म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड पळसे गावातील फुलेनगरातील सैन्यातील जवानाच्या घरी झालेल्या घरफोडीत कोठीत ठेवलेले १ लाख ५० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लुटले. याच चोरट्यांनी जवानाच्या शेजारील बंद घरातून रोख २० हजार रुपये लुटले. तसेच एका नागरिकाच्या घरासमोरील दुचाकी लंपास केली. एकाच रात्री तीन ठिकाणी चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने पळसे परिसरात खळबळ उडाली आहे. रोहिणी संदिप म्हस्के (वय २७, रा. फुलेनगर, पळसे) यांनी नाशिकरोड पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांचे पती संदीप म्हस्के सैन्यदलात नोकरीस आहेत. गेल्या काही दिवसांपासून म्हस्के कुटुंबीय देवळाली कॅमम्मधील वेलमन कॉलनीत तात्पुरते वास्तव्यासाठी गेलेले होते. फुलेनगर येथील त्यांच्या घरी कुलूप असल्याने शनिवारी (दि. २) रात्री उशिरा चोरट्यांनी घरफोडी केली. यात घरातील लोखंडी कोठीत ठेवलेली १ लाख ५ हजार रुपये किंमतीची साडेतीन तोळे सोन्याची पोत आणि ४५ हजार रुपयांचा दीड तोळे सोन्याचा नेकलेस चोरट्यांनी चोरून नेला. याच चोरट्यांनी म्हस्के यांच्या घराशेजारील रामदास भिकाजी पाटील यांच्या बंद घरात शिरकाव करीत रोख २० हजार रुपये लंपास केले. पाटील कुटुंबीय त्यांच्या मूळ गावी कावणी येथे गेलेले होते. यानंतर चोरट्यांनी संदीप सुधाकर गायधनी यांच्या घरापुढे उभी केलेली दुचाकीही (एमएच १५ ईआर १२६९) चोरुन नेली. या तिन्ही घटनांची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलिस आयुक्त ईश्वर वसावे, नाशिकरोड ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नीलेश माईनकर, सहाय्यक निरीक्षक कुंदन सोनोने, उपनिरिक्षक सचिन शेंडकर, वैशाली मुकणे आदींनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. श्वान पथकाच्या मदतीने पोलिसांनी चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, संशयितांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळाले नाही. आडगावातही घरफोडी विश्वनाथ वसंत बेडसे (रा. वृंदावननगर, आडगाव) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केली. हा प्रकार २४ फेब्रुवारी ते ३ मार्च यादरम्यान घडला. चोरट्यांनी किचनमधील कपाटातून ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. यात ४० हजार रुपयांची २४ ग्रॅमची सोनसाखळी, ११ हजार रुपयांची पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी, चार हजार रुपयांचे दोन ग्रॅमचे वेढे, २० हजार रुपयांची रक्कम व ११ हजार रुपयांची एक अंगठी असा ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविला. याबाबत आडगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक पाटील पुढील तपास करीत आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट