Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

चार दुचाकीसह पिकअपची चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील वेगवेगळ्या भागातून चार दुचाकींसह एक पिकअप व्हॅन चोरट्यांनी लंपास केली. वाहनचोरीच्या गुन्ह्यात काही प्रमाणात घट झाली असली तरी चोरटे अशा पध्दतीने वाहनचालकांना दणका देत असल्याने पोलिसांनी जलद तपास करण्याची मागणी केली जाते आहे. विशेष म्हणजे वाहनचोरीचा गुन्हा लागलीच दाखल होत नसल्याने वाहनचालकांच्या मनस्तापात आणखी भर पडते आहे.

वाहनचोरीची एक घटना सिटी सेंटर मॉलच्या मागील बाजुस २५ जानेवारी रोजी दुपारी १२ ते ४ या वेळेदरम्यान घडली. नाशिकरोड येथील नारायणबापू नगर येथे राहणारा वसंत पोपट करंजकर (१६) याने आपल्याकडील दुचाकी (एमएच १५ सीजी ८२२८) पार्क केली होती. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर, सैयद प्रिंपी येथे राहणाऱ्या मोहन नामदेव उखाडे (४२) यांनी पंचवटीतील मार्केट यार्ड येथे पार्क केलेली २५ हजार रुपयांची दुचाकी चोरट्यांनी हातोहात लंपास केली. ही घटना १९ जानेवारी रोजी १२ ते साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. पंचवटी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. पळसे येथील चौधरी पार्कच्या रूम नंबर दोन जवळ पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी २२ नोव्हेंबरच्या मध्यरात्री चोरी केली. या प्रकरणी केशव रामकृष्ण गायधनी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नाशिकरोड पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्याची नोंद केली. दरम्यान, दिंडोरी रोडवरील कलानगर येथील आकाश रो हाऊस येथे समित रमेश बिरारी यांनी पार्क केलेल्या दुचाकीवर देखील चोरट्यांनी हात साफ केला.

चोरट्यांनी सातपूर त्र्यंबकरोडवर पार्क केलेली दीड लाख रुपयांची पिकअप व्हॅन चोरी केली. त्र्यंबकरोडवरील मंदिरासमोर राहणाऱ्या कुमार शांताराम जाधव (२८) यांनी आपल्याकडील पिकअप जीप (एमएच १५ ई ४५८२) घरासमोर पार्क केली होती. २६ जानेवारीच्या पहाटे चोरट्याने ती गाडी पळवली. याप्रकरणी सातपूर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

भाजी विक्रेत्यांवर गुन्हा

गंगाघाट भाजीबाजार मैदानावर अतिक्रमण करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई केली जात आहे. त्यास विरोध केल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी दिलीप नेरकर, भिमराव शांताराम शिरसाठ यांच्यासह संघटनेच्या इतर पदाधिकाऱ्यांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाम धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निकाली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यातील भाम धरणाचे काम साठ टक्के पूर्ण होऊनही या धरणग्रस्तांचे पुनर्वसन रखडले आहे. या आदिवासी बांधवांना डोंगरावर घरे देऊन माळीणची पुनरावृत्ती होण्यापेक्षा या धरणग्रस्तांचे पुनर्वसन धरणालगतच सपाट जमिनीवर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आमदार, जलसंपदा अधिकारी यांनी पुनर्वसनासाठी जागेचा प्रस्ताव देताच सर्व धरणग्रस्तांनी त्यास ग्रीन सिग्नल दिला.

गेल्या वर्षभरापासून नांदूरमध्यमेश्वर प्रकल्पांतर्गत इगतपुरी तालुक्यात काळुस्ते शिवारात भाम धरणाचे काम बंद स्थितीत आहे. धरणाचे काम साठ टक्के होऊनही या धरण शिवारातील काळुस्ते, भरवज, निरपण, दरेवाडी, बोरवाडी, सारुक्तेवाडी या गावे, वाड्यांचे पुनर्वसन झाले नाही. धरणग्रस्तांनी पुनर्वसनाचे काम हाती घेतल्याशिवाय धरणांचे काम होऊन देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे हा प्रश्न गंभीर बनला होता.

धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार निर्मला गावित यांनी पुढाकार घेतला. धरणग्रस्त, पुनर्वसन अधिकारी जलसंपदा विभागाचे अधिकारी व स्थानिक पदाधिकारी यांची संयुक्त बैठक भाम धरणस्थळावर घेण्यात आली. अध्यक्षस्थानी आमदार निर्मला गावित होत्या. यावेळी जिल्हा पुनर्वसन अधिकारी मधुमती सरदेसाई, जलसंपदा विभागाच्या शहाणे, माजी जि. प. सदस्य जनार्धन माळी, धरणग्रस्त प्रतिनिधी माजी सभापती रामदास घारे आदी उपस्थित होते.

धरणग्रस्तांचे उंच जागी पुनर्वसन केल्यास माळीणच्या पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. म्हणून आमदारांनी उंच व डोंगराळ भागावर पुनर्वसन करण्यास ठाम नकार दिला. प्रकल्पग्रस्तांनीही धरणालगतच सपाटजागी पुनर्वसन करण्याची मागणी केली. यावेळी पुनर्वसन अधिकारी व भाम धरण अधिकाऱ्यांनी डॅमच्या डाव्या बाजूला बोरवाडी, सारुक्ते वाडीचे तर उजव्या बाजूला भरवज, दरेवाडीचे सपाट जागेवर पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव ठेवला. यावेळी कुटुंब सदस्य निहाय प्लॉट वाटप, बाजारभावाने जागेचे वाढीव पेमेंट आदी विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. या सपाट जागेवर पुनर्वसन करण्याला मान्यता देण्यात आली. परंतु, धरणाच्या कामाबरोबरच पुनर्वसनचे काम जलदगतीने करण्याची मागणी करण्यात आली. तसेच, पुनर्वसन करताना गावाना पाणी, वीज, शाळा, आरोग्य आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. जमिनींचे वाढीव पेमेंट चालू बाजारभावाने देण्याची मागणीही धरणग्रस्तांनी केली. अधिकाऱ्यांनी या मागण्या मान्य केल्या.

जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व सुविधांयुक्त पुनर्वसन करून राज्याला हेवा वाटेल, असा भाम पुनर्वसन पॅटर्न निर्माण करावा. धरणालगतच सपाट जागेवर पुनर्वसन व्हावे ही धरणग्रस्तांची भूमिका रास्त होती. पुनर्वसनबरोबरच धरणग्रस्तांना चांगल्या प्रकारच्या मूलभूत सुविधा देता येणार आहेत. - निर्मला गावित, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवनेरी पॅनलपुढे नम्रता पॅनलचे आव्हान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून, शिवनेरी विरुद्ध नम्रता या दोन पॅनलमध्ये सरळ लढत होत आहे. अपक्षांनी आव्हान निर्माण केल्याने चुरस वाढली आहे. रविवारी (३१ जानेवारी) मतदान होत आहे.

