Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

भांडण दोघींचे अन् मारहाण पोलिसाला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वात्सल्य महिला सुधारगृहातील दोन महिलांमध्ये सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या महिला पोलिसाला त्याच दोघींनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी संबंधित महिलांविरोधात कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंपा शेख व रिना शेख अशी संशयित महिलांची नावे आहेत. अशोकस्तंभ परिसरात वात्सल्य महिला सुधारगृह आहे. या ठिकाणी अनाथ, गरजू महिला मुलींसह देहविक्री व्यवसायातून पोलिसांनी सोडवलेल्या मुलींना आसरा दिला जातो. मुख्यालयातील पोलिस शिपाई भाग्यश्री मधुकर भाटेवाल या वात्सल्य वसतिगृहात नेमणुकीस आहेत. सोमवारी सकाळी चंपा व रिना या दोघी संशयितांमध्ये कुठल्यातरी कारणावरून वाद सुरू होता. यावेळी महिला पोलिस भाटेवाल यांनी दोघींना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघींनी भाटेवाल यांच्याशी वाद सुरू केला. वाद वाढल्यानंतर दोघींपैकी एकीने पकडून ठेवले, तर दुसरीने बेदम मारहाण केल्याचे भाटेवाल यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.

या प्रकरणी सरकारवाडा पोलिसात मारहाण व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक अहिरराव करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनमाडला कडकडीत बंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

अंजनेरी येथे घडलेल्या अत्याचार घटनेनंतर नाशिक जिल्ह्यात झालेली जाळपोळ व हिंसाचाराच्या घटनेच्या, तसेच देवळा येथे झालेल्या पुतळा विटंबनेच्या निषेधार्थ मनमाड शहरात पुकारण्यात आलेल्या सर्वपक्षीय मनमाड बंद आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शहरातील विविध राजकीय पक्ष, संघटना, सामाजिक संस्था, व्यापारी संघ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुतळा विटंबना व हिंसाचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी शहरातून मूकमोर्चा काढला. सर्वपक्षीय, सर्वधर्मीय आंदोलन झाल्याने कोणताही तणाव निर्माण झाला नाही, ही बाब महत्त्वाची मानली जात आहे. आंदोलनाची घोषणा झाल्यानंतर मनमाड शहरातील प्रमुख राजकीय पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते आणि व्यापारी संघाने बंदला पाठिंबा देत हे आंदोलन सर्वसमावेशक केले. मंगळवारी सकाळपासूनच शहराच्या प्रमुख बाजारपेठेसह प्रमुख रस्त्यांवरील दुकाने बंद होती. रिक्षा संघटनेने या बंदला पाठिंबा जाहीर केला होता. बंदमुळे रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. शाळांच्या परीक्षांवर बंदमुळे कोणताही विपरीत परिणाम झाला नाही.

शांततापूर्ण मोर्चा

मनमाड शहरातील विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते, दलित संघटना यांनी शहरातून मोर्चा काढून या घटनेचा निषेध केला. सिद्धार्थ कॉलनी येथून निघालेल्या मूकमोर्चात नगराध्यक्ष प्रवीण नाईक, माजी नगराध्यक्ष राष्ट्रवादीचे राजाभाऊ पगारे, रिपाइं ग्रामीण जिल्हाप्रमुख राजाभाऊ आहिरे, साईनाथ गिडगे, गणेश धात्रक, अॅड. सुधाकर मोरे, योगेश पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, शिवसेना गटनेते संतोष बळीद, शहरप्रमुख मयूर बोरसे, रिपाइं पदाधिकारी गंगाभाऊ त्रिभूवन, नगरसेवक प्रमोद पाचोरकर, काँग्रेसचे अशोक व्यवहारे, फुले शाहू आंबेडकर मुस्लिम मूलनिवासी मंचचे फिरोज शेख, प्रकाश बोधक, व्यापारी महासंघाचे राजाभाऊ पारीक, सुरेश लोढा, अरुण सोनवणे, किशोर नावरकर आदी उपस्थित होते. यावेळी तहसीलदार देवगुणे यांना निवेदन देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नामपूर जिल्हा परिषद शाळेला लावले कुलूप

$
0
0

वादग्रस्त शिक्षकाच्या नियुक्तीवरून संताप

लखन सावंत, कॉलेज क्लब रिपोर्टर

निलंबनानंतर शिक्षक पंडित कापडणीस यांना पुन्हा सेवेत घेऊन नामपूर (ता. बागलाण) येथील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेत नियुक्ती केल्याबद्दल संतप्त ग्रामस्थ व पालकांनी शाळेला कुलूप लावले. जोपर्यंत या शिक्षकाची नियुक्ती रद्द होत नाही तोपर्यंत शाळेचे कुलूप उघडण्यात येणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.

संबंधित शिक्षक अंबासन येथील शाळेवर असतानादेखील तेथील ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना मारझोड करणे, शिक्षकांसोबत गैरवर्तणूक करणे, पालकांना न जुमानने अशा अनेक कारणांवरून सीईओकडे तक्रार केली होती. त्यावर या शिक्षकाची नामपूर येथील इंदिरानगर शाळेत बदली करण्यात आली. तेथेदेखील हा शिक्षक वादग्रस्त ठरल्याने येथील शाळेला कुलूप लावण्यात आले होते. या सर्व तक्रारींची दखल घेत संबंधित शिक्षकाला निलंबित करण्यात आले होते. यावेळी ग्रामपंचायतीने ठराव करून संबंधित शिक्षक हा नामपूर परिसरातील कोणत्याही शाळेवर देण्यात येऊ नये, अशी मागणी केली होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी या वादग्रस्त शिक्षकाची पुन्हा नामपूर येथील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेवर नियुक्ती करण्यात आल्याने संतप्त पालक, ग्रामस्थ, सरपंच व सदस्यांनी शाळेला कुलूप लावले. जोपर्यंत या शिक्षकाची नियुक्ती रद्द होत नाही तोपर्यंत शाळेचे कुलूप उघडण्यात येणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. यावेळी सरपंच सोनाली निकम, उपसरपंच मंगल सावंत, जि. प. सदस्या सुनीता पाटील ग्रामपंचायत सदस्य व पालक उपस्थित होते.

शाळा भरतेय वर्गाबाहेर

शाळेला कुलूप ठोकल्याने सलग दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारात बसावे लागले. उन्हामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत असून, सीईओंनी याची त्वरित दखल घेऊन यातून योग्य मार्ग काढावा, अशी मागणी केली जात आहे.

सदर शिक्षक हा वादग्रस्त असून, याबाबत सीईओंकडे तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात सीईओ मिलिंद शंभरकर यांच्याशी बोलणे झाले आहे. येत्या दोन दिवसात या शिक्षकावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.

