Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

राजमाता जिजाऊ शिवरायांच्या गुरू

$
0
0

शिवचरित्र व्याख्याते प्रशांत देशमुख यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, धुळे

लहानपणापासून स्वराज्य निर्मितीच्या काळापर्यंत जिजाऊ माँ साहेब शिवरायांच्या गुरू होत्या, असे प्रतिपादन रायगड येथील शिवचरित्र व्याख्याते प्रशांत देशमुख यांनी केले. शहरातील जयहिंद शैक्षणिक ट्रस्ट संचलित झेड. बी. पाटील महाविद्यालयात शनिवारी (दि. १२) आयोजित राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेत शिवरायांना स्वराज्याचे स्वप्न देणाऱ्या राजमाता जिजाऊ या विषयावर ते बोलत होते.

यावेळी देशमुख म्हणाले की, जिजाऊंनी केलेल्या संस्कारांमुळेच शिवाजी राजे घडले. युद्धाच्या नियोजनात जिजाऊ या शिवबांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या. आदिलशाही, निजामशाही व कुतूबशाही यांच्या अन्याय व अत्याचाराने त्रस्त अशा समाजात आत्मविश्वास निर्माण करीत अत्यंत कठीण परिस्थिती जिजाऊंनी शिवरायांचा राज्याभिषेक करून स्रियांचा सन्मान असलेले न्याय व कायद्याचे स्वराज्य निर्माण केले, असेही ते म्हणाले.

या वेळी अध्यक्षस्थानी जयहिंद शैक्षणिक ट्रस्टचे चेअरमन डॉ. अरुण झुलालराव साळुंके होते. तर संस्थेचे उपाध्यक्ष प्रमोद पाटील, सचिव प्रदीप भदाणे, प्रा. सुधीर पाटील, संचालक अजितराव मोरे, नानाभाऊ कोर, अनिल चौधरी, शेखर सूर्यवंशी, स्मिता साळुंके, प्राचार्य डॉ. पी. एच. पवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

कर्तृत्ववान युवक घडविणे मातेचे कार्य
वर्तमान परिस्थितीत युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी जिजाऊ माँसाहेबांनी स्वराज्य निर्मितीसाठी दिलेले सर्वोच्च समर्पण व शिवरायांचे कर्तृत्व याचे चिंतन युवा मनावर होणे गरजेचे असल्याचे देशमुख यांनी सांगितले. राष्ट्रासाठी शिवरायांसारखा न्यायप्रिय, स्त्रियांचा आदर करणारा धैर्यवान, चारित्र्यवान, कर्तृत्ववान युवक घडविणे प्रत्येक मातेचे पवित्र कार्य आहे, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रमाता जिजाऊ यांनी समाजात आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर शिवबांना मार्गदर्शन केल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अरुणराव साळुंके म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बलुतेदारांचे महत्त्व साहित्यातून उजागर करण्याची गरज

$
0
0

डॉ. चक्रपाणी चोप्पावार यांचे मत

म. टा. वृत्तसेवा, धुळे

कारागिरांचे, बलुतेदारांचे महत्त्व साहित्यातून नव्याने उजागर करण्याची खरी गरज आहे. कारागिरांचे संवर्धन न झाल्यास समाज रसातळाला जाईल, असे स्पष्ट मत पहिल्या एक दिवसीय अ. भा. विश्वकर्मा साहित्य संमेलनाचे उद्घाटक डॉ. चक्रपाणी चोप्पावार यांनी व्यक्त केले. मराठी साहित्यात बलुतेदारांचे चित्रण आहे का, असा प्रश्न आहे. आजपर्यंत वंचित कामगारांच्या, शेतकऱ्यांच्या व विश्वकर्मा समाजाच्या वेदनांवर फुंकर मारण्यापलीकडे काहीही झालेले नाही, असेही ते म्हणाले.

देवपूर येथील पद्मश्री बिल्डर्स व विश्वकर्मीय समाज संघटना परिवाराच्या विद्यमाने धुळ्यात रविवारी (दि. १३) पहिले एक दिवसीय अ. भा. विश्वकर्मा साहित्य संमेलन झाले. शहरातील राजर्षी शाहू नाट्यगृहात नागोजी सुतार नगरीत व श्री संत नरहरी मंचावर झालेल्या या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी अलुतेदार, बलुतेदार या विषयाचे गाढे अभ्यासक तथा लेखक डॉ.प्रल्हाद लुलेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कृष्णा पोतदार, डॉ. प्रकाश लोहार, यल्लारी सुतार, केदारनाथ धिमाण, अशोक थोरहाते, कथाकथनकार स्वामी दिव्यानंद बापू, इंदूमती सुतार, डॉ. चंद्रकांत मोरे, सुगन बरंठ, मयुर मिस्तरी आदी उपस्थित होते.

डॉ. चोप्पावार म्हणाले की, आपली अस्मिता आपणच जागृत करायला हवी. त्यासाठी आपल्या संतांची आपण माहिती करून घेतली पाहिजे. कारण संतांपासून आपल्याला उर्जा मिळते. आज विश्वकर्मा संस्कृतीला उजागर करण्यासाठी व्यासपीठ निर्माण करण्याची गरज आहे. त्यात सर्व साहित्यिकांना स्थान दिल्यास चांगल्या साहित्याची निर्मिती होऊ शकते. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी, जाती, धर्माचे राजकारण करणाऱ्या सरकारचा समाचार घेत बलुतेदारांना स्वाभिमानी जीवन जगण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, आज प्रत्येक समाज इतर समाजाकडे संशयाच्यावृत्तीने पाहतांना दिसतो. प्रत्येकाची संमेलने, मेळावे वेगवेगळे होतात. कारण, व्यवस्थाच तशी निर्माण केली गेली आहे. बारा बलुतेदार एकत्र आल्यास निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो. राममंदिर, मशिदीपेक्षा आमच्या पोटाचा प्रश्न सुटणे महत्त्वाचे असल्याचेही ते म्हणाले. त्यासाठी आपण आधुनिक होणे गरजेचे आहे. या वेळी ऋचा बिरारी यांनी 'धन्य धन्य सुतार देवा' हे गीत सादर करुन उपस्थितांची दाद मिळविली.

