Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

रस्त्यांची दैना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रविवारी झालेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, जागोजागी खड्डे पडले आहेत. शहराबरोबरच महामार्गावरदेखील खड्डे पडले असून, लोकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. महापालिकेने याची दखल घेऊन तातडीने खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे.

मुसळधार पावसामुळे शहराच्या अनेक भागातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. बॉइज टाऊन शाळेजवळ पाण्याचा व्हॉल्व्ह बसविण्यासाटी मोठा खड्डा केला होता. हा खड्डा बुजवताना हलगर्जीपणा केल्याचे दिसते आहे. यावर केवळ माती टाकण्यात आली. ही माती पावसाने खचून या ठिकाणी खड्डा तयार झाला आहे. त्याचप्रमाणे याच रस्त्यावर महावितरणच्या कार्यालयाजवळ पूर्वी खोदले होते. त्या ठिकाणीही खड्डा झाला आहे. एमराल्ड हॉटेलकडून मायको सर्कलकडे वळताना सिग्नलवर पाणी साचले आहे.

नाशिक-पुणे महामार्गावर उपनगर सिग्नलवर तसेच द्वारका सर्कल परिसरात मोठे खड्डे आहेत. अशोकस्तंभावर स्मार्ट सिटी योजनेंतर्गत काम सुरू आहे. येथील खड्डे बुजवावेत, अशी अनेकदा मागणी करण्यात आली. मात्र कुणीही दखल घेतली नाही. अनेकदा येथे वाहतूक पोलिस माती टाकून डागडुजी करीत असतात. अशीच काहीशी परिस्थिती रविवार कारंजा व पंचवटी परिसरात आहे. या खड्ड्यांबाबत काही आंदोलनकर्त्यांनी तर थेट पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवसेनेचा भाजपला ‘गुगली’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्थायी समितीवरील भाजपच्या कोट्यातील एका रिक्त जागेसाठी भाजपमध्येच मोठी रस्सीखेच असताना शिवसेनेने भाजपला पुन्हा युतीधर्माची आठवण करून देत रिक्त जागेवर 'रिपाइं'ला संधी देण्याची मागणी करीत 'गुगली' टाकला आहे. भाजप आता तो कसा टोलवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

केंद्रात आणि राज्यात 'रिपाइं' युतीसोबत असल्याने दीक्षा लोंढे यांना स्थायीच्या सदस्यपदाची संधी द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी महापौरांसह भाजपच्या शहराध्यक्षांकडे केली आहे. त्यामुळे भाजपची पुन्हा कोंडी झाली असून, आधीच पक्षांतर्गत इच्छुकांची संख्या मोठी असल्याने एका सदस्याची निवड भाजपसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. स्थायी समितीच्या एका रिक्त जागेसह चार विषय समित्यांच्या सदस्य निवडीसाठी आज, मंगळवारी (दि. ९) विशेष महासभा बोलावण्यात आली आहे. प्रभाग '१० ड'मधील भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुदाम नागरे यांच्या निधनामुळे भाजपचे स्थायी समितीमधील बहुमत धोक्यात आले होते. १२१ सदस्य संख्येनुसार स्थायीमध्ये शिवसेनेचा एक सदस्य वाढणार होता. त्यासाठी शिवसेनेने हायकोर्टापर्यंत धाव घेतली होती. परंतु, भाजपने आस्तेकदम भूमिका घेत प्रभाग १० ची पोटनिवडणूक बिनविरोध करवून घेत संख्याबळ कायम राखले. त्यामुळे शिवसेनेचा स्थायीवरचा दावा फेटाळला गेला आहे. परंतु, तरीही शिवसेनेने या पोटनिवडणुकीत भाजपला पाठिंबा दिल्याने सातपूर प्रभाग समितीचे सभापतिपद पदरात पाडून घेतले. मात्र, स्थायी समितीचे सदस्यपद न मिळाल्याची सल कायम राहिलेल्या शिवसेनेने पुन्हा भाजपसमोर गुगली टाकला आहे.

भाजपमध्येच रस्सीखेच

स्थायी समितीतील एका रिक्त जागेसाठी भाजपमध्येच मोठी रस्सीखेच आहे. तीनही आमदारांकडून आपल्या समर्थकांची वर्णी लागावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याने आधीच पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढली असतानाच विरोधी पक्षनेते बोरस्ते यांनी स्थायीचे एक रिक्त पद 'रिपाइं'ला द्यावे, अशी मागणी केली आहे. केंद्र आणि राज्यात, तसेच नाशिकमध्येही युतीसोबत असलेल्या 'रिपाइं'ला संधी देण्याची मागणी करीत शिवसेनेने भाजपची चांगलीच कोंडी केली आहे. त्यामुळे महापौर रंजना भानसी, शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप यांच्यासमोर धर्मसंकट उभे राहिले आहे.

-

पालकमंत्री घेणार निर्णय

भाजपच्या कोट्यातील एका रिक्त जागेसाठी आपलाच समर्थक जावा यासाठी भाजपच्या तीनही आमदारांमद्ये स्पर्धा आहे. एका सदस्यसाठी तीनही आमदारांचे एकमत होत नसल्याने पक्षाची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे यासंदर्भातील अंतिम निर्णय आता पालकमंत्री गिरीश महाजन घेणार आहेत. महाजन सकाळी दहा वाजता संघटनमंत्री किशोर काळकर यांच्याकडे एका सदस्याचे नाव देणार आहेत. भाजपमधील रस्सीखेच वाढली, तर ऐनवेळी मित्रपक्षालाही संधी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे एका सदस्याचा फैसला आता सकाळीच होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीवाशी खेळ!

$
0
0

पर्यटकांची सोमेश्वर धबधब्यावर गर्दी; सुरक्षेचे नियम पायदळी

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पावसाचा जोर वाढल्याने सोमेश्वर धबधबा खळाळला असून, रविवारसह सोमवारी (दि. ८) देखील पर्यटकांनी धबधबा परिसरात गर्दी केली. निसर्गसौंदर्य न्याहाळताना धोकादायक ठिकाणी सेल्फी आणि फोटो काढण्याच्या मोहापायी पर्यटक स्वत:च्या जीवाचीही पर्वा करीत नसल्याचे दिसून येत होते. यामुळे 'नो सेल्फी झोन'च्या अंमलबजावणीसाठी प्रशासन ठोस पावले उचलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्याने सोमेश्वर येथील धबधबा खळाळून वाहत आहे. धबधब्याचे हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी तरुणाईच नव्हे, तर अबालवृध्दांनी या ठिकाणी सोमवारी गर्दी केली. मात्र, यावेळी धोकादायक ठिकाणी जाऊन फोटो आणि सेल्फी घेण्याचा मोह बहुतांश पर्यटकांना अनावर झाल्याचा दिसला. उंचावरून कोसळणारा धबधबा पाहताना, धबधब्याच्या पायथ्याशी जात जीव धोक्यात घालून फोटो काढणाऱ्यांची संख्याही अधिक होती. शिवाय धबधब्याच्या ठिकाणी निसरडी वाट असूनही, पालक लहानमुलांना घेऊन जात होते. चिमुकल्यांच्या जीवाचीही पर्वा न करता, धबधब्याच्या पाण्यात आणि दगडांच्या कडेला उभे राहत फोटो काढणारे पालक यावेळी दिसून आले.

