Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

संक्रांतीच्या पूर्वसंध्येला खरेदीसाठी झुंबड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मकरसंक्रातीच्या खरेदीसाठी सोमवारी बाजारपेठ फुलल्याचे दिसून आले. मुख्य बाजारपेठेसह उपनगरातील दुकानांमध्ये संक्रांतीच्या वस्तू घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. सुकडी, साखरेचा हलवा, तीळ-गुळाचे लाडू, काळ्या रंगाचे कपडे, वाण देण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह पूजेचे साहित्य घेण्यासाठीची लगबग महिलावर्गात दिसून आली.

मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याचे दक्षिणायन पूर्ण होऊन, सूर्य उत्तरायणात प्रवेश करतो. उत्तरायणात सूर्य असण्याचा काळ हा शुभ काळ मानला जातो. यावेळी सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या दिवसाला मकरसंक्रांती म्हणतात. या सणाच्यानिमित्ताने एकमेकांना तीळगूळ देत, शुभेच्छा दिल्या जातात. तसेच महिलावर्ग हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेत, सौभाग्याचे वाण एकमेकींना देत असतात. त्यामुळे संक्रांतीच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी झाली होती. बाजारात उपलब्ध असलेले वैविध्यपूर्ण वाण वाण खरेदीसाठी महिलावर्गाची सकाळपासूनच बाजारात लगबग दिसली. मुख्य बाजारपेठेसह उपनगरांतील दुकानांत गृहोपयोगी वस्तूंसह सौंदर्य प्रसाधने व इतर वस्तूंच्या खरेदीकडे महिलांचा कल होता. तसेच संक्रांत सणाला काळ्या रंगाच्या वस्त्रांचे महत्त्व असल्याने, कपड्यांच्या दुकानांत काळी वस्त्रे खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली. काळ्या वस्त्रांवर साजेशी ज्वेलरी खरेदी करण्याकडे महिलावर्गाने पसंती दिली. तीळगूळ, साखर फुटाणे यांच्या खरेदीसाठी ग्राहकांनी रविवार कारंजा, मेनरोड, दहीपूलसह उपनगरांतील दुकांनात गर्दी केली. तसेच विविध आकाराच्या कापडी पतंग खरेदीला यंदा तरुणांनी पसंती दिल्याचे यावेळी दिसून आले. या सर्व खरेदीमुळे बाजारात ग्राहकांची झुंबड उडाल्याचे दिसले.

\B

संक्रांतीचा शुभ मुहूर्त

\Bसंक्रांत सणाचा शुभ मुहूर्त सकाळी ७.१४ ते सायंकाळी ६.१९ पर्यंत असून, संक्रांतीच्या दिवशी नदीपात्रात स्नान करण्यास महत्त्व आहे. संक्रांतीची पूजा करताना सूर्य देवाला नमस्कार करुन, घरात प्रसाद ग्रहण करण्यापूर्वी आगीत थोडासा गूळ आणि तीळ टाकून अग्नीदेवतेलाही नमस्कार करावा. तसेच यावेळी 'सूर्याय नम: आदित्याय नम: सप्तार्चिषे नम:' या मंत्राचे उच्चारण करावे, असे पुरोहितांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाऱ्याने दिली साथ, पतंग आकाशात

$
0
0

येवल्यातील पतंगोत्सवास दिमाखात सुरुवात; पतंगप्रेमींचा उत्साह द्विगुणीत

म. टा. वृत्तसेवा, येवला

मकरसंक्रांतीनिमित्त तीन दिवस चालणाऱ्या येवला शहरातील प्रसिद्ध पतंगोत्सवास सोमवारी दिमाखात सुरुवात झाली. दिवसभर वाहत्या वाऱ्याने साथ दिल्यामुळे पतंगने आकाशात भरारी घेतली. पहिल्याच दिवशी 'उडी उडी जाय'चा अनुभव आल्यामुळे पतंगप्रेमींचा उत्साह द्विगुणीत झाला आहे. दिवसभर ढिल दे ढिल...च्या किलकाऱ्या ऐकू येत होत्या.

येवल्यातील तीन दिवशीय पतंगोत्सवाचा मकर संक्रांतीच्या भोगीच्या सोमवारच्या (दि.१४) पहिल्या दिवशी शानदार श्रीगणेशा झाला. पतंगाला हवेत वरवर घेवून जाणारा अगदी सकाळपासून ते पुढे सायंकाळपर्यंत कायम टिकून राहिलेला वारा बघता येथील पतंगप्रेमींच्या पतंगबाजीला सोमवारी दिवसभर अगदी मोठे उधाण आले होते. पहाटेपासूनच वारा वाहत असल्याने पतंगोत्सवासाठी आसुसलेल्या शहरातील अनेक पतंगप्रेमींनी उगवतीच्या दिनकराचे दर्शन होण्याअगोदरच 'आसारी' अन् 'पतंग' घेवून आपल्या घराची गच्ची गाठली. पुढे दिवसभर शहरातील प्रत्येक घरादारांच्या गच्ची व धाब्यांवरील पतंगप्रेमींची गर्दी वाढत जाताना, आकाशात असंख्य पतंग इकडून तिकडे व तिकडून इकडे घिरट्या घालत होते. हवेतील वाऱ्यासरशी आकाशात भिरकणाऱ्या पतंगांचा मांजावर मांजा पडून एकमेकांचे पतंग काटाकाटीसाठीचा 'पेच' रंगला होता. पतंगबाजीतील या पतंग कापाकापीत कुणी याचा, तर कुणी त्याचा पतंग कटल्यावर होणारा 'वकाट...वकाटे' चा जिंकल्यागतचा जल्लोष देखील लक्ष वेधून घेत होता.