पाच कलावंतांचा सन्मान
संमेलनात विविध समाजातील पाच कलावंतांचा सन्मान करण्यात आला. त्यात पापालाल पवार, वसंत आंबेकर, चंद्रकांत मोरे, जगदीश देवपूरकर, भारत रेघाटे यांचा समावेश होता. मान्यवरांच्या हस्ते त्यांना शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देण्यात आले. त्यानंतर स्वामी दिव्यानंद बापू (गुजरात) यांच्या हस्ते पंचरंगी ध्वजाचे रोहण करण्यात आले. यावेळी सुभाष अहिरे यांना समस्त गाडी लोहार समाजाच्यावतीने विश्वकर्मा पुराण लिहिलेले ताम्रपट देऊन समाजबांधवांतर्फे सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेदांत भेद नको, भक्तीत खोट नको

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वेदांत भेद नको व भक्तीत खोट नको, असे सांगत भगवान शंकरांनी तिसरा डोळा उघडला तर काय होते, याची कथा सांगत श्रृंगेरी शारदापीठाचे जगदगुरू शंकराचार्य प. पू. विधूशेखर भारती यांनी उपस्थितांना आशीर्वाद दिले.

शंकराचार्य न्यास, धर्मजागरण पीठ, श्री शृंगेरी मठ, शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्था, महर्षी गौतम गोदावरी वेद प्रतिष्ठान या शहरातील विविध संस्थांच्यावतीने श्रृंगेरी शारदापीठाचे जगदगुरू शंकराचार्य प. पू. विधूशेखर भारती स्वामी महाराज यांचा नागरी सत्कार करण्यात आला. गंगापूर रोड येथील शंकराचार्य न्यास संकुलातील कुर्तकोटी सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सनातन धर्माच्या उत्थान व प्रसारासाठी होत असलेल्या विजययात्रेसाठी जगदगुरू शंकराचार्य श्री श्री विधूशेखर भारती यांचे नाशिकला आगमन झाले असून, पंचवटीतील शृंगेरी मठात त्यांचे वास्तव्य आहे. दक्षिणाम्नाय श्री शारदा पीठ, शृंगेरी चे ३६ वे आचार्य जगदगुरू शंकराचार्य श्री श्री भारतीतीर्थ महास्वामीजी यांच्या कृपाशिर्वादाने त्यांचे उत्तराधिकारी विधूशेखर भारती यांनी कर्नाटकमधून विजययात्रेचा प्रारंभ केला आहे. ही यात्रा आता महाराष्ट्रात आली असून शंकराचार्य संकुल येथे प्रवचनाचा कार्यक्रम झाला.

यावेळी गायत्री यांनी स्वागतगीत सादर केले. शंकराचार्य न्यासाचे अध्यक्ष आशिष कुलकर्णी यांनी शंकराचर्यांचे स्वागत करून त्यांना न्यासाच्या कार्याबाबत माहिती दिली. शांतारामशास्त्री भानोसे यांनी शंकराचार्यांचा परिचय करून दिला. सन्मानपत्र वाचन व सूत्रसंचालन अतुल तरटे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

द्राक्ष निर्यातीसाठी धोरण ठरविणार

$
0
0

कृषिमंत्र्यांसह वाणिज्य मंत्र्याचे आश्वासन

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

द्राक्षाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगला भाव मिळावा यासाठी वाणिज्य मंत्रालयाने धोरण ठरवावे तसेच जिल्ह्यातील निर्यातदार द्राक्ष उत्पादकांचे २०१० या वर्षी झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी कृषी व वाणिज्य मंत्रालयाकडे केली आहे. खा. चव्हाण यांनी केंद्रीय कृषी मंत्री राधामोहनसिंह व वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली असून याबाबत धोरण ठरविणार असल्याचे आश्वासन मंत्र्याकडून देण्यात आले आहे.

जिल्ह्यातील द्राक्षाच्या प्रश्नाबाबत खासदार चव्हाण यांनी कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, दिंडोरी लोकसभा भाजपाचे विस्तारक अजित ताडगे, नाशिक जिल्हा भाजप संघटक बापूसाहेब पाटील, कैलास भोसले आदींसह द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसह दोन्ही कृषी मंत्री व वाणिज्य मंत्र्याची भेट घेतली उपस्थित होते. यावर दोन्ही मंत्र्याकडे बैठक झाली. याबाबत आंतरराष्ट्रीय बाजारातील नवीन व्हरायटी असलेल्या द्राक्ष उत्पादनासाठी पेटंट विकत घेऊन लागवड करणे तसेच सार्क देशांना निर्यात करणे कामी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येऊन यायाबबत लवकरच धोरण ठरविण्यात येईल, असे कृषी मंत्री, वाणीज्यमंत्री यांनी खा. चव्हाण यांना आश्वासन दिले.

एपेडा केंद्रीय कृषी प्राधिकरणाच्या चुकीमुळे २०१० या वर्षात अंदाजे १०० कोटी रुपयांचे नुकसान होऊनही निर्यातदार द्राक्ष उत्पादकांना नुकसानभरपाई मिळत नाही, याची माहिती यावेळी देण्यात आली. त्यावर वाणिज्य मंत्री प्रभू यांनी नुकसान भरपाई प्रस्तावातील त्रुटी दूर करून २०१० मध्ये नुकसान झालेल्या द्राक्ष उत्पादककांना भरपाई देण्यासाठी वाणिज्य मंत्रालयाने कार्यवाही सुरू केल्याचे प्रभू यांनी शिष्टमंडळास कळवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भोंदूबाबाचा भांडाफोड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भोंदूबाबा व त्याच्या दोघा साथीदारांना निफाड पोलिसांनी अटक केली. संशयितांविरोधात महाराष्ट्र नरबळी इतर अमानुष अनिष्ट व जादूटोणा प्रतिबंधक कायदा २०१३ कलम ३ भादंवि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकारात फिर्यादी महिलेने जीवावर उदार होऊन या प्रकारचा भांडाफोड करण्यासाठी प्रयत्न केला. यात तिला तिचे साथीदार अंधश्रद्धा विरोधात काम करणारे आणि छत्रपती सेनेचे तुषार गवळी, तानाजी शेलार, नीलेश शेलार, धीरज खोळंबे (रा. राणेनगर, नाशिक) यांनी महत्त्वाची साथ दिली. पीडित महिलेने पैशांचा पाऊस पाडण्याचा प्रकार आणि पूजेसाठी स्वतःला मागणी घातल्याची बाब आपल्या साथीदारांना सांगितली आणि या प्रकाराचा पर्दाफाश करण्याची योजना आखली.

