Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

आरक्षणातही सुखद धक्का

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राजकीय पक्षांसह नाशिककरांना उत्सुकता असलेली महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत शुक्रवारी जाहीर झाली. यामुळे राजकीय वर्तुळात ‘कही खुशी कही गम’चे वातावरण निर्माण झाले. शहरातील ३१ प्रभागांमधील १२२ पैकी ६१ जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. प्रत्येक प्रभागातून दोन महिलांना संधी मिळणार आहे. अनुसूचित जातीसाठी १८, अनुसूचित जमातीसाठी ९, विशेष मागास प्रवर्गासाठी ३३ जागा राखीव झाल्या. यातही महिलांना समान आरक्षण देण्यात आले आहेत. तीन प्रभाग वगळता अन्य २९ प्रभागांमध्ये सर्वसाधारण उमेदवारांसाठी जागा खुल्या आहेत.

महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी अकरा वाजता महाकवी कालिदास कलामंदिरात आरक्षण सोडतीला सुरुवात झाली. प्रभागरचनेचे नागरिकांच्या सोयीसाठी प्रभागांचे नकाशे अगोदरच बाहेर लावले होते. त्यामुळे पदाधिकारी व नागरिकांनी अगोदरच आपल्या प्रभागाचे नकाशे बघूनच सोडतीच्या ठिकाणी प्रवेश केला. प्रशासनाने सोडतीचे योग्य नियोजन केल्याने किरकोळ आक्षेप वगळता आरक्षण सोडत निर्विघ्नपणे पार पडली. सुरुवातीला अनुसूचित जातीसाठी असलेल्या १८ जागांचे सोडत जाहीर काढण्यात आली. प्रभागांमधील अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या आधारावर पुरुषांसाठी नऊ तर महिलांसाठी नऊ जागांची सोडत काढण्यात आली. त्यानंतर अनुसूचित जमातीच्या नऊ जागांपैकी सहा महिलांसाठी तर तीन पुरूषांसाठी राखीव झाल्या आहे.

विशेष मागास प्रवर्गातील ३३ जागांसाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागली. ३१ प्रभागांमध्ये प्रत्येकी एक जागा ओबीसीसाठी आरक्षित केल्यानंतर उर्वरित दोन जागांसाठी चिठ्ठ्या काढण्यात आल्या. यात प्रभाग क्रमांक १५ व १९ मध्ये दोन जागा अतिरिक्त ओबीसीसाठी आरक्षित करण्यात आल्या. त्यासाठी विना आरक्षित प्रभागांमधून या जागा राखीव करण्यात आल्याने दोन प्रभागांमध्ये ओबीसीच्या दोन-दोन जागा राखीव झाल्या आहेत. सर्वात शेवटी सर्वसाधारण गटातील महिलांसाठी आरक्षण काढण्यात आले. त्यात ६२ जागांमधून सर्वसाधारण महिलांसाठी ३० जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत.

इच्छुकांची भाऊगर्दी वाढणार
आरक्षण सोडतीने जवळपास २९ प्रभाग सर्वसाधारण गटांसाठी खुले असणार आहे. त्यामुळे या जागांमध्ये स्पर्धकांसह इच्छुकांची मोठी भाऊगर्दी वाढणार आहे. आरक्षणामुळे प्रभागांमधून बाद झालेले विद्यमान नगरसेवक सर्वसाधारण गटातून निवडणूक लढवू शकतात. त्यामुळे सर्वसाधारण जागांमध्ये चुरशीच्या लढती रंगणार असून राजकीय पक्षांसह अपक्षांचीही संख्या अधिक असणार आहे. त्यामुळे निवडणूक चुरशीची होणार असून प्रशासनालाही ती पार पाडण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.


लोंढेच प्रभागातून ‘हद्दपार’
आरक्षणाचा सर्वाधिक फटका महापालिकेत सतत चारवेळा निवडून आलेले भारतीय रिपब्लिकन पक्षाचे (आठवले) जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांना बसला आहे. त्यांचा प्रभाग क्रमांक ११ अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षित झाला आहे. तर सर्वसाधारण गटातील जागाही महिलांसाठी राखीव झाली आहे. उर्वरित एक जागा अनुसूचित जाती तर दुसरी ओबीसीसाठी राखीव आहे. त्यामुळे प्रभागातून लोंढे हद्दपार झाले आहेत. त्यांना प्रभागातून कुटुंबातील महिलेला संधी द्यावी लागणार आहे. तसेच स्वत:साठी अन्य प्रभागातून चाचपणी करावी लागणार आहे.

वसंत गितेंवरून संभ्रम
महापालिकेत भाजपचे नेते वसंत गिते यांच्या प्रभागातील आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. काठेगल्ली व भाभानगर परिसर नव्या रचनेत एकत्र झाला आहे. त्यातच प्रभाग क्रमांक १५ हा तीन सदस्यीय आहे. त्यामुळे या प्रभागातील आरक्षण सोडतीत तीनही जागा महिलांसाठी राखीव झाल्याचा संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे गितेंचा पत्ता कट झाल्याची अफवा शहरात पसरली. मात्र, आयुक्तांनी प्रभाग १५ मधील दोनच जागा महिलांसाठी राखीव असल्याचे व एक जागा सर्वसाधारण असल्याचे स्पष्टीकरण दिल्याने अफवांचा बाजार थंडावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कालिदासमध्ये रंगला आरक्षण प्रयोग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एरवी मनोरंजक नाटके अन् त्यामधील दिग्गज कलावंतांच्या अभिनयाने रसिकांना रिझविणाऱ्या कालिदास कलामंदिरचा परिसर शुक्रवारी उत्साह, उत्सुकता अन् ‘कही खुशी कही गम’च्या माहोलाने रंगून गेला. कलावंतांचे संवाद गुंजणाऱ्या या नाट्यमंदिरात महापालिका निवडणुकीसाठीच्या आरक्षण सोडतीचे नाट्य रंगले. मनासारखे आरक्षण मिळालेल्यांनी मनापासून दाद दिली तर हिरमोड झालेल्यांनी ‘वॉक आऊट’ करणे पसंत केले.

