Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

चारा छावण्यांसाठी आस्ते कदम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात चारा छावण्या सुरू करण्यासाठी संस्था आणि व्यक्ती पुढे येऊ लागल्या आहेत. सिन्नरसह मालेगाव आणि येवला तालुक्यात छावण्या सुरू करण्याबाबतचे काही प्रस्ताव प्रशासनाला प्राप्त झाले असून, पुढील आठवड्यात जिल्ह्यात चारा छावणीचा श्रीगणेशा होण्याची शक्यता आहे.

यंदा राज्याचा बहुतांश भाग दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत आहे. नाशिक जिल्हादेखील त्याला अपवाद नाही. जिल्ह्यात निम्म्याहून अधिक म्हणजेच आठ तालुके गेल्या काही महिन्यांपासून दुष्काळाचा सामना करीत आहेत. याशिवाय अन्य तालुक्यांमध्येही दुष्काळाचे चटके कमी अधिक प्रमाणात जाणवत आहेत. पाण्यासाठीची ग्रामस्थांची पायपीट कमी व्हावी याकरीता टँकरद्वारे वाड्या-वस्त्यांवर पाणी पुरवठा करण्याचा पर्याय प्रशासनाने अवलंबला आहे. एकीकडे पाण्याचे दुर्भिक्ष्य तीव्र स्वरुपात जाणवत असून, त्यासाठी काही किलोमीटर पायपीट करावी लागत असल्याचे वास्तव आहे. पाण्याबरोबरच जनावरांसाठीचा चारा हादेखील ग्रामीण आणि विशेषत: दुष्काळी तालुक्यांमध्ये चिंतेचा विषय ठरला आहे. जिल्हा प्रशासनाकडे सद्य:स्थितीत पुरेशा प्रमाणात चारा असला तरी त्याची मागणीदेखील मोठी आहे. त्यामुळे चारा टंचाईची समस्या उद्भवण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यातच चारा छावण्या सुरू करण्याचे प्रस्ताव मागविले होते. परंतु, एप्रिल अखेरपर्यंत प्रशासनाच्या या आवाहनाला जिल्ह्यातून अपेक्षित प्रतिसादच मिळाला नाही. त्यामुळे मेचा पहिला आठवडा उजाडूनही चारा छावण्या सुरू होऊ शकलेल्या नाहीत. छावणी सुरू झाली तर जनावरांना तेथे ठेवणे आणि तेथेच त्यांना चारा-पाणी पुरविणे शक्य होणार आहे. चारा छावण्यांसाठी प्रस्तावांचा ओघ वाढू लागल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. सिन्नर तालुक्यातील शेतकरी नामदेव सांगळे यांनी गुळवंच भागात चारा छावणी सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यांचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून, पुढील आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांची त्यांच्या प्रस्तावावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती, येवला कृषी उत्पन्न बाजार समिती यांसह अन्य काही बाजार समित्यांशी प्रशासनाची चर्चा झाली असून, त्यांनीदेखील चारा छावण्या सुरू करण्यास सहमती दर्शविली आहे. याखेरीज नाशिक शहरातील निर्माण ग्रुप, मालेगाव येथील गोवंश रक्षा समिती यांनीही चारा छावण्या सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव सादर केल्याची माहिती प्रशासनाने दिली.

नांदगावात प्रस्तावांची प्रतीक्षा

बीड आणि नगर जिल्ह्यात शेकडो छावण्या कार्यरत झाल्या असताना नाशिकमध्ये मात्र तीन आठवड्यांपूर्वी आवाहन करूनही चारा छावण्या सुरू करण्यासाठी अपेक्षित प्रतिसाद मिळू शकलेला नाही. नांदगाव तालुक्यात दुष्काळाची भीषणता अधिक आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये पाणी आणि चाराटंचाईने शेतकरीवर्ग हैराण झाला आहे. येथे जनावरांची संख्या मोठी असून, चाऱ्याची मागणीदेखील अधिक आहे. परंतु, या तालुक्यात अद्याप एकही व्यक्ती अथवा संस्था चारा छावणी सुरू करण्यासाठी पुढे आलेली नाही. त्यामुळे या तालुक्यात छावण्या सुरू करण्यासाठी व्यक्ती आणि संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी केले आहे.

चारा छावणी सुरू करावी यासाठी मी सिन्नरच्या प्रांताधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला आहे. गुळवंच येथेच छावणी सुरू करण्याची तयारी या प्रस्तावातून दर्शविली आहे. छावणी सुरू करण्यासाठीच्या निकषांची पूर्तता करण्याची तयारी मी दर्शविली आहे. सोमवारी या प्रस्तावावर जिल्हाधिकाऱ्यांची स्वाक्षरी होण्याची शक्यता असून पुढील आठवड्यात छावणी सुरू होईल.

- नामदेव सांगळे, गुळवंच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


समर्थांच्या पादुका दर्शनासाठी गर्दी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांची चांदीची पालखी आणि पादुकांचे घोटी शहरात आगमन झाले. या पादुकांची भक्त व साधकांमार्फत शहरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. शहरातील असंख्य भाविकांनी व सेवेकऱ्यांनी स्वामींच्या पालखीचे व पादुकांचे दर्शन घेतले. 'श्री स्वामी समर्थ महाराज की जय' अशा जयघोषात या पालखीचे स्वागत करण्यात आले. इगतपुरी येथील मुक्कामानंतर शुक्रवारी सकाळी पादुका व पालखीचे घोटीत आगमन झाले. शहरातील स्वामीभक्त सूर्यवंशी परिवारातील सदाशिव सूर्यवंशी व ग्रामस्थांनी पालखीचे पूजन केले. पालखीचे घोटी शहरातून श्रीरामवाडी येथे सूर्यवंशी यांच्या राहत्या घरी पालखी पूजन व पादुका पूजन करण्यात आले. जागोजागी महिला भाविकांनी औक्षण करून स्वामींच्या नावाचा जयजयकार केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुजबळांनी घेतला दुष्काळी परिस्थितीचा आढावा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण होताच आमदार छगन भुजबळ यांनी येवला मतदार संघाच्या पूर्वोत्तर पट्ट्यातील विविध गावांना भेटी देत दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. सायगाव, तळवाडे, डोंगरगाव, भारम, खरवंडी, ममदापूर, राजापूर व नगरसूल या गावांना त्यांनी भेट दिली. ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्याकडून दुष्काळातील टंचाई परिस्थिती, पिण्याच्या पाण्यासह मुख्या जनावरांसाठीचा चारा पाण्याचा प्रश्न, रोजगार हमीची कामे आदींबाबत जाणून घेतले. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनराज महाले, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर, महेंद्र काले उपस्थित होते. त्यानंतर भुजबळ यांनी तहसील कार्यालय गाठले. प्रांताधिकारी राजेंद्र पाटील व तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्याशी त्यांनी चर्चा केली. दुष्काळी परिस्थितीशी झुंजणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम सरकार करीत असल्याचा आरोप भुजबळ यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट रोडचेही जिओ टॅगिंग

$
0
0

नाशिक : अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका या स्मार्ट रोडच्या कामावर आता ऑटो जनरेटेड सिस्टीम (जीओ टॅगिंग) द्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. रस्त्याचे कामाचे जिओ टॅगिंग करण्यात आले असून, दैनंदिन छायाचित्राच्या आधारे दररोज किती काम करणार यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. एक किलोमीटरच्या रस्त्याच्या कामाला वर्ष उलटूनही पूर्ण होत नसल्याने अखेरीस आयुक्तांनी आता थेट सॅटेलाइटद्वारे कामावर लक्ष ठेवण्याची यंत्रणा उभी केली आहे. त्यामुळे आता तरी रस्त्याच्या कामाला गती येण्याची शक्यता आहे. जिओ टॅगिंगमुळे कामाच्या प्रगतीची छायाचित्रे पाहता येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बड्या थकबाकीदारांवरच कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुष्काळामुळे यंदा कर्जवसुली करू नये, असे सरकारचे आदेश असले तरी, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सुमारे २७०० कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. ते वसूल केले नाही तर ठेवीदारांच्या ठेवी कोठून द्यायच्या, असा उद्विग्न सवाल करीत कर्ज वसुली प्रक्रियेला अटकाव न करता सहकार्य करावे, अशी अपेक्षा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश खरे यांनी जिल्हा प्रशासनाकडे शुक्रवारी व्यक्त केली. पाच लाखांहून अधिक कर्ज असलेल्या बड्या कर्जदारांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई हाती घेण्यात येत असल्याचा इशाराही बँकेने दिला आहे.

