Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

परिकथेतील राजकुमाराशी प्रज्ञाची सप्तपदी

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

प्रत्येकी युवती आयुष्यातील विवाहाच्या सुवर्णक्षणाची प्रतीक्षा करीत असते. अनाथ प्रज्ञा सुरेश खिल्लारेच्या आयुष्यात हा क्षण १९ व्या वर्षांच्या आतच आला... सुशील, सुस्वरूप प्रज्ञा गुजरातची सून झाली. सूरतमध्ये हिरे कंपनीत पैलू पाडणाऱ्या जितेंद्र हिरप्रा याच्याशी तिचे शुभ मंगल झाले आहे.

जेलरोड येथील नारी आधार केंद्रात विठ्ठल दिनकर व त्यांची पत्नी सुमन हे निराधार मुलींचा सांभाळ करतात. या मुली नोकरी-व्यवसाय करून शिक्षण घेतात. सूरतचे राहुल व्याकरिया यांचा ट्रॅव्हलिंगचा व्यवसाय आहे. नाशिकरोडला आल्यावर त्यांचा परिचय रमेश जोशी यांच्याशी झाला. त्यांनी आपला दहावी झालेला मित्र जितेंद्रसाठी उपवर वधू पाहण्याची विनंती केली. जोशी त्यांना नारी केंद्रात घेऊन आले. प्रज्ञाशी बोलणी झाल्यानंतर जितेंद्र त्याची बहीण वैशालीला घेऊन आला. सर्वांना प्रज्ञा पसंत पडली. अनाथ मुलीचा आधार होता येणार असल्याने जितेंद्रच्या कुटुंबीयांनीही विवाहास होकार दिला.

14-1

पुरेपूर खबरदारी

या केंद्राच्या नियमानुसार जितेंद्रने डॉक्टरांचा एचआयव्ही रिपोर्ट सादर केला. त्यानंतर नारी केंद्राच्या सहव्यवस्थापन समितीच्या अधिक्षीका शोभा गायकवाड, नगरसेविका मंगला आढाव, सचिव सुमन दिनकर, समाजसेविका कल्पना गोपनर यांच्या पॅनलने जितेंद्रची मुलाखत घेतली. विठ्ठल दिनकर, कल्पना गोपनर, रमेश जोशी यांची टीम गृह चौकशी अहवालासाठी जितेंद्रच्या कंपनीत व घरी जाऊन आली. जितेंद्रच्या भावजिंजवा ग्रामपंचायतीचा रहिवासाचा दाखला, आधारकार्ड, वाहन परवाना, कंपनीचे आयकार्ड, रेशनकार्ड मिळविण्यात आले. सुरत पोलिसांनी कॅरेक्टर सर्टिफिकेट दिले. यानंतरच नारी केंद्राने विवाहाला मान्यता दिली. जितेंद्रकडून प्रज्ञाच्या नावे ५० हजारांचे फिक्स्ड डिपाजिट व सद््वर्तणुकीचा बाँड लिहून घेण्यात आला.

14-1

वैदिक पद्धतीने विवाह

जेलरोडच्या नारी केंद्रात शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या मुहूर्तावर वैदिक पद्धतीने प्रज्ञा व जितेंद्रचा शुभविवाह पार पडला. त्यानंतर विवाह निबंधक कार्यालयात विवाहाची नोटीस देण्यात आली. महापालिकेतही मॅरेज सर्टिफिकेटसाठी अर्ज देण्यात आला. विवाहाला नगरसेविका मंगला आढाव, विठ्ठल दिनकर, सुमन दिनकर, रमेश जोशी आणि प्रज्ञाच्या केंद्रातील मैत्रिणी वऱ्हाडी होते. जितेंद्रचा मित्र राहुल व्याकरिया, बहीण वैशाली विपूलराय, आई-वडील, व परिसरातील काही नागरिक उपस्थित होते.

अनाथाचा नाथ

'मटा'शी बोलताना जितेंद्र म्हणाला, की अनाथाचा नाथ होण्याचे भाग्य लाभल्याने समाज काय म्हणेल याची फिकीर मी केली नाही. मनासारखा जीवनसाथी मिळाल्याबद्दल मी देवाचा आभारी आहे. प्रज्ञा अजूनही स्वप्नातच वावरत आहे. नेत्राच्या कडा पुसत ती म्हणाली, की एवढ्या लवकर विवाहाचा योग येईल, असे वाटले नव्हते. दुःखाचे व कष्टाचे दिवस आता संपले आहे. जितेंद्रच्या कुटुंबीयांच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. जितेंद्रची बहीण वैशाली विपूलराय म्हणाली, की प्रज्ञा आम्हाला पहिल्या भेटीतच पसंत पडली होती. आई-वडिलांनी सांगितल्यावर त्यांनीही आनंदाने होकार दिला. इतरांनीही हा आदर्श घ्यावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एसटी डेपोची जागा ‘आरटीओ’ला द्या!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

येथील आर्टिलरी सेंटर रोडवरील एसटीच्या नवीन डेपोची पाहणी शनिवारी (दि. ९) खासदार हेमंत गोडसे यांनी केली. या डेपोचा वापर होत नसल्याने येथे आरटीओचे विभागीय कार्यालय सुरू करावे, अशी मागणी या वेळी कार्यकर्त्यांनी केली.

राज्य परिवहन महामंडळाने कुंभमेळ्यासाठी नाशिकरोड आर्टिलरी सेंटर रोडवरील हा एसटी डेपो परिवहन महामंडळाने कोट्यवधी रूपये खर्च करून मोठ्या जागेत स्थापन केला आहे. हा डेपो हा सन २०१५ च्या कुंभमेळ्यासाठी फक्त तीन दिवस वापरला गेला. त्यानंतर डेपोचा आजपर्यंत वापर झालेला नाही. यामध्ये कार्यालयासाठी अन्य इमारतीही बांधलेल्या आहेत. त्याचबरोबर डिझेल भरण्याची सुविधा आहे. डेपोच्या काही जागेवर आरटीओचे नाशिक रोड उपविभागीय कार्यालय चालू करण्यासाठी वेळोवेळी मागणी झालेली आहे. तसेच संबंधितांना निवेदनेही देण्यात आली आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले.

खासदार हेमंत गोडसे यांनी शनिवारी (दि. ९) डेपोची पाहणी केल्यानंतर येथे आरटीओचे कार्यालय सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. खासदार गोडसे यांनी एसटीच्या विभागीय नियंत्रक यामिनी जोशी यांच्याशी फोनवर डेपोच्या जागेबद्दल चर्चा केली. त्यावर जोशी यांनी, या जागेबद्दल आरटीओकडून प्रस्ताव आल्यास या जागेबद्दल विचार केला जाईल, असे सांगितले. या वेळी शिवसेना पदाधिकारी सुनील देवकर, शाम खोले, योगिता देवकर, हरीभाऊ पूंड, शरद जाधव, तानाजी जाचक, सदाशिव खोले, वाल्मीक बागूल, मोहन गायकवाड, नरेंद्र खोटे, रमेश गायकवाड, सुनील मगर आदींसह नागरिक उपस्थित होते.

