Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नाशिककरांसह उद्योजकांचा सवाल

$
0
0

भंगार बाजाराची नोंदणी झाली, पुढे काय?

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक महापालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून वादग्रस्त ठरलेल्या भंगार बाजाराची चौथ्यांदा महापालिकेने नोंदणी केली आहे. यात भंगार बाजाराची नोंदणी झाली पुढे काय, असा सवाल उपस्थित होत आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या भंगार बाजाराचा निर्णय कधी लागणार असा सवाल नाशिककरांसह उद्योजकांकडूनदेखील उपस्थित केल जात आहे.

सातपूरला नगरपालिका असताना नंदिनी नदीकिनारी भंगाराची दुकाने थाटण्यात आली होती. यानंतर सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीत कारखान्यांचे मोठे जाळे पसरले होते.

यात रहिवाशी भाग असलेल्या अंबड-लिंकरोडवर सर्वाधिक भंगारांची अनधिकृत दुकाने थाटण्यात आली होती. परंतु आर्थिक देवाणघेवाणीतून आजतागायत अनधिकृत भंगार बाजाराचा प्रश्न सुटलेला नाही. महापालिकेने तब्बल चारवेळा दुकानांचे रेखांकन केले आहे. दरवेळी शेकडोने दुकानांची संख्या वाढली असल्याचे समोर आले.

नगरसेवकांचाही पाठपुरावा

भंगार बाजार हटवावा यासाठी नगरसेवक दिनकर पाटील, माजी नगरसेविका अॅड. वसुधा कराड, माजी नगरसेवक दिलीप दातीर यांनी अनेकदा आंदोलने केली. परंतु महापालिकेने केवळ पोलिस संरक्षण मिळत नसल्याचे कारण सांगत चालढकल केली. आता यावर महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी नवीन रेखांकन केल्यानंतर तरी अनधिकृत भंगार बाजार हटवावा, अशी मागणी जोर धरत आहे.

अंबड-लिंकरोडवर नागरी वसाहतींच्या जागेवर अनधिकृतपणे वसलेल्या भंगार बाजारात एकाच मालकाने स्वतःचे दुकान ठेवत इतर जागा दुसऱ्या भंगार व्यावसायिकांना भाड्याने दिल्या आहेत. यात माजी नगरसेवकांचेदेखील भंगार दुकानांना जागा भाड्याने दिल्याचे समोर आले आहे.

उद्योगांचे काम होते भंगार बाजारात

सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीत उद्योजकांना एमआयडीसीकडून भूखंड नसल्याचे सांगितले जाते. परंतु अनाधिकृत भंगार बाजारात कारखान्यांमध्ये लागणाऱ्या सुटे पार्टचे काम घेतले जाते. यामुळे केवळ भंगाराचीच दुकाने नव्हे तर उद्योगांचे काम आता भंगार बाजारात अनेकांनी सुरू केले आहे. विशेष म्हणजे महागड्या अशा लेथ मशिनच्या सहाय्याने भंगार बाजारात कारखान्यांना लागणारे सुटे पार्ट बनविण्याचे काम घेतले जाते.

भंगार बाजाराबाबत अनेकदा महापालिका व पोलिस प्रशासन यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. परंतु महापालिका व पोलिस प्रशासन यांच्यात एकमत होत नसल्याने भंगारांची दुकाने दिवसागणिक वाढलेली पहायला मिळतात. महापालिका आयुक्तांनी अनधिकृत भंगार बाजाराबाबत गांभीर्याने घेण्याची गरज आहे.

- दिलीप दातीर, माजी नगरसेवक

एमआयडीसीत भूखंड घेतल्यावर सरकारच्या अनेक परवानग्या घेऊन कारखाना सुरू करावा लागतो. परंतु भंगार बाजारात कारखान्यांचे सुटे पार्ट बनविण्याचे उद्योग बिनदिक्कतपणे सुरू आहेत. यामागे शासन व विविध कर गोळा करणारे विभाग करतात काय हा आमचा सवाल आहे.

- सुधाकर देशमुख, उद्योजक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पार्किंग घोटाळ्याचा लागेना तपास

$
0
0

मनपा आयुक्त, नगरसेवकांचे मौन; चौकशी संथ गतीने

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

मुक्तिधाम येथे वाहन पार्किंगचा बोगस ठेका चालवून पालिकेला लाखो रुपयांचा चुना लावणाऱ्या बोगस ठेकेदाराने केलेला पार्किंग कर घोटाळा ‘मटा’ ने उजेडात आणला होता. मात्र त्यानंतर दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्याप या घोटाळ्यातील प्रमुख सूत्रधारापर्यंत पोलिस व मनपा प्रशासन पोहचले नाही. यामुळे या सर्व घोटाळ्यावर आता पांघरुण घातले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आयुक्त तसेच लोकप्रतिनिधीही यामध्ये बघ्याची भूमिका घेतली आहे.

गेल्या ऑगस्ट महिन्यात मुक्तिधाम येथे पार्किंग कर वसुलीचा बोगस ठेका कार्यरत असल्याचा प्रकार ‘मटा’ ने उघडकीस आणला होता. यानंतर महापालिका वर्तुळात खळबळ उडाली होती. शहरातील मुक्तिधाम येथे देशाच्या काना कोपऱ्यातून भाविक दर्शनसाठी येत असतात. पालिकेकडून पार्किंग करापोटी येणाऱ्या भाविकांकडून प्रत्येक तासासाठी प्रत्यक्षात १५० ते २०० रुपये वसूल केले जात होते. विशेष म्हणजे तशी पालिकेच्या नावाची छापील पावतीही भाविकांना दिली जात होती.

प्रत्यक्षात मात्र महापालिका प्रशासनाने येथे पार्किंग कर वसुलीचा ठेका कुणालाही दिलेला नव्हता. असे असतानाही येथे बोगस पार्किंग कर वसुलीचा ठेका सर्रासपणे सुरूच होता. या पार्किंग घोटाळ्याबाबत उपायुक्त रोहिदास बहिरम यांच्या आदेशानुसार उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मात्र या गुन्ह्याचा तपास अद्यापही जागेवरच आहे. दक्ष अधिकारी व कर्मचारी या पोलिस ठाण्यात असूनही घोटाळ्यातील सूत्रधाराचा शोध लागलेला नाही. याचेच परिसरातील नागरिकांना आश्चर्य वाटत आहे.

आयुक्तांची बघ्याची भूमिका

या घोटाळ्याचे पुरावे महापालिका प्रशासनाला प्राप्त होऊनही दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याऐवजी ही जबाबदारी पोलिसांच्या खांद्यावर टाकण्यात आली. यावरून पालिका प्रशासनाने या प्रकरणातून अंग काढून घेतल्याचे एका अर्थाने स्पष्टच झाले. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचा बचावच केला आहे. याशिवाय पालिकेच्या नावाखाली लाखो रुपयांची माया जमवून पालिकेची बदनामी व आर्थिक नुकसान झाल्याचे उजेडात येऊनही अद्याप नाशिकरोड प्रभागातील २४ पैकी एकाही नगरसेवकाने या घोटाळ्याविरुद्ध आवाज उठविण्याचे धाडस केले नाही. किंवा पालिका अधिकाऱ्यांना जाब विचारण्याची तसदीही घेतली नाही.

या प्रकरणी आयुक्तांनी मलाच नोटीस दिली होती. याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल असून पोलिसांना आम्ही सहकार्य करित आहोत. परंतु या प्रकरणी हाती काही लागल्याचे पोलिसांकडून समजलेले नाही.

