Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

मतभेद विसरून कामाला लागा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

युतीच्या नेत्यांमधील दुरावा कमी करण्यासाठी बुधवारी रात्री पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत चिंतन बैठक झाली. यात महाजन यांनी उत्तर महाराष्ट्रातील सर्व जागा जिंकणे गरजेचे असल्याचे सांगत, हेवेदावे आणि मतभेद विसरून उमेदवारांच्या विजयासाठी कामाला लागा, असे आदेश दिले.

गेली साडेचार वर्षे एकमेकांना लाखोल्या वाहणाऱ्या शिवसेना आणि भाजपने लोकसभा निवडणुकांसाठी युती केली आहे. परंतु, वरिष्ठ नेत्यांनी केलेली युती स्थानिक नेत्यांच्या पचनी पडलेली नाही. शिवसेना आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये अद्याप दुरावा आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकदा मनोमिलन सोहळा पार पडला असला तरी, नाशिकमध्ये शिवसेना आणि भाजप अंतर्गतच उमेदवारांवरून मोठी नाराजी आहे. शिवसेनेचा एक मोठा गट गोडसेंच्या विरोधात आहे, तर भाजपच्या माणिकराव कोकाटेंनी बंड पुकारले आहे. दिंडोरीतही भाजपच्या भारती पवारांविरोधात खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे. त्यामुळे युतीच्या नेत्यांमधील नाराजी दूर करण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पाथर्डी फाट्यावरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये युतीच्या नेत्यांची बैठक झाली. बैठकीला ग्रामविकास राज्य मंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसेंसह जिल्हाप्रमुख विजय करंजकर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, भाजपचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्याह युतीचे आमदार उपस्थित होते. यावेळी महाजन यांनी मतदारसंघ निहाय उमेदवारांच्या स्थितीचा आढावा घेत, प्रचाराची रणनीती आखली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पिस्तूल, काडतुसे बाळगणाऱ्यास अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिन्नर बसस्थानक परिसरात पिस्तूल, मॅगझिन व जिवंत काडतुसे विक्री करण्यासाठी आलेल्या एका संशयिताला ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. मंगळवारी ही कारवाई करण्यात आली.

अशोक बाबुराव खुळे (वय ४७, रा. खडकपुरा, सिन्नर शहर) असे संशयिताचे नाव आहे. तो तालुक्यातील वडांगळीचा रहिवाशी आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, दोन मॅगझिन आणि तीन जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्यावर अहमदनगर जिल्ह्यातील लोणी, मुंबईतील घाटकोपर इतकेच नव्हे, तर आंध्र प्रदेशातही एन. डी. पी. एस कायद्यान्वये गुन्हे दाखल आहेत. पोलिस निरीक्षक अशोक करपे, उपनिरीक्षक संदीप कहाळे, हवालदार प्रकाश चव्हाणके, दिलीप घुले, प्रीतम लोखंडे, नीलेश कातकाडे संदीप लगड, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जावांच्या खूनप्रकरणी एकास जन्मठेपेची शिक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आर्थिक वादातून दोघा जावांवर चाकू हल्ला करून त्यांचा निर्घृण खून करणाऱ्या सिडकोतील एकास जिल्हा व सत्र न्यायाधीश सुचित्रा घोडके यांनी जन्मठेप आणि तेरा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

सिडकोतील शिवाजी चौक परिसरात ६ सप्टेंबर २०१३ रोजी ही घटना घडली होती. नितीन सुभाष पवार (वय २५, रा. सूर्यनारायण चौक, पवननगर, सिडको) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेत मेघा राजेश नवलाख व ऋतुजा नवलाख (रा. दोघी शिवाजी चौक, सिडको) यांचा चाकू हल्ल्यात मृत्यू झाला होता. आरोपी पवार हा मेघा नवलाख यांचा चुलत भाऊ असून, त्यांच्यात आर्थिक देवाणघेवाणीतून वाद होता. मेघा यांच्या घरी जाऊन त्याने चाकू हल्ला केला. त्यांची जाव ऋुतुजा नवलाख मदतीला धावून आल्या. त्यांच्यावरही चाकूने हल्ला करण्यात आल्याने त्यादेखील गंभीर जखमी झाल्या. दोघींना तात्काळ उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी अंबड पोलिसांनी पवार याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला होता. तत्कालीन पोलिस निरीक्षक व्ही. डी. श्रीमनवार यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील अजय मिसर, अ‍ॅड. व्ही. एस. तळेकर यांनी युक्तिवाद केला. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारासह वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष या खटल्यात महत्त्वाची ठरली. न्यायालयाने साक्ष व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे आरोपी पवार याला जन्मठेप व १३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंदन झाडे चोरणारी टोळी जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तिडके कॉलनी परिसरातील फार्म हाऊसमधून चंदनाची झाडे तोडून नेणाऱ्या व त्यांना हटकणाऱ्या सुरक्षारक्षकास मारहाण करणाऱ्या टोळीला मुंबई नाका पोलिसांनी अटक केली. टोळीतील सर्व संशयित बेलापूर (जि. अहमदनगर) येथील असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

संजय मानिक जाधव (वय २२, रा. दत्त मंदिरजवळ, अंबड), विजय शंकर गायकवाड (वय २२, रा. पपया नर्सरीजवळ, सातपूर रोड), रामा विलास कोळी (वय ४०, रा. दत्तमंदिर जवळ, अबंड लिंक रोड), लक्ष्मण तात्याबा पवार (वय २२, रा. शेणिगाव, इगतपुरी) अशी संशयितांची नावे आहेत. २४ फेब्रुवारी २०१९ रोजी पहाटे संशयित तिडके कॉलनीतील सपट फार्म हाऊस येथील चंदनाचे वृक्ष तोडून घेऊन चालले होते. सुरक्षा रक्षकाने हटकले असता, त्याला मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये दरोड्यासह वृक्ष तोड अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रात्रीस खेळ चाले मनोमिलनाचा!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देशातील पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकांसाठीची नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया संपली असली तरी, जिल्ह्यात युती आणि आघाडीमध्ये मनोमिलन आणि हेव्यादाव्यांचा खेळ अद्याप सुरूच आहे. नाशिक आणि दिंडोरीची निवडणूक प्रक्रिया अजून सुरू झाली नसल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना नाराजांची मनधरणी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला आहे. दिवसा मतदारांच्या भेटीगाठी घ्यायच्या आणि रात्री नाराजांची समजूत काढली जात आहे.

