Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कडाक्याच्या थंडीत रंगले ‘योगाथॉन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

डी. एम. पगार हेल्थ अँड एज्युकेशन सोसायटीच्या (एसडीएमपी) वतीने १०८ सूर्यनमस्कार घालण्याची मेगा मॅरेथॉन अर्थात योगाथॉन १९ हा सोहळा सुयोजित व्हिरिडियन व्हॅलीच्या मैदानावर रविवारी सकाळी पार पडला.

रथसप्तमीच्या निमित्ताने सूर्याची उपासना करण्याची ही प्राचीन पद्धत असून, रविवारी नाशिकमधील ७०० स्त्रियांनी एकत्र येऊन, एका तालावर सलग १०८ सूर्यनमस्कार घातले. अत्यंत कडाक्याच्या थंडीतही महिलांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता. कार्यक्रमाची सुरुवात शंखनादाने करण्यात आली. सुरुवातीला पूरक व्यायाम, त्यानंतर सलग १२ सूर्यनमस्कारांची ९ आवर्तने करण्यात आली. त्यातील ६३० महिलांनी १०८ सूर्यनमस्कार पूर्ण केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुधीर तांबे, नगरसेविका डॉ. हेमलता पाटील, सहाय्यक पोलिस उपायुक्त माधुरी कांगणे, रोहिणी नाईक, डॉ. मनोज चोपडा उपस्थित होते. कार्यक्रमाच्या ब्रँड अॅम्बॅसेडर डॉ. नमिता कोहोक यांनीदेखील १०८ सूर्यनमस्कार घातले. यावेळी स्वानंदी वालझाडे या विद्यार्थिनीने रिदमिक योगाचे प्रात्यक्षिक दाखविले. स्वयं पाटील या दिव्यांग विद्यार्थ्याचा त्याच्या स्विमिंगमधील विशेष योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला.आयोजिका डॉ. स्वाती पगार यांनी योगाथॉन व सूर्यनमस्कारामागील शास्त्रीय व वैद्यकीय माहिती दिली. डॉ. प्रणिता गुजराथी यांनी आभार मानले.

सूर्यनमस्कारांतून पळवा हृदयरोग- डॉ. तांबे

भल्या पहाटेची वेळ असूनही नाशिककरांचा उदंड प्रतिसाद हा आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देतो, असे सांगत आमदार डॉ. तांबे म्हणाले की, योग आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनीही सूर्यनमस्कारांतून हृदयाशी संबंधित सर्व आजार दूर राहत असल्याचे दाखले दिले आहेत. त्यामुळे हा उपक्रम म्हणजे थेट हृदयाशी नाते सांगणारा असल्याचे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सजीव देखाव्यातून रामायणाची झलक

$
0
0

दिमाखदार मिरवणुकीने 'वसंत पंचमी' उत्साहात साजरी

म. टा. वृत्तसेवा, येवला

भगवान श्री प्रभूरामचंद्र, सीतामाई, लक्ष्मण, रामभक्त हनुमान, ऋषी वशिष्ठ व बिभिषण अशा सजीव देखाव्यांनी येवला शहरात 'वसंत पंचमी' उत्साहात साजरी करण्यात आली.

रामायणाची झलक, भारत मातेसह झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या वेशभूषेत अश्वारूढ झालेल्या तरुणी, फुलांनी आकर्षकरित्या सजविलेली श्री चौंडेश्वरी मातेची पालखी अन् महाराष्ट्रीयन संस्कृतीचे प्रतिक असलेल्या मराठमोळया नऊवारी साडीतील युवतींनी चौकाचौकात ढोल-ताशांच्या गजरात ठरलेला फेर, अशा मोठ्या उत्साहामय वातावरणात 'वसंत पंचमी' साजरी झाली.

येवला शहरातील देवांग कोष्टी समाजबांधवांच्या वतीने समाजाचे आराध्य दैवत श्री चौंडेश्वरी मातेचा दरवर्षी साजरा केला जाणारा उत्सव सोहळा अन् त्यानिमित्ताने साजरी होणारी वसंत पंचमी म्हणजे शहरवासीयांसाठी एक मोठे आकर्षण. यंदाही समाजबांधवांच्या वतीने रविवारी (दि.१०) शहरातून काढण्यात आलेली शानदार मिरवणूक सर्वांचे लक्ष वेधून गेली. श्री चौंडेश्वरी मातेचा वसंत पंचमी महोत्सव भक्तीमय वातावरणात आणि अतिशय उत्साहात व आनंदात झाला. श्री चौंडेश्वरी मातेची ह.भ.प.डॉ. राजेंद्र वीर, प्रणव होगाडे व अतुल घटे या मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक विधीवत पूजा करण्यात आल्यावर शहरातील मधली गल्लीतून चौंडेश्वरी मातेच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. ढोलताशांच्या गजरात ही पालखी मिरवणूक शहरातील मुख्य मार्गावरून निघाली. रस्त्यावर ठिकठिकाणी रांगोळी काढण्यात आली होती. विविध समाजबांधवांकडून या पालखीचे पूजन करण्यात आले.

गणेश खळेकर (राम) व त्यांची पत्नी दिपाली खळेकर (सीता), मनोज काळंगे (लक्ष्मण), सागर बोरकर (हनुमान), प्रमोद आवणकर (बिभीषण), सचिन ढोपरे (वशिष्ठ ऋषी) अशा वेशभूषा केल्या गेल्या होत्या. भारत माता व झाशीची राणीच्या वेशात अश्वारूढ झालेल्या युवती हे देखील या मिरवणुकीचे आकर्षण ठरले. मिरवणूक पुन्हा चौंडेश्वरी माता मंदिरात येताना येथे विसर्जित झाली.

