Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘बाइक रॅली’ होणार दमदार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुणी बेभान होऊन घेतलेला बाइकस्वारीचा आनंद, तर कुणी उत्साहातही जपलेले सामाजिक भान, कुणी पोशाखावर घेतलेली मेहनत, तर कुणी स्त्रीमुक्तीचा दिलेला नारा, आनंद साजरा करण्याचा प्रत्येकीचा फंडा वेगळा असला तरी त्यातील जपली जाणारी एकी मात्र सारखीच. जुनी मैत्री जपत नव्याने भेटणाऱ्या सख्यांसोबत यंदाचाही महिलादिन अधिक दमदार ठरणार आहे. महिला दिनानिमित्त 'महाराष्ट्र टाइम्स' आयोजित 'ऑल वूमेन पॉवर रॅली'चे आयोजन रविवारी (१० मार्च) करण्यात आले आहे.

मिळून साऱ्याजणी, चारचौघी, नारीशक्ती जिंदाबाद, आव्वाज कुणाचा असा थक्क करणारा उत्साह घेऊन त्या साऱ्या जणी शहरात दाखल होतात आणि न थकता प्रत्येक क्षणागणिक उत्साहाचा पारा चढाच ठरतो. दरवर्षी एक नवा ट्रेंड दाखविणाऱ्या या महिलादिन विशेष रॅलीत गेल्या वर्षीही सख्यांनी धमाल केली. पारंपरिक वेशभूषेची आधुनिक पोशाखाशी सांगड घालत काहींनी जीन्स आणि फेटा यांचे कॉम्बिनेशन केले, तर काहींनी तीन पिढ्यांनी एकत्र सहभाग घेत कौटुंबिक उत्साह दाखविला. 'हम भी किसी से कम नहीं' म्हणत ज्येष्ठांचा गट सहभागी झाला. पर्यावरण संवर्धन, स्त्रीभ्रूणहत्या, प्राणी वाचवा यांसारख्या अनेक ज्वलंत प्रश्नांना स्थान देत प्रत्येकीने आपला वेगळा विचार ठामपणे व्यक्त केला. काहींनी पोशाखातून, तर काहींनी सजविलेल्या वाहनाच्या माध्यमातून आपले परखड मत मांडले. उत्साह साजरा करतानाच महिलांचे विचार रॅलीच्या व्यासपीठावर मांडण्याची संधी अनेकींनी दवडली नाही. आनंद, उत्साह यासह स्वतःचे वेगळेपण सिद्ध करण्याची प्रत्येकीत खटपट होती. त्यापैकी कलात्मक संकल्पना असलेल्या महिलांनी पारितोषिकावर आपले नावही कोरले. काहींनी एकट्याने, तर काहींनी भल्यामोठ्या संख्येने एकत्र रॅलीत सहभाग घेतला आणि रॅलीच्या अखेरीस प्रत्येकीला नव्या मैत्रिणी गवसल्या. हीच गंमत अधिक नव्या ढंगात अनुभवण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज व्हा. पोशाखापासून नव्या संकल्पनांपर्यंत प्रत्येकाचा विचार करा आणि सोबतीला आपल्या लाडक्या सख्यांसह रॅलीचा बेत आखण्यास सुरुवात करा.

\B'गेट सेट गो'\B

'ऑल वूमेन बाइक रॅली'त सहभागी होण्यासाठी नावनोंदणी अनिवार्य आहे. नोंदणी करण्यासाठी 'PowerrallyNSK' हा एसएमएस कोड ५८८८८ या क्रमांकावर पाठवावा अथवा www.allwomenbikerally.com या वेबसाइटवरही नोंदणी करता येईल, तसेच ९४२२५ १३५६९ या क्रमांकावर संपर्क साधूनही नोंदणी करता येणार आहे.

\B'ऑल वूमेन बाइक रॅली'\B

\Bकधी :\B रविवार १० मार्च, २०१९

\Bवेळ :\B सकाळी ७.३० ते १०

\Bकुठे :\B ईदगाह मैदान, त्र्यंबक रोड, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ताई, तुम्हीसुद्धा ‘गोदाई’कडे पाठ फिरवली?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'पंकजाताई, तुमच्यात आम्हाला आमची थोरली बहिण दिसते हो. आम्हाला विविध उपक्रमांद्वारे प्रोत्साहीत करणारी. पाठीवर कौतुकाची थाप देणारी ताई! बड्या कार्यक्रमांमधील तुमचा सहज वावर आमचा आत्मविश्वास द्विगुणीत करतो. म्हणूनच तुमची भेट आम्हाला नेहमीच हवीहवीशी वाटते. ग्रामविकासचा झेंडा अटकेपार रोवण्याचा तुमचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही झटतोय. पण तुम्ही पाठीवर शाबासकी देण्याऐवजी आमच्याकडे पाठ फिरविलीत. ताई, नाशिककरांप्रमाणेच तुम्हीसुध्दा आमची निराशाच केलीत. ही भावना आहे ग्रामविकास विभागातर्फे आयोजीत गोदाई महोत्सवात सहभागी महिलांची.

राज्य सरकारचा ग्राम विकास विभाग, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे डोंगरे वसतिगृह मैदान येथे 'गोदाई महोत्सव' भरविण्यात आला आहे. या महोत्सवात तब्बल २५० बचतगटांनी सहभाग घेतला आहे. नाशिकसह अगदी तीन चारशे किलोमीटरवरील खेडोपाड्यांतील बापुड्या महिला दोन पैसे गाठीला लागतील या आशेने महोत्सवात सहभागी झाल्या आहेत.

पंकजाताई आणि राज्य सरकारमधील हेवीवेट मंत्री गिरीश महाजन प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी वेळात वेळ काढून येणार असल्याने त्या सुखावल्या. परंतु कार्यबाहुल्यामुळे हे मातब्बर येऊ शकत नसल्याची उद्घोषणा होताच त्यांचा भ्रमनिरास झाला. विशेष म्हणजे त्यानंतरचा प्रत्येक दिवस 'प्रथमग्रासे मक्षिकापात'चा अनुभव देणारा ठरत असल्याचा अनुभव या महिला घेत आहेत. बनविलेले विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, वस्तू या महिलांनी विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या. परंतु त्याचा प्रचार, प्रसार करण्याबाबत ग्रामविकास विभागाच्या सरकारी यंत्रणेने अनास्था दाखविली अन् सुरूवातीचे बहुतांश दिवस नाशिककरांनीही त्याकडे पाठ फिरविली. दिवसभर हातावर हात धरून बसून राहावे लागत असल्याने या महिला अक्षरश: वैतागल्या. निदर्शने करून त्यांनी आपल्या भावनाही यंत्रणेकडे व्यक्त केल्या. प्रदर्शन स्थळापासून हाकेच्या अंतरावरील व्ही. एन. नाईक महाविद्यालयात रविवारी पंकजा ताई येत असल्याने या महिलांच्या आशा पल्लवीत झाल्या. महोत्सवाला पंकजा ताईंचे पाय लागतील. शेवटचे दोन दिवस का असेना ग्राहकांचा ओघ वाढून आपण आणलेल्या उत्पादनांची विक्री होईल, अशी आशा या महिला व्यक्त करीत होत्या. परंतु याच विभागाचे खाते सांभाळणाऱ्या पंकजाताईंना महोत्सवाला भेट न द्यावीशी वाटल्याने महिलांचा पुन्हा एकदा भ्रमनिरास झाला. ताईंच्या उपक्रमशीलतेला दाद देण्यासाठी आम्ही घरदार सोडून चार पाचशे किलोमीटरवरून येथे आलो. ताईंना आमच्यासाठी केवळ रस्ता ओलांडणेही शक्य नव्हते का? अशी भावना या महिलांनी यावेळी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सारस्वतांची मांदियाळी...