दोन दिवस धमाल

पुढील दोन दिवस शहरात उत्साहाने पतंगबाजी करण्यात येणार आहे. पतंगोत्सवातील सोमवारी साथ देणारा 'वारा' पुढील दोन दिवसात कशी साथ साथ देतो, यावर देखील सर्व काही अवलंबून असणार आहे. वाऱ्याची साथ मिळाल्यास पुढील दोन दिवस परंपरेप्रमाणे पतंगबाजीचा धमाका पाहायला मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुरुस्तीतही खोडा

$
0
0

घोटी-सिन्नर रस्त्याचे काम रखडले

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यातील सर्वात वर्दळीचा समजला जाणाऱ्या घोटी-सिन्नर महामार्गाच्या दुरुस्तीचे व डांबरीकरणाचे काम पुन्हा रखडले आहे. त्यामुळे वाहनचालक हतबल झाले आहेत. महत्त्वाचा महामार्ग असूनही या रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. घोटी-सिन्नर महामार्गावरून धावणाऱ्या हाईस्पीड वाहनांचा वेगही यामुळे कमी होत आहे. दहा किलोमीटर अंतर पार करण्यासाठी वाहनांना अर्धा तास लागत आहे.

गेल्या वर्षभरापासून या महामार्गाला खड्ड्यांचे ग्रहण लागले असून, यामुळे वाहनचालक कमालीचे त्रस्त झाले आहेत. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे बांधकाम विभागाने दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली होती. मात्र महामार्गावर केवळ कच, खडी पसरविण्यात आले. त्यानंतर डांबरिकरणाचे काम रखडले आहे. आमदार निर्मला गावित यांनी आढावा बैठकीत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत धारेवर धरले होते. दिशाभूल करणाऱ्या सबंधित उपअभियंत्यांची तत्काळ बदली करण्याबाबतही सूचित केले होते. बैठकीनंतर 'सांबा'ने महिनाभरात दुरुस्तीचे काम करण्याची ग्वाही दिली होती.

आमदार राजाभाउ वाजे यांच्या उपस्थितीतील बैठकीतही बांधकाम विभागाने शब्द दिला होता. त्यानंतर काम सुरू करण्याबाबत दोन दिवसाचे नाटक करण्यात आले. मात्र आता पुन्हा महिना उलटला तरी या महामार्गाची दुरुस्ती व डांबरिकरणाचे काम रखडले आहे. अनेकवेळा बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करूनही, आंदोलने करूनही बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. दुरुस्ती, व डांबरिकरणाचे काम का रखडले? असा प्रश्न माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे, पांडुरंग शिंदे, कचरू डुकरे, बाळासाहेब गाढवे, रमेश परदेशी आदींनी उपस्थित केला आहे.

येत्या दोन दिवसात या महामार्गाचे काम सुरू झाले नाही बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात येईल, असा इशारा पांडुरंग शिंदे, पांडुरंग वारुंगसे यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृक्षांच्या नावाचा बोर्ड लावा

$
0
0

लोगो - दाद फिर्याद

\Bवृक्षांच्या नावाचा बोर्ड लावा

\Bचंद्रशेखर विधाते, कामटवाडे, मटा वाचक

शहरातील अनेक उद्यानांमध्ये आणि जॉगिंग ट्रॅकवर वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष लावण्यात आले आहेत. मात्र, या वृक्षांना संरक्षक जाळ्या लावण्यात आलेल्या नाहीत. महापालिका प्रशासनाने पुढाकार घेऊन या वृक्षांना संरक्षक जाळ्या बसविल्या पाहिजेत. जेणेकरुन या वृक्षांचे संवर्धन करणे सोपे जाईल. तसेच हरित नाशिकच्या या निर्सगसंपत्तीची माहिती अनेकांना होत नाही. अनेकांना हे वृक्ष कोणते आहेत, हे ठाऊक नाही. त्यामुळे वन विभागाने प्रत्येक वृक्षाच्या संरक्षक जाळीवर संबंधित वृक्षाचा प्रकार आणि नावाची पाटी लावायला हवी. जेणेकरुन नाशिककरांना निसर्गत: देखील 'स्मार्ट' होता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वामी समर्थ सेवामार्गाचा २५ पासून कृषी महोत्सव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग व श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २५ ते २९ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवाचा शुभारंभ २५ रोजी गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, पालकमंत्री गिरीश महाजन, पशू-संवर्धन आयुक्त कांतिलाल उमप आदींच्या उपस्थितीत होणार आहे.

महोत्सवाच्या मंडप उभारणीचे भूमिपूजन सोमवारी डोंगरे वसतिगृह मैदानावर करण्यात आले. शेतकऱ्यांचे आत्मबल वाढवून त्यांना मानसिक, अर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी हा महोत्सव आयोजित केला जातो. कृषी महोत्सवाचे हे आठवे वर्ष आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी विशेष मार्गदर्शन व शेती डेमो मॉडेल असणार आहे. कृषी दिंडी, शेतकरी वधू-वर परिचय मेळावा, कृषी युवा नवचैतन्य अभियान, सरपंच व ग्रामसेवक मांदियाळी, पर्यावरण कार्यशाळा, कृषी माऊली पुरस्कार, पशुधन-गोवंश प्रदर्शन, बारा बलुतेदारांचे गांव असे विविध उपक्रम या महोत्सवांतर्गत होणार असून, या सर्व उपक्रमांमध्ये दरवर्षीप्रमाणे शेतकरी, नागरिक, समर्थ सेवेकऱ्यांचा मोठा सहभाग राहणार असल्याची माहिती आयोजक आबासाहेब मोरे यांनी दिली. महोत्सवात कृषी माऊली पुरस्कार दिले जाणार आहेत. भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती प्रित्यर्थ विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीस प्रोत्साहन देऊन त्यांचे संशोधन लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयोगशील शेतकरी व विद्यार्थ्यांना काही स्टॉल्स मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

