Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

झिप झॅप झूम - शब्दांचे खेळ उत्तर

$
0
0

लोगो - शब्दांचे खेळ

--

कालचे उत्तर

- फळ (देश) : पेरु

- वेल (मुलीचे नाव) : लता

- पालेभाजी (सांभाळणारे) : पालक

- एक प्राणी (लोणच्याचा रस) : खार

- गाण्याचा प्रकार (शेतातील काम) : लावणी

--

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सावरकर जयंतीदिनी ‘साज और आवाज’ मैफल

$
0
0

सावरकर जयंतीदिनी

'साज और आवाज' मैफल

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

भगूर येथील क्रांतीसूर्य बॅ. वि. दा. सावरकर जयंती उत्सव समितीच्या वतीने यावर्षी हिंदी मराठी गाण्यांचा व समूहनृत्याचा आविष्कार असलेल्या 'साज और आवाज' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २८ मे रोजी सांयकाळी ७ वाजता शिवाजी चौकात हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष वसंत पाटील यांनी दिली.

गेल्या अनेक वर्षांपासून भगूर शहरात स्वा. सावरकर जयंतीनिमित्त उत्सव समितीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावेळी माजी अध्यक्ष तानाजी करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत यावर्षीच्या अध्यक्षपदी सचिन हेंबाडे यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक मोजाड तर सूत्रसंचालन प्रशांत कापसे यांनी केले. यानिमित्ताने समितीच्या वतीने यंदाही भगूर परिसरातील शहरातील गुणवंतांचा गुणगौरव व मान्यवरांच्या सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शांताबाई फेम राधिका पाटील या उपस्थित राहणार आहे. परिसरातील नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातामध्ये दुचाकीस्वार ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

घोटी-सिन्नर महामार्गावर देवळे गावाजवळ जीप आणि दुचाकी यांच्यात रविवारी (दि. १२) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास झालेल्या जोरदार अपघातात खेड परदेशवाडी दुचाकीस्वार ठार झाला. अपघातात अन्य तरुण गंभीर जखमी आहे.

दिगंबर चंदर गांगड (वय ४०) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर परशुराम संतू हिंदोळे असे जखमी तरुणाचे नाव आहे. खेड-टाकेद मार्गे घोटीकडे परशुरामसोबत येत असताना गांगड यांच्या दुचाकीला (एमएच १५ डीएच ४१५५) घोटीकडून जाणाऱ्या टाटा मॅजिक (एमएच १५ ई ४७३३) गाडीने देवळे गावाजवळ जोरात धडक झाली. यात जीपची जोरात धडक बसल्याने व डोक्याला मार लागल्याने गांगड जागीच ठार झाला. तर परशराम गंभीर जखमी झाला. त्याला घोटी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी तात्काळ दाखल करण्यात आले. अपघातप्रकरणी जीप चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघाताची माहिती मिळताच घोटी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक आशीष आडसूळ, हवालदार बिपिन जगताप, सुहास गोसावी आदींनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली आणि मदतकार्यास सुरुवात करून जखमीस घोटी ग्रामीण रुग्णालयात तात्काळ दाखल केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालक सचिवांकडून होणार दुष्काळपाहणी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्याचे पालक सचिव सीताराम कुंटे येत्या आठवड्यात जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यात ग्रामीण भागातील दुष्काळी परिस्थितीची ते पाहणी करण्याची शक्यता असून दुष्काळी स्थिती व त्याअनुषंगाने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावाही ते घेणार आहेत.

पाणीटंचाईच्या समस्येने दुष्काळी तालुक्यांमधील रहिवाशी बेजार झाले आहेत. पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण करावी लागत असून काही तालुक्यांमधील जनावरांना चाराटंचाईचाही सामना करावा लागतो आहे. या दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकार आणि जिल्हा प्रशासन विविध स्तरावर उपाययोजना करीत आहे. या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी सर्व पालक सचिवांनी जिल्ह्याचा दौरा करावा, असे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी दिले. जिल्ह्यांचा दौरा करून २१ मेपर्यंत त्याचा अहवाल सादर करा, असे निर्देशही देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्याचे पालक सचिव कुंटे या आठवड्यात जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे. दुष्काळाची पाहणी केल्यानंतर होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याचे काम ते करतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाविरणला खडे बोल!

$
0
0

दोन तास अखंडित वीज देण्याचे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाणी वहन मार्गावरील ग्रामस्थांना दोन तास वीज द्या, असे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असून महावितरणकडून हा आदेश डावलला जात असल्याची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. कुठल्याही परिस्थितीत नदीकाठलगतच्या ग्रामस्थांना दोन तास वीज मिळेल याची दक्षता घ्या, असे आदेश महावितरणला सोमवारी देण्यात आले.

