Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

इन्व्हिटेशन स्पर्धेत नाशिक गटविजेता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे धुळे येथे आयोजित राज्यस्तरीय इन्व्हिटेशन लीग स्पर्धेत नाशिक क्रिकेट संघाने नंदुरबार व बीड पाठोपाठ तिसऱ्या सामन्यात हिंगोलीवरही मात करून गटविजेतेपद मिळविले.

वैभव केंदळेने कर्णधारपदाला साजेशी केलेली ७२ धावांची अतिशय महत्त्वपूर्ण खेळी व डावखुरा मंदगती फिरकी गोलंदाज प्रतिक भालेरावच्या ५ बळींच्या जोरावर नाशिक संघाने, चुरशीच्या सामन्यात १० धावांनी हिंगोलीवर विजय मिळविला व आपली वरिष्ठ खुल्या गटातील सामन्यांत विजयी घोडदौड कायम राखण्यात यश मिळविले.

हिंगोलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करताना नाशिकला ४५व्या षटकात सर्वबाद १९२वर रोखले. कर्णधार वैभव केंदळेच्या ७२ धावांना, श्रीकांत शेरीकर (३६) व ओमकार भवर (२०)ची साथ मिळाली. गोलंदाजीत प्रतिक भालेरावच्या ५ बळींना साजीन सुरेशनाथ ३ तर समाधान पांगारे व तेजस पवार ह्यांनी प्रत्येकी १ बळी मिळवून साथ देताना ४८व्या षटकात हिंगोलीला सर्वबाद १८२ वरच रोखले. या संघास प्रशिक्षक सतीश गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सेलिब्रेटींनी गाजवले क्रिकेटचे मैदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमध्ये गेल्या वर्षापासून स्थापन झालेल्या नाशिक कलावंतांच्या जनस्थान व्हॉट्स अॅप ग्रुपने आयोजित केलेल्या क्रिकेट सामन्यात चित्रतीर्थ संघाने सुरमणी संघावर मात करीत २५ धावांनी सामना जिंकला. सेलिब्रेटींनी मारलेल्या चौकार, षटकारांना मैदानाबाहेरून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता.

नाशिक जनस्थान या कलावंताच्या व्हॉटस् अॅप ग्रुपने सेलिब्रिटी क्रिकेटचे व्हीरीडियन व्हॅली येथे आयोजन केले होते. गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकच्या कलावंतांना एकत्र आणण्याचे काम संगीतकार धनंजय धुमाळ करीत आहेत. त्याच्या संकल्पनेनुसार या सामन्यांचे रविवारी आयोजन करण्यात आले होते.

पहिला समाना सुरमणी संघ व चित्रतीर्थ संघ यांच्यात झाला. त्यात सुरमणी संघांने हा सामना जिंकून आपले वर्चस्व सिध्द केले. त्यानंतर संपूर्ण दिवसात १२ सामने खेळवण्यात आले. त्यातून १४४ कलावंतांनी सहभाग घेतला. यात चित्रकला, नाट्यकला, चित्रपट, संगीत क्षेत्रातील कलाकार सहभागी झाले होते. कलावंतांचे सामने पहाण्यासाठी नागरिकांनीही उत्स्फूर्त गर्दी केली होती. स्पर्धेचा अंतिम सामना चित्रतीर्थ संघ व सुरमणी संघ यांच्यात झाला.

अंतिम सामन्यात चित्रतीर्थ संघाने १० षटकात ८५ धावांचे सुरमणी संघासमोर आव्हान ठेवले. मात्र सुरमणी संघ ६० धावांमध्ये गारद झाला. चित्रतीर्थ संघ विजेता ठरला. चित्रपट आणि रंगभूमीवरील तारे नाशिकच्या मैदानात षटकार आणि चौकारासह मैदानात आपले राज्य गाजवत होते.

सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते कांचन पगारे, चिन्मय उदगीरकर, धनश्री क्षीरसागर उपस्थित होते. या मॅचसाठी जनस्थानचे अॅडमीन अभय ओझरकर, धनंजय धुमाळ, विनोद राठोड, मोहन उपासनी, भूषण मटकरी यांनी विशेष परिश्रम घेतले. जेष्ठ कलावंत सदानंद जोशी, अविराज तायडे, पं. सुभाष दसककर यांनी समालोचनाचे काम केले.




मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोडावूनला भीषण आग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

लोणवाडे शिवारातील प्लास्टिकच्या गोडावूनास सोमवारी पहाटे भीषण आग लागली. यामुळे एकच खळबळ उडाली. तब्बल पाच तास सुरू असलेल्या आगीत गोडावूनमधील लाखोंचा माल जाळून खाक झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पाच बंबांनी पाच तासानंतर ही आग आटोक्यात आणली.

खडकी रोडवरील लोणवाडे शिवारात गट नंबर १३७ मध्ये निहाल अहमद अब्दुल राहुक यांच्या मालकीचे पीव्हिसी पाइप तयार करण्यासाठी लागणाऱ्या प्लास्टिक रॉ मटेरियलचे गोडावून आहे. या गोडावूनास पहाटे चार वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. ही माहिती अग्निशामक दलाला मोहम्मद नामक व्यक्तीने दूरध्वनीवरून कळवल्यावर तत्काळ चार बंबांसह मुख्य अग्निशामक अधिकारी संजय पवार तसेच यादव भिवसण, सुधाकर अहिरे, रवींद्र महाले, रमेश सखद, निसार अहमद, भूषण ठाकरे, अस्पाक अहमद, सलीम मन्‍सुरी, प्रवीण निकम, प्रवीण शिंदे आदीं कर्मचाऱ्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

अग्निशामक दलाच्या गाड्या पोहचेपर्यंत गोडावूनच्या चारही बाजूने आगीने भीषण रूप धारण केले होते. सुमारे शंभर फूट इतक्या उंचीवर आगीचे लोट आणि त्यातून निघणारा धूर दूर अंतरापर्यंत दिसत होता. आगीची तीव्रता लक्षात घेता मुख्य अग्निशामक अधिकारी संजय पवार यांनी धुळे मनपाच्या देखील अग्निशामक दलाचे बंब आग विझवण्यासाठी बोलवले होते. मालेगाव दलाच्या चार व धुळे येथील एक असे पाच बंब, अधिकारी, कर्मचारी यांनी शर्थीचे प्रयत्न करीत आग आटोक्यात आणली. आगीचे नक्की कारण काय? हे समजू शकले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळेच ही आग लागली असल्याचे गोडावून मालकाकडून सांगण्यात आले.



मनमाड अग्निशामक दलाचा आडमुठेपणा मालेगाव शहरानजीक प्लास्टिक गोडवूनला लागलेली भीषण आग विझवण्यासाठी अधिकारी संजय पवार यांनी धुळे मनपा तसेच मनमाड येथून देखील अग्निशामक बंब बोलवले. मात्र, मनमाड अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी वाहन पाठवणार नाही, असे उत्तर पवार यांना दिल्याने त्यांचा आडमुठेपणा समोर आला. याबाबत जिल्हाधिकारी कुशवाह यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे मालेगाव अग्निशामक दलाचे मुख्य अधिकारी संजय पवार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किदवाई रोडने घेतला मोकळा श्वास

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहिमेला वेग देत मालेगाव स्वच्छ, सुंदर व अतिक्रमणमुक्त करण्याचा जणू विडाच उचलला आहे. अतिक्रमण हटाव मोहमेंतर्गत सोमवारी किदवाई रोड व भंगार बाजाररोड या भागातील अतिक्रमण काढण्यात आले. त्यामुळे या भागातील रस्त्यांनी पहिल्यांदाच मोकळा श्वास घेतल्याचे दिसून आले.

