Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

दुष्काळातही राजदेरवाडीत नांदते जलसमृद्धी

$
0
0

pravin.bidve@timesgroup.com
Tweet : BidvePravinMT

नाशिक :

राजदेरवाडी विकासाच्या नकाशावर झळकण्यासाठी धडपडणारं गाव. अवघी १३९७ लोकसंख्या अन् ग्रामपंचायतीचे वार्षिक उत्पन्नही अवघे ७० हजार रुपये. गतवर्षी येथे सरासरीच्या निम्माच पाऊस पडला. तरीही यंदा गावाला पाणीटंचाईच्या झळा बसलेल्या नाहीत. त्याचे कारण तमाम ग्रामस्थांनी श्रमनिष्टने केलेले पाण्याचे नियोजन. तुलनेने अधिक पाऊस होऊनही आसपासची गावे टँकरखाली ओंजळ धरत असताना या गावात तप्त उन्हातही जलसमृध्दी नांदते आहे.

राजदेर, इंद्रायणी आणि कोलदेर तीन किल्ल्यांच्या कुशीत राजदेरवाडी (ता. चांदवड) वसले आहे. शेती आणि त्यातही कांद्याचे उत्पादन हेच बहुतांश गावकऱ्यांच्या रोजीरोटीचे साधन. सुमारे २५१ कुटुंब आणि १ हजार ३९७ येथील लोकसंख्या. ग्रामस्थांच्या भाषेत सांगायचं तर येथील जमीन हलकट. म्हणजेच फारशी कसदार नसलेली. परंतु, जलसंवर्धनाची कामे, माती परीक्षणानुसार पीक लागवड अन् आगपेटीमुक्त बांध यांसारख्या उपाययोजनांद्वारे ग्रामस्थांनी अशा जमिनीवर हिरवं शिवार फुलविलं आहे. पाण्याचे दुर्भिक्ष्य दूर करण्यासाठी डोंगर उतारावर चाऱ्या खोदून पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविण्याचे काम ग्रामस्थांनी हाती घेतले. त्यांच्या जिद्दीला पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेची साथ मिळाली. दिवसभर चरितार्थसाठी काबाड कष्ट करणारे शेतकरीबांधव सायंकाळी सात ते रात्री १२ या वेळेत गावहितासाठी श्रमदान करू लागले. सुमारे ८७५ ग्रामस्थांनी पावसाळ्यापूर्वी ४५ दिवस स्वतःला या भगीरथी प्रयत्नांत झोकून दिले. यातून पाणी अडविणे आणि ते साठविण्यासाठीची सीसीटी, डीप सीसीटी, दगडी बांध, माती नाला बांध, नाला खोलीकरण, तलाव खोलीकरण, विहीर पुनर्भरण, कंपार्टमेंट बंडिंग, गॅबियन बंधारे, साखळी बंधारे आदी कामे करण्यात आली.

गावात दरवर्षी सरासरी ८०० ते ८५० मिलीमीटर पाऊस पडतो. यंदा मात्र ४५० मि.मी. पाऊस झाला. तरीही जलसंधारणाच्या कामांचा फायदा आजही होतो आहे. दरवर्षी फेब्रुवारीतच ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू होते. यंदा एप्रिल उजाडूनही गरजेपुरते पाणी गावातच उपलब्ध होते आहे. अत्यल्प पाऊस होऊनही उपाययोजनांमुळे ९५ टक्क्यांपर्यंत क्षेत्र सिंचनाखाली आल्याचा आणि शेती उत्पन्नातही २५ टक्के वाढ झाल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. गावात विविध प्रकारच्या १५०० झाडांची लागवड करून ती जगविण्यात आली आहेत. याखेरीज गावात माती परीक्षणाचा प्रयोग १६६ शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये यशस्वी झाला आहे. रासायनिक खतांचा तसेच, पाण्याचा वापर कमी झाला. गावातच कंपोस्ट तयार केले जाते. सेंद्रिय शेतीकडे लोक वळत आहेत.

यंदा पावसाने साथ दिली तर गाव पाणीटंचाईच्या समस्येपासून कायमचे मुक्त होऊ शकते. गावकऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच गावाची वेगळी ओळख निर्माण होते आहे. पाणी फाउंडेशनच्या राज्यस्तरावरील वॉटरकप स्पर्धेत गावाचा समावेश झाला आहे. याखेरीज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छता अभियान या राज्यस्तरावरील स्पर्धेतही गाव आहे. तंटामुक्तीचा जिल्ह्याचा विशेष पुरस्कार मिळविण्याचाही आमचा प्रयत्न आहे.

- मनोज शिंदे, उपसरपंच, राजदेरवाडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘जेट’ला इंधन देण्यास नकार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

डबघाईला आलेल्या जेट एअरवेजमुळे नाशिक-दिल्ली विमानसेवा कोलमडली आहे. शुक्रवारी (५ एप्रिल) दुपारी १ वाजता आलेले विमान तब्बल सहा तासांनंतर दिल्लीकडे झेपावले. त्यामुळे तब्बल सहा तास प्रवाशांना ताटकळत रहावे लागले. येत्या सोमवारपासून नियमित सेवा मिळणार की नाही, याबाबत संदिग्धता आहे. उदंड प्रतिसादांनतरही दिल्ली सेवेची अशी अवस्था होत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे.