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एकाहून एक सरस विषय... प्रख्यात साहित्यिकांचे अधिष्ठान... वेळप्रसंगी सकारात्मक वाद आणि संवाद घडविणारी त्यांची मत-मतांतरे... एकूणच या सर्वांचा कोलाज असलेली 'मटा मैफल' रविवारी रंगली.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या स्मरण कार्यक्रमांतर्गत 'महाराष्ट्र टाइम्स'च्या विद्यमाने झालेल्या या मैफलीत सारस्वतांची मांदियाळीच जणू अवतरली होती. कुसुमाग्रज स्मारकाच्या प्रत्येक पायरीगणिक साहित्यविषयक चर्चा झडत होती. रसिकांनी कानांत प्राण आणून साहित्यकांचे मनोगत ऐकले. अशा मंतरलेल्या माहोलमध्ये सुरू झालेला मैफल कार्यक्रम उत्तरोतर रंगत गेला. सुप्रसिद्ध गीतकार गुरू ठाकूर यांच्या हस्ते 'मटा मैफल'चे दिमाखात उद्घाटन करण्यात आले.

'महाराष्ट्र टाइम्स'चे संपादक अशोक पानवलकर, वनाधिपती विनायकदादा पाटील, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यवाह मकरंद हिंगणे, राज्य भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप धोंडगे, तसेच जहागीरदार फूड्सचे संचालक मिलिंद जहागीरदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी गुरू ठाकूर म्हणाले, की भाषेच्या जगण्यासाठी तिच्यामध्ये संवाद घडण्याची गरज असते. संवाद घडला, की भाषा संपत नाही. फेसबुकच्या भिंती भरून वाहताहेत, लोकांना फक्त व्यक्त व्हायचे आहे. त्यांना कुणीतरी ऐकून घेण्याचीही गरज आहे. 'मटा मैफल'सारखे कार्यक्रम झाले पाहिजेत. मैफलमध्ये पुस्तकेही वाचता येतात. कुटुंबे छोटी होत असताना आणि मोबाइलवर चोवीस तास खेळण्याच्या नादात वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे. परंतु, त्यांना सकस वाचायला द्या, ती वाचतील हे नक्की. एखाद्या नदीप्रमाणे भाषेचे प्रवाह होत राहिले पाहिजेत. 'महाराष्ट्र टाइम्स'चे संपादक अशोक पानवलकर यांनी 'मटा मैफल'विषयी भूमिका मांडली. कार्यक्रमाचे चिंतनगर्भ सूत्रसंचालन शब्दमल्हार मासिकाचे संपादक स्वानंद बेदरकर यांनी केले. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या नाशिक आवृत्तीचे निवासी संपादक शैलेन्द्र तनपुरे यांनी आभार मानले.

--

पंचशिलेदारांचा सन्मान

'मटा मैफल' कार्यक्रमात तारुण्यात साहित्याचा वसा घेऊन काम करणाऱ्या पूजा प्रसून, चिन्मय मोघे, कृष्णा पाचोरे, अमोल गुट्टे व शरयू पवार यांचा विशेष सन्मान गुरू ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. आज ज्यांना पुरस्कार मिळाला आहे, त्यांच्याकडे पाहून असे वाटते, की आपण जरा उशिरा सुरुवात केली, असे गौरवोद्गार या पंचशिलेदारांविषयी गुरू ठाकूर यांनी काढले.

--

हे छोटेखानी संमेलनच

मकरंद हिंगणे म्हणाले, की 'महाराष्ट्र टाइम्स' व कुसुमाग्रज स्मारक यांच्या विद्यमाने होणारी 'मटा मैफल' हे छोटेखानी साहित्य संमेलनच आहे. समाजाचे प्रतिबिंब साहित्यात पडते असे म्हणतात, ते खरेही आहे. त्यामुळे खरे तर साहित्याचा विकासच होत जातो.

--

भाषेला लोकाश्रयही गरजेचा

विनायकदादा पाटील म्हणाले, की महाराष्ट्रातला माणूस अधिक उत्सवप्रिय आहे आणि 'मटा'ने त्याच्यासाठी हा साहित्यदेवीचा उत्सव घडवून आणलेला आहे. भाषेचा विकास व्हायचा असेल, तर ती सर्वसामान्यांपर्यंत जाणे महत्त्वाचे असते. मैफलच्या माध्यमातून तेच काम होत आहे. भाषेला राजाश्रय असणे जसे महत्त्वाचे आहे, तसेच लोकाश्रय मिळणेही गरजेचे आहे. किंबहुना लोकाश्रयच अधिक गरजेचा आहे. आपल्या आधीच्या शंभर पिढ्या मराठी बोलत होत्या आणि येथून पुढीलही शंभर पिढ्या मराठीच बोलणार आहेत. त्यामुळे भाषा मरणार आहे वगैरे झूठ आहे. भाषा एकमेकांच्या संवादातून जिवंत राहते. मराठीमध्ये इतर भाषांतून आलेले शब्द स्वीकारले पाहिजेत. कालपरत्वे भाषा बदलत जाते याचा स्वीकारही आपण केला पाहिजे, असेही विनायकदादांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाषासंवर्धनासाठी संवाद महत्त्वाचा

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भाषेच्या संवर्धनासाठी संवाद महत्त्वाचा असतो. जी भाषा जास्त बोलली जाते ती प्रगल्भ होत जाते. जी बोलली जात नाही, ती लयाला जाते. मराठी भाषा ही बोलली जाणारी भाषा असल्यामुळे तिचे स्थान अबाधित असल्याचे प्रतिपादन गीतकार, कवी गुरू ठाकूर यांनी केले. 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे रविवारी आयोजित 'मटा मैफल'मधील मुलाखतीत त्यांनी विविध विषयांवर दिलखुलासपणे विचार मांडले.

कुसुमाग्रज स्मारकात रंगलेल्या 'मटा मैफल'च्या पहिल्या सत्रात गुरू ठाकूर यांची मुलाखत 'शब्दमल्हार'चे स्वानंद बेदरकर यांनी घेतली. व्यंगचित्रकार, कवी, गीतकार, पटकथा लेखक या प्रवासाचा पटच ठाकूर यांनी मुलाखतीदरम्यान उलगडला. ते म्हणाले, की भाषा संपणार असे नेहमी बोलले जाते. मात्र, ते मराठीच्या बाबतीत लागू होत नाही. एक वेळ त्या भाषेतील साहित्यनिर्मिती कमी झाली तरी चालेल. मात्र, संवाद थांबता कामा नये. मराठीत वाचन कमी होत असून, ते वाढणे गरजेचे आहे. मी अत्यंत अबोल होतो. ज्या व्यक्तीला बोलता येत नाही, ती व्यक्ती इतर मार्गाने व्यक्त होते. मी वर्गात बसल्यावर शिक्षकांची चित्रे काढायचो. तेथे माझ्या व्यंगचित्रांची सुरुवात झाली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

...अन् मी गाणं लिहायला लागलो

एका गाण्याचे मी केलेले विडंबन इतरांना खूप आवडले. ते पाहून माझा मित्र केदार शिंदे याने मला एका नाटकासाठी गाणं लिहिण्याची गळ घातली. त्या गाण्याला संगीत अशोक पत्की देणार होते. गाणं लिहून झाल्यानंतर अशोक पत्कींनी मला घरी बोलावले. मी पहिल्यांदाच गाणं लिहिलं असल्याने घाबरत घाबरत त्यांच्या घरी गेलो. ते काही म्हणायच्या आत, मी पहिल्यांदाच गाण लिहितो आहे, हे सांगून मोकळा झालो. ते ऐकून पत्की म्हणाले, गाणं परफेक्ट मीटरमध्ये लिहिलं आहे. तू सगळं सोड आणि गाणं लिही. हे वाक्य माझ्या आयुष्याला कलाटणी देणारं ठरलं. तेव्हापासून मी गाणं लिहायला लागलो. हे गाणं 'तू तू- मैं मैं' या नाटकासाठी होतं. त्यानंतर 'अगं बाई अरेच्चा' या चित्रपटासाठी गाणी लिहिली. नंतर अनेक चित्रपटांसाठी गाणी लिहिण्याची संधी मिळाली, असे ठाकूर यांनी नमूद केले.