शहरातील प्रभाग एकमधील किदवाई रोड व भंगार बाजाररोडवरील वर्दळ वाढली आहे. या भागात भंगार बाजार, प्राथमिक माध्यमिक उर्दू शाळा, व्यापारी संकुल, दुकाने, फेरीवाले आहेत. तसेच, नवीन बसस्थानक ते जुने बसस्थानक यांना जोडणारा रस्ता देखील हाच असल्याने नेहमीच हा भाग वर्दळीचा राहतो. मात्र, येथील दुकानदारांनी अगदी सर्रास रस्त्यावर दुकाने थाटल्याने वाहतूक कोंडी नित्याचीच झाली होती. विशेषतः शाळकरी मुलांना याचा सर्वात जास्त त्रास सहन करावा लागत होता. मनपाकडून या दोन्ही रस्त्यालागत असलेले अतिक्रमण हटवण्यात आले. एकूण दीडशे अतिक्रमणे यावेळी जमीनदोस्त केली.

अतिक्रमण मोहिमेचा मोर्चा किदवाई रोडकडे वळताच दुकानदारांनी नुकसान टाळण्यासाठी आधीच रस्त्यावर वाढवलेली दुकाने, सामान काढून घेतले. त्यामुळे कधी नव्हे ते हे दोन्ही रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला.

विशेष गस्ती पथक कार्यान्वित पुन्हा अतिक्रमण होणार नाही यासाठी मनपा काय करणार? असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यानुसार मनपाने पुन्हा अतिक्रमण झाल्यास त्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी विशेष गस्ती पथक नेमले आहे. त्याचे उद्घाटन पोलिस उपअधीक्षक गजानन राजमाने यांच्या हस्ते करण्यात आले. या गस्ती पथकात एकूण दहा कर्मचारी, दोन बीट मुकादम, एक वाहन असणार आहे. अतिक्रमण करणाऱ्यांवर प्रसंगी पथकाकडून दंडात्मक कार्यवाही देखील केली जाणार असल्याचे अधीक्षक दीपक हादगे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

६५ जोडप्यांचे एका मांडवात लग्न

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

आठ हजाराहून अधिक वऱ्हाडी, साठहून अधिक वधू-वर आणि आजी-माजी आमदार, खासदारांची लग्नाला असलेली उपस्थिती.. अत्यंत शाही थाटातील लग्न सोहळ्याचे हे वर्णन वाचून कोणालाही हा कुण्या गर्भश्रीमंतांचा लग्नसोहळा असावा असे वाटेल. पण, लग्नाचा हा शाही थाट होता येथील सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी आयोजित केलेल्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचा.

राज्यमंत्री भुसे यांच्या संकल्पनेतून शिवसेनापक्षाच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून येथे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते. यावर्षीची देखील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेंतर्गत या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. येथील सटाणा नाका भागातील यशश्री कंपाउंड येथे हा सोहळा पार पडला. यात हिंदू धर्मीय ६५, बौद्ध धर्मिय तीन तर मुस्लिम धर्मिय तीन असे एकूण ६५ जोडप्यांचे विवाह झाले.

गोरज मुहूर्तावर आयोजित या विवाह सोहळ्याची हिंदू जिमखाना परिसरातून या वधू-वरांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. एकाचवेळी इतक्या जोडप्यांची निघालेली वरात, फटाक्यांची आतषबाजी, आठ हजार वऱ्हाडींची उपस्थिती यामुळे शहरवासीयांसाठी हा विवाहसोहळा आकर्षण होते. सर्व धर्मियांच्या प्रथा परंपरांचे पालन करीत विवाह पार पडले. यावेळी कैलास तिसगे आणि प्रमोद शुक्ला यांना हा मान मिळाला.

या विवाह सोहळ्यासाठी खासदार हेमंत गोडसे, आमदार अनिल कदम, आमदार राजाभाऊ वाजे, माजी आमदार शरद पाटील, सुहास कांदे, अजय बोरस्ते, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त किशोर बोर्डे आदी उपस्थित होते. या सर्वधर्मीय सामुदायिक सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी बंडू बच्छाव, संजय दुसाने, पंचायत समिती सभापती भरत पवार, रामा मिस्तरी, देवा माळी, गोविंद गवळी आदींनी परिश्रम घेतले.

नवदाम्पत्यांना मदत वैयक्तिक विवाह सोहळ्यांवर होणारा अनाठायी खर्च टाळावा या उद्देशाने आयोजित या विवाह सोहळ्यात वधू-वरांना संसारोपयोगी वस्तू आणि आर्थिक मदत देण्यात आली. तसेच, विविध शासकीय योजनांचा देखील लाभ देण्यात येणार आहे. जळगाव जैन एरिगेशनचे अमित जैन यांच्याकडून प्रत्येकी अडीच हजार रुपये, तर धुळे शिवसेनेकडून भेटवस्तू देण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आगामी निवडणुकांसाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीप्रमाणे ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या उक्तीप्रमाणे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची घौडदौड राज्यभर सुरू आहे. पक्षप्रमुखांच्या आदेशान्वये नाशिक जिल्ह्यातही शिवसेनेची वाटचाल सुरू असून, निफाड तालुक्यातील शिवसैनिकांनी आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांसाठी सज्ज व्हावे, असे आवाहन नवनियुक्त ग्रामीण जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांनी केले.

निफाड शासकीय विश्रामगृहावर आयोजित पदाधिकारी, शिवसैनिकांच्या बैठकीप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर तालुकाप्रमुख उत्तम गडाख, अरुण वाळके, सुधीर कराड, मेजर विजय हिरे, प्रदीप अहिरे, निफाड शहरप्रमुख संजय कुंदे, निवृत्ती जगताप, दशरथ रुमने, सुधीर शिंदे, करंजगावचे सरपंच खंडू बोडके, प्रकाश कडाळे, विश्वास भंडारे, उत्तम बस्ते, न्यानेश्वर पवार, अश्विन घागरे, राजाभाऊ दरेकर, शिवा सुरासे, बापू कापसे आदी उपस्थित होते.

भाऊलाल तांबडे यांची ग्रामीण जिल्हाप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल निफाड तालुका शिवसेनेच्यावतीने उत्तम पाटील गडाख यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रदीप अहिरे, शिवा सुरासे, शरद खालकर आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले. तालुकाप्रमुख उत्तम पाटील गडाख, अरुण वाळके यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.

जिल्हाप्रमुख तांबडे म्हणाले की, तळागाळातील शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद आहे. या बळावरच शिवसेनेची राज्यात सत्ता आली आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी या सत्तेचा उपयोग सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी करावा. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमधे शिवसैनिकांनी तन-मन-धनाने सर्वस्व झोकून द्यावे. पक्षाचे निष्ठेचे काम करणाऱ्या शिवसैनिकांना निवडणुकांमधे संधी देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. निफाड नगरपंचायत निवडणुकीत सेनेने ब-यापैकी यश मिळविले. यामुळे पंचायत समिती व जि. प. निवडणुकीसाठी पदाधिका-यांनी कंबर कसावी, असे आवाहनही त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गरम पाण्याचे झरे होणार विकसित

$
0
0

दीपक महाजन, कळवण

सुरगाणा तालुक्यातील ऊबरपाडा, पिंपळसोडजवळील तातापाणी येथील गरम पाण्याच्या झऱ्यांचा लवकरच विकास करण्यात येणार आहे. यामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने या विकासकामाचा क वर्गात समावेश केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या झऱ्यांची पाहणीही केली आहे.

गरम पाण्याच्या झऱ्यांचा विकास झाल्यास स्थानिक आदिवासींना रोजगार मिळून त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. ऊबरपाडा, पिंपळसोड हे गाव तालुक्याचा पश्चिमेला गुजरात सिमेवरील शेवटच्या टोकाला आहे. गुजरात राज्याला जोडणारा राज्य महामार्ग जात आहे. या महामार्गावरून वर्षभरात सुमारे लाखो पर्यटक येतात. त्यांना आकर्षित करण्यासाठी येथील गरम पाण्याचे झरे विकसित केल्यास पर्यटनालाही गती मिळणार आहे. या विकासकामाचा क वर्गात समावेश करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता एस. के. शेळके यांनी दिली.