असे आहेत कार्यक्रम

२५ जानेवारीला सकाळी ८ वाजता रामकुंड ते डोंगरे वसतिगृह निघणाऱ्या कृषी दिंडीने या महोत्सवास प्रारंभ होईल. ही दिंडी डोंगरे वसतिगृह मैदानावर येईल. १० वाजेपासून उद्घाटन सोहळ्यास प्रारंभ होईल. याच दिवशी दुपारी नैसर्गिक शेतीतून शाश्वत समृद्धी या विषयावर चर्चासत्र होईल. २६ तारखेला सकाळी शेतकरी वधू-वर मेळावा तर दुपारी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आहे. २७ जानेवारी रोजी सकाळी पर्यावरण जनजागृतीवर चर्चा तर कृषी पर्यटन व जोडव्यवसायावर मार्गदर्शन, २८ तारखेला दुग्धव्यवसायातील संधी तर अखेरच्या दिवशी २९ जानेवारीला दुपारी सरपंच व ग्रामसेवक मांदियाळी आणि सायंकाळी कृषी माऊली पुरस्कार वितरणाने कृषी महोत्सवाचा समारोप होईल, असे मोरे यांनी सांगितले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुन्या नाशकात १५ फूट पतंग

$
0
0

नाशिक:

मकर संक्रांतीनिमित्त जुन्या नाशकात १५ फुटांचा पतंग साकारण्यात आला आहे. हा पतंग नाशिककरांचे लक्ष वेधून घेत आहे. प्लास्टिकच्या कागदापासून तयार करण्यात आलेल्या या पतंगाच्या माध्यमातून 'नायलॉन'चा वापर टाळा, असा संदेश देण्यात येत आहे.

जुने नाशिक परिसरातील काझीपुरा येथे राहणाऱ्या वाहिद शेख, शोएब पठाण, एहसान शेख आणि माही सैय्यद यांनी १५ फूटाची पतंग तयार केली आहे. वाहिद शेख आणि त्यांचे सहकारी दहा वर्षांपासून संक्रांतीला १० फुटांचा पतंग तयार करतात. यंदा पतंगाचा आकार वाढविण्यात आला आहे. पतंग उडविण्याचे प्रमाण कमी झाले असून, परंपरेपासून नागरिक लांब जाऊ लागले आहेत. पतंगासाठी पांढरा व सोनेरी प्लास्टिकचा कागद वापरण्यात आला आहे. स्मार्ट फोनच्या वापरामुळे लहानग्यांना सणाचे विशेष महत्त्व समजत नसल्याने, दरवर्षी मोठ्या आकाराचा पतंग तयार करून प्रबोधन करतो, असे वाहीद शेख व सहकाऱ्यांनी सांगितले. या १५ फुटांच्या पतंगाला बांबूपासून आधार देण्यात आला असून, दोरखंडाच्या सहाय्याने पतंग उडविण्यात येणार आहे. त्यामुळे हा अनोखा पतंग जुन्या नाशकातील पतंगप्रेमींना आकर्षित करत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैशांचा पाऊस; तुरुंगात भागणार हौस!

$
0
0

निफाड:

पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भोंदूबाबा व त्याच्या दोघा साथीदारांना निफाड पोलिसांनी अटक केली. संशयितांविरोधात महाराष्ट्र नरबळी इतर अमानुष अनिष्ट व जादूटोणा प्रतिबंधक कायदा २०१३ कलम ३ भादंवि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकारात फिर्यादी महिलेने जीवावर उदार होऊन या प्रकारचा भांडाफोड करण्यासाठी प्रयत्न केला. यात तिला तिचे साथीदार अंधश्रद्धा विरोधात काम करणारे आणि छत्रपती सेनेचे तुषार गवळी, तानाजी शेलार, नीलेश शेलार, धीरज खोळंबे (रा. राणेनगर, नाशिक) यांनी महत्त्वाची साथ दिली. पीडित महिलेने पैशांचा पाऊस पाडण्याचा प्रकार आणि पूजेसाठी स्वतःला मागणी घातल्याची बाब आपल्या साथीदारांना सांगितली आणि या प्रकाराचा पर्दाफाश करण्याची योजना आखली.

याबाबत पीडित महिलेने निफाड पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. या महिलेची आणि संशयित भोंदूबाबा योगेश नागरे याची प्रसाद जाधव याने निफाड येथे १२ जानेवारी रोजी शिवपार्वती लॉन्स येथे भेट घडवून आणली. या भेटीत बाबाने महिलेला शुद्धीकरण विधी व पूजा याची माहिती देऊन १३ जानेवारीला बोलावले. ही बाब महिलेने साथीदारांना सांगितली. यानंतर पीडित महिला प्रसाद जाधव आणि डॉ. योगेश सोनार यांच्यासह नाशिक येथून निफाड येथे आले. शिवपार्वती लॉन्सजवळ बाबाच्या अल्टो गाडी (एमएच १४, ईएक्स १५७९) मध्ये पीडित महिला व बाबा हे बसले. बाबा आपल्यासोबत काहीतरी वाईट करणार हे लक्षात आल्याने महिलेने तिच्या सहकाऱ्यांना एसएमएस केला. ही बाब सहकाऱ्यांनी पोलिसांना कळवली. भोंदूबाबाला व उपस्थितांना पोलिस स्टेशनमध्ये घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी या सर्व प्रकारची माहिती पीडित महिलेने सांगितली. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी निफाड तालुक्यातील दोघांसह नाशिकमधील एकास ताब्यात घेतले. योगेश नागरे (शिवरे, ता. निफाड), योगेश सोनार (पवननगर, सिडको, नाशिक) प्रसाद जाधव (टाकळी विंचूर, ता. निफाड) या तिघांना सोमवारी पहाटे पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी ताब्यात घेतले.