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा झाल्याने आता चित्र स्पष्ट झाले आहे. नाशिकमध्ये शिवसेनेकडून हेमंत गोडसे, राष्ट्रवादीकडून समीर भुजबळ रिंगणात आहेत. सोबतच भाजपचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनीही अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली आहे. वंचित आघाडीकडूनही पवन पवार रिंगणात आहेत. गोडसेंना उमेदवारी मिळाल्याने शिवसेनेचा एक मोठा गट नाराज आहे, तर भाजपच्या उमेदवारांच्या बंडाने गोडसेंसमोर अडचणी उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गोडसेंकडून नाराज आणि असंतुष्टांची मनधरणी करण्याचे काम सुरू आहे. दुसरीकडे समीर भुजबळ यांच्यासमोर एकाचवेळी विरोधकाशी दोन हात करण्यासह मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसमधील हेवेदावे दूर करण्याचे आवाहन आहे. राष्ट्रवादीकडून मान सन्मान मिळत नसल्याने आणि प्रचारावेळी विचारले जात नसल्याने राष्ट्रवादीशी जुळवून कसे घ्यायचे असा सवाल काँग्रेसचे नेते करीत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते काँग्रेस नेत्यांची मनधरणी करण्यात नाकीनऊ आहेत. काँग्रेसचे नेते अजूनही प्रचारात सक्रीय न झाल्याने राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून काँग्रेसच्या नेत्यांची मनधरणी करण्यासाठी रात्रीच्या वेळी भेटीगाठी घेण्याचा फंडा अवलंबला जात आहे. भाजपला हरवणे कसे काँग्रेसहिताचे आहे, हे त्यांना पटवून द्यावे लागत आहे. दिंडोरी मतदारसंघातही भाजप आणि राष्ट्रवादीत नाराजीनाट्य सुरू आहे. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण बंडाच्या पवित्र्यात असून त्यांची मनधरणी करताना नेत्यांच्या नाकीनऊ आले आहेत. चव्हाण यांचा गुरूवारी मेळावा होणार असून, त्यात काय निर्णय घेतात,यावरच भाजपच्या विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीकडून धनराज महालेंच्या विजयात अडसर ठरणारे माकपचे जे. पी. गावित यांचे बंड शांत करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे यासाठी उमेदवारांसह पक्षांकडून रात्रीची वेळ निवडण्यात येत असून त्यासाठी बैठका आणि मैफली रंगत असल्याच्या चर्चा आहेत.

मनसेचे वेटिंग

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजपविरोधात मतदान करण्याची भूमिका जाहीर केली असली तरी कोणाला मतदान करायचे, याबाबतचे धोरण अद्याप स्पष्ट नसल्याने मनसैनिक संभ्रमात आहेत. हा संभ्रम दूर करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी मनसेचे दोन शिलेदार ठाकरेंना भेटले. यावेळी त्यांनी अद्याप कोणाचाही प्रचार करू नका असे सांगत ६ एप्रिलला गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर भूमिका स्पष्ट करेल, असे सांगितल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांची सध्या आस्ते कदम भूमिका आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडको विभागात ४६ टक्केच वसुली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको मार्चएंडच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी वसुलीचा धडका सुरू असताना महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाने यंदा केवळ ४६ टक्‍केच घरपट्टीची वसुली केली आहे. ही वसुली वाढविण्यासाठी थेट जप्ती आणि लिलावाच्या अंतिम नोटिसा थकबाकीदारांना देण्यात आल्याचे विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांनी सांगितले. नाशिक महापालिकेच्या वतीने घरपट्टी आणि पाणीपट्टीसाठी दरवर्षी प्रत्येक विभागीय कार्यालयाला उद्दिष्ट देण्यात येत असते. सिडको परिसरातून यंदा ४५ कोटी रुपयांची घरपट्टीची वसुली होणे अपेक्षित आहे. मात्र अद्यापपर्यंत केवळ २१ कोटी ५० लाखांची वसुली झाली आहे. त्यामुळे यंदा केवळ ४६ टक्‍केच वसुली झाली आहे. वसुली वाढविण्यासाठी महापालिकेने २१ दिवसांची मुदत असलेली जप्ती व लिलाव नोटिसा देण्याचे काम सुरू केले आहे. पाणीपट्टी न भरणाऱ्यांवरही प्रशासनाने कठोर कारवाई सुरू केली असून, पाणीपट्टी न भरणाऱ्याचे थेट कनेक्शन तोडण्यात सुरुवात केली आहे. यामुळे नागरिकांनी पाणीपट्टी भरण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत १०० बड्या थकबाकीदारांना जप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. लवकरच उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार असल्याचा विश्वास कुमावत यांनी व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आसरा संस्थेतर्फे चालकांचे प्रबोधन

$
0
0

आसरा संस्थेतर्फे

चालकांचे प्रबोधन

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोडच्या दत्त मंदिर सिग्नलवर आसरा सामाजिक फाउंडेशनतर्फे पोलिसांच्या मदतीने वाहनचालक आणि पादचाऱ्यांचे प्रबोधन करण्यात आले. वाहतुकीचे नियम आणि हेल्मेट वापराचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्यात आले.

