Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

ईपीएफ पेन्शनर्सचे बहिष्कारास्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इपीएफ पेन्शनर धारकांना काशियारी समितीने सुचविल्यानुसार तीन हजार रुपये पेन्शन आणि महागाई भत्ता लागू करू, असे आश्वासन भाजप नेत्यांनी पाळले नाही. त्यामुळे 'नो कोशियारी-नो वोट' असा निर्धार ईपीएफ पेन्शनरधारकांनी सोमवारी केला.

इपीएफ ९५ पेन्शनर साखर, वीज, औद्योगिक कामगार, सहकारी बँक, सहकारी संस्था आदी १८६ आस्थापनांमधील कामगारांना किमान एक हजार रुपये पेन्शन मिळते. आमचे सरकार आले तर १०० दिवसांत कोशियारी कमिटीने सुचविल्याप्रमाणे तीन हजार रुपये रुपये पेन्शन, महागाई भत्ता लागू करू, असे आश्वासन गत लोकसभा निवडणुकांच्या प्रचारावेळी २०१४ मध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकर यांनी दिले होते. परंतु, आगामी निवडणुकांची तयारी सुरू झाली असतानाही अद्याप या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे देशातील ५६ लाख पेन्शनर्समध्ये याबाबत नाराजी आहे. सीबीएस येथील आयटक कामगार केंद्रात जिल्हा पेन्शनर फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजू देसले यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी त्यांची बैठक झाली. पेन्शनर्सला फसविणाऱ्या भाजपला लोकसभा निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. या बैठकीला जिल्हाध्यक्ष सुधाकर गुजराथी, कार्याध्यक्ष सुभाष काकड, नामदेव बोराडे, प्रकाश नाईक, एम. एन. लासुरकर, शिवाजी शिंदे, नरेंद्र कांबळे, श्रीकांत साळसकर, निवृत्ती शिंदे, विठोबा गुले, वसंत पाटील, रामकृष्ण जगताप, मामु शेख आदींसह पेन्शनर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाभरात करणार आंदोलन

आगामी अर्थसंकल्पात केंद्र सरकारने त्वरित पेन्शनवाढ व आरोग्यसुविधा पुरविण्याचा निर्णय घ्यावा याकरीता तालुका पातळीवर आंदोलने करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. पेन्शनराना फसविणाऱ्या पक्षांच्या उमेदवारांना मतदान करणार नाही, अशी शपथ पेन्शनर्स घेणार आहेत. तसेच 'आम्ही मत देणार नाही' अशी पाटी घरावर लावण्यात येणार आहे. नाशिक, दिंडोरी, निफाड, सटाणा, मनमाड, सिन्नर येथे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देसले यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नृत्याविष्कारातून देशभक्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हाती तिरंगा घेत 'वंदे मातरम् चा जयघोष करणारे अन् देशभक्तीपर गीतांवर नृत्याविष्कार सादर करत सामाजिक संदेश देणारे विद्यार्थी. सैनिकाचा वेष परिधान केलेल्या विद्यार्थ्यांच्या नृत्य सादरीकरणाला प्रेक्षकांची मिळणारी उत्स्फूर्त दाद. त्यावेळी देशाप्रेम व्यक्त करणारे नृत्याविष्कार पाहण्यात नाशिककर दंग झाल्याचे दिसले. निमित्त होते 'समूहनृत्य स्पर्धेचे'!

भारतीय एकात्मता समितीतर्फे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून 'समूहनृत्य स्पर्धा' आयोजित करण्यात आली होती. यंदा स्पर्धेचे ३३ वे वर्ष होते. सोमवारी सायंकाळी ५ वाजता कालिदास कलामंदिरात स्पर्धेला प्रारंभ झाला. यावेळी कवी शरद पुराणिक, समितीचे कार्याध्यक्ष जे. पी. जाधव, सदस्य सुनील बोरसे, सत्यनारायण पांडे व्यासपीठावर होते. स्पर्धेत शहरातील १८ शाळांच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाण्यांवर नृत्याचे बहारदार सादरीकरण केले. खास बाब म्हणजे, स्पर्धेत नॅबच्या अंध विद्यार्थ्यांनी तसेच विद्या प्रबोधिनीच्या विशेष मुलांनी अफलातून नृत्याविष्कार सादर केला. या सादरीकरणाला प्रेक्षकांसह परीक्षकांनी दाद दिली. भद्रकाली पोलिस स्टेशनच्या पोलिस उपनिरीक्षक जयश्री उनवणे यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. स्पर्धेत इतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी 'कहते हमको प्यार से इंडिया वाले', 'मेरी माती कबुल हैं...' 'देश मेरा रंगिला', 'सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा' यांसारख्या अनेक देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. एकाहून एक सरस सादरीकरणातून ही स्पर्धा रंगत गेली. स्पर्धेचे परीक्षक मंजुळा जैन, सीमा पाटील, संजय आहेर व मनदीप सिंग हे होते. सूत्रसंचालन पवन जोशी व सुनील बोरसे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बससेवेसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन

$
0
0

जिल्हाधिकारी कार्यालय आवारात घोषणाबाजी

धुळे : जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांप्रश्‍नी वारंवार लक्षवेधी आंदोलने करूनही जिल्हा प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे सोमवारी (दि. २१) पंचायत समिती सदस्य शानाभाऊ सोनवणे यांनी विद्यार्थ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. ‘मायबाप सरकार आम्हा लहानग्यांना न्याय देणार कधी, अच्छे दिन येणार कधी’ अशी आर्त हाक देत विद्यार्थी यात सहभागी झाले होते. दोंडाईचा परिसरातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांप्रश्‍नी हे आंदोलन करण्यात आले.