उडान योजनेअंतर्गत जेट एअरवेज कंपनीने जून २०१८ पासून नाशिक-दिल्ली विमानसेवा सुरू केली. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे तीन दिवस ही सेवा देण्यात येत आहे. १६८ आसन क्षमता असलेल्या बोईंग विमानाद्वारे दिल्या जाणाऱ्या या सेवेला ९० टक्क्यांहून अधिक प्रतिसाद आहे. यासेवेद्वारे कार्गो सेवाही बहरात आहे. दिल्लीमार्गे थेट युरोपात भाजीपाला नेणे शक्य झाले आहे. मात्र, सध्या जेट एअरवेज कंपनीची आर्थिक स्थिती प्रचंड खराब झाली आहे. कंपनीला १५०० कोटी रुपयांची आर्थिक मदत तातडीने आवश्यक आहे. मात्र, कंपनीच्या पाठिशी कुणीही उभे राहत नसल्याचे चित्र आहे. कंपनीकडून येणे थकल्याने इंधन पुरवठा थांबविण्याचा निर्णय इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (आयओसीएल) शुक्रवारी घेतला. त्याचा थेट फटका नाशिक-दिल्ली विमानसेवेला बसला आहे. सकाळी ११ वाजता दिल्लीहून निघालेले विमान ओझर विमानतळावर दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांनी आले. दिल्लीहून ९६ प्रवासी नाशिकला आले. त्यानंतर हे विमान नियोजित वेळेनुसार दुपारी १ वाजून २५ मिनिटांनी दिल्लीकडे झेपावणार होते. मात्र, विमानात इंधन भरणे आवश्यक होते. त्यामुळे जेटच्या अधिकाऱ्यांनी आयओसीएलकडे इंधनाची मागणी केली. पण, इंधन देण्यास नकार देण्यात आला. याबाबत मुंबई आणि दिल्लीच्या कार्यालयामार्फत विविध प्रकारची बोलणी करण्यात आली. मात्र तोडगा निघत नव्हता. अखेर विमान धावपट्टीवरच उभे होते. या साऱ्या दिरंगाईचा फटका नाशिकहून दिल्लीला जाणाऱ्या ९७ प्रवाशांना बसला. या सर्वांना पॅसेंजर टर्निमलमध्ये ताटकळत बसावे लागले. थकीत रक्कम देण्याचे आश्वासित करण्याचा प्रकार जेटच्या अधिकाऱ्यांकडून सुरू होता. अखेर सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास इंडियन ऑइलकडून इंधन देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर विमानात इंधन भरण्यात आले. अखेर सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास विमान दिल्लीकडे झेपावले. दरम्यान, काही प्रवाशांनी ओझर विमानतळावरुन परत जाणे पसंत केले. तर उर्वरीत प्रवाशांनी वाट बघून दिल्लीला जाणे पसंत केले.

जेटकडून दिशाभूल

विमानात इंधन नसल्याने दिल्लीला जाणे अशक्य होते. मात्र, याबाबतची कुठलीही कल्पना कंपनीच्या अधिकाऱ्यांनी प्रवाशांना दिली नाही. तांत्रिक कारणामुळे १५-२० मिनिटांत निघेल, अर्ध्या तासात प्रश्न सुटेल, असे कारण सांगितले जात होते. त्यामुळे थांबावे की परत जावे अशा द्विधा मनस्थितीत प्रवासी होते. ओझर विमानतळ परिसरात कुठल्याही सुविधा नसल्याने एकट्याने प्रवास करणाऱ्या महिला आणि मुली मोठ्या चिंतेत होत्या. तर, काही जणांबरोबर लहान मुले असल्याने त्यांची चिंता वाढीस लागली होती. अखेर सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान कंपनीने जाहिर करुन प्रवाशांना विमानात बसण्यास सांगितले.

सेवेबाबत अनिश्चितता

शुक्रवारची सेवा सहा तासांनी उशिरा मिळाली असली तरी सोमवारपासूनच्या सेवेचे काय? असा प्रश्न नाशिककरांना आणि प्रवाशांना पडला आहे. याबाबत जेट एअरवेजच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांच्याकडूनही समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. सोमवारच्या सेवेवबाबत आताच काही सांगणे शक्य होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नाशिकला सर्वप्रथम आणि भरघोस प्रतिसाद असलेली सेवा आता कोलमडण्याच्या अवस्थेत असल्याचे स्पष्ट होत आहे.

मी गाझियाबादचा आहे. व्यवसायानिमित्त मी नाशिकला आलो होतो. दुपारी १ वाजेची सेवा होती. मात्र, कंपनीने संध्याकाळपर्यंत काहीच माहिती दिली नाही. त्यामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. अखेर रात्री साडेआठला मी दिल्लीत पोहचलो आहे. माझा संपूर्ण दिवस वाया गेला.

- प्रशांत सिसोदिया, प्रवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावीतील मुलाचा हृदयविकाराने मृत्यू

$
0
0

सटाणा : सटाणा येथील गिरीश बच्छाव (वय १५) या मुलाचे शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. रिपब्लिकन पक्षाचे सटाण्याचे अध्यक्ष भारत बच्छाव यांचा तो मुलगा होता. गिरीशने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. अभ्यासाच्या ताणामुळे हृदयविकाराचा झटका आला असावा, अशी चर्चा सुरू होती.

सविस्तर वृत्त...२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हे तर नाशिकचे आसाराम बापू!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमधील महायुतीच्या मेळाव्यात शिवसेना नेते संजय राऊत आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भुजबळ कुटुंबीयांवर हल्लाबोल केला. साडेतीन वर्षे सरकारी पाहुणचार करून आलेल्या श्रद्धेय, पूजनीय अशा 'आसाराम बापू' अन् त्यांच्या कंपूची उर्फ भुजबळ कुटुंबीयांची नाशिककर जबाबदारी घेणार का, असा सवाल राऊत यांनी केला. तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या कर्तृत्वाचा काय पाढा वाचावा, तो सर्व नाशिककरांना माहीत आहे. एवढे होऊनही समीर निवडणुकीला उभे राहतात, हेच विशेष आहे, अशी टीका पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी नाशिकमध्ये केली.

नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजपा, रिपाइं, रासप, शिवसंग्राम महायुतीने यंदाही विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली आहे. गोडसे यांच्या प्रचारार्थ सायंकाळी हनुमानवाडी जवळील श्रद्धा लॉन्समध्ये मेळावा घेण्यात आला. मेळाव्याला महाजन यांच्यासह शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत, राज्यमंत्री दादा भुसे, आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, सीमा हिरे शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, मनपा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांसह शिवसेना, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महाजन म्हणाले,'महापालिकेत ८५ टक्के नगरसेवक शिवसेना भाजपचे आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत युतीचे उमेदवार गोडसेच विजयी होतील, हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही. गोडसे उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक मते घेऊन विजयी होतील असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला. देशाचे हित लक्षात घेऊन शिवसेना आणि भाजपने युती केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक प्रमुख नेते पक्ष प्रवेशासाठी रांगेत उभे असल्याचा दावा महाजन यांनी यावेळी केला. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात चमत्कारीक आकडा दिसेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भुजबळ यांनी कितीही पैसा वाटला, जाहिरातबाजी केली अथवा कुटनीतीचा अवलंब केला तरी नाशिककर भुजबळांना मत देणार नाहीत असा विश्वासही महाजन यांनी व्यक्त केला.