नेमके घडले काय?
ओळखीतल्या प्रसाद जाधव याने निफाड येथे एक बाबा पैशांचा पाऊस पाडतो, त्याला पूजेसाठी एका मुलीची गरज आहे, तुम्ही मदत कराल का, अशी विचारणा संबंधित महिलेला केली होती. या महिलेचा फोटो काढून बाबाला मोबाइलवर पाठवित नंतर भेटही घडवून आणली. यावेळी भोंदूबाबा योगेश नागरेने महिलेला सांगितले, की एक जीन येऊन आपल्याला पैसे देईल. त्यासाठी तुझे शुद्धीकरण करावे लागेल. तुला सुरुवातीला जीनसोबत व नंतर माझ्याशी शारीरिक संबंध ठेवावे लागतील. त्यासाठी लॉजवर जाऊ, तेथे जीन तुझ्याशी शारीरिक संबंध केल्यानंतर तुला हवे तितके पैसे देईल. ते सर्व आपण आपसात वाटून घेऊ असे सांगत महिलेला उत्तेजक द्रव्याच्या गोळ्यांची पुडी दिली. ही माहिती संबंधित महिलेने आपल्या सहकाऱ्यांना एसएमएसद्वारे कळवली. त्यांनी पोलिसांना कळवत या प्रकरणाचा भांडाफोड केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पतंग उडवताना पडून मुलाचा मृत्यू

$
0
0

नाशिक :

जेलरोड येथे पतंग उडवताना पडून एका मुलाचा मृत्यू झाला. राज राजेश्वरी परिसरातील मोरे मळ्यात एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पतंग उडवत असताना हा मुलगा पडला.

सुफियान निजाम कुरेशी असे या मुलाचे नाव आहे. तो १६ वर्षांचा आहे. सुफियान हा पतंग उडवण्यासाठी घराबाहेर पडला. एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर तो पतंग उडवण्यासाठी गेला. पतंग उडवण्याच्या नादात त्याचा तोल गेला आणि तो तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळला. त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘एटीएम’मधून दीड लाख लांबवले

$
0
0

जेलरोड :

तुमच्या मोबाइलवर आलेला ओटीपी नंबर सांगा, असे फोन करून ओटीपी नंबर घेत अज्ञाताने एक लाख ४४ हजार ३८६ रुपये काढून घेतल्याची घटना जय भवानीरोड परिसरात घडली.

नाशिकरोडच्या जय भवानीरोड येथील कमला पार्कमध्ये राहणारे नंदू दत्तू भिसे यांना अज्ञात व्यक्तीने फोन केला. तुमचे एटीएम कार्ड बंद पडलेले असून आम्ही तुमच्या मोबाइलवर ओटीपी नंबर पाठवत आहोत तो आम्हाला द्या तुमचे, एटीएम कार्ड लगेच सुरू होईल, अशी बतावणी करत अज्ञाताने मोबाइलवरून ओटीपी नंबर घेतला. नंतर भिसे यांच्या खात्यावरील सुमारे दीड लाख रुपये काढून घेतले. हा प्रकार भिसे यांना लक्षात आल्यावर त्यांनी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये तत्काळ जाऊन याबाबत माहिती दिली. उपनगर पोलिस ठाण्यात सायबर गुन्ह्यांतर्गत अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फोटो ओळ

$
0
0

आर्मी डे...

१५ डिसेंबर १९४८ रोजी भारतीय लष्कराला स्वातंत्र्य मिळाले होते. यानिमित्त नवी दिल्ली येथील कारिप्पा परेड ग्राउंडमध्ये आर्मी डे परेडमध्ये आर्मी डेअरडेव्हिल्स मोटारसायकलवर स्टंट सादर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिन्नरच्या नायगाव संघाने मारली बाजी

$
0
0

कै.विजय भोर चषकाचे ठरल मानकरी

म. टा. वृत्तसेवा,देवळाली कॅम्प

गणेश शिरसाठ, तुषार बोडके व अजय चव्हाण यांच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर सिन्नरच्या नायगाव संघाने बलाढ्य अशा रिसेंट खतवड संघाचा ४ गडी राखून पराभव करीत २२ व्या कै. विजय भोर चषकावर नाव कोरले.

स्व. बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलात मास्टर स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित स्पर्धेचा अंतिम सामना रंगला. ८ षटकांच्या लढतीत रिसेंट संघाने ७४ धावांचे दिलेले आवाहन नायगाव संघाने २ चेंडू व ४ गडी राखून पार केले. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी हिंदी चित्रपट अभिनेत्री भूमिका चावला, महाराज बिरमानी, दाक्षिणात्य चित्रपटातील अभिनेता अनिकेत चव्हाण, नरेश दोशी, कॅन्टोन्मेंट बोर्ड उपाध्यक्षा प्रभावती धिवरे, नगरसेविका आशा गोडसे, एडीसीसीचे विनोद शहा, समीर रकटे, अर्जुन टिळे, निवृत्ती जाधव, रोहीत कासार, दीपक बलकवडे, भाऊसाहेब धिवरे, सतीश मेवानी, गुंडाप्पा देवकर, सुनीता भोर आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून राष्ट्रीय दर्जाच्या खेळ व खेळाडू देवळाली घडावा, असे मत व्यक्त केले. सर्वच मान्यवरांच्या हस्ते विजयी नायगाव संघाला १ लाख रुपये व चषक प्रदान करण्यात आला. पारितोषिकांचे वाटप करण्यात आले. तर स्पर्धा यशस्वीतेसाठी

क्लबचे अध्यक्ष सुनील दिनकर, उपाध्यक्ष अनिल दिवाने, प्रसाद कळमकर, विलास जाधव, राजू जानी, संजय सुरसे, रितेश गायकवाड, प्रसाद कळमकर, संजय व्यास, दीपक झुटे आदींसह क्लबचे सदस्य प्रयत्नशील होते.

