Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

'आरोग्य'सह शिक्षण विभागावर देणार भर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे बुधवारी एस. भुवनेश्वरी यांनी हाती घेताच त्यांनी आरोग्य व शिक्षण विभागावर भर देण्याचा मनोदय व्यक्त केला. यावेळी त्यांनी एकही मूल शाळाबाह्य राहू नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर डॉ. नरेश गिते यांनी राबविलेले प्रकल्प अधिक गतीने चालवणार असल्याचेही सांगितले. बदलीचे आदेश येताच त्या हजर झाल्या. त्यानंतर त्यांनी डॉ. नरेश गिते यांची भेट घेऊन त्यांच्याकडून पदभार स्वीकारला. त्यानंतर अध्यक्ष शीतल सांगळे यांची भेट घेतली. नंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी डॉ. नरेश गिते यांनी दीड वर्षात केलेल्या कामांचे कौतुक केले. या काळात पाच राष्ट्रीय व १२ राज्यस्तरीय पुरस्कार जिल्हा परिषदेला मिळाले. त्यांनी सुरू केलेले कुपोषण मुक्ती, प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टिम, निविदा सेल, न्यायालयीन कक्ष सारखे वेगवेगळे उपक्रम यांना गती देण्यात येणार असल्याचे सांगितले. त डॉ. गिते यांची पदोन्नतीने भंडारा येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर यवतमाळच्या सहायक जिल्हाधिकारी असलेल्या ए. भुवनेश्वरी यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्याकडे आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी म्हणून जबाबदारी होती. त्या २०१५ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बागलाण : परंपरा राखणार की इतिहास घडविणार?

$
0
0

\Bवेध विधानसभेचा

बागलाण\B

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बागलाण विधानसभा मतदारसंघात भाजपला मिळालेले मताधिक्य हे भाजपच्या संभाव्य उमेदवाराला विधानसभा निवडणुकीतील विजयाच्या राजमार्गापर्यंत घेऊन जाणारे ठरणार असले तरीही गेल्या पाच पंचवार्षिक निवडणुकांपासून सातत्याने बोरसे- चव्हाण यांच्यातील सरळ सामनाच पुन्हा एकदा रंगणार की नवा भिडू नवा राज येणार, हे आगामी निवडणुकीत चित्र स्पष्ट करणारे ठरणार आहे.

१९६२, ६७, ७२ या तीन विधानसभा मतदारसंघांसाठी सर्वसाधारण खुला असलेला मतदारसंघ १९७८ पासून अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी राखीव झाला. तो आजतायागत कायम आहे. यामुळे सर्वसाधारण प्रवर्गातील अनेक मातब्बर इच्छुक असले तरीही राखीव जागेच्या अडचणीमुळे मोठी गैरसोय झाली आहे. असे असले तरी आमदार आपल्याच हुकमाचा ताबेदार असावा, यासाठीदेखील ही मातब्बर मंडळी ऐनवेळी आपले पत्ते टाकत असल्याने निवडणुकीचा निकाल बदलत असल्याचा अनुभव गत पाच विधानसभांपासून दिसून येत आहे. १९९० पासून बागलाण विधानसभा मतदारसंघ माजी आमदार दिलीप बोरसे व माजी आमदार संजय चव्हाण यांच्या कुटुंबीयांसाठीच राखीव झालेला आहे. या मतदारसंघात उमेदवारांची भाकरी फिरविली जाते ती केवळ बोरसे व चव्हाण परिवारासाठीच, असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही. मात्र, यंदा बोरसे व चव्हाण यांच्यासोबतच नवे चेहरेदेखील रिंगणात उतरण्यास इच्छुक असले तरीही पक्षीय पातळीवर कोण उमेदवारी मिळवून बाजीगर ठरणार, यावर निवडणुकीचे गणित ठरणार आहे. बागलाण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार व चेहरे ज्या पद्धतीने कायम आहेत, त्याच पद्धतीने बागलाणचे शेती सिंचनापासून तर विकासाचे प्रश्नदेखील कायम आहेत. राज्यात सत्ता असलेल्या पक्षाविरोधात आमदार निवडून देणारा बागलाण विधानसभा मतदारसंघ असल्यामुळेदेखील या मतदारसंघाचे प्रश्न रखडले असावेत.

सन १९६२ पासून २०१४ पर्यंत लक्ष्मण तोताराम पवार यांचा अपवाद वगळता एकदाही आमदार दुसऱ्यांदा निवडून देण्याची परंपरा या मतदारसंघाने जोपासलेली नाही. यामुळे आगामी निवडणूकदेखील बोरसे व चव्हाण यांच्यासाठी अत्यंत अटीतटीची ठरू शकेल.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील बागलाण विधानसभा मतदारसंघाने भाजपचे डॉ. सुभाष भामरे यांना ७२ हजार मतांची दिलेली आघाडी विधानसभा निवडणुकीचे रागरंग दाखविणारी ठरू शकेल. विद्यमान आमदार दीपिका चव्हाण यांनी मतदारसंघातील संपर्क, विकासकामे, विधानसभेतील आपल्या कार्यशैलीचा ठसा मतदारसंघात उमटविला असला तरीही राज्यात भाजपचे सरकार असल्याने तत्कालीन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांनी आमदार चव्हाण यांच्या कार्याला मर्यादा आणून ठेवल्या. विकासाचे सारेच प्रश्न आपणच सोडविल्याचा दावा व विकासकामांचा बार स्वत: भामरे यांनी उडविल्याने आमदार चव्हाणांना श्रेयनामावलीपासून दूर राखले. यामुळे आमदार चव्हाण व खासदार डॉ. भामरे यांच्यात अनेक वेळा तू तू मैं मैं झाली आहे.

तालुक्यातील शेती सिंचनासह शहरातील महत्त्वाचा बायपासचा प्रश्न कायम आहे. शहराच्या दृष्टीने पुनद पाणीपुरवठा योजना महत्त्वाचा प्रश्न सोडविण्यास विद्यमान आमदार व खासदारांना यश आलेले आहे. ही दोघांच्या दृष्टीने जमेची बाजू असली तरीही बायपासप्रश्नी दोघांना जाब द्यावा लागणार आहे. विद्यमान जि. प. सदस्या साधना गवळी, माजी आमदार ए. टी. पवार यांच्या कन्या गीतांजली पवार, राकेश घोडे व जयवंत पवार यांनी या वेळी भाजपकडून उमेदवारी करण्यासाठी कंबर कसली आहे. यामुळे भाजपत इच्छुकांची मांदियाळी आहे.

