Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कैद्याची निफाडमध्ये पोलिसांच्या हाती तूरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

येथील न्यायालयात तारखेसाठी हजर करण्यात आलेला कैदी पोलिसांच्या हाताला झटका देऊन दुचाकीस्वाराच्या पाठीमागे बसून पळून गेला. निफाड बस स्थानक आवारात ही खळबळजनक घटना घडली आहे . श्रावण सुरेश पिंपळे उर्फ सावण्या(वय २५) असे या कैद्याचे नाव आहे.

नाशिकरोड कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या श्रावणला तारखेसाठी निफाड येथील न्यायालयात आणण्यात आले होते. त्याला १८ एप्रिल अशी पुढील तारीख मिळाल्यानंतर पोलिस हवालदार एस. यू. शिरसाठ व कॉन्स्टेबल बी. आर. नाथ यांनी नाशिकरोडला नेण्यासाठी बस स्थानकात आणले. पाणी पिण्याच्या बहाण्याने थांबलेला श्रावण ग्लास फेकून आणि पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळाला. काही अंतरावर एका हेल्मेट घातलेल्या चालकाच्या दुचाकीवर बसून तो फरार झाला .

पोलिसांनी पाठलाग केला पण हा कैदी फरार होण्यात यशस्वी झाला. बस स्थानक परिसरात आलेल्या दुचाकीवरून तो फरार झाल्याने हा पूर्वनियोजित डाव असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान पोलिसांनी नाकाबंदी करीत कैद्यासह फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या दुचाकीचालकाचाही शोध सुरू केला आहे. श्रावणने अंगात काळ्या रंगाचा शर्ट आणि राखाडी रंगाची पॅन्ट परिधान केलेली आहे. त्याच्यावर जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर अनेक जबरी गुन्हे दाखल आहेत. गेल्या दोन वर्षांपासून तो नाशिकरोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पंचवीस हजार चौरस फूट महारांगोळीने वेधले लक्ष

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक राष्ट्रीय विकास मंडळ, संचलित नववर्ष यात्रा स्वागत समितीतर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, गुरुवारी राजमाता जिजाऊसाहेब यांच्या ४२१ व्या जयंती वर्ष निमित्ताने २५,००० चौरस फुटाची महारांगोळी पाडवा पटांगण, गोदाघाट येथे रेखण्यात आली. अंजनेरी येथील विवेकानंद आश्रमाचे स्वामी अखंडानंद, सिनेट सदस्य रुपाली खैरे, समाजसेविका वृंदा लवाटे, वीर पत्नी रुपाली बच्छाव यांच्या उपस्थितीत गुढी पूजनाने महारांगोळीस प्रारंभ करण्यात आला. यावर्षी आपले सण आपली संस्कृती हा महारांगोळीची विषय असून मानवी जीवन, संस्कृती व अध्यात्म यांचे सामंजस्य महारांगोळीतून दर्शविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मानवी शरीरातील सप्तधातू हे विविध सात रंगांनी दर्शविण्यात आले आहेत. उत्पत्ती, स्थीती आणि लय यांची दैवते म्हणून ब्रह्मा, विष्णू, महेश यांची मूर्ती ठेवण्यात आली आहे. यासोबत वात-पित्त-कफ हे त्रिदोष, सत्व-रज-तम हे तीन गुण, चतुर्वेद-चतुर्पुरुषार्थ-चतुराश्रम यांचे दिग्दर्शन या रांगोळीतून करण्यात आले असून, या भव्य रांगोळीला समर्पण भावाचे प्रतीक असणाऱ्या कासवाचा आकार देण्यात आला आहे. भारतीय संस्कृतीतील त्यागाचे प्रतीक असलेल्या भगव्या रंगाला भव्य प्रमाणात प्रतिनिधीत्व देण्यात आले आहे. याशिवाय महारांगोळी पूर्वी शहरातून गटनिहाय ज्या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या त्यातील चरित्र निर्माण, कौटुंबिक स्नेहभाव, स्वावलंबन, आरोग्यविचार, कृतज्ञता, नारी शक्ती आदी विषयांना सुद्धा या महारांगोळीत महत्त्वाचे स्थान देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंभरवेळा दूषित पाणीपुरवठा

$
0
0

पाणीपुरवठा विभागाच्या अहवालातील धक्कादायक माहिती

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पाणीपुरवठा करीत असल्याचा महापालिकेचा दावा फोल ठरला असून, गेल्या ११ महिन्यांमध्ये शहरातील विविध भागांत तब्बल ११४ वेळा दूषित पाणीपुरवठा झाल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अहवालातून समोर आली आहे. शहरात गावठाण आणि जुने नाशिक भागात सर्वाधिक ३० वेळा दूषित पाणीपुरवठा झाला आहे. शहरात सप्टेंबरमध्ये सर्वाधिक दूषित पाणीपुरवठा झाल्याचे अहवालात नमूद केले आहे. या दूषित पाणीपुरवठ्यामुळे मात्र नाशिककरांचे आरोग्य धोक्यात असल्याचे समोर आले आहे.

सुमारे वीस लाख लोकसंख्या असेलल्या नाशिक शहराला गंगापूर आणि दारणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. महापालिकेच्या सहा जलशुद्धीकरण केंद्रात पाण्यावर प्रक्रिया करून ते शहरातील विविध भागातील सुमारे १०९ जलकुंभांपर्यंत पोहोचवले जाते. या जलकुंभातून सुमारे १८०० किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्यांद्वारे ते नागरिकांच्या घरोघरी पोहोचविले जाते. नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा होतोय की नाही याची पडताळणी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने केली जाते. नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होऊ नये तसेच, पाण्यासंदर्भात कोणी घातपाती कारवाया करू नये, याची दक्षता पालिकेकडून घेतली जाते. पालिकेकडून दरमहा शहरातील पाण्याचे नमुने तपासले जातात. पाणीपुरवठा विभागातर्फे पंपिंग स्टेशन ते नागरिकांच्या घरापर्यंत पुरविल्या जाणाऱ्या पाण्याची विविध पातळ्यांवर वेळोवेळी तपासणी केली जात असते. या माध्यमातून गेल्या ११ महिन्यांत तब्बल १०,४४१ पाणी नमुन्यांची तपासणी केली गेली. यापैकी ११४ ठिकाणचे पाणी दूषित असल्याचे आढळून आले, तर १० हजार ३,३२६ पाणीपुरवठ्याचे नमुने शुद्ध असल्याचे आढळून आले. क्लोरिनेशनच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होणे, व्हॉल्व तसेच जलवाहिनी लिकेज होऊन त्यात सांडपाणी प्रवाहित होणे, जंतूंचा संसर्ग होणे, जलकुभांचे झाकण उघडे राहून त्यात पक्षी मरून पडणे आदी कारणांमुळे दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा दावा पालिकेने केला आहे.

...

