Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

प्रचारासाठी आतापर्यंत ७७२ परवानग्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून खासदारकीची माळ गळ्यात पाडून घेण्यासाठी अनेक उमेदवारांनी बाह्या सरसावल्या असून जिल्ह्यात प्रचारतोफा धडाडत आहेत. चौकसभेपासून जाहीर सभेपर्यंत आणि पोस्टर्स झेंडे लावण्यापासून बॅरिकेड्स लावण्यापर्यंतच्या तब्बल ७७२ परवानग्या विविध विधानसभा मतदार संघांसह एक खिडकी कक्षातून घेण्यात आल्या आहेत.

प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार हेच एकमेव माध्यम आहे. प्रचार करण्यासाठीचे मात्र अनेक पर्याय उपलब्ध आहेत. उमेदवारांच्या प्रचार यंत्रणेला चौकसभेपासून जाहीर सभेपर्यंत आणि गल्लोगल्ली वाहन फिरविण्यापासून होर्डिंग लावण्यापर्यंतच्या अनेक प्रकारच्या परवानग्यांची आवश्यकता भासते. त्या-त्या विधानसभा मतदार संघांमध्येच या परवानग्या दिल्या जात आहेत. नाशिकमध्ये एकाच छताखाली आणि तत्परतेने परवानग्या देता याव्यात, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी कक्ष सुरू करण्यात आला आहे. महसूल, महापालिका, पोलिस, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी या कक्षामध्ये नेमण्यात आले आहेत. कक्ष स्थापन झाल्यापासून १८ एप्रिलपर्यंत १२ विधानसभा मतदार संघांमध्ये ७७२ परवानग्या घेण्यात आल्या आहेत. यामध्ये ६४४ परवानग्या १२ विधानसभा मतदार संघांमध्ये देण्यात आल्या आहेत. तर १२८ परवानग्या या जिल्हाधिकारी कार्यालयातील एक खिडकी कक्षातून देण्यात आल्या आहेत.

चांदवडमध्ये सर्वाधिक परवाने

जिल्ह्यात सर्वाधिक १७७ परवानग्या चांदवड-देवळा या विधानसभा मतदार संघात घेण्यात आल्या आहेत. या तालुक्यात ७५ लहान-मोठ्या सभा झाल्या आहेत. ध्वनिक्षेपकाच्या ५६ तर मिरवणुकीच्या २६ परवानग्या घेण्यात आल्या आहेत. त्याखालोखाल सर्वाधिक २१ सभांची परवानगी दिंडोरी आणि पेठ मतदार संघामध्ये देण्यात आली आहे. नाशिकमध्ये एक खिडकी कक्षात प्रचार वाहन परवानगीच्या ६५ तर ध्वनिक्षेपक वापराच्या ५६ परवानग्या देण्यात आल्या आहेत.

परवानगीचा प्रकार संख्या

चौक/जाहीर सभा १६७

पोस्टर्स/झेंडे लावणे ६८

खासगी जागेवर जाहिरात फलक ७३

प्रचार वाहन परवानगी ११०

प्रचार कार्यालय परवानगी ४०

ध्वनीक्षेपक परवानगी २३९

मिरवणूक/ रोड शो ६५

स्टेज/बॅरिकेड्स ०३

इतर ०७

एकूण ७७२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुरातत्त्व कायदा लोकाभिमुख हवा!

0
0

ramesh.padwal@timesgroup.com

tweet-MTRameshp

राज्य व केंद्र पुरातत्त्व कायद्यात आमूलाग्र बदलाची गरज असून, वारसा जतन क्षेत्र लोकाभिमुख करायचे असेल आणि वारसाहक्क हा फक्त हक्क नाही तर जबाबदारीही आहे, हे समाजमनावर रुजवायचे असेल तर पुरातत्त्व कायद्याला सकारात्मक तरतुदींसह कठोर भूमिका घेता यायला हवी, अशा कायद्याची गरज आहे. वास्तू संरक्षित करण्याच्या प्रक्रियेपासून दंड, शिक्षेसह लोकशिक्षण, वारसा स्थळांचे जतन, संवर्धन, रोजगार, पर्यटन व सर्व्हेक्षण यावर नव्याने विचार करण्याची वेळ आली आहे.

पुरातत्त्व कायद्यात काळानुरूप विकासात्मक बदल अपेक्षित असतो. यासाठी पुरातत्त्व विभागानेच कायद्यात काळानुरूप बदल करायला हवा अथवा या क्षेत्रातील अभ्यासकांनी अशा बदलाची मागणी करायला हवी. मात्र, याचबरोबर आपला वारसा आपण जपला पाहिजे ही भावना सक्षम व्हायला हवी. आपण आपला वारसा जतन करत नसू आणि सरकारने सगळे करावे, अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. नागरिकांनी वारसा जतनासाठी पुढाकार घेतल्यास सरकारचे बळ नक्की मिळू शकेल. सक्षम कायद्यानेही हा विचार सक्षमपणे लोकांपर्यंत पोहचविला जावू शकतो.

-डॉ. गो. बं. देगलूरकर, ज्येष्ठ पुरातत्त्व तज्ज्ञ

राज्य व केंद्र या दोन्ही पुरातत्त्व कायद्यामध्ये अमूलाग्र बदलाची गरज आहे. यावर आम्ही काम करीत आहोत. मंदिरांचा जीर्णोद्धार असो वा खासगी बांधकाम असो, ही कामे करताना संबंधित व्यक्तीला पुरातत्त्व विभागाची परवानगी घेणे सक्तीचे करायला हवे. हा नियम इतर देशांत पाळला जातो. जो आपल्याकडे नाही. यामुळे अनेक वारसास्थळे जमीनदोस्त होत आहेत. अशा कामांसाठी व वारसा जतन क्षेत्रात सल्लागार व सहकार्य म्हणून पुरातत्त्व विभाग डेक्कन कॉलेज अथवा या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांची मदत घेऊ शकते. वारसा स्थळे पर्यटन या अर्थानेही विकसित करायला हवीत. यामुळे आर्थिकदृष्ट्या बोजा पडणार नाही अन् रोजगार निर्मितीदेखील होर्इल. पुरातत्त्व विभागाने लोकांशी संवाद साधणारा वेगळा विभाग निर्माण करायला हवा. अशी वेगळी व्यवस्था निर्माण केल्याने चांगले बदल स्वीकारण्यासाठी संवाद वाढेल.

-डॉ. वसंत शिंदे, कुलगुरू, डेक्कन कॉलेज, पुणे

ऐतिहासिक व पुरातत्त्वीय महत्त्व असलेल्या सगळ्या वास्तूंना कायद्याचे संरक्षण कसे मिळू शकेल याचा विचार आता व्हायला हवा. तशी गरज सध्या निर्माण झाली आहे. तसेच वारसा जतन हे फक्त सरकारचे काम नसून, सर्वसामान्यांमध्येही याबाबत जनजागृती कशी होईल व लोकसहभाग कसा वाढेल यावरही लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी राज्यातील पुरातत्त्व हा विषय शिकविणाऱ्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे बळ पुरातत्त्व विभागाला विद्यापीठांची संलग्न होत वापरता येऊ शकेल. यामुळे पुरातत्त्व विभागाचा मनुष्यबळाचा प्रश्नही सुटेल अन् नवीन पुरातत्त्व अभ्यासकांना योग्य अनुभवही मिळेल.

