Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

अॅड. हिरेंनी वाढवला मालेगावचा लौकिक

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव शहरातील नामांकित वकील शिशिर हिरे यांनी मेहनत आणि जिद्दीच्या बळावर एक एक पायरी चढत यशाचे शिखर गाठले. अॅड. शिशिर एस. हिरे यांची विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, या युवा व्यक्तिमत्वाच्या कर्तृत्वाने शहराच्या नावलौकिकात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

अॅड. शिशिर हिरे यांच्यातील गुणवत्तेच्या जोरावर त्यांची पोलिस आयुक्त बृहन्मुंबई कार्यक्षेत्राकरिता विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावर नियुक्त होणारे अॅड. हिरे हे मालेगावातील पहिलेच अभियोक्ता ठरले आहेत. गेल्या वीस वर्षांपासून अॅड. हिरे वकिली क्षेत्रात कार्यरत आहेत. शालेय तसेच पदवीचे शिक्षण त्यांनी मालेगाव शहरातूनच पूर्ण केले. परिचित असलेले अॅड. आण्णासाहेब पवार यांच्याकडून हिरे यांनी या क्षेत्रात येण्याची प्रेरणा घेतली. वकिली क्षेत्रात प्राविण्य मिळवण्यासाठी मुंबई येथील शासकीय लॉ कॉलेजमधून त्यांनी पदवी घेतली. लॉ केल्यानंतर त्यांनी आपल्या जन्मभूमी अर्थात मालेगाव न्यायालयात काम करण्याचे आव्हान स्वीकारले. ग्रामीण भागातील प्रश्न समजून घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता. अभ्यासापूर्ण बाजू मांडण्याच्या कौशल्यामुळे त्यांना २००१ मध्ये मालेगाव दंगल आयोगावर देखील घेण्यात आले. या प्रकरणी सरकारी वकील म्हणून त्यांनी केलेल्या कामाची सर्वत्र प्रशंसा देखील झाली. महाराष्ट्रातील यंगेस्ट स्पेशल कन्स्युलर / पिपी म्हणून ते नावाजले गेले. सन २०१३ मधील धुळे दंगल आयोगात देखील ते कार्यरत आहेत. तसेच, २०१३ मध्ये मुंबई, माझगाव येथील इमारत पडली त्या प्रकरणी देखील त्यांनी न्यायालयात पीडितांची बाजू भक्कमपणे मांडली. त्यांच्या याच कर्तृत्वाची दखल बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालयाने घेत त्यांना विशेष सरकारी अभियोक्ता कामासाठी विचारणा केली होती.

अॅड. निकम सोबत करणार काम

गेल्या २० वर्षांच्या कारकिर्दीत या क्षेत्रातील आव्हानांना पार करीत यशाचे शिखर गाठले. अॅड. उज्ज्वल निकम यांच्या समवेत आता ते काम करणार आहेत. मालेगाव न्यायालयातील वकील ते आता थेट मुंबई उच्च न्यायालयात विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. शिशिर हिरे यांचा हा प्रवास या क्षेत्रात येणाऱ्यांसाठी दीपस्तंभ ठरला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकच्या द्राक्षांची परदेशवारी

0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

दुष्काळी परिस्थिती व पाणीटंचाईवर मात करीत पिंपळगाव बसवंत परिसरातील शेतकऱ्यांनी भरघोस द्राक्षांचे उत्पादन घेतले आहे. द्राक्ष हंगामास जोरदार प्रारंभ झाला आहे. स्‍थानिक बाजारपेठेत द्राक्षांच्या जातीनुसार ४० रुपयांपासून ८५ रुपये किलोप्रमाणे द्राक्ष मिळत आहेत.

सलग तीन ते चार वर्षांपासून बेमोसमी पाऊस व गारपीटमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. यावर्षी पाणीटंचाई असली तरी हवामान चांगले असल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती चांगले उत्पादन येण्याची शक्यता आहे. चांगल्या हवामानामुळे द्राक्षांचे दर्जेदार उत्पादन तयार झाले असून, द्राक्षांना गोडीही आली आहे. त्यामुळे परदेशासह देशांतर्गत बाजारपेठेतही चांगली मागणी होत असल्याने द्राक्षांना उत्तम भाव मिळत आहे. पिंपळगाव बसवंत शहरातून मालदा, कोलकाता, दिल्ली, सिलिगुडी, कानपूर, लखनऊ, जयपूर आदी बाजारपेठेत द्राक्ष रवाना होत आहेत. युरापेमध्ये मोठ्या प्रमाणावर द्राक्ष निर्यात सुरू झाली आहे.

दक्षिण आफ्रिकेतील द्राक्ष हंगाम लवकर आटोपल्यामुळे भारतीय द्राक्षांना युरोपमध्ये प्रचंड मागणी होत असून, निर्यातदार कंपन्यांकडून निर्यातक्षम द्राक्ष खरेदीसाठी चढाओढ सुरू झाल्याचे दिसत आहे. युरोप व्यतिरिक्त रशिया व आखाती देशातही काही प्रमाणात द्राक्ष रवाना होत आहेत. सोनाका जातीच्या द्राक्षांची हक्काची बाजारपेठ म्हणून बांगलादेश ओळखले जाते. दरवर्षी भारतातून प्रचंड प्रमाणात निर्यात होत असते. यंदा मात्र बांगलादेश सरकारने प्रती ट्रकसाठी पाच रुपयांऐवजी सात लाख रुपये आयातशुल्क आकारणी केल्याने बांगलादेशसाठी यंदा द्राक्ष आंबट ठरण्याची शक्यता आहे. भारत सरकारने बांगलादेशाची सीमा खुली केली असली तरी द्राक्षांसह सर्वच फळांच्या आयात शुल्कात प्रचंड वाढ केल्याने बांगलादेशात फळांची निर्यात मंदावली आहे.

पिंपळगाव परिसरातून दररोज किमान पन्नास ट्रक देशातील बाजारपेठेत द्राक्ष घेऊन रवाना होत आहेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, राजस्‍थान, गुजरात, हरियाणा, पश्चिम बंगाल आदी राज्यातील बाजारपेठेत द्राक्षांना चांगले स्‍थान मिळत आहे.

पूर्वीच्या सहा चाकी ट्रक द्राक्ष वाहतुकीतून हद्दपार झाल्या असून, आता बारा चाकी वेगवान ट्रक द्राक्ष वाहतुकीसाठी सज्ज झाल्या आहेत. यामुळे वीस टनापर्यंत द्राक्ष वाहतूक करणे सोयीस्कर झाले आहे.

-

कोट

शेतकऱ्यांनी अनुकूल वातावरणाचा फायदा घेत दर्जेदार उत्पादन घेतले आहे. योगायोगाने देशात व परदेशातही द्राक्षांना चांगली मागणी होत असल्यामुळे हे वर्ष शेतकऱ्यांना लाभदायक ठरणार आहे. दर्जेदार उत्पादन, चांगली गोडी, प्रचंड मागणी यामुळे द्राक्षांना समाधानकारक भाव मिळत आहे.

- सुनील जाधव, निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक

--

द्राक्षाचे दर (प्रती किलो)

द्राक्षांची जात स्‍थानिक भाव निर्यात दर

सोनाका ४० ते ४५ ४० ते ४५

थॉमसन २२ ते ३५ ७१ ते १०५

शरद सिडलेस ६० ते ८५ ८५

जम्बो ब्लॅक ८० ते ८५ ८५

--

ट्रक भाडे

बाजारपेठ वजन भाडे

मालदा २० टन ८० ते ९० हजार

सिलिगुडी २० टन ९० हजार ते एक लाख

कोलकाता २० टन ६० ते ७० हजार

दिल्ली २० टन ६० जे ७० हजार

कानपूर २० टन ६० ते ६५ हजार

राजस्‍थान २० टन ५० ते ५५ हजार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. म्हैसेकर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या निवडीची घोषणा रविवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केली. डॉ. म्हैसेकर हे नांदेड येथील डॉ शंकरराव चव्हाण सरकारी वैद्यकीय कॉलेजचे प्रभारी अधिष्ठाता तसेच पल्मोनरी मेडिसिन विभागाचे विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम केले आहे.

राज्यपाल तथा कुलपती सी. विद्यासागर राव यांनी रविवारी निवड समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या नावाची घोषणा केली. डॉ म्हैसेकर यांची नियुक्ती पाच वर्षांसाठी करण्यात आली आहे.

डॉ. अरुण जामकर यांचा कार्यकाळ २० डिसेंबर रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. विभागीय आयुक्त एकनाथ डवले प्रभारी कुलगुरू म्हणून या पदाचा कार्यभार सांभाळीत होते. डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी १९८४ साली औरंगाबादच्या सरकारी कॉलेजातून एमबीबीएस ही पदवी प्राप्त केली तर १९८९ साली मुंबईच्या जी. एस. वैद्यकीय कॉलेजातून (क्षयरोग व छातीचे विकार) या विषयात एमडी केले. मेडिकल कौंन्सिल ऑफ इंडियाच्या पदव्युत्तर पदवी विभागाचे ते सदस्यही आहेत. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिसभा सदस्य पदावर ते कार्यरत आहेत. या अगोदर डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड येथे क्षयरोग व श्वसन विषयाचे विभागप्रमुख आणि प्राध्यापक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. डॉ. म्हैसेकर यांना अध्यापन, संशोधन व प्रशासनाचा व्यापक अनुभव असून, त्यांचे संशोधन निबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रकाशनात प्रसिद्ध झाले आहेत.

