Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

काँग्रेसमुळेच मतदानात घट

$
0
0

आघाडीतील नेत्यांचा आरोप

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

लोकसभा निवडणुकीत मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात मतटक्का घसरल्यावरून राजकारण सुरू झाले आहे. माजी आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल व जनता दल नेते बुलंद इक्बाल यांनी महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेसवर असलेला राग मतदारांनी मतदान न करून व्यक्त केल्याचे म्हटले आहे.

काँग्रेस आमदार असिफ शेख यांनी निवडणूक आटोपल्यानंतर मंगळवारी (दि. ३०) पत्रकार परिषद घेऊन निवडणूक व पोलिस यंत्रणेने जाणीवपूर्वक सरकारच्या दबावात मालेगाव मध्य मतदारसंघात मतदान कमी व्हावे यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. तसेच धुळे लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात फेरमतदान घेण्याची मागणी करणार असल्याचे म्हटले होते. आ. शेख यांनी शिष्टमंडळासह धुळे येथील नायब जिल्हाधिकारी यांना फेरमतदान घेण्यासंबंधीचे गुरुवारी निवेदन दिले. यावेळी त्यांच्या समवेत काँग्रेस प्रवक्ते साबीर गौर, मौलाना अहद असदी, अब्दुल कयूम, जमाल शेख, अब्दुल हाफिज अन्सारी, शकील शाह उपस्थित होते. आ. शेख यांनी मतदान कमी झाल्याचे खापर प्रशासनावर फोडले असतांना महापालिकेत विरोधात असलेले परंतु लोकसभा निवडणुकीत काँग्रेससोबत गेलेल्या महागठबंधन आघाडीच्या नेत्यांनी मतटक्का घटल्याचे खापर काँग्रेसवरच फोडले आहे.

माजी आमदार इस्माईल व जनता दल व महागठबंधन आघाडीचे गटनेते बुलंद इक्बाल यांनी उर्दू मिडिया सेंटर येथे पत्रकार परिषद घेतली. आम्ही महापालिकेत काँग्रेसविरोधात असलो तरी लोकसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन नको म्हणून काँग्रेस उमेदवार कुणाल पाटील यांचे समर्थन केले. आमच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केले. मात्र, मतदानाचा टक्का घटण्यास महापालिकेत सत्तेत असलेली काँग्रेस कारणीभूत असल्याचा आरोप केला. शहरात रस्ते, स्वच्छता, पिण्याचे पाणी, आरोग्य अशा मूलभूत सोयी सुविधा पुरवण्यात काँग्रेस अपयशी ठरते आहे. याविषयी असलेला राग मतदारांनी लोकसभा निवडणुकीत मतदान न करून काढला आहे, असा दावा दोन्ही नेत्यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पिण्याच्या पाण्यासाठी मोजताहेत पैसे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड विणता, कादवा आणि गोदावरी या नद्या आणि पालखेड डावा कालवा, गंगापूर कालवा निफाड तालुक्यातून वाहत असला तरीही मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच निफाड तालुक्याच्या उत्तर, दक्षिण भागात पाणीटंचाईने उग्र रुप धारण केले आहे. उगाव परिसरातील नागरिाकांना पिण्याच्या पाण्यासाठी तर पैसे माजावे लागत आहेत. निफाड आणि सिन्नर तालुक्याच्या हद्दीवरील असणारे निफाड तालुक्यातील तळवाडे, महाजनपूर, औरंगपूर, भेंडाळी या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. तळवाडे गावासाठी डिसेंबरमध्ये अधिग्रहित केलेल्या विहिरीतील पाणी आटल्याने गावाने टँकरचा प्रस्ताव सादर केल्याचे सरपंच लता सांगळे यांनी सांगितले. महाजनपूर येथील सरपंच आशा फड यांनीही गावात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला आता पुढील २ महिने सामोरे जाण्यासाठी टँकरचा प्रस्ताव सादर केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेच्या कागदपत्रांचे डिजिटायजेशन

$
0
0

कोटक महिंद्राने 'सीएसआर'मधून स्वीकारली जबाबदारी

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेकडून मिळणाऱ्या जन्म-मृत्यूच्या दाखल्यांसह नगररचना विभागातील कागदपत्रे तसेच, विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी लागणाऱ्या कागदपत्रांचे डिजिटायजेशन होणार आहे. कोटक महिंद्रा कंपनी सीएसआर फंडातून हे काम करणार आहे. यामुळे नागरिकांना मिळणारे विविध प्रकारचे दाखले आता एका क्लिकवर मिळणार असल्याची माहिती आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली.

महापालिकेकडून जन्म-मृत्यूसह विवाह प्रमाणपत्र, मालमत्ता हस्तांतरण, विभागीय, जोता दाखला, बांधकाम वापर परवाना, नळजोडणी, डॉग लायसन्स, रुग्णालय नोंदणी व नूतनीकरण, सोनोग्राफी सेंटर, प्री फायर व फायनल एनओसी, लॉजिंग लायसन्स अशी जवळपास ४५ प्रकारचे दाखले दिले जातात. महापालिकेने या दाखल्यांसाठी ऑनलाइन सेवा सुरू केली असली तरी सध्या या दाखल्यांसाठी लागणारे सर्व कागदपत्रे ही लिखीत स्वरुपात आहेत. एका दाखल्यासाठी लागणारी कागदपत्रे ही तीन ते चार विभागांकडे असतात. त्यामुळे वेळ वाया जात असल्याचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या तपासणी मोहिमेत लक्षात आले. त्यामुळे त्यांनी या सर्व दाखल्यांसाठी लागणाऱ्या कागदपत्रांचे डिजिटायजेशन करण्याचा निर्णय घेतला आहे. या कामांसाठी महापालिकेचा निधी खर्च करण्याऐवजी गमेंनी सीएसआर फंडातून हे काम करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी कोटक महिंद्रा या कंपनीने तयारी दर्शवली आहे. यासंदर्भात गमेंसोबतच कंपनीची बैठकही पार पडली आहे. त्यामुळे आता एका क्लिकवर हे दाखले मिळणार आहेत.

...

व्हॉट्अॅपवरही मिळणार दाखले

महापालिकेच्या ऑनलाइन सेवांमधून दिले जाणारे विविध प्रकारचे दाखले आता नागरिकांना व्हॉट्सअॅपवरही उपलब्ध होणार आहेत. अर्ज करताना नागरिकांना त्यांचा मोबाइल क्रमांक नोंदवावा लागणार आहे. दाखला तयार झाल्यानंतर ऑटो जनरेट होऊन तो संबंधिताच्या व्हॉट्सअॅप क्रमांकासह मेलवरही जाणार आहे. त्यामुळे नागरिकांचे परिश्रम वाचणार असून, जलद गतीने दाखले मिळणार आहेत.

....

विभागीय कार्यालयांमधील तपासणीत एका दाखल्यासाठी तीन ते चार कर्मचाऱ्यांकडील कागदपत्रे तपासावी लागत असल्याचे लक्षात आले. सर्व कागदपत्रे डिजिटायजेशन केल्यास कर्मचाऱ्यांना एका क्लिकवर दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे वेळ आणि मनुष्यबळाचीही बचत होईल.

