Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

बोहल्यावर चढण्यापूर्वी ‘त्याने’ संपविले जीवन

$
0
0

म. टा. खास, प्रतिनिधी नाशिक/म. टा. वृत्तसेवा, सातपूर

बोहल्यावर चढण्यापूर्वीच एका उच्च शिक्षित तरुणाने आत्महत्या करून जीवन संपविले. हळदीच्या दिवशीच हा प्रकार समोर आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येते आहे. पंचवटीतील हिरावाडी रोडवर रेशीमबंध कार्यालयामागे राहणाऱ्या तरुणाने गंगापूररोडवरील बळवंतनगर भागात आत्महत्या करीत जीवन संपविले.

निखिल प्रकाश देशमुख (वय ३० रा. हरिकृपा रो-हाऊस, पंचवटी) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. निखिलने गुरुवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास गंगापूररोडवरील बळवंतनगर येथील फ्लॅटमध्ये गळफास घेतला. पहाटेच्या सुमारास निखिलच्या आत्महत्येची घटना उघडकीस आली. हा प्रकार समजताच गंगापूर पोलिसांनी निखिलच्या फ्लॅटकडे धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला. घटनास्थळावर पोलिसांना एक सुसाइड नोट सापडली असून, त्यात स्वत: जीवन संपवित असल्याचा उल्लेख आहे. घटनेचा अधिक तपास हवालदार गोपाळ पाटील करीत आहेत.

आज होणार होता विवाह

निखिलचा आज, शनिवारी (दि.२०) विवाह होता. त्यामुळे देशमुख कुटुंबात शुक्रवारी (दि.१९) हळदी समारंभाची तयारी सुरू होती. निखिलच्या आत्महत्येची बातमी समोर आली अन् आनंदाचा सोहळा दु:खात बुडाला. निखिलच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नसल्याने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. उच्च शिक्षित असलेल्या निखिलने बोहल्यावर चढण्यापूर्वीच आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्हा प्रशासनावर महापालिका मेहरबान

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नगरसेवक आणि नागरिकांच्या किरकोळ मागणीकडे आर्थिक तरतूद नसल्याचे सांगत दुर्लक्ष करणारी महापालिका जिल्हाधिकारी कार्यालयावर मेहरबान झाली आहे. येत्या १ मे रोजीच्या महाराष्ट्र दिनानिमित्त पोलिस परेड ग्राऊंडवर होत असलेल्या शासकीय कार्यक्रमाचा खर्च आता महापालिका उचलणार आहे. महापालिकेने आदर्श आचारसंहिता सुरू असतांना दीड लाख रुपये खर्चासाठी निविदाही काढली आहे. त्यामुळे आतापर्यंत किरकोळ कारणावरून एकमेकांना पाण्यात पाहणारी जिल्हाधिकारी आणि महापालिका यंत्रणेतील दोस्तांना चर्चेत आला आहे. महापालिकेकडून दाखवण्यात आलेली उदारता मात्र चर्चेचा विषय बनला आहे.

नाशिक महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील यंत्रणेसह अधिकाऱ्यांमध्ये वर्चस्ववादातून संघर्ष होत राहिला आहे. महापालिकेने निवडणूक कामासाठी कर्मचारी वर्ग पळवण्यावरून तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा आणि जिल्हाधिकाऱ्यांमध्ये चांगलाच वाद रंगला होता. बी. डी. सानप आणि पी. वेलरासू यांच्यातील वाद टोकाला पोचला होता. आताही निवडणूक कामावरून पालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालय आमने सामने उभे राहिले होते.

निवडणूक कामासाठी कर्मचारी नियुक्तीवरून उद्भवलेला हा वाद ताजा असतानाच महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस परेड ग्राऊंडवर आयोजित केल्या जाणाऱ्या शासकीय सोहळ्याच्या खर्चाची जबाबदारी जिल्हा प्रशासनाऐवजी महापालिकेने स्वत:च्या खांद्यावर उचलल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. महापालिकेच्या अंदाज पत्रकात तरतूद नसतांना, केवळ जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सुचनेनुसार महापालिकेने महाराष्ट्र दिनाच्या शासकीय कार्यक्रमाचा खर्च उचलण्याची तयारी दाखवली आहे. शासकीय कार्यक्रमासाठी मंडप, सोफे, खुर्च्या भाडेतत्वावर घेण्यासाठी महापालिकेने निविदा प्रसिद्ध केली आहेत. आतापर्यंत महापालिकेने कधीही असा प्रकारचा खर्च उचलेला नाही. त्यामुळे हा खर्चही आता वादात सापडण्याची शक्यता आहे.

आचारसंहितेचे उल्लंघन?

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना महापालिकेने ही निविदा कोणाच्या मंजुरीने प्रसिद्ध केली, त्यासाठी आचारसंहिता कक्षाची परवानगी घेतली होती का, असे प्रश्न आता नगरसेवकांकडून उपस्थित केले जात आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्याचे सांगत, महापालिकेने याबाबत हात झटकले आहेत. विशेषत: महापालिकेची जबाबदारी नसलेल्या कामांवर नागरिकांनी दिलेल्या कररूपी निधीतून खर्च कसा केला जाणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांमधील दोस्तांनातून महापालिका हा खर्च करायला तयार झाल्याचीही चर्चा आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेचा ब्लॉक, प्रवाशांना ‘ताप’

$
0
0

इगतपुरीत १९ ते २१ एप्रिलदरम्यान ब्लॉक; प्रवाशांचा संताप

...

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

मध्य रेल्वेने मेगा ब्लॉक घेणे सुरूच ठेवल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. आता १९ ते २१ एप्रिल दरम्यान इगतपुरी रेल्वेस्टेशनमध्ये विशेष ट्रॅफीक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून, काही ठराविक स्थानकांदरम्यानच सोडण्यात येणार आहेत. काही गाड्या नाशिकऐवजी अन्य मार्गांनी धावतील. प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. रेल्वेगाड्या रद्द केल्यामुळे एसटी आणि खासगी वाहनांना गर्दी होण्याची शक्यता आहे.