या आहेत अडचणी

एसटी डेपो लोकवस्तीत उभारलेला आहे. तसेच आर्टिलरी सेंटर रोड अरुंद असल्याने त्यात दूभाजक टाकण्यात आले आहे. त्यामुळे एसटी डेपोतून एसटी बाहेर पडण्यासाठी जागाच नाही. एसटी बाहेर आल्यास वाहतूकीला अडथळा होतो. यामुळे प्रसंगी अपघातही होण्याची भीती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रॅलीद्वारे एकात्मतेेचा जागर

$
0
0

राष्ट्रीय एकता मंच एकात्मतातर्फे आयोजन

म. टा. वृत्तसेवा, जुने नाशिक

'एकबार बट चुँके, अब नहीं बटेंगे', 'हिंदू-मुस्लिम भाई भाई', 'सारे जहाँसे अच्छा हिंदूस्ता हमारा', 'हमारा नारा, भाई चारा', 'अमन शांती के दुश्मनों दूर हटो दूर हटो', 'विविधता में हिंदू-मुस्लिम एकता', 'गणेशोत्सव के साथ ईदभी मनायेंगे' अशा राष्ट्रीय एकात्मतेच्या घोषणा देत शनिवारी (दि. ९) जुने नाशिक भागात सद््भावना रॅली काढण्यात आली. या संवेदनशील भागातून उर्दू शाळांमधील विद्यार्थी- विद्यार्थिनींनी राष्ट्रीय एकता मंचतर्फे एकात्मता सद््भावना रॅली काढत एकतेचा संदेश दिला.

यंदा गणेशोत्सव व बकरी ईदचा सण एकत्रित आल्याने दोन्ही सण बंधूभाव व जातीय सलोख्यात शांततेत साजरे व्हावे यासाठी राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचा सर्वधर्मियांना एकतेचा संदेश देण्यासाठी राष्ट्रीय एकता मंचातर्फे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

या रॅलीत नागरिकांसह जुने नाशिकच्या नॅशनल उर्दू हायस्कूल फॉर गर्ल्स, इकरा प्रायमरी स्कूल, रहेनुमा उर्दू शाळा घासबाजार, रहेनुमा उर्दू हायस्कूल वडाळारोड, जेएमसीटी पॉलिटेक्निक आदी शाळांमधील शेकडो विद्यार्थ्यांनी रॅलीत सहभाग घेतला.

या वेळी पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल, सहाय्यक आयुक्त राजू भुजबळ, हबीब खान, मीर मुख्तार अशरफी, हाजी वसीम पिरजादा, खतीब-ए-शहर हाफीज हिसामुद्दीन मियाँ, अनिल सुकेणकर, जगबीर सिंग, शंकर बर्वे, मौलाना नदीम, हाजी सादीक शेख हिंदू-मुस्लिम एकता याविषयावर मनोगत व्यक्त करत मार्गदर्शन केले.

सध्याला वाढलेल् या द्वेष पसरविण्याच्या भावनेला तडा देत या रॅलीचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे हिंदू-मुस्लिम एकता जोपाली गेली आहे.शहरातील समस्त शांतताप्रिय नागरिकांनी मोठ्या संख्येने यात सहभाग घेत या रॅलीला पाठिंबा दर्शविला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. राष्ट्रीय एकता मंचचे शेख आसिफ इब्राहिम यांनी सूत्रसंचालन केले. दिलीपसिंग बेनिवाल, नितीन शुक्ल, सिराजुद्दीन हुड्डा, सलिम बटाडा, रऊफ पटेल, शेख नदीम अहेमद, विनायक पाईकराव, डॉ. खान अख्तर-उल-इमान, शब्बीर इलेक्ट्रीकवाला आदींचे रॅलीच्या यशस्वीतेसाठी सहकार्य मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेती महामंडळाच्या जमिनीसाठी प्रलोभने

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शेती महामंडळाच्या जमिनींची परस्परविक्री करण्याचे धाडस काही एजंटांनी सुरू केले असून, यात काही शेतकरीही अडकल्याचे सांगितले जात आहे. मालेगाव तालुक्यात महामंडळाची जमीन असून, दोन गुंठे जमीन घरांसाठी आणि ५ एकर जमीन शेतीसाठी मिळवून देण्याचे आमिष दिले जात आहे. याची दखल महामंडळाने घेतली असून, या भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन महामंडळाने केले आहे.

गेल्या वर्षीच तब्बल ६० वर्षांच्या लढ्यानंतर शेती महामंडळाच्या ताब्यात असलेल्या खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनी परत करण्यात आल्या. त्यानंतर आता महामंडळाकडे असणाऱ्या उर्वरित जमिनींपैकी दोन गुंठे जमीन घरासाठी व ५ एकर जमीन शेतीसाठी मिळवून देतो, असे सांगत प्रलोभने देऊन फसवणूक करण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे. शेती महामंडळाची नाशिक जिल्ह्यात मालेगाव भागात जमीन आहे.
महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाकडे २५ हजार एकर जमीन ताब्यात होती. त्यात पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर व नाशिक विभागातील नाशिक आणि नगर जिल्ह्यातील खंडकरी शेतकऱ्यांचा समावेश होता. ही जमीन पुन्हा शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार माधवराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली प्रदीर्घ लढा देण्यात आला. त्यानंतर पुणे विभागातील १२,३६४ आणि नाशिक विभागातील १२,०५३ एकर शेतजमिनींचे वाटप करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला. त्यानंतर यातील बहुतांश जमीन देण्यात आली आहे. मात्र, आता उर्वरित जमिनीसाठी १४ शेतमळ्यांवर जमिनीबाबत खोटी आश्वासने देऊन फॉर्म भरून घेतले जात आहेत. त्यासाठी पैसेसुद्धा घेतले जात आहेत. याबाबत महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाने खुलासा करून असा व्यवहार करणाऱ्यास सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

महामंडळाने आता वृत्तपत्रात जाहिराती देण्यापासून विविध प्रकारची जनजागृती सुरू केली असून, भामट्यांपासून सावध राहतानाच कुठलाही व्यवहार करू नये, यासाठी आक्रमक धोरण स्वीकारले आहे, तसेच महामंडळाच्या पुणे येथील कार्यालयात ०२०- २५६५०५५१ या क्रमांकावर तक्रार करावी किंवा अधिक माहिती देण्यासाठी संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वनविभागात घोटाळा?

$
0
0

संयुक्त वन व्यवस्थापन समितीची संमती न घेताच कामे

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विविध कारणांमुळे सातत्याने चर्चेत असलेला वनविभाग आणखी एका कारणासाठी चर्चेत आला आहे. संयुक्त वन व्यवस्थापन समितीची मान्यता न घेताच वनविभागाने अनेक कामे केल्याचा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे, यासंबंधीची तक्रारच नाशिक पोलिसांच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर करण्यात आली आहे. त्यामुळे या साऱ्या प्रकाराची चौकशी होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नाशिक शहर पोलिसांनी व्हॉट्सअॅपवर तक्रार करण्याचे आवाहन केल्यानंतर त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे. वनविभागाने नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात स्थापन केलेल्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीने खर्चास ग्रामसभेची मंजुरीच घेतली नसल्याची तक्रारही पोलिसांना प्राप्त झाली आहे. या तक्रारीची चौकशी पोलिस आयुक्त करणार का, ही तक्रार निकाली निघणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे थेट तक्रार करता यावी म्हणून शहर पोलिसांनी व्हॉट्सअॅप सुरू केले आहे. त्यासाठी ९७६२१००१०० हा नंबर उपलब्ध करून दिला आहे. कोणत्याही व्यक्तीला या व्हॉट्सअॅप नंबरवर तक्रार करता येऊ शकते. पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा सुरू झाली असली तरी त्यात थेट गैरव्यवहाराच्या तक्रारी आल्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. विशेष म्हणजे आयुक्तांचे कार्यक्षेत्र नाशिक असल्यामुळे ग्रामीण भागातल्या या समितीच्या ही तक्रार आहे. त्यामुळे ती जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे वर्ग केली जाण्याची शक्यता आहे.

