Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

समाजवादी शील घडविणे ध्येय

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'लोकशाही समाजवादी शीलाचे नागरिक निर्माण करणे हे अरूणचे आणि आमचेही ध्येय होते. आम्ही सारे एका वाटेचे वाटसरू; परंतु अरूणने हे ब्रीद कायम जपले,' असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी केले.

'आनंदनिकेतन' या प्रयोगशील मराठी शाळेचे संस्थापक अरूण ठाकूर यांच्या स्मरणसभेत आढाव बोलत होते. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात ही सभा झाली. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अनिल अवचट, विनायकदादा पाटील, शांताराम चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, निशा शिऊरकर, मंगल खिंवसरा, वासंती दिघे, कॉ. श्रीधर देशपांडे, नाना कुलकर्णी, अर्जुन कोकाटे, विनोदिनी काळगी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

आढाव म्हणाले,'माणसाने माणसासारखे वागणे हे अरूणचे ध्येय होते, त्याप्रमाणेच तो वागत राहिला. अरूण खूप मोठा माणूस होता; परंतु या माणसांचा मोठेपणा टोचत नाही. माझा फार मोठा सहकारी गेल्याचे दु:ख आहे.' यावेळी आढाव यांनी महात्मा फुले यांची 'सत्य सर्वांचे आदिघर, सर्व धर्मांचे माहेर' ही प्रार्थना उपस्थितांकडून म्हणवून घेतली.

अनिल अवचट म्हणाले,'अरूण महाकोष होता. माहितीचा खजिना त्याच्याकडे असायचा. काहीही विचारा, अरूणकडे उत्तर तयार असायचे.' नाना कुलकर्णी म्हणाले,'अरूणबद्दल एक प्रेम, जिव्हाळा, आत्मियता, ओढ कायम राहिली. समाजातल्या कथा, व्यथा त्याने नेहमी सांगितल्या. स्वत:चे दु:ख नेहमी लपवून ठेवले. त्याने लिहिलेले 'नरकयातना' पुस्तक त्याचे स्मारक आहे, दुसरे स्मारक काय उभारायचे?'

कॉ. देशपांडे म्हणाले,'जगण्यासाठीची त्याची शांत धडपड सुरू होती. विचारधारेला खंबीरपणे चिकटून राहण्याची वृत्ती त्याच्याकडे होती.' यावेळी आनंदनितकेतनचा विद्यार्थी अमित घुगे, करूणासागर पगारे, वासंती दिघे, मंगल खिंवसरा, निशा शिऊरकर यांनी भावना व्यक्त केल्या.

प्रारंभी आनंदनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी 'हीच आमुची प्रार्थना अन् हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे' ही प्रार्थना सादर केली. सूत्रसंचालन अनिता पगारे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेचा कारभार ठप्प

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अगोदरच अपुऱ्या मनुष्यबळाचा सामना करणाऱ्या महापालिकेतील सुमारे दीड हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांना जिल्हा प्रशासनाने निवडणुकीच्या कामाला जुंपल्याने महापालिकेचा कारभार ठप्प झाला आहे. अत्यावश्यक सेवेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची निवडणूक कामासाठी नियुक्ती न करण्याचे संकेत असतानादेखील त्यांनाही कामाला लावण्यात आल्याचे चित्र आहे.

शहरातील वीस लाख लोकसंख्येला अत्यावश्यक सेवा देणाऱ्या महापालिकेतील आरोग्य, वैद्यकीय, पाणीपुरवठा, विद्युतसह टपाल, प्रशासन, घनकचरा, घरपट्टी आदी विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाने निवडणूक आचारसंहितेच्या नावाखाली निवडणूक कामासाठी वर्ग केले आहे. महापालिकेचे एवढे अधिकारी व कर्मचारी पळविण्याची ही पहिलीच वेळ असून, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी करतात तरी काय, असा सवाल आता महापालिकेत विचारला जात आहे. राजकीय पातळीवर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना प्रशासकीय पातळीवर या निवडणूक कामांची तयारी अगोदरपासूनच सुरू आहे. निवडणूक कामांसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व शासकीय, निमशासकीय विभागांकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांची जुळवाजुळव सुरू केली आहे. जिल्हा निवडणूक शाखेकडून क्षेत्रीय अधिकाऱ्यांसह मतदान, मतमोजणी प्रक्रियेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नाशिक महापालिकेसह जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालयांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची निवडणूक कामांसाठी नियुक्ती केली जाते. महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचनेनुसार अत्यावश्यक सेवा वगळून १३०० कर्मचारी व अधिकाऱ्यांची यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविली होती. त्यानुसार महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनादेखील निवडणूक कामासाठी नियुक्तीची पत्रे प्राप्त होण्यास सुरुवात झाली आहे.

--

खातेप्रमुखांमध्ये अस्वस्थता

जिल्हा निवडणूक शाखेकडून आलेले नियुक्तिपत्रे पाहून आता महापालिकेतील खातेप्रमुखच आश्चर्यचकित झाले आहेत. मार्चची वसुली प्रक्रिया सुरू असतानाच पाणीपट्टी व घरपट्टी विभागाच्या वसुलीचे सर्व कर्मचारी अगोदरच निवडणूक कामाला जुंपण्यात आलेले आहेत. आता पाणीपुरवठा, विद्युत, आरोग्य, घनकचरा, टपाल, प्रशासन आदी अत्यावश्यक सेवांतील खातेप्रमुख आणि कर्मचाऱ्यांनाही निवडणूक कामांसाठी वर्ग करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने महापालिकेने सोपविलेल्या यादीपेक्षा अधिकचे अधिकारी व कर्मचारी वर्ग केल्याने खातेप्रमुखांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. महापालिकेकडून प्रथमच एवढ्या संख्येने कर्मचारी व अधिकारी निवडणूक कामांसाठी वर्ग केले जात आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह अन्य कार्यालयांचे कर्मचारी कुठे कामाला लावलेत, असा सवाल आता महापालिकेत उपस्थित केला जात आहे.

--

टपाल विभाग ठप्प

महापालिकेच्या टपाल विभागात जेमतेम चार कर्मचारी कार्यरत आहेत. शासन, जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रव्यवहार, नागरिकांकडून येणाऱ्या पत्रव्यवहाराचे नियोजन या कार्यालयामार्फत केले जाते. परंतु, जिल्हाधिकारी कार्यालयाने या चारही कर्मचाऱ्यांची सेवा निवडणूक कामांसाठी वर्ग केली आहे. कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, आचारसंहिता कक्षात नियुक्ती, मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी या कर्मचाऱ्यांची महापालिकेतील सेवा ठप्पच राहणार आहे. त्यामुळे पत्रव्यवहाराचे करायचे काय, असा प्रश्न अधिकारीवर्गातून केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोटीतील तिघांचा बुडून मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

रंगपंचमी खेळून झाल्यानंतर इगतपुरी येथील रेल्वे तलावावर अंघोळीसाठी गेलेल्या घोटी येथील दोघा मित्रांचा, तर दारणा नदीपात्रात घोटी खुर्द येथील एकाचा बुडून मृत्यू झाला. तिघांचेही मृतदेह हाती लागल्यानंतर शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सोमवारी घोटी येथील मयूर अर्जुन भोले (२२), तौसिफ मेहमूद मणियार (२३) व जमील पिंजारी हे तिघे मित्र रंग खेळून झाल्यानंतर दुपारी चारच्या सुमारास आंघोळीसाठी इगतपुरी येथील रेल्वे तलावावर गेले होते. मयूर व तौसिफ यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. ही बाब जमीलच्या लक्षात येताच त्याने आरडाओरड केली. लगेच घोटी येथील मित्रांना फोन केले. घटनेची माहिती मिळताच इगतपुरीचे पोलिस निरीक्षक अशोक रत्नपारखी व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाव घेऊन मदतकार्याला सुरुवात केली. घोटी येथूनही अनेक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नांदगाव सदो येथील पाणबुड्यांच्या मदतीने दोघांना शोधण्यात आले. मयूरच्या मृतदेह सायंकाळी आठ वाजता तर तौसिफचा मृतदेह रात्री उशिरा हाती लागला. मयूर संदीप फाउंडेशनमध्ये अभियांत्रिकीच्या अखेरच्या वर्षाला होता, तर तौसिफ हा घोटीतील प्रसिद्ध मेकॅनिक होता. दुसऱ्या घटनेत घोटी खुर्द येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण चंद्रकांत बोराडे (३५) हे आपल्या एका नातलगासमवेत जवळच्या नदीपात्रात दुपारी अंघोळीसाठी गेले होते. पोहत असताना दम लागल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. परिसरातील ग्रामस्थांनी तत्काळ शोधकार्य हाती घेतले. काही तासांतच त्यांचाही मृतदेह हाती लागला. त्यांच्या पश्चात आई, वडील पत्नी व मुली असा परिवार आहे. प्रवीण आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानसेवा वेळापत्रक-शनिवार

‘मुक्त’विद्यापीठात नाट्यशास्त्राची ‘नांदी’

$
0
0

मटा विशेष : जागतिक रंगभूमी दिन विशेष

Prashant.bharvirkar@timesgroup.com

Tweet : @bharvirkarPMT

नाशिक : येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात दिल्ली येथील 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा'च्या धर्तीवर नाट्यशास्त्र विभाग सुरू होणार आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातील तज्ज्ञांची समिती नाटकाचा अभ्यासक्रम निश्चित करणार असून जून-जुलैमध्ये तो सुरू होणार आहे.