नाशिक-कल्याण दरम्यान मुंबईच्या धर्तीवर लोकल सुरू करण्यात येणार आहे. या लोकलसाठी प्लॅटफार्मची उंची वाढविण्यात येणार आहे. काही रेल्वेस्थानकांमध्ये हे काम झाले आहे, तर काही ठिकाणी सुरू आहे. तसेच, मध्य रेल्वे मार्गावर तिसरा रेल्वेमार्ग विकसित केला जात आहे. कल्याण ते इगतपुरीपर्यंत हे काम झाले आहे. त्याच्यापुढे काम सुरू आहे. आता इगतपुरी येथे जुना पादचारी पूल तोडून नवा बांधण्यात येणार आहे. त्यासाठी वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याने १९ ते २१ एप्रिल दरम्यान पॉवर ब्लॉक घेतला आहे. त्यामुळे रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

..

असे आहेत बदल

दि. १९ आणि २० एप्रिलला ३.४५ ते ८.४५ दरम्यान धावणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये १९ एप्रिलची भुसावळ-मुंबई फास्ट पॅसेंजर (५११५४) आणि २० एप्रिलची मुंबई-भुसावळ फास्ट पैसेंजर (५११५३) यांचा त्यात समावेश आहे.

...

गाड्यांचे नियंत्रण

दोन दिवस गाड्यांचे नियंत्रण केले जाणार आहे. संबंधित ठिकाणी गाड्या थांबवून नियोजनानुसार त्यांना पुढे मार्गस्थ केले जाईल. दि. २० एप्रिलला सुटणारी ११०६७ एलटीटी-फैजाबाद एक्स्प्रेस आणि २१०६७ एलटीटी-रायबरेली एक्स्प्रेस ही गाडी ७.१४ ते ८.३५ दरम्यान कसारा स्टेशनवरन नियंत्रित (रेग्युलेट) केली जाईल. दि. २० एप्रिलला १२८५९ मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस खर्डी स्टेशनहून ७.५१ ते ८.३० दरम्यान नियंत्रित केली जाईल. २० एप्रिलची १७६१७ मुंबई-हजूर साहेब नांदेड तपोवन एक्स्प्रेस अटगाव स्टेशनहून ७.५८ ते ८.३० दरम्यान नियंत्रित केली जाईल. दि. २० एप्रिलची १५०१७ एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस वाशिंद स्टेशनहून ७.५३ ते ८.४५ दरम्यान नियंत्रित केली जाईल. दि. २० एप्रिलची १५६४५ एलटीटी-गुवाहाटी एक्स्प्रेस आणि १२५३४ मुंबई-लखनऊ पुष्पक एक्स्प्रेस आपल्या निर्धारित वेळापत्रकाच्या ४५ मिनिटे उशिरा इगतपुरी स्टेशनवर पोहोचेल.

...

या गाड्या रद्द

दि. २० आणि २१ एप्रिलदरम्यान ३.४५ पासून ११.१५ पर्यंत ब्लॉक घेतला जाणार असल्याने पुढील एक्स्प्रेस ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. दि. २० एप्रिलला सुटणारी ५११५४ भुसावळ-मुंबई फास्ट पॅसेंजर, २१ एप्रिलची ५११५३ मुंबई-भुसावळ फास्ट पॅसेंजर, १२११७ एलटीटी-मनमाड गोदावरी एक्स्प्रेस, १२११८ मनमाड-एलटीटी गोदावरी एक्स्प्रेस, २२१०२ मनमाड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस, २२१०१ मुंबई-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस, ११०२५ भुसावळ-पुणे एक्स्प्रेस, ११०२६ पुणे-भुसावळ एक्स्प्रेस.

....

मार्गांत बदल

ब्लॉकमुळे खालील रेल्वेगाड्या व्हाया दिवा-वसईरोड-जळगावमार्गे धावतील. दि. २१ एप्रिलची १९२२१२९ एलटीटी-इलाहाबाद तुलसी एक्स्प्रेस आणि १२८५९ मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस.

...

एक्स्प्रेस ट्रेन्सचे नियंत्रण

एक्स्प्रेस गाड्याही संबंधित स्टेशनवर थांबवून पुढील नियोजनानुसार मार्गस्थ होतील. दि. २१ एप्रिलची १५०१७ एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस कसारा स्टेशनहून ८.३४ पासून ११.१० पर्यंत नियंत्रित केली जाईल. याचदिवशी १२३३६ एलटीटी-भागलपूर एक्स्प्रेस खर्डी स्टेशनहून ९.४१ ते से ११.०० दरम्यान नियंत्रित केली जाईल. दि. २१ एप्रिलची १२५३४ मुंबई-लखनऊ पुष्पक एक्स्प्रेस अटगाव स्टेशनहून १०.०३ ते १०.५८ पर्यंत नियंत्रित केली जाईल.

...

एक्स्प्रेस ट्रेन्सचे फेरनियोजन

दि. २१ एप्रिलची १७६१७ मुंबई-हजूर साहिब नांदेड तपोवन एक्स्प्रेस ही गाडी मुंबई सीएसएमटूहून ६.१० ऐवजी ९.०५ वाजता सुटेल. दि. २१ एप्रिलची १२५१९ एलटीटी-कामाख्या एक्स्प्रेस ही गाडी मुंबई एलटीटीहून ७.५० ऐवजी ९.०० वाजता सुटेल.

...

एक्स्प्रेसचे शॉर्ट टर्मिनेशन

दि. २० एप्रिलचे १२१४० नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस नाशिकरोड स्टेशनवर टर्मिनेट करण्यात आली आहे. दि. २१ एप्रिलची १२१३९ मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस गाडी नाशिकरोड स्टेशनहून सुटेल.

...

हे आहेत परिणाम

ब्लॉकमुळे रेल्वेगाड्या रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल होणार आहेत. प्रवाशांना एसटीबस, खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागणार आहे. त्यासाठी जादा पैसे मोजावे लागतील. रेल्वेगाड्या रद्द झाल्याने रेल्वेचा लाखोंचा महसूल बुडणार आहे. पंचवटीला ब्लॉकमधून वगळण्यात आल्याने चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे.

...

