Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

श्रावणक्वीनसाठी व्हा सज्ज

$
0
0

प्राथमिक फेरीसाठी आजच करा नावनोंदणी

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मैत्रिणींनो, तुम्ही उत्तम नृत्यकलाकार आहात, गळाही गाता आहे, अभिनयाचे अंग आहे, चेहराही उत्तम भावना बोलतो, यासोबत तुमचे व्यक्तिमत्त्वही दिलखुलास आहे, याची उत्तरे 'हो' असतील, तर 'श्रावणक्वीन' स्पर्धा तुमच्यातल्या टॅलेंटला व्यासपीठ देण्यासाठी सज्ज आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून सिनेमा आणि फॅशन इंडस्ट्रीमध्ये नाव कमावलेले ग्लॅमरस चेहरे म्हणजे, पूजा सावंत, शिवानी रांगोळे, सागरिका रूकारी, पूर्वा शिंदे, विभावरी क्षीरसागर, श्रावणी पोमण, तन्वी माने, प्राची पिसाट, कुंजिका धोपाडे, आयुषी भावे... ही यादी न संपणारी असून, यामध्ये यावर्षी तुमचेही नाव झळकू शकते. त्यामुळे लगेचच 'श्रावणक्वीन'च्या प्राथमिक फेरीसाठी नावनोंदणी करा आणि तुमच्यातल्या कलाकाराची झलक आम्हाला दाखवा.

'महाराष्ट्र टाइम्स'च्या वतीने दरवर्षी 'श्रावणक्वीन' या पर्सनॅलिटी काँटेस्टचे आयोजन करण्यात येते. यामध्ये सौंदर्य आणि बुद्धिमत्ता यांची बरोबरीने कसोटी लागते. प्राथमिक फेरीसाठी नामवंत परीक्षक तुमच्यातल्या कलागुणांना ओळखून अंतिम फेरीसाठी निवड करतात. ही यशोगाथा येथेच थांबत नाही, तर अंतिम फेरीमधील विजेत्यांना महाअंतिम फेरीचीही पायरी चढण्याची संधी मिळते, अर्थात प्रसिद्ध ग्रुमिंग एक्सपर्टच्या मार्गदर्शनाखाली. त्यामुळे अभिनय, मॉडेलिंगमध्ये करिअर करण्याचे प्रयत्न असतील आणि त्याच्यासाठी योग्य व्यासपीठाची वाट पाहत असाल, तर 'महाराष्ट्र टाइम्स श्रावणक्वीन' स्पर्धेला पर्याय नाही. अभिनय आणि फॅशन रॅम्पवरही झळकण्यासाठी ही स्पर्धा आदर्श प्रवेशद्वार ठरत असल्याचे सिद्ध होते आहे. फक्त यासाठी तुमच्यामध्ये हवी योग्य प्रतिभा.

नाशिक शहर 'फॅशन हब' म्हणूनही पुढे येऊ लागले आहे. यामध्ये फॅशन डिझायनिंग महत्त्वाचे असले, तरी मॉडेलिंगशिवाय हे करिअर अपूर्ण आहे. या मॉडेलिंगला अभिनयाचे अंग असल्यास त्यातील करिअरमध्ये यश मिळण्याची शक्यता दुप्पट असते. फक्त मॉडेलिंगच नाही, तर सिनेमा, नाटक, मालिका, वेबसीरिज या माध्यमांतही उत्तम अभिनयाला पर्याय नाही. यासाठी श्रावणक्वीन स्पर्धा चांगले व्यासपीठ ठरल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे या स्पर्धेत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आधी प्राथमिक फेरीसाठी आजच नावनोंदणी करा. अधिक माहितीसाठी वाचत राहा, रोजचा 'महाराष्ट्र टाइम्स.'

....

स्पर्धेच्या नावनोंदणीसाठी

या स्पर्धेच्या नावनोंदणीसाठी mtshravanqueen.com या वेबसाइटवर लॉगइन करा. नावनोंदणीसाठी २९९ रुपयांचे प्रवेशशुल्क असून, त्यासोबत 'महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब'चे सदस्यत्त्व मोफत मिळणार आहे. या 'कल्चर क्लब'अंतर्गत आम्ही विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करीत असतो, त्यामुळे त्याचीही पर्वणी मिळेल.

...

स्पर्धेच्या अटी आणि नियम

- १८ ते २५ वयोगटांतील अविवाहीत तरुणींनाच नोंदणी करता येईल.

- नावनोंदणी करण्यापूर्वी वेबसाइटवरील नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचा.

- नोंदणी केलेल्यांपैकी निवडक स्पर्धकांना प्राथमिक फेरीसाठी बोलाविले जाईल. ही निवड आमचे ज्युरी सदस्य करणार आहेत.

- नावनोंदणी करताना मेकअप नसलेला किमान एक फोटो अपलोड करणे अपेक्षित आहे.

- नावनोंदणी शुल्क २९९ रुपये, सोबत 'कल्चर क्लब'चे वार्षिक सदस्यत्त्व मोफत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नवमाध्यम हाताळणीत जबाबदारीचे भान महत्त्वाचे

$
0
0

रविराज गंधे यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जागतिकीकरणानंतर माध्यमांची व्याप्ती वाढत गेली. भारतात २००० नंतर नवमाध्यमांचा वापर करणाऱ्यांची संख्या वाढत गेली. त्यामुळे सामान्य माणूस देखील माध्यमकर्मी झाला. पण त्यांनी नवमाध्यमे समजून घेतली पाहिजे. यात व्यक्त होताना जबाबदारीचे भान पाळणे आवश्‍यक आहे, याविषयीचे उद्‌बोधन 'माध्यमरंग' या पुस्तकात केले असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार रविराज गंधे यांनी व्यक्त केले.

औरंगाबादकर सभागृहात सावानाच्या पुस्तक मित्र मंडळातर्फे झालेल्या व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी गंधे यांनी 'माध्यमरंग'चे अंतरंग उलगडून दाखवले. माध्यमांविषयी लोकांना खूप आकर्षण आहे. नव्वदच्या दशकात टीव्ही, रेडिओ, वर्तमानपत्र, मासिके एवढ्यापुरतीच माध्यमांची व्याप्ती होती. पण १९९० नंतर अनेक वृत्तवाहिन्या सुरू झाल्या. नवनवीन वर्तमानपत्र येत गेली. मोठ्या प्रमाणावर भांडवलाची गुंतवणूक होऊ लागली. आयात-निर्यात वाढली. जगाची गरज प्रॉडक्‍ट होती. कंपन्यांना जाहिरातीसाठी माध्यमे हवी होती. एक काळपर्यंत मूल्य जपली जात होती, असे गंधे यांनी सांगितले. आता मीडियाला व्यापाराचे स्वरूप आले आहे. समाजाचे आणि माध्यमाचे 'तुझे माझे जमेना, तुझ्यावाचून करमेना' असे नाते आहे. फेसबुक, ट्विटर, व्हॉटस्‌अॅप यासारखी माध्यमे वाढत गेली. यावर जगभरातून मजकूर येऊन पडायला लागला. त्यातून एक चित्रविचित्र वळण यायला लागले. भविष्यात सोशल मीडियाचा प्रभाव खूप वाढणार आहे. माध्यमातून कसं व्यक्त होणार याचं लोकशिक्षण कोण देणार? आपण कोणता विषय पुढे पाठवतो आहे. विषय कसा असावा, त्याचा परिणाम काय होणार, याविषयीची मांडणी पुस्तकात केली आहे. तसेच माझ्या पत्रकारितेच्या जीवनातील अनुभव यात मांडले असल्याचे गंधे यांनी सांगितले.

सावानाचे अध्यक्ष विलास औरंगाबादकर, कार्याध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, प्रमुख सचिव धर्माजी बोडके, श्रीकांत बेणी, शंकर बर्वे, अॅड. भानुदास शौचे, देवदत्त जोशी, उदयकुमार मुंगी, सुभाष सबनीस, मधुकर झेंडे उपस्थित होते. श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक केले. सुभाष सबनीस यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फडके, बापट यांना ‘सावाना’त अभिवादन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्राला ज्यांच्या शब्दांनी वेड लावले ते सुधीर फडके व वसंत बापट यांना 'सावाना'च्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी नितीन वारे, डॉ. शंकर बोऱ्हाडे, किशोर पाठक, देवदत्त जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्राचार्य डॉ. वेदश्री थिगळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. 'सावाना'च्या वतीने अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांच्या हस्ते वारे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नितीन वारे म्हणाले, की पुण्याला गंधर्व संगीत महोत्सव होता. त्यावेळी कुमारजींच्या घरी होतो, त्यांच्या घरात दोन फोटो होते. वसंतराव आचरेकर व वसंत बापट. कुमार गंधर्व यांच्या घरी बापट यांचे जाणे-येणे होते. बाबुजींनी गीतरामायण हे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविले, आठ भाषांत गायले गेले ते मोठे प्रतिभावान होते. ५५ गाण्यांमध्ये वेगवेगळा राग होता, सावरकर सिनेमा बनविण्यासाठी बाबूजी कार्यक्रम करायचे, गाणे वाजवताना ठेका असायला हवा, त्यांची सर्व गाणी खूपच सुंदर गायली आहेत.

डॉ. शंकर बोऱ्हाडे म्हणाले की, माझी कविता सामान्यांपर्यंत पोहचेल, त्यावेळी मी कवी होईल, असे बापट यांनी असे सांगितले होते. एक गुराखी जिंकू किंवा मरू ही कविता म्हणत होता, तेव्हा त्यांना वाटले की आपण कवी झालो, त्यांनी भारतभ्रमण केलं, बापटांची अनेक गाणी आपल्या ओठांवर येतात. त्यांनी अनेक कविता लिहिल्या महाराष्ट्राचे शाहीर होते, मुख्यमंत्री मनोहर जोशी हे वसंत बापट यांचे विद्यार्थी होते. बाबूजींनी गीतरामायणाच्या निमित्ताने मोठा संस्कार दिला आहे.

किशोर पाठक यांनी वसंत बापट साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, अशी आठवण जागवली. देवदत्त जोशी यांनी आभार मानले. याप्रसंगी सावानाचे कार्याध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, प्रमुख सचिव डॉ. धर्माजी बोडके, सहाय्यक सचिव अॅड. अभिजित बगदे, उदयकुमार मुंगी, श्रीकांत बेणी, अॅड. भानुदास शौचे, बी. जी. वाघ आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘केबीसी’च्या लॉटरीवाला गजाआड

$
0
0

महिलेला आमिष दाखवून उकळले पावणेतीन लाख

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'कौन बनेगा करोडपती' या मालिकेच्या प्रश्नमंजुषेत २५ लाखांची लॉटरी लागल्याची बतावणी करीत महिलेकडून पावणेतीन लाख रुपये उकळणाऱ्या भामट्यास सायबर पोलिसांनी शिताफीने अटक केली. विशेष म्हणजे मूळ कोल्हापूरचा असलेला संशयित आरोपी पुणे येथून हा उद्योग करीत होता.

ऋषिकेश अभिजीत मोरे (२२, मूळ रा. लक्ष्मीगल्ली, साळगाव, ता. आजरा, जि. कोल्हापूर, सध्या रा. हमराज चौक, कोथरूड, पुणे) असे सायबर पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. ऑनलाईन प्रमोशन करण्याचा व्यवसाय असलेल्या मोरेने ऑनलाईन फसवणुकीचा उद्योग केल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

सायबर चोरट्याने गंगापूररोड भागातील एका महिलेला तब्बल पावणेतीन लाख रुपयांचा चुना लावला होता. आरोपीने ७ जुलै रोजी महिलेशी मोबाइलवर संपर्क साधला. वेगवेगळ्या नंबरवरून संपर्क करीत संशयितांनी अभिनंदन करीत आपणास 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमातून २५ लाखांची लॉटरी लागल्याचे आमिष दाखविले. रोकड तुमच्या अकाऊंटवर पाठविण्यासाठी सर्व्हिस टॅक्स आणि बँकेची प्रोसेसिंग फी भरावी लागेल. त्यासाठी व्हॉट्सअॅपवर पाठविलेल्या आयसीआयसीआय बँक खात्यावर दोन लाख ८६ हजार ५०० रुपये तत्काळ भरा, असा सल्ला ऑनलाईन आरोपीने दिला होता. महिलेने विश्वास ठेवून सदरची रक्कम बँक खात्यात भरली. पैसे खात्यात जमा होताच आरोपींनी महिलेशी संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याची कल्पना येताच पीडितेने सायबर पोलिस ठाणे गाठून फिर्याद सांगितली.

वरिष्ठ निरीक्षक देवराज बोरसे यांनी या घटनेचा तपास हाती घेतला. पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, उपायुक्त पौर्णिमा चौगुले, एसीपी आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय बोरसे, पीएसआय दानिश मन्सुरी, हवालदार किरण जाधव, पोलिस नाईक राहुल जगझाप, पोलिस शिपाई भूषण देशमुख, मंगेश काकुळदे आदींनी महिलेने जमा केलेले पैसे कोणत्या खात्यात वर्ग झाले हे तपासले. त्यात वेगवेगळ्या खात्यांमधून हे पैसे कोल्हापूर येथील संशयित आरोपीपर्यंत पोहचल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी कोल्हापूर गाठून २६ जुलै रोजी आरोपीस पकडले. यापूर्वी असे फसवणुकीचे उद्योग मुंबई किंवा उत्तर भारतातील राज्यांमधून होत असल्याचे समोर येत होते. या प्रकरणी प्रथमच कोल्हापूर येथील संशयित समोर आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्येही पालघर पॅटर्न?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप-शिवसेना युतीने दुसऱ्यांदा सत्तेवर येण्यासाठी सर्व प्रकारचे फॉर्म्युले अवलंबण्यास सुरुवात केली आहे.ज्या ठिकाणी भाजप किंवा शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये निवडून येण्याची क्षमता नाही अशा ठिकाणी राष्ट्रवादी किंवा काँग्रेसकडून उमेदवार आयात करण्यासह ज्या मतदारसंघांमध्ये शिवसेना-भाजपमध्ये वाद आहेत, त्या ठिकाणी आपल्याच उमेदवारांची अदलाबदल करणारा 'पालघर पॅटर्न' विधानसभेलाही अवलंबला जाणार असल्याची चर्चा आहे.