अभ्यासक्रम ३० विद्यार्थी क्षमतेचा राहणार असून, ४० टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. प्रारंभी हा एक वर्षाचा डिप्लोमा असेल. बारावी उत्तीर्णांना प्रवेश घेता येणार आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तज्ज्ञांची समिती अभ्यासक्रम निश्चित करणार असून, त्यासाठी सुप्रसिद्ध नाट्यलेखक जयंत पवार, अभिराम भडकमकर, गिरीश पतके, लोकेश शेवडे, मंगेश कदम, मधुरा वेलणकर, प्राजक्त देशमुख यांच्यासह नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, जळगाव येथील १२ जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. नाट्यशास्त्र उत्तीर्ण झाल्यावर या विद्यार्थ्यांना व्यावसायिकतेसाठी पुणे-मुंबई-नाशिक असा ब्रीज तयार करून देता येतो का, यावर सध्या मुक्त विद्यापीठाचा विचार सुरू आहे.

नाशकाचे परफॉर्मिंग आर्ट

नाट्यशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी मुंबई किंवा पुण्याचा पर्याय तरुणांना निवडावा लागतो. नाशिकला हा अभ्यासक्रम सुरू झाल्यास त्यानिमित्ताने उत्तर महाराष्ट्रातील नाट्यप्रेमी तरुणांना आपल्या जवळच पर्याय उपलब्ध होणार आहे. नाशकात पूर्णवेळ परफॉर्मिंग आर्ट सुरू झाल्याने तरुणाईचा ओढा वाढून नाट्यकला जपण्यासाठी प्रयत्न होणार आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या धर्तीवर हा अभ्यासक्रम होणार असल्याने त्याला मूल्यदेखील प्राप्त होणार आहे.

नाट्यशास्त्र शिक्षणक्रम सुरू करणार आहोत. ३० क्षमतेचा हा शिक्षणक्रम गुणवत्तापूर्ण असणार आहे. आधी पदविका आणि नंतर पदवी सुरू करण्याचा विचार आहे.

-डॉ. दिनेश भोंडे, कुलसचिव, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ

शिक्षणक्रमाच्या स्तरावर परिपूर्ण, सर्व बाजूंनी विचार करून हा नाट्यशास्त्र विभाग होणार आहे. पुस्तकी ज्ञानावर भर न देता अधिकाधिक प्रॅक्टिकल शिकविण्याला प्राधान्य देणार आहोत.

-सचिन शिंदे, समन्वयक, नाट्यशास्त्र विभाग, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यवसायात काळानुरुप बदल हवाच

$
0
0

व्यावसायिक चकोर गांधींचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बदलत्या काळानुसार ग्राहकांची मानसिकता बदलली आहे. ऑनलाइन व्यवहारांमुळे कॅशलेस व्यवहारास ग्राहक पसंती देत आहे. ही बाब व्यावयासिकांनी देखील हेरायला हवी. काळानुरुप प्रत्येक गोष्टीत बदल होतात. तसेच व्यवसायातही बदल हवाच, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय व्यावयासिक चकोर गांधी यांनी केले.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चरच्या नाशिक शाखेचा ४६ व्या वर्धापन दिन धनदाई लॉन्स येथे झाला. त्यावेळी गांधी यांनी 'सावधान धंदा बदलतो आहे' या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी मंचावर महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, उद्योजक राजेंद्र मेहता, संजय देवरे, चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष अमित कामत, उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, ललित गांधी, उमेश दाशरथी, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आशिष पेडणेकर, माजी अध्यक्ष रामचंद्र भोगले होते. वर्धापन दिन सोहळ्यात चेंबरच्या कार्याचा आढावा वाचण्यात आला. डॉ. मिथिला कापडणीस आणि सुरेश चावला यांनी सूत्रसंचालन केले. सुनीता फाल्गुने यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्यकारीणी सदस्य अंजू सिंघल, स्वप्नील जैन, भावेश मानेक आदींनी परिश्रम घेतले.

... तर उद्योजकांनाही फायदा

उद्योजक राजेंद्र मेहता म्हणाले, की उद्योगातील नव्या तंत्रज्ञानानुसार कंपन्यांमध्ये उच्च शिक्षितांची संख्या वाढायला हवी. त्यासाठी उद्योजकांनी पुढाकार घ्यायला हवा. कंपनीतील कामगारांचा कौशल्य विकास व्हावा म्हणून उद्योजकांनी कार्यशाळा घ्याव्यात. प्रगत तंत्रज्ञानानुसार उद्योजकांनीही कार्यात बदल केल्यास फायदा नक्की होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामचुकारांवर कारवाईचा आसूड

$
0
0

नगरसचिव विभागातील ९४ कार्यरत कर्मचाऱ्यांची होणार चौकशी

...

- कर्मचाऱ्यांना कामाचा पुरावा द्यावा लागणार

- पदाधिकाऱ्यांवरील कर्मचाऱ्यांची खातरजमा करणार

- सह्यांची मस्टर तपासणी करणार

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापौरांच्या रामायण या निवासस्थानावर कार्यरत असलेल्या लघुलेखक रवींद्र सोनवणेंच्या निलंबन प्रकरणानंतर प्रशासनाने नगरसचिव विभागात राबविलेल्या शोध मोहिमेत तब्बल ९४ कर्मचारी कार्यरत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासन विभागाने या ९४ कर्मचाऱ्यांचा आता शोध घेण्यास सुरुवात केली असून, ते कुठे काम करतात, त्यांची सध्याची नियुक्ती कुठे आणि प्रत्यक्षात सद्यस्थितीत काय काम करतात याची शहानिशा सुरू केली आहे. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढेंच्या नजरेतून सुटलेल्या या कर्मचाऱ्यांची आता पदाधिकाऱ्यांच्या दरबारासह घरकामातील बडदास्त चव्हाट्यावर येणार आहे. विशेष म्हणजे पदाधिकाऱ्यांनाही आता या कर्मचाऱ्यांच्या कामांचे पुरावे द्यावे लागणार असल्याने बेपत्ता कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

महापालिकेच्या नगरसचिव विभागात कार्यरत असलेल्या रवींद्र सोनवणे हे गेल्या दहा वर्षांपासून रामायण या बंगल्यावर काम न करताच वेतन काढत असल्याचा धक्कादायक प्रकार सभागृहनेते दिनकर पाटील यांनी उघडकीस आणला. संबंधित कर्मचारी हा एका पदाधिकाऱ्याच्या घरी बेकायदेशीरपणे कार्यरत असल्याचे पुराव्यासह आरोप करीत त्याची तक्रार आयुक्तांकडे केली होती. त्यामुळे आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर प्रशासनाने आता सोनवणे यांचे निलंबन करीत त्यांची चौकशी सुरू केली आहे. या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

महापलिकेत पदाधिकाऱ्यांच्या वशिल्याने भरती करण्यात आलेल्या १६०० कर्मचाऱ्यांपैकी अनेक कर्मचारी हे पालिकेचे वेतन घेत असताना काम मात्र पदाधिकाऱ्यांचे करीत असल्याचे समोर आले आहे. यातील अनेक कर्मचारी हे काम न करताच फुकटचे वेतन काढत असल्याने पालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याचे आता समोर येत आहे. यापूर्वी अशा कर्मचाऱ्यांवर कारवाईची तयारी प्रशासनाने सुरू केली होती. मात्र पालिकेतील भाऊ-दादांचा दबाव येत असल्याने त्यांच्यावरील कारवाईला अडथळा येत होता. परंतु, रवींद्र सोनवणे प्रकरणामुळे आपली अडचण होऊ नये म्हणून प्रशासनाने आता ताकही फुंकून पिण्याची भूमिका स्वीकारली आहे. नगरसचिव विभागात कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची कुंडलीच बाहेर काढली आहे. पालिकेतील अन्य विभागात कर्मचाऱ्यांचा तुटवडा असताना नगरसचिव विभागात चक्क ९४ कर्मचारी कार्यरत असल्याचे समोर आले आहे. नगरसचिव विभागात जेमतेम १० ते १५ कर्मचारीच दिसत असताना एवढे ९४ कर्मचाऱ्यांची यादी पाहून प्रशासनही थक्क झाले आहे. त्यामुळे पुन्हा असे प्रकार घडू नये, यासाठी या ९४ कर्मचाऱ्यांच्या कामांची खातरजमा केली जात आहे. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेता, सर्व गटनेत्यांकडे किती कर्मचारी आहेत, त्यांना नियमानुसार किती कर्मचारी अनुज्ञेय याची माहिती गोळा केली जात आहे. तसेच, हे कर्मचारी खरच काम करतात काय, त्यांच्या नियुक्तीचे ठिकाण, वेतन काढल्याची प्रक्रिया आणि त्यांच्या सह्यांचे मस्टर सध्या तपासण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे या बेपत्ता कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून, यातून जवळपास निम्मे कामचुकार कर्मचारी असण्याचा संशय प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.

