Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

आंदोलकांपुढे पोलिस हतबल

$
0
0

नागरिकांचे हाल, संध्याकाळी वाहतूक पूर्ववत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तळेगाव (अंजनेरी) येथील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराचे पडसाद रविवारी दिवसभर दिसून आले. विशेषतः मुंबई-आग्रा हायवेवरील परिस्थिती आटोक्यात आणताना पोलिसांच्या नाकीनऊ आले. पोलिस पाहत होते आणि आंदोलकर्ते बस, कार तसेच दुचाकी पेटवत राहिले. अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली. संध्याकाळी उशिरा लोकप्रतिनिधींना सोबत घेत पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना विनवणी केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथे पाच वर्षांच्या मुलीवर १५ वर्षांच्या मुलाने लैंगिक अत्याचार केला. ही घटना रात्री नऊ वाजेनंतर व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाली. यात अतिशयोक्ती वर्णन करण्यात आले. यानंतर मात्र मराठा समाजाच्या तरुणांनी ठिकठिकाणी रस्त्यावर उतरण्यास सुरुवात केली. रात्री १२ वाजेपासूनच इगतपुरी टोलनाका, वाडीवऱ्हे, गोंदे चौफुली तसेच विल्होळी येथे आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको केला. विल्होळी येथे आंदोलनकर्त्यांनी पोलिसांना मारहाण करीत त्याची पेट्रोलिंग व्हॅन पेटवून दिली. यानंतर, दिवसभरात विल्होळी येथेच पाच बसेस, दोन कार तसेच एक दुचाकी आंदोलकांनी आगीच्या भक्ष्यस्थानी पाडल्या. कंटेनर, कार तसेच इतर वाहनांच्या काचाही मोठ्या प्रमाणावर फोडण्यात आल्या. पोलिसांवर हल्ला झाल्यानंतर दुपारी एक ते दीड वाजेपर्यंत पोलिस येथे फिरकलेच नाही. तसेच आलेल्या पोलिसांनी हतबलतेने पाहण्यापलिकडे काही केले नाही. पोलिस असताना येथे एक बस पेटवून दिली, तर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यासमोरच एक दुचाकी पेट्रोल टाकून पेटवून देण्यात आली.

मीडियाच्या नावाने डांगोरा

आंदोलनकर्ते आक्रमक होते कारण तेथे पोलिसच नव्हते. पोलिसांना या आंदोलनाची तीव्रता समजेपर्यंत उशीर झाला होता. त्यामुळे पोलिसांनी आंदोलन चिघळण्यासाठी मीडियाला दोषी ठरवले. विल्होळी येथे काही पत्रकार वार्तांकनाचे काम करीत असताना ग्रामीण पोलिस दलातील एका पोलिस अधिकाऱ्याने त्यास हरकत घेतली. आंदोलनकर्ते समोर असताना त्यांना पकडण्याचे सोडून तिवारी व त्यांचे सहकारी पत्रकारांना दमबाजी करण्यात मश्गुल होते. तुम्ही मीडियावाले असल्याचे आंदोलनकर्त्यांना सांगितले, तर ते तुम्हाला जिवंत सोडणार नाही. अशा वेळी आम्ही काहीही करू शकणार नाही, असे विचार तिवारी यांनी मांडले. वास्तविक, पोलिसांनी काहीच केले नाही. जळते ते जळू द्या, आपोआप शांत होईल, अशी भूमिका पोलिसांनी घेतल्याचे चित्र दिवसभर दिसून आले.

चुंभळे येताच आंदोलक थंड

पोलिसांच्या मवाळ भूमिकेमुळेच आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांच्या उपस्थितीत वाहनांची जाळपोळ केली गेली. संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास अंबड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड हे स्थायी समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांना सोबत घेऊन विल्होळी येथे आले. चुंभळे येताच अवघ्या पाच मिनिटांत आंदोलन मागे घेण्यात आले.

दलितांमध्ये भीती

विल्होळी, वाडीवऱ्हे तसेच या परिसरात राहणाऱ्या दलितांमध्ये आजच्या प्रकरणामुळे भीतीची भावना निर्माण झाली आहे. विल्होळीसह वाडीवऱ्हे भागात दलित वस्त्यांवर हल्ला करण्याची तयारी केली जात होती. मात्र, आंदोलनकर्त्यांमधील काहींनी हा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला म्हणून पुढील अनर्थ ठळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सणासुदीत पाण्यासाठी वणवण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ऐन सणासुदीच्या दिवसांत जेलरोड परिसरातील नारायणबापूनगर भागातील असंख्य रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पाणीपुरवठ्याची मोटर जळाल्याने गेल्या आठ दिवसांपासून येथील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. रविवारी (दि. ९) पाणीपुरवठा झालाच नाही, परिणामी काही नागरिकांनी खासगी टँकर मागवून पाण्याची गरज भागविली.

महापालिकेकडून मिळणारे पाणी नारायणबापूनगर सोसायटीच्या टाकीत टाकून पाणीपुरवठा केला जातो. तथापि, जळालेली मोटर दुरुस्त करण्याची तत्परता सोसायटी व्यवस्थापनाने दाखविलेली नाही. त्यामुळे पाणीपुरवठ्याचा खेळखंडोबा झाला असून, शेकडो रहिवाशांना त्यामुळे गैरसोय सहन करावी लागत आहे.

मोटर जळाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असली, तरी सोसायटीची पाणीपुरवठा यंत्रणाच सदोष असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. महापालिकेकडून दिवसातून दोन वेळा पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा केला जात असला, तरी सोसायटी मात्र दिवसातून एकच वेळ पाणीपुरवठा करीत आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या शुद्ध पाण्यात बोअरवेलचे पाणी मिश्रित करून दूषित पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्नही निर्माण झाला आहे. अनेक नागरिक पिण्याचे पाणी जवळपासच्या सोसायट्या आणि कॉलनीतून आणतात. सोसायटी व्यवस्थापन मंडळातील बरेच सदस्य सोसायटीत राहतच नसल्याने त्यांना नागरिकांच्या आरोग्याशी आणि समस्यांशी काहीही देणे-घेणे नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

परिसरात अनेक ठिकाणी एका घरात पाणी मिळत असताना शेजारच्या घरात अत्यंत कमी पाणी मिळते, त्यामुळे काही कुटुंबांना दुसरीकडून पाणी आणावे लागते. ही समस्या दूर करण्यासाठी कोणत्याही प्रकारची उपाययोजना व्यवस्थापन करत नसल्याने लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. परिसरातील सर्वच सोसायट्यांना पुरेसा पाणीपुरवठा होत असताना नारायणबापूनगरला कमी पाणी मिळत असूनही महापालिका अथवा नगरसेवकांकडे हा प्रश्न सोसायटी व्यवस्थापन मांडत नाही, त्यामुळे दिवसेंदिवस समस्या गंभीर होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.