शिंदखेडा तालुक्यातील साहूर येथील विद्यार्थ्यांनी याअगोदर तापी नदीपात्रात उभे राहून जलसमाधी आंदोलनदेखील केले होते. ‘साहूर ते दोंडाईचा अशी दहा कि.मी.पर्यंत विद्यार्थ्यांची संघर्षयात्रा काढली होती. मात्र, याबाबत काहीही निर्णय न झाल्याने सोमवारी (दि. २१) सकाळी धुळ्यातील पांझरा नदीकिनाऱ्यापासून विद्यार्थ्यांसह मोर्चा काढला. या वेळी विद्यार्थ्यांनी शासनाचा धिक्कार करीत न्यायाची मागणी घोषणांमधून केली. या वेळी शानाभाऊ सोनवणे यांनी विद्यार्थी प्रतिनिधींसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. यात म्हटले होते की, एसटी महामंडळाने गेल्या चार महिन्यापासून रस्ता नादुरुस्तीचे कारण दाखवून साहूर-दोंडाईचा बससेवा बंद केली आहे. त्यामुळे परिसरातील साहूर, शेंदवाडे, झोटवाडे, दाऊळ, मंदाणे या गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरणासह दुरुस्त करून बस सेवा पुन्हा सुरू करावी. सदरचा रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत येतो, तो सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करून दुरुस्तीची तत्काळ मंजुरी द्यावी. एससी, एसटी व ओबीसी मुलांची शालेय शिष्यवृत्ती वेळेवर देण्यात यावी आदी मागण्या निवेदनात नमूद केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नोटाबंदीने अनेकांचा रोजगार हिरावला’

$
0
0

पंचवटी : खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं, फसव्या घोषणा व खोटी आश्वासने देऊन सर्वसामान्यांना भूलवण्याचे काम भाजप सरकार करीत आहे. राफेल घोटाळ्याबाबत मोदी बोलत नाही. नोटाबंदीमुळे अनेक लोकांचा रोजगार गेला असल्याची टीका पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली.

नाशिक शहर, जिल्हा व ग्रामीण कॉँग्रेसच्या वतीने स्वामिनारायण मंदिर हॉल येथे आयोजित एकदिवसीय संवाद प्रशिक्षण शिबिराच्या (दि. २१) उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. उत्तर महाराष्ट्र प्रभारी चेल्ला वामशी चाँद रेड्डी, संवाद प्रशिक्षण शिबिराचे समन्वयक आमदार रामहरी रूपनवार, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, माजीमंत्री शोभा बच्छाव, माजी खासदार प्रतापराव वाघ, शहराध्यक्ष शरद आहेर, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, प्रदेश सचिव हेमलता पाटील आदी उपस्थित होते.

या संवाद प्रशिक्षण शिबिरात काँग्रेसच्या लोकांनी केलेले कार्य तसेच काँग्रेस व भाजप यांच्यामधील फरक सूचक उदाराहणे, चित्रफित, ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून राजीव शाहू, नैशाध परमार, विनोद नायर यांनी माहिती दिली. सेवा दलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर, लक्ष्मण धोत्रे यांनी ध्वजारोहण केले. नगरसेवक राहुल दिवे, नगरसेविका आशा तडवी, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष विजय राऊत, अनिल कोठुळे, बबलू खैरे, विजय पाटील, उद्धव पवार आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकसभेच्या रिंगणात मनसेही उतरणार?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणुकीत नेमकी काय भूमिका घेणार याबाबत संभ्रम कायम असला तरी आता काही जागा लढविण्याचे त्यांनी ठरविले असल्याचे समजते. या काही मोजक्या जागांमध्ये नाशिकचाही समावेश असेल, असा दावा पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे.

मनसेला मुंबई व ठाण्यानंतर सर्वाधिक यश, लोकाश्रय नाशिकमध्येच मिळाला होता. तेव्हा म्हणजे पक्षाच्या स्थापनेनंतर झालेल्या २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी समीर भुजबळ यांना कडवी लढत दिली होती. तेव्हा शिवसेनेचा अधिकृत उमेदवार तिसऱ्या स्थानावर गेला होता. पुढे हे गोडसे नगरसेवक बनले व नंतर शिवसेनेत जाऊन २०१४ मध्ये लोकसभेत छगन भुजबळ यांचाच पराभव करून ‘जाएंट किलर’ बनले होते. तेव्हा मनसेचे डॉ. प्रदीप पवार हे तिसऱ्या स्थानी होते. २००९ मध्येच शहरातील विधानसभेच्या तीनही जागा जिंकून व नंतर महापालिकेचीही सत्ता मिळवून मनसेने नाशिकवर खऱ्याअर्थाने सत्ता राखली होती. पुढे त्यांची सर्वच सत्तास्थाने खालसा झाली. विधानसभेतील सगळ्या जागा गमावल्या. असंख्य नगरसेवक सोडून गेले. नंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत अवघे पाच नगरसेवक विजयी झाले. पक्षाची ही पीछेहाट झाल्याने राज ठाकरे यांनीही नंतर नाशिककडे दुर्लक्ष केले होते. परंतु, मध्यंतरी त्यांनी नाशिकचा दौरा केला तेव्हा मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाने मनसेच्या आशा पुन्हा उंचावल्या आहेत.

मनसे राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीबरोबर जाणार की स्वतंत्र लढणार याबाबत संदिग्धता कायम असली तरी मोजक्या जागा का होईना, पण निवडणूक लढविणे गरजेचे असल्याबाबत पक्षात एकमत झाल्याचे सांगितले जाते. तसे झाल्यास नाशिकमधून डॉ. प्रदीप पवार, नगरसेवक सलीम शेख, राहुल ढिकले यांची नावे पुढे येतील. भाजप-शिवसेना युती झाली तर माजी आमदार माणिकराव कोकाटे यांचाही विचार मनसे करू शकेल. कोकाटे सध्या भाजपमध्ये असून, त्यांनी गेल्या वर्षभरापासूनच लोकसभेची तयारी चालविलेली असल्याने आता माघार नाही, अशा पवित्र्यात ते आहेत. त्याचमुळे त्यांच्या सारख्या तडफदार नेत्याला मनसे आपलेसे करू शकेल, असाही अंदाज वर्तवला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ध्यानावस्थेत मिळणारा आनंद विरळाच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हृदयातील परमेश्वराचे दर्शन कसे घ्यावे, याचा मार्ग संत दाखवित असतात. आत्मज्ञानाची प्राप्ती करणाऱ्यांना ज्योतीस्वरूप प्रभुच्या रूपाचे दर्शन घडते. अनहद नाद, नाम स्मरणाचा आनंद आणि अमृताची प्राप्ती असे सर्वच लाभ मनाला ध्यानावस्थेत मिळू लागतात. यामुळे मिळणाऱ्या आनंदाची तुलना संसारातील कोणत्याही आनंदाशी होऊ शकत नाही, असे प्रतिपादन श्री हंस कल्याण धाम आश्रमच्या प्रबंधक साध्वी हिराजी यांनी केले.