कालिदास कलामंदिराचा पडदा बाजूला सरकला अन् नाटकाच्या पहिल्या अंकाला सुरूवात झाली. सोडत जाहीर करणारे आयुक्त अभिषक कृष्णा यांच्यासह अधिकारी कलावंतांच्या भूमिकेत तर नगरसेवकपदाची महत्त्वाकांक्षा बाळगणारे अन् त्यांचे कार्यकर्ते रसिकांच्या भूमिकेत होते. प्रभाग आरक्षण सोडतीचे हे नाटक अनेकांचे राजकीय भवितव्य ठरविणारे होते. त्यामुळे सकाळी दहापासूनच रसिकांची पाऊले कालिदास कलामंदिरकडे वळू लागली. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सेट उभारणीचे काम सुरू केले होते. नाटकाचा विषय राजकीय आखाड्यातील अनेकांच्या जिव्हाळ्याचा होता. कोणाचा बालेकिल्ला शाबूत राहणार व कोणाचा बुरूज ढासळणार हे पहाण्यासाठी कार्यर्त्यांची गर्दी जमली. त्यामध्ये तरुणांचा अन् त्यातही इच्छुकांचा भरणा अधिक होता. खास त्यांच्या सोयीसाठी कालिदास आवारात आणि समोरील मैदानावरही दोन स्क्रीन लावण्यात आल्या. प्रभाग रचना आरक्षणाचा शो पहाण्यासाठी प्रशासनाला अपेक्षित असलेली गर्दी झालीच नाही. त्यामुळे आवारातील बऱ्याच खुर्च्या रिकाम्या राहिल्या.

प्रभागात समाविष्ट परिसराची माहिती देणारे नकाशे कालिदास कलामंदिरच्या आवारात लावण्यात आले. ते पाहून उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर ‘कही खुशी कही गम’चे भाव उमटत होते. इतरांच्या प्रभागांची काय स्थिती आहे, हे जाणून घेण्याकडेही अधिक कल होता. कुठे गुप्तगू तर कुठे राजकीय खेळीच्या खुलेआम चर्चा रंगल्या. विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा एकत्रित फड रंगल्याचे अभूतपूर्व चित्रही दृष्टीस पडत होते. कोणत्या प्रभागात साधारणत: काय चित्र राहणार याचे तर्क लावले जात होते. अन् ‘चला आता कामाला लागा!’ असा विचार करून अनेकजणांनी हे संपूर्ण नाटक संपण्यापूर्वीच नाट्यगृह परिसरातून काढता पाय घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवीन गटांची शोधाशोध सुरू

$
0
0

महिला, पुरुष सदस्यांची सोयीच्या गटांना पसंती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेमध्ये नुकत्याच जाहीर आरक्षण सोडतीमध्ये विद्यमान ५६ सदस्यांचा पत्ता कट झाला आहे. मात्र याचा संताप असला तरी कोणाचीही तक्रार नाही. त्यामुळे गट आरक्षित झालेल्या काही सदस्यांनी नव्या सोयीच्या गटांचा शोध घेणे सुरू केले आहे. यातील काही महिला सदस्यांनी माहेरच्या गटाची तर पुरुष सदस्य मामा व आपल्या नातेवाईकांचा गटाची चाचपणी करत आहेत. एकीकडे नवीन गट शोधण्याची मोहीम काही सदस्यांनी सुरू केली असली तरी इतर सदस्यांनी मात्र आता थांबण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ते या निवडणुकीत आपल्या कार्यकर्त्यांना संधी देण्याची शक्यता आहे.

आरक्षण सोडतीमध्ये जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा विजयश्री चुंबळे यांच्यासह उपाध्यक्ष प्रकाश वडजे, सभापती उषा बच्छाव, किरण थोरे, शोभा डोखळे यांचे गटही आरक्षित झाले. त्यात सर्वच राजकीय पक्षांचे गटनेत्यांनाही गट राहीला नाही. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याची परिस्थिती विद्यमान सदस्यांवर ओढवली आहे. जिल्हा परिषदेचे एकूण ७३ गट असून त्यातील ३७ गट हे महिलांसाठी आरक्षित झाले आहे. त्याचप्रमाणे ७३ गटांपैकी १९ गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी, ३० ओबीसी, ५ गट अनुसूचित जाती व २९ गट हे अनुसूचित जमातीच्या प्रवर्गांसाठी आरक्षित करण्यात आले. यात ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव असल्याने अनेकांचा हिरमोड झाला.

राजकीय पक्षांची अडचण

जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्यांचे गट आरक्षित झाल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची अडचण वाढली आहे. विद्यमान सदस्यांऐवजी सक्षम उमेदवारांची शोधाशोध घेणे आता सर्वांची डोकेदुखी ठरणार आहे. एकाच वेळेस ५६ उमेदवारांऐवजी दुसरा उमेदवार शोधणे हे काम सर्वांना अवघड जाणार आहे.

विधानसभा व लोकसभेत २५ वर्षांनी आरक्षण बदलते तसे जिल्हा परिषदेचे १० वर्षांनी बदलायला हवे. पाच वर्षे निवडून येणारा उमेदवार आपल्या गटात काम करतो पण त्याचा त्याला फायदा होत नाही. अनेकजण दुसरा गट शोधत असले तरी मी मात्र थांबणार आहे, आमची कोणाविषयी तक्रार नाही.

- प्रकाश वडजे, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदवीधर निवडणूक : राष्ट्रवादीची वेगळी चूल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आगामी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पूर्व तयारीसाठी या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव व नंदुरबार या जिल्ह्यातील पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची व निमंत्रितांची बैठक नाशिक येथील गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारकाच्या सभागृहात सोमवार (दि. १०) रोजी सकाळी ११.३० वाजता ही बैठक होणार असल्याची माहिती पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार व शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी दिली आहे.

बैठकीस पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीसाठी नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव व नंदुरबार या जिल्ह्यांचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष यांच्यासह माजीमंत्री, आजी-माजी आमदार, खासदार, जिल्हा परिषद, महानगरपालिका, पंचायत समिती, नगरपालिका यांचे पदाधिकारी व सदस्य तसेच पक्षाचे प्रदेश व जिल्हा पदाधिकारी, सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती व इतर सहकारी बँकांचे संचालक, साखर कारखान्यांचे चेअरमन, संचालक, पक्षाचे पदाधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोंडाईचा ‘कृउबा’त रावलांची सरशी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण १६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या भाजप शेतकरी विकास पॅनलला १२ जागा तर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनापुरस्कृत शेतकरी सहकार पॅनलला ४ जागांवर विजय मिळाला आहे. या चुरशीच्या लढतीत कॅबिनेट मंत्री जयकुमार रावलांच्या पॅनलची सरशी झाली आहे.