-डॉ. माया पाटील, माजी उपसंचालक, पुरातत्त्व विभाग

राज्यातील अनेक वास्तू अशा टोकावर आहेत की, त्यांना तातडीने कायद्याने संरक्षित करण्याची गरज आहे. यात अनेक गावांतील पांढरी, पुरातत्त्वीय स्थळे, वास्तू, मंदिरे, वाडे व शिल्पांचा समावेश आहे. आर्थिक तरतूदी होतील तेव्हा होतील, मात्र तोपर्यंत त्यांना कायद्याचेही संरक्षण नाही, असे व्हायला नको. त्याचबरोबर स्थानिक पातळीवर वारसा जतनाबाबत जनजागृती व जबाबदारी निर्माण करायला हवी. यामुळे पुरातत्त्व विभागाची जबाबदारी शेअर होईल. सीएसआर फंड, दत्तक योजना व पीपीटी पद्धतीने वारसा संवर्धनाची कामे होऊ शकतात. मात्र, अनेकदा नियम जाचक असतात म्हणून अथवा नियम नसल्याने इच्छा असूनही कामे होऊ शकत नाहीत, अशी सध्यातरी स्थिती आहे.

- डॉ. मंजिरी भालेराव, पुरातत्वशास्त्र अभ्यासक

पुरातत्त्व कायद्यात सकारात्मक बदलाची गरज आहे. हा बदल करताना पुरातत्त्व विभागाचे काम विभागले जार्इल, लोकसहभाग वाढेल व आपली संस्कृती, वारसा जतन करण्याला प्रोत्साहन मिळेल यादृष्टीने विचार व्हायला हवा. पुरातत्त्व विभागाने वारसा व्यवस्थापन, आर्थिक पाठिंबा मिळवणं व वारसा स्थळांच्या विकासाबरोबर रोजगार निर्मिती कशी होऊ शकेल याचाही विचार केल्यास स्थानिक लोकांचा वारसा जतन व विकासाकडे ओढा वाढेल. वारसा जतन ही एका विशिष्ट विभागाची जबाबदारी नसून, प्रत्येक नागरिकाचे कर्तव्यही आहे, हा विचार प्रत्येकात रुजायला हवा. याला कायद्याने पाठिंबा मिळाला तर अधिक सक्षमपणे गावोगावचा वारसा जतन करता येऊ शकेल.

- आनंद कानिटकर, आतंरराष्ट्रीय वारसा जतन तज्ज्ञ

(क्रमश:)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेडिकल प्रॅक्ट्रिशनर्स अध्यक्षपदी डॉ. लासुरे

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड मेडिकल प्रॅक्ट्रिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. समीर लासूरे यांची नवव्यांदा बिनविरोध अध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे.

संघटनेच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा तसेच 'स्वाईन फ्लू'वर कार्यशाळा नाशिकरोड येथे झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहुल गायकवाड उपस्थित होते. त्यांच्यासह डॉ. आशुतोष मुंगी यांनी स्वाईन फ्लूबाबत मार्गदर्शन केले.

नूतन कार्यकारिणीमध्ये डॉ. अमित विसपुते (सचिव), डॉ. लियाकत नामोली (खजिनदार), डॉ. कौसर तांबोळी (वुमन फोरम अध्यक्ष), डॉ. राजेंद्र अमृतकर, डॉ. विलास बोराडे, डॉ. राकेश गावित, डॉ. संजय नाठे (सदस्य) यांचा समावेश आहे. तसेच सल्लागार समितीमध्ये डॉ. नंदकिशोर कातोरे, डॉ. अशोक निरगुडे, डॉ. अंबादास कुलकर्णी, सांस्कृतिक समितीत डॉ. पल्लवी पाटील, डॉ. अर्चना धात्रक, डॉ. सुनयना भुजबळ, डॉ. भारती सोनवणे, डॉ. संतोष धात्रक, डॉ. रुपेश संकलेचा, सहल समितीमध्ये डॉ. धनंजय पाटील, डॉ. आसिफ तांबेळी, डॉ. श्वेता पाटील, डॉ. स्मिता ठाणगे यांचा समावेश आहे. आरोग्य मंथन समितीमध्ये डॉ. कौसर तांबोळी, डॉ. तब्बसूम नामोले, क्रीडा समितीत डॉ. चंद्रकांत बोरसे, डॉ. आरिफ शेख, डॉ. सचिन पाटील, डॉ. रवी कुटे, डॉ. मेघा गाजरे, डॉ. विशाखा मोकळ यांचा समावेश आहे.

प्रकाश पुंड, प्रमोद पाटील, राजेंद्र अमृतकर, विजय गवळी, मंगेश सानवणे, महेश भालेराव, ज्ञानेश बोरसे, बी. आर. पाटील, मिलिंद नेमे, लक्ष्मीकांत नांदडेकर यांनी संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१०० मीटरची ‘लक्ष्मणरेषा’

0
0

मतदान केंद्र प्रवेशाबाबत जिल्हा प्रशासनाचे निर्देश

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

निवडणुकीच्या दिवशी मतदान संपतेवेळी म्हणजेच सायंकाळी सहा वाजता मतदान केंद्रापासून १०० मीटरच्या आत जेवढे मतदार असतील तेवढ्या मतदारांनाच केंद्रात मतदानासाठी प्रवेश दिला जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेने स्पष्ट केले आहे. शेवटच्या उमेदवाराला एक क्रमांकाची चिठ्ठी देऊन उलट्या क्रमांकाने चिठ्ठ्यांचे वाटप केले जाणार असल्याची माहिती शनिवारी प्रशासनाने उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी दिली. याबाबतची स्पष्ट माहिती आपल्या प्रतिनिधींनाही द्या, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.

लोकसभा निवडणुकीतील उमेदवार आणि राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांच्या स्थायी समितीची बैठक शनिवारी (दि. २०) जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, उप निवडणूक जिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांच्यासह राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. उमेदवार आणि राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे पालन अत्यंत काटेकोरपणे करावे, असे आवाहन यावेळी मांढरे यांनी केले. उमेदवारांनी खर्च नियमित व वेळेवर दाखल करावा. त्यास विलंब करू नये, असे निर्देश यावेळी देण्यात आले. सर्व उमेदवारांनी व राजकीय पक्षांनी शनिवारी (दि. २७) सायंकाळी सहा वाजता प्रचार थांबवावा, प्रचार संपल्यानंतर २९ एप्रिलपर्यंत तीन स्वतंत्र वाहनांसाठी अर्ज करून परवानगी घ्यावी, सर्व उमेदवार व राजकीय पक्षांनी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर नेमावयाचे त्यांचे मतदान प्रतिनिधी (Polling Agent) त्याच मतदान केंद्रावरील मतदार असल्याची खात्री करावी व तसे नेमणूक पत्र द्यावे, असे आवाहन मांढरे यांनी केले.