नवीन चेहरे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असले तरीही शेवटी निवडणुकीत आर्थिक गणितात वरचढ ठरणाऱ्या उमेदवारास प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र आतापर्यंत या तालुक्याने पाहिले आहे. कोटीच्या कोटी उड्डाणे घेतलेल्या या उमेदवारांनाच उमेदवारी मिळणार असल्याने या स्पर्धेत कोण बाजी मारेल हे सांगणे कठीण नाही. यामुळे आगामी निवडणूक ही पुन्हा एकदा बोरसे विरुद्ध चव्हाण अशीच ठरल्यास नवल वाटू नये.

पक्षनिहाय इच्छुक उमेदवार

भाजप : दिलीप बोरसे, साधना गवळी, पोपट गवळी, जयवंत पवार, राकेश घोडे, गीतांजली पवार

राष्ट्रवादी : दीपिका चव्हाण, पोपट अहिरे, गणेश अहिरे

काँग्रेस : गणेश अहिरे, डॉ. जयश्री बर्डे

विधानसभेसाठी २०१४ मध्ये झालेले मतदान

दीपिका चव्हाण (राष्ट्रवादी) : ६८,४३४

दिलीप बोरसे (भाजप) : ६४२५३

साधना गवळी (शिवसेना) : ९,१०८

जयश्री बर्डे (काँग्रेस) : ६,९४६

लोकसभेसाठी २०१९ मध्ये झालेले मतदान

डॉ. सुभाष भामरे (भाजप) : १,१७,९५४

कुणाल पाटील (काँग्रेस) : ४५,७२३

नबी अहमद (वंचित आघाडी) : ४,४८४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोलाणी मार्केट बंद करण्याचा प्रयत्न

$
0
0

‘धुळे बंद’ला समर्थनार्थ विना परवानगी निर्णय

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

गोरक्षकांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ दोन दिवसांपूर्वी हिंदूत्ववादी संघटनांनी धुळे बंद आंदोलन केले. याच पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. १७) गोलाणी व्यापारी संकुलातील हिंदुत्ववादी संघटनांनी गोलाणी मार्केटमध्ये काही दुकाने बंद केली. मात्र, आंदोलनाची परवानगी घेतलेली नसल्यामुळे पोलिसांनी वेळीच दखल घेत हे आंदोलन उधळून लावले. यामुळे गोलाणी संकुलात काहीवेळ तणाव निर्माण झाला होता.

धुळे बंदप्रमाणेच जळगावातदेखील व्यापाऱ्यांनी एक दिवस दुकाने बंद ठेऊन आंदोलनाला पाठींबा देण्याच्या उद्देशाने २० ते २५ तरुणांनी दुपारी १२ वाजता गोलाणी मार्केट गाठले. सुरुवातीला अनेक दुकानदारांनी स्वत:च दुकाने बंद केली होती. त्यानंतर या तरुणांनी इतर व्यापाऱ्यांनादेखील आवाहन करणे सुरू केल्याने काहीवेळ मार्केट परिसरात तणाव निर्माण झाला होता. आंदोलनकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता दुकाने बंद करण्यास सुरुवात केल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रवीकांत सोनवणे, विजयसिंग पाटील, वासुदेव सोनवणे, भरतसिंह पाटील यांनी गोलाणी मार्केटमध्ये धाव घेतली. आंदालनकर्त्यांना समज देऊन आंदोलन मागे घेण्याच्या सूचना केल्या. यांनतर लागलीच दुकाने पुन्हा सुरू करण्यात आली होती.

अफवांमुळे धावपळ
दरम्यान, गोलाणी मार्केट बंद होत असताना अनेक प्रकारच्या अफवा पसरल्या. मार्केटमध्ये दोन गटात हाणामारी झाली, चाकू हल्ला झाला, मोबाइलवर दोन समुदायांत तेढ निर्माण करणाऱ्या व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे संतप्त तरुण मार्केट बंद करीत आहेत. अशा अफवा पसरल्या होत्या. पोलिस घटनास्थळी आल्यानंतर आवाहन करणाऱ्या तरुणांना त्यांनी परवानगी नसल्याने बंदचे आवाहन करु नये असे सांगीतले. त्यानतंर तरुणांनी दुकाने उघडण्यास सांगीतल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोरखपूर एक्सप्रेसचा डबा घसरला; प्रवासी थोडक्यात बचावले

$
0
0

नाशिक:

कसारा घाटात बुधवारी रात्री गोरखपूर एक्सप्रेसचा डबा घसरल्याने मुंबई-नाशिक रेल्वे विस्कळीत झाली आहे. या अपघातात चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने सगळे प्रवासी बचावले आहेत. दरम्यान, घसरलेला डबा रुळावरून हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून सध्या मध्य मार्ग आणि अप मार्ग वाहतुकीसाठी उपलब्ध असल्याची माहिती मिळाली आहे.

मुंबईहून निघालेली गोरखपूर अंत्योदय एक्सप्रेस इगतपुरी कसारा रेल्वे मार्गावरील कसारा घाटात आली. एक्सप्रेस पुलावर येताच इंजिनामागील डबा रुळावरून घसरला. चालकाच्या प्रसंगावधानामुळे गाडी वेळीच थांबवली गेली आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दरम्यान, घसरलेला डबा रुळावरून हटवण्याचे काम सध्या सुरू असून लवकरच वाहतूक पूर्ववत होईल अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इगतपुरी: अपघातग्रस्त गोरखपूर एक्स्प्रेस रवाना

$
0
0

नाशिक:

कसारा घाटात मध्यरात्री गोरखपूर एक्स्प्रेसचा डबा घसरल्यानं मुंबई-नाशिक रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. घसरलेला डबा हटवण्याचे काम पूर्ण झाले असून, साधारण साडेनऊच्या सुमारास एक्स्प्रेस पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली आहे.