'आधी केले मग सांगितले'

आधी केले मग सांगितले हे एखाद्या चांगल्या कार्याबाबत अभिमानाने नमूद केले जाते. मात्र, मध्य रेल्वेने १९ एप्रिलपासून २१ एप्रिलपर्यंत ब्लॉक घेण्याचे अचानक जाहीर केले. आश्चर्य म्हणजे रेल्वेने आधी ब्लॉक घेतला मग प्रवाशांना सांगितले. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप झाला. त्यांचे आर्थिक नुकसान झाले. ब्लॉक १९ एप्रिलपासून सुरू होणार असताना त्याचदिवशी प्रसिद्धीपत्रक काढण्यात आले. प्रवाशांना ब्लॉकची माहिती मिळण्यासाठी २० एप्रिलची वाट पहावी लागली. त्यामुळे अनेकांची गैरसोय झाली.

...

इगतपुरी स्थानकावरील फूट ओव्हर ब्रीज काढण्यासाठी घेण्यात येणाऱ्या विशेष ब्लॉकमुळे विशिष्ट वेळेतील प्रवाशांचे हाल होणार आहेत. याबाबत मध्य रेल्वेने प्रवाशांना आधी सूचित करणे गरजेचे होते.

- ज्ञानेश्वर शिंदे, देवळाली कॅम्प

..

या विशिष्ट ब्लॉकमुळे पॅसेंजर गाडी दोन दिवस रद्द करण्यात आल्याने याचा फटका प्रवास करणाऱ्या इगतपुरी पूर्व व नाशिक दक्षिण भागातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्य प्रवाशांना बसणार आहे.

- गजीराम मुठाळ, लहवित

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणुकीवर आज व्याख्यान

$
0
0

नाशिक : डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यान मालेअंतर्गत शनिवारी (दि. २०) सायंकाळी सहा वाजता गंगापूररोडवरील कुसूमाग्रज स्मारकात ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवारा यांचे व्याख्यान होणार आहे. लोकसभा निवडणुकीचे अंतरंग हा व्याख्यानाचा विषय आहे. नाशिकमधील पुरोगामी विचारांच्या ४५ संस्था, संघटनांनी एकत्रितपणे हे व्याख्यान आयोजित केले आहे. दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर ही व्याख्यानमाला सुरू झाली. दर महिन्याच्या २० तारखेला ही व्याख्यानमाला होते. यंदाचे हे ६४ वे पुष्प आहे. नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मानव उत्थान मंचने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोकाटेंसाठी बच्चू कडू रिंगणात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शेतकरी, कष्टकरी आणि दिव्यांगाच्या न्यायायासाठी अनोखे आंदोलनासाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रहार संघटनचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू प्रचारासाठी नाशिकच्या रिंगणात उतरणार आहे. अपक्ष उमेदवार अॅड. माणिकराव कोकाटेंच्या प्रचारासाठी बच्चू कडू नाशिक आणि आजुबाजूच्या परिसरामध्ये जाहीर सभा घेणार आहेत. कडूंनी कोकाटेंच्या पाठीशी आपले बळ उभे केल्याने शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळांची डोकेदुखी वाढली आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात सेनेचे गोडसे, राष्ट्रवादीचे भुजबळ, अपक्ष कोकाटे आणि वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार यांच्या चौरंगी लढत आहे. निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. नाशिकमधील गोडसे आणि भुजबळ यांच्यातील दुरंगी लढत आता चौरंगी झाली असून, अपक्ष उमेदवार असलेल्या कोकाटेंनीही निवडणुकीत आपली ताकद पणाला लावली आहे. भाजप आणि सेनेकडून उमेदवारी न मिळालेल्या कोकाटेंनी आपली प्रतिष्ठा पणाला लावत प्रचारावरही जोर दिला आहे. राजकीय पक्षांनी उमेदवारी दिली नसली तरी, लहान-मोठ्या संघटनांचा पाठिंबा मिळवत कोकाटेंनी महायुती आणि महाआघाडीच्या उमेदवारांना जेरीस आणले आहे. आता आमदार बच्चू कडूही त्यांच्या प्रचारासाठी रिंगणात उतरले आहेत. कोकाटेंच्या प्रचारासाठी कडू यांच्याकडून २५ ते २७ असे तीन दिवस प्रचारसभा घेतल्या जाणार आहेत. सिन्नर, नाशिक तालुका, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर या भागात प्रचारसभांचे आयोजन केले जात आहे. शेतकरी पट्ट्यात होत असलेल्या सभांचा कोकाटेंना फायदा होणार असला तरी, गोडसे आणि भुजबळांना मात्र त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​भाजपातील नाराजांची मनधरणी!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी मालेगावला येऊन भाजपच्या नाराज आजी-माजी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मनधरणी केली. भाजपकडून डॉ. सुभाष भामरे यांना उमेदवारी मिळाली असली तरी त्यांच्या कार्यशैलीबाबत नाराज असलेले भाजपचे माजी महानगराध्यक्ष सुनील गायकवाड व त्यांच्या गटाची नाराजी या निवडणुकीत परवडणारी नाही. त्यामुळे रावल यांच्या मध्यस्थीने नाराजांचे मनोमिलन घडवून आणण्याचा प्रयत्न झाला आहे. नाराजांनी मोदींना पंतप्रधान करण्यासाठी कामास लागावे असे आवाहन रावल यांनी केले तर नाराज सुनील गायकवाड यांनीदेखील पक्षनिष्ठा कायम ठेवून प्रचार यंत्रणा सज्ज असल्याची ग्वाही यावेळी दिली.

खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या कार्यशैलीवर सुनील गायकवाड यांच्याकडून थेट टीका करण्यात आली होती. यानंतर मालेगाव भाजपाअंतर्गत अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये खांदेपालट करण्यात आल्याने गायकवाड गटात मोठी नाराजी पसरली होती. मालेगावातून आधीच डॉ. अद्वय हिरे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली असून त्यात पक्षांतर्गत नाराजीमुळे गायकवाड गट धुळेऐवजी जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपच्या प्रचारासाठी सक्रीय झाला होता. त्यामुळे धुळ्यातील भाजपची प्रचार यंत्रणा काहीशी पिछाडीवर पडल्याचे चित्र निर्माण झाले होते. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पक्षश्रेष्ठींकडून राज्याचा प्रचार आढावा घेण्यात आल्यानंतर या बाबी पक्षश्रेष्ठींच्या कानावर गेल्याने थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आदेशावरून पर्यटनमंत्री रावल शुक्रवारी मालेगावी नाराजांची मनधरणी करण्यासाठी आले होते.