-रोहिदास बहिरम, उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांनी सावरले ‘त्यांचे’ संसार

$
0
0

तळेगाव घटनेनंतर जनजीवन पूर्वपदावर; पीडित कुटुंबांना मदत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तळेगावात दुर्देवी घटना घडली आणि सोबत काम करणारे, एकत्र फिरणारे एकमेकांचे हाडवैरी झाले. तब्बल सहापेक्षा अधिक दिवस दहशतीत गेले. सध्या, जीवाच्या भीतीने मिळेल ती वाट पकडून शहराच्या दिशेने गेलेल्या कुटुंबांना परत आणून त्यांचा अस्तव्यस्त संसार उभा करण्यासाठी ग्रामीण पोलिसांचे काम सुरू आहे. साफसफाई करण्याबरोबर सदर कुटुंबाना उभे राहण्यासाठी पोलिस प्रयत्नशील असून, कायदा व सुव्यवस्था कायम झाली असल्याचे पोलिस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी सांगितले.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव (अंजनेरी) येथे अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना ८ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास समोर आली. यानंतर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक गावे, वाड्या दहशतीच्या छायेत लोटली गेली. कायदा व सुव्यवस्था कायम करता करता आठ दिवस लोटले. त्र्यंबकेश्वर तालुक्यात घडलेल्या अनेक घटनांना तर वाचाही फुटलेली नाही. रात्रीच्या काळोखात त्या दडपल्या गेल्या. अनेक कुटुंबांनी जीवाच्या भीतीने स्थलांतर केले. आता संचारबंदी हटवण्यात आली असून, गावा-वाड्यांमधील दैनंदिन कामकाज सुरू झाले. पोलिसांचा मोठा फौजफाटा अजूनही या परिसरात तैनात आहे. पोलिस दंगलीचा फटका बसलेल्या कुटुंबाना सावरण्याचा प्रयत्न करीत आहे. याबाबत बोलताना पोलिस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी सांगितले की, नागरिकांनी पोलिसांच्या संपर्कात राहावे. काही माहिती द्यायची असल्यास किंवा तक्रार असल्यास नागरिकांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधवा. संचारबंदी हटविण्यात आल्यानंतर घर सोडून गेलेल्या कुटुंबांना परत आणण्याचे काम सुरू आहे. साफसफाईपासून अगदी घरातील भांडे लावण्यापर्यंत पोलिस सदर कुटुंबांना सहकार्य करीत असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

दसऱ्यादरम्यान तणावपूर्ण परिस्थिती असल्याने अनेक कुटुंबांनी देवी विसर्जन केलेले नव्हते. त्यामुळे गावांमधील सर्व समाजाच्या व्यक्तींची कमिटी बनवून त्यांची बैठक घेत हे कार्य पार पाडण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जनजीवन पूर्ववत झाले आहे. पोलिस कर्मचारी तैनात असून, ते पीडित कुटुंबांना मदत करीत आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. काही शंका असल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधवा.

- अकुंश शिंदे, पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटी परिसर अस्वच्छतेच्या दुष्टचक्रात

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

स्वच्छता अभियानाचा बोलबाला सुरू असताना पंचवटीतील अस्वच्छता काही कमी होताना दिसत नाही. बऱ्याचशा रस्त्यावर कचरा साचल्याचे दिसते. नागचौक ते वाघाडीवरील चारहत्ती पूल या रस्त्यावर निर्माल्य कलश कचरा टाकण्यासाठी ठेवण्यात आलेले आहेत. मात्र, या कुंड्यांच्या बाहेरच कचरा टाकल्या जात आहे. त्यामुळे कुंड्या रिकाम्या आणि कचरा रस्त्यावर अशी स्थिती येथे बघायला मिळत आहे.

पंचवटीत कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. प्रभागानुसार घंटागाड्यांची संख्या कमी आहेत. ज्या घंटागाड्या आहेत, त्यातील बहुतांशी नादुरुस्त असतात. त्यांना पर्यायी घंटागाड्या उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. त्यामुळे कचरा साचून कचऱ्याचीच पंचवटी असे चित्र सध्या सर्वत्र दिसत आहे.

पंचवटी हे धार्मिक तीर्थक्षेत्र असल्याने येथे भाविकांची आणि पर्यटकांची कायम वर्दळ असते. त्यांना पंचवटीच्या अशा अस्वच्छतेचे हमखास दर्शन घडते. रामकुंड, कपालेश्वर महादेव मंदिर, काळाराम मंदिर, सीतागुंफा येथून दर्शन घेऊन तपोवनाकडे ज्या मार्गाने हे भाविक आणि पर्यटक जातात. त्या नागचौकापासून पुढचा वाघाडीच्या चार हत्ती पूलाकडच्या रस्त्यावर कायमच कचरा साचलेला असतो. येथे कचरा टाकीत असल्याचे लक्षात घेऊ महापालिकेने येथे गंगाघाटावरील निर्माल्य कलश ठेवले आहेत. मात्र, या कलशात कचरा टाकण्याऐवजी ते खाली रस्त्यावरच टाकण्यात नागरिक धन्यता मानत असल्याचे दिसत आहेत. त्यामुळे या कुंड्या रिकाम्याच राहून भाविकांना कचऱ्याचे दर्शन घडते.


आरोग्य धोक्यात

प्रत्येक गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी शासन प्रयत्नशील असताना शहरात मात्र आजही अनेक जण उघड्यावर शौचास बसतात. हे चित्र या रस्त्यालगत असलेल्या शौचालयाच्या समोरच्या भागाकडे बघताच दिसते. त्यामुळे या भागात कायम दुर्गंधी असते. त्याचा त्रास आजूबाजूच्या नागरिकांना होतो. त्यांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. याची महापालिकेने दखल घेतली पाहिजे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अडीच महिन्यांत बसणार दीड लाख सेट टॉप बॉक्स

$
0
0

म. टा प्रतिनिधी, नाशिक

केबल व्यवसायात पारदर्शकता आणण्यासाठी डिजिटायजेशनची प्रक्रीया सरकारने सुरू केली असून, नाशिक शहरासह मोठी गावे आणि नगरपालिका हद्दीत सेट टॉप बॉक्स अनिवार्य करण्यात आले आहेत. आता फेज ४ अंतर्गत ग्रामीण भागात डिजिटायझेशनचे काम हाती घेण्यात आले आहे. ३१ डिसेंबर २०१६ ही त्यासाठी अखेरची मुदत असून, अडीच महिन्यांत नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांत सुमारे दीड लाख सेट टॉप बॉक्स बसविण्याचे उद्दिष्ठ ठेवण्यात आले आहे.

धकाधकीच्या जीवनात काही क्षण विरंगुळ्याचे मिळावेत यासाठी मनोरंजन ही गरज बनू पहात आहे. केबलद्वारे वेगवेगळ्या दूरचित्रवाणी वाहिन्यांचे पर्याय नागरिकांना उपलब्ध होतात. मात्र अशा ग्राहकांची नेमकी संख्या आणि प्राप्त होणारा महसूल यांचा ताळमेळ बसत नसल्याने सरकारचा महसूल बुडत होता. ग्राहकांची खरी आकडेवारी समोर यावी आणि सरकारचा करमणूक कर चुकविणाऱ्यांना लगाम बसावा यासाठी सरकारने केबल डिजीटायजेशन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे केबलचा वापर करणा‍ऱ्या संबंधित ग्राहकांना सेट टॉप बॉक्सची सक्‍ती करण्यात आली आहे. केबल ग्राहकांची नेमकी आकडेवारी थेट सरकारकडे नोंद होण्यास त्यामुळे मदत होत आहे. जिल्ह्यातील मोठ्या शहरांमध्ये फेज ३ अंतर्गत सेट टॉप बॉक्स बसवण्यात आले आहेत. नाशिक शहरात ८० टक्के, धुळ्यात ७०.८३ टक्के, नंदुरबार आणि अहमदनगर शहरात १०० टक्के तर जळगावात ६५.३७ टक्के सेटटॉप बॉक्स बसविण्यात आले आहेत. नाशिक विभागात सरासरी ८२.२१ टक्के केबल डिजीटायजेशनचे काम झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

