Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कामगार संघटनांची १७ ला गेट सभा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासह विविध मागण्यांसंदर्भात ठोस निर्णय घेण्याचे आश्‍वासन प्रशासनाने दिले असले तरी त्याच्या अंमलबजावणीबाबत सकारात्मक निर्णय होत नसल्याने कर्मचारी संघटनेने दिलेला संपाचा इशारा कायम ठेवला आहे. त्यासाठी आता १७ जुलै रोजी कर्मचाऱ्यांची गेट सभा होणार असून, या सभेत संपाबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

नाशिक म्युनिसिपल कर्मचारी सेनेच्या वतीने संपाचा इशारा देण्यात आल्यानंतर प्रशासनाने संघटनेसोबत चर्चा केली. त्यात पहिली मागणी सातवा वेतन आयोग लागू करण्यासह बिंदुनामावली, सुधारीत आश्‍वासित प्रगती योजनेचा लाभ देणे, वैद्यकीय विमा उतरविणे, शासन स्तरावरून आकृतिबंध मंजूर करून घेणे, घर व वाहन खरेदी अग्रीम वाढविणे, घंटागाडी व सफाईची कामे महापालिकेने स्वत: राबविण्यासह आदी ३६ मागण्या केल्या होत्या. परंतु, या मागण्यांवर ठोस कार्यवाही होत नसल्याने अखेरीस संपाची नोटीस कायम ठेवण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गंगापूर @ ४० टक्के!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून, गेल्या दोन-तीन दिवसांत झालेल्या संततधार पावसामुळे गंगापूर धरणातील पाणी साठा ४० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. दारणा धरणही ४९ टक्के भरल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

सोमवारी सकाळी साडे आठ ते मंगळवारी सकाळी साडे आठ या २४ तासांमध्ये जिल्ह्यात ३७६.४ मिलीमीटर पाऊस झाला. इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये प्रत्येकी ११२ मिलीमीटर पाऊस झाल्याने गंगापूरसह दारणा धरणातील पाणी साठा वाढण्यास मोठी मदत झाली आहे. दारणातील पाणीसाठा ४९ टक्क्यांवर तर भावली धरणातील पाणीसाठा ५० टक्क्यांवर पोहोचला आहे. गंगापूर ४०, काश्यपी २८, गौतमी धरणातील पाणीसाठा २५ टक्क्यांवर पोहोचला आहे. पेठ तालुक्यात ७० मिलीमीटर तर सुरगाण्यात ५३.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नाशिक तालुक्यात १२ मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला. परंतु त्या व्यतीरिक्त अन्य तालुक्यांमध्ये मात्र सोमवारपासूनच पावसाने विश्रांती घेतली आहे. मंगळवारी देखील जिल्ह्याच्या बहुतांश भागातून पाऊस गायब झाला. काही भागात पावसाची भुरभुर सुरू होती.

शहरात कधी पावसाच्या हलक्या सरी, कधी सूर्य किरणांचे दर्शन तर कधी पावसाची विश्रांती असा अनुभव नागरिकांनी घेतला. मंगळवारी सकाळी साडे आठ ते सायंकाळी साडे पाच या कालावधीत शहरात ७ मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तो’ नववीचा वर्ग पुन्हा भरणार!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भौतिक असुविधांचे कारण देत कोणतीही पूर्वसूचना न देता बंद करण्यात आलेले मनपा शाळा क्रमांक ८३मधील इयत्ता नववीचे वर्ग विद्यार्थ्यांची शिकण्याची दुर्दम्य इच्छा व पालकांच्या आक्रमक भूमिकेमुळे पुन्हा सुरू करण्याची सूचना प्रशासनाधिकारी देवीदास महाजन यांनी दिली. याबाबत 'मटा'ने मंगळवारी वृत्त प्रसिद्ध केले होते.

वडाळा गाव येथील शाळा क्रमांक ८३ मध्ये या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता नववीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. मात्र, शिकवण्यास शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी पुरेशा भौतिक सुविधा नसल्याने हा वर्ग बंद करण्याची सूचना प्रशासनाधिकारी महाजन यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना दिली होती. त्यामुळे शाळेत उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास शाळेतून बाहेर काढण्यात आले होते. झाल्या प्रकाराने रडू कोसळलेल्या विद्यार्थ्यांची परिस्थिती पाहत परिसरातील नागरिक जमिलभाई मोहंमद हनिफ रंगरेज यांनी याबाबत आवाज उठवला. विद्यार्थ्यांसह त्यांनी महानगरपालिका उपायुक्त महेश डोईफोडे व प्रशासनाधिकारी देवीदास महाजन यांची भेट घेतली. उपायुक्तांनी प्रशासनाधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेण्याविषयी बजावल्यानंतर महाजन यांनी चर्चा केली. यावेळी विद्यार्थिनींनी प्रशासनाधिकाऱ्यांसमोर आपल्या व्यथा मांडल्या व शिकण्याची दुर्दम्य इच्छा व्यक्त केली. तसेच नागरिकांनीही वर्ग सुरू ठेवण्याबाबत आग्रह कायम ठेवला. यामुळे या शाळेतील नववीचा वर्ग कायम ठेवण्यास प्रशासनाने परवानगी दिली. आज, १० जुलैपासून मनपा शाळा क्रमांक ८३ मधील वर्ग पुन्हा सुरू होणार आहेत.