पाहणी करण्यासाठी वनपरीक्षेत्र अधिकारी ऊबंरठाण दुसाने, कुवर, सर्वेक्षण अधिकारी बागुल, कादरी, शाखा अभियंता एस. के. शेळके, डी. जी. ठाकरे, हेमंत चौधरी, जसुराम ठाकरे, आदिवासी बचाव कृती समितीचे तालुकाध्यक्ष रतन चौधरी, माजी सैनिक शिवा चौधरी, लहानु गावित, मणिराम चौधरी आदी उपस्थित होते.

आदिवासींची परंपराही येणार अनुभवता या ठिकाणी आदिवासी बांधवांचे पारंपरिक धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. येथे आदिवासींचे कुलदैवत कणसरी माता (याहामोगी) मातेची सुंदर व लोभसवाणी अशी देखणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. दरवर्षी येथे याहामोगी देवीच्या नावाने यात्रा भरवली जाते. या ठिकाणी रस्ता, वीज, पाणीपुरवठा, गरम पाण्याचे झरे विकसित करण्याची आवश्यकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळा मॅरेथॉनवर नाशिकचे वर्चस्व

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

देवळा मॅरेथोन २०१६ स्पर्धेत मुख्य ११ किलोमीटरच्या खुल्या स्पर्धेत पुरुषांमध्ये नाशिकच्या हिरामण थविल, तर महिलांमध्ये भारती पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

देवळा मॅरेथोन असोसिएशनच्या वतीने दुसरी मॅरेथोन स्पर्धा उत्साहात झाली. स्पर्धेचे उद्घाटन आमदार डॉ. राहुल आहेर, स्वागताध्यक्षा तथा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा धनश्री आहेर, महिंद्राचे उपाध्यक्ष तथा देवळ्याचे भूमिपुत्र हिरामण आहेर, जि.प. सभापती केदा आहेर, उपनगराध्यक्ष अशोक आहेर, बाजार समितीचे माजी सभापती योगेश आहेर, नगरपंचायतीचे गटनेते जितेंद्र आहेर, बांधकाम सभापती लक्ष्मीकांत आहेर, नियोजन सभापती अतुल पवार, क्रीडा प्रशिक्षक विजयेंद्रसिंग, आंतरराष्ट्रीय धावपटू दुर्गा देवरे, सप्तशृंगी निवासिनी ट्रस्टचे विश्वस्त नाना सूर्यवंशी, युवा उद्योजक विजय पगार, शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. सर्व विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह देऊन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

विजयी धावपटू मुख्य मॅरेथोन स्पर्धा (११ किलोमीटर) पुरुष : प्रथम - हिरामण थविल, द्वितीय- अश्विनीकुमार, तृतीय --हिंमतसिंग तडवी (तिघे नाशिक). उत्तेजनार्थ - भागिन्नाथ गायकवाड (नाशिक), रमेश गवळी (ननाशी), पंकज गुंजाळ (देवळा). महिला : प्रथम - आरती पाटील, द्वितीय- शीतल भगत, तृतीय - योगिता गवळी (तिघे नाशिक). उत्तेजनार्थ - रीतुसिंग, गोजागिरी बच्छाव (दोन्ही नाशिक).

शालेय गट १४ वर्षांखालील मुले : प्रथम - वसंत चौधरी (पेठ), द्वितीय - भूषण मार्तंड (रावळगाव), तृतीय - सुरेश चौधरी (नाचलोंडी). उत्तेजनार्थ - विजय चौधरी, दिनेश पवार (नाशिकरोड) मुली : प्रथम - ताई ब्राम्हणे (नाशिक), द्वितीय - वर्षा चौधरी (नाचलोंडी), तृतीय - ऋतुजा कांडे (नाशिक). उत्तेजनार्थ - वनिता डांबे, सुनीता चौधरी. १७ वर्षांखालील मुले : प्रथम - दिलीप कहांडोळे (अलंगुण), द्वितीय - विजय वाटाणे (पब्लिक स्कूल, देवळा), तृतीय - तेजस काकुळते (देवळा). उत्तेजनार्थ - गणेश पवार (नाशिक), गणेश डोंबे (हरसूल), सुरेंद्र दळवी (पब्लिक स्कूल, देवळा). मुली : प्रथम - पूनम सोनवणे, द्वितीय - सायली मेंगे, तृतीय - प्रगती मुळाणे (सर्व नाशिक). उत्तेजनार्थ - अर्चना आहेर (देवळा), कविता मोरे (देवळा).

मुख्य आकर्षण पुरुष : प्रथम - माणिक निकम (औंदाणे), द्वितीय - नाना कुराडे (पिंपळगाव), तृतीय - कारभारी शेवाळे. महिला : प्रथम - मीराबाई पानपाटील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


परिपत्रकानुसार सहलींचे नियोजन करणे महाकठीण!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अबे इनामदार शाळेचे १३ विद्यार्थी मुरूड जंजिरा येथे सहलीदरम्यान समुद्रात बुडून मृत्युमुखी पडल्याची घटना घडल्याने जोखमीच्या ठिकाणी सहली नेण्यास प्रतिबंध करण्याच्या सूचना पुणे विभागाच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयाने शाळांना परिपत्रकाद्वारे केल्या आहेत. मात्र, इतक्या कठोर निकषांचे अनुकरण करण्याचा विचार केल्यास सहल नेणे अशक्य बाब ठरेल, असा सूर नाशिकमधील शिक्षणक्षेत्रातून निघाला आहे.

सहलीदरम्यान कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी विभागामार्फत नियमावली ठरवून देण्यात आली आहे. सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच, ज्युनिअर कॉलेजसाठी सहल नेताना हे नियम पाळणे आवश्यक आहे. या नियमावलीनुसार विद्यार्थ्यांची हेळसांड, कुचंबना, मानसिक, शारीरिक त्रास झाल्यास तशी पालकांकडून तक्रार आल्यास संबंधित शिक्षक, मुख्याध्यापक व प्राचार्यांना जबाबदार धरले जाणार आहे. समुद्राचे बीच, पर्वतावरील ठिकाणे, नदी, तलाव, विहिरी, उंच जागा, ट्रेकिंग, जलक्रीडा, अॅडव्हेंचर पार्क, वॉटर पार्क, साहसी खेळ यांसारख्या ठिकाणी सहल नेण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. प्राथमिक शाळेच्या सहली सायंकाळी पाच वाजेपर्यंत पुन्हा घरी नेणे आवश्यक असून, रात्रीचा प्रवास करण्यावरही बंदी आणण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना मोबाइल वापराची मुभा, प्रथमोपचार पेटी सोबत बाळगणे, आपत्कालीन परिस्थितीचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात यावे, शिक्षकांनी सहलीदरम्यान व्यसनांचे सेवन टाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सहल न्यायची असेल तर मुख्याध्यापकांना शंभर रुपयांच्या बाँड पेपरवर सुरक्षेची हमी द्यावी लागणार आहे. शिवाय प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांनी कोणतीही सहल काढताना गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, शिक्षणप्रमुख, शिक्षण उपसंचालक यांची लेखी परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. यापैकी काही नियम शिथिल केल्यास सहल नेण्यास सोपे होईल. मात्र, हे सर्वच नियम अनुकरण करण्याचे ठरवले तर कोणीही सहल काढण्याचा विचार करणार नाही, असे मत याविषयी व्यक्त करण्यात आले.