- डी. एम. बहिरम,

गटविकास अधिकारी

पंडित कापडणीस या शिक्षकाच्या गैरवर्तुणुकीबाबत नामपूर येथील शाळेत नियुक्ती होऊ नये, यासाठी नामपूर ग्रामपंचायत तसेच शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे काही महिन्यांपूर्वी पाठविण्यात आला होता. तरीदेखील सदर शिक्षकाची नामपूर मराठी शाळेवर गरज नसताना नियुक्ती झालीच कशी.

- सोनाली निकम, सरपंच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खत प्रकल्प लवकरच कार्यान्वित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेचा खत प्रकल्प गेल्या अनेक दिवसांपासून बंद असून, तो व्यवस्थित सुरू व्हावा यासाठी नाशिक वेस्ट मॅनेजमेंट प्रा. लि. या कंपनीच्या वतीने मंगळवारी महापालिकेत प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. हा प्रकल्प खासगीकरणाच्या माध्यमातून सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नाशिक वेस्ट मॅनेजमेंट प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून हा प्रकल्प पुन्हा सुरू राहणार असून, प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. हा प्रकल्प बंद झाल्याने शहरातील बांधकामाच्या पूर्णत्वाचे दाखले देण्यास पुण्याच्या हरित लवादाने मनाई केली होती. त्यामुळे नवीन फ्लॅट ताब्यात घेणाऱ्यांना असंख्य अडचणी निर्माण झाल्या होत्या. या प्रकल्पातून सध्या एक टन कचऱ्यातून चार टक्के खत तयार होते. कंपनीने याच प्रकल्पातून १२ टक्के खत तयार होईल, असा दावा केला आहे. अटी-शर्तींनुसार निविदाधारकाने सध्या खत प्रकल्प येथील मशिनरी, वाहने व इमारती इत्यादी आवश्यक दुरुस्ती कामे करून प्रकल्प कार्यान्वित करणे व येणाऱ्या कचऱ्यावर नियमानुसार प्रक्रिया करणे व विल्हेवाट लावण्याचे काम करायचे आहे. भविष्यात वाढत जाणाऱ्या कचऱ्याच्या प्रमाणानुसार येणाऱ्या संपूर्ण कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक ती नवीन मशिनरी, वाहने व आवश्यक यंत्रणा वेळोवेळी उभी करण्याचे कंपनीला सांगण्यात आले आहे. तीस वर्षांच्या कालावधीत जुनी-नवीन मशिनरी, इमारती इत्यादी बाबींची देखभाल दुरुस्ती करून येणाऱ्या कचऱ्यावर नियमानुसार प्रक्रिया करणे गरजेचे आहे.

वेळोवेळी शासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ इत्यादींनी ठरवून दिल्यानुसार विविध मंजुरी, परवानगी घेणे इत्यादीसाठी आवश्यक ती कायदेशीर पूर्तता करणे, कचरा प्रक्रियेनंतर तयार होणारे विविध उत्पादनांची विक्री करणे व त्यासाठी योग्यती यंत्रणा उभी करणे ही जबाबदारी निविदाधारकाची राहील. प्लॅन्ट चालविण्याचा खर्च, भविष्यात लागणाऱ्या मशिनरीसाठीचा खर्च, कर्मचाऱ्यांचे वेतनानुसार येणारा खर्च, विज बिले व इतर बाबींसाठी लागणारा सर्व प्रकारचा खर्च निविदाधारकाने करावयाचा आहे. तसेच तयार होणाऱ्या विविध उत्पादनातून मिळणारे उत्पन्न हे मक्तेदाराचे राहील.

मनपाचे राहणार नियंत्रण

या प्रकल्पावर मनपाचे नियंत्रण व देखरेख असणार आहे. खत प्रकल्पात येणाऱ्या कचऱ्याचे वजन योग्य पध्दतीने नोंदविण्यासाठी नाशिक मनपामार्फत अॅटोमेटेड वजनकाटा बसविण्याची कार्यवाही चालू आहे. तसेच खत प्रकल्प येथिल दैनंदिन कामकाजावर योग्य पध्दतीने नियंत्रण ठेवण्याचे दृष्टिने विद्युत विभागामार्फत आवारात सीसीटीव्ही. कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गॅस सबसिडी नकोय; नाकारा स्वस्त धान्यही!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एक लाख रुपयांहून अधिक वार्षिक उत्पन्न असतानाही सरकारकडून सवलतीच्य दरात अन्नधान्य मिळविणाऱ्या रेशनकार्डधारकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा पुरवठा विभागाने दिला आहे. असे अन्नधान्य स्वेच्छेने नाकारा, असा विनंतीचा सूर आळवतानाच थेट कारवाईचीच तंबी दिली जात असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

रेशन दुकानांच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकांना सवलतीच्या दरात अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ मिळविण्यासाठी उत्पन्न मर्यादाही विहीत करण्यात आली आहे. एक लाखापेक्षा अधिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांकडे शुभ्र शिधापित्रका असणे व त्यांनी सवलतीच्या दरातील अन्नधान्याचा लाभ न घेणे पुरवठा विभागाला अभिप्रेत आहे. मात्र, अजुनही अनेक कुटुंब केशरी व पिवळी रेशनकार्ड बाळगून त्याद्वारे शिधावस्तूंचा लाभ मिळवित असल्याची वस्तुस्थिती आहे. असे सवलतीच्या दरातील अन्नधान्य स्वेच्छेने नाकारण्याचा पर्याय राज्य सरकारने १३ ऑक्टोबर रोजी एका विशिष्ट धोरणानुसार उपलब्ध करून दिला आहे. ज्या केशरी व पिवळ्या शिधापत्रिकांधारकांचे उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, त्यांनी अशा रेशनकार्ड तहसील किंवा धान्य वितरण कार्यालयात तत्काळ जमा करून शुभ्र रेशनकार्ड प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे.

... तर होणार कारवाई
पुरवठा विभाग लवकरच अपात्र रेशनकार्ड शोधमोहीम हाती घेणार आहे. एक लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांकडे केशरी किंवा पिवळी रेशनकार्ड आढळून आल्यास किंवा ते अशा शिधापत्रिकांद्वारे शिधावस्तूंचा लाभ घेत असल्याचे आढळल्यास रेशनकार्डधारकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस कर्मचाऱ्यांना सुखद धक्का!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर पोलिसांच्या दैनंदिन कामास मंगळवारी सुरुवात झाली. त्यातील २०० पोलिसांना त्यांच्या कुटुंबासह आरोग्य तपासणीसाठी पोलिस मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. बरहुकूम सर्व हजर झाले. मात्र, पोलिसांना त्यांच्या कुटुंबीयांसह खासगी वाहनात बसवून थेट उंटवाडीरोडवरील मल्टीफ्लेक्सच्या दारात सोडण्यात आले. काय करायचे, असे प्रश्न सर्वांच्या मनात असताना हातात एमएस धोनी या पिक्चरची तिकिटे पडली. कामाच्या दडपणाखाली मॉलपर्यंत पोहचलेल्या पोलिसांसाठी हा क्षण अविस्मरणीय ठरला.