जिल्ह्यातील बहुतांश भागात डिजिटायझेशन पूर्ण झाल्याने आता फेज ४ अंतर्गत प्रत्येक खेड्यापाड्यापर्यंत सेट टॉप बॉक्स बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्यासाठी ३१ डिसेंबर २०१६ ही अखेरची मुदत आहे. नाशिक विभागात १ लाख ३७ हजार ९४५ सेटटॉप बॉक्स बसविण्याचे आव्हान महसूल प्रशासन आणि केबल ऑपरेटर्ससमोर आहे. जे ग्राहक ३१ डिसेंबरपूर्वी सेटटॉप बॉक्स बसविणार नाहीत त्यांचे केबल प्रेक्षेपण बंद करण्यात येणार असल्याचे करमणूक कर विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. नाशिक व धुळे जिल्हा वगळता अन्य ३ जिल्ह्यांमध्ये चवथ्या फेजमधील सेटटॉप बॉक्स बसविण्यास सुरूवात झाली आहे. नंदुरबारमध्ये एक हजार ५०, जळगावमध्ये ७३९, अहमदनगर जिल्ह्यात दोन हजार ९८४ असे एकुण ४ हजार ७७३ सेटटॉप बसविण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोलकरणीच्या पतीने केला वार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

मालकीणच्या सांगण्यावरून पत्नीने आपल्याला सोडून दिले. या गोष्टीचा राग मनात ठेवून अरविंद सुदाम लाटे याने अश्विननगर येथील अरुणा जर्नादन कापसे यांच्यावर ब्लेडने वार करीत जखमी केले. तसेच त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन लंपास केली. हा प्रकार घडल्यानंतर पाथर्डी फाटा येथे वाहतूक पोलिसांना हा प्रकार समजल्यावर त्यांनी पाठलाग करून संशयित आरोपी अरविंद यास मुद्देमालासह ताब्यात घेऊन अंबड पोलिसांच्या स्वाधीन केले.

अरुणा जनार्दन कापसे (वय ५८, रा. अश्विननगर) यांच्या बंगल्यात अरविंद सुदाम लाटे (वय ३२, मूळ रा. टिटवाळा) याची पत्नी काम करीत होती. मात्र काही दिवसानंतर त्याची पत्नी त्याला सोडून निघून गेली. मात्र अरविंद याने कापसे यांच्या सांगण्यावरूनच ती गेल्याचा राग मनात ठेवून अरुणा कापसे यांच्यावर ब्लेडने वार केले. यात जखमी झालेल्या कापसे यांच्या गळ्यातील सोन्याची चेनसुद्धा त्याने लंपास केली. या घटनेची माहिती शेजारी राहणाऱ्यांना समजल्यावर त्यांनी तातडीने अंबड पोलिसांना दिली. पोलिसांनासुद्धा अरविंद हा पाथर्डी फाट्याकडे पळत असल्याची माहिती मिळाली. यावेळी वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश भाले यांच्यासह वाहतूक शाखेचे कमलेश आवारे, संजय पगारे यांनाही मिळालेल्या माहितीनुसार सदर युवक पाथर्डी गावाकडे जात असल्याचे लक्षात आले. वाहतूक पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पाथर्डी गावाजवळील एका हॉटेलजवळून ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडे सोन्याची चेन आढळून आली. त्यांनी तातडीने त्यास अंबड पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी अंबड पोलिसांनी कापसे यांच्या फिर्यादीवरून अरविंदविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हागणदारीमुक्त’चे येवल्यास पारितोषिक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी हागणदारी मुक्त शहरासाठी प्रभावीपणे राबवलेल्या योजना अन् शहरवासीयांची भरभरून मिळालेली साथ यातून येवला नगरपालिकेस राज्य शासनाच्या वतीने स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत हगणदारीमुक्त शहराचे पारितोषिक मिळाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या एका सोहळ्यात हे पारितोषिक प्रदान करण्यात आले.

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत येवला नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय समितीमार्फत सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणात समितीने शहरातील वैयक्तिक तसेच पालिकेच्या सार्वजनिक शौचालयांची प्रत्यक्ष पाहणी करतानाच शहरातील विविध भागातील नागरिकांशी संवाद देखील साधला होता. या सर्वेक्षणात समाधानकारक बाब समोर आल्याने सर्वेक्षण अहवालानुसार येवले शहरास हागणदारीमुक्त शहर घोषित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते हे पारितोषिक नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे, उपाध्यक्ष पंकज पारख, पालिका मुख्याधिकारी राहुल वाघ, स्वच्छता विभागाचे अभियंता सत्यवान गायकवाड व कामगार प्रमुख श्रावण जावळे यांनी स्वीकारले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खते खरेदीसाठीही आधार लिंकिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खते, कीटकनाशके खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून सबसिडी दिली जाते. सबसिडीच्या या प्रक्र‌ियेत सुसूत्रता आणि पारदर्शकता आणता यावी यासाठी केंद्र सरकारने ‘पाइंट ऑफ सेल’ हा उपक्रम हाती घेतला आहे. केंद्राच्या या पायलट प्रोजेक्टसाठी राज्यात नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. १ नोव्हेंबरपासून या उपक्रमाला सुरुवात होणार असून, ही सर्व प्रक्र‌िया आधार लिंक‌िंग केली जाणार आहे.

केंद्र सरकारचा दरवर्षी खते आणि कीटकनाशकांच्या सबसिडीवर कोट्यवधींचा खर्च होतो. मात्र, तरीही शेतकऱ्यांना खते व कीटकनाशके वेळेत आणि मुबलक प्रमाणात मिळतात की नाही, याबाबत ठोस माहिती उपलब्ध होत नाही. म्हणूनच सरकारने या खते वितरण प्रणालीत सुसूत्रता आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचा कृषी विभाग तसेच राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टिलायझर विभागामार्फत हा उपक्रम राबविला जाणार असून, त्यावर जिल्हाधिकाऱ्यांचे नियंत्रण असणार आहे. मान्यताप्राप्त खते व कीटकनाशक विक्रेत्यांना विशिष्ट मशिन्स दिले जाणार आहेत. खते खरेदी करण्यासाठी जाताना शेतकऱ्यांनाही सोबत आधारकार्ड ठेवावे लागणार आहे. नोंदणीकृत दुकानदारांना मशिन्स देण्यात येणार असून, सात-बारावर नोंदणी केलेल्या क्षेत्रानुसारच शेतकऱ्यांना खते व कीटकनाशके उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस आहे. त्यामुळे आपसूकच या क्षेत्रातील अनागोंदीला चाप बसण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जातो आहे.

जिल्ह्यात खते व कीटकनाशक विक्री करणारे तीन हजार ३०० दुकाने आहेत. त्यापैकी एक हजार ६०० दुकाने नोंदणीकृत असून, त्यांनाच उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात समाविष्ट केले जाणार आहे. खतांच्या विक्रीवर सरकारला नियंत्रण ठेवता येणे, तसेच खत कंपन्यांना सबसिडी देताना त्याचा फायदा होणार आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये ९२ मंडळ अधिकारी व ४५० तलाठ्यांमार्फत या उपक्रमासाठी आधार क्रमांक जोडणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. डिसेंबर अखेरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे. एकदा दुकानदारांकडील मशिन्सला हे क्रमांक जोडले की प्रत्येकवेळी शेतकऱ्यांना खते- किटकनाशके घेतेवेळी आधार क्रमांक सांगावा लागेल. भविष्यात शेतकऱ्यांची बायोमेट्र‌िक नोंदणी केली जाणार असून, थंब केल्यानंतरच त्याला खते व कीटकनाशके मिळू शकतील. आपल्याकडील शेती निसर्गावर अवलंबून आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे होणारे नुकसान गृहीत धरून शेतकऱ्यांना खते खरेदी करण्यावर मर्यादा नसावी, असाही या उपक्रमाचा मानस आहे.


१ नोव्हेंबरपासून प्रायोगिक तत्वावर या उपक्रमाची सुरुवात होणार आहे. १ डिसेंबरपासून तो नियमितपणे राबविण्यात येईल. हा उपक्रम आंध्रप्रदेशात यशस्वीरित्या राबविला जात असून, त्याचाच अभ्यास करण्यासाठी कृषी तसेच राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टिलायझर विभागाचे नाशिकमधील काही अधिकारी आंध्रप्रदेशातील कृष्णा जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले आहेत.


या उपक्रमासाठी राज्यात नाशिकसह रायगडची निवड करण्यात आली आहे. १ नोव्हेंबरला तो कार्यान्वित करण्यात येणार असून, एक दोन महिन्यांत त्याचे फायदे लक्षात येतील. हा उपक्रम यशस्वी झाल्यास तो राज्यभर लागू होऊ शकेल.