सप्टेंबरमध्ये सर्वाधिक दूषित पाणी

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केलेल्या तपासणीत ११४ पैकी सप्टेंबर २०१८ मध्ये सर्वाधिक ४६ पाणीनमुने दूषित असल्याचे आढळून आले. विशेषत: ११४ पैकी सर्वाधिक दूषित ३० नमुने हे जुने नाशिक, रविवार कारंजा, द्वारका परिसरात आढळून आले. या भागातील पाइपलाइन खराब झाल्याने दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. सातपूरमध्ये सर्वाधिक कमी दूषित पाण्याचे नमुने आढळून आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वंचित बहुजन आघाडीतर्फे अर्ज दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

वंचित बहुजन आघाडीतर्फे जळगाव लोकसभेसाठी अंजली बाविस्कर यांनी तर रावेर मतदारसंघासाठी नितीन कांडेलकर यांनी गुरुवारी (दि. ४) उमेदवारी अर्ज दाखल केले. या वेळी दोन्ही उमेदवारांनी दुपारी १ वाजता जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपले उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केले.

या वेळी जळगाव लोकसभेच्या उमेदवार अंजली बाविस्कर यांनी जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांच्याकडे अर्ज दाखल केला. या वेळी प्रमोद इंगळे, किशोर निकुंभ, सुजाता ठाकूर, दिनेश ठाकूर, सूर्यकांत भालेराव उपस्थित होते. तर रावेर मतदारसंघाचे उमेदवार नितीन कांडेलकर यांनी अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे अर्ज दाखल केला. या वेळी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, बाळा पवार, छाया सावळे व संजय कांडेलकर उपस्थित होते. आज दुपारी सागर पार्क वरुन शक्ती प्रदर्शन करीत शेकडो कार्यकर्तेसह जिल्हाधिकारी कार्यालयात परिसरात दाखल झाले होते.

रावेर मतदारसंघाचे निरीक्षक जळगावात
रावेर लोकसभा मतदारसंघासाठी सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक डॉ. अजयकुमार हे जळगावात दाखल झाले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने लोकसभा मतदारसंघनिहाय सर्वसाधारण निवडणूक निरीक्षकांची नेमणूक केली आहे. त्यानुसार रावेर लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून डॉ. अजयकुमार यांची नेमणूक करण्यात आली आहे. निवडणुकीसंबंधी त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९४२२९४५४२८ हा आहे. नागरिकांना निवडणुकीसंबंधी काहीही तक्रार दाखल करावयाची असल्यास त्यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहननिवडणूक निर्णय अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दाम्पत्यासह पुतण्याचाखाणीत बुडून मृत्यू

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात पती-पत्नीसह पुतण्याचा खाणीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (ता. ४) सकाळी दहाच्या सुमारास सय्यद पिंप्री येथे घडली. सविता नंदू वराडे (वय ३०), नंदू वराडे (३४) आणि केशव वराडे (२३) अशी बुडून मृत्युमुखी पडलेल्या तिघांची नावे आहेत.

सय्यदपिंप्रीजवळ खाणीत पाणी साचले असून, तिथे सविता कपडे धुण्यासाठी गेल्या. एक चादर पाण्यात थोडी दूर गेली. ती घेण्यासाठी पुढे वाकलेल्या सविता यांचा तोल गेल्याने बुडाल्या. त्याच वेळी सविता यांना वाचविण्यासाठी पती नंदू वराडे यांनी पाण्यात उडी घेतली. मात्र, त्यांना पोहता येत नसल्याने दोघांनी बचावासाठी आरडाओरड केली. हा प्रकार पाहून त्यांचा पुतण्या केशव बचावासाठी पुढे आला. त्यानेही पाण्यात उडी घेतली. मात्र, खोल पाणी आणि चिखल यात केशव फसला. खाणीजवळ सुरू असलेल्या या मृत्युतांडवाची माहिती ग्रामस्थांना समजली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तत्पूर्वीच तिघांचा बुडून मृत्यू झाला. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाला तब्बल अडीच तासांच्या शोधमोहिमेनंतर तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक सार्थक नेहते तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्वानाच्या पिलास रॉडने मारहाण

$
0
0

श्वानाच्या पिलास

रॉडने मारहाण

नाशिक : रॉडने मारहाण करीत श्वानाच्या पिलास गंभीर जखमी केल्याप्रकरणी भरत नेरकर (रा. एकदंत अपार्ट, मखमलाबाद) याच्याविरूद्ध प्राणी क्रुरता निवारण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी शरण्या शशिकांत शेट्टी यांनी म्हसरूळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. नेरकर यांनी १ एप्रिल रोजी सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास घरासमोर बसलेल्या श्वानाच्या पिलास लोखंडी रॉडने जबर मारहाण करीत जखमी केले. या घटनेची माहिती मिळताच शेट्टी यांनी म्हसरूळ पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. शेट्टी या भटक्या श्वानांच्या पूनर्वसनासाठी काम करतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मटा’संगे शिका डेझर्ट मेकिंग

$
0
0

'मटा'संगे शिका डेझर्ट मेकिंग

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

डेझर्ट हा सर्वांच्याच आवडता प्रकार. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच गोड डेझर्ट आकर्षित करत असतात. हल्ली तर परदेशात आवडीचे असलेले डेझर्ट आपल्याकडेही सहजपणे मिळतात. परंतु, असे डेझर्ट घरी बनविण्याची मजा वेगळीच असते. हे ओळखत महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे डेझर्ट मेकिंग वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. ७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता हॉटेल रॉयल हेरिटेज, शालिमार येथे हे वर्कशॉप होणार आहे. फज ब्राउनी, रेड वेलवेट लावा केक, चिया फ्रुट कस्टर्ड पुडिंग असे विविध प्रकारचे डेझर्ट रितू मेहरा यावेळी शिकविणार आहेत. कल्चर क्लब सदस्यांसाठी १०० रुपये तर इतरांसाठी ४०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. वर्कशॉपमध्ये सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करणे गरजेचे असून ९४२२५१३५६९ या क्रमांकावर किंवा महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा स्केअर, डिसुझा कॉलनी, कॉलेज रोड या पत्त्यावर संपर्क दुपारी १ ते ५ वेळेत संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा उत्पादकांचा सटाण्यात रास्तारोको

$
0
0

म. टा. वृत्तसेवा सटाणा

तब्बल आठ दिवसांपासून बंद असलेल्या सटाणा कृषि उत्पन्न बाजार समितीमधील लिलाव गुरुवारी होण्यापूर्वीच संतप्त कांदा उत्पादकांनी बाजार समिती कार्यालयाबाहेर घोषणा देत सटाणा-मालेगाव राज्य महामार्गावर रास्तारोको केला. दरम्यान प्रशासनाने तातडीने संचालक मंडळाची बैठक घेवून दुपारी दोन वाजेनंतर कांदा लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने उत्पादकांनी रास्तारोको मागे घेतला.