झेब्रा क्रासिंग व सिग्नल तोडू नये, दुचाकीचालकांनी हेल्मेटचा आवर्जून वापर करावा, वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, वाहतूकीचे नियम पाळावे आदी सूचना वाहनचालकांना करण्यात आल्या. वाहनचालक व नागरिकांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिला. आसरा फाउंडेशनचे संस्थापक पिंटू थोरात व सहकारी उपस्थित होते. त्यांना वाहतूक पोलिसांचेही सहकार्य लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संत साहित्याचा मार्गदर्शक हरपला

$
0
0

\Bप्रा. डॉ. यशवंत पाठक यांना आदरांजली अर्पण \B

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'यशवंतचे आपल्यातून नकळत निघून जाणे अद्यापही खरे वाटत नाही. आपल्या सोबत त्याचा सहवास कायम असल्याचे क्षणोक्षणी वाटते. यशवंतचा संत साहित्याचा अभ्यास आणि प्रत्येकाशी जवळीकतेने असलेले वर्तन हृदयात घर करून बसले आहे. यशवंत आपल्यात नसला तरी त्याचे विचार सदैव असणार आहेत. पण, त्याच्या जाण्याने संत चळ‌वळीतील एक उत्तम मार्गदर्शक हरपला', अतिशय भावपूर्ण वातावरणात अशा भावना स्वर्गीय प्रा. डॉ. यशवंत पाठक यांच्या शोकसभेत व्यक्त झाल्या.

संत साहित्याचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ निरुपणकार, ग्रंथकार स्वर्गीय प्रा. डॉ. पाठक यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सार्वजनिक वाचनालय नाशिक तर्फे कलादालनात बुधवारी सायंकाळी शोकसभा झाली. त्यावेळी हभप सिन्नरकर महाराज म्हणाले, की यशवंत आणि मी एकाच वर्गात होतो. बालपणापासून त्याचा संत साहित्याचा अभ्यास मी ज‌वळून पाहिला आहे. यशवंत आपल्यातून गेल्याचा निरोप मिळाला तेव्हाही त्या वृत्तावर विश्वास बसला नाही. यशवंतच्या जाण्याने संत साहित्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पण, यशवंतचे विचार आणि त्याने मांडलेल्या भूमिका अविरत राहतील.

डॉ. तुळशीराम गुट्टे म्हणाले, की रसाळ बोलण्यातून यशवंत समोरच्याला आपलंस करून घ्यायचा. यशवंतच्या सानिध्यात संत साहित्याला सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. त्याचा सहवास लाभलेल्यांना जणू संत साहित्याची संजीवनी लाभली आहे. पुरुषोत्तम सावंत म्हणाले, की आध्यात्माची जवळून ओळख असणारा व्यक्ती आपल्यातून गेला आहे. यशवंत पाठकांच्या जाण्याने अध्यात्माची एक बाजू मोडली आहे. तसेच यशवंत हा आदर्श आणि आनंदायी जीवन जगण्याचा प्रेरक होता. शलाका सावंत म्हणाल्या, की यशवंत पाठकांच्या सहवासातून सगळेजण अमृततुल्य साहित्याची माहिती झाली. आयुष्यात इतक्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वांसोबतचा सहवास भाग्यवंतांनाच मिळतो. त्यामुळे आजची पिढी अतिशय उत्कृष्ट अभ्यासकाला आणि मार्गदर्शकाला मुकली आहे. सावानाचे अध्यक्ष श्रीकांत बेणी, उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते यांसह शहरातील साहित्य क्षेत्रातील अनेक नामवंत मंडळींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शंकर बोऱ्हाडे यांनी सूत्रसंचालन केले.

पुन्हा असे व्यक्तिमत्त्व घडणे नाही

डॉ. उल्हास रत्नपारखी म्हणाले, की यशवंतचे जाणे हे नकळत असले तरी त्याच्या जाण्याने महानतेला स्पर्श केला आहे. यशवंतासारखे व्यक्तिमत्त्व पुन्हा घडणे नाही. शिवाय त्याने केलेला संत साहित्याचा अभ्यास पुढील कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. त्यामुळे तो आज आपल्यातून हरपला असला तरी त्याचे विचार आणि भूमिका कायम राहणार आहे', अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आरटीई’ची अर्जसंख्या १३ हजारांच्या पार

$
0
0

शाळांमधील जागा : ५ हजार ७३५

आतापर्यंत आलेले अर्ज : १३ हजार ६८३

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बालकांचा सक्तीचा व मोफत शिक्षणहक्क कायद्यानुसार सुरू असलेल्या आरटीई प्रक्रियेसाठी यंदा रेकॉर्ड ब्रेक अर्ज प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यातील ४५७ शाळांमध्ये प्रक्रिया राबविण्यात येत असून, ५ हजार ७३५ जागांसाठी तब्बल १३ हजार ६८३ अर्ज प्राप्त झाले आहेत. ३० मार्चपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असून, अर्जसंख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी जिल्ह्यातील ४५७ शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागा राखीव आहेत. या जागांवर प्रवेशासाठी आरटीई अर्ज प्रक्रिया सुरू असून, या प्रक्रियेस ३० मार्चपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आरटीईबाबत जनजागृती वाढीस लागल्याने मोठ्या प्रमाणात गरजू पालक अर्ज करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या नावांची लॉटरी काढून त्यामार्फत प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेशापूर्वी विद्यार्थ्यांच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी समितीकडून करण्यात येणार आहे. या पडताळणीनंतर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.

