Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘महिला राज’साठी देवळ्यात चाचपणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

जिल्हा परिषद निवडणुकीचे आरक्षण जाहीर होताच इच्छुक उमेदवारांनी गावागावात जाऊन मतदारांची चाचपणी सुरू केली आहे. पहिल्यांदाच तालुक्यातील लोहोणेर व नव्याने अस्तित्त्वात आलेला वाखारी हे दोन्ही जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने कधी नव्हे इतकी चुरस निर्माण झाली आहे.

जिल्हा परिषदेच्या राजकारणात गेल्या तीस वर्षांपासून देवळा तालुक्यातील राजकारण्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला आहे. जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर गुडग्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेक इच्छुकांची हिरमोड झाला असला तरी पर्याय म्हणून आपल्या सौभाग्यवतींना संधी देण्यासाठी सर्वच इच्छुक उमेदवार सरसावले आहेत. तालुक्यातील लोहोणेर, वाखारी गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असून उमराणा गट अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. जिल्हास्तरावरच्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ‘जिल्हा विकास आघाडी’ निर्माण करण्याच्या हालचाली चालू झाल्या असून देवळा तालुक्यात त्याचीच पुनरावृत्ती होते की पक्षीय चिन्हावर निवडणूक लढविली जाते याबाबत सर्वांना उत्कंठा लागली आहे. केदा आहेर यांच्या पत्नी तथा देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा धनश्री आहेर यांचे नाव दोन्ही गटातून चर्चेत आहे. वाखारी गटातून माजी आमदार शांतारामतात्या आहेर यांच्या स्नुषा, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य योगेश आहेर यांच्या पत्नी लीना आहेर यांचेही नाव चर्चेत आहे. शांताराम आहेर यांचा तालुक्याच्या राजकारणात अजूनही दबदबा कायम आहे. मितभाषी स्वभावाच्या योगेश आहेर यांनी तालुक्यातील कार्यकर्त्यांचा संपर्क कायम ठेवल्याने व गटातील असलेल्या नात्यागोत्यामुळे लीना आहेरांना ती एक जमेची बाजू आहे. वाखारी गटातून सुनील आहेर यांच्या पत्नी नूतन आहेर, रामेश्वरचे उपसरपंच विजय पगार यांच्या पत्नी वर्षा पगार, माजी जिल्हा परिषद सदस्या तथा पंचायत समितीचे माजी सभापती अशोक आहेर यांच्या पत्नी भारती आहेर, गुंजाळनगरच्या विद्यमान उपसरपंच सुजाता गुंजाळ, देवळ्याचे माजी सरपंच जितेंद्र आहेर यांच्या पत्नी सुलभा आहेर, खर्ड्याच्या उपसरपंच प्रमिला जगताप, वत्सला देवरे, बांधकाम सभापती लक्ष्मीकांत आहेर यांच्या पत्नी सरोज आहेर आदींचीही नावे चर्चेत आहेत. लोहोणेर गटातून देवळ्याच्या नगराध्यक्षा धनश्री आहेर यांच्या बरोबरच शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख, पंकज निकम यांच्या पत्नी सुरेखा निकम, खालपचे भूमिपुत्र अरविंद सूर्यवंशी यांच्या पत्नी अलका सूर्यवंशी, लोहोणेरच्या विद्यमान सरपंच तथा युवानेते दीपक बच्छाव यांच्या पत्नी जयवंता बच्छाव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पंडितराव निकम यांच्या पत्नी सरला निकम आदींचीही नावे चर्चेत आहेत. उमराणा गट अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. कर्मवीर ग्यानदेवदादा देवरे व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विश्वासराव देवरे यांच्या गटांकडून प्रबळ उमेदवार उभा केला जाण्याची चिन्हे दिसत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिडकोवासीयांची दैना मिटणार!

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पायाभूत सुविधांसह अतिक्रमण, तसेच विविध समस्यांनी ग्रस्त असलेल्या सिडकोवासीयांची अखेर सिडकोच्या प्रशासकीय जाचातून सुटका झाली आहे. सिडकोने नवीन नाशिकमधील सर्व सहा योजनांचे महापालिकेकडे हस्तांतरण केले असून, यापुढे सिडकोचे नियोजन प्राधिकरण हे आता महापालिका असणार आहे. त्यामुळे जवळपास पाच लाख सिडकोवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. सोबतच सिडकोतील बांधकामांच्या परवानग्या देण्याचे हक्कही पालिकेच्या नगररचना विभागाला मिळाले असून, पायाभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी पालिकेवर आली आहे. दुसरीकडे, या निर्णयामुळे सिडकोवासीयांवर करांचा बोजाही वाढणार असून, अतिक्रमणाच्या फेऱ्यातूनही सुटका होणार आहे.

सिडकोच्या सहाव्या योजनेचे नुकतेच महापालिकेकडे हस्तांतरण करण्यात आले आहे. त्या हस्तांतरणावेळी सिडकोचे नियोजन प्राधिकरणाचे हक्क आमच्याकडे असावेत, अशी अट महापालिकेने घातली होती. सिडकोने शहरात आतापर्यंत सहा योजना तयार केल्या आहेत. या योजनांमध्ये रस्ते, पाणी या सुविधा महापालिकेडून दिल्या जात असल्या तरी सर्व कागदपत्रांची पूर्तता मात्र रहिवाशांना सिडकोकडेच करावी लागत होती. तसेच या ठिकाणी घर घेणाऱ्यांना सिडकोच्या अटी व शर्थीतच घरे घ्यावी लागत होती. सिडको पूर्ण सुविधा देवू शकत नसल्याने या योजनाच बकाल झाल्या होत्या. तसेच सिडकोतील रहिवाशी इमारतींचे रुपांतर मोठ्या प्रमाणात व्यावसायिक मालमत्तेत झाले असून, पूर्ण परिसर अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत. सिडकोचे मुख्यालय हे औरंगाबादला असल्याने नागरिकांना कामांसाठी औरगांबादला चकरा माराव्या लागत होत्या. त्यामुळे सिडकोचे हस्तांतरण महापालिकेकडे व्हावे अशी नागरिकांचीही इच्छा होती.

सिडको प्राधिकरणाने अखेर महापालिकेची मागणी पूर्ण केली असून, प्राधिकरणाचे पूर्ण अधिकार आता महापालिकेला बहाल केले आहेत. १४ ऑक्टोबरपासून सिडकोचे विशेष नियोजन प्राधिकरणाचे हक्क संपुष्टात येत असल्याचा अध्यादेश सिडकोने काढला आहे. त्यामुळे सिडकोच्या विकासाचे पूर्ण अधिकार महापालिकेला मिळाले आहेत. इमारत बांधकामाचा परवाना आता नगररचना विभागाकडून दिला जाणार आहे. तसेच या भागातील अतिक्रमण काढण्याचे अधिकार महापालिकेला मिळाले आहेत. सोबतच या भागातील पाच लाख नागरिकांना पायाभूत सुविधा देण्याची जबाबदारी आता महापालिकेवर येणार आहे. सिडकोचे रिकामे भूखंड महापालिकेच्या ताब्यात येणार असून, या ठिकाणी पायाभूत सुविधांचा विकास करता येणार आहे.

अतिक्रमणातून मुक्तता होणार

सिडको मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणाच्या विळख्यात आहे. हे अतिक्रमण काढण्याची व्यवस्था सिडकोकडे नाही. त्यामुळे या भागाला अतिक्रमणमुक्त करण्याची जबाबदारी आता महापालिकेवर आली आहे. त्यामुळे सिडको अतिक्रमणमुक्त होण्याच्या दृष्टीने पावले उचलणार आहे.