...

सुरक्षितता नाहीच

सोमेश्वर धबधब्याच्या पायथ्याशी जाणारी वाट पूर्णत: निसरडी झाली आहे. असे असूनही धबधब्याच्या पाण्यातील दगडांवर जात फोटो घेण्याचे स्टंट पर्यटकांनी केले. तसेच संरक्षक जाळ्यादेखील तुटक्या अवस्थेत आहेत.

...

बीट मार्शलचा वॉच

सोमेश्वर धबधबा परिसरात पर्यटकांची गर्दी झाल्याने, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गंगापूर पोलिस स्टेशनच्या बीट मार्शलचा वॉच ठेवण्यात आला. यावेळी 'सेल्फी काढू नका, फोटो काढण्याच्या नादात अपघात होऊ शकतो, त्यामुळे जीव सांभाळा', असे आवाहन पोलिसांनी केले. तरीदेखील सेल्फीच्या मोहात पडलेल्या पर्यटकांनी पोलिसांना दाद न देता, जीव धोक्यात घालून फोटो काढणे पसंत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुप्तांच्या अर्जावर आज होणार सुनावणी

$
0
0

गुप्तांच्या अर्जावर

आज होणार सुनावणी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बांधकाम व्यावसायिक सुजय गुप्ता यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सरकारी व बचाव पक्षाने सोमवारी जोरदार युक्तीवाद केला. यानंतर कोर्टाने आपला फैसला राखून ठेवला आहे. याबाबत कोर्ट मंगळवारी (दि. ९) निर्णय देण्याची शक्यता आहे. बांधकाम साईटवरील मजुरांसाठी बांधलेली पाण्याची टाकी कोसळून चार जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी गुप्ता यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

गंगापूर रोडवरील ध्रुवनगर येथील बांधकाम प्रकल्पात ही दुर्घटना घडली होती. यात चौघा कामगारांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी गंगापूररोड पोलिस ठाण्यात श्वेता इन्फ्रास्ट्रक्चर अॅण्ड हौसिंग इंडियाचे सुजय गुप्ता, आरसीसी कॉन्ट्रॅक्टर भावीन नवीनभाई पटेल (वय ३४), लेबर कॉन्ट्रॅक्टर आशिष अनिलकुमार सिंग (वय २६, रा. जगतापनगर, उंटवाडी) आणि प्रोजेक्ट मॅनेजर सचिन सुरेश शेवडे (वय ४४, रा. इंदिरानगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील गुप्ता वगळता इतरांना लागलीच अटक झाली होती.

गुप्ता यांनी अटकपूर्व जामीनासाठी अॅड. जयदीप वैशंपायन यांच्यावतीने जिल्हा कोर्टात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सोमवारी सुनावणी झाली. दोन्ही पक्षांनी जोरदार युक्तीवाद केला. मात्र, कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला. हा निर्णय मंगळवारी होऊ शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एनटीपीएस क्लबच्या खेळाडूंना ट्रॅक सूट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक एकलहरे भागात कार्यरत असलेल्या एनटीपीएस स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंचा उत्साह वाढावा यासाठी नाशिक औष्णिक विद्युत केंद्राच्यावतीने ट्रॅक सूट भेट देण्यात आले. यावेळी एकलहरेचे मुख्य अभियंता उमाकांत निखारे, उप-मुख्य अभियंता मोहन आव्हाड, प्रभारी उप मुख्य अभियंता राकेश कमटमकर, अधीक्षक अभियंता मनोहर तायडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता विवेक मोरे यांच्या हस्ते खेळाडूंना ही भेट देण्यात आली. या क्लबच्या माध्यमातून परिसरातील खेळाडूंना विविध खेळाचे प्रशिक्षण दिले जाते. या सुविधेमुळे खेळामध्ये आवड असलेल्या मुलांमुलींना फायदा होत आहे. यावेळी मुख्य अभियंता, उमाकांत निखारे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. तसेच मुलांना प्रशिक्षण देणाऱ्या एनटीपीएस क्लबच्या प्रशिक्षकांचे कौतुक केले. याप्रसंगी एनटीपीएस स्पोर्ट्स क्लबचे व्हॉलीबॉल प्रशिक्षक मनोज म्हस्के, क्रीडा शिक्षक मधुकर वाघ, वसंत मुरकुटे, स्वप्निल पाटील, शशांक केसारखाने आदी सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक मनोज म्हस्के यांनी केले. आभार बंडू जमदाडे यांनी

मानले तर मधुकर वाघ यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंगापूर धरणात ३५ टक्के पाणी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणातील पाणीसाठा २० टक्क्यांनी वाढून ३५ टक्क्यांवर पोहोचला आहे. जिल्ह्यातील धरणांमधील एकूण पाणीसाठाही सहा टक्क्यांनी वाढला असून, पावसामुळे धरणांमध्ये चार टीएमसी एवढे अतिरक्त पाणी उपलब्ध झाले आहे.

गेल्या दोन दिवसांत नाशिकसह त्र्यंबकेश्वर, इगतपुरीत रेकॉर्डब्रेक पाऊस झाला. यामुळे गंगापूर धरण समूहामधील पाणीसाठा १२ वरून २८ टक्क्यांवर पोहोचला आहे. रविवारी सकाळी या धरण समूहामध्ये १२२० दलघफू पाणीसाठा उपलब्ध होता. आजमितीस २८९१ दलघफू पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. गंगापूर धरणातील पाणीसाठा १५ वरून थेट ३५ टक्क्यांवर पोहोचला आहे. काश्यपी १५, तर गौतमी गोदावरी आणि आळंदी धरणातील पाणीसाठ्यात १२ आणि ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जिल्ह्यात मध्यम आणि मोठ्या आकाराची मिळून २४ धरणे आहेत. या धरणांमध्ये आठ टक्क्यांवरून १४ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा पोहोचल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

...