यंदा जागांच्या तुलनेत अर्जसंख्या अधिक असल्याने लॉटरी प्रक्रियेकडे पालकांचे लक्ष लागले आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पहिली लॉटरी काढली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक काँग्रेस कार्यालयावर जप्तीचे संकट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेसच्या नाशिक शहर कार्यालयावर जप्तीचे संकट घोंगावत आहे. महापालिकेने जप्ती वॉरंट बजावूनदेखील घरपट्टीची २२ लाख ३९ हजारांची थकबाकी मुदतीत न भरल्याने अखेर कॉँग्रेस कार्यालयावर महापालिकेने जप्तीची प्रक्रिया सुरू केली आहे. काँग्रेससोबतच शहरातील १६५४ थकबाकीदारांच्याही मालमत्ता जप्तीची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. पुढील आठवड्यात यासंदर्भातील आदेश जारी होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

महापालिकेने २५ हजारांपेक्षा अधिक रकमेची थकबाकी असलेल्या मिळकतधारकांकडून थकबाकी वसुलीसाठी जप्तीची कारवाई सुरू केली आहे. महापालिकेने जवळपास १६५४ थकबाकीदारांना जप्तीचे वॉरंट बजावले आहे. या सर्व मिळकतधारकांना ३ मार्च रोजी जप्ती वॉरंट बजावत त्यांना थकबाकी भरण्यासाठी २५ मार्चची मुदत दिली होती. वॉरंट बजावल्यापासून २१ दिवसांच्या आत थकीत कर भरणे बंधनकारक होते. मात्र ही थकबाकी भरायची कोणी, यावरून कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या वादात थकबाकी भरण्याची मुदत २५ मार्च रोजी संपुष्टात आली. महापालिकेने बजावलेल्या जप्ती वॉरंटवर काँग्रेसने आक्षेप घेत महापालिकेकडून चुकीच्या पद्धतीची आकारणी होत असल्याचा आरोप केला होता. गटनेते शाहू खैरे यांनी तसे पत्र प्रशासनाला दिले होते. मात्र विविध कर विभागाने काँग्रेसला मागील थकबाकीसह येणे, दंड व तो न भरल्यामुळे वॉरंटपोटी चढलेला बोजा आदी तपशील कळवत त्यांचा आक्षेप खोडून काढला. काँग्रेस कमिटीला २२ लाख ३९ रुपयांच्या थकबाकीसाठी जप्ती वॉरंट काढले होते. त्यामुळे २५ तारखेपर्यंत ही रक्कम न जमा झाल्याने आता महापालिकेकडून जप्तीची कारवाई सुरू झाली आहे. पुढील आठवड्यापासून थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. ऐन निवडणूक काळात कार्यालय जप्त झाल्यानंतर त्याचा लिलावही केला जाणार आहे. त्यामुळे काँग्रेससमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

१६५४ थकबाकीदारांना नोटिसा

आर्थिक वर्ष संपत आल्याने महापालिकेने करवसुली मोहीम तीव्र केली आहे. पंचवीस हजारांपेक्षा अधिक घरपट्टी थकीत असलेल्या ११५२ मिळकतधारकांना पहिल्या टप्प्यात जप्ती वॉरंट बजावल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात आणखी ५०२ थकबाकीदार मिळकतधारकांना जप्ती वॉरंट बजावण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण १६५४ थकबाकीदारांवर अशा प्रकारे कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, येत्या काही दिवसांत ही संख्या आणखी वाढणार आहे. दरम्यान, महापालिकेची वसुली ही शंभर कोटींच्या पार गेली आहे.

दोनशे नळजोडण्या तोडल्या

पाणीपट्टीच्या थकीत करवसुलीसाठी महापालिकेने मोहीम तीव्र केली असून, पाच हजारांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या ३३ हजार नळजोडणी धारकांना नोटिसा बजावल्यानंतर आता थकबाकी न भरणाऱ्यांच्या नळजोडण्या तोडण्याची प्रत्यक्ष कारवाई सुरू करण्यात आली आहे. गेल्या आठवडाभरात तब्बल २०० थकबाकीदारांच्या नळजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. पाणीपट्टीची वसुली ही ४२ कोटी ३८ लाखांवर पोहचली आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रचारापेक्षा मानपानावरच खल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मदत न केल्याने काँग्रेसचे अनेक उमेदवार पराभूत झाले. असे असताना लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला का म्हणून आपण मदत करावी, अशी खदखद काँग्रेस कार्यकर्त्यांनी बुधवारी व्यक्त केली. आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारासाठी त्यांचे कुटुंबीय प्रभागात येऊन जातात, तरीही स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले जात नाही. आदरभाव दाखविला जात नसल्याबद्दलही या वेळी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर (जिल्हा) व ग्रामीण (जिल्हा) काँग्रेस प्रभारी पुणे महापालिकेचे माजी महापौर दत्तात्रेय गायकवाड आणि माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत महात्मा गांधी रोडवरील काँग्रेस भवनात बुधवारी दुपारी एकला काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली. या वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, शहराध्यक्ष शरद आहेर, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, रतन जाधव, रमेश कहाडोले, सुनील आव्हाड आदी उपस्थित होते.