राज्यात १२ हजारांहून अधिक वनसंरक्षक समित्या वनविभागाने स्थापन केल्या. या समितीमार्फत गाव पातळीवर इको टुरिझम, संत तुकाराम वनग्राम योजना, बायोगॅस या योजनांबाबतचा निधी संयुक्त वन व्यवस्थापन समितीला देण्यात येतो. या खर्चास ग्रामसभेची मंजुरी घेणे आवश्यक आहे. असे असताना त्याला मंजुरी घेण्यात येत नसल्यामुळे २०१३ मध्ये महसूल व वनविभागाने अनेक मार्गदर्शक सूचना करून नियमावली तयार केली. पण या सर्व नियमावलीला धाब्यावर बसवत वनसमित्यांनी खर्च केला असल्याची तक्रार करण्यात आली आहे. सदर समिती पूर्वी सार्वजनिक न्यासकडे नोंदणी केल्या जात असत. त्यानंतर २०११ पासून वनसमिती गावाच्या ग्रामपंचायतीच्या उपसमिती म्हणून जोडण्याचा निर्णय वनविभागाने व ग्राम विकास विभागाने संयुक्तपणे घेतला. या समितीने कोणताही खर्च करण्याअगोदर त्याचा नियोजीत खर्चाचा आराखडा करून ग्रामसभेची मंजुरी घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे २० हजारांपेक्षा जास्त खर्च करतानाही त्याला ग्रामसभेची मंजुरी आवश्यक आहे.

कारवाईकडे लक्ष

सटाणा येथे या समितीत असाच गैरव्यवहार झाल्यामुळे सहा महिन्यांपूर्वी सहा अध्यक्ष व वनपाल असलेल्या सचिवावर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर १ सप्टेंबर रोजी न्यायालयात त्याबाबत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या समितीत कोट्यवधीचा गैरव्यवहार झाला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पोलिस या तक्रारीवर काय कारवाई करतात हे महत्त्वाचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आळंदी वाढवणार नाशिकची डोकेदुखी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आळंदी धरणाचा समावेश गंगापूर धरणसमूहात करण्याचा जलसंपदा विभागाचा प्रशासकीय बदल नाशिककरांची डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत. मराठवाड्याला पाणी सोडण्याच्या प्रश्नावरून मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण आळंदीचे पाणी गंगापूर धरणात येणार नसले तरी मराठवाड्यासाठी गंगापूर धरणसमूहातूनच पाणी सोडले जात असल्याने यापुढील काळात मोठा वाद उभा ठाकण्याची शक्यता जल क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

जलसंपदा विभागाने जिल्ह्यातील धरणाच्या समूहात बदल केल्यानंतर गंगापूर धरणसमूहाला त्याचा फटका बसणार आहे. या बदलामुळे गेट नसलेल्या आळंदी धरणाचाही भार येणार आहे. त्यामुळे जास्त पाणी तीन धरणांतून सोडावे लागणार आहे. या सर्व चर्चेला पूर्णविराम देत जलसंपदा विभागाने जायकवाडी धरण ६५ टक्के भरल्यामुळे आता पाणी सोडण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. धरणसमूहातील हे बदल केवळ प्रशासकीय सोयीसाठी असून, रिपोर्टिंग करणे सोपे जावे यासाठी आहे. त्यामुळे या बदलाचा कोणताच फरक पडणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे. मात्र, जल क्षेत्रातील अभ्यासक आणि मान्यवरांनी ही बाब अतिशय डोकेदुखी ठरणार असल्याचे म्हटले आहे.

धरणसमूहात बदल केल्यामुळे जलतज्ज्ञ समितीच्या सदस्यांबरोबरच अनेक सामाजिक संस्थांनी जलसंपदा विभागावर प्रश्नांचा भडिमार केल्यानंतर जलसंपदा विभागातर्फे हे स्पष्ट करण्यात आले आहे. गंगापूर धरणसमूहात गंगापूर, काश्यपी, गौतमी गोदावरी यांचा समावेश होता; पण आता आळंदीचा समावेश केल्यामुळे हे प्रश्न उपस्थित करण्यात आले. मेंढगिरी समितीने दिलेल्या तक्त्याप्रमाणे जायकवाडी धरण जर ६५ टक्के भरले तर गंगापूर, काश्यपी व गौतमी गोदावरी धरण समूहात ८२ टक्केच पाणी शिल्लक ठेवण्यात येऊन उर्वरित पाणी सोडण्याचे म्हटले होते. त्यामुळे गंगापूर धरणातून ५२४ दशलक्ष घनफूट, काश्यपीतून २३५, गौतमी गोदावरीतून ३३७ व आळंदीतून १७५ दशलक्ष घनफूट पाणी सोडावे लागले असते; पण जलसंपदा विभागाने याबाबत खुलासा करत आता पाणी सोडण्याची गरज नसल्याचे सांगितले असले तरी आळंदीचा समावेश करण्यात आल्यामुळे त्याचा भारही गंगापूर धरणारवर येईल, ही भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. आळंदी धरणाला गेट नाही. त्यामुळे या धरणातून पाणी सोडू नये, असेही मेंढगिरी समितीने सुचवल्यामुळे जलतज्ज्ञांमध्येही संभ्रम आहे. यावर जलसंपदा विभागाने आपली भूमिका मांडत या प्रश्नाला उत्तर दिले. नाशिक जिल्ह्यातून गंगापूर धरणसमूह व दारणा समूहातून पाणी सोडले जाते. आळंदी धरण हे दारणा समूहात अगोदर दाखवण्यात येत होते. त्यानंतर आता हे धरण काही दिवसांपासून गंगापूर धरणात दाखवण्यात येत असल्यामुळे याबाबत जलसंपदा विभागाला पाणीप्रश्नावर संघर्ष करणाऱ्या संघटनांनी विचारणा केली आहे, तसेच मराठवाड्याला पाणी देण्याच्या प्रश्नावरून येत्या काळात मोठा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कायदा व सुव्यवस्था राखा

$
0
0

पोलिस आयुक्तांचे मोर्चेकऱ्यांना आवाहन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मराठा समाजातर्फे आयोजित मूकमोर्चावेळी शहराची कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी आयोजकांना केले आहे. हा मूकमोर्चा असून, कुठलाही अनूचित प्रकार घडणार नाही, अशी ग्वाही मराठा समाजातील प्रमुख नेत्यांनी दिली.

या मोर्चाचा अंदाज घेण्यासाठी पोलिस आयुक्तालयात शनिवारी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीत मराठा समाजाच्या नियोजित मूकमोर्चासंदर्भात, तसेच मोर्चाच्या मार्गाची माहिती घेण्यात आली. बैठकीला खासदार हेमंत गोडसे, माजी मंत्री प्रशांत हिरे, मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी खासदार देवीदास पिंगळे, शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते, उद्धव निमसे, शैलेश कुटे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांसह पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, उपायुक्त विजय पाटील, दत्तात्रय कराळे, श्रीकांत धिवरे, लक्ष्मीकांत पाटील, वाहतूक शाखेचे पोलिस अधिकारी उपस्थित होते.

मोर्चामध्ये सुमारे १० लाख मराठा समाज सहभागी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. बैठकीत मोर्चासंदर्भातील नेत्यांची भूमिका जाणून घेण्यात आली. मोर्चातून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही वा कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहन सिंघल यांनी केले. मोर्चासाठीचा मार्ग सुमारे साडेसहा किलोमीटरचा असून, कोणतीही घोषणा दिली जाणार नाही. तसेच, कोणत्याही समाजात तेढ निर्माण होईल, असे कोणतेही वक्तव्य केले जाणार नाही. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था बिघडण्याचा प्रश्‍नच उद्भवणार नाही, अशी ग्वाही बैठकीला उपस्थित मराठा समाजाच्या नेत्यांनी दिली.

