Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

मतदार याद्यांचे होणार शुद्धीकरण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच जिल्ह्यात मतदार यादी शुद्धीकरण मोहीम हाती घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (बीएलओ) आठवडाभरात ही मोहीम हाती घ्यावी, असे आदेश निवडणूक उप जिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी दिले आहेत. मतदार यादीमध्ये आपला अचूक तपशील यावा याकरीता नागरिकांनीही बीएलओंना सहकार्य करावे, असे आवाहन आनंदकर यांनी केले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुद्ध मतदार यादी करण्यावर निवडणूक शाखेने भर दिला आहे. या मोहिमेअंतर्गत प्राधान्याने मतदार यादीतील सर्व मयत मतदारांची नावे वगळण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मतदान केंद्राच्या कार्यक्षेत्रातील सर्व मयत मतदारांची माहिती एकत्रितरित्या संकलित करून मृत्यूचे दाखले प्राप्त करून घ्यावेत, अशा सूचना बीएलओंना देण्यात आल्या आहेत. मतदान केंद्राच्या कार्यक्षेत्रातील दुबार मतदारांची नावे वगळण्याची कार्यवाही करून दोषरहीत आणि परिपूर्ण मतदार यादी तयार करा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत शहरी भागातील काही मतदान केंद्रांवर मतदार यादीबाबत तक्रारी प्राप्त झाल्या. अशा तक्रारी विधानसभा निवडणूक काळात प्राप्त होणार नाही. यासाठी मतदार यादी शुद्धीकरणाचे काम अत्यंत काटेकोरपणे करा, अशा सूचनाही बीएलओंना देण्यात आल्या आहेत.

बीएलओंचे प्रशासनाकडे गाऱ्हाणे

मतदार स्वतःची संपूर्ण माहिती देताना टाळाटाळ करीत असल्याचे गाऱ्हाणे बीएलओंनी जिल्हा प्रशासनाकडे मांडले आहे. मतदारांकडून फोन नंबर, मोबाइल नंबर चुकीचे दिले जातात. त्यामुळे ओळखपत्र वाटप किंवा मतदार पावती वाटप करताना मतदारांचा शोध घेणे अवघड होत असल्याची कैफियत बीएलओंनी मांडली आहे. मतदार रंगीत फोटो देत नाहीत, त्यामुळे मतदारांना रंगीत छायाचित्र मतदार ओळखपत्र (स्मार्ट इपीक) देता येत नाही. एका कुटुंबातील लोकांनी वेगवेगळया वेळी अर्ज भरल्यामुळे कुटुंबातील लोकांची नावे वेगवेगळ्या यादी भागांमध्ये गेली आहेत. परंतु नागरिक त्यावरूनही वाद घालत असल्याच्या बीएलओंच्या तक्रारी आहेत. नागरिकांनी बीएलओंना सहकार्य करावे, असे आवाहन आनंदकर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दर महिन्याला होणार ‘झूम’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

उद्योजकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा उद्योग मित्रची (झूम) बैठक आता दर महिन्याला होणार आहे. त्यासाठी एक वार ठरवून त्यावर चर्चा केली जाणार आहे. बुधवारी 'निमा'च्या कार्यालयात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. त्यात जिल्हाधिकाऱ्यांनी उद्योजकांना सकारत्मकतेचे धडे देऊन प्रश्न कसे सोडविता येतील, याबाबत सल्लाही दिला. प्रशासन आपले काम करेलच पण, तुम्हीसुद्धा त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही त्यांनी उद्योजकांना सांगितले.

उद्योजकांचे प्रश्न सुटावेत यासाठी राज्य सरकारने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती तयार करण्यात आली आहे. पण, या समितीच्या बैठकाच जिल्हाधिकारी नियमित घेत नसल्याच्या तक्रारी नेहमी असतात. त्यामुळे नवनियुक्त जिल्हाधिकाऱ्यांनी पहिल्याच बैठकीत उद्योजकांना दिलासा देत ही बैठक आता नियमित घेतली जाणार असल्याचे सांगितले. बैठकीत शेवटची दहा मिनिटे एखादा प्रश्न सोडवण्यासाठी उद्योजकांनी काय केले यासाठी राखीव ठेऊ, असेही ते म्हणाले. या बैठकीत ३० ऑगस्ट २०१८ रोजी झालेल्या बैठकीतील २८ प्रश्नांवर चर्चा झाली. त्यातील ५ प्रश्नांची सोडवणूक करण्यात आली आहे, तर १४ प्रश्नांवर कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे ९ प्रश्नांवर कार्यवाही अपेक्षित असल्याची माहिती उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक पी. डी. रेंदाळकर यांनी दिली. या बैठकीत एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील - भामरे, निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, उपाध्यक्ष शशिकांत जाधव, सरचिटणीस तुषार चव्हाण, आयमाचे अध्यक्ष वरुण तलवार, निमाचे माजी अध्यक्ष मंगेश पाटणकर, धनजंय बेळे यांच्यासह उद्योजक व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

दिंडोरीच्या दरावर नाराजी

तब्बल दीड तासाहून अधिक काळ चाललेल्या या बैठकीत दिंडोरी येथील तळेगाव अक्राळे येथील भूखंडाचे दर राज्यात सर्वाधिक असल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे भूखंडाचे वाटप टप्प्याटप्प्याने न करता एकाच वेळी करण्यात यावे अशी सूचना करण्यात आली. त्यानंतर उद्योजकांच्या भावना समितीतर्फे मुंबई येथे एमआयडीसी कार्यालयाला कळविण्याचा निर्णय घेण्यात आला.