पोलिसांची सकाळी सुरू झालेली ड्युटी कधी संपेल याचा नेम नसतो. सोबत दंगल, समाजकंटकाचा त्रास, गुन्ह्याचा तपास अशा बारा भानगडी पाचवीला पुजलेल्या. अर्थात, पोलिस दलाच्या सेवेत रूजू झाल्यापासून हळूहळू का होईना पोलिस हा ताण पचवायला लागतात. सर्वांना ते सहन होते असे नाही. मात्र, कामाचा भाग म्हणून आरोग्याशी खेळ करत कर्तव्याला प्राधन्य दिले जाते. मागील आठवड्यात तर पोलिसांनी दिवसाची रात्र केली. मिळेल तिथे झोपणे आणि हातात पडेल ते खात पोलिसांनी चोख कर्तव्य बजावले. दंगल आटोपली आणि पोलिसांनी दिवाळी बंदोबस्ताची तयारी सुरू केली. दरोडा, घरफोडी, चेनस्नॅचिंग घडू नये, यासाठी बैठका सुरू झाल्या.

कामाचा ताण एका दिवसात कमी होणे शक्य नसले तरी तो हलका करणे आवश्यक असल्याचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांचे म्हणणे आहे. आपल्या काही अधिकाऱ्यांना त्यांनी ही बाब बोलून दाखवली. यानंतर, कर्मचाऱ्यांना काहीतरी सरप्राईज द्यावे, याची तयारी त्यांनी केली. मंगळवारी प्रत्येक पोलिस स्टेशनमधून पाच ते सहा पोलिसांना त्यांच्या कुटुंबियासह आरोग्य तपासणीसाठी मुख्यालयात बोलविण्यात आले. आदेश ते मुख्यालयात हजरही झाले. यानंतर, कोणतीही कल्पना न देता त्यांना खासगी बसमध्ये बसवून थेट उंटवाडी येथील मल्टीफ्लेक्समधील ‘एमएस धोनी’ पिक्चर सुरू असलेल्या थिएटरमध्ये नेण्यात आले. पोलिसांनी या पिक्चरचा आनंद घेतला. ‘विचार केला नव्हता की कधी, असा दिवसही उजडेल!’, अशी एका पोलिस कर्मचाऱ्याची प्रतिक्रिया सर्व काही व्यक्त करणारी ठरली.

सतत दडपण असेल तर त्याचा पोलिसांच्या कामावर परिणाम होतो. तो ताण कमी व्हावा, या उद्देशाने आज सर्व नियोजन करण्यात आले. त्यास कर्मचाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. यापुढे असे नवनवीन प्रयोग राबवले जातील.
- डॉ. रवींद्र सिंघल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संत गाडगे महाराज धर्मशाळा अनुभवण्याची संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छतेच्या नायनाटासाठी जीवन खर्ची घातलेले अनाथ, अपंगांचे सेवेकरी अन् समाजात बदल घडविण्याची ताकद फक्त शिक्षणात असल्याचे ठाम मत मांडणाऱ्या संत गाडगे बाबांनी गोरगरिबांच्या सोयीसाठी जागोजागी धर्मशाळा बांधल्या. अशीच एक धर्मशाळा नाशिकच्या गोदाकाठी १९३२ ला बांधली. ही वास्तू आजही त्यांच्या कार्याचा अन् कर्तृत्वाचा वारसा सेवाकार्यातून पुढे नेत आहे. म्हणूनच ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे येत्या रविवारी, २३ ऑक्टोबर रोजी श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट येथे हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिकची पांडवलेणी (त्रिरश्मी), पंचवटीतील मंदिरे, नाशिकचा नाणे संग्रह, वाडा संस्कृती दर्शन, पोथ्यांचा साज, गोदाघाट, प्राचीन गोवर्धन, गंगापूर व जलापूरसह देवघडे वडनेर व समर्थांची टाकळी हे नाशिकचा वारसा असलेली स्थळे ‘मटा हेरिटेज वॉक’च्या माध्यमातून नाशिककरांनी अनुभवली आहेत. अगदी अबालवृद्धांचा या हेरिटेज वॉकला उत्स्फूर्त प्रति‌साद लाभला. ही स्थळे जशी नाशिकचा वारसा आहेत तशीच या शहराला वेगळेपण मिळवून देणाऱ्या व्यक्त‌िही नाशिकचा वारसाच आहेत. यात संत गाडगेबाबांचे नाव आदराने घेतले जाते. संत गाडगे बाबांचा सहवास नाशिककरांना लाभला आहे. याच काळात नाशिककरांच्या आग्रहामुळे गाडगेबाबांनी हनुमानगढीवर (आजची काझीगढी) गोदाघाटानजीक धर्मशाळा बांधली. यासाठी त्यांनी श्रमदानही केले. या धर्मशाळेचे बांधकाम गाडगेबाबांच्या सूचनेनुसार झाल्याने या वास्तुचे सौंदर्य आजही गोदाघाटावर येणाऱ्या पर्यटकांच्या मनाला भावते, असे श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्टचे संचालक कुणाल देशमुख यांनी सांगितले. या वास्तुला आता ८४ वर्षे झाली आहेत. गोदातटापासून गढीच्या टोकापर्यंत विस्तारलेली गुलाबी रंगाची इमारत पाहताना अनेकांना येथे भेट देण्याची इच्छा असते. ही उत्सुकता श‌मविण्यासाठी ‘मटा’ने धर्मशाळेत हेरिटेज वॉकचे आयोजन केले आहे. धर्मशाळेबरोबरच टाळकुटेश्वर मंदिर व सरदार यसाजी बलकवडे यांची समाधीही पाहता येणार आहे. याबाबत श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्टचे संचालक कुणाला देशमुख व इतिहास अभ्यास प्रा. रामनाथ रावळ माहिती देणार आहेत.