आरोग्याच्या तक्रारींत वाढ

महापालिकेकडून मिळणाऱ्या शुद्ध पाण्यात बोअरवेलचे पाणी मिसळून सर्वच पाणी दूषित केले जाते. हे पाणी प्यायले गेल्याने पोटदुखी, सर्दी, मळमळ असे त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यातच सोसायटीची पाणीपुरवठा व्यवस्था सदोष असल्याने अनेक इमारतींना पाणी मिळत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायकल रॅलीद्वारे आरोग्य संवर्धनाचा संदेश

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक सायकलिस्ट आणि पिंपळगाव सायकलिस्टतर्फे जागतिक हृदय दिनानिमित्त निरोगी हृदयासाठी रविवारी सायकल रॅली काढण्यात आली. पहाटे साडेपाच वाजता महाकवी कालिदास कलामंदिर येथून ऑलिम्पिकपटू दत्तू भोकनळ याच्या प्रमुख उपस्थितीत रॅलीला सुरुवात झाली.

पहाटे साडेपाच वाजता सुरू झालेल्या रॅलीत नाशिक सायकलिस्ट असोसिएशन, पिंपळगाव सायकलिस्ट, इंदिरानगर सायकलिस्ट, भाभानगर सायकलिस्ट, जल्लोष ट्रेकिंग ग्रुप, मानवता हेल्प फाउंडेशन, पंचवटी मेडिकल असोसिएशन, नाशिक फार्मा ग्रुपचे सदस्य सहभागी झाले होते. या रॅलीत ९ महिला, ६ मुले यांच्यासह १६० सायकलिस्ट सहभागी झाले.

सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून ही सायकल रॅली काढण्यात आली. समाजाला हृदयरोगापासून मुक्त करण्यासाठी नाशिककरांनी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, डॉ. पल्लवी धर्माधिकारी यांनी केले होते.

सायकल चालवण्यामुळे वजन प्रमाणशीर राहते, स्नायूंमध्ये शक्ती व डौलदारपणा येतो व अनावश्यक चरबीपासून सुटका होते. सुखी आयुष्यासाठी तंदुरुस्ती आवश्यक आहे व तंदुरुस्तीसाठी सायकलिंगचा व्यायाम करणे आवश्यक आहे, तसेच या उपक्रमामुळे इंधन वाचवण्याबरोबरच पर्यावरण चांगले राहते, असा संदेश ऑलिम्पियन विजेता दत्तू भोकनळ याने दिला. सद्यःपरिस्थितीत प्रत्येकाने स्वतःपासून इंधन बचतीला सुरुवात करावी व स्वतःही निरोगी राहावे, यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पर्यावरण जागृतीचा संदेश देण्यात आला.

रॅलीचे सकाळी ६.३० वाजता ओझर येथील दुर्गा देवी मंदिरात आगमन होताच ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले. सकाळी ७.३० वाजता पिंपळगाव येथील स्वयंवर लॉन्स येथे क्रीडाप्रेमींच्या हस्ते सायकलिस्टचा सत्कार करण्यात आला. सकाळी ८ वाजता वडाळीभोई येथील ग्रामपंचायतीच्या वतीने स्वागत होऊन रॅली सकाळी ९ वाजता रॅली चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात पोहोचली. येथून सायकलिस्टने रेणुका देवीचे दर्शन घेतले व रॅली नाशिककडे मार्गस्थ झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाभरात रास्ता रोको

$
0
0

तळेगाव (अंजनेरी) घटनेचे पडसाद, जनजीवन विस्कळीत

टीम मटा

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव (अंजनेरी) येथे पाच वर्षांच्या चिमुरडीवरील बलात्कार प्रकरणाचे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले. जिल्हाभरात रास्ता रोको आंदोलन करीत संशयित आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, रास्ता रोकोमुळे जिल्हाभरात ठिकठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत होऊन पोलिस प्रशासनाची धावपळ उडाली.

बागलाणमध्ये रास्ता रोको

तळेगाव घटनेच्या निषेधार्थ सटाणा शहरासह तालुक्यातील नामपूर येथे रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. सटाणा बसस्थानकासमोर मनसे व मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी नायब तहसीलदार आबासाहेब तांबे यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये मनसेचे शहराध्यक्ष पंकज सोनवणे, मनोज सोनवणे, वैभव सोनवणे, डॉ. आशिष सूर्यवंशी, सुमित वाघ, अनिल सोनवणे, योगेश सोनवणे, अमोल पवार, माजी नगराध्यक्ष विजय वाघ, पंचायत समिती उपसभापती वसंत भामरे, ज. ल. पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

देवळावासीयांचा इशारा

देवळा येथील सकल मराठा समाजाच्या तरुणांनी पाचकंदील येथे रास्ता रोको आंदोलन छेडले. युवानेते संभाजी आहेर, सामाजिक कार्यकर्ते पंकज अहिरराव, शिवसंग्रामचे उदयकुमार आहेर, अतुल आहेर, राजेश आहेर आदींनी मराठा समाजाच्या भावनांची दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. यावेळी लक्ष्मीकांत आहेर, जितेंद्र आहेर, सुनील आहेर, भाऊसाहेब पगार, जगदीश पवार, नानू आहेर, उमेश आहेर, प्रतीक आहेर, कौतिक पवार, बंडूनाना आहेर, प्रदीप आहेर, बाळासाहेब शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी तळेगाव येथील नराधमाला त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन श्रुतिका आहेर व समृद्धी आहेर यांच्या हस्ते पोलिस निरीक्षक सतीश माने, तलाठी राजेंद्र गुंजाळ यांना देण्यात आले. आंदोलनामुळे विंचूर-प्रकाशा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

निफाडमध्ये नागरिक रस्त्यावर

निफाड परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. निफाड, नैताळे, पिंपळस, ओझर आदी ठिकाणी नागरिकांनी रास्ता रोको केला. निफाड येथील शांतीनगर चौफुली यथे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अनिल कुंदे यांच्या नेतृत्वाखाली अर्धा तास रास्ता रोको करण्यात आला. अत्याचार करणाऱ्या नराधमाला फासावर लटकवा, अशी मागणी यावेळी आंदोकानी केली. वाल्मीक कापसे, विक्रम रंधवे, मधुकर कापसे, भीमराज काळे, देवदत्त कापसे, संपतराव व्यवहारे, दीपक गाजरे, महेश चोरडिया आदी उपस्थित होते. नैताळे येथे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष राजेंद्र बोरगुडे यांच्या नेतृत्वाखाली अर्धा तास रास्ता रोको करण्यात आला. यावेळी अण्णा बोरगुडे, उपसरपंच अरविंद बोरगुडे, महेश बोरगुडे, दिलीप घायाळ, दादा बोरगुडे उपस्थित होते. पिंपळस रामाचे येथेही नाशिक-औरंगाबाद महामार्ग, ओझरजवळ दहावा मैल या मुंबई महामार्गावरही रास्ता रोको करण्यात आला.