याबाबत पीडित महिलेने निफाड पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. या महिलेची आणि संशयित भोंदूबाबा योगेश नागरे याची प्रसाद जाधव याने निफाड येथे १२ जानेवारी रोजी शिवपार्वती लॉन्स येथे भेट घडवून आणली. या भेटीत बाबाने महिलेला शुद्धीकरण विधी व पूजा याची माहिती देऊन १३ जानेवारीला बोलावले. ही बाब महिलेने साथीदारांना सांगितली. यानंतर पीडित महिला प्रसाद जाधव आणि डॉ. योगेश सोनार यांच्यासह नाशिक येथून निफाड येथे आले. शिवपार्वती लॉन्सजवळ बाबाच्या अल्टो गाडी (एमएच १४, ईएक्स १५७९) मध्ये पीडित महिला व बाबा हे बसले. बाबा आपल्यासोबत काहीतरी वाईट करणार हे लक्षात आल्याने महिलेने तिच्या सहकाऱ्यांना एसएमएस केला. ही बाब सहकाऱ्यांनी पोलिसांना कळवली. भोंदूबाबाला व उपस्थितांना पोलिस स्टेशनमध्ये घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी या सर्व प्रकारची माहिती पीडित महिलेने सांगितली. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी निफाड तालुक्यातील दोघांसह नाशिकमधील एकास ताब्यात घेतले. योगेश नागरे (शिवरे, ता. निफाड), योगेश सोनार (पवननगर, सिडको, नाशिक) प्रसाद जाधव (टाकळी विंचूर, ता. निफाड) या तिघांना सोमवारी पहाटे पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी ताब्यात घेतले.

-

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणवेश घोटाळ्याची चौकशी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतील शाळांमधील गणवेश खरेदीच्या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश महासभेने दिले असतानाच, आता राज्यसरकारनेही चौकशीचे आदेश दिले आहेत.

राज्य सरकारच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत महापालिकेच्या शाळांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला दोन गणवेश दिले जातात. सरकार यापूर्वी गणवेश खरेदीसाठी पालकांच्या बँक खात्यावर रक्कम देत होते. परंतु, ही प्रक्रिया क्लिष्ट असल्याने राज्य सरकारने यात बदल करून पुन्हा शालेय व्यवस्थापन समितीमार्फत करण्याचे आदेश दिले होते. यापूर्वी प्रतिगणवेश असलेला दर २०० रुपयांवरून ३०० रुपयांवर नेला होता. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला सहाशे रुपयांत गणवेश खरेदी करण्याचे आदेश शालेय व्यवस्थापन समितीला देण्यात आले. त्यानुसार महापालिकेने खरेदीची प्रकिया सुरू केली होती. परंतु, वाढलेल्या दराचा फायदा घेण्यासाठी पालिकेत विशिष्ट ठेकेदारांसाठी काही नगरसेवकांकडूनच लॉबिंग सुरू केले होते. ठेकेदाराने ३०० ऐवजी २०० रुपयांतच गणवेश दिल्याची चर्चा सुरू झाली. तत्कालीन अधिकाऱ्यांनीही मग या ठेका प्रकरणात वाजवीपेक्षा जास्त लक्ष घातल्याने पालिकेतील सर्व शाळांच्या गणवेश पुरवठा करण्याचे काम तीनच ठेकेदारांना देण्यात आले होते. शालेय व्यवस्थापन समितीवर दबाव टाकून विशिष्ट ठेकेदारांनाच काम दिले गेले. त्यामुळे या प्रकरणाबाबत नगरसेवकांकडूनच आरोप प्रत्यारोप होऊ लागले होते. गणवेश खरेदीत मोठी अनागोंदी झाल्याने गोरगरीब विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचा दावा करीत, गणवेशांचे लॅबमधून तपासलेले सॅम्पलही बोगस असल्याचा आरोप केला, तर गणवेश खरेदीत अटीशर्तींचा भंग झाला असून, ठराविक निर्देशांनुसार गणवेश खरेदी केली गेली नसल्याने या प्रकरणाची चौकशी करून तत्कालीन शिक्षणाधिकारी उपासनी, केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याची मागणी १९ ऑक्टोबर २०१८ रोजी झालेल्या महासभेत करण्यात आली होती. त्यावेळी तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मात्र शिक्षण विभागाला क्लीन चीट देण्याचा प्रयत्न केला होता. तसेच, कापडाच्या गुणवत्तेची चौकशी करण्याची तयारी सुरू केली होती. यात त्रुटी आढळली तर शालेय व्यवस्थापन समितीवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. तरीही अनेकांचे याबाबत समाधान झाले नाही. त्यामुळे थेट राज्य सरकाकडेच याबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्याची गंभीर दखल घेत, राज्याच्या शिक्षण विभागाने महापालिकेच्या शिक्षण विभागाला २३ हजार ४८८ मुलांसाठी घेतलेल्या गणवेशांची चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे वृत्त आहे. गणवेशाच्या कापडाची गुणवत्ता आणि दर्जा तपासला जाणार असल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

महासभेचा ठराव कुठे?

१९ ऑक्टोबर २०१८ रोजी झालेल्या महासभेत या विषयावर तब्बल दोन ते तीन तास चर्चा झाली होती. सभागृहनेते दिनकर पाटील यांच्यासह अनेक नगरसेवकांनी या खरेदीवरच संशय व्यक्त केला होता. त्यानुसार महापौर रंजना भानसी यांनी महासभेत याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. मात्र, हा आदेश कागदावरच राहिला आहे. महापौरांनी दिलेल्या आदेशाचे पुढे काय झाले याबाबत पालिका वर्तुळातच खमंग चर्चा आहे. महासभेत अचानक गाजलेले हे प्रकरण शांत कसे झाले, याबाबतची विचारणा आता नगरसेवकही करत आहेत. त्यामुळे सीमा हिरेंच्या तक्रारीने का होईना, सरकारला या खरेदीतल्या अनागोंदीची आठवण झाली असून, आता या चौकशीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे, आता महासभेच्या ठरावालाही पाय फुटण्याची शक्यता आहे.

पदाधिकाऱ्यांची जवळीक

महापालिकेच्या ११० शाळांपैकी ८० टक्के शाळांमध्ये तीन ठेकेदारांनी गणवेशाचा पुरवठा केला आहे. शालेय व्यवस्थापन समितीला गणवेश खरेदीचे स्वांतत्र्य असले तरी, संपूर्ण समितीला या तीन ठेकेदारांचे गणवेश कसे पसंत पडले, याबाबतची चौकशी केली जाणार आहे. या तीन ठेकेदारांसाठी पालिकेतील दोन पदाधिकाऱ्यांनी थेट शिक्षण विभागावर दबाव टाकल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ठेकेदार आणि पदाधिकाऱ्यांच्या सलगीमुळे आता शिक्षण विभागातील अधिकारी आणि शालेय समितीचे अध्यक्ष मुख्याध्यापक गोत्यात आले आहेत. कापडाच्या दर्जा आणि गुणवत्तेची तटस्थ चौकशी झाली तर, अनेकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाड पालिकेत राष्ट्रवादीचा राडा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

विरोधी पक्षांचे मत विचारात न घेता एकापाठोपाठ एक विषय मंजूर करणाऱ्या शिवसेनेच्या भूमिकेवर आक्षेप घेत सोमवारी मनमाड पालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत राडा केला. मुख्याधिकाऱ्यांसह सत्ताधारी पक्षाला धारेवर धरत समोरचे टेबल लाथाडल्याने पालिकेची सभा वादळी ठरली. थोड्यावेळानंतर सभेत मनमाड शहरात करंजवण धरण योजनेस, तसेच शहरात केटीवेअर बंधारे बांधण्यास मंजुरी हे दोन प्रमुख विषय सोमवारच्या पालिका सभेत मंजूर करण्यात आले.