- राधाकृष्ण गमे, आयुक्त, मनपा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाइन फ्लूचा ओसरेना प्रादुर्भाव

$
0
0

एप्रिलमध्ये ३० जण बाधित

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

उष्णतेची दाहकता वाढल्याने शहरात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव काहीसा ओसरला असला तरी गेल्या चार महिन्यांत स्वाइन फ्लूने आठ जणांचा बळी घेतला आहे. गेल्या चार महिन्यांत तब्बल १२८ जणांना या आजाराची लागण झाली असून, एप्रिल महिन्यात स्वाइन प्लूचे ३० रुग्ण बाधित आढळले आहेत. वाढत्या उन्हामुळे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचा दावा आरोग्य व वैद्यकीय विभागाने केला आहे.

उन्हाळ्यात ब्रेक घेणारा स्वाइन फ्लू यंदा मात्र नाशिककरांची पाठ सोडत नसल्याचे चित्र आहे. उन्हात स्वाइन फ्लूचे विषाणू तग धरत नसल्याचा दावा आरोग्य व वैद्यकीय विभागाने केला होता. परंतु, उष्णतेच्या वातावरणाचाही विषाणूंवर आता फारसा परिणाम होत नसल्याचे समोर आले आहे. जानेवारीत स्वाइन फ्लूचे सात रुग्ण आढळून आले होते. फेब्रुवारीत थंड वातावरणात या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढून या आजाराची लागण झालेल्यांची संख्या ४२ वर पोहोचली होती, तर चार जणांचा या आजाराने बळी घेतला. मार्चमध्येही आकडा वाढून ४९ जणांना स्वाइन फ्लू झाल्याची आकडेवारी समोर आली होती. मार्चमध्येही दोन जणांचा या आजाराने बळी घेतला. एप्रिलमध्ये मात्र वाढलेले तापमान या आजाराच्या प्रादुर्भावाला अटकाव निर्माण करेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु, या महिन्यातही तब्बल ३० जणांना या आजाराची लागण झाली असून, दोघांचा बळी गेला आहे. त्यामुळे चार महिन्यात या आजाराने आठ जणांचा बळी घेतल्याचे समोर आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिवरायांच्या चरित्रातून राष्ट्रवादाची शिकवण’

$
0
0

शिवशाहीर विजय तनपुरे यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

पावने चारशे वर्षानंतरही छत्रपती शिवाजी महाराज नाव घेतले की स्फूर्ती येते. ही ताकद त्यांच्या नावात आहे. राष्ट्रासाठी कसे जगावे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र शिकवते, असे प्रतिपादन शिवशाहीर विजय तनपुरे यांनी केले. वसंत व्याख्यानमालेत लोकशाहीर गजाभाऊ बेणी स्मृती व्याख्यानात 'शिवचरित्रातून मी बी घडलो, तुम्ही बी घडा' या विषयावरील व्याख्यानात गुरुवारी ते बोलत होते.

यशवंतराव महाराज पटांगण येथे झालेल्या व्याख्यानाप्रसंगी शाहीर सुरेशचंद्र आहेर, श्रीकांत बेणी, भाग्यश्री ओझा, संगीता बाफना आदी उपस्थित होते.

विजय तनपुरे म्हणाले, की शिवाजी महाराजांनी लाख मोलाची माणसं घडविली. म्हणून स्वराज्याची निर्मिती झाली. आजही ते हृदयात स्थान करून आहे.

कर्म हे प्रामाणिक असावे, हीच खऱ्या अर्थाने पूर्ण होईल. गेलं के ते बघू नका, जे आहे ते बघा. माणूस जे देतो, ते हजार पटीने परत मिळते. बुद्धीच्या जोरावर माणसाने विज्ञानाच्या आधारे प्रचंड प्रगती केली. जेथे विज्ञान थांबते तेथे आध्यात्म सुरू होते.

शरद वाघ यांनी प्रास्ताविक केले. अॅड. अजय निकम यांनी परिचय करून दिला.

..

आजचे (दि. ३) व्याख्यान

विषय : संत गाडगेबाबा यांचे सामाजिक कार्य

वक्ते : प्रा. अशोक सोनवणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यालयात लवकरच ‘सीबीएसई’ शाळा

$
0
0

पोलिस आयुक्त नांगरे-पाटील यांची माहिती

..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पोलिसांच्या पाल्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळणे गरजेचे आहे. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य दरात दर्जेदार शिक्षण उपलब्ध करणे आवश्यक आहे. त्यासाठी पोलिस मुख्यालयात सीबीएसई शाळा सुरू करणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली.

महाराष्ट्र दिनानिमित्त पोलिस आयुक्तालय कार्यालयात आयोजित 'विशेष पोलिस महासंचालक पदक' प्रदान सोहळ्यात पोलिस आयुक्त नांगरे पाटील यांनी पोलिस कुटुंबीयांशी संवाद साधला. ते म्हणाले की, पोलिस मुख्यालयात महापालिकेची शाळा आहे. मुख्यालयातील शाळेची परिस्थिती कायम पाहतो. मुख्यालयात त्यापेक्षाही चांगल्या दर्जाची, सुसज्ज यंत्रणेची शाळा पोलिसांच्या पाल्यांसाठी असणे महत्त्वाचे वाटते. पोलिस कर्मचारी व अधिकारी कर्तव्य बजावत असताना त्यांच्या पाल्यांचा शिक्षणाकडचा ओढा तितकाच उत्तम असायला हवा. पालकांच्या विश्वासाला यशस्वी करिअरची साथ देणे पाल्यांचे कर्तव्य आहे. त्यासाठी पोलिस मुख्यालयात सीबीएसईची शाळा असावी, असा मानस आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू असून, लवकरच दहावीपर्यंतची सीबीएसई शाळा नाशिक पोलिस मुख्यालयात सुरू करणार आहे, असे नांगरे-पाटील यांनी सांगितले. यावेळी पोलिस अधिकारी, कर्मचारी व कुटुंबीयांनी जोरदार टाळ्यांचा वर्षाव केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारटेपवर चोरट्याचा डल्ला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कारच्या काचा फोडून महागडे साऊंड सिस्टीम चोरी करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरट्यांच्या उपद्रवामुळे वाहनमालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या सात घटनांमध्ये चोरट्यांनी सुमारे दोन लाख रुपये किंमतीचे साऊंड सिस्टीम चोरून नेले. या प्रकरणी गंगापूर, पंचवटी आणि मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

महात्मानगर भागात मंगळवारी (दि. ३०) एकाच दिवशी पाच वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. त्यात टोयाटो, इनबेल्ड, होंडा सिटी, सियाज, इनोव्हा अशा महागड्या वाहनांचा समावेश आहे. या प्रकरणी श्रीकांत खानीवाले (रा.महात्मानगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. इतर वाहनमालकांची साक्षीदार म्हणून नोंद करण्यात आली. टकलेनगर भागात कैलास निवृत्ती सोनवणे (रा.पवन अपार्ट. टकलेनगर) यांची इनोव्हा (एमएच १५ ईयू ८५५५) सोमवारी (दि.२९) रात्री त्याच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असताना चोरट्यांनी काच फोडून ७० हजार रुपये किमतीची साऊंड सिस्टीम चोरून नेली. वैद्यनगर येथील आनंदा अशोक पाठक (रा.स्नेहपूर्ती सोसा.वैद्यनगर) यांची टोयाटो कार (एमएच १५ डीव्ही १२१२) सोमवारी रात्री त्यांच्या घराच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी काच फोडून मोबाइल आणि कारटेप असा २५ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दागिन्यांची बॅग घेऊन रिक्षाचालकाची धूम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अॅटोरिक्षाने प्रवास करणाऱ्या उल्हासनगर येथील महिलेची सोने चांदीचे दागिने असलेली बॅग भामट्या रिक्षाचालकाने पळविल्याची घटना नाशिक-पुणे मार्गावरील आंबेडकर नगर भागात घडली. या बॅगेत कपड्यांसह सुमारे एक लाख ७१ हजार रूपयांचे दागिने होते. उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अलका सुरेश पगारे (रा. मिनाक्षी अपार्ट. उल्हासनगर) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. अलका पगारे या २६ एप्रिल रोजी नातेवाइकांना भेटण्यासाठी शहरात आल्या होत्या. रेल्वे प्रवासानंतर त्या आंबेडकरनगर येथे जाण्यासाठी नाशिकरोड येथे रिक्षात बसल्या असता ही घटना घडली. चालकाने बॅग सिटच्या मागे ठेवण्यास भाग पाडले. त्यानंतर आंबेडकरनगर येथील कमानीजवळ पगारे रिक्षा खाली उतरताच रिक्षाचालकाने धूम ठोकली. बॅगेत महागड्या पैठणी साड्यांसह सुमारे एक लाख ७१ हजार रुपये किंमतीचे दागिने होते. अधिक तपास हवालदार कोकाटे करीत आहेत.

