Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नोटबंदीने मोडले एसटी, रेल्वेचे कंबरडे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाचशे व हजाराच्या नोटा रद्द झाल्यामुळे जिल्ह्यात एसटी महामंडळ तोट्यात तर रेल्वेची मालवाहतूक निम्म्याने घटली आहे. नोटा बदलण्यापासून तर पैसै काढणे आणि पैसा खात्यात भरण्याची आर्थिक उलाढालही गेल्या १० ते १२ दिवसात कोट्यवधींमध्ये गेली आहे. या साऱ्या स्थितीचा आढावा राज्याचे मुख्य सचिव स्वधीन क्षत्रीय यांनी घेतला आहे. चलनात सुटै पैसे उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

मुख्य सचिवांनी व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी)द्वारे राज्यभरातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून सोमवारी नोटाबंदीच्या सद्यस्थितीची माहिती घेतली. गेल्या दहा दिवसानंतर राज्यात नोटा रद्द झाल्यामुळे काय परिणाम झाला याचा आढावा आता राज्य सरकारने घेण्यास सुरुवात केली असून, त्यात कशी सुधारणा करण्यात येईल यासाठी प्रयत्न केले जात आहे याबाबत त्यांनी माहिती घेतली.

बसला फटका

नोटा रद्द झाल्यामुळे मनमाड, सिन्नर, नांदगाव, इगतपुरी, येवला, लासलगाव या बसस्थानकावर १२ ते १६ टक्के वाहतुकीत घट झाली आहे. त्यामुळे एसटीला मोठा फटका बसला आहे. त्याचप्रमाणे उर्वरित बसस्थानकावर ५ ते ८ टक्के घट झाली आहे.

रेल्वेची वाहतूक निम्मी

नाशिक जिल्ह्यातून मनमाड, येवला, लासलगाव, खेरवाडी, नांदगाव येथून मोठ्या प्रमाणात कांद्याची वाहतूक रेल्वेच्या रॅकने केली जाते. त्यामुळे या दहा दिवसात त्यात मोठी घट झाल्याचे रेल्वेचे अधिकारी सांगतात. एका रॅकसाठी रेल्वे १८ लाख ते २० लाखापर्यंत भाडे आकारते. पण कांद्याचे लिलाव बंद पडल्यामुळे त्याचा परिणाम झाला असल्याचे बोलले जाते.

भाजीपाल्यालाही फटका

नाशिक हे देशाचे किचन म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यातील भाजीपाला मुंबईसह देशातील अन्य राज्य आणि शहरांमध्ये पुरवली जातो. कांद्याबरोबरच भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाले असून, ११ ते १४ नोव्हेंबर या काळात जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद होत्या. गेल्या १-२ दिवसांपासून बाजार समित्यांमध्ये लिलाव पूर्वपदावर आले आहेत.

माहिती गोळा?

नोटा रद्द झाल्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालायतून नाशिक शहर व जिल्ह्यातील प्रमुख व्यापाऱ्यांना रोज फोन करुन व्यापारावर काय परिणाम झाला याची माहिती गोळा केली जात होती. याबाबत अनेक व्यापाऱ्यांना प्रश्न पडला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भगूरकर भोगतायेत काळ्या पाण्याची शिक्षा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

नगरपालिकेत शिवसेना सत्तेत आल्यापासून भगूरकर काळ्या पाण्याचीच शिक्षा भोगत आहेत. हीच परिस्थिती राज्यातदेखील शिवसेनेची असून, पत नसल्याने जनतेला वाऱ्यावर सोडले, असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केले.

भगूर येथील शिवाजी चौकात राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीच्या वतीने आयोजित प्रचारसभेत मुंडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी पक्षासह काँग्रेसचे शहर पदाधिकारी व सर्व उमेदवार उपस्थित होते.

मुंडे म्हणाले, जर एखादा पक्षाच्या जिल्हाप्रमुख सतत २० वर्ष त‌िच आश्वासने देत नागरिकांची दिशाभूल करून सत्तेत येत असेल, तर त्यांची जागा नागरिकांनी त्यास दाखवत सत्तेत परिवर्तन घडविणे गरजेचे आहे.

प्रास्ताविकातून अकबर सैय्यद यांनी गेल्या १६ वर्षांत गावातील प्राथमिक सुविधा वगळता अन्य काही भरीव काम झालेच नसल्याचे सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, माजी आमदार दिलीप बनकर, नाना महाले यांसह नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रेरणा बलकवडे यांची भाषणे झाली. व्यासपीठावर गोरखनाथ बलकवडे, अर्जुन टिळे, सोमनाथ खातळे, मोहन करंजकर, भारती साळवे, बी. डी. करंजकर आदी उपस्थित होते. विशाल बलकवडे यांनी आभार व्यक्त केले. सभेस मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते. सभेनंतर पथनाट्य सादर करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेरीच्या शाळेतून तोट्या लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मेरी येथील सीडीओ मेरी शाळेच्या स्वच्छतागृहात बसविलेल्या सुमारे १५ हजार रुपये किमतीच्या ४५ नळांच्या तोट्या चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. या शाळेत दुसऱ्यांदा अशा प्रकारची घटना घडली असून, शाळेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची खंत संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, शाळेत पुरेशा सुरक्षारक्षकांची नेमणूक केली असतानाही पुन्हा अशी चोरी झाल्याने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दिंडोरी रोडवरील मेरी परिसरात सीडीओ मेरी शाळा आहे. पूर्वी गजबजलेली ही मेरी कॉलनी आता पूर्ण ओसाड असल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे भुरट्या चोरांचे या परिसरात चांगलेच फावते आहे. काही महिन्यांपूर्वीही शाळेतील स्वच्छतागृहांचे नळ चोरीला गेल्याची घटना घडली होती. एक तोटी साधारणपणे शंभर ते दीडशे रुपयांना मिळते. मुख्याध्यापिका पूजा गायकवाड यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत, १७ ते १९ नोव्हेंबरदरम्यान ही चोरी झाल्याचे नमूद केले आहे. याबरोबरच शाळेच्या काचा फोडणे, शाळेच्या आवारात कचरा करणे यांसारख्या समस्यांनाही शाळा प्रशासनाला सामोरे जावे लागत आहे. पोलिस स्टेशनमध्ये पूर्वीही तक्रार दिली असली तरी पुरेसे लक्ष दिले जात नसल्यानेच अशा समस्या वारंवार घडत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

काही दिवसांपूर्वीच ग्लॅक्सो कंपनी व हॅबिटेट फॉर ह्युमॅनिटीतर्फे या शाळेत स्वच्छतागृहांचा सुधारित सेटअप उपलब्ध करून देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना याद्वारे चांगल्या सुविधा पुरविण्याकडे एकीकडे शाळा लक्ष देत असताना, दुसरीकडे अशा प्रकारच्या समस्यांचा सामनाही विद्यार्थ्यांना करावा लागत आहे.

यापूर्वी चोरी झाली तेव्हाही आम्ही तक्रार दिली होती. आता पुन्हा तशीच घटना घडली आहे. पोलिसांकडून या प्रकारणाची ज्या प्रकारे दक्षता घ्यायला हवी त्याप्रमाणे घेतली जात नसल्याने अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. या परिसराकडे पोलिसांनी लक्ष द्यावे.

