Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

शॉक बसल्याने प्लंबरचा मृत्यू

$
0
0

नाशिक : ड्रिल मशिनने भिंतीस होल पाडत असतांना अंडरग्राऊंड असलेली वीज वितरणाची वायर तुटल्याने प्लंबरचा शॉक बसून मृत्यू झाला. ही घटना उंटवाडीतील सिटी सेंटर मॉलमध्ये घडली. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सुमेरसिंग बहादुरसिंग देवरे (वय ३५, रा. खोडे मळा, सावतानगर सिडको) असे मृत प्लंबरचे नाव आहे. देवरे हे शनिवारी (दि.१५) एका ठेकेदारामार्फत मॉलमधील दुरुस्तीचे काम करीत असतांना ही घटना घडली. नळफिटींगसाठी दुपारी साडेतीनच्या सुमारास देवरे हे ड्रिलमशिनने भिंतीस होल पाडत होते. यावेळी अंडरग्राऊंड असलेली वीजपुरवठा करणारी वायर तुटली. त्यामुळे ड्रिल मशिनमध्ये वीजप्रवाह उतरला. या घटनेत देवरे गंभीर जखमी झाले होते. दोन्ही हात भाजल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात तत्काळ दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून देवरे यांना मृत घोषित केले.

वृद्धाचा मृत्यू

नाशिक : घरासमोरील अंगणात चक्कर येऊन पडल्याने दत्तात्रेय रघुनाथ यार्दी (रा. सर्वेश बंगला, कार्तिकेयनगर) यांचा मृत्यू झाला. ही घटना सिडकोतील कामटवाडा भागात घडली. यार्दी हे शनिवारी (दि. १५) दुपारी तीनच्या सुमारास आपल्या घरासमोरील अंगणात उभे असतांना अचानक चक्कर येऊन जमिनीवर कोसळले. जिल्हा रुग्णालयात त्यांना तत्काळ दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आरोग्याधिकाऱ्यावर लाचखोरीचा गुन्हा

$
0
0

कर्मचाऱ्याकडे १० हजारांच्या लाचेची मागणी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत वादग्रस्त ठरल्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये आरोग्याधिकारी म्हणून दाखल झालेल्या डॉ. विजय डेकाटे यांच्याविरूद्ध लाच मागितल्याप्रकरणी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला. वादग्रस्त कारर्कीद राहिलेल्या डॉ. डेकाटे यांच्याविरूद्ध थेट गुन्हा दाखल झाल्याने जिल्हा परिषदेसह आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. गुन्हा दाखल होण्याची कुणकुण लागल्यापासून डॉ. डेकाटे रजा टाकून गेले आहे. सध्या ते कोणाच्याही संपर्क नाहीत. 'एसीबी' त्यांचा शोध घेत असून, लवकरच पुढील कार्यवाही करण्याचे संकेत अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

तालुका आरोग्याधिकाऱ्याच्या वेतनात ऑक्टोबर २०१८ पासून वेतनवाढ लागू करण्यासाठी डॉ. डेकाटे यांनी २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. बराच दिवसांपासून याबाबतचे भिजत घोंगडे पडले होते. त्यामुळे वैतागलेल्या तक्रारदाराने 'एसीबी'कडे तक्रार केली. २१ मे रोजी तक्रार प्राप्त झाल्यानंतर 'एसीबी'ने पडताळणी सुरू केली. या पडताळणीत तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या डॉ. डेकाटे यांनी १० हजार रुपयांवर तडजोड करण्याचे मान्य केले. यानंतर 'एसीबी'ने एकदा सापळाही रचला. मात्र, ट्रॅप होण्याच्या भितीने डॉ. डेकाटे यांनी ही रक्कमच स्वीकारली नाही. याच दरम्यान डॉ. डेकाटे दीर्घकालीन रजेवर निघून गेले. लाच मागणे हा सुद्धा भ्रष्टाचाराचा प्रकार असल्याने आणि तसे पुरावे आपल्या विभागाकडे असल्याने 'एसीबी'चे अधीक्षक सुनील कडासने यांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार शनिवारी दुपारी भद्रकाली पोलिस ठाण्यात डेकाटे विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. डेकाटे हे वर्ग एकचे अधिकारी असून, त्यांचा शोध सध्या सुरू असल्याचे अधीक्षक कडासने यांनी सांगितले. ते समोर आल्यानंतर पुढील कार्यवाही सुद्धा सुरू करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

वादग्रस्त कारर्कीद

महापालिकेत असताना डॉ. डेकाटे यांची कारर्कीद गाजली होती. यानंतर त्यांना बदलीला समोरे जावे लागले. मात्र, नाशिकमध्येच काम करायचे असा चंग त्यांनी बांधला होता. त्यामुळे जिल्हा परिषदेचे तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे यांची बदली करून त्यांनी आपली वर्णी लावली. हा वाद राजकीय आणि प्रशासकीय दृष्टीकोनातून बराच गाजला. जिल्हा परिषदेत हजर झाल्यानंतर डॉ. डेकाटे यांच्याविरूद्ध छोट्या-मोठ्या तक्रारी येत होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पुण्याच्या धर्तीवर पार्किंग मोफत करा’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील सर्व मॉलमध्ये नागरिकांना पार्किंग करणेबाबतचा ठराव पुणे महापालिकेच्या महासभेत करण्यात आला आहे. याच धर्तीवर नाशिक महापालिकेने ठराव करून शहरातील सर्व मॉल्समध्ये पार्किंग मोफत करावी, असा आशयाचा अशासकीय प्रस्ताव शिवसेनेच्या नगरसेविका किरण गामणे तसेच दीपक दातीर यांनी दिला आहे.