--

मंगळसुत्रावर महिलेचा डल्ला

सोने खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीत शिरलेल्या ग्राहक महिलेने दुकानातील १५ हजाराचे मंगळसुत्र हातोहात लांबविले. चोरीची घटना कॅनडा कॉर्नर भागात घडली असून, या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

स्वाती किरण जाधव (रा.सावतानगर, सिडको) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गाडगीळ अ‍ॅण्ड सन्स या ज्वेलरी दुकानात हा प्रकार घडला. जाधव या दुकानात काम करतात. बुधवारी (दि.१) दुपारी त्या अन्य ग्राहकांना अलंकार दाखवित असताना सोने खरेदीच्या बहाण्याने संशयित चोरटी महिला दुकानात आली. जाधव यांचे लक्ष नसल्याची संधी साधत त्या महिलेने पंधरा हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र घेवून पोबारा केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस चोरट्या महिलेचा शोध घेत आहे.

आजाराला कंटाळून आत्महत्या

आजारपणास कंटाळून एकाने मद्याच्या नशेत गळफास लावून घेत आत्महत्या केली. ही घटना जेलरोड भागात घडली. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अशोक बाबुराव गुनवरे (४४ रा. इच्छामणी अपार्ट. बिटको कॉलेज मागे) असे या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुनवरे यांना पायांच्या नसांमध्ये रक्ताच्या गाठी झाल्याने ते आजारपणास कंटाळले होते. महागडा औषधोपचार करूनही आजार बरा होत नसल्याने त्यांनी आपल्या घरात मद्याच्या नशेत पंख्याच्या हुकास दोरी बांधून गळफास घेतला. ही घटना बुधवारी (दि.१) सकाळी उघडकीस आली. अधिक तपास हवालदार विंचू करीत आहेत.

--

दुचाकींच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

भरधाव दुचाकींमध्ये समोरासमोर धडक झाल्याने वृद्ध दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात दसक पेट्रोल पंपासमोर झाला. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गोकुळ बंडू सुतार (६५ रा. महालक्ष्मी नगर, जत्रा हॉटेल जवळ) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी सुतार आपल्या दुचाकीने प्रवास करीत असताना हा अपघात झाला. जेलरोड परिसरातील दसक पेट्रोल पंपासमोर दोन दुचाकींमध्ये समोरा समोर धडक झाल्याने सुतार गंभीर जखमी झाले होते. पत्नी चित्रा सुतार यांनी त्यांना तत्काळ नजीकच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास हवालदार भोईर करीत आहेत.

--

विवाहितेची आत्महत्या

नांदूरनाका परिसरातील जॉकीनगर भागात राहणाऱ्या ३० वर्षांच्या विवाहितेने आपल्या राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली. महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद केली. दुर्गा विनय शिंदे (३० रा.रामदासनगर, जॉकीनगर) असे या महिलेचे नाव आहे. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच पती विनय शिंदे यांनी त्यांना तत्काळ नजीकच्या खासगी हॉस्पिटल येथे दाखल केले. मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. अधिक तपास हवालदार लोहकरे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


होर्डिंग लावाल तर पद गमवाल!

$
0
0

शिवसेनेचा पक्षनेत्यांना आदेश

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहराच्या विद्रुपीकरणात भर घालणाऱ्या होर्डिंग्जबाबत उच्च न्यायालयाने राजकीय पक्षांना नोटीस काढल्यानंतर राजकीय पक्ष भानावर आले आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करण्यासाठी शिवसेना सर्वप्रथम पुढे सरसावली असून, सार्वजनिक ठिकाणी पूर्वपरवानगीशिवाय होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स आणि फ्लेक्स लावू नये, असे जाहीर आवाहन शिवसेनेने आपल्या नेते-कार्यकर्त्यांना केले आहे. तसेच परवानगीशिवाय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे फोटो कोणत्याही होर्डिंग्ज, बॅनर्सवर लावू नये असे ‌आवाहन केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर निलंबन किंवा सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई करण्याचा इशारा पक्षाने दिला आहे.

शहरांमध्ये संबहधित स्थानिक स्वराज्य संस्थांची मदत न घेताच मोठ्या प्रमाणावर राजकीय पक्षांकडून तसेच त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून अनधिकृतपणे होर्डिंग, बॅनर्स, पोस्टर्स, डिजिटल फ्लेक्स, कमानी उभारून विद्रुपीकरण केले जाते. संबंधित यंत्रणांनी निश्चित केलेल्या ठिकाणांऐवजी जागा मिळेल तिथे असे फलक उभारले जातात. यंत्रणाकडूनही अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांविरोधात किरकोळ कारवाई केली जाते. त्यामुळे उच्च न्यायालयाने अशा विद्रुपीकरणाची सुमोटो तक्रार दाखल करून घेत, राज्य सरकार तसेच राजकीय पक्षांना नोटीस बजावली. तसेच पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विद्रुपीकरणासाठी अटकाव करण्याबाबत काय उपाययोजना केल्या याबाबतचे स्पष्टीकरण मागवले होते. त्यानुसार शिवसेनेने पुढाकार घेत आपल्या पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना अनधिकृत होर्डिंग्ज न लावण्याचे आवाहन केले आहे. याबाबत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कायद्याचे पालन करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सक्षम प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय कुठेही अनधिकृत होर्डिंग्ज लावू नये असे निर्देश दिले आहेत. तसेच सक्षम प्राधिकरणाने दिलेल्या परवानगीचा उल्लेख होर्डिंग्जवर करण्यात यावा तसेच अनधिकृतपणे लावलेले होर्डिंग्जसाठी संबंधित यंत्रणेला सहकार्य करण्याचे आवाहन सेनेचे सचिव आणि खासदार अनिल देसाई यांच्याकडून करण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे अनधिकृत होर्डिंग्ज लावल्याचे आढळल्यास पदाधिकाऱ्यांवर मोठी आफत ओढावणार आहे. शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना या आवाहनाला कसा प्रतिसाद देतात याकडे आता लक्ष लागून आहे.

