Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

वाहतूक मार्गात सातपूरला बदल

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सातपूर गाव येथे गुढीपाडव्यानिमित्ताने आज (दि. ६) सायंकाळी भरत असलेल्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर रोडवरील वाहतूक कोंडी टाळण्याच्या हेतूने वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. दुपारी २ वाजेपासून मध्यरात्रीपर्यंत हे बदल लागू राहतील.

वाहतूक बदलांतर्गत आयटीआय सिग्नल ते सातपूर गाव या मार्गावरील दोन्ही बाजूने वाहनांना प्रवेश बंद असणार आहे. त्र्यंबकच्या दिशेने जाणारी वाहने आयटीआय सिग्नलवरून एमआयडीसी रोडने परफेक्ट सर्कलमार्गे टपारिया टूल्स कंपनीसमोरून महिंद्रा सर्कलमार्गे सातपूर व त्र्यंबकच्या दिशेने जातील. त्र्यंबक व सातपूरकडून शहराकडे येणाऱ्या वाहनचालकांनासुद्धा याच मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. गुढीपाडव्यानिमित्त सातपूर गावात दरवर्षी ग्रामदेवता असलेल्या भवानीमातेची यात्रा भरते. यात्रोत्सवापूर्वी श्री गणेशा अर्थात अर्धनारीनटेश्वराच्या वेषातील तरुणाची गावातून मिरवणूक काढली जाते. त्यानंतर एमआयडीसीतील श्री भवानी माता मंदिरात पूजा होते. पूजा होताच ज्या तरुणाला बारा गाड्या ओढायचा मान मिळालेला असतो, त्याच्यासह इतर भाविक त्र्यंबकरोडवरपर्यंत धावत येऊन तेथे बांधलेल्या बारागाड्या गावच्या वेशीपर्यंत ओढून नेतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तोरण अन् गुढीने सजणार शहर

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मराठी नववर्षाचा प्रारंभ आज, शनिवारी मोठ्या उत्साहात होणार असून, गुढीपाडव्यानिमित्त घरोघरी तोरण व गुढ्या उभारल्या जाणार आहेत. साडेतीन मुहूर्तापैकी एक समजल्या जाणाऱ्या या सणाला हिंदू धर्मात मोठे महत्त्व आहे. या दिवशी घरात वस्तूंची खरेदी करणे, वाहन खरेदी, सोने खरेदी तसेच गृहप्रवेश या दिवशी केले जातात.

संपूर्ण महाराष्ट्रात हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बाजारात वेगवेगळ्या वस्तू खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी होते. पाश्चात्य संस्कृतीमुळे १ जानेवारी रोजी नवीन वर्ष साजरे करण्यात येत असले तरी हिंदू धर्मात गुढीपाडव्याला मोठे महत्त्व आहे. हे हिंदूधर्माचे नवीन वर्ष असल्याने सर्व हिंदू बांधव ते आनंदाने साजरे करतात.

सकाळी अभ्यंगस्नान करून सूर्योदयापूर्वी गुढी उभारली जाते. त्या गुढीच्या काठीला तांब्याचा कलश बांधला जातो. त्याला चंदन हळद-कुंकू लावले जाते. त्यावर कापड (खण), फुलांचा हार, कडूनिंबाची पाने बांधली जातात. ही गुढी सूर्योदयापासून माध्यान्हापर्यंत डौलाने घराच्या बाहेर फडकत असते. त्याचप्रमाणे आपण घरही सजवत असतो. दारात तोरण बांधले जाते, घर फुलांनी सजवले जाते. सर्वजण सकाळी अभ्यंगस्नान करतात. काही लोक पाण्यात कडूनिंबाची पाने घालून स्नान करतात, अशी प्रथा आहे. गुढीपाडव्यानिमित्त गोडधोड पदार्थ तयार केले जातात. नवीन घरात प्रवेश करण्यासाठी लोक मुहूर्त शोधत असतात. गुढीपाडव्याचा चांगला मुहूर्त असल्याने या दिवशी गृहप्रवेश समारंभ आयोजित केला जातो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदानासाठी द्या सुटी!

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड मतदानाच्या दिवशी विविध आस्थापनांनी आपल्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना मतदान करण्यासाठी भरपगारी सुटी अथवा दोन किंवा तीन तासांची सवलत द्यावी, असे आवाहन कामगार उपायुक्त जी. जे. दाभाडे यांनी केले आहे. अशी सुटी किंवा सवलत न दिल्यास व त्याबाबत तक्रार आल्यास संबंधित आस्थापनांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. दिंडोरी - २० व नाशिक- २१ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक येत्या २९ एप्रिल रोजी होत आहे. त्यामुळे निवडणूक होत असलेल्या मतदारसंघातील खासगी कंपन्या व त्यामधील आस्थापना, सर्व दुकाने, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स रिटेलर्स आदी आस्थापनांतील कामगारांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुटी देण्यात यावी. पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. मात्र, याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील, असेही त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदार चव्हाणांचे 'वेट अॅण्ड वॉच'