पुरस्कारांचे वितरण

मंदिरात आयोजित कार्यक्रमात समाजासाठी योगदान देणाऱ्या समाजातील अनेक मान्यवरांना 'समाजरत्न पुरस्कार' देण्यात आले. कार्यक्रमाच्या निमित्ताने विजय लोळे,प्रकाश टेके,राजेंद्र ढवळे,गुलाबराव टाकले,देविदास कांबळे,दतात्रय कांबळे,पंडित इदाते, विष्णु कुटे,सुनील भागवत या राज्यातील मान्यवरांसह विविध शहरातून पाहुण्यांनी उपस्थिती लावली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राणप्रतिष्ठा सोहळा आजपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शंकराचार्य न्यासाच्या व्यंकटेश बालाजी मंदिराजवळ साकारण्यात आलेल्या पद्मावती मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आज, सोमवारपासून सुरुवात होत आहे. हा कार्यक्रम १५ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. मुंबई येथील संन्यास आश्रमाचे महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद गिरी व पुणे येथील श्रृतिसागर आश्रमाच्या स्वामिनी स्थितप्रज्ञानंद सरस्वती या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

सोहळ्याचे यजमानपद अनिता व मारुती पी. प्रभू भुषविणार आहेत. आज, दि. ११ रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत मंगलाचरण, शांतीसुक्त, प्रायश्चित्त विधी संकल्प, ब्रह्मस्तंभ पूजन, दशस्नान विधी, महाविष्णू पूजन, प्रायश्चित्त पूर्वांग व उत्तरांग हवन, ब्रह्मसभा विसर्जन विधी होणार आहेत. दुपारी ११ ते १.३० या वेळेत वरील विधींबरोबरच प्रधान संकल्प, महागणपती पूजन, स्वस्तिवाचन, मातृकापूजन, नांदी श्राद्ध, आचार्यवरणम्, ऋत्विगवरणम, मधपर्क होणार आहेत. दुपारी ३ ते ६ या कालावधीत दशदान विधी, सवत्स धेनू पूजन, स्थल शुद्यर्थ उदकशांती, आरती, मंत्रपुष्प होणार आहे. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत पीठस्थ देवतांचे पूजन, मुख्य मूर्ती व उत्सवमूर्तीची कलशासह ग्राम प्रदक्षिणा, पूजन होणार आहे. ११ ते १.३० या कालावधीत आचार्यकर्म देवता व कलश जलधिवास, प्रासाद वास्तू स्थापना व पूजन, योगिनीपूजन, मुख्य देवता स्थापना व पूजन होणार आहे. दुपारी ३ ते ६ या वेळेत क्षेत्रपाल पूजन, भैरव पूजन, अग्निनिर्माण कार्य, अग्निसंस्कार, नवग्रहमंडल व रुद्रमंडल स्थापना होणार आहे. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता पुजेला सुरुवात होणार असून, नित्य पूजेबरोबरच सकाळी ११ ते १ यावेळेत देवतांचे व कलशांचे ८१ औषधांनी स्नान होणार आहे. त्यानंतर दुपारी ३ ते ६ या वेळेत कलशाचा धान्याधिवास होणार आहे. १४ आणि १५ फेब्रुवारी रोजीही विविध धार्मिक विधी होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक कोंडी पाचवीला पूजलेली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

औरंगाबादरोड आणि मुंबई-आग्रा महामार्ग अशा दोन्ही प्रमुख रस्त्यांच्या लगत असलेल्या लॉन्स आणि मंगल कार्यालयांमुळे वाहतूक कोंडी या परिसराच्या पाचवीलाच पूजलेली आहे.

औरंगाबाद नाक्यापासून ते मानूर-आडगाव शिवारापर्यंत रस्त्यालगत लॉन्स-मंगल कार्यालये आहेत. दाट लग्नतिथीच्या काळात येथे वऱ्हाडींची प्रचंड गर्दी होते. या गर्दीचा ताण वाहतुकीवर येतो. लग्नासाठी येणाऱ्या वऱ्हाडींकडे चारचाकी वाहनांची संख्या जास्त असते. अनेकदा पार्किंगची जागाही कमी पडते. वाहनधारकांना लग्न समारंभातून लवकर निघण्याची घाई असल्यामुळे ते वाहने सोयीनुसार लवकर काढता येतील या दृष्टीने रस्त्यावरच पार्क करतात. इतरही वाहने त्याचप्रमाणे पार्क केली जात असल्यामुळे वाहनांची ही गर्दी वाढत जाते. ही गर्दी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना त्रासदायक ठरते.

महापालिकेने लॉन्सधारकांना नियमानुसार पार्किंगसाठी पुरेशी जागा उपलब्ध करून देण्याची अट घातली आहे. त्यानुसार अनेक लॉन्सधारकांनी पार्किंगसाठी तशी जागा उपलब्ध करून दिली आहे. असे असले तरीही वाहने शिस्तबद्धपणे पार्क करण्यात येत नाहीत. त्यासाठी लॉन्सधारकांनी वाहनधारकांना सक्ती करण्याची गरज आहे. त्यासाठी निदान दाट लग्नतिथीला तरी खास सुरक्षारक्षकांची नेमणूक करायला हवी. मात्र, असे होत नसल्यामुळे वाहतूक कोंडीच्या समस्येला प्रवाशांना तोंड द्यावे लागते.

लॉन्सची संखा वाढतीच

औरंगाबाद रोडला नवीन आडगाव नाक्यापासून ते मानूर शिवारापर्यंतच्या महापालिकेच्या हद्दीत रस्त्यालगत १८ लॉन्स आहेत. आणखी काही नवीन लॉन्स तयार होत आहेत. या रस्त्याला जोडणाऱ्या रिंगरोडलगत ९ लॉन्स आहेत. मंबई-आग्रा महामार्गालगत औरंगाबाद नाका ते आडगाव शिवारापर्यंत महापालिकेच्या हद्दीत ४ लॉन्स आहेत. दाट लग्नतिथीच्या वेळी या सर्व लॉन्सवर हजारोंच्या संख्येने वाहने येत असतात. एकाच वेळी अनेक ठिकाणी लग्न सोहळ्यास हजेरी लावण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. त्यामुळे औरंगाबाद रोड आणि मुंबई-आग्रा महामार्ग या दोन्ही रस्त्यांना ट्रॅफिक जॅम होते. (क्रमश:)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्मेनियाला हवीत सुखोई विमाने

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

काळ्या समुद्रालगत असलेल्या अर्मेनियाने सुखोई ३० या लढाऊ विमानाच्या खरेदीची मागणी नोंदवली आहे. अर्मेनियाने चार सुखोई विमाने हवी असल्याने रशियन सरकारसोबत भारत सरकारने पत्रव्यवहार सुरू केला आहे. हा करार पूर्ण झाल्यास ओझर येथील हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडला काम मिळेल, तसेच आगामी काळात अनेक राष्ट्रांना सुखोई विमानाची विक्री करण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकेल.