पुरेसा शिक्षकवर्ग, विद्यार्थ्यांसाठी भौतिक सुविधा नियमानुसार नसल्याने शाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु, विद्यार्थी व पालकांच्या इच्छेमुळे वर्गास परवानगी देत आहोत. परंतु, पवित्र प्रणालीच्या माध्यमातून शिक्षक भरती होईल, त्यावेळी शिक्षक उपलब्ध करुन देण्यात येईल.

- \Bदेवीदास महाजन, प्रशासनाधिकारी, मनपा शिक्षण विभाग

(वर्षभर शिक्षक मिळणार नाही... पान..)\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पांडुरंग दिसणे म्हणजे देवबाभळी!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'तुकाराम महाराजांवर करीत असलेल्या एका चित्रपटासाठी भंडारा डोंगरावर गेलो असताना देवबाभळी सुचले. देवबाभळी म्हणजे नाटकात तुकारामांचे ऐकू येणे व पांडुरंगाचे दिसणे,' असे प्रतिपादन लेखक प्राजक्त देशमुख यांनी केले.

सावाना पुस्तक मित्र मंडळातर्फे संगीत देवबाभळी या नाटकाच्या पुस्तकावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देशमुख बोलत होते. ते पुढे म्हणाले,'आजही देवबाभळी कसे सुचले ते सांगता येत नाही. त्याची ठोस प्रक्रिया कशी झाली याचा विचार मी ही मनाशी करीत आहे; परंतु आजोबा पहाटे चारच्या सुमारास पांडुरंगाच्या पितळी मूर्तीची पूजा करायचे, हरिपाठ म्हणायचे ते मी निळ्या रगीच्या आडून पहात होतो. उदबत्तीचा सुगंध दरवळायचा. त्या उदबत्तीचा लाल टिंब अजूनही मला ठळक आठवतो, तो टिंब म्हणजे देवबाभळी. लहानपणी कॅलेंडरवर पाहिलेला 'तुकाराम बीज' हा उल्लेख, पंढरपूर येथे विठ्ठल व रखुमाई यांचे मंदिर वेगळे का असा पडलेला प्रश्न, त्यावर आईने दिलेले 'रुसून मागे बसलीय ती' असे उत्तर अशा अनेक प्रसंगांत नाटकाची बीजे आहेत. त्यातच चित्रपट लेखनाच्या संशोधनासाठी देहूच्या भंडारा डोंगरावर गेलो असता, तुकोबा व आवलीची आख्यायिका नव्याने सुचली. रखुमाई व आवली यांच्या भेटीचा ग्रंथांत उल्लेख नाही; पण त्या भेटल्या असत्या तर काय बोलल्या असत्या, त्यांची स्वत:ची काय मते असतील, हे डोक्यात येऊ लागले. नाटकात तुकोबा-विठोबाचे अस्तित्व आहे. पण उपस्थिती नाही. तुकोबा अभंगरूपात, तर विठोबा प्रतिमारूपात दिसत राहतात. हेच तर त्यांच्या पत्नींचे शल्य होते. तुकोबा-विठोबाची पात्रे समाविष्ट केली असती तर नाटकाचा समतोल बिघडण्याची, रखुमाई व आवलीवरील लक्ष हटण्याची भीती होती, असेही ते म्हणाले.

स्वागत व प्रास्ताविक सुभाष सबनीस यांनी केले. प्राजक्त देशमुख यांचा परिचय वसंतराव खैरनार यांनी करून दिला. आभार रमेश कडलग यांनी मानले. दरम्यान, सुभाष सबनीस यांचे वाढदिवसानिमित्ताने प्रा. विलास औरंगाबादकर यांच्या हस्ते अभिष्टचिंतन करण्यात आले. हा कार्यक्रम मु. शं. औरंगाबादकर सभागृहात झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोटरी क्लबतर्फे शुक्रवारी ‘आरोग्य मंथन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिककरांमध्ये आरोग्याबाबत जागृकता निर्माण व्हावी यासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त शुक्रवारी (दि. १२) 'आरोग्य मंथन' हा विशेष कार्यक्रम होणार आहे. गंगापूर रोडवरील शंकराचार्य न्यास सभागृहात सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात नाशिक आणि पुण्याचे प्रतिथयश डॉक्टर 'स्थुलता निवारण' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्र टाइम्स या उपक्रमाचा मीडिया पार्टनर आहे.