--

कवीप्रमाणेच गीतकारालाही वेदना

व्यंगचित्राची निर्मिती कशी होते हे सांगताना ठाकूर म्हणाले, की व्यक्तीचे बारकावे लक्षात घेतले, तर व्यंगचित्र काढणे सोपे जाते. प्रत्येकामध्ये एक लकब असते, ती समजून घेणे महत्त्वाचे असते. मर्म शोधायची सवय लागली की व्यंगचित्र साकारते. गीतकारांना दुय्यम स्थान दिले जाते का? या प्रश्नावर ते म्हणाले, की, कवी हा श्रेष्ठच असतो. गाण्यात कवित्व असतेच. आज गीतकार जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. मात्र, कवी पोहोचत नाही ही खंत आहे. गीतकार व्हायला कवी असावाच लागतो. कवीच्या वेदनेसारखीच गीतकारालादेखील वेदना असते.

--

खेबूडकरांच्या पावतीने ऑस्करची भावना!

इतर भाषांमधील लिखाणाबाबत बोलताना ठाकूर यांनी सांगितले, की भाषेचे प्रवाह या भाषेतून त्या भाषेत गेले, तर विचारांचीही देवाणघेवाण होते. चित्रकला हीदेखील एक भाषा आहे. गीत लिहिताना तिचा उपयोग होतो. 'गोऱ्या गोऱ्या गालावरी' हे गाण लिहिताना माझ्या डोळ्यासमोर चित्र उभे राहिले. त्यानंतर गीताची निर्मिती झाली. त्यामुळे चित्रभाषा ही गीतकाराला पूरकभाषा आहे. 'नटरंग' चित्रपटातील गाणी लिहिताना मूळ गाभ्याला कुठेही धक्का लावायचा नव्हता. त्यामुळे जुन्या लावण्यांचा अभ्यास करून ती गाणी लिहिली. खुद्द जगदीश खेबूडकरांनी या गाण्यांना पावती दिल्याने ऑस्कर मिळाल्याची भावना होती.

--

कवी म्हणजे मुलगी, गाणं म्हणजे सून

कवी आणि गीतकार यापैकी काय चांगले, या प्रश्नावर ते म्हणाले, की कवी असतो तेव्हा मी घरातील लाडकी मुलगी असतो आणि गाणं लिहितो तेव्हा मी सून असतो. गाणं लिहिताना सगळ्या गोष्टींचे भान बाळगावे लागते.

--

कोण बोललं हे महत्त्वाचं

अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल गुरू ठाकूर म्हणाले, की, माणसाने व्यक्त होणं गरजेचे आहे. ते व्यक्त होताना भान बाळगणं गरजेचं आहे. काय बोलले, यापेक्षा कोण बोललं हे जास्त महत्त्वाचं आहे, असेही त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. सलील कुलकर्णींशी आज संवाद

$
0
0

डॉ. सलील कुलकर्णींशी संवाद

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी देशस्थ ऋग्वेदी संस्था, श्री समर्थ सहकारी बँक व डी. के. फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'हार्ट टू हार्ट' संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात सोमवारी प्रसिद्ध गायक डॉ. सलील कुलकर्णी यांच्यासोबत संवाद साधण्याची संधी नाशिककर रसिकांना मिळणार आहे.

महाशिवरात्रीच्या निमित्ताने सोमवारी (४ मार्च) रोजी सायंकाळी ५.३० वाजता डॉ. कुलकर्णी यांच्या संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. तिडके कॉलनी परिसरातील देशस्थ ऋग्वेदी संस्थेच्या ऋग्वेदी सभागृहात हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमात प्रसिद्ध गायक, संगीतकार आणि नुकतेच चित्रपट दिग्दर्शन व लेखन या क्षेत्रात पदार्पण केलेल्या डॉ. सलील कुलकर्णी यांच्याशी 'हार्ट टू हार्ट' संवाद साधता येणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, रसिकांनी कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावाना कार्यक्षम आमदार पुरस्काराचे आज वितरण

$
0
0

सावाना कार्यक्षम आमदार

पुरस्काराचे आज वितरण

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वैभवशाली १७९ वर्षांची परंपरा असलेल्या सार्वजनिक वाचनालय, या संस्थेतर्फे स्व. माधवराव लिमये स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा १७ वा कार्यक्षम आमदार पुरस्कार वितरण सोहळा सोमवार, ४ मार्च रोजी सायं ५. ३० वाजता टिळकपथावरील प. सा. नाट्यगृहात होणार आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना प्रदान करण्यात येणार आहे.

माजी आमदार व पत्रकार कै. माधवराव लिमये यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गेल्या १६ वर्षांपासून हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. ५० हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे, या पुरस्काराचे स्वरुप आहे. कै. लिमये यांच्या कन्या डॉ. शोभाताई नेर्लीकर व जावई डॉ. विनायक नेर्लीकर यांच्या उदार देणगीतून हा पुरस्कार देण्यात येतो. हेमंत टकले, 'महाराष्ट्र टाइम्स'चे नाशिक आवृत्तीचे निवासी संपादक शैलेंद्र तनपुरे, सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, प्रमुख सचिव श्रीकांत बेणी, डॉ. नेर्लीकर दांम्पत्य यांच्या निवड समितीने यंदा धनंजय मुंडे यांची या पुरस्काराकरीता निवड केली आहे. यापूर्वी हा पुरस्कार गेली १६ वर्षे अनुक्रमे आ. बी. टी. देशमुख, आ. गणपतराव देशमुख, आर. आर. पाटील, आ. प्रमोद नवलकर, आ. शोभाताई फडणवीस, आ. जीवा पांडू गावीत, आ. दत्ताजी नलावडे, आ. गिरीश बापट, आ. सा. रे. पाटील, आ. पांडुरंग फुंडकर, आ. जयवंतराव पाटील, आ. देवेंद्र फडणवीस, आ. बाळासाहेब थोरात, आ. बच्चु कडू व डॉ. निलम गोऱ्हे, आ. गिरीश महाजन यांना प्रदान करण्यात आला आहे. या समारंभास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर व कार्यकारी मंडळ सदस्यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवभक्तांसाठी दुग्धशर्करा योग

$
0
0

सोमवारी महाशिवरात्र असल्याने त्र्यंबकनगरी सजली

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर महाशिवरात्र उत्सवासाठी सज्ज झाले आहे. बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक ज्योर्तिलिंग येथे आहे. येथील देवस्थान संस्थान पेशवेकालीन परंपरेने वर्षभरात बारा उत्सव साजरे करीत असतात. महाशिवरात्र हा त्यातील प्रमुख उत्सव आहे. यादिवशी येथे देशविदेशातून भाविक दर्शन पूजाअभिषेक करण्यासाठी येत असतात. यावेळेस महाशिवरात्र सोमवारी आल्यामुळे भाविकांसाठी हा दुग्धशर्करा योग आहे. त्यामुळे त्र्यंबक नगरीत शिवभक्तांची सोमवारी मांदियाळी उसळणार आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिरात या उत्सवाची तयारी सुरू आहे. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर २४ तास खुले राहणार आहे. भगवान त्र्यंबकराजाची पालखी पूर्वसंस्थानीक जोगळेकर यांच्या वाड्यावरून पाचआळीमार्गे कुशावर्त तीर्थावर येत असते. देवस्थान ट्रस्टने दर्शनाचे नियोजन प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून जाहीर केले आहे. धर्मदर्शनासाठी पूर्वदरवाजा दर्शनबारीने भाविकांना मंदिरात सोडण्यात येते. सोमवारी ही दर्शनबारी २४ तास सुरू राहणार आहे. उत्तरदरवाजाने देणगीदर्शन सकाळी ७ वाजेपासून सुरू राहणार आहे. स्थानिक भाविकांना दर्शनासाठी पश्चिम दरवाजाने दर्शनासाठी जाता येणार आहे. सकाळी मंदिर उघडल्यापासून दुपारी १२.३०पर्यंत व सायंकाळी सहा वाजेपासून रात्रीपर्यंत दर्शनासाठी जाता येणार आहे. यादरम्यान व्हिआयपी दर्शन पूर्ण बंद ठेवण्यात आले आहे. दुपारी चार वाजता पालखी उत्सव होणार आहे.