सटाणा कृषि उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार २८ मार्च ते ३ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आले होते. आज गुरुवारी लिलाव घेवून पुन्हा शुक्रवारी ५ रोजी अमावस्येनिमित्त बाजार समितीमधील व्यापार बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर सोमवार ८ एप्रिलपासून दैनंदिन लिलाव सुरू होणार होते. त्यामुळे गुरुवारी सकाळी तालुक्यातील कांदा उत्पादकांनी साठविलेला नवीन कांदा विक्रीसाठी बाजार समिती आवारात आणला होता. मात्र बाजार समितीने लिलावात भाग घेणाऱ्या व्यापाऱ्यांना आपले परवाने मधील तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासंदर्भात सुचित केले होते. यामुळे बाजार समिती प्रशासन व व्यापारी वर्गात समन्वय न होवू शकल्याने सकाळी कांदा लिलाव सुरू नसल्याचे एका व्यापाऱ्याने स्पष्ट केले. परिणामी कांदा विक्रीसाठी आलेल्या कांद्याचा लिलाव न झाल्याने संतप्त शेतकरी वर्गाने रस्त्यावर येत रास्ता रोकोस प्रारंभ केला.

दोन तास ठिय्या

तब्बल दोन तासांहून अधिक वेळ झालेल्या रास्ता रोकोमुळे पोलिस प्रशासन व बााजर समिती प्रशासनाची धावपळ उडाली. दरम्यान बाजार समिती सभापती मंगला सोनवणे यांनी तातडीने संचालकमंडळाची सभा घेवून दुपारी २ वाजता बाजार समितीमधील कांदा लिलाव सुरू करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर शेतकरी वर्गाने रास्तारोको मागे घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सर्व्हर डाऊनचा वैताग

$
0
0

कर्ज नूतनीकरण व वाढीव कर्जासाठी मिळेना सातबारा

...

म. टा. वृत्तसेवा, निफाड

ऑनलाइन सातबारा उतारे आणि नोंदी मिळत नसल्याने जिल्ह्यातील शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून ऑनलाइन प्रक्रियेतील सर्व्हर डाऊन झाल्याने ऑनलाइन नोंदीचे बारा वाजले आहेत.

काही संस्थांमध्ये मार्च एंडची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. शेतकऱ्यांना आपल्या कर्जाचे नूतनीकरण व नवीन कर्ज घेण्यासाठी सातबारा उतारा व ऑनलाइन नोंदी आवश्यक आहेत. मात्र सर्व्हर डाऊन असल्याचे तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्याकडून सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग हतबल झाला आहे. महसूल विभागाने लोकसभा निवडणुकीच्या कामाबरोबरोरच मतदान करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याच्या भावना शेतकऱ्यांनी मांडल्या.

शासनाने लोकांना घरच्या घरी उतारे उपलब्ध व्हावे, यासाठी सात वर्षांपूर्वी ऑनलाइन प्रक्रियेला सुरुवात केली. बहुतेक तालुक्यांचे काम पूर्ण झाले आहे. तलाठी, सर्कल या सर्वांनी सातबाराचे रेकॉर्ड संगणकीकृत केले. यात बराच काळ गेला. यामुळे काहीअंशी शेतकऱ्यांचा फायदाही झाला. सद्यस्थितीत सर्व्हर डाऊनमुळे तोटा होत असल्याचे समोर येत आहे.

जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांच्या ऑनलाइन नोंदी होणे तर दूरच पण सातबारा उतारा मिळणेही अवघड होऊन बसले आहे. मार्च महिना नुकताच संपला असून, शेतकऱ्यांना विविध संस्था व बँकाकडून घेतलेले कर्ज नूतनीकरण करावयाचे, तर काही शेतकऱ्यांना नवीन कर्ज घ्यावयाचे आहे. आपल्या शेतीचे नजरगहाण व डिक्लेरेशन केल्याशिवाय कोणतीही बँक जादा कर्ज देत नाही. त्यासाठी ऑनलाइन नोंदीची गरज आहे. अनेक शेतकऱ्यांना वारस नोंद, शेती वाटपाची नोंद, विविध संस्थांचे नाव कमी करण्याच्या नोंदी टाकायची गरज आहे. मात्र सर्व्हर डाऊनमुळे नोंदीचा खेळखंडोबा झाला आहे. या नोंदी मिळवण्यासाठी शेतकरी तलाठ्याकडे चकरा मारून वैतागला आहे.

..

कांदा उत्पादकांनाही फटका

राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान जाहीर केले. त्यासाठी तीन वेळा योजनेच्या तारखांत वाढ केली. शेवटीची मुदत ३१ मार्च होती. मात्र सर्व्हर डाऊनमुळे हजारो शेतकऱ्यांना अर्ज भरता आला नाही. त्यामुळे मिळणाऱ्या तुटपुंज्या अनुदानाला मुकावे लागणार आहे. त्यामुळे अनुदानाच्या अर्जासाठी १५ एप्रिल ही मुदत वाढवावी व तेथून पुढे बाजार समित्यांनाकडून जिल्हा निबंधकांना १५ दिवस माहिती पाठवायला द्यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृक्षतोडीमुळे वाहतुकीचा खेळखंडोबा

$
0
0

निफाड-पिंपळगाव रोडवर अघोषित मेगाब्लॉक

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड पिंपळगाव रस्त्याचे प्रस्तावित रुंदीकरणाच्या पूर्वतयारीसाठी रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या झाडांची कत्तल सुरू आहे. मात्र ही झाडे तोडताना कोणतीही पूर्वसूचना न दिल्याने तसेच पर्यायी वाहतुकीची व्यवस्था न केल्याने या मार्गावर अघोषित मेगाब्लॉकचा तापदायक अनुभव या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना येत आहे.

सुरत-शिर्डी मार्गावर सतत वाहतुकीची वर्दळ असते. या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू झाले आहे. हे काम करण्यापूर्वी रुंदीकरणात अडसर असणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील झाडे जमीनदोस्त केली जात आहेत. या मार्गावरील लिंब, वड, पिंपळ अशी १०० वर्षे वयाची डेरेदार वृक्ष आहेत. ती जमिनीवर कटरच्या सहाय्याने पाडल्यानंतर संपूर्ण रस्ता बंद होतो. तोडलेल्या झाडांच्या संगळ्या फांद्या कापून काढेपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात. यामध्ये अर्धा ते पाऊण तास वेळ जातो, अशा तक्रारी प्रवाशांकडून करण्यात येत आहेत. वास्तविक अशी मोठी झाडे तोडायची असतील तर या ठिकाणी तात्पुरती पर्यायी व्यवस्था निर्माण करायला हवी. मात्र संबंधितांकडून अशी कोणतीही व्यवस्था या ठिकाणी दिसत नाही. शिवाय दोन्ही बाजुंनी वाहनचालकांना या बाबतीत असणाऱ्या सूचनाही पाहायला मिळत नाही. रात्री काही झाडांचे मोठमोठे ओंडके रस्त्यावरच असल्याने अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत. रस्ता रुंदीकरणाचे काम घेतलेल्या कंपनीने रस्ता सुरक्षेबाबत काळजी घ्यावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