त्रिमूर्ती चौकातील दुर्गा माता मंदिरामागील हनुमान मंदिर प्रांगणात सद्गुरूदेव श्री सतपालजी महाराज प्रणीत मानव उत्थान सेवा समितीच्या वतीने सद्भावना संमेलनाचे आयोजन करण्यात आले. त्याच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर साध्वी मुक्तिकाजी, साध्वी उत्तमजी तसेच महात्मा कुलदीपजी आदी उपस्थित होते. माजी नगरसेवक तानाजी जायभावे यांच्या हस्ते साध्वींचे पुष्पमाला देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी साध्वी हिराजी म्हणाल्या, की मानव जन्म मोठ्या भाग्याने मिळतो. आपल्यालाच मानव जन्म का मिळाला याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. जन्मणाऱ्या नवजात बालकाची मूठ वळलेली असते. मातेच्या गर्भात जीव ज्या प्रभूचे नामस्मरण करीत असतो, त्याच नामाचे स्मरण त्याने जन्मल्यानंतरही करणे अपेक्षित आहे. परंतु, संसारात आला की तो नामस्मरण विसरतो. त्याची मूठ उघडते. संसारातील मायामोहात तो असा काही अडकतो की त्याला निर्गुण निराकार परमेश्वराच्या नामस्मरणाची आठवणही रहात नाही. याच नामस्मरणाची आठवण करून देण्यासाठी सद्गुरू विविध रुपांत भूतलावर अवतार घेत असतात.

महाराष्ट्रास संतांची मोठी परंपरा

महाराष्ट्रामध्ये तर संतांची मोठी परंपरा आहे. या संतांनी मानवाला अध्यात्माचा मार्ग दाखविला. संसारिक कर्म करताना याच मार्गावर चालून मानवाने आपल्या जीवनाचे कल्याण करायला हवे, असे आवाहन साध्वी हिराजी यांनी केले. साध्वी मुक्तिकाजी यांच्याही सारगर्भित प्रवचनाचा लाभ भाविकांना मिळाला.

सिडको परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने या संमेलनाला हजेरी लावली. क्यूं भटकता हे माया मे बंदे, ज्योती मन मे जलाई रे हंस नाम की यांसारखी अनेक भक्तीगीतं या संमेलनात सादर झाली. संमेलन यशस्वीतेसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक रहिवाशी आणि सिडको परिसरातील मानव धर्म प्रेमींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकच्या तरुणाचा आंतरराष्ट्रीय सन्मान

$
0
0

‘आयसेक’ संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुणांच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत ‘आयसेक’ या संघटनेच्या माध्यमातून नाशिककडे आंतरराष्ट्रीय युवकांना आकर्षित करणारा एक नाशिककर तरुण आता युरोपातील हंगेरी देशातल्या आयसेकचा राष्ट्रीय अध्यक्ष बनला आहे. रोहित तनपुरे हा अवघा पंचविशीतील अभियंता आता हंगेरीतील तरुणांना बाह्य जगास जोडणारा दुवा म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर भूमिका बजावित आहे. ‘आयसेक’ या आंतरराष्ट्रीय संघटनासाठी राष्ट्रीय अध्यक्ष हे उच्चश्रेणीतील पद आहे. ही संधी रोहितच्या रूपाने नाशिकला आल्याने तो नाशिकचाही बहुमान आहे.

जगाच्या पाठीवरील दोन देशांमध्ये विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक आदान-प्रदान करण्यासह त्यांच्यातील नेतृत्वगुण विकसित करण्याचे कार्य ‘आयसेक’ संघटनेच्या माध्यमातून केले जाते. युरोपात पाऊण शतकापासून कार्यरत या संघटनेची शाखा नाशिकमध्ये २०१४ साली सुरू झाली होती. आतापर्यंत नाशिकमधून सुमारे सव्वाशे तरुणांनी आयसेकच्या उपक्रमांचा लाभ घेतला आहे. नाशिकचा रोहित धैर्यशील तनपुरे नाशिक आयसेकसोबत सप्टेंबर २०१५ मध्ये जोडला गेला. त्याअगोदर २००९ पासून तो मुंबई आयसेकसोबत कार्यरत होता. सुरुवातीच्याच कालावधीत झपाटून काम केल्याने अवघ्या वर्षभरात म्हणजे जुलै २०१६ मध्ये आयसेकच्या आऊटगोईंग प्रोग्रामचा तो अध्यक्ष बनला होता. या भूमिकेत असताना जगभरातून ४० विद्यार्थ्यांना नाशिकमध्ये येण्यासाठी मदत करण्यासह सांस्कृतिक आदान-प्रदान उपक्रमांतर्गत त्याने सहा विद्यार्थ्यांना परदेशात पाठविण्यासाठीही मदत केली.