रशियन बनावटीचे सुखोई ३० हे अत्याधुनिक लढाऊ विमान आहे. संरक्षणाच्यादृष्टीने या विमानाचे महत्त्व मोठे आहे. विविध आव्हाने पेलत वेगवेगळ्या हवामान आणि स्थितीमध्ये हे विमान कार्य करू शकते. भारत सरकारने रशियन सरकारशी करार करुन ओझर येथील एचएएलमध्ये या विमानाची निर्मिती केली आहे. मूळ तंत्रज्ञान हे रशियाचे आहे. अर्मेनियाने चार सुखोई विमानांची मागणी नोंदवली आहे. यासंदर्भात विविध पातळ्यांवर अर्मेनियन सरकार आणि भारत सरकार यांच्या प्रतिनिधींची बोलणी झाली आहे. म्हणूनच भारत सरकारने याप्रकरणी रशियन सरकारशी पत्रव्यवहार सुरू केला आहे. रशियाकडून यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. त्याअनुषंगाने भारत सरकारनेही विश्वासात्मक पावले या कराराबाबत टाकली आहेत. हा करार यशस्वी झाला तर ओझर एचएएलला चार सुखोई विमानांच्या निर्मितीचे कंत्राट मिळणार आहे. तसेच, यानिमित्ताने सुखोई विमानांची निर्मितीही सुरू होणार आहे. तसे झाले तर येत्या काळात अन्य देशांनाही भाराताला सुखोई विमान विक्री करता येणार आहे. परिणामी, ओझर एचएएलला कामे मिळणार आहेत. याचा नाशिकच्या विकासालाही फायदा होणार आहे.

एचएएलला हवेत भाषांतरकार

ओझर एचएएलला रशियन भाषांतरकारांची नितांत गरज आहे. त्यासाठी एचएएलकडून भाषांतरकाराचा शोध सुरू आहे. यामुळे विविध प्रकारची रशियन माहिती इंग्रजी किंवा भारतीय भाषेत समजून घेणे सोपे होणार आहे.

असा आहे अर्मेनिया

आर्मेनिया हा काळा समुद्र व कॅस्पियन समुद्र यांमधील युरेशियाच्या दक्षिण कॉकेशस भागातील एक डोंगराळ देश आहे. या देशाच्या पश्चिमेस तुर्कस्तान, उत्तरेस जॉर्जिया, पूर्वेस अझरबैजान, तर दक्षिणेस इराण व अझरबैजानाचा नाख्चिवान प्रांत आहे. पूर्व युरोप व पश्चिम आशिया यांच्या उंबरठ्यावरील या देशाचे ऐतिहासिक काळापासून युरोपाशी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक लागेबांधे आहेत. या देशाची लोकसंख्या ३० लाख असून, या देशाला १९९१ मध्ये रशियापासून स्वातंत्र्य मिळाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थंडीचा मुक्काम वाढला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमध्ये थंडीचा मुक्काम कायम असून, रविवारी पुन्हा राज्यातील नीचांकी तापमान नाशिक जिल्ह्यातच नोंदविले गेले. शनिवारपेक्षा थंडीचा कडाका काहिसा कमी झाला असला, तरी किमान तापमान ५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. निफाड तालुक्यात मात्र थंडीचा कहर सुरूच असून ३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उद्यापर्यंत गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

कूल सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमधील वातावरणही गेल्या काही दिवसांपासून अधिकच कूल झाले आहे. उत्तरेकडील राज्यांत पाऊस आणि बर्फवृष्टी सुरू असल्याने त्याचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावरही होत आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या दिवसापासून वातावरणात सातत्याने बदल होत असून, त्यामुळे जाणवणाऱ्या परिणामांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्यात शीतलहर पसरली आहे. राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद नाशिकमध्ये होत आहे. रविवारी नाशिकमध्ये किमान तापमान ५, तर कमाल २८.८ अंश सेल्सिअस एवढे नोंदविले गेले. निफाडमध्येही ३ अंश सेल्सियस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली. गारठ्यामुळे शनिवारी दोन बेघर ज्येष्ठ नागरिकांनी जीव गमावला असला तरी रविवारी सुदैवाने अशा अनुचित घटनेची नोंद झाली नसल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

आगामी सप्ताहातील अपेक्षित तापमान

दिनांक किमान कमाल

११ फेब्रुवारी ८.० २७.०

१२ फेब्रुवारी १०.० २८.०

१३ फेब्रुवारी १०.० २८.०

१४ फेब्रुवारी ११.० २८.०

१५ फेब्रुवारी ९.० २७.०

१६ फेब्रुवारी ९.० २७.०

पुढील आठवडाभरात वातावरणात बदल होईल. शीतलहर हळू-हळू कमी होऊन तापमान वाढू लागेल. राज्यभरातच ही स्थिती असेल. त्यामुळे नाशिककरांसह राज्यातील रहिवाशांना थंडीपासून दिलासा मिळेल.

- कृष्णानंद होसाळीकर, उपमहासंचालक, हवामान विभाग

-

४ ते १० फेब्रुवारी या कालावधीत नोंदविलेले तापमान

-

दिनांक किमान कमाल

४ फेब्रुवारी १७.४ ३०.७

५ फेब्रुवारी १५.० ३२.०

६ फेब्रुवारी १४.४ ३०.९

७ फेब्रुवारी १३.२ २४.२

८ फेब्रुवारी ९.८ २३.२

९ फेब्रुवारी ४.० २४.०

१० फेब्रुवारी ५.० २८.८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेगा ब्लॉकने प्रवाशांचे हाल

$
0
0

मनमाड स्थानकात तोबा गर्दी; बसप्रवासाला प्राधान्य

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मध्य रेल्वेने रविवारी कल्याण येथील रेल्वेच्या विकासकामांसाठी मेगा ब्लॉक घेतल्याने मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. त्यातच मनमाड येथून सुटणारी पंचवटी एक्स्प्रेस ही एकमेव गाडी सुरू असूनही रविवारी सकाळी मनमाड रेल्वे स्थानकात ओव्हर हेड वायर तुटल्याने पंचवटीही तीस ते पस्तीस मिनिटे उशिरा सुटली. त्यामुळे विविध कार्यासाठी सहकुटुंब निघालेल्या

प्रवाशांना कार्याला वेळेत पोहचता न आल्याने त्यांना चांगलाच मनस्ताप झाल्याचे चित्र होते.

मुंबई, पुण्याकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या गाड्या रद्द असल्याने अनेक प्रवाशांना मनमाड रेल्वे स्थानकातून पायपीट करीत बस स्थानकावर जाण्याची वेळ आली. दरम्यान बस स्थानकावर प्रवाशांची चांगली गर्दी असल्याने व लासलगाव, नाशिक, कोपरगाव, शिर्डी,

पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या रद्द असल्याने एसटीचे उत्पन्न वाढले असल्याचे दिसून आले. कल्याण येथील रेल्वे विकासकामांसाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात आल्याने राज्यराणी, गोदावरी, जनशताब्दी या कल्याण, मुंबईकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या. तर भुसावळ-मुंबई ही प्रवासी गाडीही बंद असल्याने प्रवाशांना त्याचा फटका बसला.

