Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सात वर्षांतील उच्चांकी दंडवसुली!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
वाहतूक पोलिसांनी गेल्या सात वर्षांतील उच्चांकी दंड नुकत्याच संपलेल्या ऑक्टोबरअखेर वसूल केला आहे. पोलिसांनी या वर्षी ऑक्टोबरपर्यंत एक कोटी ८९ लाख ९७ हजार १०० रुपयांचा दंड बजावून घेतला आहे.
वाहनांच्या तुलनेत कमी पडणारे रस्ते, वाहनचालकांची मानसिकता तसेच वाहनांची वाढती संख्या यामुळे मागील सात वर्षातील दंड वसुलीतील सर्व रेकॉर्ड मोडीत काढण्याची कामगिरी वाहतूक पोलिसांनी बजावली आहे. यंदाच्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत एक लाख ७९ हजार ८८९ वाहनचालकांवर कारवाई झाली असून, यापोटी एक कोटी ८९ लाख ९७ हजार १०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त बेशिस्त वाहनचालकांना कोर्टाने तब्बल १२ लाख रुपयांचा दंड सुनावला आहे.
शहरातील औद्योग‌िक व आधुनिक शेतीप्रधान संस्कृतीमुळे प्रगतीची नवी दालने खुली होत आहेत. याबरोबर पर्यटन क्षेत्र देखील बहरत आहे. सर्वांचा आर्थिक स्थर उंचावत असल्याने शहरातील वाहनांची संख्या वर्षागण‌िक वाढत आहे. नाशिक शहर आणि आजूबाजूच्या तालुक्यांतील लाखो वाहने दररोज रस्त्यावर धावतात. याशिवाय, राष्ट्रीय व राज्य महामार्गांचा वापर करीत मोठ्या प्रमाणावर वाहने शहरातून मार्ग काढत पुढे जातात. या सर्वांचा ताण शेवटी रस्त्यांवर पडतो. त्यातच मुख्य शहरातील स्थापत्य रचना वाहनांच्या जास्त संख्येसाठी तयार झालेली नाही. या सर्वांचा परिणाम वाहतूक कोंडी, अपघात, रॅश ड्रायव्हिंग, वाहतूक नियमांची पायमल्ली यांसारख्या घटकांमधून प्रतिबिंब‌ित होतात. त्यातच गेल्या काही वर्षांत वाहतूक नियमांची पायमल्ली करणे हा वाहनचालकांचा हक्क झाल्यासारखे चित्र निर्माण झाले. झेब्रा, सायलन्स झोन, लेन कटिंग यांसारखे नियम तर वाहनचालकांना माहित असतात का, असा प्रश्न निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर २०१२पासून वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई वाढवण्यावर भर दिला आहे.
दंडाच्या रकमेतदेखील भरघोस वाढ करण्यात आली आहे. २०११मध्ये जानेवारी ते डिसेंबर या १२ महिन्यांत वाहतूक विभागाने प्रथमच एक लाख १० हजार ८४ वाहनांवर कारवाई करीत एक कोटी २२ लाख चार हजार ४५० रुपयांचा दंड वसूल केला होता. शहर वाहतूक विभागाची स्थापना झाल्यापासून प्रथमच एवढ्या मोठ्या स्वरुपाची कारवाई झाली होती. त्यानंतर २०१२मध्येदेखील बेशिस्त वाहनचालकांच्या संख्येवर परिणाम झाला नाही. उलट या वर्षात शहर पोलिसांनी एक लाख ५२ हजार ३१२ वाहनचालकांवर कारवाई करीत एक कोटी ८३ लाख ४३ हजार ६५० रुपयांचा दंड वसूल केला. २०१६मध्ये वाहतूक विभाग बेशिस्त वाहनचालकांविरोधात सुरुवातीपासून आक्रमक राहिला. आर्थिक झळ बसली तर वाहनचालक नियम पाळतील, अशी पोलिसांची अपेक्षा होती. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यापर्यंत पोलिसांनी एक लाख ७९ हजार ८८९ वाहनचालकांवर कारवाई करीत विक्रमी एक कोटी ८९ लाख ९७ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला. याच वर्षात कोर्टात पाठवण्यात आलेल्या ६८२ पैकी ५६६ वाहनचालकांना कोर्टाने १२ लाख ५८ हजार ४०० रुपयांचा दंड सुनावला आहे.

वाहनांची वाढती संख्या आणि त्यात बेशिस्त वाहनचालकांचे प्रमाण यामुळे दंडात्मक कारवाईचे प्रमाण वाढले आहे. आता तर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास मोठी रक्कम दंड स्वरुपात आकारली जाणार आहे. वाहनचालकांनी नियमांचे कसोशिने पालन करणे, हेच उत्तम आहे. पोलिस टार्गेटनुसार नाही, तर वाहनचालकांच्या बेशिस्तीनुसार कारवाई करतात.
-जयंत बजबळे,
सहायक पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रक्षोभक पोस्टप्रकरणी गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
धार्मिक भावना दुखावतील असा मजकूर फेसबुकवर पोस्ट केल्याप्रकरणी अंबड पोलिसांनी एका युवकास अटक केली आहे. त्याच्याविरोधात कलम २९५ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश पाटील असे संशयित युवकाचे नाव आहे. पाटीलने १९ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास एक प्रक्षोभक मजकूर फेसबुकवर पोस्ट केला. याची माहिती उपद्रेंनगर येथील साईग्राममध्ये राहणाऱ्या स्वप्नील पंड‌ित तायडे यांना समजताच त्यांनी अंबड पोलिस स्टेशनला माहिती दिली.
पोलिसांनी तत्काळ पाटीलविरोधात गुन्हा दाखल करीत फेसबुकवरील ती पोस्ट हटवली. यामुळे दोन समाजांत तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने सहायक पोलिस आयुक्त अतुल झेंडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी संशयित आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. घटनेचा अधिक तपास पीएसआय चव्हाण करीत आहे.
पाथर्डी फाट्याला घरफोडी
पाथर्डी फाटा येथील विक्रीकर भवनरोडवरील प्रशांतनगर येथील बंद बंगल्याचा दरवाजा तोडून चोरट्यांनी घरातील एलईडी टीव्ही, गॅस सिलेंडर, ड‌िज‌िटल कॅमेरा, रोख रक्कम असा मिळून ३६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी केला. याप्रकरणी सुनील दिगंबर क्षीरसागर यांनी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
देशी-विदेशी मद्य जप्त
मद्य विक्रीस बंदी असताना अवैध पध्दतीने देशी विदेशी मद्याची विक्री करणाऱ्या दोघांना नाशिकरोड तसेच म्हसरूळ पोलिसांनी गजाआड केले आहे. शहरात शनिवारी सर्व प्रकारच्या मद्य विक्रीस बंदी घालण्यात आली होती. मात्र, दसक-जेलरोडवरील मामाज् हॉटेलशेजारी एका पत्र्याच्या टपरीलगत विजय सुरेश बुऱ्हाडे मद्यविक्री करताना आढळून आला. बुऱ्हाडेकडे १० व्हिस्कीच्या बाटल्या आढळून आल्या. पोलिस नाईक भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नाशिकरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास हवालदार पाटील करीत आहेत. अवैध मद्यविक्रीचा आणखी एक गुन्हा म्हसरूळ पोलिसांनी उघडकीस आणला. पोलिसांनी क्रांतीनगर येथील उद्य कॉलनीत राहणाऱ्या राकेश साहेब आंधळेवर मद्यविक्री प्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिस नाईक शरद लहू जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आंधळेवर म्हसरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाचडगावचा बिबट्या अखेर सरकारी पाहुणचारात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