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी 'वेट अॅण्ड वॉच' भूमिका घेतली आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी आता सोमवार व मंगळवार हे दोनच दिवस शिल्लक असल्यामुळे चव्हाण कधी ते दाखल करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत चव्हाण यांना विचारले असता त्यांनी अद्याप कार्यकर्त्यांबरोबर चर्चा सुरू असल्याचे सांगितले. राजकारणात काहीही घडू शकते असे सांगत त्यांनी सस्पेन्सही कायम ठेवला. भाजपने राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षा असलेल्या डॉ. भारती पवार यांना उमेदवारी दिल्यामुळे कमालीचे नाराज असलेले चव्हाण बंड करणार असल्याची चर्चा आहे. पण, त्यांनी अद्याप कोणतीच भूमिका जाहीर न केल्यामुळे अनेकांचे हृदयाचे ठोके वाढले आहेत. २९ मार्च रोजी त्यांनी सुरगाणा येथील कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. त्यावेळेस संपूर्ण मतदारसंघातील विधानसभा क्षेत्रनिहाय कार्यकर्त्यांची चर्चा करून दोन दिवसांत निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले होते. पण, त्यांची भूमिका समोर न आल्यामुळे भाजपची चिंता वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सावाना’ बैठक बेकायदेशीर

0
0

श्रीकांत बेणी यांचा दावा

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सन २०१९-२० च्या नूतन कार्यकारिणी निवडीसाठी सावाना अध्यक्षांनी बोलावलेली बैठक बेकायदेशीर असल्याचा दावा माजी प्रमुख सचिव श्रीकांत बेणी यांनी केला आहे. अध्यक्षांना निवड बैठक बोलावण्याचा अधिकारच नसल्याचे सांगत, या निवडीला भविष्यात एखाद्या पदाधिकाऱ्याने किंवा सभासदाने आव्हान दिल्यास ती बेकायदेशीर ठरू शकते आणि तसे झाल्यास त्यास केवळ सावाना अध्यक्ष जबाबदार असतील असे बेणी यांनी सांगितले.

कार्यक्षम आमदार पुरस्कार कार्यक्रमात श्रीकांत बेणी यांनी आमदार धनंजय मुंडे यांची निवड केल्याने धमक्या आल्याचे जाहीरपणे सांगितले होते. त्यानंतर कार्यकारिणीमध्ये बैठक होऊन त्याची परिणती भांडण, हाणामाऱ्यांत झाली. अर्वाच्च शिवीगाळ आणि फर्निचरची तोडफोड यामुळे ही बैठक चांगलीच गाजली. यासह अनेक विषयांच्या केंद्रभागी असलेल्या श्रीकांत बेणी यांना त्यांच्या कार्यशैलीमुळे राजीनामा द्यावा लागला. तसेही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नूतन निवडीसाठी कार्यकारी मंडळाची बैठक बोलिवण्यात येणार होती. त्याआधीच बेणी यांनी राजीनामा दिला. घटनेत नमूद केल्याप्रमाणे प्रमुख सचिवांच्या अनुपस्थितीत कार्यकारी मंडळाची बैठक बोलाविण्याचा अधिकार सहायक सचिवाला असतो. कार्याध्यक्षांच्या संमतीने ते बैठक पाचारण करू शकतात. मात्र, सावानात उलटे वारे वाहत असून, अध्यक्षांनीच बैठक बोलावली. सहायक सचिव अॅड. भानुदास शौचे यांनी अध्यक्षांना याबाबत लेखी कल्पना दिली की बैठक नियमाप्रमाणे मी बोलवायला हवी. परंतु, अध्यक्षांनी त्यांचे निवेदन ठेवून घेतले आणि बैठक बोलावली. मुळात हे बेकायदेशीर असल्याचे शनिवारच्या बैठकीच्या प्रारंभीच अॅड. शौचे यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच, बेणी यांनीदेखील ही बैठक म्हणजे नियमभंग असून, यातील निवड बेकायदेशीर ठरेल व त्यास सर्वस्वी अध्यक्ष जबाबदार असतील, असे सांगितले. अध्यक्षांनी मला कुणाचेही ऐकून घ्यायचे नाही याबाबत काही पत्रे द्यायची असतील तर ऑफिसमध्ये जमा करा, अशी सूचना करून नूतन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर केली.

...

नूतन पदाधिकाऱ्यांची निवड नियमभंगाचा डाग लावून झाली आहे. अध्यक्षांना बैठक बोलावण्याचा कोणताही अधिकार घटनेत नाही. यामुळे ही निवड बेकायदेशीर ठरू शकते. निवडीला पाठिंबा आहे, परंतु उद्या काही पेचप्रसंग उदभवला तर जबाबदारी अध्यक्षांची असेल.