या निवडणुकीत पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी बाजार समितीवर एकहाती सत्ता प्रस्थापित करण्याचा दावाच या विजयानंतर केल्याचे बोलले जात आहे. सोळा जागांपैकी बारा जागांवर भाजप पुरस्कृत उमेदवारांना मतदारांनी पसंती दिली आहे. दोंडाईचा बाजार समिती निवडणूक मंत्री रावल आणि माजी कामगार मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांच्यासाठी खूप प्रतिष्ठेची मानली जात होती.

त्यामध्ये माजी मंत्री हेमंत देशमुख यांच्या शेतकरी सहकार पॅनलमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना पुरस्कृत उमेदवार होते. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादीला प्रत्येकी १-१ तर शिवसेनेला २ अशा एकूण चार जागा मिळाल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खत प्रकल्पासाठी क्रेडाईचे ठाकरेंना साकडे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या वर्षभरापासून शहराचा विकास ठप्प करणाऱ्या खत प्रकल्पाचे खासगीकरण करून तो तत्काळ सुरू करण्याची मागणी क्रेडाईने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे केली आहे. क्रेडाईचे अध्यक्ष सुनील कोतवाल यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापौर व स्थायी समितीच्या सभापतींच्या उपस्थितीत ठाकरेंची भेट घेतली आहे. राज ठाकरे यांनीही उपस्थित पदाधिकाऱ्यांना खत प्रकल्पाच्या खासगीकरणाचा प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुढील स्थायी समितीत खत प्रकल्पाचा विषय मार्गी लागण्याची शक्यता आहे.

खत प्रकल्पाच्या दुरवस्थेमुळे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पुण्याच्या राष्ट्रीय हरित लवादाने नाशिकमधील बांधकामांवर बंदी घातली आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून शहरातील बांधकाम व्यवसाय ठप्प झाला आहे. जोपर्यंत खत प्रकल्प सुरू होत नाही, तोपर्यंत एनजीटीची बंदी उठवली जाणार आहे. त्यासाठी प्रशासनाने खत प्रकल्प सुरू करण्याचा विषय मार्गी लावला असून, तो स्थायी समितीवर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. मात्र, स्थायीतल्या काही सदस्यांच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे हा प्रस्ताव सध्या पडून आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांनी कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. या वेळी महापौर अशोक मुर्तडक, स्थायी समितीचे सभापती सलीम शेख, मनसेचे शहराध्यक्ष राहुल ढिकले, क्रेडाईचे अध्यक्ष सुनील कोतवाल, सचिव उमेश वानखेडे आदींचा समावेश होता.

खत प्रकल्पामुळे संपूर्ण शहराचाच विकास ठप्प झाल्याची माहिती कोतवाल यांनी ठाकरेंना दिली. त्यामुळे खत प्रकल्पाच्या खासगीकरणाचा विषय मंजूर झाल्यास पुढील सहा महिन्यांत तरी एनजीटी बंदी उठणार आहे. ठाकरे यांनी खत प्रकल्पाबाबत महापौर व सभापतींसोबत चर्चा केली. ठाकरेंनी या वेळी महापौर व सभापतींनाच खत प्रकल्पाचा प्रस्ताव तत्काळ मार्गी लावण्याचे आदेश दिले. सभापतींनीही या वेळी स्थायी समितीवर असलेला प्रस्ताव तत्काळ मंजूर करू, असे आश्वासन ठाकरेंना दिले. त्यामुळे स्थायी समितीच्या पुढील बैठकीत हा विषय तत्काळ मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अनुभूती’च्या तालात श्रोते मंत्रमुग्ध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कापडपेठेतील श्री बालाजी मंदिर येथे ब्रह्मोत्सव कार्यक्रमात शुक्रवारी ज्येष्ठ तबलावादक पं. कमलाकर (नाना) वारे यांचा डॉ. मो. स. गोसावी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर ‘अनुभूती’ हा तबला सहवादनाचा कार्यक्रम झाला.

डॉ. गोसावी, डॉ. रमेश बालाजीवाले आणि पं. कमलाकर वारे यांच्या हस्ते दीप्रज्ज्वलन झाले. गोसावी यांचा परिचय करून देत डॉ. बालाजीवाले यांनी त्यांचा सत्कार केला. त्यानंतर पंडित नाना वारे यांचा परिचय करून दिला. त्यांच्या जीवनावरील चित्रफीत दाखवण्यात आली. त्यानंतर सदानंद जोशी यांनी प्रेक्षकांना सन्मानपत्र वाचून दाखवले व डॉ. गोसावी यांच्या हस्ते पं. वारे यांचा प्रदीर्घ सेवेबद्दल सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. ज्योत्स्ना बालाजीवाले यांनी प्रभावती वारे यांचा सत्कार केला.

पं. वारे यांनी मनोगत व्यक्त करत आपल्या जीवनातले काही बहुमोल क्षण त्यांनी श्रोत्यांसमोर मांडले, तसेच गोसावी यांनी संगीत हे तबल्याशिवाय अपूर्ण असून, पं. नाना वारेंनी विद्यार्थ्यांना तबल्याचे शिक्षण देऊन मोठी कामगिरी केली आहे, असे सांगत आशीर्वादपर मनोगत व्यक्त केले. त्यानंतर पं. नितीन वारे व पं. नितीन पवार यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘अनुभूती’ तबला सहवादनाचा कार्यक्रम झाला. यामध्ये तब्बल ६० विद्यार्थ्यांनी एकत्रितरीत्या तबल्याचे ताल झपतालमधील दहाताल, त्रिताल आणि बंदिशी सादर करत बालाजी मंदिराचा माहोल मंत्रमुग्ध केला. सुजित काळे, दिगंबर सोनवणे, रसिक कुलकर्णी, जयेश कुलकर्णी, ओंकार कोडिलकर व अमित भालेराव यांचे विशेष सहकार्य लाभले. अश्विनी जोशी यांनी सूत्रसंचालन केले. सचिव हर्षवर्धन बालाजीवाले यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैसे द्या अन् कॉलेजमध्ये जा...!