तालुक्यातील उमराळे बुद्रुक व चाचडगाव परिसरात तीन जनावरे फस्त करत धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकला आहे. मात्र, अजूनही बिबट्याची भीती ग्रामस्थांमध्ये कायम आहे.
गेल्या महिनाभरात दोन वासरे व एका बैलाची या बिबट्याने शिकार केले होती. त्यामुळे परिसरात बिबट्याच्या दहशतीने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. चाचडगाव येथील विलास पेलमहाले यांच्या मळ्यात एकाच आठवड्यात दोन वासरे व एक बैल बिबट्याने ठार केला होता. त्यानंतर येथील भागात पिंजरा लावण्यात आला होता. उमराळे शिवारात नाशिक-पेठ महामार्गालगत वास्तव्य असलेले शेतकरी अशोक गायकवाड यांच्या शेतानज‌िकच्या गोठ्याजवळ गाई-बैल बांधण्यात आले होते. रात्रीच्या सुमारास या बैलावर बिबट्याने हल्ला चढवत त्यास ठार केले. सकाळी ही बाब लक्षात येताच गायकवाड यांनी वनविभागाला कळविले. वनविभागाचे कर्मचारी महाले यांनी पंचनामा केला होता. अखेर चाचडगाव येथील विलास पेलमहाले यांच्या मळ्यात लावलेल्या पिंजऱ्यात शनिवारी सायंकाळी अंदाजे चार वर्ष नर बिबट्या अडकला. त्यामुळे नागरिकांनी तुर्तास सुटकेचा निःश्वास सोडला असला तरी, अजूनही बिबट्या असू शकतो अशी भीती कायम आहे. शेतमळ्यात राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून पिंजरा कायम ठेवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोकाटे-वाजे गटाची प्रतिष्ठा पणाला

$
0
0

सिन्नरमध्ये भाजपचा प्रभागांमध्ये प्रचारसभांवर जोर; ‌शिवसेनेचा मात्र चौकसभांवर भर

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर नगरपालिका निवडणुकीत भाजपचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी प्रभागांमध्ये सभा घेण्याचा धडाका लावला आहे. तर, शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे हे वैयक्तिक गाठीभेटी घेऊन भ्रष्टाचारमुक्त नगरपालिकेच्या कारभारासाठी शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन करीत आहेत.

सिन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीतील प्रचार शिगेला पोहोचला असून, माणिकराव कोकाटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची सभा घेऊन प्रचारात आघाडी घेतली आहे. यामुळे आमदार राजाभाऊ वाजे यांनीही कंबर कसली असून, आक्रमक पवित्रा घेत चौक सभांवर जोर देत आहेत. कार्यकर्त्यांनीही सोशल मीडियाचा आधार घेत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू केले आहेत.

काँग्रेस, राष्ट्रवादी, माकप यांच्या युतीतर्फे जिल्हा नेत्यांची पहिली नारळ वाढवण्याची सभा वागळता उमेदवारांनीच वैयक्तिक गाठीभेटींवर भर देत प्रचार सुरू ठेवला आहे. मनसेने नगराध्यक्षपदांसह काही ठिकाणी उमेदवार दिलेले असताना आजपर्यंत कोणताही जिल्हा नेता या निवडणुकीत प्रचारासाठी आलेला नाही. त्यातच मनसेचे जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी सिन्नर येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केल्याने मनसैनिक सैरभैर झाले आहेत.

या निवडणुकीत नगराध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असल्याने माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्यातर्फे माजी नगरसेवक अशोक मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेने नवीन व शिक्षित चेहरा किरण डगळे यांना निवडणुकीत उतरवले आहे. काँग्रेस आघाडीतर्फे विद्यमान नगरसेविका लता हिले यांना उमेदवारी दिली असून, त्या माणिकराव कोकाटे यांच्या समर्थक नगरसेवक होत्या. भाजपतर्फे उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी काँग्रेस आघाडीकडून उमेदवारी केलेली आहे. मनसेतर्फे राजेंद्र बोरसे या नवीन चेहऱ्याला संधी देण्यात आली. अपक्ष म्हणून वसंतबाबा नाईक रिंगणात आहेत. या निवडणुकीत नगराध्यक्षपद खेचून घेण्यास कोकाटे व वाजे गटांनी मोठी ताकद लावली आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार अशोक मोरे यांना निवडून द्यावे, यासाठी कोकाटे यांनी प्रचारावर जोर दिला आहे. किरण डगळे यांच्यासाठी वाजे यांनी वजन खर्ची घातले आहे.

बहुरंगी लढत

सिन्नरची ही निवडणूक बहुरंगी होत असून भाजप, शिवसेना समोरासमोर ठाकले आहेत. त्यांच्या समोर काँग्रेस, राष्ट्रवादी व माकप यांची युती तर मनसेचे काही ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. काही ठिकाणी अपक्ष उमेदवार असल्याने या निवडणुकीत चांगलीच रंगत निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवल्यात प्रचाराने धरला जोर

$
0
0

उमेदवारांकडून मतदारांना साद

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला नगरपालिकेच्या थेट नगराध्यक्षपदाच्या लढतीबरोबरच १२ प्रभागातील नगरसेवकपदाच्या एकूण २४ जागांसाठी आता प्रचाराचा ज्वर दिवसागणिक वाढू लागला आहे. निवडणूक मैदानात उतरलेल्या जवळपास सर्वच उमेदवारांचा फौजफाटा आता प्रचारासाठी रस्त्यावर उतरला आहे. आपापल्या प्रभागातील घर अन् घर अक्षरशः पिंजून काढतानाच ‘ताई, मावशी, आक्का...भाऊ, दादा, काका’ अशी साद कानी पडत आहे. निवडणुकीतील या रणसंग्रामातील प्रचाराची लगीनघाई चांगलीच जोम धरू लागतानाच अनेकांच्या प्रचाराचा रथदेखील दारोदार धडकताना दिसत आहे. ध्वनीक्षेपकावरून या प्रचाररथाद्वारे मतदारांना साद घातली जात आहे.

येवला नगरपालिकेची यावेळची पंचवार्षिक निवडणूक लक्षवेधी ठरतानाच सध्या प्रचाराने चांगलाच जोर धरला आहे. नगराध्यक्षपदाच्या थेट लढतीसह पालिकेच्या नगरसेवकपदाच्या एकूण २४ जागांसाठी एकूण १०३ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वच उमेदवारांनी गेल्या काही दिवसांत आपल्या पायाला जणू काही भिंगरी बांधल्याचं चित्र उडालेल्या प्रचाराच्या धुराळ्यातून स्पष्ट दिसत आहे. प्रचारातील घरोघरच्या या भेटीत प्रभागातील मतदारांना आपलंस करण्यासाठी वेगवेगळे फंडेदेखील वापरतानाचे चित्र दिसत आहे. नगराध्यक्षपदाच्या थेट लढतीसह

अनेक प्रभागांमध्ये मोठी रस्सीखेच होणार आहे.