अनेक वर्षांपासून नाशिक शहरात रोटरी क्लब ऑफ नाशिक ही संस्था विविध सामाजिक विषयांवर काम करत आहे. या संस्थेच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त दर महिन्याला एक याप्रमाणे वर्षभरात १२ आरोग्य विषयक कार्यक्रम होतात. 'आरोग्य मंथन' या कार्यक्रमांन्वये विविध आजारांवर माहिती दिली जाणार आहे. यात 'स्थुलता निवारण' या विषयावर शुक्रवारी पहिले पुष्प गुंफले जाणार आहे. त्यात नाशिकमधील एन्डोक्रिनोलॉजिस्ट डॉ. यशपाल गोगटे, पुण्यातील बॅरियाट्रिक सर्जन डॉ. शशांक शहा, नाशिकमधील बॅरियाट्रिक सर्जन डॉ. जयंत वाघ, आहारतज्ज्ञ डॉ. रश्मी सोमाणी हे मार्गदर्शन करणार आहेत.

निरोगी राहणे हे बहुतांश वेळा आपल्या अन्न ग्रहणावर अवलंबून असते. जीवनावश्यक सत्त्वांसोबत लागणारी प्रथिने आपणास ऊर्जा देतात. आपण जास्त खात असू तर आपली शरीरयंत्रणा आवश्यक ते सत्त्वे घेऊन उर्वरित भाग मेदात म्हणजेच चरबीत रुपांतरीत करत असते. तसेच ही चरबी आपल्या शरीरातून उत्सर्जित न होता शरीरातच साठत जाते. आपण नियमित अतिरिक्त अन्न खात राहिलो तर ही चरबी साठत जाऊन स्थूलता येऊ शकते. स्थूलता हा कायमस्वरुपी आजार मानला जातो.

मुलाखतीच्या माध्यमातून मार्गदर्शन

स्थुलतेमुळे निर्माण होणारा मधुमेह, वाढणारा रक्तदाब, यातून निर्माण होणारी गुंतागुंत या विषयावर 'आरोग्य मंथन'मधून मार्गदर्शन केले जाणार आहे. हा कार्यक्रम मुलाखतीतून पुढे जाणार असून रोटेरीयन मृदुला बेळे या उपस्थित तज्ज्ञांची मुलाखत घेणार आहे. वर्षभर चालणाऱ्या या उपक्रमातून दर महिन्याला विविध आजारांवर माहिती मिळणार आहे. अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन रोटरी क्लब नाशिकचे अध्यक्ष मनीष चिंधडे, सचिव श्रीया कुलकर्णी, डॉ. राजेंद्र नेहते आदींनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाळण झालेल्या रस्त्यावरच घातले लोटांगण

$
0
0

किदवाई रोडच्या दुरावस्थेवर बॅटरीवाला यांचे आंदोलन

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील किदवाई रोडाचे नुकतेच करण्यात आलेले डांबरीकरण रिमझिम पावसात पूर्णतः वाहून गेले. रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधून घेण्यासाठी अवामी पार्टीचे अध्यक्ष रिजवान बॅटरीवाला यांनी मंगळवारी रस्त्यावर झोपून आंदोलन केले. इम्रान बेटरीवाला, हनीफ बाबा, मोहम्मद इलियाज, शेख अमीन, इम्रान निहाल आदींसह अवामी पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

गेल्याच महिन्यात या रस्त्यावर ठेकेदाराकडून २० लाख रुपसे खर्च करून डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र शहरात झालेल्या रिमझिम पावसातच रस्त्यावरील डांबरीकरण वाहून गेले. त्यामुळे रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. पालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत रिजवान यांनी रस्त्यावर गुलाबपुष्पाची उधळण केली. त्यानंतर त्यांनी रस्त्यावर झोपून आंदोलन केले. यामुळे काहीकाळ रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. जनतेच्या पैशांतून होणाऱ्या कामात भ्रष्टाचार होत असून, संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी त्यांनी केली.

नुसतेच आश्वासन

रिजवान यांनी आंदोलन सुरू करताच पालिकेचे अभियंता चौरे यांनी त्यांची भेट घेत घेतली. संबंधित कामाच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात येईल. त्यानंतरच ठेकेदाराला बिल अदा करू. ठेकेदाराकडून रस्त्याचे काम नव्याने करून घेण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेरवळ पाझर तलावास गळती!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणापाडा भागातील बेरवळ पाझर तलाव लिकेज असल्याने आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तिवरे धरण फुटीच्या प्रकाराने हादरलेल्या शासन यंत्रणांची धावपळ उडाली आहे. ७ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसाने हे धरण फुटण्याचा धोका निर्माण झाला होता.

उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी राहुल पाटील यांनी तहसीलदार दीपक गिरासे यांनी परिसरातील परिस्थितीची पाहणी केली. हा पाझर तलाव असून तो जिल्हा परिषद लघू पाटबंधारे यांनी बांधलेला आहे. जिल्हा परिषद लघू पाटबंधाऱ्याचे अधीक्षक अभियंता प्रवीण पाटील, तालुक्याचे अभियंता वनमाने यांना बोलावून त्याची कल्पना देण्यात आली. जिल्हा परिषद यंत्रणेने सांडव्याच्या बाजूने खोल करून धरणातील पाण्याचा विसर्ग वाढविला आहे. दोन दिवसांत तलाव फुटीचा धोका टळलेला असला तरी सांडवा खोली करण्याचे काम सुरू राहणार आहे. तलावात अद्याप मोठ्या प्रमाणात पाणी शिल्लक असल्याचे सांगण्यात येत आहे. महसूल खात्याने तलावाच्या खालच्या बाजूस असलेल्या धायटीपाडा आणि डोळओहळ या दोन गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुकणे देयक वाद मुख्यमंत्र्यांकडे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुकणे थेट पाइपलाइन योजनेतील वजावट केलेल्या २० कोटींचा निधी काढून घेण्याच्या काही लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे पक्षाची प्रतिमा मलीन होण्याची शक्यता असल्याने भाजपच्या एक गटाने हा वाद थेट पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या दरबारात नेण्याचे ठरविले आहे. एकीकडे नगरसेवकांची किरकोळ कामे निधीच्या कारणावरून अडवली जात असतानाच दुसरीकडे २० कोटींची उधळपट्टी ठेकेदारावर केली जात असल्याने नगरसेवकांचा आधीच नाराज असलेला गट संतप्त झाला आहे.

जवाहरलाल नेहरु नागरी पुनर्रुत्थान योजनेंतर्गत सन २०४१ पर्यंतची शहराची लोकसंख्या गृहीत धरत अतिरिक्त पाणीपुरवठ्यासाठी मुकणे धरणातून थेट पाइपलाइनद्वारे पाणी आणण्याचे नियोजन करण्यात आले. सदरचे काम एल अॅन्ड टी कंपनीला २६६ कोटी रुपयांमध्ये देण्यात आले. मुकणे धरण ते विल्होळी नाक्‍यापर्यंत अठरा किलोमीटर लांबीची १८०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकली जाणार आहे. सिमेंट, इंधन, स्टिलचे दर मधल्या काळात कमी झाल्याने सदरचे काम हे २६६ कोटींऐवजी २४६ कोटींतच पूर्ण झाले. जवळपास २० कोटींची वजावट बिलामध्ये दाखवली जात आहे. परंतु, सध्याच्या इंधन दरासह बांधकाम साहित्याचे दर दाखवून ही वजावट पुन्हा काढण्याचे प्रयत्न सुरू झाले असून, सदरची फाइल पुन्हा फिरवली जात आहे. त्यासाठी पालिकेतील काही अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी प्रयत्नशील आहेत. ठेकेदारावर मेहरबानी करण्यावरून भाजपच्या एका जेष्ठ नगरसेवकाने थेट मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांकडे याबाबत तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. हा तिजोरीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न असून, एकीकडे नगरसेवक निधी दिला जात असताना ही उधळपट्टी कशासाठी, असा सवाल उपस्थित केला जात आहे. हा वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘एमपीडीए’मार्फत शेख स्थानबद्ध

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

उपनगर पोलिस ठाणे हद्दीत सातत्याने गंभीर गुन्हे करणाऱ्या सराईत आरोपीविरुद्ध शहर पोलिसांनी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा कायद्यानुसार (एमपीडीए) कारवाई केली. या कायद्यानुसार संबंधित व्यक्तीला एक वर्षभरासाठी जेलमध्ये कैद करण्यात येते.

इलियास गुलाब शेख (२५, रा. सुंदरनगर, देवळालीगाव) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध उपनगर पोलिस ठाण्यात जबरी चोरी, लुटमार, गृह आगळीक असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या पार्श्वभूमीवर त्याला दोन वर्षांसाठी तडीपार सुद्धा करण्यात आले होते. मात्र, या प्रतिबंधक कारवाईनंतर इलियासच्या वर्तनात बदल झाला नाही. त्याच्या गुन्ह्यांचा आलेख चढतच गेला. या पार्श्वभूमीवर त्याच्याविरोधात स्थानबद्धतेची कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात आला. पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या आदेशाने ६ जुलै रोजी इलियासला पकडून स्थानबद्ध करण्यात आले. आतापर्यंत शहर पोलिसांनी पाच जणांवर एमपीडीएनुसार कारवाई केली आहे. आणखी बरेच सराईत आरोपी रडारवर असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे महामार्गावर बोअरवेल ट्रक उलटला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

वळण आणि अरुंद महामार्गाचा अंदाज न आल्याने नाशिकहून कर्नाटकातील बिजापूर येथे जाणारा बोअरवेलचा ट्रक मंगळवारी (दि. ९) पहाटे अडीच वाजेच्या दरम्यान चेहेडी गावाजवळ पलटला. या अपघातात ट्रकचालकासह क्लिनर आणि इतर कामगार थोडक्यात बचावले. ते किरकोळ जखमी झाले आहेत.