बंद दाराआड चर्चा

यावेळी सटाणा नाका भागातील सुनील गायकवाड यांच्या संपर्क कार्यालयात रावल यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ते म्हणाले की, भाजपची शिकवण ही देशहिताला प्राधान्य देणारी आहे. यंदाच्या निवडणुकीत देशहिताचा विचार करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा निवडून देणे गरजेचे आहे. त्यासाठी एक एक खासदार महत्वाचा आहे. पक्षात मतभेद असू शकतात, मात्र ते दूर करून देशहिताचा विचार करून प्रचारात सक्रीय व्हावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी गायकवाड व रावल यांच्यात बंद दाराआड देखील चर्चा झाली. यानंतर गायकवाड यांनीदेखील पक्षनिष्ठेला प्रमाण मानून पक्षश्रेष्ठींच्या आदेशानेच जळगाव मतदार संघात प्रचाराची धुरा सांभाळली. आपल्या मनात कोणत्याही प्रकारे किंतु-परंतु नाही. पक्षाने प्रचारासाठी समन्वयक द्यावा, पक्षाचे कार्य आणि ध्येयधोरण जनमाणसात पोहोचविण्यासाठी आपली यंत्रणा सज्ज असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यशू गाथेचे चर्चमध्ये स्मरण

$
0
0

\B'गुड फ्रायडे'निमित्त भक्तिगीतांनी आदरांजली

\B

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रभू येशूंची प्रार्थना... सर्व चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांनी केलेली गर्दी... प्रार्थनेसोबतच प्रवचानातून व्यक्त होणारे अध्यात्म... भक्तिगीतांच्या अनेक कार्यक्रमांतून शहरात भक्तिमय वातावरण दिसून आले. निमित्त होते ते 'गुड फ्रायडे'चे.

'गुड फ्रायडे'निमित्ताने शहरात भक्ती उत्सव साजरा करण्यात आला. ज्या दिवशी प्रभू येशू यांना वधस्तंभावर खिळून ठार मारण्यात आले, त्या दिवसाला 'गुड फ्रायडे' असे संबोधले जाते. शहरातील सर्व चर्चमध्ये शुक्रवारी ख्रिस्ती बांधवांनी प्रभू येशूंचे स्मरण केले. शहरातील सर्व चर्चमध्ये सकाळपासून ख्रिस्ती बांधवांनी प्रभू येशूंच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. येशूंचे स्मरण करत प्रार्थना, भक्तिगीते, प्रवचन आणि इतर धार्मिक कार्यक्रमांनी चर्चचा परिसर अध्यात्मिक झाल्याचे दिसून आले. शरणपूर रोडवरील संत आंद्रिया चर्चमध्ये सकाळी ११ वाजता स्तुती भजने गायली गेली. त्यासह दिवसभर ख्रिस्ती बांधवांनी प्रभू येशूंची उपासना केली.

त्र्यंबक नाका सिग्नल येथील संत हॉली क्रॉस चर्चमध्ये सायंकाळी ६ वाजता यशूच्या विविध प्रसंगांचे स्मरण करण्यात आले. प्रभू येशू जसे खांद्यावर क्रूस घेऊन चालले, त्याच क्रुसाच्या वाटेचे स्मरण करीत शेकडो ख्रिस्ती बांधवांनी हातात क्रूस घेऊन पदयात्रा काढली. या पदयात्रेत येशू प्रार्थना करण्यात आली. ख्रिस्ती बांधवांनी पदयात्रेत भक्तिगीते गायली. परिसरात भक्तियम वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले.

\Bप्रवचनातून चिंतन

\Bप्रभू येशू ख्रिस्त यांनी मृत्यूपूर्वी उच्चारलेल्या शेवटच्या सात शब्दांवर शहरातील चर्चमध्ये मनन-चिंतन करण्यात आले. 'गुड फ्रायडे'निमित्त आयोजित प्रवचनात सात शब्दांची माहिती देत धर्मोपासना करण्यात आली. 'हे बापा, त्यांना क्षमा कर; कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही', 'मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील', 'बाई पाहा, हा तुझा मुलगा, मुला पाहा ही तुझी आई', 'माझ्या देवा तू माझा त्याग का केलास?', 'मला तहान लागली आहे', 'पूर्ण झाले आहे' आणि 'हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो', या सात वाक्यांच्या आधारे प्रवचनातून चिंतन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पारा पुन्हा चाळिशीकडे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहर व तालुक्यात अवकाळीचे मळभ दूर झाले असून, आता सूर्य पुन्हा आग ओकू लागला आहे. या आठवड्यात रविवार, सोमवार व मंगळावर असे तीन दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढल होते. यामुळे ऐन उन्हाळ्यात तापमानाचा पारा तब्बल ७ अंशांने खाली आला होता. मंगळवारी कमाल तापमान ३५.६ अंश से. पर्यंत खाली आले होते. उकाडा व घामामुळे हैराण झालेल्या मालेगावकरांना यामुळे दिलासा मिळाला होता. आता मात्र पारा पुन्हा चाळिशीकडे वाटचाल करू लागला आहे.

शुक्रवारी मालेगावचे तापमान कमाल ३९.२ व किमान २२.६ अंश से. इतके नोंदवले गेले. चार दिवसात पारा ४ अंशाने वाढला असून आता पुन्हा उकाडा जाणवू लागला आहे. त्यामुळे तापमान पुन्हा चाळीशी पार जाण्याची शक्यता असून येणारा उन्हाळा तापदायक ठरू शकतो.

दिवस किमान कमाल

१६ एप्रिल १९.८ ३५.६

१७ एप्रिल २२.४ ३६.०

१८ एप्रिल १९.२ ३६.४

१९ एप्रिल २२.६ ३९.२

( तापमान अंश सेल्सिअस मध्ये)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एसपीजीचे वरिष्ठ अधिकारी हजर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव बसवंत येथे सभा होणार आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नाशिक ग्रामीण पोलिस दलाची बऱ्याच दिवसांपासून तयारी सुरू आहे. मात्र, पंतप्रधानांची सभा असल्याने स्पेशल प्रोटेक्शन गार्डस (एसपीजी) या विभागाने वेगवेगळ्या पातळ्यांवर आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. एसपीजीचे काही वरिष्ठ अधिकारी आज, शुक्रवारी नाशिकला हजर झाले. या अधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षक आरती सिंह यांची भेट घेऊन बंदोबस्त आणि सुरक्षेचा आढावा घेतला.