मनमाड बाजार स‌मितीच्या निवडणुकीबाबत जिल्ह्यात सर्वत्र उत्सुकता वाढली आहे. माजी आमदार संजय पवार आणि जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुहास कांदे यांचे शेतकरी विकास पॅनल नांदगावप्रमाणे मनमाड बाजार समितीवर भगवा फडकविण्याच्या इराद्याने निवडणूक रिंगणात उतरले आहे. जिल्हा बँकेचे माजी संचालक चंद्रकांत गोगड यांनी नम्रता पॅनलची निर्मिती केली आहे. शिवनेरी शेतकरी विकासची पतंग आणि नम्रताची छत्री यांच्यातील लढत चुरशीची होण्याची चिन्हे असून, अपक्ष उमेदवारही आपले वेगळे अस्तित्व दाखवण्याची शक्यता आहे.

व्यापारी संघटनेने व्यापारी गटातून माणकचंद गांधी व कल्याणचंद ललवाणी यांना पुरस्कृत केले असून, त्यांची कपबशी करामत करेल अशी व्यापारी गटाला अपेक्षा आहे. आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार अनिल आहेर यांच्यासह माजी सभापती प्रकाश घुगे, राजेंद्र पवार यांचा नम्रता पॅनलला पाठिंबा असल्याचे चंद्रकांत गोगड यांनी सांगितले. रविवारी (३१ जानेवारी) छत्रे विद्यालयात मतदान होत आहे. मतदार कोणाला कौल देतात हे पहाणे महत्त्वाचे आहे. भ्रष्टाचार, गैरकारभार तसेच बाजार समितीची थेट उच्च न्यायालयापर्यंत प्रकरणे गेली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवक पुत्राला मनपाचा दणका

$
0
0

भारतनगरमध्ये अतिक्रमण काढण्यावरून नुकतीच दंगल झाली होती. त्यात एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा पुत्राचा सहभाग असून तो अटकपूर्व जामिनावर आहे. या भागात नगरसेवक पुत्राने खासगीच नव्हे तर महापालिकेच्या आरक्षित जागांवरही अतिक्रमण करून पक्के बांधकाम केले होते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध धंदेही सुरू होते. नागरिकांनी या संदर्भात वारंवार महापालिकेकडे तक्रारी केल्या. दीपाली नगरमध्ये साईबाबा मंदिराला लागून असलेल्या सर्व्हे नंबर ८०९ मधील शिवाजी येथे महापालिकेच्या जागेवर पक्के बांधकाम करण्यासह पत्र्याचे शेड उभारण्यात आले होते. नागरिकांना या ठिकाणी गुंडाचा नेहमीच त्रास होता. हा भाग या अनधिकृत बांधकामामुळे गुन्हेगारांचा अड्डाच बनला होता. तसेच भारत नगरमधील सर्व्हे नंबर ८०९/१ महापालिकेच्या आरक्षित डीपीच्या जागेवर नगरसेवकाच्या आशिर्वादाने झोपड्या वसविण्यात आल्या होत्या.

महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या आदेशानंतर शुक्रवारी महापालिकेच्या अतिक्रम निर्मूलन विभागाचे उपायुक्त रोहिदास बहिरम यांच्या नेतृत्वाखाली पूर्व विभागाच्या तीन पथकांनी या दोनही जागेवरील अतिक्रमण जमीनदोस्त केले. महापालिकेचे ३५ अधिकारी व कर्मचारी तसेच पोलिस सहआयुक्त राजू भूजबळ आणि ८० पोलिस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. अतिक्रमण पाडण्याला विरोध होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी मोठा फौजफाटा सोबत नेला. एक जेसीबी, दोन ट्रॅक्टर्स, ३ गाड्यांच्या मदतीने जवळपास दोन ट्रक साहित्य या ठिकाणाहूंन जप्त करण्यात आले आहे. महापालिकेच्या या कारवाईने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

नेत्यांनी घेतला कारवाईचा धसका महापालिकेच्या आरक्षित जागांवर अतिक्रमण करून अनेक ठिकाणी राजकीय पदाधिकाऱ्यांनीच आपले अड्डे सुरू केले आहेत. काही ठिकाणी जनसंपर्क कार्यालये, तर समाज मंदिरे उभारून त्याचा वापर चुकीच्या कामांसाठी केला जात आहे. त्यामुळे अशा जागांचा शोध घेवून महापालिकेने आता कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे अतिक्रमण करणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या या कारवाईचा आता धसका घेतला आहे.

फौजफाट्याने तणाव निवळला भारतनगरमध्ये दंगलीची पुनरावृत्ती होवू नये म्हणून महापालिका आणि पोलिसांनी सयुंक्तरित्या मोठ्या फौजफाट्यासह ही कारवाई केली. संबंधित अतिक्रमण हे राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या मुलाचे असल्याने स्थानिकांकडून त्याला विरोध होण्याची शक्यता होती. परंतु, अतिक्रमणाला विरोध करण्यास पुढे कोणीच आले नाही.

दीपाली नगर व भारतनगर या दोन्ही ठिकाणी महापालिकेच्या आरक्षित जागांवर अतिक्रमण करून पक्के बांधकाम केले होते. सदरील बांधकाम निदर्शनास आल्यानंतर ते जमिनदोस्त करण्यात आले. अतिक्रमणा विरोधात महापालिकेची कारवाई अशीच सुरू राहणार आहे. - रोहिदास बहिरम, उपायुक्त, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मांगीतुंगी सोहळ्यात वाटणार हजारो कपडे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

मांगीतुंगी येथे होत असलेल्या श्री भगवान वृषभदेवांच्या १०८ फूट मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक सोहळ्यात सहभागी होणाऱ्या परिसरातील सुमारे पाच हजार आदिवासी बांधवांना पाच हजार कपडे व साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम दि. ९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. ही माहिती समितीचे कार्याध्यक्ष अनिलकुमार जैन व मंत्री विजयकुमार जैन यांनी दिली.

पंचकल्याण महोत्सवाला दि. ११ फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार असून, १७ रोजी सांगता समारंभ होत आहे. महास्तकाभिषेक उत्सवाला १८ फेब्रुवारी रोजी प्रारंभ होत आहे. या उत्सवासाठी देशभरातून जैन समाजाचे १००० अधिक सेवेकरी लवकरच दाखल होणार असून, लाखो भाविकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून सर्वांना आपापली कामे विभागून देण्यात आली आहेत. वीस हजारहून अधिक जैन बांधवांच्या निवासाची व्यवस्था अंतिम टप्प्यात आहे. एक लाख चौरस फुटाचा महल उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारावी हॉलतिकीट त्रुटींमुळे गोंधळ

$
0
0

बारावीची परीक्षा ही करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा म्हणून ओळखला जाते. त्यामुळे कोणतीही रिस्क घेण्यास विद्यार्थी तयार नसतात. मात्र ऐनवेळी हॉल तिकिटातच त्रुटी सापडल्याने गोंधळ उडाला आहे. फोटो, माध्यम, विषय, नाव यामध्ये साम्यताच नसल्याने अभ्यासाची तयारी सोडून या त्रुटी निस्तारण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. या प्रकरणी कॉलेजेस विभागीय मंडळावर तर मंडळ कॉलेज व विद्यार्थ्यांना दोषी ठरवत असल्याचे चित्र यामुळे दिसून येत आहे.