अविश्रांत योगदानाने संधीचे सोने केले
विद्यार्थ्याचा वैश्विक दृष्टिकोन विकसित व्हावा यासाठी आयसेकच्या माध्यमातून निवड केलेल्या विद्यार्थ्याला सहा आठवड्यांसाठी बाह्य देशांमध्ये निवास करता येतो. भारताच्या नॅशनल लीडरशीप कॉन्फरन्ससाठी आणि आयसेक हंगेरीच्या नॅशनल सपोर्ट टीमचा भाग म्हणून रोहितने सक्रिय सहभाग घेतल्यानंतर मे २०१७ मध्ये त्याला एका उपक्रमांतर्गत तीन महिन्यांच्या कालावधीसाठी हंगेरीत जाण्याची संधी मिळाली. आपल्या अविश्रांत योगदानाने या संधीचे रोहितने सोने करीत आयसेकचा विश्वास जिंकला. परिणामी तेथील कामासाठी त्याच्यावर विश्वास दाखवत वर्षभराच्या निवासाची परवानगी देण्यात आली होती. या कालावधीतही त्याने केलेल्या चमकदार कामगिरीच्या परिणामी आता रोहितकडे हंगेरीच्या आयसेक राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.


नाशिकसारख्या सामान्य शहरातून पुढे आलेला तरुण आज हंगेरीसारख्या युरोपीय देशात आयसेकचे राष्ट्रीय प्रतिनिधीत्व करतो ही नाशिककरांसाठी अभिमानाची बाब आहे. नाशिकमधील तरुणांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करण्याची क्षमता आहे. योग्य दिशेने तरुणांनी प्रयत्न करायला हवेत. असाच संदेश रोहितला मिळालेल्या बहुमानाने तरुणांना दिला आहे.
- शर्वरी भोसले, व्हॉइस प्रेसिडेंट, आयसेक-भारत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला पोलिसांकडून शालेय विद्यार्थिनींचे प्रबोधन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

सोशल मीडिया व टीव्हीचा वाढत्या वापराने शालेय विद्यार्थी सैरभैर झाले आहेत. अल्पवयीन मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण वाढत असल्याने सातपूर पोलिसांनी शाळांमध्ये जाऊन विशेष प्रबोधनावर भर दिला आहे. गेल्या वर्षांत महिला पोलिसांनी केलेल्या प्रबोधनामुळे कुमार वयातील मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण घटल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

सातपूर परिसरातील शाळांमध्ये सातपूर पोलिस स्टेशनच्या सहाय्यक निरीक्षक सरिता जाधव व रेश्मा अवतारे यांनी शालेय विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. आई, वडिलांना समाजात खाली मान घालावी लागेल असे कृत करू नका, उच्च शिक्षणाची ध्यास अंगी बाळगा, ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करा, असे सांगून महिला पोलिस अधिकारी प्रबोधन करीत आहेत. तसेच घरातून निघून गेल्यावर अल्पवयीन अथवा तरुणींना नंतर अनेक समस्यांना कसे सामोरे जावे लागते याचीही जाणीव या पोलिस अधिकाऱ्यांकडून विद्यार्थिनींना करून दिली जात आहे. समाजातील वाईट प्रवृत्तींवर आळा बसावा, या हेतूने सर्वच शाळांमधील विद्यार्थिनींचे प्रबोधन केले जात असल्याचे महिला पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महाराष्ट्र चेंबर व बेलारूस चेंबरमध्ये सामंजस्य करार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ऍण्ड अॅग्रीकल्चर आणि बेलारूस चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. बेलारूसमधील व्यवसायाच्या संधींवर नुकतेच चर्चासत्र झाले. त्यात हा करार करण्यात आला. बेलारूस व भारतीय उद्योजकांच्या बी टू बी बैठकाही तेथे झाल्या. या बी टू बीमधून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, भारतीय कंपन्यांबरोबर उद्योग विस्तार व वाढीसाठी करार करण्यात येणार असल्याचे बेलारूस चेंबरच्या सरचिटणीस मरीना फिलोनोव्हा यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी फिलोनोवा यांना भगवद्गीता देऊन त्यांचे स्वागत केले. सामंजस्य करारामुळे दोन्ही देशांदरम्यान व्यापार संबंध वाढतील. बी टू बीचे उद्दिष्ट व्यापार आणि व्यावसायिक संपर्कांचा विस्तार करणे असून, बेलारूसी-भारतीय आर्थिक संबंध मजबूत करण्यासाठी योग्य योगदान देणे आहे, असे मंडलेचा यांनी सांगितले.

यावेळी फिलोनोव्हा म्हणाल्या,'महाराष्ट्रातील उद्योगांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे. ऍग्रो इंडस्ट्रियल, मेडिकल टूरिझम, टुरिझम/ हॉस्पिटॅलिटी, इन्स्टिट्यूट सेक्टरमध्ये व्यवसाय वाढावा. आजच्या बी टू बी मधून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, भारतीय कंपन्यांबरोबर उद्योग विस्तार व वाढीसाठी करार करण्यात येतील.' परस्परसंवादी चर्चा सत्रानंतर बेलारूसी आणि भारतीय कंपन्यांच्या दरम्यान बी टू बी बैठक झाली. १५० हून अधिक उद्योगांच्या बी टू बी बैठका संपन्न झाल्या. चेंबरच्या आंतरराष्ट्रीय संबंध समितीचे चेअरमन रवींद्र माणगावे यांनी समितीच्या कार्यक्रमाविषयी व उपक्रमाची माहिती दिली. बी टू बी यशस्वीतेसाठी महाराष्ट्र चेंबरचे सरकार्यवाह सागर नागरे, उपसचिव वनिता घुगे यांनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पिकाला भाव न मिळणे, कर्जबाजारीपणा यासारख्या कारणांमुळे जिल्ह्यात नववर्षात पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना सरकारने प्रत्येकी १० लाखांची मदत करावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाने मंगळवारी जिल्हा प्रशासनाकडे केली.