-राजेश साळवे, डीआयओ एनआयसी, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दलित-मराठा ऐक्य परिषद कोल्हापुरात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिर्डीमधील स्थगित करण्यात आलेली दलित- मराठा ऐक्य परिषद आता ११ नोव्हेंबरला कोल्हापुरात होणार आहे. या परिषदेचे स्थळ बदलण्यात आले असून, ती आता शिर्डीऐवजी कोल्हापूरमध्ये होणार असल्याची माह‌िती आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी दिली. कोपर्डीची घटना व त्यापाठोपाठ नाशिकमध्ये निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे ठिकाण बदलण्यात आले आहे.

दलित व मराठा समाजामध्ये निर्माण झालेला दुरावा कमी करण्यासाठी आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिर्डीमध्ये १९ ऑक्टोबरला दलित-मराठा ऐक्य परिषद आयोजित केली होती.परंतु तळेगाव प्रकरणामुळे पुन्हा तणाव निर्माण झाल्याने ही ऐक्य परिषद स्थगित करण्यात आली होती.दोन दिवसांपूर्वीच नाशिक दौऱ्यावर आलेल्या रामदास आठवलेंनी ही परिषद स्थगित केल्याची घोषणा केली होती. कोपर्डी व तळेगावच्या घटनांमुळे दोन समाजात जातीय तेढ निर्माण झाली होता. त्यामुळे या परिषदेचे ठिकाणच बदलण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे.

११ नोव्हेंबरला कोल्हापूर येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. या परिषदेला कोल्हापूरमधील स्थानिक प्रतिनिधींसह राज्यभरातील दलित व मराठा नेत्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे.दोन समाजात निर्माण झालेली तेढ कमी करून जातीय सलोखा कायम राहण्यासाठी या परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देश में शांती बनी रहे, यही मकसद…

$
0
0

तुषार देसले, मालेगाव

‘भैय्या देश मे क्या हो रहा है मुझे मालूम नही, बस्स देश मे शांती बनी रहे यही मेरा मकसद है.’ डोक्याला बांधलेले लाल कफन, अंगतील टी शर्ट, गळ्यात काही मजकूर लिहिलेली पाटी आणि हातात देशाचा तिरंगा ध्वज घेऊन एक अवलिया सध्या भारताचे दक्षिणेकडील शेवटचे टोक असलेल्या रामेश्वरमकडे पायी निघालाय. हा अवलिया तरुण महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांचे सध्या लक्ष वेधून घेत आहे. त्याच्या हातातील तिरंगा पाहून कुणीही त्याची आपसूकच विचारपूस करीत आहे.

बाबा राहुल गौड पिवारी असे त्या अवलीया तरुणाचे नाव आहे. राहुल मूळचा उत्तर प्रदेशातील बदायू येथील रहिवासी. मात्र सध्या तो एका अनोख्या पायी यात्रेच्या प्रवासाला निघाला आहे. हरिद्वार ते रामेश्वर अशा शांती पदयात्रेला निघलेला राहुल नुकताच येथील महामार्गावरून मार्गस्थ झाला. त्यावेळी त्याच्या हातातील अत्यंत भव्य असा तिरंगा त्याच्या बद्दलची प्रवाशांची उत्सुकता वाढणारा असल्याने तो अनेकांचे लक्ष वेधून घेत होता. १५ ऑगस्टपासून त्याने आपली पदयात्रा सुरू केली आहे.

भगवान शंकराचा भक्त असलेला राहुल सच्चा देशभक्तदेखील आहे. कारण देशात शांतता राहावी, जातीय धार्मिक सलोखा कायम राहावा याच विचारातून तो प्रेरित झाला असून, त्यासाठीच त्याने ही पदयात्रा सुरू केली आहे. महाराष्ट्रातील साई बाबांचे दर्शन घेण्याची त्याची इच्छा असल्याने तो शिर्डी येथेही जाणार आहे.

हजारो किमीचे हे अंतर पायी चालण्याचे आव्हान त्याने स्वीकारले असून, गेल्या तीन महिन्यात मजल दरमजल करीत तो महाराष्ट्रात दाखल झाला आहे. वाटते मुक्काम कुठे करायचं? राहायचे कुठे? खायचे काय? हे प्रश्न त्याचा मनात नाहीत कारण तो म्हणतो ‘पुरा देश मेरा है’ रस्त्यात लागणारे धार्मिक ठिकाणे, ढाबे असे कुठेही तो आपले भूक भागावतो आणि चालत राहतो. हातात अभिमानाने फडकणारा तिरंगा आणि चालताना फार बोलू नये म्हणून त्याने गळ्यात अडकवलेली पाटी आणि त्यावरील ते वाक्य ‘देश की शांती हेतु पद यात्रा’ हेच सारे काही सांगून जाते. एरवी कुठल्याही धार्मिक पदयात्रेत डिजेच्या तलवार झिंगाट नाचणारी तरुणाई हल्ली सहज रस्त्यावर दिसते. मात्र देशात शांती सलोखा राहावा म्हणून ऊन, वारा, पावसाची तमा न करता पायी निघालेला हा अवलिया वेगळाच म्हणावा लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात अवतरले चहाचे मळे!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

चहाचे मळे आसाममध्ये आहेत हे आपण टीव्ही आणि पुस्तकात पाहतो. मात्र, नाशिकरोडलाही चहाचे मळे अवतरल्याचे आणि महिला मजूर चहाची पाने तोडून पाठीवरील टोपलीत टाकत असल्याचे सुंदर चित्र दिसत आहे.

नाशिक-पुणे महामार्गावर नासर्डी पुलालगत वाहतूक बेट आहे. त्यामध्ये आसामचे सुंदर निसर्ग चित्र साकारण्यात आले आहे. चहाच्या मळ्यात महिला मजूर पाठीला टोपली लाऊन चहाची पाने खुडत असल्याचे सहा-सात पुतळे येथे उभारण्यात आले आहेत. एक वर्षापूर्वी या वाहतूक बेटातील झाडे जळून गेली होती. तसेच बोरी आणि बाभळी उगवल्या होत्या. महिला पुतळ्यांचे हात समाजकंटकांनी काढून बाजूला फेकून दिले होते. त्यामुळे वाहतूक बेटाकडे पाहून नाशिक शहराची चुकीची प्रतिमा बाहेरगावच्या प्रवाशांच्या मनात उभी राहत होती. बेट साकारणाऱ्या खासगी प्रायोजकाने बेटाची पुन्हा स्वच्छता करून झाडे वाढवली आहेत. पुतळ्यांचे हात पुन्हा जोडण्यात आले असून रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्यामुळे या बेटाची शोभा वाढली आहे. या बेटावर महिला मजूर चहाची पाने खुडून टोपलीत टाकत असल्याचा भास येणाऱ्या जाणाऱ्याला होत आहे. नाशिकमध्ये कामानिमित्त येणारे बाहेरगावचे लोकदेखील समाधान व्यक्त करत आहेत.

अन्य बेटांची दुरवस्था

नाशिकरोडच्या वाहतूक बेटांची दुरवस्था झाली आहे. व्दारकाच्या बेटामध्ये भिकारी झोपलेले असतात. तेथे मुंबई नाक्याप्रमाणे झाडे लावलेली नाहीत. या महत्त्वाच्या चौकातील वाहतूक बेटालाच अवकळा आली आहे. विजय-ममता चौकातील वाहतूक बेटावर काटेरी झाडे-झुडपे उगवली आहेत. उपनगर नाक्यावरील बेटाची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही. दत्तमंदिर चौकातील बेट कचराकुंडी झाले आहे. तेथेही कांग्रेस गवत व काटेरी झाडे-झुडपे उगवली आहेत. बिटको चौकात दोन वाहतूक बेट साकारली जात आहे. मात्र, त्यांच्या पूर्णत्वाला मुहूर्त लागत नाही. सिन्नरफाटा येथील बेटाचीही रंगरंगोटीची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भगवा फडकव‌िण्याचा केला निर्धार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

नगरपालिका, पंचायत समिती अन् जिल्हा परिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येवला शहर व तालुक्यात आता राजकीय वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या रणांगणात उतरण्यासाठी जय्यत तयारीच्या दृष्टीने विविध राजकीय पक्षांच्या बैठकांना सुरुवात झाल्याचे दिसत असून, याच अनुषंगाने रविवारी दुपारी शिवसेना पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांची एक बैठक शहरातील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात झाली. आगामी निवडणुकीत एकजुटीने सामोरे जाताना भगवा फडकवण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने शिवसेनेची बैठक झाली. या बैठकीत आगामी येवला नगरपालिका, पंचायत समितीसह जिल्हा परिषदेच्या गटातील निवडणुकीत एक दिलाने काम करून भगवा फडकवण्याचा निर्धार करण्यात आला. पक्षात कुठलेच अंतर्गत मतभेद नसून, या निवडणुका एकहाती जिंकू अशी ग्वाही यावेळी नेत्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिली. नगरपालिका निवडणुकीत भाजपाशी युती झाली तर ठिकच, अन्यथा सर्वच्या सर्व २४ जागांवर सेनेच्या वतीने सक्षम उमेदवार दिले जाणार असल्याचे संकेत या बैठकीत देण्यात आले. संघटनात्मक पातळीवर एकजुट असल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी सांगितले.

पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पवार यांनी संघटना वाढीवर भर देण्याच्या सूचना केल्या. येवला नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीपाठोपाठ पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका लगेचच येत असल्याने वेळ फार कमी असणार आहे. त्यामुळे आतापासूनच सर्वच निवडणुकांच्या दृष्टीने तयारीला लागून जास्तीत जास्त काम करायचे आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धीकडे लक्ष ठेवा. येत्या काळात गाफील न राहता जोमाने कामाला लागा, असेही पवार यावेळी म्हणाले. जिल्हा उपप्रमुख वाल्मिक गोरे, तालुकाप्रमुख झुंजार देशमुख, शहरप्रमुख राजेंद्र लोणारी, भास्कर कोंढरे, राहुल लोणारी, सर्जेराव सावंत आदींनी विचार मांडले.

बैठकीस तालुका उपप्रमुख छगन आहेर, पंचायत समिती सदस्य रतन बोरनारे, बाबासाहेब डमाळे, नगरसेवक सागर लोणारी, ‘येमको’ बँकेचे संचालक अरुण काळे, रुपेश लोणारी, रावसाहेब नागरे, दीपक भदाणे, धीरज परदेशी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटीत दुचाकी पेटवली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुतोंड्या मारुतीसमोरील अहिल्याराम व्यायामशाळेसमोरील पार्किंग शेडमध्ये लावलेली दुचाकी अज्ञात समाजकंटकांनी पेटवून दिली. सोमवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. स्थानिक युवकांनी तत्काळ आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. पेटवलेल्या दुचाकीजवळ काही चारचाकी व दुचाकी वाहने होती. यातील एका टेम्पोचेही नुकसान झाले असून, पंचवटी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

रामकुंड परिसराला लागून असलेल्या अहिल्याराम व्यायमशाळेसमोर वाहनांच्या पार्किंगसाठी शेड उभारण्यात आले आहे. या शेडमध्ये लकी कोटेकर यांनी आपली दुचाकी रविवारी रात्री पार्क केली. मात्र, सोमवारी पहाटेच्या सुमारास समाजकंटकांनी पेट्रोल टाकून दुचाकी पेटवली. यानंतर, समाजकंटकांनी एका टेम्पोसह तीन ते चार दुचाकींवर पेट्रोल टाकून त्या पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही घटना स्थानिक नागरिकांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत दुचाकीची आग विझवली. मात्र, तोपर्यंत टेम्पोचे हुड पेटून नुकसान झाले होते. या ठिकाणी दोन चारचाकीदेखील पार्क होत्या. त्यातील एका कारचे कव्हर पेटले. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. या घटनेबाबत बोलताना गोदाप्रेमी नागरी सेवा समितीचे अध्यक्ष देवांग जानी यांनी सांगितले की, रामकुंड परिसरात तीर्थस्थळ म्हणून देशविदेशातील पर्यटक येतात. दुर्दैवाने समाजकंटक या ठिकाणी मद्य पिणे, उनाडकी करणे यासाठी येऊन धिंगाणा घालतात. पोलिसांनी येथे गस्त वाढवणे आवश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘धम्ममूल्यांचे आचरणच राष्ट्रहित साधेल’

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खासगीकरण, उदारीकरण, व्यापारीकरण, बाजारीकरण, भांडवलशाही अर्थव्यवस्थेने मानवाच्या जगण्याचे प्रश्न अधिक जटील बनले आहेत. ‘मी प्रथम भारतीय आहे आणि शेवटीही भारतीयच’ हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संदेश ध्यानी धरून सर्व धर्म, पंथ, प्रांत सन्मान ही राष्ट्राची बलस्थाने असल्याचा सूर ‘धर्मांतराची ८१ वर्ष व आजची धम्म चळवळ’ या विषयावरील परिसंवादात निघाला.

८१ व्या धर्मांतर घोषणा दिनानिमित्त लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिकतर्फे खुल्या मुक्ती परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता, धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टिकोन, सत्य, शांती, अहिंसा, मानवता ही धम्म व संविधानिक मूल्यांचे आचरणच राष्ट्र हित साधेल, असे मत शरद शेजवळ यांनी व्यक्त केले. या मूल्यांवर शेजवळ यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. बुद्ध, कबीर, तुकोबा, शिवाजी महाराज, शाहू महाराज, फुले, आंबेडकर यांचा विचार आदर्शच कृतीत आण्याची गरज व सामाजिक प्रबोधन चळवळी अधिक गतिमान करण्याची गरज यावेळी प्रा. जितेश पगारे यांनी व्यक्त केली. बुद्ध विचारच जगाला मार्ग देईल असे विचार एस. डी. जाधव यांनी व्यक्त केले. सुरेश सोनवणे, बाळासाहेब सोनावणे, महेंद्र पगारे, विनोद वाघ यांनी धम्म व संविधान मूल्यांच्या प्रचार प्रसाराचे महत्व सांगितले. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी अतिश वानखेडे होते. प्रास्ताविक उमेश पगारे यांनी केले. प्रताप निकम, राहुल गुंजाळ, अक्षय जगताप, अश्विन जाधव, नितीन काळे, सिद्धार्थ शेजवळ, विकास सोनवणे, चेतन साबळे, लालचंद डाके, रवी निकम या मान्यवरांनी आपले मते व्यक्त केले. लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिकतर्फे घेण्यात आलेल्या या खुल्या परिसंवादाला शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉन को पकडना मुश्किलही नहीं, नामुमकीन हैं।

$
0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

गेल्या महिन्याभरापासून शहरात डॉन येणार अशी चर्चा होती. मैं हूँ डॉन, डॉन इन नाशिक असं म्हणत शहरात डॉनची दहशत पसरविण्यात आली. विशेष म्हणजे डॉन येणार असल्याचे पोस्टर पोलिस प्रशासानेच लावले असल्याने नाशिककर संभ्रमात पडले होते. कॉलेजियन्समध्ये सस्पेन्स तयार झाला होता. अखेरीस सोमवारी (१७ ऑक्टोबर) डॉन मागील गमक उलगडले. नाशिक पोलिसांनी कॉलेजियन्स व प्राध्यापकांची मिटिंग घेत डॉन म्हणजे ‘दोस्त ऑफ नाशिक’ असे जाहीर केले. डॉन को पकडना मुश्किलही नहीं, नामुकीन हैं, क्योकी डॉन ट्रॅफिक रूल ब्रेक ही नहीं करता तो उसे पकडे कैसें? असे नवे पोस्टर शहरात रिलीज करण्यात आले आहे.

नाशिक पोलिस आयुक्तालय व नाशिक फर्स्ट यांच्या वतीने नाशिक शहराच्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी काँक्रीट प्लॅन बनविण्यात आला आहे. शहरातील सर्व कॉलेजचे प्राचार्य, प्राध्यापक व कॉलेजियन्सचे प्रतिनिधी यांच्या एकत्रित सहभागातून हा काँक्रीट प्लॅन राबविण्यास सुरुवात झाली आहे. प्लॅनची पहिली फेज म्हणून वाहतुकीचा डॉन ही संकल्पना मांडण्यात आली. प्रचंड सस्पेन्स ठेवल्यानंतर डॉन म्हणजे काय हे सोमवारी सर्वाना सांगण्यात आले. नाशिकचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल, मनपा आयुक्त अभिषेक कृष्णा, महापौर अशोक मुर्तडक, आरटीओ भरत कळसकर यावेळी व्यासपीठावर होते.