ओव्हरहेड वायर तुटली

अनेक प्रवाशांना मेगा ब्लॉकची व गाड्या रद्दची माहिती नसल्याचे दिसून आले. त्यात मनमाड मुंबई पंचवटी एक्स्प्रेस सुरू असूनही दुष्काळात तेरावा महिनाप्रमाणे मनमाड स्थानकात ओव्हरहेड वायर तुटल्याने वेळेवर सुटली नाही. ओव्हरहेड दुरुस्तीनंतर पंचवटी सुटल्यानंतर प्रवाशांनी हायसे वाटले. नागपूरकडून येणारी सेवाग्राम एक्स्प्रेसही मनमाडनंतर लासलगाव येथे नेहमीपेक्षा जास्त वेळ थांबविण्यात आल्याची प्रवाशांची तक्रार होती. ही गाडी देखील रविवारी उशिराने धावत असल्याचे दिसून आले.

बसस्थानकात गर्दी

महत्त्वाच्या रेल्वे बंद असल्याने लासलगाव, नाशिक, कल्याण, मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांनी बसस्थानकात गर्दी केली. दरम्यान नाशिकसाठी मनमाड स्थानकातून विशेष गाड्या सोडण्यात आल्या नसल्या तरी गाड्यांच्या फेऱ्या वाढवल्याचे आगाराकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थंडीने दिला अंशत: दिलासा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

गेल्या चार पाच दिवसांपासून गोठणबिंदूपर्यंत गेलेल्या तापमानाचा पारा पुन्हा वाढला असून, निफाड येथील गहू संशोधन केंद्रात सोमवारी ५.६ तापमानाची नोंद झाली आहे.

गेल्या तीन दिवसांत निफाड तालुक्याचे तापमान ३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. काही खासगी तापमान मापकावर ० अंश सेल्सिअसपर्यंत नोंद झाली होती. शनिवार आणि रविवारी तर सकाळी दवबिंदूही गोठले होते. इतके तापमान खाली आल्याने अवघा तालुका गारठला होता. या थंडीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. ऐन हंगामात तापमान घसरल्याने द्राक्ष उत्पादकांसमोर मोठे संकट उभे ठाकले असताना आता पुन्हा पारा वाढत आहे. सोमवारी तापमान २ अंशांनी वाढून ५.६ पर्यंत स्थिरावले आहे. दरम्यान येत्या दोन ते तीन दिवसांत वातावरणात बदल होईल आणि ढगाळ हवामान राहील अशी शक्यता व्यक्त केली असल्याने द्राक्ष, कांदा उत्पादक धास्तावले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला-नाशिक राज्य महामार्गालगत येवला शहरातील विंचूर चौफुली लक्कडकोट नजीकच्या पुरातन देवस्थान लक्ष्मीआई मंदिरातील दानपेटीवर रविवारी रात्री ते सोमवार सकाळदरम्यान अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला. चोरट्यांनी मंदिरातील लोखंडी दानपेटीचे कुलूप तोडून अंदाजे १ हजार २०० रुपयांची रक्कम चोरून नेली.

सोमवारी दररोज सकाळी मंदिरात भाविक आले असता, त्यांना चोरीचा हा प्रकार लक्षात आला. अज्ञात चोरट्यांनी दानपेटीचा कडीकोयंडा तोडून त्यातील रक्कम लंपास केल्याची फिर्याद राजेंद्र शिवाजी पांगुळ यांनी येवला शहर पोलिसांत दिली आहे. पांगुळ यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप घेणार ‘जनमन’चा कौल

$
0
0

'भारत के मन की बात'द्वारे जाहिरनाम्याची आखणी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भाजप आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर 'भारत के मन की बात' या उपक्रमाची सुरुवात करीत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून जनतेची मते मागवून त्यानुसार जाहिरनामा तयार करणार असल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत जाजू बोलत होते. निवडणुकीला सामोरे जाताना विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. प्रत्येक भारतीयाच्या मनात काही संकल्पना आहेत, त्यांना मूर्त रुप देण्यासाठी 'भारत के मन की बात' या उपक्रमाची सुरुवात केली आहे. आदिवासी भाग, कृषी उत्पन्न बाजार समिती, मोहल्ला, गाव, पाडे या ठिकाणी एकेक बॉक्स ठेवला जाणार आहे. लोकांनी सरकारकडून असलेल्या अपेक्षा त्यात लिहून टाकायच्या आहेत. भाजपने लोकसभा मतदार संघांमध्ये क्लस्टर बैठकांचे नियोजन केले आहे. जळगाव जिल्ह्यातील बैठकीनंतर मंगळवारी नाशिकमध्ये बैठक होत आहेत. यामध्ये निवडणूक रणनीती ठरविण्यात येणार असून कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण केला जाणार असल्याचे जाजू यांनी सांगितले.

भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता, नगरसेवक, पदाधिकारी आपल्या घरांवर पक्षाचा ध्वज फडकावणार असून सरकारची कामे जनतेपर्यंत पोहचविणार आहे. भाजप सरकारने अनेक योजना सर्व स्तरांमध्ये पोहचविल्या. त्यांच्या लाभार्थींची यादी तयार केली असून येत्या २६ फेब्रुवारी रोजी 'कमलज्योती' कार्यक्रम हाती घेतला आहे. या अंर्तगत लाभार्थींनी आपल्या घरात एक दिवा प्रज्ज्वलीत करावा आणि सरकारविषयी कृतज्ञता व्यक्त करावी, असा त्यामागील उद्देश आहे. तसेच संपूर्ण देशभरात २ मार्च रोजी युवा मोर्चाच्या वतीने बाईक रॅली काढली जाणार असून महाराष्ट्रात ही रॅली ३ मार्च रोजी होणार आहे.