साई विनायक आणि साई बालाजी बोअरवेल कंपनीचा ट्रक (केए ०१ एमजी ६६८८) नाशिकहून कर्नाटकातील बिजापूर येथे जात होता. नाशिक-पुणे महामार्गावरील चेहेडी गावाजवळ समोरुन आलेल्या वाहनाला वाचविण्यासाठी चालकाने बोअरवेल ट्रक महामार्गाच्या डाव्या बाजुला घेतला. मात्र, तेथील वळण आणि अरुंद महामार्गाचा अंदाज चालकाला आला नाही. त्यामुळे ट्रक महामार्गावरून थेट चेहेडी गावाच्या बाजुस खोल जागेत पलटी झाला. यात ट्रकच्या काचा फुटून केबिनमध्ये बसलेले कामगार किरकोळ जखमी झाले. ट्रकवरील बोअरवेलच्या यंत्राचे मोठे नुकसान झाले. क्रेनच्या सहाय्याने मंगळवारी दुपारी हा ट्रक उचलण्यात आला.

वळण धोकादायक

नाशिक-पुणे महामार्गाचे रुंदीकरणाचे काम रखडले आहे. दारणा नदीवरील पुलाचे काम पूर्ण झाले असून पुलाची नाशिककडून सिन्नरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी बाजू वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. मात्र, पुलापूर्वी महामार्गाचे काम बाकी आहे. या ठिकाणी अत्यंत धोकादायक वळण निर्माण झालेले आहे. या वळणावर अपघातांची कायम भीती वाहनचालकांना सतावते. महामार्गालगतच नागरिकांची घरे असल्याने महामार्गाची उंची जास्त असल्याने वाहन पलटी झाल्यास थेट नागरिकांच्या घरांवर वाहन पडण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

घराच्या लोखंडी जिन्यात विद्युत प्रवाह उतरल्याचे लक्षात येताच घरातील दोन महिलांसह वृद्ध वडिलांचे प्राण वाचविण्यासाठी सरसावलेल्या मारकस बाळू शिरसाठ (वय ४०) यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. हा धक्‍कादायक प्रकार चुंचाळे परिसरात सोमवारी सायंकाळी घडला. या प्रकरणी अंबड पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

पावसामुळे महावितरणच्या डीपीत विद्युत प्रवाह उतरल्याच्या घटना घडल्या. याचप्रकारे चुंचाळे गावातील शिरसाठ या कुटुंबाच्या घराजवळ असलेल्या जिन्यातही विद्युत प्रवाह उतरला होता. पावसामुळे आधीच या जिन्याचा वापर कमी होता. मात्र सकाळी घरातील अर्चना शिरसाठ, स्वामिनी शिरसाठ यांनी जिन्याजवळ जाऊन पाहिले असता, जिन्याच्या पायऱ्यांमध्ये विद्युत प्रवाह सुरू होता. हा प्रकार घरातील बाळू शिरसाठ यांच्याही लक्षात आला. या तिघाजणांना या विद्युत प्रवाहाचा झटकासुद्धा लागला. याचवेळी घरात असलेल्या मारकस यांच्या हा प्रकार लक्षात आला. जिन्यातच वीजप्रवाह उतरला असल्याने या तिघांना याचा झटका बसता कामा नये, या एकाच उद्देशाने मारकस यांनी धाव घेऊन या तिघांना जिन्यापासून दूर केले. यावेळी मारकस यांनाही विजेचा जोरदार धक्‍का बसला. ते जिन्यावरून खाली कोसळले. यामुळे ते गंभीर जखमी झाले. यावेळी भाऊ मधुकर शिरसाठ यांनी तातडीने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महामेट्रो झाली ‘नाशिक मेट्रो निओ’

$
0
0

मुख्यमंत्र्यांनी केले नामकरण

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी नियोजित टायरबेस्ड महामेट्रोची तयारी सुरू असतानाच आता नाशिक महामेट्रोचे 'नाशिक मेट्रो निओ' असे नामकरण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या टि्वटर अकाउंटवर याबाबत माहिती दिली असून, या मेट्रो निओचा प्रस्तावित आराखडा आणि धावणाऱ्या मेट्रोंचा व्हिडीओ जारी केला आहे. या अंतर्गत २५ मीटर लांबीची आणि २५० प्रवाशी क्षमता असलेली टायरबेस्ड मेट्रो निओ शहरात धावणार आहे.

शहरातील सार्वजनिक वाहतुकीवरचा ताण कमी करण्यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत मेट्रो सेवा सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यासाठीचा प्रारूप आराखडा आणि अहवाल करण्याचे काम सिडको आणि महामेट्रोला देण्यात आले होते. त्यानुसार शहरात ताशी २० हजार प्रवाशी क्षमता नसल्याने मेट्रो रेल्वेऐवजी महामेट्रोने एलिव्हटेड बेस अर्थात बॅटरी व इलेक्ट्रिकवर आधारित टायरबेस्ड बस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीचे सर्वेक्षण सुरू आहे. हे सर्वेक्षण सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांनी सोमवारी टि्वटर अकाउंटवर याबाबतची नवीन माहिती जाहीर केली. त्यानुसार महामेट्रोचे महानिओ असे नामकरण केले आहे. या टायरबेस्ड मेट्रोनिओच्या मार्गावर २९ स्टेशन असतील. तसेच २५ मीटर लांबीची २५० प्रवाशी क्षमता असलेली टायरबेस्ड बस असेल. वाहतुकीचे दोन कॉरिडॉर असतील. हे काम सन २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.