बँकेचे एक लाख १७ हजार थकबाकीदार असून यापैकी सहा हजार खातेदारांकडे लाखो रुपयांचे कर्ज थकीत आहे. हे कर्ज वसूल होत नसल्याने बँकेपुढील अडचणी वाढल्या आहेत. गुंतविलेल्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी ठेवीदार रोज बँकेत चकरा मारत आहेत. मुलीचे लग्न, मुलांचे शिक्षण इतकेच नव्हे तर कुटुंबातील सदस्याचा दशक्रिया विधी यांसारख्या कारणांसाठी ठेवींची मागणी होत असून, ठेवीदारांना तोंड देणेही मुश्किल झाल्याची कैफियक बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी जिल्हा प्रशासनाकडे व्यक्त केली. आर्थिक परिस्थिती चांगली असूनही कर्जाची परतफेड न करणाऱ्या ठेवीदारांवर थकबाकी वसुलीसाठी कठोर कारवाईशिवाय गत्यंतर नसल्याची माहिती आहेर तसेच बँक प्रशासनाचे अधिकारी सतीश खरे यांनी जिल्हा प्रशासनाला दिली. तर जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत असून छोट्या थकबाकीदारांकडे वसुलीसाठी तगादा लावू नये अशी भूमिका निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी घेतली. कर्ज वसुलीच्या कठोर कारवाईतून तूर्तास पाच लाखांहून कमी कर्ज असलेल्या थकबाकीदारांना वगळण्यात येईल, अशी ग्वाही आहेर यांनी दिली आहे.

बँकेचे साडेसहा हजार मोठे थकबाकीदार असून त्यांच्या मालमत्ता जप्तीच्या कारवाईसाठी कार्यवाही सुरू केली आहे. यापैकी ६५० थकबाकीदारांवर कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्यांच्या मालमत्तांचे उपनिबंधक कार्यालयाकडून मूल्यांकन घेण्यात येणार आहे. ही सर्व प्रक्रिया मार्गी लावण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष जप्तीच्या कारवाईला सुरुवात केली जाणार आहे. जप्तीची कारवाई कोणत्या निकषांच्या आधारे व कशी करावी, याबाबत शुक्रवारी १५० अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला देण्यात आली.

आर्मस्ट्राँगवरही कारवाईस मर्यादा

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या कुटुंबीयांवरील बेनामी संपत्तीशी संबंधित आरोपांच्या आधारे सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) तपास सुरू आहे. थकबाकीदार असलेल्या आर्मस्ट्राँग कंपनीचाही यामध्ये अंतर्भाव असला तरी ईडी ही मोठी संस्था असल्याने या कंपनीच्या मालमत्तेवर तूर्तास कारवाई करू शकत नसल्याचे बँक प्रशासनाने स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेची ‘हजेरी’

$
0
0

अनधिकृत मिळकतींबाबत उच्च न्यायालयाने फटकारले

...

- आयुक्तांना ३ जून रोजी हजर राहण्याचे आदेश

- पालिकेच्या अधिकाऱ्यांची काढली खरडपट्टी

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या ७६९ मिळकतींचा सर्व्हे केल्यानंतर त्याची तीन टप्प्यांत विभागणी करून सार्वजनिक मिळकतींचा गैरवापर करणाऱ्यांवर चाप बसविण्याच्या निर्देशाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला फटकारले. आपल्या मिळकतीही सांभाळता येत नाहीत का, असा सवाल करीत मिळकतींबाबत माहिती नाही तर न्यायालयात आलेच कसे अशा शब्दात उच्च न्यायालयाने पालिकेच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. महापालिकेच्या मिळकतींवर अतिक्रमण कसे काय होऊ शकते असा प्रश्न करीत याप्रकरणी महापालिका आयुक्तांना ३ जून रोजी हजर राहण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

महापालिकेच्या मिळकती वेगवेगळ्या सामाजिक तसेच, सार्वजनिक कारणांसाठी विविध संस्थांना चालविण्यासाठी दिल्या आहेत. यातील काही मिळकती या नाममात्र दरात दिलेल्या असल्या तरी, संबंधित संस्थांकडून त्यांचा व्यावसायिक वापर होत असल्याचे समोर आले आहे. या मिळकतींचा गैरवापर होत असल्याने फ्रवशी अॅकॅडमीचे संचालक रतन लथ यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. विविध संस्थांकडे असलेल्या ७६९ मिळकतींचा गैरवापर रोखून पालिकेच्या मिळकतींवरील अतिक्रमण काढण्याची मागणी करण्यात आली होती. महापालिकेच्या शेकडो मिळकती भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या असून, त्यातील काहींचा खरोखर योग्य वापर होतो तर काही मिळकती या राजकीय तसेच समाजघातक कामांसाठी वापरल्या जातात, असे लथ यांनी जनहित याचिकेत स्पष्ट केले आहे.

मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजयोग आणि न्या. एन. एम. जमादार यांच्या पीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. या याचिकेवर सर्वप्रथम ५ एप्रिल रोजी सुनावणी झाली. त्यात ७६९ जागांचा वापर संबंधित संस्था अथवा व्यक्ती करीत असल्या तरी त्यावर सर्वसामान्य नागरिकांना तेथील सुविधा वापरण्याचा अधिकार आहे. त्यामुळे तीन टप्प्यांत हा विषय सोडवावा, असे स्पष्ट निर्देश उच्च न्यायालयाने पालिकेला दिले होते. शुक्रवारी पुन्हा मुख्य न्यायमूर्ती यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी कृती आराखडा सादर करणे अपेक्षित असताना पालिकेला मिळकतींबाबत पुरेशी माहिती सादर करता आली नाही. किती मिळकती आहेत, नव्याने सर्वेक्षण केले का याबाबत न्यायालयाचे समाधान झाले नसल्याने न्यायमूर्तींनी पालिकेच्या उपस्थित अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. महापालिकेला आपल्या मिळकती सांभाळता येत नाहीत का, अशा शब्दांत सुनावत मिळकतींची माहिती नाही तर आलेच कशाला अशा शब्दात खरडपट्टी काढली. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार येत्या ३ जूनपर्यंत सर्व माहिती उच्च न्यायालयात सादर करण्याचे तसेच, महापालिकेच्या या हलगर्जीपणा प्रकरणी स्वत: आयुक्तांना हजर राहण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. रतन लथ यांच्या वतीने अॅड. मुकुल तळे यांनी बाजू मांडली.

...