त्रुटी दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांना सवलत देण्यात आली असून दुरुस्तीचा फॉर्म त्यांना लवकर सादर करावयाचा आहे. फॉर्मची मुख्य प्रत संबंधित प्राचार्यांकडे जमा करावयाची असून झेरॉक्स कॉपी मुंबई नाका जवळील राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागाकडे जमा करावयाचे आहेत.

विद्यार्थ्यांनी स्वतःच ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरले असल्याने यात मंडळाची काही चूक नाही. सुधारित फॉर्म भरून हॉल तिकिटांमधील त्रुटींवर तोडगा निघेल. - राजेंद्र मारवाडी, सचिव, विभागीय शिक्षण मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे वर्ल्ड फेस्टिवल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जगातील देश, धर्म आणि जाती एकत्र आणण्याच्या उद्देशाने आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे वर्ल्ड कल्चर फेस्टिवल प्रदर्शन ११ ते १३ मार्च दरम्यान नवी दिल्ली येथे होत आहे. जागतिक नेतृत्व आणि अंतर धर्म परिषद म्हणून हा कार्यक्रम होणार आहे.

या फेस्टिवलमध्ये १५५ देशांमधून लाखो लोक उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात हजारो कलाकार, मान्यवर आणि पाहुणे यांना बसण्यासाठी ७ एकरचे व्यासपीठ तयार करण्यात येणार असून अनेक प्रकारचे संगीत, नृत्य, भोजन आणि संपूर्ण जगातील इतर कला प्रकार एका व्यासपीठावर सादर करणे आणि भावी पिढ्यांसाठी ते जागृत ठेवणे हा उद्देश आहे. रंगांची उधळण, सण, उत्सव, हर्ष, उल्हास आणि सर्वत्र हसरे चेहरे यामुळे सर्व उपस्थितांना भारतातील संस्कृतींची व्यापकता अनुभवता येईल.

या फेस्टिवलमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर, एक 'शांती ध्यान' घेतील, जे जगभरातील लाखो लोक एकाच वेळी करतील. हे आणखी एक 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' होणार आहे.

राष्ट्रपती, पंतप्रधानांची असणार उपस्थिती

या कार्यक्रमात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह परदेशातून येणाऱ्या मान्यवरांच्या यादीत सुरीनाम, झिम्बाब्वे, यूएइ, इंडोनेशिया, अल्बेनिया श्रीलंका, नेदरलंड, फ्रान्स, नॉर्वे, लिथूआना या देशातील नेत्यांचा समावेश आहे. या उत्सवासाठी ना‌शिकहून भक्तगण जाणार आहेत. अधिक माहितीसाठी संतोष कापडणे (७५८८६१७२४४, ७८७५५२७३४४) यांच्याशी संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन फॉर्मसाठी मुदतवाढ

$
0
0

दोन आठवड्यांपूर्वी एस. वाय. बीएससीच्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाले. त्यानंतर दुसऱ्या सत्राचे फॉर्म भरण्याची सूचना विद्यार्थ्यांना करण्यात आली. केवळ पाच दिवसांचा कालावधी व सर्व्हरमधील असंख्या त्रुटींमुळे विद्यार्थ्यांना हे फॉर्म भरणे अशक्य झाले होते. याची दखल घेत ऑनलाइन फॉर्म भरण्याची मुदत ८ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

लिंकवर पाच दिवसांची मुदत दाखवत असल्याने सर्वच विद्यार्थी चिंतेत होते. परंतु, विद्यापीठाने फॉर्म भरण्याची मुदत वाढवून दिल्याने दिलासा मिळाला आहे. - गौरव घोरपडे, विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘चंदनपुरीचे खंडेराय’ मोठ्या पडद्यावर

$
0
0

महाराष्ट्रातील सगळ्या भक्तांचे लाडके दैवत असलेल्या श्री खंडेराय यांची जेजुरीनंतर मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी क्षेत्राचे विशेष महात्म्य आहे. येथील बाणाईने आपल्या भक्ती आणि प्रेमाच्या बळावर खंडेराय यांना प्रसन्न करीत चंदनपुरीत येण्यास भाग पाडले होते. त्यांची हीच प्रेमकथा सध्या 'जय मल्हार' या मालिकेच्या रूपाने सर्वत्र लोकप्रिय झाली आहे. आता याच कथेवर आधारित सिनेमा बनविण्यात आला आहे. शरद शेलार यांनी स्वतः या सिनेमासाठी कथा लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.

सिनेमामध्ये मुंबई, पुणे, नाशिक अशा विविध शहरातील कलावंतांची अभिनय केला आहे. 'परतू' या कलात्मक मराठी सिनेमातील सलमान तांबोळी व पल्लवी पवार, महम्मद देशमुख, प्रशांत गरुड, राजू डांगळे, प्रशांत पाटील, स्नेहल पाटील यांची 'चंदनपुरीचे खंडेराय'मध्ये प्रमुख भूमिका आहे. या सिनेमासाठी मालेगाव येथील संगीतकार गीतकार अमोल तिवारी यांनी संगीत दिले आहे. सिनेमातील एकूण सहा गाणी सध्या सोशल मीडियावर गाजत आहेत. या गाण्यांमध्ये देखील खंडेरायाच्या जागरण गोंधळापासून ठेका धरायला लावणारी अॅटम साँगपर्यंत अशी विविध गाणी बहार आणणारी आहेत.

कॅमेरामन म्हणून पंकज घोरपडे, व्यवस्थापक म्हणून प्रवीण झोपे व प्रदीप शेवाळे यांनी काम पहिले आहे. सध्या चंदनपुरी येथे यात्रोत्सव सुरू आहे. सेन्सॉर बोर्डने देखील मान्यता दिली असल्याने लवकरच हा सिनेमा राज्यभरात प्रदर्शित केला जाणार आहे. शुक्रवारी (दि. २९) या सिनेमाचा खास प्रिमियर शो मालेगावमधील वैभव सिनेमागृहात मान्यवरांच्या उपस्थित पार पडला. यावेळी चित्रपटरसिकांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी होती.

सिनेमाची आधीपासून आवड होती. यापूर्वी अनेक लघुपट बनविले होते. संपूर्ण सिनेमासाठी जाणीवपूर्वक लोकदैवत श्री खंडेराय यांची जीवनकथा घेतली. सिनमेच्या माध्यमातून जमा होणाऱ्या रकमेतून मालेगाव तालुक्यातील दुष्काळपीडित शेतकरी कुटुंबीयांना मदत केली जाणार आहे. यात्रोत्सव काळात सिनेमा पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळावी म्हणून सिनेमा मालेगावी प्रदर्शित करतो आहोत. सिनेमा प्रदर्शित झाल्याने विशेष आनंद होत आहे. - शरद शेलार, दिग्दर्शक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यापारी बँक अध्यक्षपदी गायकवाड