...

महापौरांची वाढणार अडचण

नगरसचिव विभाग हा महौपारांच्या नियंत्रणाखाली येत असतो. त्यामुळे या विभागामार्फत पदाधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांची सेवा पुरविली जाते. महापौरांच्या आदेशान्वये कोणाला किती आणि कोणते कर्मचारी द्यायचे याची शिफारस केली जाते. त्यामुळे या सगळ्या प्रकाराचे खापर महापौरांवरच फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने आता खबरदारीचा उपाय म्हणून पदाधिकाऱ्यांकडे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना कामाच्या पुराव्याची सक्ती केली जाणार आहे. महिनाभरात काय काम केले यासह पदाधिकाऱ्याची शिफारस द्यावी लागणार आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या मर्जीतील असल्याचे कारण देत बेपत्ता राहणाऱ्यांवर वचक बसणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकीचे बळ, मिळते फळ!

$
0
0

प्रवीण बिडवे

pravin.bidve@timesgroup.com

Tweet : BidvePravinMT

'ऐसे निश्चयाचे बळ तुका म्हणे तेचि फळ' या उक्तीचा प्रत्यय दिंडोरी तालुक्यातील अवनखेड गावात येतो. ग्रामस्थांचा दृढनिश्चयी बाणा अन् एकात्मतेमुळे या गावाने विकासाचे आयाम बदलले आहेत. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छतेचे अत्यंत प्रतिष्ठेचे नाशिक विभागाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक या गावाने अलीकडेच पटकावले. राज्यस्तरावरील पहिल्या पारितोषिकावर आपलीच मोहोर उमटविण्यासाठी हे गाव सिद्ध झाले आहे.

दिंडोरी तालुक्यातील अवनखेड हे अवघ्या ४५० उंबऱ्यांचे गाव. विकासासाठीचे झपाटलेपण येथे पहावयास मिळते. विकास हा एकट्याने ओढावयाचा गाडा नाही. ती अंगणवाडीत जाणाऱ्या बालकापासून जख्खड आजोबांपर्यंत सर्वांचीच जबाबदारी आहे. गावातील सर्वच्या सर्व २,८५० ग्रामस्थ ही जबाबदारी पार पाडतात. म्हणूनच उत्तर महाराष्ट्रातील ६ हजार ६९६ गावांमधून अवनखेड या गावाला गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचे पहिले १० लाखांचे पारितोषिक मिळाले. आता राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी १२ गावांमध्ये अवनखेडनेही दंड थोपटले असून, राज्याचे पहिले पारितोषिक मिळविण्याचा संकल्प सोडला आहे.

ग्राम स्वच्छता अभियान कशासाठी

ग्रामीण जनतेचे आरोग्यमान व पर्यायाने जीवनस्तर उंचावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ग्रामस्थांचा सक्रिय व सातत्यपूर्ण सहभाग वाढावा, ग्रामीण जनतेला स्वच्छतेची सवय लागावी त्यांचा सहभाग वाढावा या उद्देशाने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा घेतली जाते.

नाशिक विभागातील जिल्हानिहाय गावे

जिल्हा गावांची संख्या

नाशिक १९६०

जळगाव १५१३

अहमदनगर १६०२

नंदुरबार ९४३

धुळे ६७८

एकूण ६६९६

जिल्हास्तरावर प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या ग्रामपंचायती विभागस्तरीय स्पर्धेसाठी पात्र असतात. त्यानुसार नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यांत एकूण १० ग्रामपंचायती विभागस्तरावर स्पर्धेसाठी पात्र होत्या.

जिल्हा ग्रामपंचायतीचे नाव तालुका

नाशिक अवनखेड दिंडोरी

नाशिक राजदेरवाडी चांदवड

धुळे अजंदे बु शिरपूर

धुळे परसामळ शिंदखेडा

नंदुरबार वाटवी नवापूर

नंदुरबार राजविहीर तळोदा

जळगाव मेहेरगाव अमळनेर

जळगाव सुसरी भुसावळ

अहमदनगर लोणी बु राहाता

अहमदनगर वडनेर बु पारनेर

अशी होती १०० गुणांची परीक्षा

विषय गुण

शौचालय व्यवस्थापन ४०

पाणीगुणवत्ता २०

सांडपाणी व्यवस्थापन १०

लोकसहभाग १०

घनकचरा व्यवस्थापन ०५

घर/गाव परिसर स्वच्छता ०५

वैयक्तिक स्वच्छता ०५

स्मार्ट व्हीलेज संकल्पनेनुसार उपलब्धी ०५

एकूण १००

स्वच्छतेसाठी नेमणूक

जबाबदारी सोपविली की, कामे व्यवस्थित होतात, असा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा अनुभव आहे. गावातील त्या-त्या वस्तीवर स्वच्छता राखण्याची जबाबदारी नेमून देण्यात आली आहे. त्या-त्या भागातील ग्रामपंचायत सदस्यांनी परिसरात आठ ते दहा जणांची समिती स्थापन केली आहे. आठवड्यात दोन दिवस निश्चित करण्यात आले असून, त्या दिवशी न सांगता प्रत्येकजण आपआपली जबाबदारी पार पाडतो.

शिवारही स्वच्छ

गावाच्या पूर्वेला आणि पश्चिमेला आठ किलोमीटपर्यंत शिवार पसरले आहे. गावाचा केवळ दर्शनी भाग स्वच्छ ठेऊन उपयोग नाही. ग्रामस्थ गावापासून दूर मळ्यामध्ये राहात असतील तर तेथेही स्वच्छता नांदली पाहिजे याची कटाक्षाने काळजी घेतली जाते. गावातील शेतकरी बांधव प्राधान्याने द्राक्ष आणि उसाचे पिक घेतात. त्यांच्या शिवारापर्यंत वायफाय सुविधा पुरविण्यात आली आहे.

पंतप्रधानांकडूनही अवनखेडचे कौतुक

गाव हागणदारीमुक्त, तंटामुक्त आहे. येथील कचराही नैसर्गिक साधनसंपत्ती मानून त्याचा गांडूळखत निर्मितीसाठी उपयोग केला जातो. त्याकरिता तसे युनिट गावात साकारण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून जख्खड आजोबांपर्यंत सारेच स्वच्छतेचे पुजारी आहेत. गावात वायफाय सुविधा, अत्याधुनिक स्वरूपाचे टॉयलेट्स, शालेय विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी नॅपकीन आणि डिस्पोजल मशीन्स, शुद्ध पाण्यासाठी आरो यंत्रणा बसविण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा आपल्या भाषणातून अवनखेडचा उल्लेख करून या ग्रामस्थांचे कौतुक केले आहे.

आयएसओ मानांकन

आधारकार्ड ही अनिवार्य बाब झाल्याने गावातील सर्व ग्रामस्थांचे आधारकार्ड काढण्यात आले आहेत. अंगणवाडी, प्राथमिक शाळेला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. ग्रामपंचायतीचे दिवे सौरउर्जेवर चालतात. गावात स्वामी पदमानंद सरस्वती महाराज सभागृहाचे नूतनीकरण सुरू आहे. गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. गावात तंटे नाहीत अन् अतिक्रमणही नाही. सांडपाण्याच्या व्यवस्थापनासाठी शोष खड्डे, परसबाग, बंदिस्त गटारे यांची शास्त्रशुद्ध पद्धतीने मदत घेतली जाते.

स्वच्छता राहिली तर रोगराई पसरत नाही. त्यामुळे ग्रामस्थ स्वच्छतेला महत्त्व देतात. सर्वजण एकोप्याने राहतात म्हणूनच गावाची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे. गवत वाढू न देणे, रस्ते व त्यालगतचा परिसर स्वच्छ ठेवणे हे काम प्रत्येकजण आपली जबाबदारी समजून करतो. स्वच्छतेवर नजर ठेवण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर समितीही काम करते.

- भिका शिंदे, ग्रामस्थ

अंगणवाडीत ४० बालके येतात. ते स्वच्छ व नीट नेटकी असावीत याकडे आमचा कटाक्ष असतो. कपडे अस्वच्छ असतील तर पालकांना बोलावून समजावून सांगितले जाते. साबणाने हात स्वच्छ धुणे, केस अधिक वाढू न देणे आणि डब्यामध्ये खाद्यपदार्थ देतानाही योग्य काळजी घेण्याबाबत बालके आणि पालकांनाही मार्गदर्शन केले जाते. बालकांची नखे वाढली असतील तर ती अंगणवाडीतही काढली जातात.