अतिक्रमण होतेच कसे

न्यायालयाने महापालिकेच्या मिळकतींवर होत असलेल्या अतिक्रमणाबाबतही फटकारले. महापालिकेच्या ६७ मिळकतींवर लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी अतिक्रमण केल्याची माहिती उच्च न्यायालयात सादर करण्यात आली. महापालिका शहरातील नागरिकांचे अतिक्रमण काढत असताना स्वत:च्या मिळकतींवर मात्र अतिक्रमण कसे होऊ देते असा सवाल न्यायाधिशांनी केला. अतिक्रमण काढण्यासह अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, असे निर्देशही पालिकेला यावेळी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वॉटर कप कार्यकर्त्यांवर हल्ला

$
0
0

- दोनशे जणांच्या आदिवासी जमावाचे कृत्य

- गलोल, गोफणीने मारले दगड

- मोटारसायकलीही जाळल्या

म. टा. वृत्तसेवा, चांदवड

पाणी फाउंडेशन आयोजित 'सत्यमेव जयते वॉटर कप' स्पर्धेत सहभाग घेतलेल्या चांदवड तालुक्यातील शिवाजीनगर (मतेवाडी) या गावात शुक्रवारी जलसंवर्धनाचे काम सुरू असताना अचानक सकाळी ७.३० च्या सुमारास आदिवासी जमावाने दगडफेक करीत श्रमदान करणाऱ्या गावकरी, कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला केला. यात गावकरी पळून गेल्यावर त्यांच्या आठ ते नऊ मोटारसायकली जमावाने घटनास्थळी जाळून टाकल्या. यामुळे महाराष्ट्रात आदर्श ठरत असलेल्या जलसंवर्धनाच्या कामाला गालबोट लागले आहे.

तालुक्यातील ७२ गावांनी पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत सहभाग घेतला असून, त्यातील २४ गावांमध्ये महाश्रमदानाचे काम सुरू आहे. त्यातीलच शिवाजीनगर (मतेवाडी) गावात डोंगरालगत असलेल्या वनजमिनीत गावाला जेसीबी मशीन मिळाल्याने मोठ्या उत्साहात शुक्रवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास काम सुरू करण्यात आले. या श्रमदानात गावातील शंभरावर पुरुष, महिला, मुलांनी सहभाग घेतला होता. गावकरी कामात मग्न असताना आदिवासी समाजाच्या सुमारे २०० जणांच्या समूहाने साखळी करीत अचानक श्रमदान करणाऱ्या गावकऱ्यांवर गलोल, गोफणीने दगडांचा हल्ला चढविला. यामुळे श्रमदान करणारे गावकरी भयभीत होऊन सैरावैरा पळत सुटले. या हमल्यात अनेकांना मार लागला. पाच जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. श्रमदान करणाऱ्यांनी पळ काढल्यावर आदिवासी जमावाने श्रमदान करणाऱ्यांच्या मोटारसायकलींकडे मोर्चा वळवित त्यांच्यावर दगड घालत मोटारसायकलींचे नुकसान केले. यानंतर ८ ते ९ दुचाकी पेटवून देण्यात आल्या. तेथे असलेल्या जेसीबी मशीनच्या चालकास बेदम मारहाण करीत मशिनचीही मोडतोड करण्यात आली, तसेच श्रमदान करणाऱ्यांचे साहित्य मोडतोड करून फेकून देण्यात आले.

तालुक्यात दहशत

सदर घटनेतील श्रमदात्यांनी पोलिस, मित्रपरिवार तसेच नातेवाईकांना मदतीची हाक देत झालेला प्रकार सांगितल्याने शिवाजीनगरसह तालुकाभरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी घटनास्थळी मालेगावचे अप्पर पोलिस अधीक्षक नीलोत्पल, मनमाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी आर. रागसुधा, तहसीलदार प्रदीप पाटील, चांदवडचे पोलिस निरीक्षक संजय पाटील, वडनेर भैरवचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन साळुंके, पोलिस कर्मचारी, दंगल नियंत्रक पथकाने परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, चांदवड पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवकाची आत्महत्या

$
0
0

नाशिक : अक्राळे (ता. दिंडोरी) येथे २२ वर्षीय युवकाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. या प्रकरणी दिंडोरी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. राहुल अरुण गाडे (वय २२) असे या युवकाचे नाव आहे. राहुलने बुधवारी (दि. १) दुपारी राहत्या घरी अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. ही बाब लक्षात येताच चुलत भाऊ अनिल गाडे यांनी दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढे जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

...

सर्पदंशाने मृत्यू

नाशिक : शेतात काम करीत असताना विषारी सापाने चावा घेतल्याने ५० वर्षांच्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना हिवरगाव (ता. सिन्नर) येथे घडली. या प्रकरणी सिन्नर एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भगवान बाबुराव पोमनर (वय ५०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सेंट्रल किचनमुळे बचतगटांना कात्री

$
0
0

- शालेय पोषण आहारचा करणार पुरवठा

- महापालिका हद्दीतील सव्वा लाख विद्यार्थ्यांना लाभ

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेसह सर्व खासगी शाळांमधील सव्वा लाख विद्यार्थ्यांना येत्या शैक्षणिक वर्षापासून सेंट्रल किचन प्रणालीद्वारे शालेय पोषण सकस आहाराचा पुरवठा केला जाणार आहे. महापालिका हद्दीतील सर्व शाळांमधील मक्तेदार नियुक्तीसाठी पालिकेने मक्तेदारांकडून स्वारस्य देकार मागविले आहेत. त्यामुळे सध्यस्थितीत बचतगटांकडून करण्यात येणारे शालेय पोषण आहार पुरवठ्याचे काम थांबणार आहे. विशेष म्हणजे सद्यस्थितीत लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू असल्याने राज्य निवडणूक आयोगाकडून यासाठी महापालिकेने परवनागी घेतली आहे.

केंद्र सरकारमार्फत शासकीय आणि खासगी प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत पोषण आहार दिला जातो. राज्यातील जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका शाळांमधील विद्यार्थी, खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थी यांना हा पोषण आहार दिला जातो. केंद्र सरकारची ही योजना सध्या बचतगटांमार्फत राबवली जात असून, त्यांच्याकडून शालेय पोषण आहार शिजवून देण्यासोबतच त्याचे वाटप विद्यार्थ्यांपर्यंत करण्याची जबाबदारी होती. परंतु, बचतगटांकडून तयार करण्यात येणाऱ्या पोषण आहारावर ठरलेल्या आहारापेक्षा कमी प्रमाणात पोषक घटक असतात, किचन अस्वच्छ असणे, बचतगटांच्या महिलांव्यतिरिक्त इतर महिला कामाला ठेवून त्यांच्याकडून पोषण आहार बनवून घेणे, ठरलेला मेनू न देणे आदी कारणे समोर आली आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार शासनाने सेंट्रल प्रणालीद्वारे आहार पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

..

इच्छुक संस्थेसाठी निकष

महापालिका क्षेत्रात ज्या संस्थांची उलाढाल ५५ लाखांपेक्षा अधिक आहे, शिजविलेल्या अन्नाचा पुरवठा करण्याचा अनुभव, किमान दहा हजार विद्यार्थ्यांना आहार पुरविण्याची तयारी, स्वयंपाकगृहासाठी किमान एक हजार चौरस फूट जागा असणाऱ्या संस्थांना सेंट्रल किचनसाठी परवानगी दिली जाणार आहे.

...