...

..असे असतील मार्ग

- पहिला मार्ग २२ किलोमीटरचा : गंगापूर गाव, शिवाजीनगर, श्रमिकनगर, एमआयडीसी, मायको सर्कल, सीबीएस, सारडा कॉर्नर, द्वारका, गांधी नगर, नेहरूनगर, दत्त मंदिर, नाशिक रोड.

- दुसरा मार्ग १० किलोमीटरचा : गंगापूर, जलालपूर, नवश्या गणपती, थत्तेनगर, मुंबई नाका असा

- तिसरा मार्ग : मुंबई नाका ते सातपूर कॉलनी व्हाया गरवारे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लढतीला चिन्हओळख

$
0
0

\B'प्रगती'ला प्रेशर कुकर तर 'क्रांतिवीर'ला कपबशी

\B

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज माघारीनंतर पंढरीनाथ थोरे यांच्या 'क्रांतिवीर' आणि कोंडाजी आव्हाड यांच्या 'प्रगती' पॅनलने भर पावसात प्रचारास प्रारंभ केला आहे. चिन्ह वाटप मंगळवारी झाले. त्यात प्रगती पॅनलला प्रेशर कुकर तर क्रांतिवीर पॅनलला कपबशी चिन्ह देण्यात आले आहे.

संस्थेच्या २९ जागांसाठी २० जुलै रोजी निवडणूक होत आहे. अखेरच्या दिवशी २८६ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर ७० उमेदवार रिंगणात आहेत. यात १२ अपक्षांचा समावेश आहे. चिन्ह वाटपामध्ये प्रगती पॅनलला प्रेशर कुकर, क्रांतिवीर पॅनलला कपबशी, अपक्ष चंद्रकला साबळे यांना नारळ, ज्ञानेश्वर सोनवणे यांना गॅस सिलिंडर, मनोहर काळे यांना टीव्ही असे चिन्ह देण्यात आले. तर उर्वरित उमेदवार गैरहजर होते. त्यांना बुधवारी (दि.१०) चिन्ह वाटप केले जाणार आहे. निवडणूक मंडळाचे अध्यक्ष म्हणून अ‍ॅड. गजेंद्र सानप जबाबदारी पाहत आहेत. निवडणूक मंडळात अ‍ॅड. अशोक कातकाडे, अ‍ॅड. संतोष दरगोडे यांचा समावेश आहे. लवाद म्हणून अ‍ॅड. एस. जी. सोनवणे यांची नियुक्ती केली आहे.

\Bखासदार मुंडेंच्या सासूबाईंची माघार\B

निवडणूक रिंगणात खासदार प्रीतम खाडे-मुंडे यांच्या सासूबाई कांचन राजेंद्र खाडे यांनी उपाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांनी माघार घेतली असल्याचे पत्रकाद्वारे स्पष्ट केले. उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला; मात्र ही निवडणूक लढविण्यास आपण इच्छुक नाही. मुदतीत अर्ज मागे घेऊ शकले नाही, याची सभासदांनी नोंद घ्यावी, असे आवाहन खाडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांच्या वेशात येऊन चोरट्यांनी लुटले

$
0
0

मनमाड : स्त्रियांच्या वेशात आलेल्या चोरट्यांनी शेतात काम करीत असलेल्या बेबीबाई पवार (३७) या महिलेवर हल्ला करून दागिने लुटल्याची घटना मंगळवारी दुपारी नांदगावजवळच्या डॉक्टरवाडी शिवारात घडली. बेबीबाई यांनी प्रतिकार केल्याने चोरट्यांनी त्यांचा कान तोडला व दगडांचा मारा करून त्यांना गंभीर जखमी करीत त्यांच्या अंगावरील दोन तोळ्यांचे दागिने घेऊन पसार झाले. बेबीबाईंचा मुलगा नवनाथ शेतावर गेला असता त्याला आई जखमी अवस्थेत दिसली. त्याने त्यांना नांदगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी बेबीबाई यांना रक्ताच्या उलट्या झाल्या. नांदगावचे पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांनी घटनेचा पंचनामा करुन गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदाकाठबाबत प्रशासन सतर्क

$
0
0

चांदोरी, सायखेडा व नांदूरमध्यमेश्वर धरणाची पाहणी

म. टा. वृत्तसेवा, निफाड

गोदावरीला येत्या काळात पूर आल्यास निफाड तालुक्यातील चांदोरी, सायखेडा या गावांमध्ये होणारी पूर परिस्थितीचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्याबाबत उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आणि नांदूरमध्यमेश्वर धरणाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्यासह अधिकाऱ्यांच्या फौजफाट्याने मंगळवारी या परिसराची पाहणी केली.