- जयश्री पिंगळ (अंगणवाडी सेविका)

चॉकलेटचे रॅपर देखील डस्टबीनमध्ये टाकण्याची सवय शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये बाणविली आहे. शाळेतील वर्गांमध्ये नेलकटर ठेवले आहेत. पसायदानानंतर वर्ग शिक्षक विद्यार्थ्यांची नखे तपासतात. ती वाढली असतील तर कमी करण्याबाबत सूचना देतात. गुरूवारी शाळेतच नखे काढली जातात. केस वाढलेल्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी वर्गामध्ये उभे केले जाते. केस कमी करून येण्याच्या सूचना त्यांना दिल्या जातात.

- बाळूकाका शेवाळे, मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय, अवनखेड

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुरस्कार मिळणे हे अवनखेड ग्रामस्थांचे यश आहे. कोणत्याही चांगल्या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. ग्रामस्थांनी प्रत्येक वेळी हिरीरीने हा सहभाग दिला. राज्य स्तरावरील स्पर्धेत अवनखेडसह १२ गावांचा समावेश आहे. राज्य स्तरावरील समितीने अलीकडेच गावाची पाहणी केली असून, ग्राम स्वच्छतेचे राज्य स्तरावरील पहिले पारितोषिकही अवनखेडलाच मिळेल हा विश्वास आहे.

- नरेंद्र जाधव, सरपंच अवनखेड

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान विभागस्तरीय समिती

राजाराम माने, विभागीय आयुक्त - अध्यक्ष

सुदर्शन कालिंके, मुख्य अभियंता जीवन प्राधिकरण - सदस्य

शिवाजी दहीते, अध्यक्ष जिल्हा परिषद धुळे - सदस्य

डॉ. किरण मोघे - उपसंचालक माहिती व जनसंपर्क - सदस्य

प्रतिभा संगमनेरे - उपायुक्त विकास - सदस्य सचिव

स्वागत अन् बँडबाजाला नकार

गावाची पाहणी करण्यासाठी येणाऱ्या सरकारी समितीचे ग्रामस्थांच्या वतीने जोरदार स्वागत केले जाते. या स्वागताआड समितीला खूश करण्याचा प्रयत्न अधिक असतो हे नव्याने सांगायला नको. परंतु, विभागीय स्तरावर गावांची पाहणी करणाऱ्या समितीने स्वागत आणि बँडबाजाला स्पष्ट शब्दांत नकार दिला. सर्व औपचारिकतांना फाटा देऊन गावाच्या पाहणीला महत्त्व दिले. समितीमधील काही सदस्यांनी गावाचे डॉक्युमेंटशन तपासले तर काहींनी थेट ग्रामस्थांच्या घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. खरोखरच लोकसहभाग आहे का हे तपासण्यासाठी ग्रामस्थांना अनपेक्षित प्रश्न विचारण्यात आले. स्पर्धेत सहभागी काही गावांमध्ये समितीला शौचालयांचा वापर चारा साठवणुकीसाठी होत असल्याचे आढळले, तर काही गावांचा दर्शनी भाग लख्ख असला तरी सांडपाणी दूर कोठे शोष खड्ड्यात न सोडता जलाशयात सोडल्याचे आढळून आले. अशी गावे स्पर्धेतून बाद झाली. घनकचऱ्याचे काय करता? असे प्रश्न महिलांना तर नखे कोणत्या दिवशी कापतात असा प्रश्न कोणत्याही विद्यार्थ्याला विचारले गेले. केवल डॉक्युमेंटेशनवर विश्वास ठेऊन गुण न देता प्रत्यक्ष पाहणी, संवाद आणि क्रॉस व्हेरिफिकेशनला महत्त्व देण्यात आले.

गावाने काय केले?

घनकचरा व्यवस्थापनासाठी गांडूळ खत प्रकल्प निर्मिती

बंदिस्त गटारांची निर्मिती

सांडपाण्याच्या विल्हेवाटीसाठी शोषखड्डे

परसबाग निर्मिती

प्रत्येक घरी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी शौचालये

नदीकाठालगत कचरा टाकू नये याकरिता जॉगिंग ट्रॅक निर्मिती

जनावरांच्या मलमूत्राचेही व्यवस्थापन

विद्यार्थ्यांची नखे व केस कापण्याबाबत पाठपुरावा

जलजन्य आजार पसरू नयेत याकरिता टीसीएलचा वापर

शाळेत बसविले सॅनिटरी नॅपकीन व डिस्पोजल मशिन

वैयक्तिक स्वच्छता आणि घर स्वच्छतेलाही प्राधान्य

गावात १०० टक्के आधारकार्डधारक

गावकरी देतात श्रमदानाला महत्त्व

स्मशानभूमी परिसरात हिरवाई

सौर उर्जेवर चालतात सार्वजनिक दिवे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. वाटवाणी, डॉ. केळकर, गायकवाड यांचा रविवारी सन्मान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आजच्या तरुणांसमोर आदर्श व्यक्तींची उदाहरणे असावीत व त्यातून त्यांना सामाजिक कार्याची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने येत्या रविवारी (३१ मार्च) मुलाखतपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मॅगसेसे अॅवॉर्ड प्राप्त डॉ. भरत वाटवाणी, नाशिकचे प्रसिध्द अस्थिरोगतज्ञ डॉ. भरत केळकर व सोशल नेटवर्किंग फोरमचे प्रमोद गायकवाड यांच्या कार्याचा प्रवास या कार्यक्रमातून उलगडण्यात येणार असून, त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. कालिदास कलामंदिर येथे सकाळी ११ वाजता कार्यक्रम सुरू होणार आहे.

या चर्चेत मानसिकदृष्ट्या अपंग रुग्णांना तसेच, त्यांच्या परिवारासाठी श्रद्धा पुनर्वसन केंद्राद्वारे १९८८ सालापासून काम करणाऱ्या २०१८ चा मॅगसेसे अॅवॉर्ड प्राप्त मनोविकारतज्ज्ञ डॉ. भरत वाटवाणी हे सहभागी होऊन सामाजिक कार्याची जाणीव करून देणार आहेत. नाशिकचे प्रसिध्द अस्थिरोगतज्ञ डॉ. भरत केळकर यांनी वैद्यकीय सेवेच्या पलिकडे जाऊन वेगळे काम उभे केले आहे. आपल्या शिक्षण आणि सेवेचा वापर यादवी युध्दात जखमी झालेल्या नागरिकांच्या सेवेसाठी आयुष्य वेचले आहे. तेदेखील या विषयांवर आपले अनुभव कथन करणार आहेत. सोशल नेटवर्किंग फोरम संस्थेचे प्रमोद गायकवाड यांनी संस्थेच्या माध्यमातून आदिवासी भागातील गावांना टँकरमुक्त करणारी चळवळ, त्र्यंबकेश्वर तालुक्यात कुपोषणमुक्तीसाठी कार्य यांसारखे अनेक विषयांवर ते कार्य करीत असून, त्याची माहिती ते या कार्यक्रमात देणार आहेत. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त नाशिककरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ. हेमंत कोतवाल, राजेश बोरा, किरण चव्हाण, उमेश वानखेडे, शिरीष कदम, राजेश कोठावदे, विनिता धारकर, नितीन राका यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'उमेदवारांच्या खर्चाचा तपशील ठेवा'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारच्या सेवेतील अधिकारी निवडणूक निरीक्षकांना सहायक खर्च निरीक्षक म्हणून देण्यात आले आहेत. या सहायक खर्च निवडणूक निरीक्षकांनी राजकीय पक्ष व उमेदवारांनी केलेल्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे काम करावे. निवडणुकीविषयी देण्यात येणाऱ्या विविध परवानग्या तसेच त्यावर होणाऱ्या खर्चाचा तपशिल ठेवावा. सहायक खर्च निरीक्षकांनी बँक अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून खर्चाचे तपशील घ्यावेत, अशा सूचना निवडणूक उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांनी मंगळवारी संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्या.