संस्थेसाठी लागू होणारे नियम

सेंट्रल किचनची जबाबदारी स्वीकारणाऱ्या संस्थेला विद्यार्थ्यांसाठी दररोज वेगळी पाककृती द्यावी लागेल. प्रत्येक आठवड्याला एक फळ, शेंगदाणा लाडू, राजगिरा चिक्की, चुरमुरे लाडू, खजूर, खारीक देणे बंधनकारक आहे. भाजीपाला, मिरची, कोथिंबीर, टोमॅटो याचा वापर स्वखर्चाने करायचा आहे. तसेच आहारामध्ये तूरडाळ, मसूरडाळ, मूगडाळ, चवळी, हरभरा, मटकी, वाटाणा, सोयाबीन, तेल, कांदा लसूण मसाले यांचा समावेश संबंधित संस्थेला करावा लागणार आहे.

...

निवडणूक आयोगाची परवागनी

येत्या शैक्षणिक वर्षापासूनच हा आहार पुरवठा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. परंतु, सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे त्यात अडसर येऊ नये म्हणून राज्याच्या मुख्यसचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने सेंट्रल किचन प्रणालीला परवानगी मिळावी, यासाठी निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार केला होता. महाराष्ट्रातील निवडणुकीच्या मतदानाचे टप्पे पूर्ण झाल्यानंतर यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यास हरकत नाही, असे निर्देश आयोगाने दिले होते. त्यानुसार शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी दिलेल्या आदेशांनुसार महापालिकेने स्वारस्य देकार मागवले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरुषोत्तम स्कूलमध्ये कौशल्य विकास केंद्र

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या नाशिकरोड येथील पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलमध्ये प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेतंर्गत कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन नुकतेच झाले.

नवी दिल्लीच्या युवा विकास संस्थेचे अध्यक्ष आशिष भावे, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष महेश दाबक, उपाध्यक्ष श्रीपाद देशपांडे, सचिव ज्ञानेश्वर कुलकर्णी, खजिनदार वैशाली गोसावी, जयंत मोंढे, मंगेश पिंगळे, राजेश टोपे, संजय साळवे आदींची प्रमुख उपस्थिती होती. ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.

भावे म्हणाले की, केंद्रामार्फत फार्मसी असिस्टंट, जनरल ड्युटी असिस्टंट, सेल्फ टेलरिंग, फॅशन डिझायनिंग कोर्स सुरू करण्यात आले असून, प्रवेश विनामूल्य आहे. तज्ज्ञांच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाते. सुरुवातीलाच नाशिकरोड केंद्रास उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. सत्तर टक्के महिलांसाठी हे कोर्सेस केंद्र सरकारने सुरू केले असून, त्याव्दारे कौशल्य आत्मसात केल्यास रोजगार व स्वयंरोजगाराची संधी हमखास मिळेल. मुद्रा लोन व पुढील शिक्षण मिळणार आहे. हे कोर्सेस केलेल्यांना देश-विदेशात चांगली मागणी आहे. कोर्स पूर्ण केलेल्या उमेदवारांचा बचतगट स्थापन करावा.

महेश दाबक म्हणाले की, संस्थेने शिक्षणातील आव्हानाबरोबरच रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी आयटीआयनंतर कौशल्य विकास केंद्राची सुरुवात केली आहे. भविष्यात असे विविध कोर्सेस सुरू केले जातील. गरजू विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. कोर्सेस मोफत असले तरी त्यामध्ये सातत्य ठेवून कौशल्य आत्मसात करावे. शिवराज सोनवणे यांनी आभार मानले. प्रवेश प्रक्रियेसाठी प्रा. योगेंद्र पाटील यांचे सहकार्य लाभले. स्वप्ना मालपाठक यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंत्राटी कर्मचाऱ्यांचा कामबंदचा इशारा

$
0
0

सहा महिन्यांपासून वेतन थकल्याने घेतला निर्णय

..

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

जिल्हाभरातील बीएसएनएलच्या ईओआय कर्मचाऱ्यांचे गेल्या सहा महिन्यांपासून मासिक वेतन थकल्याने उपासमारीची वेळ आली आहे. या प्रकरणी सर्व कर्मचाऱ्यांनी नाशिक महाप्रबंधक यांना निवेदन देऊन वेतन देण्याची मागणी केली.

कंत्राटी पद्धतीने बीएसएनएलची कामे ईओआयमार्फत होत असतात. त्या बदल्यात त्यांना दरमहा वेतन दिले जाते. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून वेतन न झाल्यामुळे हे कर्मचारी वैतागले असून, घर चालविणे कठीण झाले आहे. येत्या सात दिवसांत वेतन न झाल्यास सर्व कर्मचारी मायको सर्कल येथील महाप्रबंधक कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत. आज (दि. ४) सकाळी ८ वाजता याप्रकरणी खासदार हेमंत गोडसे यांची हे कर्मचारी भेट घेणार असून, त्यांच्यामार्फत वरिष्ठ कार्यालयाकडे दाद मागणार असल्याची माहिती रवींद्र कटारे, माणिक पोरजे, नारायण सजगुरे, प्रकाश आडके, अनिल राठोड, दीपक भोर, गोरख शिंदे, गोपाळ सोनवणे, विकास गोडसे, विनोद सरदार, राहुल आडके, गोरख आडके आदींनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट रोडसाठी अल्टिमेटम

$
0
0

ठेकेदाराला काम पूर्णत्वासाठी ३० जूनपर्यंत मुदत

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिककरांसाठी डोकेदु:खी ठरलेला आणि वर्दळीचा रस्ता असलेल्या अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका या स्मार्ट रोडसाठी स्मार्ट सिटी कंपनीने आता पूर्णत्वासाठी ३० जूनची डेडलाइन निश्चित केली आहे. तसेच, एप्रिलपासून एकूण खर्चावर ०.५ टक्के दंड ठोठावला जाणार असून, त्यासाठीचा प्रस्ताव संचालक मंडळाच्या बैठकीत ठेवला जाणार आहे. स्मार्ट रोडच्या कामाला तिसऱ्यांदा दिलेल्या मुदतीत ठेकेदार काम पूर्ण करतो का, याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

स्मार्ट सिटी अभियानांतर्गत साकारण्यात येत असलेला त्र्यंबकरोड ते अशोक स्तंभ हा १.१ किलोमीटर लांबीच्या स्मार्ट रोडच्या कामाला जवळपास वर्ष लोटूनही पूर्ण झालेले नाही. या रस्त्याची वर्षभरात एकच बाजू पूर्ण झाली असून, त्यातही काम अपूर्ण आहे. तब्बल १७ कोटी रुपयांचा खर्च असलेल्या स्मार्ट रोडमुळे वर्दळीचा परिसर वाहतूक कोंडीमुळे ठप्प झाला आहे. स्मार्ट रोडच्या कामाचा शुभारंभ मार्च २०१८ मध्ये करण्यात आला होता. या कामासाठी सर्वप्रथम सहा महिन्यांची मुदत देण्यात आली होती. परंतु, मुदतीत केवळ २० टक्केच काम पूर्ण झाले होते. या रस्त्यासंदर्भात अनंत अडचणी उभ्या राहिल्याने रस्ते कामासाठी मुदतवाढ देण्याची मागणी ठेकेदाराने केली. त्यामुळे पुन्हा मार्च २०१९ पर्यंत ठेकेदाराला मुदतवाढ देण्यात आली. परंतु, या मुदतीतही केवळ ४० ते ५० टक्केच काम पूर्ण झाले होते. त्यामुळे ठेकेदाराकडून पुन्हा मुदतवाढ देण्याचा आग्रह धरण्यात आला. आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी ३१ मार्चची डेडलाइन दिली. मात्र तरीही रस्त्याचे काम संथ गतीने सुरू होते. त्यामुळे आयुक्तांनी ठेकेदाराला दंड करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर ठेकेदाराने कामाचा वेग वाढवत एका बाजूचे ७० टक्के काम पूर्ण केले. या रस्त्याच्या अर्धवट कामामुळे जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालयात येणाऱ्या नागरिकांना हालअपेष्टांचा सामना करावा लागत आहे. या मुदतीतही काम पूर्ण होत नसल्याने ठेकेदाराने पुन्हा मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. परंतु, निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने हा विषय संचालक मंडळाच्या बैठकीत येऊ शकला नाही. स्मार्ट सिटी कंपनीकडून संबंधित ठेकेदाराचे प्राकलन वाढवून देताना त्याच्यासमोर ३० जूनपर्यंत काम पूर्ण करण्याची अट टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली. कोणत्याही परिस्थितीत रस्ता पूर्ण करण्याचे बंधन ठेकेदाराला घातले आहे.