ड्रेनेजचा प्रश्न पुन्हा

यावेळी सातपूर व अंबड येथील ड्रेनेजचा प्रश्न पुन्हा उपस्थित करण्यात आला. त्यावर मनपा व एमआयडीसी टोलवाटोलवी करीत असल्याचे उद्योजकांनी सांगितले. यावर हा प्रश्न अजून वेगळया मार्गाने कसा सोडवता येईल यावर जिल्हाधिकाऱ्यांनी आपले मत मांडले. त्यावेळी त्यांनी या प्रश्नाकडे सकारात्मकतेने बघून त्यावर अजून काय करता येईल यावर सूचना केल्या. उद्योजकांनी या बैठकीत वीज खंडित होत असल्याचे प्रश्न मांडले. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी हा प्रश्न गंभीर असून, त्याबाबत सर्व माहिती पुढील बैठकीत सादर करण्याचे निर्देश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नार-पार’साठी एकजुटीचा संकल्प

$
0
0

वांजुळपाणी संघर्ष समितीची मालेगावी बैठक

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

पुनद प्रकल्पातून सटाणा शहराला पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेच्या कामाबाबत सुरू असलेल्या आंदोलन व राज्य सरकारने नार-गिरणा-पार-कादवा उपसा सिंचन योजनेस राज्य प्रकल्प म्हणून घोषित करावे, याबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवारी येथील शासकीय विश्रामगृहावर वांजुळपाणी संघर्ष समितीची बैठक झाली. उपलब्ध पाण्याचे वाटप करण्यावरून सुरू असलेले आपापसातील वाद 'कसमादे'च्या हिताचे नाही. त्यापेक्षा या प्रकल्पाच्या माध्यमातून जास्ती पाणी उपलब्ध करून घेण्यासाठी एकजुटीने लढा देण्याची तसेच इतर स्त्रोत निर्माण व्हावे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत बैठकीत मांडण्यात आले.

बैठकीस प्रा. के. एन. अहिरे, सटाण्याचे नगरध्यक्ष सुनील मोरे, नगरसेवक मनोहर देवरे , विश्वासराव देवरे, निखील पवार, शेखर पवार, दिनकर सोनवणे, हेमंत पाटील, देवळ्याचे नगरसेवक जितेंद्र आहेर, भाऊसाहेब पगार, दत्तू खैरनार, संजय खैरनार, शेखर पगार, शरद पवार, हरिदादा निकम, मनीष सूर्यवंशी, पिंटू सूर्यवंशी, सुरेश पवार, सोमनाथ जगताप, अतुल लोढा, सुशांत कुलकर्णी, आप्पाजी महाले उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी के. एन. अहिरे यांनी सांगितले की, चणकापूर व पुनद धरणातून सतत आरक्षण वाढत गेल्यास शेती उजाड होऊन जाईल, रोजगाराचे प्रश्न निर्माण होतील. या सर्व वादावर तोडगा म्हणून नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्प तत्काळ राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.

सटाणा नगर परिषदेचे नगरसेवक मनोहर देवरे यांनी मालेगाव महानगरपालिकेने गिरणा धरणातून पूर्ण क्षमतेने पाणी उचलावे व चणकापूर धरणावरील पाणी हक्क सोडावा. ते पाणी शेती सिंचनासाठी वापरावे अशी सूचना मांडली. परंतु गिरणा धरणातून पाणी लिफ्ट करण्याचा खर्च न परवडणारा आहे. यावर मालेगाव महापालिकेने सोलर प्रोजेक्ट राबवून पाणी लिफ्ट केले पाहिजे, असे मत अनेकांतर्फे व्यक्त करण्यात आले. राज्य सरकारने नार-गिरणा-पार-कादवा या उपसा सिंचन योजनांद्वारे प्रत्येकी १२.५ टीएमसी पाणी गिरणा व गोदावरी खोऱ्यात देण्याचे निश्चित केले आहे. मात्र गिरणा खोरे त्रुटीचे खोरे असून, नार-पार खोऱ्यात ३० टीएमसी पाणी उपलब्ध असून त्यातील स्थानिक वापर वगळता २५ टीएमसी पाणी गिरणा खोऱ्याला मिळाले पाहिजे. मांजरपाडानंतर पुन्हा एकदा गिरणा खोऱ्यावर सरकार अन्याय करू पाहत आहे. त्यासाठी कसमादेसह जळगाव, धुळे, औरंगाबाद मधील सर्व लोकप्रिनिधींनी एकत्रित पाठपुरावा व लढा दिला पाहिजे असा सूर बैठकीत उमटला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नाम मैं क्या रखा है...!’

$
0
0

दुबार नाव वगळण्यासाठी सिटीझन्स फोरमची मोहीम

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मतदार यादीतील दुबार नावे वगळून, मतदारांचा फुगलेला आकडा कमी करण्यासाठी आता 'नाम मै क्या रखा है' ही मोहीम सिटीझन्स फोरमतर्फे आता नाशिकमध्ये राबविली जाणार आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या उपस्थितीत झालेल्या फोरमच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दोन नावे असलेल्या मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी खास 'व्हॅन' तयार केली जाणार असून ती विभागनिहाय मतदारांपर्यंत जाणार आहे.

या अगोदर लोकसभा निवडणुकीत मतदानांची टक्केवारी वाढवण्यासाठी 'व्होट कर, नाशिककर' ही मोहीम राबविण्यात आली होती. त्याच धर्तीवर आता विधानसभा निवडणुकी अगोदरच ही मोहीम राबविली जाणार आहे. शहरातील विविध क्षेत्रातील संघटना असलेल्या या फोरमने नाईसच्या सभागृहात झालेल्या बैठकीत अनेक प्रस्ताव मांडले. त्यात जुने सीबीएसवर मल्टी पार्किंग करावी, अशी सुचनाही केली. नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर दिंडी मार्ग किंवा सायकल ट्रॅक उभारावा, ओझर एअरपोर्टवर जातांना दिशादर्शक फलक असावे, शिर्डी-ओझर विमानतळ कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी चौपदरी रस्ता, समृद्धी महामार्गाला नाशिक कनेक्ट करणे, कुंभमेळ्यासाठी अगोदर अधिकाऱ्यांची समिती करणे, यासारख्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या. हायवेवर होणारे अपघात यावरही या फोरमध्ये चर्चा झाली. शहरातील रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या झाडांवरही काय करता येईल, यावरही सर्वांनी आपले मत मांडले.