पक्षप्रतिनिधींसमोर यंत्रछाननी

मतदानाचे दुसरे दिवशी म्हणजेच ३० एप्रिलला सर्व विधानसभा मतदारसंघांची यंत्र अंबड येथील गोदामात आणण्यात येणार आहेत. स्ट्राँगरुम बंद करतेवेळी उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी हजर रहावे, याच दिवशी सकाळी ११ वाजता फॉर्म १७ अ ची छाननी निवडणूक निरीक्षकांच्या समक्ष होणार असून त्यासाठी हजर रहावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

बूथसाठी दोन खुर्च्यांची मर्यादा

निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्राबाहेर केवळ एक टेबल व दोन खुर्च्या बसतील एवढेच उमेदवाराचे बूथ लावता येतील. हे बूथ लावण्यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांची परवानगी आवश्यक असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. मतदान यंत्राचे सेटिंग आणि सीलिंग जिल्ह्यात सुरू झाले असून त्याची पाहणी करावी, प्रशिक्षण तसेच मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर मॉल पोलवेळी उपस्थित रहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीची हत्या; पतीस जन्मठेप

0
0

वर्षाच्या आत सुनावणी पूर्ण

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

चारित्र्याच्या संशयातून लग्नाच्या वाढदिवशी पत्नीची निर्घुन हत्या करणाऱ्या पतीस जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. न्यायाधीश एन. जी. गिमेकर यांच्या कोर्टात हा खटला सुरू होता. सिडकोतील पंडितनगरमध्ये ३ मे २०१८ रोजी ही घडली होती.

सारीपुत्र पुंजाराम शिंदे (रा. जय मल्हार चौक, पंडितनगर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी सारीपुत्रचा भाऊ राहुल शिंदे याने अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. गवंडी काम करणारा सारीपुत्र हा पत्नी रमावर संशय घ्यायचा. रमा माहेरच्या व्यक्तींशी फोनवर बोलते, याचाही सारीपुत्रला राग होता. शिंदे दाम्पत्याचा ३ मे २०१८ रोजी लग्नाचा वाढदिवस होता. आपल्या खोलीत दुपारी दोन वाजेच्या सुमारास पलंगावर बसलेले असतांना सारीपुत्र याने पत्नीस अनैतिक संबधाबाबत विचारणा केली. रमाने त्यास खडसावले. यामुळे संतप्त झालेल्या सारीपुत्रने जवळच पडलेला भाजी कापण्याच्या चाकू उचलून तिच्या पोटात खुपसला. तसेच गळ्यावरही वर्मी वार केले. भावाच्या रूममधून ओरडण्याचा आवाज आल्याने राहुलने धाव घेतली. मात्र, आरोपीने त्यास धक्का मारून पोबारा केला होता. या घटनेत रमा जागीच ठार झाली. अंबड पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला. तत्कालीन सहाय्यक निरीक्षक एस. बी. खडके यांनी तपास केला. आरोपीला अटक करीत पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. विशेष सरकारी वकिल रवींद्र एल. निकम यांनी सात साक्षीदार तपासले. न्यायालयाने परिस्थितीजन्य आणि प्रत्यक्षदर्शी पुराव्यांच्या आधारे आरोपीस जन्मठेप आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांवर गुन्हा दाखल करा

0
0

माकपची निवडणूक आयोगाला पत्र

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तडीपारीची नोटीस काढून अन्याय करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी माकपच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता सुरू असताना डॉ. डी. एल. कराड यांच्याविरुद्ध ही नोटीस काढण्यात आल्याने पक्षाने पत्र दिले आहे.

माकपचे केंद्रीय समितीचे सदस्य नरसैय्या याडम, डॉ. अशोक ढवळे, महेंद्रसिंग, जे. पी. गावित यांनी मुंबईतील राज्य निवडणूक आयोगाला पत्र दिले. देशात लोकसभा निवडणूक सुरू असून, माकपने देशभरासह नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदार संघात गावित यांना उमेदवरी दिली आहे. सर्व पक्षांचा प्रचार सुरू असून डॉ. कराड हे पक्षाचे व्हीआयपी नेते आहेत. ते या निवडणूक प्रक्रियेत गुंतले असताना त्यांना सुडबुद्धीने, बेकायदेशीरपणे नाशिक शहर पोलिसांकडून नाशिक, ठाणे व नगर या जिल्ह्यांतून हद्दपार का करण्यात येऊ नये, याचे स्पष्टीकरण मागवणारी नोटीस देण्यात आली आहे.

डॉ. कराड हे संघटित व असंघटित कामगारांसाठी काम करतात. कामगार चळवळ दडपून टाकण्यासाठी हा प्रयत्न असून, यामुळे लोकशाहीवरच हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. लोकसभा निवडणूक सुरू असतांना विरोधी पक्षाच्या नेत्यांना अशा प्रकारची नोटीस देऊन त्यांच्यावर दबाव आणणे हे अत्यंत गंभीर व लोकशाहीच्या विरोधात आहे. निवडणूक प्रक्रिया काळात अशा प्रकारची नोटीस काढणे हा अचारसंहिता भंगाचा प्रकार ठरतो. त्यामुळे सबंधीत पोलिसांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा तसेच त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आचारसंहिता भंगाचा चांदवडमध्ये गुन्हा

0
0

काँग्रेसचा कंटेनरवरून विनापरवानगी प्रचार

म. टा. वृत्तसेवा, चांदवड

चांदवड शहराजवळ मुंबई-आग्रा महामार्गावरील सोमा कंपनीच्या टोल नाक्यालगत कंटेनरद्वारे विनापरवागी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या जाहिरातीचे फलक लावल्याचे भरारी पथकाला तपासणीदरम्यान आढळून आले आहे. संबंधित कंटेनरविरोधात आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा चांदवड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीची पाहणी करण्यासाठी मतदारसंघात सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी भरारी व स्थिर सर्वेक्षण पथकांची नियुक्ती केली आहे. याच पथकाला शुक्रवारी (दि. १९) सोमा टोल नाक्याजवळ तपासणी करत असतांना अशोक लेलँड कंपनीचा कंटेनरच्या (एम एच ०४ जी एफ ९५५८) दोन्ही बाजूस सुमारे ३२ फुट बाय १२ फुट रुंदीचे काँग्रेस पक्षाचे फलक त्यावर राहुल गांधी यांचा फोटो व काँग्रेसचे पक्षचिन्ह पंजाचे चित्र तसेच त्यावर हिंदी भाषेत 'अब होगा न्याय, गरिबी पे वार ७२,००० हजार सालाना हर गरीब परिवार के खाते मे' असे डिजिटल फलक २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी कंटेनरवर लावलेले दिसून आले. कंटेनरचालक वीरेंद्रसिंह श्रीमिश्रीलाल बघेल याच्याकडे परवानगी व कागदपत्राबाबत पथकाने विचारणा केली. ती आढळून न आल्याने भरारी पथकाचे प्रमुख किशोर लोहार, स्थिर पथकाचे प्रमुख सतीश कांबळे यांनी कंटेनरचालकाविरोधात आचारसंहिता भंग केल्याची चांदवड पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजीनगरला एकावर चॉपरहल्ला

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लहान मुलांचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या एकावर दोघांनी चॉपरने हल्ला केला. सातपूर परिसरातील शिवाजीनगर भागात ही घटना घडली. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकास अटक करण्यात आली आहे.