नाशिक जिल्ह्यात विशेषत: नाशिक पश्चिम आणि इगतपुरी मतदारसंघात हा पॅटर्न राबविला जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राज्यात सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'मेगा भरती' सुरू आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीतल्या नाराजांना हेरून त्यांना भाजप आणि शिवसेनेत समाविष्ट करून घेत उमेदवारी देण्याचा फॉर्म्युला सध्या जोरात आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे विद्यमान अनेक आमदार हे दोन्ही पक्षांत प्रवेश करीत आहेत, तर दुसरीकडे मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होणार यावरून युतीमध्ये तणाव निर्माण झाला आहे. एकीकडे दोन्ही पक्षांत मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेला वाद आणि दुसरीकडे भाजप-शिवसेनेत होत असलेल्या 'मेगा भरती'मुळे भाजप-शिवसेना स्वतंत्र निवडणूक लढवणार अशीही चर्चा रंगली आहे. परंतु, दोन्ही पक्षांचे नेते मात्र युती होणारच असाही दावा करीत आहेत. भाजप आणि शिवसेनेने ज्या ठिकाणी आपल्याकडे सक्षम उमेदवार नाहीत अशा ठिकाणी काँग्रेस,राष्ट्रवादीत फोडाफाड सुरू केली आहे. ज्या जागांवर दोन्ही पक्षांमध्ये वाद आहेत त्या ठिकाणी मात्र मार्ग काढण्यासाठी पालघर पॅटर्न राबविला जाणार आहे. नाशिकमध्ये इगतपुरी हा मतदारसंघ भाजपला हवा आहे, तर नाशिक पश्चिम मतदारसंघावर शिवसेनेने दावा ठोकला आहे. युतीच्या जागावाटपानुसार इगतपुरी हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आहे. या ठिकाणी शिवसेनेकडे इच्छुक उमेदवाराची संख्या अधिक असली, तरी त्यांची निवडून येण्याची क्षमता नाही. भाजपकडेही या ठिकाणी सक्षम उमेदवार नाही. परंतु, या मतदारसंघातही भाजपकडून फोडाफोडीचे राजकारण केले जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी भाजपचे लक्ष काँग्रेसच्या विद्यमान आमदार निर्मला गावित यांच्याकडे आहे. गावित यांनी आपण कुठेही जाणार नसल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. परंतु, तरीही भाजपकडून या मतदारसंघावर दावा सांगितला जात असल्याने अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरे या आमदार आहेत. परंतु, हा मतदारसंघ शिवसेनेला हवा आहे. शिवसेनेकडून या मतदारसंघात इच्छुकांची संख्या मोठी आहे. परंतु, विद्यमान आमदार भाजपचा असल्याने भाजपकडून हा मतदारसंघ सोडला जाण्याची शक्यता कमीच आहे. अशा परिस्थितीत पालघर पॅटर्नचा अवलंब करून भाजपचा उमेदवार शिवसेनेत पाठवून त्यांना उभे करण्याचा फॉर्म्युला अवलंबला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन मतदारसंघांमधील संभाव्य अदलाबदलीची चर्चा सध्या जिल्ह्यात रंगत आहे.

--

इगतपुरी टाळले, पश्चिमला हजेरी

युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी नुकतीच नाशिकमध्ये जनआशीर्वाद यात्रा काढली.ज्या ठिकाणी शिवेसना निवडणुका लढवणार त्याच ठिकाणी हा यात्रेचा मार्ग निवडण्यात आला होता. आदित्य ठाकरेंनी त्र्यंबकेश्वरमध्ये हजेरी लावून इगतपुरी मतदारसंघाला स्पर्श केला असला, तरी मोठा भाग असलेल्या इगतपुरीकडे जाणे मात्र टाळले. नाशिक पश्चिम या मतदारसंघात भाजपचा आमदार असतानाही या ठिकाणी सभा घेऊन शक्तिप्रदर्शन केले. त्यामुळे आदित्य ठाकरेंचे इगतपुरी मतदारसंघाकडील दुर्लक्ष आणि नाशिक पश्चिमध्ये केलेल्या शक्तिप्रदर्शनामुळे शिवसैनिकांमध्येही चर्चा झडत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एनडीआरएफ’ उद्यापासून नाशकात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पावसामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) च्या पथकाला नाशिकमध्ये पाचारण केले आहे. गुरुवारी, १ ऑगस्टला हे पथक जिल्ह्यात दाखल होणार असून, पूरजन्य परिस्थितीत नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असणार आहे.

शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार पाऊस आणि धरणांमधून सोडण्यात येणारे पाणी यामुळे शहरासह निफाड तालुक्यातील चांदोरी, सायखेडा येथे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीकाठच्या गावांना दरवर्षी पुराच्या पाण्याचा वेढा पडत असल्याने तेथील रहिवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीक उपाययोजना कराव्या लागतात. यंदाही ऐनवेळी मदतीची आवश्यकता भासल्यास ती तातडीने उपलब्ध व्हावी, याकरिता एनडीआरएफच्या पथकाला नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने पाचारण केले आहे. त्यानुसार १ ऑगस्ट रोजी पुणे येथून हे ४० जणांचे पथक नाशिकमध्ये दाखल होत असून, ते जिल्ह्यातच १५ दिवस तळ ठोकणार आहे. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली, तर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी या पथकाची मदत घेता येणार आहे.

...

आपत्ती व्यवस्थापनाबाबत करणार जनजगृती

पूरजन्य परिस्थिती हाताळण्याची आवश्यकता न भासल्यास हे पथक जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये जाऊन आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृती करणार आहे. कळवण, दिंडोरी, सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, नाशिक आणि निफाड तालुक्यात हे पथक पूर, यात्रा उत्सव, भूकंप आपत्ती व्यवस्थापनाबाबत रहिवाशांना मार्गदर्शन करणार आहे.

...

कोणतीही आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवलीच तर नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्काळ मदत उपलब्ध व्हावी, याकरिता एनडीआरएफला पाचारण केले आहे. तसेच जिल्ह्याच्या विविध भागांत जाऊन आपत्ती व्यवस्थापनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करेल.

- प्रशांत वाघमारे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुराच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिकांचे स्थलांतर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरीला पाणी सोडले असून, आणखी पावसाची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर रामसेतू, कापड बाजार, भांडी बाजार, सराफ बाजारातील व्यावसायिकांनी आपल्या दुकानातील माल स्थलांतरीत करण्यास सुरुवात केली आहे.

गंगापूर धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने नदीलगतच्या रहिवाशांना व व्यावसायिकांनी स्थलांतरीत होण्याचा जिल्हा प्रशासनाने इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर रामसेतूवर असलेल्या व्यावसायिकांनी आपल्या टपऱ्या काढून घेण्यास सुरुवात केली आहे. येत्या दोन दिवसात जास्त पाऊस वाढण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली असल्याने नारोशंकर मंदिरालगत असलेल्या टपऱ्या काढून घेतल्या आहेत. त्याचप्रमाणे बालाजी मंदिरालगत असलेली देवतांच्या मूर्तीची व कुंकवाची दुकाने स्थलांतरीत झाली आहेत. सरस्वती नाल्याजवळ असलेली पूजा साहित्याची दुकाने हटविण्यात आली आहेत. या भागातून काढण्यात आलेली दुकाने कापड बाजारात हलवली आहेत. बालाजी मंदिराखालील दुकानदारांनी आपल्या दुकानातील माल टेम्पोत भरून सुरक्षित स्थळी रवाना केला आहे.