मुंबईहून काल रात्री गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेस सुटली होती. मध्यरात्री कसारा घाटातील पुलावर इंजिनामागील डबा रुळावरून घसरला. लोको पायलटनं प्रसंगावधान राखून वेळीच एक्स्प्रेस थांबवली. त्यामुळं मोठा अनर्थ टळला. अपघातग्रस्त एक्स्प्रेसमुळं मुंबई-नाशिक रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. घसरलेला डबा रुळावरून हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. सकाळी साधारण साडेनऊच्या सुमारास ते काम पूर्ण झाले. त्यानंतर एक्स्प्रेस विशेष ट्रेन म्हणून पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली. दरम्यान, एक्स्प्रेसमधील प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी रेल्वेतर्फे त्यांना घटनास्थळी आणि इगतपुरी स्थानकात नाश्ता आणि चहा देण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेनं ट्विटद्वारे दिली.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक महापालिका स्थायी समिती सभापतीपदी उद्धव निमसे

$
0
0

नाशिक:

महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी भाजपचे उद्धव निमसे हे बिनविरोध निवडून आले आहेत. शिवसेनेच्या कल्पना पांडे यांनी यांनी उमेदवारी अर्ज माघे घेतल्याने निमसे यांची बिनविरोध निवड झाली आहे.स्थायी समितीत १६ पैकी भाजपचे ९,सेनेचे ४, तर काँग्रेस ,राष्ट्रवादी आणि मनसेचा प्रत्येकी एक सदस्य आहेत. मनसे सदस्य अशोक मुर्तडक हे अनुपस्थित राहिले.

महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी आज जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली.सभापती पदासाठी भाजपकडून उद्धव निमसे यांनी तर शिवसेनेकडून कल्पना पांडे यांनी अर्ज दाखल केला होता.छाननित दोन्ही उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्या नंतर माघारी साठी १५ मिनिटांची वेळ देण्यात आली होती.निमसे यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सेना युतीचा दाखला देत निमसे यांनी पांडे यांना उमेदवारी अर्ज माघे घेण्याची विनंती केली.त्यानंतर पांडे यांनी आपला अर्ज माघे घेतला.त्यामुळे निमसे यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने मांढरे यांनी उद्धव निमसे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. निमसे यांची निवड जाहीर होताच भाजपने ढोल ताशांचा गजर करत जल्लोष साजरा केला.निमसे यांच्या रूपाने भाजपने सलग तिसऱ्या वर्षी पालिकेची तिजोरी आपल्या हाती ठेवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीबीएसवर महिलावाहकाचा विनयभंग

$
0
0

प्रवासी भरण्यावरून वाद विकोपाला

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बसमध्ये प्रवासी भरण्याच्या कारणातून दोन वाहकांमध्ये झालेल्या वादातून वाहकाने आपल्या सहकारी महिला कर्मचाऱ्यास जातिवाचक शिवीगाळ करीत विनयभंग केला. ही घटना सीबीएस बसस्थानकाच्या आवारात घडली असून, या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात विनयभंगासह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रीतेश रमेश परदेशी (वय ३६, रा. क्रांतीनगर, मखमलाबाद रोड) असे या संशयित वाहकाचे नाव आहे.

तक्रारदार महिला आणि संशयित दोघेही एसटी महामंडळात वाहकपदावर कार्यरत आहेत. या दोघांना त्र्यंबक मार्गावर वेगवेगळ्या बसमध्ये नियुक्ती देण्यात आली आहे. क्रमांकानुसार व्यवसायासह फेऱ्या वाढविण्यासाठी दोघांकडून प्रयत्न सुरू असतात. शेजारी शेजारी लागलेल्या बसपैकी महिला वाहकाने आपल्या बसमध्ये प्रवाशांना बसविल्याने दोघांमध्ये वाद झाला. क्रमांकानुसार बस उभी नसताना महिला वाहकाच्या बसमध्ये प्रवासी बसत असताना परदेशीने मोबाइलमध्ये चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. आपण दोघे शासनाचे काम करतो, तू शूटिंग बंद कर, असे महिला वाहकाने सांगितले. या वेळी महिलेने केलेल्या विरोधामुळे परदेशीचा मोबाइल हातातून खाली पडला. यामुळे चिडलेल्या परदेशीने थेट महिलेच्या डोक्यात चापटी मारल्या. वरिष्ठांना चित्रीकरण दाखवून तुझी नोकरी घालवतो, अशी धमकी देत जातिवाचक शिवीगाळ केली. हा वाद डेपो मॅनेजरपर्यंत गेल्यानंतर तेथेही संशयिताने अश्लील आणि जातिवाचक शिवीगाळ केल्याने महिला वाहकाने थेट सरकारवाडा पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. सहाय्यक आयुक्त अशोक नखाते तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नवीन शैक्षणिक धोरण’ विषयावर उद्या व्याख्यान

$
0
0

'नवीन शैक्षणिक धोरण'

विषयावर उद्या व्याख्यान

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतीय शिक्षण मंडळ, पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे 'नवीन शैक्षणिक धोरण' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या (२० जुलै) सायंकाळी ६ वाजता रावसाहेब थोरात सभागृह येथे हे व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमासाठी अमरकंटक येथील इंदिरा गांधी जनजातीय विद्यपीठचे कुलगुरू डॉ. टी. व्ही. कट्टीमनी मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. कट्टीमनी हे राष्ट्रीय शिक्षण धोरणं मसुदा समितीचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वायुनंदन, मराठा विद्या प्रसारक समाजाच्या सरचिटणीस नीलिमा पवार उपस्थित राहणार आहेत. शालेय तसेच उच्च शिक्षणात अनेक बदल या नवीन धोरणात प्रस्तावित आहेत. या मसुद्याबद्दल विविध पातळ्यांवर चर्चा आयोजित करून लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न भारतीय शिक्षण मंडळातर्फे करण्यात येत आहे. या आधी मंडळातर्फे नाशिकमधील मान्यवरांचा या विषयावर खुला संवाद आयोजित केला होता. नाशिककरांनी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मराठी बळी देऊन इंग्रजीचा पुरस्कार नको

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मातृभाषा ही जगण्याचे बळ देते. त्यामुळे मराठी भाषेचा बळी देऊन इंग्रजी भाषेचा पुरस्कार केला जाऊ नये. ज्ञानोबा, तुकोबांची, अनंत फंदीची, शाहीर परशरामाची मराठी हद्दपार होता कामा नये, असे प्रतिपादन प्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी केले.