बैठकीत फोरमचे अध्यक्ष सुनील भायभंग, सेक्रेटरी नरेंद्र बिरार, जितेंद्र ठक्कर, उपाध्यक्ष हेमंत राठी, 'एमटीडीसी'चे नितीन मुंडावरे व महेश बागूल, 'नरेडको'चे सुनील गवांदे, 'तान'चे दत्ता भालेराव, इन्स्टिट्यूय ऑफ आर्किटेक्टचे प्रदीप काळे, आर्किटेक्ट अॅण्ड इंजिनीअर्स असोचे योगेश कासार-पाटील, 'क्रेडाई'चे उमेश वानखेडे, भूषण मटकरी, रवी महाजन, राजन दर्यानी, डी. जे. हंसवानी, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिीनअरींगचे संतोष मुथा, बार असोशिएशनचे अॅड. नितिन ठाकरे, अॅड जालिंदर ताडगे, संजय होळकर, 'निमा'चे माजी अध्यक्ष मंगेश पाटणकर, गुंज फाउंडेशनचे संदीप गोयल व अमर कलंत्री, 'आयमा'चे अध्यक्ष वरुण तलवार, माजी अध्यक्ष धनंजय बेळे, रोहित भायभंग, राहुल भायभंग हे उपस्थित होते.

टूरिझमवर भर

बैठकीत टूरिझम कसे वाढवता येईल यावरही भर देण्यात आला. त्यात नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर येथील धबधबे यांचे ब्रॅण्डिग कसे करता येईल, तसेच 'बीएसएनएल'सोबत टायअप करून 'वेलकम नाशिक' असा मेसेज टाकता येईल का, अशा मुद्यांवरही चर्चा झाली. त्यात जिल्हाधिकारी यांनी टूरिझम वाढवण्यासाठी एखादी कॅच लाइन वा बॅण्डिंग करणाऱ्या एखाद्या एजन्सीला सोबत घेत आराखडा तयार करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधी, न्यायकडून तपासणी

$
0
0

आदिवासी विकास मंत्र्यांची माहिती; साहित्य खरेदी केले नसल्याची सारवासारव

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कायापालट योजनेंतर्गत आदिवासी विभागातील ३२५ कोटींच्या वादग्रस्त फर्निचर खरेदीत घोटाळ्याचे आरोप असलेल्यांची चौकशी सुरू आहे. या खरेदीची राज्याच्या विधी व न्याय विभागाकडून तपासणी केली जात असल्याची माहिती आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली. फर्निचर खरेदीचे आदेश अप्पर आयुक्त कार्यालयाने दिले असतांनाही, डॉ. उईके यांनी मात्र साहित्य खरेदी झाली नसल्याची सारवासारव केली. खरेदी समिती पारदर्शक झाल्याचा दावा करतांना, सरकारी पातळीवर अशी तपासणी होतच असल्याचे सांगत संशयितांना वाचविण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

आदिवासी विकास विभागाने राज्यातील आश्रमशाळा आणि वसतिगृहांसाठी फर्निचर खरेदीसाठी ११२ कोटी रुपये मंजूर केले. नंतर ही रक्कम ३२५ कोटींपर्यंत वाढविण्यात आली. तसेच या प्रक्रियेत दोनच ठेकेदार कंपन्या पात्र होतील, अशी व्यवस्था करण्यात आली. फर्निचर घोटाळ्यातील अनियमितता 'महाराष्ट्र टाइम्स'ने उघडकीस आणली. त्यामुळे या प्रकरणाची तत्कालीन आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी गंभीर दखल घेत, खरेदीप्रक्रियेला स्थगिती दिली. याबाबत उपस्थित प्रश्नांसदर्भात सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याचे सांगत, चारही अप्पर आयुक्तांना पत्र पाठविले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांनाही या घोटाळ्याबाबत मुख्यमंत्र्याना पत्र देत चौकशीची मागणी केली. दुसरीकडे, निविदा प्रक्रियेत अपात्र ठरलेल्या काही ठेकेदार कंपन्यानी न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे सदरची खरेदी प्रक्रिया वादात सापडली.

विभागातील काही अधिकाऱ्यांनी बॅकडेटेड आदेश देत खरेदीची घाई सुरू केली. त्यामुळे भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला. सध्यस्थितीत या घोटाळ्याची चौकशी सुरू तसेच न्यायालयीन प्रक्रियेत मुद्दा फसलेला असतांनाच आदिवासी विकास विभागाने या खरेदीची तपासणी विधी व न्याय विभागाकडून करण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. उईके यांनी यासंदर्भात पत्रकारांशी बोलतांना माहिती दिली. विभागाने जेम पोर्टलद्वारे खरेदी प्रक्रिया राबविल्याचे सांगत, अद्याप साहित्य खरेदी केली नसल्याचाही दावा केला. एकीकडे ही खरेदी प्रक्रिया पारदर्शक असल्याचे सांगतनाच चौकशी तसेच तपासणी हा सरकारी पातळीचा भाग असल्याचे सांगत, या प्रकरणातील अधिकारी तसेच ठेकेदारांना वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न आदिवासी विकास मंत्र्यानी केला आहे.