गोदावरीला पूर आल्यावर गोदाकाठ भागातील चांदोरी, सायखेडा, शिंगवे गावांना पुराचा वेढा बसून जनजीवन विस्कळीत होत असते. अनेकदा या गावांचा संपर्कही तुटतो. त्यामुळे येत्या काळात पुन्हा अशी परिस्थिती झाल्यास त्याबाबत संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी मांढरे यांनी चर्चा केली. चांदोरी आणि सायखेडा येथे गोदावरी नदीवरील पूल, नदीकाठचा परिसर यांची पाहणी केली. यावेळी ज्या भागात पुराचे पाणी येते त्या परिसरातील रहिवाशांना नोटिसा देण्याबाबत केल्या.

त्यानंतर जिल्हाधिकारी मांढरे यांनी करंजगाव येथील गोदावरी नदीवरील पूलावर पाहणी करून नांदूरमध्यमेश्वर धरण येथे भेट दिली. चिपळूण येथील तिवरे येथील धरण फुटल्याच्या पार्श्वभूमीवर नांदूरमध्यमेश्वर धरणाची मांढरे यांनी पाहणी केली. यावेळी पाटबंधारे विभागांच्या अधिकाऱ्यांना पुराच्या पाण्याचा विसर्ग करण्याचे प्रमाण, कालवे आणि नदीपात्रात विसर्गाचे सोडलेले पाणी, असलेला पाणीसाठा याबाबत त्यांनी माहिती घेतली. या मार्गावर जिल्हाधिकारी मांढरे यांनी चापडगाव येथील पक्षी अभयारण्याला भेट दिली. मांढरे यांच्यासोबत अपर जिल्हाधिकारी रामदास खेडकर, प्रांत अर्चना पाठारे, पाटबंधारे विभागाचे अधिकारी कुलकर्णी, आपत्ती व्यवस्थापन टीमचे सागर गडाख आदींसह, तलाठी, मंडळ अधिकारी, पाटकरी होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘नासाका’बाबत प्रशासनाचा खोडा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक सहकारी साखर कारखाना सहा वर्षांपासून बंद आहे. हा कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी जिल्हा बँक सकारात्मक असली तरी प्रशासन मात्र खोडा घालत आहे, असा आरोप नासाका बचाव कृती समितीचे अध्यक्ष विलास गायधनी यांनी केला आहे. नासाकाबाबत जिल्हा प्रशासनाने सकारात्मक प्रयत्न न केल्यास आंदोलनाचा इशारा कृती समितीने दिला आहे.

नासाका बंद असल्याने ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. कामगारांवर उपासमारीची वेळ आहे. नासाका पुन्हा सुरू होण्याची कार्यक्षेत्रातील सर्व शेतकरी, कामगारांची अपेक्षा आहे. जिल्हा बँकेने निविदा प्रसिद्ध केल्यापासून कारखाना भाडेतत्त्वावर घेण्यासाठी अनेक कंपन्या तयार आहेत. मात्र जिल्हा प्रशासनाच्या मुद्रांक शुल्क विभागाच्या अटी या कंपन्यांसाठी जाचक ठरत हेत. त्यामुळे प्रशासनाने स्टॅम्प ड्युटी माफ करून कारखाना सुरू करण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणी शेतकरी आणि नासाका बचाव कृती समितीने केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जैन स्थानकातर्फे उद्या शोभायात्रा

$
0
0

चातुर्मासानिमित्त आयोजन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चातुर्मासाला शुक्रवारपासून (दि. १२) प्रारंभ होत असून, यानिमित्ताने आर. के. जैन स्थानकतर्फे गुरुवारी (दि. ११) शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. चातुर्मासानिमित्त स्थानकातर्फे नेहमी मंगलप्रवचन होणार असून, शोभायात्रेसह मंगलप्रवचनात भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जैन धर्म अहिंसेवर आधारित असून, चातुर्मास हा जैन धर्मातील महत्त्वपूर्व पर्व असते. या महिन्यांमध्ये धर्म आराधना व साधनेला अधिक महत्त्व असून, अहिंसा, सत्य, ब्रह्मचर्या आणि साधनेविषयीचे प्रवचन केले जाते. यानुसार दरवर्षी आर. के. जैन स्थानकातर्फे चातुर्मास मंगलप्रवचन सोहळा होतो. यंदा पंचवटीतील विमलनाथ प्राईड येथून गुरुवारी सकाळी ७.४० वाजता चातुर्मासानिमित्त शोभायात्रा काढण्यात येईल. डॉ. समकितमुनिजी म. सा., भवान्तमुनिजी म. सा. आणि जयवन्तमुनिजी म. सा. यांचा चातुर्मास मंगलप्रवेश सोहळ्यानिमित्त ही शोभायात्रा असेल. या सोहळ्याच्या समितीचे अध्यक्ष राजेंद्र डुंगरवाल आहेत. शोभायात्रेसह मंगलप्रवचन सोहळ्यात सर्व जैन बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संघपती राजमल भंडारी, सुभाष लोढा, पंकज शामसुका यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर पकडले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा सटाणा