वर्दीचा धाक बसवून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर दंड आकारण्यापेक्षा मानसिक बदल घडवायला हवा हा उद्देश या काँक्रीट प्लॅनचा आहे. नाशिकचे ब्रँडिंग कन्सल्टन हेमंत बेळे यांची डॉन ही संकल्‍पना होती. याअंतर्गत डॉन म्हणजे दोस्त ऑफ नाशिक असणार असून, शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याचे काम व जनजागृती हे डॉन करणार आहेत. यावेळी वाहतुकीचे नियम पाळणे, हेल्मेट वापरणे व वाहतुकीला स्वतःहून शिस्त लावेल, अशी शपथ यावेळी सर्वांनी घेतली.

सर्व डॉन उपस्थित

ट्रॅफिक काँक्रीट प्लॅनसाठी शहरातून निवडण्यात आलेले चोवीस नामवंत डॉननीदेखील या कार्यक्रमास उपस्थिती लावली. डॉन नावाची कन्सेप्ट नेमकी काय कार्य करणार याची उत्सुकता या सर्व डॉनला देखील लागून होती. शहरातील सर्व डॉन वाहतुकीचे नियम पाळणार असून, नाशिककरांना हे नियम पाळायला लावणार आहेत.

सर्व डॉन व्हावेत

स्मार्ट नाशिकच्या वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी आखण्यात आलेल्या काँक्रीट प्लॅनमध्ये सर्वजण डॉन (दोस्त ऑफ नाशिक) झाल्यास आवडेल. सर्व नाशिककरांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत, असे आवाहन पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी केले.
वाहनांवर लागणार डॉनची स्टिकर

मैं हूँ डॉन (दोस्त ऑफ नाशिक) हे स्टिकर कॉलेजियन्सचे प्रतिनिधी, प्राध्यापक प्रतिनिधी आणि शहरातील नामवंत डॉन यांच्या वाहनांवर लागणार आहेत. या माध्यमातून वाहतुकीचे सर्व नियम पाळले जावेत, असे आवाहन व जनजागृती करण्यात येणार आहे.

कॉलेजेसमध्ये होणार कॅम्पेन

शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी युथला कॅम्पेनमध्ये सहभागी करून घेतले जाणार आहे. यासाठी काँक्रीट प्लॅनची पुढची फेज म्हणून जनजागृती तसेच आणखी सरप्राईज सस्पेन्स कॅम्पेन शहरातील कॉलेजेसमध्ये घेतले जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनमाडच्या राजकारणात ‘एमआयएम’ची एंट्री

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड नगरपालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. या पार्श्वभूमीवर मनमाडच्या राजकारणात उतरण्यासाठी नवे पक्ष, संघटनादेखील उत्सुक असल्याने आता मनमाडच्या राजकारणात ओवेसी बंधूंच्या एमआयएम (मजल‌िस ए मुस्लिमिन) या पक्षाची एंट्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मनमाड येथील अकबर सोनावाला यांनी नुकताच या पक्षात प्रवेश करून निवडणुकीत एमआयएम उतरणार असल्याची त्यांनी घोषणा केली आहे. मनमाड शहरात या पुढील काळात या पक्षाचे नगरसेवक, आमदार तसेच पक्षप्रमुख ओवेसी बंधूदेखील येणार असल्याचे अकबर सोनावाला यांनी स्पष्ट केले. विकासासाठी व भ्रष्टाचारी सत्ताधारी आघाडीला तसेच निष्क्रिय ठरलेल्या सर्व इतर पक्षांना आम्ही लढत देऊन शहर विकास घडवून आणू. तसेच अल्पसंख्यांक बहुजन समाजाला न्याय मिळवून देऊ, असे अकबर सोनावाला यांनी म्हटले आहे. सोनावाला परिवारातील सबिहा सोनावाला या विद्यमान नगरसेविका असून, मनमाड शहरात ओवेसी बंधूंचा पक्ष येण्याची चिन्हे हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.


मनमाड, नांदगावमध्ये हालचाली गत‌िमान

मनमाड : मनमाड व नांदगाव नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक येत्या २७ नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे वृत्त येताच राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. मनमाड व नांदगाव शहरात निवडणूक आचारसंहिता लागली असून, निवडणुकीच्या तारखेची वाट पाहणाऱ्या इच्छुकांमध्ये उत्साह संचारला आहे. थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक याबाबत मनमाड नांदगावमध्ये कमालीच्या औत्सुक्याचा विषय असून, थेट नगराध्यक्ष पदासह विविध प्रभागातील नगरसेवक पदासाठी मोर्चे बांधणीला वेग येण्याची चिन्हे आहेत मनमाड शहरात थेट नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने इच्छुकांची रेलचेल असणार आहे. नगरपालिकेत मतदारांच्या प्रारूप याद्या लावण्यात आल्या असल्याने ते पाहण्यासाठी पालिकेत गर्दी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चायनीज फटाके घातकच

$
0
0

चायनीज फटाके घातकच

दिवाळीसाठी बाजारात अनेक प्रकारचे फटाके आले असून, त्यातील काही आवाजाचे, तर काही शोभेचे आहेत. मर्यादेपेक्षा जास्त आवाज असणाऱ्या फटाक्यांवर सरकारने निर्बंध लादले असतानाही काही प्रकारचे फटाके बाजारात सर्रास विकले जात आहेत. त्याचप्रमाणे शरीराला घातक ठरू शकणाऱ्या चायनीज फटाक्यांचीही बाजारात चलती आहे. याबाबत नाशिक जिल्हा फटाके असोसिएशनची काय भूमिका आहे, याबद्दल असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांच्याशी साधलेला संवाद...

---

मोठ्या आवाजाचे फटाके विकले जात आहेत, याबाबत तुमचे म्हणणे काय?

➤ बंदी असलेले फटाके विकले जात असल्याचा काही लोकांचा आरोप आहे, तो धादांत खोटा आहे. नाशिक जिल्हा फटाका असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून मी जबाबदारीने हे विधान करतो, की आमच्या मान्यताप्राप्त दुकानांत अशा स्वरूपाच्या फटाक्यांची कधीही विक्री केली जात नाही. मुळातच फटाके तयार होताना भारत सरकारच्या नियमानुसार तयार केले जातात. तमिळनाडू येथील शिवाकाशी येथे याचे कारखाने आहेत. तेथील कारखानदार कुठल्याही प्रकारच्या नियमांचे उल्लंघन करीत नाहीत. त्यामुळे मोठे फटाके तयारच होत नाहीत, तर विक्री करण्याचा प्रश्नच उद्धवत नाही.•रस्त्यालगत असलेल्या दुकानांवर कारवाई होणार आहे का?

➤ अनेकदा काही विक्रेते (लायसन्सधारक नाही) रस्त्याच्या बाजूला स्टॉल लावतात. नाशिक जिल्हा फटाका असोसिएशनचा कोणताही सभासद असे कृत्य करीत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही गंगापूररोड येथील डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर स्टॉल लावत असतो. यंदाही तेथेच स्टॉल लावण्यात येणार आहे. त्यामुळे जे नियमात नसतील, त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई करावी. त्याला असोसिएशन विरोध करणार नाही. असोसिएशन सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून स्टॉल लावते.•फटाका स्टॉलमध्ये साठ्याची मर्यादा पाळली जात नाही...

➤ सरकारने घालून दिलेल्या नियमानुसार ५० किलो फटाके व ४०० किलो शोभेच्या फटाक्यांचा साठा केला जातो. त्यात कधीही तडजोड होत नाही. फटाक्यांमध्ये कागदाचे वजन जास्त असते, आतील दारूचे वजन कमी असते.•गावठी पद्धतीने बनवलेल्या व चायनीज फटाक्यांची सर्रास विक्री केली जाते...