द्राक्षांना परदेशवारीची गोडी

$
0
0

दर यंदा निर्यात वाढली; मात्र भाव पडलेलेच

म. टा. वृत्तसेवा, निफाड

यंदा जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असले तरी जानेवारी, फेब्रुवारीत सुदैवाने अवकाळी पाऊस न पडल्यामुळे द्राक्ष उत्पादनात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा भारतातून परदेशात होणारी द्राक्ष निर्यात यंदा वाढली आहे. द्राक्ष हंगामाच्या याच टप्प्यावर गेल्या वर्षी २०१७-१८ मध्ये ८५८१७.४३९ मेट्रिक टन निर्यात झाली होती. तर यावर्षी २०१८-१९ मध्ये १०८८९६.४९० मेट्रिक टन निर्यात झाली. मागील वर्षी ६५४१ इतके कंटेनर द्राक्ष निर्यात झाले होते, तर यंदा ८०५९ कंटेनर निर्यात झाले आहे. म्हणजेच यावर्षी २३०७९ मेट्रिक टन अधिक निर्यात झाली आहे. अजून १५ एप्रिलपर्यंत द्राक्ष निर्यात हंगाम सुरू राहणार आहे.

यावर्षी मात्र निर्यातक्षम द्राक्ष उत्पादकांना जो भाव अपेक्षित होता तो मिळाला नाही. मागील वर्षी १०० रुपयांपासून सुरू झालेले निर्यायक्षम द्राक्ष मार्केट ६० ते ६५ रुपयांपर्यंत टिकून होते. यावर्षी मात्र उत्पादन वाढल्यामुळे अवघा ४८ ते ५० रुपये इतकाच भाव मिळत असल्याचे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादकांनी सांगितले. सर्वाधिक निर्यात नेदरलँडमध्ये ६३७२६ मेट्रिक टन झाली. तर जर्मनीत १८४३३ मेट्रिक टन निर्यात झाली. आतापर्यंत २० देशांमध्ये १०८८९६.४९० मेट्रिक टन निर्यात झाली.

उत्तर भारतात मागणी वाढली

उत्तर भारतात श्रीराम जन्मोत्सवसह इतर सण उत्सव आणि वाढलेल्या तापमानामुळे द्राक्षाची मागणी वाढली आहे. देशांतर्गत बाजारभाव वाढल्याने निर्यातक्षम द्राक्षाचेही भाव वाढले असले तरी अवघ्या १५ दिवसांत २७ रुपये असलेले देशांतर्गत मार्केट ३५ ते ४० रुपयांपर्यंत पोहचले आहे. दहा दिवसांपूर्वी १० ते १२ रुपये किलो मिळणारे द्राक्षमनी २० रुपयांपर्यंत पोहचले आहेत. त्यामुळे बेदाणाही यंदा महाग असेल तर निर्यातक्षम माल ५० रुपयांपर्यंत गेला आहे.

तापमान वाढल्याने उत्तरेत द्राक्षाची मागणी वाढल्याने सध्या देशांतर्गत बाजारभाव वाढले आहेत. सुरुवातीला थंडी असल्याने आणि एकाच वेळी जास्त उत्पादन आल्याने निर्यातक्षम द्राक्षालाही भाव कमी मिळाले. सध्या निर्यात सावकाश सुरू आहे १५ एप्रिलपर्यंत निर्यात सुरू राहील. -जगणदादा खापरे, अध्यक्ष, द्राक्ष निर्यातदार संघटना

निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनासाठी येणाऱ्या खर्चाच्या पटीत यावर्षी भाव न मिळाल्याने निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक समाधानी नाहीत. गेल्या वर्षीच्या तुलनेत २० रुपयांपर्यंत यावर्षी घसरण झाली. निर्यातदारांनी द्राक्ष उत्पादकांचे कष्ट लक्षात घेऊन चांगला दर मिळण्यासाठी प्रयत्न व्हावे.--बाळासाहेब सानप, द्राक्ष उत्पादक

देश निर्यात (मेट्रिक टन)

नेदरलँड - ६३७२६.०२८ (४५७४ कंटेनर)

जर्मनी - १८४३३.२०९ (१३८४ कंटेनर)

यूके - १६७४९.०४९ (१२५७ कंटेनर)

डेन्मार्क - २१५८.४१० (१६८) कंटेनर

फिनलँड-१५०७ (१२१) कंटेनर

लॅट्विया -९१४ (५२ कंटेनर)

लिथुनिया ६३४ (४४ कंटेनर)

फ्रांस ७५९ (५० कंटेनर)

नॉर्वे ५७६ ( ४८ कंटेनर)

बेल्जियम ५५१ (४४ कंटेनर)

स्वित्झर्लंड ४३७ (३६ कंटेनर)

स्वीडन ४३० (३४ कंटेनर)

स्पेन ३९९ (२९ कंटेनर)

आयर्लंड ३४८ (२६ कंटेनर)

ऑस्ट्रिया ३३९ (२५ कंटेनर)

पोर्तुगाल ३१९ (२२ कंटेनर)

इटली ३०४ (२४ कंटेनर)

रोमानिया १२६ (८ कंटेनर)

क्रेज १०१ (८ कंटेनर)

ग्रीस ६३ (४ कंटेनर)

--------------------------------------------------------------

एकूण १०८८९६.४९० मेट्रिक टन आणि ८०५९ कंटेनर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॉशमध्ये कायम कामगारही चिंतेत

$
0
0

एप्रिलमध्ये पुन्हा ब्रेकची शक्यता

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सातपूर येथील 'बॉश' या बहुराष्ट्रीय कंपनीत नऊशेहून अधिक ऑन जॉब ट्रेनिंग (ओजीटी) कर्मचाऱ्यांना ब्रेक दिल्यानंतर आता कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांनाही एप्रिलमध्ये असाच ब्रेक देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कायमस्वरुपी कामगारही धास्तावले आहे. अर्थात, 'पे ऑफ' असल्याने त्यांना आर्थिक फटका बसणार नसला तरी हातात काम मात्र राहणार नाही. नाशिकमध्ये अशाच अनेक मोठ्या कंपन्यातही असाच ब्रेक कामगारांना दिला जाणार असल्याने उद्योग वर्तुळात चिंतेचे वातावरण आहे.

केंद्र सरकारने चारचाकी वाहनांसाठी बीयू सिक्स प्रणाली सक्तीची केल्याने हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. मात्र, मंदीचे सावट वाहन विक्रीवर आल्याने कामगारांच्या हातातले काम निसटू लागले आहे. एकीकडे देशभर निवडणुकीत रोजगार दिल्याचा दावा सरकारतर्फे केला जात असतांना बॉश सारख्या कंपन्यामधून रोजगारांची संधी हिरावली गेली आहे. याअगोदर कायमस्वरुपी काही कामगारांना २५ ते ३० मार्चपर्यंत असाच 'पे ऑफ' देण्यात आला होता. त्यामुळे कामगारांची चिंता अधिकच वाढली आहे.