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

आयुक्त डॉ. सिंघल यांनी मोर्चाच्या मार्गाबाबत पोलिस स्वत: निरीक्षण करतील. त्यात काही बदल असल्यास संयोजकांना त्यासंदर्भात कळविले जाईल, असे सांगितले. शहराची कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा पुरेपूर बंदोबस्त असेल मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आंदोलकांनीही दक्षता बाळगावी, असे आवाहन केले. पुन्हा यासंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक बोलविली जाईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवला पैठणी केंद्रावर नियंत्रण कुणाचे?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला शहराजवळील अंगणगाव येथील कायमच या ना त्या कारणाने चर्चेत अन् वादाच्या भोवऱ्यात असणारे 'येवला ग्रामीण पैठणी पर्यटन केंद्र' आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्याला कारण ठरले आहे नांदगावचे आमदार पंकज भुजबळ यांचे मनमाड येथील स्वीय सहाय्यक. त्यांनी शनिवारी दुपारी येवला शहरातील पैठणी विणकरांची एक बैठक घेतली. यामुळे पैठणी पर्यटन केंद्रावर नेमके कुणाचे नियंत्रण आहे, असा सवाल आता येवल्यातील पैठणी विणकरांकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे.

पैठणी पर्यटन केंद्रातून काही महिन्यांपूर्वी पैठणी वगळता इतर साड्यांच्या विक्रीवर पर्यटन खात्याकडून बंदी आणली जात असतानाच शनिवारी आमदार भुजबळ यांचे मनमाड येथील स्वीय सहाय्यकाने स्थानिक विणकरांची बैठक घेतली. पैठणीचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येवलानगरीत पैठणी खरेदीसाठी पर्यटकांची रीघ लागावी, पैठणी उत्पादन अन् विक्रीला चालना मिळावी, यासाठी माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून येवला शहराजवळील अंगणगाव येथे येवला ग्रामीण पैठणी पर्यटन केंद्राची निर्मिती करण्यात आली होती. पैठणी पर्यटन केंद्रातून पैठणीची विक्री व्हावी हा मुख्य उद्देश असताना या ठिकाणी इतर साड्यांसह जर्दोशी साड्यांची विक्री केली जात होती. पर्यटकांची दिशाभूल उघडपणे केली जात असताना याबाबत अनेक तक्रारी पर्यटन खात्याकडे विणकरांनीच केल्यानंतर तत्कालीन प्रादेशिक पर्यटन अधिकारी प्रज्ञा बढे-मिसाळ यांनी ही विक्री बंद पाडली होती. पर्यटन खात्याकडून येवला ग्रामीण पैठणी पर्यटन केंद्राचा कारभार मुंबई रा. रा. फाऊंडेशन या संस्थेला करारानुसार देण्यात आल्यानंतर या पैठणी पर्यटन केंद्रावर महात्मा फुले अकादमीचे नियंत्रण पर्यटन केंद्र सुरू झाल्यापासून आहे. केंद्रावर तांत्रिक सल्लागार म्हणून विक्रम गायकवाड यांची नेमणूक करण्यात आली आहे. येवला पैठणी क्लस्टरच्या अध्यक्षपदी आमदार पंकज भुजबळ यांची वर्णी असून, शहरातील काहींची संचालकपदी नेमणूक आहे. येवला ग्रामीण पैठणी पर्यटन केंद्राशी कुठलाही संबंध नसताना पैठणी क्लस्टरच्या संचालकांनी या ठिकाणी दोन वर्षांपासून हस्तक्षेप सुरू केल्याने शहरातील खरा विणकर वर्ग दुखावला गेला आहे. येवला ग्रामीण पैठणी पर्यटन केंद्रातून यातील काहींनी स्वत:चा व्यवसाय सुरू केल्याने पर्यटन केंद्राची नाचक्की झाली होती. त्यातच आमदार पंकज भुजबळ यांच्या स्वीय सहाय्यकाने शनिवारी दुपारी पैठणी पर्यटन केंद्रात विणकरांची बैठक घेतली. या बैठकीला शहरातील मोजके २० ते २५ विणकर उपस्थित होते.

बैठकीत विणकरांकडून नवनवीन सूचना पैठणीत बदल घडविण्यासाठी मागविण्यात आल्याचे समजते. पैठणी क्लस्टरचे संचालक प्रवीण पहिलवान यांनी पैठणी पर्यटन केंद्रातील विक्रम गायकवाड यांना असलेले अधिकार त्वरित काढून घेण्याची मागणी आमदार पंकज भुजबळ यांच्या स्वीय सहाय्यकांकडे केली. पैठणी पर्यटन केंद्रात वास्तविकपणे शहरातील सर्व विणकरांना विश्‍वासात घेऊन बैठकीचे आयोजन व्हायला होते, अशी अपेक्षा अनेक विणकरांनी केली आहे. पैठणी पर्यटन केंद्रावर खरा अंकुश कोणाचा आहे, असाही प्रश्‍न विणकरांनी उपस्थित केला आहे. आमदार पंकज भुजबळ यांच्या स्वीय सहाय्यकाने बोलविलेल्या या बैठकीला पैठणी क्लस्टरच्या काही संचालकांनी उपस्थिती लावल्यानंतर उर्वरित संचालकांनी आपणास न बोलावल्याची खंत व्यक्त केली आहे. बैठकीला प्रवीण पहिलवान, विनोद बाकळे, सुरेश कुंभारे, अनभुले, संजय विधाते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बँक भामट्यांच्या घरावर पोलिसांचा छापा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

बँक अधिकारी असल्याचे भासवून एकाने एटीएमचा पीन नंबर घेऊन बँक ग्राहकाच्या खात्यातून सुमारे ५० हजार रुपये परस्पर काढून घेतले होते. या प्रकरणी ना‌शिकरोड पोलिसांनी या भामट्याच्या झारखंडमधील राहत्या घरी छापा टाकून पाच लाख रुपयांची रक्कम व इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त केला. मात्र संशयित पळून जाण्यास यशस्वी झाला.

जुलै महिन्यात अजय शिवशंकर गुप्ता (रा. म्हसोबानगर, चेहेडी शिव) यांनी आपल्या बँक खात्यावरून एटीएमचा पीन नंबर घेत संशयितांनी बँक अधिकारी असल्याचे सांगून तब्बल ४८,७२८ रुपयांची रक्कम परस्पर काढून घेतल्याची तक्रार नाशिकरोड पोलिस ठाण्यात दि.२ सप्टेंबरला दाखल केली होती. ज्या मोबाइल क्रमांकावरुन अजय गुप्ता यांना या बनावट बँक अधिकाऱ्याने फोन करून एटीएमचा पीन नंबर घेतला होता, त्या मोबाइल नंबरचे लोकेशन थेट झालखंड राज्यातील गांडेय पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मरगोडीह असे मिळाले होते. त्यानंतर नाशिकरोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश मजगर यांच्या नेतृत्वाखाली किशोर खिल्लारे, भूषण चंडेल यांच्या पोलिस पथकाने झारखंडच्या स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने थेट मरगोडीह येथे रोहित मंडल या संशयिताच्या घरी छापा टाकला. या छाप्यात तब्बल पाच लाख दहा हजार रुपयांची रक्कम आढळून आली. मात्र मुख्य संशयित रोहित मंडल या छाप्यावेळी फरार होण्यात यशस्वी झाला, अशी माहिती पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी दिली.