सहभागासाठी नावनोंदणी आवश्यक
गोदाघाटावरील संत गाडगे महाराज धर्मशाळा येथे आयोजित केलेल्या मटा हेरिटेज वॉकमध्ये सहभागी होण्यासाठी रविवारी (दि. २३) सकाळी नऊ वाजता सर्वांनी धर्मशाळेत एकत्रित जमायचे आहे. गाडगेबाबा धर्मशाळेकडे येण्यासाठी पंचवटी अमरधामकडून धर्मशाळेकडे तसेच रोकडोबा तालमीकडून धर्मशाळेकडे येता येईल. ‘मटा’ हेरिटेज वॉकमध्ये सहभागी होण्यासाठी खालील क्रमांकावर आपले नाव व सोबत येणाऱ्यांची संख्या एसएमएस करावी.
अधिक माहितीसाठी संपर्क : रमेश पडवळ, ८३८००९८१०७.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावानात आता कामकाजास मनाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहराचे भूषण असलेल्या आणि १७६ वर्षांची प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या सार्वजनिक वाचनालयातील (सावाना) अंतर्गत वाद पुन्हा उफाळून आले आहेत. संस्थेच्या विद्यमान कार्यकारिणीत फूट पडली असून, कार्याध्यक्ष, कार्यवाह आणि अर्थसचिवांना अध्यक्षांनी नोटीस बजावली आहे. या घडामोडींमुळे सावानातील राजकारण तापले आहे.

सावानाच्या कार्याध्यक्षा विनया केळकर, कार्यवाह मिलिंद जहागीरदार आणि अर्थसचिव स्वानंद बेदरकर यांनी सावानाच्या घटनेतील नियमांचे उल्लंघन करून संस्थेचे आर्थिक आणि सामाजिक नुकसान होईल, असे काम केल्याचे आढळून आल्याचे संस्थेचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांनी पाठविलेल्या नोटिशीत म्हटले आहे. या तिघांचे कार्यकारी मंडळ सदस्य तथा पदाचे कामकाज पुढील सूचना होईपर्यंत थांबवून ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

घटनेच्या भाग ५ कलम २२ अन्वये अध्यक्षांनी ही नोटीस मंगळवार (दि. १८)बजावली आहे. सभासदांच्या माहितीसाठी ती संस्थेच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आली आहे. या निर्णयाची संस्थेच्या बँकांनाही माहिती देण्यात आली आहे. संस्थेच्या घटनेतील नियम, उपनियमांचे उल्लंघन करीत असल्याबाबतची कारणे दाखवा नोटीस अध्यक्षांनी ६ ऑक्टोबर रोजी बजावली होती. सात दिवसात या संदर्भात संबंधितांना खुलासा करण्यास सांगण्यात आले होते. जहागीरदार यांच्याकडून ३७, केळकर यांच्याकडून २६, तर बेदरकर यांच्याकडून १३ मुद्द्यांचा खुलासा अध्यक्षांनी मागितला होता. परंतु, या तिघांनीही १३ ऑक्टोबर रोजी अध्यक्षांना पत्र देवून पुराव्यांची मागणी केली होती. मात्र, विचारण्यात आलेल्या मुद्द्यांचे उल्लंघन झाले आहे किंवा नाही याबाबत खुलासा केला नव्हता. अध्यक्षांनी अखेर पुढील निर्णय होईपर्यंत या तिघांचे कामकाज स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला.

चुकीचे आरोप करून आम्हाला हेतूतः बदनाम करण्याचा विद्यमान पदाधिकारी जाणिवपूर्वक प्रयत्न करीत होते. परंतु अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांनी केलेल्या कारवाईमुळे या पदाधिकाऱ्यांचा खरा चेहरा उघड झाला आहे. जहागीरदार यांनी आता सत्य काय ते सिध्द होण्यासाठी अध्यक्षांना सहकार्य करावे, असे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे यांनी म्हटले आहे. सावानामध्ये केवळ दर्शनी भागामध्ये नियमबाह्य पध्दतीने कामे करून संस्थेचे लाखो रुपये जहागीरदार यांनी उधळले. मात्र, वाचनालयाच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला. पुस्तके व सभासद नोंदीतील घोटाळा उघड होऊ नये, या हेतूने पुस्तक देवघेव विभागाची संगणकीय प्रणाली हेतूतः बंद पाडली. आम्ही वेळोवेळी केलेल्या आरोपांना या कारवाईने पुष्टी मिळाली आहे, असे माजी कार्यवाह श्रीकांत बेणी यांनी म्हटले आहे.

आमच्यावर अन्याय झाला
सार्वजनिक वाचनालयाचा लौकिक वाढावा यासाठी स्वच्छ पारदर्शी आणि निरपेक्ष भावनेने आम्ही काम केल्याचे सर्व वाचक जाणतात, तरीही आमच्यावर सर्वथैव अन्याय झाला हे यामागील सत्य आहे अशी प्रतिक्रि‌या केळकर, जहागीरदार आणि बेदरकर यांच्यावतीने देण्यात आली.

जहागीरदार यांच्यावरील आरोप
संस्थेच्या आवारात लाखोंची बांधकामे विहीत पध्दतीने केली नाहीत.
कार्यकारी मंडळाच्या बैठकीत ठराव न करताच अनेकांना बिले अदा करण्यात आली. कामनिहाय खर्च कार्यकारी मंडळापुढे सादर केला नाही.
सुमारे १ कोटी रुपयांच्या मुदत ठेवी वेळोवेळी मोडतांना कार्यकारी मंडळाची मंजुरी घेतली नाही.
मुक्तद्वार विभागाचे बांधकाम करतांना नाशिक महापालिका तसेच संस्थेच्या कार्यकारी मंडळाची मंजुरी घेतली नाही.
प. सा. नाट्यगृहामध्ये ग्रीनरुममध्ये बेकायदेशीरपणे गाळा बांधला.
संस्थेच्या विविध कार्यक्रमांच्या जाहिरातींवर अकारण लाखो रुपये खर्च करण्यात आले. जाहिराती देण्यापूर्वी वेळोवेळी कार्यकारी मंडळाची मंजुरी घेतली नाही.
संस्थेमध्ये नवीन कर्मचारी नेमतांना कार्यकारी मंडळाचे ठराव केले नाही.
भंगार सामानाची विक्री कार्यकारी मंडळाच्या ठरावाशिवाय व कायदेशीर बाब न पाळता केली.
संस्थेमध्ये ग्रंथ खरेदी नियमितपणे करण्यात आली नाही.