$
0
0

मावळते अध्यक्ष डॉ. दत्तात्रय पेखळे यांच्या हस्ते गायकवाड यांचा तर ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे आणि मावळते उपाध्यक्ष शामराव चाफळकर यांच्या हस्ते सुधाकर जाधव यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. पेखळे आणि चाफळकर यांचा सत्कार जाधव यांनी केला. जनसंपर्क संचालिका रंजना बोराडे, संचालक अशोक सातभाई, हेमंत गायकवाड, डॉ. प्रशांत भुतडा, अशोक चोरडिया, सुनील आडके, जयश्री गायकवाड, श्रीराम गायकवाड, जग्गनाथ आगळे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी एकनाथ कदम, अशोक डेरले, यशवंत पागेरे आदी उपस्थत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवल्याजवळ विदेशी मद्य जप्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला शहर पोलिसांनी एका वाहनातून पावणे दोन लाखांचे बेकायदेशीर विदेशी मद्य जप्त केले आहे. कोपरगांव तालुक्यातील धामोरी येथून येवला तालुक्यातील चिचोंडी मार्गे ही दारू येवल्यात आणली जात होती, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

चिचोंडीमार्गे एका वाहनातून विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती गुरुवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास येवला शहर पोलिसांनी अंगणगाव येथील बोटिंग क्लबजवळ सापळा रचला. या पोलिस पथकाला येवल्याच्या दिशेने टाटा एस वाहन येताना दिसले असता त्याची तपासणी करण्यात आली. त्यात हा वाहनात 'बॉम्बे स्पेशल डार्क' या विदेशी कंपनीच्या रमचे ५० खाकी बॉक्स आढळून आले. पोलिसांनी १ लाख ७७ हजार रुपयांच्या विदेशी दारूसह वाहतूक करणारे वाहन ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी योगेश विनायक मोरे (२१) या चालकास अटक केली. त्याला कोर्टाने १४ दिवसांची कोठडी सुनावली. कारवाईत पोलिस निरीक्षक दीपककुमार वाघमारे, उपनिरीक्षक एस. आर. बैरागी, हवालदार अभिमन्यू आहेर, कॉन्स्टेबल राजेंद्र माळी, योगेश पाटोळे आदींनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षाथांबे अडकले लालफितीत

$
0
0

दोन वर्षापासून पालिकेला मिळेना वेळ; मनसेकडून ठरावाची तयारी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी व रिक्षा चालकांचे रस्त्यावर होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी दोन वर्षापूर्वी आरटीओ आणि शहर वाहतूक शाखेने महापालिकेला २६३ रिक्षा थांब्याचा प्रस्ताव पालिकेला दिला. परंतु दोन वर्षापासून रिक्षा चालकांचे थांबे हे पालिकेच्या लालफिती कारभारात अडकले असून, त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे रिक्षा चालकांना प्रश्न निकाली काढण्यासाठी मनसे सरसावली आहे. मनसेने रिक्षाचालकांना अधिकृत थांबे देण्यासाठी थेट ठरावाची तयारी सुरू केली आहे. सभागृह नेते सलिम शेख यांनी या थांब्यासंदर्भात शनिवारी शहर वाहतूक पोल‌सिांची भेट घेतली.

शहरातील रिक्षाचालकांच्या बेश‌स्तिीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहे. रिक्षाचालक आपल्या मनमानीने कुठेही रिक्षा थांबवत असल्याने शहरातील वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे मार्च 2013 मध्ये आरटीओ, पोल‌सि आणि महापालिकेने एकत्र‌ति येऊन रिक्षा थांब्यासंदर्भात सर्व्हेक्षण केले होते. आरटीओ आणि शहर पोल‌सि

वाहतूक शाखेने या समितीने शिफारस केलेल्या रिक्षाथांब्यापैकी २६३ रिक्षा थांब्याची यादी करत, त्याच्यावर अंमलबजावणी करण्याची सूचना महापालिकेला केली होती. महापालिकेने मात्र या प्रस्तावावर लक्षच दिलेले नाही.

शहरात रिक्षाचालकांच्या थांब्याची बोंब असताना महापालिकेत मात्र गेल्या दोन वर्षापासून हा प्रस्ताव धूळखात पडला आहे. शहरातील रिक्षाचालकांच्या थांब्यासंदर्भात सभागृह नेते सलिम शेख यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शनिवारी शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक एम. एम. बागवान यांची भेट घेतली. यावेळी संदीप लेनकर, सचिन भोसले, जमीर शेख यांनी रिक्षा चालकांच्या थांब्याचा प्रश्न उपस्थित केल्यावर महापालिकेमुळेच रिक्षाथांबे आडल्याचा दावा केला. पालिकेला रिक्षा थांब्यासंदर्भात दिलेला प्रस्तावच त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या हातात दिला. त्यामुळे पदाधिकारीही आश्चर्य चकीत झाले.

आरटीओ आणि पोल‌सिांनी दिलेल्या या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय मनसेने घेतला असून, हे रिक्षाथांबे अधिकृत करण्यासाठी आता महासभेत ठराव आणण्याची तयारी सुरू केली आहे. महासभेत ठराव करून वाहतुकीचा प्रश्न निकाली काढणार असल्याचे सलिम शेख यांनी सांगीतले आहे. त्यामुळे नागरिकांची लवकरच वाहतुकीच्या कोंडीतून सुटका होण्याची शक्यता आहे.


अडीच हजार रिक्षांचा प्रश्न

महापालिकेने शहरात २६३ रिक्षा थांब्याना परवानगी दिल्यास प्रत्येक थांब्यावर जवळपास १० ते १५ रिक्षा थांबू शकणार आहेत. त्यामुळे शहरातील जवळपास अड‌ीच हजार रिक्षांना अधिकृत जागा मिळणार आहे. त्यामुळे रस्त्यात कुठेही रिक्षा थांबवण्याचे प्रमाण कमी होऊन वाहतुकीचा प्रश्नही सुटेल. विशेषता शालिमार, सीबीएस, आरके, अशोक स्तंभ, द्वारका, मुंबईनाका, बसस्टॅन्ड आदी ठिकाणांवरील रिक्षा थांब्याचा ताणही कमी होणार आहे.





शहरात २६३ अधिकृत रिक्षाथांबे तयार झाल्यास कुठेही रस्त्यावर रिक्षा थांबवण्याचे प्रमाण कमी होईल. त्यामुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्न बऱ्यापैकी सुटणार आहे. महासभेत लवकरच ठराव करून ही रिक्षाथांबे अधिकृत केली जातील.

- सलिम शेख, सभागृहनेते, मनपा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकांचा रास्तारोको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

शिवाजीनगरमधील प्रभाग क्रमांक १७ मध्ये नागरी सुविधा पुरवाव्यात यासह टवाळखोर, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कारवाई करावी, या मागणीसाठी नगरसेवक दिनकर पाटील व नगरसेविका लता पाटील यांनी रहिवाशांसह कार्बननाका येथे रास्तारोको आंदोलन केले. पोलिस प्रशासन व महापालिका अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवदेन देत प्रशासनाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नगरसेवक पाटील यांनी दिला आहे.

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १७ मधील जंगलीदास महाराज रोड, गंगापूररोड येथे दुभाजक टाकण्यात यावेत, कार्बन नाका ते ज्योती ट्रक्चर कंपनीपर्यंतच्या रस्त्याचे रूंदीकरण करावे, गतिरोधक टाकण्यात यावेत, गंगापूररोडवरील अनधिकृत पार्किंग बंद करावी, अनधिकृत लॉन्सवर कारवाई करावी, शिवाजीनगर भागातील गुंठेवारी पद्धतीने बांधलेली घरे अतिक्रमण विभागाने काढावीत, मुख्य रस्त्यांवर अनधिकृत असलेले ट्रान्सपोर्ट व्यवसाय बंद करावेत, उद्यानांची निगा राखावी आदी मागण्यांचे निवेदन नगरसेवक पाटील यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले आहे.