सर्वच बँकाची एटीएम कार्ड जप्त

घरात पोलिसांना बनावट चेकबुक, अॅक्सिस, बॅँक ऑफ बडोदा, एसबीआय व बँक ऑफ इंडिया या बँकाचे एटीएम कार्डही आढळून आले. तीन तास ही कारवाई सुरू होती. नाशिकमधील २० ते २५ नागरिकांच्या बँक खात्यावरून रोहित मंडल याने बँक अधिकारी असल्याचे भासवून पैसे काढलेले असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. नाशिकरोड पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अंतर्गत हा गुन्हा दाखल झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कबड्डीला सुगीचे दिवस

$
0
0

fanindra.mandlik@timesgroup.com
Tweet : @fanindraMT
नाशिक ः ग्रामीण भागात प्रामुख्याने खेळल्या जाणाऱ्या कबड्डीने अचानक कात टाकली असून शहरात कबड्डी खेळणाऱ्यांच्या संख्येत दोन वर्षांत दुप्पट वाढ दिसून आली आहे. विशेष म्हणजे सांघ‌िक खेळाकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालकांनीदेखील यात रस दाखवण्यास सुरुवात केली आहे. आयपीएलच्या धर्तीवर दोन वर्षांपासून प्रो-कबड्डी सामने टीव्हीवर प्रचंड लोकप्रिय होत असून, त्यामुळेच खेळाडूंच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
कबड्डी हा खेळ शहरात पूर्वी कमी प्रमाणात खेळला जात असे. नाशिक शहरातील, रचना क्लब, गुलालवाडी व्यायामशाळा, यशवंत व्यायाम शाळा येथील ठराव‌िक खेळाडू यात सहभागी होत असत. हा खेळ सांघ‌िक असल्याने पालकांचादेखील या खेळाकडे कमी ओढा होता. वैयक्त‌िक खेळाकडे जास्त होता. मात्र प्रो-कबड्डीमुळे याचा प्रसार व प्रचार चांगला झाल्याने पालक स्वतःहून मुलांना हा खेळ खेळण्यास प्रवृत्त करीत आहे.
१९३६ सालापासून कबड्डीने महाराष्ट्रात चांगला जोर धरला. हा खेळ शास्त्रशुध्द व्हावा यासाठी बडोद्याचा हिंदू जिमखाना, पुणे येथील डेक्कन जिमखाना व महाराष्ट्राचा शारीरिक शिक्षण विभाग यांनी नियमावली तयार केली. त्यानुसार हा खेळ खेळला जाऊ लागला. या खेळाचा प्रसार व्हावा यासाठी १९५२पासून राज्यस्तरीय स्पर्धेला सुरुवात झाली. तेव्हा या खेळाने चांगला जोर धरला. सुरुवातीला एखादा खेळाडू बाद झाल्यास तो मैदानाबाहेर जात नव्हता. कालांतराने या नियमात बदल करुन बाद झालेला खेळाडू मैदानाबाहेर बसू लागला आणि मैदानातून पुन्हा खेळायला येऊ लागला. याला संजीवनी पध्दत असे संबोधले जाऊ लागले. त्यानंतर तत्कालीन कलकत्ता येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या अशोक शिंदे, राजू भावसार यांनी चांगली कामगिरी करुन महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले. त्यानंतर अशियायी क्रीडा स्पर्धेतदेखील महाराष्ट्राने चांगली कामगिरी केली. मात्र, हा खेळ तितकासा जोर पकडत नव्हता. प्रो-कबड्डीच्या पहिल्या पर्वाला सुरुवात झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये या खेळाविषयी गोडी वाढू लागली. दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर मात्र आमूलाग्र बदल झाला. पूर्वी शालेयस्तरावर होणाऱ्या स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त १५ संघ सहभागी होत असत. आता हीच संख्या चाळीसच्या वर पोहचली आहे. मातीतील कबड्डीप्रमाणेच मॅटवरच्या कबड्डीनेही जोर धरला असून, नाशिक शहरातून चांगले खेळाडू तयार होत आहेत.
हा खेळ पूर्वी ग्रामीण भागातील अशिक्षित लोकांचा समजला जात होता. गरीब घरातील मुले तो जास्त प्रमाणात खेळत असत. आता परिस्थिती बदलली असून, पालक महागड्या चारचाकी गाड्यांमधून आपल्या पाल्यांना या खेळाच्या प्रशिक्षणासाठी घेऊन येत असल्याचे दृष्य व्यायामशाळेबाहेर पहायला मिळते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन् ‘त्या’ बातमीने गहिवरले गाव

$
0
0

चांदवड तालुक्यातील वाके खुर्द गावात शोककळा

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

भारतीय सैन्य दलाच्या राष्ट्रीय रायफलमध्ये गेल्या दहा वर्षांपासून निष्ठेने सेवा करणाऱ्या चांदवड तालुक्यातील वाकी खुर्द या हजार वस्तीच्या गावातील शहाजी गोपाळा गोरडे हा जवान शनिवारी (दि. १०) मध्यरात्री श्रीनगर येथे कुपवाडान‌जिक कर्तव्य बजावत असताना शहीद झाला. त्याच्या मृत्यूच्या बातमीने त्याचे अवघे गाव गहिवरून गेले आहे.

सामान्य शेतकरी कुटुंबातील ३४ वर्षांच्या या जवानाच्या आकस्मिक जाण्याचे वृत्त काळजाला चटका लावणारे पण त्याच्याबद्दलचा अभिमान द्विगुणित करणारे ठरले आहे. शहाजी गोरडे हा सामान्य कुटुंबात वाढला. आपले प्राथमिक शिक्षण गावातील मराठी शाळेत घेणाऱ्या आणि लासलगाव महाविद्यालयातून १२ वी कला उत्तीर्ण झालेल्या शहाजीला सैन्यात जाण्याची मनस्वी इच्छा होती. वृद्ध आई-वडील, पत्नी, एक आठ वर्षांची मुलगी आणि पाच वर्षाचा छकुला शहाजीच्या नसण्याने पोरके झाले आहेत. आमचा भाऊ कुटुंबाचा आधार होता ही भावना शहाजीचे भाऊ-बहीण बोलून दाखवित आहेत. ग्रामस्थ आपल्या लाडक्या जवानाचे पार्थिव गावात कधी येते याकडे डोळे लावून बसले आहे.

गावकऱ्यांना अभिमान

अपयश येऊनही पुन्हा प्रयत्न करून अखेर तो सैन्यासाठी निवडला गेल्याचे त्याचे मित्र दीपक जाधव यांनी सांगितले. शहाजी राष्ट्रीय रायफलमध्ये नायकपदी कार्यरत होता. गेल्या जुलैमध्येच तो गावी आला होता. या गावातून देशासाठी अठरा तरुण सैन्यात गेले आहेत. शहाजी आमच्या गावची शान असून त्याच्या कर्तव्याचा गावाला व परिसराला अभिमान आहे, अशी भावना सरपंच विक्रम जगताप यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाफेडमार्फत खरेदी केलेला कांदा सडला

$
0
0

केंद्र सरकारला २० कोटींचा फटका; पंधरा हजार टन कांदा वाया जाणार?

म. टा. वृत्तसेवा, निफाड

कोसळणाऱ्या कांद्याच्या दराला आळा घालून कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने नाफेडमार्फत कांदा खरेदी केला. मात्र तो कांदा आता नाफेडच्या गोडाऊनमध्ये सडला असून या खरेदीसाठी केंद्राने खर्च केलेले तब्बल वीस कोटी रुपयेदेखील वाया जाणार आहेत. त्यामुळे केंद्राला हा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. सरकारने ८०० रुपये भावाने खरेदी केलेला या कांद्याची टिकण्याची क्षमता फक्त ६ महिने होती. आता ६ महिने उलटून गेले आणि मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा असल्याने नाफेड कांदा बाजारात आणू शकत नाही. यामुळेच हा फटका सरकारला बसला आहे.

केंद्राने कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी ४ मे २०१६ रोजी केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी लोकसभेत तशी घोषणाही केली होती. कांदा उत्पादकांना दिलासा मिळण्यासाठी नाफेडमार्फत खरेदी करण्यात आलेला हा कांदा आता पूर्णत: सडला आहे.