काँग्रेसचे उमेदवार एजाज शेख यांनी तर गेल्या दोन-चार दिवसात प्रचारात मोठी मुसंडी मारल्याचेही दिसत आहे. एजाज शेख यांनी प्रचारादरम्यान मुस्लिम व्होटबँकेवर मुख्यत्वे डोळा ठेवल्याचे बोलले जात आहे. पालिकेत सत्तारूढ असलेल्या राष्ट्रवादीने विकासाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न चालवला आहे. दुसरीकडे भाजप-शिवसेना-रिपाइं महायुतीने राष्ट्रवादीच्या गेल्या दहा वर्षांतील सत्ता काळात न सुटलेले अनेक प्रश्न व समस्यांकडे बोट दाखवत युतीला साथ देण्याचे शहरवासीयांना साकडे घातले आहे. येवला शहरात मुस्लिम समाजाची जवळपास नऊ हजारांच्या आसपास एकगठ्ठा मते असून, या मतांच्या एकगठ्यावर नेमका कोण डल्ला मारतो, यावरच निकालाचं गणित अवलंबून असणार आहे.

पालिकेच्या मोजक्या काही प्रभागातच दुरंगी व तिरंगी लढती होत असून, अनेक प्रभागात चौरंगी, पंचरंगी लढती नजरेत दिसत आहेत. काही ठिकाणी बहुरंगी लढतीमुळे मतविभागणी ही निर्णायक ठरणार असल्याने नेमकी कुणाची मतविभागणी कुणाच्या पथ्यावर पडते याबद्दल शहरवासीयांना मोठी उत्कंठा आहे. बारा प्रभागातील २४ जागांवर रिंगणात असलेल्या १०३ उमेदवारांपैकी अनेक चेहरे हे नवीन असून, यापैकी बहुतांश उमेदवार केवळ रिंगणात आहेत. विविध राजकीय पक्षांच्या स्थानिक नेतेमंडळींनी देखील आपापल्या उमेदवारांच्या पाठीशी ताकद उभी केली असून, पालिकेच्या या निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठादेखील पणाला लागण्याचे स्पष्ट दिसत आहे. मोठ्या भुजबळांशिवाय होणारी ही निवडणूक स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची कसोटी पाहणारी ठरणार आहे. यामुळे या निवडणुकीकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिरंगी लढतीमुळे चुरस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत १५ प्रभागांच्या ३१ नगरसेवकपदांसाठी जोरदार चुरस निर्माण झाली आहे. शहरातील प्रभाग ११ अ मधील महिला राखीव गटातील लढत लक्षवेधी होणार असल्याची चिन्हे आहेत. या प्रभागात तीन महिला निवडणुकीत आमनेसामने असून, या तिरंगी लढतीकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

प्रभाग ११ अ मध्ये मध्यमवर्गीय नोकरदार, सुशिक्षित मतदारांचा समावेश आहे. मनमाडमधील शिवाजीनगर, संभाजीनगर, हुडको, आठ हजार विभाग, फिल्टर हाऊस, आनंद विहार असा मोठा भाग या प्रभागात सामावलेला आहे. विविध जाती-धर्मांच्या मतदारांचा सहभाग हे या प्रभागाचे वैशिष्ट्य आहे. संमिश्र अशा या प्रभागात यंदा महिला राखीव गटात राष्ट्रवादीच्या थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार व विद्यमान नगरसेविका रुपाली पगारे या नगरसेवकपदासाठी पुन्हा नशीब आजमावत आहेत. त्यांच्यासमोर भाजपच्या काजल नारायण पवार आणि अपक्ष उमेदवार शोभा दिलीप नरवडे यांनी आव्हान उभे केले आहे. तिन्ही उमेदवारांनी प्रचारात जोरदार आघाडी उघडून आपली दावेदारी उभी केली आहे.

तिन्ही उमेदवार तुल्यबळ

तिरंगी लढतीत राजकीय हितसंबंध व ताकद यात तिन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत. भाजपसाठी झालेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा काजल पवार यांची जमेची बाजू आहे. तर या प्रभागात नवरात्र, गणेशोत्सव उपक्रमांनिमित्त जमवलेला जनसंपर्क राजाभाऊ पगारे यांचे सर्व जाती धर्मातील लोकांशी असलेले संबंध ही रुपाली पगारे यांना तारक ठरू शकते. अद्याप पालिकेत निवडून न गेलेला नवा चेहरा या आपल्या वेगळेपणाचा फायदा शोभा नरवडे किती उठवतात, शिवसेनेची त्यांना कशी साथ मिळते यावर या प्रभागाचे गणित अवलंबून आहे. नरवडे किती मते घेतात यावर पगारे व पवार यांचे भवितव्य अवलंबून आहे. प्रस्थापित की नवा उमेदवार हा मुद्दा या तिरंगी लढतीत कळीचा ठरू शकेल.

राजकीय वारसा

रुपाली पगारे यांना राजकीय वारसा आहे. त्यांचे सासरे डी. के. पगारे हे शहराचे माजी नगराध्यक्ष होते. तसेच पती राजेंद्र पगारे हे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व माजी नगराध्यक्ष आहेत. काजल पवार यांचे पती भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते असून, भाजप शहराध्यक्ष ते भाजप जिल्हा चिटणीस असा त्यांचा यशस्वी प्रवास आहे. शोभा नरवडे यांचे पती दिलीप नरवडे हे रिपाइंचे शहराध्यक्ष असून, शिक्षण मंडळ सभापती म्हणून त्यांनी पद भूषविले आहे. एकूणच ११ अ मधील तिन्ही महिला उमेदवारांचा राजकारणाशी जवळचा संबंध असून, ही लढाई दिग्गजांची लढाई मानली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयकर विभागाच्या जिल्ह्यात नोट‌िसा

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्राप्तीकर विभागाने सक्रिय होऊन मोठ्या रकमा बँकेत जमा करणाऱ्यांना नोट‌सिा धाडणे सुरू केले आहे. संबंध‌ति खातेधारकांना शनिवारीच नोटीसा पाठवण्यात आल्याच्या चर्चेने खळबळ निर्माण झाली आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मात्र आयकर विभागाने दिली नाही. ‘बँकेत जमा केलेल्या पैशांचा स्रोत काय’, अशी विचारणा करण्यात आली असल्याचे बोलले जात असले तरी त्या नोट‌सिा नेमक्या कोणाला पाठवण्यात आल्या हे गोपनीय ठेवण्यात आले आहे.