राज्यपालांनी कुलगुरू निवडीसाठी दिल्लीच्या एम्स येथील डॉ. निखिल टंडन यांच्या अध्यक्षतेखाली शोध समिती गठित केली होती. समितीने शिफारस केलेल्या सर्व उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती रविवारी राजभवन येथे झाल्या त्यानंतर डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असल्याचे राजभवनातर्फे जाहीर करण्यात आले आहे. नवनियुक्त कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर लवकरच विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्याकडून विद्यापीठाचा कार्यभार स्विकारतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिंक कारखान्यात स्फोट; आठ कामगार जखमी

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथे रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास संजय अॅड्रेसिव्ह या डिंक पावडर बनवणाऱ्या कंपनीत ऑईल टाकीचा स्फोट झाल्याने आठ कामगार गंभीर जखमी झाले. स्फोट इतका मोठा होता की, स्फोटाच्या हादऱ्याने कंपनीच्या छताचे पत्रे उडाले. उडालेलले पत्रे वीजेच्या खांबांवर पडल्याने निफाड शहराचा विद्युत पुरवठा तीन तास खंडित झाला होता.

निफाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंदेवाडी नांदुरी रस्त्यावर संजय अॅड्रेसिव्ह ही कंपनी आहे. याचे मालक संजय पारीख (रा. मुंबई) हे आहेत. या डिंक कारखान्यात १५ कामगार काम करीत असताना बॉईलरमधून अचानक धूर व ऑइल बाहेर निघू लागले व त्यानंतर ऑईल टाकीचा मोठा स्फोट झाला. त्यामुळे कारखान्यात आग लागली. या आगीमुळे पंधरापैकी आठ मजूर जखमी झाले. उर्वरित कामगारांनी आगीवर पाण्याचा मारा करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पिंपळगाव ग्रामपालिकेचे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाल्याने आग आटोक्यात आली.

कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते. निफाड पोलिस स्टेशनचे पोलिस नि‌रीक्षक निघोट यांनी घटनेची माहिती घेतली. आगीमुळे भाजलेल्या कामगारांपैकी भारती रविंद्र क्षीरसागर या खाजगी रुग्णालयात उपचार घेत असून मिना भाऊसाहेब पवार, गायत्री अंबादास शिंदे या गंभीर जखमी असून त्यांना निफाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर उर्वरित पाच जखमीत सविता मुरलीधर सूर्यवंशी, सुभाष यादव, लालचंद यादव, सुभाष राजेश यादव, अनिल यादव यांच्यावर प्राथमिक उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीजदर विषमतेविरोधात एल्गार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक सरकार स्तरावरून पेरण्यात येणाऱ्या प्रांतिक वादामुळे राज्यात मराठवाडा अन् विदर्भाव्यतिरीक्त इतरत्र बेकारीची कुऱ्हाड कोसळेल. केवळ सरकारच्या चुकीच्या भूमिकांची ही विषफळे उद्योजक कुठल्याही स्थितीत स्वीकारणार नाहीत. वीजदरात विषमता वाट्याला आल्यास राज्यात उद्योजकांच्या संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन छेडतील, असा इशारा रविवारी राज्यातील उद्योग संघटनांच्या बैठकीत दिला.

सातपूरच्या निमा हाऊस येथे या बैठकीचे आयोजन निमा (नाशिक इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन) यांच्या वतीने करण्यात आले होते. मराठवाडा, विदर्भासह डी प्लस झोनमधील उद्योगांवर वीजदराबाबतीत मेहरबानी करण्याची सरकारची भूमिका हाणून पाडण्याचा मनोदय या बैठकीत एकमुखाने व्यक्त करण्यात आला. यासाठी अॅक्शन प्लॅन म्हणून ९ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत औद्योगिक संघटना मुख्यमंत्र्याची भेट घेणार असून, सरकारसमोर भूमिका मांडण्यात आहेत. उद्योजकांची भूमिका सरकारने समजून न घेतल्यास आंदोलनाचा पावित्रा स्वीकारला जाणार आहे.

या बैठकीदरम्यान व्यासपीठावर निमा अध्यक्ष संजीव नारंग, अहमदनगर मॅन्युफॅक्चरींग असोसिएशनचे अध्यक्ष अशोक सोनवणे, आयमाच्या उपाध्यक्षा निलीमा पाटील, लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष संजय महाजन, नाईसचे उपाध्यक्ष रमेश वैश्य, प्लॅस्टीक मॅन्युफॅक्चरर्सचे संचालक शिवा अय्यर, स्टील मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे पदाधिकारी चेतन लोढा, निमाचे सरचिटणीस मंगेश पाटणकर, निमा उर्जा समितीचे अध्यक्ष मिलींद राजपूत, निमाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गोपाळे आदी उपस्थित होते.

असा असेल अक्शन प्लॅन

राज्यात सर्व औद्योगिक संघटना व उद्योजक सभासदांकडून मुख्यमंत्री, ऊर्जा मंत्री, उद्योगमंत्री यांना ई-मेल पाठविले जातील. ९ फेब्रुवारी रोजी सर्व औद्योगिक संघटनांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेईल. त्यानंतर १० रोजी महावितरणला निवेदन दिले जाईल. ११ रोजी त्या-त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल. १२ रोजी स्थानिक आमदार व खासदार यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात येईल. या बैठकीनंतर १३ रोजी सर्व औद्योगिक संघटनांचे शिष्टमंडळ सर्व लोकप्रतिनिधींसोबत मुख्यमंत्र्यांना भेटून हा निर्णय रद्द करण्यास विनंती करेल. तरीही सकार न जुमानल्यास उद्योजक आंदोलनासाठी रस्त्यावर उतरतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डायरियाचा वाढला धोका

0
0

शिखरेवाडी, नेहरुनगर, गंधर्वनगरी परिसरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याबाबत स्थानिक नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार तक्रारी केल्यात. मात्र, नागरिकांच्या तक्रारीला महापालिका प्रशासनाने केराची टोपली दाखवली. दूषित पाण्याचा प्रश्न 'जैसे थे' राहिल्याने डायरियाचा फास वाढत आहे. अनेक नागरिकांना उलट्या, जुलाबाचा त्रास होत असून थंडी, तापाने लहान मुलेच नव्हे तर मोठी मंडळीही त्रस्त आहेत. गंधर्वनगरी परिसरातील घरती सोसायटी, कादंबरी सोसायटी, अमर हौसिंग सेसायटी, निलांबरी सोसायटी, ड्रीम सोसायटी येथे डायरियाने धुमाकुळ घातला आहे. लहान मुले आणि वयस्कर नागरिकांना हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन उपचार घेण्याची वेळ आली आहे. तसेच शिखरेवाडी परिसरातील अमर सोसायटी, शिखर अपार्टमेंट, निता चेंबर्स, हरिओम सोसायटी, राधा निवास येथील नागरिकांना दूषित पाण्याची झळ बसते आहे. जुलाब आणि उलट्यांमुळे शरिरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. ही परिस्थिती पेशंटच्या जीवावर बेतू शकते. नागरिकांनी आपापल्यापरीने काळजी घ्यावी, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

जलवाहिनी घातक शिखरेवाडीत ४० वर्षांपूर्वी पिण्याच्या पाण्यासाठी जलवाहिनी टाकण्यात आली होती. ती अत्यंत जुनाट झाली आहे. त्यातून ठिकठिकाणी गळती होते. लोकसंख्येच्या तुलनेत पाईपलाईनचा व्यास कमी असल्याने तेथे कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. त्यातच आता दूषित पाणी पुरवठा सुरू झाला आहे. नागरिकांच्या समस्येत भर पडली आहे.

दूषित पाण्याबाबत राजकीय नेत्यांचे मौन गंगापूर धरणात नेमके पाणी किती? उन्हाळ्यासाठी किती कपात करायची? अशा मूलभूत मुद्यावरून सध्या राजकारण होतांना दिसत आहे. जनतेने निवडून दिलेले भाजप, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्र‍ेस तसेच शिवसेनेचे लोकप्रतिनिधी पाण्यासारख्या संवेदनशील मुद्याचे फक्त राजकारण करत आहे. आता उन्हाळ्याची सुरुवात झाली असून नागरिकांना दूषित पाण्याचा सामना करावा लागतो आहे. धरणांचा जिल्हा म्हणून थोरवी गाणाऱ्या नाशिककरांना भविष्यात काय मनस्ताप सहन करावा लागणार, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो आहे.

अनेक दिवसांपासून माझे पती दूषित पाण्याबाबत महापालिका अधिकाऱ्यांकडे तक्रार करीत आहेत. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही. आमच्या घरातील चार जण दूषित पाण्यामुळे आजारी आहेत. - कविता देसाई, त्रस्त नागरिक

नागरिकांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा महापालिका नीट करू शकत नाही. आपण स्मार्ट सिटीच्या गप्पा तरी कशा मारतो? पाणी आणि दवाखान्याचे बील आम्ही का म्हणून भरायचे? - मंदाकीनी फडताळे, रुग्ण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वालदेवीमुळे पाणी दूषित

0
0

नाशिकरोड विभागासाठी दररोज साधारण दीड एमसीएफटी पाणी पुरवठा केला जातो. दारणा नदीतून पाण्याचे रोटेशन असते त्यावेळी संपूर्णपणे पाणी उचलले जाते. नदीतील चेहेडी पंपिगचे रोटेशन ३० जानेवारीला बंद झाले. परंतु, पाणी पुरवठा विभागाने वालदेवीचे ड्रेनेजचे सांडपाणी मिसळलेले पाणी त्यानंतरही सुरू ठेवले. गेल्या तीन चार दिवसांपासून नाशिकरोड भागात शेकडो लोकांना याचा त्रास होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोत मालमत्ता मोजणी

0
0

महापालिकेचा प्रायोगिक उपक्रम; इंजिनीअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांचाही सहभाग

म. टा. प्रतिनिधी, सिडको

नाशिक महापालिकेची स्थापना झाल्यापासून किरकोळ वाढ वगळता कुठलीच करवाढ करण्यात आलेली नाही. यासाठी महापालिकेकडून रविवारी प्रायोगिक तत्तावर मालमत्तेचे सर्व्हेक्षण करण्याचे काम हाती घेण्यात आले. यामध्ये नवीन नाशिक अर्थात सिडकोतील वेगवेगळ्या भागात घरांचे ७० महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून दिवसभर सर्व्हे करण्याचे काम सुरु होते.