... तर सदस्यत्व रद्द

पक्षाच्या आवाहनाचे पालन न करणाऱ्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. सक्षम प्राधिकरणाची परवानगी न घेताच होर्डिंग, बॅनर्स, फ्लेक्स लावल्याचे आढळल्यास तो उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा भंग केल्याचा ठपका संबंधित पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर ठेवला जाईल. या प्रकरणी संबंधित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर निलंबनाची किंवा सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई पक्षाकडून केली जाईल, अशा थेट इशाराच देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशकात रंगली मनोमिलनाची मिसळ

$
0
0

मिसळ पार्टीतून उमेदवार, पदाधिकाऱ्यांनी झटकली मनातील किल्मीष

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांवर केलेल्या आरोपांमुळे निर्माण झालेली कटुता आणि दुरावा कमी करण्याचा प्रयत्न सर्वपक्षीय उमेदवारांसह पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या पुढाकाराने आयोजित सर्वपक्षीय मिसळ पार्टीत एकमेकांविरोधात लढलेले उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांनी एकाच पंक्तीत बसून नाशिकच्या तर्रीदार मिसळवर ताव मारत आपल्या मनातील किल्मीष झटकून टाकली. आता नाशिकचा खासदार कोणीही होवो, नाशिकच्या विकासासाठी सर्वांनी मतभेद, मनभेद विसरून एकत्र यायचे, नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी एकदिलाने काम करायचे, असा निर्धार यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केला गेला.

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दोन महिन्यांपासून सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्याच पक्षाचा खासदार व्हावा यासाठी झपाटल्यागत निवडणूक प्रचाराला लागले होते. नाशिकमध्ये झालेल्या बड्या नेत्यांच्या जाहीर सभांमुळे निवडणूक ज्वर अधिकच चढला. थेट आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. काही प्रमाणात झाल्याने राजकीय वातावरण गढूळ बनले. सोशल मीडियावर उमेदवारांचे समर्थक एकमेकांवर तुटून पडत होते. मतदान पार पडल्यानंतर हा सगळा आरोप-प्रत्यारोपांचा धुराळा बसला असला तरी नेते आणि कार्यकर्त्यांची मने मात्र कलुषितच होती. अशा धगधगत्या राजकीय वातावरणात रंजन ठाकरे यांनी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय मिसळपार्टीने उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मनातील एकमेकांविरोधातील मतभेद दूर करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.

नाशिकमधील एका खासगी हॉटेलमध्ये झालेल्या मिसळ पार्टीला राष्ट्रवादीचे समीर भुजबळ, अपक्ष उमेदवार अॅड. माणिकराव कोकाटे यांच्यासह आमदार सीमा हिरे, शिवसेनेच्या वतीने विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, नगरसेवक गुरुमित बग्गा, शिवाजी गांगुर्डे, नंदू बनकर, सुरेश वैश्य, निवृत्ती अरिंगळे, नाना महाले, 'रिपाइं'चे प्रकाश लोंढे, शेफाली भुजबळ यांच्यासह विविध दैनिकांचे संपादक, ज्येष्ठ पत्रकारांनीही हजेरी लावली.

राजकीय गुपितेही उघड

समीर भुजबळ यांनी अॅड. कोकाटे यांच्याशी खुल्यादिलाने हस्तांदोलन करत आस्थेने चौकशी केली. अपक्ष असूनही आपला 'ट्रॅक्टर' कसा धावला, सिन्नरकरांनी ही निवडणूक कशी अस्मितेची केली अन् नाशिकमध्ये स्थानिक सिन्नरकरांचा कसा प्रतिसाद लाभला, हे कोकाटे यांनी सांगितले. तर भुजबळ यांनीही राष्ट्रवादीच्या घड्याळाच्या प्रचाराचे काटे शहरासह ग्रामीण भागातही कसे वेगाने फिरले, याबाबत सांगितले. बोरस्ते आणि सीमा हिरे यांनी पक्षाच्या प्रचाराची रणनीती विषद केली. यावेळी आपापल्या प्रचाराची गुपितही उमेदवारांनी उघड केली आणि विविध किस्स्यांमधून उडालेल्या हास्यकल्लोळात विरोधाची धारही बोथट होत गेली. मिसळ पार्टीच्या निमित्ताने एकत्र आलेल्या उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांमध्ये निवडणूक प्रचारातील कटुता दूर झाल्याचे चित्र दिसले.

महापालिका निवडणुकीतही आयोजन

निवडणुकांमध्ये नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांविरोधात तयार झालेली कटूता दूर करण्यासाठी मिसळ पार्टीचे आयोजन करण्याची मुहर्तमेढ ही महापालिका निवडणुकांवेळेस रोवली गेली होती. महापालिकेत आरोप-प्रत्यारोपांचे राळ उठल्यानंतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मनोमिलन करण्यासाठी ठाकरे यांनी यापूर्वीही मिसळ पार्टीचे आयोजन केले होते. त्यानंतर गुरुवारी दुसऱ्यांदा असे आयोजन करण्यात आले. यापुढील सर्व निवडणुकांमध्ये अशा मिसळ पार्ट्या करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.

निवडणुकांमध्ये सर्वजण आपापल्या राजकीय पक्षांच्या विचारधारेनुसार काम करतात. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपही होतात. मात्र, आता निवडणुका संपल्याने एकमेकांविरोधातील कटुता दूर करून सर्वांनी एकत्र येत शहराच्या विकासासाठी काम करायला हवे.

- समीर भुजबळ, राष्ट्रवादीचे उमेदवार

निवडणुकांच्या माध्यमातून राजकीय विचारांची लढाई लढली जाते. आता निवडणुका संपल्या असून कार्यकर्त्यांनीही नेत्यांप्रमाणे कटुता विसरून एकत्र यायला हवे. त्यासाठी मिसळ पार्टी चांगला संदेश देणारी ठरेल. आता विकासाचे राजकारण व्हावे.

- ॲड. माणिकराव कोकाटे, अपक्ष उमेदवार

नाशिकची मिसळ जशी सर्वदूर प्रसिद्ध आहे. तसाच नाशिकच्या संस्कृतीचाही नावलौकिक आहे. निवडणुका संपल्या की विकासासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, हाच संदेश या मिसळपार्टीतून महाराष्ट्रभर जाणार आहे. एकोप्याचे वातावरण निर्माण होण्यासाठी हा उपक्रम स्तुत्य आहे.

- अजय बोरस्ते, शिवसेना नेते

निवडणुकीनंतर विकास आणि प्रगतीचे राजकारण झाले पाहिजे. नेते, कार्यकर्त्यांमधील कटुताही दूर झाली पाहिजे. याच उद्देशाने या मिसळ पार्टीचे आयोजन केले. या निमित्ताने नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे पुन्हा मनोमिलन होणार आहे.