लोकसभा निवडणुकीत खर्चाविषयीचा आढावा घेण्यासाठी सहायक खर्च निरीक्षकांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर, मुख्य वित्त व लेखा अधिकारी बोधी किरण, कोषागार अधिकारी व्ही. जी. गांगुर्डे, तहसीलदार प्रशांत पाटील, रचना पवार, लेखाधिकारी वाय. आर. झोले, एम. के. मिश्रा, संजय जोशी तसेच बीएसएनएल, प्रतिभूति मुद्रणालयाचे अधिकारी उपस्थित होते. उमेदवारांकडून स्टार कॅम्पनिंगद्वारे होणाऱ्या खर्चाचा तपशील, निवडणूक काळात राजकीय पक्षांकडून एक लाख किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम खात्यात जमा करणे किंवा काढणे तसेच उमेदवाराच्या खात्यातून १० लाखांहून अधिक रक्कम काढणे किंवा जमा करणेबाबत माहिती मिळविण्यासाठी बँक अधिकाऱ्यांशी सपंर्कात राहण्याच्या सूचना आंनदकर यांनी यावेळी दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी रात्रीचे जागरण

$
0
0

दीड वाजता कमी दाबाने पुरवठा

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १९ मधील गोरेवाडी भागातील विविध उपनगरांत सकाळी आणि सायंकाळी होणारा पाणीपुरवठा काही दिवसांपासून बंद झाल्याने या भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. या भागात चक्क रात्री दीड-दोन वाजेच्या दरम्यान आठवड्यातून तीन ते चार दिवस अत्यंत कमी दाबाने पुरवठा होत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

प्रभाग क्रमांक १९ मधील गोरेवाडी, नाशिककर मळा, जुना ओढा रोड, खंडू गायकवाड मळा य मोठ्या परिसरात काही दिवसांपासून सकाळ आणि सायंकाळी नियमित पाणी पुरवठ्याऐवजी रात्री दीड-दोन वाजेच्या दरम्यान पुरवठा होत आहे. तो अत्यंत कमी दाबाने आणि कमी वेळ होत असल्याने नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. कधी कधी तर रात्रीही पाणी पुरवठा होत नाही. परिणामी या भागातील उपनगरांतील नागरिकांवर पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे. प्रभाग क्रमांक २२ मधील खर्जुल मळ्यातही कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने या भागातही पाणी टंचाई निर्माण झालेली आहे.

जीर्ण जलवाहिनीचा फटका

नाशिकरोड जलकुंभापासून पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी ब्रिटिशकालीन असून ही जलवाहिनी सध्या अत्यंत जीर्ण झाली आहे. अनेक ठिकाणी या जलवाहिनीला गळती सुरू आहे. याशिवाय ही जलवाहिनी गंजल्याने व्यास घटल्याने कमी क्षमतेने पाणी होत आहे. पाणी वाहून नेण्याच्या क्षमतेत घट आल्याने कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. जलवाहिनी बदलण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी नगरसेवकांकडे केली. मात्र, जनतेच्या या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

"गोरेवाडी भागात काही वर्षांपासून कमी दाबाने आणि अवेळी पाणी पुरवठा होतो. या भागाला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी जीर्ण झाल्याने ती बदलण्याची मागणी करूनही स्थानिक नगरसेवकांनी दुर्लक्ष केले. परिणामी स्थानिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

- अनिल बोकील, स्थानिक नागरिक

दारणा नदीचे रोटेशन बंद झाल्याने चेहेडी पंपिंग स्टेशन येथील बंधाऱ्यातील पाणीसाठा घटला आहे. त्याचा परिणाम सध्या येथून नाशिकरोड जलशुद्धीकरण केंद्राला होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर झाला आहे. चेहेडी पंपिंग स्टेशन बंधाऱ्यातून पाणी उचलण्यासाठी लवकरच आणखी एक पंप सुरू केला जाणार आहे.

- अविनाश भोये,

उपअभियंता, पाणी पुरवठा विभाग, मनपा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ईव्हीएमच्या क्रमबदलीकरणाला सुरुवात

$
0
0

फोटो : सतीश काळे

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी विविध ठिकाणांहून जिल्ह्याला प्राप्त झालेल्या बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट या मतदान यंत्रांच्या पहिली क्रमबदलीकरण (फर्स्ट रँडमायझेशन- यादृच्छिकीकरण प्रक्रिया) प्रक्रिया जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळात बुधवारी सुरू करण्यात आली. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी ही प्रक्रिया समजून घेतली. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन व व्हीव्हीपॅट यंत्राबाबतच्या शंकांचे निरसन करून घ्यावे, तसेच संपूर्ण मतदानप्रक्रिया समजून घ्यावी, असे आवाहन या वेळी मांढरे यांनी केले.

क्रमबदलीकरण प्रक्रियेला सकाळी सव्वादहाला सुरुवात झाली. या वेळी अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, निवडणूक उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, मतदान यंत्र व्यवस्थापन समितीच्या नोडल अधिकारी सरिता नरके, श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार प्रशांत पाटील, राजश्री अहिरराव, नायब तहसिलदार अमित पवार यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

संगणक प्रणालीच्या साह्याने क्रमबदलीकरण प्रक्रियेची पहिली फेरी कशारीतीने पूर्ण होईल, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह सर्वांना माहिती दिली. तत्पूर्वी आनंदकर यांनी या प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती दिली. क्रमबदलीकरण प्रक्रियेंतर्गत मतदारसंघनिहाय यंत्रांचे वाटप होणार आहे. व्हीव्हीपॅट यंत्रांची वाहतूक करताना ती अत्यंत काळजीपूर्वक हाताळावीत, असे आवाहन कर्मचाऱ्यांना करण्यात आले. मतदान केंद्रांपर्यंत व्हीव्हीपॅट मशीन नेताना ते ट्रान्स्पोर्ट मोडमध्ये असणे गरजेचे असल्याच्या सूचनाही कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या. संगणकप्रणालीद्वारे प्रथम व द्वितीय क्रमबदलीची प्रक्रिया कशापद्धतीने पूर्ण करण्यात येणार आहे, याची माहिती नरके यांनी प्रात्यक्षिकाद्वारे दिली. विधानसभा मतदारसंघनिहाय १५ मतदारसंघांमध्ये ४,७२० मतदान केंद्रांना प्रत्येकी ५,५१३ बॅलेट व कंट्रोल युनिट आणि ५,९६९ व्हीव्हीपॅट यंत्रांचे वाटप करण्यात आले.

ही प्रक्रिया समजून घेण्यासाठी भाजपतर्फे बाळासाहेब पाटील, प्रकाश चकोर, उखाजी चौधरी, मनसेचे कार्यालयीन अध्यक्ष मनोज कोकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, काँग्रेसचे सुनील आव्हाड, रामप्रसाद कातकाडे, शिवसेनेचे नाना काळे, संजय करंजकर, बहुजन समाज पक्षाचे अरुण काळे उपस्थित होते. मात्र, तरीही राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या सरमिसळ प्रक्रियेकडे पाठ फिरविली.

तीन दिवस चालणार क्रमबदल प्रक्रिया

विधानसभा मतदारसंघनिहाय बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट यंत्रे नेमून देण्याची कार्यवाही पहिल्या क्रमबदल प्रक्रियेत सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया तीन दिवस सुरू राहील. ​​दुसऱ्या क्रमबदल प्रक्रियेत विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रनिहाय बॅलट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट यंत्रे नेमून देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. ही कार्यवाही १४ एप्रिलपूर्वी करावी लागणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रातील किमान ५० प्रतिनिधी अंबड वेअर हाऊसमध्ये उपस्थित राहतील. या सर्वांच्या चहापानासह जेवणाची चांगली व्यवस्था करा, असे निर्देश मांढरे यांनी दिले. याशिवाय कर्मचाऱ्यांसाठी आरोग्यविषयक सुविधा आणि रुग्णवाहिकाही येथे उपलब्ध करून द्या, असे निर्देश निवडणूक उपजिल्हाधिकारी आनंदकर यांना दिले.

कोट

कोणते ईव्हीएम मशिन कोणत्या मतदारसंघात जाईल, याचे नियंत्रण कोणाच्याही हाती नाही. एखाद्या उमेदवाराला फायदा होईल, अशा पद्धतीने ईव्हीएममध्ये सेटिंग होण्याची सूतराम शक्यता नाही. दहा हजार प्राप्त मशिनपैकी कोणते मशिन प्रत्यक्षात वापरले जाणार हेच अद्याप निश्चित नाही. एडिटिंगची सुविधा नसल्याने सर्व्हरकडून प्राप्त झालेल्या यादीमध्ये बदल करणे हीदेखील केवळ अशक्य गोष्ट आहे. विधानसभा मतदारसंघांमध्ये, इतकेच नव्हे तर तेथील कोणत्या मतदान केंद्रावर क्रमबदलीकरण पद्धतीने निवडलेले मशिनच गेले का, हेदेखील पक्षप्रतिनिधी तपासू शकतील.

- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कमान कार्यस्थळी अवतरले रिफ्लेक्टर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

सातपूर एमआयडीसी परिसरात उभारल्या जात असलेल्या स्वागत कमानीच्या कामाची माहिती व्हावी यासाठी अखेर रिफ्लेक्टर लावण्यात आले आहे.