खासदार राऊत यांनी थेट भुजबळ कुटुंबीयांवर हल्लाबोल करीत, कारागृहाची वारी करुन आलेल्या उमेदवाराची जबाबदारी नाशिककर सोसणार नाहीत, असा दावा केला. यावेळी राऊत यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, बसपच्या अध्यक्षा मायावती यांच्यावरही टीका केली. राहुल यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याचा अधिकार नाही असे सांगत, अखंड हिंदुस्तानचे तुकडे करणाऱ्यांच्या पाठिशी जनता उभी राहणार नाही, असा दावा केला.

हम दो हमारे ४८
विरोधकांमध्ये एकवाक्यता नसतांना विरोधक राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा पराभव करायला निघाल्याची खिल्ली त्यांनी यावेळी उडवली. शिवसेना आणि भाजप एकत्र असून राज्यात आता 'हम दो आणि हमारे ४८ खासदार' निवडून येतील असा दावा राऊत यांनी यावेळी केला. नरेंद्र मोदी हे भारताचे शेर असल्याची पुस्तीही त्यांनी यावेळी जोडली.

मायावतींवर घसरली जीभ
बसपा अध्यक्षा मायावतीवंर टिका करतांना राऊतांची यावेळी जीभ घसरली. 'मी देशासाठी लग्न केले नाही' असा दावा करणाऱ्या मायावतींनी लग्न केले असते तर देश एक संकटातून मुक्त झाला असता अशी टीका केली. ज्यांनी लग्न केले नाही, त्या सगळ्यांना देशाचे पंतप्रधान करायचे का, असा सवाल करत मायावती देशाच्या पंतप्रधान झाल्या असत्या तर त्या कशा दिसल्या असत्या, अशा खालच्या शब्दांत त्यांच्यावर टीका केली. कुणीही उठते अन् पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहतो, अशी टीका त्यांनी यावेळी शरद पवार यांच्यावर केली.

राहुल यांच्या बुद्धिची किव
राहुल गांधी यांना कुठे काय बोलावे हे कळत नाही. त्यांच्या सभेत मोदींच्या नावाचा जयघोष होतो. मोदींनी जगभर दौरे करून सर्व जग आपल्या बाजूने वळविले आहे. पाच वर्षांत मोदींनी एक तासही सुट्टी घेतलेली नाही. राहुल गांधी यांच्या बुद्धीची किती कीव करावी हेच कळत नाही. त्यांच्या भाषणात रोज नवीन आयटम असतो. काँग्रेस कार्यकर्त्यांना स्वप्न पडत नाहीत, असे भाषण राहुल गांधी करतात अशी टीका महाजन यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी मतदानावर बहिष्कार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, चांदवड

ओझरखेड कालव्याला सोडण्यात आलेले पाणी पाटचारी क्रमांक ३२पर्यंत पोहचले आहे. मात्र पुढील दोन पाटचाऱ्या (३३ व ३४) वाहेगावसाळ (ता. चांदवड) शिवारात येतात. या दोन्ही पाटचाऱ्यांना पाणीपुरवठा केला जाणार नसल्याची माहिती शेतकऱ्यांना मिळाल्याने त्यांनी पाण्यासाठी मतदानवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे.

तालुक्यात भयावह दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे शेतकऱ्यांना पिकांचा विषय सोडून दिला आहे. मात्र निदान कुटुंबाला व शेतातील जनावरांना पिण्यासाठी तरी पाणी कालव्याच्या माध्यमातून मिळेल अशी अपेक्षा होती. त्यासाठी त्यांनी संबधित विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धन तसेच पालकमंत्री गिरीश महाजन यांची यांची भेट घेऊन त्यांना पाण्यासाठी लेखी साकडे देखील घातले होते. त्यावेळी होकार देण्यात आला होता.या पार्श्वभूमीवर १ एप्रिल रोजी ओझरखेड कालव्यास पाणी देखील सोडण्यात आले.ओझरखेड कालव्यावर ३४ पाटचारी असून त्यातील क्रमांक ३२ पाटचारी निफाड शिवारापर्यंत पाणी पोहचले असून, यापुढे पाणी जाणार नसल्याचे संबधित पालखेड पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितल्याने चांदवड तालुक्यातील पिंपळद, वाळकेवाडी, वाकी खुर्द व वाहेगावसाळ परिसरातील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी एकत्रितपणे मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून याआशयाचे लेखी निवेदन सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांना देण्यात दिले. निवेदनावर अरुण न्याहारकर, निवृत्ती न्याहारकर, निवृत्ती भागीनाथ न्याहारकर, सुनील न्याहारकर, तुकाराम खैरे आदी शेतकऱ्यांची नावे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतेसाठी लवकरच धावतील ८७ वाहने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव स्वच्छ भारत अभियानांतर्गत मंजूर असलेल्या घनकचरा प्रकल्पाच्या डीपीआरमधून महापालिकेने खरेदी केलेली ८७ वाहने आरटीओच्या रजिस्ट्रेशनअभावी पडून होती. मात्र, आता या वाहनांच्या नोंदणीला गती देण्यात आली असून, महिनाभरात ही वाहने रस्त्यावर येवून त्यांचा वापर करणे शक्य होणार आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत मंजूर घनकचरा व्यवस्थापनाच्या डीपीआरच्या निधीमधून महापालिकेने २ जेसीबी, ८५ घंटागाड्या अशी सुमारे ८७ वाहनांची खरेदी केली. खरेदी केलेली वाहने महापालिकेकडे दाखल होवून महिना पूर्ण झाला आहे. मात्र, त्यांची आरटीओकडे नोंदणी पूर्ण न झाल्याने त्या वाहनांचा वापर करता येत नव्हता. त्यामुळे ही वाहने सतरा मजली इमारतीच्या आवारात पडून होती. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी देखील प्रशासनाला वाहनांची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे या वाहनांच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. पहिल्या टप्प्यात २ जेसीबींची नोंदणी पूर्ण होवून त्यांना क्रमांक देखील मिळाले आहेत. तर दुसऱ्या टप्प्यातील २५ घंटागाड्यांची तांत्रिक पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे. खरेदी केलेल्या कंपनीचे प्रमाणपत्र आल्यानंतर त्यांनी देखील नोंदणी लवकरच होणार असल्याची माहिती वाहन विभागाने दिली. तसेच तिसऱ्या टप्प्यातील ६० घंटागाडींच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. लवकरच ही प्रक्रिया देखील पूर्ण होवून सर्व वाहने जळगाव महापालिकेला वापरण्यासाठी सज्ज होतील, अशी माहिती देखील वाहन विभागाने दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा अनुदानासाठी पुन्हा मुदतवाढ