...

सराफ बाजारातही दक्षता

जास्त पाऊस झाल्यास सराफ बाजारातही पाणी येते. सन २००८ मध्ये झालेल्या पावसाने अनेक सराफ व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी शासनाकडून कोणतीच नुकसानभरपाई मिळाली नाही. त्यामुळे अनेक व्यावसायिकांनी आतापासून दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी आपल्याकडील माल सुरक्षित स्थळी हलवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी डॉक्टर आज संपावर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारने मांडलेले आणि लोकसभेत संमत झालेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकास इंडियन मेडिकल असोसिएशनचा (आयएमए) ठाम विरोध आहे. केंद्र सरकार मात्र आपले धोरण पुढे राबवत असून, याविरोधात आयएमएतील सर्व खासगी डॉक्टर बुधवारी (दि. ३१) संपावर आसणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सकाळी सहा ते सायंकाळी सहा या वेळेत डॉक्टर रुग्णांना तपासणार नाहीत.

नव्या विधेयकानुसार भारतीय वैद्यक परिषदेचे प्रातिनिधिक अस्तित्व संपुष्टात येणार आहे. नव्या आयोगात शासननियुक्त प्रतिनिधींची वर्णी लागणार आहे. फक्त पाच राज्यांना एकावेळी प्रतिनिधित्व मिळेल. यामुळे इतर राज्ये, विद्यापीठे आणि वैद्यकीय व्यावसायिक यांना अजिबात थारा मिळणार नाही. सध्या १३४ सदस्य असलेल्या परिषदेचे कार्य अवघ्या २५ जणांकडे सोपविण्यात आले आहे. राज्यस्तरीय परिषदांची स्वायत्तता गेल्याने संघराज्यीय तत्त्वाला हरताळ फासला जाईल. खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील फक्त पन्नास टक्के जागांचे शुल्क नियमन सरकार करणार असल्याने वैद्यकीय शिक्षण ही फक्त धनदांडग्यांची मक्तेदारी होईल. आयुर्वेद, युनानी, होमिओ अशा इतर उपचार पद्धतीच्या पदवीधारकांना, एवढेच नव्हे तर, आरोग्य व्यवस्थेशी संबंधित कोणासही म्हणजे नर्सेस, टेक्निशियन किंवा सहाय्यक यांना जुजबी प्रशिक्षण देऊन आधुनिक वैद्यक शास्त्राचे उपचार करण्याची मुभा देणे हे अशास्त्रीय असल्याचा गंभीर आरोपसुद्धा आयएमएकडून करण्यात येत आहे. कुठल्याही पूर्वपरवानगीविना वैद्यकीय महाविद्यालय काढणे, पदवी आणि पदव्युत्तरच्या जागा वाढवणे, हे या प्रस्तावित कायद्याने शक्य होईल. तसेच काही त्रुटी असल्यास पाच ते शंभर कोटी रूपये दंडाची तरतूद आहे. म्हणजेच भ्रष्टाचाराला भरपूर वाव आहे. याशिवाय इतरही अनेक गंभीर आरोप 'आयएमए'ने केले आहेत. हे विधयक संमत करू नये म्हणून आयएमए देशव्यापी आंदोलन करीत आहे. याच पार्श्वभूमीवर ३१ जुलै रोजी भारतात सर्व सदस्य डॉक्टरांचे दवाखाने बंद राहतील. बुधवार सकाळी सहा ते गुरुवार सकाळी सहा वाजेपर्यत फक्त अत्यवस्थ रुग्णच तपासले जातील. इतर सर्व सेवा बंद राहतील. तसेच देशभर निदर्शने आणि उपोषण केले जातील अशी माहिती नाशिक 'आयएमए'चे अध्यक्ष डॉ. प्रशांत देवरे, उपाध्यक्ष डॉ. हेमंत सोनानीस, सचिव डॉ. विशाल गुंजाळ खजिनदार डॉ. किरण शिंदे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. राजेंद्र कुलकर्णी यांनी दिली. रुग्णाच्या होणाऱ्या गैरसोयी बद्दल दिलगीर आहोत, पण हे आंदोलन समाजाच्या दीर्घकालीन आरोग्य अबाधित राखण्यासाठी संप महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुलाबी गणवेशावर फुली

$
0
0

आरोपांनी व्यथित सभापतींकडून रंग बदलाचा निर्णय मागे

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विशिष्ट ठेकेदाराकडून खरेदी वादात सापडल्यानंतर शिक्षण सभापती प्रा. सरिता नरके आणि उपसभापती प्रतिभा सोनवणे यांनी गुलाबी गणवेशावर आता फुली मारली आहे. या खरेदीत प्रतिमा मलिन होत असल्याचे सांगत त्यांनी खरेदीसाठी लॉबिंग करणाऱ्या ठेकेदारालाच दणका दिला. तसेच गणवेश खरेदीचा निर्णय आता पूर्णत: शालेय व्यवस्थापन समित्यांनीच घ्यावे. गुलाबी वगळता अन्य कोणत्याही रंगाचा गणवेश खरेदी करावा. मात्र, शालेय व्यवस्थापन समित्या खरेदी झालेल्या गणवेशाचा दर्जा गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून तपासून घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरवर्षाप्रमाणे महापालिकेची गणवेश खरेदीही यंदा वादात सापडली आहे. गेल्यावर्षी गणवेश खरेदीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दोनशे रुपयात दोन गणवेश पुरवठा करून देतो, असा दावा काही ठेकेदारांकडून केला गेल्याने महापालिकेची ही गणवेश खरेदी वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश महासभेने दिले होते. मात्र, नंतर हे प्रकरण दडपले गेले. यंदाही महापालिकेच्या ९० प्राथमिक तर १० माध्यमिक शाळांमधील २९ हजार विद्यार्थ्यांसाठी गणवेश खरेदीची घाई सुरू झाली. त्यासाठी प्रति गणवेश ६०० रुपये याप्रमाणे शालेय व्यवस्थापन समितीकडे पैसे वर्ग करण्याची तयारी सुरू झाली आहे. या गणवेश खरेदीवर तब्बल पावणेदोन कोटींचा खर्च केला जाणार असल्याने या खरेदीसाठी मुंबईतल्या मक्तेदारांनी घिरट्या मारण्यास सुरुवात केली होती. यंदा रंग बदलून गुलाबी गणवेश विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय शिक्षण सभापती सोनवणे, उपसभापती पवार व शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांनी घेतला होता. या पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या शाळांमधील केंद्रप्रमुखांची बैठक घेत शालेय व्यवस्थापन समित्यांमार्फत गुलाबी गणवेश खरेदी करण्याचे निर्देश दिले.