पुणे शहरात पार्किंगचा प्रश्‍न बिकट झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर शहर सुधार समितीने मॉल्समध्ये पार्किंग मोफत करण्याचा निर्णय घेतला असून महासभेनेही त्याला मान्यता दिली आहे. पुण्याप्रमाणेच नाशिकमध्ये देखील पार्किंगची समस्या मोठी आहे. अनेक ठिकाणी 'पे अॅण्ड पार्क पार्किंग' असल्याने नागरिकांना परवडतं नाही. शहराच्या मध्यवर्ती भागात वाहने उभी केल्यास वाहतूक पोलिसांकडून ती वाहने उचलून नेली जातात. त्यापार्श्‍वभूमीवर पुण्याप्रमाणेच नाशिकमधील मॉलमध्ये देखील मोफत पार्किंग उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसा प्रस्ताव येत्या महासभेवर ठेवण्यात आला आहे. शहरात मॉल्सधारकाकडून चुकीच्या पद्धतीने पार्किंग शुल्क वसूल केले जात असल्याचा आरोप शिवसेनेच्या बाळा दराडे यांनी केला आहे. महासभेने हा ठराव मंजूर करून नाशिकककरांना पार्किंगच्या जाचातून मुक्त करावे, अशी मागणी त्यांनी महापौरांकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सन्मान नसेल तर स्वबळावर लढा

$
0
0

काँग्रेस पदाधिकारी-कार्यकर्त्यांची भूमिका

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुक काळात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाकडून सन्मानजनक वागणूक मिळाली नाही. विधानसभा निवडणुकीत सन्मानजनक आघाडी झाली तरच 'राष्ट्रवादी'सोबत जायला हवे. समसमान जागा मिळाल्यास ही निवडणूक एकत्रितपणे लढावी. अन्यथा काँग्रेसने जिल्ह्यातील सर्व जागा स्वबळावर लढवाव्यात, असेही मत काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नोंदविले आहे.

जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात पक्षाची तयारी, तालुका पदाधिकाऱ्यांचे मत जाणून घेण्यात आले. यावेळी डॉ. शेवाळे म्हणाले, की कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र स्वरूपाच्या आहेत. या भावना पक्षश्रेष्ठींना कळविण्यात येतील. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ग्राम काँग्रेसचे कार्यालय तातडीने सुरू करावेत. या माध्यमातून जनतेचे प्रश्न गंभीरपणे हाताळण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. बैठकीला निवृती डावरे, दिगंबर गिते, प्रल्हाद पाटील, साखरचंद कांकरिया, विनायक सांगळे, संजय जाधव, मनोहर आहिरे, सखाराम भोये, संपतराव वक्ते, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आक्रमकतेची गरज

पक्षाच्या कार्यकर्त्यांनी झपाटून कामाला लागतानाच आक्रमक होणे काळाची गरज आहे, असे मत माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी व्यक्त केले. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेळ देणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेससोबत सन्मानजनक आघाडी करून काँग्रेसने एकत्रितपणे निवडणूक लढविणे हे दोन्ही पक्षांच्या हिताचे आहे.

- डॉ. शोभा बच्छाव, माजी मंत्री

आगामी निवडणुकीत लढतांना काँग्रेसने राज्यभरातील राखीव मतदार संघासाठी आग्रह धरावा.

- ज्ञानेश्वर काळे,

जिल्हाध्यक्ष, अनुसूचित विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नायपर’ मध्ये हर्षद देशात दुसरा

$
0
0

\Bम. टा. प्रतिनिधी, नाशिक

\B'नायपर' या राष्ट्रीय संस्थेतील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेत 'मविप्र' फार्मसी कॉलेजचा विद्यार्थी हर्षद जाधव हा देशात दुसरा आला आहे. औषधनिर्माणशास्त्र विद्याशाखेतील संशोधनासाठी कार्यरत असणाऱ्या नायपर (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च) या संस्थेतील प्रवेशासाठीच्या पात्रता परीक्षा घेण्यात येते. यात 'मविप्र'च्या फार्मसी कॉलेजच्या २६ विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.

'नायपर'मध्ये यश मिळविणाऱ्या 'मविप्र'च्या २६ पैकी ७ विद्यार्थ्यांनी १०० च्या आत रँक मिळविला आहे. हर्षद जाधव हा भारतात दुसरा, सौरभ भोरकडे हा १६ वा, संजली पाणीग्रही हिने २० वा, शुभांगी पुंड हिने ३३ वा, साक्षी पगार हिने ४७ वा, सिद्धांत गायकवाडने ८३ वा तसेच योजना भोर हिने ९८ वा क्रमांक मिळविला. नायपर ही राष्ट्रीय पातळीवरील संस्था असून तेथे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात शिष्यवृत्ती तसेच शिक्षणानंतर नामांकित ठिकाणी कामाची संधी मिळते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सरचिटणीस नीलिमा पवार, सभापती माणिकराव बोरस्ते, चिटणीस डॉ. सुनील ढिकले, उपसभापती राघोनाना अहिरे, संचालक नाना महाले, सचिन पिंगळे, शिक्षणाधिकारी डॉ. एन. एस. पाटील, प्राचार्य डॉ. डी. व्ही. डेर्ले व शिक्षकेतर सेवकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

असे आहेत यशस्वी विद्यार्थी

हर्षद जाधव (२), सौरभ भोरकडे (१६), संजाली पाणीग्रही (२०), शुभांगी पुंड (३३), साक्षी पगार (४७), सिद्धांत गायकवाड (८३), योजना भोर (९८), कमलेश सोनवणे (१२८), मयुरी दळवी (१२९), सायली चौधरी (१५६), प्रतिक्षा पाटील (१५७), श्रुती पाटील (१६२), श्रेया पांडे (१७१), सागर आरोटे (३०४), संजिरी शेलार (३४३), दीक्षा अडसरे (३५४), श्रद्धा शिरसाठ (३६६), गौरव बोथरा (३८०), श्रेया मसुरकर (५२४) , विजय भालेकर (७१९), चैताली ढोमसे (९५१), राणी गोरडे (९६८), वासंती पाटील (११२७), अनघा उपासनी (१२८४), निकिता परदेशी (१२३४) आणि चेतन पलवी (१७६९)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात अवघे २२४३ वटवृक्ष

$
0
0

महापालिका वटवृक्षांची संख्या वाढविणार

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भारतीय संस्कृतीत आणि आयुर्वेदात वटवृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व असले तरी, सिमेंटच्या वाढत्या जंगलामुळे दिवसेंदिवस दुर्मिळ अशा वटवृक्षांची संख्या कमी होत असल्याचे चित्र आहे. महापालिका हद्दीत नुकत्याच पार पडलेल्या वृक्षगणनेत शहरात अवघे २२४३ वटवृक्ष आढळून आले आहेत. त्यामुळे महापालिकेने शहरात वडाच्या झाडांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला असून, शहरात दरवर्षी किमान शंभर वटवृक्ष जगविली जाणार आहेत. खासगी पर्यावरण संस्थांच्या मदतीने वटवृक्षांची संख्या वाढविण्यावर महापालिकेच्या उद्यान विभागाने काम सुरू केले आहे.