$
0
0

निफाड : राज्य सरकारने कांदा उत्पादकांना अनुदानासाठी अर्ज करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. आता शेतकऱ्यांना १४ एप्रिलपर्यंत मुदत वाढवली असल्याचे पणन मंडळाने कळवले आहे. कांदा अनुदानासाठी अर्ज करण्याची मुदत २९मार्चपर्यंत होती. मात्र साईट बंद झाल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकरी वंचित राहणार असल्याने मुदत वाढवण्याची मागणी होत होती. त्यानुसार आता शेतकऱ्यांना १५ एप्रिलपर्यंत कांदा अनुदानासाठी अर्ज करता येणार आहे यानंतर बाजार समित्यांना आलेले अर्ज ३० एप्रिलपर्यंत जिल्हा निबंधक कार्यालयाकडे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महायुतीचे नगरसेवक सरसावले

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप महायुतीचे नाशिकचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांनी एकीकडे प्रचारासाठी ग्रामीण भागावर जोर दिला असतानाच नाशिक शहरात गोडसेंच्या प्रचाराची धुरा आता महापालिकेतील शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांनी खांद्यावर घेतली आहे.

शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांवर शहरातील सर्व ३१ प्रभागांत स्वंतत्रपणे प्रभागातील प्रचाराची धुरा सोपविण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या महापालिका निवडणुकीत एकमेकांविरोधात मते मागणारे शिवसेना-भाजपचे नगरसेवक प्रथमच युतीसाठी मत मागत असल्याचे चित्र निर्माण झाले असून, नगरसेवकांची झालेली ही दिलजमाई पाहून नागरिक मात्र सुखावले आहेत.

नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा ही महायुतीच्या जागावाटपानुसार शिवसेनेकडे आली असून, शिवसेनेने विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी दिली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात सहा आमदार असून, तीन आमदार भाजपचे, तर दोन आमदार शिवसेनेचे आहेत. सोबतच नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता आहे. मात्र, महापालिकेत शिवसेना विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढलेली असली, तरी शिवसेनेला उमेदवारी कायम ठेवण्यात यश मिळाले आहे. गेली साडेचार वर्षे एकामेकांविरोधात भांडत असलेले शिवसेना-भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते लोकसभा निवडणुकीनिमित्त एकत्र आणण्याचे प्रयत्न युतीकडून सुरू आहेत. दुसरीकडे दोन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये असलेली दुश्मनी मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही पक्षांतील नगरसेवक आणि नेते मात्र विसरताना दिसत आहेत. मतदारसंघात भाजपची ताकद असली आणि शिवसेनेचा उमेदवार असला, तरी भाजपने आता नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी एकदिलाने काम सुरू केले आहे.

--

नागरिक मात्र सुखावले

महापालिकेत भाजपचे ६५, तर शिवसेनेचे ३५ नगरसेवक आहेत. या दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांवर गोडसेंच्या प्रचाराची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शहरात ३१ प्रभाग असून, या प्रभागातील ज्येष्ठ नगरसेवकांवर त्या प्रभागात शिवसेना-भाजपच्या प्रचाराचे काम सोपविण्यात आले आहे. या प्रभागातील सर्व नगरसेवक एकदिलाने गोडसेंच्या प्रचारात उतरल्याचे चित्र आहे. सातपूर, नाशिकरोड, सिडको, पंचवटी, नाशिक पश्चिम आणि नाशिक पूर्व या सहा विभागांतील ज्येष्ठ नेत्यांकडे या नगरसेवकांच्या प्रचारावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत एकमेकांविरोधात लढणारे आणि भांडणारे नगरसेवक मात्र गोडसेंच्या प्रचारासाठी एकदिलाने मत मागत असल्याचे पाहून प्रभागातील नागरिक सुखावले आहेत.

--

विकासासाठीही एकत्र या

महापालिकेत भाजप सत्तेत असून, शिवसेना विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. त्यामुळे महापालिकेत शिवसेना-भाजपचे नगरसेवक एकमेकांविरोधात भूमिका घेतात. प्रभागांमध्येही शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांमध्ये फारसे सख्य नाही. परंतु, लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंच्या प्रचारासाठी शिवसेना-भाजपचे नगरसेवक एकदिलाने एकत्रितपणे प्रभागांमध्ये फिरत आहेत. त्यामुळे प्रभागातील विकासकामांसाठीही आपले नगरसेवक आता भांडण-तंटे बाजूला सारून एकदिलाने काम करतील, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

--

शिवसेना आणि भाजपची विचारधारा एकच आहे. त्यामुळे केंद्रात नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी शिवसेनेचे नाशिकमधील उमेदवार हेमंत गोडसेंना विजयी करणे दोन्ही पक्षांचे ध्येय आहे. त्यामुळे महापालिकेत आम्ही एकमेकांच्या विरोधात असलो, तरी विकास आणि देशहितासाठी शिवसेना-भाजपचे नगरसेवक एकत्रित येऊन महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करीत आहेत.

-अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेते, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गाव तेथे मानसोपचार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्य हे सर्वांगीण आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. मानसिक आजारांबाबत समाजात अनेक गैरसमज असून, त्याबाबत जनजागृती करण्यासाठी राज्यभरातील समविचारी मानसोपचार तज्ज्ञांनी एकत्र येऊन गाव तेथे मानसोपचार- राज्यव्यापी मनस्वास्थ जनजागृती अभियान हाती घेतले आहे.

या उपक्रमाचा प्रात्यक्षिक प्रकल्प ७ एप्रिल जागतिक आरोग्य दिनानिमित्त संपूर्ण राज्यात मुख्यतः ग्रामीण भागात राबविला जाणार आहे. या वेळी प्रकल्पाची संकल्पना 'नैराश्य -एक मानसिक आजार' ही असणार आहे. समाजातला मानसिक आजाराविषयीचा गैरसमज दूर करून समाजात मानसिक साक्षरता निर्माण करणे हा या अभियानाचा मूळ उद्देश आहे. हे अभियान सफल करण्यासाठी राज्यातील मानसोपचारतज्ज्ञ प्रयत्न करीत आहेत. गाव तेथे मानसोपचार या राज्यव्यापी अभियानांतर्गत मानसोपचार तज्ज्ञ डॉ. उमेश नागापूरकर रविवारी (दि.७) साई मंदिर, सोनार आळी, जव्हार जि. पालघर येथे सकाळी ८ वाजता ग्रामस्थांना याबाबत मार्गदर्शन करतील. याच दिवशी सकाळी १० ते १२ वाजेच्या दरम्यान मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हेमंत सोनानीस हे हरसूल तालुक्यातील देवीचा माळ येथे संवाद साधतील. या चर्चासत्रात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मानसोपचार तज्ज्ञांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुजबळांसाठी घेतला उमेदवारी अर्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. परंतु, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या समर्थकाने त्यांच्यासाठी उमेदवारी अर्ज घेतला. काँग्रेसचे दिनेश उन्हवणे यांनीही स्वत:च्या उमेदवारीसाठी अर्ज घेतला आहे. शुक्रवारी नऊ जणांनी १२ अर्ज घेतल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत चार जणांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. त्यामध्ये माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासह अन्य तिघांचा समावेश आहे. शुक्रवारी अमावस्या असल्याने नाशिक लोकसभा मतदारसंघातील एकही इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात फिरकला नाही. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ यांच्यासाठी गणेश पगार या समर्थकाने चार उमेदवारी अर्ज घेतले. याशिवाय काँग्रेसचे दिनेश शंकर उन्हवणे यांनीही काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. संघर्ष सेनेचे संजय किवळे यांच्यासह प्रिया जैन, वाळिबा जगताप, भारत आवारी, प्रसाद सांडभोर, विलास देसले आणि भाऊसाहेब सोनवणे यांनी अपक्ष लढण्यासाठी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. परंतु, आज कुणीही उमेदवारी अर्ज दाखल केले नाहीत. शनिवार आणि रविवार सुटी असल्याने आता सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांतच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची झुंबड उडणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमेदवारी अर्जांसाठी आस्तेकदम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सुरगाणा येथील विद्यमान आमदार जिवा पांडू गावित यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. अॅड. टिकाराम बागूल यांनीही आज पुन्हा तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. त्यामुळे शुक्रवारीदेखील सर्वच प्रमुख उमेदवारांचे अर्जांसाठी आस्तेकदम धोरण दिसून आले.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात माकपच्या वतीने आमदार गावित यांनी उमेदवारीसाठी दंड थोपटले आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील लढतही बहुरंगी आणि चुरशीची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गावित शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. त्यांच्या समवेत मनसेचे माजी आमदार नितीन भोसले, डॉ. डी. एल. कराड, राजू देसले, वसंत बागूल आदी उपस्थित होते. अर्जासमवेत द्यावयाचे प्रतिज्ञापत्र सोबत न जोडल्याने अर्ज दाखल करून घेण्याच्या प्रक्रियेला विलंब झाला. दरम्यान, माजी सनदी अधिकारी टी. के. बागूल यांनी गुरुवारी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले होते. शुक्रवारी पुन्हा त्यांनी तिसऱ्यांदा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. गावित आणि बागूल शनिवारी गुढीपाडव्याच्या दिवशी प्रचाराचा प्रारंभ करणार आहेत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून शुक्रवारी पाच व्यक्तींनी एकूण ११ उमेदवारी अर्ज घेतले. त्यामध्ये अशोक त्र्यंबक जाधव यांनी बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारीसाठी अर्ज घेतला आहे. याच पक्षाच्या उमेदवारीसाठी विष्णू कराटे यांच्याकरिता धर्मेंद्र जाधव यांनी अर्ज नेला. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बापू बर्डे यांनीही दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज घेतला असून, शिवाजी मोर यांनी अपक्ष उमेदवारीसाठी अर्ज घेतला आहे. दिंडोरी मतदारसंघात आतापर्यंत ३० जणांनी ५८ उमेदवारी अर्ज घेतल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. शनिवारी व रविवारी सुटी असल्याने उर्वरित सर्वच उमेदवार अर्ज भरण्यासाठी सोमवार आणि मंगळवारचा मुहूर्त साधणार असल्याने हे दोन्ही दिवस प्रशासनाचा कस पाहणारे ठरणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करसवलतीला नकारघंटा

$
0
0

मालमत्ता करसवलत योजना राबविण्यास आयुक्तांचा नकार

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या करसवलत या प्रोत्साहनपर योजनेपासून नाशिककरांना यंदाही वंचित रहावे लागणार आहे. एकाच वेळी वर्षभराचा कर भरल्यास नागरिकांना प्रोत्साहनपर काही रक्कम सूट देण्यास महापालिकेच्या कायद्यात तरतूद असतानाही तुकाराम मुंढे यांच्यापाठोपाठ आता आयुक्त राधाकृष्ण गमे यांनीही ही योजना राबविण्यास नकारघंटा दर्शवली आहे. बजेटमध्ये तरतूद नसल्याने तसेच, सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याचे सांगत गमेंनी सवलत योजनेबाबत कानावर हात ठेवले आहेत. त्यामुळे नाशिककरांना यंदाही पाच, तीन, दोन टक्के सवलतीला मुकावे लागणार आहे.

तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी करदात्या नाशिककरांना प्रोत्साहन देण्यासाठी मालमत्ता करात सवलत देण्याची योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत एप्रिल महिन्यात आगाऊ मालमत्ता कर भरणाऱ्या करदात्यांना घरपट्टीच्या देयकात पाच टक्के सवलत दिली जात होती. घरपट्टीची रक्कम मेमध्ये भरल्यास तीन, तर जूनमध्ये भरल्यास दोन टक्के सवलत दिली जात होती. तसेच, ही रक्कम ऑनलाइन भरली तर एक टक्का अधिक सवलत देण्यात येत होती. गेडाम यांच्या या योजनेला नाशिककरांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. गेडाम यांच्या या योजनेमुळे एप्रिल, मे, जून या महिन्यातच घरपट्टीचा तब्बल ४० टक्क्यांपर्यंत भरणा झाला होता. त्यामुळे नागरिकांसह पालिकेला त्याचा फायदा होत होता.

गेडाम यांच्यानंतर आयुक्तपदी विराजमान झालेल्या अभिषेक कृष्णा यांच्या कार्यकाळातही ही योजना सुरू राहिली. मात्र त्यानंतर आलेल्या मुंढे यांनी नाशिककरांवर एकीकडे अवाजवी करवाढ लादताना कायद्यात अंतर्भूत असलेली ही करसवलत योजना तोंडी आदेशाद्वारे बंद केली. महासभेने या योजनेच्या अंमलबजावणीला मंजुरी दिली असताना सभागृहाचे आदेश डावलत ही योजना बंद केली गेली. परंतु, मुंढेंनंतर आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारलेल्या गमे यांनीही करसवलत योजनेपासून नाशिककरांना वंचित ठेवले आहे. त्यामुळे आता महासभा आणि स्थायी समितीच्या निर्णयाकडे लक्ष लागून आहे.

...

आचारसंहितेचा अडसर

करसवलत योजना लागू करण्यासाठी बजेटमध्ये तरतूद करावी लागते. परंतु, प्रशासनाला या योजनेचा बजेटमध्ये समावेश करण्याचा विसर पडला. स्थायी समिती व महासभेतही या योजनेबाबत वेळीच निर्णय घेतला गेला नाही. तरीही प्रशासनाने आयुक्तांपुढे या योजनेबाबतचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु, सद्यस्थितीत लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू असल्याने ही योजना लागू करता येत नसल्याचा खुलासा आयुक्तांनी केला आहे. त्यामुळे नाशिककरांना यंदा या करसवलतीपासून वंतिच रहावे लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावाना आज बैठक

$
0
0

सावानामध्ये आज

सचिवपदासाठी बैठक

नाशिक : प्रमुख सचिवपदाच्या निवडीसाठी सार्वजनिक वाचनालय, नाशिकमध्ये आज (६ एप्रिल) सकाळी १० वाजता कार्यकारी मंडळाची बैठक होणार आहे. सावानामध्ये दोन गट पडले आहेत. दोन्ही गटातून प्रमुख सचिवपदासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. संस्थेचे सर्वच निर्णय या पदाकडे असल्याने आपली या जागी निवड व्हावी, यासाठी काहीजण इच्छुक आहेत. पैकी विद्यमान कार्याध्यक्ष आणि नाट्यगृह सचिव यांच्यापैकीच एकाकडे हे पद जाणार असल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४७० मतदान केंद्रांवर ‘वॉच’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बोगस मतदान व निवडणुकीत प्रक्रियेवर नजर ठेवण्यासाठी बीएसएनएल लाइव्ह वेबकास्टिंग आणि व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टीमचा वापर या निवडणुकीत केला जाणार असल्याची माहिती 'बीएसएनएल'चे महाप्रबंधक नितीन महाजन यांनी दिली. त्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांद्वारे 'बीएसएनएल'ची इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलन्स (संशयितांवर पाळत ठेवण्यासाठी)साठी नेमणूक केली आहे.

जिल्ह्यात एकूण ४७०० पोलिंग बूथ आहेत. त्यापैकी १० टक्के म्हणजे ४७० पोलिंग बूथ वेबकास्टिंगद्वारे इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलन्सखाली येणार आहेत. या ४७० पोलिंग बूथवर कॅमेरे बसविले जाणार असून, बूथवरील सर्व हालचाली तहसील मुख्यालयात असलेल्या निवडणूक कार्यालयात वेबकास्टिंगद्वारे थेट लाइव्ह दिसणार आहेत. त्यातून फेस रिकग्नायझेशनद्वारे जर कोणी व्यक्ती दुसऱ्यांदा गैर पद्धतीने मतदान करायला आली, तर सॉफ्टवेअर त्याला अचूक ओळखणार आहे. त्यासाठी त्वरित अॅलर्ट देऊन निवडणूक कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधून घेता येणार आहे. त्यामुळे मतदान करण्यापूर्वीसुद्धा त्याला रोखता येणार आहे. या घटनेचे चित्रीकरण सेव्हदेखील करता येणार आहे.