महासंघाच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत (आप्पा) पवार, राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष धनवटे, शहराध्यक्ष चंद्रकांत बनकर, सरचिटणीस अजय मराठे, कार्याध्यक्ष दिलीप मोरे, उपाध्यक्ष भीमराव कडलग, संजय फडोळ आदी उपस्थित होते.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना तात्काळ दहा लाख रुपयांची मदत सरकारने द्यावी, कांद्याला दोन हजार रुपये प्रतिक्विंटल हमीभाव मिळावा, भावांतर योजना लागू करावी, निर्यातीचे धोरण पाच वर्षे स्थिर ठेवावे, बंद ऊसाचे कारखाने पुन्हा सुरू करावेत आदी मागण्या त्यामध्ये करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात द्राक्षाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु, दर हंगामात परप्रांतातील द्राक्ष व्यापारी येतात. शेतकऱ्यांकडून माल घेऊनही ते पैसे देत नाहीत. असे प्रकार घडू नयेत याकरिता या व्यापाऱ्यांचे सरकारमार्फत रजिस्ट्रेशन करण्यात येऊन त्यांच्याकडून डिपॉजिट घ्यावे, असा व्यापार करण्यासाठी स्मार्ट कार्ड दिले जावेत, अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या. यावेळी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष विलास जाधव, नीलेश मोरे, महिला जिल्हाध्यक्ष अस्मिता देशमाने, शहराध्यक्ष शोभा सोनवणे, योगिता शिंदे, प्रमिला पाटील, निलेश दूसे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऋतुरंग महोत्सव शुक्रवारपासून

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकरोडकरांची सांस्कृतिक तृष्णा भागवणारा ऋतुरंग कला व सांस्कृतिक महोत्सव यंदा २५ ते २७ जानेवारी या कालावधीत होणार आहे. रसिकांना त्याद्वारे विविध कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे.

नाशिकरोड येथील बिझनेस बँकेच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती संयोजकांनी दिली. बँकेचे ज्येष्ठ संचालक विजय संकलेचा, अध्यक्ष पुरुषोत्तम फुलसुंदर, विजय चोरडिया, सुरेश टर्ले, राजीव पत्की, सुभाष पाटील, संतोष जोशी, अशोक भाबड, मनोहर आंबेडे आणि ऋतुरंग परिवाराचे सदस्य उपस्थित होते. दत्तमंदिर चौकातील ऋतुरंग भवन येथे २५ ते २७ या दरम्यान सायंकाळी चार ते रात्री नऊ या वेळेत हा महोत्सव होईल. त्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम व कला प्रदर्शन होणार आहे.

दि. २५ जानेवारीला सायंकाळी सहाला फेदर टच स्टुडिओतर्फे मराठी संगीत कला क्षेत्रातील जन्मशताब्दी वर्ष असणाऱ्या प्रतिभावंतांना मानवंदना देण्यात येईल. यात जयेश आपटे, धनेश जोशी, विवेक केळकर, रसिका नातू, सुवर्णा क्षीरसागर हे गायन, किर्ती भवाळकर नृत्य आणि अमेय बर्वे नाट्यकृती सादर करतील. २६ जानेवारीला सायंकाळी सहाला सिने, नाट्य कलावंत अनिता दाते व अभिजित खांडकेर यांची प्रकट मुलाखत तन्वी अमित या घेतील. २७ जानेवारीला एमएच १५ बॅन्डचा संगीताचा कार्यक्रम होईल. राहुल आंबेकर, विनेश नायर, गणेश जाधव व त्यांचे सहकारी गीते सादर करतील. या तीन दिवसांत दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत प्रशांत खरोटे, प्रवीण अस्वले, नितीन कोकणे, डॉ. रवींद्र सिंगल, डॉ. मिलिंद नेवे व प्रसाद पवार यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन तसेच कलाप्रदर्शन होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारच्या धोरणाचा लिपिकांकडून निषेध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वर्षानुवर्ष प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सरकारी कार्यालयांमधील लिपिकांनी मंगळवारी शहरातून मोर्चा काढला. महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय लिपीकसंवर्गींय हक्क परिषदेने जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले असून, त्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

राज्यातील सरकारी व निमसरकारी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांच्या एकूण संख्येपैकी सुमारे ६० टक्के कर्मचारी लिपिक संवर्गीय आहेत. गट क वर्गात समाविष्ट होणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या वेतनासह त्यांना दिल्या जाणाऱ्या इतर सुविधांकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गतवर्षी २ सप्टेंबर रोजी राज्यातील लिपिकांनी एकत्र येत पुण्यात एल्गार परिषद घेतली. या आंदोलनाची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेण्याचे आश्‍वासन दिले. परंतु, आश्‍वासनपूर्ती न झाल्याने लिपिकांनी २७ नोव्हेंबरला मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन केले. तरीही मागण्यांची पूर्तता न झाल्यामुळे मंगळवारी नाशिकसह राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये लिपिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. ईदगाह मैदानावरून मोर्चाला सुरुवात झाली. जिल्हा परिषद, शालिमारमार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मोर्चाचा समारोप करण्यात आला. मोर्चामुळे वाहतूक काहीवेळ विस्कळीत झाली. मागण्या मान्य न झाल्यास २० फेब्रुवारीला राज्यातील सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांवर मोर्चा काढण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. मोर्चात संघटनेचे जिल्हाध्यक्ष नीलेश देशमुख, उपाध्यक्ष नीलेश पाटील, रमेश जेजुरकर, सरचिटणीस हिरामण झोटिंग, विनायक केदारे, रवींद्र अमृतकर, बापूसाहेब शिरसाठ, प्रमोद निरगुडे, विनोद पाटील यांच्यासह लिपिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

या मागण्या प्रलंबित

लिपिकांच्या ग्रेड पेमध्ये सुधारणा करून सातवा वेतन आयोग लागू करावा.

'समान काम समान वेतन' धर्तीवर न्याय द्यावा

जुनी पेन्शन योजना लागू करावी.

लिपिकांची रिक्तपदे तत्काळ भरावी.

केंद्राप्रमाणे आश्‍वासित प्रगती योजनेचा लाभ १०,२०,३० टप्प्यात द्यावा.

सुधारीत आकृतीबंधासह स्थायी स्वरुपाची लिपिकांची पदे निर्माण करावीत.

मंत्रालय ते ग्रामपंचायत सर्व विभागातील लिपिकांचे पदनाम सारखे असावे.

अर्जित रजा साठविण्याची कमाल मर्यादा काढून टाकावी.

कॅशलेस मेडिकल सुविधा देण्यात यावी.