➤ गावठी पद्धतीने बनवलेल्या फटाक्यांमध्ये आपटबारसारख्या फटाक्यांचा समावेश होतो. हे फटाके मान्यताप्राप्त कारखान्यात बनवले जात नाहीत, तसेच चायनीज फटाक्यांच्या आयातीला बंदी आहे. त्यामुळे हेही फटाके चोरट्या मार्गाने शहरात येतात. या दोन्ही प्रकारच्या फटाक्यांची शहरात विक्री होत नाही. ग्राहकांनी भारतीय बनावटीचे फटाके खरेदी करावेत, असा आमचा नेहमीच आग्रह असतो. ग्राहकांना स्वस्तात फटाके हवे असल्याने अशा प्रकारच्या फटाक्यांची खरेदी होते. जिल्हा फटाका असोसिएशन चायनीज फटाके वापरू नये यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून जनजागरण मोहीम राबवीत असून, फटाके गाळ्यांच्या ठिकाणी प्रबोधनात्मक बोर्डदेखील लावले जात आहेत.•काही धोकादायक कालबाह्य फटाक्यांची विक्री होते का?

➤ प्रत्येक फटाक्याला उत्तम प्रकारचे पॅकिंग असते. एक फटाका दुसऱ्या फटाक्याच्या संपर्कात येऊन आग लागू नये याची काळजी घेतली जाते. या पॅकिंगवर उत्पादित वस्तू तयार केल्याचा दिनांक असतो. त्यामुळे जुने फटाके विकण्याचा संबंधच येत नाही. बाजारातील अस्थिरता लक्षात घेता कोणताही विक्रेता जास्त माल मागवत नाही. जेवढा माल विकला जाईल त्यापेक्षा १० टक्के कमी माल मागवला जातो. त्यामुळे जुना माल विक्री होत नाही.• चायनीज फटाक्याबाबत काय सांगाल?

➤ चायनीज फटाके दिसायला आकर्षक असतात. मात्र, ते तयार करताना कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेचे नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे ते हानीकारक ठरू शकतात. या फटाक्यांमध्ये फॉस्फरसचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे हे फटाके लहान मुलांप्रमाणेच मोठ्या माणसांच्या शरीरालादेखील घातक ठरतात.•दहा हजारांच्या वरच्या माळेला बंदी आहे का?

➤ पूर्वी १५ हजार, २० हजार, २५ हजार अशा फटाक्यांच्या माळा तयार होत असत. मात्र, सरकारने १० हजारांवरच्या माळेच्या उत्पादनाला बंदी घातल्याने यापुढील माळा तयारच होत नाहीत. त्यामुळे त्या बाजारात

उपलब्ध होत नाहीत. सरकारने या व्यवसायावर इतके निर्बंध लादले आहेत, की व्यवसाय करणे अडचणीचे झाले आहे. तरीही असोसिएशनच्या वतीने नियमांचे काटेकोर पालन केले जाते.

(शब्दांकन ः फणिंद्र मंडलिक)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एमआयडीसी’त पार्किंगची दैना

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सातपूर

अंबड व सातपूर भागात असलेल्या औद्योगिक वसाहतींत कंटेनर व अवजड वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था ‘एमआयडीसी’ने केली आहे. मात्र, असे असतानाही अनधिकृत पार्किंग फोफावल्याने ‘एमआयडीसी’त ठिकठिकाणी पार्किंगची दैना उडाल्याचे दिसून येत आहे. अनधिकृत पार्किंग फुल्ल, तर अधिकृत पार्किंग मात्र रिकामे, अशी स्थिती ‘एमआयडीसी’त पाहायला मिळत आहे. सातपूर व अंबड ‘एमआयडीसीं’त मुख्य रस्त्यांवर तर नेहमीच कंटेनर व अवजड वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. ‘एमआयडीसी’च्या सेवा-सुविधा भूखंडांवरही अनधिकृतपणे कंटेनर व वाहनांचे सर्रास पार्किंग केले जात असल्याचे त्यावर कारवाई करणार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे. ‘एमआयडीसी’, महापालिका व पोलिस प्रशासन यांनी संयुक्तपणे या रस्त्यावर व अन्यत्र अनधिकृतपणे पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.

सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतींत कारखान्यांचे जाळे पसरावे यासाठी काही दशकांपूर्वी परिसरातील शेतकऱ्यांनी हजारो एकर शेतजमिनी दिल्या होत्या. त्यानंतर खऱ्या अर्थाने सातपूर व अंबडला कारखाने येऊन सर्वसामान्य कुटुंबांतील अनेकांना रोजगार मिळाला होता. ‘एमआयडीसी’त दिवसेंदिवस वाढलेल्या कारखान्यांमुळे कंटेनर व अवजड वाहनांची संख्याही वाढली आहे. परंतु, ‘एमआयडीसी’त कच्चामाल घेऊन येणाऱ्या व पक्का माल घेऊन जाणाऱ्या कंटेनर व अवजड वाहनांच्या पार्किंगची समस्या सातपूर व अंबड ‘एमआयडीसी’त कायमच असल्याची स्थिती आहे. त्यासाठी ‘एमआयडीसी’ने सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतींत स्वतंत्र पार्किंगचे भूखंडच आरक्षित करून अवजड वाहनांच्या पार्किंगसाठी ते उपलब्ध करून दिलेले आहेत. मात्र, उपलब्ध असलेल्या अधिकृत पार्किंगकडे कंटेनर व अवजड वाहनचालकांनी पाठच फिरविल्याची स्थिती आहे. मात्र, दुसरीकडे ‘एमआयडीसी’च्या मुख्य रस्त्यांवर व सेवा-सुविधा क्षेत्रासाठी राखीव भूखंडांवरच कंटेनर व इतर वाहनांचे सर्रास पार्किंग होत अाहे. त्यामुळे अनधिकृत फोफावले असून, अधिकृत पार्किंग ओस पडत असल्याचे चित्र ‘एमआयडीसी’त दिसून येत आहे. त्यामुळे ‘एमआयडीसी’, महापालिका व पोलिस प्रशासन यांनीच कंटेनर व अवजड वाहनचालकांना पार्किंगची शिस्त लावण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

---

सुविधा नसल्याच्या तक्रारी

‘एमआयडीसी’च्या अधिकृत पार्किंगवर पाहिजे त्या प्रमाणात सुविधा मिळत नसल्याचे अवजड वाहनचालकांचे म्हणणे आहे. त्यातच पार्किंग केलेले वाहन काढताना अधिकृत पार्किंगच्या ठिकाणी मोठी कसरत करावी लागत असल्याने रस्त्यावर अथवा ‘एमआयडीसी’च्या मोकळ्या भूखंडांवरच कंटेनर किंवा अवजड वाहनचालक वाहने उभी करीत असल्याचे सांगतात.

---

अपघातात अनेकांचा मृत्यू

‘एमआयडीसी’त कंटेनर व अवजड वाहनांच्या धडकेने अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. यात वाहन रीव्हर्स घेतानाच जास्त अपघात झाले असून, चालकाला अंदाज न आल्याने काही दुचाकीस्वारांनाही जीव गमवाव लागल आहे. रस्त्यांच्या साइडपट्ट्यांचीही दुरवस्था झाल्याने कंटेनरचालकांना कसरत करावी लागत आहे. मुख्य रस्ता अरुंद झाल्यानेदेखील दुचाकीस्वार कंटेनरवर आदळून अपघात होत आहेत.

---

‘एमआयडीसी’च्या मालकीच्या भूखंडांवर कंटेनर अथवा इतर कुठल्याही वाहनांचे पार्किंग होत असेल, तर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. ‘एमआयडीसी’ने उपलब्ध करून दिलेल्या भूखंडांवरच अवजड वाहनांचे पार्किंग केले पाहिजे.