...

ठेकेदाराला दंड

स्मार्ट सिटी कंपनीकडून ठेकेदाराला तोंडी स्वरुपात ३० जूनचा अल्टिमेटम देण्यात आला असला तरी, मुदतवाढीचा निर्णय स्मार्ट सीटी कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत होणार आहे. दंडाबाबतही कंपनीकडून आराखडा तयार करण्यात आला आहे. कामास उशीर केल्याप्रकरणी ठेकेदारास एकूण किमतीच्या ०.५ टक्के दंड लावावा, अशी शिफारस स्मार्ट सिटी कंपनीकडून संचालक मंडळाकडे करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावात पुन्हा स्त्रीभ्रूणहत्या

$
0
0

मोसम पात्रात आढळले मृत अर्भक

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव तालुक्यातील कौळाणे येथील अवैध गर्भपाताचे प्रकरण ताजे असतानाच गुरुवारी रात्री पुन्हा शहरातील मोसम नदीपात्रात पाच ते साडेपाच महिन्यांचे स्त्री जातीचे अर्भक मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शहरात पुन्हा एकदा अवैध गर्भपात करणारी टोळी सक्रिय झाली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत असून, आरोग्य विभागानेच या प्रकारांकडे गांभीर्याने लक्ष नसल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास छावणी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण वाडीले यांना फोनवरून माहिती मिळाली की, रामसेतूनजीक असलेल्या नवीन सावित्रीबाई फुले पादचारी पुलाजवळ मोसमनदी पात्रात एक अर्भक पडलेले आहे. माहिती मिळताच वाडीले यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. नदीपात्रात लाल कपड्यात गुंडाळून ठेवलेले ते अर्भक पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने बाहेर काढले. त्यानंतर येथील सामान्य रुग्णालयात ते अर्भकाला आणले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ते स्त्री अर्भक मृत असल्याचे सांगितले.

रात्री उशिरा याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात नरेंद्र भिकन खैरनार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अवैध गर्भपात व स्त्रीभ्रूणहत्येचा प्रकार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. जनमानसात बदनामी होऊ नये या उद्देशाने हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. कौळाणे येथील गर्भपात प्रकरणानंतर हा प्रकार उघडकीस आल्याने पोलिस तसेच आरोग्य यंत्रणेपुढे या प्रकरणाची पाळेमुळे शोधण्याचे आव्हान आहे. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक झाली नसून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

आरोग्य यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात?

जानेवारी २०१९ मध्ये तालुक्यातील कौळाणे येथे अवैध गर्भपातचे मोठे रॅकेट उघडकीस आले होते. याप्रकरणी चौकशी दरम्यान आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार व हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला होता. आता पुन्हा एकदा शहरातील भर वस्तीत एक स्त्री अर्भक अवैध गर्भपात करून नदीपात्रात फेकून दिल्याचा प्रकार समोर आल्याने आरोग्य यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. शहरात अवैध गर्भपाताचे प्रकार सर्रास होत असताना आरोग्य यंत्रणा काय करते आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अवैध गर्भपात केंद्र?

गेल्या काही वर्षांत सातत्याने मालेगाव अवैध गर्भपाताच्या प्रकरणी चर्चेत राहिले आहे. याआधी देखील डॉ. देवरे बंधूंना याप्रकरणी शिक्षा झाली होती. तसेच जानेवारीत देखील कौळाणे येथील गर्भपात केंद्र उघड झाले होते. मात्र त्यानंतर देखील वारंवार अशा घटना समोर येत असल्याने मालेगाव अवैध गर्भपाताचे केंद्र म्हणून पुढे येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गिरणाकाठी जलसंघर्ष

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळाच्या या झळा दिवसेंदिवस तीव्र होत असून, तालुक्यातील गिरणा नदीकाठच्या आघार, चिंचावड, पाटणे व मुंगसे गावातील ग्रामस्थांमध्ये पाण्यावरून संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत. आघार, चिंचावड व पाटणे या चारही गावांतील खासगी जमिनींवरील विहिरींतून मुंगसे ग्रामस्थांना पाणी देण्यास गावकऱ्यांनी विरोध केला असून, शुक्रवारी दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांची भेट घेऊन आपापली बाजू मांडली.

तालुक्यातील गिरणा नदीकाठच्या सगळ्या गावांत सध्या पाणीटंचाई भेडसावते आहे. मुंगसे गावातील काही ग्रामस्थांनी गिरणा नदीलगत असलेल्या खासगी शेतजमिनी आघार, चिंचावड व पाटणे ग्रामस्थांकडून खरेदी केल्या होत्या. कालांतराने खरेदीदारांनी या जमिनीवर विहिरी खणल्या. आता दुष्काळी परिस्थिती असल्याने मुंगसे ग्रामस्थांना शेती तसेच पिण्यासाठी या विहिरींपासून पाइपलाइन टाकायची आहे. मात्र आघार, चिंचावड व पाटणे ग्रामस्थांनी यास विरोध सुरू केला असून, गावाचे एक थेंबही पाणी देणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे.

पाण्याचा हा वाद शुक्रवारी थेट तहसीलदार चंद्रजित राजपूत यांच्यापर्यंत पोचला. दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी आपापली बाजू मांडली. आघार, चिंचावड व पाटणे ग्रामस्थांनी गावालगत असलेल्या विहिरीतून जलवाहिनीद्वारे पाणी देण्यास गावकऱ्यांचा विरोध असून, तसा ठराव ग्रामसभेत केल्याची बाब निदर्शनास आणून दिली. तर मुंगसे येथील ग्रामस्थांनी आमच्या खासगी जमिनींवरील विहिरी असून, विहीर खोदणे व पाइपलाइन टाकणे यासाठी मोठा आर्थिक खर्च झाल्याचे सांगून आम्हाला जलवाहिनी टाकू द्यावी, असा आग्रह धरला. दोन्ही ग्रामस्थांनी आपली गाऱ्हाणे मांडले. हा पाणीप्रश्न आणखी बिकट होण्याची चिन्हे आहेत.