भारतीय संस्कृतीत वडाच्या झाडाचे असाधारण महत्त्व विशद करण्यात आले आहे. पुराणातील सत्यवान-सावित्रीची कथा या वडाच्या झाडाशी इतकी निगडीत आहे की वटपौर्णिमेला सर्व हिंदू स्त्रिया आजही श्रद्धेने आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे म्हणून वडाच्या झाडाचे पूजन करतात. आधुनिक भाषेत वटवृक्ष नैसर्गिक व्हेन्टिलेटरचे काम करतो. त्याच्या आसपास राहणाऱ्या लोकांना सहजपणे शुद्ध प्राणवायू मिळत असतो. अशा या दुर्मिळ आणि महत्त्वपूर्ण वटवृक्षांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याचे चित्र आहे.

शहरी भागात वाढत असलेल्या सिमेंटच्या जंगलामुळे तर या वृक्षांची संख्या अधिकच कमी होत आहे. महापालिकेने नुकत्यात केलेल्या वृक्षगणनेत ४८ लाख वृक्ष शहरात आढळून आले आहेत. परंतु, दुर्दैवाची बाब म्हणजे संसारवृक्ष अशी ओळख असलेल्या वटवृक्षांची संख्या मात्र अवघी २२४३ एवढीच आहे. त्यामुळे आयुर्वेदीकदृष्ट्या महत्त्वपूर्ण अशा वटवृक्षांची संख्या वाढविण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत.

गेल्या वर्षी महापालिकेने नव्याने ५० वटवृक्ष वाढवले आहेत. यंदा आणखी १०० वटवृक्ष लावण्याचा संकल्प केला आहे. त्याची सुरुवात वटसावित्री पौर्णिमेच्या दिवसापासून केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वटपौर्णिमा आजच करा साजरी’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वटपौर्णिमा कधी साजरी करावी याबाबत गृहिणींमध्ये संभ्रमाचे वातावरण असून, १६ व १७ जून रोजी वटपौर्णिमा असल्याने नक्की कोणत्या वारी उपवास धरावा याबाबत अनेक तर्क-वितर्क सुरू आहेत. मात्र रविवारी दीड वाजेपर्यंत वटपूजन करावे, अशी माहिती दाते पंचांगात देण्यात आली आहे.

यंदा ज्येष्ठ पौर्णिमेला आज (दि. १६) दुपारी दोन वाजता प्रारंभ होऊन सोमवारी (दि. १७) दुपारी दोन वाजता समाप्त होत आहे. तथापि वटपौर्णिमा मात्र ज्येष्ठ शु. १४ ला म्हणजे रविवारी दिली आहे. सूर्यास्तापूर्वी सहा घटीपेक्षा अधिक व्यापीनी अशा चतुर्दशीयुक्त असलेल्या पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीव्रत (वटपूजन) करावे असे वचन आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी दुपारी २.०२ पर्यंत चतुदर्शी तिथी असली तरी त्याच दिवशी सूर्योदयापासून मध्यान्हापर्यंत म्हणजे सुमारे दुपारी दीड वाजेपर्यंत कोणत्याही वेळी वटपूजन करावे. या शास्त्रवचनानुसार ज्येष्ठ शु. १४ ला रविवारी म्हणजे दि. १६ जून रोजी नेहमीप्रमाणे उपवासासह वटपूजन करावे, अशी माहिती दाते पंचांगात दिली आहे.

...

वटसावित्री व्रतासाठी पौर्णिमा १६ जून रोजी मिळत असून, १७ जून रोजी मिळत नाही. त्यामुळे वटसावित्री व्रत व वटपौर्णिमेचा उपवास इत्यादी रविवारी, १६ जून रोजीच करणे शास्त्रसंमत आहे. असे धर्मशास्त्रसंमत सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगात सांगितलेले आहे.

- अमोलशास्त्री किरपेकर, पुरोहित

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुंडाराज; वाहनांच्या काचा फोडल्या

$
0
0

म्हसरूळ परिसरात सहा वाहनांचे नुकसान

..

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

सशस्त्र दरोड्याच्या तपासात संपूर्ण शहर पोलिस दल कार्यरत असताना अज्ञात समाजकंटकांनी म्हसरूळ परिसरात सहा वाहनांच्या काचा फोडून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. रहिवासी भागात शनिवारी (दि. १५) पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सीसीटीव्हीचे एक अस्पष्ट फुटेज एवढाच पुरावा पोलिसांच्या हाती असून, समाजकंटकांचे आव्हान पोलिस मोडून काढणार काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नोकरदार आणि व्यावसायिक राहत असलेल्या या शांत परिसरात दहशत माजविण्याच्या दृष्टीनेच वाहनांच्या काचा फोडण्याचे घटना घडल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. दिंडोरी रोडवरील आकाश पेट्रोलपंपाच्या समोरच्या बाजूला छत्रपती शिवाजी गार्डनच्या भोवतलाच्या भागात येथील रहिवाशांची वाहने रोज पार्क करण्यात येतात. रोजच्या प्रमाणे शुक्रवारी (दि. १४) रात्री वाहने पार्क करण्यात आली होती. या उद्यानाच्या भोवतालच्या भागात साईश्रध्दा, विजयस्मिता, साईकृपा अपार्टमेंट, धनेश्वर सोसायटी आदी सोसायट्या आहेत. या सोसायटीच्या भागातील नागरिक शुक्रवारी रात्री दोन वाजेपर्यंत जागे होते. त्यानंतर रात्रीच्या सुमारास कधी या गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या हे त्यांना कळले नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. वाहनधारकांच्या तक्रारीनुसार म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये तक्रारी करण्यात आलेल्या आहेत.

..

पोलिस म्हणतात...