लिपिकांना नियमित प्रशासकीय प्रशिक्षण द्यावे.

एमपीएससीत गट ब प्रशासकीय अधिकारी व लिपिक कर्मचाऱ्यांचा प्राधान्याने विचार करावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अलायन्स एअरचे बुकिंग सुरू

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक-अहमदाबाद आणि नाशिक-हैदराबाद या दोन सेवांसाठीचे बुकिंग सुरू झाले आहे. ही सेवा एक फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, आठवड्यातील सातही दिवस ही सेवा राहणार असल्याने नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे. हैदराबादहून सकाळी ६.४५ वाजता विमान निघेल आणि ते सकाळी ८.३० वाजता ओझरला पोहोचेल. त्यानंतर हेच विमान नाशिकहून सकाळी ८.५५ वाजता निघेल आणि सकाळी १०.१० वाजता अहमदाबादला पोहोचेल. त्यानंतर अहमदाबादहून विमान सकाळी १०.४० ला निघेल आणि ओझरला सकाळी ११.५५ वाजता पोहोचेल. नाशिकहून दुपारी १२.२० ला विमान निघेल आणि ते हैदराबादला दुपारी २.२५ वाजता पोहोचेल. त्यामुळे सकाळीच अहमदाबादला जाण्याची आणि नाशिकहून हैदराबादला दुपारी जाण्याची सोय होणार आहे. पहिल्याच दिवशी बुकिंगला प्रतिसाद चांगला मिळााला आहे. हैदराबादसाठी १९९५ ते ३३०० रुपये एवढे भाडे आकारण्यात येत आहे. या सेवेमुळे एकाचवेळी नाशिकशी दोन शहरे जोडली जाणाार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुले कलादालनात रंगणार कलाप्रदर्शन

$
0
0

आजपासून २८ जानेवारीपर्यंत आयोजन

...

कलाप्रदर्शनाला प्रतिसाद

- विद्यार्थ्यांनी पाठविलेल्या कलाकृती : ४४४८

- परीक्षण समितीने निवडलेल्या कलाकृती : ९३६

- सात विभागातून ३१ कलाकृतींना मिळणार पारितोषिक

- ३७ कलाकृतींना गुणवत्ता प्रमाणपत्रे प्रदान करणार

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाच्या विद्यार्थी विभागाच्या वतीने २३ ते २८ जानेवारी या कालावधीत ५९ वे कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत महात्मा फुले कलादालन, शालिमार येथे हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य राहणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन आज सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. यावेळी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे व राज्यमंत्री रवींद्र वायकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

उद्या, २४ जानेवारी रोजी सुनील धोपावकर, प्रा. विजय सपकाळ, प्रा. प्रकाश सोनवणे, प्रा. अनिल वाघ यांचे चर्चासत्र होणार आहे. शुक्रवारी (दि. २५) संदीप लोंढे यांचे शिल्प प्रात्यक्षिक होणार आहे. २६ रोजी प्रा. महावीर पाटील, प्रा. सुरेंद्र जगताप यांचे चर्चासत्र होणार आहे. २७ रोजी प्रा. हेमंत मोहोड, मीनल जोगळेकर तैलरंग व पॉटरी प्रात्यक्षिक होणार आहे, तर २८ रोजी प्रा. दीपक वर्मा यांचे मेटल क्राफ्ट यावर प्रात्यक्षिक होणार आहे.

या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन राज्याचे कला संचालक राजीव मिश्रा, प्रदर्शन अधिकारी गोविंद पांगरेकर यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला प्रा. रमेश वडजे, प्रा. भास्करराव तिखे, प्रा. विनोद दांडे, प्रा. अनिल अभंगे, प्राचार्य मुंजा नरवाडे यांची उपस्थिती होती.

..

आनंद सोनार यांचा होणार सन्मान

विद्यार्थी विभागाच्या राज्य कला प्रदर्शनानिमित्त दृश्यकला क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलाकाराचा सन्मान करण्यात येतो. यावर्षी ज्येष्ठ चित्रकार आनंद सोनार यांच्या दृश्यकला क्षेत्रातील योगदानासाठी त्यांचा सन्मान करण्यात केला जाणार आहे. याचवेळी त्यांच्या काही कलाकृतींचे प्रदर्शन यावेळी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एचपीटीतील समस्यांचे निवारण करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'एचपीटी आरवायके कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये असंतोष जाणवत असून, विद्यार्थी व प्राध्यापकांतील संवाद कमी झाला आहे. तसेच कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा डोके वर काढत असून, विद्यार्थ्यांना योग्य न्याय मिळण्याची गरज आहे. त्यामुळे कॉलेज प्रशासनाने कॅम्पसमधील समस्यांचे निवारण करावे', अशा आशयाचे निवेदन विद्यार्थी नेत्यांनी प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी यांना दिले आहे.

अनेकदा विद्यार्थ्यांना सुटीच्या दिवशीदेखील लेक्चर्ससाठी बोलावले जाते. विद्यार्थ्यांची समस्या ऐकून घेतली जात नसल्याचे जाणवते. त्यामुळे प्राचार्यांनी या प्रकरणात लक्ष घालून कॅम्पसमधील समस्यांचे निवारण करावे. विद्यार्थ्यांची घुसमट कायम राहिल्यास विद्यार्थी संघटनांतर्फे आंदोलन करण्यात येईल, असे विद्यार्थी नेत्यांनी सांगितले. यावेळी अजिंक्य गिते, वैभव वाकचौरे, अभिजात गवते, सिद्धार्थ कापडी, प्रतीक खराटे, गौरव उगले, जीत पगारे, संकेत मोरे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दहा तारखेच्या आतच द्या प्रस्ताव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महासभेत इतिवृत्तावरुन झालेल्या गोंधळाची गंभीर दखल आयुक्त राधकृष्ण गमे यांनी घेतली आहे. गमे यांनी नियमांवर बोट ठेवत महिन्याच्या १० तारखेच्या आतच नगरसेवकांनी प्रस्ताव सादर करावेत, असे आदेश नगरसचिवांना दिले आहेत.