मंदिराला रोषणाई

महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर येथील पुरातन शिवमंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत असते. स्थानिक भाविक अहिल्या गोदावरी संगमाजवळ असलेल्या जुन्या महादेव मंदिरात दर्शनासाठी जातात. शहरातील विविध शिवमंदिरांना विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

शिपाई संपावर

शनिवार दोन मार्चपासून त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे १३८ शिपाई कर्मचारी संपावर आहेत. शिवरात्रानिमित्त शनिवारपासूनच देवदर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली आहे. देवस्थान ट्रस्टने होमगार्ड आणि पोलिसांची कुमक मागविली होती. मात्र पहिल्या दिवशी ही मदत मिळाली नाही. रविवारी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला. जिल्हा पोलिस अधिक्षक आरती सिंह यांनी रविवारी त्र्यंबकेश्वर मंदिरास भेट दिली. येथील सुरक्षाव्यवस्थेची त्यांनी पाहणी केली. मंदिर ते कुशावर्त पायी जाऊन पालखी मार्गाची माहिती घेतली.

देणगी दर्शन, गावकरी गेट बंद

ट्रस्टचे चेअरमन जिल्हा न्यायाधीश बोधनकर तसेच सचिव व नगर पालिका मुख्याधिकारी डॉ. चेतना केरुरे यांनी विश्वस्तांच्या मदतीने नियोजन केले आहे. गर्दीचा ओघ वाढला आहे. देणगी दर्शनासही गावकरी गेटही बंद करण्यात आले आहे. दरम्यान गर्दीचा वाढलेला ओघ आणि अपुरे कर्मचारी यामुळे व्हिआयपी प्रोटोकॉल बंद ठेवण्यात आला आहे. देवस्थान ट्रस्ट शिपाई कर्मचाऱ्यांनी यापूर्वी जानेवारी महिन्यात दोन दिवस सिटू संघटनेने केलेल्या राज्यव्यापी संपात सहभाग घेतला होता. वेतन वाढ आणि सेवानियम आदी मागण्यांसाठी हा संप करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिद्धिविनायक कॉलनीत घरफोडी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अंबड परिसरातील खांडेनगर येथील सिद्धिविनायक कॉलनीतील गजानन कृपा या बंगल्याचा गॅलरीचा दरवाजा तोडून बंगल्यात घुसलेल्या चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा तब्बल दोन लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

या प्रकरणी वाल्मीक शांताराम बोरसे यांनी फिर्याद दिली. २८ फेब्रुवारी ते २ मार्चदरम्यान बोरसे कुटुंबीय बाहेर असल्याची संधी चोरट्यांनी साधली. बंगल्याच्या पुढे असलेल्या गॅलरीचा दरवाजा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील तीन तोळे वजनाची सोन्याची पोत, १३ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, १४ ग्रॅम वजनाचे कानातील टॉप्स, ७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे वेढे, तसेच ६८ हजार रुपयांची रोकड असा मुद्देमाल घेऊन चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी अंबड पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक खडके तपास करीत आहेत.

सहा जणांची एकास मारहाण

रस्त्याच्या मधोमध कार पार्क का केली, असा जाब विचारल्याने सहा जणांनी मिळून एकास बेदम मारहाण केली. ही धक्कादायक घटना २७ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास रामदास स्वामीनगर चौकातील रस्त्यावर घडली. या प्रकरणी उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयितांना बेड्या ठोकल्या.

प्रवीण वसंतराव पवार (वय ४६, रा. रामदास स्वामीनगर, नवरंग हौसिंग सोसायटी, उपनगर) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. घटनेच्या दिवशी फिर्यादी पवार भाजीपाला घेऊन जात असताना रामदास स्वामीनगर चौकातील रस्त्यावर एक कार रस्त्यातच पार्क झालेली दिसली. जाण्यासाठी पुरेशी वाट नसल्याने पवार यांनी तेथे उभ्या असलेल्यांना जाब विचारला. मात्र, याचा राग आल्याने संशयित आरोपी नानू उर्फ अमोल अनिल साळवे (वय २६, रा. राजनाथ सोसायटी, चंपानगरी), अंकुश बाळू साळवे (२७, रा. संघमित्रा सोसायटी, संजय गांधीनगर), चंद्रमणी राजेंद्र जगताप (२७, रामदास स्वामीनगर, आगरटाकळी), शुभम प्रमोद वर्मा (२१, रामदास स्वामीनगर, पडवळ अपार्टमेंट), राजेश माधव जगताप (५०, रामदास स्वामीनगर, आगरटाकळी), भरत रामअवतार मल्ला (३२, बी ३, तुळशी अपार्टमेंट, रामदास स्वामीनगर) यांनी प्रवीण पवार यांना थेट मारहाण सुरू केली. शिवीगाळ करीत 'तुझा गेमच करतो,' अशी दमबाजी करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात पवार यांचा दात तुटला. याच दरम्यान चंद्रमणी राजेंद्र जगताप आणि राजेंद्र जगताप या संशयितांनीही पवार यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. पोलिस उपनिरीक्षक जगदाळे तपास करीत आहेत.

कारमधून लॅपटॉप लंपास

कारची काच फोडून चोरट्यांनी आतील १५ हजार रुपयांचा लॅपटॉप लंपास केला. ही घटना १ मार्च रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास गंगापूर रोडवरील नवश्या गणपती मंदिर परिसरात घडली. या प्रकरणी अमित संजय धारणकर (शिवकल्प सोसायटी, मखमलाबाद रोड) यांनी फिर्याद दिली. धारणकर यांनी पार्क केलेल्या लाल रंगाच्या कारमध्ये (एमएच १५/बी ८९९१) लॅपटॉप होता. चोरट्यांनी कारच्या डाव्या बाजूकडील मागील दरवाजाची काच फोडून आतील लॅपटॉप आणि निळी बॅग असा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार पाटील तपास करीत आहेत.

दोन सीसीटीव्हींची चोरी

सोसायटीच्या पार्किंगममध्ये बसविण्यात आलेले दोन सीसीटीव्ही कॅमेरे चोरून नेल्या प्रकरणी सोसायटीतील तीन जणांविरूद्ध भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी रामचंद्र माधव तेजाळे (वय ६६, रा. वास्तुसंहिता सोसायटी, गणेशनगर काठे गल्ली) यांनी फिर्याद दिली. तेजाळे यांच्या तक्रारीनुसार, २८ मार्च रोजी रात्री आठच्या सुमारास गौरव विजय वराडे, धनंजय बाळू गिते आणि तरुण टेकचंद (तिघे रा. वास्तुसंहिता सोसायटी, गणेशनगर, काठे गल्ली) या तिघांनी १० हजार रुपयांचे कॅमेरे लंपास केले. हा प्रकार सोसायटीतील आपापसांतील वादामुळे झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. हवालदार भोज तपास करीत आहेत.

तरुणाची आत्महत्या

उपनगर परिसरातील पगारे मळा येथील जितेंद्र आनंद कुटे (वय ३२) याने अज्ञात कारणातून गळफास घेऊन आत्महत्या केली. जितेंद्रच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. जितेंद्रने २ मार्च रोजी सकाळी घरातच गळफास लावून घेतला होता. हवालदार पगारे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लवकरच मध्यवर्ती ऑक्सिजन पुरवठा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) लवकरच मध्यवर्ती ऑक्सिजन पुरवठा करणारी यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. या यंत्रणेचे काम युद्धपातळीवर सुरू असून, ८० टक्के काम झाले आहे. या यंत्रणेमुळे दोन बेडजवळ एक पॉइंट देणे शक्य असून, रुग्णांना ऐनवेळी प्राणवायूची गरज भासल्यास उपस्थित डॉक्टरांची अथवा परिचारिकांची धावपळ थांबणार आहे.