मनमाड पालिकेची सर्वसाधारण सभा सोमवारी दुपारी नगराध्यक्षा पद्मावती धात्रक यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी बहुमतावर सगळेच विषय मंजूर करू नका, विरोधी पक्षांचे देखील मत विचारात घ्यावे, असा पवित्रा घेत आक्षेप नोंदवला. आरडाओरड करीत तसेच समोरची टेबले लाथाडत ट्री गार्डप्रश्नी नगरसेवक कैलास पाटील, अमजद पठाण यांनी पीठासनाकडे धाव घेतली. रुपाली पगारे, यास्मिन पठाण या नगरसेवकांनीदेखील सत्ताधाऱ्यांना खडे बोल सुनावले. मनमाड पालिकेत ट्री गार्ड खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी नगरसेवकांनी केला. गळ्यात या संदर्भातील बोर्ड अडकवून त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. तसेच डॉ. दिलीप मेनकर यांना ट्री गार्ड भेट देत जाब विचारला. या प्रश्नी चौकशी समिती नेमून सत्यता पडताळून पाहू असे आश्वासन डॉ. मेनकर यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुसऱ्या महायुद्धातील सैनिकांच्या सहाय्यात वाढ

$
0
0

जिल्ह्यातील चार सैनिक व ८६ विधवांना होणार लाभ

Gautam.Sancheti@timesgroup.com

नाशिक : दुसऱ्या महायुद्धा भाग घेणाऱ्या जिल्ह्यातील चार हयात सैनिक व ८६ सैनिकांच्या विधवांना यापुढे राज्य सरकारकडून सहा हजार रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे. सरकारने तीन महिन्यापूर्वीच यात वाढ केली असली तरी अद्याप हे अर्थसहाय्य मिळालेले नाही. त्यामुळे मार्च २०१७ पासून एकत्रित हे पैसे मिळणार आहेत. यापूर्वी हे अर्थसहाय्य तीन हजार होते.

१९३९ ते ४५ या कालावधीत हे दुसरे महायुद्ध झाले होते. तेव्हा भारतात ब्रिटिशांचे राज्य असल्याने भारतीय सैनिकांनी ब्रिटिशांच्या नेतृत्वाखाली या युद्धात सहभाग घेतला. १९३९ मध्ये युध्द सुरू झाल्यानंतर त्यात दोन लाख ब्रिटीश भारतीय सैनिक होते. युद्ध संपल्यानंतर या सैनिकांची संख्या ३० लाख झाली होती. या युद्धात एकूण ८७ हजार सैनिक ठार झाले. चार हजार सैनिकांना पराक्रमासाठी शौर्य पदके तर ३१ सैनिकांना व्हिक्टोरिया क्रॉस पदके मिळाली. ब्रिटीश भारतीय सैनिकांमध्ये भारतीय सैनिकांसह पाकिस्तान, बांगलादेश व नेपाळच्या गुरखांचा समावेश होता. नाशिक जिल्ह्यातील अनेक सैनिकांनीही या युद्धात सहभाग घेतला होता. त्यातील वाचलेल्या सैनिकांना केंद्र सरकारकडून कोणतीच मदत मिळत नसल्याने राज्य सरकारने १९८९ मध्ये ३०० रुपये अर्थसहाय्य देण्यास सुरुवात केली. २०११ मध्ये त्यात वाढ करून ते तब्बल तीन हजार रुपये इतके केले. आता सात वर्षांनंतर त्यात दुप्पट वाढ करून ६ हजार करण्यात आले आहे.

अशी आहे नोंद

पहिल्या युद्धात भाग घेणाऱ्या जिल्ह्यातील ९७ सैनिकांची नोंद होती. त्यातील ७ सैनिक मृत पावल्यानंतर आता ९० सैनिकांची नोंद दिसते. पैकी चार सैनिक आजही जिवंत असल्याची नोंद जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात आहे. त्यात हिरालाल धनराज भावसार, दत्तात्रय पुणतांबेकर, दत्तू मल्हारी पवार, जने कृष्णा भोसले यांचा समावेश आहे. उर्वरित ८६ सैनिकांच्या विधवा पत्नी हयात आहेत.

ब्रिटिशांकडून मिळते पेन्शन?

ब्रिटिशांकडून लढणाऱ्या पहिल्या महायुध्दातील सैनिकांना ब्रिटीशांकडून पेन्शन मिळत होती. दुसऱ्या महायुध्दातील सैनिकांनाही ही पेन्शन देण्यात येते. पण, जिल्ह्यातील या सैनिकांना ही पेन्शन मिळते का? याची माहिती मात्र जिल्हा सैनिक कार्यालाकडे नाही.

दुसऱ्या महायुद्धात सहभाग घेतलेल्या सैनिक व त्यांच्या विधवांना राज्य सरकारने सहा हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. यातील निधी अद्याप आला नसला तरी तो एकत्रित दिला जाणार आहे.

- विद्या रत्नपारखी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी

लोगो : सैन्यदल विशेष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वच्छतेला प्राधान्य

$
0
0

स्वच्छतेला प्राधान्य

केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत सध्या शहरांचे सर्वेक्षण सुरू आहे. केंद्राचे पथक ४ ते ३१ जानेवारी दरम्यान गुप्तपणे शहरांना भेटी देऊन तेथील स्वच्छतेची पाहणी करणार आहेत. त्यामुळे गमे यांनी सोमवारच्या बैठकीत स्वच्छ सर्वेक्षणाचाही आढावा घेतला. त्यात त्यांनी सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेबाबत सूचना केल्या. पथकाकडून अनेक ठिकाणांची पाहणी केली जाणार आहे. त्यामुळे सार्वजनिक स्वच्छतेला अधिक प्राधान्य देऊन नागरिकांनाही या स्वच्छता सर्वेक्षणाबाबत जनजागृतीच्या सूचना यावेळी दिल्या. सध्या स्वच्छतेचे काम जोमाने सुरू असले तरी त्यात महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही सहभाग वाढवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.