यांनाही पारितोषिके प्रदान

उपविजेता संघ : रिसेंट खतवड ५१ हजार व चषक

तृतीय संघ :- जयश्री रॉयल क्लब २१ हजार व चषक

चतुर्थ संघ - देवपूर संघ ११ हजार व चषक

मालिकावीर :- अक्षय चव्हाण (नायगाव)

सामनावीर :- तुषार बोडके (नायगाव)

क्रीडाप्रेमी जॉन बाबा पुरस्कार :- मधुकर गवळी

उत्कृष्ट गोलंदाज :- विकी म्हात्रे (खतवड)

उत्कृष्ट फलंदाज :- गणेश शिरसाठ (नायगाव)

उत्कृष्ट क्षेत्ररक्षक :- सर्वेश सिंग (ऍरॉन बॉईज)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणवेश घोटाळ्याच्या चौकशीसाठी समिती

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या शाळांमधील गणवेश घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश राज्याच्या शिक्षण विभागाने दिल्यानंतर आयुक्तांनी या चौकशीसाठी शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी उदय देवरे यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची समिती नियुक्त केली आहे.

शिक्षणाधिकाऱ्यांसह पाच विस्तार अधिकारी या घोटाळ्याची चौकशी करणार आहेत. महिनाभरात या घोटाळ्याची चौकशी करून अहवाल सादर करावा लागणार आहे. त्यामुळे ठेकेदारांसह समर्थक नगरसेवकांचेही धाबे दणाणले आहे.

सरकारच्या समग्र शिक्षण योजनेंतर्गत महापालिकेच्या २३ हजार विद्यार्थ्यांना दिलेल्या गणवेश खरेदीत गैरप्रकार झाल्याची तक्रार आमदार सीमा हिरे यांनी राज्य सरकारकडे केली होती. २३ हजार ४८८ विद्यार्थ्यांना प्रति गणवेश ३०० रुपयाने गणवेश पुरवठा करण्यात आला होता. दोन गणवेशासाठी ६०० रुपये देण्यात आले होते. परंतु, शालेय व्यवस्थापन समिती मार्फत ही खरेदी होणार असतांनाही, तीन ठेकेदारांच कामे मिळाली आहेत. त्यामुळे या खरेदीसाठी दबाव आणला गेल्याच्या तक्रारी झाल्या होत्या.

त्यापार्श्वभूमीवर सरकारने या चौकशीचे आदेश होते. त्यानुसार प्रशासनाने या चौकशीसाठी प्रशासन अधिकारी उदय देवरे यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची समिती नियुक्त केली आहे.

पाच विस्तार अधिकाऱ्यांच्या मदतीने महिनाभरात ही चौकशी पूर्ण करायची आहे. शाळांमध्ये जाऊन विस्तार अधिकाऱ्यांमार्फत गणवेशाची गुणवत्ता तपासली जाणार असल्याने अधिकारी, ठेकेदार आणि काही नगरसेवकांचे धाबे दणाणले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पतंगबाजी बेतली जीवावर

$
0
0

नाशिकरोड : बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर पतंग उडविण्याच्या प्रयत्नात तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या एका युवकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना जेलरोड भागात घडली. मकरसंक्रांतीच्या दिवशीच ही दुर्दैवी घटना घडली.

मंगळवारी (दि.१५) मकरसंक्रांतीनिमित्त जेलरोड भागातील राजराजेश्वरी रोडवरील मोरे मळ्यातील बालाजीनगर भागात राहणारा सुफियान निजाम कुरेशी (वय १६) हा प्रगतीनगर भागात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पतंग उडवत होता. पतंग उडविताना तोल गेल्याने तो जमिनीवर पडला. या घटनेत सोफियानच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यास उपचारार्थ नाशिकरोड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना सोफियान त्याचा सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान मृत्यू झाला. या घटनेची नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोगोई घेणार राहुल गांधीची भेट

$
0
0

गुवाहाटी : कृषक मुक्ती संग्राम समितीचे नेते अखिल गोगोई लवकरच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह इतर नेत्यांची नागरिकत्वाच्या मुद्द्याबाबत चर्चा करण्यासाठी भेट घेणार आहेत. 'आसाम आणि इतर ईशान्येकडील राज्यांबाबतचे विधेयक अद्याप प्रलंबित आहे. ईशान्य भारतातील काँग्रेसच्या खासदारांनी नागरिकत्व विधेयकातील दुरुस्त्यांना विरोध केला आहे. त्यामुळे याबाबत चर्चा करण्यासाठी राहुल गांधी यांची भेट घेणार आहे,' असे गोगोई यांनी स्पष्ट केले आहे. विधेयकाला विरोध करणाऱ्या ७० संस्थांच्या प्रतिनिधींसह गोगोई यांनी सोमवारपासून उपोषणाला सुरुवात केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षाचोरीचा उलगडा सहा महिन्यांनंतर!

$
0
0

दिंडोरीतील चोरट्यास पोलिसांची अटक

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सहा महिन्यांपूर्वी चोरीस गेलेली रिक्षा शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी रिक्षा हस्तगत केली असून संशयितांच्या चौकशीत अन्य गुन्हेही उघड होण्याची चिन्हे आहेत. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश वसंत बर्वे (३५ रा. वरवंडी राजवाडा, ता. दिंडोरी) असे संशयित रिक्षा चोरट्याचे नाव आहे. शहरात वाहनचोरीच्या घटना वाढल्याने युनिटचे पथक चोरट्यांच्या मागावर असतांना हवालदार विजय गवांदे यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. दिंडोरी रोडवरील बसथांबा परिसरात चोरटा रिक्षा घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार युनिटचे निरीक्षक आनंद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (दि. ११) सापळा लावण्यात आला. रिक्षातून (एमएच १५ झेड ११३१) उतरताच पोलिसांनी संशयितास बेड्या ठोकल्या. या कारवाईत पोलिसांनी रिक्षा हस्तगत केली. संशयिताने सहा महिन्यापूर्वी जिल्हा रुग्णालय आवारातून रिक्षा चोरी केल्याची कबुली दिली आहे. संशयितास न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

संशयिताच्या अटकेने सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल असलेला एक गुन्हा उघडकीस आला आहे. अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. अधिक तपास हवालदार गवांदे करीत आहेत. ही कारवाई सहाय्यक निरीक्षक महेश कुलकर्णी, सचिन खैरनार, उपनिरीक्षक बलराम पालकर, जमादार बाळासाहेब दोंदे आदींच्या पथकाने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गोविंदनगरला ‘हॅप्पी स्ट्रीट’ची ट्रीट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मनोरंजनाची सफर कॉलेजरोड, व्हिरिडियन व्हॅली आणि नाशिकरोडच्या रस्त्यावर घडविल्यानंतर आता 'महाराष्ट्र टाइम्स'चा 'हॅप्पी स्ट्रीट' उपक्रम गोविंदनगरमध्ये धमाल करण्यासाठी येत आहे. रविवारी (दि. २०) सकाळी ७ वाजता ही धमाकेदार ट्रीट गोविंदनगरवासीयांना मिळणार आहे.