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरसह अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी, कोपरगाव येथील रहिवाशांसाठी गंगापूर आणि दारणा धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. हे आवर्तन २१ मेपर्यंत सुरू राहणार असून, नदीपात्राललगतच्या गावांमधील रहिवाशांकडून पाण्याचा बेकायदेशीर उपसा होऊ नये, यासाठी २२ तास वीज पुरवठा खंडित ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. परंतु तरीही करंजगाव, चेहडीसह निफाड तालुक्यातील काही गावांमध्ये २४ तास वीज पुरवठा खंडित ठेवला जात असल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत 'महाराष्ट्र टाइम्स'ने सोमवारी सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. पाटबंधारे विभाग आणि महावितरणकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली होत असल्याची बाब या माध्यमातून 'मटा'ने चव्हाट्यावर आणली. प्रशासनाने या प्रकाराची दखल घेतली असून, कुठल्याही परिस्थितीत संबंधित गावांमधील रहिवाशांना दोन तास अखंडित वीज मिळेल याची खबरदारी घ्या, असे स्पष्ट निर्देश महावितरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिली. त्यामुळे यापुढील काळात ग्रामस्थांना दोन तास अखंडित वीजपुरवठा उपलब्ध होईल, अशी ग्वाही देण्यात आली आहे.

तीन शिष्टमंडळांनी घेतली भेट

नदीकाठालगतच्या गावांचा वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर खासदार हेमंत गोडसे, आमदार अनिल कदम, आमदार योगेश घोलप हे सोमवारी सकाळी शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. दुष्काळामुळे पिके वाचविताना नाकीनऊ येत असून, त्यातच २४ तास वीज पुरवठा खंडित केला जात असल्याने शेतीला पाणी देणे जिकरीचे झाले आहे. यामुळे भाजीपाल्याचे नुकसान होत असल्याची कैफियत मांडत शेतकऱ्यांनी खेडकर यांच्या दालनात ठिय्या मांडला. गेले काही दिवस २४ तास वीज पुरवठा खंडित होता. किमान चार ते पाच तास वीज पुरवठा सुरळीत ठेवून हा बॅकलॉक भरून द्यावा, वीज पुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर करावे, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन्यथा उपोषण अटळ

$
0
0

अन्यथा उपोषण अटळ

जुन्या पेन्शनसाठी संघर्ष समिती आग्रही; बैठकीत आंदोलनाचा इशारा

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

शिक्षकांसह शासनाच्या सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेतून वगळण्याचा शासनाचा निर्णय अन्यायकारक असून हा निर्णय रद्द करण्यासाठी संघर्ष अटळ आहे. आमदार-खासदारांना पेन्शन मिळते तर शिक्षकांना का नको? असा सवाल उपस्थित करून जोपर्यंत शिक्षक आणि पदवीधर आमदार येत्या पावसाळी अधिवेशनात सभागृह बंद पाडून पेन्शनसंदर्भातील शिक्षकांवर अन्यायकारक निर्णय रद्द करत नाही तोपर्यंत मुंबईतील आझाद मैदानावरील नियोजित आमरण उपोषण सोडणार नाही, असा इशारा जुनी पेन्शन संघर्ष समितीच्या अध्यक्षा संगीता शिंदे यांनी सोमवारी शासनाला दिला.

१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त परंतु २००५ नंतर अनुदान प्राप्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू नसल्याचा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने २०१० मध्ये जाहीर केला होता. त्यानंतर जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी या शासन निर्णयाला संघर्ष समितीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. परंतु उच्च न्यायालयाने शासनाचा निर्णय कायम ठेवल्याने राज्यातील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त परंतु २००५ नंतर अनुदान प्राप्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. या प्रश्नावर पुढील नियोजनाची दिशा ठरविण्यासाठी सोमवारी दुपारी नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील गुरुदत्त लॉन्स येथे संघर्ष समितीची नाशिक विभाग स्तरावरील बैठक पार पडली.

यावेळी संघर्ष समितीच्या अध्यक्षा संगीता शिंदे यांनी वरील इशारा दिला. न्यायालयीन लढ्यात आलेल्या अपयशाचीही त्यांनी यावेळी माहिती दिली. पेन्शन संदर्भात राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी जागे झाले नसल्याबद्दल त्यांनी यावेळी खेद व्यक्त केला. क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून शिक्षकांच्या आतापर्यंत सुरू असलेल्या कपाती बंद करण्याची तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी शिक्षक लोकशाही आघाडी, शिक्षण संघर्ष संघटना, मुख्याध्यापक संघ आदी संघटनांचे योगेश पाटील, दिनेश अहिरे, नीलेश ठाकूर, के. के. अहिरे, मोहन चकोर, राजेंद्र सावंत, तुषार शिंदे यांच्यासह नाशिक, जळगाव, धुळे, नगर आणि नंदुरबार या जिल्ह्यांचे प्रतिनिधी आणि शिक्षक उपस्थित होते.

----

सभागृहात दबावनिर्मितीची गरज

जुनी पेन्शनचा प्रश्न आजवर विधानसभेत एकाही आमदाराने मांडला नाही. शिक्षक आणि पदवीधर आमदारांत धमक असेल तर त्यांनी येत्या पावसाळी अधिवेशनात पेन्शनचा प्रश्न मांडून सरकारवर दबाव निर्माण करण्याचे आव्हान यावेळी शिंदे यांनी राज्यातील शिक्षक व पदवीधर आमदारांना दिले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी येत्या १५ जून रोजी राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. तत्पूर्वी राज्यातील सर्व आमदार आणि खासदारांना लेखी निवेदन देण्याचे ठरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेन्शन संघर्ष समिती बैठकीत गोंधळ