लासलगाव महाविद्यालयाचे निवृत्त प्रा. शिरीष गंधे यांनी अनंत फंदी यांच्या जीवनावर आधारित लिहिलेल्या 'कवनाचा सागर' हे संगीत नाटक आणि अनंत फंदीकृत 'श्रीमाधवग्रंथ' या संपादन केलेल्या दोन पुस्तकांचे प्रकाशन रामदास फुटाणे यांच्या हस्ते पुणे जिल्ह्यातील मोराची चिंचोली येथे झाले. त्या वेळी ते बोलत होते. प्रा. गंधे म्हणाले, की आपण ज्या मातीत जन्माला आलो त्या मातीचे ऋण फेडण्याची जबाबदारी आपली असते. त्या दृष्टीने शाहीर अनंत फंदी यांच्यावर गेल्या पंचवीस वर्षांपासून संशोधनात्मक अभ्यास सुरू आहे. यंदाचे शाहीर अनंत फंदी यांना द्विशताब्दी वर्ष पूर्ण होत असल्याने त्यांच्यावर आधारित साहित्य वाचकांसमोर घेऊन येताना आनंद होत असल्याचा भावना त्यांनी व्यक्त केल्या. संगमनेर येथील कॉलेजमध्ये १९७८- ७९ च्या माजी विद्यार्थी मेळाव्यात झालेल्या या दोन पुस्तकांच्या प्रकाशनप्रसंगी कवी भरत दौंडकर, संगीतकार चंद्रमोहन, अभिनेते उल्हास आढाव, चित्रपटनिर्माते गिरीश सांगळे, वनस्थळी लासलगावच्या समन्वयक अनिता गंधे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थिनींच्या प्रयत्नानेपुन्हा धावली बस!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

रोज पाच किलोमीटरची पायपीट किंवा खासगी वाहनाची लिफ्ट घेत मजल-दरमजल करीत कॉलेजला जाणे चांदवड तालुक्यातील दोन-तीन गावांतील मुलींसाठी कमालीचे त्रासदायक ठरत होते. अखेर हा रोजचा संघर्ष या विद्यार्थिनींनीच पुढाकार घेत संपवला आणि गेल्या चार महिन्यांपासून बंद पडलेली पिंपळगाव बसवंत- बहादुरी ही बससेवा गुरुवारपासून पुन्हा सुरू झाली. विद्यार्थिनींच्या या प्रयत्नामुळे पिंपळगाव बसवंत येथील महाविद्यालयीन शिक्षणाचा मार्ग सुकर पुन्हा सुकर झाला आहे.

रस्ता खराब असल्याचे कारण देत गेल्या चार महिन्यांपासून पिंपळगाव बसवंत-धोंडगव्हाणमार्गे वडनेरभैरव-बहादुरी ही बस बंद करण्यात आली होती. धोंडगव्हाणमार्गे वडनेरभैरव, बहादुरीला जाणाऱ्या या बसचा मार्ग यामुळे बदलण्यात आला होता. त्यामुळे अनेक दिवसांपासून विद्यार्थी व प्रवाशांचे हाल होत होते. यात धोंडगव्हाण, पाचोरे वणी येथील प्रवाशांना पाच किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागत होती. या पाच किलोमीटरच्या रोजच्या संघर्षाला विटलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थिनी मोनाली चौरे, दीपाली तिडके, अश्विनी थेटे, पूजा परदेशी, रोहिणी परदेशी, ऋतुजा कतवारे, काजल पूरकर, प्रतीक्षा उगले, तसेच अंकित कतवारे, अंजिम शेख, ज्ञानेश्वर थेटे यांनी अखेर थेट आगारप्रमुख संध्या जाधव यांची भेट घेत कैफियत मांडली. हा मार्ग तुम्हीच पाहा, असेही त्यांनी आगारप्रमुखांना सांगितले. अखेर आगारप्रमुख जाधव यांनी या मुलींसोबत या बसने प्रवास केला. बस धोंडगव्हाण येथे पोहोचली तेव्हा आगारप्रमुखांनीही बससेवा सुरळीत सुरू करण्याचे आश्वासन विद्यार्थिनींना दिले. बससेवेचा प्रश्न सुटल्याने आनंदित झालेल्या विद्यार्थिनींनी जाधव यांचा सत्कार केला.

रस्ता अरुंद आणि खराब असल्याने ही बससेवा बंद केली होती. विद्यार्थी व ग्रामस्थांच्या विनंतीवरून गुरुवारी आम्ही रस्त्याची पाहणी केली. त्यानंतर बससेवा पूर्ववत सुरू करण्यात आली.

- संध्या जाधव, आगारप्रमुख, पिंपळगाव बसवंत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीई थकबाकीविरोधात आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य शिक्षण विभागाच्या वतीने २०१२-१३ ते २०१८-१९ पर्यंत 'आरटीई'ची थकबाकी देण्याबाबत अद्यापही ठोस पावले उचलली जात नसल्याने इंडिपेंडन्ट इंग्लिश स्कूल्स असोसिएशनतर्फे गुरुवारी 'काळा दिवस' पाळत आंदोलन करण्यात आले.

शिक्षण विभागांनी शाळांच्या मागण्यांची दखल घ्यावी, यासाठी शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांना निवेदन देण्यात आले. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्या १२ फेब्रुवारी २०१९च्या आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी, आरटीई फी परतावा देण्यासाठी दिरंगाई करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांना किंवा शिक्षण अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे, २०१८-१९ पर्यंतचा थकीत आरटीई फी परतावा तात्काळ अदा करावा, दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण येणाऱ्या शैक्षणिक वर्षांपासून पूर्ववत करण्यात यावे, तसेच केंद्रात व राज्यात एकच मूल्यमापन पद्धत लागू करावी, सर्व शाळांसाठी शाळा सुरक्षा कायदा करावा, अशा मागण्या संघटनेकडून मांडण्यात आल्या. यावेळी संघटनेचे सहसचिव डॉ. प्रिन्स शिंदे, विभागीय अध्यक्ष विवेक पडाळे, जिल्हाध्यक्ष सुखदेव उशिर, उपाध्यक्ष सुशील सक्सेना, अजय देशमुख आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पोलिसपाटलांची भूमिका मोलाची’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीवेळी पोलिसपाटलांनी चांगली कामगिरी केली. आगामी सणासुदीचे दिवस आणि विधानसभा निवडणूक काळात पोलिसपाटलांची भूमिका मोलाची ठरणार असून, सर्वांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी केले.