जिल्हा रुग्णालयात उत्तर महाराष्ट्रातील मोठ्या रुग्णालयांपैकी एक असून, त्यात ५४१ बेड आहेत. याशिवाय सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान सुरू करण्यात आलेल्या २०० बेडची यात भर पडली आहे. तांत्रिक दृष्टिकोनातून ७४१ बेडपैकी ६५० बेड आजमितीस वापरले जातात. जिल्हा रुग्णालयात सातत्याने जिल्हाभरातील रुग्ण दाखल होतात. बहुतांशवेळी रुग्णालयात अतिगंभीर रुग्ण दाखल होतात. यात अपघातात जखमी, आत्महत्या, गंभीर आजारपण यांचा समावेश असतो. बऱ्याचदा रुग्ण सुरुवातीला इतर ठिकाणी उपचार घेतात. तिथे फरक पडला नाही तर अशा रुग्णांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येते. अशा रुग्णांना थेट व्हेंटिलेटरचीसुद्धा गरज भासते. ऑक्सिजनचा सतत पुरवठा होत राहणे हेदेखील हॉस्पिटल प्रशासनासमोर आव्हान असते. याबाबत बोलताना अतिरिक्त सिव्हिल सर्जन निखिल सैंदाणे यांनी सांगितले, की यापूर्वी ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णाला सिलिंडरच्या मदतीने ऑक्सिजन दिला जात होता. नवीन यंत्रणेने सिलिंडरची गरज भासणार नाही. याऐवजी रुग्णांच्या बेडजवळच एक पॉइंट दिला जाणार आहे. कोणत्याही रुग्णाला गरज भासली, की त्या पॉइंटचा वापर केला जाईल. आजमितीस हे काम ८० टक्के झाले असून, उर्वरित काम महिनाभराच्या कालावधीत पूर्ण होईल, असे डॉ. सैंदाणे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, जिल्हा रुग्णालयाला रोज १५ ते १८ ऑक्सिजन सिलिंडरची गरज भासते. अतिदक्षता विभागाची मागणी वाढली तर ही संख्या २० पर्यंत पोहोचते. संभाव्य मोठे अपघात अथवा गंभीर दुर्घटनेची तयारी म्हणून १० ऑक्सिजन सिलिंडर राखीव ठेवावे लागतात, असे डॉ. सैंदाणे यांनी सांगितले.

डिजीटल एक्स-रे मशिन दाखल होणार

ई हॉस्पिटलचा एक भाग म्हणून जिल्हा रुग्णालयात लवकरच डिजिटल एक्स-रे मशिन दाखल होणार आहे. या मशिनच्या खरेदीला मंजुरी मिळाली असून, मशिनची किंमत आठ लाख रुपये असल्याने त्याचे ई-टेंडर निघणार आहे. तांत्रिक कामांची पूर्तता होऊन येत्या एक ते दीड महिन्यात ही यंत्रणा कार्यान्वित होईल, असा दावा डॉ. सैंदाणे यांनी केला. यामुळे अवघ्या ५० रुपयात रुग्णांना डिजिटल एक्स-रे मिळणार आहे. खासगी ठिकाणी याचे साडेतीनशे ते चारशे रुपये आकारले जातात. दरम्यान, डिजिटल एक्स-रेमुळे ई हॉस्पिटल यंत्रणेचे कामदेखील सोपे होणार आहे. यामुळे रुग्णांचे एक्स-रे ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध होतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंडे संघर्ष करणारे नेते

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'संघर्ष करुन यशस्वी कसे व्हायचे व आत्मविश्वास कसा वाढवायचा याची प्रेरणा नव्या पिढीला गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा देईल, ते संघर्ष करणारे नेते होते,' असे सांगत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मुंडे यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी आमची जन्मतारीख बारा बारा असल्याचे सांगत त्यामुळे आमचे नक्षत्रं जुळले असल्याचेही त्यांनी सांगितले. ज्यांनी मुंडेला जवळून पाहिले त्यांना त्या माणसाला पुतळा पटत नाही, असेही ते म्हणाले.

क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेने आयोजित केलेल्या लोकनेते गोपीनाथ मुंडे अभियांत्रिकी महाविद्यालय इमारतीचा उद्घाटन सोहळा व लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळयाच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी पवार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे स्वातंत्र्यसैनिक वसंतराव नारायण नाईक व गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने शिष्यवृत्ती सुरू व्हावी यासाठी २५ लाखाची देणगी जाहीर केली. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळही उपस्थित होते.

कॅनडा कॉर्नरवरील वसंतराव शैक्षणिक संस्थेत आयोजित केलेल्या या कार्यक्रमात शरद पवार व पंकजा मुंडे या एकत्र आल्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी गप्पा मारत राजकारणातील संघर्षाचे वातावरण हलके केले. यावेळी पवार म्हणाले, 'मुंडे यांनी विरोधी पक्षाची प्रतिष्ठा वाढवण्याचे काम केले. संघर्ष करणाऱ्या माणसाला संस्था चालवता येत नाही. पण, मुंडे यांनी वैद्यराज साखर कारखाना उत्तम चालवला. त्यामुळे सहकारातही त्यांचे नाव घेतले जाते. मुंडे यांनी वंचित वर्गाचे प्रश्न असो, ऊस तोड कामगारांचे प्रश्न असो. त्यासाठी त्यांनी संघर्ष केला. त्याचप्रमाणे ऊर्जा विभागाचे काम करताना त्यांनी भरीव काम केले, असेही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी स्वातंत्रसैनिक वसंतराव नाईक यांच्या कामाचाही आढावा घेतला. 'मंत्रीमंडळात त्यांचा दबदबा' असे सांगून त्यांनी केलेल्या कार्याचा गौरवही केला. 'वंजारी समाज हा दिशा देणारा समाज आहे. त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपली छाप टाकली आहे. हा समाज शेतीही उत्तम करतो आहे.' असेही पवार म्हणाले. 'त्यांनी चांगले शिक्षण घेऊन उद्योजक बनावे, त्यासाठी समाजाने मदतीचा हात द्यावा,' असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात यांनी मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कामाचा गौरव केला. या सोहळ्यात जिल्ह्यातील खासदार, आमदार, माजी आमदार, नगरसेवक व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रास्ताविक संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक यांनी केले. तर संस्थेच्या कार्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष कोंडीजीमामा आव्हाड यांनी दिली.

पिता नाही, तर नेताही!

'गोपीनाथ मुंडे माझे फक्त पिता नाही, तर नेतेही होते. त्यांच्याकडून मी राजकारण शिकले. पण, राजकारणात विरोधी असलेले शरद पवार यांच्याकडून बऱ्याच गोष्टी मला शिकायला मिळाल्या. राजकारणात संयमाने कसे रहावे, व्यक्तीद्वेष कसा टाळायचा हे त्यांच्याकडून शिकली,'अशी कबुली पंकजा मुंडे यांनी यावेळी दिली. राजकारणीत सर्वोच्च मार्गदर्शक कसा असावा तर पवारांसारखा असावा, असेही त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी 'मुंडे यांचे कार्य विद्यार्थ्यांना प्रेरणा देईल, असेही सांगितले. भुजबळांनी पक्षापलीकडे त्यांची मैत्री जपली,' असा उल्लेखही त्यांनी केला.

इंजिनीअरिंग कॉलेज म्हणजे दुकानदारी!

'गरजेपेक्षा जास्त संस्था इंजिनीअरींग महाविद्यालये झाल्यामुळे मुले आणायची कुठुन असा प्रश्न आहे. अनेक संस्थांनी दुकानदारी सुरू केली आहे. त्यामुळे या संस्था अडचणीत आल्या. पण, उत्तम शिक्षण दिले व दर्जा चांगला ठेवला तर या संस्था टिकतात,' असेही पवार यांनी सांगितले. त्यामुळे गोपीनाथ मुंडे अभियांत्रिकी महाविद्यालयही चांगले विद्यार्थी घडवित आहे, असेही पवार म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

pawar-pankaja: पंकजांसमोर पवार कोरा कागद देतात तेव्हा...

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाषणात केलेल्या गोष्टीची कृती कशी करतात याचा मूक अभिनयच 'राष्ट्रवादी'चे नेते शरद पवार यांनी केल्याने उपस्थित पोटधरून हसवले. निधीसाठी पंकजा मुंडे यांच्याकडे पवारांनी पुढे केलेला कागदामुळे पंकजा मुंडेचा उडालेला गोंधळाच्या अनोख्या नाट्यछटा कार्यक्रमात पहायला मिळाली तर पुढच्याच क्षणी पंकजा मुंडे व शरद पवारांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या हास्यामुळे कार्यक्रमात वेगळीच रंगत आली.