-

करांचा बोजा वाढणार

सिडकोचे नियोजन प्राधिकऱण म्हणून महापालिकेला पूर्ण अधिकार प्राप्त झाल्याने घरपट्टी व पाणीपट्टीचे दर या भागाला लागू होणार आहेत. सिडकोपेक्षा महापालिकेचे कर जास्त आहेत. त्यामुळे सिडकोवासीयांवर करांचा बोजा पडणार आहे. बकाल झालेल्या सिडकोला पूर्ववत आणण्यासाठी पालिकेला मोठ्या प्रमाणावर आर्थिक भार येणार आहे. हा भार उचलण्यासाठी सिडकोतील नागरिकांवर करांचा बोजा टाकावा लागणार आहे. त्यामुळे दिलासा मिळणार असला तरी,नागरिकांवर अतिरिक्त करांचा भार पडणार आहे.

काय साध्य होणार?

- बांधकाम परवानगीचे अधिकार महापालिकेडे

- पायाभूत सुविधांची जबाबदारी महापालिकेची असणार

- कर लावण्याचे अधिकार महापालिकेला मिळणार

- सिडकोची अतिक्रमणातून सुटका होणार

- सिडकोचे रिकामे भूखंड पालिकेला मिळणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युती फिसकटल्याचा दोन्ही पक्षांना फायदा-तोटा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी ,नाशिक

राज्यातील नगरपालिका व नगरपंचायत निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय शिवसेनेने राज्य पातळीवर घेतल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सहाही नगर पालिकांमध्ये शिवेसना-भाजप युतीची बोलणी आता फिसकटली आहे. गेल्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर निर्णय घेत काही ठिकाणी युती तर काही ठिकाणी स्वतंत्र निवडणुका लढवण्यात आल्या होत्या. पण यावेळेस थेट राज्य पातळीवरच हा निर्णय घेतल्यामुळे जिल्ह्यात शिवसेना व भाजपाला काही ठिकाणी फायदा, तर काही ठिकाणी फटका बसणार अाहे.

गेल्या निवडणुकीत या सहा नगरपालिकांतील येवला, नांदगाव, सटाणा व मनमाड येथे राष्ट्रवादीने यश मिळवले होते. तर भगूर येथे शिवसेना, तर सिन्नर येथे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या गटाने सत्ता काबीज केली होती. शेवटच्या वर्षात मनमाड येथे राष्ट्रवादीचा मोठा गट फुटला व शिवसेनेकडे नगराध्यक्षपद गेले. या सहाही नगर पालिकांमध्ये भाजपचे कोठेही वर्चस्व नव्हते. त्यामुळे भाजपाकडे गमवण्यासारखे काही राहणार नाही. शिवसेना मात्र दोन ठिकाणी सत्तेत असली तरी इतर ठिकाणी त्यांचे वर्चस्व आहे. भाजपाला सोबत घेवून त्यांना सत्ता स्थापन करणे सोपे जाणार होते. त्यासाठी गेल्या काही दिवसापासून स्थानिक पातळीवर भाजप-शिवसेनेची बोलणी सुरू झाली होती. जिल्ह्यात मुदत संपलेल्या नगरपालिकांच्या २७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकांची जोरदार मोर्चेबांधणी सहा नगरपालिकेत सुरू असतांना शिवसेनेचा हा निर्णय आल्यामुळे भाजपसह शिवसेनेलाही धक्का बसला आहे. विशेष म्हणजे सर्व ठिकाणी थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका असल्यामुळे या दोन्ही पक्षात मतविभागणी होणार असून, त्याचा फायदा आता कोणाला होतो हे महत्त्वाचे राहणार आहे. नाशिक जिल्ह्यातील सहा नगरपालिकांमध्ये मनमाड-सर्वसाधारण महिला, येवला-सर्वसाधारण, नांदगाव-नागरिकांचा मागासवर्ग, सटाणा-सर्वसाधारण, भगूर-सर्वसाधारण महिला, सिन्नर-अनुसूचित जमाती (महिला) राखीव झाले आहे. त्यामुळे शिवसेनेकडे प्रबळ उमेदवार आहे, तर काही ठिकाणी तो भाजपाकडे आहे.जिल्हयात होणाऱ्या निवडणुकीत दोन वॉर्डांचा एक प्रभाग असणार आहे. तर नगराध्यक्षपदाची निवडणूक थेट असल्यामुळे भाजपाने त्यासाठी राज्यभर व्यूहरचना आखली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदगाव पालिकेसाठी राष्ट्रवादीने कसली कंबर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

नांदगाव नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची निर्विवाद सत्ता असल्याने नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पालिका निवडणुकीत पुन्हा राष्ट्रवादीकडे पालिकेची सत्ता जाईल, या दिशेने प्रयत्न करण्याची तसेच राष्ट्रवादीची ताकद सिद्ध करण्याची खूणगाठ नांदगावच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बांधली. इच्छुक उमेदवार रणनीती आणि समविचारी पक्षांबरोबर युती याबाबत विचार विनिमय करण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पुन्हा विशेष बैठक घेण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.

राष्ट्रवादीच्या नांदगाव येथील संपर्क कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक बोलवण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी शहराध्यक्ष संतोष गुप्ता होते. यावेळी पालिका निवडणूक इच्छुक उमेदवार चाचपणी सत्ता टिकविण्यासाठी धडपड यावर बैठकीत चर्चा होऊन समविचारी पक्षांशी युती जागा वाटप रणनीती याबाबत मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत विशेष बैठक बोलवण्याचे ठरविण्यात आले.

या बैठकीत संतोष गुप्ता अरूण पाटील, शिवाजीराव पाटील दिलीप इनामदार विष्णू निकम, डॉ. वाय. पी. जाधव, रमेश पगार, बाळकाका कलंत्री, सचिन मराठे, देविदास भोपळे, इंदिरा बनकर आदींची भाषणे झाली राष्ट्रवादीची पालिकेतील सत्ता टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेडिकलच्या जागांची यादी जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सद्यस्थितीत टॉप डिमांड असणाऱ्या मेडिकल शाखेंतर्गत विद्यार्थ्यांची काही कॉलेजांकडून होणारी संभाव्य फसवणूक टाळण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने पाऊल उचलले आहे. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या सन् २०१६-२०१७ या वर्षासाठीच्या अंतिम मान्यतेच्या संदर्भांनुसार विद्यापीठाने संलग्नित मेडिकल कॉलेज, त्यांच्याकडील उपलब्ध जागा व अभ्यासक्रम यांचा तपशीलच वेबसाईटवर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला आहे.

गेल्या वर्षीही मेडिकल विद्याशाखेंतर्गत एमबीबीएस, डेंटल, आयुर्वेदीक, होमिओपॅथी आणि युनानी या अभ्यासक्रमांतर्गत अनेक कॉलेजेसमधील काही जागांवर एमसीआयने मर्यादा आणल्या होत्या. याची माहिती कॉलेजेसने विद्यार्थ्यांना न देताच प्रवेश निश्चित करून घेतल्यानंतर मात्र विद्यापीठ स्तरावर या विद्यार्थ्यांना परीक्षाच देता आली नव्हती. याप्रकरणी अनेक विद्यार्थ्यांनी विद्यापीठासच जबाबदार धरले होते. या पार्श्वभूमीवर यंदा विद्यापीठाने ही माहिती वेबसाईटद्वारे जाहीर केली आहे.

विद्यार्थ्यांचा संभ्रम टाळण्यासाठी आरोग्य विद्यापीठाने संलग्नित कॉलेजेसची यादी जाहीर केली आहे. या यादीत डीम्ड विद्यापीठांतर्गत येणाऱ्या कॉलेजेसचा समावेश करण्यात आलेला नाही. सन् २०१६-१७ या वर्षासाठी ही यादी ग्राह्य राहणार आहे. राज्यात खासगी मेडिकल कॉलेजेसमध्ये प्रवेश घेऊ इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही यादी मार्गदर्शक ठरणार आहे. संबंधित कॉलेजांचे इन्स्पेक्शन पार पडल्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चरसह विविध शैक्षणिक गुणवत्तेशी निगडीत कारणांहून मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया ( एमसीआय ) जागांच्या उपलब्धतेत दरवर्षी बदल करत असते. एमसीआयने चालू वर्षात केलेल्या बदलांची माहिती न देता अनेक कॉलेजेस केवळ आर्थिक लाभापोटी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचे प्रवेश करून घेतात. या विद्यार्थ्यांना पुढील टप्प्यात मात्र विद्यापीठाच्या परिक्षेला बसता येत नाही. हा संभाव्य धोका टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी वेळीच जागरूक रहावे, यासाठी विद्यापीठाच्या वतीने संलग्नित कॉलेजेस, त्यांच्याकडील अभ्यासक्रम व उपलब्ध जागा यांची माहिती या यादीद्वारे दिली असल्याची माहिती विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी दिली.