आडगाव ग्रामीण पोलिस मुख्यालयात बुधवारी (ता. १७) जिल्हास्तरीय पोलिसपाटलांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा घेण्यात आली. त्या वेळी डॉ. आरती सिंह बोलत होत्या. पोलिसपाटील आणि पोलिस यांच्यातील समन्वयाविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. लोकसभा निवडणूक काळात चांगले काम करणाऱ्या पोलिसपाटलांचा सत्कार करण्यात आला. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांना सहकार्य करावे. विधानसभा निवडणूक काळात उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलिसपाटलांचाही सत्कार करण्यात येईल, असे आश्वासन सिंह यांनी दिले. प्रारंभी सिंह यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. या वेळी उपअधीक्षक सुरेश जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक करपे, निरीक्षक के. के. पाटील, विशेष शाखेचे निरीक्षक नंदकुमार गायकवाड, तसेच पोलिसपाटील संघटनेचे चिंतामण मोरे उपस्थित होते. निरीक्षक गायकवाड यांनी ग्रामपोलिस अधिनियम १९६७ अंतर्गत पोलिसपाटलांचे अधिकार, कर्तव्य आणि वागणूक याची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे वाटप केले. पोलिसपाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष चिंतामण मोरे यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा संघटक रवींद्र जाधव यांनी आभार मानले. संघटनेचे कार्याध्यक्ष बाजीराव सावंत, उपाध्यक्ष अरुण बोडके आदींसह सुमारे १,४५० पोलिसपाटील कार्यशाळेस उपस्थित होते. विशेष शाखेचे कर्मचारी मारुती आघाण, प्रकाश भामरे, रामकृष्ण लोखंडे, करुणा आहेर, मोहन बर्वे आदींनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निराधार लाभार्थींना दिलासा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थींना शहरात २००३ च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार लाभ दिला जात असल्याने हजारोंच्या संख्येने लाभार्थी वंचित आहेत. त्यामुळे आता संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभार्थींना २०११ च्या आर्थिक सर्वेक्षणाप्रमाणे लाभ देण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुरेश मांढरे यांनी दिले आहेत.

आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी आयोजित केलेल्या समाधान शिबिरात लाभार्थींशी बोलताना मांढरे यांनी हे आदेश दिले. आमदार फरांदे यांच्या प्रयत्नांतून नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ करून देण्यासाठी रोटरी क्लब हॉल, गंजमाळ येथे समाधान शिबिर सुरू असून, जिल्हाधिकारी मांढरे यांनी या शिबिराला भेट दिली. यावेळी फरांदे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थींबाबत फरांदे यांनी अद्यापही २००३ च्या दारिद्र्यरेषेप्रमाणे लाभार्थींना लाभ दिले जात असल्याचे मांढरे यांच्या लक्षात आणून दिले. त्यानंतर मांढरे यांनी याबाबत बोलताना शहरातील सर्व लाभार्थींना २०११ च्या आर्थिक सर्वेक्षणाप्रमाणे लाभ दिला जाईल, असे सांगताना आजच याबाबतचे आदेश निर्गमित करण्याचे आश्वासन दिले. यासंदर्भातील यादीही त्यांनी तातडीने मागवून कामाच्या सूचना दिल्या. त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या शहरातील हजारो लाभार्थींना त्याचा लाभ होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाईक शिक्षण संस्था वार्तापत्र

$
0
0

गुणवत्ता नव्हे, राजकारणच वरचढ!

--

व्ही. एन. नाईक संस्थेच्या निवडणूक प्रचारात प्रगती आणि क्रांतिवीर पॅनल एकमेकांवर गंभीर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. नात्यागोत्यांच्या राजकारणापलीकडे न पाहिले गेल्याने दुर्दैवाने शैक्षणिक गुणवत्तेची चर्चा कोणीच करताना दिसत नाही.