संघटनांचा आक्षेप

महापालिकेचे स्वच्छतेचे आऊटसोर्सिंग करण्याच्या घेतलेल्या निर्णयावर वाल्मीकी मेघवाळ मेहतर समाज संघर्ष समितीने आक्षेप घेतला आहे. महापालिकेने स्वच्छतेचे खासगीकरण रद्द केले नाही तर संपाचा इशारा दिला आहे. स्वच्छ सर्वेक्षण सुरू असल्याने ही बाब महापालिकेला परवडणारी नसल्याचे सांगत, खासगीकरणाची निविदा रद्द करण्याची मागणी सुरेश मारू यांनी आयुक्त राधाकृष्ण गमे आणि अतिरिक्त आयुक्त हरिभाऊ फडोळ यांच्याकडे केली आहे. त्यावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगररचनाची झाडाझडती

$
0
0

थेट कारवाईचा आयुक्तांनी दिला इशारा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या नगररचना विभागातील त्रुटी दूर करण्यासाठी बोलवलेल्या बैठकीत आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी प्रलंबित तक्रारींवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. नगररचना विभागाकडे या विभागाशी संबंधित सातशेहून अधिक तक्रारी प्रलंबित असल्याने सहायक संचालकांना धारेवर तर तातडीने अडचणी दूर करण्याच्या सूचना केल्या. कारभारात सुधारणा झाली नाही तर थेट कारवाईचा इशारा गमे यांनी दिला आहे.

शहरातील बांधकाम क्षेत्र अनेक जाचक अटी ‌‌व शर्तीच्या फेऱ्यात अडकले असतांनाच, नगररचना विभागाच्या संथ कामाचा फटका व्यावसायिकांना बसला आहे. ऑटो डीसीआर प्रणाली कशी तरी मार्गी लागत असतांना या विभागातील प्रलंबित तक्रारी मात्र सुटत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे गमे यांनी विभाग प्रमुखांच्या बैठकीतच नगररचना विभागाला धारेवर धरले. नगररचना विभागाचा आढावा घेताना प्रलंबित तक्रारींचे प्रमाण सर्वाधिक आढळून आले. त्यामुळे सातशेहून अधिक बांधकाम प्रकरणे प्रलंबित कशी, अशी विचारणाच त्यांनी यावेळी केली.

नगररचना विभागाशी संबंधित अतिक्रमणांच्या तक्रारी देखील न सोडविल्याने आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली आणि तक्रारी तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. विभागप्रमुखांनी अखर्चित निधी खर्च करण्यासाठी सादर केलेल्या यादीत प्राधान्याने करावयाच्या कामांना गती देण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कालिदासमध्ये अवतरणार ‘धगधगते शंभूपर्व’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

छत्रपती शंभूराजांची जीवनगाथा कथन करणारी व्याख्यानमाला, स्वराज्याच्या वंशजांशी थेट भेट, शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन व युद्धकला प्रात्यक्षिके असा भरगच्च उत्सव १८, १९ व २० जानेवारी रोजी, सायंकाळी पाच वाजता महाकवी कालिदास कला मंदिर येथे होणार आहे

नाशिक महानगरपालिका व संस्कृती नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजीराजे यांचा जीवनपट उलगडणाऱ्या 'धगधगते शंभूपर्व' या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यानमालेप्रसंगी शिवाजी महाराजांनी रायबाच्या गळ्यात घातलेली कवड्यांची माळ व वीर तानाजी यांची २६ किलोची तलवार नाशिककरांच्या दर्शनार्थ ठेवण्यात येणार आहे. २० जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता या दोन्ही ऐतिहासिक वस्तूंची रोकडोबा पटांगण ते कालिदास कलामंदिर यादरम्यान भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.

नगरसेवक शाहू खैरे यांच्या 'संस्कृती नाशिक' या संस्थेतर्फे, क्रांतीशाहीर प्रा. सचिन कानिटकर यांच्या तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानाद्वारे छत्रपती श्री संभाजी राजांचा जीवनपट प्रा. कानिटकर श्रोत्यांसमोर मूर्तिमंत उभा करतात. 'गाथा शिवरायांची' या व्याख्यानमालेमुळे ते नाशिककरांना परिचित आहेत.

या व्याख्यानमालेस प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती शिवरायांच्या सेनापतींच्या आजच्या पिढीचे प्रतिनिधी, म्हणजेच स्वराज्याचे वंशज उपस्थित राहणार आहेत. तानाजी मालुसरे यांच्या वंशज शीतल मालुसरे, हंबीरराव मोहिते यांचे वंशज विक्रमसिंह मोहिते, संताजी घोरपडे यांचे वंशज श्रीमान घोरपडे सरकार, धनाजी जाधव यांचे वंशज विक्रमसिंह राजे जाधवराव, हिम्मतबहाद्दर चव्हाण यांचे वंशज संग्रामसिंह चव्हाण यांचा याप्रसंगी बहुमान करण्यात येणार आहे.

शिवरायांच्या सुप्रसिद्ध कवड्यांच्या माळेचे दर्शन हे या उत्सवाचे आकर्षण ठरणार आहे. तानाजी मालुसरे यांचा मुलगा रायबा याच्या गळ्यात साक्षात शिवरायांनी बांधलेली कवड्यांची माळ व तानाजीची २६ किलो वजनाची तलवार नाशिककरांना या उत्सवात प्रथमच पाहायला मिळणार आहे. उत्सवादरम्यान रोज शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके व शस्त्रांचे प्रदर्शन भरणार आहे.

रामशेज किल्ल्यापासून क्रांतिज्योत

२० जानेवारी रोजी रामशेज किल्ल्यावरून मोटारसायकल रॅलीद्वारे शहरात आलेल्या क्रांतिज्योतीचे स्वागत गोदाघाटावरील ऐतिहासिक रोकडोबा हनुमान मंदिरात करण्यात येईल. दुपारी ३ वाजता रोकडोबा पटांगणातून शोभायात्रा निघेल. या शोभायात्रेत विविध खेळ, कसरती, मैदानी खेळांची प्रात्यक्षिके यांचा समावेश असेल. छत्रपतींनी रायबाला दिलेली ऐतिहासिक कवड्यांची माळ व तानाजी मालुसरे यांची २६ किलो वजनाची तलवार वाजत गाजत या शोभायात्रेतून सभास्थळी कालिदास कलामंदिर येथे नेण्यात येणार आहे.