शहरासह जिल्हाभरातून आलेल्या काही पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मिळत असलेल्या अपमानास्पद वागणुकीबद्दल तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मदत न केल्याने महापालिका निवडणुकीत आपल्या उमेदवारांचा पराभव झाल्याचे शल्य हनीफ बशीर यांनी बोलून दाखविले. आताही राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, भुजबळ कुटुंबीय प्रभागात प्रचाराला येतात तरी स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांप्रती त्यांच्याकडून आदरभाव दाखविला जात नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. अपमानाचे घोट गिळून लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी सर्वतोपरी मदत करू, असे ते म्हणाले. मनमाड येथील माजी नगराध्यक्ष रहेमान शाह यांनीही काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना समजून घ्यायला हव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. नाशिकरोड येथील एका पदाधिकाऱ्यानेही अशीच भावना व्यक्त केली. हेवेदावे सोडून राहुल गांधी यांचे सत्तेचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सर्वतोपरी योगदान द्यावे, अशी अपेक्षा गायकवाड आणि चौधरी यांनी व्यक्त केली. नाशिक, दिंडोरीसह धुळे येथील आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी मनापासून काम करा, असे आवाहन शहराध्यक्ष आहेर यांनी केले. अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष काळे यांनी उमेदवारांच्या विजयासाठी जिल्हा पिंजून काढणार असल्याचे सांगितले. युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्निल पाटील, सुरेश मारू यांनीही मनोगत व्यक्त केले. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसला पुन्हा सत्तेमध्ये आणायचे आहे. त्यामुळे आघाडीने आपल्या मतदारसंघांमध्ये दिलेल्या प्रत्येक उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी योगदान द्या, असे आवाहन करीत काँग्रेसचे नाशिक लोकसभा समन्वयक माजी आमदार शिरीष चौधरी, दत्ता गायकवाड यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे कान फुंकले. राहुल गांधी यांच्या सत्तास्थापनेच्या स्वप्नपूर्तीसाठी काँग्रेस मरगळ झटकून निवडणुकीच्या रणधुमाळीत सक्रिय होणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेठरोडला तडीपारास अटक

$
0
0

पेठरोडला

तडीपारास अटक

पंचवटी : पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असल्याने नाशिक शहर तसेच जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेले असतांना पेठरोड म्हसोबा झोपडपट्टी वास्तव्य करणाऱ्या संदीप पगारे या संशयित तडीपाराला पंचवटी पोलिसांनी अटक केली. पंचवटी पोलिसांना संदीप पगारे हा कोणतीही परवानगी न घेता पंचवटी हद्दीत वास्तव्य करीत असल्याचे शनिवारी (दि.२३) रात्री आढळून आले होते. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कपाटकोंटी फुटणार

$
0
0

२७५५ प्लॉटधारकांनी जागा केली वर्ग, एफएसआय मिळण्याचा मार्ग होणार मोकळा

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहराच्या बांधकाम व्यावसायिकांच्या मागे गेल्या चार वर्षांपासून लागलेले कपाटाचे ग्रहण आता हळूहळू दूर होत असल्याचे चित्र आहे. कंपाउंडिंग पॉलिसी अंतर्गत नगररचना विभागाकडे कपाट क्षेत्राशी संबंधित दाखल असलेली २७५५ प्रकरणांमागील शुक्लकाष्ट संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणाशी संबंधित विकसकानी ६ आणि ७.५ मीटर रस्ते नऊ मीटरपर्यंत रुंदीकरणासाठी महापालिकेकडे अखेर जागा सुपूर्द केली आहे. या जागांवर महापालिकेचे नाव लावू दिल्याने आता त्यांना अतिरिक्त एफएसआय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, कपाटकोंडी फुटण्यास मदत होणार आहे.

शहरातील बांधकाम व्यावसायिक गेल्या तीन ते चार वर्षांपासून सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कोंडीत सापडला आहे. कधी एनजीटीची बंधी, कधी डीसीपीआरमधील गोंधळ, टीडीआर धोरण, प्रीमियम बंदी, त्यात नव्याने आलेल्या ऑटो डिसीआरमुळे बांधकाम व्यावसायिक संकटात सापडले. टीडीआर धोरणामुळे सरकारने ६ आणि ७.५ मीटरवरील रस्त्यांवर टीडीआर व एफएसआयवर बंदी आणल्याने बांधकाम व्यवसायाचे कंबरडेच मोडले होते. तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी कपाट प्रकरणावर प्रहार केला. कोंडी टीडीआरमुळे सुटेल अशी अपेक्षा असतानाच टीडीआर धोरणामुळे पुन्हा संकट ओढ‌ले होते. या सर्वांना राज्य शासनाने कलम २१० अंतर्गत प्रस्ताव दाखल करण्याचा पर्याय दिला होता. त्यानुसार ६ मीटर रस्ता ९ मीटर करणे आणि ७.५ मीटर रस्ता ९ मीटरपर्यंत रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानुसार आतापर्यंत २७५५ प्लॉटधारकांनी महापालिकेकडे जागा रुंदीकरणाचे प्रस्ताव दाखल करून देत महापालिकेचे नाव सातबाऱ्यावर लावून दिले आहे. या सर्व प्लॉटधारकांना आता अतिरिक्त एफएसआय मिळणार असून, कपाटकोंडी फुटणार आहे. तसेच, पालिकेला शंभर कोटींचाही महसूल मिळण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदूरच्या शौचालय स्वच्छतेला ‘मुहूर्त’

$
0
0

महापालिका प्रशासनाला अखेर आली जाग

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नांदूरगावच्या सुलभ शौचालयामागे अस्वच्छता असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. 'दुर्गंधीने नागरिक त्रस्त' अशी बातमी महाराष्ट्र टाइम्समध्ये सोमवारी (दि. २५) प्रसिद्ध होताच महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्याची दखल घेत परिसराची तात्काळ स्वच्छता केली.

हागणदारीमुक्तीचा दावा करणाऱ्या महापालिका हद्दीतील नांदूरगावातील सुलभ शौचालयामागे साचलेल्या घाणीमुळे दुर्गंधी पसरली होती. हा परिसर अस्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त झाल्याने गावातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. येथील दूरवस्थेचे स्थिती 'मटा'ने मांडताच त्याची आरोग्य विभागाने त्वरित दखल घेतली.