आशिष राजेंद्र जाधव (वय २६, रा. शिवाजीनगर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. गणेश जाधव हा त्याचा साथीदार मात्र फरारी झाला. या प्रकरणी रुपेश जव्हारीलाल छाजेड (३३, धर्माजी कॉलनी) यांनी तक्रार दिली. छाजेड गुरुवारी रात्री सह्याद्री कॅफेमागील अभ्यासिकेसमोरून पायी जात असताना ही घटना घडली. वाटेत लहान मुलांचे भांडण सुरू होते. त्यावेळी छाजेड यांनी मुलांना हटकले असता तेथे बसलेल्या दोघा संशयितांनी त्यांना अडवून शिवीगाळ केली, तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत त्यांच्यावर चॉपरने वार केले. हवालदार पाटीक्तपास करीत आहेत.

--

महिलेचा विनयभंग

घरात शिरून झोपलेल्या महिलेचा एकाने विनयभंग केला. ही घटना आनंदवली भागात घडली असून, या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी संशयितास अटक केली. हिरामण रामदास फसाळे (२६, आनंदवली) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. २६ वर्षांच्या महिलेच्या तक्रारीनुसार, पीडित महिला गुरुवारी दुपारी आपल्या घरात झोपलेली असताना घरात कुणी नसल्याची संधी साधत संशयिताने घराची आतून लावलेली कडी उघडून आत प्रवेश केला आणि महिलेचा विनयभंग केला. सहाय्यक निरीक्षक बुराडे तपास करीत आहेत.

--

सिडकोत भरदिवसा घरफोडी

सिडकोतील राणाप्रताप चौकात भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. त्यात रोकडसह सोने-चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दत्तात्रेय त्र्यंबक पाटील (राणाप्रताप चौक) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. पाटील कुटुंबीय शुक्रवारी सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. चोरट्यांनी भरदिवसात त्यांच्या बंद घराची कडी उघडून कपाटातील १२ हजार ५०० रुपयांची रोकड आणि सोने-चांदीचे दागिने असा सुमारे एक लाख ३१ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हवालदार सोनवणे तपास करीत आहेत.

--

श्रमिकनगरला चाकूहल्ला

घरासमोर वाहन उभे करीत असताना किरकोळ कारणातून एकाने दुसऱ्यावर चाकूहल्ला केल्याची घटना श्रमिकनगर भागात घडली. या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रवीण खंडारे असे संशयित आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी अशोक उत्तम त्रिभुवन (श्रमिकनगर) यांनी तक्रार दिली. त्रिभुवन शुक्रवारी दुपारी कामावरून घरी परतले असता ही घटना घडली. आपले वाहन घरासमोर उभे करीत असताना संशयिताने त्यांच्यावर हल्ला केला. वाहन उभे करून घराकडे जात असताना संशयिताने वाहन उभे करण्याच्या कारणातून पूर्वी झालेल्या वादाची कुरापत काढून त्रिभुवन यांना शिवीगाळ केली. यावेळी संतप्त झालेल्या संशयित खंडारे याने वाहनाच्या काचा फोडत त्रिभुवन यांच्यावर चाकूने वार केले. या घटनेत त्रिभुवन जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हवालदार दराडे तपास करीत आहेत.

--

राजीवनगरला एकाची आत्महत्या

महामार्गावरील राजीवनगर भागात राहणाऱ्या एका व्यक्तीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. या व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रमोद श्रीनिवास महाजन (राजीवनगर) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. महाजन यांनी गुरुवारी अज्ञात कारणातून राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना रात्री त्यांचा मृत्यू झाला. सहायक उपनिरीक्षक गोसावी तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मोदींच्या सभेवेळी ड्रोनला बंदी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी (दि. २२) पिंपळगाव बसवंत येथे येत असून सुरक्षेच्या दृष्टीने सर्वतोपरी उपाययोजना केल्या जात आहेत. शनिवारी सभास्थळी हेलिकॉप्टरचे तीन वेळा यशस्वी लँडिंग झाले. सभास्थळापासून पाच किलोमीटर परिघात ड्रोन उडविण्यास मज्जाव असल्याचे परिपत्रक जिल्हा प्रशासनाने काढले आहे.

नाशिक, दिंडोरी आणि धुळे लोकसभा मतदार संघातील शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी नाशिक जिल्ह्यात येत आहेत. सकाळी ११ ते पावणेबारा या वेळेत त्यांची पिंपळगाव बसवंत येथील जोपूळ रस्त्यावरील मोकळ्या मैदानात सभा होणार आहे. मोदी यांच्या सभेवेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत आहेत. सकाळी ओझर विमानतळावर आगमन झाल्यानंतर मोदी हेलिकॉप्टरने सभास्थळी दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शनिवारी हेलिकॉप्टरच्या लँडिंगची चाचणी सभास्थळी यशस्वीरित्या पार पडल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. सभेच्या ठिकाणी शनिवारपासूनच पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. शहर पोलिस आयुक्तालयातील प्रत्येक पोलिस स्टेशनच्या १५ कर्मचाऱ्यांना बंदोबस्तासाठी घेण्यात आले आहे. याखेरीज ग्रामीण पोलिसांसह विविध शाखांचे पोलिस कर्मचारीही कर्तव्यावर असणार आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्याची धुरा सांभाळणाऱ्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे ६५ सदस्य जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांच्या सूचनांनुसार पूर्वतयारी सुरू आहे.

लाखभर लोक येण्याचा अंदाज

पंतप्रधान मोदी यांची सभा ऐकण्यासाठी, ती अनुभवण्यासाठी एक लाखाहून अधिक लोक येतील असा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे या गर्दीचे व्यवस्थापन करण्याचे नियोजनही प्रशासनाकडून केले जात आहे. सभेसाठी येणाऱ्या नागरिकांना खाद्य पदार्थांचे पॅकेट्स देण्याचे आयोजकांचे नियोजन आहे. इडली व तत्सम आंबविलेले पदार्थ देऊ नयेत असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. सभेनंतर एक लाख नागरिकांना पुरी-भाजीचे पॅकेटस देण्याची व्यवस्था आयोजक करणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

काटेकोर नियोजन

निफाड : दिंडोरी आणि लोकसभा उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पिंपळगाव बसवंत येथील सभेचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे. पालकमंत्री गिरीश महाजन आणि आमदार अनिल कदम यांच्याकडे सभेच्या नियोजनाची जबाबदारी असून, त्याचे काटेकोर नियोजन सुरू आहे. जोपूळरोडवरील बाजार समितीजवळच्या ६८० एकर पडीक जागेवर होत असलेल्या या सभेसाठी सुमारे तीन हजार पोलिस कर्मचारी तैनात असणार आहेत. गेल्या १५ दिवसांपासून सभेच्या ठिकाणी उच्चस्तरीय पोलिस अधिकारी आढावा घेत आहेत. सभास्थळी मुख्य भाषणाचे स्टेज ४० बाय ३० फुटांचे असून, उंची आठ फूट आहे. डी-झोन स्टेजपासून ६० फुटांपर्यंत असेल. मंडपाची लांबी ७०० फूट असून, रुंदी ४०० फूट आहे. स्टेजजवळ व्हीआयपी कक्ष नियोजित आहे. सुमारे ३०० कर्मचारी या ठिकाणी रात्रंदिवस काम करीत असून, प्रत्येकाला ग्रामीण पोलिस दलातर्फे विशेष ओळखपत्र देण्यात आले आहे. सभामंडपाच्या समोर असणाऱ्या टेकडीजवळ खाली पंचवीस हजार गाड्यांच्या पार्किंगची सोय करण्यात आली आहे.