- श्रीकांत बेणी, माजी प्रमुख सचिव, सावाना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातपूरला संस्कृतीदर्शन

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

गुढीपाडव्यानिमित्त सात ठिकाणी पारंपरिक पद्धतीने कला, संस्कृतीचे दर्शन घडवत नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

जाधव संकुल तुळजा भवानी मंदिर, महालक्ष्मी मंदिर मौले हॉल, दक्षिणमुखी हनुमान मंदिर सातपूर कॉलनी, वरद विनायक मंदिर समतानगर, अमृतमनी गणेश मंदिर जुनी कॉलनी, संकट मोचन हनुमान मंदिर अशोकनगर, श्रीराम मंदिर विश्वास नगर येथून यात्रा काढण्यात येत दक्षिण मुखी इच्छापूर्ती साईनाथ मंदिर, बळवंतनगर, आनंद छाया येथे समारोप करण्यात आला. मतदान जनजागृती, बेटी बचाव, पाणीबचत, मोहीम राबवत जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती सातपूर नववर्ष स्वागत समितीचे अध्यक्ष बाळासाहेब भोजने यांनी दिली. या यात्रेत सामाजिक संस्था, भजनी मंडळ, सामाजिक मंडळे, विविध शैक्षणकि संस्था, व्यायाम मंदिर यांचा सहभाग असतो. स्वागत यात्रेत पारंपरिक वेशभूषा करीत सातपूरकर सहभागी झाले होते. नगरसेविका माधुरी बोलकर, पल्लवी पाटील, सीमा निगळ, नगरसेवक सलिम शेख, शशिकांत जाधव, डॉ. वृषाली सोनवणे, डॉ. मेघा वाणी, गणेश बोलकर, अमोल जोशी, सतीश धामणे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील १९ टेरेस हॉटेल बंद

0
0

महापालिकेने बजावल्या ३५ हॉटेल्सचालकांसह ६४ लॉन्सचालकांना नोटिसा

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने शहरातील अनधिकृत लॉन्ससोबतच आता इमारतीच्या टेरेसवर अनधिकृतरित्या उभारलेल्या ३५ टेरस हॉटेल्सवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पालिकेच्या नगररचना विभागाने अनधिकृतपणे टेरेसवर सुरू असलेल्या ३५ हॉटेलचालकांना नोटिसा बजावल्या असून, त्यापैकी १९ अनधिकृत टेरेस हॉटेल्स बंद करण्यात आले आहेत. तसेच, शहरात ६४ अनधिकृत लॉन्सलाही नियमितीकरणासाठीच्या नोटिसा बजावल्या आहेत.

महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी विभागप्रमुखांच्या बैठकीत शहरातील अनधिकृत टेरेस हॉटेल्स, अतिक्रमित, अनधिकृत लॉन्स, मंगल कार्यालये तसेच जनावरांच्या अनधिकृतरित्या उभारण्यात आलेल्या गोठ्यांवर कारवाईबाबतचा आढावा घेतला. त्यावेळी नगररचना विभागाच्या वतीने हॉटेल्स, लॉन्सचा तर पशुसंवर्धन विभागाच्या वतीने गोठ्यांवरील कारवाईचा अहवाल सादर केला आहे. त्यानुसार महापालिका क्षेत्रातील ३५ अनधिकृत टेरेस हॉटेल्सला महापालिकेच्या नगररचना विभागाने नोटिसा बजावल्या होत्या. त्यामुळे या ३५ पैकी १९ हॉटेल्सचालकांनी नोटीस मिळताच टेरेसवरील हॉटेल्स बंद केले आहेत. दोन हॉटेल्समालकांनी अधिकृतरित्या पालिकेची परवानगी घेतली आहे. तसेच, सहा प्रकरणे कंपाउंडिंग अंतर्गत महापालिकेच्या नगररचना विभागाकडे दाखल झाली असून, आठ अनधिकृत टेरेस हॉटेल्सवर कारवाईसाठी अतिक्रमण निमूर्लन विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती दिली. नगररचनाच्या सर्वेक्षणात महापालिका क्षेत्रात १६७ लॉन्स, मंगल कार्यालये असल्याचे आढळून आले. त्यापैकी १०३ अधिकृत आढळले असून, ६४ अनधिकृत लॉन्सला नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच, ३० लॉन्सची प्रकरणे शासनाच्या प्रशमित संरचना अधिनियम अर्थात कंपाउंडिंग अंतर्गत नियमितीकरणासाठी महापालिकेच्या नगररचना विभागाकडे दाखल झाली आहेत.

...

५४ गोठे अनधिकृत

महापालिकेच्या पशुंसवर्धन विभागाने केलेल्या सर्वेक्षणात ५४ गोठे अनधिकृतपणे सुरू असल्याचे आढळून आले आहेत. त्यात नाशिकरोड विभागात १६, नाशिक पूर्व ३८, पंचवटी विभागात ५५ व नाशिक पश्चिम विभागामध्ये ७ जनावरांचे गोठ्यांचा समावेश आहे. हे सर्व गोठे बंद करण्यासाठी संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. गोठेधारकांनी स्वत:हून गोठे हटवले नाहीत, कारवाई केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माणिकराव कोकाटेंचे झुलेलाल यांना साकडे?