प्रभाग १७ मधील कायदा व सुव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. धृवनगर, शिवाजीनगर, श्रमिकनगर व अशोकनगर भागातील टवाळखोर, गुन्हेगार, गुंडांचा उवद्रव वाढला आहे. त्यांच्यावर कामयस्वरुपी कारवाई करण्यात यावी, चौकाचौकात घोळके करून उभे राहणारे टवाळखोर मुलींची छेड काढतात. पोलिसांनी शिवाजीनगर भागात गस्त वाढवावी, तलवारीने केक कापणाऱ्यांवर कारवाई करावी व गंगापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना सुरक्षा देतात म्हणून त्यांची तत्काळ बदली करावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

रास्तारोको आंदोलनात अमोल पाटील, दिनकर कांडेकर, राजाराम पाटील, दशरथ गुरगुडे, लियाकत शेख, संजू तांबे, सदानंद नाईकवाडी, संजय ठुबे यांसह प्रभागातील शेकडो रहिवाशी सहभागी झाले होते.

महापालिका व पोलिस प्रशासनाला वेळोवेळी समस्यांबाबत पत्रव्यवहार केला आहे. परंतु, महापालिका नागरी सुविधा पुरवत नाही. पोलिस प्रशासन टवाळखोर व गुन्हेगारांवर कारवाईच करीत नाही. यासाठी प्रभाग १७ मधील रहिवाशांना बरोबर घेत रास्तारोको आंदोलन करण्याची वेळ आली. प्रशासनाने याची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. - दिनकर पाटील व लता पाटील, नगरसेवक, प्रभाग क्रमांक १७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गतिरोधकासाठी रास्तारोकाे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

तारवाला नगर ते अमृतधाम रोडवर स्कॉर्पिओच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला. सकाळी सहा वाजता ही घटना घडली. या अपघातात लामखेडा मळा येथील लक्ष्मी नारायण इमारतीत राहणाऱ्या आशा शांताराम क्षीरसागर (वय ५१) या महिलेचा मृत्यू झाला. यानंतर नगरसेवकासह नागरिकांनी या ठिकाणी गतिरोधक टाकावेत, या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन केले.

आशा क्षीरसागर या सकाळी सहा वाजता फिरण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. यावेळी तारवाल नगरकडून अमृतधामकडे जाणाऱ्या स्कॉर्पिओने त्यांना जोरात धडक दिली. या अपघातात आशा क्षीरसागर यांना प्राण गमवावे लागले. क्षीरसागर यांच्या पश्चात पती आणि मुलगा असा परिवार आहे.

नगरसेविका रस्त्यावर या अपघातानंतर प्रभाग तीनच्या नगरसेविका सुनीता शिंदे यांनी या ठिकाणी गतिरोधक टाकावेत या मागणीसाठी नागरिकांसह रास्तारोको आंदोलन केले. सुनीता शिंदे यांनी महापालिकेच्या पंचवटी विभागाचे बांधकाम अभियंता सी. बी. आहेर यांना रोडवर येऊन प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने गतिरोधक टाकावेत, अशी मागणी केली. त्यांनी येण्यास टाळाटाळ केल्याने संतप्त नागरिकांनी अपघातास्थळी रास्ता रोको आंदोलन करून रोडवर कुदळीने चारी खोदून वाहने अडवली. यावेळी नंदकुमार शिंदे, प्रमोद मंडलिक, भाऊसाहेब लामखडे, दीपक डोळसे, महेंद्र बडवे, धनंजय माने, संतोष शिंदे, विजय मांदले, नरेंद्र दराडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विह‌िंप’ने दिलेल्या संधीमुळेच मंत्री

$
0
0

आदिवासी विकास मंत्री सावरा यांची भावना

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'विश्व हिंदू परिषदेच्या प्रकल्प शाळेतच मी शि‌कलो. विह‌िंप नसती तर मी उच्चशिक्षण घेऊन मंत्रीपदापर्यंत पोहोचू शकलो नसतो.' अशी भावना राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी शनिवारी व्यक्त केली.

विश्व हिंदु परिषद संचलित वनवासी व दुर्बल घटक विविध सेवा प्रकल्प न्यासतर्फे सुरू करण्यात आलेल्या कै. श्रीमती गोदावरीबाई महाजन शैक्षणिक संकुलाच्या स्नेहवर्धिनी या इमारतीचे लोकार्पण सावरा यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, विहिंपचे अखिल भारतीय संघटन संयुक्त महामंत्री विनायकराव देशपांडे, विहिंपचे अखिल भारतीय सहसेवा प्रमुख मधुकरराव दीक्षित, विहिंपचे पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष एकनाथ शेटे आदी मान्यवर उपस्थित होते.

सावरा म्हणाले, 'मी स्वत: विहिंपच्या शिक्षण प्रकल्पात शिकलो. म्हणूनच या इमारतीच्या लोकार्पणाचा आनंद अधिक आहे. विहिंपने त्यांच्या प्रकल्पात शिक‌ण्याची संधी दिली नसती माझे शिक्षण पूर्ण होऊ शकले नसते. त्यामुळे मी कोठेच नसतो. मंत्रीही झालो नसतो. एकीकडे आपण देशाला आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी झटत आहोत. त्या दिशेने आश्वासक पाऊले टाकत आहोत. मात्र दुसरीकडे अजूनही समाजात मोठ्या प्रमाणात दुर्बल घटक, दारीद्र्य आणि अशिक्षित वर्ग पहावयास मिळतो. या वर्गाला आधार दिला नाही तर देश महासत्ता कसा बनेल.' अशा घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असे मतही त्यांनी व्यक्त केले. या इमारतीसाठी भुखंड देणाऱ्या शुभांगी महाजन आणि परिवाराचा तसेच इमारत उभारणीत योगदान देणाऱ्यांचा सावरा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

स्नेहवर्धिनीत काय असणार...

साडेपाचशे वार जागेत उभारलेल्या या दोन मजली संकुलात उच्चशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकांमधील मुलींच्या निवासाची सोय असेल. २५ मुली येथे दहावीनंतरचे शिक्षण पूर्ण करू शकतील. त्यांच्या भोजनाचीही येथे व्यवस्था राहील. स्वयंरोजगाराच्या दृष्टीकोणातून येथे व्यक्तीमत्व विकास, इंग्रजी संभाषण कला, स्पर्धा परीक्षा अभ्यास वर्ग चालविले जातील. नाशिकमधील कंपन्या, संस्थांमधील कामगारांच्या प्रशिक्षणासाठीही ही जागा उपलब्ध होऊ शकेल. ५० जणांचे रहिवाशी प्रशिक्षण शिब‌िर येथे घेता येईल. येथे मातृपितृ विश्रांती गृह असेल. कामानिमित्त बाहेरगावी जाणारे लोक आपल्या वृध्द वड‌िलधाऱ्यांना १५ दिवस येथे ठेऊ शकतील. रोज संध्याकाळी येथे परिसरातील लहान मुलांसाठी संस्कार वर्ग होईल. याखेरीज वाचनासाठी पुस्तकेही उपलब्ध होतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आरटीईचे प्रवेश यंदाही ऑनलाइन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खासगी शाळांचा मनमानी कारभार, पालकांची अनास्था आदी कारणांमुळे आरटीईअंतर्गत २५ टक्के प्रवेशप्रक्रिया २०१४-१५ या शैक्षणिक वर्षात फारशी यशस्वी ठरली नाही. परिणामी, अनेक बालके शिक्षणापासून वंचित राहिली. याचा विचार करता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संचालनालयाने बैठक घेत आरटीईचे २०१६-१७ या शैक्षणिक वर्षातील सर्व प्रवेश ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार शहरातील १०१ शाळांमधील सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे.