- रंजन ठाकरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉस्पिटलमध्ये तोडफोड टोकळ्याविरुद्ध गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अपघातात जखमी रुग्णाला दाखल करून घेण्यासाठी 'आयसीयू'त जागा नसल्याचे कारण सांगितल्याने रुग्णाच्या नातेवाईक व मित्रांनी सह्याद्री हॉस्पिटलच्या स्टाफला मारहाण करीत तोडफोड केली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना मंगळवारी (दि. ३०) रात्री घडली. या घटनेचा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) नाशिक शाखेने निषेध नोंदवला असून, संशयितावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या प्रकाराबाबत माहिती देताना आयएमए नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत देवरे आणि सह्याद्री हॉस्पिटलचे सेंट्रल हेड संजय चावला यांनी सांगितले, की रस्ते अपघातात मंगळवारी (दि. ३०) विशाल चौघुले हा तरुण जखमी झाला. त्यास त्याच्या नातेवाइकांसह मित्रांनी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले. तिथे प्रथमोपचार झाल्यानंतर १५ ते २० जण नातेवाईक व मित्रांनी त्यास सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेतला. मात्र, याची कोणतीही माहिती हॉस्पिटल प्रशासनाला देण्यात आली नाही. अॅब्युलन्स थेट हॉस्पिटलमध्ये आली. अपघात कक्षात विशालला डॉक्टरांनी तपासले. मात्र, त्याला अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करण्याची गरज डॉक्टरांनी व्यक्त केली. हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात सध्या बेड शिल्लक नसून, विशालला तातडीने दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेण्याबाबत डॉक्टरांनी सांगितले. मात्र, नातेवाईक विशेषत: मित्रांनी विशालला येथेच दाखल करण्याची मागणी केली. उपस्थित डॉक्टरांनी हतबलता दर्शवली. त्यानंतर १५ ते २० जणांच्या टोळक्याने डॉ. ज्ञानेश्वर रकिबे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की व मारहाण करीत हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली.

घटनेची माहिती मिळताच मुंबई नाका ठाण्याचे पोलिस हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. त्यांनी नातेवाइकांशी मध्यस्थी करीत विशालला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेमुळे हॉस्पिटल्सवर व डॉक्टरांवर हल्ला होण्याची प्रवृत्ती वाढू शकते, अशी भीती डॉ. देवरे यांनी व्यक्त केली. संशयितांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी पोलिस आयुक्तांना निवेदन सादर केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या घटनेचे सर्व व्हिडीओ फुटेज पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. त्याआधारे पोलिस तपास करीत असल्याचे संजय चावला यांनी स्पष्ट केले.

मारहाणीत कर्मचारी जखमी

संशयितांच्या मारहाणीत हॉस्पिटलचा कर्मचारी हर्षल भदाणे जखमी झाला असून, त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. या प्रकरणी डॉ. रकिबे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार १५ ते २० संशयितांवर मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा पुढील तपास पीएसआय महेश वराळ करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिन्यातून एकदाच पाणी

$
0
0

संदीप देशपांडे, मनमाड निवडणूक असो, सण-उत्सव असो पाणीटंचाई मनमाडकरांची पाठ सोडायला काही तयार नाही. तापमानाने चाळीशी गाठलेली आहे. त्यातच मनमाडकरांना थेंब थेंब पाण्यासाठी तरसावे लागत आहे. सध्या मनमाड शहरात वीस ते एकवीस दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे आज आलेले तीन-तीन आठवडे साठवायचे कसे? पुरवायचे कसे? असा पेच महिला वर्गापुढे आहे. दरम्यान आहे ते पाणी काटकसरीने वापरण्यासाठी व पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी मनमाड नगरपरिषदेने मेन लाईनवरील अनेक बेकायदा कनेक्शन तोडून कारवाईचा बडगा उगारल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. मनमाड शहरात पाण्याच्या टाकीवर देखील दिवसभर नागरिकांना पाणी भरण्यासाठी असलेली सोयदेखील आता बंद कण्यात आली आहे. पालिका प्रशासनाने त्यासाठी विशिष्ट वेळ ठरवून दिली आहे. एकूणच महिन्यातून एकच दिवस पाणी येत असल्याने मनमाडकरांची पाण्यासाठी धावाधाव सुरू असून, पाहुणे आल्यास विकतचे पाणी घेण्याकडे नागरिकांचा कल आहे. त्यामुळे पाणीटंचाईत होरपळण्यापेक्षा मनमाडमध्ये न गेलेलेच बरे, असे सांगून पाहुणे मंडळी दुरुनच मनमाडकरांना हात जोडत आहेत. अनेक सरकार आले आणि गेले मात्र मनमाड शहरात पाणी प्रश्न जैसे थे आहे. लोकसभा निवडणुकीत देखील मनमाड, नांदगावचा पाणी प्रश्न प्रचार सभांमध्ये कळीचा मुद्दा होता. सध्या पालखेडमधून मिळालेल्या आवर्तनावर शहराला २० ते २१ दिवसाआड म्हणजे महिन्यातून एकदा पाणीपुरवठा होत आहे. हे पाणी साठवून कसे ठेवायचे? जास्त दिवस कसे पुरवायचे? याची चिंता महिलांना लागली आहे. पावसाकडे लागले डोळे मनमाडसाठी पालखेड धरणातून मिळणाऱ्या आवर्तनाशिवाय दुसरा पर्याय नाही. आवर्तनाचे पाणी पुढल्या आवर्तनापर्यंत म्हणजे महिना ते दीड महिना टिकवून ठेवणे पालिका प्रशासनाला क्रमप्राप्त असल्याने व पुढचे आवर्तन कधी? हे आज स्पष्ट नसल्याने पालिकेला देखील वीस दिवसाआड पाणी देण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आता पाऊस लवकर व भरपूर पडावा हीच अपेक्षा असणार आहे. महिन्यातून एकदा पाणी आल्यानंतर पाणी साठवण्यासाठी एक हजार लिटरच्या टाक्यांसह अगदी छोटे छोटे पातेलेपर्यंत सारी भांडे भरून ठेवले जातात. त्याचबरोबर हे पाणी तीन आठवडे टिकावे यासाठी पाण्यावर फवारण्यासाठीची औषधे वापरली जातात. महिन्यातून एकदा का असेना नळांना दूषित पाणी येऊ नये यासाठी पालिका प्रशासन फिल्टर हाऊसच्या माध्यमातून प्रयत्न करीत असते. वेगवेगळे फंडे पाणीटंचाई पाचवीलाच पुजलेली असल्यामुळे मनमाडकरांनी पाणी वाचविण्याचे अनेक फंडे विकसीत केले आहेत. रात्री उशिरा पाणी आले की शहरातील रेल्वे लगतच्या आनंदवाडी भागात झोपलेल्या छोट्या मुलांना झोपेतून उठवून त्यांना आंघोळ घालून पुन्हा झोपवले जाते, असाही प्रयोग काही घरात पहायला मिळतो. तर काही ठिकाणी बाजेवर आंघोळ प्रयोग रंगतो. बाजेच्या खाली भांडे ठेऊन पडणारे पाणी साठवायचे व त्याचा पुनर्वापर करायचा असाही फंडा नागरिक करताना दिसतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुणी हिरमुसले; कुणी आनंदाने उजळले

$
0
0

फोटो - पंकज चांडोले

कुणी हिरमुसले; कुणी आनंदले

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुतूहल, उत्सुकता, भीती, चिंता अशा संमिश्र भावनांच्या वातावरणात विद्यार्थ्यांनी २०१८-१९ या शैक्षणिक वर्षाचा निकाल स्वीकारला. कुणाला मनाप्रमाणे श्रेणी मिळाली तर कुणाला अपेक्षेपेक्षा कमी. त्यामुळे काही विद्यार्थ्यांचे चेहरे हिरमुसलेले तर काहींचे चेहरे आनंदाने उजळले होते. १ मे रोजी शाळांमध्ये निकाल वाटप करण्यात आल्यानंतर असे चित्र शाळाशाळांमध्ये दिसून आले.