प्राप्तीकर विभागाने चौकशीचा धडाका सुरू केल्यामुळे जिल्ह्यातील अनेक खातेधारकांना धडकी भरली आहे. काहींनी अडीच लाखापेक्षा जास्त रक्कम खात्यावर भरले असल्याने त्यांना पैशांच्या स्त्रोताबाबत विचारणार करण्यात आली आहे. प्राप्तीकर कायद्याच्या कलम १३३ (६) (माहिती मागविण्याचा अधिकार) अंतर्गत खातेधारकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. अडीच लाखांहून अधिकची जमा झालेली रक्कम अनियमित किंवा संशयित वाटणारी विशिष्ट प्रकरणे बँकांनी कळवल्यानंतर या नोटिसा पाठवण्यात आल्या असल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यात या अगोदर अघोषित उत्पन्न योजनेत प्राप्तीकर विभागाने सर्व्हे केल्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले होते. त्यानंतर पुन्हा या नोट‌सिा पाठव‌ण्यिात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ फाइल प्रकरणात एफआयआर नाहीच

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र औद्योगिक विकास महांडळाच्या (एमआयडीसी) कार्यालयातील एका वादग्रस्त फाइलमधील तब्बल १८० पाने चोरीला जाऊन २५ दिवस उलटल्यानंतरही या प्रकरणात कोणतीही कारवाई झालेली नाही. एमआयडीसीने सातपूर पोलिस स्टेशनमध्ये केवळ तक्रार अर्ज देऊन जबाबदारी झटकली आहे. मात्र यामुळे पोलिसांनाही तपासात अडचणी येत आहेत. या प्रकरणात एमआयडीसीने एफआयआर द्यावी, असे पोलिस सांगत असले तरी महामंडळातील अधिकारी एकमेकांवर जबाबदारी ढकलून या प्रकरणी बचावत्मक भूमिका घेत असल्यामुळे फाइल घोटाळा चांगलेच रंगू लागले आहे. दरम्यान या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे प्रशासकीय कारवाईची मागणी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी मुंबई येथील कार्यालयात केली असली तरी एफआयआरबाबत अधिकारी मात्र गप्प आहेत.

विशेष म्हणजे महामंडळातून फाइल चोरीला गेली असल्याची माहिती महामंडळाकडे असताना पोलिसांना मात्र गहाळ झाल्याची तक्रार देण्यात आली आहे. या प्रकरणात तीन आरोपी असून, त्यात फाइल गायब करणारा, चावी देणारा व त्यानंतर ज्यासाठी ही फाइल गायब केली तो आरोपी आहे. याबाबत पोलिसांनी जुजबी माहिती गोळा केली असून, त्यात ही माहिती पुढे आली आहे. दरम्यान, कोट्यवधीचा घोटाळा झालेल्या या प्रकरणात कसून चौकशी करून संबंधितावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी काही उद्योजकांनी केली आहे. या कागदपत्र गहाळ प्रकरणी मुंबई मुख्यालयातील मोठे अधिकारी कर्मचाऱ्यांना पाठीशी घातल असल्यामुळे या प्रकरणात कठोर कारवाई केली जात नसल्याची चर्चा आहे. तर आतापर्यंत कार्यालयात अशी अनेक प्रकरणे घडली असून या प्रकरणांचीही चौकशीची मागणी आता उद्योजक करत आहेत.

एमआयडीसी अगोदरच विविध भूखंड घोटाळ्यामुळे अडकली असताना आता हा कागदपत्र घोटाळा नेमका काय यावर चर्चा रंगत आहे. थकबाकी किंवा बांधकाम संबंध‌ति एमआयडीसीची कारवाई सुरू असते ही कारवाई थांबवावी, यासाठी फाइल गायब झाल्याचे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​‘सनदी अधिकाऱ्यांचे वेतन वसूल करा’

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यात आयएएस, आयपीएस आणि आयएफएस अधिकाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू झाला असून, राज्य सरकारच्या तिजोरीतून हे वेतन दिले जात आहे. राज्य सेवेतील अधिकाऱ्यांना वेतन आयोग लागू होत नाही तोपर्यंत भारतीय प्रशासन सेवेतील सनदी अधिकाऱ्यांनाही सरकारने आयोगानुसार वेतन देऊ नये, अशी स्पष्ट भुमिका महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाने घेतली आहे. अशा अधिकाऱ्यांना वितरीत केलेले वेतन टप्प्याटप्प्याने वसूल करा, अशा मागणीचा ठराव करीत या संघटनेने आयएएस, आयपीएस लॉबीलाच आव्हान दिले आहे. त्यामुळे वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांत खटके उडण्याची शक्यता बळावली आहे.

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची बैठक रविवारी नाशिकमध्ये सरकारी विश्रामगृहावर पार पडली. महासंघाचे संस्थापक अध्यक्ष ग. दि. कुलथे यांनी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीमध्ये अनेक ठराव करण्यात आले. मागण्यांच्या पूर्ततेबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे कुलथे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. केंद्राप्रमाणे ५ दिवसांचा आठवडा करावा, सातवा वेतन आयोग येण्यापूर्वी विद्यमान वेतन अडथळे दूर करावेत, प्रशंसनीय कामाबद्दल २००६ पासूनच्या आगाऊ वेतनवाढी सुरू कराव्यात, राजपत्रित अधिकाऱ्यांचे पगार वाढवावेत, सेवानिवृत्तीचे वय ५८ ऐवजी ६० वर्षे करावे, पेन्शन योजना सुरू ठेवावी आदी मागण्यांवर यावेळी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. आयएस अधिकाऱ्यांना दिलेले वेतन टप्प्याटप्प्याने वसूल करावे, अशी मागणी कुलथे यांनी केली.

पत्रकार परिषदेपूर्वी झालेल्या बैठकीला अध्यक्ष मनोहर पोकळे, सरचिटणीस समीर भाटकर, उपाध्यक्ष विनोद देसाई, शिवाजी मानकर, विनायक लोहाडे, डॉ प्रमोद रक्षमवार, महिला उपाध्यक्ष डॉ. सोनाली कदम, शितल सेवतकर, नाशिक विभागाचे बाळासाहेब घोरपडे, प्रदीप जायभावे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात नेत्यांची वाढली गर्दी

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्ह्यात सहा नगरपालिकेच्या निवडणुका व आगमी पाच महिन्यात होणाऱ्या महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमुळे जिल्ह्यात नेत्यांची गर्दी वाढू लागली आहे. त्यातच पदवधीर मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा होणार असल्याने जिल्ह्याचे वातावरणही निवडणूकमय झाले आहे. गेल्या काही दिवसापासून नोटांच्या विषयामुळे निवडणुकीच्या चर्चेला ब्रेक लागला असला तरी जिल्ह्यातील नगरपालिकेच्या निवडणुकांमुळे रंग भरले जाऊ लागले आहेत.

जिल्ह्यातील या सहा नगरपालिकांत थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक असल्यामुळे यात स्टार प्रचारक उतरले असून, आतापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडेसह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेसह मोठ्या नेत्यांनी हजेरी लावली आहे. त्यानंतर शिवसेना, काँग्रेसह सर्वच पक्षाचे स्टार प्रचारक

येणार आहेत.