शिक्षण विभागाने काढलेल्या परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांना सहलीला नेणे कठीण आहे. सहली या केवळ पर्यटनासाठी नाही तर अभ्यासाठीही असतात. किल्ले, धरणे, ऐतिहासिक ठिकाणे विद्यार्थ्यांना दाखविली नाहीत, तर सहलीचा उपयोग नाही. शिवाय प्रत्येक ठिकाणी रिस्क असतेच, मात्र इतके कठोर निकष त्यासाठी असावे, असे नाही. - राजेंद्र निकम, राज्य उपाध्यक्ष, खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ महाराष्ट्र राज्य

विद्यार्थ्यांची काळजी असतेच. या परिपत्रकापूर्वीही आम्ही सहल नेताना पालकांची परवानगी घेतच असतो. या परिपत्रकातील काही नियम अतिशय योग्य आहेत. मात्र, काही नियमांमुळे सहल नेण्याबाबत भीती पसरत आहे. - नंदा पेटकर, मुख्याध्यापक, रंगुबाई जुन्नरे हायस्कूल

शिक्षण विभागांनी संवेदनशीलता दाखवून चांगले परिपत्रक काढले. मात्र, त्यातील काही अटी शिथिल करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना इस्रो, ऐतिहासिक ठिकाणे दाखवायची झाल्यास राज्याबाहेर सहली नेणे आवश्यक असते. यावर निर्बंध घातल्यास अशा शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहतील. यावर उपाय शोधणे आवश्यक आहे. सहलीवर लक्ष ठेवण्यासाठी पालक शिक्षक संघातील दोन व्यक्ती नेले जाऊ शकतात. - सचिन जोशी, शिक्षणतज्ज्ञ

कठीण निकषांचा सामना करून सहल न्यावी लागणार असेल, तर सहल न्यावी की नाही, हाच प्रश्न पडेल. शिक्षक विद्यार्थ्यांची काळजी घेतच असतात. परंतु, प्रत्येक एका बाबीत नियम असेल तर तो पाळणे अवघड आहे. - नितीन पाटील, मुख्याध्यापक, सुखदेव विद्यामंदिर प्रा.शाळा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रलंबित मागण्यांसाठी आम्ही तुमच्यासोबत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

काही शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांसाठी नवनवीन योजना राबवून कार्यरत आहेत. त्यांचे कार्य पाहता शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी आवाज उठविण्याची गरज निर्माण झाली आहे. या संघर्षात आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे आश्वासन पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिले.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशन रविवारी पार पडले. अमृतधामजवळील आशादीप मंगल कार्यालयात हे अधिवेशन पार पडले. आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले. आमदार तांबे पुढे म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून शिक्षकांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी सदैव सोबत राहून कार्य करू, असेही नमूद केले.

राज्याध्यक्ष काळू बोरसे यांनी राज्यातील व जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांबाबत संघर्ष करण्याची भूमिका घेत जिल्ह्यातील गुणवत्तापूरक स्पर्धेचा गौरव केला. जिल्हाध्यक्ष केदू देशमाने यांनी प्रास्ताविक केले.शिवाजी शिंदे यांनी अधिवेशनाचे सूत्रसंचालन केले. सुनील भामरे यांनी आभार मानले.

कार्यकारिणीची निवड

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या त्रैवार्षिक जिल्हा समितीच्या नूतन कार्यकारिणीची निवड अधिवेशनात करण्यात आली. यामध्ये जिल्हाध्यक्षपदी आनंदा कांदळकर, जिल्हा सरचिटणीसपदी राजेंद्र दिघे, जिल्हा कार्याध्यक्षपदी प्रकाश सोनवणे, पी. के. अहिरे व जिल्हा कोषाध्यक्षपदी साहेबराव पवार यांची नियुक्ती करण्यात आली.

उपक्रमशील शिक्षकांचा गौरव जिल्ह्यात विविध शाळांमध्ये गुणवत्ता, तंत्रज्ञान या बाबींना समोर ठेवून विशेष उपक्रम राबविले जात आहेत. अशा निवडक शाळांच्या शिक्षक, मुख्याध्यापकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. सरोज नवले, काशिनाथ सोनवणे, आरती बैरागी, प्रमोद परदेशी, सुदर्शन केदार, हेमंत सोनवणे, दीपक वाघ, ज्योती मोरे आदी २५ उपक्रमशील शिक्षकांचा यामध्ये सहभाग होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आतिथ्यशील: सेकंड होम

$
0
0

किशोर अहिरे
नाशिकचे आल्हाददायक वातावरण हे नेहमीच येथे येणाऱ्या पर्यटकांचे तसेच पाहुण्यांचे आकर्षण ठरले आहे. नाशिक व परिसरात वर्षभर असलेले सुखद वातावरण हे सुरुवातीपासूनच शहर व परिसराचे मुख्य वैशिष्ट्य ठरले. नाशिकची ख्याती मुघल काळापासून ते पेशवाईपर्यंत खास करून इथला निसर्ग इथले हवामान यासाठीच होती.

मुघल काळात हे शहर सैनिकांच्या विश्रांतीसाठी तसेच पुढच्या लढाईला सामोरे जातांना ताजेतवाने होण्यासाठीचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध होते. त्यानंतर पेशवाईच्या काळात सुद्धा याकरिताच आपला परिसर प्रसिद्ध होता. त्यानंतरच्या ब्रिटीश राजवटीच्या काळात इंग्लंडहून येणारे लष्करी अधिकारी तसेच सैनिकांसाठी भारतातल्या वातावरणाशी जुळवून घेणे सोपे जावे म्हणून त्यांना काही काळ नाशिक येथे ठेवण्यात येत असे. याचे कारण म्हणजे ब्रिटिशांना सुद्धा इथले वातावरण अधिक सुसह्य वाटत असे. म्हणूनच इथल्या आल्हाददायक वातावरणात ब्रिटीशांनी एक्लेमेटायझेशन सेंटर म्हणून निवड केली. यामुळेच मोठ्या प्रमाणात ब्रिटीश अधिकारी तसेच उच्चपदस्थ लोकांनी नाशिकची निवड ही सेकंड होम म्हणून केली. यांच्या पाठोपाठच त्यांच्याशी व्यापारी संबंध असलेल्या व्यावसायिक समुदायांनी देखील येथे आपल्या सॅनिटोरियम्सची (आरोग्य ‌भुवन) उभारणी केली. त्या काळात मुंबईतील बहुतांश धनाढ्य लोकांचे बंगले देवळाली कॅम्प परिसरात उभे राहिले. यामुळे नाशिक व परिसराला सेकंड होम अथवा हॉलिडे होमचे शहर म्हणून प्रसिद्धी मिळाली.

नंतरच्या काळात देवळाली, नाशिक या परिसरात मोठ्या प्रमाणात सर्व सोयींयुक्त असे टुमदार बंगले तसेच सॅनिटोरियम उभी राहिली. यामुळे जवळजवळ १५० वर्षांपूर्वीच लोकांनी सेकंड होम म्हणून नाशिकची निवड करायला सुरुवात केली. नाशिक व परिसरातील नैसर्गिक वातावरण हे आपल्या परिसराचे खास आकर्षण ठरते आहे. त्यामुळे सेकंड होम्स या क्षेत्रात नाशिकचे महत्त्व अलीकडच्या काळात वाढलेले दिसते.

नाशिकच्या जवळ असलेले मुंबई व मुंबई महानगर क्षेत्राची अलीकडच्या काळात झपाट्याने झालेली वाढ व या क्षेत्राचे नाशिकशी भौगोलिकदृष्ट्या असलेली जवळीक हा आपल्या परिसरातील सेकंड होम्सच्या विकासास चालना देणारी महत्त्वपूर्ण बाब ठरली आहे. इगतपुरी परिसराची मुंबईशी रेल्वे व रस्ते मार्गाने असलेली जवळीक या परिसरात अशा प्रकारच्या प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात चालना देणारी ठरली आहे. रस्ते मार्गाने मुंबई ते इगतपुरी हा प्रवास अलीकडच्या काळात अत्यंत सुसह्य झाल्याने देखील मुंबईकरांनी या परिसराला आपली सेकंड होमसाठी पहिली पसंती दिलेली दिसते. इगतपुरी व परिसर हा पर्यटकांसाठी खरोखरच नंदनवन ठरला आहे. पावसाळ्यात इथले निसर्ग सौंदर्य अधिक खुलते. यामुळे पर्यटकांचा या काळात मोठा ओघ या परिसरात पाहायला मिळतो. गेल्या दोन दशकांत येथे बऱ््याच नामांकित उद्योग समूहांनी भव्य असे सेकंड होम प्रकल्प या परिसरात उभारण्यास सुुरुवात केलेली दिसते.