या तिघांच्याही कामकाजाबाबत सभासदांचे आक्षेप होता. त्यामुळे त्यांना तात्पुरते कामकाज करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. याबाबत सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल, त्यानंतरच अंतिम कारवाई करण्यात येईल.
- विलास औरंगाबादकर, अध्यक्ष, सावाना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्हाभरात आचारसंहिता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीप्रमाणेच नगरपालिका निवडणुकांची आचारसंहिता जिल्हाभर लागू करण्यात आली आहे. या आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी होईल याकडे लक्ष द्या, गाफील राहू नका, असे आदेशच जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला दिले आहेत. सणासुदीच्या निमित्ताने उमेदवार कुठल्या ना कुठल्या प्रकारे मतदारांना प्रलोभने दाखवितात. मात्र त्यावर होणारा खर्चही निवडणुकीच्या खर्चात मोजला जाईल, असे मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

नगरपालिका निवडणुकीचा बिगूल वाजला असून, रविवारी २७ नोव्हेंबरला जिल्ह्यातील सहा नगरपालिकांमधील १३२ जागांसाठी मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. निवडणुकीचा कालबध्द कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. नाशिक जिल्ह्यात भगूर, सिन्नर, येवला, नांदगाव, मनमाड आणि सटाणा या सहा नगरपालिकांमध्ये मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. एका जिल्ह्यात चारहून अधिक नगरपालिकांमध्ये निवडणूक होत

असल्याने आयोगाच्या निर्देशानुसार पूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी दिली. आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावली होती. ही निवडणूक तसेच आयोगाचे निर्देश गांभीर्याने घ्या, अंमलबजावणीचे काटेकोरपणे पालन होईल याची काळजी घ्या, असे आदेश त्यांनी यंत्रणेला दिले. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी निवडणूक प्रक्रिया अन त्या अनुषंगाने येणाऱ्या आचारसंहितेबाबत माहिती दिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे, मालेगावचे अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरूळे आदी उपस्थित होते. लोकसभा, विधानसभा निवडणुकीप्रमाणेच ही आचारसंहिता असणार आहे. महापालिका क्षेत्रासह ती संपूर्ण जिल्ह्यात लागू राहणार आहे.

तपासणीसाठी पथक

आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी होतेय की नाही हे तपासण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे फ्लाईंग स्कॉड, व्हीजिलन्स स्कॉड, अकाउंटिंग टीम कार्यरत राहणार आहे. झोनल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असून, निवडणूक कामाशी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.

अशी असेल आदर्श आचारसंहिता
सभेच्या ठिकाणांचे सर्व पक्षांना समन्यायी पध्दतीने वाटप, प्रचारकाळात हेलिकॉप्टरचा वापर झाल्यास उमेदवाराच्या निवडणूक खर्चात समावेश, झेंडे, खुर्च्या, व्यासपीठाचा खर्चही लावण्यात येणार, प्रसिध्दी पत्रकांवर छापील पत्रकांची संख्या आणि मुद्रकाचे नाव बंधनकारक, मुद्रकाचे नाव नसल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई, प्रचारासाठी तीन वाहने वापरण्यास परवानगी, बल्क मेसेजेसचा खर्चही मोजला जाणार, सोशल मीडियावरून आक्षेपार्ह मजकूर प्रसारीत केल्यास कारवाई, मंदिर व तत्सम धार्मिक स्थळांवर सभा घेण्यास मज्जाव, परीक्षाकाळात शाळा, महाविद्यालयांजवळ सभेला परवानगी नाही, पक्ष, उमेदवारांकडून मतदारांना प्रलोभने दाखविण्यास मज्जाव, परवानाधारक उमेदवारांना शस्त्र जमा करावी लागणार, रात्री १० नंतर सभेला परवानगी नाही, सरकारी विश्रामगृह, सरकारी वाहनांचा वापर करता येणार नाही, नव्याने निविदा काढता येणार नाही,

अधिकाऱ्यांसाठी आदेश

मतदारसंघातील प्रत्येक प्रभागाला भेट देऊन सूक्ष्म नियोजन करा. निवडणुकांच्यादृष्टीने आवश्यक पथके तयार करा. मतदार जागृतीवर विशेष भर द्या. नगरपरिषदेच्या ठिकाणी नियंत्रण कक्ष स्थापित करा. सभास्थळ अथवा इतर कोणत्याही परवानगी देताना प्रथम येणाऱ्यास प्राधान्य द्या.
सर्व उमेदवारांना समान न्याय या तत्त्वाचे पालन करा. महामंडळ, स्थानिक स्वराज्य संस्था, बाजार समिती आदींकडील पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेली वाहने ताब्यात घ्या. प्रचार सभा किंवा जाहिरातीतून सामाजिक तेढ निर्माण करणारे संदेश प्रसारीत होणार नाहीत यावर लक्ष ठेवा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीस लाखांचा फ्लॅट परस्पर विकला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बनावट कागदपत्रे बनवून नांदूर-दसक शिवारातील २० लाख रुपये किमतीचा फ्लॅट संशयित चौघांनी विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

गीता घनश्याम खोब्रागडे (वय ६३, रा. दुर्गानगर, के. के. वाघ कॉलेजमागे, पंचवटी) यांनी फिर्याद दिली आहे. खोब्रागडे यांच्या नावे नांदूर-दसक शिवारात फ्लॅट आहे. या फ्लॅटच्या विक्रीसाठी बनावट पॅनकार्ड नोंदवून संशयित अनोळखी महिलेसह शशिकांत हरिश्चंद्र परदेशी (रा. देवळाली गाव, कुंभार गल्ली, नाशिकरोड, संजय काशिनाथ साळुंखे (रा. स्नेहनगर, म्हसरुळ), पवन जाधव (रा. बोरगड, म्हसरुळ) या संशयितांनी हा फ्लॅट संदीप बागड यास विकण्याच्या व्यवहारात सहभाग घेतला. तर बागड यानेही फ्लॅट इतरांना विक्री केला आहे. याप्रकरणी संशयित अनोळखी महिलेसह चौघांविरोधात आडगाव पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

एकाची आत्महत्या

जुना सायखेडा रोड परिसरात एका व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. रामभाऊ जानकिशन साळवे (वय ५५, रा. गुरूकृपा रो-हाऊस, जुना सायखेडा रोड, जेलरोड) यांनी मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास राहत्या घरी अज्ञात कारणातून गळफास घेतला. नाशिकरोड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

कॉपर वायर चोरीस

गंगापूर गावात उभारण्यात आलेल्या रिलायन्स कंपनीच्या टॉवरवरील कॉपर वायर चोरीस गेली आहे. गंगापूर गावातील पेठ गल्लीत हा टॉवर उभारला आहे. अमोल आत्माराम पाटील (रा. इंदिरानगर) यांनी फिर्याद दिली आहे. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी टॉवरला बसविलेली कॉपर केबल वायर चोरून नेली. गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


संशयित ताब्यात

त्र्यंबक नाक्यावरील पिनॅकल मॉल परिसरातून मोटरसायकल चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या परप्रांतीय संशयिताला जागरुक नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. म्हसरूळ टेक परिसरातील किरण प्रभाकर बैरागी गेल्या सोमवारी दुपारी त्र्यंबकनाका येथील उपनिबंधक कार्यालयात कामानिमित्त आले होते. त्यावेळी त्यांनी मोटरसायकल पार्किंगमध्ये लावली. संशयित आकाश इश्वरीप्रसाद नामदेवे (रा. मोहननगर, छत्तीसगड) याने त्यांची मोटरसायकल चोरून पसार होण्याचा प्रयत्न केला. मात्र जागरूक नागरिकांनी त्याला पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खेडभैरवला ग्रामस्थाच्या मृत्यूनंतर तणाव

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

घोटी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील खेडभैरव गावात ग्रामस्थाचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर बुधवारी सायंकाळी तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी मारहाण केल्यानेच ग्रामस्थाचा मृत्यू झाल्याचा आरोप संतप्त ग्रामस्थांनी केला. तर भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांना पाहून पळालेल्या ग्रामस्थाचा पडून मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येतो आहे.