- प्रा. सूर्यकांत रहाळकर, अध्यक्ष, नाशिक एज्युकेशन सोसायटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामाजिक विषमता दाखवणारे ‘वावटळ’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गरीब-श्रीमंत यांच्यातील भेद, सवर्ण व दलित यांच्यात सुरू असलेला संघर्ष पूर्वीपासून असून, त्यामुळे या दोहोमंधील दरी वाढतच चालली आहे. हे दाखवणारे ‘वावटळ’ हे नाटक सोमवारी सादर झाले. इतर दिवशी दोनच अंकी नाटक सादर झाले. मात्र, या नाटकाचे विशेष म्हणजे हे तीन अंकी नाटक होते.

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फे ५६ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत लक्ष्मण काटेलिखित ‘वावटळ’ हे नाटक सादर झाले. हे नाटक श्री शिवछत्रपती सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ संस्थेतर्फे प्रस्तुत करण्यात आले होते.

विठोबा हा दारिद्र्याने गांजलेला वृद्ध गृहस्थ आहे. तो एका शेतात झोपडे बांधून राहतो. त्याला राम नावाचा मुलगा व सीता नावाची सून असते. हे दाम्पत्य म्हाताऱ्या विठोबाला खूप जीव लावते. अगदी स्वत: न जेवता त्याला जेऊ घालणे, आजारपणामध्ये त्याची काळजी करणे, त्याला जिवापाड जपण्याचे काम हे दोघे प्रामाणिकपणे करतात. अशातच सुंदर सीतावर डोळा असलेला पाटलाचा मुलगा रामला पैशांचे आमीष दाखवून काहीबाही काम करायला लावतो. घरात पोटापाण्यासाठी अन्नाचा कण नसल्याने राम त्याचे म्हणणे ऐकतो. मात्र, त्याच्या हातून बरेवाईट घडविण्याचा पाटलाच्या मुलाचा उद्देश असतो. त्यातून त्याला सीताला बळकवायचे असते. एक दिवस पाटलाचा मुलगा येतो आणि सीताला उचलून घेऊन जातो. तिच्या खूप विनवण्या करतो, त्याचे तिच्यावर प्रेम असते. ती नकार देते. त्यामुळे नैराश्यातून तो विष पिऊन आत्महत्या करतो. इकडे पाटील मुलाच्या मृत्यूमुळे खवळून उठतो व सीताला विहिरीत ढकलून देतो. त्यात तिचा मृत्यू होतो. राम पाटलाला जाब विचारायला येतो तेव्हा तो धोंड्या दरोडेखोराचे नाव पुढे करतो. राम धोंड्याला मारायला निघतो व त्याचा खात्मा करून येतो. मात्र, त्याला विहिरीत सीताचा मृतदेह दिसतो. त्यामुळे राम वेडापिसा होतो. त्याच वेळी इकडे विठोबा पुरलेले धन रामला देऊ, म्हणून ते खणतो तर त्यात सर्व दगडधोंडे निघतात. त्या धसक्याने त्याचाही मृत्यू होतो. राम वेडा होऊन निघून जातो. अशा प्र्रकारे वावटळ येऊन त्या कुटुंबाची वाताहत होते.

या नाटकात प्रसन्न काटे, अतुल महानवर, एकाग्रता सोनवणे, किरण शिंपी, चंद्रवदन दीक्षित, सुनील सूर्यवंशी, मयूर गरुड, प्रतीक साळी, सुनीता गरुड, हर्ष गरुड, प्रवीण पाटील यांनी भूमिका केल्या. संगीत प्रा. नीलेश जाधव यांचे व नेपथ्य सुनीता गरुड, प्रतीक साळी यांचे होते. प्रकाशयोजना दिनेश चौधरी यांची होती. नाटकाचे दिग्दर्शन प्रसन्न काटे यांनी केले होते. रंगभूषा माणिक कानडे यांची होती. विशेष सहाय्य बहुरूपी कलावंत यांचे होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रांगेत मृत्यू झालेल्यांना शहीद म्हणणार का?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

देशात पाचशे, हजाराच्या नोटा बदलाच्या निर्णयामुळे जवळपास ६० लोकांनी जीव गमावला. त्या सर्वांना सरकार शहीद घोषित करणार का, असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विचारला. ते शहादा नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारसभेत बोलत होते.

सध्या संपूर्ण राज्यात नगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि माजीमंत्री आमदार वर्षा गायकवाड यांची प्रचारसभा पार पडली. यावेळी खासदार चव्हाण यांनी शहादा नगरपालिकेत काँग्रेस पक्षाची सत्ता कायम ठेवा, असे आवाहन केले. नोटबंदीच्या मुद्द्यावरून केंद्र आणि राज्य सरकारवर त्यांनी निशाणा साधला.

काँग्रेसच्या कार्यकाळात सरकार निर्णय घ्यायचे, पण जनतेला त्रास झाला, तर निर्णय मागेही घेत असे. पण सध्याचे सरकार मुस्कटदाबी करून चालविले जात आहे, असे चव्हाण यांनी सांगितले. धुळे आणि नंदुरबार काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असून येथे विरोधकांची डाळ शिजणार नाही, असा टोलाही चव्हाण यांनी मारला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे मनपात वसुलीतून १२ कोटी ८५ लाख जमा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

महापालिकेत विविध करांसाठी हजार व पाचशे रुपयांचे जुने चलन स्वीकारण्याची गुरूवारी (दि. २४) शेवटची मुदत होती. त्यामुळे मनपात करदात्यांची गर्दी फारशी दिसून आली नाही. कारण १० नोव्हेंबरपासून जुन्या नोटा स्वीकारण्यात येत असल्याने पहिल्याच दिवपासून कर भरण्यासठी मनपामध्ये नागरिकांनी गर्दी केली होती.

शेवटच्या दिवशी शहरातील वृद्ध, अपंग, आजारी असलेल्या करदात्यांसाठी ‘महापालिका आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात आला असल्याची माहिती आयुक्त संगीता धायगुडे यांनी दिली. या सुविधेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

महापालिकेत विविध कर भरण्यासाठी मनपाने काही दिवसांपासून थकीत कर दात्यांकडे धडक वसुली मोहीमही सुरू केली आहे. याद्वारे मनपाच्या तिजोरीत आतापर्यंत १२ कोटी ८५ लाख रुपये जमा झाले आहेत. नागरिकांनी कर भरण्यासाठी मोठे सहकार्य मनपाला केल्याने मनपातर्फे आयुक्त धायगुडे यांनी नागरिकांचे आभार मानले आहेत. तर ज्या नागरिकांचे कर भरणा बाकी असले त्यांनीदेखील तत्काळ भरणा करावा, असे आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात संघर्ष मूकमोर्चा उद्या

$
0
0

अॅट्रॉसिटी महामोर्चाची तयारी जाेरात

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे शहरात शनिवार (दि. २६) रोजी सकाळी दहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून अॅट्रॉसिटी संघर्ष मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चात लाखोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन दलित-आदिवासी अॅट्रॉसिटी कायदा संरक्षण समितीने केले आहे. दरम्यान मोर्चाला अनेक संघटनांनी जाहीर पाठींबा दिला आहे.