$
0
0

बैठकीत गोंधळ

एकच मिशन जुनी पेन्शन या विषयावरील लढ्यातून २००५ नंतर नियुक्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ऐनवेळी वगळल्याची वस्तुस्थिती उघड झाली. त्यामुळे दुसऱ्या नाराज गटाने उघड विरोध दर्शवल्याने मेळाव्याच्या सुरुवातीलाच मोठा गोंधळ उडाला. नाराज गटाचे शिक्षक थेट व्यासपीठावर चढल्याने व्यासपीठावरील उपस्थितांना व्यासपीठ सोडण्याची नामुष्कीही ओढवली. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षकांसाठीच ही समिती न्यायालयीन लढा लढणार असल्याची माहिती आयोजकांकडून मिळताच २००५ नंतर नियुक्त शिक्षकांचा गट नाराज झाला. यातील काही शिक्षकांनी मेळाव्याच्या व्यासपीठावरील फलकावरील मजकुरावरची आक्षेप घेत थेट व्यासपीठाचा ताबा घेतला. यावेळी विरोध करणाऱ्या शिक्षकांना सभेच्या ठिकाणाहून बाहेर काढण्यात आले. मुख्याध्यापक संघाचे के. के. अहिरे यांनी या लढ्यास पाठिंबा असल्याचे जाहीर केल्यानंतर या गोंधळावर पडदा पडला.

---

मग आमच्याकडून पैसे का घेतले?

१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त परंतु त्यानंतर अनुदान प्राप्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेतून वगळल्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने २०१० मध्ये जाहीर केला होता. तोपर्यंत शिक्षकांची जुन्या पेन्शन योजनेनुसार कपातही झालेली होती. त्यामुळे या निर्णयाला पेन्शन संघर्ष समिती आणि राज्यातील इतर संघटनांनी न्यायालयात आव्हान दिले होते. या न्यायालयीन लढ्यासाठी प्रत्येक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून ४ हजार रुपयांचा निधी जमा केला होता. यात २००५ नंतर नियुक्त आणि अनुदान प्राप्त शिक्षकांचाही समावेश होता. परंतु आता २००५ नंतरच्या नियुक्त्या असलेल्या शिक्षकांना या लढ्यातुन ऐनवेळी वगळल्याने या शिक्षकांनी मग आमच्याकडून पैसे कशासाठी घेतले होते असा सवाल उपस्थित केला.

---

२००५ पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना मिळावी यासाठीच जर न्यायालयीन लढा लढवायचा होता तर २००५ नंतर नियुक्त शिक्षकांकडूनही प्रत्येकी ४ हजार रुपये समितीने कशासाठी घेतले होते. या पेन्शन संघर्ष समितीने शिक्षकांची दिशाभूल करून मोठा आर्थिक घोळ केला आहे.

- सचिन शेवाळे (शिक्षक)

मेळावा फक्त २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठीच होता. मेळाव्यात गोंधळ घालणारे शिक्षक २००५ नंतरची नियुक्ती असलेले होते. त्यांनी जमा केलेल्या आर्थिक निधीशी मेळाव्याच्या आयोजकांचा काही संबंध नाही.

- योगेश पाटील (नाशिक विभागप्रमुख,पेन्शन संघर्ष समिती)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामस्थांनी श्रमदानाने केली पाणीटंचाईवर मात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

तालुक्यातील वाघेरा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या कोशिमपाडा येथील ग्रामस्थांनी श्रमदानाने वर्षानुवर्षांच्या पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा गावचा कोशिमपाडा येथे पाणी पुरवठ्याची विहीर खोदण्यात आली. मात्र मार्च महिन्यात पाण्याच्या उद्भव कमी झाल्याने पाण्यासाठी पाड्यावरच्या महिलांना काही किलोमीटर अंतर पायी जावे लागते. या पाड्यावर जाण्यासाठी आजही रस्ता नाही. जवळपास ४०० लोकसंख्या असलेल्या कोशिमपाड्यास रस्ता नसल्याने येथे टँकर पोहचणे अवघड आहे. श्रमजीवी संघटनेने काही दिवसांपूर्वी येथे बैठक घेत आंदोलनाचा इशारा दिला होता. दरम्यान सरपंच यशोदा खेडुलकर, उपसरपंच रामचंद्र बदादे आदींसह ग्रामस्थांनी येथे वेळोवेळी बैठक घेऊन ग्रामसेवक महाजन यांच्या माध्यमातून प्रशासनाशी समन्वय साधत वाघेरा येथून पाणी कसे पोहच करता येईल यावर तोडगा काढला. श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे तसेच सरपंच यशोदा खेडुलकर, उपसरपंच रामचंद्र बदादे, तुकाराम देशमुख, दिलीप खेडुलकर, लहानू भोईर आदींसह सर्वच ग्रामस्थांनी प्रयत्न केले.

महिलांच्या चेहऱ्यावर फुलले हसू

वित्तीय आयोगाच्या निधीतून कोशिमपाडा येथील विहिरीपासून जवळपास २ कि.मी. अंतरापर्यंत पाइपलाइन टाकण्यात आली. याकरिता ग्रामस्थांनी श्रमदान करीत खोदाई केली. वाघेरा येथून विहिरीतील पाणी टँकरने भरून ते या पाइपलाइन पर्यंत आणून तेथून पाईपाद्वारे कोशिमपाड्याच्या विहिरीत पाणी टाकण्यात आले आहे. पाणीटंचाईचे चटके सोसत रोज हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या महिल्यांना आता थेट विहिरीतून पाणी भरता येत असल्यामुळे सगळी आनंदाचे वातावरण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


२५० क्विंटल कांद्याची रसायन टाकून नासाडी

$
0
0

कळवणच्या शेतकऱ्यावर कोसळले आभाळ

म. टा. वृत्तसेवा, कळवण

तालुक्यातील पाळे खुर्दजवळील असोली शिवारात नाना महादू पाटील या शेतकऱ्यांच्या तब्बल २५० क्विंटल कांद्यावर अज्ञात व्यक्तीने विषारी रसायन टाकले. त्यामुळे चाळीत साठवून ठेवलेला संपूर्ण कांदा खराब झाला आहे.