0
0

देवळाली कॅम्प : लोकसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली असतांना भाजपचे बंडखोर उमेदवार, माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी देवळालीस भेट दिली. चेट्रीचंड उत्सवात सहभाग घेतला. येथील झुलेलाल मंदिरात जाणून भगवान झुलेलाल यांच्या मूर्तीचे दर्शन घेतले. त्यांनी झुलेलाल यांना विजयासाठी साकडे घातले की काय, अशी चर्चा उपस्थितांमध्ये रंगली. आपले जुने संबंध असलेल्या विविध राजकीय व सामाजिक व लोकप्रतिनिधींची गाठभेट घेत कोकाटे यांनी आपल्याला मतदान करीत निवडून देण्याची विनंती केली. चार दिवसांपूर्वी कोकाटे यांची कन्या व जिल्हा परिषद सदस्या सीमांतिनी कोकाटे यांनीही देवळालीच्या लोकप्रतिनिधींची भेट घेत चर्चा केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजप सरकारला धडा शिकवण्याची वेळ

0
0

दाभाडीतील सभेत कुणाल पाटील यांचे आवाहन

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

भाजप सरकारच्या काळात शेतीमालास योग्य भाव मिळालेला नाही, तरुण बेरोजगार झाले, शेतकरी-तरुणांसह सर्वांनाच या सरकारने वाऱ्यावर सोडले. त्यामुळे भाजप सरकारला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. कल्याणकारी सरकार देशात परत आणण्यासाठी मतदारांनी पाठबळ द्यावे, असे आवाहन धुळे लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार व आमदार कुणाल पाटील यांनी केले.

कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ मालेगावचा दौरा झाला. दाभाडी येथे झालेल्या सभेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. अद्वय हिरे हे उपस्थित होते. काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, प्रसाद हिरे, राष्ट्रवादीचे राजेंद्र भोसले, शांताराम लाठर, पवन ठाकरे, राकेश भामरे, जयंत पवार, संदीप पवार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी आमदार पाटील म्हणाले, की मतदारांनी मोठा विश्वास दाखवत डॉ. भामरे यांना निवडून दिले होते; मात्र गेल्या पाच वर्षात केवळ घोषणा झाल्यात मतदारसंघात विकास कुठेही दिसत नाही. विविध संस्थांच्या माध्यमातून निवडणुकांचा अनुभव आपल्या गाठीशी आहे. तसेच आमदार म्हणूनही अनुभव असून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी शेतकऱ्यांच्या जिवावर निवडून आलेले भाजप आता शेतकऱ्यांच्याच जिवावर उठले आहे. त्यामुळे भावनेच्या आहारी न जाता विचार करून मतदान या निवडणुकीत करायचे आहे. आमदार कुणाल पाटील यांना विधानसभेत कामकाजाचा अनुभव असून त्यांना संधी देण्याचे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. हिरे यांनी खासदार सुभाष भामरे यांच्यावर टीका केली. भामरे यांनी एकनिष्ठ भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय केला. न केलेल्या कामांचे श्रेय भामरे घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी सभेस दाभाडी परिसरातील काँग्रेस, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदार गोडसे पोचले तुळजा भवानीच्या चरणी

0
0

जेजुरीच्या खंडेरायाचेही घेतले आशीर्वाद

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप या महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे हे सोमवारी (दि. ८) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र, त्यापूर्वी विजयासाठी गोडसे यांनी तुळजापूर आणि जेजुरीला जाऊन तुळजा भवानीला आणि खंडेरायाला साकडे घातले. गोडसे यांनी आपला उमेदवारी अर्ज तुळजा भवानी तसेच खंडेरायाच्या चरणी ठेवत विजयाचा आशीर्वाद मागितला. यंदा २०१४ पेक्षाही मोठा विजय या निवडणुकीत मिळू दे, असे साकडेही त्यांनी यावेळी घातले.

नाशिक लोकसभा मतदारसंघातून खासदार गोडसे दुसऱ्यांचा नशीब आजमावत असून त्यांच्यासमोर 'राष्ट्रवादी'चे माजी खासदार समीर भुजबळ यांचे आव्हान आहे. गेल्या वेळी गोडसे यांनी 'राष्ट्रवादी'चे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा तब्बल पावणे तीन लाख मतांनी पराभव केला होता. त्यामुळे शिवसेनेने पुन्हा भुजबळ कुटुंबीयांच्या समोर गोडसे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे गोडसे यांच्यासमोर दुसऱ्यांदा खासदार होण्याचे आव्हान आहे. गेल्या वेळेसे मोदी लाटेचाही गोडसे यांना फायदा झाला होता. परंतु, मोदी लाटेपेक्षा भुजबळ कुटुंबाविरोधात असलेला रोष मतातून व्यक्त झाला होता. परंतु, यंदा परिस्थिती बदलली असून निवडणूक जिंकण्यासाठी गोडसे यांनी आपली शक्ती पणाला लावली आहे. येत्या सोमवारी गोडसे यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. त्यामुळे या उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी शनिवारी आपल्या परिवारासह तुळजापूर आणि जेजुरी येथे जात देवदर्शन घेतले. तुळजा भवानी आणि खंडेराव महाराज यांची विधीवत पूजा-अर्चा करून गोडसे यांनी आपला उमेदवारी अर्ज काही काळ देवतांच्या चरणस्पर्शी ठेवला. निवडणूक जिकण्यासाठी बळ देण्याचे साकडे यावेळी गोडसे यांनी आई भवानी आणि खंडेराव महाराज यांना घातले. गेल्या वेळपेक्षा अधिक मतांनी विजयी होऊ दे, माझ्या हातून अधिकाधिक जिल्ह्याचा विकास होऊ दे, असे साकडेही त्यांनी घातले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समीर भुजबळांशी बुधवारी मुक्त सवांद