नाशिकमध्ये जुन्या दरांप्रमाणेच घरपट्टी व विविध करांची महापालिकेडून आकारणी केली जात आहे. यात महापालिकेनेच काही वर्षांपूर्वी स्पेक नावाच्या कंपनीला घरांच्या मोजणी करण्यासाठी काम दिले होते. मात्र, त्या कंपनीने केलेल्या सर्व्हेक्षणावर महापालिकेच्या महासभेत सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी विरोध केला होता. यानंतर सबंधित कंपनीने केलेल्या घरांच्या सर्व्हेला केराची टोपली दाखविण्यात आली.

मात्र, महापालिकेचा वाढलेला खर्च पहाता उत्पन्नाच्या नव्या मार्ग व पर्यायांचा शोध महापालीका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडून केला जात आहे. यासाठी प्रायोगिक तत्वावर नवीन नाशिकमध्ये रविवारी दिवसभर ७० अधिकारी व कर्मचारी यांनी वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन घरांचे सर्व्हेक्षण केले आहे. यात घरगुती, व्यावसायिक किंवा इतर वापण्यात येणाऱ्या मालमत्तेचा अहवाल आयुक्तांकडे ठेवला जाणार आहे. यानंतर आयुक्त पुढे काय निर्णय घेतात याबाबत अधिकाऱ्यांनी काही सांगितले नाही. सर्व्हेक्षण करतांना अनेक ठिकाणी रहिवाशांच्या प्रश्नांना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना तोंड द्यावे लागले. याप्रसंगी उपायुक्त रोहिदास दोरकुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त जयश्री सोनवणे, अधीक्षक भिमाशंकर शिंगाडे, एल. ए. गायकवाड, कर्मचारी संगमनेरे, पठाण, देवरे, पाटणकर आदींसह ७० अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.

फिल्डवर्कचा अनुभव

महापालिकेने प्रायोगिक तत्तावर सुरू केलेल्या घरांच्या सर्व्हेक्षणासाठी शहरातील विविध इंजिनीअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा देखील सहभाग होता. यामुळे सर्व्हे करतांना महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना या विद्यार्थ्यांची मदत झाली. महापालिकेने यापूर्व वॉटर ऑडिटसाठीही विद्यार्थ्यांचा हातभार लागला होता. यातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष फिल्डवर्कचा अनुभव मिळत आहे.

शेजारच्यांची का नाही मोजणी?

नवी नाशिकमध्ये घरांचे सर्व्हेक्षण सुरू केला जात असतांना 'आमचे का, शेजारच्यांचे का नाही?' असे प्रश्न रहिवाशांनी उपस्थित केला. यावेळी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी संयमाने उत्तर देत 'हा सर्व्हे प्रायोगिक तत्वावर' असल्याचे सांगितले. मात्र, काही रहिवाशी पोर्चमधली जागाच का मोजली अशा प्रश्नांची सरबत्ती सुरू होती. यावर कर्मचाऱ्यांनी तुमच्याच कामासाठी सर्व्हे केला जात असल्याचे शांततेत सांगितले.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चेतना यात्रेचा श्रीगणेशा

0
0

रामकुंड परिसरात हरितकुंभ चेतना यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, महापालिकेचे उपआयुक्त यू. बी. पवार, चिन्मय उदगीरकर, धनश्री क्षीरसागर, कांचन पगारे, पुरोहित संघाचे सतीश शुक्ल, हरितकुंभ समितीचे राजेश पंडित, निशिकांत पगारे आदी उपस्थित होते. याप्रसंगी डवले म्हणाले, की कुंभमेळ्यापूर्वी वेळोवेळी झालेल्या नियोजनाच्या बैठकांमध्ये अधिकाऱ्यांनी 'हरितकुंभ'चा संकल्प केला. बैठकांमधील विचारमंथनातून हरितकुंभ बाबतच्या विविध कल्पना समोर आल्या. विशेष म्हणजे या कल्पना मूर्त रूपात याव्यात, यासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग महत्त्वूपर्ण ठरला. सांस्कृतिक क्षेत्रातूनही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. लोकसहभागातून पर्यावरण रक्षणाचा केलेला हा प्रयत्न इतरत्रही मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास डवले यांनी व्यक्त केला.

जलरक्षणातून संतुलन

याप्रसंगी राजेंद्र सिंह म्हणाले, की कुंभमेळा जलसंपत्तीचे महत्त्व आणि तिच्या संवर्धनाचा संदेश देतो. नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्यात गोदावरी पात्रातील शुद्ध जलामुळे सोहळ्याचे पावित्र्य जपले गेले. अधिकारी, कर्मचारी, चित्रपट कलावंत आणि समाजातील विविध घटकांनी या उपक्रमात सहभाग घेतल्याने नदी प्रदूषण टाळण्याचा संदेश भाविकांपर्यंत पोहोचला. चेतना यात्रेच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश इतर कुंभमेळ्याच्या क्षेत्रांवरही पोहोचेल आणि तेथेही चांगल्या पद्धतीने कुंभमेळा साकार होईल, असा विश्वास सिंह यांनी व्यक्त केला. जलसंपत्ती रक्षणाच्या माध्यमातून पर्यावरण संतुलनाचे उद्दिष्ट्य साकार करता येईल, असे ते म्हणाले.

हरितकुंभ नाशिककरांमुळे यशस्वी नाशिककरांच्या प्रयत्नामुळे हरितकुंभ यशस्वी झाल्याचे गौरवोद्गार जिल्हाधिकारी कुशवाह यांनी काढले. हरितकुंभ म्हणून हा उत्सव स्मरणात राहील. पर्यावरण रक्षणाचा संदेश प्रत्येक भाविकापर्यंत पोचविण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने यात सहभाग घेतला. या माध्यमातून स्वच्छतेच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले गेले. पुढील कुंभमेळ्यात पर्यावरणाविषयी जागृती झाली असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आज त्र्यंबकमध्ये यात्रा गोदावरी पुजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. गोदावरीच्या जलाने कलश भरून त्याची पूजा करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते चेतना यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यात्रा सोमवारी (दि. ८) त्र्यंबकेश्वरकडे प्रस्थान करणार असून राज्यातील इतर तीर्थस्थळी नदी प्रदूषण टाळण्याबाबत संदेश देत उज्जैन येथे जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लहरी हवामानाचा नाशिककरांना फटका

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक‌करांना सध्या दिवसा उन्हाचे चटके तर रात्री थंडीचा गारठा सहन करावा लागतो आहे. आठवडाभरात सातत्याने जिल्ह्यातील तापमानात कमालीचे चढउतार होत असून त्याचा मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होऊ लागला आहे. १ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत कमाल आणि किमान तापमानात चार अंशापर्यंत चढउतार होत असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

हिवाळ्यात येथील हवा शीतल आणि आल्हाददायक राहात असल्याचा नाशिककरांचा अनुभव आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून वातावरणात सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे नाशिककरांना दिवसागणिक बदलत्या हवामानाचा सामना करावा लागतो आहे. थंड हवेचे ठिकाण अशी नाशिकची ओळख आहे. त्याचा प्रत्यय डिसेंबरअखेरीस आणि जानेवारीत काहीवेळा आला. अगदी पाच अंशाच्या खाली तापमान गेल्याच्या नोंदी अनेकदा नोंदविल्या गेल्या. यंदा राज्यातील निचांकी तापमानाची नोंद अनेकदा नाशिकमध्ये झाली. मात्र, गेल्या आठवडाभरापासून दिवसा तापमानात वाढ होत असल्याची तर रात्री थंडीचा पारा घसरत असल्याची माहिती हवामान विभागाकडील नोंदींवरून येते आहे. उन्हाळ्यात तापमान वाढते तसा अनुभव हिवाळ्यातही येऊ लागला आहे. आठवडाभरात जिल्ह्यातील कमाल तापमान २९ अंशांपासून ते अगदी ३४ अंश सेल्सियसपर्यंत नोंदविण्यात आले आहे. किमान तापमानही ८.४ अंशांपासून १२.४ अंशांपर्यंत नोंदविण्यात आले आहे. १ ते ७ फेब्रुवारी या सात दिवसांत कमाल आणि किमान तापमानात चार अंश सेल्सियसपर्यंत चढ उतार झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. सर्वाधिक ३४ अंश सेल्सियस तापमान शुक्रवारी (दि. ५ फेब्रुवारीला) नोंदविण्यात आले. तर सर्वात कमी म्हणजेच ८.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद बुधवारी (दि. ३) फेब्रुवारीला झाली.

..

रुग्णसंख्येत वाढ

बदलत्या हवामानाचा परिणाम मानवी आरोग्यावर होताना दिसतो आहे. सर्दी, घसादुखी, खोकला आणि तापाच्या रुग्णांचे प्रमाण वाढल्याचे चित्र शहरात पहावयास मिळत आहे. शहरातील दवाखान्यांमध्ये अशा रुग्णांची गर्दी होत असून व्हायरल इन्फेक्शनपासून संरक्षणासाठी काळजी घ्यावी, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जाऊ लागला आहे.

दिनांक..............कमाल तापमान........किमान तापमान

७ फेब्रुवारी २९ १२.४

६ फेब्रुवारी २९.५ ११.६

५ फेब्रुवारी ३४ ११.४

४ फेब्रुवारी ३१.१ ९.२

३ फेब्रुवारी ३२.९ ८.४

२ फेब्रुवारी ३२.९ ११

१ फेब्रुवारी ३२.६ ११.५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेचे ‘दुसऱ्यास सांगे ब्रह्मज्ञान’

0
0



रेल्वेतून कुठल्याही ज्वलनशील पदार्थांची वाहतुकीस कायद्याने बंदी आहे. असा प्रयत्न जरी कुणी केला तर त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारला जातो. संबंधित व्यक्तीला शिक्षा देखील होते. परंतु, रेल्वे सुरक्षेचा हाच कायदा बहुतेक रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी नाही. स्फोटक ठरू शकणाऱ्या बॅटरीची सर्रासपणे वाहतूक केली जात असल्याचे प्रवाशांनी ५ फेब्रुवारी रोजी अनुभवले. भुसावळवरून मनमाड येथे रेल्वेच्या वीज विभागातील चार कर्मचाऱ्यांनी पॅसेंजरने २० बॅटरीची प्रवाशी डब्यातून वाहतूक केली. भुसावळच्या अधिकाऱ्यांनी बॅटरीचे चलन दिले असल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रवाशांनी विचारल्यावर सांगितले.