$
0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

नाशिकमधील कॉलेज रोड परिसरातील एका नामांकित शिक्षण संस्थेच्या कॅम्पस गेटवर अनेक बाऊन्सर तैनात असतात. या नामांकित संस्थेच्या एकाच कॅम्पसमध्ये सुमारे आठ कॉलेजेस आहेत. यामुळे कॅम्पसमध्ये दिवसभरात दहा हजारांहून अधिक कॉलेजियन्स येत असतात, तसेच अनेक टवाळखोरदेखील कॅम्पसमध्ये आलेले दिसून येत आहेत. कॅम्पसला सिक्युरिटी तैनात असूनही टवाळखोर आत कसे येतात हा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र, या बाऊन्सर पैसे घेऊन या टवाळखोरांना कॅम्पसमध्ये जाऊ देत असल्याचे दिसून आले आहे.


कॉलेजरोडवरील नामांकित कॅम्पसच्या एका गेटवर सुमारे चार बाऊन्सर व सहा सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. तब्बल तीन गेट या कॅम्पसला असून, ३५ पेक्षा अधिक सिक्युरिटी गार्डची टीम इथे कार्यरत आहे. असे असले तरी कॉलेजशी संबंध नसलेले तरुण व तरुणी कॅम्पसच्या आत आलेले दिसून येतात. यातील अनेकांच्या उपद्रवाला नाहक कॉलेजियन्स व कॉलेज प्रशासनाला बळी पडावे लागत आहे. कॉलेजशी संबंधित नसलेल्यांकडून बाऊन्सर पैसे घेऊन आत सोडत असल्याचे दिसून आले आहे. मंगळवारी कॅम्पसच्या मुख्य गेटवर एका तरुणास अडवण्यात आले. त्याच्याकडे ओळखपत्र नसल्याने बाऊन्सर त्याला आत सोडत नव्हते. या तरुणाने खिशातून पैसे काढून बाऊन्सरच्या हातात दिले. ‘हे १५ दिवसांचे झाले भाऊ...’ असे बाऊन्सरने यावर प्रत्युत्तर दिले. तरुणाने ‘तात्पुरते राहू दे, बाकी बघू नंतर’ असे म्हणत बाऊन्सरला टाळी दिली. यानंतर बाऊन्सरने त्या तरुणाला कॉलेजच्या आत जाऊ दिले. असे प्रकार अनेकदा घडत असल्याचे कॉलेज कॅम्पसमधील काही खात्रीलायक सूत्रांनी सांगितले आहे. यामुळे आता कॅम्पसमध्ये जायचे असेल तर पैसे द्या अन् कॉलेजला जा... अशी पद्धत असते का, अशी चर्चा कॉलेजियन्समध्ये सुरू आहे.

ओळखपत्र असलेल्यांची अडवणूक

ज्या कॉलेजियन्सकडे ओळखपत्र आहे त्यांची रोज कॅम्पस गेटवर अडवणूक होत आहे. ओळखपत्र संपूर्णतः तपासून सोडले जाते. एखाद्या दिवशी चुकीने ओळखपत्र नसेल तर बाऊन्सर आत प्रवेश देत नसल्याचे कॉलेजियन्स सांगतात. मात्र, याच वेळी हितसंबंध व चिरीमिरी संबंध असलेले थेट आत जात असल्याचे दिसून आले आहे. अनेकदा हे बाऊन्सर्स व सुरक्षारक्षक काही मुलींसोबत मैत्री वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.

कमिटीसमोर बाऊन्सर हिरो

कॅम्पसमधील कॉलेज कमिटीच्या राऊंडच्या वेळा बाऊन्सर्सला माहीत झाल्या आहेत. या वेळात बाऊन्सर कोणालाही आत जाऊ देत नाहीत. एकदम हिरो असल्याप्रमाणे चोख काम बजावतात. कमिटी राऊंडनंतर मात्र यांचा कारभार धूसर झालेला दिसून येतो. यानंतर अनेक टवाळखोर कॅम्पसमध्ये दिसून येतात. या प्रकाराबाबत कॉलेज प्रशासन पूर्णतः अनभिज्ञ आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अणुविज्ञानात होमी भाभांचे योगदान अतुलनीय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारताच्या अणुविज्ञानाचा पाया डॉ. होमी भाभा यांनी रचला आहे. त्यांनी विज्ञानाच्या प्रगतीला दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अणुशक्ती, ऊर्जानिर्मिती या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी डॉ. होमी भाभा यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अणुशास्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर यांनी केले.

रावसाहेब थोरात सभागृहात शनिवारी आयोजित कार्यक्रमात ‘डॉ होमी भाभा यांचे भारताच्या अणुविज्ञान क्षेत्रातील योगदान व अणुक्षेत्रातील भारताची कामगिरी व आजपर्यंतचा प्रवास’ या विषयावर ते बोलत होते.

ते म्हणाले, की डॉ. भाभा यांनी भारतीय विज्ञान संस्था, बेंगलुरू येथे प्राध्यापकपदी काम केले. १९४५ मध्ये टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर १९४८ मध्ये त्यांच्या पुढाकाराने अणुऊर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली. त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच भारत देशात अणुभट्टीची स्थापना होऊ शकली. अणूचा वापर शांततेच्या मार्गानेच व्हावा, असे ठाम मत संयुक्त राष्ट्राच्या सभेत मांडणारे भाभा हे पहिले वैज्ञानिक होते. डॉ. भाभा यांनी पाया रचला म्हणूनच भारत अनेक ठिकाणी अणुभट्ट्या सुरू करून त्याचा वीजनिर्मितीसाठी उपयोग करू शकला. अणूचा संहारक उपयोग होता कामा नये, या उद्देशाने जगातील शास्त्रज्ञांना एकत्र करून त्यांनी विशेष प्रयत्न केले, असेही डॉ. गोवारीकर म्हणाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा नीलिमा पवार म्हणाल्या, की विद्यार्थ्यांनी संशोधक वृत्ती वाढविण्यासाठी सर्व बाजूंनी प्रयत्न करणे गरजेचे असून, त्यासाठी सरकार, संस्था, शिक्षक प्रयत्नशील आहेत. कर्मवीरांनी सत्याचा शोध घेण्यासाठी आपल्या आहुती ज्ञानयज्ञात पोहोचविल्या. ग्रामीण भागासाठी सुखकर ठरेल अशा संशोधनावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. डॉ. डी. पी. पवार यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य डॉ. आर. डी. दरेकर यांनी आभार मानले. या वेळी डॉ. गोवारीकर यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली. या वेळी डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी, शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. काजळे, प्रा. रामनाथ चौधरी, प्रा. एस. के. शिंदे, डॉ. आर. डी. दरेकर, अपूर्वा जाखडी, लीना जाखडी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ स्पा जागामालकास अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्पाच्या आड अनैतिक व्यवसाय सुरू ठेवण्यात जागा मालकाचाही समावेश असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असून, पोलिसांनी संबंधित व्यक्तीला अटक केली आहे. स्पा चालकाच्या अधिक चौकशीसाठी कोर्टाने त्याच्या कोठडीत रविवारपर्यंत वाढ केली असून, पोलिसांच्या आक्रमक भूमिकेमुळे अनेक स्पा दोन दिवसांपासून सुरूच झाले नसल्याचे दिसते.