स्वागत कमानीच्या पहिल्या टप्यातील काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्याचे काम ठेकेदाराने हाती घेतले आहे. परंतु, यात कमानीबाबत यंत्रणा अयशस्वी असल्याचे वृत्त 'मटा'ने दिले होते. 'मटा'च्या या वृत्ताची दखल घेत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला सुरक्षा ठेवण्याबाबत आदेश नुकतेच दिले. कमानीच्या कामाच्या ठिकाणी ठेकेदाराने रात्रीच्या वेळी वाहनांना काम सुरू असल्याची माहिती व्हावी, यासाठी रिफ्लेटकर लावण्यात आले आहे. दिवसा कमानीचे काम सुरू असल्याचे वाहनचालकांना कळत असले, तरी रात्री मात्र त्यांची तारांबळ उडत होती. ठेकेदाराकडून एकाबाजूने सुरक्षेसाठी रिफ्लेक्टर लावले आहेत. परंतु, दुसऱ्या बाजूने किमान एकेरी वाहतूक सुरू असल्याचे फलक लावावेत, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्रव्यवहारात अडकला स्थायीचा निर्णय

$
0
0

निवडणूक शाखेकडे पुन्हा पालिका पत्रव्यवहार करणार

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्थायी सदस्य नियुक्तीसाठी विशेष महासभा बोलविण्याची परवानगी मागणाऱ्या महापालिका प्रशासनाला जिल्हा निवडणूक शाखेच्या आचारसंहिता कक्षाने सदस्य नियुक्तीबाबत स्पष्ट उत्तर न दिल्याने नगरसचिव विभागाकडून पुन्हा निवडणूक शाखेशी पत्रव्यवहार केला जाणार आहे. स्थायी समिती सदस्यपद हे लाभाचे पद असल्याने नियुक्तीत वाद ओढावू नये, यासाठी निवडणूक शाखेकडून पुन्हा स्वयंस्पष्ट अहवाल मागविला जाणार आहे. आयुक्त राधाकृष्ण गमे हे आज (दि. २८) सुटीवरून परत आल्यानंतर त्यांच्या स्वाक्षरीने पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र लिहिले जाणार आहे.

भाजप नगरसेवक सुदाम नागरे यांच्या निधनामुळे भाजपची सदस्यसंख्या १ ने कमी झाली आहे. त्यामुळे स्थायी समितीवर सदस्यत्वाचे गुणोत्तर प्रमाणदेखील बदलले असून, नव्या प्रमाणानुसार शिवसेनेचा एक सदस्य स्थायीवर जाणार आहे. चारऐवजी पाच सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी शिवसेनेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने विभागीय आयुक्तांकडे, तर त्यांनी महासभेच्या कोर्टात चेंडू ढकलला होता. सदस्य नियुक्तीचा निर्णय आता महासभेवर घ्यायचा असल्याने आणि सध्या आचारसंहिता सुरू असल्याने नगरसचिव विभागाने जिल्हा निवडणूक शाखेतील आचारसंहिता कक्षाशी पत्रव्यवहार करीत विशेष महासभा बोलविण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र आदर्शआचारसंहिता काळात स्थायी सदस्य नियुक्तीसाठी विशेष महासभा घ्यावी की नाही, याबाबत या पत्रात थेट मार्गदर्शन न करता आचारसंहितेबाबत भारत निवडणूक आयोगाच्या निर्देर्शित केलेल्या सूचनांमधील प्रश्न क्रमांक २७ मधील उत्तरानुसार आवश्यक कार्यवाही करावी, असे नमूद केले होते. यासोबत आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे सुनावल्याने पालिका गोंधळात पडली होती. त्यामुळे नगरसचिवांनी आता हे प्रकरण अंगावर येऊ नये, यासाठी आस्ते कदम भूमिका घेतली आहे. आयुक्त सुटीवरून परत आल्यावर पुन्हा निवडणूक शाखेकडून स्वयंस्पष्ट अहवाल मागवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सदस्य नियुक्तीवरून पत्रव्यवहाराचा खेळ रंगून नियुक्ती लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

...

तर, न्यायालयात वाद

बहुमत टिकवण्यासाठी भाजप प्रयत्न करणार असून, आपलाच एक सदस्य स्थायीवर नियुक्त करणार आहे. त्यामुळे शिवसेनेकडून पु्न्हा न्यायालयात धाव घेतली जाण्याची शक्यता आहे. त्यातच स्थायी समितीवरील सदस्य हे लाभाचे पद आहे. त्यामुळे त्याची नियुक्ती आचारसंहितेच्या रडारवर येऊ नये, यासाठी काळजी घेतली जाणार आहे. त्यामुळे प्रशासनाने नियुक्ती नाही झाली तरी चालेल, परंतु वाद नको अशी भूमिका घेतल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यवसायात काळानुरुप बदल हवाच

$
0
0

व्यावसायिक चकोर गांधींचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बदलत्या काळानुसार ग्राहकांची मानसिकता बदलली आहे. ऑनलाइन व्यवहारांमुळे कॅशलेस व्यवहारास ग्राहक पसंती देत आहे. ही बाब व्यावयासिकांनी देखील हेरायला हवी. काळानुरुप प्रत्येक गोष्टीत बदल होतात. तसेच व्यवसायातही बदल हवाच, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय व्यावयासिक चकोर गांधी यांनी केले.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चरच्या नाशिक शाखेचा ४६ व्या वर्धापन दिन धनदाई लॉन्स येथे झाला. त्यावेळी गांधी यांनी 'सावधान धंदा बदलतो आहे' या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी मंचावर महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, उद्योजक राजेंद्र मेहता, संजय देवरे, चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष अमित कामत, उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, ललित गांधी, उमेश दाशरथी, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आशिष पेडणेकर, माजी अध्यक्ष रामचंद्र भोगले होते. वर्धापन दिन सोहळ्यात चेंबरच्या कार्याचा आढावा वाचण्यात आला. डॉ. मिथिला कापडणीस आणि सुरेश चावला यांनी सूत्रसंचालन केले. सुनीता फाल्गुने यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्यकारीणी सदस्य अंजू सिंघल, स्वप्नील जैन, भावेश मानेक आदींनी परिश्रम घेतले.

... तर उद्योजकांनाही फायदा

उद्योजक राजेंद्र मेहता म्हणाले, की उद्योगातील नव्या तंत्रज्ञानानुसार कंपन्यांमध्ये उच्च शिक्षितांची संख्या वाढायला हवी. त्यासाठी उद्योजकांनी पुढाकार घ्यायला हवा. कंपनीतील कामगारांचा कौशल्य विकास व्हावा म्हणून उद्योजकांनी कार्यशाळा घ्याव्यात. प्रगत तंत्रज्ञानानुसार उद्योजकांनीही कार्यात बदल केल्यास फायदा नक्की होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकीचे बळ, मिळते फळ!

$
0
0

प्रवीण बिडवे

pravin.bidve@timesgroup.com

Tweet : BidvePravinMT

'ऐसे निश्चयाचे बळ तुका म्हणे तेचि फळ' या उक्तीचा प्रत्यय दिंडोरी तालुक्यातील अवनखेड गावात येतो. ग्रामस्थांचा दृढनिश्चयी बाणा अन् एकात्मतेमुळे या गावाने विकासाचे आयाम बदलले आहेत. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छतेचे अत्यंत प्रतिष्ठेचे नाशिक विभागाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक या गावाने अलीकडेच पटकावले. राज्यस्तरावरील पहिल्या पारितोषिकावर आपलीच मोहोर उमटविण्यासाठी हे गाव सिद्ध झाले आहे.

दिंडोरी तालुक्यातील अवनखेड हे अवघ्या ४५० उंबऱ्यांचे गाव. विकासासाठीचे झपाटलेपण येथे पहावयास मिळते. विकास हा एकट्याने ओढावयाचा गाडा नाही. ती अंगणवाडीत जाणाऱ्या बालकापासून जख्खड आजोबांपर्यंत सर्वांचीच जबाबदारी आहे. गावातील सर्वच्या सर्व २,८५० ग्रामस्थ ही जबाबदारी पार पाडतात. म्हणूनच उत्तर महाराष्ट्रातील ६ हजार ६९६ गावांमधून अवनखेड या गावाला गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचे पहिले १० लाखांचे पारितोषिक मिळाले. आता राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी १२ गावांमध्ये अवनखेडनेही दंड थोपटले असून, राज्याचे पहिले पारितोषिक मिळविण्याचा संकल्प सोडला आहे.

ग्राम स्वच्छता अभियान कशासाठी

ग्रामीण जनतेचे आरोग्यमान व पर्यायाने जीवनस्तर उंचावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ग्रामस्थांचा सक्रिय व सातत्यपूर्ण सहभाग वाढावा, ग्रामीण जनतेला स्वच्छतेची सवय लागावी त्यांचा सहभाग वाढावा या उद्देशाने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा घेतली जाते.

नाशिक विभागातील जिल्हानिहाय गावे

जिल्हा गावांची संख्या

नाशिक १९६०

जळगाव १५१३

अहमदनगर १६०२

नंदुरबार ९४३

धुळे ६७८

एकूण ६६९६

जिल्हास्तरावर प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या ग्रामपंचायती विभागस्तरीय स्पर्धेसाठी पात्र असतात. त्यानुसार नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यांत एकूण १० ग्रामपंचायती विभागस्तरावर स्पर्धेसाठी पात्र होत्या.