दलित-आदिवासी-मुस्लिम-भटक्या विमुक्त जमाती-ओबीसी यांच्यातर्फे अॅट्रॉसिटी कायद्याच्या समर्थनार्थ मूकमोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाचे कोणीही नेतृत्व करणार नसून समावेशक मोर्चा असणार आहे. तसेच मोर्चाचे निवेदन महिला, मुली हे उपस्थित जनसमुदायास मंचावरून संबोधित करणार आहेत. या मोर्चाचा मार्ग निश्चित करण्यात आला असून बाहेरगावहून येणाऱ्या नागरिकांसाठी ठिकठिकाणी वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. मोर्चा मध्यवर्ती बसस्थानक मार्गे पोलिस कवायत मैदान, मनोहर चित्रमंदिर, आग्रारोड, कराचीखुंट, मनपा, झाशी राणी पुतळा या मार्गाने जिल्हा कारागृहाच्या प्रवेशद्वारासमोर त्याचा समारोप होणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषीथॉन शेतकऱ्यांनी फुलला

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सातपूर

शेतकऱ्यांना बदलत्या तंत्रज्ञान व आधुनिक शेतीची माहिती व्हावी, यासाठी दरवर्षी मीडिया एक्झिबिटर यांच्यातर्फे कुंभथॉनचे आयोजन करण्यात येते. गुरुवारी ठक्कर डोम येथे शेतकऱ्यांच्या कृषी कुभांची उत्साहात सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी हजारो शेतकऱ्यांनी हजेरी लावल्याने कृषीथॉन फुलला होता. यावेळी महाराष्ट्रभरातून निवड करण्यात आलेल्या युवा शेतकरी पुरस्काराचे वितरण करण्यात आले. २८ नोव्हेंबरपर्यंत शेतकरी, शेती उद्योजक व शेती संशोधन करणाऱ्यांना कृषीथॉनचा लाभ घेता येणार आहे.

कृषीथॉनचे उद्घाटन खासदार हरिचंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर अशोक मुतर्डक, आमदार सिमा हिरे, देवयानी फरांदे, निर्मला गावीत, सॅमसोनाईटचे उपाध्यक्ष यशवंत सिंग, नाडाचे विजय पाटील, कृषी विभागाचे सहसंचालक कैलास मोते, व्यंकटेश कुलकर्णी, नगरसेवक केशव आण्णा पाटील, आश्विनी बोरस्ते, माजी महापौर प्रकाश मते व आयोजक संजय न्याहारकर उपस्थित होते.

‘शेतकऱ्यांसाठी पर्वणी असलेल्या कृषीथॉनमध्ये दरवर्षी नवीन तंत्रज्ञान व आधुनिक शेतीबाबत माहिती मिळते. युवा शेतकऱ्यांनी त्यांच्या कल्पनेतून शेतीत मिळविले यश हे सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याने येत्या काळात तरुण वर्ग शेतीकडे व्यावसायिक दृष्टीने पाहू शकेल. यासाठी कृषीथॉनसारख्या प्रदर्शनाचा त्यांनी लाभ घ्यायला हवा.’ असे खासदार चव्हाण यांनी सांगितले.

महापौर मुतर्डक यांनी शेतकऱ्यांसाठी घेण्यात येत असलेल्या कृषी कुभंबाबत न्याहारकर व त्यांच्या टिमला शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविकात शेतकऱ्यांना बदलते तंत्रज्ञान व आधुनिक शेतीबाबत माहिती व्हावी यासाठी कृषीथॉन वरदान ठरत असल्याचे सांगितले. तसेच विदेशी कंपन्यांचा सहभाग हे कृषीथॉनचे यश असल्याने न्याहारकर यांनी नमुद केले. साहिल न्याहारकर यांनी आभार मानले.

२५० स्टॉल कृषीथॉनचे आकर्षण

कृषीथॉनमध्ये लागलेले देशविदेशातील स्टॉल शेतकऱ्यांसाठी आकर्षण ठरत आहेत. शेती व्यावसायला लागणारे अवजारे, औषधी, बि-बियाणे, अत्याधुनिक यंत्रसामग्री, सिंचनसाधने, खते, फलोउत्पादन, पॅकेजिंग, फळांची साठवणूक, सौरऊर्जा, पशुखाद्य, डेअरी उपकरणे, कृषी अर्थसहाय्य योजना, कृषीविषयक पुस्तके, नियतकालिके आदींचे स्टॉल शेतकऱ्यांची गर्दी खेचत आहेत.

आधुनिक शेती व उपकरणाबांबत व्याख्यान

हवामानाच्या बदलत्या वातावरणात आधुनिक शेती कशी करावी व कुठल्या उपकरणांचा वापर असावा. तसेच कुठल्या पिकाला किंवा फळबागांना कोणती औषधी द्यावीत याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन कृषीथॉनमध्ये व्याख्यानांच्या माध्यमातून मिळणार आहे.

युवा शेतकऱ्यांनी वेधले लक्ष

महाराष्ट्रातून शेती युवा पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्या विद्यार्थी, शेती, उद्योग व संशोधन यावर युवा शेतकऱ्यांच्या व्यावसायाने सर्वच अचंबित झाले होते. विविध क्षेत्रात तरुण व तरुणींनी शेतीला व्यावसायिकतेचा दर्जा दिल्याने मेहनत घेतल्यास यश निश्चित मिळते हे दाखवून दिले. आधुनिक शेती, तंत्रज्ञान व शेती उद्योग यांच्यात काम करणाऱ्या महाराष्ट्रातील २६ युवा शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते शेती युवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यात प्रयोगशील युवा शेतकरी पुरस्कार (पुरुष गट) : गोकुळ जाधव (नाशिक विभाग), ब्रह्मदेव सरडे (पुणे विभाग), कृषिभूषण शिवराम घोडके (औरंगाबाद विभाग), हर्षद पाटील (कोकण विभाग), सचिन सारडा (अमरावती विभाग), योगेश लिचडे (नागपूर विभाग).

प्रयोगशील युवा शेतकरी पुरस्कार (महिला गट) : संगीता मालकर (नाशिक विभाग), प्रिया घोडके (पुणे विभाग), सुनंदा क्षीरसागर (औरंगाबाद विभाग), ज्योती सावे (कोकण विभाग), सिंधू निर्मळ (अमरावती विभाग).

प्रयोगशील युवा कृषी संशोधक पुरस्कार : डॉ. धनराज चौधरी (नाशिक विभाग), डॉ. अभिनंदन पाटील (पुणे विभाग), डॉ. सुभाष घोडके (औरंगाबाद विभाग), डॉ. विवेक वर्तक (कोकण विभाग), डॉ. संतोष पाटोळे (अमरावती विभाग), डॉ. मुकेश कापगते (नागपूर विभाग).

प्रयोगशील युवा कृषी उद्योजक पुरस्कार : शंतनू पाटील (नाशिक विभाग), शरद लाड (पुणे विभाग), किरण आहेर (औरंगाबाद विभाग), प्रसाद सावे (कोकण विभाग), आशिष आवटे (अमरावती विभाग), वैभव उघडे (नागपूर विभाग).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अटीतटीतही जुन्या मशिन सुसाट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड प्रेसला चांगल्या प्रतीचा कच्चा माल आणि आधुनिक मशिन्स मिळाले तर उच्च प्रतिच्या नोटांची छपाई करून उत्पादनाचे लक्ष गाठू. तांत्रिक अडचणी असतानाही १३ ते २४ नोव्हेंबर दरम्यान नाशिकरोड प्रेसमध्ये तीनशे दशलक्ष नोटांचे उत्पादन करण्यात आल्याची माहिती प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे आणि कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

प्रेस महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण गर्ग यांनी नाशिकरोड प्रेसला भेट देऊन उत्पादन आणि समस्यांची माहिती घेतली. त्यावेळी त्यांच्याशी झालेल्या चर्चेची माहिती गोडसे यांनी दिली.