शौचालयाला जोडलेली ड्रेनेज लाइन बंद आहे की अन्य काही कारणामुळे येथील घाण वाहून जाण्यास अडचण येत आहे, याची साधी पाहणी देखील प्रशासनाकडून केली जात नव्हती. त्यामुळे येथील समस्या गंभीर बनली होती. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जात नसल्याचे या प्रकारावरून लक्षात येत होते. दुर्लक्षित असलेल्या या भागात शौचालयाची दुरवस्था झाली आहे. घाणीबरोबरच प्लास्टिक आणि जुन्या कपड्यांचा कचराही मोठ्या प्रमाणात साचला होता. त्याचीही अखेर स्वच्छता करण्यात आली.

स्थानिकांकडून वापर

नांदूर गावठाणमध्ये नाल्यालगतच्या सुलभ शौचालयातून बाहेर पडणारी घाण ड्रेनेज लाइनमधून वाहून जात नव्हती. याउलट ती नाल्याच्या बाजूने उताराने वाहून परिसरात साचली होती. तेथील खोलगट भागात घाण साचत असल्याने त्याची दुर्गंधी पसरत होती. नांदूरगावात अनेक घरांमध्ये अजूनही शौचालये नाहीत. त्यामुळे या सुलभ शौचालयाचा वापर होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऊन तापले, रस्ते मोकळे

$
0
0

सनकोट, रुमालांना वाढली मागणी

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मार्चअखेरीस दिवसागणिक उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात झाली आहे. या कडाक्याच्या उन्हामुळे दुपारी घराबाहेर पडणे नाशिककरांना नकोसे होऊ लागले असून, त्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. उन्हाळ्यातील तीव्र सूर्यकिरणांचा त्वचेवर घातक परिणाम होण्यासही सुरुवात झाली असल्याने त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सनकोट, रुमाल, हातमोजे यांना मागणी वाढू लागली आहे.

वाढत्या उन्हामुळे नाशिककरांच्या अंगाची लाहीलाही होत असून, नाशिककर मार्च महिन्यातच हैराण झाले आहेत. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी शहरवासीयांची पावले रसाची दुकाने, कापड मार्केट यांकडे वळू लागली आहेत. कमाल तापमान ३८ अंशांपर्यंत पोहोचले असून, लवकरच चाळिशी गाठण्याची शक्यता आहे. कडक उन्हामुळे त्वचा रापत, काळी होत असल्याने त्वचेचे संरक्षण करण्यासाठी विविध प्रकारचे रुमाल, सनकोट, हातमोजे, सनस्क्रिन लोशन घ्यायला गर्दी होत आहे. याबरोबरच, दुपारी घरातून बाहेर निघण्याचे टाळण्यात येत असल्याने रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत आहे.

....

\Bबाजारात शुकशुकाट\B

एरवी बुधवारचा बाजार दिवसभर गजबजलेला दिसून येत असला तरी कडाक्याच्या उन्हामुळे बाजारातही शांतता दिसून आली. डोक्यावर छत्र्या, छप्पर आदींची तयारी करूनच विक्रेते बाजारात दाखल झाले होते.

...

मार्चच्या सुरुवातीपासूनच रुमाल, सनकोट्सला मागणी सुरू झाली आहे. मात्र, गेल्या पाच-सहा दिवसांपासून ही मागणी दुपटीने वाढली आहे. फिक्या रंगाचे कापड असलेल्या सनकोट, रुमालाला अधिक पसंती मिळते आहे.

- अतुल भोळे, विक्रेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बहिणाबाईंच्या कवितांना रसिकांची उत्स्फूर्त दाद

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक ज्येष्ठ कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचा जागर नुकताच झाला. मंजुषा सोमण यांचे निवेदन आणि गीता गद्रे यांनी स्वरबद्ध केलेल्या या कविता ऐकतांना उपस्थित प्रत्येकालाच आपल्या आयुष्याचे बोलके चित्रण डोळ्यासमोर उभे राहिले. अक्षरांशी ओळख नसल्याने त्यांना निरक्षर म्हणणे योग्य आहे मात्र अशिक्षित म्हणणे अयोग्य असल्याचा विचार मंजुषा सोमण यांनी मांडला आणि उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळवली. बहिणाबाईंच्या कविता वऱ्हाडी-खानदेशीत, त्यांच्या मातृबोलीत, रचिलेल्या आहेत. त्यांच्या कवितांचे विषय माहेर, संसार, शेतीची साधने, कापणी, मळणी असे रोजच्या जीवनातील आहेत. गीता गद्रे यांनी सादर केलेल्या रचनांतून शेती, सणवार आदी प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले. गीता गद्रे यांनी याच स्वरबद्ध केलेल्या शब्दांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.'आला सास, गेला सास, जीवा तुझं रे तंतर, अरे जगणं-मरणं एका सासाचं अंतर!' किंवा 'लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते' अशा किमान शब्दांत अर्थाची कमाल गाठणारे शब्द, 'अरे संसार संसार.. या त्यांनी सादर केलेल्या रचना बोलक्या होत्या. तल्लख स्मरणशक्ती, सूक्ष्म निरीक्षण, विनोदबुद्धी, जीवनातील सुखदुःखांकडे समभावाने पाहू शकणारं शहाणपण आणि जगण्यातून कळलेले तत्त्वज्ञान हा बहिणाबाईंच्या रचनेचा नेमका बाज मंजुषा सोमण आणी गीता गद्रे यांनी सांभाळला. विकास आणी अनुराधा गरुड यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुख्यात दरोडेखोर जेरबंद

$
0
0

सिनस्टाइल पाठलागनंतर तिघांना अटक; दोन फरार

...