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बाजार समितीतून ५ हजार मेट्रिक टन, लासलगाव व कळवण बाजार समितीतून १० हजार आणि गुजरात राज्याच्या सुरत बाजार समितीतून २ हजार मेट्रिक टन असा एकूण सतरा हजार मेट्रिक टन कांदा खरेदी करून तो नाफेडच्या गोदामांमध्ये साठवला होता. ज्या वेळेस कांद्याचा तुटवडा निर्माण होईल आणि कांद्याचे दर गगनाला भिडतील. त्या काळात कांदा बाजार आणून वाढलेल्या दरावर नियंत्रण मिळविण्याचा सरकारचा विचार होता. कांद्याच्या वाढलेल्या उत्पादनामुळे सध्या बाजारात कांद्याचे दर घसरले आहेत. पुन्हा एकदा शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने प्रतिक्विंटल कांद्याला एक रुपयाचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

एकूण सतरा हजार मेट्रिक टन कांद्यापैकी २ हजार मेट्रिक टन कांदाच फक्त विक्री झाला आहे. तर पंधरा हजार मेट्रिक टन कांदा आजही नाफेडच्या विपणनातील दोषांमुळे पडून आहे. या कांद्याला कोंब फुटले असून, त्याचा उग्र वास येत आहे.



उदासीन अधिकाऱ्यांची चूक

कांद्याचे कोसळते भाव स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा हा महत्त्वपूर्ण निर्णय होता. पण या निर्णयात शेतकरी, ग्राहकांना जरी दिलासा मिळाला असला, तरी सरकारचे मात्र वीस कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र यात चूक ही सरकारच्या उदासीन अधिकाऱ्यांची आहे. त्यांच्यामुळे हे नुकसान होणार आहे. केंद्र सरकारने हा कांदा नाशिक जिल्ह्यातील ३ मुख्य बाजार समित्यांमधून बाजारभावाप्रमाणे नाफेड आणि एसएफएसी या संस्थांद्वारे खरेदी केला होता.


सरकारने कांदा खरेदी केल्यानंतर कांद्याचे दर वाढल्याने तो बाजारात आणण्याचा विचार होता. पण सध्या ४०० रुपये प्रतिक्विंटल कांद्याला दर मिळतो आहे. त्यामुळे हा कांदा घाट्यात कसा विकायचा, हा प्रश्न आहे. त्याची टिकवण क्षमता संपली असून, कांदा सडू लागला आहे.

- नानासाहेब पाटील, नाफेड संचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पॉवरग्रीड’ बाधितांचे आज आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पॉवरग्रीडचे टॉवर कोसळू लागल्याने शेतकऱ्यांचा या कंपनीच्या गुणवत्तेवरील विश्वास ढासळू लागला आहे. सरकार शेतकरी तसेच त्यांच्या जीविताशी खेळत असून, या निषेधार्थ देहत्याग आंदोलन करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. वलखेड येथे सोमवारी (दि. १२) सकाळी १० वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे.

‌दिंडोरी तसेच निफाड तालुक्यात पॉवरग्रीडच्या माध्यमातून टॉवर उभारण्यात येत आहेत. मात्र हे टॉवर कोसळू लागल्याने बाधित शेतकऱ्यांना धडकी भरली आहे. या टॉवर्समुळे शेतीवर आणि पर्यायाने चरितार्थावरच गदा येणार असल्याने त्यास शेतकऱ्यांनी सुरुवातीपासूनच विरोध दर्शवला आहे. द्राक्षबागा, घरे तसेच लोकवस्ती नसलेल्या जागेतून टॉवरलाइन नेण्यास शेतकऱ्यांचा विरोध आहे. मात्र त्यास प्रशासन दाद देत नसल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक होण्याचा निर्णय घेतला आहे.

निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी येथील शेतकरी वसंत गायकवाड यांच्या शेतामध्ये २५ ऑगस्ट रोजी पॉवरग्रीड बाधित शेतकऱ्यांनी आत्मदहन आंदोलन सुरू केले होते. शेतकऱ्यांना अधिकाधिक नुकसान भरपाई दिली जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार अनिल कदम यांच्या उपस्थितीत दिले होते. निफाड तालुक्यातील साराळे खुर्द येथे १४ मार्च २०१५ रोजी तुकाराम भोसले या शेतकऱ्याच्या शेतीतील पूर्ण काम झालेला टॉवर कोसळला होता. आता पुन्हा १० सप्टेंबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास दिंडोरी तालुक्यातील वलखेड येथे गोटीराम मोरे यांच्या शेतामधील सुमारे ३०० फूट उंचीचा टॉवर कोसळला.

...तर जबाबदारी सरकारची

आम्हाला बाराही महिने शेतात राबावे लागते. आमच्या द्राक्षबागा आहेत. शेतात लोखंडी गज आणि तारांचे जाळे पसरलेले असते. भविष्यात टॉवरमधील तारांमध्ये विद्युत प्रवाह सुरू असताना टॉवर कोसळला, तर आमचा आणि आमच्या पुढील पिढ्यांचा जीव धोक्यात येईल. म्हणूनच अशा टॉवर उभारणी विरोधात शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. आमच्या जीविताला कोणताही अपाय झाला तर त्याची जबाबदारी सरकारची राहील असा इशारा संतोष पूरकर, विलास शेटे, शिवाजी बस्ते, दलोबा तिडके यांसह शेतकऱ्यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिन्नर, इगतपुरीत एकाचवेळी ड्रोन सर्व्हे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गासाठी राज्य सरकारला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जमीन संपादित करावी लागणार आहे. नेमकी कोठे किती जमीन संपादित करावी याचा अचूक अंदाज घेण्यासाठी ड्रोन सर्व्हे करण्यात येत असला तरी हे काम तात्पुरते थांबविण्यात आले आहे. मात्र गणेश विसर्जनानंतर १६ सप्टेंबरपासून पुन्हा सर्व्हेला सुरुवात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नागपूर आणि मंबई या दोन महानगरांदरम्यान वाहतूक व्यवस्था अतिशय गतिमान व्हावी, यासाठी समृध्दी महामार्गासारखा महत्त्वाकांशी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी नाशिक जिल्ह्यातील सुमारे १८०० हेक्टर जमीन राज्य सरकारला संपादित करावी लागणार आहे. इगतपुरी तालुक्यातील २०, तर सिन्नर तालुक्यातील २६ गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनीची सरकारला या महामार्गासाठी आवश्यकता भासणार आहे. आतापर्यंत महामार्गाच्या नियोजित जागांचा सॅटेलाईटद्वारे सर्व्हे करण्यात आला आहे. मात्र नेमक्या कोणत्या जमिनी या महामार्गासाठी घ्याव्या लागणार याचा अचूक अंदाज यावा, यासाठी ड्रोन सर्व्हेला सुरुवात करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आवक दुप्पट; दर निम्म्यावर!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भरमसाट आवक होत असल्याने भाजीपाला दरात कमालीची घसरण झाली आहे. पालेभाज्यांसह फळभाज्यांचेही दर २० रुपये किलोपर्यंत खाली आले आहेत. बाजारात मुळ्यांची आवक सुरू झाली असून, आठ मुळ्यांचे बंडल १८ ते २० रुपयांना मिळत आहे.

जुलै महिन्यांत विक्रमी पाऊस झाल्यानंतर मोठ्या प्रमाणाम भाजीपाल्याची लागवड करण्यात आली. यामुळे सध्या बाजारात दर्जेदार भाजीपाला विक्रीसाठी येऊनही दर मात्र घसरले आहेत. मेथी व कांदापात वगळता इतर पालेभाज्यांच्या दरात कमालीची घसरण झाली आहे. पालकची जुडी एक रुपयाने विकली जात असल्याने ‌उत्पादकांचा खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे. शेपूची जुडीही पाच ते दहा रुपयाला मिळत आहे.

उन्हाळ्यात डोळ्यांना पाणी आणणारी मिरची १५ ते २० रुपये किलोपर्यंत खाली आली आहे. वांगे, टोमॅटो, गवार, कोबी, फ्लॉवर, शिमला मिरची यांचे दरही १० ते २० रुपये किलोदरम्यान स्थिरावले आहेत. भेंडी, गिलके, दोडकेही २० रुपये किलोने मिळत आहेत. भोपळ्याचे दर तीन ते चार रुपयांनी कमी झाले असून, पाच रुपये नगने मिळत आहेत.