शिक्षण हक्क कायद्यानुसार मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्याचे बंधन शाळांना घालून देण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा हेतू यामागे आहे. मात्र शाळांनी प्रवेश नाकारणे, पालकांची अनास्था, प्रवेश अर्जच न मिळणे यामुळे आरटीई प्रक्रियेला मागील वर्षी बऱ्याच खाचखळग्यांचा सामना करावा लागला. तसेच, मुख्याध्यापक व शाळा प्रशासनानी अनेकांचे प्रस्ताव धुडकावून लावल्याचे वास्तवही या प्रवेश प्रक्रियेत समोर आले. यावर पावले उचलत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरण्याचे तंत्र विकसित करण्यात आले आहे. यामध्ये पालकांनी केवळ ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरून द्यायचे असून, प्रवेशाची पुढील प्रक्रिया सरकारी यंत्रणाच पार पाडणार आहे. यामुळे कुणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही. तसेच शाळाही विद्यार्थ्यांचा प्रवेश रोखू शकणार नाहीत.

नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्य व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये हा नियम लागू करण्यात आला आहे. मागील वर्षी ऑनलाइन प्रवेशाची प्रक्रिया केवळ नाशिक शहरापुरतीच मर्यादित होती. या निर्णयामुळे संपूर्ण जिल्ह्यातील वंचित व दुर्बल घटकातील मुलांना प्रवेश मिळू शकणार आहे. प्रवेशाचे वेळापत्रक http://rte25admission.maharashtra.gov.in या वेबसाइटवर घोषित करण्यात येणार असून या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता करून ठेवावी, असे आवाहन नाशिक महापालिक शिक्षणमंडळातर्फे करण्यात आले आहे.

प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे

ऑनलाइन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना पासपोर्ट साइज फोटो, एससी/एसटी प्रवर्गासाठी पालकांचे जात प्रमाणपत्र, इतर प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थी विद्यार्थ्यांकरिता पालकांच्या सक्षम प्राधिकरणाचा एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असल्याचा उत्पन्न दाखला, पालकांचा रहिवासी पुरावा, अपंग विद्यार्थ्यांसाठी अपंगत्त्वाचे प्रमाणपत्र सादर करावयाचे आहेत.

आरटीईच्या प्रवेशामध्ये पारदर्शकता राहण्यासाठी या प्रक्रियेचा उपयोग होईल. ज्या शाळा २५ टक्क्यांनुसार प्रवेश देण्यास टाळाटाळ करतील, अशा शाळांवर काय कारवाई करायची, याबाबत विचारप्रक्रिया सुरू आहे.

- उमेश डोंगरे, शिक्षणमंडळ, प्रशासनाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतीही बनतेय हायटेक

$
0
0

प्रा. अशोक सोनवणे

विज्ञान तंत्राज्ञानाच्या व संसूचनाच्या साधनांचा जसा विकास झाला, तसा त्याचा मानवी जीवनावर परिणाम झाला. कृषी प्रक्रिया उद्योगावरही त्याचा परिणाम झाला. कृषी क्षेत्रातही अमुलाग्र बदल झाले. सुमारे २० वर्षांपूर्वी परंपरागत शेती करणारा शेतकरी आता हायटेक शेती करू लागला आहे. शेतीक्षेत्रात जे संशोधन होत आहे, ते आत्मसात करून शेतकरी त्याचा अवलंब करीत आहेत. भारतातील अनेक शेतकरी स्वतःही संशोधन करीत आहेत. अनेक शेतकरी गट शेतीच्या माध्यमातून शेती करताना दिसतात. काही शेतकरी अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया व इस्राईल यासारख्या विकसित देशांना भेटी देऊन तेथील शेतीच्या विकासाचा आणि संशोधनाचा अभ्यास करीत आहेत.

वर्षापूर्वी तृणधान्ये आणि कडधान्याचे पारंपरिक पद्धतीने उत्पादन घेणारा शेतकरी आज आधुनिक शेती करतो आहे. आज हॉट्रीकल्चर, सेरीकल्चर, फ्लोरीकल्चर अशा विविध क्षेत्रात प्रवेश केला आहे आणि त्यात यशही मिळवलेले आहे. सर्वच शेतकरी यशस्वी झाले असे नाही. आजही दुष्काळी भागातील बहुसंख्य शेतकरी परंपरागत पध्दतीने शेती करीत आहेत. साधन सामुग्रीच्या अभावामुळे त्यांना आधुनिक शेतीची कास धरता आलेली नाही. काही तर अपयशामुळे अगदी खचून गेलेले आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागे त्यांना येत असलेले अपयश हे देखील एक कारण आहे.

शेती करणे हे एक सर्वात मोठे आव्हान आहे. त्यातही कोरडवाहू शेती करणे हे खडतर आव्हान आहे. कारण कोरडवाहू शेती अनिश्चिततेच्या फेऱ्यांमध्ये सदैव अडकलेली आहे. अपार कष्ट करूनही अपेक्षित लाभ पदरात पडत नाही. शेतात उपसलेल्या कष्टांचे योग्य फळ पदरात पडत नाही म्हणून सुमारे ४० टक्के शेतकऱ्यांची आज शेतीक्षेत्रातून बाहेर पडण्याची मानसिकता आहे. कोरडवाहू शेतीच्या आतबट्याच्या व्यवहाराचे दृष्टचक्र हे वर्षानुवर्षे चालू आहे. शेती क्षेत्रातील उत्पन्नाची अनिश्चितता व तोटा जेवढा वाढेल तेवढे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढते. अशा परिस्थितीतही जो धाडसाने शेती करतो अशा सर्व शेतकऱ्यांना सलामच केला पाहिजे.

नाशिक जिल्ह्यात आणि राज्यातही मी अनेक बहादूर शेतकरी पाहिले आहेत, की ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीला अतिशय धाडसाने तोंड दिलेले आहे. हतबल न होता यश मिळवलेले आहे. कोरडवाहू शेतीतही नवनवे प्रयोग केलेल आहेत. कुणी फळबागा फुलविल्या तर कुणी फळबागा उभ्या करून उत्पादनाचे नवनवे विक्रम प्रस्थ्यपित केले. काहींनी शेळी पालन केले तर कुणी उघड्या माळावर फूलशेती यशस्वी केली. एक मात्र खरे की जो सतत धडपड करतो तो निश्चितपणे यशस्वी होतो. अशा यशस्वी ठरलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या यशोगाथा मांडता येतील. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या दुःखी व्यथा एका बाजूला आहेत, तर प्रचंड संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा एका बाजूला आहेत.