जादा उत्पादन देणार

गोडसे म्हणाले की, नाशिकरोड प्रेसमध्ये पाचशेचे उत्पादन दुपटीने वाढविले जाणार आहे. त्याचबरोबर १०, २०, ५० या नोटांच्या छपाईचेही काम वाढणार आहे. नाशिकरोड प्रेसची तुलना रिझर्व्ह बँकेच्या कामाशी केली जाते. मात्र, बँकेच्या दोन्ही प्रेस अलिकडे सुरू झाल्या असून, मशिनरीही अत्याधुनिक आहेत. नाशिकरोड प्रेसच्या मशिनरी जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे ब्रेकडाऊनचे प्रमाण वाढले आहे. तसेच आधुनिकीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे. रिझर्व बँकेच्या दोन्ही प्रेसला चांगल्या प्रतिची शाई मिळते. प्रसंगी परदेशातूनही ती आयात करता येते. नाशिकरोड प्रेसला भारतीय शाई वापरावी लागते. चांगला कच्चा माल आणि आधुनिक मशिन्स दिल्या तर देशाच्या उत्पादनात भर पडेल.

‘डे-ला-रु’ला विरोध

करन्सी व सिक्युरिटी कागदपत्रे छापण्यात आघाडीवर असलेल्या ब्रिटीश डे-ला-रु कंपनीला महाराष्ट्र शासनाने औरंगाबाद येथे जागा दिली आहे. या कंपनीला नोटा व अन्य सुरक्षा कागदपत्रे छापण्याची परवानगी देऊ नये, प्रेस कामगारांना टार्गेट अलाऊन्स मिळावा, सातवा वेतन आयोग त्वरित मिळावा, नवी कामगार भरती करावी आदी मागण्यांवर गांर्भीयाने विचार व कृती करण्याचे आश्वासन गर्ग यांनी दिले.


कामगारांना रोख पगार

देशात नोट टंचाई असताना प्रेस कामगारांनी दररोज जादा काम केले. दोन रविवारी सुटी घेतली नाही. त्याबद्दल प्रवीण गर्ग यांनी कामगारांचे कौतुक केले. नोटा छापणाऱ्या कामगारांनाच सुट्या पैशांची समस्या भेडसावत आहे. ‘मटा’ने याबाबत वृत्त दिले होते. त्याची दखल घेत सरकारने परिपत्रक काढले आहे. त्यानुसार नाशिकरोड प्रेस कामगारांना दोन दिवसात पगारापोटी रोख दहा हजाराची रक्कम रोख मिळणार असल्याची माहिती गोडसे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीब‌िल रीडिंग ऑनलाइन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेकडून पाणीपट्टीची बिले वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी थांबण्याची चिन्हे दिसत आहेत. स्मार्ट सिटी योजनेतंर्गत पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेत अामूलाग्र बदल होणार असून, पाणीबिलाचे रीडिंग ऑटोमॅट‌िक करण्याचे प्रयत्न महापालिकेने सुरू केले आहेत. टाटा कंन्सलटन्सी सर्व्हिसेसकडून इनोव्हेशन सेंटरमध्ये यासंदर्भातील संशोधन करण्यात येत आहे. नव्या अॅटोमॅट‌िक मीटर रीडींग (एएमआर)मध्ये थेट डिव्हाईस बसवून त्याचे पाणीवापराचे रीडिंग केले जाणार आहे. महापालिका व टीसीएस यावर एकत्र‌ित काम करित आहे. टीसीएसच्या या संशोधनाला यश आल्यास पाणीब‌िलाचे आऊटसोर्सिंगचा अडीच कोटींचे प्रस्ताव बारगळणार आहे.

महापालिकेत सध्या पाणीबीलाच्या सर्वाधिक तक्रारी आहेत. शहरात पाणीपट्टीचे एक लाख ८५ हजार ग्राहक असून, पाणीबील दर तीन महिन्यांनी दिले जाते. परंतु पालिकेकडे मनुष्यबळ नसल्याने ग्राहकांना पाणीपट्टीचे बीलच मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. काही ग्राहकांना तर दोन दोन वर्ष बिल मिळत नाही. तर अनेक वेळा एकत्रीत बिल मिळाल्यास ग्राहक आणि पालिकेत संघर्ष निर्माण होतो. त्यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने नुकतेच ब‌िल रीड‌िंग व त्याचे वाटप करण्यासाठी आऊटसोर्सिंगचा प्रस्ताव ठेवला होता. अडीच कोटी रुपये खर्चाचे हे काम खासगी कंपनीला देण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव महासभेनेही मंजूर केला आहे. संबंधित कंपनीचे कर्मचारीच रीडिंग घेवून बिल पोहचते करणार होते. तसेच जागेवरच बिलाची वसुली होणार होती.

मात्र नाशिकचा समावेश स्मार्ट सिटी योजनेत झाल्यानंतर आता पाणीपट्टीच्या बिल‌िंग पद्धतीत बदल करण्याचा पाणीपुरवठा विभागाचा विचार आहे. त्यासाठी महापालिकेने टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस सोबत करार केला असून, टीसीएसने नाशिकमध्ये इनोव्हेशन सेंटर सुरू केले आहे. त्यात महापालिकेच्या विविध विभागांसाठी संशोधन करण्यात येत आहे. त्यात अॅटोमॅट‌िक मीटर रीडिंगवरही संशोधन सुरू आहे. त्यानुसार पाणीमीटरमध्ये थेट डिव्हाईस बसवून बिलिंग ऑनलाइन करण्यावर काम सुरू आहे. या अॅटोमॅट‌िक रीडिंग मीटरचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यासमोर सादरीकरण करण्यात आले आहे. या रिंडीगबाबत आयुक्तही सकारात्मक आहेत. त्यामुळे सध्या बीलांचे आऊटसोर्सिग संदर्भातील पालिकेचा अडीच कोटी प्रस्ताव तुर्तास थांबवला आहे.

खरेदी कोण करणार

टीसीएसचा हे संशोधन यशस्वी झाल्यास महापालिकेवरील ताण कमी होणार असला तरी, या हे अॅटोमॅट‌िक मीटर रीडिंग कोण खरेदी करणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. या मीटरची किंमत साधारण दहा हजाराच्या वर राहणार आहे. त्यामुळे ही खरेदी कोट्यवधीत राहणार असून, त्याचा भार नागरिकांवर टाकायचा की, महापालिकेने सोसायचा यावर विचार मंथन सुरू आहे. नागरिकांवर भार टाकल्यास त्याला विरोध होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे महापालिकाच ते खरेदी करतील अशी शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी महिलांचा घेराव

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक महापालिकेत समाविष्ट असलेल्या पिंपळगाव बहुला गावठाण भागाकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. मागील अनेक महिन्यांपासून गावात पिण्याचे पाणी मिळत नसल्याने महिलांच्या संयमाचा बांध गुरुवारी फुटला. महिलांनी रौद्रावतार धारण करीत स्थानिक लोकप्रतिनिधींबरोबरच महापालिकेच्या अधिकायाऱ्यांना घेराव घालून जाब विचारला. आठवड्याभरात पाणीप्रश्न सुटला नाही, तर पुढील गुरुवारी महापालिकेच्या सातपूर कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्याबरोबरच अधिकाऱ्यांना बांगड्यांचा अहेर दिला जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