भालचंद्र राजाराम सावळे असे स्पाच्या जागामालकाचे नाव आहे. इंदिरानगर परिसरातील गजानन महाराज मंदिरासमोर वास्तव्यास असलेल्या सावळेचा कॉलेज रोडवरील ठक्कर मॅजेस्टी इमारतीत गाळा आहे. या ठिकाणी मागील वर्षापासून हेमंत अशोक परिहार आणि त्याची साथीदार नीलोफर तय्यब शेख यांनी इंजी नावाने स्पा सुरू केला. हे दोघे त्याआड अनैतिक व्यवसाय करीत होते. पोलिसांनी चार ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास छापा मारून येथे वेश्या व्यवसाय करणाऱ्या पाच मुलींची सुटका केली, तसेच परिहार, शेखसह अन्य एकास अटक केली. या गुन्ह्याचा सखोल तपास करावा म्हणून कोर्टाने परिहार आणि शेख या दोघांना पोलिस कोठडी सुनावली होती. शेखच्या कोठडीची मुदत आज संपली, तर स्पा मालक परिहारच्या कोठडीत कोर्टाने ९ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी काही एजंटाची नावे शोधून काढली आहेत. दरम्यान, गेल्या वर्षी पोलिसांनी याच ठिकाणी छापा मारून स्पाच्या आड सुरू असलेला वेश्या व्यवसायाचा अड्डा उद््ध्वस्त केला होता. आता पुन्हा तसाच प्रकार घडल्याने पोलिसांना जागा मालकाबाबत संशय होताच. त्यांनी सावळेचा पत्ता शोधून त्याची चौकशी केली. त्यात सावळे याचा या वेश्या व्यवसायाच्या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार पोलिसांनी त्यालाही जेरबंद केले. एवढेच नव्हे, तर पुन्हा या जागेचा दुरुपयोग होऊ नये म्हणून ही जागा सील करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले.

स्पा चालकांचे धाबे दणाणले

स्पाच्या आड अनैतिक व्यवसाय सुरू होणार नाहीत या दृष्टीने पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कॉलेज रोड, तसेच गंगापूर रोड यासह परिमंडळ एक हद्दीतील अनेक स्पा सेंटरची अचानक तपासणी केली. पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त राजू भुजबळ, विजयकुमार चव्हाण, तसेच भद्रकाली, पंचवटी, सरकारवाडा, गंगापूर, मुंबई नाका, आडगाव आणि म्हसरूळ येथे पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. पोलिसांचा मोठा फौजफाटा यासाठी नियुक्त करण्यात आला होता. वरील पोलिस स्टेशन हद्दीतील मसाज पार्लर व स्पा यांची अचानक तपासणी केली असता बरेचसे सेंटर बंद असल्याचे आढळून आले. सुरू असलेल्या सेंटरची तपासणी करण्यात आली. बंद आढळून आलेले सेंटर सुरू झाल्यास पुन्हा तपासणी करणार असून, अशा ठिकाणावर सुरू असलेले अवैध प्रकार रोखण्यासाठी पोलिस योग्य ती कार्यवाही करीत असल्याचे सहायक पोलिस आयुक्त राजू भुजबळ यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेणींवर अखेर गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्वत:च्या फायद्यासाठी अधिकाराचा गैरवापर करून सात लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सार्वजनिक वाचनालयाचे माजी कार्यवाह श्रीकांत गजानन बेणी यांच्याविरुद्ध भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये ४०६, ४०९, ४१७ व ४२० कलमान्वये फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेणींवर गुन्हा दाखल झाल्याने शहरातील साहित्य क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

सार्वजनिक वाचनालयाचे कार्यवाह मिलिंद जहागीरदार यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. तीस जानेवारी २०११ ते ५ मार्च २०१२ दरम्यान बेणी यांनी अपहार केल्याचे जहागीरदार यांच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. बेणी यांनी अधिकाराचा गैरवापर करून परस्पर सात लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे.

३० जानेवारी २०११ रोजी सार्वजनिक वाचनालयाच्या कार्यकारी मंडळाच्या १५ सदस्यांपैकी आठ सदस्यांनी सह्या करून एकत्रित राजीनामापत्र कार्याध्यक्षांना सादर केले होते. घटनेतील नियमाप्रमाणे त्या वेळी निवडणूक घेणे बंधनकारक असताना तत्कालीन मुख्य कार्यवाह श्रीकांत बेणी यांनी हे राजीनामे न स्वीकारता बेकायदेशीररीत्या काम सुरूच ठेवल्याचे तक्रार अर्जामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे, तसेच २१ फेब्रुवारी २०११ रोजी नवीन सदस्यांची नेमणूक करून त्या रिक्त आठ जागा भरल्या. या जागा भरण्यास नाशिक कोर्टाने स्थगिती दिली होती. मात्र, श्रीकांत बेणी यांनी या स्थगितीस आव्हान देऊन जिल्हा न्यायाधीशांकडे प्रकरण नेले. मात्र, त्यांनीही ही स्थगिती कायम ठेवली. त्यावरून बेणी यांनी केलेल्या नियुक्त्या बेकायदेशीर होत्या हेच स्पष्ट होत असल्याचे जहागीरदार यांनी दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केलेले आहे. त्यानंतर सहाय्यक धर्मादाय आयुक्त, नाशिक यांनी अल्पमतातील कार्यकारिणी कायदेशीर नाही असा निर्णय देऊन नवीन निवडणूक घेण्यास सांगितले. मात्र, बेणी यांनी या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही. याचा अर्थ ३० जानेवारी २०११ ते ५ मार्च २०१२ या कालावधीत झालेले आर्थिक व्यवहार बेकायदेशीर असून, याच काळात बेणी यांनी एका कंपनीसोबत सात लाख रुपयांचा व्यवहार केला असून, करार करण्याचे अधिकार नसताना करारनामा केला व संस्थेच्या पैशांचा गैरवापर केला असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक लांडे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला अत्याचाराचे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अहमदनगरमधील पाथर्डी तालुक्यात गोसावी समाजातील अल्पवयीन गतिमंद मुलीवर अत्याचार करण्यात आला. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, तसेच दोषी नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी यांसारख्या मागण्या श्री दशनाम गोसावी समाजाने केल्या आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले.