विशेष म्हणजे काही प्रवाशांनी बॅटरी तुम्ही रेल्वेतून कसे काय नेत आहेत अशी विचारणाही केली. यावर त्या संबंधित कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकारी सुविधाच देत नसल्याने रेल्वेतून बॅटरीची वाहतूक करावी लागत असल्याचे सांगितले. तसेच रेल्वेचा गार्ड किंवा रेल्वेचे इंजिन चालक हे देखील त्यांच्या जवळ बॅटरी ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून देत नसल्याने प्रवाशी डब्यांतून बॅटरी घेऊन जावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रवासी संकटात! रेल्वेतून ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करण्यावर बंदी आहे. मात्र, रेल्वेचेच कर्मचारी बॅटरीची वाहतूक करतांना दुर्घटना घडल्यास यास जबाबदार कोण राहील? बॅटरींमध्ये अॅसिड असते. असे असतांना रेल्वेच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी देखील बॅटरी वाहतुकीकडे दुर्लक्ष केले कसे? असा प्रश्न असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला आहे. वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालत स्फोटक पदार्थ वाहतूक करणाऱ्यांवर तसेच त्यांच्या वरिष्ठांवर कारवाईची प्रवाशांनी केली आहे.

रेल्वेतही पाणीटंचाई भुसावळवरून देवळालीकडे येणाऱ्या पॅसेंजरमध्ये प्रवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. देवळावीवरून भुसावळकडे जातांना मुबलक पाणी गाडीत असते. मात्र, परतीच्या प्रवासात चाळीसगाव किंवा नांदगावच्या पुढे डब्यांमधील पाणी संपल्याने प्रवाशांना पाणी मिळतच नाही. टॉयलेटला जाण्यासाठी सुद्धा विकत घेतलेले सिलबंद बाटलीतील पाणी वापरावे लागत असल्याने प्रवाश्यांनी संताप व्यक्त केला आहे.

नवीन बॅटरी रस्तेमार्गे भुसावळला बॅटरीच्या वाहतुकीबाबत रेल्वेच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला असता, त्यांनी बॅटरी दुरुस्तीसाठी मनमाडला नेल्या जात आहे. मात्र, त्यासाठी वाहनांची सुविधा मिळत नाही. तसेच नवीन बॅटरी देखील भुसावळवरूनच आणाव्या लागता. मात्र, त्या मुंबईवरून थेट रस्ते मार्गे भुसावळला पाठविल्या जातात. यात मनमाडमार्गे बॅटरीची गाडी नेण्याचे गरज असल्याचे कर्मचारी सांगतात. यामध्ये मनमाडला लागणाऱ्या बॅटरी मनमाड विभागामध्ये उतरविता येतील. यामध्ये पुन्हा बॅटरी घेण्यासाठी भुसावळला जाण्याची गरज भासणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

ज्वलनशील पदार्थ रेल्वेतून वाहतूक करण्यावर कायद्याने बंदी आहे. मात्र, रेल्वेचेच कर्मचारी बॅटरीची रेल्वेतून वाहतूक सर्रासपणे करत आहेत. याकडे रेल्वेच्या सुरक्षा विभागाने लक्ष घालण्याची गरज आहे. - मनोज पाटील, रेल्वे प्रवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कैलासाच्या तालावर थिरकली तरुणाई

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ग्रेप वाईनची टेस्ट होठांवर जपत कैलासा बँडच्या तालावर थिरकणारी तरुणाईची पावले अन् निसर्गाच्या कुशीत साऱ्या व्यथा विसरत क्षणभराच्या सेलिब्रेशनसाठी धुंद झालेले देश विदेशातील वाईनप्रेमी.. अशा एखाद्या उंची चित्रपटाला साजेशा माहोलमध्ये 'सुला फेस्ट २०१६' मध्ये रविवारी रंगत भरली गेली.

सुला फेस्टमध्ये सहभागी होण्यासाठी नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर देशभरासह विदेशातूनही पर्यटक आले आहेत. शहरातील विविध हॉटेल्समध्ये थांबलेल्या या पर्यटकांनी शनिवारी व रविवारी दुपारी गंगापूर रस्त्यावरील सुला वायनरीची वाट धरली. यावेळी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूकीची वर्दळ होती. सुलाच्या कॅम्पसमध्ये फेस्टीवलच्या दुसऱ्या दिवशी विख्यात सुफी गायक कैलास खेरच्या कैलाशा बँड चे आकर्षण होते.

कैलासा बँडसह अॅम्पिथिएटर आणि डीजे म्युझिकची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. शनिवारी इव्हेंटच्या पहिल्या ऑस्ट्रेलियातील विख्यात बँड 'दि कॅट एम्पायर'च्या तालाने रसिकांना मोहिनी घातल्यानंतर रविवारी कैलासाच्या सादरीकरणाने या रसिकांना खिळवून ठेवले. यावेळी 'कैलासा इश्क अनोखा' या कैलास खेर यांच्या नव्या अल्बमचे लाँचिंगही हजारो कैलासा फॅन्सच्या उपस्थितीत करण्यात आले. कैलासा बँडच्या सोबतीला स्पेनचा विख्यात एज्यू लंर्बनॉन बँडचीही साथ रसिकांना रंगत देऊन गेली. या फेस्टीवलला मिळणारा रसिकांचा उदंड प्रतिसाद लक्षात घेता सुरक्षा व्यवस्थाही चोख ठेवण्यात आली होती. या फेस्टीवलमध्ये सुमारे २५० विदेशी पर्यटक सहभागी झाले आहेत. सुमारे १५ हजारांपेक्षाही जास्त वाईनप्रेमींनी रविवारी सायंकाळी या फेस्टीवलचा आनंद लुटला. तर तीन इंटरनॅशनल म्युझीक बँड यंदा सादर करण्यात आले.


फेस्टीवलविरोधात 'छावा'चे आंदोलन

वाईन उत्पादनाच्या मर्यादेपलिकडे जाऊन बेकायदेशीररित्या असे फेस्टीवल भरविण्यात येऊ नयेत, या मागणीसाठी रविवारी दुपारी छावा मराठा संघटनेने आंदोलन छेडले. या प्रकरणी छावाच्या वतीने नाशिक तालुका पोलिसांना निवेदनही देण्यात आले. वाईनच्या मार्केटींगसाठी अशा प्रकारे भरविल्या जाणाऱ्या इव्हेंटमुळे नीतीमूल्यांना धक्का पोचत असून कॉलेज तरुणावर चांगले संस्कार होत नाहीत. यामुळे या महोत्सवातील कॅमेरा फुटेज पोलिसांनी कायदेशीरपणे उपलब्ध करून द्यावे. या महोत्सवासंदर्भातील कायदेशीर परवानग्याही तपासून बघाव्यात. अन् या प्रकारच्या इव्हेंटवर बंदी घालावी, अशी मागणी यावेळी छावाच्या वतीने करण्यात आली. आंदोलनात छावाचे जिल्हाध्यक्ष विलास पांगारकर, युवा प्रदेशाध्यक्ष सुनील गुंजाळ, जिल्हाध्यक्ष रवी भारव्दाज, मुस्लिम आघाडी अध्यक्ष रशीद सय्यद, आदर्श सिंह, जुल्फेकार कुरैशी, सागर चिंचोरे, वसीम शेख, अभिजीत निगळे, विक्रम वैष्णव, गणेश शेलार आदींनी सहभाग घेत निषेध नोंदविला.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गैरकारभार हाच प्रचाराचा मुद्दा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

पारदर्शीपेक्षा गैरकारभारामुळे चर्चेत असलेल्या नाशिकरोड येथील बिझनेस बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवडणुकीची शक्यता संपली आहे. गैरकारभाराच्या आरोपांमुळे विद्यमान संचालक मंडळाला बचात्मक पवित्रा घ्यावा लागला आहे. हाच मुद्दा निवडणुकीत कळीचा ठरणार आहे.

सत्ताधारी गटातून एक वेगळा होऊन निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. दोन पॅनलमध्ये लढत होण्याचे चित्र असून दोन्ही गटाकडून उमेदवारी यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. सत्ताधाऱ्यांमधील काही नाराज संचालकांनी नव्या पॅनल निर्मितीला प्राधान्य दिले आहे. मनमानीला विरोध करीत असल्याचे सांगत संचालक निवृत्ती चाफळकर यांनी विरोधी गटाच्या पारड्यात आपले वजन टाकले आहे. सत्ताधारी गटाच्या पॅनलचे नेतृत्व माजी अध्यक्ष वसंत नगरकर, विजय संकलेचा आणि अशोक तापडिया यांच्याकडे तर विरोधी गटाच्या पॅनलचे नेतृत्व सुभाष घिया, निवृत्ती चाफळकर, बंडू दणदणे यांच्याकडे आहे.