नगरपालिका निवडणुकांप्रमाणेच नाशिक महापालिकेच्या निवडणुकीची तयारी जोरात सुरू झाली असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विविध विकासकामांचे उद्घाटन व घोषणा करुन निवडणुकीची चाहुल लागल्याचे संकेत दिले आहेत. जिल्ह्यात कोणत्याही एका पक्षाचे वर्चस्व नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप व सेनेला जनेतेने कौल दिला, पण विधानसभा निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी व भाजपाचे प्रत्येकी चार आमदार निवडून आले तर काँग्रेसचे दोन आमदार विजयी झाले. या निवडणुकीत माकपने एक जागा पटकावली. त्यामुळे संम‌श्रि असलेल्या वर्चस्वामुळे कोणत्याही एकाच पक्षाला सत्ता आजही मिळेल, असे चित्र नाही. नगरपालिकेचे निकाल स्थानिक प्रश्नावर असणार आहेत, तर जिल्हा परिषदेचे सम‌ीकरण वेगळे आहे. महापालिका निवडणुकीत शिवसेना व भाजपात काटेकी टक्कर होणार आहे. तर विरोधीपक्ष म्हणून राष्ट्रवादी, काँग्रेसने अगोदरच मोट बांधली असून, त्यात इतर मित्र पक्ष साम‌ील करण्याचे प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे या निवडणुकीत काय होईल हे आज सांगणे अवघड आहे.

एकूणच जिल्ह्यात या चारही निवडणुकांमुळे नेत्यांची गर्दी येत्या काळात मोठ्या प्रमाणात वाढणार असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुध्दा झडणार आहेत. श्रेयवादावरूनही मित्र पक्षाबरोबच विरोधीपक्षही झगडताना दिसेल. त्यामुळे मतदारांचा गोंधळही उडणार आहे. नगरपालिकेच्या निवडणुकींना अवघा आठवडा बाकी आहे. त्यामुळे त्यांचे निकाल आल्यानंतर एकूण राजकीय वातावरणात बदल होणार आहे. त्यानंतर महागरपालिका, जिल्हा परिषदेच्या आगमी निवडणुकांचे आराखडे व प्रचाराची पूर्वतयारीसाठी विकासकामांचे उद्घाटन सोहळे सगळीकडे दिसू लागतील. लोकसभा व विधानसभा निवडणुका झाल्यानंतर अडीच वर्षाच्या अंतरानंतर जिल्ह्यातील प्रत्येक मतदार निवडणुकीसाठी मतदान करणार असल्यामुळे त्यातून जनतेच्या कौलाची दिशाही स्पष्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये दर चार दिवसांनी जुळी!

$
0
0

arvind.jadhav@timesgroup.com
Tweet: @ArvindJadhavMT

नाशिक ः बाळ जन्माला येण्याची नैसर्गिक प्रक्रिया आधुनिक काळात जेवढी सुलभ, तेवढीच गुंतागुंतीची होते आहे. गेल्या सहा वर्षांत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तब्बल ५८८ जुळ्यांनी जन्म घेतला असून, वर्षागणिक हे प्रमाण वाढत आहे. मूल होण्यासाठी दीर्घकाळ औषधोपाचारामुळे जुळे होण्याची शक्यता ९५ टक्के अधिक असते. नैसर्गिक पद्धतीने जुळे होण्याचे प्रमाण अवघे पाच टक्के असते.

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याची भावना अनेकांना सहन होत नाही. सरकारी काम अन् पाच महिने थांब, अशी सार्वत्रिक समज सिव्हिल हॉस्पिटलबाबत मनात डोकावली नाही तर नवलच! मात्र, याच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये २०१०-११ ते २०१५-१६ या कालावधीत तब्बल ४०५ जुळ्यांनी जन्म घेतला. विशेष म्हणजे या प्रसूती नैसर्गिक पद्धतीने झाल्या आहेत. याच कालावधीत १८३ जुळ्यांनी सिझेरियननंतर पहिला श्वास घेतला. सरासरी चार दिवसांनी जुळ्यांचा जन्म झाल्याचे दिसते. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दरवर्षी सरासरी सात हजार प्रसूती होतात. त्यात जुळ्यांचे प्रमाण हळूहळू वाढत असल्याचे प्रसूती विभागाच्या प्रमुख डॉ. वर्षा लहाडे यांनी सांगितले. गर्भाशयात जुळे तयार होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी काही वर्षांपासून त्यावर औषधांचा विपरित परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. वास्तविक अवघ्या पाच टक्के केसेसमध्ये नैसर्गिक पद्धतीने जुळे तयार होतात. मूल होण्यासाठी घेतली जाणारी औषधे, तसेच इंजेक्शनमुळे जुळे तयार होण्याची शक्यता ९५ टक्क्यांपर्यंत वाढते. अनेकदा अत्यंत गुंतागुंतीच्या किंवा शेवटच्या क्षणी पेशंटला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाते. त्या वेळी जीव वाचवण्यास प्राधान्य म्हणून सिझेरियनचा पर्याय वापरला जातो; अन्यथा जुळे किंवा तिळे असले तरी आम्ही नैसर्गिक प्रसूतीवरच भर देत असल्याचे डॉ. लहाडे यांनी सांगितले.

सर्वाधिक जुळ्यांचे गाव कोडिन्ही!

केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील कोडिन्ही हे आशियातील सर्वाधिक जुळ्यांचे गाव आहे. दोन हजार लोकवस्तीच्या या गावात ३५० जुळी मुले आहेत. या गावात एक हजार मुलांमागे ४५ जुळी जन्मतात. मात्र, येथे जुळी मुले होण्याचे कारण दीर्घकाळ औषधोपचाराचे नसून, नैसर्गिक आहे. या गावात जुळ्यांचे प्रमाण एवढे जास्त का आहे, यामागचे कारण अद्याप उकललेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककर केव्हा होणार जागे?

$
0
0


वसंत कुरुप, मटा वाचक

मी जेव्हा जेव्हा नाशिकमध्ये फिरतो, तेव्हा तेव्हा मला असंख्य नाशिककरांच्या वागणुकीचे आश्चर्य वाटते. खरे तर नाशिकवर कोणीही मनापासून प्रेम करताना दिसत नाही. बहुतांश नेते, लोक, महापालिकेचे अधिकारी, पोलिस प्रशासन हे अापापले काम पुरेशा जबाबदारीने करताना दिसत नाहीत. त्यामुळेच नाशिकची एवढी दुरवस्था होत आहे.