नाशिक जिल्ह्यातील शेतकरी कष्टाळू अन् नाविण्याचा शोध घेणारे आहेत. द्राक्षाची यशस्वी शेती या शेतकऱ्यांनी केली. द्राक्षाच्या उत्पादनाचे व त्याच्या गुणवत्तेचे नवनवे विक्रम प्रस्थापित केले. नाशिकच्या द्राक्षाची चव जगभरातील लोकांनी चाखली. द्राक्षाची चव गोड असते याची नाशिकच्या द्राक्षांनी संपूर्ण जगाला ओळख दिली. फ्रान्समधील शॅम्पेनचे उत्पादक शारबोट हे भारतात आले त्यांनी येथील द्राक्षाची चव चाखली व या द्राक्षापासून उत्तम शॅम्पेन व वाईन तयार होऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी येथून द्राक्षे फ्रान्सला नेली व तिथे त्यांची शॅम्पेन बनविली. ती अप्रतिम स्वादाची शॅम्‍पेन तयार झाली होती. त्यातूनच पुढे पिंपळगाव परिसरात माधवराव मोरे व मालोजीराव मोगल यांनी पिंपेनचा प्रकल्प सहकारी तत्वावर उभा केला. पुढे तो प्रकल्प बंद पडला. सहकारी तत्त्वावरील हा प्रकल्प बंद पडल्यानंतर खासगी क्षेत्रात अनेक शेतकरी पुढे आले आणि त्यांनी वाईन प्रकल्प उभे केले, ते फार मोठे धाडस होते. आव्हान स्वीकारल्याशिवाय व प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याशिवाय यशप्राप्ती नाही, हे ब्रीद स्वीकारलेल्या शेतकऱ्यांनी वाईन उद्योगातही आपला जम बसविला. द्राक्षे निर्यात केली. काही वेळा दोन पैसे मिळाले तर काही वेळा आपला माल युरोपच्या बाजारपेठेत नाकारला गेला. नुकसान झाले तरी शेतकरी हटला नाही. त्याला परिस्थितीने खूप शिकवले आणि तो निर्यात करीतच राहिला. आज आव्हाने असूनही तो वाईन तयार करतो आहे. एका बाजूला शेतमालाच्या उत्पादनाच्या गुणवत्तेकडे त्याचे लक्ष आहे, तर दुसरीकडे त्याचे लक्ष बाजारपेठेवर आहे. उच्च गुणवत्तेसाठी उच्च तंत्रज्ञान फार महत्त्वाचे आहे. त्यासाठी काही शेतकरी तर स्वतःच प्रयोग करतात व संशोधनही करतात.

आज नाशिकचा शेतकरी वाईन उद्योगात पुढे येत आहे. द्राक्षापासून तो वाईन तयार करतो आहे. उद्या जांभळापासून वाईन तयार करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी काही शेतकऱ्यांनी जाणीवपूर्वक जांभळाची शेती सुरू केलेली आहे. वेगवेगळ्या फळांपासून वाईन तयार करण्याचे प्रयोग सुरू आहेत. सध्या तरी द्राक्षापासून तयार होणाऱ्या वाईनचीच चर्चा आहे. वाईनचे उत्पादन घ्यावे की नाही? अशाही चर्चा सध्या होत आहे, पण काही असो शेतकरी प्रयोगशील होत आहे. जगाच्या बाजारवार लक्ष ठेवून शेती करतो हे फार महत्त्वाचे आहे. कारण शेतकऱ्याच्या शेतमालावर प्रक्रिया झाल्याशिवाय त्याची मूल्यवृद्धी होणार नाही याची आता शेतकऱ्यांना खात्री पटली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशातही कृषी-प्रक्रिया उद्योग वाढत आहेत. सीताफळ हे तसे डोंगरी पीक पण आता त्याची शास्त्रीय पद्धतीने लागवड होत आहे. सीताफळापासून आईसक्रीम तयार करण्याच्या उद्योग वाढत आहे. आवळा, संत्री, केळी, आंबा इ. फळपिकांवर प्रक्रिया उद्योग वाढत आहे. तो अजून वाढवायला हवा.

यादृष्टीने नाशिक जिल्ह्यातील शेतकरी सर्वात पुढे आहे. सन २००० सालापासून पुढे वाईन उद्योग वाढत आहे. आज जिल्ह्यात ४० पेक्षा अधिक वायनरी आहेत. सुमारे दीडकोटी लिटर एवढी वाईन जिल्ह्यात तयार होते, त्यासाठी जगभरातील बाजारपेठ शेतकरी शोधतो आहे. एकूण उत्पादनापैकी सुमारे १० टक्‍के वाईन निर्यात केली जाते. निर्यातीसाठी जगभरात फार मोठी स्पर्धा आहे. चीन, जर्मनी, अमेरिका, इटली, चिली, ऑस्ट्रेलिया आदी देशांमधेही वाईनचे मोठ्या प्रमाणत उत्पादन होते. जगभरात मोठी स्पर्धा आहे. जगाच्या व्यापारातील स्पर्धेत टिकाव धरण्यासाठी अत्यंत चिकाटीने गुणवत्तापूर्वक उत्पादन करावे लागणार आहे. प्रतिकूल परिस्थितीला भिडण्याची मानसिकता विचारात घेता हा शेतकरी एक दिवस जगाच्या बाजारात निश्चितपणे दिमाखाने उभा राहिल, असा विश्वास वाटतो. जागतिक बाजारपेठेत टिकाव धरणे हे भारतासारख्या विकसनशील देशांना फार अवघड आहे. गुणवत्तेच्या तंत्राबरोबर बाजारपेठेचे तंत्र शेतकऱ्यांनी आत्मसात केले तरच जागतिक पातळीवर आपल्याला टिकाव धरता येईल. येणारा भविष्यकाळ या गोष्टी निश्चितपणे भारतीय शेतकऱ्यांना शिकवेल.

(लेखक हे कृषी क्षेत्रातील अभ्यासक आहेत.)



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन हजार होर्डिंग हटवले

$
0
0


महापाल‌िकेची कारवाई; ११ जणांवर गुन्हे दाखल

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील अनधिकृत होर्डिंग्जसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर महापालिकेने सुरू केलेल्या साफसफाई मोहिमेत आतापर्यंत तीन हजार होर्डिंग,बोर्ड व बॅनर्स काढण्यात आले. १८ तारखेपासून सुरू असलेल्या मोहिमेत राजकीय पक्षांचे १३९ होर्डिंग काढण्यात आले असून, तब्बल ११ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे शहराच्या विद्रुपीकरणाला कारणीभूत ठरलेले २५०४ बोर्ड हटविण्यात आले आहेत.