म्हणून फिरविला निर्णय

विशिष्ट ठेकेदारामार्फत गणवेश खरेदीसाठी ही बैठक घेऊन शालेय व्यवस्थापन समित्यांवर दबाव आणला जात असून आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले होते. त्यामुळे सभापती आणि उपसभापतींनी आपल्यावर वाद ओढावू नये, यासाठी थेट गणवेशाचा रंग बदलण्याचा निर्णय घेतला. गुलाबी गणवेश घेऊ नयेत, असे आदेश त्यांनी दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वरुणराजा मेहरबान;धरणांची भागली तहान

$
0
0

- ४८ तासांत धरणांत ५,६२८ मिलीमीटर पाणीसाठा

- २४ पैकी १९ धरणांतील जलसाठ्यात लक्षणीय वाढ

- नाशिक शहरात सायंकाळपर्यंत ५१ मि.मी. पाऊस

- सोमेश्वर येथे सेल्फीबाबत जनजागृती

- नांदूरमध्यमेश्वरमध्ये अतिउत्साहींवर कारवाईच्या सूचना

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हाभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गेल्या ४८ तासांत धरणांमधील एकूण पाणीसाठ्यात ५ हजार ६२८ दशलक्ष घनफुटाने वाढ झाली आहे. हा पाऊस धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा वाढविण्यास मदतगार ठरला असून, दोन दिवसांत एकूण उपयुक्त पाणीसाठा आठ टक्क्यांनी वाढून ४५ टक्क्यांवर पोहोचला आहे. भावली पाठोपाठ आळंदी, वालदेवी ही धरणेही १०० टक्के भरली आहेत.

पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यात सात धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्याचे काम पाटबंधारे विभागाकडून सुरू आहे. तरीही २४ पैकी १९ धरणांकरिता हा पाऊस वरदान ठरला आहे. गंगापूरसह पालखेड धरण समूहामधील धरणांना या पावसामुळे अधिक लाभ झाला असला तरी गिरणा धरण समूहामधील गिरणा, माणिकपुंज, नागासाक्या या धरणांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. या पावसामुळे गंगापूर धरण समूहातील पाणीसाठा किमान १० ते ३४ टक्क्यांनी वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी ६६ टक्के पाणी असलेल्या आळंदी धरणातील पाणीसाठा ३४ टक्क्यांनी वाढून १०० टक्क्यांवर पोहोचला आहे.

-

धरणांमधील पाणी साठ्यात झालेली वाढ (टक्क्यांमध्ये)

धरण पाणीसाठा (२८ जुलै) पाणीसाठा (३० जुलै)

गंगापूर ७४ ८४

कश्यपी ४८ ५८

गौतमी गोदावरी ५८ ७२

आळंदी ६६ १००

पालखेड ५३ ७०

करंजवण १६ ३४

वाघाड ३२ ५८

ओझरखेड ०४ ०९

पुणेगाव ०० ३६

तिसगाव ०० ००

दारणा ८७ ८७

भावली १०० १००

मुकणे ३८ ४७

वालदेवी ८२ १००

कडवा ८९ ८९

भोजापूर १२ ४८

चणकापूर १८ ४८

हरणबारी १३ ४६

केळझर ०१ २२

नागासाक्या ०० ००

गिरणा ०८ ०८

पुनद २५ ५१

माणिकपुंज ०० ००

एकूण ३७ ४५

-

नांदूरमध्यमेश्वर येथून ५८ हजार क्युसेकने विसर्ग

मंगळवारी दिवसभर गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होता. सकाळी आठ वाजता ७ हजार ८३३ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत होते. आळंदी धरणातूनही २३३ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. पालखेडमधून सकाळी ६०७ क्युसेकने पाणी सोडण्यात आले. दुपारी तीनपर्यंत हाच विसर्ग २ हजार ८१० क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला. इगतपुरी तालुक्यात पावसाचा जोर अधिक असल्याने सकाळपासून सायंकाळपर्यंत १३ हजार ५८ क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. भावली धरणातूनही सायंकाळी ९४८ क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. नांदूरमध्यमेश्वर येथून दिवसभरात ५८ हजार क्युसेक वेगाने पाणी जायकवाडीच्या दिशेने वाहून गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गटारीच्या दिवशी लिव्हर तपासणी!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

श्रावणाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. ३१) दीप अमावस्था अर्थातच गटारीचा आनंद घेण्याची व्यूहरचना करण्याच्या तयारीत असलेल्या महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय विभागाने लिव्हर तपासणीचे शिबिर हाती घेऊन धक्का दिला आहे.

खासगी संस्था, हॉस्पिटल महापालिकेच्या वैद्यकीय विभाग यांच्यातर्फे महापालिकेत सकाळी लिव्हर तपासणीचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे या शिबिराची अधिकाऱ्यामध्ये खमंग चर्चा सुरू झाली. लिव्हर चांगले असल्याचा रिपोर्ट सकाळी आला की सायंकाळी गटारी जल्लोषात साजरा करण्याचा बेतही दुसरीकडे आखला जात आहे. श्रावण महिना गुरुवार, एक ऑगस्टपासून सुरू होत आहे. या महिन्यात मद्य तसेच मासांहार वर्ज्य समजला जातो. त्यामुळे या दोन्ही गोष्टींना तिलांजली देण्यापूर्वी एक दिवस अगोदर गटारी अमावस्या साजरी केली जाते. त्याचे नियोजन महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून सुरू असतांनाच, दुसरीकडे महापालिकेने या दीप अमावस्येचाच्य दिवशी रोटरी क्लब, फोर्टिस हॉस्पिटलच्या मदतीने लिव्हर तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. तज्ज्ञ डॉक्टराच्या मदतीने ही तपासणी केली जाते. परंतु, या तपासणीच्या टायमिंगवरून अधिकाऱ्यांमध्ये वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. तपासणीत लिव्हरमध्ये काही गडबड निघाल्यास सायंकाळच्या आनंदावर विरजन पडेल, अशी भीती अधिकाऱ्यांमध्ये आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाकाबंदीतच तळीरामांची तपासणी

$
0
0

शहर पोलिसांकडून आज सायंकाळपासून व्यवस्था

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आषाढ अमावस्येनिमित्त मद्य आणि मासांहारावर ताव मारणाऱ्यांवर पोलिसांनी लक्ष करण्यासाठी बंदोबस्ताचे नियोजन आखले आहे. शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी बुधवारी (दि. ३१) सांयकाळनंतर नाकाबंदी पॉईंटस् लावण्यात येणार असून मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. याशिवाय अंडाभुर्जी, चायनिज स्टॉल यांना वेळेचे बंधन घालून देण्यात येणार आहे.

आषाढ महिन्यातील अमावस्येचे धार्मिक दृष्टीकोनातून वेगळे महत्त्व असते. मात्र, अमावस्येनंतर सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यात मासांहार आणि मद्यपान वर्ज्य केले जाते. या काळात शक्यतो तामसी आहार नाकारला जातो. मात्र, श्रावण सुरू होणार म्हणून आषाढ अमावस्येला अथवा त्याच्या एक दिवस अगोदरच मद्य व मांसाहारावर मोठ्या प्रमाणावर ताव मारला जातो. रात्री उशिरापर्यंत पार्ट्या रंगतात. मद्यपी वाहनचालकांकडून अपघात होण्याचा धोका तर असतोच पण हाणामाऱ्या, भांडणे सुद्धा होतात. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन आखले आहे. शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी पॉईंट्स लावण्यात येणार असून, रात्रीच्यावेळी चायनीज स्टॉल्स, अंडाभुर्जी सेंटर आदी ठिकाणी तपासणी करण्यात येणार आहे.