या भागात घटनेच्या रात्री दोन गटात हाणामारी किंवा अशा घटना झाल्याचे समोर आलेले नाही. परिसरातील एका सीसीटीव्हीमध्ये काही दृश्य कैद झाले असून, त्याआधारे आरोपींचा माग काढण्याचे काम सुरू आहे. परिसरात सातत्याने गस्त होते, त्यात वाढ करण्यात येणार आहे.

..

या वाहनांची तोडफोड

सकाळी आठच्या सुमारास अक्षय धात्रक यांच्या स्कार्पियो (एमएच १५, बीडी ७७८१) च्या मागची आणि पुढची अशा दोन्ही काचा, प्रमोद सावंत यांची फिगो (एमएच १५, सीटी ४३४२) ची पुढील काच, धनेश्वर सोसायटीतील पुष्कर जोशी यांची झेन (एमएच १२, एएन ३२४८) ची पुढील काच, प्रशांत जोशी यांची फिगो (एमएच १५, ईबी ७६२६), राजेंद्र वाघमारे यांच्या इंडिका (एमएच ४१, जी १८३५) ची पुढील काच, तसेच गुलमोहर नगर येथील मारुती सुझुकी अल्टो (एमएच १५, बीएस ८१९८) या वाहनांच्या काचा दगड आणि विटांनी फोडण्यात आलेल्या आहेत.

..

छत्रपती शिवाजी उद्यानाचा हा परिसर अत्यंत शांत आहे. या भागात राहणारे नागरिक आपापल्या कामात गर्क असतात. येथील रहिवाशी कुणाच्याही वादात कधी पडत नाही. केवळ दशहत माजविण्याच्या उद्देशाने हे कृत्य घडले असावे.

- अक्षय धात्रक, रहिवासी

......

दिंडोरी रोड परिसरात वाहनाच्या काचा फोडून त्यातील टेप रेकॉर्डर, साउंड सिस्टिम आदींच्या चोऱ्या होण्याचे प्रकार घडलेले आहेत. कारण नसताना वाहनांच्या काचा फोडण्याचे प्रकाराने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

- वैभव वाईकर, रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बुद्धिबळ स्पर्धेत वरुण अजिंक्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक जागतिक बुद्धिबळ संघटना (फिडे), अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने मुंबई येथे १३ ते १६ जून दरम्यान झालेल्या आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत नाशिकच्या वरुण संजय वाघ याने स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. शेवटच्या व निर्णायक फेरीत त्याने श्रीलंकेच्या जी जुडेडोरीसन याच्याशी डाव बरोबरीत सोडविला. वरुणला १ लाख २० हजार रुपये रोख व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले व या कामगिरीच्या आधारे त्याने आपल्या गुणांकनात ७५ गुणांची भर घातली. नाशिकचा सुपर ग्रँडमास्टर विदित गुजराती नंतर एवढी मोठी रक्कम जिंकणारा पहिलाच बुद्धिबळ खेळाडू ठरला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज रंगणार प्रवेशोत्सव

$
0
0

शाळांची घंटा वाजणार; रांगोळी अन् गुलाबपुष्पाने विद्यार्थ्यांचे स्वागत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उन्हाळ्याच्या दीर्घ सुटीत आनंदोत्सव साजरा केल्यानंतर विद्यार्थी पहिल्या दिवशी शाळेत येतील तेव्हा त्यांचे जल्लोषात स्वागत व्हावे, विद्यार्थ्यांना शाळा हवीहवीशी वाटावी, तसेच विद्यार्थ्यांना हसत खेळत शिक्षण मिळावे यासाठी यंदाही शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा केला जाणार आहे. शाळेच्या प्रांगणात आकर्षक रांगोळ्या रेखाटण्यात आल्या आहेत. शाळेतील वर्ग पताका आणि फुलांच्या माळांनी सजविण्यात आले असून, आज गुलाबपुष्प आणि गोड खाऊ देत प्रवेशोत्सव साजरा करताना विद्यार्थ्यांचा पहिला दिवस खास बनवला जाणार आहे.

शाळांच्या नव्या शैक्षणिक वर्षास २०१९-२० सोमवार (१७ जून) पासून प्रारंभ होत असून, नव्या शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांसह शाळा देखील सज्ज झाल्या आहेत. नव्या शैक्षणिक वर्षानिमित्त शालेय साहित्य, गणवेश खरेदीची लगबग बाजारात जाणवल्यानंतर रविवारी शाळा सजावटीची लगबग जिल्ह्यात दिसून आली. नव्या वर्षाच्या प्रारंभी अभ्यासक्रम शाळेच्या पहिल्या दिवसाच्या उत्सुकतेसोबतच विद्यार्थ्यांना अभ्यासाची चिंताही जाणवू लागते. नवे विषय, नवे शिक्षक, नवी पाठ्यपुस्तके यात रमण्यात विद्यार्थ्यांचा वेळ जातो. काही विद्यार्थ्यांना दडपण जाणवते. यामुळे उन्हाळ्याच्या दीर्घ सुटीनंतरही विद्यार्थ्यांना शाळेत जाणे नकोसे वाटते. मात्र, विद्यार्थ्यांना शाळा हवीहवीशी वाटावी, यासाठी गेल्या चार वर्षांपासून शाळा प्रवेशोत्सव ही संकल्पना शाळेच्या पहिल्या दिवशी राबवली जात आहे.

प्रवेशोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. 'नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत...' असे फलक शाळांबाहेर लावण्यात आले आहेत. प्रवेशोत्सवात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी जिल्ह्यातील शाळांनी नियोजन केले असून पहिल्या दिवशी देशभक्तीपर गीते, प्रभातफेरी, प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची नावे लाऊड स्पीकरवर घोषित करण्यात येणार आहे. विद्यार्थी शाळेत येताच त्याला प्रसन्न वाटावे यासाठी शाळा सजावटीवर भर देण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश वितरणही केले जाणार आहे. विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन शाळा प्रशासनाने केले आहे.