मी आतापर्यंत पाच-सहा वेळा ‘मटा’च्या सिटीझन रिपोर्टर अॅपच्या माध्यमातून काही विषय मांडले होते. पण, त्यांची योग्य दखलच घेतली गेलेली नाही. आजही महापालिकेचे कर्मचारी असंख्य ठिकाणी कचरा रस्त्यावरच जाळतात. गुरे-ढोरे रस्त्याच्या मध्येच बसलेली दिसतात. लोक जेथे ‘कचरा टाकू नये’ अशी पाटी लावलेली आहे तेथेच कचरा आणून टाकतात. गोदावरी नदी व तिच्या तीरावर किती तरी वेळा स्वच्छता अभियान राबविले गेले. कोर्टनेही आदेश दिलेला आहे. पण, तरीही गोदावरीकडे बघवत नाही. कोणत्याही सिग्नलवर असंख्य वाहनचालक सिग्नल तोडताना दिसतात. हे कशामुळे घडत आहे? जर यासाठी यंत्रणा असेल, तर ती सुस्त, आळशी व बेजबाबदार झालेली आहे, याचेच हे द्योतक म्हणावे लागले. मुख्यमंत्री, व्हीआयपी येणार असे कळले, तर सर्व रस्ते साफ, चकाचक होतात. त्यावेळी सर्वजण कसे आपापले कर्तव्य बरोबर पार पाडतात? याचा अर्थ इतर वेळी मनापासून कोणीही काम करत नाही. आपण नाशिककर फार भाग्यवान आहात. नाशिकसारखी हवा, पाणी, निसर्गसौंदर्य कोठेच नाही, त्यामुळे मी सर्व नाशिककरांना विनंती करू इच्छितो, की नाशिक आपले आहे व मी यावर नितांत प्रेम करतो, अशा भावनेला बळकटी द्या. येथील नद्या, रस्ते, गल्ली, चौक कोठेही घाण-कचरा टाकणार नाही व कोणालाही टाकू देणार नाही, सिग्नल तोडणार नाही आदींची सुरुवात स्वतःपासूनच करून सुंदर नाशिक बनविण्यासाठी पुढाकार घेईन, असा निर्धार करावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीमुळे शहर विकासाला खीळ

$
0
0

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

नगरपालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी गत दोन वर्षांपासून विकासकामांचे प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविलेले नाहीत. त्यामुळे शहर विकासासापासून दूर राहिले. आपण मुख्यमंत्र्यांकडून शहरविकासासाठी सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला असून, अवघ्या काही दिवसांत हा विकासनिधी पालिकेत सत्ता स्थापन करणाऱ्या येणाऱ्या नव्या सत्ताधारी पक्षाकडे येईल, असा आत्मविश्वास केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी व्यक्त केला.

सटाणा नगरपालिका निवडणुकीत भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार बाळासाहेब जगन्नाथ सोनवणे व प्रभागतील २१ उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेचे आयेजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी भाजप जिल्हाध्यक्ष दादा जाधव होते.

डॉ. सुभाष भामरे म्हणाले, गत दोन वर्षांत आपण सटाणा शहरासह तालुक्यात विकासकामांसाठी सर्वाधिक निधी दिला आहे. मात्र पालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता असल्याने त्यांनी विकासकामांचे प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविले नाहीत. लोकप्रतिनिधी या नात्याने शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केल्याने लवकरच शहरातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. शहरातील बहुचर्चित बायपास प्रश्नासाठी निधी मंजूर केला आहे. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विरोधामुळे त्यालाही खीळ बसला आहे. शहरातून लवकरच आता चौपदरी महामार्ग जात असून, बायपासलादेखील मंजुरी मिळाली आहे.

तालुक्यातील हरणबारी डावा उजवा कालवा, तळवाडे भामेर पोहच कालव्यासाठी निधी मंजूर केला आहे. शहरातील आरम नदीवर पाच केटीवेअर मंजूर केले असून ते देखील लवकरच उभारण्यात येतील. पालिकेची सत्ता भाजपच्या हाती दिल्यास निश्चितपणे शहराचा विकास बघावयास मिळेल, असा आशावाद डॉ. भामरे यांनी शेवटी व्यक्त केला. पालिकेतील माफियाराज व झेरॉक्स नगरसेवकांनी शहर विकासाची वाट लावली असल्याचा आरोप नगराध्यक्षपदाचे उमेदवार बाळासाहेब सोनवणे यांनी केला. दादा जाधव, डॉ. विलास बच्छाव, हिरामण गवळी, मुन्नादादा रावल, गटनेता साहेबराव सोनवणे यांची भाषणे झाली. व्यासपिठावर बाजार समिती सभापती रमेश देवरे, समकोचे माजी चेअरमन श्रीधर कोठावदे, बिंदूशेठ शर्मा उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गर्भपात करणारा डॉक्टर चतुर्भुज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार करून मुलीचा गर्भपात करणाऱ्या संशयित आरोपीस मदत केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी डॉ. उमेश आर. मराठे यास अटक केली आहे. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. संशयित डॉक्टरास कोर्टाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार व गर्भपात केल्याप्रकरणी स्थायी समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांचा मुलगा अजिंक्यवर इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीड‌ित युवतीच्या तक्रारीनुसार, बलात्कारानंतर संशयित आरोपीने इच्छा नसताना लेखानगर येथील लाइफ केअर हॉस्पिटलचे डॉ. उमेश मराठे यांच्या हॉस्पिटलमध्ये गर्भपात केला. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्य संशयित आरोपी अजिंक्य चुंभळेने अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतली. कोर्टाने २३ नोव्हेंबरपर्यंत अजिंक्यचा अटकपूर्व जामिन अटी-शर्तींसह मंजूर केला. सदर प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी काही हॉटेलांमधील व्हिड‌िओ फुटेज जप्त केले आहेत. दुसरीकडे पीड‌ित मुलीच्या तक्रारीनुसार डॉ. मराठे यांची दोन दिवस कसून चौकशी केली. पोलिसांच्या चौकशीदरम्यान डॉक्टरांनी समाधानकारक खुलासा दिला नाही. त्यामुळे डॉक्टर मराठे यांना कलम ३१३ नुसार पोलिसांनी रविवारी उशिरा अटक केली. एखाद्या महिलेच्या इच्छेविरोधात गर्भपात करणाऱ्या व्यक्तीस कलम ३१३ नुसार दहा वर्ष किंवा आजीवन कारावास अशी शिक्षा होऊ शकते. दरम्यान, सोमवारी डॉ. मराठे यांना पोलिसांनी कोर्टात हजर केले. बचाव तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने डॉ. मराठे यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. यामुळे वैद्यकीय क्षेत्रासह राजकीय पातळीवर खळबळ उडाली आहे.
मुंबईलाही तपास
या गुन्ह्याचे कनेक्शन मुंबई येथे जोडले गेले आहे. पीड‌ित मुलीच्या तक्रारीनुसार मुंबईतील काही बड्या हॉटेल्समध्ये संशयित आरोपीने वेळोवेळी तिच्यावर बलात्कार केला. नाशिकमधील अशाच एका हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले आहेत. आता तपास पथकाने मुंबईकडे आपले लक्ष वळवले असून, तेथील व्हिड‌िओ फुटेज जप्त करण्यात येणार आहे. याप्रकरणी सध्या तरी नवीन आरोपी होण्याची शक्यता नाही, असे मत एका अधिकाऱ्याने व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एचओआय’ संचालकांच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
२४ टक्के व्याजाचे आमिष दाखवून शहरातील हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या हाऊस ऑफ इन्व्हेस्टमेंटच्या (एचओआय) तिघा संचालकांच्या पोलिस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
या घोटाळ्यातील चौथा फरार संचालक देखील पोलिसांनी जेरबंद केला असून त्याचीही रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे. एचओआयच्या माध्यमातून जवळपास तीन हजार गुंतवणूकदारांना ३०० कोटी रुपयांना चुना लावण्यात आला आहे. या फसवणूक प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने १५ नोव्हेंबर रोजी सतीश शेषराव कामे (रा. सिडको), विजय लक्ष्मण खूनकर (रा. जेजूरकर मळा, तपोवन) व मुख्य संशयित विनोद पाटील याची पत्नी प्रियंका विनोद पाटील यांना अटक केली होती. या सर्वांना न्यायालयाने आज, सोमवारपर्यंत पोल‌िस कोठडी सुनावली होती. वरील संशयितांकडे केलेल्या चौकशीनुसार पोलिसांनी रविवारी (२० नोव्हेंबर) या प्रकरणातील आणखी एक फरार संचालक सुशांत रमेश कोठुळे (२९, आगरटाकळी, जेजुरकर मळा, नाशिकरोड) यास अटक केली. या चौघांना सोमवारी कोर्टात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्याने कोर्टाने सर्व संशयितांना २४ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीलाच पाच संचालकांना जेरबंद केले होते. पोलिस कोठडी संपल्यानंतर संशयितांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार विनोद पाटील मात्र पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी ठरला आहे. विनोद पाटील गुंतवणूकदारांशी सोशल मीड‌ियाच्या माध्यमातून संपर्कात राहत असल्याचे गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे. विनोद पाटीलच्या अटकेनंतरच या घोटाळ्यातील सर्व तथ्यावर प्रकाश पडेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