मोहरी गावात एका १४ वर्षीय मतिमंद मूकबधिर मुलीवर बलात्कार करण्यात आला. याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली तर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी या गुन्ह्यातील ५५ वर्षीय संशयिताने दिली. अशा अत्याचाराच्या घटनांचा निषेध करण्यासाठी पंचवटीपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला. रामकुंडापासून मोर्चाला सुरुवात झाली. मालेगाव स्टँड, रविवार कारंजा, महात्मा गांधी रोड, मेहेर सिग्नल या मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा आला. काही तरुणी निवेदन देण्यासाठी खेडकरांच्या दालनात गेल्या, तर उर्वरित मोर्चेकरी हुतात्मा स्मारकात गेले. तेथे मोर्चाचा समारोप झाला. मोर्चाच्या अग्रभागी विद्यार्थिनी, युवती, महिला, त्यापाठोपाठ तरुण, ज्येष्ठ नागरिक व शेवटी अन्य समाजबांधव होते. महिलांनी काळ्या साड्या परिधान करून या घटनेचा निषेध नोंदविला, तर भगव्या टोप्या परिधान करून सहभागी झालेल्या पुरुषांनी सर्वांचे लक्ष वेधले. गुन्हेगार कोणत्याही जातीधर्माचा नसतो. अशा सर्वच घटना निंदनीय असून, त्यावर अंकुश आणण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलावीत, अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली. पोटासाठी भटकंती करणाऱ्या भटक्या विमुक्तांना कायदेशीर संरक्षण द्यावे, महिला अत्याचारातील सर्वच गुन्ह्यांमधील दोषींना फाशीची शिक्षा द्यावी आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या. या वेळी श्रद्धा भारती, दर्शना गोसावी, अदिती भारती, मानसी गोसावी, निशा गोसावी आणि स्नेहा गोसावी या तरुणींनी खेडकर यांना निवेदन दिले. तत्पूर्वी, या निवेदनाचे वाचन करण्यात आले.

दशनाम गोसावी समाजाच्या मागण्या

- महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांतील आरोपींवर ४५ दिवसांत आरोपपत्र दाखल करावे.
- असे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावेत.
- पीडित कुटुंबाचे पुनर्वसन करून संरक्षण मिळावे.
- दोषींना फाशीची शिक्षा व्हावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालिकेवर बलात्कार;त्र्यंबकेश्वरला तणाव

$
0
0

त्र्यंबकेश्वर : तळेगाव (अंजनेरी) येथे शनिवारी सायंकाळी पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्काराची घटना घडली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. रात्री उशिरापर्यंत त्र्यंबक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. बलात्कार करणारा पंधरा वर्षांचा मुलगा आहे. दरम्यान, सुमारे २०० ते ३०० व्यक्तींचा जमाव त्र्यंबक पोलिस स्टेशनमध्ये ठाण मांडून बसला होता. वातावरण चिघळल्याने एसआरपीची एक तुकडी येथे तैनात करण्यात आली आहे. मुलाची व पीड‌ित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. मुलीची स्थिती गंभीर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वंचित गावांमध्ये होणार रेशन दुकान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

धान्य वितरणात अनियमतता आढळून आल्याने जिल्ह्यात पुरवठा विभागाने अनेक रेशन दुकानांवर कारवाई केली असून, या दुकानांचे नव्याने जाहिरनामे काढण्यात येणार आहेत. निवडणुकांच्या आचारसंहितेपूर्वी हे जाहीरनामे काढण्यात येणार असून, ३११ रास्त भाव दुकाने तसेच किरकोळ केरोसीन परवाने स्वयंसहायता गटांना देण्यात येणार आहेत. त्यासाठी परवाने नसलेल्या गावांची माहिती पाठविण्याचे आवाहन जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना करण्यात आले आहे.

सुरगाणा येथे झालेल्या कोट्यवधींच्या रेशन धान्य घोटाळ्याने नाशिक राज्यभर चर्चेत आले. अशा घोटाळ्यांचे सत्र अजूनही सुरूच आहे. एकीकडे गरिबांच्या हक्काचे रेशनचे धान्य अशा घोटाळ्यांच्या माध्यमातून फस्त केले जात असताना रेशन दुकानांवर धान्य न मिळणे, धान्याचा दर्जा सुमार असणे, दुकान नेहमी बंद असणे, धान्याचे वाटपच न करणे यांसारखे प्रकार घडत असतात. याबाबतच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे अशा दुकानांवर जिल्हा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

जिल्ह्यातील रेशन दुकानांची विशेष पथकाद्वारे तपासणी करण्यात आली. जिल्ह्यात २ हजार ६०९ रेशन दुकाने आहेत. त्यापैकी १ हजार ९०५ दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ५२६ दुकानांमध्ये किरकोळ प्रकारचे दोष आढळून आले. सुमारे १८३ दुकानांमध्ये मध्यम स्वरुपाच्या, तर ४७ दुकांनांमध्ये गंभीर स्वरुपाच्या त्रुटी आढळून आल्या. अशा दोषी दुकानदारांवर त्यानंतरही जिल्हा पुरवठा अधिकारी सरिता नरके यांनी कारवाई केली असून, नव्याने रेशन दुकानांची गरज भासणाऱ्या गावांमध्ये नवे परवाने देण्याचा निर्णय घेतला आहे.

निवडणुकीपूर्वी निघणार जाहीरनामा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या असून नगरपंचायत, पदवीधर निवडणूक, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांची आचारसंहिता लागण्यापूर्वीच जिल्ह्यातील ३११ रेशन दुकानांचे नव्याने जाहिरनामे काढण्यात येणार आहेत. राज्य सरकारच्या ३ नोव्हेंबर २००७ च्या निर्णयानुसार रास्त भाव दुकाने व किरकोळ केरोसीन परवाने स्वयंसहायता गटांना देण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांकडून परवाने नसलेल्या गावांची माहिती मागविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

न्यायालयीन प्रकरण; समन्वयासाठी समिती

$
0
0

संगणकीय प्रणालीव्दारे ट्रॅकर प्रणालीचा वापर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने न्यायालयीन प्रकरणांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी विभागीय स्तरावरून समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीबरोबरच संगणकीय प्रणालीव्दारे ट्रॅकर प्रणालीसुध्दा विकसित केली जाणार आहे. त्यामुळे अनेक न्यायालयीन प्रकरणांत शासनाची बाजू मांडणे व त्यावर तातडीने निर्णय घेणे सोपे होणार आहे.