पालखेड धरण समूहालाही लाभ

पालखेड, करंजवण आणि वाघाड या धरणांमधील पाणीपातळी अनुक्रमे चार, एक आणि सहा टक्क्यांनी वाढली आहे. दारणा धरणात आजमितीस २ हजार ९६३ दशलक्ष घनफूट एवढा पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. भावलीतील पाणीसाठा पाच टक्क्यांनी, तर मुकणेतील पाणीसाठा नऊ टक्क्यांनी वाढला आहे. कडवा धरणातील पाणीसाठाही आठ टक्क्यांनी तर पुनद धरणातील पाणीसाठा दोन टक्क्यांनी वाढून तीन टक्क्यांवर पोहोचला आहे.

-

धरण उपलब्ध पाणीसाठा (दलघफू) रविवारची टक्केवारी सोमवारची टक्केवारी

गंगापूर १९०६ १५ ३५

काश्यपी ४५३ ०९ २४

गौतमी गोदावरी ३९८ ०९ २१

आळंदी १३४ ०३ १४

पालखेड १२० १४ १८

करंजवण ११७ ०१ ०२

वाघाड १४३ ० ०६

ओझरखेड ०५३ ०२ ०२

पुणेगाव ०० ०० ००

तिसगाव ०० ०० ००

दारणा २७४६ २६ ४२

भावली ५९९ ३४ ४२

मुकणे ८६८ ०३ १२

वालदेवी ०३७ ०२ ०३

कडवा १३३ ०० ०८

नांदूरमध्यमेश्वर १४० ०० ५४

भोजापूर ०० ०० ००

चणकापूर ०० ०० ००

हरणबारी ३० ०३ ०३

केळझर ०० ०० ००

नागासाक्या ०० ०० ००

गिरणा १३७४ ०७ ०७

पुनद ३६ ०१ ०३

माणिकपुंज ०० ०० ००

एकूण ९४६६ ०८ १४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीकपात तूर्त कायम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या दोन दिवसांपासून गंगापूर आणि दारणा धरणाच्या लाभक्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणसाठ्यात वाढ झाली आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी प्रशासनावर पाणीकपात रद्द करण्यासाठी दबाव वाढवला आहे. परंतु, धरणात समाधानकारक साठा होत नाही, तोपर्यंत कपात कायम ठेवण्याचा निर्णय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासह महापौर रंजना भानसी यांनी कायम ठेवला आहे. त्यामुळे तुर्तास तरी धरणासाठा ६० टक्क्यांच्या वर जाईपर्यंत पाणीकपात रद्द होणार नसल्याचे चित्र आहे.

दोन दिवसांत गंगापूर धरणाचा साठा ३५ टक्के, तर दारणा धरणाचा साठा ४२ टक्क्यांवर पोहचला आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, अपक्ष नगरसेवक गुरुमीत बग्गा यांनी महापौरांकडे पाणीकपात रद्द करण्याची मागणी केली. निदान गुरुवारचा ड्राय डे रद्द करून संपूर्ण शहरात एकच वेळ पाणीपुरवठा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. परंतु, महापौरांनी मागणी फेटाळली. समाधानाकारक पाणी साठा होत नाही, तोपर्यंत कपात रद्द केली जाणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले. आयुक्त राधाकृष्ण गमे यांनीही ही मागणी फेटाळून लावली आहे. येत्या दोन दिवसांत आणखी पाणीसाठा वाढला, तर गुरुवारी सुरू असलेला संपूर्ण एक दिवसाचा पाणीपुरवठा रद्द करण्याची शक्यता आहे. त्याबाबत बुधवारी निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर आली धावून, शेत गेलं वाहून!

$
0
0

मुळेगाव (ता. त्र्यंबकेश्वर) येथे बंधाऱ्याच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

...

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे मुळेगाव (ता. त्र्यंबकेश्वर) येथे कोल्हापुरी बंधाऱ्याला आलेल्या पुराने सलग दुसऱ्या वर्षी शेतकऱ्यांची भातशेती वाहून गेली आहे. पाण्यामुळे शेतीला भगदाड पडले असून, बांधबंदिस्ती फुटली आहे. भाताच्या रोपवाटिका गाळाखाली दबल्या गेल्या आहेत. मिलनवाडी या मुळेगावच्या वस्तीला पाणीपुरवठा करणारी विहीर या वाहून आलेल्या गाळमातीने बुजून गेली आहे. जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणाचा फटका या शेतकऱ्यांना बसला आहे.

गतवर्षी मुळेगाव येथे वालदेवी नदीवर बांधलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याने अडवलेले पाणी थेट भात आवनांमध्ये शिरले आणि जवळपास आठ एकर भातक्षेत्र धुवून नेले होते. त्र्यंबक पंचायत समितीचे माजी सभापती देवराम रामभाऊ भस्मे, शंकर सखाराम रामसे, संपत धर्मा भस्मे या तीन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सुमारे दोनशे पोते भात पिकवणारी जमीन नापीक झाली होती. याबबत शेतकऱ्यांनी तक्रार केली, पंचनामे झाले मात्र सर्व परिस्थिती जैसे थे राहिली.

उन्हाळ्यात शंकर रामसे व संपत भस्मे यांनी कर्ज काढून शेतीची पुन्हा बांधबंदिस्ती केली. त्यावेळेस कोल्हापुरी बंधाऱ्याची उंची कमी करण्याचे आणि जमीन बांधणीसाठी होणारा खर्च भरून देण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी या शेतकऱ्यांना दिले होते. मात्र पुढे काही झाले नाही. रविवार (७ जुलै) च्या पावसात कोल्हापुरी बांधाऱ्याच्या पुराच्या पाण्याला रस्ता न मिळाल्याने ते शेजारच्या आवनांमधून वाहत गेले. यामुळे बांधबंदिस्ती फुटली. भाताच्या रोपवाटिका गाळाखाली दबल्या गेल्या आहेत. मिलनवाडी या मुळेगावच्या वस्तीला पाणीपुरवठा करणारी विहीर या वाहून आलेल्या गाळमातीने बुजून गेली आहे. येथे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. यावर्षी पुन्हा झालेल्या नुकसानीने हे शेतकरी कुटुंब हतबल झाले आहे. जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे तसेच, कृषी विभागाने याकडे लक्ष दिले नाही, तर आपण जिल्हाधिकारी यांना भेटणार असल्याचे या कुटुंबाचे म्हणणे आहे. शासकीय निष्काळजीपणाचा फटका या कुटुंबाला बसत आहे.

...