भाजप-शिवसेना युतीबाबत जाजू म्हणाले, की शिवसेना आमचा जुना मित्रपक्ष आहे. १९८४ पासून आम्ही त्यांच्यासोबत आहोत. येत्या निवडणुकीत चांगले परिणाम पहायला मिळतील, असे सांगून भाष्य करणे टाळले. प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी भाजप आमदार रामदास आंबोटकर, देवयानी फरांदे, सीमा हिरे, बाळासाहेब सानप यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

ही मत मतदारांची दिशाभूल

प्रियंका वड्रा यांच्या आगमनाविषयी जाजू म्हणाले, की लोकांनी काँग्रेसला नाकारले आहे. उत्तर प्रदेशसारख्या राज्यात त्यांना धूळ चारली आहे. त्यामुळे प्रियंका यांच्या येण्याने भाजपला काही फरक पडणार नाही. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांची युती मतदारांची दिशाभूल आहे. व्यक्तिगत स्वार्थासाठी हे लोक एकत्र आले आहेत. लोक त्यांना त्यांची जागा दाखवतील.

..

लोगो : राजकारण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘उर्दू हैं जिसका नाम’ कार्यक्रम शनिवारी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एस. एम. रिसर्च अँड एज्युकेशन फाउंडेशन, नाशिक, ग्लोबल व्हिजन स्कूल, रेडिओ विश्वास आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. १६) सायंकाळी ५ वाजता कुसुमाग्रज स्मारकातील स्वगत हॉलमध्ये 'उर्दू हैं जिसका नाम' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

उर्दू या भाषेची नजाकत काही औरच आहे. उर्दू ही भारतीय भाषा नसली तरी 'अपने दिल की' भाषा जरूर आहे. आपल्याला उर्दू बोलता यावी, त्यातली शेरो शायरी समजावी, आपल्याला शायरी सहीअंदाजमध्ये सांगता यावी, त्या सुंदर शायरीचे अर्थ कळावेत असे मनात नक्की असते पण आपल्याला हे सगळे जाणून घेण्याची, समजून घेण्याची आणि शिकण्याची संधी फार कमी वेळा मिळते किंवा अजिबात मिळत नाही आणि मग ती भाषा शिकण्याची इच्छा केवळ एक स्वप्न बनून राहते. ही भाषा शिकण्याची संधी या कार्यक्रमाद्वारे एस एम रिसर्च अँड एज्युकेशन फाउंडेशनने आणली आहे.

या कार्यक्रमात उर्दूचे गाढे अभ्यासक डॉ. फैय्याज अहमद फैजी हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच, या कार्यक्रमात गझल मैफलही होणार आहे. गझल कशी असते? गझल म्हणजे नेमके काय? गझल कशी समजून घ्यावी? गझलमधल्या शब्दांचे अर्थ कसे लावले जातात आणि संदर्भानुसार उर्दू शब्दांचे अर्थ कसे बदलतात? या बाबी कार्यक्रमात सांगितल्या जाणार आहेत. या कार्यक्रमाची संकल्पना विजयालक्ष्मी मणेरीकर यांची आहे.

उर्दू भाषेचा लहेजा, त्यातील अदब आणि सौंदर्य यांचा आपल्यासारख्या सर्वच रसिकांना मोह होतो आणि ते समजून घेण्याची गरज आणि इच्छा दोन्ही ही असते. त्यासाठी ही संधी सर्वांसाठीच आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बापूरावजी देशमुख पुरस्कार राजेश दिवे यांना प्रदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स् असोसिएशन लि., मुंबईतर्फे दरवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'कै.बापूरावजी देशमुख उत्कृष्ट सहकारी बँक कर्मचारी' पुरस्कार विश्वास को-ऑप. बँकेचे कर्मचारी राजेश दिवे यांना नुकताच प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स् असोसिएशन लि., मुंबईतर्फे राज्यातील सहकारी बँकांमध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना दरवर्षी विविध पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. सहकारी बँकांतील व्यवस्थापन प्रणालीमध्ये गुणवत्तापूर्ण व विकासात्मक वाटचालीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. राजेश दिवे हे बँकेच्या सेवेत १७ वर्षांपासून कार्यरत असून बँकेतील विविध विभागात त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण सेवा केली आहे. माहिती व तंत्रज्ञानातील कौशल्य त्यांनी आत्मसात केले आहे.

पुरस्कार वितरणप्रसंगी असोसिएशनच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर, विश्वास ठाकूर, असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती पांडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लघु उद्योजकांवर धोरणात द्यावा भर

$
0
0

उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींचा सूर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गत साडेचार वर्षांमध्ये उद्योग धोरणांमधून खूप काही केल्याचा दावा भाजप सरकार करीत असले तरी लघु उद्योजकांसाठी अनेक गोष्टी अद्याप करावयाच्या बाकी आहेत. नाशिकमध्ये दोन दशकांपासून एकही मोठा उद्योग येऊ शकलेला नाही, या वस्तुस्थितीचा विचार करून सरकारने उद्योगविषयक धोरणांमध्ये आवश्यक तो बदल करावा, असा सूर निमा भवन येथे आयोजित संवाद सत्रातून उमटला. भाजप राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांच्या उपस्थितीत सोमवारी संवादसत्र झाले.

यावेळी मंचावर निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, उपाध्यक्ष शशिकांत जाधव, आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, निमा धोरण व विकास समितीचे अध्यक्ष व भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार उपस्थित होते. शशिकांत जाधव यांनी सांगितले, की उद्योगास अनुकूल असतानाही दोन दशकात नाशिकमध्ये कुठलीही गुंतवणूक येऊ शकलेली नाही. सरकारने औद्योगिक हितासाठी भूखंडवाटपविषयक धोरणे आणि कामगार कायद्यातही आवश्यक ते बदल करणे गरजेचे आहे. सातत्याने होणारे बंद आणि आंदोलनांमुळे उद्योग क्षेत्रावर प्रतिकूल परिणाम होत आहे. रास्त मुद्द्यांसाठी हे योग्य असले तरी याचा हेतूपुरस्सर होणारा अतिरेक योग्य नाही. कामगार कायद्याने याचाही विचार करावा, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

हरिशंकर बॅनर्जी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. 'निमा'तर्फे नाशिक औद्योगिक क्षेत्राच्या क्षमतांची माहिती देणारा माहितीपट यावेळी प्रदर्शित करण्यात आला. 'निमा'चे मानद सरचिटणीस तुषार चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. यावेळी मानद सचिव सुधाकर देशमुख, खजिनदार कैलास आहेर, 'निमा' सिन्नरचे अतिरिक्त सचिव संदीप भदाणे, निमा दिंडोरीचे अतिरिक्त उपाध्यक्ष संजय सोनवणे, माजी अध्यक्ष मंगेश पाटणकर, कार्यकारिणी सदस्य हर्षद ब्राह्मणकर, अखिल राठी, राजेश गडाख, मनीष रावल, उदय रकिबे, रावसाहेब रकिबे, हिमांशू कनानी, उदय खरोटे, सदस्य सुनील बागूल, मिलिंद कुलकर्णी, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडालेचा, 'आयमा'चे अध्यक्ष वरुण तलवार तसेच अन्य औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी व उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पक्षश्रेष्ठींपर्यंत भावना पोचविणार

उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनी मनोगत व्यक्त केल्यानंतर जाजू म्हणाले, की पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात दूरदृष्टी, खंबीरपणा, पारदर्शकता, नीती आणि निर्णय क्षमता आदी गुणांचा मिलाफ आहे. अनेक सकारात्मक बदलांच्या दिशेने देशाची वाटचाल सुरू आहे. परिणामी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची पतप्रतिष्ठा वाढली आहे. सौर ऊर्जा वापरात जगात देश दुसऱ्या स्थानावर तर शक्तीशाली देशांच्या यादीत देश चौथ्या स्थानापर्यंत झेप घेऊ शकल्याचेही त्यांनी सांगितले. उद्योजकांचे म्हणणे पक्षश्रेष्ठींपर्यंत पोचविण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थंडीचा अल्पदिलासा!

$
0
0

- सोमवारी किमान तापमानात ५ अंशांनी वाढ

- कमाल तापमानातही ४ अंशांची वाढ

- गुरुवापर्यंत राहणार तापमानात चढ-उतार

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात गेले दोन दिवस चार ते पाच अंश सेल्सिअसवर घुटमळणारे किमान तापमान सोमवारी एकदम पाच अंश सेल्सिअसने वाढून १० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. याचवेळी कमाल तापमानातही कमालीची वाढ झाल्याने नाशिककरांना थंडीपासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

नाशिककर गेले दोन दिवस सलग हुडहुडी भरविणाऱ्या थंडीचा अनुभव घेत आहेत. नाशिकसह जिल्ह्याच्या अन्य भागात चार ते पाच अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले, तर निफाडमध्ये तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शहरातील तपोवनासह निफाडमधील काही गावांमध्ये तर किमान तापमान शुन्यापर्यंत गेल्याने गोठविणाऱ्या थंडीचा अनुभव नागरिकांना आला. दिवसभर वाहणाऱ्या थंड हवेमुळे नागरिकांना आरोग्याच्या तक्रारीही भेडसावू लागल्या आहेत. अशा परिस्थितीत किमान आणि कमाल तापमानात वाढ झाल्याने नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारी जिल्ह्यात किमान तापमान १०.२, तर कमाल तापमान ३२.५ अंश सेल्सिअस एवढे नोंदविले गेले. कमाल तापमानही चार ते पाच अंशांनी वाढून ३० अंश सेल्सिअसच्या पुढे सरकल्याने दिवसभर हवेतून गारवा गायब झाल्याचा अनुभव नाशिककरांनी घेतला. कमाल तापमान वाढल्याने हवेतील गारवाही कमी होण्यास मदत झाली आहे.

..

तापमानात चढ-उतार

१३ फेब्रुवारीपर्यंत किमान तापमान १० ते १२ अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. १४ फेब्रुवारीपासून पुन्हा हे तापमान आठ ते नऊ अंशांपर्यंत कमी होऊ शकते, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. या कालावधीत कमाल तापमानही २७ ते ३० अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता असल्याने दिवसभर थंड हवेचा सामना करावा लागणार नाही, असाही हवामान विभागाचा अंदाज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीजबिलांची आज होळी

$
0
0

वीजदरवाढ विरोधात उद्योग संघटना सरसावल्या

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महावितरण कंपनीने केलेल्या अवास्तव वीज दरवाढी विरोधात उद्योग क्षेत्रातील विविध संघटना सरसावल्या आहेत. महाराष्ट्र चेंबरच्या नेतृत्वाखाली निमा,आयमा, लघु उद्योग भारती, वीज ग्राहक संघटना, वीज ग्राहक समिती व व्यापारी संघटना आदी संघटनांच्या वतीने वीजबिलांची होळी आंदोलन आज (दि.११) सकाळी १०. ३० वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथे करण्यात येणार आहे. यानंतर जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांना निवेदन देण्यात येणार आहे.

सप्टेंबर २०१८ पासून झालेली सर्व औद्योगिक वीज दरवाढ संपूर्णपणे रद्द करण्यात यावी, राज्यातील औद्योगिक वीज दर नोव्हेंबर २०१६च्या आदेशानुसार मार्च २०२० पर्यंत कायम ठेवण्यात यावेत, राज्य सरकारने सप्टेंबर २०१८ते मार्च २०२० पर्यंतच्या दर फरकापोटी ३४०० कोटी रुपये अनुदान महावितरण कंपनीस द्यावे, या मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून हे आंदोलन आज होणार आहे.

या आंदोलनात सर्व व्यापारी, उद्योजकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अग्रीकल्चरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, ऊर्जा उपसमितीचे चेअरपर्सन मिलिंद राजपूत, निमाचे अध्यक्ष बॅनर्जी, सरचिटणीस तुषार चव्हाण, ऊर्जा समितीचे अध्यक्ष रावसाहेब रकिबे, आयमाचे अध्यक्ष वरुण तलवार, सरचिटणीस ललित बुब, ऊर्जा समितीचे अध्यक्ष विजय जोशी, लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष संजय महाजन, वीज ग्राहक संघटना, वीज ग्राहक समितीचे सिध्दार्थ सोनी, गिरीश मोहिते यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घरपट्टीप्रश्नी आज बैठक

$
0
0

घरपट्टीप्रश्नी आज बैठक

नाशिकरोड : महापालिकेच्या मुख्यालयात शहरातील सर्व सहाही विभागीय अधिकाऱ्यांना मंगळवारी (दि. १२) घरपट्टी वसुली संदर्भातील रेकॉर्ड सादर करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. या बैठकीत आजवर घरपट्टी वसूल न झालेल्या मिळकती किती व कोणाच्या आहेत याबाबत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासनाकडून दरवर्षी सुमारे १०० कोटी रुपयांच्या घरपट्टी वसुलीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप भाजप नगरसेविका संगिता गायकवाड यांनी महापालिका आयुक्तांकडे केल्यानंतर प्रशासन जागे झाले आहे.