अंगणवाडीत ३० जूनपर्यंत उत्सव

नवे शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून समग्र शिक्षा हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये ३० जूनपर्यंत प्रवेशोत्सव सुरू राहणार आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने ११ ते ३० जून या कालावधीत ६ ते १४ वयोगटातील सर्व मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी पटनोंदणी पंधरवडा राबविण्यात येत आहे. २५ जून रोजी गावात शाळाबाह्य मुलांच्या भेटीचे आयोजन, २५ ते २९ जून रोजी प्रत्यक्ष पालकांच्या गृहभेटी करण्यात येणार आहे. १ जुलै रोजी पटनोंदणी पंधरवड्याबाबत केलेल्या कार्यवाहीबाबत माहिती जिल्हास्तरावर सादर केली जाणार आहे.

--

शाळा-विद्यार्थी

- जिल्ह्यात ४ हजार २३० शाळा

- ५ लाख २८ हजार २३१ विद्यार्थी

पाठ्यपुस्तकांचे वाटप

- पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके

- ८ लाख ४४ हजार ४५३ पुस्तकांचे वितरण पूर्ण

- २९ लाख ३८ हजार ९६५ प्रतींचे वाटप

खरेदीला उधाण

नाशिक : सोमवारी (१७ जून) शाळा सुरू होत असल्याने पालकांनी शालेय साहित्याच्या खरेदीसाठी रविवारी बाजारपेठेत गर्दी केली. एमजी रोड आणि मेनरोडवर पालकांची मोठी झुंबड पहायला मिळाली. युनिफॉर्मबरोबरच वॉटर बॅग, पाऊच, काळे व पांढरे शूज, सॅक आदींची खरेदी पालक वर्गाकडून केली जात होती. शाळा सुरू होणार असल्याने या गर्दीने बाजारपेठ गजबजून गेली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपट्टी देयकाचे खासगीकरण

$
0
0

प्रायोगिक तत्त्वावर दोन प्रभागांत योजना राबविण्याचा विचार; महासभेत प्रस्ताव येणार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतील अपुऱ्या मनुष्यबळामुळे पाणीपट्टीची देयके विहित कालावधीत वाटप होत नसल्यामुळे करवसुलीवर परिणाम होत आहे. वाढत्या आस्थापना खर्चाच्या नावावर सरकारकडून नोकरभरतीला परवानगी दिली जात नसल्याने पाणीपट्टीच्या थकबाकीचा आलेख वाढत चालला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून पुन्हा महावितरणच्या वीज देयकवाटपाच्या धर्तीवर पाणीपट्टीच्या देयकवाटपाचे खासगीकरण करण्याचा विचार झाला आहे. प्रायोगिक तत्त्वावर एक-दोन प्रभागांत खासगीकरणातून देयक वाटपाचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण शहरासाठी अशा प्रकारची योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

महापालिकेत रिक्त पदांची संख्या २२०० वर पोहोचली आहे. त्यातच दरमहा मोठ्या प्रमाणावर निवृत्तांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे मात्र आस्थापना खर्चाचे कारण देत, नोकरभरतीला मंजुरी दिली जात नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाला आउटसोर्सिंगचा अवलंब करावा लागत आहे. घरपट्टी व पाणीपट्टी विभाागात मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची कमतरता आहे. पाणीपट्टीची देयके दर तीन महिन्यांनी ग्राहकांना देणे अपेक्षित आहे; परंतु पाणीपट्टीची देयकेच करदात्यांपर्यंत वर्ष होऊनही पोहोचत नसल्यामुळे पाणीपट्टीची कोट्यवधींची रक्कम थकली आहे. या करवसुलीसाठी महापालिकेने मोहीम आखली असली तरी मनुष्यबळाअभावी या मोहिमेलादेखील अडचणी आहेत. त्यामुळे पाणीपट्टीच्या देयकांचे वाटप खासगीकरणातून करण्याचा विचार प्रशासन स्तरावर सुरू झाला आहे. या संदर्भातील प्रस्ताव महासभेवर सादर केला जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर एक-दोन प्रभागांत हा उपक्रम राबवून नंतर तो संपूर्ण शहरासाठी राबविण्याच्या सूचना आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी करवसुली विभागाला दिल्या आहेत. यापूर्वी दोन वेळा खासगीकरणाचा प्रस्ताव फेटाळण्यात आला होता. त्यामुळे आता याला मंजुरी मिळते काय, याकडे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जवसुली कराल, तर पिटाळून लावू

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक 'दुष्काळात सर्व सरकारी व सहकारी बँकांना कर्जवसुलीसाठी सरकारने स्थगिती दिली आहे. जिल्ह्यातही असे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत. असे असतानाही काही बँका बेकायदेशीर वसुली किंवा जमिनीचा लिलाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. वसुलीला स्थगिती असताना असे करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास अधिकाऱ्यांना पिटाळून लावू,' असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.बँक वसुली करत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी १३ मे रोजी पत्र पाठवून आदेश दिले. त्यात जिल्ह्यातील आठ तालुके व १७ महसुली मंडळ दुष्काळ घोषित केल्याची माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकच्या दर्शिता, श्रावणीला विजेतेपद

$
0
0

…महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन स्पर्धा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नागपूर येथे ११ ते १६ जून दरम्यान झालेल्या महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत १० वर्षाआतील मुले-मुली आणि १३ वर्षाआतील मुले-मुली अशा दोन गटात नाशिकच्या दर्शिता राजगुरूने १० वर्षे मुलीच्या गटात अप्रतिम खेळ करून या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. १३ वर्षे मुलींच्या गटात दुहेरी प्रकारात नाशिकच्या श्रावणी वाळेकरने मुंबईच्या तारिणी सुरीच्या साथीने दुहेरीचे विजेतेपद पटकावले.