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा तिसरा टप्पा सुरू झाला असून, या टप्प्यात उत्तर महाराष्ट्रात घमासान होणार आहे. भारतीय जनता पार्टीचा गड ठरलेल्या उत्तर महाराष्ट्रात मोदींची सभा होणार असल्याने पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान मोदी यांची सभा २२ एप्रिल रोजी सकाळी होणार आहे. नाशिकमध्ये पंतप्रधानांची एक सभा होण्याची शक्यता असल्याने पोलिस, एसपीजीसह विविध सुरक्षा दलांनी जागांची पाहणी, सुरक्षेशी संबंधित बाबींचा आढावा घेतला होता. त्याचमुळे पिंपळगाव बसवंत येथील जोपूळ गावातील मोकळे मैदानावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ग्रामीण पोलिस दलासह बाहेरगावाहून आलेल्या जवळपास अडीच ते तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी एसपीजीच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज एसपी आरती सिंह यांची भेट घेऊन सुरक्षेचा आढावा घेतला. शनिवारी आणखी काही अधिकारी येणार असून, सुरक्षेच्या दृष्टीने वेगवेगळ्या सूचना वरिष्ठ पातळीवरून करण्यात येत असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

मैदान मोठे गर्दीचे आव्हान

जोपूळ गावातील हे माळरान विस्तीर्ण असून, लाखो कायकर्ते येथे बसू शकतात. मैदानाचा आकार आणि संभाव्य गर्दी यांचा ताळमेळ घालणे हे सुरक्षा यंत्रणासह सत्ताधारी पक्षासमोर आव्हान ठरणार आहे. सुरक्षा दलांच्या अनुमानानुसार गर्दीचा आकडा ५० हजारांच्या घरात पोहचू शकतो. हा आकडा जास्तीत जास्त वाढविण्याकडे भाजपाचे प्रयत्न आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चैत्रोत्सवाची आज प्रक्षालय पुजेने सांगता

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

श्री सप्तशृंगी माता चैत्रौत्सवानिमित्त शुक्रवारी ७५ भाविकांनी भगवतीचे दर्शन घेतले. गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेला चैत्रोत्सवाची आज, शनिवारी सांगता होणार आहे. शुक्रवारी दर्शनासाठी पहिल्या पायरीपासून १५ बाऱ्या लागल्या होत्या. दुपारनंतर संख्या कमी होत गेली. शुक्रवारी जिल्हा न्यायाधीश रवींद्र जोशी यांनी भगवतीची सपत्नीक महापूजा केली.

सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट, विश्वस्त डॉ. रावसाहेब शिंदे, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्य अधिकारी भगवान नेरकर, इस्टेट विभाग प्रमुख प्रकाश पगार, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे तसेच विविध विभाग प्रमुख व कर्मचारी वर्ग यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. चैत्रोत्सव यात्रेचा समारोप खऱ्या अर्थाने होतो तो प्राक्षालय पूजेने. शनिवारी सकाळी सर्व पुरोहित नेहमीप्रमाणे श्री भगवतीची पूजा करतील.

'रेणुका'चरणी भाविक नतमस्तक

म. टा. वृत्तसेवा, चांदवड

कुलस्वामिनी श्री रेणुकामातेचा चैत्र पौर्णिमेनिमित्त आयोजित यात्रोत्सवात शुक्रवारी (दि. १९) विविध धार्मिक कार्यक्रमांचे तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो भाविक रेणुकादेवी चरणी नतमस्तक झाले.

चांदवड येथील श्री रेणुकादेवी मंदिरात नवरात्रोत्सवात ९ दिवस तर चैत्र पौर्णिमेला एक दिवसीय यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यात्रोत्सवात शुक्रवारी सकाळी ५ वाजता नितीन चांदवडकर यांच्या हस्ते रेणुका मातेच्या मूर्तीवर महाअभिषेक करण्यात आला. देवीचा गाभारा मनमोहक फुलांनी सजविण्यात आला होता. देवीला पैठणी परिधान करून महाआरती करण्यात आली. त्यानंतर रंगमहालापासून रेणुकादेवीची आभूषणे सकाळी ८.३० वाजता पारंपरिक सवाद्य पालखी मिरवणुकीने रेणुकादेवी मंदिरात नेण्यात आली. विधिवत पूजा करून ती आभुषणे मूर्तीवर चढविण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झिप झॅप - चित्र

स्पेशल वॉर्डचा सनस्ट्रोकवर उतारा

$
0
0

वाढत्या उष्णतेमुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुविधा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अवकाळी पावसानंतर शहरासह उत्तर महाराष्ट्रात उष्णतेमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. तपमानाचा पारा सध्या ३७ अंशावर असला तरी तो पुन्हा चाळीशीच्या घरात जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सिव्हिल हॉस्पिटलने सन स्ट्रोकचा संभाव्य धोका लक्षात घेता सहा खाटांचा विशेष वार्ड सुरू केला आहे.

थंड हवेचे ठिकाण अशी ओळख असलेल्या नाशिक शहरात वर्षागणिक तपमानाचा पारा चढता राहतो आहे. ४० अंश सेल्सियस तपमानाच्या पुढे उन्हात फिरणाऱ्या वा काम करणाऱ्या व्यक्तींना सन स्ट्रोकची शक्यता नाकारता येत नाही. सन स्ट्रोक झाल्यास आणि वेळेत उपचार मिळाला नाही तर अशा व्यक्तींच्या जीवाला धोका निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर सिव्हिल हॉस्पिटलने अशा रुग्णांसाठी विशेष वॉर्ड सुरू केला आहे. या वॉर्डात सहा बेड्स असून, तीन महिला आणि तीन पुरुषांना एकाच वेळी येथे उपचार मिळू शकतो. सन स्ट्रोकनंतर रुग्णाला आवश्यक ते उपचार करण्याच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध असल्याचे अतिरिक्त सिव्हिल सर्जन डॉ. निखिल सैंदाणे यांनी स्पष्ट केले.