कांदाफेक आंदोलकांना नोटिसा

कळवण : पंतप्रधान मोदी यांच्या सभेत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे व कार्यकर्ते कांदा फेक आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिस यंत्रणेला मिळाल्याने कलम १४९ प्रमाणे त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करिना, करिश्माकडून बाळ येशूचे दर्शन

0
0

करिना, करिश्माकडून बाळ येशूचे दर्शन

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर, तिची बहिणी करिश्मा कपूर आणि त्यांची आई तथा जुन्या जमान्यातील प्रसिद्ध अभिनेत्री बबिता कपूर यांनी शनिवारी नाशिकरोड येथील बाळ येशूचे दर्शन घेतले. त्यांची ही खासगी भेट असल्याने त्याबाबत गुप्तता पाळण्यात आली होती, तरीही त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी उसळली होती. चर्चच्या सूत्रांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला.

कपूर कुटुंबीय सकाळी विमानाने मुंबईहून ओझर येथे आले. तेथून खासगी वाहनाने अकरा वाजता नाशिक-पुणे महामार्गावरील सेंट झेविअर्स शाळेत ते आले. त्यानंतर करिना, करिश्मा, बबिता कपूर, तसेच करिश्मा यांची मुले आणि मित्र यांनी बाळ येशूचे मनोभावे दर्शन घेतले. फादर ट्रेव्हर मिरांडा यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली. बाळ येशूचे हे मंदिर ख्रिस्ती बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचे असून, फेब्रुवारीत येथे तीन दिवस यात्रा भरते, तिला म्हणजे देश-विदेशांतून भाविक येतात, अशी माहिती फादर मिरांडा यांनी कपूर कुटुंबाला दिली. कपूर कुटुंबीयांच्या आगमनाचे वृत्त समजताच येथे चाहत्यांची गर्दी उसळली होती. चर्चचा कर्मचारीवर्ग आणि सुरक्षारक्षक यांना चाहत्यांना आवरणे अवघड झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जिंदगी कितनी खुबसुरत हैं...’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मनाचा ठाव घेणारे आणि जीवनाचे विविध पैलू उलगडणारे हिंदी गाणे जेव्हा सुरांचा मागोवा घेते; तेव्हा शब्दसूरांचा अनोखा मिलाफ घडतो. शनिवारची सायंकाळही शब्द आणि सुरांनी रसिकांना मोहवून टाकणारी ठरली. सायंकाळच्या वाऱ्याला साथ मिळाली ती सुमधूर हिंदी गीतांच्या मैफलीची. प्रसिद्ध अभिनेते प्रदीप वेलणकर यांनी विस्तृत केलेला गाण्यातील मतित अर्थ अन् स्वरमयी गाण्यांमुळे वातावरणालाही सुरांची लय साधली.

विश्वास ग्रुप तर्फे 'तकरार भी-इकरार भी' ही मैफल गंगापूर रोडवरील विश्वास लॉन्सजवळील हॉलमध्ये रंगली. यात सादर होणाऱ्या प्रत्येक गाण्याला रसिकांची भरभरून दाद मिळाली. अभिनेते वेलणकर यांनी मैफलीत अनेक रंग भरले. 'जिंदगी खुबसुरत हैं...', 'जहर हैं जिंदगी...' अन् 'दो रोज में वो प्यार का आलम गुजर गया' या सारखी सदाबहार गाणी रसिकांनी ऐकविण्यात आली. प्रत्येक गाण्यानंतर वेलणकर त्या गाण्याची माहिती रसिकांना सांगत होते. जुन्या हिंदी गाण्यांनी जणू रसिकांवर स्वरांची मोहिनी टाकल्याचे दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला मंडळ कॉलम

0
0

आम्ही साऱ्या जणी लोगो - फोटो आहे

- -

जय संताजी महिला मंडळ

- -

समाजातील महिलांना मनातील विचार मांडण्यासाठी एक व्यासपीठ असावे, या उद्देशाने १९८५ साली जय संताजी महिला मंडळाची स्थापना करण्यात आली. महिलावर्गासाठी विविध स्पर्धा घेतल्या जातात. सांस्कृतिक, सामाजिक कार्याच्या आयोजनातून महिलांच्या विकासाबरोबरच सामाजिक विकासासाठी महिला प्रयत्नशील आहेत. समाजाचे आपण काही देणे लागतो ही भावना मनात ठेवून आपल्या कार्यातून समाजाचे कल्याण व्हावे, यासाठी महिला मंडळातील महिला प्रयत्नशील असतात.

- -

कार्यक्रमांतून गुणदर्शन

अनेक महिलांमध्ये विविध कलागुण असतात. परंतु, हे कलागुण सादर करण्यासाठी व्यासपीठ प्रत्येकीलाच मिळते, असे नाही. त्यामुळे हे व्यासपीठ जय संताजी महिला मंडळ उपलब्ध करुन देत असते. विविध सांस्कृतिक गुणदर्शन महिला या व्यासपीठावर सादर करतात. तसेच गणेशउत्सव, नवरात्र, आरोग्याविषयी व्याख्यान, पाककला, भजन, विविध कार्यशाळा, महिलादिन असे कार्यक्रम, स्पर्धाही मंडळ आयोजित करत असते.

- -

२५ वर्षांपासून वधू वर मेळाव्यात कार्य

महिला मंडळाच्या समाजाकडून वधू वर मेळावा दरवर्षी आयोजित करण्यात येतो. यात मंडळातील सदस्य महिला हिरीरिने सहभाग घेतात. गेल्या २५ वर्षांपासून मेळावा नियमित आयोजित केला जातो. लग्नव्यवस्था सुदृढ रहावी, यासाठी मार्गदर्शन केले जाते. सर्व सदस्या मनापासून ही कार्य करत असतात.

- -

लहान मुलांनाही प्रोत्साहन

लहान मुलांच्या त्यांच्या आवडीनिवडींची जोपासणा करता यावी, लहान वयातच त्यांना विविध कला शिकता याव्यात, याचा विचार मंडळाकडून केला जातो. लहान मुलांसाठी विविध कार्यशाळा वर्षभर आयोजित केल्या जातात. त्यातील गणेशमूर्ती कार्यशाळा ही मोठी कार्यशाळा असते. पर्यावरण संवर्धनाचा विचार लहान वयात मुलामुलींवर रुजवला जातो.