द्वारकेवर चेनस्नॅचिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
द्वारका सर्कल येथील बस स्टॉपवर उभ्या असलेल्या अहमदनगर येथील महिलेच्या गळ्यातील सुमारे ६० हजार रुपये किमतीची सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी ओरबाडून नेली. ऐन वर्दळीच्या ठिकाणी चोरट्यांनी चेन स्नॅचिंग करून एक प्रकारे पोलिसांनाच आव्हान दिले आहे.
या प्रकरणी ज्योती महावीर मंडलेचा (रा. टाकळी, ता. पाथर्डी ) यांनी भद्रकाली तक्रार पोलिसांकडे तक्रार दिली आहे. चेन स्नॅचिंगची घ्टना रविवारी सांयकाळी घडली. अहमदनगर येथे जाण्यासाठी मंडलेचा या पुणे रोडवरील द्वारका सर्कल भागात असलेल्या बस स्टॉपवर उभ्या असताना चोरट्यांनी संधी साधली. सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास बसची वाट पाहत असताना दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी मंडलेचा यांच्यासमोर आपली दुचाकी उभी केली. यानंतर, दुसऱ्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी तोडली. या प्रकारामुळे घाबरलेल्या मंडलेचा यांनी आरडाओरड केली. मात्र, भरधाव वेगात चोरटे पसार झाले. सोन्याचा हार सुमारे तीन तोळे वजनाचा व ६० हजार रुपये किमतीचा होता. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वारे करीत आहेत.
एकास मारहाण
चेष्टा मस्करी करण्यास विरोध केल्याने दोघांनी बेदम मारहाण करीत एकास गंभीर जखमी केले. ही घटना मद‌िना चौकात रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
इरफान खान (२६) व मोसीन खान (२४, दोघे रा. मदिना चौक) अशी मारहाण करणाऱ्या संशय‌ितांची नावे आहेत. फरमान मुकीन कुरेशी याने दिलेल्या तक्रारीनुसार, फरमान रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आपल्या घराजवळ उभा असताना तेथे वरील दोघे संशय‌ित पोहचले. त्यांनी फरमानची टिंगलटवाळी करण्यास सुरुवात केली. मात्र, फरमानने त्यांना विरोध करून माझी चेष्टा करू नका असे सुनावले. यानंतर, दोघा संशय‌ितांनी फरमानला पकडून त्याचे डोके भिंतीवर आपटून जखमी केले. तसेच दोघांनी लाथाबुक्यांनी मारल्याचे फरमानने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक कडारे करीत आहेत.
श्रमिकनगरला आत्महत्या
सातपूर परिसरातील श्रमिकनगर येथील विवेक कन्स्ट्रक्शन परिसरात राहणाऱ्या ३४ वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. युवकाच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. राजेंद्र भागवत पाटील (३४ रा.श्रमिकनगर) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. राजेंद्रने आपल्या घरात कुणी नसतांना अज्ञात कारणातून गळफास लावून घेतला होता. रविवारी सकाळी तो मृतावस्थेत मिळून आला. याप्रकरणी सातपूर पोलिसांनी आकस्मात मृत्युची नोंद केली असून, अधिक तपास हवालदार आव्हाड करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ डोस मिळताच आमदार सक्र‌िय

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्यानंतर आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूम‌िवर भाजपचे तीनही आमदार पुन्हा सक्र‌िय झाले आहेत. भाजपच्या आमदारांनी शहर विकासाच्या प्रश्नांना हात घालत त्यांना सोडविण्यासाठी महापालिकेतील ये-जा वाढव‌ली आहे.

गेल्या १५ दिवसांपासून भाजप आमदारांची स्वतःची विकासकामे मंजूर घेण्यासह निवडणुकांसाठी फिल्ड‌िंग लावण्यासाठी पालिकेतील वर्दळ वाढवली आहे. मनपा निवडणुका जिंकणे भाजप आमदारांसाठी प्रतिष्ठेचा विषय असल्याने त्यांनी सर्व शक्ती पणाला लावून कामाला सुरूवात केली आहे. एकीकडे महापालिकेत भाजप सक्र‌िय झाली असतांना सत्ताधारी मनसे मात्र पूर्ण निष्क्र‌िय झाली आहे.

फेब्रुवारी २०१७ मध्ये महापालिकेच्या निवडणुका असून, त्या जिंकण्यासाठी भाजप व सेनेत चढाई सुरू आहे. शहरातील भाजपचे तीनही आमदार हे नगरसेवकही आहेत. त्यामुळे या निवडणुका जिंकण्याचा सर्वाधिक दबाव या तीनही आमदारांवर आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूम‌िवर शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप, आमदार प्रा. देवयानी फरांदे व सीमा हिरे यांनी पालिकेतील सक्र‌ियता वाढवली आहे. विशेषतः आमदार बाळासाहेब सानप यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असून, त्यांच्यावर नागरी प्रश्नांची सोडवणूक करण्याची जबाबदारी सर्वाधिक आहे. सानप यांनी गेल्या पंधरा दिवसात आयुक्तांची तब्बल चार ते पाच वेळा भेट घेत शहर विकासाच्या प्रश्नांवर चर्चा केली आहे. अनधिकृत धार्मिक स्थळापाठोपाठ आता कपाट प्रश्नातही त्यांनी थेट भूमिका घेतली आहे. तर प्रा. देवयानी फरांदे यांनीही प्रभागातील विविध प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतली आहे. सीमा हिरे यांनीही सक्र‌ियता वाढवली आहे. तीनही आमदारांची वर्दळ वाढल्याने व त्यांनी नाशिककरांच्या प्रश्नांना त्यांनी उश‌िरा का होईना हात घातला आहे.