कळवणला निवेदन

कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने कळवणमध्ये शांतता अबाधित राहावी म्हणून तहसीलदार कैलास चावडे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत मराठा समाजाच्यावतीने निवेदन देण्यात आले. पीडित मुलीला १० लाखांची शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात आली. या प्रसंगी प्रदीप पगार, सुधाकर पगार, निंबा पगार, मोतीराम पगार, ललित आहेर, प्रकाश आहेर, कौतीक पगार, सुभाष शिरोडे, जितेंद्र पगार, शशिकांत पाटील, टिनू पगार, अतुल पगार आदी उपस्थित होते.

दिंडोरीत कारवाईची मागणी

जानोरी दहावा मैल मुंबई-आग्रा महामार्गावर ओझर, जानोरी व जऊळके दिंडोरी येथील संतप्त नागरिकांनी अर्धा तास रास्ता रोको करून निषेध नोंदवला. या प्रसंगी निफाडचे तहसीलदार भामरे व ओझरचे पोलिस निरीक्षक यांना निवेदन देऊन संशयित आरोपीला कठोर शासन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.

चांदवडमध्ये वाहतूक ठप्प

चांदवडमध्ये तीव्र पडसाद उमटले असून, या घटनेच्या निषेधार्थ तसेच संशयितावर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी रविवारी मराठा समाज बांधवानी एकत्रित येऊन चांदवड चौफुलीवर अर्धा तास रास्ता रोको आंदोलन केले. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलिस प्रशासनाची धावपळ उडाली. नाशिक-मालेगावकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. माजी आमदार शिरीष कोतवाल, बाजार समिती सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, उपसभापती नितीन आहेर, अनिल काळे, डॉ. गवांदे, संजय जाधव, दत्तात्रय गांगुर्डे, बाळासाहेब जाधव, रमाकांत जामदार आदी उपस्थित होते.

सिन्नरला आंदोलन

अत्याचार घटनेच्या सिन्नर येथे प्रतिक्रिया उमटल्या असून, मराठा क्रांती मोर्च्याच्या समितीच्या वतीने नाशिक-पुणे महामार्गावरील आडवा फाट्यावर रास्ता रोको करण्यात आला. संध्याकाळी साडेसहा वाजता मराठा क्रांती मोर्चाच्या समितीच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. या प्रकरणी अत्याचार करणाऱ्या नराधमावर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. या प्रसंगी पोलिस निरीक्षक राजेश शिंगटे यांना निवेदन देण्यात आले. रास्ता रोको केल्यामुळे नाशिक पुणे महार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गैरहजर विद्यार्थ्यांचा ताप

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करून घेण्यासाठी राज्यभरात मोठी मोहीम राबविली जात असली, तरी दुसरीकडे सतत गैरहजर विद्यार्थ्यांची समस्या मुख्याध्यापकांसमोर उभी राहिली आहे. एकाच विद्यार्थ्याचे दुसऱ्या शाळेतही नाव असणे, कुटुंबाच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे काम करावे लागणे, अशा अनेक गोष्टींमुळे विद्यार्थी शाळेत गैरहजर राहत असून, त्यांना शाळेत टिकवून ठेवणे आव्हानात्मक बनले आहे.

सतत गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे मुख्याध्यापकांना पटसंख्येची मांडणी करण्यात, शालेय पोषण आहाराचा ताळेबंद जुळवण्यास नेहमीच कसरत करावी लागते. त्यामुळे गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे गैरहजेरीचे नेमके कारण काय, हे शोधण्याचे आव्हान शिक्षकांसमोर उभे राहिले आहे. याबाबत पेठरोडवरील उन्नती प्राथमिक विद्यामंदिर शाळेने सर्वेक्षणही केले आहे. या शाळेतही सतत गैरहजर विद्यार्थ्यांची समस्या सातत्याने समोर आल्याने शाळेचे मुख्याध्यापक नंदलाल धांडे यांनी पंचवटी परिसरातील २२ शाळांमध्ये सर्वेक्षण केले. यामध्ये एक विद्यार्थी दोन शाळांच्या पटसंख्येवर असल्याचा प्रकार आढळून आला. त्यामुळे दोनपैकी एका शाळेत संबंधित विद्यार्थी सतत गैरहजरांच्या यादीत आला. हे चित्र स्पष्ट दिसत असूनही शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदींनुसार अशा विद्यार्थ्यांबाबत कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याने कोंडी होत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे, तसेच सतत गैरहजर राहूनही या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात ढकलावे लागत असल्याने शैक्षणिक गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.



प्रबोधनाचे आव्हान

सतत गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थी व पालकांमध्ये प्रबोधन करण्याचे मोठे आव्हान शाळांपुढे उभे राहिले आहे. आर्थिक कारणांमुळे अनेक विद्यार्थी शाळेत येत नाहीत. कुटुंबाला आधार मिळावा म्हणून पालकच शाळांमध्ये न जाण्याचा सल्ला देत असल्याचे शाळाबाह्य सर्वेक्षणातही दिसून आले आहे. पालकांमध्ये प्रबोधन करूनदेखील अशा समस्या ओढावत असल्याने शाळांसमोर आव्हान उभे राहिले आहे.

---

महापालिका शाळांमध्ये सतत गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. खासगी शाळांमध्ये हे प्रमाण असू शकते. विद्यार्थी का गैरहजर राहत आहेत, याची कारणे शोधून त्यांच्या पालकांच्या संपर्कात राहणे आवश्यक आहे.

-नितीन उपासनी, प्रशासनाधिकारी, शिक्षण समिती

---

काही शाळा विद्यार्थीसंख्येचा फुगवटा दाखविण्यासाठी विद्यार्थ्यांची नावे आपल्या पटसंख्येत समाविष्ट करीत आहेत. पट टिकविण्यासाठी चाललेल्या स्पर्धेमुळे हे चित्र असल्याचे निदर्शनास आले. काही विद्यार्थी सातत्याने गैरहजर राहूनही त्याविरोधात आम्हाला शिक्षण हक्क कायद्यातील नियमांमुळे काहीही कारवाई करता येत नाही.