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ हे मतदारसंघातील शेतकरी, महिला, तरुणांशी 'बोलू भाऊंशी' या कार्यक्रमाद्वारे 'मुक्त संवाद' साधणार आहे. कॅनडा कॉर्नर येथील व्ही. एन. नाशिक शिक्षण संस्थेत बुधवारी (दि. १०) सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी या कार्यक्रमाची माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, या मुक्त संवाद कार्यक्रमात समीर भुजबळ हे नाशिकचा विकास आणि प्रगती याबाबत असलेले व्हिजन नागरिकांसमोर मुक्तपणे मांडणार आहे. तसेच नाशिक लोकसभा मतदारसंघात २००९ ते २०१४ या कालावधीत नाशिक लोकसभा मतदारसंघात झालेली विकासकामे आणि २०१४ ते २०१९ या काळात नाशिकचा खुंटलेला विकास याबाबत उपस्थितांशी मुक्तपणे संवाद साधतील. यामध्ये उपस्थित शेतकरी, महिला, तरुण या समाजघटकांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पकपणे उत्तर देखील देणार असून नाशिक लोकसभा मतदारसंघातील विकास आणि प्रगतीचे व्हिजन नागरिकांसमोर मांडणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीईची पहिली लॉटरी ८ एप्रिलला

0
0

जागा : ५ हजार ७६४

अर्ज : १४ हजार ९९५

..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेल्या २५ टक्के जागांसाठी अर्जप्रक्रिया पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात ५ हजार ७६४ जागांसाठी १४ हजार ९९५ ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले असून, पालकांचे लक्ष लॉटरी प्रक्रियेकडे लागले आहे. यंदा राज्यस्तरावरून लॉटरी काढण्यात येणार असून, पुणे येथील आझम कॅम्पसमधील मुलांची उर्दू शाळेत सोमवारी (८ एप्रिल) ही प्रक्रिया पार पडणार आहे.

बालकांचा सक्तीचा व मोफत शिक्षण हक्क कायदा २००९ नुसार आरटीई प्रक्रिया राज्यभरात राबविण्यात येत आहे. प्रवेश देण्यापूर्वी कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. नाशिक शहरासाठी गंगापूर रोड येथील होरायझन अॅकॅडमी, के. के. वाघ इंग्लिश मीडियम स्कूल सरस्वती नगर, गुरू गोविंदसिंग इंग्लिश मीडियम स्कूल इंदिरानगर, के. एन. केला इंग्लिश मीडियम स्कूल जेलरोड या केंद्रांवर कागदपत्र पडताळणी होणार असून, या केंद्रांना ९२ शाळा जोडण्यात आल्या आहेत. सर्व तालुक्यांच्या ठिकाणी पडताळणी समिती स्थापन करण्यात आली असून, त्यांचा पत्ता व नावे वेबसाइटवरील कागदपत्रे पडताळणी केंद्र या टॅबवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

सर्व शाळांना कागदपत्रे पडताळणी केंद्राचे नाव नोटीस बोर्डवर प्रदर्शित करणे गरजेचे असून, लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना कागदपत्रे पडताळणी केंद्रावर पाठवावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. मुख्याध्यापकांना कागदपत्रांची तपासणी व अॅडमिट करण्याची आवश्यकता नसून, हे काम कागदपत्रे पडताळणी केंद्र करणार आहे, असेही कळविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बायोमेट्रिकवरून दणका

0
0

कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी विभागप्रमुखांचे वेतन बंद

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतील कामचुकार कर्मचाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी कर्मचाऱ्यांसह विभागप्रमुखांकडे मोर्चा वळवला आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बायोमेट्रिक हजेरीची संपूर्ण जबाबदारी आता विभागप्रमुखांवर टाकण्यात आली असून, अधिनस्त अधिकारी-कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी सुरू झाल्याची खात्री होईपर्यंत विभागप्रमुखांनी स्वत:चे वेतन काढू नये, असे आदेश आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत. आयुक्तांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे पालिकेत खळबळ उडाली आहे.

पालिकेतील रिक्तपदांचा आकडा २२०० च्या वर गेला असून, केवळ पाच हजार कर्मचाऱ्यांवरच पालिकेचा गाडा हाकावा लागत आहे. त्यातच दरमहा होणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमुळे रिक्तपदांचा आकडा वाढतच आहे. वाढलेल्या आस्थापना खर्चाचे कारण देत राज्य शासनाने महापालिकेच्या रिक्तपदांच्या भरतीलाही स्थगिती दिली आहे. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवरच महापालिकेच्या कामकाजाचा ताण वाढत चालला आहे. प्रशासनाचा गाडा ओढण्यासाठी एकीकडे काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना अहोरात्र मेहनत घ्यावी लागत असताना काही कर्मचारी मात्र कामावर न येताच अनेकवर्षे पालिकेचे वेतन लाटत असल्याच्या तक्रारी आयुक्तांकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी बायोमेट्रिक हजेरी सक्तीची केली आहे. पालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांनाही सेल्फी अॅटेडन्स सक्तीचा केला आहे. त्यामुळे कामचुकार कर्मचाऱ्यांची मोठी फजितीच झाली आहे. बायोमेट्रीक हजेरीच्या आधारेच मार्च पेड इन एप्रिलचे वेतन अदा करण्याचे निर्देश आयुक्त गमे यांनी दिले होते. परंतु अद्यापही शिक्षण, आरोग्यासह अन्य काही विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी सुरू होऊ शकलेली नाही. त्यामुळे मार्च पेड इन एप्रिलचे वेतन अदा करताना एप्रिल पेड इन मेच्या वेतनाबाबत मात्र आयुक्तांनी कठोर भूमिका घेतली आहे. बायोमेट्रिक हजेरी नसणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करतानाच जोपर्यंत अधिनस्त सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी सुरू झाल्याची खात्री होत नाही तोपर्यंत संबंधित विभागाप्रमुखाचे वेतन अदा न करण्याची भूमिका आयुक्तांनी घेतल्याने कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

...