यामुळे होतो उष्माघात

उन्हामध्ये शारीरिक श्रमाचे, मजुरीची कामे करणे, कारखान्याच्या बॉयलर रूममध्ये अथवा उष्णतेशी संबंधित ठिकाणी काम करणे, घट्ट कपड्यांचा वापर करणे आदी कारणांमुळे उष्माघात होऊ शकतो. ५ वर्षांपेक्षा कमी व ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींना उष्माघाताचा त्रास लगेचच होतो, हे लक्षात घेणे महत्त्वाचे असते. मद्य, सोडा, कॉफी, अतिथंड पाणी पिणे, गरज नसताना उन्हात बाहेर फिरणे, तंग व गडद कपडे वापरणे टाळणे हे सर्वच वयोगटातील नागरिकांसाठी महत्त्वाचे ठरते.

उष्माघाताची लक्षणे आणि काळजी

शरीरास घाम सुटणे, तहान लागणे, शरीर शुष्क होणे, थकवा येणे, ताप येणे (१०२ पेक्षा जास्त), त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैनी, अस्वस्थ, बेशुद्ध अवस्था, उलटी होणे इत्यादी. उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी लिंबू-मीठ-साखरपाणी, नारळपाणी, कोकम सरबत, फळांचा रस आदी द्रवपदार्थ भरपूर प्रमाणात घ्यावेत. फ्रीजचे पाणी न पिता माठातले पाणी वाळा, गुलाबाच्या पाकळ्या घालून नैसर्गिक थंड केलेले जल प्यावे. काकडी, टरबूज, खरबूज डाळिंब अशी हंगामी फळे खावीत.

तपमानातील वाढ लक्षात घेता हा वॉर्ड सुरू करण्यात आला आहे. त्यात सहा बेड्स असून, उपचारासाठी आवश्यक सुविधा या ठिकाणी पुरविण्यात आल्या आहेत.

- डॉ. निखिल सैंदाणे, अतिरिक्त सिव्हिल सर्जन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनिल गोटेंना भाजपमधून डच्चू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

भारतीय जनता पक्षाचे नंदुरबार येथील ज्येष्ठ नेते डॉ. सुहास नटावदकर यांची हकालपट्टी केल्यानंतर शहरातील बंडखोर आमदार अनिल गोटे यांचीही अखेर पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. आमदार गोटेंचा जलसंपदामंत्री गिरीश महाजन, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पर्यटनविकास मंत्री जयकुमार रावल यांच्यातील संघर्ष अधिक वाढत गेल्याने आणि महापालिका व लोकसभा निवडणुकीत केलेल्या बंडखेारीमुळे गोटेंना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.

भाजपचे लोकप्रतिनिधी गोटेंना मनपा निवडणुकीवेळी पालक म्हणून नेमण्यात आले होते. मात्र, ऐववेळी पक्षाने सर्व सूत्रे मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे व शहरातील भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्याकडे सोपविल्याने गोटेंनी मनपा निवडणुकीत बंडखोरी करीत स्वपक्षातील मंत्री व पदाधिकाऱ्यांविरोधात पत्रकबाजी करीत आरोप प्रत्यारोप केले. भाजपचा हा वाद विधानसभेपर्यंत गेला. त्यावेळी मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी कोणतीही भूमिका न घेता मनपा भाजपच्या ताब्यात कशी येईल, याकडे लक्ष दिले. अखेर गोटेंची भाजपातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

मी स्वत:हून आमदारकी व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे आता माझे निलंबन करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या ज्ञानात मी भर घालण्याची इच्छा नाही. निवडणुकीवर परिणाम करण्यासाठी दुष्ट हेतूने केलेली ही कारवाई आहे.

- अनिल गोटे, आमदार

आमदार अनिल गोटेंनी महापालिका व लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केले. त्यामुळे याविषयी दखल घेऊन भारतीय जनता पक्षातून आमदार गोटेंवरील कारवाईचे स्वागत करतो.

- अनुप अग्रवाल, धुळे महानगर जिल्हाध्यक्ष, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भीमरूपी महारुद्रा वंदन तुला

$
0
0

अंजनेरी पर्वतावर हनुमान जन्मोत्सव

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेकेश्वर

'रामभक्त हनुमान की जय, बोल बजरंग बली की जय,' असा जयघोष करीत हनुमानाचे जन्मस्थळ अंजनेरी पर्वतावरावर हनुमान जयंती उत्सवाला हजारो भाविकांनी हजेरी लावली. शुक्रवारी गर्दी वाढणार असल्याचा अंदाज आल्यामुळे काही हनुमानभक्त गुरुवारी रात्रीच पर्वतावर मुक्कामी पोहोचले होते. त्यामुळे शुक्रवारी पहाटे सूर्योदय होताच हनुमानाचा जयघोष करण्यात आला.

दुष्काळ, वाढत्या उन्हाचा तडाखा आणि निवडणूक आदी कारणांमुळे दरवर्षाप्रमाणे यंदा अंजनेरी पर्वतावर हनुमान जन्मोत्सव सोहळ्याला अल्प प्रतिसाद लाभला. त्यातही वर्षानुवर्षे नित्यनेमाने येणाऱ्या भाविकांनी पर्वतावर आवर्जून हजेरी लावल्याने गडाचा परिसर गुरुवार रात्रीपासूनच गजबजला होता.

भाविकांचे हाल

अंजनेरी गावापासून ते गडाच्या पायथ्यापर्यंत जाणारा रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याने भाविकांना समस्यांना तोंड द्यावे लागले. या मार्गावर दिवे नसल्यामुळे रात्री मुक्कामी जाणाऱ्या भाविकांनी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. रात्री अंधारात मार्गक्रमण करीत असताना भाविक धडपडत होते. वाहनांनी पायथ्यापर्यत जात असताना होणारी कसरत दमछाक करणारी होती. दरम्यान पर्वतावर पिण्याच्या पाण्याचे देखील दुर्भिक्ष आहे.