- नंदलाल धांडे, मुख्याध्यापक, उन्नती प्राथमिक विद्यामंदिर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी नगरसेवकाचा संशयास्पद मृत्यू

$
0
0

मालेगाव : माजी नगरसेवक शकील हमद हाजी अब्दूल रऊफ उर्फ मगा मेम्बर (वय ५०) यांचा रविवारी संशयास्पद मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह सकाळी महामार्गावरील चंदनपुरी शिवारातील शालिमार हॉटेलजवळील अरशबा बाबा दर्ग्याजवळ संशयास्पदरित्या आढळून आल्याने खळबळ उडाली. या घटनेची माहिती चंदनपुरी येथील भरत बापू अहिरे यांनी पोलिसांना दिली.

शकील हमद हाजी अब्दूल हे शनिवार सायंकाळपासूनच बेपत्ता असल्याने कुटुंबीय त्यांचा शोध घेत होते. मृतदेह मिळून आल्याचे कळताच कुटुंबीय व नागरिकांनी सामान्य रुग्णालयात गर्दी केली होती. किल्ला व आझादनगर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसह पोलिस उपअधीक्षक गजानन राजमाने, अजित हगवणे यांनीही घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, मगा मेम्बर यांच्या कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी किल्ला पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृताच्या कुटुंबीयांनी सामान्य रुग्णालयाबाहेर आंदोलन करीत आरोपीस त्वरित अटक करण्याची मागणी केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नातं अन् सुखाची सरमिसळ...

$
0
0

नातं अन् सुखाची सरमिसळ...

---

धनश्री क्षीरसागर

---

साधारण तिसरीत वगैरे असेन मी, गल्लीत खेळत असताना वाड्याच्या दारात एक रिक्षा येऊन थांबली अन् आमच्याच वाड्यात राहणारे जोशी काका रिक्षातून उतरले आणि मग रिक्षातून बाहेर आला तो जोशींचा ब्रँड न्यू टीव्ही. मग खेळ वगैरे सगळ बाजूला ठेवून आम्ही सगळे जोशी काकांच्या मागे. मोठ्या थाटात आम्ही जोशी काकांचा टीव्ही त्यांचा घरी पोहोचवला. शेवटी वाड्यात आलेला पहिला टीव्ही होता तो. काकांचा चेहेरा साधारण एखादा राजा लढाई जिंकून आल्यावर कसा दिसत असेल तसा दिसत होता. जोशी काकू आधीच वाड्यातल्या सगळ्या मैत्रिणी गोळा करून दारात वाट बघत बसल्या होत्या. मग टीव्हीची स्थापना करण्यात आली, त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढण्यात आले, सगळ्या मोठ्या मंडळींनी मिळून भरपूर कोडकौतुक करून झालं त्या टीव्हीचं. आरती तेवढी बाकी ठेवली होती. काकूंचा तर आनंद गगनात मावत नव्हता आणि का नसावा, दोन वर्षे मागे लागल्यावर काकूंसाठी काकांनी घरात आणलेली पहिली वस्तू होती म्हणे ती.

हे सगळ आठवलं कारण, परवा शूटिंग करत होते, माझ्या सीनला थोडा उशीर होता म्हणून मेकअप रूम मध्ये बसले असताना एक मुलगी आत आली. तरुण, सुंदर, कॉन्फिडन्ट पण जरा अस्वस्थ. ओळख झाली, मग गप्पा सुरू झाल्या. तिचा फोन सारखा वाजत होता. पण, ती तो कट करत होती. न राहून मी म्हटलं, अगं घे की तो फोन, बोल कोण आहे त्याचाशी. तर म्हणाली, नाही गं दीदी मला नाही बोलायचं त्याच्याशी. प्रेमप्रकरण होतं हे वेगळ सांगायची गरज नव्हती. मग काही वेळाने तीच सांगायला लागली, अगं भांडण झालंय माझं ‘बीएफ’शी. मी एक गिफ्ट मागितलं होतं त्याचाकडे, पण नाही दिलं त्याने. आम्ही जरा हसलोच तिला आणि मग प्रत्येक जण आपापल्या परीने सल्ले देत समाजावत होता. मग मी तरी कशाला मागे राहू, मीही म्हटलं, अगं होतात भांडणं म्हणून इतकं थोडंच रूसायचं असतं. आता नाही दिलं, तर नंतर देईल गिफ्ट. इतकं मनाला नाही लावून घ्यायचं आणि अजून तर काहीच नाही, लग्नानंतर काय कराल तुम्ही? तेव्हा तर खूप जबाबदाऱ्या असतात, खूप तडजोडी असतात, तेव्हाही असेच भांडणार की काय तुम्ही, असं म्हणून आम्ही हसलो. त्यावर तिचं उत्तर, हो गं दीदी तोच विचार करतेय मी, जो मुलगा मला १५०० ची लिपस्टिक नाही घेऊन देऊ शकत तो काय मला आयुष्यभर सांभाळणार. नको बाई आताच ब्रेकअप करते!!! मेकअप रूम शांत. काही वेळ आम्ही सगळ्या जणी फक्त एकमेकींकडे बघत होतो.

नाही नाही मला तुलना अजिबात करायची नाहीये. पिढी बदलली त्याप्रमाणे त्यांच्या गरजा, त्यांच्या आवडी नक्कीच बदलणार यात काहीच गैर नाही आणि अपग्रेड होत राहणं चांगलंच असत. पण, अपग्रेड झालेल्या भावना बघायला मिळाल्या. कुठंतरी ऐकलं होत समज व्यक्तीला घडवते आणि व्यक्ती समज घडवते म्हणे. म्हणून प्रश्न पडला, जोशी काकू पण अस म्हणू शकत होत्या खरंतर, पण त्यांना म्हणावसं नाही वाटलं. म्हणजे त्यांना आनंद महत्त्वाचा नव्हता असं नाही, पण त्यांना त्यापेक्षा महत्त्वाचं वाटलं ते त्यांचं नातं आणि आपल्या पार्टनरवरचा विश्वास. अर्थात, काकूंच्या त्या भावनेला हल्ली ओर्थोडॉक्स असं म्हटलं जातं. पण, आम्ही

करणार तरी काय, जग बदललंय, स्पर्धा वाढलीय, आम्हाला टिकून राहायचंय, खूप काम करायचंय, स्टेटस मेंटेन ठेवायचंय, मग थोड्या सोयी गरजेच्या आहेतच आणि त्यासाठी आपल्या गरजा ओळखून आधीच काही निर्णय घेतले तर हरकत काय?