इगतपुरी तालुका हा धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो. या धरणांच्या परिसरातच अत्यंत सुंदर व उच्च अभिरुचीच्या गृह प्रकल्पांची उभारणी अलीकडच्या काळात जोमाने सुरू आहे. यामुळे या परिसराचे एकंदरच अर्थकारण पूर्णपणे बदललेले दिसते. जमिनींचे भाव हे दिवसेंदिवस उच्चांक गाठत आहेत सोबतच यामुळे या परिसराला विकासाची नवी संधीच यातून प्राप्त झालेली दिसते.

सेकंड होम्सच्या मोठ्या प्रमाणात झालेल्या विकासामुळे या परिसराची पर्यटनाच्या नकाशावर नव्याने उदय झालेला दिसतो. यातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो आहे. तसेच मुलभूत सुविधांची देखील उभारणी यामुळे खाजगी विकासकांकडून व शासकीय पातळीवरून देखील होते आहे. सेकंड होम म्हटले की अत्यंत सुंदर असे छोटेखाणी घर व त्या सभोवताली विविध प्रकारची वृक्ष व फुलझाडांची लागवड होते. यामुळे एका अर्थाने पर्यावरणाचे देखील संवर्धन होते व एकंदरीतच परिसर हिरवागार दिसतो. या घरांचे मालक आठवड्यातून अथवा महिन्यातून काही काळ येथे थांबतात. उरलेल्या काळात ही घरे पर्यटकांसाठी उपलब्ध असतात. यामुळे शनिवार आणि रविवार अथवा इतर सुट्यांच्या काळात मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे येतात. पर्यटकांसाठी अशा सोयीसुविधा या आकर्षणाच्या केंद्रबिंदू ठरल्या आहेत. यामुळेच पर्यटक आपल्या कुटुंबासह येथे येणे पसंत करतात. आपण जर त्यांना योग्य अशा सोयी सुविधा पुरवल्या तसेच या परिसरातील निसर्गाचे पर्यटकांना दर्शन घडवले तर आतिथ्यक्षेत्रात मोठी संधी आपल्याला उपलब्ध होईल. येथे निसर्ग पर्यटन, पावसाळी पर्यटन तसेच आदिवासी समूहासोबत राहण्याची त्यांचे नृत्य प्रकार व कलाविष्कारांचे सादरीकरण आधी गोष्टींना आपण मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देऊ शकतो. यातून स्थानिकांच्या सहभागासोबतच निसर्गाचे व येथील नैसर्गिक संसाधनांचे देखील संवर्धन होऊ शकते.

या परिसरात विविध संकल्पनांवर आधारित अशा सेकंड होम प्रकल्पांची मोठ्या प्रमाणावर उभारणी होताना दिसते आहे व याला ग्राहकांकडून देखील उत्तम असा प्रतिसाद मिळतो आहे. पण या सगळ्यात कुठेही सुसूत्रता अथवा योग्य असे नियोजन दिसत नाही. येथे विकासकांना व घर घेणाऱ्यांना देखील अनेक किचकट अशा कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागते. बऱ्याच वेळा विविध विभागांकडून त्यांची अडवणूक केली जाते. नियमांच्या नावाखाली मानसिक त्रासास सामोरे जावे लागते. या परिसराचा सर्व नियम व अटी पाळूनच विकास व्हायला हवा, परंतु या सगळ्यात एक प्रकारची सुसूत्रता निर्माण होणे गरजेचे आहे. या परिसरात घर घेणाऱ्या लोकांकडे आपण आपले अतिथी म्हणून पाहणे जास्त गरजेचे आहे व नियमांचा अवास्तव बाऊ करून या उगवत्या क्षेत्राकडे आपण नकारात्मतेने न पाहता एक महत्त्वाची संधी म्हणून पाहिलं तर या क्षेत्रात आपण आपले स्थान निश्चितच अधोरेखित करू शकतो.

(लेखक हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील तज्ज्ञ आहे.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सफाई कर्मचाऱ्यांना आता सेल्फी अटेन्डन्स

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थात साधुग्राममध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी राबविलेला सेल्फी अटेन्डन्स उपक्रम महापालिकेने दोन हजार सफाई कर्मचाऱ्यांना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर विभागीय कार्यालयांमध्ये हा प्रयोग राबविला जाणार आहे. या अटेन्डन्समुळे कामचुकार कर्मचाऱ्यांना लगाम बसणार आहे. दरम्यान सफाई कामगार संघटनेने सेल्फी अटेडन्सला तीव्र विरोध केला. प्रथम सुविधा द्या, मग हा निर्णय लागू करा, अशी मागणी केली. या मागणीचे निवेदन देण्यासाठी गेलेल्या संघटनेच्या पदाधिकारी आणि आयुक्तांमध्येच खडाजंगी उडाली. थेट पोलिसांनाच बोलवावे लागले. काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर यांच्या मध्यस्तीनंतर हा वाद मिटला.

महापालिकेने साधुग्रामच्या धर्तीवर शहरातील १९९३ सफाई कर्मचारी असून शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी त्यांच्यावर आहे. परंतु, हजेरी शेडवर निम्मेही कर्मचारी कामाला नसतात अशी खुद्द नगरसेवकांची तक्रार आहे. तर अनेक जण सफाई कामाच्या नावाने गायब असतात. अनेक जण हजेरी शेडवर हजेरी लावून गायब होतात. त्यामुळे सफाई कामगाराबद्दलच्या या तक्रारींची आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी गंभीर दखल घेतली. अनेक सफाई कर्मचारी हे जास्तीचे काम करतात, तर काही कामांकडे फिरकतच नाहीत. त्यामुळे सर्व सफाई कर्मचाऱ्यांना सेल्फी अटेन्डन्स लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळी काम सुरू करतांना कामाच्या ठिकाणाहून अटेन्डन्स केला जाणार आहे. तर कामबंद करतांना अटेन्डन्स सक्तीचा करण्यात येणार आहे. प्रथम प्रायोगिक तत्वावर सहा विभागात ही योजना राबविली जाणार आहे. कर्मचाऱ्यांशी चर्चा करून नंतर अंतिम निर्णय होणार आहे. या सेल्फी अटेन्डन्समुळे शहरातील सफाई कामगारांचे वेळेवर येणे होवून शहर स्वच्छतेला हातभार लागणार आहे. परंतु, आयुक्तांच्या या निर्णयाला काही संघटनांनी विरोध केला आहे.

वाल्मिकी मेहतर समाज संघर्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सफाई कामगारांसाठी असलेल्या श्रमसाफल्य योजनेसह विविध सुविधा कामगारांना द्या अशी मागणी केली. सोबतच साडेचार हजार सफाई कर्मचारी आवश्यक असतांना केवळ दोन हजार कर्मचारी असून नव्याने कर्मचाऱ्यांची भर्ती करा, अशी मागणी केली. आयुक्तांनी भर्तीचा विषय सरकारचा असून उर्वरित विषयांवर चर्चा करू असे सांगितले. मात्र, तरीही आयुक्त आणि पदाधिकाऱ्यांमध्ये वाद कायम राहिला.

वादावर सामंजस्याने तोडगा

सेल्फी अटेन्डन्स लागू करण्यापूर्वी सफाई कर्मचाऱ्यांना शासकीय सुविधा द्याव्यात, अशी मागणी मेहतर वाल्मिक संघटना पदाधिकाऱ्यांनी केली. तर बायोमेट्रीक हजेरीला तीव्र विरोध केला. आयुक्तांनी मात्र सेल्फी अटेडन्स कायम लागूच होईल, असा दावा केला. यावरून संघटनेचे पदाधिकारी व आयुक्तांमध्ये कार्यालयातच खडाजंगी सुरू झाली. दोघांमध्ये शाब्दिक चकमकी झाल्यानंतर थेट पोलीसांनाच पाचारण करण्यात आले. त्यावरून संघटनेचे पदाधिकारी अधिक भडकून आयुक्त दडपशाही करत असल्याचा आरोप केला. सुरेश मारू, सुरेश दलोड यांनी थेट काँग्रेसच्या नेत्यांना पाचारण केले. त्यानंतर काँग्रेस शहराध्यक्ष शरद आहेर, डॉ. हेमलता पाटील, नगरसेवक उद्धव निमसे यांनी मध्यस्ती करत आयुक्तांशी चर्चा केली. आयुक्तांनीही श्रमसाफल्य योजना लागू करण्यासह कामगारांच्या काही मागण्या मान्य केल्या. त्यानंतर वाद मिटला.