नाशिक जिल्ह्यातही न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे अनेक अधिकाऱ्यांच्या खुर्च्या जप्त झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यात ग्रामीण भागातील न्यायालयीतन प्रकरणाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे शासनाच्या ग्राम विकास विभागाने न्यायालयीन प्रकरणांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी ही समिती स्थापन केली आहे. ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या क्षेत्रिय कार्यालयांतर्गत विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या जनहित याचिका, अवमान याचिका व इतर प्रकरणांमध्ये प्रभावी समन्वय करून कामकाजाच्या सोयीसाठी सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने ही समिती स्थापन करण्यात आली आहे. आता ही समिती राज्यातील सर्व जिल्हा कार्यालयातील प्रकरणांचा दरमहा आढावा घेणार आहे.

अशी असेल समिती आणि कामकाज

या समितीत सामान्य प्रशासनाचे विभागीय उपायुक्त अध्यक्ष असणार असून, सदस्य म्हणून जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासनामधील सर्व उपमुख्य कार्यकारी अधिकारी सदस्य असणार आहेत. त्याचप्रमाणे सदस्य सचिव हे सर्व गटविकास अधिकारी असणार आहेत. आठवड्याच्या प्रत्येक मंगळवारी ही समिती आढावा घेणार आहे. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांना त्याबाबतचा अहवाल दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे या समितीची बैठक दरमहा २५ तारखेला होणार आहे. त्यानंतर हा अहवाल विभागीय आयुक्तांच्या मान्यतेसाठी सादर करावा लागणार आहे. विशेष म्हणजे न्यायालयीन प्रकरणास होणाऱ्या विलंबास, निष्काळजीपणा व दिरंगाईमुळे शासनास सहन कराव्या लागणाया नुकसानीस अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कार्यवाहीचा अधिकार या समितीला देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तलाठी परीक्षेचा निकाल जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या तलाठी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे राज्यात पहिल्यांदाच परीक्षेत उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

महसूल विभागातील उपविभागीय कार्यालयांमधील तलाठीपदाच्या ४१, तर वाहनचालकपदाच्या एका जागेसाठी ११ सप्टेंबरला परीक्षा घेण्यात आली. तलाठी पदासाठी पेसा आणि पेसा क्षेत्राबाहेरील अशा वर्गवारीत अर्ज मागविण्यात आले होते. ४१ पैकी ११ पदे पेसासाठी, तर ३० पदे पेसा क्षेत्राबाहेरील उमेदवारांकरिता होती. तलाठीपदासाठी पेसा क्षेत्राबाहेरील २० हजार ३०३, तर पेसा क्षेत्रातून ३ हजार २२१ अर्ज प्राप्त झाले. वाहनचालकपदासाठी सरळसेवा पध्दतीने ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. एकूण १९ हजार ८९२ परिक्षार्थिंनी ही परीक्षा दिली. उत्तरतालिका प्रसिध्द केल्यानंतर आता प्रशासनाने निकालही जाहीर केला आहे. निकालाच्या दोन याद्या प्रसिध्द करण्यात आल्या असून, त्यामध्ये एक पात्र उमेदवारांची तर दुसरी यादी उमेदवारांच्या गुणांनुसार जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला किती गुण मिळाले हे प्रत्येक उमेदवाराला समजू शकणार आहे. पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी दोन वेगवेगळ्या दिवशी केली जाणार आहे.

कागदपत्र तपासणी

पेसा क्षेत्रातील ११ जागांसाठी २२ उमेदवारांची आणि वाहनचालकाच्या एका जागेसाठी पाच उमेदवारांची कागदपत्रे १८ ऑक्टोबरला तपासली जाणार आहेत. तर १९ ऑक्टोबरला पेसा क्षेत्राबाहेरील तलाठ्यांच्या ३० जागांसाठी ६७ उमेदवारांची कागदपत्रे तपासण्यात येणार आहेत. कागदपत्रांच्या तपासणीनंतर दोन्ही क्षेत्रातील उमेदवारांची अंतिम यादी जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने पुढील दोन ते तीन दिवसांतच जाहीर केली जाईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भगवानगड वादाचे नाशकात पडसाद

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बीड जिल्ह्यातील भगवानगडावर दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंना भाषण करू देण्यास नामदेव शास्त्रींनी विरोध केल्यामुळे नाशिकमध्ये सुध्दा त्याचे पडसाद उमटले आहेत. या विषयावर चर्चा करण्यासाठी शनिवारी व्ही. एन. नाईक संस्थेच्या लोकनेते गोपीनाथ मुंडे अभियांत्रिकी महाविद्यालयात बैठक झाली. या बैठकीत पंकजा मुंडे यांचे भाषण व्हावे, असा ठराव करून जास्तीत जास्त संख्येने मेळाव्याला जाण्याचा निर्णय घेण्यात आला.

पंकजा मुंडे आणि महंत नामदेवशास्त्री सानप यांच्यातील वादामुळे भगवानगड पुन्हा चर्चेत आला आहे. या गडावर दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंना भाषण करू देण्यास नामदेव शास्त्रींनी विरोध केला आहे. तर पंकजा मुंडे यांनी आपण गडावर जाणारच असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. यामुळे येत्या दसरा मेळाव्याला भगवानगडावर वर्चस्ववादाचा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. त्यात आता नाशिक जिल्ह्यानेही उडी घेतली आहे.