१९ जागांसाठी चुरस

निवडणूक २१ फेब्रुवारीला आहे. चिन्हवाटप १२ फेब्रुवारीला झाल्यानंतर प्रचारात रंग भरेल. निकाल २२ फेब्रुवारी रोजी लागेल. १२५ उमेदवारांनी अर्ज भरले. उपनिबंधकांच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी चांगदेवराव पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली छाननीत १२ अर्ज बाद झाले. सर्वसाधारण गट १४, अनुसुचित जाती जमाती १, भटक्या विमुक्त १, इतर मागासवर्गीय १, महिला २ अशा एकूण १९ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. आर्थिक दुर्बल गटाची जागा रद्द करून सर्वसाधारण गटाची एक जागा वाढविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाइक रॅलीतून अहिंसेचा प्रचार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'अहिंसा परम धर्म की जय', 'जगा आणि जगू द्या' अशा अहिंसेचे दर्शन घडविणाऱ्या घोषणांनी रविवारी शहरातील प्रमुख रस्ते दुमदमले होते. निमित्त होते डीजे युवा ग्रुप व जेएसजी युवा फोरमतर्फे आयोजित अहिंसा रॅलीचे. या रॅलीद्वारे शहरभरात अहिंसेचा संदेश देण्यात आला.

कॉलेजरोडवरील मॉडेल कॉलनीपासून सुरू झालेल्या या रॅलीचा अहिरराव सर्कलमार्गे अशोकस्तंभ, रविवार कारंजा, पंचवटी कारंजा, तारवाला नगर, पेठ रोड, गजपंथ पहाड येथे समारोप झाला. विविध वेशभूषांमध्ये तरुणांनी या रॅलीत सहभाग घेतला. रॅलीचे सारथी होण्याचा मान विजय लोहाडे व साहिल लोहाडे यांना मिळाला. रॅलीच्या अग्रभागी एका जीपमध्ये प्राण्यांच्या भूमिकेत लहान मुले होती. 'मला मारू नका', 'प्राणी असेल तर पृथ्वी असेल' अशा घोषणांचे बोर्ड त्यांच्या हातात होते.

अंजनेरी येथील गजपंथा पहाड येथे समारोप झाल्यावर सर्व सदस्यांनी नमोकार महामंत्र म्हणत पहाडाची चढाई केली. येथील मुनिश्री विप्रणसागर यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आजची युवा पिढी हीच खरी समाजाची आणि देशाची संपत्ती आहे. ती चांगल्या मार्गावर असेल तर त्या समाजाचे वा देशाचे कल्याण सहज होते, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. पवन ठोळे व निंजा फॅमिली, बुलेट वुमन सोनाली सुराणा हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते. अश्‍विनी कांकरिया यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर विशाल कोचर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी निखील सुराणा, भाविक लोढा, पराग बेदमुथा आदींनी मेहनत घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अस्तित्वाची धडपड !

0
0

वृन्दा भार्गवे
अभिव्यक्त होणे ही गरज आहे, हा या जनरेशनचा आवडता सिद्धांत. अनेकजण व्यक्त होण्याला, आपली मुद्रा ठसवणे, असा एक अर्थ जोडतात. हे व्यक्त होणे विचारातून, चिंतनातून, चर्चा किंवा वैचारिक आदानप्रदानातून येतेच असे नव्हे. प्रामुख्याने अनुकरण आणि जवळ असणारे हाताच्या मुठीत मावणारे एक यंत्र त्यांना खुणावत असते. मी व्यक्त झालो, आता तू... विषय कोणताही असो, त्यावर हिरीरीने चिन्हांना जवळ करत किंवा अगोदरच्याची नक्कल गिरवत क्रिया प्रतिक्रिया पाठवल्या जातात. मग ते whatsapp असो, फेसबुक किंवा ट्विटर. आपण आपले अस्तित्व दाखवायला नको का, हा प्रश्न एखादा तरुण करतो तेंव्हा अस्तित्व पणाला लावण्यासाठी त्याच्यासारख्या काहींना दिवसरात्र या खेळाचा भाग बनावे लागते, आणि ते अपरिहार्य कसे आहे यावर त्यांचा परिसंवाद रंगत असतो.

हे अभिव्यक्त होणे मोबाइल पुरते मर्यादित नसते. शाळेत असल्यापासून वयाने मोठ्या असणाऱ्यांना रस्ता दणाणून सोडताना अनेकदा त्यांनी पाहिले असते. त्यांचे हे Expression आहे, असे त्याच्यावर बिंबवले गेलेले असते. उदाहरणार्थ १४ फेब्रुवारी हा दिवस, शाळकरी मुलाच्या लक्षात राहतो. या दिवशी काहीतरी मजा त्याला पाहायला मिळणार असते, याच दिवशी कुठलातरी राडा कदाचित होण्याची शक्यता असते, त्यामुळे शहराच्या कॉलेजेस जवळील परिसरात त्याला चक्कर मारायची असते.

आजकाल अनेक शाळा महाविद्यालये एकाच परिसरात असल्याने त्याला १४ फेब्रुवारीचा जोश, उन्माद सहज न्याहाळता येतो. हा दिवस रायडरच्या मर्दानगीचा, तरुणींच्या अधिक सुंदर दिसण्याचा, रस्त्यावर घोळक्या घोळक्याने उभे राहण्याचा, बेधुंद अशा वातावरणाचा. त्या शाळकरी वयापासून प्रत्येक वर्षी त्यात बदल होत गेलेला तो पाहत असतो. कोणीतरी पाठिंबा द्यायचा आणि कोणीतरी विरोध करायचा या राजकीय पक्षांच्या भूमिकांमुळे दर वर्षी या दिवसाला तडका मिळालेला तो पाहतो. तो थरार अनुभवत मोठी झालेली ती मुले जेंव्हा प्रत्यक्ष या दिवसाचे साक्षीदार बनत असतात, त्यावेळेस त्यांचा उत्साह वाढलेला असतो. valentine day साठी सज्ज व्हायचे तर आता नवी ओळख त्यांना मिळवावी लागते. प्रथम सोशल मीडियामध्ये व्यक्त व्हायचे आणि नंतर रस्त्यावर.

मेट्रो सिटीतील मोकळेपणा त्यांना नेटवर दिसतो. वेगवेगळ्या कल्पक अफाट क्लृपत्या करणारे तरुण तरुणी त्यांचे परस्परांशी मैत्री, प्रेम व्यक्त करण्याचे फंडे त्यांना चकित करून टाकतात. हे जगावेगळे काहीतरी करणे म्हणजे अमुक एक दिवस साजरा करणे. सेलिब्रेशन या शब्दाला आपापल्या पद्धतीने केवळ गुणले जाते. पार्टी आणि गिफ्ट ही या सेलिब्रेशनची घटकद्रव्ये. त्याशिवाय तुम्हाला Express होता येणारच नाही. त्यासाठी बक्कळ पैसा हवा. अनेकांकडे त्याची वानवा. पण आता प्रश्न इज्जतीचा असतो. इज्जत अशा दिखाऊ गोष्टींवर ठरवली जाते. डिजिटल जगाने त्याला मान्यता दिली असते. अनेक लहान मोठ्या शहरातील तरूणांनाच नव्हे तर तरुणींना valentine सारख्या दिवसाला पाकिटात पैसा असल्याशिवाय घरातून बाहेर पडणे नामुष्कीचे वाटते. त्याकरता प्रथम पालकांवर दबाव, स्वतःचे बरे वाईट करून घेण्याची धमकी देखील दिली जाते. काही घरे तात्काळ मान तुकवून तरुणांची मागणी मान्य करतात. काही नकार देतात. प्रतिष्ठा, इज्जत यांचे अर्थ न कळणारे अनेकजण आपली ही साधी मागणी मान्य होत नाही म्हणून संतापतात. कोणताही झोल करून पैसे उभे करायचे हा पण करणारे, गुन्ह्याला प्रवृत्त होतात.

अर्थात प्रत्येक घरात असे घडत नाही. पहिल्या फटक्यात त्यांना पॉकेटमनी मिळतो. महागडे गिफ्ट ऑनलाइन खरेदी केले जाते. सकाळपासून whats app वर फुलांचे अगणित गुच्छ पाठवले जातात. battary discharge होईपर्यंत छोटे मोठे व्हिडिओ शेअर केले जातात. आता वाट फक्त संध्याकाळची. सगळा दिवस भटकायचे तर पेट्रोल लागणार. बजेटचा विचार करून प्रोग्राम आखला जातो. मात्र सेलिब्रेशन तो बनता है हे मात्र पक्क असते.

प्रदर्शन हा अनेक तरुणांच्या जीवनशैलीचा भाग बनलेला आहे. असे खास दिवस असो, वाढदिवस असो, कोणाचे लग्न असो किंवा एखाद्याचे परीक्षेतील यश असो, कोणाला जॉब मिळालेला असो, तो दणक्यात साजरा करायलाच पाहिजे ही मनोवृत्ती आज मोठ्या प्रमाणावर दिसते. आनंद झाला असे केवळ बोलून चालत नाही. मला तू आवडते असे वाक्य म्हणून चालत नाही. तुझा अभिमान वाटतो, तुझे कौतुक वाटते असे शब्द खरे करायचे असतील तर त्याला जोड हवी पैशाची. त्याशिवाय प्रेम आनंद सिध्द होत नाही ही या तरुणांची धारणा. ज्याला काही प्राप्त होते त्याने भव्य समारंभ ठेवला पाहिजे, ज्याला त्याचे अभिनंदन करायचे त्याने देखील सोहळा केलाच पाहिजे.

शाळांमध्ये निरोप समारंभ डोळ्याच्या कडा ओलावणारे असतातच असे नाही तर एखाद्या हॉटेलमध्ये एक संध्याकाळ डीजेच्या सानिध्यात, व्हेज-नॉनव्हेजच्या चमचमीत खमंग पदार्थात दरवळून निघते. त्यासाठी प्रत्येकाकडून किमान चार आकडी वर्गणी घेतली जाते. ही वर्गणी त्या वातावरणासाठी असते. तेथे सामील व्हायचे तर स्वत:चा पेहराव नीट पाहिजे. त्यावर वारेमाप खर्च केला जातो. उत्सुकता हुरहूर, मित्र मैत्रिणींच्या ताटातुटीची नसते, तर आपण कसे दिसू, त्या वातावरणात आपली छाप कशी पाडायची, याच चिंता असल्याने भावनिकदृष्ट्या निरोप समारंभामध्ये गुंतण्याचा विचार बाजूला होतो.