मुळ्यांची आवक सुरू

बाजारात मुळ्यांची आवक सुरू झाली आहे. रविवारी आठ मुळ्यांच्या बंडलला १८ ते २० रुपये भाव मिळाला. आवक कमी असली तरी येत्या काही दिवसात वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, सध्या भाजीपाल्याची भरमसाट आवक होत असल्याने आगामी काही दिवस तरी दरात वाढ होण्याची शक्यता कमी आहे, असे विक्रेत्याने सांगितले.

भाजीपाल्याचे किलोचे दर

मिरची - १५ ते २०, टोमॅटो - १० ते १५, कोबी - १५ ते २०, फ्लॉवर - २०, भेंडी - १५ ते २०, वांगे - १५, कारले - ८ ते १०, गिलके - २०, दोडके - २०,
शिमला मिरची - २०, गवार - २५ ते ३०, मेथी - १५ ते २५ रु. जुडी, कोथिंबीर - ३ ते १०, कांदापात - १० ते १८, शेपू - ५ ते १२, पालक - १,
मुळा - १८ ते २० बंडल, भोपळा - ५ रु. नग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गणेशोत्सवामुळे फुलांचा बाजार तेजीत

$
0
0

पवन बोरस्ते, कॉलेज क्लब रिपोर्टर

नाशिक : गणेशोत्सवासाठी आवश्यक सगळ्याच साहित्याचे दर वाढले आहेत. सध्या मागणी वाढल्याने फुलांच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. गणपतीला प्रिय असलेल्या जास्वंदीसाठी २५० ते ३०० रुपये मोजावे लागत आहेत.

लिली, मोगरा, गुलाब, शेवंती, ग्लॅडोज या फुलांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मलेशियातून मुंबईत येणाऱ्या आर्किडलाही २० नगांमागे ३०० ते ४०० रुपये मोजावे लागत आहेत. दुर्वांनाही मागणी असून, जुडी आता दोन ते पाच रुपयांना मिळत आहे. झेंडूची जाळी ११० ते १६० रुपयांना मिळत आहे. दमदार पावसामुळे लागवड वाढल्याने झेंडूची आवक वाढली आहे. यामुळे झेंडूच्या दरात किरकोळ वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

हार व पुष्पगुच्छांना मागणी

गणराय व गौराईंना विविध प्रकारचे हार घातले जातात. जास्वंदीच्या कंठी माळेसाठी सध्या ८० ते १०० रुपये, तर सफारी हारसाठी ३०० ते ४०० रुपये मोजावे लागत आहेत. द‌हा रुपयांना मिळणारी झेंडूची साधी माळही २० रुपयांना मिळत आहे. त्याचबरोबर पुष्पगुच्छही सध्या तेजीत आहे. साधा पुष्पगुच्छ आता ७० ते ८०, तर मोठा पुष्पगुच्छ १२० ते १५० रुपयांना मिळत आहे.

गणेशोत्सवामुळे आम्हाला फुलांची खरेदी फार महागात पडते. मजुरीमुळे फुलांचे भाव आणखी वाढतात. सध्या जास्वंदी, झेंडू, दुर्वा, हार यांना मोठी मागणी आहे. गणेशोत्सवापर्यंत तरी फुलांचे दर चढेच राहतील.

- भूषण गायकवाड, फुलविक्रेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालमत्तेचे ७१ टक्के गुन्हे अंधारात!

$
0
0

arvind.jadhav@timesgroup.com
Tweet: @ArvindJadhavMT

नाशिक : शहरात जानेवारी ते जुलैदरम्यान झालेल्या जबरी चोरी, चेन स्नॅचिंग, घरफोडी, चोऱ्या तसेच दरोड्यासारख्या मालमत्तेशी संबंधित तब्बल ७१ टक्के गुन्ह्यांचा शोध अद्याप लागलेला नाही. यातील केवळ २९ टक्के गुन्ह्यांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे या सर्व गुन्ह्यांमध्ये घरफोड्यांचा शोध लावण्याचे प्रमाण केवळ २५ टक्के आहे.

शहरी भागात मालमत्तेशी संबंधित सर्वाधिक गुन्हे दाखल होतात. यात दरोडा, चेन स्नॅचिंग, घरफोडी, चोऱ्या, तसेच जबरी चोऱ्यांचा समावेश आहे. जानेवारी ते जुलैदरम्यान शहरात वरील प्रकारचे एकूण ५४७ गुन्हे झाले आहेत. यात दरोड्याचे नऊ, जबरी चोरीचे ४७, चेन स्नॅचिंगचे ६३, दिवसा घरफोडीचे २८, रात्री घरफोडीचे १३३ आणि इतर चोऱ्यांचे ३२१ अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. उपरोक्त कालावधीत पोलिसांनी तपास करीत १५८ गुन्ह्यांचा शोध लावला. गुन्ह्यांत सहभागी असलेल्या तब्बल ३२६ संशयित आरोपींना जेरबंद केले. मात्र, अद्याप ३८९ म्हणजे ७१ टक्के गुन्ह्यांचा तपास अधांतरी आहे. गुन्हा तपासाची टक्केवारी केवळ २९ टक्क्यांच्या आसपास आहे. चेन स्नॅचिंगचे प्रमाण गुन्ह्यांच्या तुलनेत कमी असले तरी एकूण ६३ गुन्ह्यांपैकी तब्बल ४७ गुन्ह्यांचा कोणाताही थांगपत्ता पोलिसांना लागलेला नाही. अन्य २६७ चोरीच्या घटनांपैकी ७७ गुन्ह्यांत चोरट्यांना पकडण्यात यश आले आहे.

चेन स्नॅचर्स मोकाटच!

शहर पोलिसांनी जानेवारी ते जुलै २०१६ या कालावधीत तब्बल ३२६ संशयित गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मात्र, यात सर्वांत कमी चेन स्नॅचर्स आहेत. चोरीच्या गुन्ह्यांत १८२, घरफोडीच्या गुन्ह्यांत ५२, जबरी चोरीचे ३९, तर दरोडा व दरोड्याची तयारीत असलेल्या ३६ संशयितांना पकडण्यात आले. मात्र, चेन स्नॅचर्सच्या गुन्ह्यांत केवळ १८ जणांना पकडले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशदर्शनात हरवले रस्ते!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील चौकाचौकांत नाशिककरांच्या गर्दीने रस्ते फुलले होते. विविध मंडळांनी साकारलेले देखावे पाहण्यात दंग झालेल्या नाशिककरांची पाऊलेही आज कमालीची संथ झाली होती. आकर्षक देखाव्यांकडे जाणारे बहुतांश रस्ते गर्दीत जणू हरवले होते! रविवारची सुटी आणि गणेशदर्शनाचा सातवा दिवस, यामुळे शहरासह जिल्हाभरातील नागरिकांनीही सहकुटुंब हजेरी लावली होती. सुटीचे औचित्य साधत रविवारी नाशिकनगरीत गर्दीने उच्चांक गाठला.