बंधाऱ्याची भिंतीची उंची अधिक

जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाने कोल्हापुरी बंधाऱ्यासाठी निवडलेली जागा चुकीची आहे. तसेच, त्याची बांधणी करताना लगतची भिंत चुकीच्या बाजूने बांधली आहे. भितींची उंचीही अधिक आहे. पाण्याचा प्रवाह आल्यास जास्तीचे पाणी या बंधाऱ्याच्या भिंतीवरून न वाहता ते शेजारच्या आवनांत शिरते. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बच्छाव, शिंदेची बदली

$
0
0

नाशिक : महापालिकेचे मुख्य लेखा परीक्षक महेश बच्छाव तसेच मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुहास शिंदे यांच्या बदलीचे आदेश अखेर शासनाने सोमवारी जारी केले आहेत. बच्छाव यांची नाशिक जिल्हा परिषदेतील मुख्य लेखा व वित्त अधिकारी या पदावर बदली करण्यात आली आहे. या पदावरील बी. जी. सोनकांबळे यांची यापूर्वीच पालिकेच्या मुख्य लेखा परीक्षकपदी बदली झाली आहे. बच्छाव यांच्या पाठोपाठ सुहास शिंदे यांची नवी मुंबईतील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियानाच्या उपसंचालक पदावर बदली झाली आहे. त्यांच्या बदलीनंतर महापालिकेतील मुख्य लेखा व वित्त अधिकारीपदाची जागा मात्र रिक्त झाली असून, अद्याप या जागेवर शासनाने पर्यायी अधिकारी दिलेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदार पवारांच्या हस्ते सुरगाण्यात वृक्षारोपण

$
0
0

खासदार पवारांच्या हस्ते

सुरगाण्यात वृक्षारोपण

नाशिकरोड : सुरगाणा वनपरीक्षेत्र कार्यालयातर्फे दोन ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम झाला. मौजे भदर येथे खासदार भारती पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. सुरगाण्याचे नगरसेवक रमेश थोरात, पंचायत समिती सदस्य एन. डी. गावीत, उपवनसंरक्षक तुषार चव्हाण, सहाय्यक वनसंरक्षक सुजीत नेवसे, वनक्षेत्रपाल योगेश सातपुते, राहुल घरटे आदी उपस्थित होते. महाराष्ट्र-गुजरात सीमेवर सापुता-यालगतच्या मौजे श्रीभुवन येथे आमदार जीवा पांडु गावित यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सुरगाणा वनपरीक्षेत्र कार्यालय परिसरात 'माझे छोटसं जंगल' या उपक्रमातंर्गत विविध झाडांची लागवड करण्यात आली आहे. यावेळी संयुक्त वन व्यवस्थापन समिती सदस्य, वनपाल, वनरक्षक, वनकर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रगतीच्या विरोधात परिवर्तनने ठोकला शड्डू

$
0
0

अध्यक्षपदासाठी आव्हाड-थोरेंमध्ये लढत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी लढतींचे चित्र स्पष्ट झाले. अध्यक्षपदासाठी कोंडाजी आव्हाड व पंढरीनाथ थोरे यांच्यात तर सरचिटणीसपदासाठी हेमंत धात्रक व अभिजीत दिघोळे यांच्यात थेट लढत होणार आहे. सत्ताधारी गटाने या निवडणुकीसाठी प्रगती पॅनलची तर विरोधी गटाने परिवर्तन पॅनलची स्थापना केली आहे.

अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी ३३३ पैकी २६२ उमेदवारांनी माघार घेतली. आता २९ जागांसाठी ७१ उमेदवार रिंगणात आहेत. सत्ताधारी गटातून कोंडाजी आव्हाड, हेमंत धात्रक यांच्या नेतृत्त्वाखाली प्रगती पॅनल तर पंढरीनाथ थोरे, माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या नेतृत्त्वाखाली परिवर्तन पॅनलची घोषणा करण्यात आली. उमेदवारांची अंतिम यादी मंगळवारी (दि. ९) प्रसिद्ध केली जाणार आहे. यावेळी चिन्हांचे वाटपही होणार असल्याची माहिती निवडणूक मंडळाचे अध्यक्ष ॲड. गजेंद्र सानप यांनी दिली.

अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, सहचिटणीस, विश्वस्त व तालुका संचालक अशा २९ जागांसाठी ४३१ अर्ज दाखल झाले होते. अर्ज छाननीत ४४ अर्ज अवैध ठरल्याने ३७३ जणांचे अर्ज उरले. यातील ८ उमेदवारांनी लवादाकडे दाद मागितली होती. यातील ३ अर्ज वैध धरले, तर ५ अर्ज अवैध ठरविण्यात आले. माघारीच्या अखेरच्या दिवशी विविध जागांसाठी २६२ जणांनी माघार घेतली.

यामध्ये शिल्लक उमेदवारांसह अध्यक्ष : २, उपाध्यक्ष ; ३, सरचिटणीस : २, सहचिटणीस : २, विश्वस्त (६ जागा) : १४, नाशिक प्रतिनिधी (४ जागा) : १२, सिन्नर (३ जागा) : ८, दिंडोरी (३ जागा) : ८, निफाड (३ जागा) : ६, येवला- (२ जागा) : ५, नांदगाव (२ जागा) : ४ व महिला प्रतिनिधी (२ जागा) : ५ उमेदवार आहेत. उमेदवारांची अंतिम यादी मंगळवारी सकाळी ११ वाजता प्रसिद्ध झाल्यानंतर दुपारी ४ वाजता निवडणूक चिन्हाचे वाटप होईल.

माघारीनंतर सत्ताधाऱ्यांनी ९ नवीन चेहऱ्यांना संधी देत प्रगती पॅनल उमेदवारांची घोषणा कोंडाजी आव्हाड व हेमंत धात्रक यांनी केली. सत्ताधाऱ्यांविरोधात एकवटलेल्या विरोधकांनी एकत्र येत परिवर्तन पॅनलची घोषणा तुकाराम दिघोळे व पंढरीनाथ थोरे यांनी केली. मात्र, पॅनलची घोषणा करताना उमेदवारी निश्चितीवरून झालेल्या मतभेदांचा सामना 'परिवर्तन'च्या समन्वयकांना करावा लागला. परिणामी सायंकाळी उशिरा पॅनलची घोषणा करण्यात आली.