कोणताही अभ्यासक्रम उधळपट्टीवर आधारित प्रदर्शनाचे धडे देत नसतो. तरी देखील ग्रामीण भागातील महाविद्यालयातील बहुतांश तरुण अत्यंत जल्लोषात एकमेकांचे वाढदिवस साजरे करतात. लॉन्स भाड्याने घेऊन अनेकांना जेवू-खाऊ घालण्यात धन्यता मानणारे सोशल मीडियावर मात्र श्रीमंती कारभारावर सणसणून टीका करतात. त्यांचे अस्तित्व त्यांना दोन्ही ठिकाणी दाखवायचे असते. आपण मित्रांसाठी उदार होतो ही त्यांची भूमिका. आपले ते औदार्य आणि उधळपट्टी करणाऱ्यांचे क्रौर्य, आपली ती माणुसकी आणि इतरांचे माणुसकीहीन वर्तन. अशा सोयीच्या तर्काने वावरणारे खरे तर ते अनेकदा संभ्रमित होतात परंतु आपला संभ्रम ते मान्य करत नाहीत.

साधी राहणी उच्च विचारसरणी ही भिंतीपुरती मर्यादित असलेली ओळ. घासून गुळगुळीत झालेली, कोणीही कुठेही वापरावी अशी. साधेपणा असणे बावळटपणाचे लक्षण हा समज घरानेच दूर करावयास हवा. मैत्री, प्रेम यासारख्या भावनांना शाब्दिक विळखे घालून सोहळ्यांच्या रस्त्यावर मिरवण्याची हौस कमी झाली तर प्रदर्शनाचे फुटलेले पेव नक्की कमी होईल.

(लेखिका साहित्यिक तसेच तरुणांच्या भावविश्वाच्या अभ्यासक आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उपेक्षित समाजाचा कार्यकर्ता

0
0

fanindra.mandlik@timesgroup.com

सामाजिक परिवर्तनासाठी समाज चळवळीत अग्रणी राहून विमुक्त जाती प्रवर्गाच्या उत्थानासाठी दत्तात्रय कृष्णाजी (डी.के.) गोसावी गेल्या अनेक वर्षापासून झटत आहेत. बीवायके कॉलेजमधून बाहेर पडलेल्यांना विद्यार्थ्यांना डी. के. गोसावी परिचित आहेतच परंतु भटक्या विमुक्त चळवळीतील अग्रणी कार्यकर्ता म्हणून त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे.

गोसावी सरांचा जन्म २८ फेब्रुवारी १९४४ रोजी सिन्नर तालुक्यातील सायाळे गावी झाला. त्यांचे अकरावीपर्यंतचे शिक्षण सिन्नर येथे झाले. त्यानंतरचे महाविद्यालयीन शिक्षण नाशिकच्या बीवायके कॉलेज येथे झाले. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने १९६६ मध्ये लोकल सेल्फ गव्हर्नमेंटमध्ये ज्युनीअर ऑडिटर म्हणून नोकरीला सुरुवात केली. उच्च शिक्षण घेण्याची इच्छा होती मात्र परिस्थिती नसल्याने ते घेऊ शकत नव्हते. याच कालावधीत एम.कॉमचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना फेलोशिप मिळाली आणि ते पुन्हा बीवायके महाविद्यालयात शिक्षणासाठी दाखल झाले.

शिक्षण घेत असतांना घरखर्चाला हातभार लागावा यासाठी शिकवण्या घेण्यास सुरुवात केली. १९७० मध्ये त्यांनी एम.कॉमचे शिक्षण पूर्ण केले आणि त्याच वर्षी बीवायके कॉलेजमध्ये अधिव्याख्याता म्हणून रुजू झाले. ३२ वर्षांच्या नोकरीच्या काळात शिक्षण क्षेत्रात विविध प्रयोग करुन महाविद्यालयीन शिक्षणाला वेगळा आयाम देण्याचे काम त्यांनी केले.

सर, प्राध्यापक व प्राचार्य या चाकोरीत न राहता त्यांनी १९७० मध्ये सामाजिक क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली व तिथे प्रखर कार्यकर्ता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. महाराष्ट्रात विमुक्त भटक्यांची प्रबोधनात्मक चळवळ उभी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. या निमित्ताने त्यांनी नाशिक येथे अनेक राज्यस्तरीय अधिवेशनांचे आयोजन केले आहे. त्याचबरोबर मागासवर्गीय समाज जवळून पाहिला असल्याने १९८६ मध्ये बिऱ्हाड तुरुंग मोर्चाचे त्यांनी नेतृत्व केले. यावेळी पंचवटी कारंजापासून ते सब जेलपर्यंत भटका समाज आपल्या जनावरांसह मोर्चात सहभागी झाला होता. त्याच प्रमाणे १९८७ मध्ये भटक्या विमुक्तांच्या मागण्यासाठी त्यांनी राजभवनाला वेढा घातला. यावेळी देखील त्याच्या कार्याची शासनाने दखल घेतली. बीवायके कॉलेजमधून २००४ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याच्या कार्याला खरी गती मिळाली.

भटक्या समाजाच्या साहित्यिकांना हक्काचे व्यसपीठ मिळून देण्यासाठी राज्य पातळीवरील साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात त्याच्या मोलाचा वाटा होता. भटक्यांचे काम करताना हुंडा विरोधी मोहिमेतही ते सक्रिय होते. या कार्याची सुरुवात त्यांनी आपल्या घरापासून केली. आपल्या मुलाच्या लग्नात त्यांनी हुंडा घेतला नाही व मुलीच्या लग्नातही हुंडा दिला नाही. समाजातील अनेक कुटुंबांनी त्यांच्या कामाचा आदर्श घेऊन हुंडाविरोधी चळवळीला हातभार लावला आहे. महाराष्ट्र सरकारने न्यायमूर्ती बापट यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. नाशिक जिल्हा दशनाम समाजाचे अध्यक्ष म्हणून ते गेली १४ वर्षांपासून कार्यरत आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून ते कार्य करीत आहे.

व्यासंगी अध्यापक, सव्यासाची लेखक, कुशल प्रशासक, व उत्कृष्ट प्रबोधनकार म्हणून डी.के. गोसावी सरांनी लौकीक मिळवला आहे. विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाबरोबरच नीतीमुल्यांचा पाठ देण्याचेही कार्य त्यांनी केले आहे. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या उत्कर्षात सरांचा वाटा मोलाचा आहे. नाशिकमधीलच नव्हे तर महाराष्ट्रातल्या अनेक सामाजिक संस्थांनी त्यांना विविध पुरस्कार देऊन गौरविले आहे. मात्र महाराष्ट्र सरकारने त्याच्या कार्याची दखल घेतलेली नाही. वयाच्या ७२ व्या वर्षीही त्यांचा लढा सुरू असून भटक्या विमुक्तांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत अखेरच्या श्वासापर्यंत मी लढतच राहील असे ते म्हणतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हाताशी गुन्हेगार; फिर्यादी संकटात

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अल्पवयीन मुलांच्या मदतीने चोऱ्या करणाऱ्या काही टोळ्या गंगापूर पोलिसांच्या मदतीने उघड-उघड धुमाकूळ घालत आहेत. या टोळ्यांच्या म्होरक्यांचे गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये उठणे-बसणे असून, गंगापूर पोलिस स्टेशनचे सिनीअर पीआय शंकर काळे यांचा त्यांच्यावर वरदहस्त असल्याचा आरोप लोकप्रतिनिधींसहीत सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.

गंगापूर पोलिस स्टेशन हद्दीतील मंगेश ठाकूर, आकाश पवार, प्रमोद जाधव, पप्पू कुटे, सम्राट सिंग, अरुण पाटील, सचिन सूर्यवंशी अशा काही व्यक्तींबाबत सर्वसामान्य नागरिक सातत्याने तक्रारी करतात. मात्र, पीआय काळे त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याऐवजी त्यांनाच तक्रारदाराविषयी माहिती देऊन त्रास देण्यास उद्युक्त करीत असल्याचा आरोप सर्वच स्थरातून होत आहे. यातील काही व्यक्ती अल्पवयीन मुलांना हाताशी धरून बॅटऱ्या चोरी, दुचाकी किंवा दुचाकींचे स्पेअरपार्ट चोरी करणे, चेन स्नॅचिंग, घरफोडी सारखे गंभीर गुन्हे करतात. या अल्पवयीन मुलांमागे असलेल्या सज्ञान चेहऱ्यांकडे पोलिस जाणून बुजून दुर्लक्ष करतात, असा आरोप होत आहे.

याबाबत बोलताना नगरसेवक दिनकर पाटील म्हणाले की, गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये सर्वसामान्य नागरिकांनी तक्रार घेऊन जाणे हाच एक गुन्हा झाला आहे. एकतर पीआय काळे सर्वसामान्यांची तक्रार दाखल करीत नाही. तसेच, त्यांच्याबाबत वरिष्ठ पातळीवर तक्रार केली तर त्यांचे काही सराईत 'मित्र' तक्रारदाराच्या वस्तू चोरी करणे, तक्रारदाराच्या वाहनाच्या बॅटऱ्या काढून नेणे असा उद्योग करीत असल्याचे पाटील म्हणाले.

काही दिवसांपूर्वी शंकर काळे यांच्याविरोधात आम्ही अर्ज दिला होता. त्यानंतर आमच्या दोन आणि माझ्या भावाच्या तीन ते चार वाहनांमधून बॅटऱ्या चोरी करण्यात आल्या. आणखी काही तक्रारदारांना हे अनुभव आलेच असतील. हे काम कोण व कसे करते याचे उत्तर आपल्या पोलिस आयुक्तांना सापडत नाही, यापेक्षा नाशिककरांचे आणखी दुर्दैव कोणते? अशी​ भावना भाजपाचे नगरसेवक सवाल पाटील यांनी व्यक्त केली.