--

वाहनांवर ट्रॅकिंग स्टिस्टीम

निवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांवर लाइव्ह ट्रॅकिंग सिस्टीम बसविली जाणार आहे. वाहन कुठे किती वेळ थांबले, कुठे फिरले वा कक्षेबाहेर गेले का, या सर्व घटनेचे लाइव्ह अपडेट मिळणार आहे. त्यात काही तफावत असल्यास सॉफ्टवेअर अॅलर्ट देणार आहे. या सिस्टीममध्येसुद्धा सेव्ह हा ऑप्शन देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी बाटल्या जप्त

$
0
0

नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वे स्थानकात अनधिकृतपणे खाद्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध रेल्वे प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. अनधिकृत विक्रेत्यांकडून पिण्याच्या पाण्याच्या साडेचारशे सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. प्लास्टिक पिशव्यांना बंदी असूनही रेल्वेत विक्रेत्यांकडून त्याचा वापर होत असल्याने या ठिकाणी महापालिका कर्मचारीही तपासणी करीत आहेत. रेल्वेतून खाद्यपदार्थांची विक्री करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अधिकृत विक्रेत्यांची नेमणूक केलेली आहे. मात्र, अनधिकृत विक्रेत्यांची संख्या वाढत असल्याच्या तक्रारी आल्याने नाशिकरोड रेल्वे स्थानकात रेल्वे स्टेशन मास्तर आर. के. कुठार यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांनी अनधिकृत विक्रेत्यांकडून पाण्याच्या साडेचारशे सीलबंद बाटल्या जप्त केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालकांसाठी आज समुपदेशन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आपल्या पाल्याने जगात उल्लेखनीय कार्य करावे, अशी प्रत्येक पालकांची अपेक्षा असते. या अपेक्षेला अनुसरुन 'समर्थ ट्रस्ट'तर्फे पालकांसाठी समुपदेशन उपक्रमाची मुहूर्तमेढ गुढीपाडव्यानिमित्ताने रोवली जाणार आहे. 'मेक युवर चाइल्ड युनिक इन द वर्ल्ड' या संकल्पनेंतर्गत नामवंत समुपदेशक आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन आज, शनिवार (६ एप्रिल) रोजी नाशिककरांना मिळणार आहे.

दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या 'व्हिजन २०२०'चे ध्येय समोर ठेऊन समर्थ ट्रस्टने 'पालकत्व, समाज आणि देश' हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत पालकांच्या भावविश्वावर आधारित समुपदेशनाचे विविध कार्यक्रम शहरात राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचा प्रारंभ शनिवारी (६ एप्रिल) दुपारी १२.३० वाजता होणार आहे. कालिदास कलामंदिरात १२.३० ते ४ या वेळेत समुपदेशक आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन पालकांना मिळणार आहे. ट्रस्टचे सचिव मनीष मंजुल, निवृत्त लेफ्टनंट कर्नल अमित बत्रा, करिअर मार्गदर्शक डॉ. मंगेश भांगे, ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर आणि रंजिथ कुमार रेड्डी या तज्ज्ञांचे व्याख्यान कार्यक्रमात होईल. प्रत्येक तज्ज्ञ ३० मिनिटे मार्गदर्शन करणार असून, त्यानंतर पालकांना तज्ज्ञांसोबत संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. पालकांनी उपस्थित राहण्याचे ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रलय सरकार यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चव्हाण यांचे ‘वेट अॅण्ड वॉच’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दिंडोरी लोकसभा मतदार संघातील विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी 'वेट अॅण्ड वॉच' भूमिका घेतली आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी आता सोमवार व मंगळवार हे दोनच दिवस शिल्लक असल्यामुळे चव्हाण कधी ते दाखल करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत चव्हाण यांना विचारले असता त्यांनी अद्याप कार्यकर्त्यांबरोबर चर्चा सुरू असल्याचे सांगितले. राजकारणात काहीही घडू शकते असे सांगत त्यांनी सस्पेन्सही कायम ठेवला.

भाजपने राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षा असलेल्या डॉ. भारती पवार यांना उमेदवारी दिल्यामुळे कमालीचे नाराज असलेले चव्हाण बंड करणार असल्याची चर्चा आहे. पण, त्यांनी अद्याप कोणतीच भूमिका जाहीर न केल्यामुळे अनेकांचे हृदयाचे ठोके वाढले आहेत. २९ मार्च रोजी त्यांनी सुरगाणा येथील कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. त्यावेळेस संपूर्ण मतदार संघातील विधानसभा क्षेत्रनिहाय कार्यकर्त्यांची चर्चा करून दोन दिवसांत निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले होते. पण, आता त्याला आठवडा उलटला असला तरी त्यांची भूमिका समोर न आल्यामुळे भाजपची चिंता वाढली आहे.

राष्ट्रवादीमध्ये चलबिचल

राष्ट्रवादी काँग्रेसने अगोदरच शिवसेनेतून आलेले माजी आमदार धनराज महाले यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांनी प्रचाराच्या तीन फेऱ्यासुद्धा पूर्ण केल्या आहेत. असे असताना राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी चव्हाण यांच्याशी संपर्क साधल्याची चर्चाही रंगली. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये चलबिचल सुरू आहे. या विषयावर चव्हाण यांना विचारले असता राजकारणात काहीही घडू शकते. जळगावमध्ये घडलेच ना, असे सूचक उत्तरही त्यांनी दिले. दरम्यान, भाजपचे नेते चव्हाण यांच्या संपर्कात असून त्यांनी बंड करू नये यासाठी त्यांची मनधरणी केली जात आहे. त्यांना वेगवेगळी आश्वासनेही दिली जात असल्याची चर्चा आहे. पण, याबाबत कोणतीही माहिती पुढे आलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुढीपाडवा मतदान वाढवा उपक्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जास्तीत जास्त मतदारांनी लोकसभा निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हावे आणि मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी 'गुढीपाडवा मतदान वाढवा' या उपक्रमाचे आयोजन केले आहे. आज, शनिवारी (दि. ६) सकाळी सात वाजता गोल्फ क्लब मैदान येथून मतदान जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे.