जिल्हा ग्रामपंचायतीचे नाव तालुका

नाशिक अवनखेड दिंडोरी

नाशिक राजदेरवाडी चांदवड

धुळे अजंदे बु शिरपूर

धुळे परसामळ शिंदखेडा

नंदुरबार वाटवी नवापूर

नंदुरबार राजविहीर तळोदा

जळगाव मेहेरगाव अमळनेर

जळगाव सुसरी भुसावळ

अहमदनगर लोणी बु राहाता

अहमदनगर वडनेर बु पारनेर

अशी होती १०० गुणांची परीक्षा

विषय गुण

शौचालय व्यवस्थापन ४०

पाणीगुणवत्ता २०

सांडपाणी व्यवस्थापन १०

लोकसहभाग १०

घनकचरा व्यवस्थापन ०५

घर/गाव परिसर स्वच्छता ०५

वैयक्तिक स्वच्छता ०५

स्मार्ट व्हीलेज संकल्पनेनुसार उपलब्धी ०५

एकूण १००

स्वच्छतेसाठी नेमणूक

जबाबदारी सोपविली की, कामे व्यवस्थित होतात, असा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा अनुभव आहे. गावातील त्या-त्या वस्तीवर स्वच्छता राखण्याची जबाबदारी नेमून देण्यात आली आहे. त्या-त्या भागातील ग्रामपंचायत सदस्यांनी परिसरात आठ ते दहा जणांची समिती स्थापन केली आहे. आठवड्यात दोन दिवस निश्चित करण्यात आले असून, त्या दिवशी न सांगता प्रत्येकजण आपआपली जबाबदारी पार पाडतो.

शिवारही स्वच्छ

गावाच्या पूर्वेला आणि पश्चिमेला आठ किलोमीटपर्यंत शिवार पसरले आहे. गावाचा केवळ दर्शनी भाग स्वच्छ ठेऊन उपयोग नाही. ग्रामस्थ गावापासून दूर मळ्यामध्ये राहात असतील तर तेथेही स्वच्छता नांदली पाहिजे याची कटाक्षाने काळजी घेतली जाते. गावातील शेतकरी बांधव प्राधान्याने द्राक्ष आणि उसाचे पिक घेतात. त्यांच्या शिवारापर्यंत वायफाय सुविधा पुरविण्यात आली आहे.

पंतप्रधानांकडूनही अवनखेडचे कौतुक

गाव हागणदारीमुक्त, तंटामुक्त आहे. येथील कचराही नैसर्गिक साधनसंपत्ती मानून त्याचा गांडूळखत निर्मितीसाठी उपयोग केला जातो. त्याकरिता तसे युनिट गावात साकारण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून जख्खड आजोबांपर्यंत सारेच स्वच्छतेचे पुजारी आहेत. गावात वायफाय सुविधा, अत्याधुनिक स्वरूपाचे टॉयलेट्स, शालेय विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी नॅपकीन आणि डिस्पोजल मशीन्स, शुद्ध पाण्यासाठी आरो यंत्रणा बसविण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा आपल्या भाषणातून अवनखेडचा उल्लेख करून या ग्रामस्थांचे कौतुक केले आहे.

आयएसओ मानांकन

आधारकार्ड ही अनिवार्य बाब झाल्याने गावातील सर्व ग्रामस्थांचे आधारकार्ड काढण्यात आले आहेत. अंगणवाडी, प्राथमिक शाळेला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. ग्रामपंचायतीचे दिवे सौरउर्जेवर चालतात. गावात स्वामी पदमानंद सरस्वती महाराज सभागृहाचे नूतनीकरण सुरू आहे. गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. गावात तंटे नाहीत अन् अतिक्रमणही नाही. सांडपाण्याच्या व्यवस्थापनासाठी शोष खड्डे, परसबाग, बंदिस्त गटारे यांची शास्त्रशुद्ध पद्धतीने मदत घेतली जाते.

स्वच्छता राहिली तर रोगराई पसरत नाही. त्यामुळे ग्रामस्थ स्वच्छतेला महत्त्व देतात. सर्वजण एकोप्याने राहतात म्हणूनच गावाची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे. गवत वाढू न देणे, रस्ते व त्यालगतचा परिसर स्वच्छ ठेवणे हे काम प्रत्येकजण आपली जबाबदारी समजून करतो. स्वच्छतेवर नजर ठेवण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर समितीही काम करते.

- भिका शिंदे, ग्रामस्थ

अंगणवाडीत ४० बालके येतात. ते स्वच्छ व नीट नेटकी असावीत याकडे आमचा कटाक्ष असतो. कपडे अस्वच्छ असतील तर पालकांना बोलावून समजावून सांगितले जाते. साबणाने हात स्वच्छ धुणे, केस अधिक वाढू न देणे आणि डब्यामध्ये खाद्यपदार्थ देतानाही योग्य काळजी घेण्याबाबत बालके आणि पालकांनाही मार्गदर्शन केले जाते. बालकांची नखे वाढली असतील तर ती अंगणवाडीतही काढली जातात.

- जयश्री पिंगळ (अंगणवाडी सेविका)

चॉकलेटचे रॅपर देखील डस्टबीनमध्ये टाकण्याची सवय शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये बाणविली आहे. शाळेतील वर्गांमध्ये नेलकटर ठेवले आहेत. पसायदानानंतर वर्ग शिक्षक विद्यार्थ्यांची नखे तपासतात. ती वाढली असतील तर कमी करण्याबाबत सूचना देतात. गुरूवारी शाळेतच नखे काढली जातात. केस वाढलेल्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी वर्गामध्ये उभे केले जाते. केस कमी करून येण्याच्या सूचना त्यांना दिल्या जातात.

- बाळूकाका शेवाळे, मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय, अवनखेड

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुरस्कार मिळणे हे अवनखेड ग्रामस्थांचे यश आहे. कोणत्याही चांगल्या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. ग्रामस्थांनी प्रत्येक वेळी हिरीरीने हा सहभाग दिला. राज्य स्तरावरील स्पर्धेत अवनखेडसह १२ गावांचा समावेश आहे. राज्य स्तरावरील समितीने अलीकडेच गावाची पाहणी केली असून, ग्राम स्वच्छतेचे राज्य स्तरावरील पहिले पारितोषिकही अवनखेडलाच मिळेल हा विश्वास आहे.

- नरेंद्र जाधव, सरपंच अवनखेड

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान विभागस्तरीय समिती

राजाराम माने, विभागीय आयुक्त - अध्यक्ष

सुदर्शन कालिंके, मुख्य अभियंता जीवन प्राधिकरण - सदस्य

शिवाजी दहीते, अध्यक्ष जिल्हा परिषद धुळे - सदस्य

डॉ. किरण मोघे - उपसंचालक माहिती व जनसंपर्क - सदस्य

प्रतिभा संगमनेरे - उपायुक्त विकास - सदस्य सचिव

स्वागत अन् बँडबाजाला नकार

गावाची पाहणी करण्यासाठी येणाऱ्या सरकारी समितीचे ग्रामस्थांच्या वतीने जोरदार स्वागत केले जाते. या स्वागताआड समितीला खूश करण्याचा प्रयत्न अधिक असतो हे नव्याने सांगायला नको. परंतु, विभागीय स्तरावर गावांची पाहणी करणाऱ्या समितीने स्वागत आणि बँडबाजाला स्पष्ट शब्दांत नकार दिला. सर्व औपचारिकतांना फाटा देऊन गावाच्या पाहणीला महत्त्व दिले. समितीमधील काही सदस्यांनी गावाचे डॉक्युमेंटशन तपासले तर काहींनी थेट ग्रामस्थांच्या घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. खरोखरच लोकसहभाग आहे का हे तपासण्यासाठी ग्रामस्थांना अनपेक्षित प्रश्न विचारण्यात आले. स्पर्धेत सहभागी काही गावांमध्ये समितीला शौचालयांचा वापर चारा साठवणुकीसाठी होत असल्याचे आढळले, तर काही गावांचा दर्शनी भाग लख्ख असला तरी सांडपाणी दूर कोठे शोष खड्ड्यात न सोडता जलाशयात सोडल्याचे आढळून आले. अशी गावे स्पर्धेतून बाद झाली. घनकचऱ्याचे काय करता? असे प्रश्न महिलांना तर नखे कोणत्या दिवशी कापतात असा प्रश्न कोणत्याही विद्यार्थ्याला विचारले गेले. केवल डॉक्युमेंटेशनवर विश्वास ठेऊन गुण न देता प्रत्यक्ष पाहणी, संवाद आणि क्रॉस व्हेरिफिकेशनला महत्त्व देण्यात आले.

गावाने काय केले?