तीन ठिकाणी बॅटऱ्यांची चोरी

डिसूझा कॉलनीतील अल्फा स्क्वेअर इमारतीतील दोन जनरेटरमधील बॅटऱ्या चोरट्यांनी लंपास केल्या. त्यापूर्वी एका बँकेचे जनरेटर फोडून चोरट्यांनी बॅटऱ्या काढण्याचा प्रयत्न केला. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गुन्हा दाखल झाला. संबंधित बँकेत सीसीटीव्ही असून, यात चोरट्याचा काही मागमूस मिळतो काय? याचा पोलिस तपास करू शकतील.




३६ तासानंतरही चौकशीच!

ना‌शिक : विद्यार्थ्यास अमानुष मारहाण केल्याप्रकरणी सहायक पोलिस आयुक्त अतुल झेंडे अद्याप चौकशीच करीत आहेत. मारहाणीच्या घटनेस ३६ तास उलटले असून, पोलिसांच्या बचावात्मक पावित्र्यामुळे जनमाणसात संतापाची भावना निर्माण होत आहे.

राणेनगर परिसरातील सेंट फ्रान्सिस हायस्कूलजवळ उभ्या असलेल्या शाकीब मुक्तार पठाण या १५ वर्षीय विद्यार्थ्यास इंदिरानगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत सावंत यांनी बेदम मारहाण केली. सोमवारपासून सुरू असलेल्या तोंडी परीक्षेचे वेळापत्रक पाहण्यासाठी गेलेल्या शाकीबला पोलिसी अत्याचाराचा बळी पडावे लागले. शाकीबसह त्याच्या आईने थेट सावंत यांचे नाव घेऊन तक्रार दिली आहे. मात्र, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी चौकशीचे फार्स सुरू केले आहेत. अल्पवयीन विद्यार्थ्यास मारहाण झाली त्यावेळी काही पोलिस कर्मचारी तिथे हजर होते. त्यांच्यासह इतर विद्यार्थ्यांचे जबाव नोंदवण्याचे काम सुरू करण्यात आल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, कायदेशीरबाबींची पूर्तता केल्यानंतर गुन्हा दाखल होईल की नाही याबाबत शाश्वती नाही. वास्तविक, अधिकारांचा दुरूपयोग करणाऱ्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी वरिष्ठांकडून कायद्याचा खुबीने वापर केला जात असल्याचे वारंवार पुढे आले असून, दुसरीकडे कायद्याच्या रक्षणकर्त्यांकडून होणारे अत्याचार सहन करणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तींना कोणताही दिलासा मिळत नसल्याची भावना वाढीस लागली आहे.

याबाबत बोलताना शाकीबच्या नातेवाईकांनी सांगितले की, झालेली घटना व त्यानंतरचे मिळालेले अनुभव अत्यंत दुर्दैवी आहेत. तक्रारदारांनी पुढे यावे, असे आवाहन करणाऱ्या पोलिस आयुक्तांना भेटण्यासाठी शनिवारी आम्ही तीन वेळेस गेलो. मात्र, त्यांची भेट होऊ शकली नाही. आज पुन्हा भेट घेणार आहेत.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मैत्रेय ग्रुपची ४० कोटींची देणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मैत्रेय ग्रुपला जानेवारी २०१६ नंतर ४० कोटी रुपयांची देणी बाकी असून, ज्या गुंतवणूकदारांना परतावा मिळाला नसेल किंवा ज्यांचे चेक बाऊन्स होत असेल त्यांनी पोलिसांकडे तक्रार द्यावी, असे आवाहन पोलिस विभागाने केले आहे.

मैत्रेय ग्रुपचे राज्यभरात लाखो गुंतवणूकदार असून, त्यांनी गेल्या काही वर्षात ८०४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ८०४ कोटी रुपयांपैकी मैत्रेय ग्रुपने ७६३ कोटी ३२ लाख रुपये जानेवारी २०१६ पर्यंत गुंतवणूकदारांना परत केल्याचे मैत्रेय ग्रुपने राज्य सरकारला कळवले आहे. म्हणजेच जवळपास ४० कोटी रुपये मैत्रेय ग्रुपच्या संचालकांना आजही देणे आहे. २०१३ मध्ये सेबीने मैत्रेय ग्रुपच्या मैत्री प्लॉटर्स अॅण्ड स्ट्रक्चरल प्रा. लि. या कंपनीविरोधात आदेश दिला. संबंधित कंपनीने कोणत्याही गुंतवणूकदाराकडून पैसे घेऊ नये, असे सेबीने बजावले होते. मात्र, यानंतरही मैत्रेय ग्रुपच्या संचालकांनी दुसरी कंपनी सुरू करून पैसे संकलनाचे​ काम केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी ग्रुपच्या संचालिका वर्षा मधूसुधन सत्पाळकर आणि संचालक जनार्धन अरविंद पारूळेकर यांच्याविरोधात कलम ४०६ आणि एमपीआयडीच्या कलम ३ व ४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. सत्पाळकर सध्या पोलिस कोठडीत असून त्यांना आज, कोर्टात हजर केले जाईल. पारूळेकर यांचा एका पथकामार्फत शोध सुरू असून ज्या गुंतवणूकदारांना पैसे मिळालेले नाहीत, त्यांनी तक्रारीसाठी पुढे यावे, असे आवाहन पोलिस करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चतुरंग खेळाडू

0
0

महेश पठाडे

काही वर्षांपूर्वी जळगावात फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा होती. त्या वेळी एक लहानसा मुलगा अनुभवी ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसेंसोबत खेळत होता. डाव चुरशीचा होता. ठिपसे प्रचंड दबावाखाली खेळत होते, तर त्या लहानग्या मुलाच्या चेहऱ्यावर तणावाचा लवलेशही नव्हता. ठिपसेंच्या चेहऱ्यावर घर्मबिंदू चमकत होते. अर्थातच तणाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होते. ते विचारांती चाल करायचे नि हा चिमुरडा क्षणात त्यांना उत्तर द्यायचा. विशेष म्हणजे या लहानग्या मुलाला खुर्चीवर बसून खेळता येत नव्हते. उभा राहून खेळायचा. हा डाव पाहण्यासाठी पटाभोवती मोठी गर्दी जमली. ठिपसेंचा डाव कोसळला होता, पण अनुभवाच्या जोरावर ते तग धरून होते. मात्र, अखेर ते हरले. तो लहानगा मुलगा जिंकला. हा मुलगा दुसरातिसरा कोणी नाही तर अहमदनगरचा शार्दुल गागरे होता. वेगवान चाली रचणारा हाच चुणचुणीत मुलगा आता वयाच्या १८ व्या वर्षी नुकताच ग्रँडमास्टर झाला आणि हा बहुमान मिळविणारा उत्तर महाराष्ट्रातला दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला.

भारतीय बुद्धिबळ महासंघाची (एआयसीएफ) स्थापना १९५१ मधील. या ६५ वर्षांत महासंघाकडे आतापर्यंत ५० हजारपेक्षा अधिक अधिकृत खेळाडू रजिस्टर आहेत. या ६५ वर्षांच्या प्रवासात भारतात केवळ ४२ ग्रँडमास्टर होऊ शकले. एरव्ही अन्य खेळांमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू होणे म्हणजे एखाद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळणे एवढेच समजले जाते. तो राखीव होता का, त्याची कामगिरी काय होती असले प्रश्न कधी पडत नाहीत. बुद्धिबळात आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळला तरी त्याला आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणणे थोडे धाडसाचे ठरेल. त्याचे आंतरराष्ट्रीय फिडे रेटिंग काय, त्याची कामगिरी काय असे नाना प्रश्न उपस्थित होतात. म्हणूनच बुद्धिबळातील कोणतीही कामगिरी ही त्या खेळाडूच्या गुणवत्तेवरच मोजली जाते. ग्रँडमास्टरचा बहुमानही असाच आहे. त्याचे निकषही इतके कठीण आहे, की अनेकांना आंतरराष्ट्रीय मास्टरचा बहुमान मिळाल्यानंतरही ग्रँडमास्टरची पात्रता पूर्ण करण्यासाठी अनेक वर्षे वाट पाहावी लागली आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्राचे पहिले आणि भारतातील दुसरे ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे. राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेची सात वेळा विजेतीपदे मिळवली असली तरी ठिपसे वयाच्या ३८ व्या वर्षी १९९७ मध्ये ग्रँडमास्टर झाले. विश्वनाथन आनंदनंतर त्यांनी हा बहुमान मिळविला. शार्दुलचे कौतुक याचसाठी आहे, की ग्रँडमास्टरपर्यंतचा प्रवास सोपा मुळीच नाही. आंतरराष्ट्रीय मास्टरचा बहुमान मिळविल्यानंतर हा बहुमान मिळतो. अर्थात, आंतरराष्ट्रीय मास्टरचा बहुमान मिळवण्यासाठी तीन नॉर्म मिळवावे लागतात. त्यामुळे या नॉर्मच्या स्पर्धा भारतात फारशा होत नाहीत. आयएम झाल्यानंतरच जीएम नॉर्मसाठी कोणताही खेळाडू पात्र ठरतो. अर्थात, त्यासाठी फिडे रेटिंग किमान २५०० असावे लागते. रेटिंगचे निकष पार करण्यासाठी स्पर्धा खेळाव्या लागतातच, शिवाय नॉर्म मिळवायचा तर त्या आयएम, जीएम खेळाडूंचा सहभागही असावा लागतो. या खेळाडूंविरुद्ध गुण घेतले तरच जीएमचा एक नॉर्म निश्चित होतो. ग्रँडमास्टरचा नॉर्म झटपट मिळवायचा असेल तर एकच पर्याय आहे, तो म्हणजे विश्व बुद्धिबळ स्पर्धा जिंकणे. ती जिंकली तर थेट ग्रँडमास्टर होता येते!