लोकसभा निवडणुकीत १०० टक्के मतदान व्हावे यासाठी निवडणूक आयोग आग्रही आहे. लोकशाही सशक्त व सुदृढ करण्यासाठी प्रत्येक जबाबदार नागरिकाने मतदानाचा हक्क बजावावा यासाठी जिल्हा प्रशासनही प्रयत्नशील आहे. यामुळेच जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, सकाळी सात वाजता गोल्फ क्लब मैदान येथून रॅलीला सुरुवात होईल. यावेळी जिल्हाधिकारी मांढरे यांच्यासह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेंद्र गिते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सरकारी कार्यालयांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह विविध शाळांचे शिक्षक, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. त्र्यंबकनाका-शालिमार- रेडक्रॉस-मेहेर सिग्नल-सीबीएस-त्र्यंबकनाका-गोल्फ क्लब असा रॅलीचा मार्ग आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आई-वडिलांना पत्र लिहून मतदान करण्याबाबत आवाहन करणे तसेच रॅलीत सहभागी सदस्यांनी प्रत्येकी पाच व्यक्तींना पत्र पाठवून मतदान करण्याचे आवाहन करावे, असे आवाहन जिल्हा समन्वय समितीने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभिजात भारतीय संगीताची उद्या मैफल

$
0
0

तिकिटावर खास सवलत

..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्सच्या 'कल्चर क्लब' सदस्यांसाठी मराठी नववर्ष दिनानिमित्त सुप्रसिद्ध गायक महेश काळे यांच्या सुरेल मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. शास्त्रीय, उपशास्त्रीय अशा अभिजात भारतीय संगीताची दुर्मिळ मैफल रविवारी (७ एप्रिल) सायंकाळी ७ वाजता नंदनवन लॉन्स, सावरकरनगर, गंगापूर रोड या ठिकाणी रंगणार आहे.

नववर्षाचे स्वागत सुरेल संगीत मैफलीने करण्याची संधी कल्चर क्लब सदस्यांना मिळणार आहे. महेश काळे यांच्या मैफलीचे तिकीट खास सवलतीच्या दरात कल्चर क्लब सदस्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. मैफलीचे एक तिकीट ५०० रुपयांचे असून, दोन तिकिटे खरेदी केल्यावर ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच, नव्याने कल्चर क्लब सदस्य होणाऱ्यांना सदस्य शुल्कासह तिकीट खरेदी करावे लागेल. प्रत्येक सदस्याला किमान दोन तिकिटांपुरतीच सवलत देण्यात येईल. या सुरेख संधीचा लाभ घेण्यासाठी आणि सवलतीच्या दरात तिकिटे खरेदी करण्यासाठी दुपारी १ ते ६ या वेळेत ९४२२५१३५६९ या क्रमांकावर किंवा महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा स्केअर, डिसुझा कॉलनी, कॉलेज रोड या पत्त्यावर संपर्क साधा.

..

\B२९९ रुपयांत व्हा सदस्य\B

'मटा कल्चर क्लब'चे सदस्यत्व केवळ २९९ रुपयांत होता येणार आहे. त्यासाठी आजच ऑनलाइन सभासदत्वासाठी www.mtcultureclub.com या वेबसाइटला किंवा महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यालयाला भेट द्या.

...

\Bकार्यक्रम : महेश काळे यांची मैफल\B

कधी : ७ एप्रिल २०१९

किती वाजता : संध्याकाळी ७ वाजता

कुठे : नंदनवन लॉन्स, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपा आयुक्तांची लोकायुक्ताकडे तक्रार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सातपूरमधील स्वागत हाइटस इमारतीला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिल्यानंतर इमारत अनधिकृत ठरवून पाणीपुरवठा खंडित केल्याप्रकरणी इमारतीतील रहिवाशांनी थेट लोकायुक्तांकडे धाव घेतली आहे. पालिकेतील अधिकाऱ्यांना पाठिशी घालण्यासाठीच आयुक्तांकडून रहिवाशांची पिळवणूक केली जात असल्याचा आरोप करीत संबंधित दोषी अधिकाऱ्यांसह आयुक्तांवर कारवाई करण्याची मागणी लोकायुक्तांकडे करण्यात आली आहे.

सातपूर विभागातील स्वागत हाइट्स या इमारतीला महापालिकेच्या नगररचना विभागातर्फे १९ डिसेंबर २०१३ रोजी बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्यात आला होता. परंतु, सोसायटीतील अंतर्गत वादातून झालेल्या तक्रारींनंतर २७ मार्च २०१८ रोजी अचानक मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांनी या इमारतीची उंची मोजली असता ती मंजुरीपेक्षा ३५ सेंटिमीटर अधिक असल्याचे आढळून आले. त्यामुळे महापालिकेने ही इमारत अनधिकृत ठरवून २१ ऑगस्ट २०१८ पासून इमारतीचा पाणीपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे गेल्या २२५ दिवसांपासून इमारतीतील ६० रहिवाशांना पाण्यावाचून रहावे लागत आहे. या इमारतीतील रहिवाशांनी आयुक्त गमे यांची भेट घेत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती. परंतु, जोपर्यंत मंजुरीपेक्षा अधिक असलेली इमारतीची उंची कमी करून सुधारित लेआऊटला मंजुरी घेतली जात नाही अथवा अग्निप्रतिबंधक उपाययोजना बसविली जात नाही, तोपर्यंत इमारतीचा पाणीपुरवठा जोडता येणार नाही, अशी भूमिका आयुक्तांनी घेतली आहे. या सगळ्या प्रकारात इमारतीतील रहिवाशांची चूक नसतानाही, त्यांना शिक्षा भोगावी लागत आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनीच तिची मोजणी करून पूर्णत्वाचा दाखला दिला आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकारात अधिकाऱ्यांचा दोष असताना, पालिकेने त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी सोसायटीच्या रहिवाशांना शिक्षा दिली आहे. यावर उपाय म्हणून इमारतीची उंची पालिकेने कमी करून द्यावी, अशी मागणीही रहिवाशांनी केली आहे. परंतु, त्याकडे पालिकेने दुर्लक्ष केले आहे. स्थानिक रहिवाशांनी दोषी बांधकाम व्यावसायिकाविरोधात पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात दोषी असलेल्या पालिकेच्या अधिकाऱ्यांविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांनी महापालिकेकडे परवानगी मागितली आहे. मात्र, पालिका प्रशासनाकडून त्यासही विलंब केला गेला. यातून संबंधित दोषी अधिकाऱ्यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे, अशी तक्रारही इमारतीतील रहिवाशांकडून आता थेट लोकायुक्तांकडे करण्यात आली आहे. त्यामुळे या इमारतीला परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांची अडचण अधिकच वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images