म्हणे साहित्य खरेदी नाही

अनियमिततेची वाच्यता झाल्याने दोन अप्पर आयुक्तालयांकडून संबंधित ठेकेदार कंपन्याना घाईघाईत खरेदीचे आदेश देण्यात आले होते. यानंतर संबंधित साहित्याचा दर्जा तपासण्याचा अफलातून निर्णय विभागाने घेतला. परंतु, खरेदी प्रक्रियेतील अनियमिततेचा विषय थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचल्याने तसेच न्यायालयात सदर घोटाळ्याबाबत याचिका दाखल झाल्याने खरेदी प्रक्रिया रखडली. असे असतांनाही, डॉ. ऊईके यांनी साहित्याची खरेदी झाली नसल्याचे सांगत, सदर प्रकरणात सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भक्ती देसाईला १६.२ लाखांचे पॅकेज

$
0
0

नाशिक : विद्यार्थ्यांना नोकरीच्या उत्तमोत्तम संधी मिळाव्यात, यासाठी संदीप फाउंडेशन संचलित एसआयटीआरसी कॉलेजमध्ये झालेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये भक्ती देसाईला १६.२ लाखांचे पॅकेज मिळाल्याची माहिती संदीप फाउंडेशनच्या महाविद्यालयातर्फे देण्यात आली. ती इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाची विद्यार्थिनी असून, तिच्यासह या विभागाच्या ५३ विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या मल्टिनॅशनल कंपनीमध्ये कॅम्पस प्लेसमेंट मिळाली आहे. भक्तीला जपानच्या ओएस टेक्नॉलॉजीतर्फे हे पॅकेज मिळाले असून, प्लेसमेंट ड्राइव्हला सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमधून तीन विद्यार्थ्यांची निवड या कंपनीने केली आहे. भक्तीसोबतच विभागातील इतर विद्यार्थ्यांनाही टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस, कॉग्निझेण्ट, केपीआयटी, अॅमेझॉन, आयमस पीपल, वेब्बीझ प्रायव्हेट लिमिटेड, धूत इलेक्ट्रॉनिक्स औरंगाबाद, इपिक रिसर्च इंदोर या कंपन्यांमध्ये संधी मिळाली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस, कॉग्निझेण्ट या कंपन्यांनी विद्यार्थ्यांना ३.५० लाखांचे पॅकेज दिले आहे. ट्रेनिंग- प्लेसमेंट विभागाचे समन्वयक प्रा. एम. डी. निकोसे यांनी ही माहिती दिली. संदीप फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीपकुमार झा, प्राचार्य डॉ. संजय गंधे आणि विभागप्रमुख डॉ. गायत्री फडे यांनी विद्यार्थ्यांचा गौरव केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात धावणार इलेक्ट्रिकल सायकली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'पब्लिक बायसिकल शेअरिंग'ला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर स्मार्ट सिटी कंपनीकडून आता इलेक्ट्रिकल सायकलीही ठेवल्या जाणार आहेत. बॅटरीवर चालणाऱ्या २५ सायकली हेक्सा हिरो कंपनीने आणल्या असून, त्याचे भाडे पॅडल सायकलींच्या तुलनेत २५ ते ३० टक्के अधिक राहणार असल्याची माहिती स्मार्ट सिटीचे सीईओ प्रकाश थविल यांनी दिली आहे.

सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्यासह प्रदूषणमुक्त शहर संकल्पनेतून स्मार्ट सिटी अभियानांतर्गत पर्यावरणपूरक, आरोग्यास हितकारक आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य असा 'पब्लिक बायसिकल शेअरिंग' प्रकल्प पीपीपी तत्त्वावर सुरू करण्यात आला आहे. महापालिका आणि स्मार्ट सिटी कंपनीच्या संयुक्त विद्यमाने हेक्सी हिरो सायकलच्या मदतीने तो राबविण्यात येत असून, त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत एरिया बेस्ड डेव्हलपमेंटअंतर्गत (क्षेत्रिय पायाभूत सुविधा) संपूर्ण शहरात १०० डॉकिंग स्टेशन तयार करून हिरो कंपनीच्या वतीने एक हजार सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सायकल शेअरिंग प्रकल्पामुळे पर्यावरणपूरक वाहतूक, पैशांची बचत, शरिरस्वास्थ्य सुधारण्यास मदत, प्रदूषण कमी, इंधनाची बचत होत असल्याने नागरिकांमध्ये त्या लोकप्रिय झाल्या आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटी कंपनीने या स्मार्ट सायकल शेअरिंगचा अधिक विस्तार करण्यासह त्यात नाविन्य आणण्याचा निर्णय घेतला आहे. हिरो कंपनीने आता शहरात इलेक्ट्रिकल सायकली आणल्या आहेत. पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर २५ इलेक्ट्रिकल सायकली दाखल झाल्या आहेत.

निवडक ठिकाणी चाचपणी

या सायकलींची निवडक ठिकाणी चाचपणी केली जाणार आहे. नागरिकांच्या प्रतिसादानंतर टप्प्या-टप्पाने सायकलींची संख्या वाढवली जाणार आहे. या सायकलींमध्ये बॅटरीसह पॅडलवर चालविण्याचीही सुविधा आहे. त्यामुळे नागरिकांना दोन्ही प्रकारचा वापर करता येणार आहे. इलेक्ट्रिकल सायकली दाखल झाल्यास त्याचा अधिक प्रचार होणार असल्याचा दावा कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे. लवकरच शहरातील रस्त्यांवर इलेक्ट्रिकल सायकली धावताना दिसणार आहे.

स्मार्ट सायकल शेअरिंग प्रकल्पाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे या सायकलींसोबतच आता हेक्सा कंपनीने बॅटरीवर चालणाऱ्या सायकली रस्त्यावर आणण्याचा निर्णय घेतला असून त्याची चाचपणी सध्या सुरू आहे.

- प्रकाश थविल, सीईओ, स्मार्ट सिटी कंपनी, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लष्करी जवान ठार

$
0
0

नाशिक : सिन्नर-शिर्डी महामार्गावर वडांगळी फाट्यावर मारुती स्विफ्ट कार, क्रुझर जीप व छोटा हत्ती (मिनी ट्रक) या वाहनांदरम्यान झालेल्या तिहेरी अपघातात देवळाली कॅम्प येथील आर्टिलरी सेंटरमधील जवानाचा मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाले. व्यंकटेश रेड्डी (वय ३२, आंध्र प्रदेश) असे मृत जवानाचे नाव आहे. बुधवारी दुपारी साडेतीन वाजता हा अपघात घडला. आर. व्यंकटेश रेड्डी यांना काही दिवसांपूर्वीच मुलगी झाल्याने ते नातेवाईकांसह स्विफ्ट कारने शिर्डीकडे जात होते. त्यांच्या गाडीने शिर्डीकडून येणाऱ्या क्रुझर जीपला धडक दिली. जीपच्या पुढे असलेला मिनी ट्रकही यावेळी उलटून चालक जखमी झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकऱ्याची आत्महत्या