२५ जानेवारीपर्यंत अतिक्रमण विभागाने ९४ राजकीय होर्डिंग, २२६२ व्यावसायिक बोर्डसह राजकीय पक्षांचे शाखा फलक काढले आहेत. महापालिकेची ही मोहीम अजूनही सुरूच राहणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे यांनी दिली आहे. शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज व फलक काढण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार पालिकेने १८ जानेवारीपासून शहरातील अनधिकृत होर्डिंग, बॅनर व फलकांविरुद्ध कारवाई सुरू केली होती. शहरातील अनेक भागात महापालिकेच्या परवानगीशिवाय लावण्यात आलेले होर्डिंग, फलक,बोर्ड, पोल बॅनर व झेंडे जप्त करण्याची मोहीम सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासून अनधिकृत होर्डिंगमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून, अपघाताला निमंत्रण मिळत असल्याने या अनधिकृत होर्डिंगसंदर्भात रतन लथ यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्देश दिल्यानंतर त्यांची अंमबजावणी केली जात आहे.

गेल्या १२ दिवसापासून महापालिकेच्या या मोहिमेत १३९ राजकीय होर्डिंग्ज व २५०४ व्यावसायिक व राजकीय पक्षांचे शाखा फलक व बोर्ड काढण्यात आले आहेत. जवळपास ३०३९ होर्डिंग व फलक जप्त करण्यात आले असून, ११ जणांवर आतापर्यंत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २६ जानेवारीनंतरही पालिकेने ही मोहीम सुरूच ठेवली असून, पुढेही सुरूच राहणार असल्याचे अतिरिक्त आयुक्तांनी सांगीतले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंबरडे मोडणारा रोड अखेर झाला चकाचक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

देवळाली कॅम्प शहरात प्रवेश करणारा प्रमुख रस्ता हौसन रोडची दयनीय अवस्था झाली होती. खड्ड्यांमध्ये रस्ता हरवला असल्याने डांबरीकरण गरजेचे होते. वाहनधारकांच्या मागणीनंतर अखेर प्रशासनाने या भागातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे रस्ते आता चकाचक दिसू लागले आहेत.

देवळालीतील अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. हौसन रोडवरील व्यापारी बँकेसमोर खोदलेल्या रस्त्यावर रोजच वाहन चालवताना कसरत करावी लागत होती. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष सचिन ठाकरे व प्रशासनाने याकडे लक्ष देत हौसन रोड व मेन स्ट्रीट परिसरात डांबरीकरणाचे काम सुरू केले आहे. खड्ड्यांमुळे वाहनधारकांना पाठ व मानेचे दुखणे जडले आहे. यामुळे हौसन रोड हा देवळाली कॅम्प शहरात प्रवेश करणारा प्रमुख रस्ता असल्याने या भागातील डांबरीकरण होणे अनिवार्य होते. मेन स्ट्रीट रस्त्यावर सतीश कॉम्प्लेक्स परिसरातील वळणावर निर्माण झालेले मोठे खड्डे बुजवून डांबरीकरण करण्यात आले आहे.

खड्ड्यांमुळे व्यवसायावर परिणाम झाला होता. ग्राहकांची संख्या रोडावली होती. यामुळे आर्थिक नुकसान होत होते. डांबरीकरणामुळे ग्राहकांची संख्या वाढीस लागेल. - राजेश भालेराव, व्यावसायिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकचा पाणी प्रश्न सुटणार

$
0
0

दमणगंगा-गोदावरी लिंकचा बृहत आराखड्यात समावेश

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रस्तावित असलेल्या दमणगंगा-गोदावरी लिंकचा बृहत आराखड्यात समावेश करण्यात आला असून, यामळे नाशिक शहराचा २०४१ पर्यंतचा पाणी प्रश्न सुटणार आहे. यासंदर्भात जलसंपदा विभागाने लेखी कळविले असून, या प्रकल्पासाठी १६०० कोटी रुपये खर्च येणार आहे.

राज्य सरकारने सकारात्मक दृष्टीकोन ठेवून दमणगंगा (एकदरे)-गोदावरी लिंक योजनेस तत्वतः मान्यता देऊन या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे पत्र राष्ट्रीय जलविकास अभिकरणास (NWDA) दिले आहेत. या योजनेत दमणगंगा नदीवर एकदरे गावाजवळ ५००० दशलक्ष घनफूट इतक्या क्षमतेचे धरण बांधण्यात येणार आहे. २१० मीटर उपसा करून हे पाणी कश्यपी धरणात टाकण्यात येणार आहे. तेथून पुढे प्रवाही मार्गाने ते पाणी धरणात येईल. अशा प्रकारे नाशिकच्या विकासासाठी ५००० दशलक्ष घनफूट पाणी अतिरिक्त उपलब्ध होणार असल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले आहे.

सद्यस्थितीत गंगापूर धरणातून नाशिक शहरास थेट पाईपलाईनने पाणीपुरवठा केला जातो. आजमितीस १६ लाख लोकसंख्येच्या नाशिक शहरास दररोज १२ दशलक्ष घनफूट इतके पाणी लागते. वर्षभर ४३८० दशलक्ष घनफूट इतके पाणी लागते. मात्र, गंगापूर धरणाची क्षमता गाळामुळे कमी झाली असून, धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास ५६०० दलघफू इतका पाणीसाठा होतो. मेंढेगिरी समितीच्या अहवालानुसार त्यापैकी ४० टक्के पाणी दरवर्षी जायकवाडी धरणात सोडावे लागणार आहे. त्यामुळे नाशिक शहरास ३३६० दलघफू इतकेच पाणी उपलब्ध होणार आहे. या वर्षीसुद्धा १३०० दशलक्ष घनफूट पाणी गंगापूर धरणातून जायकवाडीस सोडण्यात आले. त्यामुळे नाशिककरांवर पाणी कपात करण्याची वेळ आली आहे. २०४१ मध्ये नाशिक शहराची लोकसंख्या ४५ लाख इतकी असणार आहे. त्यासाठी दररोज ३४ दशलक्ष घनफूट इतके पाणी लागणार आहे. म्हणजेच एका वर्षात १२,४१० दशलक्ष घनफूट इतके पाणी महापालिकेला लागणार आहे. त्याची गरज या योजनेतून भागविली जाईल. दमणगंगा-गोदावरी लिंक योजना राबवणे काळाची गरज असल्याने गेल्या दीड वर्षापासून खासदार गोडसे आणि जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांच्याकडून पाठपुरावा सुरु आहे. अखेर या योजनेचा कोकण खोरे महामंडळाच्या बृहत आराखड्यात समावेश करण्यात आल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. या योजनेचा अंदाजित खर्च १६०० कोटी इतका आहे.

गोदावरी खोरे तुटीचे खोरे असून पाण्यावरून प्रादेशिक वाद उपस्थित झाले आहेत. हायकोर्टात सुद्धा चालू आहे. उपलब्ध पाण्यात भविष्याची गरज लक्षात घेऊन गोदावरी खोऱ्यात उत्तर कोकणातील दमणगंगेचे पाणी आणण्याशिवाय तरणोपाय नाही. म्हणूनच दमणगंगा (एकदरे)-गोदावरी लिंक, वाल (आडगांव)-वैतरणा लिंक, गारगाई-वैतरणा-कडवा-देवनदी लिंक इत्यादी नदीजोड प्रकल्प राबविणे आवश्यक असल्याचे गोडसे आणि जाधव यांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>