- -

मंडळाची कार्यकारिणी

अध्यक्ष - सुनिता सोनवणे

सचिव - सरिता सोनवणे

उत्सव समिती - मनीषा पवार

सदस्य - अंजली आमले, उषा शेलार, संगीता कोते, शैला नेरकर, सोनाली रायनादे, मनीषा मोरे, वैशाली शैलार, कल्पना पवार, योगिता क्षीरसागर, सुमन बागले

- -

(संकलन - अश्विनी कावळे)

- -

पाठवा तुमच्या मंडळाची माहिती

प्रिय सखी,

आपलंही महिला मंडळ आहे? तुम्हीही विविध प्रकारचे उपक्रम राबवतात? तर मग, आजच आम्हाला त्याविषयी कळवा. आपल्या मंडळाची आजवरची कारकीर्द कशी आहे? आगामी काळाचे नियोजन काय आहे? हे सारे आपण 'आम्ही साऱ्या जणी' या कॉलमसाठी 'मटा'ला कळवू शकता. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या नावे व फोटोदेखील यामध्ये अपेक्षित आहे. मंडळाची माहिती ashwini.kawale@timesgroup.com या ई मेल आयडीवर किंवा महाराष्ट्र टाइम्स, तिसरा मजला, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड या पत्त्यावर पाठवावी. अधिक माहितीसाठी अश्विनी कावळे यांच्याशी ०२५३ - ६६३७९३८ या क्रमांकावर दुपारी १२ वाजेनंतर संपर्क साधावा.

- -

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोत, गोडसे भुजबळ आमने-सामने

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांनी शनिवारी शहरातील मतदारांवर लक्ष केंद्रीत केले. राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ आणि शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी सिडको आणि सातपूर भागात प्रचार रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी सिडकोत एका ठिकाणी गोडसे आणि भुजबळ यांची रॅली आमने-सामने आल्यानंतर दोन्ही उमेदवारांनी खिलाडू वृत्ती दाखवत एकमेकांना हात करून शुभेच्छा दिल्या.

लोकसभा निवडणूक प्रचाराला आता अवघा आठवडा शिल्लक राहिला असून, उमेदवारांनी वैयक्तिक भेटीगाठींऐवजी प्रचार रॅलींवर भर देण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे भुजबळ, शिवसेनेचे गोडसे, अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पवन पवार यांनी विजयासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. आता शक्तिप्रदर्शनावर जोर देण्यास सुरुवात केली आहे. शनिवार आणि रविवार सुटी असल्याने शहरातील मतदार घरीच असतात. याचा फायदा उचलण्यासाठी राष्ट्रवादीचे भुजबळ आणि शिवसेनेच्या गोडसेंनी शहरात प्रचार रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. हेमंत गोडसे यांनी देवळाली मतदारसंघात आणि सिडको भागात रॅली काढली. सिडकोत आमदार सीमा हिरे यांच्यासह गोडसेंनी मोटारसायकल रॅली काढून गल्लीबोळात जाऊन मतदारांशी संपर्क साधला. याच वेळी राष्ट्रवादीचे उमेदवार भुजबळ यांनीही सिडकोतच रॅली काढत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे दोन्ही उमेदवार सिडकोतील मतदारांना आवाहन करत असताना एकमेकांसमोर आले. यावेळी दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांनी एकमेकांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. परंतु, उमेदवारांनी मात्र ही भेट खिलाडू वृत्तीने घेत, एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी गोडसेंनी विजयाची खूण दाखवली, तर भुजबळांनी हात दाखवत आपल्याला मतदान करण्याचे आवाहन गोडसेंसह समर्थकांना केले.

कोकाटेंचा ग्रामीणवर जोर

गोडसे, भुजबळ, पवार या तीनही उमेदवारांनी शहरी भागात शनिवारीच प्रचार रॅली काढून प्रचार केला असताना, अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटेंनी मात्र ग्रामीण भागात शक्तिप्रदर्शन केले. कोकाटेंनी घोटी, इगतपुरी या परिसरात मतदारांच्या गाठीभेट घेत, सिन्नरमध्ये जोरदार सभा घेतली. शक्तिप्रदर्शन केले. नाशिकपाठोपाठ सिन्नरमध्ये कोकाटेंनी केलेल्या शक्तिप्रदर्शनाची चर्चा सिन्नरमध्ये रंगली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक पूर्वचे कर्मचारी मोबाइल गेममध्ये दंग!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक पश्चिम विभागीय कार्यालयापाठोपाठ नाशिक पूर्व विभागीय कार्यालयातही आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी शनिवारी दिलेल्या अचानक भेटीत विभागीय कार्यालयाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला.

ऑनलाइन प्रणाली कागदावरच असणे, कर्मचारी नागरिकांची कामे करण्याऐवजी मोबाइवर गेम खेळण्यात दंग असणे असे नागरिकांना वेठीस धरण्याचे प्रकार या पाहणीत समोर आले. त्यामुळे प्रशासकीय कामकाज सुधारण्याचा इशारा आयुक्त गमेंनी विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांना दिला. विभागीय कार्यालयांचा ढेपाळलेला कारभार गतिमान करण्यासाठी आयुक्त गमेंनी विभागीय कार्यालयांना भेटी देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेण्याचे काम सुरू केले आहे. गुरुवारी पश्चिम विभागीय कार्यालयाची पाहणी करीत विभागीय अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतल्यानंतर शनिवारी आयुक्तांनी नाशिक पूर्व विभागीय कार्यालयाला अचानक भेट दिली. यावेळी आयुक्त गमेंना नाशिक पश्चिमप्रमाणेच अनुभव आला. या ठिकाणीही कामकाजाबाबत अनागोंदी कारभाराचे दर्शन आयुक्तांना झाले. या कार्यालयात विविध अर्ज स्वीकृती, वाटप या कामांसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांकडून दिवसभरात अत्यल्प कामकाज होत असल्याचे आयुक्तांच्या पाहणीत आढळून आले. अनेक कर्मचाऱ्यांकडे पुरेसे कामकाज न सोपवल्याने ते स्वस्थ बसून होते. अनेक विभागांत एकाच कामासाठी एकापेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची नेमणूक केल्याने कामाचा खोळंबा झाल्याचे दिसून आले.