घनकचरा व्यवस्थापनासाठी गांडूळ खत प्रकल्प निर्मिती

बंदिस्त गटारांची निर्मिती

सांडपाण्याच्या विल्हेवाटीसाठी शोषखड्डे

परसबाग निर्मिती

प्रत्येक घरी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी शौचालये

नदीकाठालगत कचरा टाकू नये याकरिता जॉगिंग ट्रॅक निर्मिती

जनावरांच्या मलमूत्राचेही व्यवस्थापन

विद्यार्थ्यांची नखे व केस कापण्याबाबत पाठपुरावा

जलजन्य आजार पसरू नयेत याकरिता टीसीएलचा वापर

शाळेत बसविले सॅनिटरी नॅपकीन व डिस्पोजल मशिन

वैयक्तिक स्वच्छता आणि घर स्वच्छतेलाही प्राधान्य

गावात १०० टक्के आधारकार्डधारक

गावकरी देतात श्रमदानाला महत्त्व

स्मशानभूमी परिसरात हिरवाई

सौर उर्जेवर चालतात सार्वजनिक दिवे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज दरवाढीचा शॉक

$
0
0

ऐन उन्हाळ्यात जादा आकारणी; एक एप्रिलपासून अंमलबजावणी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्याला वीज पुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीची दरवाढ १ एप्रिलपासून लागू होणार असल्याने ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. याविरोधात वीज ग्राहक संघटनाही आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहे. ऐन निवडणुकीत ही दरवाढ लागू होणार असल्याने विरोधी पक्ष सुद्धा याला प्रचाराचा मुद्दा करणार आहे. या दरवाढीला सर्वच क्षेत्रातातून प्रचंड विरोध असून त्यात सरकारला लक्ष्य केले जात आहे.

वीज दरवाढ सरासरी ६ टक्के असल्याने वीज ग्राहकांना ऐन उन्हाळ्यात आर्थिक चटकाही सहन करावा लागणार आहे. राज्यभर ही दरवाढ होणार आहे. जिल्हाभरात १४ लाख ७५ हजार १६३ वीज ग्राहक आहेत. वीज नियामक आयोगाने १२ सप्टेंबर २०१८ रोजी या दरवाढीला मंजुरी दिली होती. त्यानंतर ही दरवाढ आता अंमलात येणार आहे. या दरवाढीतून वीज वितरण कंपनीला ८२६८ कोटी रुपये मिळणार असून त्याची झळ मात्र ग्राहकांच्या खिशांना बसणार आहे.

अशी आहे दरवाढ

महावितरणाच्या ० ते १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना वीजदर ५.३० रुपये प्रति युनिट होता. आता हा दर १६ पैशांनी महागणार असून व हे दर ५ रुपये ४६ पैसे होणार आहे. १०१ ते ३०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांचे दर हे २४ पैशांनी महागणार आहे. ५०० युनिटपर्यंत वीजवापर करणाऱ्यांना हे दर १५ पैशांनी महागणार आहे. तसेच स्थिर दर आकारातही १० रुपये दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ८० रुपयाचे हे दर ९० रुपये होणार आहे.

असे आहे जिल्ह्यातील वीज ग्राहक

वापर मालेगाव सर्कल नाशिक सर्कल

घरगुती २६२६६३ ७३६७८४

व्यावसायिक २२८०४ ८८३५९

औद्योगिक ४१८६ ९९०५

कृषी १४७१३९ १७४३१०

सार्वजनिक पाणीपुरवठा ६०४ ११३८

पथदीप १४७१ ३६४३

पॉवरलूम १२५७१ ९

इतर ३५०३ ६०७४

एकूण ४५४९४१ १०२०२२२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षाचालकाने केले साडेपाच तोळे सोने परत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा सिडको

वणी (ता. दिंडोरी) येथील एक कुटुंब सिडकोत येत असताना त्यांची बॅग रिक्षात राहिली होती. त्या बॅगेत साडेपाच तोळे सोने होते. ही बॅग रिक्षाचालकाने अंबड पोलिसांच्या माध्यमातून बॅगमालकाला परत केली. या प्रामाणिकपणाबद्दल रिक्षाचालकाचा सत्कार करण्यात आला.

प्रकाश मुरलीधर सोनार (रा. वणी) हे त्यांच्या पत्नीसह नाशिकला आले. सोनार कुटुंबीय पवननगरपर्यंत एमएच १५ एफयू ०३३७ या रिक्षातून आले. रिक्षातून उतरल्यानंतर रिक्षाचालक वाल्मीक आत्माराम गायकवाड यांच्या लक्षात आले की, प्रवाशांची बॅग रिक्षातच राहिली आहे. त्याने तातडीने अंबड पोलिसात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी बॅगेत असलेल्या कागदपत्रांवरून बॅगमालकाचा शोध घेतला. पोलिसांनी सोनार यांना पोलिस ठाण्यात बोलावून बॅग त्यांच्या ताब्यात दिली. यावेळी या बॅगेत सुमारे साडेपाच तोळे सोन्याचे दागिने व कपडे असल्याचे दिसून आले. मात्र रिक्षाचालकाने कोणत्याही प्रकारे स्वार्थ न ठेवता ही बॅग परत केल्याने पोलिसांसह सर्वांनीच त्याचे अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या हाती येणार स्मार्टफोन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अंगणवाडीमधील कामकाज १ मेपासून पेपरलेस होणार असून येथे आता रजिस्टरऐवजी मोबाइल अ‍ॅपच्या वापर केला जाणार आहे. यासाठी या कर्मचाऱ्यांना स्मार्ट फोनही दिले जाणार आहे. त्यामध्येच लसीकरण व गृहभेटीच्या दैनंदिन नोंदी व बालकांच्या दैनंदिन नोंदी घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे रजिस्टरवरील दैनंदिन नोंदीचे काम संपुष्टात येणार आहे.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाने विकसित केलेल्या मोबाइल ॲपचा त्यासाठी वापर केला जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात सर्व स्तरावर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे काम स्मार्ट होणार आहे. या स्मार्ट फोनमधून सर्व माहिती आणि दैनंदिन अहवाल ऑनलइन भरता येणार आहे.

जिल्हा परिषदेच्या सभागृहात बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका यांनी बुधवारी कार्यशाळा घेतली. यात कुटुंबांची सर्व माहिती अद्यावत करून मोबाइल ॲपबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हाभरात मोबाइल अॅपचा प्रभावीपणे वापर करून जबाबदारीने काम करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी यावेळी दिले. येत्या आठवडाभरात सर्व मोबाइल फोन अंगणवाडी सेविकांना उपलब्ध होणार असून त्यानंतर पुन्हा २ एप्रिल ते ११ एप्रिल या काळात सरकारकडून याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे यांनी दिली. कार्यशाळेत जिल्ह्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी, मुख्यसेविका, पर्यवेक्षिका आदी उपस्थित होते.

कोणते काम करणे शक्य?

अंगणवाडीत पूरक पोषण आहार, औषधी वाटप, बालकांचे वेळोवेळी वजन घेणे गरोदर माता, बालकांचे वजन, लसिकरण यासह इतर बाबींची कामे असतात. या सर्व कामांचा अहवाल अंगणवाडी सेविकांना केंद्र किंवा तालुकास्तरावर द्यावा लागत असतो. तो आता स्मार्ट फोनद्वारे देता येणे शक्य होणार आहे.

वेळेची बचत

दुर्गम भागात रस्त्यांची व वाहनांची कमतरता लक्षात घेता असे अहवाल वेळेत सादर करण्याची मोठी कसरत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना करावी लागते. मात्र, आता या स्मार्ट फोन आणि मोबाइल अॅपमुळे वेळेत बचत होणार असून सदरची माहिती तालुकास्तरापासून ते राज्यस्तरापर्यंत बघता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोडमध्ये मंगळवारी (दि. २६) विविध घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. त्यात दोन जणांचा हृदयविकाराने तर एकाची प्रकृती अचानक बिघडल्याने मृत्यू झाला. एका अनोळखी इसमाचा मृतदेह सुभाषरोडला आढळून आला असून त्याची अद्याप ओळख पटू शकलेली नाही. याशिवाय अन्य एका घटनेत अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत विवाहितेचा अंत झाला.

पांडुरंग माधवराव भावसार (वय ६८, रा. माळी कॉलनी, जेलरोड), बाळू शामराव बेलसरे (वय ७१, रा. गोरेवाडी, जेलरोड) या दोन नागरिकांना श्वसनाचा त्रास झाला. त्यांना सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. प्रकृती अचानक बिघडल्याने देवराम कारभारी पवार (वय ७५, रा. शिंदेगाव) यांचाही रुग्णालयात मृत्यू झाला. तसेच सामनगाव रोडवरील जयप्रकाशनगरमधील रहिवाशी पूजा अनिकेत साठे (वय २१) या विवाहितेने घरात सोमवारी (दि. २५) दुपारी बारा वाजेच्या दरम्यान अंगावर स्वतः रॉकेल ओतून पेटवून घेतले. यात ती शंभर टक्के भाजली. महापालिकेच्या बिटको रुग्णालयात उपचार सुरू असतांना पूजाचा मंगळवारी सकाळी सहा वाजता मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live

Latest Images