बायू सिक्स प्रणालीमध्ये कारच्या इंजक्टरचे डिझाइन बदलावे लागणार असल्यामुळे बाँशने नवीन तंत्राचा वापर करत नवीन मशिनही आणल्या आहे. या नवीन मशिनवर उत्पादन बदलाने हा ब्रेक असल्याचे कंपनी सांगत असली तरी एकूणच मंदीचा हा फटका आहे. नोटाबंदीनंतर औद्योगिक क्षेत्रात ही मंदीची लाट आली त्यानंतर ती अद्याप सावरली गेली नाही. त्यामुळे हा फटका आता कामगारांना बसू लागला आहे.

निवडणुकीवर परिणाम

ऑन जॉब ट्रेनिंगचे कामगार नाशिक महसूल विभागाचे असल्याने आठ लोकसभा मतदारसंघात त्याचे पडसाद पडण्याची शक्यता आहे. नाशिक, नगर, धुळे, जळगाव व नंदुरबार येथील हे कामगार आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपमध्ये सुद्धा चिंतेचे वातावरण आहे. कामगार घरी गेल्याने त्याची चर्चा गावभर होते आणि त्यातून चुकीचा संदेश जातो.

संधी हुकणार

ऑन जॉब ट्रेनिंगचे कामगार हे आयटीआय उत्तीर्ण आहे. त्यांना बॉशने ट्रेनिंग देऊन त्यांना रोजगार दिला आहे. सात वर्षे काम गेल्यानंतर त्यांना कायम होण्याची संधी आहे. पण, त्यांना आता ब्रेक दिल्याने त्यांची संधी हुकणार असल्याचे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिंडोरीत ‘जाऊबाई’ जोरात!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सध्या जाऊबाई जोरात अशी चर्चा आता रंगू लागली आहे. भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्याविरुद्ध त्यांच्या जाऊबाई माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवार यांनी जोरदार आघाडी उघडल्याने राष्ट्रवादीचे घड्याळही आता धावू लागले आहे. त्यांना पती व जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांचीसुद्धा साद असल्यामुळे पवार घराण्यातील अंतर्गत भांडण आता राजकीय पटलावर आले आहे.

माजी मंत्री दिवंगत ए. टी. पवार यांच्या घराण्यातील जावांमधील भांडण जिल्ह्यात नवीन नाही. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत हे भांडण ए. टी. पवार असतानाच समोर आले होते. त्यावेळी दोन्ही जावा या पदासाठी इच्छुक होत्या. पण, त्यावेळी जयश्री पवार यांचे पारडे जड ठरले व त्यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळाले. त्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने नरहरी झिरवाळ यांच्याऐवजी पवार घराण्यातून उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी या जावांचे भांडण पुन्हा समोर आले. त्यानंतर राष्ट्रवादीने डॉ. भारती पवार यांना संधी दिली. २०१९ मध्येही डॉ. भारती पवार यांना तिकीट देण्याचे राष्ट्रवादीने जवळपास निश्चित करून त्यांना प्रदेश उपाध्यक्ष केले. पण, घरातील भांडण पुन्हा समोर आल्यामुळे त्यांचा पत्ता कट झाला. त्यानंतर शिवसेनेतून आलेल्या माजी आमदार धनराज महाले यांना संधी मिळाली.

--

शेवटी 'कमळा'चा आसरा

राष्ट्रवादीतून संधी हुकल्यामुळे डॉ. भारती पवार यांनी 'कमळ' हातात घेत पुन्हा चेकमेट दिला. पण, यावेळी त्यांच्याबरोबर घरातील त्यांचे दीर व जाव मात्र राष्ट्रवादीत राहिल्यामुळे आता पक्षीय पातळीवर हे भांडण समोर दिसू लागले आहे. त्यात दोन जावा एकमेकांच्या विरोधातही समोर आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठ व्यंगचित्रकार ज्ञानेश सोनार यांना जीवनगौरव

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या कार्टुनिस्‍ट्स कंबाईन या संस्थेचे वार्षिक व्यंगचित्रकार संमेलन व प्रदर्शन नाशिकच्या कुसुमाग्रज स्मारकात १३ व १४ एप्रिल रोजी होणार आहे. याच कार्यक्रमात प्रसिद्ध व्यंगचित्रकार ज्ञानेश सोनार यांना जीवनगौरव पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात येणार आहे. या पुरस्‍काराचे वितरण माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्‍या हस्ते होणार आहे.

व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी (दि. १३) सकाळी साडेदहा वाजता होईल. त्‍यानंतर ११ वाजता व्‍यंगचित्रकार ज्ञानेश सोनार यांना जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा आणि त्यानंतर त्‍यांची मुलाखत घेतली जाणार आहे. प्रथम सत्रात प्रसिद्ध व्यंगचित्रकार चारुहास पंडित व प्रशांत कुलकर्णी यांचे मार्गदर्शन होईल. 'आपले व्यंगचित्र आपल्या समोर' हा कार्यक्रम सादर होईल. रसिकांना आपले व्यंगचित्र काढण्याची संधी मिळेल. संमेलनात रविवारी (दि. १४) घनश्याम देशमुख, विनय चानेकर, वैजनाथ दुलंगे हे व्यंगचित्र व कथाचित्रे रंगसंगती या विषयावर मार्गदर्शन करतील. संमेलनात परिसंवाद होतील तसेच नवोदित व्यंगचित्रकारांना मार्गदर्शन करण्यात येईल.

माजी अध्यक्ष विवेक मेहेत्रे व माजी कार्यकारणी सदस्यांचाही सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष संजय मिस्त्री आणि कार्टूनिस्‍ट्स कंबाईनचे कार्यकारणी सदस्य अनंत दराडे, योगेंद्र भगत, राजीव गायकवाड, अतुल मुळ्ये यांनी दिली. नाशिककरांनी या संमेलनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्टूनिस्‍ट्स कंबाईनचे माजी उपाध्यक्ष रवींद्र बाळापूरे आणि इतरांनी केले आहे.

७० जणांच्या व्यंगचित्रांचा सहभाग

प्रदर्शनात देशभरातील ७० हून अधिक व्यंगचित्रकार सहभागी होणार आहेत. दिवंगत व्यंगचित्रकारांचीही व्यंगचित्रे या प्रदर्शनात असतील. त्यात प्रामुख्याने बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे, आर. के. लक्ष्मण यांच्यासह इतर लोकप्रिय व्यंगचित्रकारांचा समावेश आहे. या वर्षी प्रथमच 'निवडणूक व दहशतवाद' या दिलेल्या विषयावर व्यंगचित्रे प्रदर्शनात मांडली जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आधारकार्ड, अर्ज एकाच ठिकाण द्या’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोडच्या प्रभाग २० मध्ये आधारकार्ड सेंटरमध्ये अर्ज उपलब्ध करण्याची मागणी मनविसेतर्फे नाशिकरोड प्रमुख नितीन धानापुणे, शशी चौधरी, सागर दाणी, गुड्डू शेख, प्रशांत गायकवाड, स्वप्निल विभांडिक, बाजारीव मते आदींनी केली आहे.