तुकाराम मुंढे आयुक्त असताना महासभेत जादा विषय येत नव्हते. त्याबद्दल मुंढे यांनी नगरसचिवांना सूचना केल्या होत्या. त्यांची बदली होताच राधाकृष्ण गमे रुजू झाल्यानंतर पहिल्याच महासभेत जादा विषय येण्यास सुरुवात झाली. जादा विषय आल्यानंतर त्यावर अभ्यास करता येत नाही, असा पवित्रा राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार यांनी घेतला होता. या मुद्द्यावरुन राधकृष्ण गमे, महापौर रंजना भानसी यांना लक्ष्य करण्यात आले होते. 'टक्केवारीच्या महापौर' असा त्यांचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे महत्त्वाच्या विषयासाठी विशेष महासभा बोलविण्यात येईल, असे जाहीर केले होते. स्मार्ट सिटी अंतर्गत हरितक्षेत्र विकास नगरपरियोजना तयार करणे, महापालिकेच्या मिळकती संस्थांना भाडे कराराने देणे, त्याचप्रमाणे अक्षयपात्र योजनेत सेन्ट्रल किचन सुरू करणे असे प्रस्ताव होते. मात्र, आता राधाकृष्ण गमे यांनी केलेल्या नियमांमुळे भाजपच्या नगरसेवकांची गोची होणार आहे. महिन्याच्या १० तारखेच्या आत सादर होणारे प्रस्तावच स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत नगरसचिव कार्यालयाला तशा सूचना करण्यात आल्या आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता मार्चच्या पहिल्या आठवड्यात लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या १० तारखेपर्यंत जे विषय येतील तेच पुढे मार्गी लागणार आहेत. त्यानंतरची कामे खोळंबणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औषधविक्रीवरून जुंपली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील डॉक्टर आपल्या दवाखान्यांमध्ये औषध विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले असून, अशा डॉक्टरांविरोधात केमिस्ट असोसिएशनने लढा उभारला आहे. जे डॉक्टर आपल्या दवाखान्यात औषधांची विक्री करीत असतील, अशांची नावे केमिस्ट असोसिएशनला कळवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

औषध विक्री हा रिटेलरच्या हक्काचा व्यवसाय आहे. त्यासाठी डॉक्टर डिस्पेन्सिंग व डॉक्टरमार्फत होणारी औषध विक्री बंद करण्यासाठी जिल्ह्यामध्ये चळवळ उभारली जात आहे. जिल्ह्यात ४० टक्के औषध विक्री व्यवसाय डॉक्टरमार्फत होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत संघटनेकडे बऱ्याच तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

ज्या केमिस्टकडे आसपासच्या डॉक्टरमार्फत औषध विक्री होत असल्याचे पुरावे असतील त्यांनी केमिस्ट असोसिएशनशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्यांची नावे गुप्त ठेवण्यात येतील, असे आवाहनही करण्यात आले आहे.

शेड्यूल 'के'चा गैरवापर

शेड्यूल 'के' नुसार कोणतीही व्यक्ती औषधांची विक्री करू शकते. मात्र, विक्री होत असलेल्या दुकानात मान्यताप्राप्त फार्मासिस्ट असणे गरजेचे आहे. मात्र, काही डॉक्टर या शेड्यूल 'के' च्या कलमाचा गैरवापर करीत आहेत. यानुसार प्रत्येक डॉक्टरला आपत्कालीन परिस्थितीत औषध बाळगण्याचा अधिकार आहे. मात्र, त्या औषधांची विक्री करू शकत नाही. असे असताना सध्या या कलमाचा आधार घेऊन अनेक डॉक्टर सर्रास औषधविक्री करीत आहेत. त्यामुळे अनेक केमिस्टच्या धंद्यावर परिणाम होत आहे. काही डॉक्टरांनी आपल्या सोयीसाठी स्वत:च औषधांची दुकाने टाकून त्यात फार्मासिस्ट कामाला ठेवला आहे. त्यामुळे मूळ व्यवसायिकांवर गदा येत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

लवकरच अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना याबाबत कळविण्यात येणार आहे. प्रत्येक डॉक्टरकडे असलेला औषधाचा साठा तपासावा, अशी विनंती करण्यात येणार आहे.

- अतुल आहिरे, अध्यक्ष, केमिस्ट असोसिएशन

प्रत्येक हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरमध्ये औषधांचा ठराविक साठा ठेवला जातो. तो अत्यावश्यक वेळी वापरण्यात येतो. तो वापरून झाल्यानंतर पेशंटच्या नातेवाईकांकडून तो पुन्हा मागवला जातो. त्यामुळे वापरलेली औषधे पुन्हा घेतली जातात. यात औषधांचा साठा ठेवण्याचा प्रश्नच येत नाही.