दरवर्षी सुमारे २१० कोटी रुपये घरपट्टीतून मिळणे अपेक्षित असतांना प्रत्यक्षात ८५ ते ९० कोटी रुपये इतकाच घरपट्टी जमा झाली आहे. त्यामुळे दरवर्षी सुमारे १०० ते १२५ कोटी रुपयांच्या घरपट्टी महसुलावर महापालिका प्रशासन पाणी सोडत आलेले आहे. या तुटीचा परिणाम महापालिकेच्या एकूण महसुलावर झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जाचक अटींविरोधात ‘ईसा’चे आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

१ नोव्हेंबर २०१८ चा शासननिर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा, २०१२ ते २०१९ या शैक्षणिक वर्षांपर्यंतचा आरटीईअंतर्गत देण्यात आलेल्या २५ टक्के प्रवेशांचा थकीत शुल्काचा परतावा द्यावा, तसेच राज्यातील सर्व इंग्रजी शाळांच्या सुरक्षेसाठी शाळा सुरक्षा कायदा करण्यात यावा, या मागण्यांसह राज्य सरकारकडून इंग्रजी शाळांवर लादण्यात येणाऱ्या जाचक अटींविरोधात इंडिपेन्डंट इंग्लिश स्कूल्स असोसिएशन (ईसा) संघटनेकडून २५ फेब्रुवारी रोजी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संघटनेच्या अंतर्गत असलेल्या राज्यातील ४ हजार ४०० इंग्रजी शाळा या आंदोलनात सहभागी होतील, अशी माहिती संघटनेच्या सोमवारी आयोजित बैठकीत देण्यात आली.

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या २५ टक्के प्रवेशाबाबत सरकारी व्यवस्थेकडून जाचक अटी लादण्यात येत असून, त्याचा निषेध करण्यासाठी ईसा संघटनेकडून राज्यव्यापी इंग्रजी शाळा बंद आंदोलन करण्यात येणार आहे. याविषयी माहिती देताना प्रदेशाध्यक्ष दायमा म्हणाले, की राज्य सरकार आरटीई प्रवेशांचा फी परतावा करण्यात अपयशी ठरले आहेत. गेल्या चार, पाच वर्षांची थकीत शुल्काचा परतावा देण्यासाठी सरकारने १ नोव्हेंबर २०१८ रोजी शासन आदेशाद्वारे जाचक अटी लादल्या आहे. या अटींमुळे इंग्रजी शाळांवर एका प्रकारे इन्स्पेक्टर राज लादण्यात आले आहे. गेले सहा वर्षे प्रवेश देताना सर्व शाळा पात्र होत्या. परंतु, आता फी परतावा देताना त्यांची पात्रता तपासणी करणे म्हणजे इंग्रजी शाळावर अन्याय आहे. यावेळी प्रदेश सचिव भरत भांदरणे, डॉ. संजय रोडगे, जागृती धर्माधिकारी, डॉ. प्रिन्स शिंदे, विवेक पडाळे आदी उपस्थित होते.

या मागण्या मांडणार

इंग्रजी शाळांना वारंवार समाजकंटकांकडून लक्ष्य केले जात आहे म्हणून राज्यात शाळा सुरक्षा कायदा तात्काळ लागू करण्याची गरज आहे. तसेच १८ नोव्हेंबर २०१३च्या शासन आदेशामध्ये दुरुस्ती करण्यात यावी, शालेय विद्यार्थी वाहतूक संदर्भामध्ये मुख्याध्यापकांऐवजी शाळेने नियुक्त केलेल्या वाहतूक व्यवस्थापकावर जबाबदारी सोपवावी. स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर दर्जा वाद प्रस्तावांसाठी ऑनलाइन प्रक्रिया तातडीने सुरू करावी, या मागण्याही आंदोलनात मांडण्यात येणार असल्याचे या बैठकीत ठरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेल्मेट घेतले, गुणवत्तेचे काय?

$
0
0

ग्रामीण भागात हेल्मेटची विक्री वाढली

संजय लोणारा, येवला

गेल्या काही वर्षात रस्ते अपघातात मृतांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे ग्रामीण भागातही १ तारखेपासून हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. या सक्तीमुळे अनेकांनी हल्मेट खरेदीसाठी गर्दी केली. मात्र रस्त्याच्या दुतर्फा उपलब्ध असलेल्या हेल्मेटच्या गुणवत्तेबाबत मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पोलिसांनी या प्रश्नाकडेही लक्ष देण्याची गरज आहे, असे काही जाणकारांनी सांगितले.

ग्रामीण भागात १ फेब्रुवारीपासून विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पाचशे रुपयांची दंडात्मक कारवाई होत असल्यामुळे गेल्या आठ दहा दिवसांत दुचाकीधारक धास्तावले आहेत. ग्रामीण भागातील दुचाकीचालकांकडे हेल्मेट नसल्यामुळे या कारवाईचा परिणाम असा झाला की हेल्मेटची विक्री वाढली. मात्र महामार्गाच्या दुतर्फा उपलब्ध असलेले हेल्मेटच्या गुणवत्तेचा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

सहा दिवसात ग्रामीण भागातील रस्त्यारस्त्यावर दुचाकी चालकांच्या डोक्यावर 'हेल्मेट' नजरेत पडू लागली आहेत. नव्हे तर, हेल्मेटची गरज बघता रस्त्यारस्त्यांच्या दुतर्फा आजवर कधी नसलेली हेल्मेट विक्रेत्यांची अगदी खुली दुकाने नजरेत भरू लागली आहेत. मार्गावरून मार्गक्रमण करताना अचानक पोलिसांचा दंडात्मक भुर्दंड नको म्हणून एकीकडे अनेक दुचाकीचालक हे हेल्मेट खरेदी करतात. दुसरीकडे हेल्मेटविक्री करणाऱ्यांना रोजगार मिळाला आहे.

विक्री वाढली

दुचाकीवरून विनाहेल्मेट पुढे सरसावताना कुठल्या रस्त्यावर पोलिसदादा समोर येईल, याचा नेम नसल्यामुळे दुचाकीचालकांच्या डोक्यावर हेल्मेट झळकू लागले आहेत. अनेक मार्गावर समोरून येणाऱ्यांच्या डोक्यावरील हेल्मेट बघता इतर दुचाकीचालक देखील अचानक हेल्मेट खरेदी करू लागल्याचे चित्र देखील दिसत आहे. येवल्यातून जाणाऱ्या नाशिक-औरंगाबाद आणि नगर-मनमाड राज्य महामार्गालगत अनेक ठिकाणी आता या हेल्मेट विक्रीचा खुला बाजार दिवसागणिक वाढत चालला आहे.