बागलाण तालुक्यातील गिरणा नदीपात्रातील अवैद्य वाळू उपसाच्या तक्रारी वाढल्याने बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे यांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. ठेंगोडा येथील गिरणा नदीपात्रातून वाळू उपसा करणाऱ्या चार ट्रॅक्टरवर सोमवारी मध्यरात्री कारवाई करण्यात आली. यावेळी पाच लाख २६ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. सध्या भीषण दुष्काळी परिस्थीती असताना बेसुमार वाळू उपसा कारणीभूत असल्याचा भूजलतज्ज्ञांचा निष्कर्ष आहे. ठेंगोडा येथील गिरणा नदीपात्रात वाळू उपसा सुरू असल्याने तहसीलदार जितेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मेजर मच्छिंद्र मोरे व लक्ष्मण गवारी यांच्या पथकाने सोमवारी मध्यरात्री वाळू उपसा करणाऱ्या चार ट्रॅक्टर पकडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयशरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

$
0
0

सिडको : अंबड येथील एक्स्लो पॉईंटवरून किर्लोस्कर कंपनीच्या दिशेने जाणाऱ्या एका दुचाकीस्वारास आयशर ट्रकने धडक दिल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातपूर येथील अशोकनगर भागात राहणारा अजित रतन सदाफळ (वय २३) हा तरुण दुचाकीवरून एक्स्लो पॉईंटवरून किर्लोस्कर कंपनीच्या दिशेने जात होता. यावेळी त्याच्या मागून येणाऱ्या एका आयशर ट्रकने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत अजित खाली पडल्याने गाडीच्या चाकाखाली सापडला. डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पांडुरंग दिसणे म्हणजे देवबाभळी!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक 'तुकाराम महाराजांवर करीत असलेल्या एका चित्रपटासाठी भंडारा डोंगरावर गेलो असताना देवबाभळी सुचले. देवबाभळी म्हणजे नाटकात तुकारामांचे ऐकू येणे व पांडुरंगाचे दिसणे,' असे प्रतिपादन लेखक प्राजक्त देशमुख यांनी केले. सावाना पुस्तक मित्र मंडळातर्फे संगीत देवबाभळी या नाटकाच्या पुस्तकावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देशमुख बोलत होते. ते पुढे म्हणाले,'आजही देवबाभळी कसे सुचले ते सांगता येत नाही. त्याची ठोस प्रक्रिया कशी झाली याचा विचार मी ही मनाशी करीत आहे; परंतु आजोबा पहाटे चारच्या सुमारास पांडुरंगाच्या पितळी मूर्तीची पूजा करायचे, हरिपाठ म्हणायचे ते मी निळ्या रगीच्या आडून पहात होतो. उदबत्तीचा सुगंध दरवळायचा. त्या उदबत्तीचा लाल टिंब अजूनही मला ठळक आठवतो, तो टिंब म्हणजे देवबाभळी. लहानपणी कॅलेंडरवर पाहिलेला 'तुकाराम बीज' हा उल्लेख, पंढरपूर येथे विठ्ठल व रखुमाई यांचे मंदिर वेगळे का असा पडलेला प्रश्न, त्यावर आईने दिलेले 'रुसून मागे बसलीय ती' असे उत्तर अशा अनेक प्रसंगांत नाटकाची बीजे आहेत. त्यातच चित्रपट लेखनाच्या संशोधनासाठी देहूच्या भंडारा डोंगरावर गेलो असता, तुकोबा व आवलीची आख्यायिका नव्याने सुचली. रखुमाई व आवली यांच्या भेटीचा ग्रंथांत उल्लेख नाही; पण त्या भेटल्या असत्या तर काय बोलल्या असत्या, त्यांची स्वत:ची काय मते असतील, हे डोक्यात येऊ लागले. नाटकात तुकोबा-विठोबाचे अस्तित्व आहे. पण उपस्थिती नाही. तुकोबा अभंगरूपात, तर विठोबा प्रतिमारूपात दिसत राहतात. हेच तर त्यांच्या पत्नींचे शल्य होते. तुकोबा-विठोबाची पात्रे समाविष्ट केली असती तर नाटकाचा समतोल बिघडण्याची, रखुमाई व आवलीवरील लक्ष हटण्याची भीती होती, असेही ते म्हणाले. स्वागत व प्रास्ताविक सुभाष सबनीस यांनी केले. प्राजक्त देशमुख यांचा परिचय वसंतराव खैरनार यांनी करून दिला. आभार रमेश कडलग यांनी मानले. दरम्यान, सुभाष सबनीस यांचे वाढदिवसानिमित्ताने प्रा. विलास औरंगाबादकर यांच्या हस्ते अभिष्टचिंतन करण्यात आले. हा कार्यक्रम मु. शं. औरंगाबादकर सभागृहात झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images