$
0
0

मालेगाव : तालुक्यातील ढवळेश्वर येथील एका वयोवृद्ध शेतकऱ्याने बुधवारी सकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आनंदा गंभीर आहिरे (वय ६०) असे त्यांचे नाव आहे. आहिरे यांच्या नावे एक हेक्टर १९ गुंठे एवढी सामूहिक शेती आहे. २०१५ साली कर्जमाफी योजनेचा त्यांच्या वडिलांना लाभ झाला होता. त्यानंतर मात्र त्यांच्यावर कोणतेही कर्ज नसल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, भावंडे असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२९ जागांसाठी तब्बल ४३१ अर्ज

$
0
0

लोगो - व्ही. एन. नाईक संस्था निवडणूक

फोटो - पंकज चांडोले

- -

२९ जागांसाठी ४३१ अर्ज

अखेरच्या दिवशी तब्बल ३२८ अर्ज दाखल

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

क्रांतिवीर व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत २९ जागांसाठी तब्बल ४३१ अर्ज प्राप्त झाले आहेत. बुधवारी अर्ज भरणे व स्वीकृतीचा अंतिम दिवस होता. त्यामुळे सकाळी ११ वाजेपासून ५ वाजेपर्यंत शिक्षणसंस्थेच्या प्रांगणात अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी झाली होती. शेवटच्या दिवशी तब्बल ३२८ अर्ज प्राप्त झाले. अध्यक्ष, सरचिटणीस या मुख्य पदांसह, उपाध्यक्ष, सहचिटणीस, विश्वस्त, महिला संचालक, इतर संचालक आदी २९ जागांसाठी ४३१ अर्ज प्राप्त झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी अॅड. गजेंद्र सानप यांनी दिली आहे.

संस्थेच्या सन २०१९ ते २०२४ या पाच वर्षांची कार्यकारिणी निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ३० जून रोजी अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर ३ जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत होती. ज्येष्ठ विश्वस्त मंडळाचे सहा सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि सहचिटणीस ही चार पदाधिकारी पदे आहेत. तर, नाशिक तालुका व शहरासह इगतपुरी (४ जागा), सिन्नर तालुका (३ जागा), निफाड व चांदवड (३ जागा) येवला व मालेगाव (२ जागा), नांदगाव, बागलाण, कळवण (२ जागा), दिंडोरी, पेठ व सुरगाणा तालुका (३ जागा) आणि महिला प्रतिनिधी (२ जागा) यासाठी ही निवडणूक प्रक्रिया होत आहे.

हे दिग्गज रिंगणात

अध्यक्ष पदासाठी विद्यमान अध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांच्यासह बाळासाहेब सानप, अॅड. पी. आर. गिते, अशोक धात्रक, दिगंबर गिते, तुकाराम दिघोळे, दामोदर मानकर आदींनी अर्ज दाखल केले आहेत, तर सरचिटणीस पदासाठी विद्यमान सरचिटणीस हेमंत धात्रक यांच्यासह अॅड. पी. आर. गिते, अंजली दिघोळे, अभिजित दिघोळे, अशोक धात्रक, मनोज बुरकुले, अशोक आव्हाड, दिगंबर गिते आदींनी अर्ज दाखल केले आहेत. विश्वस्तपदासाठी सखाराम कराड, एकनाथ कातकाडे, अशोक कराड, भिकाजी पालवे आदींचे अर्ज आले आहेत. आज (४ जुलै) अर्जांची छाननी करण्यात येणार असून ८ जुलैपर्यंत अर्ज माघार घेण्यास मुदत देण्यात आली आहे. ९ जुलै रोजी उमेद्वारांना निशाणी वाटप करण्यात येणार आहे. २० जुलै रोजी मतदान होणार असून २१ जुलैला मतमोजणी होणार आहे.

----------------------

निवडणूक बिनविरोध व्हावी

सामाजिक चळवळीत शंभर वर्षे व ज्ञानदानाच्या क्षेत्रात गेली ५० वर्षे प्रगतीसाठी काम करणाऱ्या व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. शिक्षण क्षेत्राचे ज्ञान असलेल्या जास्तीत जास्त लोकांचा सहभाग संस्थेच्या कामकाजात वाढण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने सर्वांनी काळाची पावले ओळखून निवडणूका बिनविरोध होण्यासाठी समाज धुरिणांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन संस्थेचे ज्येष्ठ सभासद व माहिती विभागाचे संचालक शिवाजी मानकर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'राज्यात मागेल त्याला खावटी कर्ज मिळणार'

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक आदिवासींकडून मागणी झाल्यास पुन्हा खावटी कर्ज दिले जाईल, असे आश्वासन आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिले. राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या काही शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसोबत भेदभाव झाल्याचे आढळून आल्यास अशा संस्थाची मान्यता रद्द केली जाईल. तसेच आश्रमशाळांच्या सुविधांकडे दुर्लक्ष केल्यास यापुढे संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यास दोषी धरले जाईल, अशा इशाराही त्यांनी दिला आहे. मंत्रीपद स्वीकारल्यानंतर उईके यांनी बुधवारी (दि. ३) प्रथमच आदिवासी विभाग अंतर्गत येणाऱ्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक येथील शासकीय विश्रामगृहावर घेतली. विविध योजनांचा आढावा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आदिवासी विकास विभागाने तब्बल पंचवीस हजार मुला-मुलींना इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश मिळवून दिला. मात्र, या विद्यार्थ्यांना वेगळ्या वर्गात बसविले जात असल्याच्या तक्रारी आल्या. याबाबत डॉ. उकई यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळांना कडक शब्दात इशारा दिला. यावेळी आमदार राजाभाऊ वाजे, डॉ. राहुल आहेर, आदिवासी विकास विभागाचे आयुक्त कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी धावाधाव