थेट कोर्टात रवानगी

सध्या पावसाचे दिवस असून, रस्ते गुळगुळीत झाले आहे. त्यात मद्यप्राशन करून वाहने चालविल्यास अपघातांना निमंत्रण मिळू शकते. या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात येणाऱ्या नाकाबंदी दरम्यान वाहनचालकांची तपासणी केली जाणार आहे. मद्यपी वाहनचालकांना थेट कोर्टात पाठविण्यात येणार आहे. चालू वर्षात तीनशेहून अधिक मद्यपी चालकांवर कारवाई झाली असून, नव्याने मिळालेल्या ५० ब्रेथ अॅनालायझरमुळे अधिकाधिक तळीरामांना कायद्याच्या कक्षेत आणणे पोलिसांना शक्य होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंगावर कपाट पडून विद्यार्थ्याचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर रोडवरील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या मराठा हायस्कूलमध्ये अंगावर कपाट पडून विद्यार्थ्याचा मृत्यू ओढावल्याची दुर्दैवी घटना घडली. जयेश सखाराम अवतार (१२) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

जयेश अवतार सातवीत शिक्षण घेत होता. दुपारी तीन वाजेच्या सुमारास बाहेर पाऊस सुरू असल्याने विद्यार्थी वर्गातील कपाटाभोवती खेळत होते. या वेळी जयेशच्या अंगावर गोदरेजचे लोखंडी कपाट पडले. मोठा आवाज झाल्याने विद्यार्थी घाबरून सैरावैरा पळू लागले. शिक्षकांनीही त्वरित धाव घेत विद्यार्थ्याला उपचारांसाठी दवाखान्यात दाखल केले. पण त्याचे प्राण वाचू शकले नाहीत. सरकारवाडा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील रोहकले यांनी दिली. जयेश हा पंचवटी परिसरातील मखमलाबाद रोडवरील क्रांतिनगर येथील वैभवलक्ष्मी अपार्टमेंटमधील रहिवासी आहे. शाळेच्या हलगर्जीपणामुळे या दुर्दैवी प्रसंगाला सामोरे जावे लागल्याचा आरोप जयेशच्या कुटुंबीयांनी केला. वर्गखोलीत कपाटासारख्या अवजड वस्तू शालेय प्रशासनाने ठेवल्याच कशा, असा सवालही जयेशचे पालक आणि संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे.

\Bनवा गणवेश ठरला अखेरचाच \B

जयेशच्या वडिलांचे मेनरोड परिसरात ऑप्टिकलचे दुकान असून, त्यांना गिरीश आणि जयेश अशी दोन मुले होती. गिरीश हा बिटको महाविद्यालयात शिक्षण घेतो आहे, तर जयेशने पाचवीपर्यंत रमाबाई आंबेडकर शाळेत शिक्षण घेतल्यानंतर सहावीला मराठा हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला होता. यंदाच्या शैक्षणिक वर्षात मविप्रच्या शाळांचा गणवेश बदलल्याने दोनच दिवसांपूर्वी जयेशसाठी पालकांनी नवीन गणवेश खरेदी केला होता. हा गणवेश घालून शाळेत जाण्याचा जयेशचा मंगळवारी पहिलाच दिवस होता. मात्र, नव्या गणवेशाचा हा दिवस अखेरचाच ठरला. शाळेतही हुशार म्हणून जयेश परिचित होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आइस्क्रीम उद्योग; आज विचारमंथन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इंडियन आइस्क्रीम मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनची बैठक बुधवारी (दि. ३१) नाशिकमध्ये घेण्यात येणार आहे. यात असोसिएशनचे अध्यक्ष राजेश गांधी, सचिव अशिष नहार यांच्यासह देशातील नामांकित आइस्क्रीम बँडचे संचालक आणि प्रतिनिधी उपस्थित असणार आहेत.

बैठकीत प्रामुख्याने भारतात आइस्क्रीम कंपन्यांना येणाऱ्या अडचणींवर चर्चा केली जाईल. या समस्यांवरील उपायांवरही विचारमंथन केले जाणार आहे. तसेच या क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक वाढवून भारतीय आइस्क्रीम ब्रँड परदेशात विक्री आणि तेथे गुंतवणूक वाढण्यासाठी काय करायला हवे, यावर सर्वांचे मत जाणून घेतले जाणार असल्याची माहिती असोसिएशनतर्फे देण्यात आली आहे. या बैठकीत नाशिकच्या आइस्क्रीम उद्योजक, विक्रेत्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भारतात डेअरी आणि आइस्क्रीम उद्योगांची संख्या वाढवून परदेशात मोठ्या प्रमाणात विक्री करण्याचे उद्दिष्ट्य समोर ठेवत परदेशातील गुंतवणुकीवर भर देणे, डेअरी व आइस्क्रीम उद्योगांचे स्टार्टअप करू इच्छिणाऱ्यांना प्रोत्साहित करणे, या उद्योगात सध्या जाणवणाऱ्या समस्या, जीएसटी दर कमी करणे, विविध शासकीय नियम व अटी या सर्व विषयांवर आइस्क्रीम उद्योजक विचारमंथन करणार आहेत. यासाठी नाशिकमध्ये उद्योजकांची बैठक होत आहे.

लघु उद्योगांना प्रोत्साहन

लघु आइस्क्रीम उद्योजकांना असोसिएशनचे सदस्य करून घेण्यासह या उद्योगांना गुंतवणुकीच्या संधी व व्यवसायाच्या संधी देण्यावर असोसिएशन भर देणार आहे. लघु उद्योगांमध्ये येणाऱ्या समस्यांचे निवारण केले जाणार असून लघु उद्योगांना प्रोत्साहन देत भारतातील आइस्क्रीम उद्योजकता वाढविण्याचा मानस असोसिएशने ठेवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुकणेच्या २५ कोटींच्या देयकाला विरोध

$
0
0

दिनकर पाटील यांचा आंदोलनाचा इशारा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुकणे धरण थेट पाणीपुरवठा योजनेच्या देयकातून वजावट करण्यात आलेले २५ कोटी रुपये महापालिकेतील काही पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने काढण्याचा ठेकेदार कंपनीचा डाव उघड झाल्यानंतर पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या या प्रयत्नांना विरोध वाढू लागला आहे. माजी सभागृहनेते दिनकर पाटील यांनी आयुक्त राधाकृष्ण गमे यांना निवेदन देत सदरची रक्कम अदा करण्यास तीव्र विरोध केला आहे. अशी रक्कम काढल्यास २१ कोटींच्या प्रकरणाची आठवण त्यांनी प्रशासनाला करून देत, तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

'जेएनएमएमयूआरएम'अंतर्गत शहराचा २०४१ पर्यंत पाणीप्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेने मुकणे धरण थेट पाणीपुरवठा योजनेची अंमलबजावणी केली. यात मुकणे धरण ते विल्होळी नाक्यापर्यंत १८ किलोमीटरची १८०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकणे, विल्होळी नाका येथे ४०० दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राची निर्मिती, मुकणे धरणात कॉपर डॅम व इलेक्ट्रिकल कामे आदी कामांसाठी २६६ कोटी रुपयांचा करार करण्यात आला होता. यासाठी महापालिकेने संबंधित ठेकेदार कंपनीसमवेत करार केला. त्यानुसार अंतिम देयक देताना बांधकाम साहित्याचे जे दर असतील त्यानुसार मोबदला दिला जाणार होता.