-हेमांगी पाटील, प्रादेशिक अधिकारी, ‘एमआयडीसी’, नाशिक विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटांच्या पेपर म‌िलसाठी नाशिकरोडला सर्वेक्षण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड प्रेसच्या जागेत नोटांची पेपर मिल होण्याच्या दृष्टीने केंद्राची समिती मंगळवारी दाखल झाली. पेपर मिलसाठी असलेल्या सोयी-सुविधांची आणि व्यवहार्यतेची पडताळणी समितीने केली. समिती आपला अहवाल केंद्र सरकारला सादर करणार आहे.
सर्वेक्षणावेळी महाप्रबंधक एस. पी. वर्मा, होशंगाबाद समितीचे सदस्य पी. आर. गौडा, एस. पी. एम. सी. एल.चे राकेशकुमार, प्रवीण गुप्ता, मण‌िशंकर, गंधम, महापात्रा, कमळसकर आदी उपस्थित होते. खासदार हेमंत गोडसे, प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, संदीप बिश्वास, देवीदास गोडसे, सुनील आहेर यांनी समिती सदस्यांचे स्वागत केले. ही पेपर मिल झाल्यास नाशिकचा विकास होणार असून, रोजगारवृद्धीही होणार आहे.
केंद्र सरकारचे २०२४पर्यंत ४८ हजार टन नोट पेपरच्या उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. सध्या १६ हजार टन उत्पादन होते. उर्वरित ३२ हजारांपैकी १६ हजारसाठी दोन मशिनलाइन याअगोदर होशंगाबादसाठी तत्वतः मंजूर झाल्या आहेत. उर्वरित १६ हजार टन पेपर उत्पादनासाठी केंद्र सरकार जागा शोधत आहे. खासदार हेमंत गोडसे यांनी नाशिकमध्ये पेपरमिल व्हावी यासाठी जोरदार पाठपुरावा सुरू केला आहे. संसद आणि संबंधित मंत्रालयाला नाशिकमधील सुविधांची माहिती देऊन त्यांनी महत्व पटवून दिले. पेपर मिलसाठी भारतप्रत‌िभूती आणि चलार्थ मुद्रणालयाकडे २५० एकर जागा पडिक आहे. तसेच प्रेस कामगारांच्या नेहरुनगर वसाहतीत तीन हजार सदनिका रिकाम्या आहेत. तेथे नवीन पेपरम‌िलच्या कामगारांना राहण्याची सोय होईल. नाशिकरोड रेल्वे स्टेशन जवळ असल्याने पेपरमिलचे उत्पादन झाल्यानंतर वाहतूकही स्वस्तात होणार आहे. पेपर मिलसाठी लागणारा कापूसही जवळच्या जळगावमधून उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नाशिकला पेपरमिल होणे शासनासाठीही व्यवहार्य ठरणार असल्याचे गोडसे यांनी केंद्र सरकारला पटवून दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पक्षांतराचे `मतलबी वारे`

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीत यश मिळवून नगरसेवकपदाची खुर्ची अन् त्यापाठोपाठ येणारी विविध पदे मिळवता यावीत यासाठी शहरात पक्षांतराचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. निष्ठावंत म्हणून ओळखल्या जाणारे विद्यमान लोकप्रतिनिधी तसेच पदाधिकाऱ्यांनी भाजप तसेच शिवसेनेची वाट धरल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सत्ताधारी मनसेला शहरात मोठे खिंडार पडले आहे. मंगळवारी डझनभर पदाधिकाऱ्यांनी अन्य पक्षात प्रवेश करून अनेकांना धक्का दिला.

छगन भुजबळ यांचे समर्थक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते शिवाजी चुंभळे यांनी पत्नी कल्पना आणि शेकडो कार्यकर्त्यांसह मंगळवारी शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हातून त्यांनी शिवबंधन स्वीकारले. जेलरोड येथील मनसेचे नगरसेवक अशोक सातभाई, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सुनील बोराडे, बालाजी सोशल फाऊन्डेशनचे गिरीश मुदलीयार आदींनी शिवसेनेत प्रवेश केला. सिडकोत राष्ट्रवादीचे विभागीय अध्यक्ष खंडेराव दातीर, त्याचबरोबर माजी नगरसेवक रवींद्र देवरे यांचे बंधू भूषण देवरे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे.

मनसेचे विद्यमान नगरसेवक तसेच माजी सभागृह नेते शशिकांत जाधव यांनी मनसेला ‘जय महाराष्ट्र’ करीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. याखेरीज सातपूर भागातील अपक्ष नगरसेविका लता दिनकर पाटील यांच्यासह राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले मधुकर जाधव, मनसेचे कार्यकर्ते संदीप पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवणीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. पंचवटीतील राष्ट्रवादीच्या नगरसेविका रुपाली गावंड यांनीही भाजपची वाट धरली आहे.

सातपूर भाजपचा बालेकिल्ला?

सातपूर : सातपूर परिसरातील काँग्रेस व मनसेच्या नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केल्याने शिवसेनेच्या गोटात हुडहुडी भरली आहे. काँग्रेस, शिवसेना व मनसेचा बालेकिल्ला राहिलेल्या या भागात आता भाजपची ताकद नक्कीच वाढणार असल्याचे राजकिय नेत्यांकडून बोलले जात आहे.

सिडकोत शिवसेनेचे बारा नगरसेवक

सिडको: पूर्वीपासूनच सिडको म्हणजे भाजपा व शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मागील महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपा सेनेची युती न झाल्याने व मनसेची हवा असल्याने सिडकोत मनसेने चांगलीच घोडदौड केल्याचे दिसून आले. मात्र, आता शिवसेनेत आजी-माजी नगरसेवकांसह विविध पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षप्रवेश करीत असल्याने सिडकोत शिवसेनेची ताकद चांगलीच वाढल्याचे दिसत आहे. शिवसेनेच्या वाढत्या ताकदीला रोखण्यासाठी भाजपाकडूनसुद्धा विविध पक्षांतील पदाधिकारी किंवा काही नगरसेवकांचा लवकरच प्रवेश होणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. या भागात शिवसेनेचे बारा नगरसेवक झाले आहेत.

सेनेची वाढली ताकद

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

महापौर निवडणुकीत जेलरोडचे मनसेचे नगरसेवक शोभना शिंदे आणि संपत शेलार यांनी पक्षाचा आदेश झुगारुन शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केले होते. पक्षाचा व्हीप झुगारल्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द झाले होते. ते रद्द करण्यासाठी अशोक सातभाई यांनी विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. दीड वर्ष पाठपुरावा करुन आणि आपल्या पक्षाची बाजू समर्थपणे सातभाई यांनी मांडली. त्यामुळे शिंदे आणि शेलार यांचे नगरसेवकपद रद्द होऊन नुकतीच पोटनिवडणूक झाली होती. आता स्वतः सातभाईच शिवसेनेत दाखल झाले. हा विचित्र योगायोग चर्चेचा विषय ठरला आहे.

पोटनिवडणुकीत भाजपने शिवसेनेच्या उमेदवारांचे आव्हान मोडून काढले. भाजपच्या मंदाताई ढिकले आणि सुनंदा मोरे यांनी विजय मिळवला. त्यातच अपक्ष नगरसेवक पवन पवार आणि राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक दिनकर आढाव, विद्यमान नगरसेवक संगीता गायकवाड, कन्हैय्या साळवे, कोमल मेहरोलिया तसेच प्रताप मेहरोलिया, हेमंत गायकवाड यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. जेलरोडला सविता दलवानी, संभाजी मोरुस्कर हे देखील भाजपचे नगरसेवक आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपची ताकद वाढली आहे. शिवसेनेचे खच्चीकरण झाले होते. अशोक सातभाई आणि सुनील बोराडे यांच्या सेना प्रवेशाने शिवसेनेची ताकद वाढली असून भाजपला तुल्यबळ प्रतिस्पर्धी तयार झाला आहे.

मनसे धोक्यात

नाशिकरोडला मनसेचे सहा नगरसेवक गेल्या पंचवार्षिकमध्ये निवडून आले होते. शोभना शिंदे, संपत शेलार, रमेश धोंगडे, संगीता गायकवाड, अशोक सातभाई, हेमंत गोडसे यांचा त्यात समावेश होता. हेमंत गोडसे यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन शिवसेनेतर्फे लढून खासदारकी मिळवली आहे. अन्य नगरसेवक विविध पक्षात गेले. त्यामुळे आता नाशिकरोडला मनसेचा एकही नगरसेवक नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images