दर्शनसाठी रीघ

नाशिक-त्र्यंबक रस्त्याच्या बाजूस असलेल्या हनुमान मंदिरात भाविकांची गर्दी होती. येथील ध्यानस्त हनुमान मूर्तीसमोर भाविक तल्लीनतेने भजन करताना दिसून येत होते. त्याच प्रमाणे ठानापती ब्रम्ह गिरी महाराज, अशोक बाबा यांच्या आश्रमातही उत्सव संपन्न झाला. बाल हनुमान व अंजनीमाता दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली होती.

विद्युत रोषणाई

त्र्यंबकेश्वर शहरात असलेल्या ग्रामदैवत हनुमान मंदिर, मौनी बाबा आखाडा दक्षिणमुखी हनुमान, आदिसह हनुमान मंदिरास विद्युत रोषणाई करण्यात आली होती. येथे महाप्रसादाचे वाटप सुरू होते. येथून जवळच असलेल्या बेझे येथे शिलाई माता यात्रोत्सव उत्साहात संपन्न झाला आहे.

येवल्यात उत्साह

येवला : 'भीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती वनारी अंजनीसुता, रामदूता प्रभंजना', अशा विविध धूनमधील भक्तिमय वातावरणात रामभक्त हनुमानाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरात पहाटेपासून हनुमान मंदिरांमध्ये भाविक भक्तांची उसळली होती. भगव्या पताकांसह आकर्षक फुलांच्या सजावटीने फुललेली विविध ठिकाणची हनुमान मंदिरे सजली होती. ,

येवला शहरानजीकच्या तालुक्यातील वडगाव बल्हे शिवारातील जागृत हनुमान मंदिर, तसेच तालुक्यातील धानोरे येथील ५१ फूट उंचीच्या मोठा हनुमान मंदिरासह येवला शहरातील विंचूर चौफुली लगतचे दक्षिणमुखी हनुमान मंदिर, जबरेश्वर खुंटानजीकचे जबरेश्वर मारुती मंदिर, पाटोद दरवाजा नाक्यावरील काटा मारुती, बुरुड गल्ली जवळील जाईचा मारुती, जुन्या नगरपालिका रोडवरील दक्षिणमुखी हनुमान मंदिर अशा विविध हनुमान मंदिरांमध्ये दिवसभर भाविकांची गर्दी होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक जिमखान्याची ‘हकीम मर्चंट’वर मोहोर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने झालेल्या हकीम मर्चंट क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नाशिक जिमखाना संघाने एनडीसीए मॉर्निंग संघाचा ८५ धावांनी पराभव करीत विजेतेपद पटकावले.

या पन्नास षटकांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात नाशिक जिमखाना संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. तेजस पवार व मीत पटेलच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर नाशिक जिमखाना संघ १६७ धावांत गारद झाला. विकास वाघमारे याने ३३, तर सुजय महाजन याने ३१ धावा केल्या. तेजस व मीतने प्रत्येकी ३ गडी बाद केले. अवघ्या १६७ धावांचे सोपे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेला एनडीसीए मॉर्निंग संघ रणजीपटू सत्यजित बच्छाव याच्या भेदक माऱ्यापुढे ८२ धावांत गारद झाला. सत्यजितने १५ धावांमध्ये ५ गडी बाद केले, तर गौरव काळे याने ४ गडी बाद करीत त्याला उत्कृष्ट साथ दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तरुणाची आत्महत्या

$
0
0

नाशिक : निळवंडी (ता. दिंडोरी) येथील ३० वर्षीय तरुणाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. गोरक्षनाथ अशोक जाधव असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. गोरक्षनाथ याने गेल्या रविवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. ही बाब लक्षात येताच पत्नी सुवर्णा यांनी त्यास दिंडोरी शासकीय रुग्णालयातून अधिक उपचारार्थ दाखल केले. मागील पाच दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, शुक्रवारी (दि.१९) उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी दिंडोरी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हनुमानाच्या जयघोषाने दुमदुमले शहर

$
0
0

ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'पवनसुत हनुमान की जय', 'सियावर रामचंद्र की जय', 'बजरंगबली की जय', 'एकमुखाने बोला, बोला जय जय हनुमान', असा होणारा जयघोष... नाशिक ढोलचा दणदणाट... उंचावणारे भगवे ध्वज अन् डमरू नाद, असे भक्तिमय वातावरण शहरात शुक्रवारी सायंकाळी पहायला मिळाले. निमित्त होते, हनुमान जन्मोत्सव मिरवणुकीचे.

श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त शहरात शुक्रवारी भव्य मिरवणूक काढण्यात आली. यंदा मिरवणुकीत वाराणसी येथून श्री काशी विश्वनाथ महाकाल डमरू दलाचे साधक सहभागी झाले. अंगी भस्म लावलेले साधक आणि डमरूंचा नाद, हे मिरवणुकीचे खास आकर्षण ठरले. डमरू नाद आणि 'जय जय हनुमान'च्या जयघोषात मिरवणुकीचा मार्ग दुमदुमून गेला होता. शहरातील मिरवणुकीत पहिल्यांदाच काशी येथून महाकाल साधक सहभागी झाल्याने सर्व भक्तांचे लक्ष वेधले गेले. साधकांनी डमरूचा नाद करीत श्री हनुमानास वंदन केले. मिरवणूक मार्गावर भस्म उधळत होणाऱ्या डमरू नादाने मिरवणुकीची शोभा वाढविली.