दरम्यानच्या काळात सिमेंट, इंधन, स्टीलसह इंधनाच्या दरात कपात झाल्याने आतापर्यंत देयकाच्या रकमेतून २५ कोटींची वजावट केली गेली आहे. परंतु, सदरची वजावट झालेली २५ कोटींची रक्कम पदरात पाडून घेण्यासाठी कंपनीने महापालिकेतील काही पदाधिकारी तसेच अधिकाऱ्यांना हाताशी धरले. त्यानुसार ही प्रक्रिया सुरू झाली असतांना, माध्यमांमध्ये हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे त्याला तुर्तास ब्रेक दिला असला तरी, हा निधी काढण्याच्या हालचाली पुन्हा सुरू आहेत. त्यामुळे दिनकर पाटील यांनी मंगळवारी आयुक्तांना पत्र देत, सदरची रक्कम देण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘शिक्षकांनीच स्वमूल्य घसरवलं’

$
0
0

यजुर्वेंद्र महाजन यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रत्येक पालकाला आपल्या मुलाला चांगले शिक्षण, शिक्षक मिळावे, असे वाटत असले तरी या क्षेत्रात येऊन शिक्षक होण्याची मानसिकता लोप पावत आहे. शिक्षकही आपल्या कामाला दूषणं देतात. स्वत:च्या पाल्याला शिक्षक होऊ नको, असा सल्ला देतात. हे गंभीर असून यातूनच शिक्षकांनी आपला सन्मान, मूल्य घसरवल्याचे प्रतिपादन दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन यांनी केले.

गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित एसकेडी चॅरिटेबल ट्रस्ट प्रस्तुत साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा प. सा. नाट्यगृहात मंगळवारी झाला. यावेळी महाजन 'शिक्षक कधीच सामान्य नसतो' या विषयावर बोलत होते. कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार, एसकेडी चॅरिटेबल ट्रस्टचे संजय देवरे यांची उपस्थिती होती. महाजन म्हणाले, की जो शिक्षक आपल्या मुलांप्रमाणेच काळजी शाळेतल्या मुलांची करतो, तोच चांगले विद्यार्थी घडवू शकतो. इंजिनीअर, डॉक्टर कोणत्याही क्षेत्रातील व्यक्ती असो त्यांना आपल्या पाल्याला चांगले शिक्षक मिळावे, याचा शोध ते घेत असतात. त्यासाठी पाहिजे तितका खर्च करायलाही ते तयार असतात. पण ते कधीही हा विचार करत नाही की, आपल्या पाल्याला शिक्षक करून इतरांना घडवावे. या देशाचे वर्तमान, भविष्य उज्ज्वल करायचे सामर्थ्य कोणात असेल तर ते केवळ शिक्षकांमध्येच आहे. पण त्यांच्याकडेच सध्या दुर्लक्ष झाले आहे. शिक्षकांनी आपल्या कामाला विशिष्ट उंची प्राप्त करून दिली पाहिजे. स्वत:चं मूल्य, प्रतिष्ठा जपली पाहिजे.

'शिक्षणातून सामाजित परिवर्तन' या विषयावर बोलताना ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे म्हणाले, की शिक्षक नावाची संस्था १९८५ पासून चक्रव्यूहात सापडली आहे. शिक्षणाचा विचार करणारी यंत्रणाच नसल्याने ती मोठ्या अडचणीत आहे. शिक्षकांचे तंत्रज्ञान, क्लासेस, गाईड, नोट्स असे अनेक शत्रू निर्माण झाले पण, शिक्षकांना समजलेही नाही. आज पटसंख्येसाठी शिक्षकांवर विद्यार्थी शोधत फिरण्याची वेळ आली असून, हे क्षेत्र सध्या बेजबाबदारपणे सुरू आहे. सरकार, पालक, विद्यार्थी, शिक्षक कोणीही याची जबाबदारी घ्यायला तयार नाही. शिक्षण, साक्षरता म्हणजे नेमके काय, याचा विचार करण्याची गरज आहे. तो विचार होत नसल्याने आज शिक्षण व्यवस्था धोक्यात आली आहे, त्यामुळे शिक्षकही धोक्यात आले आहे.

कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या ४० शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार, कोचिंग क्लासेसच्या ५२ शिक्षकांना तसेच ५० गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. सुरेश पवार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी 'बे दुणे चार' या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरगाणा, पेठमध्येही अतिवृष्टी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरीत धुवाधार बॅटिंग करणाऱ्या पावसाने आपला मोर्चा पेठ आणि सुरगाण्याकडे वळविला असून, या तालुक्यांमध्येही मंगळवारी अतिवृष्टी झाली. सुरगाण्यात २४ तासांत १४५ मि.मी., तर पेठमध्ये ११० मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात मंगळवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांत ६५६ मि.मी. पाऊस झाला असून, या हंगामात ९ हजार ९९० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या तालुक्यांत गेल्या काही दिवसांपासून रोजच किमान १०० ते २०० मि.मी. पावसाची नोंद होत आहे. या दोन्ही तालुक्यांमध्ये या हंगामात अनेकदा अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्या खालोखाल पेठ आणि सुरगाणा या दोन तालुक्यांमध्येही गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर अधिक आहे. सोमवारी दिवसभर आणि मंगळवारीदेखील या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. विशेष म्हणजे सोमवारी दिवसभरात त्र्यंबकेश्वरमध्ये १२८, तर इगतपुरीत ११७ मि.मी. पाऊस झाला. सुरगाणा तालुक्यात सकाळी साडेआठपर्यंत सर्वाधिक १४५ मि.मी. पावसाची नोंद झाली.

...

तालुकानिहाय पडलेला पाऊस

तालुका पाऊस (मि.मी.)

नाशिक ३२.२

इगतपुरी ११७

त्र्यंबकेश्वर १२८

दिंडोरी ३५

पेठ ११०

निफाड १४.२

सिन्नर २०

चांदवड ७

देवळा ३.२

येवला २.०

नांदगाव ३.०

मालेगाव ४.०

बागलाण २४

कळवण १२

सुरगाणा १४५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महालक्ष्मी’च्या अतिक्रमणावर हातोडा

$
0
0

सिडको : त्रिमूर्ती चौक परिसरातील दुर्गानगर येथील श्री महालक्ष्मी मंगल कार्यालयाच्या आवारात एक पत्र्याचे शेड बांधून त्याचा अनधिकृतरित्या वापर सुरू होता. महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने मंगळवारी कारवाई करून हे अतिक्रमण जमीनदोस्त केले. ही मोहीम मनपा आयुक्‍त राधाकृष्ण गमे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमणचे उपायुक्‍त जयश्री सोनवणे, विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर, महेंद्र पगारे, गोकुळ पगारे आदींनी राबविली. यावेळी नो हॉकर्स झोन, सार्वजनिक रस्ते, फूटपाथ, चौक आदी ठिकाणी अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यांवर अशाच प्रकारची कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा मनपा अधिकाऱ्यांना दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धोका टळला!