हजेरीबाबत तक्रारींमुळे सफाई कामगारांसाठी सेल्फी अटेन्डन्स लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात तो प्रायोगिक आहे. या कर्मचाऱ्यांच्या श्रमसाफल्य योजनेची तातडीने अमलबजावणी केली जाईल.

- डॉ. प्रवीण गेडाम, आयुक्त

सफाई कामगारांना शासकीय सुविधा द्याव्यात मग, बायोमेट्रीक हजेरी लागू करावी. आम्ही सनदशीर मार्गाने विरोध केला. मात्र, आयुक्तांची पोलिसांना बोलावण्याची कृती अयोग्य असून अन्याय करणारी आहे.

- सुरेश मारू, कामगार संघटना

सफाई कामगार संघटना व आयुक्तांमध्ये सामंजस्याने चर्चा झाली आहे. कामगारांनी प्रायोगिक सेल्फी अटेन्डन्सला मान्यता दिली. तर आयुक्तांनीही कामगारांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले.

- शरद आहेर, शहराध्यक्ष काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेचा भाजपविरोधात एल्गार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील वाढती गुन्हेगारी, नाशिककरांचे पळवलेले पाणी, टीडीआर धोरण आणि सरकारने आरोग्य विज्ञान विद्यापीठ स्थलातंरासह व विविध कार्यालयांच्या स्थलांविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. भाजप सरकारच्या या अन्यायी वागणुकीविरोधात शिवसेना आता थेट भाजपच्या विरोधात मैदानात उतरत शड्डू ठोकला आहे.

शिवसेना कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सोमवारी बैठक घेत बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थे विरोधात आक्रमक भूमिका घेत मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, आमदार राजाभाऊ वाजे, योगेश घोलप, माजी महापौर विनायक पांडे, उपजिल्हा प्रमुख निवृत्ती जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील अनेक महत्त्वाकांशी प्रकल्प नागपूरला नेण्याचा घाट घातला जात आहे. गंगापूर धरणाचे पाणी पोलिस बंदोबस्तात जायकवाडी धरणात नेण्यात आले. त्यामुळे जिल्हाला कधीही न झालेल्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. युतीच्याच काळात झालेल्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे तुकडे करून होमिओपॅथी व आयुर्वेद हे विभाग नागपूर येथे नेण्याचा प्रयत्न चाललेले आहे. या पाठोपाठ राज्य वनविभागाचे कार्यालय नागपूर येथे स्थलांतर करण्यात आले आहे. जिल्हासाठी अतिशय महत्त्वाचा हजारो लोकांना रोजगार देणारा एकलहरा औष्णिक विद्युत प्रकल्प बंद करण्याचा घाट राज्य सरकारने घातला आहे. नवीन येणारा ६६० मेगावॉटचा प्रकल्प स्थलांतरित केला जात आहे.

प्रसंगी रस्त्यावर उतरू!

नाशिक शहर अत्यंत असुरक्षित झाले आहे. रोज शहरात खून पडत आहेत, चेनस्नॅचिंग, चोऱ्या, दरोडे हे तर रोजचे झाले आहे. सामान्य माणसाला राहणे मुश्कील झाले आहे. कायदा व सुव्यवस्था ही केवळ नावाला उरली आहे. प्रशासनावर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही. म्हणूनच शिवसेनेच्या वतीने या सर्व मुद्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालायावर धडक मोर्चा नेण्याचे आवाहन शिवसेना उपनेते बबनराव घोलप यांनी केले. कुठल्याही परिस्थितीत नाशिकचे लचके तोडून देणार नाही; प्रसंगी रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टीडीआर धोरणाविरोधात एल्गार

$
0
0

व्यावसायिकांकडून स्थापत्य महासंघ स्थापन; हायकोर्टात जाण्याचाही निर्धार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने जाहीर केलेले टीडीआर धोरण हे जाचक स्वरुपाचे असून, त्याद्वारे हजारो जण बेरोजगार होणार असल्याने नाशिकमधील विविध बांधकाम संघटना एकवटल्या आहेत. त्याद्वारेच नाशिकचा स्थापत्य महासंघ स्थापन करण्यात आला असून, टीडीआर धोरणाला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात येणार आहे.

टीडीआर धोरण आणि राष्ट्रीय हरित लवादाने महापालिकेच्या बांधकाम परवानग्यांवर घातलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर शहर परिसरातील बांधकाम व्यावसायिक, आर्किटेक्ट, सल्लागार आणि इतर घटकांची वैराज कलादालनात सोमवारी दुपारी बैठक झाली. कलादालनात उभे रहायलाही जागा नाही, अशी स्थिती यावेळी होती. तर अनेक जण दालनाच्या बाहेर मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे दिसून आले. विकास हक्क हस्तांतरण (टीडीआर) धोरण हे एखाद्या बंद खोलीत बनविण्यात आले आहे. त्याच्या परिणामांची कुठलीही परवा करण्यात आलेली नाही. केवळ सहा आणि सात मीटरच्या रस्त्यांनाच याचा फटका बसणार आहे, असे नाही तर संपूर्ण बांधकाम उद्योगच यामुळे बाधित होणार असल्याची भीती यावेळी व्यक्त करण्यात आली. आर्किटेक्ट अँड सिव्हिल इंजिनीअर असोसिएशनचे अध्यक्ष विजय सानप यांनी यावेळी सादरीकरण केले. बांधकाम मजूर, बांधकाम उत्पादनांचे विक्रेते, सप्लायर्स, आर्किटेक्ट, कन्सल्टंट, ठेकेदार, बांधकाम व्यावसायिक या साऱ्याच घटकांवर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे, असे यात स्पष्ट करण्यात आले.

कुठलेही धोरण हे ठराविक तारखेनंतर लागू होते. मात्र, हे धोरण पूर्वलक्षी प्रभावाने (रेट्रोस्पेक्टिव्ह) लागू होणार आहे. ज्यांच्याकडे जमिनी आहेत, ते मोठ्या प्रमाणात अडचणीत येणार आहेत. छोट्या बांधकाम व्यावसायिकांना उद्योग सोडण्यावाचून पर्याय राहणार नाही. ३० मीटर रस्त्यालगत ज्यांच्याकडे एक एकर जागा असेल त्यांनाच या धोरणाची झळ बसणार नाही, असे सानप यांनी सांगितले. या साऱ्याच प्रकाराबाबत उपस्थितांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सूचना, हरकती घेऊनही कुठलाही फायदा झालेला नाही. येत्या काळात येणाऱ्या गृहनिर्माण धोरणाने तर या उद्योगाला मोठा फटका बसणार असल्याची भीती त्यात व्यक्त करण्यात आली.

टीडीआर धोरणाचा महापालिकेला सर्वाधिक फटका बसणार आहे. हे धोरण ठरविताना पालिकांना विश्वासात घेण्यात आलेले नाही, असा आरोप उपमहापौर गुरमित बग्गा यांनी केला. टीडीआरसाठी सरकारने समतोल धोरण स्वीकारायला हवे.

टीडीआर जो घेतो त्याचे स्वागत करणे अपेक्षित आहे. टीडीआर देवून जमीन मालकावर मेहेरबानी केली जात नाही. तसेच, एकाला टीडीआर देवून दुसऱ्याला निर्बंध घालणे हे घटनेत बसत नाही. त्यामुळे कोर्टाची यास नक्कीच स्थिगिती मिळेल, असे बग्गा यांनी सांगितले. याप्रसंगी बांधकाम व्यावसायिक अविनाश शिरोडे, अभय तातेड, बीएआयचे अध्यक्ष रामेश्वर मलाणी, आर्किटेक्ट निलेश चव्हाण, विवेक जायखेडकर, काँग्रेस नगरसेवक उद्धव निमसे, भाजपचे पदाधिकारी सुरेश पाटील आदी उपस्थित होते. नाशकातील क्रेडाई, बीएआय, इंजिनिअर्स, आर्किटेक्ट यांसह विविध प्रकारच्या संघटनांचा मिळून स्थापत्य महासंघ स्थापनेचा ठराव बैठकीत करण्यात आला.