गावठाण क्षेत्रात मागील अनेक महिन्यांपासून पाण्याचा अत्यल्प पुरवठा महापालिकेकडून केला जात आहे. खासकरून उंचावरील भाग असलेली धात्रक आळी, भावले गल्ली, थेटे गल्ली, नागरे गल्ली, कोळीवाड्याचा संपूर्ण परिसर, तसेच नव्याने निर्माण झालेल्या वसाहतीला पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. पाण्याच्या पाइपलाइनपेक्षा खालच्या पातळीवर खड्डे करूनही पाणी येत नाही. त्यामुळे गुरुवारी संतापलेल्या महिलांनी अखेर स्थानिक नगरसेविका सुरेखा नागरे यांचे पती गोकुळ नागरे यांना बोलावून घेत, त्यांना अपुऱ्या पाणीपुरवठ्याबाबत जाब विचारला. नागरे यांनी महिलांची समजूत काढत, त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गावातीलच रहिवासी प्रकाश नागरे यांनाही घेराव घालून त्यांनाही जाब विचारण्यात आला. प्रकाश नागरे यांनीच नवी पाइपलाइन अडवून ठेवल्याचा आरोप करण्यात आला. पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनला कुणी अडथळा करीत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही महिलांनी केली. सातपूरच्या वाढत्या लोकवस्तीत पिंपळगाव बहुला शिवारात लोकवस्ती वाढली आहे. परंतु, ज्या गावाच्या उशाशी गंगापूर धरण आहे, तसेच ज्यांच्या शेतजमिनींवर लोकवस्ती वाढली त्याच गावाकडे महापालिका दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही महिला, तसेच ग्रामस्थांनी केला.

...तर थेट कारवाई

पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता ए. व्ही. जाधव तातडीने घटनास्थळी दाखल झाले. महिलांची पाण्याची मागणी रास्त असून, गावात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची कबुली उपअभियंता ए. व्ही. जाधव यांनी दिली. पाइपलाइनच्या कामात अडथळा न आणण्याचे आवाहनही त्यांनी ग्रामस्थांना केले आहे. तर, महापालिका क्षेत्रातील रहिवाशांसाठी असलेल्या पाइपलाइनच्या कामात कुणी अडथळा आणत असेल तर त्यांना नोटीस बजावून त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल केले जातील, असे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.


‘त्या’ आंदोलनाची पुनरावृत्ती?

पंधरा वर्षांपूर्वीही पिंपळगाव बहुल्यात पाणीप्रश्नी महिलांनी महापालिकेच्या सातपूर कार्यालयावर धडक दिली होती. तेव्हा हंडा मोर्चा काढतानाच महापालिका अधिकाऱ्यांना बांगड्यांचा अहेर देण्यात आला होता. महिलांचा रौद्रावतार पाहून महापालिका अधिकाऱ्यांना पळताभुई थोडी झाली होती. हे आंदोलन संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरले होते. आता त्याच आंदोलनाची पुनरावृत्ती करण्याचा इशारा महिलांनी दिला आहे.

---

मटा भूमिका
यंदा पावसाने कृपा केल्याबद्दल आपण आपलीच पाठ थोपटून घेत असलो तरी महापालिकेच्या हद्दीतील गावठाण भागात भर हिवाळ्यात सुरू झालेल्या पाणीबाणीमुळे अनवस्था प्रसंग तर उभा ठाकला आहे. मनपा प्रशासन पाणी पुरवठ्यात अपयशी ठरत असल्याचेही त्यातून स्पष्ट झाले आहे. पालिकेची स्थापना होऊन तब्बल ३४ वर्षांचा कालावधी उलटला आहे. पाण्यासाठी विविध भागात झालेल्या महिलांच्या उद्रेकाने, तेव्हा पालिकेत समाविष्ठ झालेल्या २३ खेड्यांच्या समस्या मात्र आजही जैसे थे असल्याचेच अधोरेखित झाले आहे. कमी दाबाने पाणीपुरवठा होणे, अजिबातच न होणे यासारख्या अडचणी तर नित्याच्याच आहेत. अनेक भागात आजही टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. इतर समस्यांची स्थितीही अशीच या भागाला सापत्नभावाची वागणूक देणारी आहे. स्मार्ट सिटीकडे झेपावतांना हा मुद्दा गांभार्याने पहावयास हवा, अन्यथा पालिकेतून बाहेर पडण्याची मागणी जोर धरू शकेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्यानांच्या साफसफाईला अखेर लागला मुहूर्त

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या २८२ उद्यानांची साडेसाती अखेर संपली आहे. खासगी ठेकेदारांनी या उद्यानांची देखभाल व दुरुस्तीच्या कामाला गुरुवारपासून सुरुवात केली आहे. त्यामुळे ही उद्याने पुन्हा एकदा फुलणार, येथे येणाऱ्या ज्येेष्ठांसह बालगोपालांचा विरंगुळा होणार आहे.

महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या उद्यानांच्या देखभाल व दुरुस्तीचा प्रस्ताव दोन वर्षांपासून रखडलेला होता. त्यामुळे शहरातील उद्यानांची दुरवस्था झाली होती. या उद्यानांची देखभाल ठेकेदाराला द्यायची की बचत गट या वादातच एक वर्ष निघून गेले. अखेर खासगी ठेकेदाराला काम देण्यात येवून ६० टक्के काम बचत गटांना देण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर ठेकेदाराला ऑर्डर देण्यात आली असून, ठेकेदाराने कामाला सुरूवात केली आहे. गुरुवारी पंचवटी, नाशिकरोड, नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व, सिडको व सातपूरमधील उद्यानांच्या दुरुस्तला सुरुवात करण्यात आली आहे.

येथे कामांना सुरुवात

पूर्व विभागातील सिटी गार्डन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, नाशिक पश्चिम विभागातील तेजोप्रभा सोसायटी उदयान, राजीव गांधी भवन उद्यान, उत्कर्ष कॉलनी उद्यान, पंचवटी विभागात प्रमोद महाजन उद्यान, सरस्वती नगर, हनुमान नगर उद्यान, केवडीवन उद्यान येथे कामास सुरवात करण्यात आली. पंचवटी विभागात उद्यान देखभालीचे कामात आज प्रभाग क्र. ११ मधील संत जनार्दन स्वामी उद्यान, प्रभाग ७ मधील बक्षी पार्क उद्यान, ५ मधील प्रभात नगर उद्यानात साफसफाई करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कुतूहल असेपर्यंतच माणसाचे अस्तित्व’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘कुतूहल ही माणसाला निसर्गाकडून मिळालेली देणगी आहे. सर्वच सजीव या देणगीचे धनी नाहीत. जोपर्यंत कुतूहल जागृत असते तोपर्यंतच माणसाचे खरे अस्तित्व असते. माणूसपण टिकविण्यासाठी तुमच्याजवळचे निसर्गदत्त कुतूहल कायम जागृत ठेवा. ज्ञान संपादन करा आणि मानव जातीला अधिकाधिक समृध्द बनवत चला’ , असे प्रतिपादन ज्येष्ठ विज्ञान लेखक व संगणक तज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी केले.
विश्वास बँकेच्या वतीने शंकराचार्य न्यास येथे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. गोडबोले म्हणाले, ‘माणसाने कायम विद्यार्थी म्हणून जगायला हवे. तुम्ही विद्यार्थी म्हणून जगतात त्यावेळी तुमच्या मनाची कवाडे उघडी असतात. अन् ज्याच्या मनाची कवाडे असतात तोच मनुष्य ज्ञानसंपन्न बनू शकतो. घरातल्या कलासक्त वातावरणाने मला संपन्न विचारांचा वारसा दिला. साहित्यातील दिग्गज माणसांची सावली घरातील वातावरणामुळे लहानपणीच माझ्यावर पडली. आमच्या घरातील संस्कारांनी आम्हाला कधीही भेदाभेदाची दृष्टी दिली नाही, त्यामुळे मी बिनदिक्कत विश्वामध्ये संचार करू शकलो.’
लेखनाबाबत बोलताना त्यांनी सांगितले, ‘सर्वंकष लेखनावर माझा भर आहे. कधीही व्यावहारिक दृष्टीकोन ठेवून मी लिखाण केलेले नाही, ते माझे उद्दीष्टही नाहीच. केवळ विविध विषयांबाबत माणसांना आवड निर्माण व्हावी, या भावनेपोटी सोप्या अन् सरळ भाषेत लिहीण्यावर माझा भर राह‌िला. विशेषत: माझ्या लेखनावर अमेरिकन लेखकांचा पगडा राह‌िला, त्यातही बिल ब्रायसन, कार्ल सगान, स्टिफन हॉकिंग अशा अमेरिकन अन् आणि ब्रिटिश लेखकांचा यात समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कठीण समय येता, कन्याच कामास येते