पिण्याच्या पाण्यास प्राधान्य

तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पिण्याच्या पाण्यास प्राधान्य देण्याचे शासनाचे निर्देश असल्याचे तहसीलदार राजपूत यांनी स्पष्ट केले. तसेच विहिरी खासगी जागेवर असल्या तरी जलवाहिनी ज्या शेतजमिनीवरून जाणार आहे, त्या जमीनमालकांचे 'ना हरकत' दाखले मुंगसे ग्रामस्थांनी आणावेत, तसेच जलवाहिनीसाठी महसूल विभागाची परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे सांगितले. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती पाहता दोन्ही गावाच्या ग्रामस्थांनी सामंजस्यची भूमिका स्वीकारावी, असे आवाहन तहसीलदार राजपूत यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नदीच्या काठावर, तरी हंडे डोक्यावर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड तालुक्यातील पूर्व भागातील गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गोई नदीने वळसा घातलेल्या शिरवाडे वाकद या गावाला सातत्याने बाराही महिने पाणी टंचाईला सामोरे जावे लागते या परिसरात सद्यस्थितीत महिला वर्ग डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी भटकंती करतानाचे चित्र आहे

तालुक्यातील शिरवाडे वाकद येथील गावठाणात असणारे पाणी पिण्यायोग्य नाही. या गावात असणाऱ्या एकमेव कुपनलिकेचा विद्युत पुरवठा वीजबिल थकल्यामुळे बंद केल्याने अधिकच समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे उपलब्ध असणारे क्षारयुक्त पाणी पिल्याने नागरिकांना मूत्रविकारांचा सामना करावा लागत आहे.

शिरवाडे वाकद या गावासाठी गोई नदीकाठी स्वजलधारा योजनेतून २ लाख ८५ हजार रुपयांची विहीर खोदण्यात आली. विहिरीला पाणीही मुबलक लागले. मात्र विहिरीपासून ते जलकुंभापर्यंत पाइपलाइन न झाल्याने पाणी आणि विहीर असूनही त्याचा काही फायदा नाही. सन २००९ मध्ये भारत निर्माण योजनेअंतर्गत तब्बल २२ लाख रुपयांची पाणीयोजना अंमलात आली. गावठाण परिसरात खाऱ्या पाण्याचे स्रोत आहेत, याची माहिती असूनही अधिकारी वर्गाने याच गावठाण परिसरात विहीर खोदण्याचे काम केले. विहिरीला खराब पाणी लागले. त्यामुळे शासकीय निधी वाया गेला. जवळपास दहा वर्षे ही योजना रेंगाळली. त्यामुळे ती गुंडाळण्यात आली.

आता नव्याने मुख्यमंत्री पेयजल योजनेतून सुमारे ९२ लाख रुपयांच्या योजनेसाठी प्रस्ताव पाठविला आहे. ही योजना कधी मार्गी लागते, याची गावकऱ्यांना प्रतीक्षा आहे. सध्या संपूर्ण गावाची पिण्याच्या पाण्याची भिस्त शिरवाडे प्रभावतीनगर या आदिवासी वस्तीमध्ये असणाऱ्या एकमेव हातपंपावर आहे. जो प्रथम येईल, त्यालाच पाणी मिळत असल्याने या हातपंपावर अगदी पहाटेपासूनच पाण्यासाठी रांगा लागलेल्या असतात.

शिरवाडे ग्रामपंचायतीने चौदाव्या वित्त आयोगातून जलशुद्धीकरण यंत्र बसविले आहे. मात्र, त्याचाही फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे बहुतांश नागरिक खासगी विहिरीवरून पाणी आणताना दिसतात. गावच्या स्मशानभूमीजवळ बोअरवेल घेतले असून, या बोअरवेलचे पाणी हनुमान मंदिराजवळच्या जलकुंभात टाकले जाते. मात्र तेही पाणी खराब असल्याने त्याचा वापर घरगुती वापरासाठी होतो. त्यामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईचे चटके बसत असून, जनतेला पाणीपुरवठा करण्यास प्रशासन असमर्थ ठरत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.

शिरवाडे ग्रामपंचायतीने भारत निर्माण योजनेअंतर्गत विहीर खोदली. मात्र, तिला अत्यल्प व क्षारयुक्त पाणी लागले. त्यामुळे ही योजना बंद करण्यात आली असून, मुख्यमंत्री पेयजल योजनेतून नव्या पाणी योजनेसाठी प्रयत्न सुरू आहेत.

- संदीप पाटील

- अध्यक्ष, भारत निर्माण योजना

असेही दातृत्व

शिरवाडेकरांना गोड पाणी मिळावे म्हणून गोदावरी कालव्याच्या कडेला विहिरीच्या जागेसाठी प्रांत यांनी प्रयत्न करावेत, असे आदेश या मतदार संघाचे आमदार छगन भुजबळ यांनी ते जिल्ह्याचे पालकमंत्री असताना तत्कालीन प्रांतांना दिले होते. मात्र, आदेश देऊनही प्रांताधिकाऱ्याच्या उदासीनतेमुळे विहिरीसाठी जागा मिळू शकली नाही. शिरवाडेकरांची पाण्याची परवड बघून वाकद गावच्या सरपंच वैशाली बडवर यांनी गोदावरी कालवा व गोई नदीनजीक गुंठ्याला पाच ते सहा लाख रुपये दर असतानाही पाणीपुरवठा योजनेसाठी मोफत जागा दिली. त्याचबरोबर शिरवाडे येथील गोरख आवारे हे स्वतःच्या जलकुंभातून संपूर्ण गाव, मोर्विस, कानळद, धामोरी येथील नागरिकांना पिण्याचे तसेच लग्नकार्यास टँकरद्वारे मोफत पाणी पुरवतात. टंचाईच्या काळात पाणी विकणाऱ्या लोकांसमोर सरपंच वैशाली बडवर व गोरख आवारे यांनी आदर्श निर्माण केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कौशल्य शिक्षणातूनच विद्यार्थ्यांना विपूल संधी

$
0
0

कुलगुरू वायूनंदन यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यशंतवराव चव्हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठातर्फे नियमित पारंपरिक अभ्यासक्रमांसोबत कौशल्यांवर आधारित शिक्षणक्रम विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केला जातो आहे. अशा अभ्यासक्रमांतून विद्यार्थ्यांना रोजगार, करिअरच्या चांगल्या संधी उपलब्ध होऊ लागल्या आहेत. 'डीआयडीटी'च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कौशल्याधिष्ठीत शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होईल, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाचे कुलगुरू ई. वायुनंदन यांनी केले.

कॉलेज रोडवर कल्पतरू ट्रस्ट संचालित धन्वंतरी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन ऍन्ड टेक्‍नॉलॉजी (डीआयडीटी)च्या नूतन कॅम्पसच्या उद्‌घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी कल्पतरू ट्रस्टच्या पदाधिकारी मनीषा बागूल, चंद्रकांत गुंजाळ, शकुंतला वाघ, अजय बोरस्ते, 'डीआयडीटी'चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल बागूल आदी उपस्थित होते.

वायुनंदन म्हणाले, की इतकी देखणी वास्तू असलेले विद्यापीठाचे अभ्यास केंद्र असल्याचे नमूद करतांना विविध सुविधांचा आढावा घेतला. औपचारिक कार्यक्रमानंतर झालेल्या समारंभात 'डीआयडीटी' कॅम्पसच्या नूतन वास्तुला रंगरूप देणाऱ्या इंटेरिअर डिझायनिंगच्या विविध व्यक्‍तींचा सत्कार करण्यात आला. 'डीआयडीटी'मार्फत दरवर्षी फॅशन शो घेतला जातो. यंदाचा फॅशन शो २३ जून रोजी होणार असून, त्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून अमृता फडणवीस उपस्थित राहाणार असल्याची माहिती अनिल बागूल यांनी दिली.