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळयाच्या अनावरण कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे भाजपमध्ये असल्या तरी त्यांच्याकडे गेल्यानंतर एक-दीड कोटीच्या निधीच्या कागदावर लगेच सह्या मिळतात, असे आपल्या भाषणात सांगितले. त्यांचे हे भाषण ऐकताच पवारांनी आपल्यालाही निधी मिळेल या आशेने थेट शेजारी बसलेल्या पंकजा मुंडेंकडे रायटिंग पॅड सहीसाठी दिले. पंकजा मुंडे कडे गेलो की लगेच निधी देतात या आव्हाडाच्या भाषणाचा धागा पकडत पवारांनी काही न बोलता कृतीतूनच केलेली निधीच्या मागणीमुळे पंकजा मुंडे गडबडल्या. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रमातही हंशा पिकला. काय घडलयं हे लक्षात आल्यावर पंकजा मुंडे व शरद पवार खळखळून हासले अन् यात उपस्थितांनीही सहभाग घेत टाळ्या वाजविल्या.

आव्हाडांच्या भाषणानंतर पंकजा मुंडे यांनी केलेल्या भाषणात पवारांच्या या गंमतीवर कोटी करत पवारांनी पुढे केलेला कागद कोरा होता, असे सांगितले. त्यामुळे 'पवारांच्या या कृतीचा अर्थ काय काढायचा,' असे सांगत हलकासा चिमटाही काढला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन महिन्यांत स्वाइन फ्लूचा जोर वाढला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जानेवारी ते मार्चच्या सुरुवातीपर्यंत स्वाइन फ्लूचे ५० संशयित रुग्ण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. यातील १० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर तिघांचा मृत्यू झाला. स्वाइन फ्लू आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९० टक्क्यांच्या पुढे असून, नागरिकांनी थोडी काळजी घेतली तर मृत्यूचे प्रमाणसुद्धा शून्यावर येऊ शकते, असा दावा सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाने केला आहे.

शहारासह जिल्हाभरात २०१८ मध्ये पहिले नऊ महिने स्वाइन फ्लूने थैमान घातले होते. शेवटचे तीन महिने स्वाइन फ्लूचा फैलाव शून्यावर आला. याचमुळे डिसेंबर महिन्यात सिव्हिल हॉस्पिटलने स्वाइन फ्लू रुग्णांसाठी सुरू केलेला वार्ड बंद केला. या ठिकाणी कार्यरत मनुष्यबळास इतर ठिकाणी नियुक्ती देण्यात आली. जानेवारी महिन्यात ८ ते ९ तारखेदरम्यान स्वाइन फ्लूने पुन्हा डोके वर काढले. रुग्णांचा राबता वाढल्याने सिव्हिल हॉस्पिटलने पुन्हा हा वार्ड सुरू केला. याबाबत बोलताना अतिरिक्त सिव्हिल सर्जन डॉ. निखिल सैंदाणे यांनी सांगितले, की जानेवारी ते मार्च महिन्याच्या सुरुवातीपर्यंत ५० रुग्णांवर उपचार करण्यात आले. यातील १० रुग्णांचे अहवाल स्वाइन फ्लूसाठी पॉझिटिव्ह आले. यातील तीन रुग्णांचा मृत्यू झाला. उर्वरित बहुतांश रुग्ण पूर्णत: बरे होऊन परतले किंवा त्यातील काहींवर सध्या उपचार सुरू आहेत. स्वाइन फ्लू बरा होतो. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल होणारे ९० टक्के रुग्ण बरे झाले आहेत. बऱ्याच प्रकरणात रुग्णांना अगदीच अटीतटीच्या क्षणी दाखल करण्यात येते. त्या वेळी रुग्ण उपचारांना प्रतिसाद देत नाही, असे डॉ. सैंदाणे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, स्वाइन फ्लू वार्डात उपचार घेणाऱ्या आणखी तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याचे डॉ. सैंदाणे यांनी सांगितले. या रुग्णांची लक्षणे स्वाइन फ्लूसारखी होती. मात्र, त्यांना या आजाराची लागण झालेली नव्हती. तसे अहवाल आल्याचे त्यांनी सांगितले. स्वाइन फ्लू आणि फ्लू यातील लक्षणांमध्ये फारसा बदल नसून, फ्लूची लक्षणे दिसून आल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा. सिव्हिल आणि सर्वच सरकारी हॉस्पिटलमध्ये यासाठी औषधे उपलब्ध असून, नागरिकांनी हा आजार अंगावर काढू नये, असे आवाहन डॉ. सैंदाणे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सेप्टिक टँक’मध्ये दुसरा बळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वडाळारोड येथे सेप्टिक टँकमध्ये गुदमरून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच रविवारी दुपारच्या सुमारास छत्रपती शिवाजी स्टेडियमलगतच्या सेप्टिक टँकमध्ये गुदमरून एका कामगाराचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत अन्य दोन कामगारही गंभीर जखमी झाले आहेत. शहरात सलग दोन घटनांमध्ये दोन जणांचा बळी गेल्याने महापालिकेच्या कारभारावर शंका उपस्थित होत आहे.…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या ताब्यात असलेल्या छत्रपती शिवाजी स्टेडियमचे शौचालय साफ केलेले नसल्याने दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे खेळाडूंच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे व्यवस्थापक भास्कर कुटे यांनी सेप्टिक टँक साफ करण्याबाबत ठेकेदार गणेश सोनवणे व पप्पू बाबूराव सकट यांच्याकडे प्राथमिक चौकशी केली. या कामाबाबत कोणतीही कागदपत्रे तयार झालेली नसताना आणि कामाची ऑर्डर काढलेली नसतानाही ठेकेदार सोनवणे व सकट यांनी रविवारी परस्पर काम सुरू केले. काम सुरू करताना कुणालाही कळविण्यात आले नव्हते.

टँकमध्ये उतरले होते तिघे

येथील कामासाठी ठेकेदारांनी सोमनाथ शंकर चौधरी (वय ४७), बाळू काशीनाथ खानझोडे (४५) आणि अशोक भीम राखपसारे (४०) या तिघांची नियुक्ती केली. तिघेही टँक साफ करण्यासाठी आत उतरले होते. टॅँकचे तोंड निमुळते असल्याने तिघांनाही अस्वस्थ वाटू लागले. त्यातील चौधरी व खानझेडे या दोघांनी बाहेर पडून आसपासच्या लोकांना माहिती सांगितली. त्यानंतर अग्निशामक दलास कळविण्यात आले. अग्निशामक दलाचे श्याम राऊत व त्यांच्या सहकाऱ्यांनी सेप्टिक टँकमधील अशोक राखपसारे या कामगाराला बाहेर काढले. त्यावेळी तो बेशुद्धावस्थेत होता. त्याला ताबडतोब जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. हे तिघेही पंचवटी येथील अवधूतवाडीतील रहिवासी आहेत.

बंधनाअभावी घडताहेत दुर्घटना

या अगोदर वडाळा गाव परिसरात सेप्टिक टँक साफ करताना एका कामगाराचा मृत्यू झाला होता, तर अग्निशामक दलाचा एक कर्मचारीदेखील अत्यवस्थ झाला होता. शहरात अनेक ठेकेदार कोणतीही परवानगी व सुरक्षेची साधने नसताना अशा प्रकारची कामे करीत असून, त्यांच्यावर कुणाचेही बंधन नसल्याने दुर्घटना घडत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. त्याचप्रमाणे महापालिकेच्या कारभारावरदेखील शंका उपस्थित केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रदर्शनात वाळवण पदार्थांना पसंती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ऊन्हाचा कडाका जाणवू लागल्याने वाळवण्याचे पदार्थ तयार करण्यासाठी महिलावर्गाची लगबग सुरू असताना, नाशिककरांनी गोदाई प्रदर्शनातील तयार पदार्थांच्या खरेदीला पसंती दिली आहे. मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्रातील वाळवणाच्या तयार पदार्थांची खरेदी करण्यासाठी महिलावर्गाने रविवारी गर्दी केली होती.

ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानांतर्गत विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हा ग्रामीण यंत्रणेतर्फे महिला बचतगटांसाठी गोदाई या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या पाच दिवसीय प्रदर्शनाचा सोमवारी (४ फेब्रुवारी) अखेरचा दिवस असून, प्रदर्शनात नागली पापड, उडीद पापड, खान्देशातील बिबडे, लोणची, कुरडई या पदार्थांना अधिक मागणी होत आहे. ऊन्हाळ्यात घरी वाळवण करण्यापेक्षा तयार पदार्थांना नेहमीच मागणी असते. पण, यंदा प्रदर्शनाचा मुहूर्त साधत बाजारातून वाळवणाचे पदार्थ खरेदी करण्यास ग्राहकांनी पसंती दिल्याचे दिसते. त्यामुळे महिला बचत गटांना आर्थिक आधार प्राप्त झाला असून, चार दिवसात ठप्प असलेली आर्थिक उलाढाल रविवारी वाधारलेली दिसून आली. सोमवारी देखील असाच प्रतिसाद राहील, अशी अपेक्षा विक्रेत्या महिल्यांनी व्यक्त केली असून, गावाकडच्या पापडांची चव चाखण्यासाठी या पदार्थांना पसंती देत असल्याचे ग्राहक सांगतात.

या प्रदर्शनात नाशिकसह जळगाव, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जालना, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमधील ग्रामीण भागातील महिला बचतगट सहभागी झाले आहेत. त्यामुळे प्रदर्शनात अस्सल गावरान तडका असलेले विविध मसाले देखील विक्री होत असून, पापडांच्या जोडीला मसाल्यांचीही खरेदी तेजीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एनसीए’ने जिंकला एव्हरशाईन चषक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एव्हरशाईन स्पोर्टस् अ‍ॅकॅडमीतर्फे आयोजित 'एव्हरशाईन प्रोफेशनल कप २०१९' स्पर्धेत रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात टीम एनसीएने टीम सीसीएनचा ३५ धावांनी दणदणीत पराभव करीत विजेतेपद पटकावले.

संदीप फाउंडेशनच्या क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या अंतिम सामन्यात स्पर्धेतील एका इनिंगची सर्वाधिक धावसंख्या नोंदवताना कर्णधार नितीन धात्रक (३४), नीलेंद्र राजपूत आणि श्रीरंग कापसे यांच्या खेळींच्या जोरावर टीम एनसीएने १५ षटकांत १७८ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात मुझफ्फर सय्यद (३६) आणि फयाझ (३९) यांनी केवळ ३.३ षटकांत ५० धावांची सलामीची खेळी करीत आपले इरादे स्पष्ट केले होते. मात्र त्यानंतर एकापाठोपाठ फलंदाज बाद होत गेल्याने टीम सीसीएनला १४३ धावांवर रोखण्यात टीम एनसीएला यश आहे. श्रीरंग कापसे सामनावीर ठरले.

तत्पूर्वी सेमी फायनल मध्ये टीम सीसीएनने एव्हरशाईन डॉक्टर्सचा पराभव केला. तर टीम एनसीएने एनडीसीए सिनिअरचा मोठा पराभव करत दिमाखात अंतिम फेरी गाठली. सिझन चेंडूवर खेळवल्या गेलेल्या या स्पर्धेत एकूण २५९ चौकार तर ४३ षटकार ठोकले. या स्पर्धेत एनडीसीए सिनिअर, सीसीएन, सनराईज, एनसीए, टीम गर्जना, नाशिक जिमखाना, एव्हरशाईन डॉक्टर्स या ८ संघांत ३५ वर्षे वयापुढील १२० खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते.

एव्हरशाईन प्रोफेशनल कप' मध्ये ३५ वर्षांवरील डॉक्टर्स, सी. ए., आयआरएस ऑफीसर्स, वकील, आर्किटेक्ट, उद्योजक, एनडीसीए, सीसीएन या क्षेत्रात काम करणारे व खेळाची आवड असणाऱ्यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विमानसेवा वेळापत्रक

$
0
0

विमानसेवा वेळापत्रक

--

विमानसेवा वेळापत्रक

सोमवार

नाशिक - अहमदाबाद

सकाळी ८.५५ - सकाळी १०.१०

अहमदाबाद - नाशिक

सकाळी १०.४० - सकाळी ११.५५

नाशिक - हैदराबाद

दुपारी १.००… - दुपारी २.५०

हैदराबाद… - नाशिक

सकाळी ६.४५… - सकाळी ८.३०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

(शुभवार्ता)

$
0
0

(शुभवार्ता)

असंघटित कामगारांसाठी निवृत्तीवेतन योजना

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत असंघटित कामगारांसाठी निवृत्तीवेतन योजना कार्यान्वीत करण्यात आली आहे. आपले सरकार या पोर्टलवर ज्येष्ठ नागरिकांनी आपली माहिती भरून द्यावी, असे आवाहन माहिती कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

या योजनेचा लाभ जिल्हा परिषदेतील असंघटित कामगार, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, ग्राम रोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी आशा वर्कर, मध्यान्ह भोजन कर्मचारी, सीआरपी, आपले सरकार सेवा केंद्र व सीएससीचे केंद्र चालक तसेच महसूल विभागातील कोतवाल, पोलिस पाटील तसेच जिल्ह्यातील इतर असंघटित कामगारांच्या बचत गटांचे सदस्य, बांधकाम क्षेत्रातील कामगार व मनरेगा मजूर इत्यादींना मिळणार असून, त्यांची नोंदणी करण्यासाठी तालुकास्तरीय मेळावे आयोजित करण्यात आले आहे.

६० वर्षे वयानंतर ३ हजार रुपये प्रती महिना किमान पेन्शन मिळणार आहे. कौटुंबिक पेन्शन-वर्गणीदार मयत झाल्यास, कोणत्याही वेळी पैसे काढण्याची सुविधा मिळणार आहे. या योजनेसाठी ५५ रुपये (१८ वर्षे) ते २०० रुपये (४० वर्षे) दरमहा वयानुसार खात्यातून ऑटो डेबिट होणार आहेत. या उपक्रमात नोंदणी करण्यासाठी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्राशी संपर्क साधावा. यासाठी आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स, मोबाइल नंबर. असंघटित क्षेत्रामध्ये १८ ते ४० वर्षे काम केलेले असावे. दरमहा रुपये १५ हजार पेक्षा कमी उत्पन्न असावे, तसेच आयकरदार नाही याचे प्रतिज्ञापत्र या योजनेसाठी द्यावे लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेपत्ता जवानासाठी पत्नीची वणवण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पुलवामा येथील भ्याडहल्ल्यानंतर जवानांबाबत सर्वत्र चर्चा होत आहे, त्यांच्याविषयी आदर व्यक्त केला जात आहे. मात्र, सैन्यातील एक जवान बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या शोधासाठी कुठलेच प्रयत्न होत नसल्याची बाब समोर आली आहे. संरक्षण राज्यमंत्र्यांपासून पोलिस आयुक्तांच्या भेटीपर्यंत अनेक कार्यालयांचे उंबरठे झिजविल्यानंतरही ‘त्या’ जवानाच्या पत्नीला दिलासा मिळालेला नाही.

भारतीय सैन्यदलात अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे कार्यरत असलेले रविंद्र प्रभाकर कुवर हे १७ डिसेंबर २०१८ मध्ये खडकी (पुणे) येथे प्रशिक्षणासाठी आले. मात्र, त्याचवेळी त्यांची बॅग हरवली. याच बॅगेत त्यांचे ओळखपत्र आणि अन्य साहित्य होते. त्यांनी घरी फोन करुन पत्नीला तशी माहिती दिली. त्यानुसार शोधाशोध केली, पण बॅग काही मिळाली नाही. अखेर पुणे आणि नाशिक शहरातील विविध पोलिस स्टेशनमध्ये त्याची तक्रार दिली. तरीही ओळखपत्र व बॅग हाती लागली नाही. या प्रकरणाचा मोठा ताण कुवर यांना होता.