पोलिस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास या गावातील चार ते पाच जणांची आपापसात भांडणे चालली होती. भांडणे सोडविण्यासाठी घोटी पोलिस स्टेशनचे काही कर्मचारी या गावात गेले. मात्र, पोलिसांनी पाहून संबंधित लोक पळू लागले. याचवेळी पळताना पडून डोक्याला मार लागल्याने एकाचा मृत्यू झाल्याचे शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले. मात्र, पोलिसांनी मारहाण केल्यानेच संबंधिताचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत धार्मिक स्थळांना अंत‌िम नोट‌िसा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यांसदर्भात हायकोर्टाने दिलेली डेडलाईन जवळ आल्याने या धार्मिक स्थळांविरोधात कारवाई करण्यासाठी पालिकेने धावपळ सुरू केली आहे. शहरात सन २००९ नंतर असलेली ३१६ अनधिकृत धार्मिक स्थळे स्थलांतर करण्यासाठी अंतिम नोट‌िसा बजावल्या जाणार आहेत. ही धार्मिक स्थळे काढण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत दिली जाणार असून, या नोट‌िसा थेट धार्मिक स्थळांवरच चिकटवल्या जाणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिली.

हायकोर्टाने अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यासंदर्भात महापालिकांना डेडलाईन दिली आहे. त्यानुसार महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरात एकूण १२६९ अनधिकृत धार्मिक स्थळे आढळून आली आहेत. सन २००९ पूर्वीची १०६४ तर सन २००९ नंतरची ३१६ धार्मिक स्थळे आहेत. पहिल्या टप्प्यात २००९ नंतरची ३१६ ही धार्मिक स्थळे ऑक्टोबरपूर्वी काढायची आहेत. त्यामुळे पालिकेने ही धार्मिक स्थळे हटवण्यासंदर्भात कारवाई सुरू केली आहे. ही सर्व स्थळे हटविण्याबाबत यापूर्वीच हरकती मागव‌िण्यात आल्या होत्या. परंतु त्याला अल्प प्रतिसाद मिळाला होता.

ही स्थळे हटविण्याची डेडलाईन जवळ आल्याने पालिकेने धावपळ सुरू केली आहे. बुधवारी आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या अनधिकृत धार्मिक स्थळांना अंतिम नोट‌िसा दिल्या जाणार आहे. या धार्मिक स्थळांच्या ट्रस्टींना शेवटची संधी म्हणून १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला जाणार आहे. त्यांसदर्भातील नोट‌िसा धार्मिक स्थळावर चिटकव‌िल्या जाणार असून, पंधरा दिवसात स्थलांतरीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, ही धार्मिक स्थळे हटविण्याची मुदत आता ऑक्टोबर ऐवजी डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती पालिकेतर्फे देण्यात आली आहे.

धार्मिक तणावाचा अडसर

अनधिकृत धार्मिक स्थळे हटवण्यासाठी पोलिसांची मदत लागणार आहे. परंतु, नुकतेच तळेगाव येथील घटनेने नाशिकमध्ये जातीय तेढ निर्माण झाला होता. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात तणाव निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा धार्मिक स्थळाविरोधात कारवाई सुरू केली तर, जिल्ह्यात जातीय तणाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या कारवाईबाबत महापालिकेसह पोलिसांमध्येही धास्ती आहे. त्यामुळे अंतिम निर्णयासाठी पुन्हा सरकारकडेच निर्णय जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल मीड‌ियाद्वारे दिलीप खैरेंची बदनामी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे यांच्याबद्दल सोशल मीडियांवर अफवा पसरविल्यामुळे पंचवटी पोल‌िस स्थानकात शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी गुन्हा दाखल केला आहे. दिलीप खैरे हे शिवसेनेत जाणार असल्याची अफवा सोशल मीड‌ियावर पसरविण्यात आली आहे.

माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या काही समर्थकांनी शिवसेनेत प्रवेश केला असून, भुजबळांचे कट्टर समर्थक दिलीप खैरे हे देखील येत्या १ नोव्हेंबर रोजी ३५ गावांतील कार्यकर्त्यांसमवेत शिवसेनेत प्रवेश करणार आहे, अशा आशयाची खोटी माहिती व्हॉट्स अॅप व तत्सम सोशल माध्यमातून पसरविली जात आहे. राजकीय बदनामी करण्याच्या हेतूने काही जणांकडून मुद्दाम ही माहिती पसरवली जात आहे. त्यामुळे नाशिक शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी पंचवटी पोल‌िस स्थानकात खोटी माहिती पसरविणाऱ्यांच्या विरोधात सायबर क्राईमअन्वये पंचवटी पोल‌िस स्थानकात गुन्हा दाखल गुन्हा करण्यात आला आहे. यावेळी रायुकाँ अध्यक्ष अंबादास खैरेंसह नगरसेवक समाधान जाधव, विशाल जेजुरकर, समाधान जेजुरकर, स्वप्नील वाघ, संतोष पुंड, संदीप खैरे, किशोर शेवाळे, दिलीप रावत आदींसह कार्यकर्ते पोल‌िस स्थानकात उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदवीधरसाठी दोन दिवस नोंदणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या नव्याने मतदार याद्या तयार करण्याचे आदेश भारत निवडणूक आयोगाने दिले असल्याने या कामाला गती मिळावी व जास्तीत जास्त मतदारांना नाव नोंदणीची संधी मिळावी यासाठी येत्या शनिवारी (दि.२२) व रविवारी (दि.२३) प्रशासनामार्फत विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविली जाणार आहे. नाशिक विभागाचे महसूल आयुक्त तथा नाशिक पदवीधर मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी एकनाथ डवले यांनी ही माहिती दिली.

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदार यादी तयार करण्यासाठीचे अभियान सुरू आहे. या मतदार नोंदणी अभियानाला गती मिळावी यासाठी येत्या शनिवारी व रविवारी शासकिय सुट्टी असूनही या दोन्ही दिवशी नाशिक विभागातील सर्व पदनिर्देशित अधिकारी व सर्व महसूल मंडळ कार्यालयांत पदवीधर मतदार नोंदणी सुरू राहणार आहे.