$
0
0

गोदावरीचे पाणी ओसरल्याने चांदोरी, सायखेड्याची पुरापासून सुटका

...

म. टा. वृत्तसेवा, निफाड

नाशिक, इगतपुरी भागात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीपात्रात पाणी सोडल्याने नांदूरमध्यमेश्वर धरण ओव्हरफ्लो झाले आहे. गोदावरीच्या पाण्याची पातळी वाढल्याने मंगळवारी सकाळी निफाड तालुक्यातील सायखेडा व चांदोरी भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती, पण दुपारनंतर पाणी ओसरल्याने या गावांना पुराचा धोका टळला. सध्या नांदूरमध्यमेश्वर धरणातून गोदावरी नदीपात्रात ५८००० क्युसेसने विसर्ग सुरू आहे.

गेल्या चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने गंगापूर आणि दारणा धरणातून पाणी सोडण्यात आले. हे पाणी नांदूरमध्यमेश्वर धरणातून पाच वक्राकार गेट उघडून गोदावरी नदीपात्रात सोडले जात आहे. त्यामुळे पुराचा धोका टळला आहे. गेल्या आठ दिवसांत सरासरी १० टीएमसी पाणी नांदूरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडी धरणासाठी सोडण्यात आले आहे.

सोमवारी रात्री १२ वाजता पाण्याची पातळी वाढल्याने तहसीलदार दीपक पाटील यांनी चांदोरी येथे भेट देऊन परिस्थितीची पाहणी करून नागरिकांना सूचना केल्या. सकाळी नऊ वाजेपर्यंत पाण्याची पातळी वाढलेली होती. पुराचा वेढा बसतो की काय, असे वाटत असताना पावसाचे प्रमाण कमी झाल्याने नदीपात्रातील पाण्याचा प्रवाहही ओसरला. त्यामुळे संभाव्य पूरपरिस्थिती टळली आहे. तरीही प्रशासनाने नदीकाठावरील गावांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

...

शेतीचे नुकसान

सोमवारी मध्यरात्रीनंतर सायखेडा, चांदोरी परिसरात नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने नदीपासून एक किलोमीटरपर्यंतची शेतीक्षेत्र बाधित होऊन नुकसान झाले आहे. यामध्ये ऊस आणि नुकत्याच कोंब फुटलेल्या सोयाबीन या पिकांचा समावेश आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. या भागात नुकसानीचे पंचनामे करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

...

पालखेडमधूनही पाण्याचा विसर्ग

पालखेड धरणही ओव्हरफ्लो झाल्याने ५००० क्युसेसचा विसर्ग धरणातून सुरू आहे. पुराचे पाणी पालखेड डाव्या कालव्याला सोमवारी सोडण्यात आले. हे पाणी येवला आणि मनमाड या शहरांना उपयोगात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोकणातले पाणी गोदावरीतून मराठवाड्यास

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

पश्चिमवाहिनी नदी खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यातील मराठवाड्यात पाणी वळविण्यासाठी प्रस्तावित नदी जोड प्रकल्पाबाबत जलसंपदा विभागाने मंत्रिमंडळासमोर मंगळवारी सादरीकरण केले. या प्रकल्पाबाबत तसेच जलसंपदा विभागाने मांडलेल्या प्रस्तावाबाबत चर्चेअंती मुख्यमंत्र्यांनी पुढील कार्यवाही करण्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे. तहानलेल्या दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे.

आंतरराज्यीय दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प व राज्यांतर्गत नार-पार-गिरणा, पार गोदावरी, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी व दमणगंगा-एकदरे-गोदावरी हे नदीजोड प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून न घेता राज्यांतर्गत प्रकल्प म्हणून राज्याच्या निधीतून त्वरित हाती घेण्यात यावेत. या नदीजोड प्रकल्पांमुळे मुंबई शहरासाठी ३१.६० अब्ज घनफूट, गोदावरी खोऱ्यातील मराठवाडा भागात २५.६० अब्ज घनफूट व तापी खोऱ्यासाठी १०.७६ अब्ज घनफूट पाणी कोकणातून उपलब्ध होईल.

पश्चिमवाहिनी नदीखोऱ्यातील (कोकण) उल्हास, वैतरणा, नार-पार व दमणगंगा खोऱ्यात एकूण ३६० अब्ज घनफूट अतिरिक्त पाणी उपलब्ध आहे. हे अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळविणे शक्य आहे. त्यासाठी नवीन नदीजोड योजनांचे सविस्तर सर्वेक्षण व अन्वेषण त्वरित हाती घेऊन व्यवहार्य योजनांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार आहेत. अशा एकूण १४० अब्ज घनफूट पाणी वळविण्यासाठीच्या योजनांची निवड जलसंपदा विभागाने प्रस्तावित केली आहे.

जायकवाडीपर्यंत पाणी जाणार

मराठवाडा हा अत्यंत अवर्षणप्रवण व सातत्याने दुष्काळी प्रदेश आहे. पाण्याची नैसर्गिक उपलब्धता कमी असल्याने कोकणातील अतिरिक्त पाणी वळवून मराठवाड्यासाठी उपलब्ध करुन देणे हाच पर्याय उपलब्ध आहे. त्यासाठी सविस्तर सर्वेक्षणाअंती आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरणाऱ्या योजनांना मान्यता देऊन त्यांची कामे सुरु करण्यात येतील. कोकणातील नार-पार, दमणगंगा, उल्हास व वैतरणा या खोऱ्यांलगत असलेल्या मराठवाड्यातील गोदावरी नदी खोऱ्यातील पुणे, गंगापूर, वाघाड, करंजवण, भंडारदरा, मुळा, कडवा, मुखणे, भावली इत्यादी धरणांच्या पाणलोट खोऱ्यात हे पाणी वळवता येईल. त्यामार्गे पुढे मराठवाड्यातील जायकवाडी धरणापर्यंत पाणी पोहोचू शकेल.

नदीजोडसाठी स्वतंत्र पदनिर्मिती

दमणगंगा-पिंजाळ, नार-पार-गिरणा, पार-गोदावरी, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी व दमणगंगा-एकदरे-गोदावरी या नदीजोड प्रकल्पांचे कार्यक्षत्र तीन महामंडळात विभागले आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या अंमलबजावणीत समन्वय व एकसूत्रीपणा राखण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. ही शक्यता लक्षात घेता या नदीजोड प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र मुख्य अभियंता कार्यालय स्थापन करणे आवश्यक होते. त्यामुळे मुख्य अभियंता (नदीजोड प्रकल्प) पदाची पदनिर्मिती करुन हे प्रकल्प हाती घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे प्रकल्पांची मिशन मोडवर गतिमान अंमलबजावणी करणे शक्य होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images