\Bप्रगती पॅनल\B \Bउमेदवार \B:

\Bअध्यक्ष : \Bकोंडाजी मामा आव्हाड, उपाध्यक्ष : प्रभाकर धात्रक, सरचिटणीस : हेमंत धात्रक, सहचिटणीस : तानाजी जायभावे,

विश्वस्त : बाळासाहेब गामणे, डॉ. धर्माजी बोडके, बबनराव सानप, बाळासाहेब चकोर, रामप्रसाद कातकाडे, विठ्ठलराव पालवे,

नाशिक प्रतिनिधी : माणिकराव सोनवणे, महेंद्र आव्हाड, प्रकाश घुगे, गोकुळ काकड,

दिंडोरी प्रतिनिधी : कचरू आव्हाड, शरद बोडके, भालचंद्र दरगोडे,

सिन्नर प्रतिनिधी : हेमंत नाईक. पी. पी. आव्हाड, गणेश घुले,

निफाड प्रतिनिधी : रामनाथ नागरे, भगवान सानप, गणपत केदार,

येवला : संपत वाघ व दिनेश आव्हाड,

नांदगाव प्रतिनिधी : विजय इप्पर व रमेश बोडके,

महिला प्रतिनिधी : अरुणा कराड, आक्काबाई सोनवणे.

\B

परिवर्तन पॅनल उमेदवार : \B

अध्यक्ष : पंढरीनाथ थोरे, उपाध्यक्ष : ॲड. पी. आर. गिते, सरचिटणीस : अभिजीत दिघोळे, सहचिटणीस : मनोज बुरकुल,

विश्वस्त : भास्कर सोनवणे, दामोदर मानकर, दिगंबर गिते, बाळासाहेब वाघ, सुभाष कराड, ॲड. अशोक आव्हाड,

नाशिक प्रतिनिधी : मंगेश नागरे, विलास आव्हाड, सुरेश घुगे, विष्णू नागरे,

दिंडोरी प्रतिनिधी : दौलत बोडके, शामराव बोडके, भगंवत चकोर,

सिन्नर प्रतिनिधी : रामनाथ बोडके, उत्तम बोडके, अशोक भाबड,

निफाड प्रतिनिधी : अशोक नागरे, ॲड. सुधाकर कराड, विठोबा फडे,

येवला प्रतिनिधी : तुळशीराम विंचू, विजय सानप,

नांदगाव प्रतिनिधी : ॲड. जंयत सानप, विजय बुरकुल,

महिला प्रतिनिधी : अननाबाई काकड, शोभा बोडके.

\Bसत्ताधाऱ्यांकडून ७ नवीन चेहरे \B

सत्ताधारी प्रगती पॅनलने २८ पैकी ७ विद्यमान संचालकांना डच्चू देत नवीन चेहरे दिले आहेत. यामध्ये ॲड. वाळीबा हाडपे, यशवंत दरगोडे, सुदाम नवाळे, बंडुनाना दराडे, महेश आव्हाड, कविता मानकर, शैलशा बुरकुल यांचा समावेश आहे. तर बाळासाहेब चकोर यांना संचालकपदावरून विश्वस्तपदी बढती देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. डेकाटेंचा आज ‘फैसला’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वेतनवाढ लागू करण्यासाठी लाचेची मागणी केल्याचा आरोप असलेले जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांच्या अटकेबाबत विशेष जिल्हा न्यायालय आज, मंगळवारी (दि. ९) फैसला सुनावणार आहे.

डेकाटेंना काही दिवसांपूर्वी तात्पुरत्या अटकपूर्व जामिनाचा दिलासा मिळाला होता. डेकाटे पुन्हा सेवेत हजर झाल्यास आपल्या जिवाला धोका असल्याबाबतचा अर्ज तक्रारदाराने 'एसीबी'सह भद्रकाली पोलिस ठाण्याला दिला असून, न्यायालय काय निर्णय घेते याकडे जिल्हा परिषदेसह शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. महापालिकेत वादग्रस्त ठरल्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये आरोग्याधिकारी म्हणून दाखल झालेल्या डॉ. डेकाटेंविरुद्ध लाच मागितल्याप्रकरणी 'एसीबी'ने मागील महिन्यात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होण्याची कुणकुण लागल्यापासून डेकाटे रजा टाकून गेले होते. 'एसीबी'ने त्यांची शोधाशोध केली. मात्र, यश मिळाले नाही. यादरम्यान डॉ. डेकाटे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला होता. त्यानुसार काही अटी-शर्तींच्या आधारे आजपर्यंत (दि. ९ जुलै) तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आला होता. याबाबत 'एसीबी' आज आपले म्हणणे कोर्टासमोर ठेवणार आहे.

या घडामोडींबाबत माहिती देताना सूत्रांनी सांगितले, की डॉ. डेकाटे वेगवेगळी कारणे पुढे करून तालुका आरोग्याधिकाऱ्यांसह इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून पैसे मागत होते. 'एसीबी'ने या अधिकाऱ्यांचे जाबजबाब नोंदविले आहेत. तात्पुरता जामीन मिळाल्यानंतर डॉ. डेकाटे यांनी जिल्हा परिषदेमध्ये हजर होण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, फौजदारी गुन्हा दाखल असल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांना रुजू करण्यास नकार दिला. याबाबत जिल्हा परिषदेने शासनाकडे मार्गदर्शन मागविले आहे. दरम्यान, डेकाटे मूळ पदावर हजर झाल्यास फिर्यादीसह साक्षीदारांवर थेट दबाव निर्माण होण्याची शक्यता असल्याने 'एसीबी'नेही त्यास विरोध दर्शविला आहे. या गुन्ह्यातील फिर्यादीने आपल्या जिवाला धोका असल्याबाबतचे पत्रसुद्धा 'एसीबी'सह भद्रकाली पोलिस ठाण्याला सादर केले आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. डेकाटेंच्या अटकपूर्व जामीनावर काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आरोग्यसेवा हा महत्त्वाचा भाग असून, त्यात लाचखोरीचे आरोप होणे ही गंभीर बाब आहे. अशा प्रकरणांमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आणि पुढे रुग्णसेवेवर थेट परिणाम होऊ शकतो. जिल्हा कोर्टाने डेकाटे यांचा अर्ज मंजूर केला, तर याविरोधात हायकोर्टात दाद मागण्याची तयारी 'एसीबी'ने केली असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

होमगार्ड पदासाठी पदवीधरांची ‘भरती’

$
0
0

धुळ्यात १९० जागांसाठी तीन हजार उमेदवार

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरात सोमवारी (दि. ८) होमगार्डसची भरती सुरू करण्यात आली. यामध्ये होमगार्डसाठी थेट एलएलबी, इंजिनीअर्स, बी. एड. झालेल्या उमेदवारांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे, या पदासाठी शिक्षणाची पात्रता दहावी पास असून, पदवीधरांनी हजेरी लावल्याने एकप्रकारे या पदासाठी पदवीधरांची ‘भरती’ आल्याचे चित्र दिसत होते. एकूण १९० जागांसाठी जिल्ह्यातील ३ हजारांहून अधिक उमेदवार आल्याने भरती प्रक्रिया उशिरा सुरू करण्यात आली.