शिक्षणाधिकाऱ्याला नोटीस

शिक्षण विभागालाही बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात आली आहे. त्यामुळे शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी देखील बायोमेट्रिक लागू झाले असून, तसे आदेश आयुक्तांनी यापूर्वीच दिले आहेत. वेळोवेळी सूचना देऊनही शिक्षण विभागाने महापालिकेच्या शाळांमधील शिक्षकांची बायोमेट्रिक हजेरी सुरू न केल्याने शिक्षणाधिकारी उदय देवरे यांना आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नोटीस बजावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

... तर पोलिस घरी येणार घ्यायला!

0
0

कामचुकार निवडणूक कर्मचाऱ्यांवर होणार गुन्हा दाखल

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीसाठी प्रशिक्षण सत्राला सुरुवात झाली असून या प्रशिक्षणाला दांडी मारू पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांना घेण्यासाठी थेट पोलिसांचे वाहन त्यांच्या घरापर्यंत पाठविण्यात येणार आहे. विविध कारणांची ढाल पुढे करून निवडणूक कामाची जबाबदारी पार पाडू पाहणाऱ्या कामचुकार कर्मचाऱ्यांना इंगा दाखविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेने कंबर कसली असून कर्मचाऱ्यांची नेतेगिरी करीत प्रशिक्षणाकडे पाठ फिरविणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही प्रशासनाने दिले आहेत.

लोकसभा निवडणुक प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी जिल्हा प्रशासनाची निवडणूक शाखा कसोशीने प्रयत्न करीत आहे. मतदान प्रक्रिया निर्विघ्न पार पडावी याकरीता कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे हा प्रत्येक निवडणुकीच्या प्रक्रियेतील अविभाज्य भाग आहे. या निवडणुकीसाठी सुमारे ३० हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ नाशिक निवडणूक शाखेला हवे आहे. निवडणुकीच्या कामकाजासाठी नेमण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची यादी बनविण्यात आली असून त्यांना ऑर्डर्सही पाठविण्यात आल्या आहेत. परंतु, अनेक कर्मचारी निवडणुकीच्या कामाची जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी आजारपणासह विविध अडचणीही त्यांच्याकडून सांगितल्या जात आहेत. मात्र, अडचणी सांगणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही निवडणूक कामकाजाच्या जबाबदारीतून सुटका होणार नसल्याचा पवित्रा सुरुवातीपासूनच निवडणूक शाखेने घेतला आहे. त्यामुळेच आरोग्याबाबतच्या तक्रारी पुढे करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही ऑर्डर्स पाठवून प्रशिक्षणाला हजर राहण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. प्रशिक्षण घेतल्यास निवडणुकीच्या कामकाजात सक्रिय रहावे लागेल, अशी धास्ती कर्मचाऱ्यांना वाटू लागली आहे. त्यामुळे प्रशिक्षणालाच गैरहजर राहण्याची शक्कल कर्मचाऱ्यांकडून लढविली जाण्याची शक्यता आहे. मात्र, प्रशिक्षणाला गैरहजर राहणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची तयारी निवडणूक शाखेने सुरू केली आहे. दिंडोरी आणि निफाड विधानसभा मतदारसंघात शनिवारी प्रशिक्षण सत्र पार पडले. जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघांमध्ये रविवारी (दि. ७) नियोजित ठिकाणी दिवसभर प्रशिक्षण सत्र सुरू राहणार असून उर्वरित ठिकाणी सोमवारी (दि. ८) प्रशिक्षण सत्र घेण्यात येणार आहे.

आधी फोन नंतर पोलिस व्हॅन

कोणत्या ना कोणत्या कारणाने निवडणुकीच्या कामकाजाची जबाबदारी कर्मचारी टाळू पाहात असतील तर हे काम कोणी करायचे, असा सवाल उपस्थित होतो. त्यामुळेच कामचुकारपणा करणाऱ्या कुणाचीही गय न करण्याचा पवित्रा जिल्हा प्रशासनाने स्वीकारला आहे. प्रशिक्षणाला रविवारी (दि. ७) सकाळी १० वाजता सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी प्रशिक्षण केंद्रावर हजर न होणाऱ्या कर्मचाऱ्यांना जिल्हा प्रशासनाकडून फोन करून प्रशिक्षण सत्रास हजर होण्याबाबत सांगण्यात येणार आहे. त्यानंतरही काही कर्मचारी प्रशिक्षण सत्रात सहभागी झाले नाहीत तर त्यांना आणण्यासाठी घरापर्यंत पोलिस व्हॅन पाठविण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांनी दिली आहे. तरीही प्रशिक्षण सत्राकडे कुणी पाठ फिरविलीच तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