या स्पर्धेत १० वर्षे मुलीच्या गटात प्रथम मानांकन मिळालेल्या दर्शिताने संघर्षपूर्ण उपांत्य फेरीत अमरावतीच्या नितीशा कोटेचा हिचा २२-२०, ०८-२१ आणि २३-२१ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. या लढतीत दर्शिताने पहिला सेट २२-२० असा जिंकून आघाडी मिळविली. मात्र तिला दुसरा सेट ०८-२१ अशा मोठ्या फरकाने गमवावा लागला. मात्र त्यानंतरच्या तिसऱ्या सेटमध्ये दर्शिताने आक्रमक खेळ करून १८-०८ अशी मोठी आघाडी मिळविली. परंतु नीतिशाने जिद्देने खेळ करून बरोबरी साधली. त्यानंतर दर्शिताने संयमाने खेळ करून अगदी संघर्षपूर्ण झालेल्या तिसऱ्या सेटमध्ये २३-२१ अशा फरकाने हा उपांत्य सामना जिंकून अंतिम फेरी गाठण्यात यश मिळविले. दर्शिताची अंतिम लढत दुसरे मानांकन असलेल्या नागपूरच्या फिझा अकबनीशी झाली. या लढतीत मात्र दर्शिताने कधी सुंदर ड्रॉप्स तर कधी जोरदार फटके असा अष्टपैलू खेळ करून हा अंतिम सामना २१-१५ आणि २१-१४ असा सरळ दोन सेटमध्ये आपल्या नावे करून या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. १३ वर्षे मुलींच्या गटात दुहेरीमध्ये खेळणाऱ्या नाशिकच्या श्रावणी वाळेकर आणि मुंबईच्या तारिनी सुरी या जोडीने दर्जदार खेळ करून दुहेरीचे विजेतेपद पटकावतांना क्रीशा सोनी (नागपूर) आणि कुंजल मंडलिक (अमरावती) या जोडीचा २१-१७ आणि २१-१२ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. १३ वर्षे वयोगटात एकरी प्रकारात तिसरे मानांकन असलेल्या श्रावणी वाळेकरने चांगला खेळ करून उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. मात्र या संघर्षपूर्ण लढतीच्या उपांत्य फेरीत दुसरे मानांकन असलेल्या नायेशा भटोरेकडून महत्वाचे गुण मिळविण्यात श्रावणीला अपयश आले आणि तिला हा सामना १९- २१ , १९ -२१ असा गमवावा लागला. या स्पर्धेत पाहिले मानांकन मिळालेल्या नाशिकच्या शिवसत्य मंडळाच्या पार्थ देवरेने चांगले प्रदर्शन करून उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. परंतु त्याला उपांत्यपूर्व लढतीत पराभव पत्करावा लागला. तर दुहेरीत शिवसत्य मंडळाच्या सक्षम पठानिया आणि ईशान वानखडे यांनी चांगला खेळ करून उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली.

दर्शित राजगुरू आणि श्रावणी वाळेकर यांनी याआधी मुंबई येथे झालेल्या महाराष्ट्र मनोरा बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मॉलमधील पार्किंग मोफत?

$
0
0

महासभेवर प्रस्ताव; मंजुरी न मिळाल्यास नगरसेवकांचे आंदोलन

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पुण्याच्या धर्तीवर आता नाशिकमध्येही मॉलमधील पार्किंग मोफत होण्याची चिन्हे आहेत. यासंदर्भात येत्या गुरुवारी (२० जून) होणाऱ्या महासभेवर प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यास नाशिककरांच्या खिशावरील भार काही प्रमाणात कमी होणार आहे. हा प्रस्ताव अमान्य झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा नगरसेवकांनी दिला आहे.

मॉलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना पार्किंग सुविधा मोफत देणे बंधनकारक असताना शहरातील मॉल व्यवस्थापनाकडून पार्किंगच्या नावाखाली वाहनधारकांकडून अव्वाच्या सव्वा पैसे आकारले जात आहेत. मॉल व्यवस्थापनाने ग्राहकांकडून पार्किंगचे पैसे घेऊ नये, असा नियम असताना त्याला केराची टोपली दाखवली जात आहे. शहरातील मॉलमध्ये पार्किंगचे पैसे आकारू नये, असा प्रस्ताव नगरसेवक किरण गामणे व दीपक दातीर यांनी महासभेवर ठेवला आहे.

व्यावसायिक आस्थापनेत येणाऱ्या वाहनधारकांच्या वाहनांची जबाबदारी संबंधित आस्थापनेची असते. या व्यावसायिक आस्थापनांनी विनाशुल्क वाहन पार्किंगची व्यवस्था करून द्यावी, असा नियम आहे. मात्र, मॉल व्यवस्थापन हा नियम धाब्यावर बसवत असून मॉलमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांकडून पार्किंगच्या नावाखाली भरमसाठ पैसे उकळत आहेत. काही ठिकाणी पैसे देऊनही वाहने सुरक्षित नसल्याचे निदर्शनास आले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने राज्य सरकारच्या नियमांची अंमलबजावणी सुरू करीत ग्राहकाकडून कोणत्याही प्रकारेच पार्किंग शुल्क आकारू नये आणि वाहनधारकांना मोफत पार्किंग द्यावे, असे आदेश काढले आहेत. नाशिक शहरातही पार्किंगचा मोठा प्रश्न असताना मॉलमधील पार्किंग ग्राहकांना मोफत उपलब्ध करून द्यावी, असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. हा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर झाल्यास शहरातील सर्व मॉलमध्ये या नियमांची अंमलबजावणी कशी होईल, याकडे लक्ष दिले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वनजमिनी हस्तांतरणाची होणार चौकशी

$
0
0

तक्रारीनंतर मुख्य सचिवांचे वनविभागाला आदेश

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील सायने बु येथील गट नंबर २७५ या मूळ वन विभागाच्या मालकीच्या जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण व वनेतर कामासाठी होणारा वापराची सखोल चौकशी करून वन जमीन परत घेत सर्व संबंधित दोषींवर कारवाई करावी अशी मागणी येथील स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेच्या निखिल पवार यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून, याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश राज्याचे मुख्य सचिव आयोज मेहता यांनी वनविभागाच्या प्रधान सचिवांना दिले आहेत.