२१४ कॉलेजेसचा तपशील

या अद्यावत यादीमध्ये यंदा बदललेले जागांचे समीकरण आणि बदलत्या अभ्यासक्रमांची माहिती देण्यात आली आहे. यानुसार ३८ एमबीबीएस कॉलेजेस, २८ डेंटल कॉलेजेस, ३५ आयुर्वेदीक आणि युनानी कॉलेजेस, ६ होमिओपॅथी कॉलेजेस, २३ फिजीओथेरपी कॉलेजेस, २१ बीपीएमटी कॉलेज, ६ ऑप्टोमेट्री आण ऑप्थोल्मीक सायन्स कॉलेज व १ पॅरामेडिकल अभ्यासक्रमाचे कॉलेज आणि ५६ नर्सिंग कॉलेजेसचा समावेश आहे. ही एकूण संख्या २१४ आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबई-आग्रा महामार्गाची चाळण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील रस्त्यांची चाळण झालेली असताना तालुक्यातील अनेक गावांना शहाराशी जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग तीनवर देखील जागोजागी खड्डे पडले आहेत. दररोज हजारो वाहनांची यावरून वाहतूक होत असते. त्यामुळे नोकरी, शिक्षण, व्यवसायाच्या निमित्ताने तालुक्यातील लोक याच महामार्गाने प्रवास करीत शहरात दाखल होत असतात. मात्र सध्या धुळे-मालेगाव दरम्यान या महामार्गावर खड्डेचखड्डे झाल्याने प्रवाशांना हा नक्की महामार्ग आहे की खड्डेमार्ग असा प्रश्न पडतो आहे.

राष्ट्रीय महामार्ग तीन मालेगाव शहारातून जातो त्यामुळे दररोज येथून हजारो वाहनांची, प्रवाशी, मालवाहतूक होत असते. मात्र यंदाच्या पावसाळ्यात या महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे झाल्याने वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागते आहे. विशेषतः तालुक्यातील झोडगे ते मालेगाव दरम्यानचा २० किमी अंतरावर तर खड्ड्यामुळे महामार्गाची चाळण झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग असल्याने अत्यंत वेगाने वाहने येथून ये-जा करीत असतात. मात्र खड्ड्यांमुळे वाहतुकीवर देखील परिणाम होत आहे. महामार्ग असल्याने वाहनधारकांना यावर खड्डे असतील याची कल्पनादेखील करवत नाही. त्यामुळे अत्यंत वेगाने वाहन चालवताना अचानक खड्डे आल्याने वाहने खड्ड्यात आदळतात. अनेकवेळा अवजड मालवाहतूक करणारे कंटेनर, मालट्रक चालक खड्डे टाळण्यासाठी अचानक लेन बदलतात यामुळे दुचाकी तसेच छोट्या वाहनांना आपला जीव मुठीत घेऊनच वाहन चालवावे लागते. खड्ड्यामुळे वाहने अचानक वळवली जात असल्याने अनेकवेळा मागून वाहने धडक देत असल्याने अपघातचे देखील प्रसंग ओढवले आहेत. राष्ट्रीय महामार्ग असून देखील खड्ड्यामुळे त्याची दुरवस्था झाल्याने यावरून प्रवास करणे म्हणजे जीव धोक्यात घालणे अशीच उद्विग्न प्रतिक्रिया यावरून नियमित प्रवास करणारे प्रवाशी देतात. दरम्यान पावसाळ्यात ठिकठिकाणी महामार्गवरील खड्डे तात्पुरते बुजवण्यात येत होते मात्र आता पावसाळा उलटला असला तरी या खड्ड्याचा कायमस्वरूपी बुजवण्याचा मुहूर्त संबंधित कंपनीला अद्याप सापडत नाही का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान याबाबत धुळे टोल प्लाझा येथील कार्यालयाशी नागरिकांनी संपर्क केला असता ‘काम सुरू आहे’ असे शासकीय उत्तर मिळत आहे. नागरिकांकडून या महामार्गवरील खड्डे लवकरात लवकर बुजवण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.

झोडगेनजीक कामे खोळंबली

महामार्गावर मालेगावापासून २० किमी अंतरावर असलेल्या झोडगे गावालगत गेल्या तीन महिन्यापासून रस्ता दुरुस्तीचे काम सुरू आहे. गावाच्या प्रवेशद्वारासमोर वारंवार खड्डे पडत असल्याने येथील डंबरीकरण काढून सीमेंटचा रस्ता करण्याचे काम कंपनीकडून ऐन पावसाळ्यात हाती घेण्यात आले. त्यामुळे बरेच दिवस हा मार्ग एकेरी झाल्याने वाहतूक खोळंबा होत असे. आता तीन महीने उलटून देखील हे दुरूस्तीचे काम अर्धवटच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरी भागासाठी किफायतशीर घरे

$
0
0

शहरी भागासाठी किफायतशीर घरे

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात प्रत्येकाला राहण्यासाठी चांगले घर मिळायला हवे यासाठी ‘प्रधानमंत्री आवास’ योजना सुरू केली आहे. याच संकल्पनेवर आधारित घरे बनविण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आयडीया कॉलेज २१ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत काम सुरू करत आहे. यात अनेकदा शहरांमध्ये कमी जागेत सर्व सुविधांनी परिपूर्ण आणि किफायतशीर घरे कशी बनवता येतात याचे प्रत्यक्ष सादरीकरण कॉलेजमधील विद्यार्थी करणार आहे.

विद्यावर्धन ट्रस्ट यांच्या मार्फत इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन इनव्हार्मेंट अॅण्ड आर्किटेक्चर अर्थात आयडिया कॉलेज कार्यरत आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा यासाठी कॉलेजकडून नेहमीच उपक्रम राबविले जातात. याअंतर्गत ‘व्हर्टिकल स्टुड‌िओ’ चे आयोजन केले जाते. यात विद्यार्थी थेट ऑफिस थाटून व्यवसायिक पद्धतीने काम करतात.

यंदा व्हर्टीकल स्टुड‌िओसाठी ‘शहरी भागात किफायतशीर घरे’ असा विषय निवडण्यात आला आहे. आजच्या काळाची गरज ओळखून महाविद्यालयाने याबाबत मुलांना प्रत्यक्ष कार्यानुभव देण्याचे ठरविले आहे.