राजकीय प्रतिनिधींनीही आवाहन

निवडणूक प्रक्रिया आणि त्यातील कायदेशीर तरतुदींची माहिती राजकीय पक्षांनाही असायला हवी. त्यामुळेच त्यांनी नेमलेल्या मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान प्रतिनिधी यांनाही निवडणूक प्रशिक्षणासाठी पाठवा, असे विनंतीपत्र सर्व राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष तसेच शहराध्यक्षांना निवडणूक शाखेकडून पाठविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटा कट्टा - युवक समन्वय समिती - प्रतिक्रिया

0
0

निवडणूका जवळ आल्या की, युवकांबाबत विविध घोषणाबाजी केली जाते. राजकारणी युवकांना केंद्रस्थानी ठेवून आश्वासने देतात. पण प्रत्यक्षात कार्य होताना दिसत नाही. दोन कोटी रोजगार देणार असे आश्वासन सत्ताधारी सरकारने दिले होते, मात्र ते प्रत्यक्षात उतरलेले नाही. नाशिकमध्ये गेल्या दहा वर्षात इंजिनीअरिंग कॉलेजची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी या विद्यार्थ्यांना नोकरी देण्यासाठी एकही मोठी कंपनी शहरात आलेली नाही. हे चित्र बदलण्याची गरज आहे.

प्रसाद देशमुख

- -

निवडणुकांमध्ये तरुण व शेतकरी यांना समोर ठेवून प्रचार केला जातो. या प्रचारात मोठी आश्वासने दिली जातात. पण ते प्रत्यक्षात उतरत नसल्याने आमच्या भावनांचा खेळ होतो आहे. शहरी व ग्रामीण भागातील मुलामुलींचे प्रश्न वेगवेगळे आहेत. हे प्रश्न जाणत कार्य होणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना बसची सुविधा नाही, शहरात रहायचे म्हटले तर वसतिगृह नाही. या प्रश्नांना निवडणुकीच्या माध्यमातून वाचा फोडण्याची गरज आहे.

भूषण काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजप सरकारला धडा शिकविण्याची वेळ

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव भाजप सरकारच्या काळात शेतीमालास योग्य भाव मिळालेला नाही, तरुण बेरोजगार झाले, शेतकरी-तरुणांसह सर्वांनाच या सरकारने वाऱ्यावर सोडले. त्यामुळे भाजप सरकारला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. कल्याणकारी सरकार परत आणण्यासाठी मतदारांनी पाठबळ द्यावे, असे आवाहन धुळे लोकसभेचे काँग्रेसचे

उमेदवार व आमदार कुणाल पाटील यांनी केले. कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ मालेगावचा दौरा झाला. दाभाडी येथे झालेल्या सभेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. अद्वय हिरे हे उपस्थित होते. काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, प्रसाद हिरे, राष्ट्रवादीचे राजेंद्र भोसले, शांताराम लाठर, पवन ठाकरे, राकेश भामरे, जयंत पवार, संदीप पवार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी आमदार पाटील म्हणाले, की मतदारांनी मोठा विश्वास दाखवत डॉ. भामरे यांना निवडून दिले होते; मात्र गेल्या पाच वर्षात केवळ घोषणा झाल्यात मतदारसंघात विकास कुठेही दिसत नाही. विविध संस्थांच्या माध्यमातून निवडणुकांचा अनुभव आपल्या गाठीशी आहे. तसेच आमदार म्हणूनही अनुभव असून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानसिक अपंगत्व कठीण

0
0

फोटो - पंकज फोटो

मानसिक अपंगत्व कठीण

निवृत्त लेफ्टनंट कर्नल बत्रा यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शारीरिक अपंगत्व असूनही स्वत:च्या हिंमतीवर आणि धैर्यावर उज्ज्वल यशप्राप्त करणाऱ्यांची संख्या देशभरात अधिक आहे. यश मिळविण्यासाठी आणि उत्कृष्ट व्यक्तिमत्त्वासाठी मानसिकता आणि मनोबल महत्त्वपूर्ण ठरते. पालकांनी आपली भूमिका बजावताना पाल्यांची मानसिकता सुदृढ ठेवण्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे. कारण, मानसिक अपंगत्व आल्यास म्हणजेच, ताणतणावात पाल्य असेल तर त्याचा विकास होणे कठीण होते, असे प्रतिपादन निवृत्त लेफ्टनंट कर्नल अमित बत्रा यांनी केले.

'समर्थ ट्रस्ट' आयोजित 'मेक युवर चाईल्ड युनिक इन दि वर्ल्ड' या कार्यक्रमात ते बोलत होते. माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे 'व्हिजन २०२०' हे ध्येय समोर ठेवून समर्थ ट्रस्टतर्फे 'पालकत्व, समाज आणि देश' या उपक्रमाची मुहूर्तमेढ शहरात गुढीपाडव्याच्या निमित्ताने रोवली गेली. प्रत्येक पालकाला आपला पाल्य जगात अद्वितीय असावा, असे वाटत असते. त्यासाठी पालकत्वात असताना साकारण्याच्या भूमिका आणि मानसिक समुपदेशन यावर भर देणारा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी व्यासपीठावर ट्रस्टचे सचिव मनिष मंजुल, निवृत्त लेफ्टनंट कर्नल अमित बत्रा, करिअर मार्गदर्शक डॉ. मंगेश भांगे, ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर, मानसशास्त्रज्ज्ञ अश्विनकुमार भारद्वाज आणि रंजिथ कुमार रेड्डी होते. ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रलय सरकार यांनी सर्वांचे स्वागत केले.