$
0
0

पाणीकपातीने नागरिकांचे हाल; पालिकेकडून ६६० दशलक्ष लिटरची बचत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक/नाशिकरोड

गंगापूर धरणातील पाण्याच्या पातळीने तळ गाठल्यामुळे महापालिकेने मागील रविवारपासून पाणीकपात सुरू केली आहे. या कपातीमुळे पाच दिवसांत ६६० दशलक्ष लिटर पाण्याची बचत झाली आहे. महापालिकेने गुरुवारी संपूर्ण दिवस 'ड्राय डे' ठेवत एकाच दिवशी ४६० दशलक्ष लिटर पाण्याची बचत केली आहे. दुसरीकडे शहरात सात वर्षांनंतर प्रथमच संपूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहिल्याने सिडको, सातपूर भागासह झोपडपट्टीतील रहिवाशांना अडचणींना सामोरे जावे लागले. पाणीकपातीबद्दल अनेकांना माहितीच नसल्याने आयत्यावेळी हंडाभर पाण्यासाठी अनेकांना धावाधाव करावी लागली.

पावसाने ओढ दिल्यास भविष्यात टंचाई भासू नये म्हणून महापालिका प्रशासनाने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. ज्या भागात दोन वेळ पाणी पुरवठा होतो, तेथे एकवेळ पाणीपुरवठा होत आहे. त्यातून दररोज ५० ते ६० दशलक्ष लिटर्स पाणी वाचविले जात आहे. गेल्या चार दिवसांत यामुळे जवळपास २०० दशलक्ष लिटर्स पाण्याची बचत झाली आहे. महापालिकेच्या आरक्षित ४९०० दशलक्ष घनफूट पाण्यापैकी आता केवळ ७०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण शिल्लक राहिले आहे. गंगापूर धरणात महापालिकेचे केवळ ३८७ दशलक्ष घनफुट पाणी शिल्लक राहिले आहे, तर दारणात १४८ व मुकणेत १७४ दशलक्ष घनफूट आरक्षण शिल्लक राहिले आहे.

साठवणुकीची अडचण

एक दिवसाच्या पाणीकपातीच्या निर्णयामुळे फ्लॅटमधील रहिवासी, मजूर, झोपडपट्टीधारक अशा सर्वांना ज्यांना पाणी साठवणुकीचे साधन नाही त्यांचे हाल झाले. सन २०१२ मध्ये पाणीटंचाईमुळे महापालिकेने आठवड्यातील एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला होता. त्यानंतर सात वर्षांनी आता एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे जाहीर करून अंमलबजावणी सुरू केली आहे. गंगापूर आणि कश्यपी धरणात अल्प पाणीसाठा आहे. पाणीकपातीमुळे नाशिककरांपुढे समस्या उभी राहिली आहे, ती पाणी साठवणुकीची. अनेकांनी पिंप, टाक्या, खरेदीस सुरवात केली आहे, तर काहींनी माळ्यावरील हांडे, टाक्या काढल्या आहेत. अनेक कार्यालये, सोसायट्यांनी पाण्याच्या टाक्या साफ करून घेतल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेल्पलाइनचा प्रचार आता फ्लेक्सद्वारे होणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक सरकारी कामकाजाचा पाठपुरावा करता यावा याकरीता जिल्हाधिकारी कार्यालयात 'व्हॉटसअॅप ग्रिवन्स रिड्रेसल' ही हेल्पालाइन सुरू केल्यानंतर आता त्याच्या प्रसारावरही जोर देण्यात आला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील प्रांत व तहसीलदार यांना जिल्हाधिकारी कार्यालयाने पत्र पाठवून सर्वसामान्यांना या योजनेची माहिती व्हावी यासाठी फ्लेक्स तयार करून सार्वजनिक ठिकाणी लावण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कामाचा पाठपुरवा करण्यासाठी स्वतंत्र मध्यवर्ती तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. ९४२१९५४४०० या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संपर्क साधून नागरिक त्यांच्या कामाचे पुढे नेमके काय झाले, याची माहिती येथे मिळणार आहे. पण, या क्रमांकाची व या योजनेची माहिती सर्वसामान्यांना जिल्ह्यात माहिती व्हावी, यासाठी आता फ्लेक्स लावले जाणार आहे. प्रांत, तहसील, तलाठी, सेतू, आपले सरकार या कार्यालयांच्या दर्शनी भागात ते फ्लेक्स उभारले जाणार आहेत. तसेच रेल्वे स्टेशन, बस स्टँण्ड व रेशन दुकानातही हे फ्लेक्स दिसणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना या क्रमांकावर संपर्क साधता येईल. त्याचप्रमाणे हेल्पलाइनची माहिती सुद्धा मिळेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फी विरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार

$
0
0

शिक्षण उपसंचालक कार्यालयावर छात्रभारतीचा मोर्चा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सध्या सुरू असणाऱ्या महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेत नियम आणि कायदे डावलून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर फी महाविद्यालयांकडून वसूल केली जाते. अशा महाविद्यालयांची त्वरित चौकशी सुरू व्हावी, यासाठी छात्रभारती संघटनेच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयावर गुरुवारी मोर्चा काढण्यात आला.

जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये कॅपिटेशन अॅक्टचे उल्लंघन विविध मार्गांनी होत असल्याचा दावा छात्रभारतीने केला. ६ मार्च १९८६ च्या कायद्यानुसार मुलींना इयत्ता बारावीपर्यंत मोफत शिक्षण हक्क कायदा लागू व्हावा, जिल्ह्यात विकासनिधी, बोनाफाईड, दाखला, संगणक, पूर्वपरीक्षा, इंटरनेट, मॅग्झिन आणि इतर सुविधा या नावांखाली घेतलेली फी त्वरीत परत द्यावी, विनाअनुदानित महाविद्यालयांची शुल्क वसुली एकाच स्तरावर असावी, अनेक कॉलेजेस पॅटर्न फी वसूल करतात; त्याच पायबंद बसावा, अनेक कॉलेजेस जिमखान्यासह विविध सुविधा पुरव नसतानाही या नावे फी वसूल करतात हे बंद व्हावे अशा मागण्या संघटनेने केल्या आहेत. निवेदनावर संघटनेचे राज्य उपाध्यक्ष राकेश पवार, राज्य सदस्य समाधान बागूल, जिल्हाध्यक्ष राहुल सूर्यवंशी, शहराध्यक्ष सदाशिव गणगे, आम्रपाली वाकळे, निवृत्ती खेताडे, ताराचंद्र रुपवत, भावेश सोनवणे आदींच्या सह्या आहेत.