शार्दुलपुढे दुसरा पर्याय खुला होताच. शार्दुलने तिन्ही नॉर्म जिंकले तरी तो जीएम होऊ शकणार नव्हता. कारण त्यासाठी २५०० चे रेटिंग असणेही आवश्यक होते. त्या वेळी त्याचे रेटिंग होते २४९७. जुलै २०१३मध्ये त्याने पहिला जीएम नॉर्म मिळवला. दोन वर्षांनंतर त्याने जुलै २०१५ मध्ये दुसरा नॉर्म मिळवला आणि यंदा जानेवारीत कतारमध्ये झालेल्या स्पर्धेत त्याने तिसरा नॉर्मही मिळवला. एका नॉर्मसाठी किती झगडावे लागते हे शार्दुलच्या या ग्रँडमास्टरच्या प्रवासावरूनच लक्षात येते. एका स्पर्धेचे शुल्क २५ हजार रुपयांपेक्षा अधिक असते. हे नॉर्म मिळवूनही त्याला २४९७ वरून २५०० रेटिंग मिळवावे लागणार होते. हे सर्वांत अवघड असते. रेटिंग मिळवण्यापेक्षा आहे ते टिकवून ठेवणे अवघड असते. जर कमी रेटिंग असणाऱ्या खेळाडूकडून पराभूत झालेच तर १५ ते २० गुणांचा फटका बसतो. सुदैवाने शार्दुलबाबत तसे काही झाले नाही. मुंबईतील एका स्पर्धेत त्याने २५०० चा पल्ला पार केला आणि शार्दुल बुद्धिबळातला सर्वोच्च ग्रँडमास्टरचा बहुमान मिळवला.

शार्दुलच्या बुद्धिबळासाठी गेल्या आठ-दहा वर्षांत त्याच्या पालकांनी ५० लाखांपेक्षा अधिक खर्च केला आहे. आयएमचे स्वप्न बाळगणारे अनेक खेळाडू सध्या एका वर्षासाठी पाच ते दहा लाख रुपयांपेक्षा खर्च करीत आहेत.

बुद्धिबळात भारत

भारतात आतापर्यंत २० हजार १६३ खेळाडूंनी फिडे रेटिंग मिळवले आहे. मात्र, ग्रँडमास्टरची संख्या अद्याप ४० पेक्षा जास्त नाही. अवघे ४२ ग्रँडमास्टर भारतात आहेत. महिला ग्रँडमास्टर ७, तर ८९ खेळाडू आंतरराष्ट्रीय मास्टर (आयएम) आहेत. रशियात सर्वाधिक २२७ ग्रँडमास्टर आहेत. त्याखालोखाल जर्मनी ८३ ग्रँडमास्टर, युक्रेन ८२, अमेरिका ८५, सर्बिया ५४ या देशांचा क्रमांक लागतो. ही एकूण ग्रँडमास्टरची संख्या आहे. मात्र, क्रम अॅक्टिव्ह ग्रँडमास्टरनुसार आहे. यात भारताचा क्रमांक ११ वा आहे, तर सलग दोन वेळा विश्वविजेतेपद मिळविणाऱ्या मॅग्नस कार्लसनचा नॉर्वे देश ३२ व्या स्थानी आहे. मात्र, कमी ग्रँडमास्टर असले तरी गुणवत्तेनुसार भारत महिला आणि पुरुष गटात जगात पाचवा आहे. यात विश्वनाथन आनंद जगात आठव्या स्थानावर आहे, तर महिला गटात भारताची अव्वल खेळाडू कोनेरू हम्पी जगात दुसऱ्या स्थानावर आहे.

जगातील पहिले ग्रँडमास्टर

फिडेने दुसऱ्या महायुद्धानंतर ग्रँडमास्टरचा बहुमान सुरू केला. फिडेने १९५० मध्ये २७ खेळाडूंना थेट ग्रँडमास्टरचा बहुमान प्रदान केला. त्यात विश्वविजेता मिखाइल बोटविनिक, मिगुएल नॅजदॉर्फ आदी खेळाडूंचा समावेश होता. मात्र, विश्वविजेता स्टेनिट्झ, लास्कर, कॅपाब्लॅंका, अलेखाइन या दिग्गज खेळाडूंना हा बहुमान मात्र मिळू शकला नाही. कारण १९५० पूर्वीच त्यांचे निधन झाले होते. १९५७ मध्ये जगात केवळ ५० ग्रँडमास्टर होते. त्या वेळी रशियात १९, युगोस्लाव्हियात ७, तर जर्मनीत अवघे दोनच ग्रँडमास्टर होते. १९७२ मध्ये जगातील एकूण ७७ पैकी एकट्या रशियाकडे ३३ ग्रँडमास्टर होते. आता जगभरात हजाराच्या वर ग्रँडमास्टर आहेत. जॉर्जियाची नोना गॅप्रिंडाश्विली जगातील पहिली महिला ग्रँडमास्टर, तर फिलिपिन्सचा युजिनियो टोरे हा आशियातला पहिला ग्रँडमास्टर आहे.

एकूणच ग्रँडमास्टरचा प्रवास सोपा नाही. जागतिक बुद्धिबळ महासंघाच्या स्थापनेला ९० वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. ग्रँडमास्टरचा बहुमान सुरू होण्यासही ६० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. याचा अर्थ ग्रँडमास्टरची संख्याही वाढायला हवी असे वाटणे साहजिक आहे. मात्र, त्याचे निकष सोपे नाहीत. या बहुमानापर्यंतचा मार्गच प्रचंड खडतर आहे. म्हणूनच ग्रँडमास्टर होणारा खेळाडू असामान्य म्हणूनच ओळखला जातो ते उगीच नाही. शार्दुलचे म्हणूनच कौतुक.

mahesh.pathade@timesgroup.com

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेथीचा दर्जा अन् दरही ‘कोमेजले’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पाण्याअभावी घसरलेला दर्जा आणि बाहेरील बाजारपेठेतून रोडावलेली मागणी यामुळे भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मेथीची जुडी दोन ते पाच रुपयांना तर पालकाची जुडी एक रुपये प्रमाणे मिळत आहे. यामुळे शहरी ग्राहक भलताच खूश आहेत.मात्र गाडीभाडेही सुटत नसल्याने उत्पादक नाराजी व्यक्त करीत आहेत.

वास्तविक यंदा पाणीटंचाईमुळे भाजीपाल्याचे दर कडाडण्याची शक्यता होती. मात्र, या महिन्यात उलट स्थिती झाली आहे. कोथिंबीर वगळता पालेभाज्या मातीमोल भावात विकल्या जात आहेत. सर्वच भाज्यांच्या दरात दहा ते बारा रुपयांनी घसरण झाली आहे. यामुळे शहरी ग्राहकांना कमी बजेटमध्ये भरपूर भाजीपाला मिळत आहे. कारले, गिलके, दोडके, गवार, भेंडी यांचे दर मात्र स्थिर आहेत. काकडी, टोमॅटो यांचे दरही दहा रुपयांनी खाली आले आहेत. थंडी ओसरल्याने वांग्याचे दरही दहा ते पंधरा रुपयांनी खाली आले आहेत. काकडी व टोमॅटोचे दरही पाच ते दहा रुपयांनी कमी झाले आहेत.

दर्जा घसरला

पाणीटंचाईमुळे भाजीपाला सुकू लागला आहे. यामुळे भाज्यांच्या दर्जावरही परिणाम झाला आहे. भाज्यांचा टवटवीतपणा हरवला आहे. पाणीटंचाईमुळे उत्पादकही आहे तसा भाजीपाला विक्रीवर भर देत आहेत. यामुळे आवक ‌टिकून आहे. पाण्याची कमतरता भासू लागल्यानंतर मात्र, येत्या काही दिवसात भाजीपाल्याचे दर कडाडण्याची शक्यता आहे.

मागणीचा अभाव

नाशिकमधून मुंबई, गुजरात येथे मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीसाठी जात असतो. मात्र, सध्या या ठिकाणी भाजीपाला जात नसल्याने स्था‌निक बाजारपेठेत विकावा लागत आहे. याचाही परिणाम भाजीपाल्याच्या दरावर झाला आहे.


नाशिकची टवटवीत द्राक्ष वेधताहेत लक्ष

सर्वांच्या आवडीचे आणि तोंडाला पाणी आणणारे द्राक्ष बाजारात दाखल झाली आहेत. सोनाका, थॉमसन, शरद सिडलेस, जम्बो ब्लॅक आदी जातीची द्राक्षे लक्ष वेधून घेत असून, ४० रुपयांपासून ९० रुपये किलोने मिळत आहेत.

जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात द्राक्ष हंगामाला सुरुवात झाली. मात्र, आता द्राक्ष काढणीला वेग आला आहे. मुंबई-आग्रा हायवेवर द्राक्ष उत्पादकांनी दुकानेही थाटली आहेत. तापमानात वाढ झाल्यामुळे द्राक्षांमध्ये साखर उतरली असून गोडवा वाढला आहे. यामुळे नाशिकच्या द्राक्षांची मागणी वाढली आहे. स्थानिक बाजारपेठेत द्राक्षांची आवक अद्याप मर्यादीत आहे. मात्र, या महिन्यात आवक वाढून भावही आटोक्यात येऊ शकतील. यंदा द्राक्षांचे वारेमाप पीक आले आहे.

द्राक्षांच्या जोडीला संत्री, पपई, केळी, बोर या फळांची आवकी भरमसाट होत आहे. यामुळे नाशिककरांना उन्हाळ्यात रसाळ फळांचा मनमुराद आनंद घेता येत आहे. संत्री, पपई, बोरांच्या किमती स्थिर असून, चौकाचौकात दुकाने थाटलेली आहेत. यामुळे सध्या शहरात फळांची चांगलीच रेलचेल वाढली आहे. सीताफळांचा हंगाम संपल्याने बाजारात दिसेनासे झाले आहेत. चिकूची आवकही घटली आहे. सफरचंदची आवक चांगली असून दर जैसे थे आहेत.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images