रोजची धावपळ, रस्त्यावर असणारी वर्दळ, कामाचे टेन्शन यांपासून सुटका करुन घेत, 'हॅप्पी स्ट्रीट'मध्ये नाशिककर निवांत होतात. या उपक्रमात धमाल, मस्ती करीत आठवडाभर उत्साही राहण्याची उमेद अनेकांना मिळते. कायम वाहनांचा गोंगाट असलेला रस्ता यानिमित्ताने आनंददायी होतो. या उपक्रमाला नाशिककरांचा कायम उत्स्फूर्त प्रतिसाद असतो. एकाहून एक बहारदार कलाविष्कारांच्या सादरीकरणातून तसेच अनोख्या खेळांतून या उपक्रमाची आनंदपर्वणी अनुभवता येणार आहे. झुम्बावर थिरकण्यासह जुन्या गाड्या बघण्याची, सेल्फी अन् फोटोसेशन करण्याची, हटके गेम्स खेळण्यासह आकाश निरीक्षण, नेल आर्ट, क्विलिंग आर्ट, म्युझिक कॉन्सर्ट अनुभवण्याची संधी मिळणार आहे. या धमाल, मस्तीच्या पर्वणीत कल्ला करताना, गोविंदनगरवासियांची सकाळ यादगार ठरणार आहे.

\Bकलाकारांना नाव नोंदविण्याची संधी \B

आपली कला या उपक्रमात सादर करण्यासाठी नावनोंदणी करायची आहे. यासाठी महाराष्ट्र टाइम्सच्या ०२५३ ६६३७९८७ किंवा ९४२२५१३५६९ या क्रमांकावर दुपारी १२ ते ४ या वेळेत संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाखरांवरच संक्रांत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक\B

\Bशहरात मकरसंक्रांतीनिमित्त पंतगोत्सवाला उधाण आले असतानाच पक्ष्यांवर मात्र संक्रांत आल्याचे पहायला मिळाले. शहराच्या विविध भागात १० ते १२ पक्षी जखमी झाल्याचे दिसून आले. पक्षीप्रेमींनी पुढाकार घेत पक्ष्यांवर उपचार केले.

पतंगांच्या मांजामुळे पक्ष्यांवर ओढावणारी संक्रांत टळली नसल्याचे मंगळवारी दिसून आले. नायलॉन मांजा विक्रीस बंदी असूनही छुप्या पद्धतीने हा मांजा विकला गेला. पतंगोत्सवात नायलॉनसह इतर घातक मांज्याचा वापर झाल्याने, संक्रांतीच्या दिवशी यंदाही पक्षी जखमी झाल्याचे समजले. दुपारी १ वाजता पेठेनगर येथील पुष्पवर्षा इमारतीच्या गच्चीवर 'होला' हा पक्षी मांजात अडकला. हा पक्षी कबुतर पक्षाची प्रजाती असून, पायात नायलॉन मांजा अडकल्याने त्याचे पाय व पंख जखमी झाले. ही माहिती स्थानिकांनी पक्षीमित्र वैभव भोगले यांना दिली. त्यानंतर घटनास्थळी जात भोगले व त्यांच्या सहकाऱ्यांनी होलावर प्रथमोपचार केले. तसेच पाथर्डी फाटा येथील रायबा हॉटेलजवळ देखील मांजा अडकल्याने कबुतराचे पंख कापले गेले. पक्षीमित्रांनी दिवसभरात जखमी झालेल्या १० ते १२ पक्ष्यांवर उपचार केले. सायंकाळी उशिरापर्यंत पक्षी जखमी झाल्याचे फोन पक्षी मित्रांना येत होते. शहरात अनेक ठिकाणी पक्षी ‌जखमी असून, त्याची माहिती पक्षीमित्रांपर्यंत पोहचू शकलेली नाही. \B

\B

\Bदोन कबुतरांचे पंख कापले

\Bगंगापूर रोडवरील केबीटी चौकाजवळील थत्तेनगर येथील अष्टविनायक अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये मांजामुळे कबुतराचा एक पंख कापला गेला. दुपारी ३ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. परिसरातील व्यावसायिकाने या घटनेची माहिती पक्षीमित्र राहुल कुलकर्णी यांना दिली. राहुल व त्यांच्या सहकाऱ्यांनी कबुतराचा शोध घेतला. कबुतरावर प्रथमोपचार केल्यानंतर सोडून देण्यात आले. सायंकाळी ६ वाजता खुटवटनगर येथील सीटू भवनाजवळील इमारतीच्या गच्चीवर मांजा अडकून कबुतराचे पंख कापले गेले. सायंकाळी उशिराने त्यावर उपचार करण्यात आले.

\Bते 'कबुतर' सुखरुप\B

शरणपूर रोडजवळील कुलकर्णी गार्डन येथे वीजेच्या तारांना लटकलेल्या मांजामुळे कबूतराची मान कापली गेली. दुपारी ४ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. घटनेची माहिती मि‌ळाल्यानंतर पक्षीमित्र जयेश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी कबूतरावर प्रथमोपचार केले. त्यामुळे कबूतराचा जीव वाचला.