या भरती प्रक्रिसाठी सोमवारी सकाळी १० वाजेअगोदर पोहोचण्याचे सांगण्यात आले होते. सकाळी १० वाजेपर्यंत जिल्ह्यातून आलेल्या पुरुष-महिला उमेदवारांनी कवायत मैदान गाठले. मात्र, काहींना उशिर झाल्याने माघारी फिरावे लागले. या प्रक्रियेवर अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. राजू भूजबळ लक्ष ठेवून आहेत. बेरोजगारी वाढत असल्याने उच्चशिक्षित तरुण-तरुणीदेखील भरतीत सहभागी झाल्याचे दिसून आले. या भरती प्रक्रियेसाठी कवायत मैदानावर सुरुवातीला उमेदवारांची नोंदणी करण्यात आली. जिल्ह्यातील होमगार्डचा अनुशेष भरून काढण्यासाठी ही होमगार्ड भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे. भरती प्रक्रियेला अपेक्षापेक्षा अधिक उमेदवार आले असल्याने पोलिस प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली होती.

काही काळ गोंधळ
या ठिकाणी सकाळी १० वाजता गेट बंद केल्यामुळे उशिरा ग्रामीण भागातून आलेल्या उमेदवारांचा हिरमोड झाला. यातील काहींनी कवायत मैदानाची भिंत ओलांडण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना हुसकावले. त्यामुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. होमगार्ड भरती प्रक्रियेत सुरुवातीला उमेदवाराचे शैक्षणिक कागदपत्रे, रेशनकार्ड, आधारकार्ड, मतदान कार्ड आदी तपासण्यात आले. त्यानंतर सहभागी झालेल्या तरुण उमेदवारांसाठी १६०० मीटर रनिंग तर महिला उमेदवारासांठी ८०० मीटर रनिंग घेण्यात आली. त्यानंतर गोळा फेक, उंची आणि छाती आदी शारीरिक चाचण्या घेण्यात आल्या. प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा अशी ठेवण्यात आली आहे.


जळगावात भरतीची अफवा
जळगाव : जिल्ह्यात येत्या ११ जूलै रोजी सकाळी ७ वाजता होमगार्ड भरती होणार असल्याची बातमी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियातून व्हायरल केली जात आहे. मात्र, अशा प्रकारची कोणतीही भरती अद्याप होऊ घातलेली नाही. त्याचबरोबर जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयाकडून नवीन भरतीबाबत बातमी अद्याप देण्यात आलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियातून भरतीबाबत व्हायरल होणारी माहिती अफवा असून, उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे होमगार्डचे जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलिस अधिक्षक लोहित मतानी यांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकीचोर निघाला कार मॉलचा मालक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिक मार्केट यार्डाच्या कार्यालयासमोरून भरदिवसा दुचाकी चोरी झाली होती. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपली गेली. त्या आधारे पंचवटी गुन्हे शोध पथकाने तपास करीत चोरास पकडले. मात्र, हा चोर एका कार मॉलचा मालक असल्याचे समजल्याने चर्चेला उधाण आले.

कृषी उपन्न बाजार समितीच्या कार्यालयात वरिष्ठ लिपिकपदी कार्यरत असलेले सुनील जाधव यांची कार्यालयाच्या बाहेर लावलेली हिरो होंडा (एमएच १५, एई ७४०४) ही २६ जून रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास चोरी गेली होती. चोरीचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्या आधारे पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. दुचाकी चोर हा बाजार समितीमध्ये येणार असल्याची माहिती बुधवारी (दि. ३) गुप्त बातमीदाराकडून पोलिस शिपाई मयूर हजारी व योगेश ससकर यांना मिळाली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक के. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक रामदास भडांगे, पोलिस शिपाई मयूर हजारी व योगेश ससकर यांनी सापळा रचून बाजार समितीच्या आवारातून संशयित किरण दैने (वय ३५, रा. सातभाई सिग्नल, जेलरोड) यास ताब्यात घेतले. या कामी त्यांना मार्केट यार्डचे सिक्युरिटी अधिकारी प्रसाद पोपसे यांची मदत मिळाली. ताब्यात घेतल्यानंतर चौकशी केली असता संशयित किरण हा मल्हार कार मॉलचा मालक असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ओपीं’च्या गितांनी जागल्या सुनहरी यादें

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

म्युझिकही तोच देणार, गाणीही तोच म्हणणार आणि माहितीही तोच सांगणार असा त्रिवेणी संगम जुळून आला तो भरतभाई भाटिया यांच्या कार्यक्रमामध्ये. बाबाज् थिएटरच्या वतीने आयोजित 'सुनहरी यादें' या उपक्रमात 'एक शाम जादुगर संगीतकार ओ. पी. नय्यर के नाम' ही मैफल रंगली. यात भरतभाई गाणी गाण्यासह स्वत: वेगवेगळे आवाज काढून त्याला म्युझिकही देत होते. सोबत नय्यरसाहेबांची पूरक माहिती पुरवत मैफलीत त्यांनी अधिक रंगत आणली.

हा बहारदार कार्यक्रम रविवारी झाला. केवळ जुन्नरे यांच्या आग्रहाखातर आज पहिल्यांदा स्टेजवर परफॉर्मन्स करीत असल्याचे सांगत भाटिया यांनी नय्यर साहेबांच्या गाण्याची वैशिष्ट्ये सांगितली. 'त्यांचे गाणे हे म्युझिकने सुरू होते', असे सांगत ते म्युझिक अक्षरश: तोंडाने काढून दाखवत, घोड्यांच्या टापांचा आवाज, तानपुरा, पियानोचा आवाज तसेच दीर्घकाळ शिटी असे अनेक वेगवेगळे आवाज भाटिया यांनी सादर केले. 'माँग के साथ तुम्हारा मैने माँग लिया संसार', 'कजरा मोहब्बतवाला, अँखियोंमे ऐसा डाला' अशी दिलबहार गाणे सादर करीत भाटियांनी प्रेक्षकांना जिंकून घेतले. १९५४ मध्ये संगीतबद्ध केलेला 'आरपार' नय्यर साहेबांची नैय्या पार करणारा ठरला. १९६० पर्यंत त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले. प्रत्येक चित्रपटात आठ ते दहा गाणी वेगवेगळ्या चालीचे देणे, ते ही कोणत्याही संगीताच्या शिक्षणाशिवाय असे त्यांचे वैशिष्ट्य भाटिया यांनी सांगितले. नय्यर साहेबांना उडत्या चालीचे गाणी देणारे संगीतकार म्हणून ओळख झाली अशी माहिती देत भाटिया यांनी काही गाणी सादर केली.