--

महत्त्वाची कागदपत्रे अस्ताव्यस्त

या कार्यालयातील विद्युत विभागातील कर्मचारी मोबाइलवर गेम खेळताना आढळून आले, तर दुसरीकडे महत्त्वाची कागदपत्रे अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. विभागीय कार्यालयाचे डिजिटलायझेशनही कागदावरच दिसून आले. त्यामुळे आयुक्तांनी विभागीय अधिकाऱ्यांची कानउघाडणी करतानाच कामकाजात सुधारणा करण्याचे निर्देश दिले. या दौऱ्याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त हरिभाऊ फडोळ, शहर अभियंता संजय घुगे आदी अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांना पर्यटनाची संधी

0
0

एलटीटी ते वाराणसी स्पेशल टीचर्स ट्रेन

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

रेल्वे गाड्यांच्या रिझर्वेशन अभावी उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये शिक्षकांच्या पर्यटन आनंदावर दरवर्षी विरजण पडत असते. मात्र, शिक्षकांची यंदा या समस्येतून मुक्तता होणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने लोकमान्य टिळक टर्मिनस ते वाराणसी दरम्यान खास शिक्षकांसाठी दोन रेल्वे गाड्या सोडण्याचे नियोजन केल्याने शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शिक्षकांना दरवर्षी मे आणि जून महिन्यात उन्हाळी दीर्घ सुट्या असतात. या कालावधीत शिक्षकांकडुन कुटुंबियांसह देशभर पर्यटनाचे नियोजन केले जात असते. परंतु रेल्वे गाड्यांना रिझर्वेशन मिळत नसल्याने शिक्षकांची मोठी गैरसोय होते. शिक्षकांची नेमकी हीच अडचण लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने लोकमान्य टिळक टर्मिनस ते वाराणसी दरम्यान दोन खास रेल्वे गाड्यांचे नियोजन केले आहे. या दोन्ही गाड्यांचे बुकिंग फक्त शिक्षकांसाठीच असणार आहे. त्यामुळे शिक्षकांनाही पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे.

----

स्पेशल टिचर्स ट्रेन वेळापत्रक आणि रिझर्वेशन

या दोन रेल्वे गाड्यांपैकी पहिली गाडी (क्र.०११०१) लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथून ६ मे रोजी रात्री १२.४५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.४० वाजता वाराणसी येथे पोहचेल. वाराणसीहून ही गाडी (क्र.०११०२) ७ मे रोजी सकाळी ८ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री १२.१५ वाजता एलटीटीला पोहोचेल. या गाडीला ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपुर, सतना, कटनी, माणिकपूर आणि अलाहाबाद जंक्शन या रेल्वे स्टेशनवर थांबा देण्यात आला आहे. दुसरी गाडी (क्र.०११०३) एलटीटीहुन १० जुन रोजी रात्री १२.४५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.४० वाजता वाराणसीला पोहोचेल. वाराणसीहून ही गाडी (क्र.०११०४) ११ जून रोजी सकाळी ८ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी एलटीटीला रात्री १२.१५ वाजता पोहोचणार आहे. गाडी क्र.०११०१ आणि ०११०४ साठीचे रिझर्वेशन बुकिंग आजपासून (२१ एप्रिल) सायंकाळी ३.३० वाजेपासून सुरू होईल. या गाड्यांची रिझर्वेशन सुविधा फक्त मुंबईत सीएसएमटी येथेच उपलब्ध आहे. गाडी क्र.०११०३ या स्पेशल गाडीसाठी काही वेगळे चार्जेसही लागू करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


'नाट्यपरिषद'मध्ये आज नाट्यवाचन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नाशिक शाखेचा पथदर्शी असलेला प्रकल्प 'नाट्यवाचन' पुन्हा एकदा समस्त नाट्यप्रेमींसाठी सुरू होत आहे. नाट्यवाचनाचे पहिले पुष्प आज (२१ एप्रिल) सायंकाळी ६ वाजता नाट्यपरिषद हॉल, कालिदास कलामंदिर, नाशिक येथे सादर होणार आहे. नाट्यवाचनाचा विषय 'भगव्या वाटा' असा असून लेखिका अरुणा ढेरे आहेत. दिग्दर्शन अपर्णा क्षेमकल्याणी व संगीत गौरव खैरनार यांचे आहे. अभिवाचक पल्लवी पटवर्धन आणि अपर्णा क्षेमकल्याणी आहे. अरूणाताईंच्या भगव्या वाटा या पुस्तकातील संत स्त्रियांच्या जीवनकथांचा मागोवा या नाट्यवाचनात घेतला जाणार आहे. सर्व नाट्यरसिक, नाट्यपरिषद सभासद यांनी नाट्य वाचनास उपस्थित राहावे असे आवाहन नाट्य परिषद नाशिक शाखा अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, प्रमुख कार्यवाह सुनील ढगे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘काव्यपंचमी’मध्ये नाशिककर रसिक चिंब

0
0

'पसा'च्या मैफलीत झाले कवितेचे गाणे

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भर उन्हात कधी पाऊस भेटीला येतो तर कधी रानवाटेतून कृष्ण हळूच डोकावतो, प्रेयसीच्या आठवणीने कधी हृदय पिळवटते तर सरोवराच्या काठावर कधी प्रियकर हसत येतो, कधी मन होते घुंगरू तर कधी मन होते विठ्ठल असा भावपूर्ण माहोल तयार झाला 'काव्यपंचमी' मैफलमध्ये. प. सा. नाट्यगृहात शनिवारी हा बहारदार कार्यक्रम रंगला.

मोहन उपासनी यांनी श्री व्यंकटेश बालाजी संस्थानच्या माध्यमातून शब्द-सूर-संवाद हा सीमेपलिकडल्या सर्जनशीलतेचा, एक नवा प्रयोग गेले वर्षभर राबवला. एक कवी आणि त्याच्या संगीतबद्ध केलेल्या कवितांचे सादरीकरण असे अनेक प्रयोग यापूर्वी झालेले असले तरी हा प्रयोग अभिनव होता. कविता स्वत: समजून घेण्यात आणि श्रोत्यांना उलगडून सांगण्यासाठी हा कार्यक्रम होता. कवीचे म्हणणे संगीतकाराला माहीत नाही आणि संगीतकाराच्या मनात उमटलेली कवितेच्या आशयाची वलये कवीला माहीत नाहीत, असे या कार्यक्रमाचे वेगळेपण होते. या दोन स्वतंत्र अनुभूती आणि त्या प्रथमच थेट अनुभवणारे रसिक श्रोते काव्यानंदामध्ये चिंब झाले.

'रोज सकाळी आठवणींनी पिळवटतो गाभा हृदयी', 'या सरोवराच्या काठी', 'देह झाला स्वर जेव्हा', 'पावसालाही असे हे', 'मन घुंगरू घुंगरू', 'स्तब्ध थबकली जणु पावले', 'नभाने धरेला', 'परतूनी ये रे कृष्णा', 'पाउस झणाणला', 'माळले मी चंद्र लाखो', 'अथांगतेवर दूर लाघवी', 'घन विठ्ठल', 'सळसळे शेला तुझा चांदण्यांचा', 'स्वर येई कुठूनसा कानी', 'आज झिम्मड धारांनी', 'नर्तनरंग' ही गाणी सादर करण्यात आली. 'तव भाळावरती चांद' या गाण्याने मैफलीचा समारोप करण्यात आला.

प्रारंभी उपासनी यांनी बालाजी भगवान यांची प्रार्थना घेतली. कवीपंचक व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुण्या आराधना कपाडिया यांच्या हस्ते कवीपंचक व गायक वादकांचा सन्मान करण्यात आला.