यंदा दिनांक २१ ते २४ या कालावधीमध्ये व्हर्टीकल स्टुड‌िओचे आयोजन करण्यात आले आहे. यात पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे सोडत पद्धतीने ग्रुप बनवून संपूर्ण माहिती दिली जाईल. पुढे दोन दिवस विद्यार्थी त्यावर प्रत्यक्ष काम करतील. आणि शेवट्या दिवशी त्यांनी केलेल्या कामाचे सादरीकरण करण्यात येईल. या संपूर्ण कामांमध्ये विद्यार्थ्यासोबत बाहेरून आलेले व्यवसायिक आर्किटेक्ट सुद्धा त्याच्यासोबत दिवसरात्र काम करणार आहे. यंदा प्रतिक धानमेर (डहाणू), विनित निकुंभ (मुंबई), यतिन पंड्या (अहमदाबाद), मनोज कुमार (तिवेद्रम) आणि जय(मुंबई) आणि नम्रता कपूर (मुंबई) येत आहेत. ही सहा तज्ञ मंडळी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करणार आहेत. ५० विद्यार्थांचा ग्रुप असे त्याचे स्वरूप आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिमुकल्या ज‌िवांची माय गेली…

$
0
0

खारूताईच्या पिलांची कहाणी; नेचर क्लबकडून मायेची ऊब

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खारूताईची अवघ्या तीन दिवसांची आठ पिलेे…शहरातील एका बंगल्याच्या आवारात बेवासरपणे आढळतात…काही सुजाण नागरिक त्या इवल्याशा ज‌िवांना आसरा देतात, दूधही पाजतात…मात्र खूप शोध घेऊनही त्यांची आई सापडत नाही…ती इटुकली पिटुकली पिले आईसाठी कासावीस होतात…आई-आई करीत त्यातील दोन पिले जीव सोडतात…मात्र तरीही आई काही नरजेस पडत नाही…शेवटी शेडमधील नळीच्या होलमध्ये दोन खारूताई मृतावस्थेत आढळतात…अन् पोरक्या झालेल्या पिलांच्या आईचा शोध थांबतो…आईव‌िना जगू पाहणाऱ्या या पिलांना एका संस्थेच्या सानीध्यात सोडले जाते…कुणाच्याही डोळ्यात सहज पाणी आणणारी ही करूण कहाणी घडली शहरातील गंगापूररोडवरील माणिकनगरजवळील एका बंगल्याच्या आवारात.

शहराच्या धकाधकीच्या जीवनात खारूताईला स्वच्छंदपणे बागडणे दुरापास्त झाले आहे. शहरात होणारी प्रचंड वृक्षतोड, वाढत्या सिमेंटच्या जंगलाचे प्रमाण, वाडे संस्कृतीचा ऱ्हास आदी कारणांमुळे खारींची संख्या कमी होत आहे. त्यातच आठ पिलांना जन्म देणाऱ्या खारूताईंचा अंत झाला आहे. गंगापूर परिसरात खारूताईच्या पिलांबाबत ही धक्कादायक घटना घडली. परंतु वेळीच लक्षात आल्याने काही पिलांना वाचविण्यात यश आल्याने परिसरात सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.

माणिकनगरजवळील बंगल्याच्या आवारात खारूताईची अवघ्या तीन दिवसांची आठ पिल्ले घरमालकाला दिसली. त्यांनी नेचर क्लब ऑफ नाशिकला संपर्क साधला असता संस्थेचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा, सागर बनकर व पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय महाजन त्या ठिकाणी पोहचले. ज्यावेळी त्या ठिकाणी गेले तेव्हा ती आठही पिल्ले जिवंत होती. त्यांना अलगद उचलून घरात आणले व डॉक्टर महाजन यांनी त्यांना ड्रोपरने दूध पाजले. ही पिल्ले अवघी चार ते पाच दिवसाची असावी.

एका खारूताईला दोन ते तीन पिल्ले होतात मग एकाच ठिकाणी आठ पिल्ले कशी आली हे शोधण्यासाठी संस्थेने प्रथम त्या परिसरात घरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शेडमधील नळीच्या होलमध्ये दोन खारूताई मृत दिसल्या. तकाही विषारी अन्न खाल्याने त्या दगावल्या असतील, असा अंदाज आहे. ती पिलेे त्या नळीत ठेवून खूप वेळ वाट बघूनही तिथे एकही खारूताई फिरकली नाही. त्या पिल्लांना एक एक तासाने दूध पाजणे आवश्यक होते, यामुळे सायंकाळी त्यांना पुन्हा खोक्यात ठेवून संस्थेचे कार्यकर्ते उमेश नागरे यांच्या घरी नेण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नोंदणीचा तिढा सुटेना

$
0
0

फार्मसी शिक्षणासाठी सेक्शन १२ अंतर्गत मूळ प्रश्न कायम

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

फार्मसी शाखेतील उच्च शिक्षणाशी निगडीत सेक्शन १२ अंतर्गत विद्यार्थ्याच्या नोंदणीचा मुद्दा दरवर्षीच कॉलेजांसाठी डोकेदुखी ठरतो आहे. जाचक अटींमुळे अभ्यासक्रमाची मान्यता रद्द होण्याची टांगती तलवार विद्यार्थ्यांच्या डोक्यावर कायमच राहत असल्याने या अटी शिथील धरण्याची मागणी आता कॉलेजेसकडून जोर धरू लागल्याची वस्तुस्थिती वर्षभरानंतर आहे.

सेंट्रल फार्मसी कौन्सिलच्या अटींनुसार विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रियाच मुदतीपलीकडे दोन महिने उलटून झाली नसल्याची बाब ‘मटा’ ने उघडकीला आणली होती. यामुळे फार्मसीच्या शिक्षणात कॉलेजांसाठी तांत्रिकदृष्ट्या जिकीरीचा ठरणारा सेक्शन १२ आणि व्यवसाय नोंदणीच्या मुद्द्याच्या स्थितीवर प्रकाशझोत पडला होता. या स्थितीत मुदतवाढीनंतर काहीसा बदल होऊन बहुतांश विद्यार्थ्यांची नोंदणी झाली खरी पण हा प्रश्न दरवर्षीच कॉलेजेससाठी डोकेदुखी ठरतो आहे.

गतवर्षी राज्यात सुमारे ९५ कॉलेजमध्ये प्रवेशित पाच हजारपैकी एकाही विद्यार्थ्याची नोंदणी स्टेट फार्मसी कौन्सिलकडे करण्यात आलेली नव्हती. यात वारंवार देण्यात आलेल्या मुदतीनंतर कॉलेजेसने या अटी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.

राज्यात अनेक फार्मसी कॉलेजांकडे फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाची ‘कोर्स ऑफ कंडक्ट’ ची परवानगी आहे. पण फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाची फार्मसी कायद्याच्या सेक्शन १२ खाली देण्यात येणारी परवानगी नाही, या प्रकारच्या फार्मसी कॉलेजातून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी स्वतःची रजिस्टर्ड फार्मसीस्ट म्हणून नोंदणी स्टेट फार्मसी कौन्सिलकडे करू शकत नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बासरीच्या सुरावटीत ज्येष्ठ मुग्ध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बोले रे पपी हरा, आयोध्येचा राजा, ज्ञानियांचा राजा, ऋणुझुणू ऋणुझुणू रे भ्रमरा, ज्योतिकलश झलके अशा एकापेक्षा एक गीतांनी प्रौढ नागरिक संघाचा हॉल स्वरमय झाला होता. निमित्त होते संदीप कुलकर्णी यांच्या बासरीवादनाचे. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त प्रौढ नागरिक मंडळातर्फे गुरुवारी बासरीवादनाच्या कार्यक्रमाचे खास आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात हिंदी- मराठी भावगीते, भक्तिगीते, चित्रपटगीते बासरीवादनातून सादर करण्यात आली. कलाकारांचा परिचय जामदार यांनी, तर प्रास्ताविक आशा चौधरी यांनी केले. वादनाची सुरुवात यमन रागातील बंदिशीने झाली. पंख होते तो उड आती रे, दिवाना हुवा पागल, बाजे रे मुरलीया बाजे, हिरो अशी एकापेक्षा एक गीते बासरीवादनातून सादर करीत कुलकर्णी यांनी रसिकांची मने जिंकून घेतली. कुलकर्णी यांच्यासोबत अनिल कुटे यांनीही बासरीवादन केले. त्यांना तबल्याची साथ ओंकार वैरागकर, तर गायनाची साथ कुमार गोविलकर यांनी केली. या कार्यक्रमानंतर सुगम संगीताची मैफल झाली. यात अनिल कोठीरी व सुजाता कायदे यांनी विविध गीते सादर करून रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. मैफलीची सुरुवात अष्टविनायक चित्रपटातील प्रथमतुला वंदितो या गीताने झाली. त्यानंतर जितेंद्र अभिषेकी यांनी अजरामर केलेले अबिर गुलाल उधळीत रंग हे गीत कोठारी यांनी सादर केले. तबल्याची साथ रोजरेकर यांनी केली. कार्यक्रमाला प्रौढ नागरिक मित्र मंडळाचे अध्यक्ष अनंत साळी, सुरेंद्र गुजराथी, शरद पाटील, रंजन शहा यांच्यासह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. यानंतर दुग्धपानाचा कार्यक्रम झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साधकांच्या आठवणी चिरस्मृतीत राहतील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘आठवणी’ हा ग्रंथ ज्या ज्या साधकांच्या हातात येईल, त्यांना त्यांच्या आयुष्याचा मार्ग गवसेल. हा ग्रंथ अनेकांसाठी मार्गदर्शक ठरेल. साधकांनी नारायणकाका ढेकणे महाराज यांच्याविषयी ज्या आठवणी ग्रंथात लिहिल्या आहेत, त्या चिरस्मृतीत राहतील, असे प्रतिपादन वाराणसीचे प्रसिद्ध कृष्ण यजुर्वेदाचे आचार्य गणेश्वरशास्त्री द्राविड गुरुजी यांनी केले.