कृतज्ञता पुरस्काराने गौरव

ज्येष्ठ रंगकर्मी रेखा केतकर, एन. सी. देशपांडे आणि संगीतकार ध्रुवकुमार तेजाळे यांचा मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाच्या प्रारंभी कृतज्ञता पुरस्काराने सन्मान करण्यात आला. मंचावर नगरसेविका वत्सला खैरे, नरेश कारडा, जयप्रकाश जातेगावकर, बाबाज् थिएटरचे प्रशांत जुन्नरे, राजेश पिंगळे, मधुकर झेंडे, उत्तमराव तांबे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सुनील पिंपळे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आरटीईची आज तिसरी लॉटरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार २५ टक्के राखीव जागांवर ऑनलाइन पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत असून, आज (दि. १०) तिसरी लॉटरी काढण्यात येणार आहे.

लॉटरीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एसएमएस पाठविण्यात येणार आहेत. असे असले तरी एसएमएसवर अवलंबून न राहता वेबसाइटवर जाऊन अॅप्लिकेशन वाइज डिटेल्स या पर्यायामध्ये जाऊन अर्ज क्रमांक टाकून लॉटरी लागली आहे का हे तपासावे, असे आवाहन पुणे येथील प्राथमिक विभागाचे शिक्षण उपसंचालक हारूण अत्तार यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. डेकाटेंची सुनावणी लांबणीवर

$
0
0

१६ जुलैला निकालाची शक्यता

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लाचखोरीच्या गुन्ह्यात डॉ. विजय डेकाटे यांनी सादर केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी १६ जुलैपर्यंत लांबली आहे. या अर्जावर अॅण्टी करप्शन ब्यूरो (एसीबी) आपले म्हणणे मांडणार आहे. मंगळवारी (दि. ९) यावर निकाल होण्याची शक्यता होती. मात्र, तांत्रिक कारणांमुळे सुनावणी होऊ शकली नाही.

जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. डेकाटे यांनी तालुका आरोग्याधिकाऱ्याकडून लाच मागितल्याप्रकरणी अॅण्टी करप्शन ब्यूरोने (एसीबी) मागील महिन्यात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होण्याची कुणकुण लागल्यापासून डेकाटे रजा टाकून गेले होते. एसीबीने त्यांची शोधाशोध केली, मात्र यश मिळाले नाही. याच दरम्यान डॉ. डेकाटे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला होता. त्यानुसार काही अटी शर्थींच्या आधारे ९ जुलैपर्यंत तात्पुरता जामीन मंजूर केला होता. मंगळवारी एसीबी आपले म्हणणे मांडणार होते. एसीबीच्या युक्तिवादानंतर डेकाटे यांना अटक होणार की नाही, हे स्पष्ट होणार आहे. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे मंगळवारी कोर्टात सुनावणी झाली नाही. आता याबाबतची पुढील कार्यवाही १६ जुलै रोजी पार पडणार आहे. तोपर्यंत यापूर्वीचा आदेश कायम राहिला आहे.

वेगवेगळी कारणे पुढे करून तालुका आरोग्याधिकाऱ्यांसह इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून पैसे मागत असल्याचा डॉ. डेकाटे यांच्यावर आरोप आहे. एसीबीने त्यादृष्टीने सर्वांचे जाबजवाब यापूर्वीच नोंदवले आहेत. तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर डॉ. डेकाटे यांनी जिल्हा परिषदेमध्ये हजर होण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, फौजदारी गुन्हा दाखल असल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने त्यांना रूजू करण्यास नकार दिला. याबाबत जिल्हा परिषदेने शासनाकडे मार्गदर्शन मागविले आहे.

...

एसीबीकडून विरोध

डॉ. डेकाटे मूळ पदावर हजर झाल्यास फिर्यादीसह साक्षीदारांवर थेट दबाव निर्माण होण्याची शक्यता असल्याने एसीबीकडून विरोध दर्शविला जात आहे. या गुन्ह्यातील फिर्यादीने आपल्या जीवाला धोका असल्याबाबतचे पत्रसुद्धा एसीबीसह भद्रकाली पोलिस ठाण्याला सादर केले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर डॉ. डेकोटेच्या अटकपूर्व जामिनावर काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठांमध्ये नेतृत्वबांधणी

$
0
0

कॉलेज \Bकॅम्पसमध्ये \B२७ वर्षांनंतर \Bनिवडणुका

\B

jitendra.tarte@timesgroup.com

jitendratarte@MT

नाशिक : दंगे आणि गुन्हेगारीस प्रोत्साहन देणाऱ्या घटनांमुळे तब्बल २७ वर्षांपासून बंद करण्यात आलेल्या खुल्या निवडणुका यंदा कॅम्पसमध्ये पार पडणार आहेत. राज्य सरकारने या निवडणुकांबाबत गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये परिनियम जाहीर केला होता. याची अंमलबजावणी चालू शैक्षणिक वर्षात होणार आहे. त्यादृष्टीने प्रशासकीय तयारी करण्यासाठी शिक्षण संचालनालयाच्या निर्देशांनुसार विद्यापीठांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

कॅम्पसमध्ये यापूर्वी खुल्या निवडणुका १९९२ मध्ये झाल्या होत्या. यानंतर सरकारने निवडणुकांवर रोख लावत कॉलेजांमध्ये गुणवत्तेनुसार प्रतिनिधींची निवड केली जात होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानेही गुरुवारी (दि.११) याच विषयासंदर्भात पुण्यासह नाशिक आणि नगर जिल्ह्यातील प्राचार्यांची बैठक बोलावली आहे. इतक्या दीर्घ कालावधीनंतर कॉलेजांमध्ये पार पडणाऱ्या खुल्या निवडणुकांचा विषय गांभीर्याने घेण्याच्या सूचनाही विद्यापीठाने दिल्या आहेत. विशेष म्हणजे या विषयासंदर्भातील बैठकीसाठी प्राचार्यांनी त्यांचे प्रतिनिधी पुढे न करता स्वत: उपस्थित रहावे, ही पुणे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. या निवडणुकांच्या नियोजनासाठी शैक्षणिक व प्रशासकीय दुवा म्हणून प्राचार्यांवर विद्यापीठाची भिस्त आहे. या बैठकीत विषयासंदर्भाने संवैधानिक आणि व्यावहारिक उपाययोजना सूचविल्या जाव्यात आणि खुली चर्चा घडून यावी या उद्देशाने कॅम्पस निवडणुकांसंदर्भात पुणे विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र विभागात बैठक पार पडणार आहे.