नाशिक विभागीय मंडळाच्या निर्देशानुसार गठीत करण्यात आलेली विशाखा समिती अनेक कॉलेजांमध्ये अस्तित्वात नाही. ही समिती त्वरीत अस्तित्वात यावी. याशिवाय कॉलेजमध्ये रॅगिंगचे प्रकार रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करून त्याची माहिती देण्यात यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

या महाविद्यालयांची चौकशी करा

केटीएचएम कॉलेज, बीवायके कॉलेज, आरवायके कॉलेज (नाशिक), बिटको गर्ल्स कॉलेज (सीबीएस),

छत्रपती कॉलेज (मखमलाबाद), जनता कॉलेज (दिंडोरी), केव्हीएन नाईक कॉलेज (दिंडोरी), एलव्हीएच कॉलेज (पंचवटी), जनता ज्युनिअर कॉलेज (सातपूर), बिटको कॉलेज (नाशिकरोड), जीएमडी कॉलेज (सिन्नर), म. फुले कॉलेज (सिन्नर), ग्लोबल कॉलेज (चिंचबारी), पीव्हीजी ज्युनिअर कॉलेज (म्हसरूळ) आणि केएसकेडब्ल्यू कॉलेज (पवननगर, नाशिक) या कनिष्ठ महाविद्यालयांची चौकशी करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शॉक लागल्याने तरुणाचा मृत्यू

$
0
0

नाशिक : विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटार सुरू करीत असतांना शॉक बसल्याने नवनाथ नारायण पथवे (२५, पांढुर्ली, ता. सिन्नर) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मखमलाबाद शिवारातील गायकवाड मळा भागात घडली. शासकीय नर्सरी परिसरातील राजेंद्र गायकवाड यांच्या शेतावरील विहिरीतील मोटार सुरू करीत असतांना गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मोटारच्या स्टार्टरमध्ये वीज पुरवठा उतरल्याने नवनाथ पथवे दूरवर फेकला गेला. त्याला जिल्हा रुग्णालयात तत्काळ दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

मोहाडीला तरुणाची आत्महत्या

नाशिक : मोहाडी (ता. दिंडोरी) येथील दीपक राजाराम ढेपले (२८) या तरुणाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. दीपकने मंगळवारी (दि. २) रात्री अज्ञात कारणातून आपल्या घरी विषारी औषध सेवन केले. ही बाब लक्षात येताच वडिल राजाराम ढेपले यांनी त्यास जिल्हा रुग्णालयात तत्काळ दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना गुरुवारी (दि. ४) सकाळी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी दिंडोरी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रामचंद्र जाधव सेनेकडून ‘पावन’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शिक्षण उपसंचालक पदावर कार्यरत असताना वादग्रस्त ठरलेले माजी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांना शिवसेनेने विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पावन करून घेतले आहे. जाधव यांनी गुरुवारी मुंबईत 'मातोश्री'वर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला आहे. निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी जाधव यांच्यावर अपसंपदेप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापे मारले होते. त्यामुळे जाधव यांनी यांचा शिवसेनेतील प्रवेश कारवाई टाळण्यासाठी की राखीव मतदारसंघातून उमेदवारी करण्यासाठी याची चर्चा सुरू झाली आहे.

जाधव यांचे अनेक निर्णय वादग्रस्त ठरले होते. विशेषत: शिक्षक तसेच शाळांना मान्यता देताना अनियमितता केल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातो. अनियमित कारभारामुळे जाधव शिक्षण विभागाच्याच रडारवर आले होते. जाधव यांच्यावर ४६ लाखांची अपसंपदा जमविल्याचा गुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केला होता. चौकशीत जाधव यांनी अपसंपदा जमविल्याचे सिद्धही झाले होते. त्यानुसार त्यांची चौकशीही सुरू आहे. निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी जाधव यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापेही मारले होते. त्यांच्या अटकेचेही विभागाने प्रयत्न केले होते. एकीकडे लाचलुचपत विभागाची कारवाई सुरू असतानाच जाधव यांनी गुरुवारी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेचे आमदार नरेंद्र दराडे यांच्या मध्यस्तीने जाधव यांनी हा प्रवेश केला असून, ते श्रीरामपूर मतदारसघांतून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तांना निवेदन

$
0
0

राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे

मनपा आयुक्तांना निवेदन ⏰

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सातपूरमधील ध्रुवनगर येथे पाण्याची टाकी कोसळून झालेल्या चार मजुरांच्या मृत्यूप्रकरणी नाशिक शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांना निवेदन देण्यात आले.

'अपना घर' प्रकल्पाच्या ठिकाणी पाण्याची टाकी कोसळून चार मजुरांना जीव गमवावा लागला. यात एका महिला मजुराचाही समावेश आहे. या महिलेची चार बालके अनाथ झाली आहेत. शहरात जेवढे मोठे बांधकाम प्रकल्प सुरू आहेत, त्या ठिकाणी महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करावी. बांधकाम मजुरांना सुरक्षा पुरविण्यात आली आहे का, त्यांची राहण्याची योग्य व्यवस्था आहे की नाही याची खातरजमा करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मजुरांबाबत उपाययोजना केल्या नसतील तर बांधकाम सुरू करण्यास परवानगी देऊ नये, असेही निवेदनात म्हटले आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक शहराध्यक्षा अनिता भामरे, सलमा शेख, संगिता पाटील, शकिला शेख, शाहीन खान आदींनी हे निवेदन दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवघ्या ३० क्लासेसमध्ये अग्निसुरक्षा!