पाटील यांनी महिनाभरापूर्वी उन्हाळ कांदा काढून चांगला भाव मिळेल, या आशेपोटी कांदा चाळीत साठवून ठेवला होता. मात्र, आता हा सर्व कांदा खराब झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले असून ते आर्थिक संकटात सापडले आहे. उन्हाळी कांदा काढून दोन महिने झाले असून, कांदा चाळीत साठवण करून सुमारे दीड महिना झाला. मात्र, अज्ञात व्यक्तीने चाळीत रासायन टाकल्याने सगळा कांदा सडला. पाटील यांनी दुष्काळशी दोन हात करून कांदा पीक घेतले होते. त्यासाठी एकरी लाखो रुपये खर्चही केला होता. मात्र, आता सगळ्या स्वप्नांवर पाणी फेरले गेल्याने पाटील यांच्या डोळ्यात आसवांनी गर्दी केली आहे.

नाना पाटील यांच्या चाळीत कांडा सडला आहे. त्याचा तत्काळ पंचनामा करण्यात येईल. योग्य ती कारवाई करण्यात येईल.

- रवींद्र पाटील, कृषी अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठेंगोड्यात दोन पुलांच्यामधोमध अडकला ट्रक!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

विंचूर- शहादा- प्रकाशा राज्य महामार्गावरील ठेंगोडा येथील गिरणा नदीपुलावर नाशिककडून नंदुरबारकडे वाळू घेण्यासाठी जात असलेल्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पुलाचे कठडे तोडून दोन पुलांच्या मध्ये तरंगत राहिला. यात जीवित हानी झाली टळली. मात्र, काही काळ वाहतूक खोळंबली. ही घटना सोमवारी दुपारी घडली. नाशिक येथून नंदुरबारकडे वाळू घेण्यासाठी जात असलेला ट्रक ठेंगोडा येथील गिरणा नदीपात्रातील मोठ्या पुलावरून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पुलाचे कठडे तोडून दोन्ही पुलांच्या मधोमध अडकला. यात ट्रकचालकासह प्रवासी बालंबाल बचावले. अपघातामुळे पुलावर एकेरी वाहतूक काही काळ खोळंबली. सायंकाळनंतर ही वाहतूक सुरळीत सुरू झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रॅक्टरच्या धडकेत महिला ठार

$
0
0

नाशिक : भरधाव ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात पिंपळगाव (ब.)-वणी मार्गावर झाला. याप्रकरणी वणी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जया प्रभाकर गुंबाडे (३२ रा. पिंपळगाव बहुला, ता. जि.नाशिक) असे महिलेचे नाव आहे. गुंबाडे या रविवारी (दि.१२) सायंकाळी पती प्रभाकर गुंबाडे यांच्यासमवेत दुचाकीवरून जात असताना तळेगाव येथील माऊली फाटा भागात समोरून भरधाव येणाऱ्या ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीस धडक दिली. या अपघातात जया गुंबाडे गंभीर जखमी झाल्या. सासरे संतू गुंबाडे यांनी त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परिवर्तन घडविण्यासाठी एकच क्षण पुरेसा

$
0
0

छोटी गुरू माँ यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आपल्या आयुष्याचा नेमका उद्देश काय आहे, याचा विचार व्हायला हवा. केवळ लग्न करणे, मुले जन्माला घालणे हा एवढाच आपल्या आयुष्याचा उद्देश असू शकत नाही. जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडविण्यासाठी एकच क्षण पुरेसा असतो, असे प्रतिपादन इगतपुरीतील धामणगाव येथील निर्वाणा नॅचरोपॅथीच्या प्रमुख छोटी गुरू माँ यांनी केले.

गोदाघाटावरील देवमामलेदार यशवंतराव महाराज पटांगणावर वसंत व्याख्यानमालेचे तेरावे पुष्प छोटी गुरू मॉं यांनी सोमवारी गुंफले. मूळचंदभाई गोठी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित या पुष्पात छोटी गुरू माँ यांनी 'खुद को जानो' या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी त्या म्हणाल्या, की परमेश्‍वराने पृथ्वीवर प्रत्येक जीव काहीतरी उद्देश ठेवून पाठविलेला असतो. त्याने आपल्याला गाढव व अन्य प्राण्याऐवजी माणसाचा जन्म दिला हे आपले भाग्यच आहे. अनेक योनींचा प्रवास करून मानव जन्म मिळतो. मात्र, जीवनात परिवर्तनासाठी काही वर्षे, काही तास नव्हे, तर एकच क्षण महत्त्वाचा असतो. एका क्षणात संपूर्ण आयुष्य पालटू शकते. प्रत्येकाला आपल्या जीवनात परिवर्तन आणणे शक्य आहे; मात्र त्यासाठी आळस दूर सारण्याची गरज आहे.