प्रशिक्षण कार्यालयाने स्पष्ट केले की, ‘ओळखपत्राशिवाय तुम्हाला प्रवेश मिळणार नाही आणि ते हरवले आहे तर तुम्हाला तवांग येथे जावून योग्य ती कार्यवाही करावी लागेल. मात्र, तेथे गेलो तर चौकशी लागेल, या भीतीने ते अधिक चिंतातूर झाले आणि त्यानंतर ते बेपत्ता झाले. आपले पती प्रशिक्षण कार्यालय, तवांग किंवा घरी नसल्याने भारती कुवर या चिंतीत झाल्या. त्यांनी सर्व नातेवाईकांकडे चौकशी केली. काही दिवस वाट पाहिली. अखेर पुणे, नाशिक, धुळे आणि अन्य ठिकाणी पोलिस स्टेशनमध्ये रविंद्र कुवर यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार दिली. ‘आठ वर्षाची मुलगी आणि मी असे दोघेही आम्ही त्यांची आतूरतेने त्यांची वाट पाहत आहोत,’ असे भारती कुवर सांगतात.
यासंदर्भात संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची भेट घेतली. त्यांनी पुण्याच्या पोलिस आयुक्तांशी फोनवर बोलणी केली. त्यानंतर पुण्याच्या आयुक्तांसह जिल्हाधिकारी, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय आणि विविध अधिकारी, कर्मचारी आणि विविध सरकारी कार्यालयांमध्ये गेले. पण, अजूनही माझे पती सापडत नाहीत. किंबहुना त्यांच्या शोधासाठी काहीच हालचाली होत नसल्याची खंत भारती यांनी व्यक्त केली आहे. देशभरात जवानांप्रती आदर आणि प्रेम व्यक्त केले जात असताना माझ्या पतीचा शोध का घेतला जात नाही, असा प्रश्नही भारती विचारत आहेत. विविध ठिकाणी तक्रार आणि अर्ज सादर केले असले तरी काहीच फायदा होताना दिसत नाही, असेही त्या म्हणाल्या.

गेल्या तीन महिन्यांपासून मी पतीच्या शोधार्थ फिरत आहे. मुलीचे शिक्षणही सुरू आहे. शिवाय घरासाठी कर्जही घेतले आहे. हे कर्ज कसे फेडायचे? संरक्षण राज्यमंत्र्यांना भेटूनही उपयोग झालेला नाही. आता मी काय करावे?
- भारती कुवर, सैनिक पत्नी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ जखमी तरुणाचाही मृत्यू

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भरधाव दुचाकींच्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताची घटना आग्रा रोडवरील बळी मंदिराजवळ १६ फेब्रुवारी रोजी झाली होती. भरधाव दुचाकीने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक तरुण ठार झाला होता, तर दोघे जण गंभीर जखमी झाले होते.

गौरव बाळासाहेब मानकर (रा. २५, रा. ताहाराबाद, ता. बागलाण) असे उपचारादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. संशयित दिनेश अशोक गवळी हा त्याच्या दुचाकीवरून (एमएच ०१ एझेड ९९६४) गौरव मानकर याच्यासोबत शनिवारी (दि. १६) सकाळी १० वाजता आग्रा रोडवरील बळी मंदिर ते धात्रक फाटा सर्व्हिस रोडवरून जात असताना अपघात झाला. भरधाव वेगातील दिनेशने समोरून येणाऱ्या नितीन निकम याच्या दुचाकीला (एमएच १५ एटी ६९६३) जोरदार धडकली. या अपघातात नितीनच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. तर एकाच दुचाकीवरील दिनेश व गौरव हे जखमी झाले होते. त्या दोघांवर उपचार सुरू असताना गौरवचा रविवारी (दि. ३) दुपारी मृत्यू झाला. या अपघाताप्रकरणी रवी दत्तात्रय निकम (रा. बेलतगव्हाण, लॅम रोड, देवळाली कॅम्प) यांनी फिर्याद दिली आहे. घटनेचा अधिक तपास आडगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बिडगर व पोलिस हवालदार गायकवाड करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत धार्मिक स्थळांना महिनाभराचा अवधी

$
0
0

विश्वस्तांना पुरावे सादर करावे लागणार; ६४७ धार्मिक स्थळांवर मागविल्या हरकती व सूचना

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील धार्मिक स्थळ निष्कासन समितीच्या मान्यतेनंतर धार्मिक स्थळांबाबत फेरसुनावणी घेण्यासाठी हरकती आणि सूचनांची प्रक्रिया सुरू झाली आहे. महापालिकेने २००९ नंतरची ७१ आणि पूर्वीची ५७६ धार्मिक स्थळांची यादी प्रसिद्ध केली असून, त्यावर हरकती आणि सूचना सादर करण्याचे आवाहन केले आहे. विश्वस्तांना ही धार्मिक स्थळे २००९ पूर्वीचे असल्याचे सिद्ध करावे लागणार असून, तसे पुरावे सादर न केल्यास एकतर स्थलांतरीत करावे लागतील अथवा त्यांच्यावर हातोडा फिरवला जाईल. त्यामुळे एक महिन्याच्या आत विश्वस्तांना ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

सन २००९ पूर्वीची व नंतरची अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या धार्मिक स्थळांच्या निष्कासनासाठी राज्य शासनाने निर्धारित केलेली प्रक्रिया अंमलात न आणता महापालिकेने सरसकट कारवाई सुरू केल्याने विनोद थोरात यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. १ नोव्हेंबर २०१८ रोजी या याचिकेवर झालेल्या सुनावणीअंती न्यायालयाने महापालिकेला अनधिकृत बांधकामांच्या निष्कासनासाठी ५ मे २०११ रोजीच्या शासननिर्णयानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार महापालिका प्रशासनाने कारवाईची फेरप्रक्रिया सुरू केली आहे.

विभागीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून धार्मिक स्थळांची फेरपडताळणी करण्यात आली आहे. महापालिकेच्या सहाही विभागांमधील फेरपडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, यासंदर्भातील अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला आहे. आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली धार्मिक स्थळ निष्कासन समितीच्या बैठकीत हा अहवाल सादर करण्यात आला असून, या समितीच्या मान्यतेने सोमवारी अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यावर हरकती व सूचना सादर करण्यासाठी एक महिन्याचा अवधी विश्वस्तांना देण्यात आला आहे. हरकती व सूचना प्राप्त झाल्यानंतर त्यावर सुनावणीची प्रक्रिया पूर्ण करून अंतिमत: अनधिकृत आढळणाऱ्या धार्मिक स्थळांवर एप्रिलअखेर हातोडा मारला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

...

...तर ६४७ धार्मिक स्थळांवर हातोडा?

धार्मिक स्थळ निष्कासन समितीने 'ब' वर्गाच्या यादीत सन २००९ पूर्वीची ५७६, तर सन २००९ नंतरची ७१ अशी तब्बल ६४७ धार्मिक स्थळे टाकली आहेत. या सर्व ६४७ अनधिकृत धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांना ही धार्मिक स्थळे 'अ' वर्गाच्या यादीत समाविष्ट करावयाची असल्यास त्याबाबतचे पुरावे सादर करावे लागणार आहेत. पुरावे सादर करण्यात अपयश आल्यास संबंधित धार्मिक स्थळे खासगी जागेत स्थलांतरीत करण्याची संधी दिली जाईल. दिलेल्या मुदतीत ही धार्मिक स्थळे स्थलांतरीत केली नाही, तर त्यांच्यावर हातोडा फिरवला जाईल. राज्य शासनाकडे ओपन स्पेसवर १५ टक्के बांधकाम अनुज्ञेय असल्याचा महासभेचा ठराव वेळेत संमत झाला, तर यातील काही धार्मिक स्थळे वाचण्याची शक्यता आहे.

....

धार्मिक स्थळांचे वर्गीकरण-

वर्ग स्थळे कारवाई

अ वर्ग - २४२ - नियमित होणार

ब वर्ग - ५७६ - निष्कासित होणार

२००९ नंतरची - ७१ - निष्कासित होणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images