नकारात्मकतेला आळा घालणार

कॅम्पसमधील खुल्या निवडणुकांबाबत विद्यार्थी व संघटनांमध्येही उत्सुकता आहे. या निवडणुकांसाठी विद्यापीठाने तयार केलेली आचारसंहिता आणि नियमावलीची माहिती, निवडणूक रचना या विषयांबाबत प्राचार्यांना तपशीलवार माहिती देण्यात येणार आहे. या निवडणुकांमध्ये गैरप्रकार व गैरप्रवृत्तींचा शिरकाव होऊ नये, यासाठी आचारसंहिताच काटेकोर बनविण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थी उमेदवारास असणाऱ्या खर्चाच्या विशेष मर्यादा, निवडणूक निकालानंतर मिरवणूका न काढण्याचे बंधन, निवडणूक लढविण्यासाठी वयाचे बंधन आदी नियमांमधून नकारात्मक प्रवृत्तींना आळा घालण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएममधून बँकांना गंडा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एटीएम मशिन्समधून पैसे काढतानाच वीज पुरवठा खंडीत केला की, यामुळे पैसे तर मिळायचे पण ही नोंद बँकेत होत नव्हती. त्यामुळे हे आरोपी पुन्हा बँकेकडूनही न मिळालेल्या पैशांसाठी दावा करायचे. एकाच व्यवहारात दोन वेळा पैसे मिळवून ते बँकांची सर्रास फसवणूक करीत होते. या तांत्रिक ज्ञानाचा वापर करीत एटीएममधूनच बँकांना गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात शहर पोलिसांना यश मिळाले असून, ही आंतरराज्य टोळीतील तिघा संशयितांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाबीर रज्जु खान (२८, रा. जलालपूर, फिरोजपूर, हरियाणा), अखलाक अहमद अब्दुल्ला खान (२४, मुंठेता ता. पुन्हाना, हरियाणा) आणि समुन खान (२४, बडकली, फिरोजपूर, हरियाणा) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. शाबीर व अखलाक यांना नागरिकांच्या सहायाने पोलिसांनी जेरबंद केले आहे. समुन खान हा फारार आहे. शनिवारी (दि. ६) सायंकाळी चर्वाक चौकातील युनियन बँकेच्या एटीएममध्ये हा प्रकार घडला होता. पोलिसांनी केलेल्या चौकशीत हा धक्कादायक प्रकार समोर आला. एटीएम मशिन्सबाबत थोडीफार तांत्रिक माहिती संशयितांना आहे. याचाच फायदा घेत एक संशयित आरोपी एटीएम सेंटरमध्ये जाऊन त्यांच्याजवळील एटीएम कार्डद्वारे पैसे काढत असे. ज्यावेळी एटीएम मशिनमधून पैसे निघत त्याच वेळी दुसरा सदस्य एटीएमच्या वीज कनेक्शनचे बटन बंद व चालू करतो. त्यामुळे एटीएममधील सदस्याला पैसे मिळतात. परंतु एटीएम सिस्टीममध्ये पैसे निघाल्याची नोंद होत नाही. एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसणार नाही, याची काळजी घेतली जाते. यानंतर सर्व संशयित त्यांचे ज्या बँकेत खाते आहे, त्या बँकेशी संपर्क साधून पैसे मिळाले नाहीत, अशी तक्रार करून बँकेकडून पुन्हा पैसे उकळतात.

६ जुलै रोजी संशयित त्यांच्या कारने (एचआर २८, एच ५४०४) भोपाळ येथून मुंबईकडे जात असताना सकाळी प्रथम जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील एटीएममध्ये त्यांनी प्रयत्न केला. परंतु या ठिकाणी एटीएमची संख्या जास्त असल्याने तसेच वर्दळ असल्याने त्यांनी तेथून काढता पाय घेतला. संशयित इगतपुरीपर्यंत गेले. मात्र पाऊस जास्त असल्याने ते पुन्हा नाशिककडे वळले. नाशिक येथील इंदिरानगर परिसरात त्यांनी पुन्हा प्रयत्न केला. मात्र, बँकेचे व्यवस्थापक आणि नागरिक यांच्या सतर्कतेमुळे ते पकडले गेले. यावेळी आमदार देवयाणी फरांदे यांनी धाडसाने आपल्या वाहनाद्वारे पाठलाग करून एका संशयितास पकडले होते. तपासामध्ये या आंतरराज्य टोळीच्या इतर सदस्यांची नावे मिळाली असून, लवकरच त्यांना जेरबंद करण्यात येणार असल्याचे पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांनी सांगितले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अंकुश दांडगे अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरामधून ११ जण तडीपार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

परिमंडळ एकमधील ११ जणांना तडीपार करण्याचे आदेश पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी काढले आहेत. यातील एकाच गँगमधील सहा जण हाणामारी गुन्ह्यातील, चौघे जण हाणामारीसंबंधी गुन्ह्यातील आरोपी आहेत.

शरीरिक दुखापत केल्याचे गुन्हे असलेल्यांमध्ये धनंजय गायकवाड, (२०), अक्षय कानडे (२२, दोघे रा. चर्मकार लेन, भद्रकाली), गौरव वाकोडे (३२), प्रतीक काशीद (१८) आणि पिंटू उर्फ यादव धनंजय कानडे (४२, तिघे रा. काझीपुरा, भद्रकाली) यांचा समावेश आहे. त्यांना एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. तसेच शरीरविरुद्ध आणि मालमत्तेविषयी गुन्हे दाखल असलेल्यांमध्ये चंग्या उर्फ सुजीत पगारे (२५, रा. प्रितीपार्क, स्नेहनगर, म्हसरूळ), सादिक उर्फ राजू मेमन (३५, रा. नदिम हॉस्पिटलजवळ, भद्रकाली), विजय वाघमारे (३७) आणि संजय खरात (४०, दोघे रा. संत कबीरनगर झोपडपट्टी) यांचा समावेश आहे. त्यांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. याशिवाय शरद लोखंडे (२९, रा. भराडवाडी, फुलेनगर, पंचवटी) याला एका वर्षासाठी तडिपार करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images