३०० रुपयात हेल्मेट

येवला तालुक्यातील जागोजागी रस्त्यालगत नानाविविध कंपन्यांची हेल्मेट विक्री होताना दिसत आहे. यात नेमक्या किती खऱ्या कंपन्या अन् हेल्मेटवरील किंमत किती खरी? हा देखील संशोधनाचा विषय आहे. तीनशे ते पाचशे रुपयांना हे हेल्मेट दुचाकीस्वारांच्या हाती पडत आहेत. ५०० रुपयांच्या दंडापेक्षा हेल्मेट बरे, असे म्हणत अनेक दुचाकीस्वार हे हेल्मेट खरेदी करताना धन्यता मानत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामसेवकाविरोधात सरपंचासह सदस्यांचे उपोषण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा शहराजवळील मळगाव (ति.) ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाच्या मनमानी व भष्ट कारभाराबाबत ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्य यांनी सटाणा तहसील कार्यालयाच्या पटागणात उपोषण सुरू केले आहे.

मळगावंचे ग्रामसेवक व्ही. जे. भामरे दोन वर्षांपासून पदावर आहेत. मात्र कुठल्याही कामकाजात आम्हास विश्‍वासात घेत नसून, आमच्या अज्ञानाचा फायदा घेवून आम्हास दमबाजी करतात. पंचायतीत बसू नका असे वारंवार सांगतात. माजी सरपंच व सदस्यांना जवळ घेवून कारभार करीत असल्याची तक्रार अप्पर जिल्हाधिकारी मालेगाव, गटविकास अधिकारी बागलाण यांच्याकडे ऑगस्ट २०१८ मध्ये केली आहे. तसेच ग्रामपंचायत सदस्य दिनेश पिंपळसे यांनी शासकीय जागेत अतिक्रमण कले आहे. याबाब अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमण काढण्याचा आदेश देऊनही भामरे यांनी हे अतिक्रमण काढले नाही. जोपर्यंत भामरे यांच्यावर कारवाई करून त्यांना निलंबित केले जात नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहील असा पवित्रा सरपंचांसह सदस्यांनी घेतला आहे. सरंपच अंजनाबाई पवार, सदस्य म्हाळू पवार, सोन्याबाई पवार, काळूबाई पवार, गेंदाबाई सोनवणे, पुंजाबाई पिंपळसे, राहिबाई शिंगरे, मंगला सोनवणे रवींद्र पवार, लखण पवार, मेघा पवार, मंगलाबाई माळी, भागाबाई शिंदे, कल्पना गोसावी आदी उपोषणाला बसले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाळ येशू यात्रेत चोरीप्रमाण झिरो

$
0
0

- सीसीटीव्हीचा 'वॉच' लाभदायी

- पोलिसांचा २४ तास पहारा

- हप्तावसुलीपासून स्टॉलधारकांची सुटका

- नियोजनामुळे अपघात टळले

...

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक-पुणे मार्गावरील सेंट झेवियर्स स्कूलच्या आवारात सुवर्ण महोत्सवी बाळ येशू यात्रा निविर्घ्न पार पडली. दोन दिवसीय यात्रेसाठी देशभरातून दोन लाख भाविक आले होते. यंदाचे विशेष म्हणजे, दक्ष संयोजक व पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे यंदा यात्रास्थळी एकही चोरी झाली नाही.

बाळ येशू यात्रा भाविकांसाठी जशी पर्वणी असते, तशीच चोरांसाठी सुवर्णसंधीच ठरते. मागील काही वर्षांमध्ये यात्राकाळात चेन स्नॅचिंग, बॅग्ज लंपास करणे, पाकीट मारणे, स्टॉल्समधून रोकड लांबवणे आदी प्रकारांनी कळस गाठला होता. गेल्यावर्षी धार्मिक पुस्तकांच्या स्टॉलमधून दीड लाखाची रोकड चोरांनी लांबवली होती. स्वयंसेवकांनी काही चोरांना पकडून दिले होते. मात्र, विशेष कारवाई न झाल्याने संयोजक व भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. याबाबत 'मटा'मध्ये वृत्त प्रसिध्द झाले होते. यंदा पोलिसांनी त्याची दखल घेत बंदोबस्त, सीसीटीव्हींची संख्या वाढवली. यात्रास्थळीच तंबू टाकल्याने मंदिर आवारात एकही चोरी झाली नाही. बाळ येशू मंदिराचे प्रमुख फादर ट्रॅव्हर मिरांडा यांनी सांगितले की, एक वर्षापासून सुवर्ण महोत्सवी यात्रेचे आम्ही नियोजन करीत होतो. लाखो भाविक येऊनही गोंधळ, दुर्घटना घडली नाही.

..

अशी होती स्ट्रॅटेजी

यंदा यात्रेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक आयुक्त ईश्वर वसावे, उपनगरचे वरिष्ठ निरीक्षक प्रभाकर रायते यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा पोलिसांची फौजच यात्रेत होती. वरिष्ठ निरीक्षक महेंद्र चव्हाण तर चोवीस तास हजर होते. त्यांच्या मदतीला दोन पोलिस निरीक्षक, एक सहाय्यक निरीक्षक, पाच उपनिरीक्षक, १५० पोलिस व २५ होमगार्ड होते. दहा महिला पोलिस तसेच महिला सुरक्षारक्षक यात्रेकरूंचा वेष करून वावरत होत्या. यंदा तब्बल २३ सीसीटिव्ही कॅमेरे बसवून प्रत्येक पॉईंट कव्हर करण्यात आला. पोलिसांच्या कडक बंदोबस्तामुळे स्टॉलधारक, फेरीवाले यांना गुंडांच्या हप्तावसुलीचा त्रास झाला नाही. वाहतूक पोलिस निरीक्षक बांबळे व सहकाऱ्यांनी वाहतुकीचे नियोजन केल्याने अपघातासारखी दुर्घटना टळली.

...

स्वयंसेवकांची मदत

यात्रेतील स्वागत समितीचे उद्घोषक फ्रान्सिस वाघमारे यांनी सांगितले की, चोर व अनोळखी व्यक्तींपासून सावध राहण्याची उद्घोषणा आम्ही सतत करीत होतो. दोनशे स्वयंसेवक आणि खासगी ५० सुरक्षारक्षक यांची पोलिसांनी मोठी मदत झाली. त्यामुळे यंदा चोरीचे प्रमाण शून्यावर आले. ताटातूट झालेल्या भाविकांना एकमेकांना लगेच भेटता आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images