\B'पक्षी वाचवा'चे आवाहन\B

'नाशिककर मकरसंक्रांतीच्या दिवशी व त्यापुढील काही दिवस एक महत्त्वाचे काम करा. तुम्हाला पक्षी मित्रांचे संपर्क क्रमांक पाठविले आहेत. जर तुमच्या परिसरात मांजामध्ये अडकलेला पक्षी आढळला. तर लगेचच पक्षी मित्रांना संपर्क साधा', असा मेसेज सोशल मीडियावर मंगळवारी व्हायरल झाला. या मेसेजद्वारे 'पक्षी वाचवा, नायलॉन मांजाचा वापर टाळा', असे आवाहन करण्यात आले. या मेसेजमध्ये देण्यात आलेल्या संपर्क क्रमांकाद्वारे अनेक नागरिकांनी पक्षी मित्रांना संपर्क साधला.

थत्तेनगर येथे झाडाला लटकलेल्या मांज्यामुळे कबुतरांचे पंख कापले गेले. कबुतर झाडाला लटकल्याचे दिसल्यावर पक्षीमित्रांना कळविले. नागरिकांनी नायलॉनचा वापर पूर्णत: बंद करायला हवा.

- सुहास गोरे, व्यावसायिक, थत्तेनगर

नायलॉन मांजाला बंदी असल्याने यंदा पक्ष्यांना दुखापत होणार नाही असे वाटले. शाळा कॉलेजांमध्ये नायलॉनच्या वापराबाबत प्रबोधन होऊनही नागरिकांनी छुप्या पद्धतीने नायलॉन मांजा खरेदी केला. त्यामुळे अनेक पक्षी जखमी झाले.

- वैभव भोगले, पक्षी मित्र

नायलॉनसह इतर मांजामुळे पक्ष्यांना इजा झाल्याचे दिसले. दिवसभरात शहरातील विविध भागात १० पेक्षा अधिक पक्षी जखमी झाल्याचे समजले. जखमी पक्ष्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

- राहुल कुलकर्णी, पक्षी मित्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डीजे, मिरवणूक अन् फेटा प्रथेला फाटा

$
0
0

\Bतळवाडेत \Bगावविकास सभेत एकमताने ठराव मंजूर

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

तालुक्यातील तळवाडे येथील ग्रामस्थांनी लग्नसमारंभ, विविध उत्सव यामध्ये अनावश्यक खर्चाला फाटा देण्याचा निर्णय घेतला आहे. तळवाडे गावात आता नवरदेवाची मिरवणूक निघणार नाही की, डीजेसारखे जास्त आवाजाचे वाद्यही वाजणार नाही. विवाहासाठी आलेल्या वऱ्हाडी मंडळींना फेटे बांधले जाणार नाहीत. एवढेच नव्हे तर रात्रीच्या वरातीसह हळदीला जाताना नवरदेवाची मिरवणूकही निघणार नाही, असा अभूतपूर्व निर्णय ग्रामस्थांनी मंगळवारी गावविकास बैठकीत घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

मंगळवारी ग्रामस्थांची 'गावविकास' सभा झाली. कोणत्याही धार्मिक कार्यात शाल, टोपी घेण्यादेण्यास बंदीचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. तसे न केल्यास २१ हजार रुपये दंडदेखील ठोठावण्यात येणार आहे. सरपंच ज्ञानेश्वर भिवसेन, उपसरपंच संतोष बोडके, चेअरमन मोहन बोडके, माजी सरपंच रोहीदास बोडके, बाळू बोडके, समाधान आहेर, महीपत बोडके, शिवाजी कसबे आदी उपस्थित होते.

ग्रामीण भागात विवाह सोहळ्यात होणाऱ्या अनावश्यक खर्चात काटकसर आणि काही खर्चावर बंदीच आणण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे या सर्व ठरावांना बैठकीत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. यासह दिवट्या, वास्तूशांती, दशक्रिया या सारख्या धार्मिक कार्यात टॉवेल-टोपी देणेही बंद करण्यात आले आहे. त्यामुळे गावविकासासाठी चालना मिळून गाव प्रगती करेल, असा आशावाद उपसरपंच संतोष बोडके यांनी व्यक्त केला. हळदीसह, लग्नातील हळदीच्या अनावश्यक खर्चावरून हळदी व लग्न समारंभातील अनावश्यक खर्च टाळून पारंपरिक पद्धतीनेच समारंभ करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच विवाह सोहळ्यातील फेट्यासही बंदी घालण्यात आली.

गावात विविध ठिकाणी सार्वजनिक गणपती मंडळ उत्सव साजरा करतात. तसाच प्रकार नवरात्रोत्सवाही होतो. यावर उपाय म्हणून तळवाडे येथे 'एक गाव एकच उत्सव' साजरा करण्यात येणार आहे. गावात फक्त यापुढे गणपती, नवरात्री, छपती शिवाजी महाराज जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडर जयंतीलाच मिरवणुका काढण्यात येणार आहेत.

--संतोष बोडके, उपसरपंच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिमेन्शियाग्रस्तांचीसेवा हे उदात्त कार्य

$
0
0

डॉ. धनंजय चव्हाण यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जगभरात हृदयविकार व कॅन्सरवर जेवढा खर्च होतो, त्यापेक्षा जास्त खर्च डिमेन्शियावर होतो; पण अनेक गैरसमजांमुळे या आजाराला लपवून ठेवण्यात येते. यामुळे डिमेन्शियाच्या रुग्णांची सेवा करण्याइतके अवघड, अनपेक्षित, न योजलेले व समाजाकडून दुर्लक्षित काम क्वचितच दुसरे असेल. म्हणूनच हे एक उदात्त आणि थोर कार्य आहे, असे प्रतिपादन डॉ. धनंजय चव्हाण यांनी केले.