वार्षिक परीक्षेचा निकाल १ मे रोजी जाहीर होत असल्याने पालक, विद्यार्थी, शिक्षक सर्वांसाठीच हा दिवस महत्त्वाचा असतो. त्यामुळे सकाळी ८ वाजेपासून शाळांचे परिसर गजबजू लागले होते. २० एप्रिलपासून सर्वच शाळांना सुट्ट्या लागल्याने गेले काही दिवस शाळा पूर्णत: बंद होत्या. त्यामुळे शांत असलेल्या शाळा निकालामुळे पुन्हा गजबजल्या. महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम संपल्यानंतर सर्व विद्यार्थी आपापल्या वर्गात गेले. एक एका विद्यार्थ्याचे नाव, हजेरी क्रमांकानुसार निकालाचे वाटप करण्यात आले. संपूर्ण वर्षभर आपण केलेल्या अभ्यासाचे फलित आपल्यासह, पालकांसमोर येणार असल्याने काही विद्यार्थी चिंतेत होते. ज्यांच्या मनाप्रमाणे निकाल लागले, त्यांची कळी मात्र यावेळी चांगलीच खुलली होती. काही विद्यार्थी गावी गेलेले असल्याने त्यांच्या पालकांनी त्यांचे निकाल स्वीकारले. वर्गात सर्वाधिक चांगले गुण, श्रेणी मिळालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी शाबासकीची थाप दिली. एकमेकांचे अभिनंदन करत, पेढे वाटून निकालाचा आनंद विद्यार्थ्यांनी लुटला. निकाल लागल्याने शाळा सुरू होईपर्यंत विद्यार्थ्यांना चिंतामुक्त होत उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद उपभोगता येणार आहे.

- -

यंदा शाळा १७ जूनपासून

दरवर्षी शाळा १५ जूनला सुरू होतात. यंदा मात्र, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडून जाहिर करण्यात आलेल्या २०१९-२० या शैक्षणिक वर्षाच्या वेळापत्रकानुसार यावर्षी शाळा १७ जूनपासून सुरू होणार आहेत. या बदलाबरोबरच, शाळांना असलेल्या उन्हाळा व दिवाळीच्या सुट्ट्या कमी करुन त्या नाताळ किंवा गणेशोत्सव या सणांना शिक्षणाधिकाऱ्यांच्या परवानगीनुसार घेता येणार आहेत.

- -

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'जलयुक्त'साठी श्रमदान करणाऱ्यांवर आदिवासींचा हल्ला

$
0
0

चांदवड, नाशिक

चांदवड तालुक्यातील मतेवाडी येथील वन विभागाच्या हद्दीत पाणी फाउंडेशनच्या 'वॉटर कप' स्पर्धेतंर्गत 'जलयुक्त'चे कामकाज सुरू असताना स्थानिक आदिवासी नागरिकांनी दगडफेक केली. या दगडफेकीत श्रमदानासाठी आलेले नागरीक जखमी झाले आहेत.

वन विभागाच्या हद्दीत ही जमीन येते. ही वनजमीन आदिवासी कसत असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, या जमिनीवर आदिवासींनी अतिक्रमण केले असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. आज मतेवाडीत वॉटर कप स्पर्धेतंर्गत जलयुक्तसाठी श्रमदान करण्यात येणार होते. श्रमदानासाठी नागरिक साधनसामु्ग्रीसह पोहचले होते. मात्र, अचानक झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ उडाला. या हल्ल्यामुळे भयभीत झालेल्या नागरिक इतरत्र धावू लागले. या हल्ल्यात सहा जण जखमी झाले आहेत. जखमींवर चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जमावाने सहा मोटरसायकल जाळले असल्याचे वृत्त आहे.

या घटनेची माहिती मिळताच चांदवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील, वडनेरभैरवचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे व पोलीस कर्मचारी, दंगल नियंत्रक पथकाने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. घटनास्थळी मनमाडच्या सहाय्यक पोलीस अधीक्षकदेखील दाखल झाल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात सध्या तणावाचे वातावरण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जवान चंदू चव्हाणवर गुन्हा

$
0
0

धुळे :

सोशल मीडिया फेसबुकच्या माध्यमातून धुळे मतदारसंघातील युतीचे उमेदवार डॉ सुभाष भामरे यांना मतदान करण्याचे आवाहन करणाऱ्या भारतीय जवान चंदू चव्हाण यांच्याविरोधात उमेदवार अनिल गोटे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यावरून धुळे तालुका पोलिस ठाण्यात रविवारी(दि.२८) दुपारी आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला.भरारी पथकाचे साहाय्याक अभियंता अभिनव सुधीर पवार यांनी ही फिर्याद दाखल केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अस्सल पाच: आस्वाद खाऊगल्लीचा

$
0
0

प्रशांत देसले, नाशिक

Prashant.desale@timesgroup.com

धार्मिक आणि पर्यटनस्थळ अशी ओळख असलेल्या नाशिक शहरात खवय्यांसाठी इतके चविष्ट आणि नवनवीन पदार्थ आहेत की, येथे येणारा प्रत्येक व्यक्ती त्यांची चव चाखण्यासाठी आतूर असतो. शहरातील काही भाग, याशिवाय नवनवीन गल्लीबोळ तर अशा अनेक पदार्थांसाठी प्रसिद्ध आहेत. एकाच ठिकाणी भेळ, पाणीपुरी, मोमोज, पावभाजी, पराठा, सॅण्डविच, गरमागरम मसाला दूध असे अनेक पदार्थ मिळत असतील तर कोणताही खवय्या ताव मारल्याशिवाय राहणार नाही. कॉलेजरोडवरील किलबिल शाळेसमोरील गल्लीत वर्षभरापासून दररोज सायंकाळी चमचमीत पदार्थांचा घमघमाट सुटलेला असतो. चला तर मग जरा या खाऊगल्लीचा आस्वाद घेऊ.…

'रघुवीर'चा गरमागरम पराठा

पराठा हा असा पदार्थ आहे जो सकाळ, दुपार, सायंकाळ केव्हाही ताटात वाढून आला तर तुम्ही नकार देऊच शकत नाही. किलबिल शाळेसमोरच्या खाऊगल्लीत 'रघुवीर पराठा' स्टॉल आहे. बाळू आणि मनोहर चित्तेंचा हा स्टॉल म्हणजे येथे येणाऱ्या खवय्यांसाठी सगळ्यात आवडता स्पॉट. गरमागरम पराठे खाण्यासाठी येथे अक्षरश: नंबर लागलेले असतात. मेथी, पालक, आलू, पनीर असे विविध पराठे येथे मिळतात. प्रत्येक पराठ्यासोबत दही आणि ठेचा मिळत असल्यामुळे खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटते. सध्या शाळांना सुट्या लागलेल्या असल्यामुळे लहान मुले चटपटीत खाण्याचा हट्ट करतात. अशा चिमुकल्या खवय्यांसाठी 'रघुवीर पराठा'वर डोरेमॉन पराठा, डोरेमॉन आलू पराठा, डोरेमॉन पनीर पराठा असे चविष्ट पराठे मिळतात. या पराठ्यांमध्ये मसाला कमी आणि चव अगदीच चटपटीत असल्यामुळे लहान मुले आवडीने खातात. सगळ्या प्रकारचे पराठे ग्राहकांच्या अगदी समोर शिजविले जात असल्यामुळे तव्यावरचा पराठा कधी आपल्या प्लेटमध्ये मिळेल आणि कधी त्यावर ताव मारू असं प्रत्येकाला वाटत असते.