प्रभाग २० मधील ताराराणी सभागृहात आधारकार्ड सेंटर आहे. विविध कामांसाठी आधारकार्ड गरजेचे असल्याने ते काढण्यासाठी नागरिकांची गर्दी असते. सकाळी दहा ते सायंकाळी अशी या सेंटरची वेळ आहे. नवीन आधारकार्ड काढणे, जुने कार्ड अपडेट करणे, चुका दुरुस्त करून घेणे आदी कामे येथे केली जातात. मात्र, नागरिक जेव्हा आधारकार्ड काढायला जातात, तेव्हा त्यांना त्याच्या अर्जासाठी अटल ज्ञानसंकुलात जाण्यास सांगितले जाते. सेंटरपासून ज्ञानसंकुल थोडे दूर आहे. तेथे गेल्यावर अनेक चौकशा केल्यानंतर अर्ज दिला जातो. तो घेऊन आधारकार्ड सेंटरमध्ये येईपर्यंत नंबर गेलेला असतो, गर्दी वाढलेली असते. अर्जात चुक असेल तर नव्या अर्जासाठी भरउन्हात महिला व ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा पायपीट करावी लागते. ताराराणी सभागृहात सुरक्षा रक्षक व प्रिंटर आहे. तेथेच अर्ज उपलब्ध केल्यास नागरिकांची मोठी सोय होईल, त्यांची उन्हातील पायपीट थांबेल, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उमेदवारी ऐनवेळी बदलून पक्षाने अपमान केला

$
0
0


आमदार स्मिता वाघ यांची खंत

म. टा. प्रतिनिधी, जळगाव
पक्षाला जर ऐनवेळी उमेदवार बदलायचाच होता तर आम्हाला पक्षाने आधीच नकार द्यायला हवा होता. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मतदारसंघातील ११० गावांच्या भेटी दिल्यानंतर अशाप्रकारे अपमान करायला नको होता, अशी खंत आमदार स्मिता वाघ यांनी व्यक्त केली. पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी (दि. ४) जळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बदलविण्यात आला त्यानंतर आमदार स्मिता वाघ या बोलत होत्या.

पक्षाने विधानपरिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांच्याऐवजी चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांनी उमेदवारी घोषीत केल्याने जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि आमदार स्मिता वाघ यांनी नाराजी व्यक्त केली. या वेळी वाघ यांच्या समर्थकांनीही संताप व्यक्त केला. दरम्यान, पक्षाच्या उमेदवार असलेल्या आमदार स्मिता वाघ यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे फोन आले होते. त्यानंतर गुरुवारी (दि. ४) दुपारी त्यांच्या निवासस्थानी संघटक किशोर काळकर यांनी पक्षाने उमेदवारी बदलण्याचा निर्णय घेतल्याची माहिती वाघ दाम्पत्यांना दिली.

याबाबतीत आम्ही पक्षश्रेष्ठींकडे जाब मागणार आहोत. शेवटी पक्षाचा जो काही निर्णय राहील तो आम्हाला मान्य राहणार असल्याचेही वाघ या वेळी म्हणाल्या. महाविद्यालयीन जीवनापासून मी पक्षाचे काम करत असून, पक्षाने जी काही माझ्यावर जबाबदारी टाकली ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आता पक्षाने ज्याप्रकारे माझे तिकीट निश्चित करून, ऐनवेळी कापल्यामुळे मला दु:ख झाल्याचे वाघ यांनी सांगितले.

प्रामाणिकपणा, निष्ठा हाच गुन्हा?
पक्षाने तिकीट कापल्याबाबतचे आतापर्यंत पक्षाकडून कोणतेही कारण देण्यात आले नाही. याबाबत माझा प्रामाणिकपणा व निष्ठा हाच माझा गुन्हा आहे का, असा सवालदेखील आमदार वाघ यांनी विचारला. राष्ट्रीय व राज्य नेतृत्वावर माझा विश्वास असून, ते अजूनही आमचा विचार करतील, असेही त्या म्हणाल्या. या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पी. सी. पाटील, मच्छिंद्र पाटील, शिक्षण समिती सभापती पोपट भोळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पक्षाकडून ‘कोल्ड ब्लडेड मर्डर’
अचानक पक्षाने उमेदवारी का बदलली, कोणी काय केले, यामागे कुणाचे षडयंत्र आहे असे सर्व प्रश्न मला पडलेले आहेत. त्याबाबत पक्षनेतृत्वाकडे चौकशीची मागणी करणार आहे. हा प्रकार म्हणजे ‘आमचा कोल्ड ब्लडेड मर्डर’ करण्यासारखे असल्याचे मत जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी ‘मटा’शी बोलताना व्यक्त केले. दरम्यान, उदय वाघ हे भाजपच्या नेत्यांसोबत मोबाइलवर चर्चा करीत असताना पक्षाने उमेदवारी कापताना ‘आय. बी.’ चे रिपोर्ट आमच्याविरोधात असल्याचे कारण सांगण्यात आल्याची माहितीही वाघ यांनी दिली. मात्र, उमेदवारी जाहीर करताना हे रिपोर्ट पाहिले नाहीत का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

मंत्री महाजनांच्या कार्यालयासमोर घोषणाबाजी
आमदार स्मिता वाघ यांचे तिकीट रद्द करून चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांना देण्यात आल्यामुळे वाघ यांच्या संतप्त समर्थक व कार्यकर्त्यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या जीएम फाउंडेशन कार्यालयासमोर गुरुवारी (दि. ४) दुपारी जोरदार घोषणाबाजी केली. ‘स्मिताताई तूम आगे बढो..हम तुम्हारे साथ है’, ‘कोणत्याही परिस्थितीत स्मिताताईंना निवडून आणू’, अशा घोषणा समर्थक देत होते. यामुळे एकच गोंधळ उडाला होता. संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांना आमदार स्मिता वाघ व त्यांचे पती जिल्हाध्यक्ष उदय वाघ शांतता ठेवण्याचे आवाहन करीत होते. जलसंपदामंत्री महाजन यांच्या कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी उदय वाघ यांना फोन करून त्यांची समजूत घातली. यामुळे उदय वाघ तातडीने जीएम फाउंडेशनच्या कार्यालयात येत त्यांनी समर्थकांना, आपण शिस्तबद्ध पक्षाचे कार्यकर्ते आहोत, आपल्याला असे आंदोलन करणे शोभत नाही, असे आवाहन करून समजूत घातली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशहित लक्षात घेऊन लढा