$
0
0


डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड

लोक कितीही प्रगत झाले, विज्ञानयुगाच्या गप्पा मारत असले आणि कितीही उच्च शिक्षण घेतले, तरी अटीतटीची वेळ येताच समाजाच्या रुढी-परंपरांपुढे मान तुकवावीच लागतेच. तथापि, नाशिकरोड येथील देशमुख समाजातील पुरोगामी विचारांच्या महिलेने कालबाह्य रीतीरिवाज बाजूला ठेवून आईवर अंत्यसंस्कार करण्याचे धारिष्ट्य दाखवले, तसेच दशक्रिया आणि अन्य विधीही स्वतःच करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या नवीन प्रथेचे स्वागत होत आहे.

नयना अविनाश देशमुख ही ती पुरोगामी महिला आहे. त्या नाशिकरोडला राहतात. त्यांच्या मातोश्री शशिकाला भास्करराव पवार (वय ७३) यांचे नुकतेच निधन झाले. शशिकला यांचे परधाडी (ता. नांदगाव) येथे अनेक वर्षांपासून वास्तव्य होते. त्या परधाडीत पोस्टमास्तरही होत्या. त्यांचे पती भास्करराव हे तेथे १५ वर्षे सरपंच होते. त्यांना एक मुलगा आणि नयना देशमुख व ललिता काळे या विवाहित कन्या आहेत.

सुशिक्षित कुटुंब

नयना यांचे पती अविनाश हे महापालिकेत नगरसचिव होते. या दाम्पत्यास तीनही मुलीच आहेत. हे कुटुंब सुशिक्षित आणि प्रगत विचारांचे आहे. नयना यांच्या मावस सासऱ्यांचे निधन झाल्यावर त्यांच्यावर कविता देशमुख या त्यांच्या मुलीने अंत्यसंस्कार केले होते. ते उदाहरण नयना यांनी आपल्यासमोर ठेवले.


धाडसी निर्णय

शशिकला आजारी असल्याने परधाडीहून नाशिकरोडला नयना यांच्याकडे राहण्यासाठी आल्या. चार महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांचे निधन झाले, तेव्हा परगावी असलेला मुलगा आला पण, थोड्या वेळाने निघून गेला. अंत्यसंस्कार कोणी करायचे ही गहन समस्या उभी ठाकली. कारण, देशमुख समाजातील महिलांनी स्मशानभूमीत जाण्याची आणि अंत्यसंस्कार करण्याची प्रथाच नाही. मात्र, नयना यांनी प्रिय आईसाठी कालबाह्य रुढी बाजूला ठेवल्या. आईवर अंत्यसंस्कार केले. आता दशक्रिया व अन्य विधीही त्याच करणार आहेत. त्यासाठी त्या गुरुंजीकडे गेल्यावर तेही गोंधळात पडले. मात्र, त्यांनी ज्येष्ठ गुरुजींचा सल्ला घेऊन मार्गदर्शन केले. नंतर नयना यांचे कौतुकही केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकचे ‘डॉन’ फरार...

$
0
0


सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

‘डॉन को पकडना मुश्किल ही नहीं नामुनकीन हैं’, ‘डॉन इन नाशिक’ अशी पोस्टर्स शहरात लावून ‘डॉन’ शहरात येणार असल्याचा प्रचंड गवगवा करण्यात आला होता. ‘डॉन’ कोण असणार, याचाही बराच सस्पेन्स शहरात वाढविण्यात आला होता. त्यानंतर ‘डॉन’ म्हणजे ‘दोस्त ऑफ नाशिक’ असून, शहरातील ट्रॅफिक सुधारणेसाठी हे ‘डॉन’ कार्यरत राहणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, सध्या हे ‘डॉन’ गायब असल्याने त्यासंबंधीची सुरुवातीची चमकोगिरी आणि सध्याच्या हाराकिरीची चर्चा सध्या नाशिककरांमध्ये रंगत आहे.

नाशिक फर्स्ट व पोलिस आयुक्तालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम नाशिककरांसाठी तयार करण्यात आला आहे. मात्र, ज्या पद्धतीने ‘डॉन’ची कन्सेप्ट नाशिककरांसमोर आणण्यात आली, त्या पद्धतीने ती वास्तवात वापरली जात नसल्याचे नाशिककर सांगत आहेत. सध्या अनेक ठिकाणी वाहतुकीचे गैरप्रकार वाढत असून, ट्रॅफिकच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. असे असतानाही शहरातील ‘डॉन’ पुढाकार घेत नसून, कुठे फरार आहेत, असा सवाल उपस्थित होत आहे.

जून २०१६ पासून कॉलेजेसचे प्राचार्य, निवडक प्राध्यापक व कॉलेजियन्स यांच्या समवेत अनेक मीटिंग्ज घेत ‘डॉन’ ही संकल्पना वेगवेगळ्या पद्धतीने नाशिककरांना सांगण्यात आली होती. त्यानंतर काही पोस्टर शहरात लावून ‘डॉन इन नाशिक’चा गवगवाही करण्यात आला. गेल्याच महिन्यात पोलिस आयुक्त डॉ. रवीद्र सिंघल, ट्रॅफिकचे डीसीपी विजय पाटील, नाशिक फर्स्टचे अभय कुलकर्णी यांनी ‘डॉन’ नेमके कोण असणार आहेत, त्यांचे काम काय, याबाबत माहिती व उपक्रम सर्वांसमोर आणला होता.

ट्रॅफिक व्यवस्थेला शिस्त लागावी यासाठी मोठ्या प्रमाणावर ‘डॉन’चा सस्पेन्स तयार करून नाशिककरांची उत्सुकता वाढवली गेली होती. मात्र, घोषित केलेले ‘डॉन’, तसेच इतर ‘डॉन’ही शहरात कुठेच दिसत नसल्याने नाशिककरांचा सस्पेन्स कमी झाला आहे. ‘डॉन’ नाशिकमध्ये आहे का?, नाशिककरांना प्रोत्साहित करणारे ‘डॉन’ दिसणार तरी कधी, असे सवाल नाशिककर करत आहेत.

शहरातील अनेक भागात होणारी रॅश ड्रायव्हिंग, हेल्मेट न घालणे, सीट बेल्ट न लावणे, ट्रिपल सीट, विनापरवाना व विनाकागदपत्रांची वाहने चालवणे हे प्रकार शहरात वाढत असल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीतही ‘डॉन’ फरार झाल्याचे जाणवत आहे. ‘डॉन’ ही परिस्थिती सुधारण्यासाठी नेमका पुढाकार घेणार तरी कधी, की डॉन कायमचे फरार झालेत, असा प्रश्न नाशिककर व यूथ विचारत आहेत.