यावेळी अविनाश गोठी उपस्थित होते. श्रीकांत येवलेकर यांनी मूळचंदभाई गोठी यांच्या स्मृतींना उजाळा दिला. संगीता बाफणा यांनी परिचय करून दिला. श्रीकांत बेणी यांनी सूत्रसंचालन केले. हेमंत देवरे यांनी आभार मानले.

आळस झटकणे गरजेचे

रेल्वेत ब्रिटिशांनी मारलेल्या एका लाथेचा परिणाम होऊन मोहनदास करमचंद गांधी यांचे महात्मा गांधींमध्ये रुपांतर झाले. पक्षी उडताना पाहून राईट बंधूंना विमान बनविण्याची कल्पना सुचली. ईश्‍वर प्रत्येकाला परिवर्तनाची संधी देत असतो. आयुष्यात येऊन आपल्याला काही माणसांच्या आयुष्यात उजेड आणता आला, तर या जन्माचे सार्थक होईल. मात्र, त्यासाठी आळस झटकणे गरजेचे आहे.

आजचे व्याख्यान

वक्ते : डॉ. आबा पाटील

विषय : शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज

स्थळ : यशवंतराव देवमामलेदार पटांगण, गोदाघाट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मूर्तीवरून पेटला वाद

$
0
0

आमदार अनिल गोटेंचे प्रशासनाविरोधात पत्र

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील पांझरा नदीकिनारी होत असलेल्या झुलता पुलावर भगवान शंकराची मूर्ती बसविण्यात आली आहे. या मूर्तीवरून आता महापालिका प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आमदार अनिल गोटे यांच्यात वाद पेटला आहे. या मूर्तीचे स्थलांतर करण्यात यावे यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या हालचाली सुरू होत्या. त्याच्याविरोधात आमदार अनिल गोटे यांनी प्रसिद्धीपत्रक काढून आयुक्तांवर आगपाखड केली आहे.

धुळ्यात महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी शंकराची मूर्ती हटविण्याबाबत आदेशित केले होते. मात्र, त्यानंतर लगेचच गोटे समर्थकांनी न्यायालयात दाद मागत स्थगनादेश आणल्याने हे प्रकरण चिघळले आहे. आयुक्तांनी, महादेवाच्या मूर्तीबाबत जनतेच्या भावना भडकल्या आहेत. त्याचा उद्रेक झाला तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. त्यामुळे आयुक्तांनी कोणाच्या आदेशावरून हे कृत्य करीत आहेत त्यांची नावे सांगावीत, असा सवाल आमदार गोटे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रातून विचारला आहे.

दरम्यान, या प्रकरणी दि. १६ मे रोजी न्यायालयात कामकाज होणार असून, स्थगनादेश हटविण्यासाठी प्रशासनाने सक्षमपणे आपली बाजू मांडावी, यापुढे असे प्रकार घडू नयेत म्हणून यंत्रणांमध्ये समन्यवय असावा असा खल जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत झाला. बंद दरवाज्याच्या आड झालेल्या या बैठकीत बाहेरच्या कोणालाही प्रवेश नाकारल्याने बैठकीत नेमके काय विषय चर्चिले गेले, हे गुपितच आहे. पांझरा नदीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत झुलत्या पुलावर बसविण्यात आलेल्या मूर्तीबाबत सर्व प्रकारच्या परवानगी विभागाने घेतलेल्या असतील असे आपण गृहित धरले होते. मात्र, केवळ झुलत्या पुलाचीच मंजुरी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही मूर्ती हटविण्याबाबत आदेशित करण्यात आले, अशी माहिती महापालिका आयुक्त सुधाकर विष्णू देशमुख यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली. हा स्थगनादेश हटविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सक्षमपणे बाजू मांडण्यात येईल तसेच सरकारी वकिलांचेही मार्गदर्शन घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फोटो आेळ

$
0
0

पुन्हा दगडफेक...

श्रीनगर येथे बलात्कार प्रकरणाच्या निषेधासाठी जमलेल्या आंदोलकांनी सुरक्षारक्षकांवर केलेल्या दगडफेकीत ४७ सुरक्षारक्षक जखमी झाले. जवानांनी केलेल्या कारवाईत अनेक आंदोलकही जखमी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपची पुन्हा कोंडी

$
0
0

\B

\Bम. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांसंदर्भात महापालिकेकडे १८४ हरकती प्राप्त झाल्या आहेत. प्रशासनाला या हरकती प्राप्त झाल्यानंतर या सर्व १८४ हरकतींवर येत्या २१ मे पासून विभागनिहाय सुनावणी घेतली जाणार आहे. या सुनावणीसाठी अतिरीक्त आयुक्त हरिभाऊ फडोळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे मिळकतींचा वाद थंड होत नाही तोच, आता अनधिकृत धार्मिक स्थळांचा वाद नव्याने उभा राहणार असल्याने भाजपची पुन्हा कोंडी होणार आहे.

उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार शहरातील धार्मिक स्थळांचे फेरसर्वेक्षण करत मार्च महिन्यात महापालिकेने शहरातील ८९९ पैकी ६४७ धार्मिक स्थळ अनधिकृत ठरवली होती. त्यानुसार वर्तमानपत्रात त्याची प्रसिद्धी करत त्यावर हरकती नोंदविण्याचे आवाहन केले होते. याविरोधात धार्मिक स्थळ बचाव कृती समितीच्या नेतृत्वाखाली शहरातील धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांनी एकत्र येत सभागृहनेते दिनकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात बैठक घेवून या कारवाईला विरोध केला होता. महासभेने मोकळ्या भूखंडावरील पारित केलेला व शासनाकडे प्रलंबित असलेल्या ठराव मंजूर करून आणण्यासाठी शहरातील तीनही आमदारांवर दबाव आणण्याचा निर्णय त्या बैठकीत घेण्यात आला.

महापालिकेने नागरिकांना या धार्मिक स्थळांबाबत हरकती नोंदविण्यासाठी एप्रिलची मुदत निश्चित केली होती. त्यानुसार शहरात ६४७ अनधिकृत धार्मिक स्थळे असताना केवळ १८४ हरकती प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये नाशिक पूर्व विभागातून ४९, नाशिक पश्चिम १५, नाशिकरोड १०, नवीन नाशिक ४०, सातपूर ३० तर पंचवटी विभागातील ४० हरकतींचा समावेश आहे. प्राप्त हरकतींची छाननीची प्रक्रिया नगररचना विभागाने पूर्ण केल्यानंतर हरकतींवर सुनावणीसाठी विभागनिहाय तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. २१ ते २७ मे दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ५.४५ वाजेदरम्यान सुनावणी घेण्यात येणार आहे.

आयुक्तांकडून समितीचा स्थापना

अनधिकृत धार्मिक स्थळांसंदर्भात प्राप्त हरकतींवर सुनावणीसाठी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पाच सदस्यांची समिती नियुक्त केली आहे. या समितीमध्ये अतिरीक्त आयुक्त (सेवा व शहर) हरिभाऊ फडोळ यांच्यासह अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त आर. एम. बहिरम हे सदस्य सचिव असून, नगररचना सहाय्यक संचालक सुरेश निकुंभे, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त हे सदस्य आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बोगस खतांचे आढळले घबाड

$
0
0

जिल्ह्यात प्रथमच मोठी कारवाई

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

बेकायदेशीरपणे विविध प्रकारची बोगस खते तयार करून विक्री करणाऱ्या जिल्ह्यातील फर्टिलायझर कंपनीचा जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाच्या गुणवत्ता नियंत्रण निरिक्षकांनी छापा टाकून भांडाफोड केला आहे. निफाड तालुक्यातील भेंडाळी येथे सुरू असलेल्या सत्यम ॲग्रो इंडस्ट्रीज या कंपनीच्या गोडावूनमध्ये १५ लाख २१ हजार ९०० रुपये किंमतीच्या १ हजार ६२७ बोगस खतांच्या गोण्या जप्त करण्यात भरारी पथकाला यश आले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात बोगस खते तयार करून विक्री करण्याचे रॅकेट उद्ध्वस्त झाले आहे.

जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी कार्यालयातील खत निरीक्षक किरण मोहिनीराज विरकर (वय ४०) यांनी सायखेडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. बोगस खतांच्या उत्पादनासह विक्रीचा गोरखधंदा करून सरकारसह शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी केशव मोहन नोरसे (वय ३०, रा. सायखेडा), अशोक केशवराव पवार (वय ५१, रा. सायखेडा) आणि एन. के. फर्टिलायझर अॅण्ड केमिकल, राहुरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी किरण विरकर यांच्यासह पथकातील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील तंत्र अधिकारी उल्हास ठाकूर, विभागीय गुणवता नियंत्रण निरीक्षक अभिजित घुमरे यांच्या पथकाने सोमवारी (दि. १३) दुपारी ३ वाजता भेंडाळी (ता. निफाड) येथील सत्यम ॲग्रो इंडस्ट्रीज या कंपनीच्या गोडावूनवर छापा टाकल्यानंतर बोगस खत उत्पादनाचे आणि विक्रीचे रॅकेट उघड झाले.