व्याख्यानमालेस नाशिककरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन 'संस्कृती नाशिक'चे अध्यक्ष शाहू खैरे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ताई बामणेला सुवर्णपदक

$
0
0

नाशिक : पुणे येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया या शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत नाशिकच्या ताई बामणे हिने पुन्हा एकदा नाशिकची मान उंचावली असून, महिला गटात ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. ताई बामणे हिने ८०० मीटर अंतर २ मिनिटे १३ सेकंद व ३७ मायक्रो सेकंदात पूर्ण केले. ताई बामणेच्या या यशामुळे नाशिकच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. दरम्यान, तिची अर्जेंटिना येथे होणाऱ्या युथ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ऑलिम्पिक स्पर्धेसाठी खेळाडू तयार करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने सुरू केलेल्या 'खेलो इंडिया' या उपक्रमातून खेळाडूंचा शोध घेण्यात आला होता; त्यातून केंद्राने ताईची निवड केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नि‌ळवंडे कलाव्यासाठी एल्गार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील निळवंडे कालव्याचे बंद केलेले काम पुन्हा सुरू करावे. तसेच काम बंद करणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी निळवंडे कालवा कृती समितीच्या शेतकऱ्यांनी आंदोलन केले. कालव्या संदर्भातील अडचणी दूर करून, संबंधितांवर कारवाई करू, असे आश्वासन जलसंपदा विभागाने दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

निळवंडे कालवा कृती समितीतर्फे सोमवारी सकाळी त्र्यंबक रोडवरील जलसंपदा कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलनास पुकारण्यात आले. नगर जिल्ह्यातील निळवंडे कालव्यासाठी केंद्रीय जलआयोगाने केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला आहे. औरंगाबाद खंडपीठाने या प्रकल्पाला निधी देण्याचे आदेश दिले असूनही, या प्रकल्पाचे काम सुरू करण्यास बिलंब करण्यात येत आहेत. त्यामुळे नगर व नाशिक जिल्ह्यातील १८२ दुष्काळी गावांना याचा फटका बसत आहे. यामुळे शेतकऱ्यांत मोठा असंतोष असल्याने आंदोलन पुकारल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

प्रकल्पासाठी 'जलसंपदा'कडे २५० ते ३०० कोटींचा निधी शिल्लक आहे. या निधीतून अकोले तालुक्यातील २८ किलोमीटरच्या खडकाळ भागाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी आग्रही मागणी समितीने 'जलसंपदा'कडे अनेकदा केली. मात्र, काही लोकप्रतिनिधीच्या हस्तक्षेपामुळे हे काम पूर्ण झाले नसल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. प्रकल्पाच्या समस्येवर योग्य निर्णय व्हावा, यासाठी नाशिकच्या मुख्य जलसंपदा कार्यालयासमोर समितीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. सुमारे ४५० शेतकरी यात सहभागी झाले. यावे‌‌ळी समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे, नानासाहेब गाढवे, विठ्ठल पोकळे, कार्याध्यक्ष मच्छिंद्र दिघे, उपाध्यक्ष संजय गुंजाळ, गंगाधर राहणे, रमेश दिघे ,नामदेव दिघे, सोमनाथ दरंदले, बाबासाहेब गव्हाणे, उत्तम जोंधळे, तानाजी शिंदे, अशोक गांडूळे, दत्तात्रय आहेर आदी उपस्थित होते.

\Bउशिरा मिळाले आश्वासन \B

महिन्याभरात काळवंडे कालव्याच्या प्रकल्पात भेडसावणाऱ्या सर्व अडचणी दूर केल्या जातील. तसेच हे काम बंद करण्यासाठी दोषी असलेल्यांवर योग्य कारवाई केली जाईल, असे आश्वासन जलसंपदाचे मुख्य अभियंता कि. बा. कुलकर्णी यांनी दिले. त्यानंतर सायंकाळी उशिराने शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.

फोटो : सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॅप्पी स्ट्रीटची धमाल आता गोविंदनगरला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

झुम्बा, जादूचे खेळ, कॅलिग्राफीची नजाकत, जुन्या गाड्यांचा नजराणा अशा अनेक गोष्टी येत्या रविवारी म्हणजेच २० जानेवारी रोजी नाशिककरांना पुन्हा अनुभवता येणार आहेत. महाराष्ट्र टाइम्सच्या वतीने रविवारी (दि. २० जानेवारी) सकाळी ७ ते ९ या वेळेत गोविंदनगर येथे 'हॅप्पी स्ट्रीट'चे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र टाइम्स आणि 'हॅप्पी स्ट्रीट' हे जणू समीकरणच झाले आहे. दर्जेदार बातम्यांबरोबरच वाचकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन 'मटा'च्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून 'हॅप्पी स्ट्रीट'ने नाशिककरांना अक्षरश: वेड लावले आहे. लहान मुले, तरुण, ज्येष्ठ नागरिक अशा विविध वयोगटातील व्यक्ती हॅप्पी स्ट्रीटची वाट पाहत असतात. मागील आठवड्यात नाशिकरोड व त्याआधी व्हिरिडियन व्हॅली व कॉलेजरोड येथे झालेल्या 'हॅप्पी स्ट्रीट'ला नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दरवर्षी प्रमाणे यंदाही गोविंदनगर येथे 'हॅप्पी स्ट्रीट'चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी लहान मुलांसाठी विविध खेळ खेळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जादूचे प्रयोगदेखील होणार आहेत. क्लासिकल व वेस्टर्न म्युझिक बॅँडद्वारे विविध गाणी सादर केली जाणार आहेत. कॅलिग्राफीचे विविध प्रकार शिकायला मिळतील. झुम्बाच्या तालावर थिरकताना शरीर फिट ठेवण्याचा मंत्र मिळणार आहे. इंग्रजी, हिंदी, मराठी गीतांच्या चालीवर थिरकण्याची मजा यावेळी अनुभवता येईल.

कलाकारांना नाव नोंदविण्याची संधी

तुमची कला हॅप्पी स्ट्रीटवर सादर करण्यासाठी नावनोंदणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी कलाकारांनी महाराष्ट्र्र टाइम्सच्या ९४२२५१३५६९ या क्रमांकावर दुपारी १२ ते ४ या वेळेत संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४२ गाव पाणीयोजना बंद

$
0
0

चांदवड, नांदगाव तालुक्यात पाणीटंचाई

म. टा. वृत्तसेवा, चांदवड

चांदवड तालुक्यातील १६ व नांदगाव तालुक्यातील २६ गावांसाठी नागासाक्या धरणावरून सुरू असलेली ४२ गाव पाणीपुरवठा योजना गेल्या पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा योजना पुन्हा बंद पडल्याने महिलांना हंडाभर पाण्यासाठी मैलोंमैल भटकंती करावी लागत आहे.

ही योजना थकित विजेच्या बिलापोटी बंद होती. गावातील जनतेच्या आंदोलनानंतर जाग आलेल्या जिल्हा परिषद प्रशासनाने योजनेच्या थकित वीजबिलाचा भरणा केला. त्यानंतर सुरू झालेली योजना कशीबशी दोन महिने सुरू होती. मात्र आता पुन्हा बंद पडली आहे. तालुक्यातील पूर्व भागातील कानडगाव, कुंदलगाव, दहेगाव, वाद, वराडी, निमोण, दरेगाव, डोणगाव, मेसनखेडे-खुर्द, मेसनखेडे-बुद्रुक, शिंगवे, कातरवाडी, वडगावपंगु, वागदर्डी, रापली, भडाणे आदी गावांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. या गावांमधील नदी-नाले कोरडेठाक असून, विहिरींनी तळ गाठला आहे. गावातील नागरिकांना गावातील ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीला थोडेफार पाणी शिल्लक आहे, तेथे हंडाभर पाण्यासाठी देखील महिलांना जीवाचे रान करावे लागत आहे. नागरिकांचा दिवसेंदिवस रोष वाढत चालला असून, काही गांवांमध्ये महिलांना हंड्डा मोर्चा काढून प्रशासनाला जाग आलेली नाही.