'जॉस्वॉ'चे इटालियन सॅण्डविच

आजकाल नाशिकमध्येही इटालियन, मॅक्सिकन पदार्थ सर्रासपणे मिळतात. खवय्येदेखील मिसळपाव आणि वडापावची रुळलेली वाट सोडून आता अशा परदेशी पदार्थांकडे वळताहेत. त्यामुळे चोखंदळ खवय्यांसाठी या खाऊगल्लीत 'जॉस्वॉज स्ट्रीट कॅफे' म्हणजे योग्य ठिकाण. जॉस्वॉ श्रीवास्तव हा तरुण विविध प्रकारचे शॉरमा, सॅण्डविच आणि रॅप्स इतके चविष्ट तयार करतो की खवय्ये आपसूकच म्हणतात, 'आम्ही अगदी योग्य ठिकाणी आलो.' जॉस्वॉ कॅफेत सॅण्डविच तर खूपच अप्रतिम मिळतात. त्यात इटालियन, मेक्सिकन आणि बार्बेक्यू असे चविष्ट प्रकार 'जॉस्वॉ' स्ट्रीट कॅफेत मिळतात. हल्ली तरुणांना आवडणारा प्रकार म्हणजे रॅप्स. रॅप्स आवडणारे खवय्ये जॉस्वा श्रीवास्तव यांच्या या चविष्ट कॅफेसमोर गर्दी करतात. येथे मिळणाऱ्या रॅप्समध्ये 'अल्टिमेट व्हेजी' तर अप्रतिम आहे. तसेच काही तरुणांना 'चिपोटले सॅण्डविच' तर खूपच आवडते. शॉरमा आवडणाऱ्या खवय्यांना येथे इतके विविध प्रकारची चव चाखायला मिळतात, की त्यांची छोटेखानी पार्टीच या किलबिल शाळेसमोरच्या गल्लीत रंगते. रात्री दहापर्यंत हा स्ट्रीट कॅफे सुरू असल्यामुळे तरुणाई हास्यविनोद करीत येथे पदार्थांवर ताव मारतात.

स्ट्रीट साईड रोल्सची भुर्जी

इटालियन फूड, महाराष्ट्रीयन पराठ्यांसोबत या खाऊगल्लीत चटकदार अंडा भुर्जीदेखील तितकीच चवदार मिळते. 'स्ट्रीट साईड रोल्स अॅण्ड अंडा भुर्जी सेंटरवर कच्ची पक्की अंडा भुर्जी, अंडा रोल्स, अंडा पनीर रोल, बॉईल भुर्जी अशा विविध प्रकारच्या डीश मिळतात. रत्नाबाई गांगुर्डे आणि अक्षय, अभिषेक, शिवम ही त्यांची तीन मुले हे अंडाभुर्जी सेंटर चालवतात. येथे डबल अंडा पनीर रोल, बटर भुर्जी, चीज रोल, कच्ची-पक्की भुर्जी खूपच चविष्ट मिळते. गरमागरम पावसोबत अंडा भुर्जी खाण्याची मजा तेही कॉलेज रोडच्या वातावरणात मग तर कोणताही खवय्या सहज होकार देतो. तरुण मुलांसाठी तर स्ट्रीट साईड रोल्सवरील अंडा रोल म्हणजे बेस्ट ऑप्शन. काही काही खवय्ये तर स्वत:ही खातात आणि निघताना पार्सलही नेतात. निरनिराळ्या पदार्थांच्या गराड्यात गांगुर्डेंचा हा अंडा भुर्जीचा गाडा चांगलीच गर्दी खेचत असतो.

'आरसी' चॅटची मसाला पाणीपुरी

अंडा भुर्जी, पनीर रोल, इटालियन रॅप्स आणि शॉरमा अशा विविध पदार्थांसह या खाऊगल्लीत पाणीपुरीचा आस्वाद नाही मिळाला तरच नवल. पाणीपुरी, ओली भेळ, दहीपुरी, शेवपुरी, रगडापुरी, दाबेली असे अनेक प्रकार आरसी चाट कॉर्नरवर मिळतात. वैभव कदम या तरुणाचा हा गाडा आहे. याच्याकडील पाणीपुरीचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या पाणीपुरीसोबत मिळणारे पाणी हे अकरा प्रकारच्या मसाल्यांपासून तयार केलेले असते. वैभवची आई सरला कदम पाणीपुरीसाठी लागणारे सगळे साहित्य तयार करतात. त्यामुळे या पाणीपुरीसह इतर पदार्थांना घरचा स्वाद असतो. 'आरसी'वरील रगडापुरीही खवय्यांना खूप आवडते. या गाड्यावरील रगडा पॅटिसचे खास वैशिष्ट्ये म्हणजे येथे कोळशाच्या भट्टीवरील रगडा मिळतो. निखाऱ्यांवरील रगडा तरुणांसाठी आकर्षणाचा मुद्दा बनला आहे. याशिवाय येथे दाबेली खाण्यासाठीही तरुण-तरुणी गर्दी करतात.

'विशाल'चे चवदार मोमोज

किलबिल शाळेसमोरच्या खाऊगल्लीत विशाल मोमोज सेंटर म्हणजे सगळ्यात वेगळा गाडा. येथे मोमोज मिळत असल्यामुळे काही खास खवय्ये आपसूक थांबतात. निखाऱ्यांच्या भट्टीवर भाजलेले पनीर मोमोज म्हणजे अफलातून डीश. यासोबतच चीज पनीर फ्राइड, चीज तंदूरी, व्हेज फ्राइड, व्हेज तंदूरी असे मोमोज मिळतात. भजेंच्या आकाराचे हे मोमोज निखाऱ्यांवर भाजलेले असल्यामुळे खाताना खरपूस लागतात. त्यात काही नॉनव्हेज मोमोजही असतात. मोमोजसोबत चटणी आणि टोमॅटोचा सॉस मिळतो. त्यामुळे खवय्यांची खासकरून तरुणांची येथे मोमोज खाण्यासाठी गर्दी होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध गर्भपात करणारी टोळी पुन्हा सक्रिय?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव तालुक्यातील कौळाणे येथील अवैध गर्भपाताचे प्रकरण ताजे असतानाच गुरुवारी रात्री पुन्हा शहरातील मोसम नदीपात्रात पाच ते साडेपाच महिन्यांचे स्त्री अर्भक मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे शहरात अजूनही अवैध गर्भपात थांबलेले नसल्याचेच यातून स्पष्ट होत असून, अवैध गर्भपात करणारी टोळी पुन्हा सक्रिय झाल्याची चर्चा आहे. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.

रामसेतूनजीक नवीन सावित्रीबाई फुले पादचारी पुलाजवळ मोसम नदीपात्रात एक अर्भक पडलेले असल्याची माहिती छावणी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण वाडिले यांना फोनवरून गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास मिळाली. माहिती मिळताच वाडिले यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. नदीपात्रात लाल कपड्यात गुंडाळून ठेवलेले ते अर्भक पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने बाहेर काढले. सामान्य रुग्णालयात अर्भक आणले असता, ते मृत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात नरेंद्र भिकन खैरनार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात महिलेविरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. हा अवैध गर्भपात व स्त्रीभ्रूण हत्येचा प्रकार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. जनमानसात बदनामी होऊ नये या उद्देशाने हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. कौळाणे येथील गर्भपात प्रकरणानंतर हा प्रकार उघडकीस आल्याने पोलिस, तसेच आरोग्य यंत्रणेपुढे या प्रकरणाची पाळेमुळे शोधण्याचे आव्हान आहे. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक झालेली नाही.

आरोग्य यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात?