नारायणकाका ढेकणे महाराज यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण सोहळ्यात त्यांच्यावर आधारित ‘आठवणी’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. कालिदास कलामंदिरात गुरुवारी हा सोहळा पार पडला. श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज महायोग ट्रस्ट यांच्यातर्फे हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून द्राविड गुरुजी बोलत होते. ते म्हणाले, की ज्या वेळी कठीण काळ येतो, त्या वेळी शास्त्र मार्गदर्शक ठरतात. अंधारात ज्याप्रमाणे दिवा प्रकाशमय ठरतो, त्याचप्रमाणे ज्या लोकांमध्ये जिज्ञासा निर्माण होईल, त्यांच्यासाठी हा ग्रंथ महत्त्वपूर्ण ठरेल. वेद, वाङ्मय हे देवाच्या श्वासाप्रमाणे असून, ज्या वेळी ते लुप्त होण्याचा संभव निर्माण होतो, त्या वेळी देव कोणत्या ना कोणत्या माध्यमाने ते प्रकाशात आणत असतो. नारायणकाका महाराजांनी जागतिक स्तरावर ते पोहोचवण्याचा यशस्वी प्रयत्न करून परंपरा कायम राखली असल्याचेही ते म्हणाले.

तत्पूर्वी, मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. ढेकणे महाराज यांचा जीवनपट उलगडून दाखविणारी चित्रफीत या वेळी दाखविण्यात आली. सूर्यकांत राखे महाराज यांनी प्रास्ताविक केले. ढेकणे महाराज यांनी प्रत्येक साधकाला अशुभापासून दूर केले. अशाच काही साधकांचे भाव या ग्रंथात समाविष्ट असल्याचे ते म्हणाले. या वेळी मुकुंदकाका ठकार, माधवदास राठी, मधुकर हरणे, प्रकाश प्रभुणे आदी उपस्थित होते.

आज प्रवचन व सांगता

शुक्रवारी (२१ ऑक्टोबर) मुकुंदकाका जाटदेवळेकरांचे गुरुभक्ती या विषयावर प्रवचन होणार आहे. सकाळी १० ते १ वाजेपर्यंत गंगापूर रोडवरील लोकनाथतीर्थ स्वामी महाराज चौकात हे प्रवचन होईल. दुपारी १ वाजता सांगता, १.३० वा. श्रीपिंग दर्शन, सायंकाळी ६.३० वा. सांप्रदायिक कीर्तन होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परंपरेत नवता डोकावली पाहिजे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

संगीतात कधीही मूल्यात्मक बदल होत नाहीत. आपण परंपरेचे पालन करतोय, परंतु आता त्यात नवता डोकावली पाहिजे. जी गोष्ट परंपरेची आहे तीच नवतेचीही आहे. नवतेलाही परंपरा चिकटली नाही तर ती उठून दिसणार नाही, असे प्रतिपादन तालयोगी पंडित सुरेशदादा तळवलकर यांनी केले.

क. का. वाघ कला अकादमी प्रस्तुत क. का. वाघ कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस आयोजित कार्यक्रमात तळवलकर बोलत होते. ते म्हणाले, की संस्कार करणाऱ्या गुरूंचा सहवास लाभणे ही मोठी गोष्ट आहे. त्यासाठी वेळही तितकाच द्यावा लागतो. कला ही तरल गोष्ट आहे, ती मनानेच समजावून घ्यावी लागते. कारण तडतड केल्याने बुद्धीवर परिणाम होतो; परंतु मनावर परिणाम होण्यासाठी कलाच असावी लागते.

संगीताच्या अभिजाततेबद्दल काय वाटते, या प्रश्नाला उत्तर देताना पंडित तळवलकर म्हणाले की, अभिजाततेला मापक नसते. शास्त्र, तंत्र, विद्या आणि कला यावर राग ताल व संगीताचे स्वरूप अवलंबलेले असते. शास्त्र हा शिकवण्याचा विषय आहे. तंत्र शरीराने साधले जाते, तर कला म्हणजे सौंदर्य, आनंद, ऊर्मी, प्रेरणा, स्फूर्ती असल्याने ती मनाची कारक आहे.

ही मुलाखत सुनील देशपांडे व विद्या देशपांडे यांनी घेतली. कार्यक्रमप्रसंगी परफॉर्मिंग आर्टसच्या विद्यार्थ्यांनी तबलावादन केले. या सहवादनात त्यांनी ताल तीन ताल, पेशकार, कायदे, रेले, गत, तुकडे, चक्राधार सादर केले. व्यंकटेश तांबे, प्रफुल्ल पवार, ओंकार कोंडिलकर, अद्वय पवार यांनी तबलावादन केले. त्यांना संवादिनीवर पुष्कराज भागवत यांनी साथ केली. पदविका प्राप्त तीन विद्यार्थ्यांचा या वेळी पंडित तळवलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात संगीतात भास भामरे, नाट्यमध्ये देव चक्रवर्ती आणि नृत्यामध्ये श्रद्धा चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. मकरंद हिंगणे यांनी प्रास्ताविक केले. पंडितजींचा परिचय प्रा. शिल्पा देशमुख यांनी परिचय करून दिला. सुमुखी अथनी यांनी आभार मानले.

रिअॅलिटीत पालकांचाच उत्साह अधिक

आजकाल रिअॅलिटी शो चे फॅड आहे. विद्यार्थी मन लावून कला शिकतो आणि त्याला फक्त बक्षीस मिळवायचे असते, तर पालकांनी बक्षिसाची रक्कम कोठे खर्च करायची तेदेखील ठरवून ठेवलेले असते. त्यांना कळतच नाही, की आपण आपल्या पाल्याबाबत किती चुकीचे करत आहोत. त्यांना नंतर २५ वर्षांनीही ते कळले तर कमावले. पुढच्या जन्मात तरी त्या पाल्याला सुखाने ठेवतील, असे मत पंडित तळवलकर यांनी या वेळी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांचा संडे होणार फन-डे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विदेशात काही शहरांमध्ये महिन्याच्या शेवटच्या रविवारी सामूहिक क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. त्याच धर्तीवर नाशिकमध्येही दर महिन्याच्या चौथ्या रविवारी ‘लास्ट संडे ऑफ दि मंथ’ (एलएसओएम) हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. पोलिस दलामार्फत गंगापूर रोडवरील आसाराम बापू पुलाजवळील गोदा पार्क या ठिकाणी सकाळी सहा ते साडेआठ या कालावधीत हा उपक्रम होईल. या महिन्यात ३० ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन असल्याने २३ ऑक्टोबर रोजी ‘एलएसओएम’ उपक्रम होणार आहे. ‘हॅप्पी स्ट्रीट’ या अभिनव उपक्रमाच्या धर्तीवर एलएसओएम उपक्रम असेल.