--

शैलेन्द्र तनपुरे

shailendra.tanpure@timesgroup.com

नाशिक जिल्ह्यात मराठा समाजानंतर सर्वार्थाने बलशाली असलेल्या वंजारी समाजाच्या शिक्षण संस्थेची निवडणूक शनिवारी (दि. २०) होत आहे. हेमंत धात्रक व कोंडाजी आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील प्रगती, तर पी. आर. गिते व पंढरीनाथ थोरे यांचे क्रांतिवीर पॅनल अशी सरळ लढत होत आहे. नेहमीप्रमाणेच या निवडणुकीत चांगलाच रंग भरला असून, आरोप-प्रत्यारोपांची राळ उडाली आहे. नाईक संस्थेचा पाया समजल्या जाणाऱ्या वंजारी बोर्डिंगला पुढील वर्षी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत, तर नाईक एज्युकेशन सोसायटीला यंदाच पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. वंजारी बोर्डिंगचे नंतर डोंगरे विद्यार्थी वसतिगृह असे नामकरण झाले, तर वीस वर्षांपूर्वी म्हणजेच १९९९ साली समाजाच्या दबावामुळे डोंगरे विद्यार्थिगृह व नाईक एज्युकेशन सोसायटी यांचे एकत्रीकरण होऊन क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक ही संस्था अस्तित्वात आली. शंभर वर्षांपूर्वी वंजारी बोर्डिंगबरोबरच शाहू बोर्डिंग व उदोजी मराठा बोर्डिंग या संस्था कोल्हापूरचे छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांच्या हस्ते सुरू झाल्या होत्या. उदोजी मराठा बोर्डिंगनंतर मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेत रुपांतर झाले आणि आज ही संस्था राज्यातील सर्वार्थाने मोठी हा टिळा भाळी मिरविते आहे. तो मान नाईक संस्थेला मिळाला तर नाहीच; पण त्याच्या आसपासही ती पोहोचू शकली नाही याचे शल्य समाजातील अनेक सुजाण मंडळींना आहे. सततचे वाद, संघर्ष, नात्यागोत्यांचे अतिरेकी राजकारण व शिक्षकांचाही राजकारणातील नको एवढा सहभाग यामुळे संस्था मोठी झेप घेऊ शकली नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. आज ८००० सभासद, ६४ शाखा, २५ हजार विद्यार्थी, १२०० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि ७० कोटींचे बजेट ही संस्थेची मातब्बरी असली, तरी जिल्ह्यातील इतर संस्था त्यापेक्षाही फार पुढे निघून गेल्या आहेत. हा मागे राहिल्याचा विचार दर निवडणुकीप्रसंगी चर्चेला येतो आणि निवडणूक झाल्यावर विसरलाही जातो. संस्थेच्या या पीछेहाटीला कोणी एक जबाबदार नसला, तरी गुणवत्तेपेक्षा राजकारण व स्वार्थ यातच रममाण होणाऱ्या समाजधुरिणांकडून फार काही अपेक्षाही अर्थातच करता येणार नाहीत. अर्थात, तरीही गेल्या काही वर्षांत अभियांत्रिकी, तंत्रशिक्षण व फार्मसीसारख्या विद्याशाखा सुरू करून संस्थेने काही कसर निश्चित भरून काढली आहे. 'दुरितांचे तिमिर जावो' हे ब्रीदवाक्य असलेल्या या संस्थेत काही ठराविक मंडळींचाच आर्थिक अंध:कार दूर होऊन कोटकल्याण होत गेले आणि नंतरच्या काळात तर ज्याचे नातेसंबंध भरपूर अशीच मंडळी संस्थेत येत गेली आणि मग त्यांच्याच जोरावर नातेवाईक असलेली शिक्षक व शिक्षकेतर मंडळी भरती झाली. राजकारणापलीकडे न पाहिले गेल्याने आजही निवडणुकीत शैक्षणिक गुणवत्तेची चर्चा कोणीच करीत नाहीत, यातच सारे आले. कोणी किती जमीन विकली, कोणी किती कर्ज करून ठेवले, कोणी जागा कशा भाड्याने दिल्या हे मुद्दे विद्यमान निवडणुकीचे आहेत. वास्तविक समाजाची फार मोठी माणसं राज्यात विविध पदांवर आहेत. जिल्ह्यातीलही अनेक समाजधुरिण आपापल्या क्षेत्रांत नाव कमावून आहेत. पण, अशांना संस्था फारसे महत्त्व देत नाही. निवडणुकीत तर अशांना खड्यासारखे बाजूला ठेवले जाते. राजकीय पुढारी, मंत्री यांच्यातच पदाधिकाऱ्यांना अधिक रस. साहजिकच राजकारणातून सत्ता अन् सत्तेतून राजकारण हे दुष्टचक्र भेदण्याची कोणाचीच तयारी नाही. निवडणुकीत उभे राहिलेल्या नावांवर नजर टाकली तरी या राजकारणाच्या चक्रव्यूहात सापडलेल्या संस्थेची स्थिती लक्षात यावी. राजकारणाचा तिरस्कार नको; पण त्याचा अतिरेकही नको हे साधे तंत्र आत्मसात न केल्याने संस्थेच्या प्रगतीत शिथिलता आली हे नाकारता येत नाही. याचा अर्थ संस्था पुढे गेलीच नाही, असा नाही. जिल्हाभरातील शाळांसाठी अद्ययावत इमारती, जमिनींची खरेदी, सर्वत्र पायाभूत सुविधांची निर्मिती व प्रो-कबड्डीचे यशस्वी आयोजन या विद्यमान कार्यकारिणीच्या जमेच्या बाजू म्हणता येतील. तुकाराम दिघोळे यांच्या काळात संस्थेने अभियांत्रिकी महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवून काळानुसार पुढे पाऊल टाकले. विद्यमान पदाधिकाऱ्यांनी या महाविद्यालयासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करून संस्थेला आर्थिक दुरवस्थेच्या खाईतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. या कर्जफेडीसाठी गंगापूर रस्त्यावरील जागा साडेसव्वीस कोटींना विकावी लागली खरी; पण आज हाच विक्रीचा मुद्दा विरोधकांच्या प्रचाराला धार आणत आहे. यंदा एक चांगली बाब झाली आणि त्यातून संस्था निर्धाराने राजकारण्यांच्या दावणीतून बाहेर पडू पाहत आहे. याची रुजवात झाली, ती म्हणजे खासदार प्रीतम खाडे-मुंडे, आमदार बाळासाहेब सानप, आमदार दराडे बंधू, माजी मंत्री तुकाराम दिघोळे आदी मान्यवरांच्या प्रभावाखाली न येता उमेदवारांची निवड केली गेली. खासदार प्रीतम मुंडे यांच्या सासूबाई कांचन खाडे यांनी उमेदवारीसाठी बरीच यातायात केली. मुंडेंच्या नात्याचाही उपयोग केला गेला. माघारीसाठी दबाव येत असल्याचे पाहून त्या भूमिगतही झाल्या. अखेरीस माघार न घेता आल्याने जाहीर निवेदन देऊन माघार घेत असल्याचे त्यांना सांगावे लागले. आमदार सानप यांनीही आपल्या काही माणसांसाठी शब्द टाकण्याचा प्रयत्न केला; पण त्याला यश आले नाही. शेवटी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत रागलोभ नको म्हणून या निवडणुकीपासूनच तटस्थ राहणे पसंत केले. नरेंद्र व किशोर दराडे यांनीही जाहीर हस्तक्षेप न करण्याचे धोरण स्वीकारले. तुकाराम दिघोळे यांनीही दबाव टाकून पाहिला; पण खेळ जमत नाही हे पाहून अखेरीस त्यांनी चिरंजीव अभिजित यांच्या समाजकारणाचा श्रीगणेशा मात्र करून स्वत: माघार घेतली. सत्तारूढ प्रगती पॅनलने विद्यमान सात संचालकांना डच्चू देण्याचे दाखविलेले धाडस अंगाशी तर येणार नाही ना, अशी शंका अनेकांना आहे. त्याचवेळी पॅनल करतानाच 'क्रांतिवीर'मध्ये झालेली भांडाभांड व नाराजी किती गडबड करते हे पाहावे लागेल. मुळात नात्यागोत्यांच्या राजकारणात 'क्रॉस व्होटिंग' होणार यात काही शंका नसली, तरी त्यात कोण बाजी मारते यावर या निवडणुकीत प्रगतीची सरशी होणार की क्रांती होणार ते ठरेल!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुजॉय गुप्ता यांना अंतरिम जामीन मंजूर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बांधकाम व्यावसायिक सुजॉय गुप्ता यांचा सशर्त अंतरिम अटकपूर्व जामीन मुंबई हायकोर्टाने गुरुवारी मंजूर केला. जिल्हा कोर्टाने जामीन फेटाळून लावल्याने गुप्ता यांनी मुंबई हायकोर्टात अपील केले होते. या अर्जावर सुनावणी घेऊन न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांनी निर्णय सुनावला.

गंगापूर रोडवरील ध्रुवनगर येथील बांधकाम प्रकल्पात घडलेल्या दुर्घटनेप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात श्वेता इन्फ्रास्ट्रक्चर अॅण्ड हौसिंग इंडियाचे सुजॉय गुप्ता, आरसीसी कॉन्ट्रॅक्टर भावीन नवीनभाई पटेल (वय ३४), लेबर कॉन्ट्रॅक्टर आशिष अनिलकुमार सिंग (वय २६, रा. जगतापनगर, उंटवाडी) आणि प्रोजेक्ट मॅनेजर सचिन सुरेश शेवडे (वय ४४, रा. इंदिरानगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. यातील गुप्ता वगळता इतरांना तात्काळ अटक झाली होती. गुप्ता यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा कोर्टात प्रयत्न केला. मात्र, येथे हा अर्ज फेटाळण्यात आला. त्यामुळे त्यांनी लागलीच मुंबई हायकोर्टात धाव घेतली. वरिष्ठ वकील अशोक मुंडर्गी, अॅड. मनोज माहिते, अॅड. जयदीप वैशंपायन आणि अॅड. रवीराज परमाणे यांनी बचाव पक्षातर्फे बाजू मांडली.