'डीआयडीटी' महाविद्यालयात इंटेरिअर डिझायनिंग व फॅशन डिझायनिंग क्षेत्रातील पदविका व पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. शासनमान्य तंत्रशिक्षण मंडळ (एमएसबीटीई) व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठ यांच्याशी सदरचे अभ्यासक्रम संलग्न आहेत. उच्चशिक्षित प्राध्यापकांकडून अभ्यासक्रमासंदर्भातील शिक्षण तर तज्ज्ञ व्यावसायिकांकडून प्रात्येक्षिकांवर आधारित प्रशिक्षण दिले जात असल्याचे बागूल यांनी नमूद केले. कार्यक्रमात आजी-माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्‍त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरसावले दातृत्वाचे हात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या सीमारेषेवर असलेल्या बर्डेवाडीतील महिलांना हंडाभर पाण्यासाठी विहिरीत उतरून जीव धोक्यात घालावा लागत होता. याबाबतची छायाचित्रे, वृत्त माध्यमांतून येताच त्याची दखल मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी नाशिकच्या सभेत घेतली होती. यानंतर मनसेचे पदाधिकारी व इगतपुरी तालुक्यातील कळसूबाई मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र दिनी बर्डेवाडीसाठी दोन हजार लिटर साठवणक्षमता असलेल्या दोन टाक्या ग्रामस्थ, महिलांना दिल्या.

कळसूबाई मित्र मंडळाचे संस्थापक तथा मनसेचे जिल्हा संघटक भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी केलेल्या उपक्रमाने गावाला दिलासा मिळाला आहे. गेल्या १५ दिवसांपासून बर्डेवाडी येथील पाणीप्रश्न गंभीर झाल्याने श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते भगवान मधे यांनी प्रशासन व माध्यमांकडे याबाबत दाद मागितली होती. जिल्ह्यातील माध्यमांनीही प्रकर्षाने दखल घेत आवाज उठविल्याने प्रशासन हादरले. जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणा कामाला लावली.

श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते भगवान मधे यांच्यासह मनसेचे जिल्हा संघटक भगीरथ मराडे, जिल्हा सचिव अभिजीत कुलकर्णी, आत्माराम मते, गणेश मुसळे व मंडळाचे कार्यकर्ते अशोक हेमके, बाळू आरोटे, गजाजन चव्हान, प्रवीण भटाटे, गोकुळ चव्हान, संतोष म्हसणे, सोमनाथ भोर, बाळा जोशी, सुरेश चव्हाण आदिंनी या वाडीला भेट देऊन चर्चा केली. महिला पाणी भरत असलेल्या विहिरीवर जाऊन पाहणी केली. त्यानंतर तत्काळ या गावासाठी दोन टाक्या उपलब्ध करून दिल्या.

इगतपुरी परिसरातील भीषण टंचाईग्रस्त गावाला पाण्याची टाकी देण्याबाबत इगतपुरी तालुक्यातील कळसुबाई मित्र मंडळाचा मानस होता. त्यात मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी बर्डेवाडी येथील भयानक पाणीटंचाईबाबत व्हिडीओ दाखविल्याने तत्काळ या वाडीला दोन हजार लिटर क्षमतेच्या दोन टाक्या उपलब्ध करून दिल्या.

- भगीरथ मराडे, अध्यक्ष, कळसूबाई मित्र मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्याध्यापकांचा ठिय्या

$
0
0

वेतन आणि फरक बिलाचे नियोजन ढासळल्याने आंदोलन

...

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

वेतन पथक कार्यालयाचे शिक्षकांच्या वेतन आणि फरक बिले अदा करण्यासंदर्भात नियोजन ढासळल्याने आणि अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याच्या मुद्द्यावर जिल्ह्यातील मुख्याध्यापकांनी शुक्रवारी (दि. ३) वेतन पथक अधीक्षक कार्यालयापुढे ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत वेतन पथक अधीक्षक उदय देवरे यांनी सातव्या वेतन आयोगासह फरक बिले त्वरित अदा करण्यास संमती दिली.

वेतन पथक कार्यालयाच्या कामकाजाविरोधात जिल्हा मुख्याध्यापक संघ आणि सर्व शिक्षक शिक्षकेत्तर संघटनांनी शुक्रवारी तीन वाजता ठिय्या आंदोलन केले. यावेळी निवेदन स्वीकारण्यास उपस्थित झालेले अधीक्षक उदय देवरे यांना मुख्याध्यापकांनी घेराव घालत जिल्ह्यातील शिक्षकांची आर्थिक कोंडी केल्याप्रकरणी जाब विचारला. मुख्याध्यापकांनी उपस्थित केलेल्या सर्व अडचणींचे उदय देवरे यांनी निरसन केले. शिक्षकांचे वेतन उशिरा केल्याचा मुख्याध्यापकांचा दावाही खोडून काढला. गेल्या आर्थिक वर्षातील फरक, पुरवणी आणि वैद्यकीय बिले अदा करण्यास झालेल्या उशिरास आपण जबाबदार नसल्यावर देवरे ठाम राहिले. वेतन आणि फरक बिले अदा करण्यातील तांत्रिक अडचणी त्यांनी समजावून सांगितल्या. शिक्षण संचालकांचे मार्गदर्शन मागवून प्रलंबित बिले मार्गी लावण्याचे आश्वासन देवरे यांनी दिले.

पीएफ स्लिप वितरणासाठी येत्या १५ मेपासून पुढील तीन महिन्यांसाठी शिबिर लावण्यात येणार असल्याचे देवरे यांनी सांगितले. २५ ते ३० एप्रिल दरम्यान प्राप्त सातव्या वेतन आयोगानुसारची बिले तात्काळ अदा होतील, त्यानंतर दाखल वेतन बिले दुसऱ्या टप्प्यात अदा केले जातील या देवरेंच्या निर्णयास काही मुख्याध्यापकांनी संमती दिली, तर काहींनी विरोध केला. याप्रसंगी ज्येष्ठ नेते फिरोज बादशाह, एस. के. सावंत, माणिक मढवई, राजेंद्र सावंत आदींसह जिल्ह्यातील मुख्याध्यापक उपस्थित होते.

...

मुख्याध्यापकांचा संताप

वेतन पथक कार्यालयातील कर्मचारी शिक्षकांना वेठीस धरण्याबरोबरच उर्मटपणे वागत आहेत. शिक्षकांना वेठीस धरणाऱ्यांना देवाच्या दारी शिक्षा होईल, असा संताप सी. पी. कुशारे यांनी व्यक्त केला. वेतन पथकातील कर्मचारी मुजोर झाले आहेत. अधिकाऱ्यांचेही नियंत्रण राहिलेले नाही. पुणे कार्यालयाची भीती दाखवण्यापेक्षा तुम्ही पुणे कार्यालयच सांभाळा, अशा शब्दांत एस. बी. शिरसाट यांनी उदय देवरे यांच्या कामकाजावर संताप व्यक्त केला. एस. बी. देशमुख, पुरुषोत्तम रकिबे, एम. व्ही. बच्छाव, मोहन चकोर यांनीही यावेळी वेतन पथक कार्यालयाच्या नियोजनशुन्य कामकाजाचा पाढा वाचला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरटे पुन्हा सुसाट

$
0
0

चोरीच्या घटनांमध्ये वाढ; पोलिस निद्रावस्थेत

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीचा धुराळा शांत होताच शहरात पुन्हा एकदा चोरट्यांनी डोके वर काढले आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली असून, पोलिस मात्र हातावर हात धरून बसलेले असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

रोकडसह दागिने चोरी

अॅटोरिक्षा प्रवासात अज्ञात प्रवाशाने महिलेच्या बॅगेतील पर्स हातोहात लांबविल्याची घटना महामार्गावर घडली. पर्समध्ये लाखाचा मुद्देमाल होता. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सलमा लतिब पठाण (रा. जेऊर ता. जि नगर) यांनी तक्रार दिली. सलमा पठाण या बुधवारी (दि.१) आई वडिलांना भेटण्यासाठी शहरात आल्या होत्या. कळवण-अहमदनगर या बस प्रवासानंतर त्या जुन्या सिडकोतील वृंदावन चौकात जाण्यासाठी रिक्षा प्रवास करीत असताना ही घटना घडली. पर्समध्ये दागिने आणि साडे दहा हजाराची रोकड असा सुमारे ९० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल होता.