इकोनॉमिक्सचा अभ्यास करताना शिकले होते, माणसाच्या गरजा तीन प्रकारच्या असतात. एक जीवनावश्यक म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा. दुसऱ्या सुखकारक म्हणजे आपली कामं सोपी करणाऱ्या आणि तिसऱ्या असतात चैनीच्या म्हणजे हेच १५०० ची लिपस्टिक. पण, या प्रसंगानंतर या तीन प्रकारांची आपण भेळ करतोय की काय असं वाटलं. केवळ प्रलोभनांना बळी पडून निव्वळ चैनीच्या वस्तूंना आम्ही जीवनावश्यक तर बनवत नाही ना? म्हणजे होतं काय बघाना, या मोठमोठ्या कंपन्या आम्ही तुम्हाला अपग्रेड करतोय या नावाखाली फक्त त्यांचं सामान आम्हाला विकत असतात. म्हणजे ज्याला आम्ही आमची लाइफस्टाइल म्हणतो ती खरंतर असते कुठल्या तरी कंपनीची मार्केटिंग पॉलिसी आणि आमची अवस्था अशी असते की ते घ्याव तर कंपनी आम्हाला वेड्यात काढतेय आणि नाही घेतलं तर लोक आम्हाला मागासलेले म्हणतात. घरातल्या माळ्यावर पडलेला व्हॅक्युम क्लीनर किवा गॅलरीत पडलेल्या ट्रेडमिल (ज्यावर आम्ही हल्ली कपडे वाळत घालतो.) ते पाहिल्यावर याची जाणीव होते आम्हाला. हे म्हणजे असं झालं, की काही मॅगझिन, जाहिराती, टीव्ही चॅनलने आम्हाला लाइफस्टाइल या शब्दाशी ओळख करून दिली. मग आमच्या स्वयंपाक घराचं किचन झालं, मग त्या किचनचं मॉड्युलर किचन झालं. पण, फायनली आमचा त्या सर्व सोयींयुक्त मॉड्युलर किचनवर राज्य कोणाचं असतं, तर स्वयंपाकवाल्या मावशींचं! असो, या सगळ्या गोष्टी आवश्यक असल्या, तरी नात्यांची किंमत मोजून तर आम्ही त्या मिळवत नाही आहोत ना, याचा विचार करणं गरजेचं झालंय. अर्थात, आपलं सुख कशात आहे हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहेच.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलात्काराच्या घटनेचे जिल्हाभरात तीव्र पडसाद

$
0
0

टीम मटा

तळेगाव अंजनेरी येथे शनिवारी दुपारी पाच वर्षीय चिमुरडीवर घडलेल्या बलात्काराच्या घटनेचे नाशिक जिल्हाभरात तीव्र पडसाद उमटले. नाशिकसह विल्होळी परिसरात शनिवारी मध्यरात्रीपासूनच अनेक ठिकाणी जाळपोळ, रास्ता रोको आंदोलनाने रविवारीही तणावाचे वातावरण होते. मुंबई- आग्रा महामार्ग, विल्होळी परिसर आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहनांची जाळपोळ झाली. या घटनेचे तीव्र पडसाद नाशिक शहरात उमटल्याने नाशिककरांमध्ये दहशतीचे वातावरण होते.

त्र्यंबकेश्वरमध्ये तणाव

त्र्यंबकेश्वर ः तळेगाव अंजनेरी (ता. त्र्यंबकेश्वर) येथे घटनेनंतर त्र्यंबक पोलिस ठाण्यात हजारोंचा जमाव जमला होता. याबाबत पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून त्र्यंबकेश्वर पोलिस स्टेशनला गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील संशयितास तत्काळ ताब्यात घेण्यात आले असून, पोलिस पथक तपास करीत आहेत.

पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केला. संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून, पीडित मुलीस, तसेच संशयिताला जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी रवाना केले. दरम्यान, या बालिकेवर अतिप्रसंग झाला नसून, अतिप्रसंगाचा प्रयत्न करण्यात आल्याचे विधान पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केल्याने रविवारी आंदोलकांनी त्यांचा तीव्र निषेध केला. त्यानंतर या प्रकरणाचे पडसाद परिसरात तीव्रतेने उमटले.

तळेगाव परिसरात बंद

या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर तळेगावसह परिसरातील सर्व गावांत दैनंदिन व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. नवरात्रोत्सवाच्या अंतिम टप्प्यातच ही घटना घडल्याने या उत्सवावरही त्याचा परिणाम जाणवला.

अशी आहे तळेगावची घटना

त्र्यंबकेश्वरजवळील तळेगावात शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडल्याचे पीडित मुलीच्या आईने त्र्यंबकेश्वर पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे. याच गावातील एका १६ वर्षीय संशयितावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. फिर्यादीत म्हटल्यानुसार, संशयिताने फिर्यादीच्या मोठ्या मुलीस पेप्सी देतो, असे आमिष दाखवून बाजूला पाठवून दिले. त्यानंतर तिच्या पाच वर्षीय लहान बहिणीला तो गावातील मारुती मंदिरामागील पडक्या खोलीत घेऊन गेला. तेथे तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आला. रात्री दहाच्या सुमारास पोलिसांनी संशयितावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या घटनेची वाच्यता होताच गावात आणि तालुक्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. पोलिस अधीक्षक अंकुश शिंदे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत मोहिते, उपअधीक्षक वळवी यांच्यासह पोलिस निरीक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन संतप्त जमावाला शांतता राखण्याचे आवाहन केले.


ती मुलगी सुखरूप

पीडित मुलीचा मृत्यू झाल्याच्या अफवा सोशल मीडियावरून पसरविल्या जात आहेत. ही मुलगी सुखरूप असून, तिची तब्येत व्यवस्थित आहे. नागरिकांनी या घटनेशी संबंधित कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी पोलिसांना सहकार्य करावे.

- किशोर नवले, पोलिस निरीक्षक ग्रामीण गुन्हे शाखा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आरोपपत्र तातडीने दाखल करू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तळेगाव येथील बालिकेवरील अतिप्रसंगाच्या प्रयत्नाची घटना घृणास्पद असून, या प्रकरणी तातडीने कारवाईच्या सूचना पोलिस आणि प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. या प्रकरणी आरोपपत्र (चार्जशीट) तातडीने दाखल केले जाईल. आंदोलकांनी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी केले.

महाजन यांनी पीडित मुलगी तिच्या आईवडिलांची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भेट घेऊन विचारपूस केली. या गुन्ह्यात न्याय देण्यासाठी तातडीने आरोपपत्र दाखल करण्यात येईल, तसेच विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची या प्रकरणात नेमणूक केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील तळेगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या संतप्त नागरिकांची महाजन यांनी भेट घेतली. त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. या वेळी आमदार सीमा हिरे, विशेष पोलिस महानिरीक्षक विनय चौबे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा पोलिस अधीक्षक अंकुश शिंदे, तहसीलदार राजश्री अहिरराव उपस्थित होते.