नांदगाव पंचायत समितीत बैठक

४२ गावांना पाणीपुरवठा बंद असल्यामुळे प्रशासनाने तातडीने ४२ पाणीपुरवठा समितीची बैठक घेतली. या बैठकीत समितीने जमा झालेला पैसा नक्की कुठे खर्च केला, असा संतप्त सवाल केला. तसेच खर्चाचा सविस्तर माहित देण्याची मागणी करण्यात आली. समिती व प्रशासनाच्या समन्वयासाठी दर महिन्याला मासिक बैठक घेण्याचा प्रस्ताव सर्वानुमते मान्य करण्यात आला. तसेच झालेल्या खर्चाचा तपशील पुढील बैठकीत सादर करण्याचे अध्यक्ष बापू जाधव व सचिव विस्तार अधिकारी विजय जाधव यांनी मान्य केले. या बैठकीसाठी नांदगावचे गट विकास अधिकारी, पाणीपुरवठा समितीचे उपाध्यक्ष तथा दरेगावचे सरपंच अमोल देवरे, सहसचिव सुनील पाटील उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मिळाला फिटनेसचा मंत्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हिंदी मराठी गाण्यांच्या तालावर होणारा नृत्यरुपी व्यायाम, तसेच ध्यान अन् योगासनांद्वारे महिलांना फिटनेसचे धडे देण्यात आले. 'मटा कल्चर क्लब' आयोजित 'झुम्बा आणि पॉवर योगा' कार्यशाळेला महिलावर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यशाळेत सहभागींना नृत्य आणि योगासनांद्वारे फिट राहण्याचा गुरुमंत्र देण्यात आला.

व्यायामासाठी नवे ट्रेंड येत असून, सध्या झुम्बा या व्यायाम प्रकाराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. परंपरागत योगसाधनेचेही महत्त्व आजच्या पिढीला समजू लागले असून, योगा शिकण्यासाठी नागरिक पुढाकार घेत आहेत. बदलत्या जीवनशैलीत फिटनेस राखता यावा, यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब' तर्फे २ ते १६ जानेवारी या कालावधीत 'झुम्बा आणि पॉवर योगा' कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महात्मानगर येथील 'द फिटनेस स्टुडिओ बाय सई संघई' या ठिकाणी सकाळी ७ ते ८ व ८ ते ९ आणि सायंकाळी ५ ते ६ व ६ ते ७ या वेळेत ही कार्यशाळा घेण्यात आली. सई संघई यांनी झुम्बा आणि योगाचे धडे सहभागार्थींना दिले. बदलत्या जीवनशैलीत झुम्बा आणि योगाचे महत्त्व वाढत असून, व्यायामासोबतच हा उत्साही राहण्याचा मंत्र असल्याचे सई संघई यांनी सहभागींना सांगितले. यावेळी हिंदी मराठी गाण्यांच्या तालावर झुम्बा नृत्याद्वारे व्यायाम करवून घेतानाच, प्राणायम आणि आसनांद्वारे योगाचे महत्त्व विशद करण्यात आले. महिलावर्गासह पुरुषांनीही या कार्यशाळेत सहभाग घेतला. दररोज एक ते दीड तास व्यायाम केल्यास केवळ फिटनेस नाही तर बॉडी टोनिंग, चेहऱ्यावरील तजेलता, शरिराचा हलकेपणा, ताजेपणा या सर्वच पद्धतीने लाभ होऊ शकतो, असे संघई यांनी सहभागींना सांगितले. या कार्यशाळेतून महिलांनी फिटनेसचा मंत्र जाणून घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अजित पवार-भुजबळ आज ओझरमध्ये

$
0
0

अजित पवार-भुजबळ आज ओझरमध्ये

निफाड : पिंपळगाव बसवंत येथील स्व. अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेचा ओझर शाखा उद्घाटन समारंभ मंगळवारी (दि. १५) माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते आणि छगन भुजबळ यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे. मकरसंक्रांतीचा मुहूर्त साधत सायंकाळी चार वाजता भगवा चौक, ओझर मिग येथे हा कार्यक्रम होणार आहे. माजी आमदार दिलीप बनकर हे या संस्थेचे संस्थापक असून राजकीय प्रतिस्पर्धी आमदार अनिल कदम यांच्या गावात या शाखेचे उद्घाटन होत आहे. राष्ट्रवादीचे नेते या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याने या कार्यक्रमाकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परिवर्तन यात्रेद्वारे राष्ट्रवादीचे कूच!

$
0
0

जिल्ह्यात १६ व १७ जानेवारीला होणार सहा सभा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काढण्यात आलेली परिवर्तन यात्रा १६ व १७ जानेवारी रोजी जिल्ह्यात सहा ठिकाणी जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत सभेचे आयोजन केले जाणार आहे.

विविध प्रश्न घेऊन सरकारविरुद्ध एल्गार पुकारत ही यात्रा १० जानेवारीपासून रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन सुरू झाली. पहिली सभा महाडच्या ऐतिहासिक चवदार तळ्याच्या ठिकाणी झाली. त्यानंतर पाच दिवस ही यात्रा विविध ठिकाणी गेली. आता ही यात्रा १६ व १७ जानेवारी रोजी नाशिक जिल्ह्यात येणार आहे. जिल्ह्यातील विविध सहा ठिकाणी सभा होणार आहेत. या यात्रेत सरकारचा भ्रष्टाचार, अनेक गंभीर चुका, आतापर्यंत झालेल्या घोटाळ्यांचे आरोप, खोटी कर्जमाफी, दुष्काळ हाताळण्यात आलेले अपयश, नागरी प्रश्न, चार वर्षात पेट्रोल-डिझेल, गॅसची दरवाढ मुद्दे घेण्यात आले आहेत. या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन यात्रा यशस्वी करावी असे आवाहन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, लोकसभा मतदारसंघ अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी केले आहे.