अशी आहे कन्सेप्ट...

शहरातील प्रत्येक क्षेत्रातील मान्यवर अशा सुमारे चोवीस व्यक्तींना ‘डॉन’ म्हणून यावेळी घोषित केले गेले. त्यानंतर या ‘डॉन्स’ना, तसेच निवडक कॉलेजियन्स प्रतिनिधी व प्राध्यापकांना ‘मैं हूँ डॉन’ असे स्टिकर्स बाइक्स व वाहनांना लावण्यासाठी दिले होते. हे स्टिकर्स लावल्यावर त्यांनी स्वतः वाहतुकीचे सर्व नियम पाळून इतरांनाही वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी प्रोत्साहित करायचे, अशी ही संकल्पना होती. मात्र, अजूनही शहरातील मुख्य ‘डॉन’मधील काही जणांच्या वाहनांना हे स्टिकर नसल्याचे नाशिककर सांगतात. कॉलेजियन्स प्रतिनिधींना विचारले असता, स्टिकर लावण्यास अजून सांगितले नाही. कॉलेजमध्ये काही सेमिनार घेऊन मग स्टिकर लावायचे आहे, असे सांगितले. अद्याप असा कार्यक्रम कॉलेजमध्ये झाले नाहीत. त्यामुळे याबाबतचा इंटरेस्ट यूथमधून आता कमी होत आहे, अशी प्रतिक्रिया यूथ देत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कल्चर क्लब सदस्य व्हा अन् फ्री पासेस मिळवा!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे नेहमीच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. अशाच कार्यक्रमांची मेजवानी कल्चर क्लबला दोन वर्षे पूर्ण होत असल्याने ‘मटा’ यंदाही घेऊन येत आहे. याची सुरुवात राजस्थानी नृत्याच्या डान्स शोद्वारे सदस्यांना घेता येणार आहे. गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात रविवारी (दि. २७) सायंकाळी ५.३० वाजता हा कार्यक्रम होणार असून, कल्चर क्लब सदस्यांना याचे मोफत पास देण्यात येणार आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबअंतर्गत अनेक कार्यक्रम घेण्यात आले. विविध सेमिनार, वर्कशॉप, स्पर्धा, मनोरंजनात्मक कार्यक्रम आदींचा यामध्ये समावेश होता. या वर्षीही अशाच स्वरूपाचे अनेक कार्यक्रम घेतले जाणार आहेत. कल्चर क्लब कार्ड रिन्युअल केलेल्या व जे नव्याने सदस्य होऊ इच्छित आहेत, अशा सर्वांना या कार्यक्रमाचे पास फ्रीमध्ये मिळू शकणार आहेत.

नाशिक जिल्हा अग्रवाल महिला मंडळाच्या वतीने बारादिवसीय राजस्थानी नृत्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. घुमर, गोरबंद, बोजूबंद, कलबेलिया, डांगलिला, खंजिरी, भवाई, आगचारी, फुलचारी, हंसमारी, हरियो रुमाल, ढोलकढी असे राजस्थानी नृत्यातील प्रसिद्ध नृत्यप्रकार या शिबिरात उदयपूर येथील प्रचलित कोरिओग्राफर गुरुमा शंकुतला यांनी शिकवले आहेत. आता या ग्रॅण्ड शोमध्ये या सर्व प्रकारांचे सादरीकरण होणार आहे. आजच कल्चर क्लबचे सदस्य व्हा किंवा कार्ड रिन्यू करा आणि या कार्यक्रमांचे सुमारे तीनशे रुपयांचे पास मोफत मिळवा, असे आवाहन करण्यात आले आहे.

गेट टूगेदरची लुटा मजा

कल्चर क्लब सदस्य असणाऱ्यांना २९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या गेट टूगेदरमध्येही मोफत प्रवेश मिळू शकणार आहे. तिडके कॉलनीतील ऋग्वेद मंगल कार्यालयात दुपारी ४ वाजता हा कार्यक्रम होईल. कल्चर क्लबचे सदस्य होण्यासाठी २९९ रुपयांचा चेक महाराष्ट्र टाइम्सच्या ऑफिसमध्ये सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत भरून कल्चर क्लबची मेंबरशिप मिळविता येणार आहे.



कल्चर क्लब सदस्य होण्यासाठी

फेसबुक लिंक - https://www.facebook.com/MTCultureClub

टि्वटर लिंक - https://twitter.com/MTCultureClub

टीप - कल्चर क्लबच्या वेबसाइटवर जाण्यासाठी हा कोड तुमच्या मोबाइलवर स्कॅन करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गिरीश मुदलीयारसह १५ जणांविरुद्ध गुन्हा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

शिखरेवाडीतील बालाजी मंदिराचे अतिक्रमण काढण्यास गेलेल्या महापालिकेच्या पथकाला शिव‌िगाळ करुन धमकी दिल्याप्रकरणी, तसेच सोशल मीड‌ियाद्वारे बदनामीकारक मजकूर व्हायरल केल्याप्रकरणी मंदिराचा विश्वस्त गिरीश मुदलीयार तसेच पंधरा कार्यकर्त्यांविरुद्ध उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिका उपायुक्त रोहिदास बहिरम यांनी याबाबत तक्रार दिली होती.
तक्रारीचा आशय असा, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने बालाजी मंदिर नुकतेच जमीनदोस्त करण्यात आले. बहिरम यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. मोहिमेसाठी महापालिकेचे पथक गेले असता गिरीश मुदलीयार, विशाल कुलथे, सुनील उपाध्ये, राजेश मुदलीयार, हेमंत जयस्वाल, महेंद्र आहिरे, महेंद्र बोराडे, दीपक बोडके, सागर चव्हाण, अविनाश चव्हाण, सुखदेव लोंढे, श्रीकांत शाहीर, महेश कुलकर्णी, प्रवीण गोऱ्हाणी, परेश पटेल आदींनी जमाव जमवला. महापालिका अधिकारी व कर्मचारी यांना शिव‌िगाळ करुन धमकी दिली. शासकीय कामकाजात अडथळा आणला. नंदन भास्कर, मयूर दिवे व आकाश कदम यांनी फेसबुक, व्हॉटस अॅपद्वारे महापालिकेविषयी बदनामीकारक मजकूर प्रसिध्द केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. उमेश मराठेला कारागृहात हलविले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड
बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीचा गर्भपात केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या डॉ. उमेश मराठेला गुरुवारी जिल्हा रुग्णालयातून नाशिकरोड कारागृहात हलविण्यात आले.
नगरसेवकपुत्र अजिंक्य शिवाजी चुंभळे याने विवाहाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप एका तरुणीने केल्यानंतर पोलिसांनी चुंभळेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या तरुणीचा डॉ. उमेश मराठेने गर्भपात केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. मराठे याला कोर्टाने बुधवारी न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र, कोठडीत नेत असतानाच प्रकृती बिघडल्याचे कारण दिल्याने मराठेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज प्रकृती सुधारताच त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
खुनाचा तपास संथ
शहरातील महत्वाच्या असलेल्या गंगापूररोडच्या जेहान सर्कलला लागून असलेल्या सिटी बँकेसमोर सुधा दिनकर दफ्तरी या वयोवृद्ध महिलेचा खून झाला होता. यानंतर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या तपासणीवरून गंगापूर पोलिसांनी खुनाचा गुन्हाही दाखल केला होता. परंतु तपासाची गती संथ का आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी याकडे लक्ष घालावे, अशी अपेक्षा गंगापूररोडवासियांनी केली आहे.
जेलमध्ये कैद्याचे निधन
नाशिकरोड कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या नागपूर येथील कैद्याचे गुरुवारी दुपारी हृदयविकाराने निधन झाले. नाशिकरोड पोलिस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, १९८१च्या एपीडीए कायद्याखाली नागपूर येथील अतुल प्रकाश थूल हा नाशिकरोड कारागृहात होता. त्याला गुरुवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्याच्यावर कारागृहात उपचार केले. मात्र, त्याचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर पोलिसांनी आणले स्वाइप मशीन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटांपासून सुटका आणि दोन हजारांच्या नव्या नोटेमुळे होणारी सुट्यांची कटकट या त्रासाला कंटाळून आता वाहतूक पोलिसांनी थेट स्वाइप मशीनच आणले आहे. त्यामुळे वाहनचालकाच्या बँक खात्यातून रक्कम थेट पोलिसांच्या खात्यावर वळती होत आहे. यातून दंडाची रक्कम कमी करण्याची वाहनचालकांची विनंतीही हद्दपार झाली आहे.