ही घटना संतापजनक असून, या प्रकरणातील संशयिताला अटक करण्यात आली आहे. त्याला कायद्यानुसार कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करू. मुलीची शारीरिक तपासणी स्त्री रोगतज्ज्ञामार्फत करण्यात आली आहे. तिच्यावर अतिप्रसंग झाला नसून, अतिप्रसंगाचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रकरणाचे चार्जशीट महिन्याच्या आत दाखल करून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविले जाईल.

- गिरीश महाजन, पालकमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक पेटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव (अंजनेरी) येथे पाच वर्षाच्या बालिकेवर १६ वर्षाच्या मुलाने शनिवारी लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेचे पडसाद रविवारी जिल्ह्याभरात उमटले. घटनेचा निषेध करणाऱ्या संतप्त आंदोलनकर्त्यांनी ठिकठिकाणी सात बस, चार पोलिसांची वाहने तसेच दोन कार आणि दोन दुचाकी पेटवून दिल्या. याशिवाय अनेक वाहनांच्या काचा फोडण्याचा प्रकार संध्याकाळपर्यंत सुरू होते. पोलिसांनी जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज, हवेत गोळीबार व अश्रूधूराच्या कांड्या फोडल्या. मात्र महामार्ग तसेच शहर बंद केले गेल्याने नाशिककरांना दिवसभर दहशतीच्या छायेत राहावे लागले. आंदोलनामुळे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले आहे.

तळेगाव येथील पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना शनिवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. यानंतर, व्हॉटस अॅपवरून वेगवेगळे मॅसेजेस व्हायरल झाले. आंदोलनकर्त्यापुढे पोलिसांची संख्या नगण्य असल्याने शनिवारी रात्रीपासून रास्ता रोकोला सुरूवात झाली. तळेगाव येथे आंदोलक आक्रमक झाल्याने पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून बळाचा वापर करावा लागला. दरम्यान, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्यामुळे आंदोलन अधिक पेटले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक: अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई होणार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक

पीडित बालिकेच्या प्रकरणात पोलिसांनी योग्य ती कायदेशीर कारवाई केली आहे. मात्र तरीही सोशल मीडिया व अन्य माध्यमातून अफवा पसरवण्याचे प्रयत्न होत असतील तर अशा व्यक्तींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे नाशिकचे पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल यांनी स्पष्ट केले आहे.

पोलीस आयुक्तांनी एका निवेदनाद्वारो लोकांना आवाहन केले आहे. त्यात नमूद करण्यात आले आहे की, तळेगाव अंजनेरी येथे शनिवारी अल्पवयीन बालिकेच्या संदर्भात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने कारवाई करीत अल्पवयीन संशयितास ताब्यात घेतले. पीडित बालिकेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून तिच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. या घटनेच्या अनुषंगाने शहर पोलिसांच्या कार्यक्षेत्रात सोशल मीडिया तसेच इतर माध्यमातून अफवा पसरवण्याचे प्रयत्न होत असून त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न होत आहे. पीडित बालिकेच्या प्रकरणात पोलिसांनी योग्य ती कायदेशीर कारवाई केली आहे. मात्र तरीही अफवा पसरवण्याचे प्रयत्न होत असून अशा व्यक्तींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. ज्यांना तपास अथवा घटनेबाबत शंका असेल त्यांनी पोलीस उपायुक्त (परिमंडळ एक आणि दोन) यांच्याशी अथवा पोलीस आयुक्त कार्यालयात संपर्क करावा, असे आवाहन पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तळेगावच्या घटनेचे धुळ्यात पडसाद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

तळेगाव-त्र्यंबकेश्वर (जि.नाशिक) येथील बालिकेवरील अत्याचाराची घटना आणि त्या संदर्भात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या बेताल विधानाचे पडसाद सोमवारी धुळे शहरात उमटले. मराठा क्रांती मोर्चा आयोजकांनी एकत्र येत या घटनेचा निषेध करत गिरीश महाजन यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. तसेच बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा तत्काळ झाली पाहिजे या मागणीसाठी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना निवेदन देण्यात आले.

पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या बेताल विधानामुळे सकल मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. नाशिक शहरातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती हाताबाहेर गेल्याने आरोपींना बळ मिळत आहे. आरोपीला मदत करणारा हा देखील आरोपीच असतो. त्यामुळे या घटनेत पालकमंत्री अशी विधाने करत आहेत. त्यांना देखील आरोपी करण्यात यावे, अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात आली आहे. प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तळेगाव-त्र्यंबकेश्वर घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा तत्काळ झाली पाहिजे, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा. अन्यथा सकल मराठा समाजातर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीला दोन कोटींचा फटका

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव (अंजनेरी) येथे झालेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेचे रविवारी तीव्र पडसाद उमटले. यामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाचे सुमारे दोन कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.

अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराचे शनिवारपासून तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. संतप्त जमावाच्या रोषाचा सामना एसटी महामंडळालाही करावा लागला. जिल्हाभरात रविवारी (दि. ९) महामंडळाच्या आठ बसेस जाळण्यात आल्या. त्यापैकी सात बसेस पूर्णत: जळाल्या आहेत तर एक बस अर्धवट जळाल्याची माहिती महामंडळातील सूत्रांनी दिली आहे. एका बसची किंमत किमान १७ लाख रुपये याप्रमाणे या आठही बसेसचे एक कोटी ३६ लाख रुपये नुकसान झाले असावे, असा महामंडळाचा प्राथमिक अंदाज आहे. यापैकी बहुतांश नुकसान विल्होळी ते घोटी मार्गावर करण्यात आले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी बसेसवर दगडफेक करण्यात आली. त्यामध्ये १८ एसटी बसेसचे मोठे नुकसान झाले आहे. त्यापैकी १२ बसेस नाशिक शहरात फोडण्यात आल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर रविवारी दुपारपासून एसटी बसेसद्वारे होणारी वाहतूक पूर्णत: बंद आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील दांडिया बंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

तळेगाव (अंजनेरी) येथील बालिका अत्याचार घटनेच्या निषेधार्थ शहरातील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांच्या वतीने सोमवारीदेखील सायंकाळी गरबा-दांडिया रास नृत्याचे कार्यक्रम बंद ठेवण्यात आले. त्यामुळे शहरात दररोजचा डीजे, लाऊड स्पिकर्सचा दणदणाट ऐकू आला नाही.