कुठे आरतीचे मंगलसूर, तर कुठे जल्लोषपूर्ण भक्तिगीते यामुळे वातावरणात चैतन्य संचारले असून, गणेशभक्तांच्या उत्साहाला भरते येऊ लागले आहे. नाशिककरांचा पाहुणचार घेण्यासाठी आलेल्या लाडक्या बाप्पाचा सात दिवसांचा मुक्काम पुर्ण झाला आहे. बाप्पाच्या लोभसवाण्या मूर्तींची प्रतिष्ठापना ठिकठिकाणी करण्यात आली आहे. अनेक मंडळांनी बाप्पाच्या स्वागताबरोबरच गणेशभक्तांचे मनोरंजन आणि प्रबोधन करण्यासाठी देखावे साकारले आहेत. या देखाव्यांचा आनंद लुटण्यासाठी अबावृद्धांची पाऊले सध्या नाशिक शहरातील नावाजलेल्या मंडळांकडे वळू लागली आहेत. कोठे नयनरम्य लायटिंग, कुठे भारतातील जाज्वल्य इतिहासाची प्रचीती देणारी आरास, तर कुठे भक्तिसंप्रदायाचे गोडवे गाणारे देखावे पाहून गणेशभक्तांच्या नेत्रांचे पारणे फेडले. उत्सव अवघा चार दिवस सुरू राहणार असल्याने देखावे पाहण्यासाठी गर्दी वाढू लागली आहे. केवळ शहरातीलच नव्हे, तर ग्रामीण भागातील भाविकही देखावे पाहण्यासाठी गर्दी करू लागले आहेत. रविवारची सुटी जणू देखावे पाहण्यासाठीच राखीव ठेवल्याचे ही गर्दी सांगत होती. सीबीएस, शालिमार, अशोकस्तंभ, रविवार कांरजा, पंचवटीतील मुख्य रस्ते भाविकांच्या गर्दीने ओसंडले होते.

शहराच्या मुख्य भागात अशी परिस्थिती असताना सिडकोतील त्रिमूर्ती चौक, सावतानगर, रायगड चौक, पवननगर, उत्तमनगर, विजयनगर, राणाप्रताप चौक, शिवाजी चौक, गणेश चौक या परिसरातही यंदा मोठ्या प्रमाणावर देखावे साकारण्यात आले आहेत. ते पाहण्यासाठी सिडकोवासीयांची गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे सायंकाळी रस्ते गर्दीने फुलून जात आहेत.

रामवाडीजवळ भरली जत्रा

रामवाडी पुलाजवळ पाळणे, साहसी खेळ आणि अन्य स्टॉल्स लागल्याने या परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रहाट पाळण्यांचा आनंद लुटण्यासाठी येथे अबालवृद्धांची गर्दी होते आहे. कालिदास कलामंदिरासमोरील रस्त्याला खाऊ गल्लीचे स्वरूप आले आहे. येथील स्टॉल्सवरील खाद्यपदार्थांवर ताव मारण्यासाठी नाशिककरांची गर्दी होते आहे. अशीच परिस्थिती नेहरू गार्डन, पंचवटी कारंजा परिसरातही पाहावयास मिळते आहे. खेळणी विक्रेत्यांची दुकानेही बच्चे मंडळींना खुणावत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफोडी दडपण्यासाठी वृध्दाचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

घरफोडी करीत असताना राखणदाराने पाहिले म्हणून त्याचा तिघांनी मिळून खून केल्याची घटना दिंडोरी तालुक्यातील आशेवाडी येथे घडली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी तपास करीत संशयितांच्या मुसक्या आवळल्या.

सुदाम पांडुरंग स‌ितान (६५) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. शिवाजी बोडके यांच्या शेतात राखणदार म्हणून काम पाहणाऱ्या स‌ितान यांचा १५ ते १६ ऑगस्ट दरम्यान खून करून संशयितांनी मृतदेह शेतातीलच विह‌िरीत फेकून दिला होता. संशयित आरोपींनी स्टोअररूममधील पिस्टन पंप व हातपंप चोरी केले होते. याप्रकरणी दिंडोरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर गुन्ह्याचे समांतर तपास करीत असताना पोलिस अधीक्षक अंकुश शिंदे अपर पोलिस अधीक्षक प्रशांत मोहिते व उपविभागीय पोलिस अधिकारी देवीदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर नवले यांनी घटनास्थळ व मयत स‌ितान यांच्याबाबत सविस्तर माहिती मिळवली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने दिंडोरी तालुक्यातील आशेवाडी परिसरातील तुंगलदरा येथील सचिन राजाराम बगर, (२१), निलेश नवसू बगर, (२८) व उत्तम विश्वनाथ चोथे, (२९) यांना ताब्यात घेतले. खुनाच्या प्रकाराबाबत माहिती देताना संशयितांनी सांगितले की, मयत सुदाम पांडुरंग स‌ितान यांनी सदर आरोपींना शेतातील पिकावर फवारणी करावयाचे पंप चोरी करताना पाहिले होते. आज ना उद्या आपले बिंग फुटेल या भितीने त्यांनी स‌ितान यांना जीवे ठार मारून, मृतदेह विहिरीत फेकून दिला. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सदर गुन्ह्यात कोणत्याही तांत्रिक पुराव्याची मदत न घेता गुन्हा उघडकीस आणल्याचे पीआय नवले यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तलाठी परीक्षेला ४३४१ अर्जदारांची पाठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील महसूल विभागातील उपविभागीय कार्यालयांमधील तलाठीपदाच्या ४१, तर वाहनचालक पदाच्या एका जागेसाठी रविवारी परीक्षा घेण्यात आली. सुमारे १९ हजार ८९२ परीक्षार्थी या परीक्षेला सामोरे गेले, तर ४ हजार ५६९ अर्जदारांनी परीक्षेला दांडी मारली.

जिल्हा निवड समिती तथा जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांच्या आस्थापनेवरील तलाठीपदासाठी, तसेच वाहनचालक पदासाठी रविवारी ६१ केंद्रांवर ९८२ वर्गखोल्यांमध्ये परीक्षा घेण्यात आली. तलाठीपदासाठी पेसा आणि पेसा क्षेत्राबाहेरील अशा वर्गवारीत अर्ज मागविण्यात आले होते. वाहनचालक पदासाठी सरळसेवा पध्दतीने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. ४१ पैकी ११ पदे ही पेसासाठी, तर ३० पदे पेसा क्षेत्राबाहेरील उमेदवारांकरिता आहेत. तलाठीपदासाठी पेसा क्षेत्राबाहेरील २० हजार ३०३ अर्ज, तर पेसा क्षेत्रातून ३ हजार २२१ अर्ज प्राप्त झाले होते. वाहनचालकाच्या एका जागेसाठी ९०८ अर्ज प्राप्त झाले होते. रविवारी शहरातील प्रमुख ६१ केंद्रांवर दोन टप्यात ही परीक्षा घेण्यात आली. सकाळी ११ ते १ या वेळेत तलाठीपदासाठी परीक्षा झाली. दोनशे गुणांसाठी बहुपर्यायी पध्दतीने ही परीक्षा घेण्यात आली. सुमारे २३ हजार ५५३ अर्जदारांपैकी १९ हजार २१२ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. तर चार हजार ३४१ अर्जदारांनी परीक्षेकडे पाठ फिरवली. म्हणजेच सुमारे ८२ टक्के परीक्षार्थींनी परीक्षा दिली.

पोलिसपाटील पदाची भरती प्रक्रिया वादग्रस्त ठरल्यामुळे जिल्हा प्रशासनाने यंदा अधिक पारदर्शकपणे परीक्षा प्रक्रिया राबविण्याचा प्रयत्न केला. ९८० समवेक्षक, २७५ पर्यवेक्षक, १३० लिपिक, २५० शिपाई यांसह १९०० अधिकारी, कर्मचारी तसेच ७० वाहनांची परीक्षेसाठी मदत घेण्यात आली.

एका जागेसाठी ६८० उमेदवार

दुपारी तीन ते चार या वेळेत वाहनचालकाच्या एका पदासाठी परीक्षा घेण्यात आली. या जागेसाठी ९०८ अर्ज आले होते. त्यापैकी ६८० अर्जदार परीक्षेला सामोरे गेले. २२८ अर्जदार परीक्षेला गैरहजर होते. म्हणजेच वाहनचालक पदासाठीच्या परीक्षेला ७५ टक्के उमेदवारी लाभली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images