एलएसओएम ही संकल्पना विदेशात प्रचलित आहे. आपल्या शहरासाठी आणि आरोग्यासाठी सर्वांनी एकत्र जमावे, ही संकल्पना खरोखर प्रेरणादायी असून, पोलिस विभागाने यासाठी पुढाकार घेतला असल्याचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी सांगितले.

पोलिस आणि नागरिक एकत्र आले तर गुन्हेगारीवर निश्चितच वचक निर्माण होतो. गुन्हेगारीचा बीमोड होऊन शहराचे नाव देशपातळीवर उज्ज्वल व्हावे, यासाठी फक्त पोलिसांनी किंवा नागरिकांच्या गटांनी प्रयत्न करणे तितके फायद्याचे नाही. त्यामुळे अनेक दिवसांपासून आम्ही आणखी करता येईल काय, याची चाचपणी करीत होतो, असे सिंघल म्हणाले. विदेशात काही शहरांमध्ये महिन्याच्या शेवटच्या रविवारी सामूहिक क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. त्याच धर्तीवर नाशिकमध्येही दर महिन्याच्या चौथ्या रविवारी अशा उपक्रमाचे आयोजन पोलिस दलामार्फत होणार आहे. एलएसओएमबरोबरच धावणे, चालणे, वॉर्मअप, जॉगिंग असे व्यायमाचे प्रकारदेखील असणार आहेत. स्केटिंग, योगा, सायकलिंग वा अन्य खेळाडूंना आपले कलागुण येथे सादर करता येतील.

पोलिस-नागरिक सुसंवादासाठी उपक्रम

नागरिकांशी संवाद वाढवण्यासाठी पोलिसांमार्फत सुरुवात झाली आहे. त्याचा हा पहिला टप्पा असून, हळूहळू उपक्रमाच्या स्वरूपात, वेळेत, तसेच ठिकाणामध्ये बदल होईल. नागरिकांनी अगदी निर्धास्त होऊन कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन पोलिस आयुक्त सिंघल यांनी केले. नागरिकांना या उपक्रमाविषयी किंवा सहभागी होण्याबाबत काही शंका असल्यास त्यांनी सहायक पोलिस आयुक्त जयंत बजबळे (मो. ९७६५४६५५१३) किंवा अनिरुद्ध अथानी (९८२२०६९८७२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस उपायुक्त विजय पाटील यांनी केले. मॅरेथॉनसाठी इच्छुक असलेल्या नागरिकांना सर्व प्रशिक्षण व इतर सुविधा पोलिसांमार्फत पुरवण्यात येणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीसीटीव्हीसाठी पोलिसांचे आवाहन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिस सतत प्रयत्नशील असतात. पोलिसांच्या मदतीसाठी तंत्रज्ञानही पुढे सरसावले आहे. गुन्ह्याचा तपास आणि गुन्ह्याला प्रतिबंद घालणे यासाठी सीसीटीव्हीदेखील महत्त्वाची भूमिका बजावत असून, व्यावसायिक अस्थापनांनी त्याचा वापर करावा, असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी गुरुवारी केले.

नाशिकमधील व्यावसायिक अस्थापानाच्या प्रतिनिधींसाठी शहर पोलिसांनी घेतलेल्या बैठकीत सिंघल बोलत होते. बैठकीला सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि शेकडो आस्थापना प्रतिनिधी हजर होते. सीसीटीव्हीचा उपयोग फक्त गुन्ह्याचा तपास करण्यासाठी होतो, असे नाही, तर अनेकदा सीसीटीव्ही असलेल्या ठिकाणी चोरी होण्याचे प्रकार आपसूकच टळले जातात, असे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा दर्जा, त्यांची संख्या, बसवण्याचे ठिकाण यांचाही ताळमेळ हुकतो. त्यामुळे सीसीटीव्ही असूनही त्याचा फायदा मात्र गुन्ह्याचा शोध घेताना होत नाही. यासाठी तंत्रशुद्ध पद्धतीने सीसीटीव्ही बसवणे हे महत्त्वाचे असल्याचे सिंघल यांनी स्पष्ट केले. सीसीटीव्ही बसवताना काही अडचणी असतील, सीसीटीव्हींची क्षमता, रेकॉर्डींगचा कालावधी याविषयी माहिती हवी असल्यास संबंधीतानी पोलिसांशी संपर्क साधवा, असे आवाहन देखील पोलिस आयुक्त सिंगल यांनी केले. यावेळी हॉटेल्स, बँका, शाळा- कॉलेजेस, विविध वस्तु किंवा वाहनांचे शोरूम्स, धार्मिक स्थळांच्या ट्रस्टचे पदाधिकारी आदी हजर होते. त्यांनी काही सुचना केल्यात. तसेच आपले अनुभव सांगितले. सीसीटीव्ही कार्यरत असणे हे फक्त पोलिसांसाठी सोयीस्कर नसून, त्याचा फायदा संबंधीत अस्थापनांना देखील होतो. ही बाब आजच्या बैठकी दरम्यान, सर्वांनीच मान्य केली असून, याची अंमलबजावणी होणार असल्याचे पोलिस उपायुक्त विजय पाटील यांनी सांगितले. या संदर्भांत एक रूपरेषा तयार केली जाणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा बैठक घेतली जाईल, असे पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लष्कराचे वाहन बेपत्ताच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कामासाठी ते रोज नाशिकला यायचे. १५ सप्टेंबर रोजी ते घरातून निघाले. मात्र, यानंतर त्यांच्या मृत्यूचीच बातमी आली. त्यांच्या मरणासाठी कारणीभूत ठरलेला लष्कराच्या त्या वाहनाचा क्रमांक पोलिसांकडे आहे. मात्र, आज ३५ दिवसांनंतरही या वाहनाचा तपास लागलेला नाही. सर्वसामान्यांचा पोलिसांवर विश्वास आहे. मात्र, तो कायम ठेवण्यासाठी अशा घटनांचा तातडीने तपास लागयला नको का, ही संतप्त प्रतिक्रिया आहे हर्षदा आव्हाड या मुलीची.

मनमाड येथे स्थायिक असलेल्या आव्हाड कुटुंबातील हर्षदा ही मोठी मुलगी. हर्षदाचे वडील श्रीकांत आव्हाड (वय ६०) यांचा १५ सप्टेंबर रोजी फेम टॉकीजसमोर अपघातात मृत्यू झाला. सार्वजनिक बांधकाम विभागातून निवृत्त झालेल्या आव्हाड यांनी काही खासगी काम सुरू केले होते. यासाठी ते नेहमीच मनमाड-नाशिक असा प्रवास करायचे. नाशिकमध्ये फिरण्यासाठी त्यांनी एक दुचाकी घेतली होती. १५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास आव्हाड स्वाद हॉटेल येथून जात असताना त्यांच्या दुचाकीस बीए ०० /डी१३२९३५ एक्स या लष्काराच्या वाहनाने धडक दिली. दुर्दैवाची बाब म्हणजे वाहनचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या आव्हाडांचा मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूच्या बातमीनंतर आव्हाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. हर्षदाचा भाऊ स्वप्नील सध्या उद्योगधंद्यासाठी प्रयत्न करीत आहे, तर तीही स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न करते आहे. मात्र, वडिलांच्या अकाली निधनामुळे या भावंडांवर जणू आभाळच कोसळले. वडिलांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेल्या व्यक्तीस शासन मिळावे, एवढी आव्हाड कुटुंबाची रास्त अपेक्षा आहे. याबाबत बोलताना हर्षदाने सांगितले, की सर्वांना आपल्या लष्कराचा अभिमान असतो. तसा मलाही आहे. मात्र, अपघातानंतर पळून जाणाऱ्या वाहनचालकामुळे काही प्रश्न उपस्थित होतात. दुसरीकडे पोलिसांनी गुन्हा दाखल करीत जणू काही करायचे नाही, असे ठरवले दिसते. चौकशी केली, की तपास सुरू आहे एवढेच उत्तर मिळते. रस्त्यावर अपघात करून लष्कराच्या छावणीत घुसून बसणाऱ्या त्या वाहनचालकाला अटक केव्हा होणार, असा प्रश्न पडतो. विशेष म्हणजे उपनगर पोलिसांकडे त्या वाहनांचा क्रमांकदेखील आहे.