शहरातील अनेक सार्वजनिक नवरात्री मंडळांनी रविवारीदेखील दांडिया रद्द केले होते. त्याची पुनरावृत्ती सोमवारी शहरात सर्वत्र दिसून आली. रस्त्यांवर देवी भक्तांची गर्दीही आढळून आली नाही. समाजात अशा अत्याचाराच्या घटनांच्या विरोधात कायदेशीर मार्गाने लढण्यासाठी जात विसरून सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.


पाथर्डी परिसरात तणावपूर्ण स्थिती

सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमाराला पाथर्डी फाटा परिसरात एका मोटारसायकल स्वारावर जमावाने हल्ला करून त्याला जखमी केले. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला झेंडूची फुले घेऊन घरी परतणाऱ्या मोटारसायकलस्वारास जमावाने लक्ष्य केले. त्याची गाडी अडवत त्याच्या डोक्यावर जड वस्तूचा प्रहार केला. या जखमीला उपचारांसाठी सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले. यामुळे संतप्त झालेल्या दुसरा जमाव रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांची कुमक येऊन धडकल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. दरम्यान, या परिसरात दुपारी दोन वाहनेही जाळण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...अन् झेंडूची फुले कोमेजली!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

संपन्नता आणि सामाजिक एकतेचे प्रतीक असलेली झेंडूची फुले कोमेजली होती. चार महिने तळहातासारखी जपून वाढवलेली झेंडूची फुले दसऱ्याला मातीमोल भावाने विकावी लागली. त्यातच रास्ता रोको, दगडफेक, तणाव यामुळे अपेक्षित भावही मिळाला नाही. त्यामुळे यंदा झेंडू घेऊन पस्तावलो, अशी प्रतिक्रिया शेतकरी आणि विक्रेत्यांनी व्यक्त केली.

तळेगाव अंजनेरी येथील अत्याचार प्रकरणामुळे शहरासह जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता आहे. काही ठिकाणी व्यावसायिकांनी बंद पुकारला आहे. नाशिकरोड पोलिस स्टेशनजवळ सिन्नर, एकलहरा, लहवीत, भगूर, शिंदे, पळसे, ओढा आदी भागातून शेतकरी येतात. जीपमधून आणलेल्या मालाचा येथे जाळीच्या भावाने लिलाव होतो. एका जाळीत ४०० फुले असतात. केसरी झेंडू १७० रुपये जाळीने, तर पिवळा झेंडू २७० रुपये जाळी या भावाने विकण्यात येत होती.

आंदोलन व दगडफेकीच्या भीतीने अनेक शेतकरी यंदा आलेच नाहीत. तसेच किरकोळ विक्रेत्यांची संख्याही कमी होती. नाशिकरोड, जेलरोडवर नेहमी झेंडू विक्रेत्यंची गर्दी असते. झेंडूच्या राशी असतात. झेंडूचा मळा अवतरल्याचा भास होतो. यंदा मात्र, हे चित्र दिसले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पीडितेच्या कुटुंबाला मनोधैर्यंतर्गत मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तळेगाव (अंजनेरी) येथील पीडित मुलीच्या देखभाल व पुनर्वसनासनाठी सामाजिक न्याय विभागाने सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत संबंधित कुटुंबाला मनोधैर्य योजनेंतर्गत आर्थिक मदत करून धीर दिला.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव-अंजनेरी गावात एका बालिकेवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली. त्याचे तीव्र पडसाद नाशिक जिल्ह्यात उमटले. या घटनेनंतर सोशल मीडियावरून पसरविण्यात येणाऱ्या अफवा रोखता याव्यात, यासाठी जिल्हाभरातील मोबाइलवरील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. परिस्थितीचा अंदाज घेऊन दोन दिवस ही सेवा बंद ठेवण्याचे विचाराधीन असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली.

तळेगाव परिसरात सोमवारी कडेकोट पोलिस बंदोबस्त होता. याखेरीज पीडित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत मिळवून देता यावी, यासाठी देखील प्रशासन सरसावले. बलात्कार व तत्सम घटनांमधील पीडितेला राज्य सरकारच्या मनोधैर्य योजनेंतर्गत आर्थिक मदत देण्यात येते. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय व महिला बाल विकास विभागाच्या आधिकाऱ्यांनी तातडीने ही मदत मिळवून दिली. त्यापैकी ७५ टक्के रक्कम ठेव स्वरुपात, तर २५ टक्के रक्कम हातखर्चासाठी धनादेश स्वरुपात देण्यात आल्याची माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली.

दरम्यान, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी रविवारी उमटलेल्या पडसादांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दुपारी जिल्हाभरातील परिस्थितीचा आढावा घेतला. चांदवड, येवला, सिन्नर, वाडीवऱ्हे, नांदगाव अशा विविध ठिकाणी शांततेच्या मार्गाने या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अनेक भागात आजही त्या घटनेचा निषेध व्यक्त झाला. मात्र तो शांततामय मार्गाने करण्यात आला. नागरिकांनी संयम राखून सहकार्य करावे. जिल्हाभरातील स्थिती हळूहळू पूवर्पदावर येत आहे.

- राधाकृष्णन बी, जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर संरक्षणासाठी सज्ज

$
0
0

शांतता कमिटीत पोलिस आयुक्तांचे आश्वासन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तळेगाव येथे घडलेली घटना दुर्दैवी असून, त्याचे पडसाद उमटून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. जातीय सलोखा कायम ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. पोलिस कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिस अर्लट असून, नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, अशी अपेक्षा पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी व्यक्त केली.

गंगापूर रोडवरील पोलिस आयुक्तालयात सोमवारी सकाळी पोलिस आयुक्त सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तळेगाव (अंजनेरी) येथील घटनेनंतर सुरू झालेल्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन केले होते. सदर घटना दुर्दैवी असून, त्या संदर्भातील सखोल तपास पोलिस करीत आहेत. संशयितास ताब्यातदेखील घेतले आहे. परंतु, त्या घटनेचे पडसाद रविवारी ग्रामीण भागासह नाशिक शहरातही उमटले. मुंबई-आग्रा हायवेवर आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको केला. वाहनांची तोडफोड, दगडफेक केली. यामुळे ग्रामीण भागासह शहरातील वातावरण चिघळले. हिंसक आंदोलनाच्या घटनांची पोलिस चौकशी करीत आहेत. यातील काहींची नावेही निष्पन्न झाली असून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिस आयुक्तांनी दिले. शांतता समितीतील सदस्यांनीही तरूण कार्यकर्त्यांना आवर घालावा. शहराच्या शांततेसाठी समितीच्या सदस्यांनीही पोलिसांना सहकार्य करावे. गुन्हेगारांना जात-धर्म नसतो तसे कारवाई करताना पोलिस जात-धर्म पाहत नाही. शांतता व जातीय सलोखा-एकोपा टिकून राहण्यासाठी शांतता समितीच्या सदस्यांनी प्रयत्नशील रहावे, असे आवाहनही पोलिस आयुक्त सिंघल यांनी केले.