करिअर मार्गदर्शक आणि समुपदेशक डॉ. भांगे आणि भारद्वाज यांनी पाल्यांच्या मानसिकेतसह पालकांच्या मानसिकतेवर भाष्य केले. पाल्यांना प्रत्येक गोष्ट शक्य आहे याचा आत्मविश्वास निर्माण व्हावा त्यासाठी त्यांच्यासमोर शक्य होतील तितक्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, असा सल्ला देण्यात आला. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे काही केस स्टडीज् पालकांना दाखविण्यात आल्या. कठीण परिस्थितीवर कठोर परिश्रमातून पाल्य उत्तुंग भरारी घेतात. पण, त्यासाठी मानसिकदृष्ट्या ते सकारात्मक आणि जिद्दी असतात. त्यामागे पालकांचे संपूर्ण पाठबळ आणि सकारात्मक मानसिकतेतून मिळणारे मार्गदर्शन लाभदायक असते, असे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारागाड्यांची यात्रा उत्साहात

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

सुमारे दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या बारागाड्यांची यात्रा सातपूरला उत्साहात पार पडली. शनिवार कामगारांच्या सुटीचा दिवस असल्याने बारागाड्या यात्रेला तोबा गर्दी झाली होती. कुठलाही अनूचित

प्रकार होऊ नये याकरिता सातपूर ग्राम विकास मंडळ व पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

गेल्या तीन वर्षांपासून मंगेश निगळ यांना गणेशाचा मान दिला गेला आहे. बारागाड्यांच्या यात्रेला आमदार सीमा हिरे, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे, नगरसेवक शशिकांत जाधव, नगरसेविका पल्लवी पाटील, माधुरी बोलकर, राधा बेंडकोळी, नयना गांगुर्डे, नगरसेवक दिलीप दातीर, भागवत आरोटे, संतोष गायकवाड, माजी नगरसेवक प्रकाश लोंढे, कामगारनेते डॉ. डी. एल. कराड यांसह सर्वच पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. स्थानिक नगरसेविका सीमा निगळ यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष सचिन घाटोळ, कार्याध्यक्ष हर्षद काळे, सागर निगळ आदींनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले.

पारंपारिक बारागाड्यांच्या यात्रेसाठी त्रंबकेश्वररोडवरील रस्ता दुपारपासून बंद ठेण्यात आला होता. दुपारी दोन वाजेनंतर बारागाड्या त्र्यंबकेश्वररोडवर लावण्यात आल्या. यानंतर सांयकाळी चारवाजेला बारागाड्या ओढणाऱ्या श्री गणेशाची वाजत गाजत शिवाजी चौकातून मिरवणूक काढण्यात आली. सातपूर गावातील मारूती मंदिराचे दर्शन घेत श्री गणेशाने एमआयडीसीत असलेल्या भवानी मातेचे दर्शन घेतले. गणेशाचे रूप धारण केल्याल्या मंगेश यांची मिरवणूक सायंकाळी सात वाजेला बारागाड्यांच्या जवळ आली. यानंतर गणेशाने बारागाड्यांना प्रदक्षिणा घातल्या. यावेळी ग्रामस्थ व आलेल्या मान्यवरांनी गणेशा व बारागाड्यांची विधिवत पूजा केला. भवानी माते की जय असा जय घोष करीत गणेशाने बारागाड्या ओढल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातपूरला संस्कृतिदर्शन

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर गुढीपाडव्यानिमित्त सात ठिकाणी पारंपरिक पद्धतीने कला, संस्कृतीचे दर्शन घडवत नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. जाधव संकुल तुळजा भवानी मंदिर, महालक्ष्मी मंदिर मौले हॉल, दक्षिणमुखी हनुमान मंदिर सातपूर कॉलनी, वरद विनायक मंदिर समतानगर, अमृतमनी गणेश मंदिर जुनी कॉलनी, संकट मोचन हनुमान मंदिर अशोकनगर, श्रीराम मंदिर विश्वास नगर येथून यात्रा काढण्यात येत दक्षिण मुखी इच्छापूर्ती साईनाथ मंदिर, बळवंतनगर, आनंद छाया येथे समारोप करण्यात आला. मतदान जनजागृती, बेटी बचाव, पाणीबचत, मोहीम राबवत जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती सातपूर नववर्ष स्वागत समितीचे अध्यक्ष बाळासाहेब भोजने यांनी दिली. या यात्रेत सामाजिक संस्था, भजनी मंडळ, सामाजिक मंडळे, विविध शैक्षणकि संस्था, व्यायाम मंदिर यांचा सहभाग असतो. नगरसेविका माधुरी बोलकर, पल्लवी पाटील, सीमा निगळ, नगरसेवक सलिम शेख, शशिकांत जाधव, डॉ. वृषाली सोनवणे, डॉ. मेघा वाणी, गणेश बोलकर, अमोल जोशी, सतीश धामणे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Article 9

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images