मतदारांत निरुत्साह

गेल्या एक ऑक्टोंबरपासून नाशिक पदवीधर मतदार नोंदणी अभियान सुरू झाले आहे. अद्याप या आभियानाला पदवीधर मतदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे कमी कालावधीत सुमारे ३ लाख ५० हजार पदवीधर मतदारांची नोंदणी करण्याचे प्रशासनापुढे आव्हान आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, बॅंका व इतर आस्थापनांचे कार्यालय प्रमुखांनी आपल्या कार्यालयात कार्यरत असलेल्या पदवीधर अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून मतदार नोंदणीचा फॉर्म नं १८ भरून घ्यावेत व सोबत जोडावयाच्या आवश्यक त्या साक्षांकित कागदपत्रांसह जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.


नोंदणीबाबत प्रशासनच उदासीन
नाशिक पदवीधर मतदारसंघाची मतदार यादी रद्दबादल झाल्याने ही मतदार यादी नव्याने तयार करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने प्रशासनाला दिले असले, तरी नोंदणीच्या प्रचार-प्रसाराच्या बाबतीत खुद्द प्रशासनच उदासीन असल्याचा आरोप पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केलेले सचिन चव्हाण यांनी केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मतदार नोंदणीसाठी ज्याप्रमाणे ब्रॅण्ड अम्बेसिडरद्वारे प्रचार प्रसार केला जात आहे. त्याप्रमाणे पदवीधरच्या मतदार नोंदणीसाठी प्रशासनाकडून प्रयत्न होतांना दिसून येत नाही. पदवीधरची मतदार यादी नव्याने करावयाची आहे. याबद्दल हजारो पदवीधर अद्यापही अनभिज्ञच असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लेखक होण्यासाठी सतत वाचत रहा’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

चांगला लेखक व्हायचे असेल तर जे पुस्तक मिळेल ते वाचून काढले पाहिजे. त्याचबरोबर माणसांचे सुद्धा वाचन केले पाहिजे. पुस्तक वाचण्यातून समाज घडविणारी मूल्ये रुजली जात असल्याचे प्रतिपादन कवी किशोर पाठक यांनी केले. येथील कर्मवीर आबासाहेब तथा ना. म. सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दीन कार्यक्रमात ‘लेखकाचे व्याख्यान’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे होते.

या प्रसंगी बोलतांना किशोर पाठक म्हणाले की, जगातील सर्व साहित्यातातील मूल्ये सर्वत्र सारखीच असतात. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे कवीसुद्धा होते. त्यांचे वाचन प्रचंड होते. त्यांच्या प्रमाणेच आजच्या शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी सुद्धा दररोज वाचन केले पाहिजे. आपण पिढी घडवतोय याचा शिक्षकांना अभिमान वाटला पाहिजे. हे स्पष्ट करतांना त्यांनी उपस्थितांना धार्मिक ग्रंथापासून ते इतर गद्य व पद्य लेखनांचे पुरावे दिले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. दीलीप धोंडगे म्हणाले की, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे कवी व लेखक यांच्यावर निस्सिम प्रेम होते.

प्रारंभी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. एस. गुंजाळ, एन. डी. ततार उपस्थित होते. सुत्रसंचालन एस. पी. कांबळे यांनी तर आभार प्रा. एस. सी. शेलार यांनी मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शांततेसाठी दारूबंदी कायम ठेवावी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

तळेगाव (अंजनेरी) येथील बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेनंतर जिल्हाभरात जनक्षोभ उसळला होता. यावर सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय कायमस्वरूपी लागू करून नाशिक जिल्ह्यात दारूबंदी करावी, अशी मागणी महाराष्ट्र दारूबंदी जनआंदोलन समितीचे अध्यक्ष गणेश कदम यांनी केली आहे.

संपूर्ण राज्यात दारूबंदी करण्याचा आग्रह समितीच्या

माध्यमातून गणेश कदम यांनी राज्य सरकारकडे धरला आहे. या दारूबंदीच्या लढ्याला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह

आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रवीशंकर यांनीही समर्थन दिले आहे.

जिल्ह्यातील बिघडलेली कायदा व सुरक्षा व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यात मोबाइल इंटरनेट सेवेवर तात्पुरते निर्बंध घातले होते. याशिवाय या तणावाच्या काळात मद्य विक्रीही बंद ठेवली होती. याचा अर्थ शांतता राखण्यासाठी मद्य विक्री बंद ठेवणे आवश्यक असते.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच जाहिररित्या कबूल केले होते. म्हणजेच राज्यात शांतता कायम रहावी व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी दारूबंदी होणे आवश्यक आहे. म्हणून समितीच्या वतीने सुरू असलेल्या लढ्याचा राज्यातील सरकारने गांभीर्याने विचार करावा व संपूर्ण राज्यात कायमस्वरूपी दारूबंदी लागू करावी, अशी मागणी गणेश कदम यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळालीत सांडपाणी बेततंय नागरिकांच्या जिवावर

$
0
0

जामा मशिद परिसरातील परिस्थिती

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

येथील वॉर्ड क्रं. ६ मधील जामा मशिद परिसर गेल्या तीन ते चार वर्षांपासून गटारीच्या वाहत्या पाण्याच्या समस्येने हैराण आहे. याबाबतची तक्रार स्थानिक नागरिकांनी अनेकदा केली असून येथील नगरसेवकांनाही अनेकदा सांगूनदेखील किरकोळ काम करून नागरिकांची दिशाभूल करीत आहे. त्यामुळे आता या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले असून तातडीने प्रशासनाने याकडे लक्ष देत समस्येची सोडवणूक करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

जामा मशिद परिसर सुमारे ३५० नागरी वस्तीचा असून या भागात सर्वाधिक प्रमाणात मुस्लिम बांधव राहतात. येथील उघड्या गटारीचे पाणी साचून थेट नागरिकांच्या घरात प्रवेश करीत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य होत असून मच्छरांचा उपद्रवही वाढला आहे. अनेकवेळेस नागरिकांना रस्त्याने चालताना दुर्गंधीने तब्येत खराब झाली आहे.