दरम्यान, शहरातील शांतता अबाधित राहण्यासाठी व जातीय सलोखा-एकोपा टिकून राहण्यासाठी राजकीय पक्ष, संघटनांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन महापौर अशोक मुर्तडक यांनी केले. आमदार देवयानी फरांदे यांनी शहरातील अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी आणखी कठोर कारवाई करावी, अशी सूचना केली. शहरात पोलिस सातत्याने हे काम करीत असल्याचे पोलिस आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले. मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी सर्वांना शांततेचे आवाहन करीत तरुणांमध्ये कायद्याबाबत जनजागृती करावी, असे आवाहन केले. बैठकीला आमदार सीमा हिरे, शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते, विलास शिंदे, डी. जी. सूर्यवंशी, शशिकांत जाधव, हरिष भडांगे, शिवाजी चुंभळे, राजेंद्र बागुल, संजय साबळे, कविता कर्डक, शाहू खैरे, विनायक खैरे, माजी मंत्री शोभा बच्छाव, नाना महाले, दत्ता पाटील, पवन क्षीरसागर, माजी महापौर अशोक दिवे, अजिंक्‍य साने आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नंदिनीसाठी विद्यार्थ्यांनी पुढे यावे

$
0
0

अभिनेता चिन्मय उदगीरकर यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, सिडको

नाशिक शहरातून वाहणाऱ्या नंदिनी नदीची दुरवस्था करण्याबरोबरच तिचे नामांतर नासर्डी या नावाने झाल्याने खुपच दुःख होते. चांगली नदी आज एका नाल्यासारखी झाल्याने या नदीला पूर्ववत सुधारण्यासाठी आता विद्यार्थ्यांनीच पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अभिनेता चिन्मय उदगीरकर यांनी केले.

इंदिरानगर येथील डे केअर सेंटर शाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अभिनेत्री गिरिजा जोशी, ऋतुजा बागवे, राधिका देशमुख, सुनीर सबनीस आदींसह राजेश पंडित, नितीन जुईकर आदी उपस्थित होते. शाळेचे सचिव गोपाळ पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

शाळेतील विद्यार्थी तसेच पालकांशी संवाद साधताना उदगीरकर यांनी, कचरा करणे हे चुकीचे आहे. कचरा अस्ताव्यस्त टाकला की, परिसरात दुर्गंधी पसरते व नागरिकांना विविध रोगांना सामोरे जावे लागत असते, असे सांगितले. त्यामुळे मुळातच कचरा होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर नाशिक शहरातून वाहणारी नंदिनी ही नदी खरोखरच नाशिकची शान होती. मात्र आता तिचे रुपांतर एका नाल्यात झाल्याने खूप दुःख होते, अशी त्यांनी व्यक्त केली.

…नाहीतर मोदीकाका रागवतील

पूर्वी या नदीच्या पाण्यावरच परिसरातील शेती होत असल्याचेही उदगीरकर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. त्याचबरोबर बागवे यांनी ‘कचरा करू नका व कचरा करू देऊ नका’ असे आवाहन केले. त्याचबरोबर कोणी कचरा करीत असेल तर त्यांना सांगा, ‘काका, कचरा करू नका नाहीतर मोदीकाका रागवतील’ असे सांगा. या घोष वाक्यामुळे मुलांनीसुद्धा कचरा करणार नाही व करू देणार नाही असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘संतांच्या मार्गदर्शनामुळे आपली संस्कृती टिकून’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, अमृतधाम

निसर्ग सृष्टीचा दाता असून संस्कृतीचा नाही, त्यामुळे संस्कृती ही साधू, संतांच्या मार्गदर्शनामुळे टिकून आहे, असे विचार भाऊ पाटील यांनी व्यक्त केले.

राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांच्या जयंती उत्सवानिमित्त तपोवन येथील आश्रमात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या धार्मिक सोहळ्याचा समारोप मृत्यूंजय यागाच्या पुर्णाहूतीने करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर स्वामी माधवगिरी महाराज, स्वामी रमेशगिरी, स्वामी मधुगिरी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मधुकर चव्हाण आदी उपस्थित होते.

भाऊ पाटील म्हणाले, भारतीय संत परंपरेच्या अशा संस्कृतीचे सर्व बाजूने आक्रमण आणि विरोध होऊनही संकृतीत जे चैतन्य टिकून आहे. ते संताच्या माध्यमातूनच आहे. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांच्या आध्यात्मिक मार्गाने सर्वांनी प्रवास केल्यास जीवन यशस्वी होते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी मृत्युंजय यागाची पूर्णाहुती, सत्संग प्रवचन आणि महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला. कार्यक्रमास सर्व साधू, संत, विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी अणि पंचक्रोशीतील जय जनार्दन परिवाराचे सदस्य उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा परिषदेसाठी भाजपने कसली कंबर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र व राज्यात सरकार असल्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत यश मिळवण्यासाठी भारतीय जनता पार्टीने जोरदार तयारी केली आहे. या निवडणुका जिंकायच्याच अशा निर्धाराने आम्ही ग्रामीण भागात लक्ष केंद्रीत केल्यामुळे आता सर्वत्र सकारात्मक चित्र आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव यांनी दिली.

जिल्ह्यात ग्रामीण भागात भाजपची ताकद नव्हती पण आता परिस्थिती बदलली आहे. आम्ही सर्व १५ तालुके पिंजून काढले व संघटनात्मक कामावर भर दिला. त्यामुळे आता जिल्ह्यात १५ हजार कार्यकर्त्यांचे फौज तयार झाली आहे. गेल्या निवडणुकीत जिल्हा परिषद गटामध्ये फक्त तीन सदस्य होते. आता त्यात मोठी वाढ होणार असून संपूर्ण जिल्ह्यात चित्र आहे. गेल्या सात-आठ महिन्यात आम्ही प्रत्येक गावात गेलो व तेथे केंद्र व राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचवायचे काम केले. जिल्हा परिषदेच्या ७३ गटात आम्ही ३७५० बूथ तयार केले असून, त्यासाठी कार्यकर्त्यांची नेमणूक केली आहे.

नगरपालिकेवरही लक्ष

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकींबरोबरच सहा नगरपालिकेतही आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. या निवडणुका स्वबळावर लढवण्याचे नियोजन केले आहे. नगर परिषदेमध्ये सुद्धा या निवडणुकीत घवघवीत यश मिळेल असे संकेतही जाधव यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images