कौळाणे येथे जानेवारी २०१९ मध्ये अवैध गर्भपाताचे मोठे रॅकेट उघडकीस आले होते. या प्रकरणी चौकशीदरम्यान आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार व हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला होता. आता पुन्हा एकदा शहरातील भरवस्तीत एक स्त्री अर्भक नदीपात्रात फेकून दिल्याचा प्रकार समोर आल्याने आरोग्य यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. शहरात अवैध गर्भपाताचे प्रकार सर्रास होत असताना आरोग्य यंत्रणा काय करते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अवैध गर्भपात केंद्र?

गेल्या काही वर्षांत सातत्याने मालेगावातील अवैध गर्भपाताचे प्रकरण चर्चेत राहिले आहे. याआधीही डॉ. देवरे बंधूंना या प्रकरणी शिक्षा झाली होती. कौळाणे येथील गर्भपात केंद्र जानेवारीत उघड झाले होते. मात्र त्यानंतरही वारंवार अशा घटना समोर येत असल्याने मालेगाव अवैध गर्भपाताचे केंद्र म्हणून पुढे येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रचार फिका तरी वाढला मतटक्का

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ग्रामीण भागाचा मोठ्या प्रमाणावर समावेश असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदार संघात प्रचार फिका असतानाही गेल्या वेळेपेक्षा मतदानात २.१२ टक्के वाढ झाली आहे. मोजक्या सभा सोडल्या तर अनेक ठिकाणी प्रचारात फारशी रंगत न आल्याने मतदान कमी होणार, असे मानले जात होते. पण, प्रत्यक्षात मतदारांनी कोणतीही लाट नसताना मतदानात सहभाग नोंदवल्याने त्याचा कोणाला फायदा होतो व कोणाला फटका बसतो हे निकालानंतर समोर येणार आहे.

भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे धनराज महाले व माकपचे उमेदवार जे. पी. गावित यांच्यात तिरंगी लढत असली तरी शेवटच्या टप्प्यात ही निवडणूक डॉ. पवार आणि महाले यांच्यातच झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे गावितांचा कोणाला फटका बसतो यावरही बरंच काही अवलंबून असणार आहे. या मतदार संघात २०१४ च्या निवडणुकीत ६३.५२ टक्के मतदान झाले होते. पण, यंदा ही टक्केवारी ६५.६४ टक्के झाली. विधानसभानिहाय मतदारसंघात येवला व निफाड या दोन्ही ठिकाणी आकडेवारी कमी झाली आहे. नांदगाव, कळवण, चांदवड, दिंडोरी येथे वाढ झाली आहे. त्यामुळे ही वाढ व घटही चकवा देणारी ठरणार आहे.

दिंडोरी लोकसभा मतदार संघांतर्गत येणाऱ्या येवला व निफाड या दोन्ही विधानसभा मतदार संघांत मतदान कमी झाले. यात येवल्यात राष्ट्रवादी तर निफाड येथे शिवसेनेचे आमदार आहेत. कळवण विधानसभा मतदार संघात भाजप व माकप या दोन्ही पक्षांचे स्थानिक उमेदवार असताना येथील टक्केवारी अवघी ०.१७ ने वाढली आहे. दिंडोरीत राष्ट्रवादीचा उमेदवार स्थानिक असल्याने येथीत मतदानात ४.७२ टक्के वाढ झाली असून, त्याचा फायदा महाले यांना होण्याची शक्यता आहे. नांदगाव येथे ४.३४ टक्के, चांदवड येथे २.७० टक्के वाढ झाली असली तरी ही वाढ कोणाच्या पारड्यात जाते हे महत्त्वाचे ठरणार आहे.

मतदारही वाढले

विशेष म्हणजे गेल्या वेळी ९ लाख ६९ हजार ६६७ मतदारांनी हक्क बजावला होता; यावेळी हा आकडा ११ लाख ३४ हजार ७१९ पर्यंत गेला आहे. त्यामुळे १ लाख ६५ हजार ५२ मतदारांची यात वाढ झाली आहे. एकूण १७ लाख २८ हजार ६५१ मतदान होते. त्यापैकी ५ लाख ९३ हजार ९३२ मतदारांनी मतदान केले नाही. गेल्या वेळेस विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रात नांदगावमध्ये ५३.१५ टक्के मतदान झाले होते. यावेळेस ते ५७.४९ झाले. कळवणमध्ये ७२.३६ मतदान झाले होते, यावेळी ७२.५३ टक्के झाले. चांदवडमध्ये ६२.३७ मतदान झाले होते, यावेळी तेथे ६५.०७ टक्के इतके मतदान झाले. येवला येथे ६१.२३ टक्के मतदान झाले. यावेळेस हेच मतदान ६१.१५ टक्के झाले. निफाडमध्ये गेल्या वेळी ६३.४९ टक्के मतदान झाले होते. यावेळी हेच मतदान ६३.३१ टक्के झाले. दिंडोरीत गेल्या वेळी ७०.३३ टक्के मतदान झाले होते, यावेळी ते ७५.०५ टक्के झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळेला दिला ५१ हजारांचा निधी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड येथील वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील मुख्याध्यापिका अलका जाधव यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात झाला. न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष प्रल्हाद पाटील कराड, सचिव रतन वडघुले, संस्थापक विश्वस्त वि. दा. व्यवहारे, मधुकर राऊत, प्राचार्या मालती वाघावकर, उपप्राचार्या रेखा चौधरी, रामदास व्यवहारे आदींच्या उपस्थितीत जाधव यांचा सन्मान करण्यात आला. अलका जाधव यांनी आपल्या तीस वर्षांच्या सेवेत विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, सामाजिक व भावनिक विकासासाठी नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवून शाळेच्या नावलौकिकात भर घातली.

जाधव यांनी सेवापूर्तीनिमित्त ५१ हजार रुपयांचा भरीव निधी देणगी स्वरुपात संस्थेच्या विकासासाठी देत संस्थेप्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली. सेवापूर्ती सोहळ्यासाठी वैनतेय विद्यालय, वैनतेय इंग्लिश मीडियम स्कूल, वैनतेय शिशुविहार विभागाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दापूरला सिलिंडरचा स्फोट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

तालुक्यातील दापूर येथे गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन संपूर्ण घर भस्मसात झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने घरातील व्यक्ती उन्हाळ्यामुळे घराबाहेर झोपलेले असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दापूर येथील तलाठी कार्यालयात कोतवाल म्हणून काम करणारे शरद रामनाथ गोफणे यांचे गावातच रामोशी गल्लीत घर आहे. शरद गोफणे हे पत्नी रंजना व मुलगा अविनाश यांच्यासह घराबाहेर झोपले होते. पहाटे घरातून धूर येऊ लागल्याने त्यांनी जोरात आरडाओरड केला. अचानक स्वयंपाक घरातील सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. सिलिंडरचा स्फोट झाल्याने घराचे पत्रे उडाले. आवाजाने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शेजारीच असलेली कूपनलिका सुरू करुन आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. तोपर्यंत संपूर्ण घर आगीच्या भडक्यात सापडले होते. घरातील रोख ७० हजार रुपये, सोन्या-चांदीचे दागिने, कपाट, सोफासेट, टीव्ही, धान्य व संसारपयोगी वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. गोफणे यांच्या घराजवळच दहा-बारा घरे होती. सुदैवाने कूपनलिकेच्या पाण्याने आग आटोक्यात आल्याने परिसरातील घरांना नुकसान झाले नाही. तलाठी जे. यू. परदेशी यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. गोफणे यांचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images