पाण्याची टाकी कोसळणे ही अपघाताची घटना होती. त्यात गुप्ता यांना अटक करण्याचे कोणतेही ठोस कारण नसल्याचा युक्तीवाद बचाव पक्षाने मांडला. बचाव पक्षाच्या युक्तीवादानंतर हायकोर्टाने २३ आणि २४ जुलै रोजी पोलिस ठाण्याला हजेरी लावण्याच्या अटीवर अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘त्या’ तोतया पोलिसाला कारावास

$
0
0

पोलिस ठाण्यासमोरच मोबाइल चोरीचा प्रताप

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पोलिस असल्याची बतावणी करीत पोलिस ठाण्यासमोरूनच मोबाइल चोरून नेणाऱ्या तोतया पोलिसावरील आरोप कोर्टात सिद्ध झाला. फसवणुकीच्या गुन्ह्यात कोर्टाने आरोपीला दोन वर्षे कारवासाची शिक्षा ठोठावली. मुख्य न्यायदंडाधिकारी एस. पी. नाईक-निंबाळकर यांच्या कोर्टासमोर ही सुनावणी पार पडली.

सचिन अरुण आचार्य असे या आरोपीचे नाव आहे. मूळचा मुंबईचा असलेल्या आरोपीवर इतर शहरात काही गुन्हे दाखल आहेत. त्याने ८ जुलै २०१८ रोजी तालुका पोलिस ठाण्यासमोर फसवणुकीचा प्रकार केला होता. ऑनलाईन खरेदी विक्रीच्या एका अॅपवर सातपूर येथील बबलू कैलास राठोड यांनी मोबाइल विक्रीसाठी जाहिरात दिली होती. तब्बल २६ हजार रुपयांचा तो मोबाइल होता. आरोपीने राठोड यांच्याशी संपर्क साधून आपले नाव निंबाकर कांबळे असून, आपण पोलिस उपनिरीक्षक असल्याचे सांगितले होते. मोबाइल विकत घ्यायचा असून, राठोड यांना तालुका पोलिस ठाण्याच्या गेटवर बोलावून घेतले. एका व्यक्तीला मोबाइल घेण्यासाठी पाठवून मी वडिलांकडून पैसे घेऊन येतो, असे सांगून तो पोलिस ठाण्याच्या दिशेने गेला. बऱ्याच वेळ होऊनही पोलिस ठाण्यातून कोणी बाहेर येत नसल्याने राठोड थेट पोलिस ठाण्यात गेले. तिथे निंबाकर कांबळे नावाचा व्यक्तीच कार्यरत नसल्याचे त्यांना समजले आणि आपली फसवणूक झाल्याचे उमगले. या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वाय. एम. नारखेडे यांनी तपास करीत आरोपीस अटक केली. सबळ पुरावे कोर्टासमोर मांडण्यात आले.

सरकारी पक्षातर्फे अॅड. एस. पी. बंगले आणि टी. ए. त्र्यंबकवाला यांनी कामकाज पाहिले. कोर्टासमोर आलेल्या साक्षी पुराव्यानुसार कोर्टाने कलम ४१९ नुसार एक वर्षे तर कलम ४२० नुसार दोन वर्षे कारवासाची शिक्षा ठोठावली. कोर्ट ड्युटी कर्मचारी पोलिस कॉन्स्टेबल एस. के. संगम, आर. एच. खकाळे यांनी खटल्याच्या कामाचा पाठपुरावा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेगवेगळ्या ठिकाणीतीन जणांची आत्महत्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर बुधवारी (ता. १७) तीन जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या केली. यात एका तरुणीचा समावेश आहे. तिघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी अंबड, सातपूर व मुंबई नाका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सिडकोतील राणाप्रताप चौकात राहणाऱ्या कृतिका राजेंद्र गोसावी (वय २३, रा. फाल्गुन कॉलनी) या तरुणीने बुधवारी आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. वडील राजेंद्र गोसावी यांनी तिला तत्काळ नजीकच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिला मृत घोषित केले. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, सहायक पोलिस उपनिरीक्षक धरम तपास करीत आहेत. दुसरी घटना तिरडशेत (ता. जि. नाशिक) येथे घडली. रवी कचरू वायळ (वय ३५) याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सातपूर पोलिस ठाण्याचे हवालदार खरे तपास करीत आहेत. हॅपी होम कॉलनीतील राजेंद्र दगा बागूल (वय ६३, रा. श्याम रो बंगलो) यांनी बुधवारी घराच्या लोखंडी जिन्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, हवालदार ठाकूर तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीनशे कोटींचा बार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेने रखडलेली स्मार्ट सिटी संचालक मंडळाची बहुप्रतीक्षित बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीत प्रोजेक्ट गोदा, गावठाणातील रस्ते, गोदावरी नदीतील गाळ काढणे अशा तब्बल ३१० कोटींच्या कामांना हिरवा कंदील देण्यात आला.

विशेष म्हणजे या बैठकीवर अजय बोरस्ते, शाहू खैरे व गुरुमित बग्गा या संचालकांनी बहिष्कार टाकला असतानाही कोट्यवधींच्या कामांचा स्मार्ट धडाका लावून गैरव्यवहाराचे आरोप अध्यक्ष सीताराम कुंटेंनी निष्रभ ठरवले आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या या एकांगी बैठकीवरून सत्ताधाऱ्यांसह कुंटेंना आता तीव्र विरोधाचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.