याप्रकरणी सखोल चौकशी करून तत्कालीन तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी तसेच वनपाल, वनपरिक्षेत्र अधिकारी, उपविभागीय वन अधिकारी त्याचबरोबर अवैध खडी क्रशर मालक-चालक, जिल्हा खणकर्म अधिकारी यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी सामजिक कार्यकर्ते पवार यांनी केली. राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी तक्रारीची दखल घेत चौकशीसाठी प्रधान सचिव वन विभाग यांना सांगितले आहे. कोणत्याही शासन अधिसूचनेद्वारे जमिनीचे निर्वणीकरण झालेले नसेल तर त्या जमिनीस भारतीय वन संवर्धन अधिनियम तरतुदी लागू होतात. त्यामुळे सायाने बु येथील गट नंबर २७५ क्षेत्र १२१ हेक्टर ०५ आर यातील सन १९९२ मध्ये वितरित केलेले गट नंबर २७५ ब १ ते २७५ ब ८ तसेच गट नंबर २७५ अ १, २७५ अ २, २७५ अ ३ याचे वाटप पूर्णत: बेकायदेशीर व भारतीय वन संवर्धन अधिनियम १९८० च्या तरतुदींना भंग करणारे असल्याची बाब पवार यांनी आपल्या तक्रारीत लक्षात आणून दिली. त्याची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशा प्रकारे वनजमीन हडप करण्याचा प्रयत्न होत असल्याने याविषयी वनप्रेमी संस्था, व्यक्तींनी चिंता व्यक्त केली असून दोषींवर कारवाईची मागणी होत आहे.

बेकायदेशीर

खाणकाम सुरू

वन जमिनीचे महसूल विभागातील काही अधिकारी बेकायदेशीर व नियमबाह्य पद्धतीने हस्तांतरण करीत असताना त्यावर कोणताही आक्षेप नोंदविण्यात आला नाही. वन जमीन गहाळ होत असताना त्यावर खडी क्रशर खाणकाम सुरू असताना हा प्रकार रोखण्याची कोणतीही कारवाई वन विभागाच्या वतीने करण्यात आली नाही, असा अरोप पवार यांनी केला आहे.

खडी क्रशरसाठी भाडेपट्टा देताना व परवानगी देताना तत्कालीन तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व जिल्हा खानकर्म अधिकारी यांनी सदर क्षेत्राचे मागील ४० वर्षाचे सातबारा व दस्ताऐवज तपासले नाहीत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

- निखील पवार, सामाजिक कार्यकर्ते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


थकबाकी भरून वाढिदवस केला साजरा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी करंजवण योजना मार्गी लागणे आवश्यक असल्याने पालिकेने घरपट्टी, पाणीपट्टी भरण्याचे आवाहन केलेले असताना मनमाड बचाव समितीचे कार्यकर्ते सुशांत केदारे यांनी

पालिकेची घरपट्टी, पाणीपट्टी भरून वाढदिवस साजरा केला. या अभिनव उपक्रमातून नागरिकांना थकबाकी भरून करंजवण योजनेला सहकार्य करण्यासाठी प्रेरणा मिळेल असे बोलले जात आहे.

मनमाडचा पाणी प्रश्न गंभीर असल्याने करंजवण योजनेला राज्य सरकारने ग्रीन सिग्नल दिला आहे. मात्र २९७ कोटी रुपयांच्या योजनेसाठी ४५ कोटी लोकवर्गणी पालिकेला भरावी लागणार आहे. त्यापैकी ३ कोटी रुपये तातडीने भरणे आवश्यक आहे. पालिकेची आर्थिक स्थिती नसल्याने पालिकेने जनतेला आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत मनमाड बचाव समितीने सुशांत केदारे या कार्यकर्त्यांचा वाढदिवस पालिकेची घरपट्टी व पाणी पट्टी भरून साजरा केला. सुशांतसह मनमाड बचाव समितीच्या सदस्यांनी कर भरून या उपक्रमात सहभाग घेतला. मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांनी या उपक्रमाचे कौतुक करीत नागरिकांनीही बाकी भरण्याचे आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावी ५० हजार बालकांना डोस

$
0
0

विशेष लसीकरण मोहीम

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापालिका क्षेत्रात रविवारी ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांसाठी विशेष प्लस पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचा शुभारंभ आरोग्य अधिकारी डॉ. सायका अन्सारी यांच्या हस्ते मोसम पुलावरील बूथ वर बालकास लसीकरण करून करण्यात आला. या लसीकरण मोहिमेसाठी शहरात वेगवेगळ्या भागात ३८४ बूथ उभारण्यात आले होते. दिवसभरात ५० हजार बालकांना लसीकरण करण्यात आले.

या प्रत्येक बुथवर ३ कर्मचारी असे एकूण १ हजार १५२ कर्मचारी यासाठी कार्यरत होते. तसेच ५० पर्यवेक्षक देखील नियुक्त करण्यात आले. यावेळी १ लाख १९ हजार १६३ बालकांना लसीकरण करण्याचे लक्ष आरोग्य विभागाने निश्चित केले आहे. त्यापैकी

५० हजार ६६ बालकांना रविवारी लसीकरण करण्यात आले. गेल्यावेळी मार्च मध्ये राबविण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेत हेच प्रमाण ४० टक्के इतके होते.

रविवारी विशेष मोहिमेत जास्तीत जास्त बालकांना लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. शहरातील पूर्व भागात लसीकरण बाबत गैरसमज असल्याने विशेष मोहिमेचा दिवशी बुथवर बालकांना कमी प्रमाणात लसीकरण होते. मात्र अशा लसीकरण न झालेल्या बालकांना घरोघरी जाऊन लसीकरण केले जाणार आहे. रविवारच्या विशेष मोहिमेनंतर देखील सोमवार ते शुक्रवारी पुढील ५ दिवस आरोग्य विभागाच्या २९९ टीम उर्वरित बालकांचे लसीकरण पूर्ण करतील. त्यानंतर देखील उर्वरित दोन दिवस ही मोहीम सुरू राहील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नदीजोड प्रकल्पाला विद्यार्थ्यांची भेेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक धरणाच्या निर्मितीचे शास्त्र, धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता, पाणी मोजण्याचे मापक यासह कृत्रिम नदीची निर्मिती याची माहिती घेत इस्पॅलियर हेरिटेज स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास दौरा पूर्ण केला. कॉलेजच्या विद्यार्थ्यांप्रमाणे विषयाचे सखोल ज्ञान घेण्याचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळावा. तसेच विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्तीला अधिक चालना मिळावी. या हेतूने शाळेतर्फे अभ्यासदौरा हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. इस्पॅलियर स्कूलच्या सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांचा वणी खुर्द आणि जोरान या गावांमध्ये अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही गावांमध्ये धरण निर्मितीचे काम सुरू असून नदीजोड प्रकल्पासह धरण निर्मितीची प्रक्रिया विद्यार्थ्यांनी दौऱ्यांतर्गत जाणून घेतली. शालेय अभ्यासक्रमातील इतिहास,