मिरवणुकीच्या प्रारंभी स्वामी सोमेश्वरानंद महाराज यांच्यातर्फे श्री हनुमानाच्या भव्य मूर्तीचे पूजन करण्यात आले. सायंकाळी सहा वाजता वाकडी बारव येथून मिरवणुकीला प्रारंभ झाला. वाकडी बारवमार्गे भद्रकाली, दूधबाजार, बादशाही कॉर्नर, धुमाळ पॉईंट, सांगली सिग्नल, मेहेर, अशोक स्तंभ, रविवार कारंजा, मालेगाव स्टँडमार्गे रामकुंड असा मिरवणुकीचा मार्ग होता. रामकुंड येथील दुतोंड्या मारुती येथे पूजन करण्यात आले. हनुमान जन्मोत्सव मिरवणुकीत संबळ वादक सहभागी झाले. संबळाच्या तालावर मिरवणुकीत सहभागी झालेले हनुमान भक्त जल्लोष करताना दिसून आले. 'रामभक्त महावीर हनुमान की जय'च्या जयघोषात मिरणुकीतील भक्तांचा उत्साह उत्तरोत्तर वाढत गेला. रात्री उशिराने रामकुंड येथील दुतोंड्या मारुतीचे पूजन केल्यानंतर मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांचे मल्लयुद्ध

$
0
0

पेठ तालुक्यातील कोहोर येथे महिला पहिलवानांनी शुक्रवारी कुस्तीचा आखाडा गाजवला. विविध डावपेचांनी रंगलेले हे मल्लयुद्ध पाहण्यासाठी कुस्तीप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरच झालं थोडं अन् व्याह्याने धाडलं घोडं

$
0
0

नाशिकचीच थकबाकी वसूल होत नसताना जळगाव पालिकेचे साकडे

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेच्या घरपट्टी आणि पाणीपट्टीसह गाळ्यांची वसुलीची बोंब असतानाच जळगाव महापालिकेने तेथील पालिकेच्या मालकीच्या गाळ्यांच्या थकबाकी वसुलीसाठी नाशिकमध्ये स्थायिक असलेल्या थकबाकीदारांकडे वसुलीचा तगादा लावण्याची गळ घातली आहे. जळगाव पालिकेच्या या पवित्र्यामुळे पालिकेची अवस्था 'घरच झालं थोड अन् व्याह्याने धाडलं घोडं' अशी झाली आहे. स्मरणपत्र पाठवूनही पालिकेने त्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर जळगाव महापालिकेवरच नाशिकमधील थकबाकीदारांचा शोध घेण्याची वेळ आली आहे.

नाशिक महापालिकेची घरपट्टी, पाणीपट्टी आणि व्यापारी संकुलातील गाळ्यांची थकबाकी ही अडीचशे कोटींवर पोहचली आहे. या थकबाकी वसुलीसाठी आयुक्त राधाकृष्ण गमेंनी विभागीय अधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या असतानाच जळगाव पालिकेच्या अजब मागणीने पालिकाच चक्रावली आहे. जळगाव महापालिकेने शहरात अठरा व्यापारी गाळे संकुलात अडीच हजार गाळे आहेत. हे गाळे तीस वर्षांच्या भाडेकराराने दिल्यानंतर संबंधित गाळेधारकांनी पालिकेचे भाडेच अदा केलेले नाही. त्यामुळे पालिकेची थकबाकी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. थकबाकीदारांनी न्यायालयात धाव घेतली. परंतु, न्यायालयाचा निर्णय त्यांच्यावरच उलटला असून, थकबाकी वसुलीसाठी गाळे जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार वसुलीची कारवाई सुरू केली असताना त्यातील अनेक थकबाकीदारांच्या मालमत्ता नाशिकमध्येही असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मालमत्ता जप्तीसाठी जळगाव महापालिकेने नाशिक महापालिकेला गेल्याच वर्षी पत्र लिहिले होते. फेब्रुवारी २०१८ मध्ये जळगाव पालिकेने थकबाकीदारांची यादीही पालिकेकडे सोपवत त्यांची मालमत्ता जप्त करण्याची विनंती केली. परंतु, पालिकेने मात्र विविध कारणे सांगत या वसुलीसाठी टाळाटाळ केली आहे. अपुऱ्या कर्मचारीवर्गाचे कारण देत प्रथम पालिकेने वसुलीला नकार दिला. त्यानंतर पुन्हा गेल्या महिन्यात जळगाव पालिकेने महापालिकेला पत्र पाठवले. परंतु, निवडणूक असल्याचे सांगत कर विभागाने पुन्हा त्याकडे दुर्लक्ष केले आहे. नाशिक महापालिकेच्या या नकारघंटामुळे जळगाव पालिकेने येथील थकबाकीदारांची शोध मोहीम गुंडाळली आहे.

...

अडीचशे कोटी थकबाकी

महापालिकेने यंदाच्या वर्षात घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट हे १६१ कोटी रुपये ठेवले होते. त्यापैकी जेमतेम ११० कोटींचीच वसुली झाली आहे. पाणीपट्टीच्या ५४ कोटींपैकी ४४ कोटींची वसुली झाली आहे. त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षाचीच जवळपास ६० कोटींची थकबाही आहे. यापूर्वीच्या थकबाकीचा आकडा हा १९० कोटींपर्यंतचा आहे. त्यामुळे घरपट्टी आणि पाणीपट्टीची थकबाकी ही अडीचशे कोटींपर्यंत पोहचली असताना जळगाव पालिकेसाठी वसुली कशी करायची असा प्रश्न यंत्रणेसमोर पडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकींच्या अपघातात दोन्ही चालकांचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोन्ही गाडीचालकांचा मृत्यू झाल्याची घटना नाशिक-पुणे महामार्गावर शिंदे गावाजावळ घडली. नितीन तुंगार (रा. शिंदे) आणि सत्येंद्र रामरतन प्रसाद (वय ३५, रा. ब्राह्मणवाडे) अशी मृत्यू झालेल्या चालकांची नावे आहेत. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन केल्यानंतर या दोघांच्या मृतदेहावर त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

नितीन तुंगार हा त्याचा मित्र गणेश पाटील याला सोबत घेऊन दुचाकिवरून (एमएच १५ जीजे ९३७३) शिंदे जवळील कंपनीतील कामगारांना जेवणाचे डबे पोहच करुन परतत होता. लोहिया कंपाउंडजवळ नितीनच्या दुचाकीला ब्राह्मणवाडेकडून आलेल्या दुचाकीने (एमएच १५ एफ एक्स ८००७) समोरासमोर धडक दिली. यात नितीन व गणेश यांच्यासह दुसऱ्या दुचाकीवरील चालक सत्येंद्र रामरतन प्रसाद आणि अरविंदकुमार गुप्ता हे चौघेही गंभीर जखमी झाले. या जखमींना टोल नाका येथील रुग्णवाहिकेतून सिन्नर फाटा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डोक्याला मारल्याने गंभीर जखमी झालेल्या नितीन अणि सत्येंद्र यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु, दोघांचा मृत्यू झाला. उर्वरित दोन्ही जखमींवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>