- आडगाव पोलिस स्टेशन हद्दीतील घटना

- दरोडेखोरांचा पोलिसांवर गोळीबार

- दरोड्याचे साहित्यही हस्तगत

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सराफी दुकान फोडत असताना पोलिस आल्याने सराईत दरोडेखोरांना पळता भुई थोडी झाली. चोरीच्या कारमधून दरोडेखोरांनी पलायनाचा प्रयत्न केला. आडगाव पोलिसांनी संशयित आरोपींचा पाठलाग केला. अगदी सिनेस्टाइल पद्धतीने आरोपी आणि पोलिसांमध्ये गोळीबारसुद्धा झाला. प्रयत्नांअंती पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली. ही यशस्वी कामगिरी करणाऱ्या पथकाला पोलिस आयुक्तांनी ३५ हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले.

राजेश गोलासिंग टाक (वय २५, रा. संजयनगर, अहमदनगर, हल्ली भीमवाडी, गंजमाळ), सुनीलसिंग जुनी, हरदीपसिंग बबलू टाक (दोघे रा. संजयनगर, काटून खंडोबा, अहमदनगर) अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. अमनसिंग टाक (रा. गंजमाळ), सुनीलसिंगचा मित्र (नाव गाव नाही) असे दोघे संशयित मात्र फरार झाले आहेत.

आडगाव पोलिस स्टेशन हद्दीतील वृदांवननगर येथील साकार युग इमारतीत ऋषिकेश कुलथे यांचे आर. जे. ज्वेलर्स हे सराफी दुकान असून, वरील संशयित हे दुकान फोडण्याच्या तयारीत आले होते. दरोड्याच्या पूर्ण तयारीनिशी बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास संशयित दुकानाजवळ पोहचले. संशयितांच्या संशयास्पद हालचाली असल्याने एका सजग नागरिकांनी लागलीच ही माहिती आडगाव पोलिस ठाण्याला कळविली. ठाणे अंमलदाराने हा संदेश गस्तीवरील पथकांपर्यंत तसेच कंट्रोल रूमला कळविला. रात्र गस्तीवर नियंत्रण ठेवणारे अधिकारीसुद्धा यामुळे सजग झाले. वृदांवननगरपासून सर्वात जवळ असलेले गस्तीवरील पोलिस उपनिरीक्षक धैर्यशील घाडगे, चालक झेंडे, आरटीपीसी विनोद पाटील, गुन्हे शोध पथकातील हवालदार लक्ष्मण बोराडे, पोलिस नाईक अनिल केदारे, मिथून गायकवाड यांच्या पथकास संशयिताची कार (एमएच १५, बीडी ९०६६) दिसली. पोलिसांचे वाहन येत असल्याचे पाहून आरोपीने पलायन सुरू केले. पोलिसांनी पाठलाग सुरू केला. भरधाव वेगातील कार हॉटेल विहान येथील कच्चारोडने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार तीनवेळा पलटी झाली. पाठीमागून पोलिसांचे पथक आले. मात्र यावेळेपर्यंत कारमधील चौघे संशयित कारमधून बाहेर पडले. आपल्या पाचव्या साथिदाराला ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होते. पोलिसांची कार जवळ येताच संशयितांनी पोलिसांच्या दिशेने गोळी झाडली. पीएसआय घाडगे यांनीसुद्धा इशारा देऊन एक राउंड फायर केला. मात्र, यामुळे चौघे संशयित फरार झाले. कारमधील संशयित राजेश टाक याने बाहेर येऊन पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. त्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. घटनास्थळावरून फरार झालेल्या हरदीपसिंग टाक आणि सुनीलसिंग टाक यांना रेल्वे पोलिसांनी मनमाड येथून अटक केली. हे सर्व सराईत गुन्हेगार असून, मागील १५ दिवसांपासून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी रेकी करून दरोड्याचा प्लॅन आखला होता.

...

नागरिक, आडगाव पोलिस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकत्रित मिळून केलेल्या प्रयत्नांचे चांगले फळ मिळाले. आडगावच्या पथकाने खूप चांगली कामगिरी केली. यामुळे परजिल्ह्यातील तसेच, परराज्यातील गुन्हेगार नाशिकच्या दिशेने येताना विचार करतील.

- विश्वास नांगरे पाटील, पोलिस आयुक्त

...

गस्ती पथकाला ३५ हजारांचे बक्षीस

अटक करण्यात आलेले आरोपी सराईत असून, त्यांच्या अटकेने आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. आरोपींनी गोळीबार केला तरीही गस्ती पथकाने त्यातील एका संशयितास अटक केली. त्यामुळे पथकाला ३५ हजार रुपयांचे रोख बक्षीस पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी जाहीर करीत सर्वांचा सत्कार केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बिजली आणि या कारवाईचे समन्वय करणारे पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनाही पोलिस आयुक्तांनी शाबासकीची थाप दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभाग समित्यांना हिरवा कंदील?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या सहाही प्रभाग समित्यांच्या सभापतीपदाचा कार्यकाळ येत्या ३१ मार्च रोजी संपत येत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असली तरी, या नवीन सभापतींच्या निवडीसाठी महापालिकेच्या नगरसचिव विभागाने विभागीय महसूल आयुक्तांकडे सभापती निवडीचा प्रस्ताव पाठविला आहे. या निवडीला आचारसंहितेची अडचण येत नसल्याने या प्रस्तावाला मान्यता मिळण्याची शक्यता असल्याने एप्रिलच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात सभापतीपदासाठी निवडणूक घेतली जाण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने निवडणुकांसाठी निवडणूक शाखेची परवानगी आवश्यक असते. पालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्य निवडीसह सभापतीपदाची निवडणूक या कारणामुळेच रखडली आहे. जिल्हा निवडणूक शाखेंने महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यपदाच्या निवडणुकीबाबत संभ्रमाचे उत्तर दिल्याने आता प्रभाग समित्यांची तसेच विषय समित्यांची निवड रखडण्याची शक्यता निर्माण झाली होती.