भूगोल, गणित, विज्ञान या विषयांचे केवळ पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा प्रत्यक्ष अभ्यास दौऱ्यातून माहिती घेतल्यास निश्चितच फायदा होतो, याचा प्रत्यय विद्यार्थ्यांनी घेतला. धरणासाठी संपादित जागा, बांध घालणे, पाण्याची साठवण क्षमता, पाणी मोजण्याची पद्धत, जमीन मोजण्याची पद्धत, एकर, हेक्टर यांसह अनेक मुद्दे या अभ्यासदौऱ्यातून विद्यार्थ्यांना समजले. 'समुद्राला जाणारे पाणी अडवून त्याचा वापर पिण्यासाठी व सिंचनासाठी करण्यासाठी देशभरात नदीजोड प्रकल्प राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून कृत्रिम नदी तयार करून गुजरातमार्गे समुद्रात जाणारे पाणी अडवून त्याचा सिंचनासाठी उपयोग करण्याचा हा प्रयोग आहे.' अशी माहिती अभियंता संघवी यांनी विद्यार्थ्यांना यावेळी दिली. शाळेचे प्रमुख शिक्षण अभ्यासक सचिन जोशी यांनी अभ्यास दौऱ्यांतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षक अजितकुमार, राजेश्वरी शेट्टी, सौरभ पोळ, मेघा देव यांनी दौऱ्याचे संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संपाचे हत्यार ३० जूनपर्यंत म्यान

$
0
0

गडावरील कर्मचाऱ्यांचा संप तूर्तास स्थगित

म. टा. वृत्तसेवा, कळवण

सप्तशृंगी गडावरील ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांनी नाशिक वर्कर युनियनच्या माध्यमातून रविवारी (दि. १६) ट्रस्टच्या विरोधात २६ मागण्यांसाठी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला होता. मात्र कर्मचाऱ्यांनी तूर्त संप स्थगित केला असून, येत्या ३० जून अखेरीस मागण्या मान्य न केल्यास पुन्हा आक्रमक होण्याचा इशारा दिला आहे.

युनियनचे निवेदन ट्रस्ट प्रशासनाला ११ जून रोजी प्राप्त झाल्यानंतर ट्रस्टचे अध्यक्ष तथा अतिरीक्त सत्र न्यायाधीश गणेश देशमुख यांनी विश्वस्त मंडळ व संघटनेचे पदाधिकारी यांची नाशिक येथे शुक्रवार रोजी अध्यक्षांच्या दालनात बैठक बोलवली होती. या बैठकीत ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रावसाहेब शिंदे, राजेंद्र सूर्यवंशी, व्यवस्थापक सुदर्शन दाहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, सिटू संघटनेचे तुकाराम सोणजे, मुरलीधर गायकवाड दिलीप पवार, नारद अहिरे, संतोष पाटील आदींमध्ये मागण्यांबाबत चर्चा झाली. न्यायाधीश देशमुख यांनी कर्मचाऱ्यांच्या सर्व २६ मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करून संप मागे घेण्याचे आवाहन केले होते.

याबाबत शनिवारी (दि. १५) रोजी ट्रस्टच्या कार्यालयात युनियनचे उपाध्यक्ष तुकाराम सोनजे, दिलीप पवार, नारद आहिरे, नानाजी काकळीज, बंडू देशमुख आदींच्या उपस्थितीत युनियनचे ट्रस्टमधील सर्व कर्मचारी, सुरक्षा रक्षक, किमान वेतन कर्मचारी यांची एकत्रित बैठक घेण्यात आली. या बैठकीत चर्चा करून सर्वानूमते संप तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच येत्या ३० जून पर्यंत विश्वस्त मंडळाने मागण्यांबाबत योग्य न निर्णय न घेतल्यास पुन्हा संपावर जाण्याचा इशारा युनियनच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधानसभेसाठी राष्ट्रवादीची नाव निश्चित

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर राष्ट्रवादीने विधानसभेची तयारी जोराने सुरू केली असून, जवळपास ८० उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. त्यात जिल्ह्यातील चार नावांचा समावेश आहे. गेले काही दिवस मुंबई जिल्हानिहाय बैठक घेऊन त्यात चाचपणी केली. त्यात जून अखेर नावे निश्चित करण्यास सांगितले. पण, त्या अगोदरच काही नावावर आताच शिक्कामोर्तब केल्याची चर्चा आहे.

जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या वाट्याला १५ पैकी १० जागा असणार आहेत. यात दोन जागा मित्रपक्षाला सोडले जाणार असल्याचेही बोलले जात आहे. काँग्रेसच्या वाट्याला मालेगाव, इगतपुरी, चांदवड, नाशिक पूर्व व नाशिक मध्य येण्याची शक्यता आहे. यात काही जागांवर अदलाबदलीही केली जाणार आहे. येवला येथून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, नांदगावमधून आमदार पंकज भुजबळ, निफाडमधून माजी आमदार दिलीप बनकर, नाशिक पश्चिममधून अपूर्व हिरे यांचे नाव निश्चितच्या यादीत असल्याची चर्चा आहे. दिंडोरी व बागलाण येथे विद्यमान आमदार असले तरी येथे उमेदवार बदलीचे बोलले जात आहे. सिन्नर येथे अॅड. माणिकराव कोकाटे यांना उमेदवारी देण्याची चर्चा असली तरी त्याबाबत दुजोरा मिळालेला नाही. माकप आघाडीसोबत आले तर दिंडोरीची जागा माकपला जाण्याची शक्यता आहे.

मनसेशी आघाडी झाली तर त्यांना कोणत्या जागा दिली जाते याबाबत राष्ट्रवादीचे स्थानिक नेते वरिष्ठांकडे बोट दाखवत आहेत. विधानसभेच्या निवडणुकीला चार महिने अवकाश असला तरी उमेदवारांना काम करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी ही घाई चालल्याचे बोलले जात आहे. तूर्त तरी नाव निश्चितीची यादी ही प्राथमिक स्तरावर आहे. त्याला आघाडीची बैठक झाल्यानंतर अंतिम स्वरुप दिले जाईल, असे राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images