परवाना एक; उत्पादन भलतेच

विरकर यांच्या भरारी पथकाने छापा टाकला असता गोडावूनमध्ये सत्यम ॲग्रो इंडस्ट्रीज या कंपनीचे मॅनेजर केशव बोरसे, अरुण उशिर आणि अशोक पवार यांच्याकडे कंपनीच्या गोडावूनमध्ये साठविलेल्या आणि मशिनद्वारे तयार होत असलेल्या सुपर फॉस्पेट, पोटॅश, सिलिकॉन यासारख्या रासायनिक खतांच्या निर्मितीचा आणि विक्रीचा राज्य किंवा केंद्र सरकारचा कोणताही परवाना आढळून आला नाही. या कंपनीत सुपर फॉस्पेटच्या ६१०, प्रसाद मॅक्स पोटॅशच्या १५३, बलवान सिलिकॉनच्या ७५६ आणि सम्राट नॅचरल पोटॅशच्या १०८ अशा एकूण १ हजार ६२७ खतांच्या बॅगा आढळून आल्या. याच कंपनीत राहुरीतील एन. के. फर्टिलायझर अॅण्ड केमिकल या कंपनीच्या नावाच्या पोटॅश खतांच्या बॅगांचे उत्पादन आणि पॅकिंग सुरू असल्याचे आढळून आले. त्यामुळे भेंडाळीतील सत्यम ॲग्रो इंडस्ट्रीजच्या गोडावूनमध्ये राहुरीतील खतनिर्मिती कंपनीच्या नावे बोगस खत निर्मितीचा गोरखधंदा सुरू असल्याचेही उघड झाले आहे. सत्यम ॲग्रो इंडस्ट्रीजकडे स्फुरदयुक्त सेंद्रीय खत निर्मिती व विक्रीचा परवाना होता. मात्र, या परवान्याच्या आडून या कंपनीकडून थेट रासायनिक खतांची बेकायदेशीर निर्मिती व विक्री सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'पिस'ने चांदवडमध्ये केले श्रमदान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, चांदवड चांदवड तालुक्यातील नांदूरटेक या गावी संगणक क्षेत्रांत शिक्षण देणाऱ्या 'पिस' या संस्थेकडून महाश्रमदान करण्यात आले. एरवी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात विद्यार्थी घडविणारे शिक्षक या कार्यक्रमात 'पाणी आडवा पाणी जिरवा'चे धडे देतांना दिसले. या महाश्रमदानात ६ शिक्षक व ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. चांदवड तालुका तसा कायमच अवर्षणग्रस्त राहिला आहे. त्यात डोंगरांची मोठी खंबीर साथ तालुक्याला असली तरी यावरून वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी कुठलेही प्रयत्न झालेले नव्हते. मात्र आमीर खान यांच्या 'सत्यमेव जयते वाटर कप' स्पर्धेच्या निमित्ताने चांदवड तालुक्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सध्या तालुक्यात श्रमदानाचे 'तुफान' आले आहे. या तुफानात आपलाही 'पाणीदार' सहभाग असावा या उद्देशाने संगणक शिक्षण क्षेत्रांत काम करणाऱ्या पिस संस्थेकडून चांदवड तालुक्यातील नांदूरटेक या गावी समतल चर खोदून दोन तास श्रमदान करण्यात आले. यावेळी या संस्थेशी सलंग्न शान इन्फोटेक, वक्रतुंड कॉम्पुटर्स, करिअर कॉम्पुटर्स, व्हिजन कॉम्पुटर्स आदी संस्थेचे विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासर्वांचे नांदूरटेकचे सरपंच प्रभाकर ठाकरे यांनी आभार मानलेत.  येणारा काळ हा पाण्याच्या खूप गंभीर समस्या घेऊन येणारा असेल. या संकटावर मात करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये तयार व्हावी. डिजिटल युगात पाण्याचा अन् मातीचाही संबंध लक्षात यावा या उद्देशातून 'पिस'कडून हा उपक्रम राबवण्यात आला. -वासुदेव आहेर, संचालक, पिस नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवल्यात पाणीटंचाईचे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला येवला शहरवासियांना पाणीपुरवठा करणाऱ्या येवला नगरपालिकेच्या साठवण तलाव परिसरातील शेतकऱ्यांच्या शेकडो विहिरींमधून होणाऱ्या उपशामुळे तलावातील पाणीपातळी खालवत आहे. त्यामुळे येवला शहरवासियांसमोरील पाणीटंचाईचे संकट पुन्हा एकदा गडद होऊ लागले आहे. ५० दशलक्ष घनफूट साठवण क्षमतेच्या तलावात सध्या अवघा ६ दशलक्ष घनफूट इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने पाणीपुरवठा करण्यासाठी पालिका प्रशासनास तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळेच पालिकेने गेल्या काही दिवसांपासून सात दिवसाआड एकदाच पाणीपुरवठा सुरू केला आहे. भीषण दुष्काळातील टंचाई परिस्थितीत येवला तालुक्याच्या ग्रामीण भागातील गावोगावच्या तहानलेल्या जनतेची तहान भागविण्यासाठी एकिकडे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाची धडपड दिसत असताना, दुसरीकडे येवला शहरातील पाणीटंचाईचे संकट देखील यंदाच्या उन्हाळ्यात दिवसागणिक गडद होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येवला नगरपालिकेच्या शहरानजीकच्या बाभुळगाव शिवारातील टप्पा क्रमांक-२ साठवण तलावात मार्च महिन्यातील मध्यास पालखेड पाटबंधारे विभागाने सोडलेल्या आवर्तनातून पाणी मिळाले होते. गेल्या दोन महिन्यांत शहरवासियांना कधी तीन दिवसाआड, तर कधी चार दिवसाआड पालिकेकडून पाणीपुरवठा केला गेला होता. या दोन महिन्यात साठवण तलावातील कमी होत गेलेले पाणी बघता आता पालिकेने दहा मेपासून सात दिवसाआड पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. मूळ ५० दशलक्ष घनफूट साठवण क्षमतेच्या पालिकेच्या या साठवण तलावात आता चार मीटरपैकी केवळ अर्धा मीटर इतकेच पाणी शिल्लक राहिले आहे. तसेच पालखेडचे पुढील आवर्तन मिळण्यासाठी अजून किमान महिनाभर अवकाश आहे. त्यामुळे पालिकेने पाणीपुरवठ्याबाबत काटकसरीचे धोरण अवलंबिले आहे. असे असले तरी, साठवण तलाव परिसरातील शेतकऱ्यांच्या शेकडो विहिरींमध्ये साठवण तलावातील पाण्याचा दिवसाकाठी होणारा मोठा झिरपा, विहिरींमधून पाण्याचा दररोज होणारा उपसा आणि साठवण तलावात सध्या शिल्लक पाणी बघता पुढील तीस दिवसात शहरवासियांसमोरील पिण्याच्या पाण्याचे संकट अधिकच गडद होण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. पालखेडचे आवर्तन मे एण्डला मिळावे अशी अपेक्षा शहरवासीय तसेच पालिका प्रशासन ठेवून असली तरी, यंदाच्या पावसाळ्यातील जूनच्या पहिल्या पंधरा दिवसात मृगाच्या सरी नेमक्या कशा बरसतात, पालखेड धरण समूह क्षेत्रात पावसाची कशी सुरुवात होते? या सर्वांवर एकंदरीत नजर ठेवूनच पालखेड पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासनचे पुढील आवर्तन सोडण्याबाबतचे नियोजन होणार असल्याची माहिती सूत्रांकडून हाती आली आहे. दरम्यान, पालखेडच्या आवर्तनाचा स्त्रोत असलेल्या येवला तालुक्यातील ३८ गावे पाणीपुरवठा योजनेच्या बाभुळगाव येथील साठवण तलावात सध्या महिनाभर पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. योजनेत समाविष्ट असलेल्या तालुक्याच्या ग्रामीण भागातील एकूण ५६ गावांना साठवण तलावातून सध्या सहा दिवसआड पाणी दिले जात आहे. प्रांताधिकाऱ्यांना साकडे पालिकेच्या साठवण तलाव परिसरातील असंख्य खासगी विहिरींमधून दररोज होणाऱ्या मोठ्या उपशामुळे साठवण तलावातील पाणीसाठा कमी होत आहे. शहरवासियांना पुढील काही दिवस साठवण तलावातील सध्याचे उपलब्ध पाणी पुरवणे सोयीचे जावे, यासाठी खासगी विहिरींमधून होणारा उपसा बंद करण्यासाठी महसूल प्रशासनाने आपल्यास्तरावर कार्यवाही करावी, असे साकडे येवला नगरपालिका प्रशासनाने प्रांताधिकाऱ्यांना पत्राद्वारे घातले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कवी पाठक यांना प्रतिभा साहित्य पुरस्कार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