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर नाशिक शहर वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जातो. विविध चौक आणि मुख्य रस्त्यांवर उभे राहणारे वाहतूक पोलिस मोटार वाहन कायद्याच्या उल्लंघनाबाबत वाहनधारकांना दंड करतात. मात्र, केंद्र सरकारने ५०० आणि १००० रुपयाची नोट चलनातून बंद करण्याचा निर्णय दोन आठवड्यांपूर्वी घेतला. त्यामुळे १०० च्या नोटांचा मोठा तुटवडा चलनात आहे, तर सरकारने २००० रुपयांची नवी नोट चलनात आणली आहे. मात्र, वाहनधारकास दंड आकारल्यास संबंधितांकडून २००० रुपयांची नोट वाहतूक पोलिसांना देऊ केली जात होती. सुट्या पैशांअभावी संबंधित वाहनचालकास सोडून द्यावे लागत होते, तर अनेक वाहनधारक ५०० आणि १००० रुपयाची नोट वाहतूक पोलिसांकडे सोपवत होते. यामुळे वाहनधारक आणि पोलिस यांच्यात वादविवादही होत होते. परिणामी, वाहतूक पोलिसांचा महसूल लक्षणीयरीया घटला आहे. ऑक्टोबर महिन्यात वाहतूक पोलिसांनी १६ हजार १८० वाहनधारकांवर कारवाई केली. म्हणजेच, दिवसाला सरासरी ५२१ वाहनधारकांवर कारवाई केली. मात्र, नोटाबंदीच्या निर्णयानंतर वाहतूक पोलिसांनी गेल्या १२ ते १३ दिवसांत सरासरी अवघ्या २५० ते ३०० वाहनधारकांवर कारवाई केली आहे. या साऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आता थेट स्वाइप मशीनच आणले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मदतीने १२ स्वाइप मशीन पोलिसांना उपलब्ध झाले आहेत. यासंबंधीचे एक प्रशिक्षणही शहर वाहतूक पोलिसांना देण्यात आले आहे.

असे चालते कामकाज

वाहतूक पोलिसांच्या मोबाइलमध्ये Ezetab नावाचे मोबाइल अॅप डाऊनलोड करण्यात आले आहे. ब्लू टूथद्वारे स्वाइप मशीन कनेक्ट होते. वाहनधारकाला दंड करण्यावेळी त्याच्याकडील क्रेडिट कार्ड किंवा एटीएम कार्ड मशीनमध्ये स्वाइप केले जाते. तत्काळ कार्डधारकाला मेसेज येतो, की त्याचा बँक खात्यातून किती पैसे कट झाले आहेत. त्याच वेळी मोटार वाहन कायद्याच्या कुठल्या नियमांतर्गत दंड आकारण्यात आला, त्याचे चलन वाहतूक पोलिस वाहनधारकाला देतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटाबंदीचा ग्रंथयात्रेला फटका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहराचे सांस्कृतिक संचित जपायचे असेल तर ग्रंथविक्रीला वाव दिला पाहिजे. शहरात बाहेरून ग्रंथ विक्रीसाठी येतील अशी व्यवस्था करून नाशिककर, तसेच पंचक्रोशीतील रसिक ग्रंथ विकत घेण्यासाठी उद्युक्त होतील, असा कार्यक्रम आखला पाहिजे, याच उदात्त हेतूने नोव्हेंबर महिन्यात आयोजित ग्रंथयात्रा नोटाबंदीच्या आदेशाच्या वादळात उधळून गेली आहे.

सांस्कृतिक संचितापेक्षा लोक सध्या पोटापाण्याला प्राधान्य देत असल्याचा परिपाकच यानिमित्ताने सामोर आला आहे. ही ग्रंथयात्रा प्रकाशक व साहित्यिकांच्या सहभागाअभावी स्थगित करण्यात आली आहे.

नाशिक महापालिकेतर्फे २ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत ग्रंथयात्रा आयोजित करण्यात आली होती. या ग्रंथयात्रेचे उद््घाटन सदानंद मोरे यांच्या हस्ते प्रस्तावित होते, तर समारोपाला ज्येष्ठ साहित्यिक गणेश देवी यांची उपस्थिती लाभणार होती. या उपक्रमासाठी महापालिकेतर्फे ३५ लाखांची तरतूदही करण्यात आली होती. ठक्कर डोम येथे भव्य स्वरूपात होणाऱ्या या ग्रंथयात्रेत २०० स्टॉल्स उभारण्यात आले होते. मात्र, मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या आदेशामुळे केवळ २४ स्टॉल्सचे बुकिंग झाल्याने व प्रकाशक व साहित्यिकांनी या ग्रंथयात्रेस येण्यास नकार दिल्याने ही ग्रंथयात्रा स्थगित करण्यात आली.

वाचाल तर वाचाल, असे सांगणारे ग्रंथ हे माणसाला सुजाण बनवतात. माणूस सुजाण बनला तर तो विकासाचा विचार करू शकतो आणि माणसाचा विकास म्हणजे शहराचा विकास अशी ही शृंखला असल्याने केंद्रभागी असलेल्या ग्रंथांची भव्य यात्राच नाशिकमध्ये भरविण्याचा महापालिकेचा मानस होता. मात्र, नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका या यात्रेला बसला असून, सांस्कृतिक संचित ही नंतरची गरज असून, आता लोकांचे प्राधान्यक्रम बदलले आहे. बँका व एटीएमसमोर उभे राहून पैसा काढण्याला आणि गरजेच्याच ठिकाणी खर्च करण्याला लोक प्राधान्य देत असल्याने ही यात्रा स्थगित झाली आहे.

औरंगाबादचा अनुभव वाईट

औरंगाबाद येथे नुकतीच ग्रंथयात्रा आयोजित करण्यात आली होती. मात्र, नोटाबंदीच्या आदेशामुळे तेथे प्रतिस्टॉल ३ ते ४ हजार रुपये इतकाच प्रतिसाद मिळाल्याने संपूर्ण ग्रंथयात्रेचा फियास्को झाला. स्टॉलला भाडे सहा हजार व उत्पन्न ४ हजार मिळणार असेल तर प्रकाशक स्टॉल लावतील कशाला? नाशिकला हेच झाले असून, स्टॉलचे ६ हजार भाडेही निघते की नाही अशी परिस्थिती वाटल्याने प्रकाशकांनी येथे येण्यास नकार दिला व ग्रंथयात्रा होऊ शकली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>