या घटनेबाबत आज पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी संबंधिॉत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. सर्वसामान्य व्यक्ती म्हणून न्याय मागण्याची वेळ येते हेच दुर्दैवी आहे. शिस्त म्हंटले, की लष्करची प्रतिमा समोर येते. मात्र, अपघातानंतर जखमी व्यक्तीस रस्त्यावर सोडून पळून जाणाऱ्या त्या चालकाने काय साधले? या प्रकरणाची तक्रार सरंक्षण विभागाकडे करण्यात येणार आहे.
- हर्षदा आव्हाड, तक्रारदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अबाधित स्वातंत्र्यासाठी मुस्लिम बांधवांचा ठराव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

‘मुस्लिम पर्सनल लॉ’मध्ये हस्तक्षेप करून केंद्र सरकार मुस्लिमांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. हे कदापि सहन केले जाणार नाही, असा ठराव जमिअत उलेमाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय एकता महासंमेलनात करण्यात आला.

धुळे शहरातील नॅशनल उर्दू हायस्कूलजवळील आएशा मशिदीच्या मैदानावर जमिअत उलेमातर्फे गुरुवारी रात्री राष्ट्रीय एकता महासंमेलन आयोजित करण्यात आले होते. जमिअत उलेमा हिंदचे अध्यक्ष हजरत मौलाना सैयद अरशद मदानी, इंदूर येथील श्री सद््गुरू दत्त धार्मिक व पारमार्थिक ट्रस्टचे राष्ट्रसंत भैय्यूजी महाराज, नांदेड येथील पंचप्यारे गुरुद्वारा तकगट सचखंड श्री हुजूर साहेबचे ज्ञानी विजेंद्रसिंह कपूर, गांधीनगर येथील भन्ते प्रशील रत्न गौतम, जमिअत उलेमाचे राज्याध्यक्ष ह. मो. मुस्तकीन अहसन आजमी आदी उपस्थित होते. जमिअत उलेमा हिंदचे अध्यक्ष हजरत मौलाना सैयद अरशद मदानी म्हणाले की, केंद्र सरकार मुस्लिम पसर्नल लॉमध्ये हस्तक्षेप करून समाजाचे स्वातंत्र हिरावून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. या देशात प्रत्येक समाजाचा पर्सनल लॉ आहे. तो काढून घेण्याचा प्रयत्न आताचे सरकार करत आहे. या विरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल. भन्ते प्रशील रत्न गौतम यांनी भारत हा देश गौतम बुद्धांचा आहे. त्यांनी जगाला शांततेचा मूलमंत्र दिला आहे. त्याचे आचरण करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.

‘माझ्यासमोर बसून बोला’
आपण कायद्याला जपणारी माणसे आहोत, कायदा मोडणारे नाही. ज्यांना जाब विचारायचा असेल, त्यांनी माझ्यासमोर बसून माझ्याशी बोलावे, असे खुले आव्हान राष्ट्रसंत भैय्यूजी महाराज यांनी विरोधकांना दिले. ते राष्ट्रीय एकता महासंमेलनासाठी धुळ्यात आले असता, पत्रकारांशी बोलत होते. भैय्यूजी महाराज म्हणाले की, देशात सलोख्याचे वातावरण तयार करायचे असेल, तर भारताची तुलना पाकिस्तानशी करू नये. समान नागरी कायद्याचा विचार करताना धर्म व संविधानातील तरतुदी यांचाही विचार व्हावा. धर्मा-धर्मात काय लिहिले आहे हे लहानपणी शिकवल्यास सर्व वाद मिटतील, अशी अपेक्षा भैय्यूजी महाराजांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकार मिळाले, विकासाचे काय?

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडकोने शहरात उभारलेल्या सहा योजनांचे महापालिकेकडे हस्तांतर झाल्यानंतर आता सिडकोकडील नगररचना विभागाचे अधिकारही महापालिकेला मिळाले आहेत. त्यामुळे आता तरी महापालिकेकडून या भागातील प्रलंबित विकासकामे मार्गी लागणार की नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. विकासकामे करताना आता सिडकोची परवानगी लागणार नसल्याने राजकीय नेत्यांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, सिडकोतील वाढत्या अतिक्रमणांचा प्रश्न आता महापालिका खऱ्या अर्थाने मार्गी लावणार की नाही, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

सिडकोने उभारलेल्या सहा योजनांपैकी पाच योजनांचे यापूर्वीच महापालिकेकडे हस्तांतर झाले होते. मात्र, सहावी योजना हस्तांतरास बराच कालावधी लागला. त्यामुळे सिडकोकडून महापालिकेला चार भूखंड व दोन सभागृहेसुद्धा मिळाली आहेत. सर्व योजनांचे हस्तांतर झाल्यानंतर सिडकोकडील नगररचनेचे अधिकारही महापालिकेला मिळावेत, यासाठी सर्वांनी पाठपुरावा सुरू केला. मागील आठवड्यात हे अधिकार महापालिकेला देण्याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यामुळे आता सिडको प्रशासकीय कार्यालयात केवळ घरे हस्तांतरण व सिडकोच्या ताब्यात असलेले काही अतिक्रमित भूखंड विक्री करणे एवढेच काम शिल्लक राहिले आहे. यापूर्वी सिडकोतील अतिक्रमणाचा प्रश्न निघाल्यानंतर सिडको व महापालिका एकमेकांकडे हे अतिक्रमण काढण्यावरून ढकलाढकल करीत होते. आता महापालिकेकडे नगररचनेचे अधिकार प्राप्त झाले असून, येथील अतिक्रमण काढण्याची जबाबदारी महापालिकेवर येऊन पडली आहे. त्यामुळे येत्या काळात महापालिकेकडून सिडकोतील अतिक्रमण काढले जाणार की नाही, याबाबतची चर्चा होत आहे. सिडकोने यापूर्वी दिलेल्या बांधकाम परवानग्यांबाबतही महापालिका काय भूमिका घेणार याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.

नेतेमंडळींत समाधान!

शहरातील विविध लोकप्रतिनिधींना विविध विकासकामे करताना सिडकोच्या परवानगीची गरज पडत होती. आता मात्र सिडकोच्या ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता राहणार नसल्याने नेतेमंडळींकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योजकांची पोलिसांकडून कानउघडणी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