$
0
0

रक्षा खडसेंचे भावनिक आवाहन; प्रचाराचा शुभारंभ

म. टा. वृत्तसेवा, रावेर

लोकसभा निवडणूक देशाचे नेतृत्व ठरवणारी आहे. प्रत्येकाचे मत हे देशाचा विकास ठरवणारे असणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने देशाचे हित लक्षात घेता स्वतः उमेदवार असल्याचे समजून निवडणूक लढवायची आहे, असे भावनिक आवाहन रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी केले. मुक्ताईनगरला गुरुवारी (दि. ४) प्रचाराचा शुभारंभ करताना त्या बोलत होत्या. दरम्यान, माजी मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे हे मुंबईत उपचारार्थ दाखल असल्याने त्यांनी या वेळी मोबाइलवरून जाहीर सभेत मार्गदर्शन केले त्यावेळी रक्षा खडसे भावनिक झाल्या होत्या. ‘नाथाभाऊ मुंबईत असले तरी त्यांच्या शिकवणीत घडलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या बळावर अधिकाधिक मताधिक्याने विजय मिळणारच, असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.

जिल्हा बँक शाखेजवळील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करीत जाहीर सभा घेण्यात आली. त्यानंतर परिवर्तन चौकातून रॅली काढत कोथळी मुक्ताई मंदिरात प्रचाराचा शुभारंभ नारळ वाढविला. या वेळी खासदार रक्षा खडसे म्हणाल्या, मी नाथाभाऊंच्या शिकवणीनुसार गेल्या पाच वर्षांत कामे केलीत. कुणाची जात, धर्म, पक्ष न विचारता जो आपल्या दारी आला त्याचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच अडचणी आल्या, संकटे आली. परंतु, नाथाभाऊंनी सांगितले परिस्थिती कोणतीही असो वारसा आपला जनसेवेचा आहे तो वारसा आपल्याला पुढे घेऊन जायचाय. जनतेचा वारसा आपण उचललाय तो जनतेत जाऊन पूर्ण करायचा आहे. त्याच हिमतीने मी आज आपणा सर्वांच्या समोर आहे, असे खडसे म्हणाल्या. ऐन प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी रक्षा खडसे यांचे सासरे आणि आमदार एकनाथ खडसे उपस्थित नव्हते. ते सध्या मुंबईत उपचार घेत असल्यानेच ते याठिकाणी येऊ शकले नाही, याचे दु:ख रक्षा खडसे यांच्या बोलण्यात दिसून आले. ते बोलताना गहिवरल्या होत्या.

या वेळी आमदार संजय सावकारे, आमदार चैनसुख संचेती यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी आमदार हरिभाऊ जावळे, जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन, जेडीसीसी बँक चेअरमन अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर, जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा. डॉ. सुनील नेवे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, सहसंयोजक माधवराव गावंडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक कांडेलकर आदींसह भाजप, शिवसेना, आरपीआयचे पदाधिकारी तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार एकनाथ खडसे यांचा मोबाइलवरून संवाद
प्रत्येक निवडणूक कार्यकर्त्यांच्या बळावर जिंकली जाते. त्यामुळे प्रत्येकाने कामाला लागा, असे सांगत एकनाथ खडसे यांनी जाहीर सभेत मोबाइलवरून कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. मला विश्वास आहे तुम्ही या निवडणुकीतदेखील मोठ्या मताधिक्क्याने रक्षा खडसे यांना विजयी कराल, असा विश्वासही आमदार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला. नाथाभाऊंनी फोन वरून सभेत संभाषण केले त्यावेळी रक्षा खडसे यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले होते. त्या बोलतानाही भावनिक झाल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात तापला प्रचाराचा पारा

$
0
0

दोन्ही उमेदवारांचे आरोप-प्रत्यारोप

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे लोकसभा मतदारसंघातील अद्याप एकाही उमेदवाराचा अर्ज दाखल झालेला नाही. मात्र, त्यापूर्वीच काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी व भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांनी मतदारसंघातील गावागावात प्रचाराचे वादळ सुरू केले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे आमदार कुणाल पाटील व भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्यात सरळ लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

निवडणुकीच्या रणधुमाळीत उन्हाचा पाराही तापल्याने उमेदवारांनी सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत प्रचाराचा पारादेखील वाढविला आहे. कारण, आता लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे २३ दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यात उमेदवारांना तब्बल पाचशेहून गावांतील मतदारांच्या भेटी घ्यायच्या आहेत, हे मात्र तेवढे सोपे नाही. तापमानाचा पारा ४२ अंशावर गेल्यावरदेखील निवडणुकीत आरोपांचा पाराही वाढत आहे. यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार कुणाल पाटील यांनी मतदारसंघातील निरनिराळ्या ठिकाणी प्रचारसभांमध्ये भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना विकासाच्या मुद्द्यावर विविध आरोप केले आहेत. या वेळी माजीमंत्री रोहीदास पाटील, डॉ. हेंमत देशमुख, अव्दय हिरे, पंकज भुजबळ, डॉ. आशिष पाटील यांच्यासह पदाधिकारी व नेत्यांनी उपस्थित होते.

दुसरीकडे भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरेंनी आमदार कुणाल पाटील यांच्यावर आरोपांची धूळ उधळली आहे. यात वर्षानुवर्षे सत्ता भोगणाऱ्या आमदार कुणाल पाटलांनी आजपर्यत स्वत:चीच घरे भरलीत, असा आरोप त्यांनी केला. जनतेला कोणत्याही भूलथापा देवून आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिक्षण संस्थांमध्ये भ्रष्टाचाराचे आगार असल्याचाही आरोप डॉ. भामरेंनी प्रचारादरम्यान केला.

ज्ञानेश्वर ढेकळे आज अर्ज दाखल करणार
धनगर समाजाचे युवा नेते ज्ञानेश्वर बळीराम ढेकळे शेकडो समर्थकांसह आज (दि. ५) धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येणार आहेत. ढेकळे यांनी गेल्या काही महिन्यांपासून निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केली होती. समाज बांधवांसह इतर घटकांतून त्यांच्या उमेदवारीला प्रोत्साहन मिळत असल्याने त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात येण्याचा निर्णय घेतला आहे. अर्ज दाखल करताना धनगर समाज बांधवांसह समर्थकांना सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात उपस्थित राहण्याचे आवाहन ढेकळे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मिता वाघांना डच्चू; उन्मेष पाटलांना संधी

$
0
0

भाजपचे धक्कातंत्र; वाघांचे तिकीट कापल्याने समर्थकांची नाराजी

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी भाजप-शिवसेना युतीकडून विधानपरिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी ए. बी. फॉर्म जोडून अर्ज दाखलही केला. मात्र, दोन दिवसांत नाट्यमय घडामोडी होऊन आमदार स्मिता वाघ यांचे तिकीट कापून त्यांच्याऐवजी चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली. यानंतर आमदार उन्मेष पाटील यांनी भाजप-शिवसेना युतीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. ४) शक्तिप्रदर्शन करीत ए. बी. फॉर्मसह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, या घडामोडीने भाजपचे धक्कातंत्र पुन्हा एकदा दिसून आले.