कुसुमाग्रज स्मारकात डिमेन्शियाच्या रुग्णांच्या कुटुंबीयांसाठी आयोजित मार्गदर्शनपर भाषणात डॉ. चव्हाण बोलत होते. सत्राच्या सुरुवातीला डॉ. चव्हाण यांनी या गंभीर आजाराची व्याप्ती सांगितली. ते म्हणाले, की भारतातील वाढत्या आयुर्मानाबरोबर डिमेन्शियाचे प्रमाणही वाढत चालले आहे. त्याची पुरेशी माहिती नसल्याने डिमेन्शियाच्या रुग्णांची, त्यांच्या परिवाराची आणि पर्यायाने समाजाची मोठी मानसिक व आर्थिक हानी होते. भारतात डिमेन्शियाबद्दल इतके अज्ञान आहे, की अगदी सुशिक्षित परिवारातसुद्धा योग्य वेळी डॉक्टरचा सल्ला घेतला जात नाही.

या आजाराविषयी सांगताना डॉ. चव्हाण म्हणाले, की डिमेन्शिया हा पूर्ण बरा न होणारा आजार असला तरी सुरुवातीच्या स्टेजमध्ये औषधोपचाराने काही अंशी त्याला ब्रेक देता येतो. रुग्णाचा व कुटुंबीयांवरील ताण कमी करता येतो. त्यांना पुढील नियोजन करायला बहुमोल वेळ मिळतो. त्यामुळे त्याचे वेळेवर निदान आणि योग्य औषधोपचार गरजेचा असतो. डिमेन्शिया मानसिक नाही तर मेंदूचा आजार आहे. या आजारात अनेक मानसिक व वर्तणुकीच्या समस्या निर्माण होतात म्हणून सायकियाट्रिस्ट या आजारावर उपचार करतात. यात मानसिक क्षमतांमध्ये उत्तरोत्तर अधिकाधिक ऱ्हास होत जातो आणि त्याचा व्यक्तीच्या दैनंदिन आयुष्यावर विपरीत परिणाम होतो.

डॉ. चव्हाण यांनी सांगितले, की डिमेन्शियाचे रुग्ण अनेकदा त्यांच्याच सेवेला विरोध करतात, अडथळा आणतात. त्यामुळे त्यांना मदत करणे अधिक अवघड होते. त्यावर मात करायला संयम लागतोच, पण काल्पनिकताही लागते. पुढे त्यांनी सांगितले, की पुरेसा वेळ दिला तर अनेक कुटुंबीयांना छोट्या-मोठ्या बाबींमध्ये जवळीकतेचे, स्नेहाचे, आनंदाचे, समाधानाचे अनेक क्षण मिळतात. सहाय्यकांनी आपल्या अपेक्षा आजाराच्या स्थितीनुसार बदलल्या म्हणजे अवास्तव अपेक्षा ठेवल्या नाहीत तर त्यांच्यावरचा मानसिक ताण कमी होतो. एकीकडे अवास्तव अपेक्षा नको; पण दुसरीकडे आपण पूर्ण निरुपाय वा असहाय आहोत, असे टोकाचे नैराश्यही नको.

या वेळी डॉ. चव्हाण यांनी उपस्थितांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. वृद्धावस्थेत डिमेन्शिया होऊ नये म्हणून उच्च रक्तदाब, डायाबिटिसचे योग्य उपचार, तसेच मानसिक, शारीरिक व सामाजिकदृष्ट्या सक्रिय जीवनशैली यांचे महत्त्व सांगितले. पुण्याच्या डिग्निटी होम फाउंडेशनच्या वतीने हा कार्यक्रम झाला. गिरीश पगारे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिफेन्स हबची घोषणा उद्या?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देशातील दुसऱ्या डिफेन्स हबची घोषणा गुरुवारी (ता. १७) होण्याची चिन्हे आहेत. ओझर येथे संरक्षण उद्योगाशी निगडित भव्य सेमिनार होणार असून, त्याला संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

भारतीय संरक्षण दलातील संरक्षणनिर्मिती विभाग आणि संरक्षण मंत्रालयाच्या वतीने गुरुवारी संरक्षण क्षेत्रातील सहभागधारकांचा महत्त्वपूर्ण सेमिनार होणार आहे. यात संरक्षण मंत्रालयांतर्गत असलेल्या कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री, सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्स, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल), नाशिक इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चर असोसिएशनतर्फे या क्षेत्रातील भागधारकांचा हा सेमिनार असेस. ओझर टाऊनशिपमध्ये होणाऱ्या या सेमिनारच्या माध्यमातून भारतीय संरक्षण, तसेच हवाई वाहतूक क्षेत्रात असलेल्या संधींबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. या निमित्ताने संरक्षण क्षेत्रातील संधी, त्यासाठी असलेल्या प्रक्रिया, सुटे भाग आणि साधनांचा वापर याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. मिलिटरी हार्डवेअर सिस्टीम, तसेच सद्य:स्थितीत असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची, तसेच डीआरडीओ यांच्या संदर्भातील एक प्रदर्शनदेखील या ठिकाणी आयोजित केले जाणार आहे. डॉ. भामरे, पालकमंत्री गिरीश महाजन, संरक्षणनिर्मिती विभागाचे सचिव डॉ. अजय कुमार आणि आर्मी, नेव्ही, एअरफोर्समधील उच्चपदस्थ अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. देशांतर्गत उत्पादनाच्या प्रक्रियेमुळे संरक्षण क्षेत्रात व्यवसाय संधींबाबत सेमिनारमध्ये सहभागी उद्योजकांना माहिती मिळणार असून, व्यवसायवाढीसाठी अधिकाधिक उद्योजकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, मानद सरचिटणीस तुषार चव्हाण आदींनी केले आहे. सेमिनारला प्रवेश विनामूल्य असला तरी पूर्वनोंदणी बंधनकारक आहे. त्यासाठी निमा कार्यालयास प्रत्यक्ष किंवा २३५०२७७, ७७७००२५५७२ किंवा nimanashik@gmail.com या ई- मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन निमा औद्योगिक धोरण व विकास समितीचे अध्यक्ष प्रदीप पेशकार व मेक इन नाशिक समितीचे अध्यक्ष श्रीकांत बच्छाव यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images