यांच्या काव्याला स्वरराजाचा शृंगार

कवी सी. एल. कुलकर्णी, कवी किशोर पाठक, कवी मिलिंद गांधी, कवी प्रशांत भरवीरकर, कवी नंदन रहाणे यांच्या रचनांना संगीतकार व सुप्रसिद्ध बासरीवादक मोहन उपासनी यांनी स्वरसाज दिला. या गीतांचे गायन ज्ञानेश्वर कासार, पुष्कराज भागवत, स्वागता पोतनीस, प्रांजली बिरारी-नेवासकर, रसिका नातू यांनी केले. बासरीचा स्वर मोहन उपासनी, तबल्यावर सतीश पेंडसे, ऑक्टोपॅडवर अभिजित वैद्य, सिंथेसायजरवर अनिल धुमाळ यांची साथसंगत होती. कार्यक्रमाचे अतिशय सुंदर नेपथ्य आनंद ढाकिफळे यांनी केले होते. ध्वनी पराग जोशी यांचा तर या कार्यक्रमाचे मनोवेधक निवेदन अलका कुलकर्णी यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हर्षल नाईक अखेर फरार

0
0

गुंतवणुकदारांचा जीव टांगला

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ग्राहकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या मिरजकर सराफ व त्रिशा जेम्स कंपनीचा मुख्य सूत्रधार हर्षल नाईकला कोर्टाने अखेर फरार घोषित करण्यासाठी नोटीस प्रसिद्ध केली. आर्थिक गुंतवूणक व सोने तारणावर दरमहा एक ते दीड टक्के परतावा देण्याचे अमिष दाखवून शेकडो गुंतवूणकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्याचा नाईकवर आरोप आहे. मात्र, गुन्हा समोर आल्यापासून हर्षल फरार झाला आहे.

गुंतवणुकदारांमध्ये खळबळ उडवून देणारा हा घोटाळ मे २०१८ मध्ये समोर आला. मिरजकर सराफ व त्रिशा जेम्सच्या संचालकांविरोधात सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्यान्वये (एमपीआयडी) जून २०१८ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा दाखल होण्यापूर्वी जवळपास तीन महिने हा घोटाळा दडपण्यासाठी प्रयत्न झाला होता. २५ हजार ४३९ ग्रॅम सोने आणि २५ कोटी रुपयांहून अधिक रकमेची या प्रकरणात फसवणूक झाली आहे. हर्षल नाईक या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार आहे. या गुन्ह्यातील संशयितांपैकी असलेले आशितोष चंद्रात्रे महेश मिरजकर, सुरेश भास्कर, भरत सोनवणे, विशाल नगरकर, विजयदीप पवार, प्राजक्ता कुलकर्णी व कीर्ती हर्षल नाईक यांना पोलिसांनी अटक केली. कोर्टाने १५ कोटी रुपये भरण्याच्या अटीवर संशयितांना जामीन देखील मंजूर केला. मात्र, संशयितांनी रकम भरण्यास असमर्थता दाखविली.

अटक केलेल्या संशयितांकडून अगदीच किरकोळ रक्कम तसेच इतर प्रॉपर्टी जप्त करण्यात आली. त्यामुळे फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांचा पैसा गेला कोठे, असा प्रश्न पोलिसांसमोर आहे. मागील वर्षाच्या सुरुवातीलाच हर्षलचा ठावठिकाणा परभणी जिल्ह्यात सापडला होता. त्यानंतर त्याचा कोणताही मागमुस पोलिसांना मिळाला नाही. गुन्ह्याचा मुख्य सूत्रधारच सापडत नसल्याने गुन्ह्याचा तपास पुढे सरकलेला नाही. वर्षभरानंतरही पैसे मिळण्याची शक्यता दिसून येत नसल्याने गुंतवणुकदारांचा जीव टांगणीला लागला आहे. हर्षलचा थांगपत्ताच मिळत नसल्याने तसा अहवाल कोर्टाला सादर केला. त्यानुसार कोर्टाने हर्षल याला फरार घोषित करण्याबाबतची नोटीस जाहीर केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंबेबहुला येथे विवाहितेचा गळफास

0
0

नाशिक : आंबेबहुला (ता. जि. नाशिक) येथील दीक्षिता बबन ढगे (वय, २१) या विवाहितेने आपल्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. विवाहितेच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी वाडिवऱ्हे पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दीक्षिताने शुक्रवारी रात्री अज्ञात कारणातून ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. अधिक तपास उपनिरीक्षक आहेर करीत आहेत.

वृद्धाचा मृत्यू

नाशिक : चक्कर येऊन पडल्याने श्रीहरी नामदेव आव्हाड (वय ६५, रा. महादेववाडी, सातपूर) यांचा मृत्यू झाला. ही घटना महादेववाडी भागात घडली. ही घटना शुक्रवारी रात्री जेवण आटोपून घराजवळ फेरफटका मारीत असतांना घडली. अचानक चक्कर येवून पडल्याने त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदा प्रदूषण केल्यास पोलिस कारवाई

0
0

दोन महिने होणार कारवाई

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुंबई हायकोर्टाच्या आदेशामुळे २०१४ पासून गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा गाजतो आहे. गोदा स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी महापालिकेपाठोपाठ पोलिसांकडे सोपविण्यात आली. मात्र, आज पाच वर्षांनंतरही हा प्रश्न जैसे थे असून, प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पुन्हा एकदा पोलिस मैदानात उतरविण्यात येत आहेत. पुढील दोन महिने प्रदूषण करणाऱ्यांवर पोलिस कारवाई करणार आहेत.

रामकुंड आणि गोदावरी नदी परिसरात प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने २०१४ मध्येच दिले आहेत. महापालिका, प्रदूषण नियंत्रण बोर्ड, एमआयडीसीपाठोपाठ पोलिसांना सुद्धा यासाठी हायकोर्टाने वेळोवेळी सूचना केल्या. दुर्दैवाने थोड्याफार दिवसांच्या कारवाईनंतर सर्व थंडबस्त्यात जाते. महापालिकेने रामकुंडावर सुरक्षारक्षक तैनात केले होते. मात्र, काही महिन्यांतच वेतनाचा वाद उपस्थित झाला आणि हे सुरक्षारक्षक माघारी फिरले. तत्पूर्वी गंगापूर, सरकारवाडा, पंचवटी, उपनगर आदी पोलिस स्टेशनमार्फत गोदा प्रदूषण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई झाली. या कारवाईचा अहवालसुद्धा वेळोवेळी हायकोर्टाला सादर झाला. पण, या द्राविडी प्राणायमानंतर गोदावरी प्रदूषणमुक्तीचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. आता परिमंडळ एकचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

...

पर्यावरणप्रेमींना शंका

नदीपात्रात कपडे, भांडे, मोटार वाहन, जनावरे धुणे, नदीपात्रात कचरा टाकणे, प्लास्टिक पिशव्या सोडणे अथवा नदीचे पाणी प्रदूषित होईल, असे कृत्य करणे यावर बंदी घालण्यात आली आहे. याकडे दुर्लक्ष करणाऱ्या व्यक्तींवर कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येणार आहे. प्रशासनाच्या या नवीन कार्यवाहीचा प्रदूषणावर कितपत परिणाम होईल, याबाबत पर्यावरणप्रेमींकडून शंका व्यक्त केली जाते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images