भाजप-शिवसेना युतीच्या अधिकृत उमेदवाराने अर्ज दाखल केल्यानंतर जी. एम. फाउंडेशनच्या कार्यालयात युतीचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात शिवसेनेचे उपनेते तथा सहकार राज्य मंत्री गुलाबराव पाटील, उमेदवार आमदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार चंदुलाल पटेल, आमदार चंद्रकांत सोनवणे, भाजपचे सहयोगी आमदार शिरीष चौधरी, मनपा गटनेते भगत बालाणी, कैलास सोनवणे, स्थायी सभापती जितेंद्र मराठे, शिवसेनेचे माजी महापौर नितीन लढ्ढा, विरोधी पक्ष नेते सुनील महाजन, माजी आमदार गुरूमुख जगवाणी, माजी आमदार बी. एस. पाटील, महापौर सीमा भेाळे, नगराध्यक्ष करण पवार, रवींद्र चौधरी, रिपाईचे आढाव आदी उपस्थित होते. दरम्यान, अर्ज दाखल करताना आमदार स्मिता वाघदेखील होत्या.

‘एकदिलाने काम करणार’
भाजप-शिवसेना युतीकडून जळगाव लोकसभा मतदारसंघात आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उन्मेष पाटील हे अभ्यासू आमदार असून, त्यांच्या माध्यमातून आपले प्रश्न लोकसभेत मांडता येणार आहेत. त्यांना विजयी करण्यासाठी शिवसेना भाजपसोबत एकदिलाने काम करेल. मात्र, भाजपने हे लक्षात ठेवून जेव्हा गरज लागेल तेव्हा शिवसेनेला मदत करावी, असे आवाहन राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी मेळाव्यात केले. पक्षाचा निर्णय हा अंतिम असतो, त्यामुळे जिल्हाध्यक्ष उदय वाघ, आमदार स्मिता वाघ व खासदार ए. टी. पाटील यांनीदेखील मनात राग न ठेवता उन्मेष पाटील यांच्या प्रचारात मोठ्या मनाने सहभागी व्हावे, असेही मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

‘सिंचन व पाण्याच्या प्रश्नासाठी कटिबद्ध’
पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली आहे. या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नसल्याची ग्वाही उमेदवार आमदार उन्मेष पाटील यांनी दिली. जिल्ह्यातील बलून बंधारे, पाडळसे धरणाचा प्रश्न व नारपारचे पाणी अडवून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

पक्षाने चांगले नेतृत्व दिले
भाजपचे सहयोगी आमदार शिरीष चौधरी यांनीदेखील आपल्या भावना व्यक्त केल्या. आपण जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत अपक्ष उमदेवारीबाबत चर्चा केली होती. त्यावेळी पाडळसे धरणाच्या कामासाठीच अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार होतो. मात्र, आता या धरणासाठी निधी उपलब्ध होणार असल्याने अर्ज भरणार नाही, असे त्यांनी जाहीर केले. तसेच लोकसभा मतदारसंघासाठी पक्षाने चांगले नेतृत्व दिले आहे. आमदार उन्मेष पाटील यांना आपल्याला चांगले मताधिक्य मिळवून देण्याची जबाबदारी घेत असल्याचे चौधरी म्हणाले. शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी युतीचा उमदेवार कोणीही असो आम्ही त्याचा प्रचार करणार असल्याची भूमिका जाहीर केली. आमदार उन्मेष पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना ही निवडणूक राष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाची असून, पक्षात काही तांत्रिक अडचण असेल म्हणून माझ्यासारख्या कार्यकत्याला उमेदवारी दिली. मतदारसंघात ९९० खेडे असून, प्रचारासाठी १७ दिवस शिल्लक असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

क्षणचित्रे...
दुपारी सव्वा बारा वाजता उन्मेष पाटील जी. एम. फाउंडेशनच्या कार्यालयात
आत प्रवेश करताच पक्षाच्या ज्येष्ठ महिलांचा आशीर्वाद घेतला
उपस्थित कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी
उन्मेश पाटील यांच्यासोबत कार्यकर्त्यांनी सेल्फी काढले



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदार संख्येत तब्बल पाचपट वाढ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांत गेल्या ६८ वर्षांत पाचपट मतदार संख्या वाढल्याचे समोर आले आहे. या दोन्ही मतदारसंघांत या काळात अनेक बदल झाले असले, तरी मतदारांचा वाढलेला टक्का मात्र मोठा आहे.

१९५१ मध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघात ३ लाख ८५ हजार ८६८ मतदार होते. तेच आता २०१९ मध्ये १८ लाख ५३ हजार ५११ झाले आहेत. त्याचप्रमाणे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात १९५७ मध्ये ३ लाख ७५ हजार ५२९ मतदार होते. ते आता २०१९ मध्ये १७ लाख ४ हजार ७७७ झाले आहेत.

नाशिक व दिंडोरी हे जिल्ह्यातील दोन प्रमुख मतदारसंघ आहेत. त्यातील दिंडोरी हा २००९ मध्ये मतदारसंघ पुनर्रचेनंतर अस्तित्वात आला. त्याअगोदर हा मतदारसंघ मालेगाव मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता. नाशिक लोकसभा मतदारसंघातही बदल झाले. पण, या बदलात क्षेत्र मात्र कमी झाले नाही. त्यामुळे ही मतदार संख्येतील वाढ निश्चित परिणामकारकही ठरत आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघाची १९५१ मध्ये असलेली ३ लाख ८५ हजार ८६८ मतदार संख्या २५ वर्षांनंतर १९७७ मध्ये ६ लाख ११ हजार ४९१ झाली होती. ५० वर्षांत हीच मतदार संख्या १५ लाख २२ हजार ६७२ झाली. दिंडोरीतही ही वाढ अशाच पद्धतीने झालेली आहे. दिंडोरीत १९५७ मध्ये ३ लाख ७५ हजार ५२९ असलेली मतदार संख्या १९७७ मध्ये ५ लाख ५३ हजार ६९८ झाली. २००४ मध्ये हीच मतदार संख्या १२ लाख २२ हजार ३६३ झाली.

मालेगाव धुळे लोकसभेत

नाशिकपाठोपाठ मालेगाव शहराची लोकसंख्या मोठी आहे. पण, लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर हे शहर धुळे लोकसभा मतदारसंघात गेले. त्यामुळे नाशिकच्या दोन्ही मतदारसंघांत त्याचा समावेश नाही. मुस्लिमबहुल असलेल्या मालेगाव शहरातील मतदार बऱ्याच वेळा निर्णायकी राहिले आहेत. जनता दलाच्या उमेदवारांच्या विजयात त्यांचा मोठा वाटा दिसून आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images