माय मराठी राज्यस्तरीय पुरस्कार, पुणे आणि प्रतिभा बाल साहित्य पुरस्कार, राजगुरुनगर यांचे अंतिम पुरस्कार जाहीर झाले असून नाशिकचे ज्येष्ठ कवी किशोर पाठक यांच्या 'टिंबाच्या कविता' या बालकाव्यसंग्रहाला प्रतिभा बाल साहित्य पुरस्कार २०१९ उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार जाहीर झाला आहे.

पुणे येथील प्रतिष्ठित माय मराठी प्रतिष्ठान या संस्थेतर्फे साहित्य पुरस्कार क्षेत्रात माय मराठी राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येतो. या स्पर्धेसाठी अवघ्या महाराष्ट्रातून १५० साहित्यिकांनी आपल्या साहित्यकृती पाठवल्या होत्या. त्यामधून प्रत्येक विभागासाठी (कथासंग्रह, कादंबरी व काव्यसंग्रह) परिक्षकांनी निवडलेली अंतिम तीन पुस्तके विविध प्रसार माध्यमांवर टाकून वाचकांकडून अंतिम पुस्तक निवडीचे प्रस्ताव मागवले होते. पैकी प्रतिभा बाल साहित्य पुरस्कार २०१९ कवी पाठक यांच्या 'टिंबाच्या कविता' या बालकाव्यसंग्रहाला जाहीर करण्यात आला आहे.

नेहमीच्या बाल कवितांपेक्षा बाल कवितांची वेगळी वाट धुंडाळणारा बाल कवितेत एकच विषय (टिंब) घेऊन थीम कवितेचा नवा मार्ग रुढ करणारा एक सकस कविता संग्रह म्हणून या संग्रहाची निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे वितरण लवकरच होणाऱ्या माय मराठी पुरस्कार वितरण सोहळ्यात केले जाणार आहे. या पुरस्काराबाबत पाठक यांचे सांस्कृतिक वर्तुळातून अभिनंदन करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दिलखुलास’मध्ये पूर्वपरीक्षा मार्गदर्शन

$
0
0

नाशिक : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात २ जूनला होणाऱ्या नागरी सेवा पूर्व परीक्षेच्या (यूपीएससी) पार्श्वभूमीवर आहेत. 'नागरी सेवा पूर्व परीक्षेची तयारी' या विषयावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक भूषण देशमुख यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत बुधवार (दि. १५) ते शनिवार (दि. १८० दरम्यान रोज सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रसारित होणार आहे. निवेदिका उत्तरा मोने यांनी ही मुलाखत घेतली आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्वपरीक्षेचे स्वरूप, व्याप्ती आणि परीक्षेची तयारी, पूर्वपरीक्षेचे सरावतंत्र, मानसिक आणि शारीरिक स्वास्थ सुदृढ कसे राखायचे, पूर्व परीक्षेनंतरची मुख्य परीक्षा व मुलाखतीची तयारी कशी करावी, आदी विषयांची सविस्तर माहिती देशमुख यांनी 'दिलखुलास'मधून दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>