$
0
0

- २०९ खासगी संस्थांना नोटिसा

- महापालिकेचा अहवाल राज्य शासनाकडे

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सुरतमध्ये काही दिवसांपूर्वी घडलेल्या क्लासेसच्या आग दुर्घटनेनंतर जागे झालेल्या महापालिकेने शहरातील खासगी क्लासेसचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. शहरातील २३९ खासगी क्लासेसपैकी जेमतेम ३० क्लासमध्येच अग्निप्रतिबंधक उपाययोजना असल्याचे यात आढळून आले आहे. त्यामुळे २०९ क्लासमध्ये कुठलीही अग्निप्रतिबंधक योजना नसल्याने हे क्लासेस धोकादायक असल्याचा अहवाल महापालिकेच्या मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांनी राज्य शासनाला सादर केला आहे.

सुरतमधील एका व्यापारी संकुलाला गेल्या महिन्यात लागलेल्या आगीत खासगी क्लासमधील २१ विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला होता. या दुर्घटनेनंतर शहरातील खासगी क्लासेसमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. या दुर्घटनेची गंभीर दखल घेत महापालिकेने शहरातील खासगी क्लासेसचे सर्वेक्षण करीत अग्निप्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी संबंधित क्लासचालकांनी केली आहे किंवा नाही, याची तपासणी सुरू केली. पहिल्या टप्प्यात शहरात २१० खासगी क्लासेसचे सर्वेक्षण महापालिकेने केले होते. परंतु, सुटीच्या कालावधीत मोठे क्लासेस बंद असल्याचे समोर आले होते. सुटी संपल्यानतर महापालिकेने दुसऱ्या टप्प्यात सहा पथकांमार्फत सर्वेक्षण केले होते. त्यात २९ क्लासेस आढळून आले होते. शहरात एकूण २३९ क्लासेस आढळून आले. परंतु, यापैकी जेमतेम ३० खासगी क्लासेसमध्येच अग्निप्रतिबंधक उपाययोजना आढळून आल्या आहेत. त्यामुळे अग्निप्रतिबंधक उपाययोजना नसलेल्या खासगी क्लासचालकांना महापालिकेने नोटिसा बजावल्या असून, यासंदर्भातील अहवालही राज्य शासनाला सादर केला आहे. सुरत दुर्घटनेतून धडा घेत खासगी क्लासमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी धोरण ठरविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे आता खासगी क्लासेसबाबत शासनाकडून काय धोरण आखले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सुविचार गौरव’साठी प्रस्ताव पाठवा

$
0
0

'सुविचार गौरव'साठी

प्रस्ताव पाठवा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कला, क्रीडा, कृषी, साहित्य, शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, प्रशासन व उद्योग अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी सुविचार गौरव पुरस्कार देण्यात येतात. यावर्षीच्या पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे तसेच नावे सुचविण्याचे आवाहन सुविचार गौरव मंचचे अध्यक्ष अॅड. अशोक खुटाडे यांनी केले आहे.

समाजासाठी अविरतपणे झटणाऱ्या सर्वसामांन्यांमधील आदर्श व्यक्तींना पुरस्काराने सन्मानीत करून त्यांचे कार्य समाजापुढे आणण्यासाठी हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. ८ जुलैपर्यंत हे प्रस्ताव एफ-१०, नानाजी शेटे बिझनेस सेंटर, कॅनडा कॉर्नर, नाशिक या कार्यालयात सकाळी १२ ते ३ या वेळेत प्रत्यक्ष सादर करावे असे आवाहन करण्यात आले आहे. पात्र व्यक्तींनी आपले प्रस्ताव, सर्व कामे व आपल्या क्षेत्रातील आपण केलेल्या संपूर्ण माहितीसह वरील पत्त्यावर मुदतीत पाठवावे. आलेल्या प्रस्तावांमधून निवड समितीने निवडलेल्या पुरस्कारार्थीना एका भव्यदिव्य व शानदार कार्यक्रमात दिग्गज मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. याबाबत निवड समितीचा निर्णय अंतिम राहील असेही संस्थेच्यावतीने सांगण्यात आले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी ९४२१५६३५५५ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘क्विलिंग आर्ट’ची पर्वणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब'तर्फे येत्या रविवारी (दि. ७ जुलै) क्विलिंग आर्ट कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

आषाढी एकादशीनिमित्त क्विलिंग आर्टद्वारे श्री विठ्ठल साकारण्याची संधी नाशिककरांसाठी चालून आली आहे. ही कार्यशाळा मिनी मिरॅकल्स, रो-हाऊस क्रमांक १४, पारिजातनगर, महात्मानगर येथे सकाळी ११ वाजता होणार आहे. त्यात पूजा गवळी मार्गदर्शन करणार आहेत. कल्चर क्लब सभासदांसाठी २०० रुपये, तर इतरांसाठी ४०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

कार्यशाळेसाठी येताना कात्री, डिंक आणि ब्लॅक कलरच्या क्विलिंग स्ट्रिप्सची दोन पाकिटे आणावीत, बाकी सर्व साहित्य आयोजकांकडून मिळणार आहे. या कार्यशाळेत वय वर्षे ८ ते ८० वयोगटाचे अबालवृद्ध सहभागी होऊ शकतात. रजिस्ट्रेशनसाठी ९४२२५१३५६९ या मोबाइल क्रमांकावर दुपारी १ ते ६ या वेळेत संपर्क साधावा किंवा महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड येथे भेट द्यावी.

---

२९९ रुपयांत सदस्यत्वाची संधी

'मटा कल्चर क्लब'चे सदस्यत्व अवघ्या २९९ रुपयांत मिळविण्याची संधी उपलब्ध करवून देण्यात आली आहे. ऑनलाइन सदस्यत्वासाठी www.mtcultureclub.com या संकेतस्थळास भेट देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images