शनिवारी झालेल्या बैठकीत या वादावर मात्र फारसे भाष्य न करता कोणतेही गालबोट न लावता सर्वांनी शांततेत या मेळाव्यात सामील व्हावे, असे आवाहन यावेळी प्रमुख वक्त्यांनी केले. त्याचप्रमाणे यावेळी कै. गोपीनाथ मुंडे यांच्या कामाचा गौरव करून त्यांनी समाजासाठी खूप काही केले आहे. त्यामुळेच अभियांत्रिकी महाविद्यालयाला त्यांचे नाव दिले. त्यांचे काम समाज कधीही विसरू शकणार नाही. समाजाची श्रध्दा मुंडेसाहेब व भगवानगडावर आहे. त्यामुळे हा मोर्चा शांततेत व्हावा, असे आवाहनही करण्यात आले. भगवानगड वंजारी समाजाचं अढळ श्रद्धास्थान आहे. पण हेच धार्मिक श्रद्धास्थान आज नेत्यांमधील राजकीय वर्चस्ववादाचं केंद्रस्थान बनलं आहे. भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी गडाचा राजकीय व्यासपीठ म्हणून वापर होऊ देण्यास तीव्र विरोध दर्शवल्यानंतर तर पंकजा मुंडेंनी पारंपरिक दसरा मेळाव्यासाठी गडावर चलाची हाक दिलीय. त्यामुळे मुंडे समर्थकांनी गडावर पंकजांचे भाषण झालंच पाहिजे असा आग्रह धरत असताना नाशिकमध्येही त्यांना पाठिंबा देण्यात आला आहे.

या बैठकीला गोविंदराव केंद्रे, आमदार बाळासाहेब सानप, अखिल वंजारी समाज विकास परिषदेचे नाशिकचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, सरचिटणीस हेमंत धात्रक, कोंडाजीमामा आव्हाड, प्रभाकर धात्रक, अॅड. तानाजी जायभावे, बाळासाहेब गामणे, डॉ. धर्माची बोडके, विठ्ठलराव पालवे, शरद बोडके, भगवान सानप, संपतराव वाघ, उदय सांगळे, किशोर दराडे, दामू मानकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालिकेवर बलात्कार; त्र्यंबकेश्वरमध्ये तणाव

$
0
0

त्र्यंबकेश्वर : तळेगाव (अंजनेरी) येथे शनिवारी सायंकाळी पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्काराची घटना घडली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. रात्री उशिरापर्यंत त्र्यंबक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. बलात्कार करणारा पंधरा वर्षांचा मुलगा आहे.

सुमारे २०० ते ३०० व्यक्तींचा जमाव त्र्यंबक पोलिस स्टेशनमध्ये ठाण मांडून बसला होता. वातावरण चिघळल्याने एसआरपीची एक तुकडी येथे तैनात करण्यात आली आहे. मुलाची व पीड‌ित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. मुलीची स्थिती गंभीर आहे.

दरम्यान, तळेगाव येथील बालिकेवरील अत्याचाराचे पडसाद अनेक ठिकाणी उमटत असून वाडीवऱ्हे, गोंदे, मुकणे फाट्यावर तीन तासांपासून महामार्ग संतप्त नागरिकांनी रोखला. दहा किमी लांब वाहनांच्या रांगा तिथे लागल्या असल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘घाईने विधान करणे चुकीचे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पालकमंत्र्यांनी संपूर्ण माहिती न घेता अनावश्यक घाई करीत बलात्कार झाला नसल्याची भूमिका जाहीर करणे चुकीचे आहे. प्रकरण दडपण्याचा प्रयत्न पालकमंत्र्यांकडून होतोय की काय, अशी शंका त्यामुळे येऊ शकते, असे मत एका स्त्री रोगतज्ज्ञाने सोशल मीडियाद्वारे व्यक्त केले आहे. संबंधित मुलीची तपासणी झाली तेव्हा पोलिसांच्या परवानगीने तेथेच थांबलो होतो, असा दावा या डॉक्टरने केला आहे.

स्त्री रोगतज्ज्ञ म्हणून काही महत्त्वाचे मुद्दे या डॉक्टरने मांडले आहेत. मुलीच्या तपासणीचे अधिकृत पुरावे सिव्हिल हॉस्पिटलमधील महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे आहेत. त्यात पीडित मुलीला जखम झाल्याचे स्पष्ट होते, असा दावा या डॉक्टरने केला आहे. बलात्कार झाला किंवा नाही हे स्पष्ट व्हावे, यासाठी काही नमुने तपासणीसाठी घेतले असून, फॉरेन्सिक लॅबचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे. अहवाल येईपर्यंत पालकमंत्र्यांनी घाईने कुठलेही विधान करणे चुकीचे ठरेल. घडलेल्या घटनेबाबत तेवढेच गांभीर्य दाखविले गेले पाहिजे. कायदा व न्यायवैद्यक विभाग यांची एकत्रित शहानिशा होऊन सर्व निष्कर्ष हाती येईपर्यंत सरकारने तपास यंत्रणांना सहकार्य करावे, अशी अपेक्षा संबंधित डॉक्टरने व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बससेवा विस्कळीत, प्रवाशांचे हाल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबकेश्वर येथील घटनेनंतर जिल्ह्यात आंदोलकांनी सात बसेस जाळल्या, तर नऊ बसेसचे नुकसान केले. त्यामुळे एसटी महामंडळाने दुपारनंतर जिल्ह्यातील बसेस बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. नाशिक शहरातही या आंदोलनाचा फटका बसला. चार वाजेनंतर शहर बस सेवाही बंद झाल्यामुळे प्रवाशांना रिक्षांचा आधार घ्यावा लागला. या बस बंदचा फटका वणीच्या यात्रेलाही बसला. रविवारची सुटी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली होती. पण बससेवा बंद केल्यामुळे त्यांचाही हिरमोड झाला. वणीमध्येही बस बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविक अडकल्याचे वृत्त आहे.

सकाळी सुरू झालेल्या रास्ता रोकोनंतर ठिकठिकाणच्या आंदोलनाने हिंसक रूप धारण करीत अनेक गाड्यांचे नुकसान केले, तर काही गाड्या जाळून टाकल्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर त्याचा परिणाम झाला. वणी येथे सकाळपासून २९ बस सोडण्यात आल्या. त्यानंतर ठिकठिकाणी घटलेल्या घटनांची माहिती येऊ लागल्यानंतर दुपारी १२ नंतर मात्र हळूहळू बससेवा बंद करण्यात आली.

वणी यात्रेला फटका

वणीच्या यात्रेसाठी जिल्हाभरातील १३ आगारातून १९५ बसेस थेट सप्तशृंगी गडावर प्रवाशांना जाण्यासाठी सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र या आंदोलनामुळे या बसेस बंद करण्यात आल्या. केवळ नांदुरीफाटा ते सप्तशृंगी गड येथे भाविकांसाठी ठेवलेल्या बस सुरू ठेवण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>