--

पर्स पळविली

रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या हातातील पर्स दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना गंगापूररोड भागात घडली. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. शोभा गणेश काळे (रा.गुलमोहर अपार्ट. सावरकरनगर) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. गुरुवारी (दि.२) दुपारी एक वाजेच्या सुमारास त्या शंकर टी पॉईंट परिसरातून पायी जात असतांना ही घटना घडली. पर्समध्ये ४६ हजार १०० रूपयांची रोकड होती. घटनेचा अधिक तपास हवालदार भूमकर करीत आहेत.

--

विक्री केलेल्या घरावर कर्ज

विक्री केलेले रो हाऊस गहाण करून एकाने पतसंस्थेची साडे दहा लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. संजय सदाशिव देशमुख (रा. मुरलीधरनगर, पाथर्डीफाटा) असे पतपेढीची फसवणूक करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. संशयिताने पाथर्डी फाटा शिवारातील मुरलीधरनगर भागातील सिटी सर्व्हे न.३२० -२ या आपल्या मालकीच्या साईबाबा निवास रो हाऊसवर जयमल्हार नागरी सहकारी पतसंस्थेकडे कर्जाची मागणी केली होती. त्यानुसार ६ ऑगस्ट २०११ रोजी दुय्यम निबंधकाकडे संबधीताने तारण गहाण नोंदवून दिले. पतसंस्थेने आठ लाखाचे कर्ज मंजूर करून ती रक्कम संशयितास दिली. मात्र आजतगायत थकबाकीसह साडे दहा लाख रूपयांच्या कर्जाची परत फेड न झाल्याने बँकेने चौकशी केली. संशयिताने बँकेचे कर्ज घेण्यापूर्वीच म्हणजेच ३० मे २०११ रोजी सदरचे रोहाऊस अमर लहाणू पाटील आणि दिपक लहाणू पाटील यांनी विक्री केल्याचे पुढे आले.

--

पोलिसास महिलांची धक्काबुक्की

टोईंग करून आणलेली कार परस्पर घेवून जाणाऱ्या चालक महिलेस दंडाच्या पावतीबाबत विचारणा केल्याने संतप्त महिलांनी पोलिस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की केली. पोलिस अधिकाऱ्याची मुलगी असल्याचे सांगणाऱ्या महिलेकडून हा प्रकार शरणपूर रोडवरील वाहतूक शाखा आवारात झाला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुसुम पाटील उर्फ कुसूम सपकाळे आणि सुरेखा सैंदाणे अशी या महिलांची नावे आहेत. संशयित महिलांची कार (एमएच १५ एफएफ ६४६९) गुरुवारी (दि.२) नो पार्किंगमध्ये आढळून आली. त्यामुळे ही कार टोईंग करण्यात आली. कार वाहतूक शाखेच्या युनिट दोनच्या आवारात पार्क केलेली असतांना ही घटना घडली. महिला कार घेवून जात असताना प्रवेशद्वारावर नेमणुकीस असलेले फिर्यादी सुनील उगले यांनी कार अडविली. दंड भरल्याची पावतीची दाखवा, अशी मागणी उगले यांनी केली. यावेळी संतप्त झालेल्या महिलांनी भररस्त्याक कार आडवी लावून खाली उतरत पोलिस कर्मचाऱ्याशी हुज्जत घातली. तसेच उगले यांना धक्काबुक्की केली.

--

डावखरवाडीत घरफोडी

नाशिकरोड येथील डावखरवाडी भागात घरफोडी करीत चोरट्यांनी सुमारे ८० हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. रोशन मधुकर डावखर (रा.रामनिवास अपार्ट. बिगबाजार मागे) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. डावखर कुटुंबिय मंगळवारी (दि.३०) बाहेरगावी गेले असल्याची संधी चोरट्यांनी साधली. बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी कपाटातील रोकड, सोनसाखळी आणि मोबाइल असा सुमारे ८० हजारांचा मुद्देमाल साफ केला. अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक काकड करीत आहेत.

--

तीन मोबाइल चोरी

बंगल्याच्या खिडकीत हात घालून चोरट्यांनी बेडरूममधील तीन महागडे मोबाइल चोरून नेले. मोबाईल चोरीची घटना धात्रक फाटा परिसरात घडली असून, या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. चेतन सुधाकर विसपुते (रा. स्मृतीसागर व्हिलेज, धात्रकफाटा) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. गुरूवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

--

अनोळखी मृतदेहाबाबत आवाहन

निमाणी बसस्थानक परिसरात मिळून आलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी आवाहन केले आहे. निमाणी बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक सुरेश भदाणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २८ एप्रिल रोजी बसस्थानक परिसरात ३५ ते ४० वयोगटातील अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आला. त्याची उंची साडे पाच फुट, शरिराने सडपातळ, रंग काळा सावळा, अंगात पांढरा टी शर्ट आणि जिन्स असे त्याचे वर्णन आहे. याबाबत कोणास काही माहिती असल्यास पंचवटी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन हवालदार झाडे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकलहरे वीज केंद्रात पर्यावरणासाठी रॅली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

एकलहरे येथील औष्णिक वीज केंद्रातर्फे आंतरराष्ट्रीय कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी भव्य रॅली काढण्यात आली. विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता उमाकांत निखारे यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन झाले.

रॅलीमधे मनोहर तायडे, शशांक चव्हाण, कार्यकारी अभियंते, अधिकारी, कर्मचारी, याबरोबरच सार्थक ज्येष्ठ नागरिक संघ, परमानंद ज्येष्ठ नागरिक संघ, मेहनत मॉर्निंग वॉक ग्रुप, ज्ञानेश्वर माऊली ज्येष्ठ नागरिक संघ, महानिर्मिती सेवा निवृत्त संघटना यांनी सहभाग नोंदवला. प्रभातफेरीत सहभागी झालेल्यांना अशोका मेडिकेअरतर्फे मोफत आरोग्य तपासणीसाठी एक हजार रुपयांचे कूपन देण्यात आले. दहा भाग्यवंतांना लकी ड्रॉ काढून पाच हजारांचे मेडिकल चेकअपचे कूपन देण्यात आले.

अधिकारी मनोरंजन केंद्र व कामगार मनोरंजन केंद्र यांच्यातर्फे ही रॅली सकाळी सातला निघाली. सात वाजेपर्यंत नावनोंदणी करून प्रत्येक व्यक्तीला टी शर्ट देण्यात आले. सर्व अधिकारी, अभियंते, कर्मचारी, कंत्राटदार व कंत्राटी कर्मचारी सहकुटुंब रॅलीत सहभागी झाले. एकूण अडीचशे जणांनी सहभाग नोंदवला. शक्तिमान क्रीडा संकुल येथून प्रभातफेरीला सुरुवात झाली. 'पाणी म्हणजे जीवनाची हमी, पाण्याविना जीवन नाही, पाणी वाचवा जीवन वाचवा, झाडे वाचवा पर्यावरण वाचवा, झाडे वाचवा पृथ्वी वाचवा, निसर्ग वाचवा, प्रदूषण टाळा' आदी घोषणा देण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images