२०२ कोटींच्या वादग्रस्त स्काडा योजनेतील गैरव्यवहार, स्मार्टरोडच्या ठेकेदाराचा वाद, सीईओ प्रकाश थविल यांच्यासह प्रमोद गुर्जर यांच्या कामाबाबत झालेल्या तक्रारी, तसेच स्मार्ट पार्किंग विषयावरून गत १८ जून रोजी स्मार्ट सिटी संचालक मंडळाची बैठक रद्द करण्यात आली होती. ही रद्द झालेली बैठक गुरुवारी पुन्हा घेण्यात आल्याने ती अपेक्षेप्रमाणे वादग्रस्त ठरली. थविल यांची बदली, स्मार्ट पार्किंगमधील गोंधळ आणि स्काडातील गोंधळावरून संचालकांनी सीताराम कुंटेंची भेट घेत त्यांच्याकडे पुन्हा तक्रारी केल्या. परंत, कुंटेंनी या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याने संचालक बोरस्ते, बग्गा, खैरे यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. परंतु, केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये गैरव्यवहार होत असल्याचा विरोधकांनी केलेला आरोप, त्यातून उपसण्यात आलेले बैठकीवरचे बहिष्कारास्र कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे निष्प्रभ ठरविले. विषय मांडण्यासाठी संचालक मंडळाचे व्यासपीठ उपलब्ध असताना बहिष्कार टाकणे योग्य नसल्याचे सांगत विरोधकांनी वादग्रस्त ठरविलेल्या विषयांना या बैठकीत मंजुरी दिली. संशय व्यक्त करण्यात आलेल्या स्काडाअंतर्गत पाणीमीटर बसविण्याचा विषयाला स्थगिती देत नव्याने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, सत्ताधारी पक्षातील संचालक मंडळाने गेल्या बैठकीत बहिष्कारास्र उगारले होते. स्मार्ट सिटीचा संबंध थेट मुख्यमंत्र्यांशी येत असल्याने गुरुवारी महापौर, उपमहापौर व सभागृह नेत्यांनी बैठकीत सहभाग घेतल्याने लोकनियुक्त संचालकांच्या एकीत फूट पडल्याचे चित्र होते.

-

संचालकांचे बहिष्कारास्र

स्काडा निविदेतील गोंधळ, स्मार्ट पार्किंगचा वाद, स्मार्टरोडची दिरंगाई आणि सीईओ थविल यांच्या मनमानी कारभारावर आक्षेप घेत संचालकांनी गेल्या बैठकीवेळी कुंटेंकडे तक्रारी केल्या होत्या. त्यावेळी कुंटेंनी थविल आणि गुर्जर यांच्यावर कारवाईचे आश्वासन दिले होते. परंतु, कुंटेंनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने गुरुवारी या संचालकांनी पुन्हा कुंटेंची भेट घेतली. परंतु, कुंटेंनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, तसेच सर्वांना बैठकीत सहभागी होण्याचे आवाहनही केले. परंतु, बोरस्ते, खैरे व बग्गा यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला. महापौर, उपमहापौरांसह सभागृह नेत्यांनी कामकाजात सहभाग घेतला. परिणामी सत्ताधारी पक्षाच्या संचालकांनी माना खाली घालून या बैठकीत सहभागी होणे पसंत केले. त्यामुळे आता या वादग्रस्त विषयावर महासभेत वादळी चर्चा झडणार आहे.

-

बैठकीतील मंजूर विषय आणि निधी

--

गावठाणातील रस्ते- २०१ कोटी

गोदा रिव्हर फ्रंट- ६५ कोटी

पलुस्कर सभागृह- २.५ कोटी

पाणवेली यंत्र खरेदी- २.६ कोटी

गोदा पुनर्विकास- १२.३६ कोटी

मेकॅनिकल गेट- २२ कोटी

नदीतीला गाळ काढणे- ८.९ कोटी

स्काडा निविदा प्रक्रियेला स्थगिती

सीसीटीव्हींसाठी ४८ कोटी निधीचे हस्तांतरण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्ही. एन. नाईक

अर्धवट व्हिडिओद्वारे पोलिसांची बदनामी

$
0
0

सोशल मीडियाची दखल; संबंधितांवर होणार कारवाई

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अपघातानंतर पळून जाणाऱ्या व्यक्तीला पकडतानाचा व्हिडिओ शूट करून हेल्मेट वापरत नसल्याने पोलिस थेट मारहाण करीत असल्याचे चित्र रंगविण्याचा खोडसाळपणा सोशल मीडियावर करण्यात आला. हे प्रकरण गंभीरतेने घेत पोलिसांनी असे कृत्य करणाऱ्या व्यक्तीविरोधात प्रतिमा मलिन केल्याचा गुन्हा दाखल केला जाणार आहे.

हा सर्व घटनाक्रम नाशिकरोड भागात बुधवारी घडला. वाहतूक शाखा विभाग चारचे पोलिस उपनिरीक्षक रुपेश सतीश काळे (वय ३३) आणि पोलिस कर्मचारी बलकवडे हे सकाळी महामार्गावरील गुरुद्वारजवळ वाहन तपासणी करीत होते. त्यावेळी संशयित राजेश जीवरम प्रजापती (वय ३७, रा. जुने एमएसइबी ऑफिस, शिखरेवडी) हा त्याच्या दुचाकीवरून ट्रिपल सीट आला. काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दुचाकीस अडवले. मात्र, संशयिताने अंगावर दुचाकी घालून काळे यांना खाली पाडले. या घटनेत काळे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. या स्थितीत पोलिसांनी दुचाकीवरील एकाला पकडले. पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या या संशयितास नियंत्रणात आणताना पोलिसांनी त्याला चापटी मारल्या. यावेळी एका बघ्याने हा व्हिडिओ मोबाइलमध्ये शूट केला. यानंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्ण्यात आला. मात्र, हेल्मेट नसल्याने पोलिसांकडून दुचाकीस्वारास बेदम मारहाण, अशी जोड त्याला देण्यात आली.

या सर्व घटनेबाबत वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त अशोक नखाते यांनी सांगितले, की काही खोडसाळ प्रवृत्तीचे लोक जाणीवपूर्वक असे कृत्य सातत्याने करीत आहे. ट्रिपलशीट जाणाऱ्या दुचाकीस्वाराची, त्याच्याकडून झालेल्या अपघाताची आणि जखमी पोलिस अधिकाऱ्याची वस्तुस्थिती लपवून ठेवत फक्त हेल्मेट कारवाई बदनाम कशी होईल, यासाठी प्रयत्न होतात. हा व्हिडिओ शूट करणाऱ्या संशयिताची माहिती आमच्याकडे आली असून, तसे पुरावे सुद्धा संकलित केले जात आहे. संशयितांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे.

सोशल मीडियाचा वापर करण्याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. मात्र, त्याद्वारे एखाद्या व्यक्तीची, घटकाची अथवा विभागाची बदनामी करता येणार नाही.

- अशोक नखाते,

सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images