औद्योगिक वसाहतीत दिवाळीत होणाऱ्या चोऱ्यांना प्रतिबंध बसावा यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत उद्योजकांनी वेळेचे बंधन न पाळल्यामुळे पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्या अनुपस्थितीतच ही बैठक पार पडली. शुक्रवारी दुपारी ४ वाजता पोलिस बैठकीला हजर झाले. मात्र, उद्योजकच यावेळी उपस्थित नसल्याने पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी आयुक्तांना ‘डोन्ट कम’चा संदेश पाठवला.
उशीरा सुरू झालेल्या या बैठकीत उपायुक्त धिवरे यांनी उद्योजकांची चांगलीच कानउघाडणी केली. वेळेचे बंधन न पाळल्यामुळे मीच आयुक्तांना न येण्याचे सांगितल्याची माहितीही त्यांनीच या बैठकीत दिली. विशेष म्हणजे आयमाचे पदाधिकारी व काही उद्योजक सोडल्यास या बैठकीला अनेक उद्योजकांनीही पाठ फिरवल्यामुळे उद्योजकांची दांडी मारण्याची चोरीही या निमित्ताने उघड झाली. अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये दिवाळीच्या काळात कारखान्यांना सलग सहा दिवस सुटी असल्यामुळे होणाऱ्या चोऱ्यांना प्रतिबंध लागावा यासाठी अंबड इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स (आयमा) कार्यालयात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी उद्योजक, सुरक्षा सेवा देणाऱ्या एजन्सी व सिक्युरिटीज एजन्सीज, लेबर काँट्रॅक्टर यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. त्यासाठी ठिक चार वाजता बैठक सुरू होईल असा संदेश आयमातर्फे देण्यात आला. पण प्रत्यक्षात तो न पाळल्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांनी उद्योजकांना वेळ न पाळण्यावरून सुनावले.
गेल्या वेळच्या
सुचनांचे काय?
गेल्या वेळेस दिलेल्या सुचनांचे अजूनही पालन उद्योजकांनी केलेले नाही, असे सुनावत अधिकाराबाबत आपण नेहमी जागृत असतो.
पण आपली जबाबदारी मात्र विसरतो. गेल्या वेळी सीसीटीव्ही, स‌िक्युरिटी गार्डबरोबरच अनेक सूचना केल्या. पण त्या पाळल्या नाहीत. स‌िक्युरीटी व सेफ्टी हा महत्वाचा विषय आहे. त्यासाठी पोलिसांतर्फे आम्ही नियोजन केले आहे. त्यासाठी उद्योजकांनीसुध्दा जागृत राहणे गरजेचे आहे.
आम्ही नाकाबंदी, बॅरिकेडिंग, वाहन तपासणी व गस्त वाढवणार आहोत. त्याचप्रमाणे झोपडपट्टीत कोम्बिंग ऑपरेशनची सूचना चांगली आहे, त्यावर कारवाई करू असेही सांगितले. या बैठकीत आयमाचे अध्यक्ष राजेंद्र आहिरे यांनी रात्रीची गस्त, बाहेरुन येणाऱ्या वाहनांची तपासणी, रस्ते नाकाबंदी, झोपडपट्टी कोम्बिंग ऑपरेशन, पहाटे होणाऱ्या चोऱ्या, छोट्या टपऱ्यांची वाढलेली संख्या व अवैध धंदे, बंद पडलेले पथदीप या विषयाकडे लक्ष वेधले. या बैठकीत अंबड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड व सातपूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एस. व्ही. करंजे, आयमाचे सरचिटणीस निखील पांचाल, तक्रार उपसमितीचे चेअरमन राधाकृष्ण नाईकवाडे, नाईसचे रमेश वैश्य, धनजंय बेळे, विवेक पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालकास सोडून पालकांचा पळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अवघ्या तीन वर्षांच्या बालकास सोडून माता-पित्याने पळ काढल्याची धक्कादायक घटना जेलरोड परिसरात घडली. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, त्या निर्दयी पालकांचा शोध घेतला जात आहे. सेंट अण्णा चर्चचे रवी त्रिभूवन यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. बुधवारी रात्री एका जोडप्याने आपल्या तीन वर्षीय मुलास चर्चसमोर उघड्यावर सोडून दिले. मध्यरात्रीच्या सुमारास जीवाच्या आकांताने मुलाने रडायला सुरुवात केली. त्याच्या रडण्याच्या आवाजामुळे परिसरातील नागरिकांनी धाव घेतली असता ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सहाय्यक निरीक्षक माळी करीत आहेत.

कॉलेजमध्ये
लॅपटॉपची चोरी
मविप्रच्या फार्मसी कॉलेजमध्ये लॅपटॉप चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. सरिता अमरनाथ चौधरी (रा. सरस्वती चौक, सिडको) यांनी लॅपटॉप चोरीची तक्रार दिली आहे. बुधवारी चौधरी या फार्मसी कॉलेजला गेल्या होत्या. लॅबमध्ये ठेवलेला त्यांचा २० हजार रुपये किमतीच्या लॅपटॉपवर चोरट्यांनी हात साफ केला. अधिक तपास हवालदार निकम करीत आहेत.

गॅस वितरकास लुटले
गॅस सिलेंडरची घरपोच सेवा देणाऱ्या एजन्सी कामगारास दोघांनी लुटल्याची घटना सातपूर येथील केदारनगर परिसरात घडली. विकास उर्फ गॅब्या प्रेम प्रकाश रॉय (रा. समर्थ पार्क, श्रमिकनगर) व चंद्रकांत दामोदर डगळे (रा. आंबेडकर हॉल जवळ, शिवाजीनगर) अशी संशयितांची नावे आहेत. सातपूर गॅस एजन्सीचे कामगार चंदन शेनपडू सुशिर (२४ रा.शिवाजीनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. चंदन सुशिर व नितीन बाळासाहेब सानप हे दोघे कामगार गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास केदारनगर येथील आयटीआय कॉलनीमध्ये आपले काम करीत असताना लुटीचा प्रकार घडला. संशयितांनी दोघा गॅस वितरकांचा रस्ता अडवून बेदम मारहाण केली तसेच चंदनच्या खिशातील सुमारे सहा हजार ५०० रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेतली. यावेळी झालेल्या झटापटीत नितीन सानप या कामगाराचा मोबाइल खिशातून पडला असता तोही संशयितांनी उचलून पोबारा केला. याप्रकरणी सातपूर पोलिसांनी लुटीचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गायकवाड करीत आहेत.

चाकूचा धाक दाखवून वृध्दास लुटले
रस्त्यावर झाडांची फुले तोडत असलेल्या वृध्दास चाकूचा धाक दाखवत दुचाकीस्वार युवकांनी लुटल्याची घटना गंगापूररोडवरील स्वामी विवेकानंद मार्गावर घडली. वृध्दाच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडून नेल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काशिनाथ कारभारी ढोमसे (६४ रा. राजेंद्र भवन, जुना गंगापूर नाका) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. स्वामी विवेकानंद मार्गावरील देह मंदिर सोसायटीसमोरील रस्त्याच्या दुभाजकात लावलेल्या फुलझाडांची फुले तोडत असताना ढोमसे यांच्याजवळ एक अॅक्ट‌िव्हा येऊन थांबली. मुळात कमी वर्दळ असलेल्या ठिकाणी अ‍ॅक्ट‌िव्हा दुचाकीवर आलेल्या दोघा युवकांनी ढोमसे यांना थेट चाकूचा धाक दाखवत पैशांची मागणी केली. पैसे नसल्याचे ढोमसे यांनी सांगताच दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या युवकाने त्याच्या गालात फटका मारीत गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीची सोनसाखळी तोडली. यानंतर, चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, अधिक तपास उपनिरीक्षक सोनाने करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुतात्म्यांना पोलिसांकडून मानवंदना

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या देशभरातील पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आज, शुक्रवारी राष्ट्रीय पोलिस हुतात्मा दिनानिमित्त मानवंदना देण्यात आली. विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे व पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या उपस्थितीत पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हवेत तीन फैरी झाडून शहिदांना अभिवादन केले.
दहशतवाद, नैसर्गिक आपत्ती, अतिरेकी हल्ला व दंगलीसारख्या परिस्थितीमध्ये नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे रक्षण करताना शहीद झालेल्या जवानांना हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन करण्यात येते. १ सप्टेंबर २०१५ ते ३१ ऑगस्ट २०१६ या कालावधीत शहीद झालेल्या देशभरातील ४७३ पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना मानवंदना देण्यात आली. यात महाराष्ट्रातील पाच पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कार्यक्रमासाठी नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे, पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल, नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकुश शिंदे, महाराष्ट्र पोलिस अकादमीचे सहसंचालक बी. जी. गायकर, पोलिस उपआयुक्त विजय पाटील, श्रीकांत धिवरे, दत्तात्रय कराळे आदींनी स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण केले. त्यापूर्वी परेड कमांडर विजय दाणी व सेकंड परेड कमांडर रामदास पालशेतकर यांच्या नेतृत्वाखाली ९० पोलिस कर्मचाऱ्यांनी शोकसंचलन केले. महापौर अशोक मुर्तडक, क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ भीष्मराज बाम, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वसंतराव हुदलीकर यांच्यासह लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, राज्य गुप्तवार्ता विभाग, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग अशा विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images