या महासंघाद्वारे येत्या काळात बांधकाम क्षेत्राशी संबंधित समस्या मांडणे, सरकारकडे पाठपुरावा करणे, कोर्टात दाद मागणे आदी कार्य केले जाणार आहेत. बैठकीला इतकी मोठी गर्दी होती की दालनात उभे रहायलाही जागा नव्हती. त्यामुळे दालनाच्या बाहेर मोठ्या संख्येने बांधकाम क्षेत्राशी निगडीत व्यक्ती उपस्थित होत्या.

मुख्य़मंत्र्यांसमवेत आज बैठक

टीडीआर धोरणातील जाचक अटी आणि त्याचा परिणाम याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले जाणार आहे. मुख्यमंत्र्यांची वेळ मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात आले असून, नक्कीच या भेटीतून सकारात्मक निर्णय होईल, असा आशावाद सुरेश पाटील यांनी व्यक्त केला.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खून इथले संपत नाही!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मद्य प्राशन करीत असताना झालेल्या किरकोळ वादातून एका युवकाची त्याच्याच जोडीदाराचा खून केल्याची खळबळजनक घटना सोमवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. मालेगाव स्टॅण्डवरवरील पोलिस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.

पंचवटीमधून म्हसरूळ पोलिस स्टेशन वेगळे करण्यात आल्यापासून गुन्हेगारी घटनांत फार काही फरक पडलेला दिसून येत नाही. सोमवारी सकाळी त्याचा प्रत्यय पंचवटीकरांनी घेतला. मालेगाव स्टॅण्ड येथील एका सरकार मान्य देशी दारूच्या दुकानात सकाळी अकरा वाजेच्या सुमारास मयत सुनील प्रकाश बैरागी (३२) हा कामटवाडे, सिडको येथील रहिवाशी आणि दिंडोरीरोडवरील मायको दवाखाना परिसरातील कालिका नगर येथील संशयित आरोपी गणेश पांडुरंग वायकुंडे हे दोघे दारू पीत होते. त्यावेळी या दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. त्यांच्यात शिवीगाळ सुरू झाल्यानंतर दारू दुकानाचे व्यवस्थापक सोमनाथ चांगले यांनी दोघांना समजूत घालत वाद ​मिटविला. मात्र, रागात असलेला सुनील बैरागीने दुकानाबाहेर जाऊन गणेशला मारण्यासाठी लाकडी दांडा आणला. मात्र, गणेशने तोच दांडा हिकासवून सुनीलच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. त्यात सुनीलच्या डोक्यावर वर्मी घाव बसल्याने तो जागीच कोसळला.

हाणामारीत जखमी झालेला गणेश वायकुंडेने घटनास्थळावरून पोबारा केला. या घटनेची माहिती मिळाल्यानतंर पंचवटी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश सपकाळे यांनी पथकासह घटनास्थळी पोहचून माहिती घेतली. यानंतर त्यांनी फरार झालेल्या संशयित आरोपीला तासाभरात अटक केली. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गणेश वायकुंडे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बांधकामप्रश्नी हरित लवादात उद्या अपील

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील बांधकाम परवानगी थांबविण्याच्या हरित लवादाच्या आदेशा विरोधात आता बुधवारी (दि. १०) अपील दाखल केले जाणार असल्याचे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सांगितले आहे. हरित लवादातच या निर्णयावर अपील दाखल केले जाणार असून महापालिका याबाबतीत सकारात्मक आहे. या प्रकरणी लवकरच दिलासा मिळेल असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

कचऱ्याच्या प्रश्नांवरून हरित लवादाने नाशिकमधील बांधकामे थांबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सुमारे दोन महिन्यांपासून शहरातील बांधकाम परवानग्या थांबल्या असून बिल्डरांसह ग्राहकांमध्ये अस्वस्थता आहे. शहराचा विकास ठप्प झाला असल्याने व्यावसायिक अस्वस्थ आहेत. तर हरित लवादाच्या निर्णयाला वरच्या न्यायालयात अपील केल्यास दाद मागितल्यास निकाल विरोधात जाण्याची शक्यता होती. त्यामुळे महापालिकेने या निर्णयाला पुण्याच्या हरित लवादात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेने या संदर्भातील प्रतिज्ञापत्र तयार केले आहे. त्यात कचऱ्यावर प्रक्रिया करण्या संदर्भातील महापालिकेच्या उपाययोजनाचा समावेश करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपसंचालकांसह प्राचार्यांना कोंडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिकमधील १६ नामवंत कॉलेजेसने ११ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांकडून घेतलेली जादा फी तातडीने परत करावी या मागणीसाठी छात्रभारती संघटनेने सोमवारी विभागीय शिक्षण उपसंचालक आणि प्राचार्यांना उपसंचालकांच्या कार्यालयात कोंडले. उपसंचालकांनी १० फेब्रुवारीपर्यंत कॉलेजेसने फी परत करावी, असे लेखी आदेश काढल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वसंत हुदलीकर यांनीही आंदोलनात सहभाग घेतला.

शहरातील १६ कॉलेजेसने जादा तास, विकासनिधी, गणवेश, लॅब डिपाझिट, प्रशासकीय सेवा शुल्क आदी नावाखाली विद्यार्थ्यांकडून कोट्यवधी रुपये घेतल्याचा आरोप छात्रभारती संघटनेने केला होता. शिक्षण उपसंचालक कार्यालयाने केलेल्या चौकशीत त्याला दुजोरा मिळाला. विभागीय शिक्षण उपसंचालक भगवान सूर्यवंशी यांनी ११ ऑगस्ट २०१५ रोजी आदेश काढून फी परत करण्याची सूचना केली. छात्रभारतीने ठिय्या आंदोलन करून देखील ही मुदत १ फेब्रुवारी व नंतर ८ फेब्रुवारीपर्यंत वाढवून देण्यात आली. तरीही कॉलेजेसने कार्यवाही केली नाही.

चर्चा फिस्कटली

छात्रभारतीचे जिल्हाध्यक्ष सागर निकम, शहराध्यक्ष राकेश पवार, निलेश घुगे, प्रशांत शार्दुल, विशाल रणमाळे, रोशन वाघ, निखील गुंजाळ आदींनी प्राचार्यांच्या उपस्थितीत उपसंचालक सूर्यवंशी यांच्याशी चर्चा केली. मात्र, पुन्हा मुदतवाढीची भाषा सुरू होताच कार्यकर्त्यांनी बहिष्कार घातला. त्यांनी प्राचार्य व सूर्यवंशी यांना कोंडून बाहेर ठिय्या दिला. पोलिस निरीक्षक नारायण न्याहळदे, माधवराव रोकडे यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर सूर्यवंशी यांनी आदेश काढले. कॉलेजेसने घेतलेली जादा फी १० फेब्रुवारीपर्यंत परत करून ११ फेब्रुवारीपर्यंत अहवाल सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक बागूल यांच्याकडे सादर करावा, अन्यथा कारवाई केली जाईल, असे आदेशात नमूद केले.

बेकायदेशीरपणे घेतलेले जादा शुल्क तातडीने परत करावे; संबंधित कॉलेजेसवर कठोर कारवाई करून चांगला संदेश द्यावा.

- वसंत हुदलीकर,

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आग रामेश्वरी अन् कारवाई सोमेश्वरी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
एमजीरोड, कॉलेजरोड, शालिमार असे गर्दीने ओसंडून वाहणारे रस्ते सोडून वाहने उचलणाऱ्या ठेकेदाराने थेट गोदापार्क (बापू पुल) जवळ पार्क केलेल्या वाहनांवर हात साफ केला. वाहतुकीला कोणताही अडथळा नसलेल्या ठिकाणांवर कारवाई करीत शहर वाहतूक शाखेने टोईंगच्या व्हॅनच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला असून, या योजनेला नागरिकांचा आणखी तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे.