- आवेश पलोड, अध्यक्ष, आयएमए

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छ सर्वेक्षण टीम शहरात दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणाला नाशिक शहरात सुरुवात झाली असून, चार जणांची टीम शहरात दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत दरवर्षी स्वच्छ शहरांचे सर्वेक्षण करून त्यांना पुरस्कार दिला जातो. त्यासाठी देशभरात दरवर्षी जानेवारीत सर्वेक्षण करण्यात येते. या सर्वेक्षणाचे यंदाचे हे चौथे वर्ष आहे. पहिले सर्वेक्षण जानेवारी २०१६ मध्ये झाले. यातून देशातील शहराना नंबर देऊन गौरविण्यात येते. याचे सर्वेक्षण करताना पथक थेट शहरात दाखल होते. त्यानंतर दिल्लीहून अधिकाऱ्यांनी निर्देशित केलेल्या भागात जाऊन स्वच्छतेची पहाणी करण्यात येते. या सर्वेक्षणासाठी आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या नेतृत्वाखाली खातेप्रमुखांची विशेष समिती नेमण्यात आली होती. खाते प्रमुखांना विभाग वाटून देण्यात आले होते. ज्यांच्या विभागात कचरा सापडेल अशा खातेप्रमुखाने संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, असे आदेश दिले होते. त्यानुसार गेल्या महिनाभरापासून विशेष मोहीम राबविण्यात आली. मंगळवारी सकाळी पथक दाखल झाल्यानंतर त्यांनी सुरुवातीला सातपूर भागाचा दौरा केल्याची माहिती मिळाली. या भागात जाऊन त्यांनी सार्वजनिक शौचालये, सुलभ शौचालये, झोपडपट्टी भागात सर्व्हे केला. त्या ठिकाणांचे फोटो काढून दिल्लीला पाठविले. हा दौरा चार दिवस आहे. शहरातील महत्वाच्या ठिकाणांची यादी महापालिकेने स्वच्छ भारत अभियान विभागाला कळविली आहे. नागरिकांनी केलेल्या सूचनांच्या आधारे ही टीम विविध विभागांना भेटी देणार आहे. रुग्णालये, भाजी बाजार, सार्वजनिक ठिकाणांचा यात सामवेश आहे. यासाठी जीपीएस यंत्रणेचा आधार घेण्यात येत असून, या टीमला उद्या कुठे भेट द्यायची, त्याचे नियंत्रण दिल्लीहून होत आहे. त्यामुळे भेट देणाऱ्यांना आपण उद्या कुठे जाणार आहोत, याची माहिती नसल्याने महापालिकेचे कर्मचारीदेखील कामाला लागले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भ्रष्टाचाराविरोधात तरुणाचे उपोषण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

भगूर नगरपालिकेत वडिलांच्या जागी अनुकंपा प्रस्तावानुसार वारसाहक्कास तात्काळ नोकरीवर घ्यावे म्हणून अनेक वर्ष राज्यपालांसह जिल्हाधिकारी, नगरपरिषद प्रशासन यांच्याकडे पाठपुरावा करून थकलेल्या महेश रवींद्र जाधव या ३१ वर्षीय तरुणाने शिवाजी चौकातील जिजामाता व्यापारी संकुल परिसरात बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

महेशचे वडील भगूर नगरपालिकेत लिपिक पदावर डिसेंबर १९८१ ते ३१ डिसेंबर १९९९ दरम्यान कार्यरत होते. सेवेत असताना त्यांचा मृत्यू झाला. शासनाच्या अनुकंपा धोरणानुसार जाधव यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीला नोकरीवर घेऊ, असे आश्वासन भगूर नगरपालिकेने दिले होते. मात्र, १ ऑक्टोबर २००३ साली जाधव यांच्या प्रस्तावात फेरबदल करून वर्ग ४ आया या पदावर श्रीमती तुळसा चिमण आवारी यांना नगरपालिकेने नियमबाह्य पद्धतीने नोकरीवर घेतल्याचा महेशचा आरोप आहे.

त्यामुळे वारसाहक्कास नोकरीवर घेण्याच्या दिनांकापासून नुकसान भरपाई अदा करावी, नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्या १८ जुलैच्या परिपत्रकानुसार पात्र उमेदवारांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवावेत. त्यानुसार ज्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी अपात्र प्रस्ताव पाठविले त्यांच्यावर नियमानुसार कारवाई व्हावी. यासोबत ज्या लोकप्रतिनिधी यांनी मंजुरी किंवा ठराव मंजूर केले त्यांच्यावर निवडणुकीस बंदी घालावी. आया पदासाठी २००३ मध्ये मुलाखत झाली त्यावेळी ज्या अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी मुलाखत घेऊन चुकीच्या पद्धतीने त्यांना सेवेत घेतल्याचे पत्र दिले त्यांच्यावर कारवाई व्हावी. याबाबत अनुकंपासाठी प्रस्तावित असलेल्या तिन्ही नावांना डावलून वेगळ्याच महिलेला त्या जागी नोकरीवर घेण्यात आले. अशा विविध मुद्यांसह महेशने उपोषण सुरू केले आहे. या दरम्यान, त्याला अॅड. विशाल बलकवडे आणि राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी भेट देत उपोषणाबाबत माहिती घेतली.

मुख्याधिकारी अनभिज्ञच

या प्रकरणी भगूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी असलेल्या प्रतिभा पाटील यांची भेट घेऊन या प्रकरणी झालेल्या अन्यायाबाबत विचारणा केली असता त्यांना कुठलीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. उपोषणाची परवानगी न देता याउलट त्यांच्या सहीने उपोषणाबाबत असलेली नोटीस उपोषकर्त्या महेश जाधव यांच्या घरावर लावण्यात आली आहे. त्याबाबत खुलासा करताना त्यांनी आपण रहदारीचे ठिकाण वगळून त्यांना अन्यत्र उपोषणास बसण्याबाबत ती नोटीस दिली असल्याचा खुलासाही केला. एकंदरीतच त्या या प्रकरणी लक्ष देऊ इच्छित नसल्याचे दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बागलाण तालुका पत्रकार संघाच्या पुरस्कारांचे आज वितरण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने 'आदर्श कार्य सन्मान पुरस्कार २०१९'चे बुधवारी (दि. २३) वितरण होणार आहे. पुरस्कारार्थींमध्ये 'महाराष्ट्र टाइम्स'चे वरिष्ठ उपसंपादक प्रशांत भरवीरकर यांना पत्रकारितेतील उत्कृष्ट कामगिरीने हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. भरवीरकर यांच्यासह मुजवाड येथील दीपक सूर्यवंशी (छायाचित्रकार), सटाणा येथील किशोर भांगडीया (व्यापार), उतरणे येथील जि. प. सभापती यतीन पाटिल (सामाजिक कार्य), सटाणा येथील रवींद्र बिरारी (शेती), तर महाराष्ट्र राज्य भाषा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेले सटाणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. येथील कै. ना. म. सोनवणे तथा आबासाहेब सोनवणे महाविद्यालयात सकाळी ११ वा. प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांचे अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार प्रमोद हिले, उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकांत शिंदे, नगराध्यक्ष सुनील मोरे उपस्थित असणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images