मुख्यमंत्र्यांचा बूस्टर डोस

नुकतेच नाशिक दौ-यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिनर डिप्लोमसीत भाजपच्या आमदारांसह पदाधिका-यांना निवडणुका जिंकण्यासंदर्भात बूस्टर डोस दिला आहे. निवडणुकांच्या पूर्वीच रखडलेला शहर विकास आराखडा व नियंत्रण नियमावली ही जाहीर केली जाणार असून, त्याचा थेट फायदा भाजपला होईल, अशा तरतुदी त्यात केल्या जाण्याची शक्यता आहे.

मनसेत चलबिचल

एकीकडे भाजपचे पदाधिकारी सक्र‌िय झाले असतांना सत्ताधारी मनसेचे पदाधिकारी मात्र निष्क्रिय झाल्याचे चित्र आहे. भाजपच्या पदाधिका-यांची वर्दळ आयुक्तांकडे वाढली असतांना मनसे पदाधिकारी मात्र हातावर हात धरून बसले आहे. त्यामुळे पक्षाच्या पदाधिकारींमध्ये चलबिचल सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हायटेक वृक्षगणनेचा श्रीगणेशा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या हायटेक वृक्षगणनेचा श्रीगणेशा झाला असून, जीपीएस प्रणालीच्या आधारे जूनपर्यंत शहरातील नेमक्या वृक्षांची संख्या कळणार आहे. सोमवारी महापौर अशोक मुर्तडक व आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या उपस्थितीत या हायटेक वृक्षगणनेचा शुभारंभ करण्यात आला. मनपा मुख्यालयातून पिंपळ या वृक्षापासून या मोह‌िमेचा श्रीगणेशा करण्यात आला. हायटेक पद्धतीने केल्या जाणाऱ्या या वृक्षगणनेत वृक्षांच्या प्रजाती, उंची, वय, बांधा कळणार आहे. तसेच शहरातील झाडांची नेमकी वस्तुस्थिती समजणार असल्याने बनवेगिरी टळून अवैध वृक्षतोडही थांबणार आहे.

शहरातील वृक्षांची संख्या कळण्यासाठी व पर्यावरणाच्या रक्षणासाठी महापालिकेने वृक्षांची गणना करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील तीन मीटरपेक्षा जास्त उंचीच्या वृक्षांची गणना केली जाणार असून, ही गणना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने केली जाणार आहे. जीआयएस व जीपीएस तंत्रज्ञानाच्या आधारे फोटो घेऊन वृक्षांची गणना होणार आहे. विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, सभापती शिवाजी गांगुर्डे, प्रा. कुणाल वाघ, परशुराम वाघेरे, संजय साबळे, महेश तिवारी, टेरेकॉन कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. कंपनीच्या प्रतिनिधींनी यावेळी वृक्षगणनेची सविस्तर माहिती दिली. या वृक्षगणनेमुळे संबंधित वृक्ष गुगलमॅपवर आला आहे. या झाडाची उंची साडेआठ मीटर, बुंधा चार मीटर, वय अंदाजे ७५ वर्ष आदी नोंदणी गुगलवर करण्यात आली.

अवैध वृक्षतोड थांबणार

नव्या वृक्षगणना ही जीपीएस प्रणालीच्या आधारावर केली जाणार असून सर्व ठिकाणांवरील वृक्षांची मोजदाद केली जाणार आहे. प्रत्येक वृक्ष हा रेकॉर्डवर येणार आहे. यामुळे बेकायदेशीर वृक्षतोड थांबणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धमकी प्रकरणाचा वक‌िलांकडून निषेध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
फिर्यादीचे काम करीत असताना अॅड. शिरिष पारख यांना धमकवण्यात आले. या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत याबाबत महाराष्ट्राचे अॅडव्होकेट जनरल रोहित देव यांच्याकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय नाशिक बार असोसिएशनच्या बैठकीत घेण्यात आला.
असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली जुनी लायब्ररी हॉल येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी अॅड. पारख यांना धमकवण्यात आले. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार गंभीर असल्याने नाशिक बार असोसिएशने त्याचा निषेध करण्यासाठी बैठक बोलावली होती. धमकी देणाऱ्याविरोधात कडक कारवाई झालीच पाहिजे, असा ठराव या वेळी एकमताने मंजूर करण्यात आला. असोसिएशन सदैव पारख यांच्या सोबत असल्याची ग्वाही ठाकरे यांनी दिली. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे अध्यक्ष अॅड. जयंत जायभावे यांनीही सदर घटनेचा निषेध नोंदवत ही प्रवृत्ती न्यायसंस्थेविरोधात काम करणारी असल्याची टीका केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परतलेल्या थंडीचा नाशिककरांना कडाका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या आठवड्यात नाशिककरांना घाम फोडणारे हवामान आता चक्क नाशिककरांना हुडहुडी भरविणारे बनले आहे. नाशिकचा पारा १५ अंशांवरून कमी होत आता थेट ९ अंश सेल्सिअसवर आला आहे. त्यामुळे पहाटे आणि रात्री शहरात गारठा राहत असून पारा आणखी खाली जाण्याचा अंदाज आहे.

गेल्या गुरुवारी (दि. १६) नाशिकचे किमान तापमान १५.६ अंश सेल्सिअस तर कमाल ३०.१ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. त्यामुळे सहाजिकच नाशिककरांना थंडीच्या मोसमात काहीसा उकाडा सहन करावा लागला. वातावरणातील तत्कालिक बदलांचा हा परिणाम होता. मात्र, गुरुवारनंतर नाशिकचे किमान तापमान सातत्याने घसरत आहे. रविवारी (दि. २०) पहाटे ९.५ अंश सेल्सिअसची नोंद शहरात झाल्यानंतर सोमवारी त्यात आणखी ०.५ अंश सेल्सिअसची घट झाली.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य-महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट, कोकण-गोवा व मराठवाड्याच्या काही भागात व मध्य-महाराष्ट्र व विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तपमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट तर कोकण-गोवा व मराठवाड्याच्या उर्वरीत भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचीत घट झाली आहे. नाशिकमध्ये सोमवारी (दि. २१) ९ अंश सेल्सिअसची नोंद झाली असून तापमानाचा पारा आणखी खाली घसरण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे नाशिककरांना कडाक्याची थंडी अनुभवायला मिळणार आहे.

आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

गेल्या काही दिवसात किमान तापमानातील हा बदल मानवी आरोग्यावर परिणाम करणारा ठरत आहे. लहान मुले आणि वृद्धांना त्याचा प्रकर्षाने त्रास होत आहे. लहान मुलांना खोकला, ताप आणि सर्दीने बेजार केले आहे. तर, वृद्धांना हाडे आणि सांधेदुखीचा त्रास होत आहे. दम्याचा त्रास असलेल्या पेशंटला पहाटेच्या सुमारास श्वसनास त्रास होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images