रस्त्याच्याकडेला पार्क होणाऱ्या अस्ताव्यस्त वाहनांना दूर करण्यासाठी शहर वाहतूक शाखेने या महिन्याच्या सुरुवातीला तीन टोईंग व्हॅन कार्यरत केल्या. यासाठी एका खासगी एजन्सीची नियुक्ती करण्यात आली असून, वाहनांच्या साईजनुसार उचललेल्या वाहनमालकाकडून दंड आकारण्यात येतो. शहरातील प्रमुख रस्त्यावर पार्किंगची पुरेशी सुविधा नसल्याने वाहनचालकांना नाईलाजाने आपली वाहने पार्क करावी लागतात. त्यांच्यावरच ही कारवाई होत असल्याने नागरिकांकडून टोईंग व्हॅनला सातत्याने विरोध दर्शवला जातो. त्यातच रविवारी संध्याकाळी बापू पूलजवळ महापालिकेने तयार केलेल्या जॉगिंग ट्रॅक व उद्यान परिसरात आलेल्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. रविवारी संध्याकाळी शहरातील वेगवेगळ्या भागातील अबाल वृध्द आपल्या परिवारासह फेरफटका मारण्यासाठी आले होते. या ठिकाणी फक्त जॉगिंग ट्रॅकला येणाऱ्या वाहनांची गर्दी असते. इतर वाहने क्व​चितच येतात. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी

होण्याची सुतराम शक्यता नसते. तरीही पोलिसांनी टोईंग व्हॅनच्या मदतीने अनेक दुचाकी उचलल्या. दंड भरा आणि वाहने घेऊन जा, साहेबांचा आदेश आहे वगैरे नागरिकांना सुनावण्यात आले. याठिकाणी रिक्षाही उपलब्ध नसल्याने जॉगिंग

ट्रॅकपासून गंगापूररोडपर्यंत तीन किलोमीटरचेअंतर वृध्द, महिला आणि लहान मुलांना पायपीट करीत कापावे लागले. याबाबत बोलताना पोलिस उपायुक्त विजय पाटील यांनी सांगितले की, म्हसरूळ पोलिस स्टेशनमधून फोन आल्यानंतर टोईंग व्हॅन तिथे पोहचली. नो पार्किंगबाबत नोटीफिकेशन झालेले नसताना ही कारवाई झाली असून, संबंधितांना योग्य ती समज दिली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आम्ही या कारवाईला विरोध केला असता पोलिसांनी दमदाटी केली. अनेक महिलांना अपमानास्पद वागणुकीमुळे अश्रु अनावर झाले. सुशिक्षित नागरिकांना गुन्हेगारांप्रमाणे वागणूक देण्यात आली. पार्किंगची स्थळे आधी निश्चित करायला हवीत. त्यानंतरच मोहीम हाती घ्यायला हवी. पिवळे पट्टेही मारायला हवेत. हॉस्पिटल अथवा जेष्ठ नागरिकांच्या फेरफटक्याची ठिकाणे या त्रासदायक मोहिमेतून वगळण्यात यावी.

- रोहित जयंत कुलकर्णी
स्थानिक नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवनंतर सारसही इटलीला रवाना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिव या दोन महिन्याच्या अनाथ बालकाला इटलीतील कुटुंबात घरकुल मिळाल्यानंतर आधाराश्रमातील सारस या बालकालादेखील इटलीतील एका कुटुंबाने आपलेसे केले आहे. व्हॅलेन्टाइनुझी अॅण्ड्रयु व क्राइघेरो काटीया या जोडप्याने सारसला दत्तक घेतले असून, मंगळवारी (दि.९) हे कुटूंब इटलीला रवाना होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात दत्तक जाणारे सारस हे दुसरं मूल आहे.

अवघ्या आठ महिन्यांचा असताना पोलिसांमार्फत सारसला आधाराश्रमात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून संपूर्ण अडीच वर्ष सारस येथील कर्मचाऱ्यांच्या सान्निध्यात होता. त्यामुळे साहजिकच त्याची प्रत्येकाशी भावनिक नाळ जोडली गेली. व्हॅलेन्टाइनुझी व क्राइघेरो या दांपत्याने इटलीच्या 'इंटरनॅशनल अॅडॉप्शन असोसिएशन फॉर दि फॅमिली अॅण्ड चाइल्ड वेल्फेअर' व भारत केंद्र सरकारच्या 'केअरिंग' या प्रणालीमार्फत सारसचा फोटो आणि प्रोफाईल पाहून दत्तक घेण्याचा निश्चय केला. सारसला ऐकू येण्यास अडचणी आहेत, याची माहितीही त्याच्या प्रोफाईलवर दिली होती. तरीही कोणतीही शंका न घेता या जोडप्यानी सारसला दत्तक घेण्यास पुढाकार दाखवला. या जोडप्याला स्वतःच्या दोन मुली व एक मुलगा आहेत. मात्र एक मूल दत्तक घेण्याचे त्यांचे स्वप्न होतं. सारसला दत्तक घेऊन त्यांनी ते पूर्ण केले. त्याचे नावही पुढे सारसच ठेवण्याचा निश्चय त्यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी महामंडळ ताकही पिणार फुंकून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
सिंहस्थात प्रवासी वाहतुकीचे नियोजन पुरते फसल्यामुळे तोंडावर पडलेल्या एसटी महामंडळाने आता मांगीतुंगी सोहळ्यासाठी सावध भूमिका स्वीकारली आहे. राज्यातील कोणत्याही बसस्थानकातून प्रवाशांच्या मागणीनुसार मांगीतुंगीसाठी बसेस सोडण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. सिंहस्थात मोठ्या आर्थिक फायद्याला मुकलेल्या महामंडळाने देशपातळीवरील या सोहळ्याचे नियोजन करताना ताकही फुंकून पिण्याचा निर्णय घेतला आहे.
१४ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत बागलाण तालुक्यातील मांगीतुंगी येथे भगवान ऋषभदेव यांचा महामस्तकाभिषेक महोत्सव व आंतराष्ट्रीय पंचकल्याणक प्रतिष्ठा सोहळा होणार आहे. श्री मांगी शिखराजवळ भगवान ऋषभदेवांच्या १०८ फूट उंच मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि महामस्तकाभिषेक होणार आहे. या सोहळ्याकडे देशातीलच नव्हे तर जगभरातील जैन बांधवांचे लक्ष लागले आहे. सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. नाशिक शहरापासून सुमारे १०० ते १२५ किलोमीटरवर असलेल्या या क्षेत्रावर जाण्यासाठी सामान्य नागरिकांना राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एसटी हेच सोयीचे साधन आहे. मात्र सिंहस्थात प्रवासी वाहतुकीला भाविकांचा प्रचंड प्रतिसाद लाभेल ही अपेक्षा फोल ठरल्यामूळे महामंडळाने मांगीतुंगी येथील सोहळ्यासाठीचे नियोजन करताना सावध पवित्रा स्वीकारला आहे.
हा सोहळा अवघ्या सहा दिवसांवर येऊनही प्रवासी वाहतूकीचे कोणतेही ठोस नियोजन महामंडळाकडून करण्यात आलेले नाही. मांगीतुंगीसाठी विशेष बसेसचे प्रयोजन न करता प्रवाशांचा ओघ आणि मागणी लक्षात घेऊन बसेस सोडण्याचे महामंडळाचे नियोजन आहे. सिंहस्थाप्रमाणे जादा बसेसचे नियोजन करून स्वत:चे नुकसान करवून घेण्यापेक्षा ऐनवेळी बसेस सोडणे श्रेयस्कर अशी महामंडळाची भुमिका आहे.
सोहळ्यासाठी बहुतांश भाविक खासगी वाहने घेऊन येण्याची शक्यता आहे. त्यामुळे विशेष बसेसचे नियोजन नाही. प्रवाशांच्या मागणीनुसार बसेस सोडू. राज्यात कोठूनही आणि केव्हाही भाविकांनी मागणी केली तरी त्यांची संख्या विचारात घेऊन महामंडळ बससेवा पुरवेल.
यामिनी जोशी
विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images