प्रभाग समित्यांची सभापतीपदाची मुदत ही ३१ मार्च रोजी संपत आहे. त्यामुळे ही निवडणूक घेणे आवश्यक असून, त्यांचा आर्थिक लाभाशी कोणताही संबंध नसल्याने प्रभाग समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम हा विभागीय आयुक्तांकडून जाहीर केला जातो. त्यामुळे आचारसंहितेच्या कात्रीत या निवडणुका अडकणार नसल्याचा दावा करत नगरसचिव विभागाने सहाही प्रभाग सभापतींच्या निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याकरीता विभागीय महसूल आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविला आहे. विभागीय आयुक्तांकडून या सभापती निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात या निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, विषय समित्यांच्या निवडणुकांबाबत मात्र अजूनही संभ्रम कायम आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकारी रजेवर, जबाबदारी वाऱ्यावर!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

शहरातील तिन्ही सेतू कार्यालयांद्वारे रेशन कार्डसाठी सादर करण्यात आलेले शेकडो अर्ज गेल्या दोन ते तीन महिन्यांपासुन धान्यवितरण अधिकाऱ्यांच्या कार्यालयात धूळ खात पडलेले असल्याचे स्पष्ट झाले. आगोदरच मनुष्यबळाची कमतरता असलेल्या या कार्यालयातील बहुतेक कर्मचारी निवडणूक कामासाठी जुंपण्यात आल्याने आणि धान्य वितरण अधिकारीही वैद्यकीय रजेवर गेल्याने रेशनकार्ड वितरण ठप्प पडले आहे. अधिकारी रजेवर आणि जबाबदारी वाऱ्यावर, अशी स्थिती सध्या या कार्यालयाची झाली आहे.

शहरात सध्या नाशिकरोड, सिडको आणि पंचवटी अशा तिन्ही ठिकाणी जिल्हा सेतू केंद्र सुरू आहेत. या सेतू केंद्रांकडे नवीन रेशनकार्ड काढणे, नावे वगळणे, नावे वाढविणे, दुरुस्ती करणे अशा स्वरुपाचे अर्ज सादर केली जातात. या सेतू केंद्रांकडे प्राप्त झालेल्या अर्जानुसार डाटा एंट्रीसाठीचा ठेका दिलेल्या साक्षात महिला आदिवासी संस्थेतर्फे ऑनलाइन डाटा अपलोड केला जातो. या संस्थेतर्फे युआरसीआयडी नंबर दिला जातो. त्या आधारे नाशिकरोड येथील धान्य वितरण अधिकारी कार्यालयात या माहितीची खातरजमा केल्यावर सदरचा अर्ज धान्य वितरण अधिकाऱ्यांकडे सहीसाठी जातो. त्यानंतरच नवीन रेशन कार्ड मिळते. परंतु गेल्या दोन महिन्यांपासुन रेशनकार्ड वितरण ठप्प झाले आहे. रेशनकार्ड वितरण ठप्प झाल्याने नागरिकांवरही धान्यवितरण अधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची वेळ आली आहे.

आधारक्रमांक लिंकिंगही चुकीचे

अनेक नागरिकांचे आधारक्रमांक भलत्याच नागरिकांच्या रेशनकार्डला लिंक झाल्याचे प्रकार उघड होऊ लागले आहेत. नाशिकरोड येथील धान्य वितरण अधिकारी कार्यालयात याविषयीच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. नाशिक जिल्ह्यातील नागरिकांचे आधारक्रमांक शेजारील धुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या रेशनकार्डला लिंक झाल्याचे प्रकार घडलेले असल्याने सबंधित नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. परंतु नाशिकरोड येथील धान्यवितरण अधिकारी मनिषा राशनकर या एक महिनाभर रजेवर गेलेल्या असल्याने ही सर्व कामे ठप्प पडलेली आहेत. या सर्व परिस्थितीचा गैरफायदा एजंट लोकांकडून घेतला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जैन समाजातीलजागृतीचे कार्य मोठे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'आचार्य आर्यनंदी महाराजांना जैन समाजातील पहाटेचा शुक्रतारा म्हटले जाते. त्यांनी जैन समाजात मोठ्या प्रमाणात जागृती केली. जैन समाजातील आंतरजातीय बंधने नष्ट करण्याचा प्रयत्न केला. गुरुकुल स्थापन करून जैन समाजात शैक्षणिक क्रांती केली,' असे उद्गार जैन धर्माचे अभ्यासक व ज्येष्ठ लेखक प्रा. डॉ. गजकुमार शहा यांनी काढले.

दिगंबर जैन सैतवाल मंडळातर्फे आचार्य आर्यनंदी महाराजांच्या ११२ व्या जयंती कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी सैतवाल जैन मंडळाचे अध्यक्ष दीपक काळे, सतीश मुद्दलकर, जीवन बिटोडे, विनोद आंबेकर, शरद सराफ, बबलू जैन आदी उपस्थित होते.

शहा म्हणाले,'तीर्थरक्षा कमेटीसाठी एक कोटी रुपयांचा फंड जमा करून जैन तीर्थक्षेत्रांचे रक्षण करणे हे मोठे काम आहे. समाजातील श्रावकांवर उत्तम संस्कार व्हावेत म्हणून ठिकठिकाणी पाठशाळा सुरू केल्या. जुन्या मंदिरांचा जीर्णोध्दार केला. मंडळाचे कोषाध्यक्ष मुद्दलकर यांनी कचनेर येथे झालेल्या सभेची माहिती दिली. मंडळाचे मार्गदर्शक अरुण भागवतकर यांनी मंडळाच्या स्थापनेमागील पार्श्वभूमी सांगितली. नीलिमा अथतकर यांनी आर्यनंदी महाराजांची माहिती सांगून पोवाडा सादर केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे दीपक काळे होते. स्वाती माडीवाले यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images