भूमिगत गटारी कराव्यात

यावर उपाय म्हणून हे दुर्गंधीचे पाणी काढून देण्यासाठी भूमिगत गटार असावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. अनेकदा प्रशासनाच्या आरोग्य विभागास याबाबत सांगून देखील केवळ अधिकारी येऊन पाहणी करतात. पुढे मात्र कोणतीही कार्यवाही होत नाही. यामुळे डासांच्या उत्पत्तीत आणखी वाढ होऊन घरातील मुले आजारी पडली आहे. तरी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे गांभीर्यपूर्वक पाहणे गरजेचे असून लवकरात ही समस्या मार्गी लावण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपा कर्मचाऱ्यांचा ‘स्मार्टलेस’ कारभार

$
0
0

मनपा शाळा क्र. १२५ च्या मैदानालगतच जाळला जातोय कचरा

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

एकीकडे आपल्याला पालिका प्रशासन स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवत असले तरी दुसरीकडे पालिकेचेच कर्मचारी स्मार्टलेस वागत असल्याचे चित्र शहरात वारंवार दिसून येत आहे. नाशिकरोडच्या मनपा शाळा क्र. १२५ च्या मैदानालगतच्या मोकळ्या भूखंडाचा वापर घंटागाडी कर्मचारी सर्रासपणे कचरा जाळण्यासाठी करीत असल्याचे आढळत आहे. या प्रकारामुळे पर्यावरणीय समस्यांत भर पडत असून पालिकेच्या स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांचा ‘स्मार्टलेस’ कारभारही उघड झाला आहे.

आनंदनगर भागात मनपा शाळा क्र. १२५ च्या मैदानालगत मोठा मोकळा भूखंड आहे. या भूखंडावर मोठ्या प्रमाणात झाडे-झुडूपे, गवत वाढलेले आहे. या परिसरात मनपाच्या घंटागाडीचे कर्मचारी शहरात जमा झालेला व स्थानिक कचरा या भागातील रस्त्याच्या कडेलाच जाळण्याचा प्रकार वारंवार करीत आहेत. त्यामुळे या भागात पर्यावरणीय समस्या निर्माण झाली आहे. तसेच परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

या मैदानावर दररोज शेकडो नागरिक आरोग्य तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम करुन घाम गाळत असतात. नेमक्या याच मैदानालगत घंटागाडी कर्मचारी बऱ्याचदा जमा केलेला कचरा उचलून नेण्याऐवजी रस्त्याच्या कडेलाच जाळून टाकताना आढळून आले. या प्रकाराकडे पालिकेच्या स्वच्छता विभागाचे अधिकारीही डोळेझाक करित असल्याने कचरा जाळण्याचे प्रमाण वाढलेले आहे. अशाप्रकारे कचरा जाळण्यातून या भागात धुराचे प्रमाणही वाढलेले असते. त्यामुळे या रस्त्याने ये-जा करणारे, मैदानावर व्यायाम व चालण्यासाठी येणारे नागरिक त्रस्त झाले आहेत.

जमा केलेला कचरा जागेवरच जाळणे चुकीचे आहे. घंटागाडी कर्मचारी असा प्रकार करत असतील तर स्वच्छता अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

-सोमनाथ वाडेकर,

विभागीय अधिकारी, नाशिकरोड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निफाड तालुक्यातील रस्त्यांची ‘वाट’

$
0
0

दुरुस्तीसाठी बांधकाम विभाग शोधतोय मुहूर्त

सुनील कुमावत, निफाड

तालुक्यातील चारही दिशांना जाणाऱ्या राज्य मार्गासह, खेड्यापाड्यातील रस्त्यांची अक्षरशः वाट लागली असून, या रस्त्यांची कामे ज्यांनी करायची तो बांधकाम विभाग मात्र पावसाळा कधी थांबतो, या प्रतीक्षेत आहे. त्यांच्या या अट्टहासामुळे मात्र वाहनधारंकासह प्रवाशांचे कंबरडे मोडले जात आहे.

तालुक्यातील लासलगाव, विचार परिसर, गोडाकाठ भाग, पिंपळगाव निफाड, खडक-माळेगाव, वनसगाव या गावांतील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. सायखेडा-चाटोरी या रस्त्यावर तर दीड फुटापर्यंत खड्डे आहेत. गुजरात-शिर्डी हा मार्गावर पिंपळगाव-निफाड दरम्यानही रस्ता उखडला आहे. निफाड बसस्थानक ते शांतीनगर चौफुली या काँक्रिटीकरणाचे गज उघडे पडले आहे.

नाशिक-औरंगाबाद महामार्गावर पिंपळस ते निफाड चौपदरीकरण केलेला रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे. याबाबत अनेकदा निवेदन देवूनही अभियंत्यांना हा मार्ग कोणता आणि कुठे हेच अजून माहीत नसल्याची धक्कादायक माहिती पुढे अली आहे. सरकार बदलल्यामुळे विकासकामे होतील अशी आशा असलेल्या नागरिकांचा भ्रमनिरास झाला आहे. राज्याच्या बांधकाम विभागामार्फत राबवलेल्या खड्डेमुक्त अभियानाच्या वेळी निफाड तालुक्याला वगळले होते की काय असा प्रश्न वाहनधारकांना पडत आहे.

या खड्ड्यांतून प्रवास करणाऱ्या अनेक दुचाकीस्वारांचा अपघात होऊन त्यांना अपंगत्त्व आले आहे. पाऊस सुरू असल्याने रस्त्यांची कामे बंद होती. २० नोव्हेंबरपासून राज्य महामार्ग आणि १५ डिसेंबरपासून एन. डी. आर.च्या कामांची सुरुवात होईल. खड्डे लवकरच बुजवले जातील.

- महेश पाटील, सहाय्यक अभियंता, सा. बां. नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपकडून लढण्यासाठी इच्छुकांमध्ये स्पर्धा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीसाठी भारतीय जनता पार्टीची बैठक निफाड येथे झाली. या बैठकीत उमेदवारी करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून आला. सर्वात जास्त जि. प. गट आणि गण संख्या निफाड तालुक्यात असल्याने इच्छुकांची संख्या अधिक आहे.

१० गट आणि २० गण असल्यामुळे जवळपास प्रत्येक ठिकाणी उमेदवारी करण्यासाठी तीन ते चार जण इच्छुक आहेत. भाजपचे नेते सुरेशबाबा पाटील बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. केंद्र व राज्यात सत्ता असून तालुक्यातही जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भाजपची सत्ता येण्यासाठी आपापसातील मतभेद विसरून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन सुरेशबाबा पाटील यांनी केले. माजी आमदार कल्याणराव पाटील, नगराध्यक्ष राजाभाऊ शेलार,

जिल्हा सरचिटणीस बापूसाहेब पाटील, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक वैकुंठ पाटील, तालुकाध्यक्ष संजय वाबळे, संजय गाजरे, दिलीप कापसे, मनोहर गायकवाड आदींनी भूमिका व्यक्त केली. बहुमताने विजय मिळव‌िण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. पाटील यांनी गट आणि गणातील इच्छुकांची मनोगते ऐकून घेतली.

याप्रसंगी निफाड तालुक्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व शिवसेनेचे भास्कर डेर्ले, सुरेश माळी, विंचुरच्या शकुंतला दरेकर, अमोल सानप, विजय तलवारे, सचिन दरेकर, रत्नाकर दरेकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. याप्रसंगी युवा अध्यक्ष आदेश सानप, कैलास सोनवणे, सतीश मोरे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>