अशी असेल यात्रा

परिवर्तन यात्रा बुधवार (दि. १६) सिन्नर येथील हुतात्मा चौक येथे दुपारी ११ वाजता सभा होईल. त्यानंतर इगतपुरी तालुक्यातील घोटीमधील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे ३ वाजता तर सिडकोतील पवननगर स्टेडियम येथे सायंकाळी ६ वाजता सभा होणार आहे. याशिवाय गुरुवार (दि. १७) दिंडोरी येथे दुपारी ११ वाजता, सायखेडा येथे दुपारी ३ वाजता सभा होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता मनमाडमधील आययूडीपीतील महर्षी वाल्मीकी स्टेडियम येथे जिल्ह्यातील शेवटची परिवर्तन सभा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन नगरसेवकांची ‘वनहक्क’वर नियुक्ती

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आदिवासींच्या वनहक्क दाव्यांबाबत सरकारने गठीत केलेल्या जिल्हा वनहक्क समितीत महापालिकेकडून तीन नगरसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे सुरेश खेताडे, पुंडलिक खोडे, सरिता सोनवणे यांची या समितीवर वर्णी लागली आहे.

महासभेच्या ठरावानुसार ही नियुक्ती झाली असून तीन नगरसेवक या समितीवर महापालिकेचे प्रतिनिधित्व करणार आहेत. आदिवासींच्या वनहक्क दाव्यांच्या निपटारा करण्यासाठी राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात वन हक्क समिती स्थापना केली आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत ग्रामीण, नागरी क्षेत्राचेही प्रतिनिधी असतात. त्यानुसार महापालिका हद्दीतून या समितीवर तीन जणांची नियुक्ती केली जाते. महापालिकेच्या कोट्यातील या तीन जागा अनेक दिवसापासून रिक्त होत्या. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात महापालिकेला पत्र पाठवून समितीवर सदस्याची नियुक्ती करण्याचा मागणी केली होती. त्यानुसार महासभेने ठराव करत या समितीवर सुरेश खेताडे, पुंडलिक खाडे व सरिता सोनवणे अशा तीन जणांची शिफारस केली आहे. त्यामुळे या तीन सदस्यांना महापालिका कार्यक्षेत्रासंदर्भातील वनहक्क दाव्यांसदर्भात पाठपुरावा करता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोवर-रुबेलाचा विरोध मावळला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गोवर-रुबेला लसीकरणाला शहरातील उर्दू शाळांनी दर्शविलेला विरोध अखेर मावळला आहे. पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मुस्लिम समाजातील धर्मगुरू, समाजसेवकांसह शाळा प्रशासनाच्या प्रतिनिधींसोबत सोमवारी झालेल्या बैठकीत शहर-ए-खतीब आणि धर्मगुरूंनी त्यास संमती दिली असून, शुक्रवारच्या नमाजावेळी लसीकरणाबाबत पालकांना आवाहन केले जाणार आहे. पुढील तीन दिवस मुस्लिमबहुल भागात लसीकरणाबाबत जनजागृती मोहीम राबवली जाणार असून, शनिवारी(दि. १९) ३५ उर्दू शाळांमध्ये लसीकरणाची मोहीम राबवली जाणार आहे.

मनपा कार्यक्षेत्रात २७ नोव्हेंबरपासून गोवर-रुबेला लसीकरण ही मोहीम सुरू असून, याअंतर्गत ४ लाख ९० हजार २१८ बालकांना लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या मोहिमेसाठी नेमलेल्या 'सिटी टास्क फोर्स'ची आढावा बैठक गेल्या आठवड्यात आयुक्त गमे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात उर्दू शाळांकडून या मोहिमेला होणाऱ्या विरोधाची माहिती समोर आली आहे. या मोहिमेविरोधात राज्यभरात अफवांचे पीक पसरले असून, लस दिल्यानंतर बालकांना अपाय होत असल्याच्या वावड्यांमुळे राज्यातील काही शाळांमध्ये लसीकरणास विरोध झाला आहे. त्यामुळे ३५ शाळांमधील १६ हजार ८४ बालकांपैकी अवघ्या ६२९५ बालकांनाच लस देण्यात आली होती. दोन शाळांना लसीकरणाला थेट विरोध केला होता. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी आयुक्त गमे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी आयुक्तांच्या दालनात बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीस शहर-ए-खतीब इसामुद्दीन खतीब, धर्मगुरू शातीन अमरुद्दीन खतीब, नगरसेवक शाहीन मिर्झा, समिना मेमन, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. अब्बास निसम, वैद्यकीय अधिकारी डॉ.राहुल गायकवाड यांच्यासह ३३ शाळांचे मुख्याध्यापक आणि केंद्र प्रमुख उपस्थित होते. यावेळी डॉ. अब्बास निसम यांनी या लसीकरणाबाबत सादरीकरण केले. या लशीमुळे नंपुसकत्व येत नसून, मुलांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी लस आवश्यक असल्याचे सांगितले. या लशीबाबत शहर-ए-खतीब आणि धर्मगुरूंमध्ये असलेला गैरसमज दूर करण्यात आला. धर्मगुरूंच्या शंका दूर झाल्यानंतर त्यांनी लसीकरणाला होकार दर्शवला. त्यानुसार आता पुढील तीन दिवस मुस्लीम बहुल भागांसह शाळांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे. येत्या शुक्रवारी मशिदीमधून अजान तसेच नमाजावेळी पालकांना लसीकरण करून घेण्याबाबत आवाहन केले जाणार आहे. मदरशांमधूनही जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे. शनिवारी उर्दू शाळा तसेच मदरशांमध्ये लसीकरणाची मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती डॉ. राहुल गायकवाड यांनी दिली आहे.

७८ टक्के उद्दिष्ट पूर्ण

गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेअंतर्गत शहरात ४ लाख ९० हजार २१८ बालकांचे लसीकरण केले जाणार होते. आतापर्यंत या मोहीमेअंतर्गत ३ लाख ८३ हजार ९३४ बालकांचे लसीकरण झाले असून, ७८ टक्क्यांपर्यंत उद्दिष्ट साध्य झाले आहे. अद्याप एक लाख ६ हजार बालकांचे लसीकरण बाकी असून, २० जानेवारीपर्यंत उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे.त्यामुळे एका आठवड्यात लाखभर मुलांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट वैद्यकीय विभागाला गाठायचे आहे. त्यासाठी येत्या शुक्रवारी खासगी बालरोग तज्ञांच्या दवाखान्यांमध्येही लसीकरणाची मोहीम राबवली जाणार आहे. या ठिकाणी पालिकेची टीम उपलब्ध करून दिली जाणार आहे.

धर्मगुरू, नगरसेवकांसोबत लसीकरणाबाबत चर्चा झाली. त्यांच्या मनातील शंका दूर झाल्या असून, शहर-ए-खतीब यांनीही लसीकरणाबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यानुसार तीन दिवस जनजागृती मोहीम राबवून येत्या शनिवारी सर्व ३५ शाळांमध्ये लसीकरणाची मोहीम राबवली जाणार आहे.

- डॉ. राहुल गायकवाड, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images