Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नाट्यनृत्याविष्कारांचा बहर

$
0
0

'इंद्रधनुष्य'मध्ये रसिक मंत्रमुग्ध

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आवारात सुरू असलेल्या १६ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ युवक महोत्सव 'इंद्रधनुष्य' चा तिसरा दिवस गाजला तो विविध शास्त्रीय नृत्ये, भारतीय व पाश्चात्य गीत-संगीत, मुकाभिनय, मृद्कला, भिंतीचित्रे, वक्तृत्व व विविध विषयांनी सजलेल्या एकांकिकांनी. त्यामुळे राज्यातील विविध प्रांतातील लोककलांसोबतच भारतीय व पाश्चात्य अशा त्रिवेणी कलाविष्कारांच्या आस्वादाने रसिक समृद्ध झाले.

'इंद्रधनुष्य'च्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात 'ताक-धिना-धीन, धिना धिन धा'च्या स्वरांनी झाली. एकापेक्षा एक अशा सरस 'ताल से ताल मिला' अशा सादरीकरणांनी उपस्थित रसिक प्रेक्षकांना बसल्या जागेवरच ताल पद्धतीने ठेका धरण्यास भाग पाडले. विविध विद्यापीठातील १२ स्पर्धकांनी सादर केलेल्या नृत्यांपैकी कृष्ण-गोपिका, शिवशंकर भावप्रकट करणारे कथ्थक नृत्य, तीन ताल नृत्य यांनी मने जिंकली. याच सभागृहात दुपारी मुकाभिनय स्पर्धा झाली. त्यात १५ विद्यापीठांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी प्रामुख्याने भारतीय वीर जवानांचे शौर्य व त्याग, बेसुमार वृक्षतोड व कमी होत जाणाऱ्या पर्जन्यमानामुळे उद्भवलेला व वाढत जाणारा मनुष्य व वन्यप्राणी संघर्ष,प्रयत्नांती परमेश्वर असा यशाचा सकारात्मक संदेश देणाऱ्या मूकनाट्यांनी रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासोबत त्यांचे प्रबोधनही केले.

विद्यापीठातील यश इन सभागृहात 'इतके का पुतळे ?' या विषयावर वक्तृत्व स्पर्धा झाली. या स्पर्धेत १८ विद्यापीठाच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. सहभागी स्पर्धकांनी विषयास अनुसरून मराठी, हिंदी व इंग्रजी विषयातून आपले मत प्रदर्शित केले. विद्यापीठ प्रांगणातील ग्रंथालय व माहितीस्त्रोत केंद्रात सकाळी भिंतीचित्र रेखाटन स्पर्धा घेण्यात आली. त्यासाठी 'पर्यावरण व समृद्ध भारत' हा विषय देण्यात आला. त्यात १७ विद्यापीठाच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. येथेच दुपारी विषयमुक्त 'मृद्कला' मूर्तरूप स्पर्धा झाली. त्यात १७ विद्यापीठाच्या स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत स्पर्धकांनी संस्कृती, स्त्रीमुक्ती, वन्यप्राणी संघर्ष, क्रीडा आदी विषय हाताळले.

...

आधुनिक संगीताचा साज

विद्यापीठाच्या शैक्षणिक सभागृहात दिवसभर पाश्चात्य वाद्यवृंद, एकल व समूह गीत संगीताचा धुमधडाका सुरू होता. विविध प्रकारची विदेशी वाद्ये आणि त्यासोबत इंग्रजी गीतगायन यामुळे परिसरास आधुनिक संगीताचा साज चढला होता. या स्पर्धेतील एकल गीत गायनात ९,तर समूह गीत गायनात १० विद्यापीठांनी सहभाग घेतला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत दादासाहेब फाळके सभागृहात एकांकिका स्पर्धा सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुरुवारी बारा गाड्यांची यात्रा

$
0
0

लोगो - सोशल कनेक्ट

गुरुवारी बारा गाड्यांची यात्रा

चंपाषष्ठीनिमित्ताने खंडेराव महाराज यात्रोत्सव

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अनेक वर्षांच्या पंरपरेनुसार यंदाही पेठरोड येथे अतिप्राचीन मल्हारी राजा देवस्थानच्या वतीने चंपाषष्ठीनिमित्ताने दोन दिवसीय खंडेराव महाराज यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रोत्सवात गुरूवारी (१३ डिसेंबर) पहाटे ५ वाजता खंडेराव महाराजांचा अभिषेक आणि महाआरती होणार असून सकाळी ८ वाजता घोडा-काठी आणि ध्वजांसहित खंडेराव महाराज यांची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.

गंगाघाटावरील खंडेराव कुंड ते पेठरोड परिसरातील खंडेराव महाराज मंदिर असा या मिरवणुकीचा मार्ग असणार आहे. दुपारी २ वाजता गणेश पूजन, होम आणि देवता पूजन होणार असून, संध्याकाळी ५ वाजता बारा गाड्या ओढण्यात येणार आहेत. या गाड्या ओढण्याचा मान देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र निकम यांच्याकडे असून, संध्याकाळी ७ वाजता खंडेराव महाराजांची महाआरती होणार आहे. संध्याकाळी ७.३० वाजेपासून भाविकांना चंपाषष्ठीनिमित्ताने महाप्रसादाचा लाभ घेता येणार असून, रात्री ९ वाजेपासून जागरण गोंधळाचा कार्यक्रम देवस्थानाच्या ठिकाणीच होणार आहे. शुक्रवारी (१४ डिसेंबर) सकाळी ७ वाजता पुन्हा खंडेराव महाराजांची पालखी काढण्यात येणार असून, सकाळी १० वाजता या यात्रोत्सवाची सांगता होणार आहे. या यात्रोत्सवाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष शाहू पवार, उपाध्यक्ष गणेश मते, खजिनदार मयूर डोंगरे यांसह इतर पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओझरला होणार शेतकरी प्रशिक्षण केंद्र

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

निफाड तालुक्यातील ओझर येथे ५९ लाख ७० हजार रुपये खर्च करून पहिले शेतकरी प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेने ई-निवदा प्रसिद्ध केली असून, नावीन्यपूर्ण कामातून हे शेतकरी केंद्र उभारले जाणार आहे. या शेतकरी प्रशिक्षण केंद्रात शेतकऱ्यांसाठी काय सुविधा असले याची माहिती अद्याप दिलेली नसली तरी हे शेतकरी केंद्र शेतकऱ्यांना उपयोगी ठरणार आहे.

शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी सरकारने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हे प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार आहे. आमदार अनिल कदम यांच्या प्रयत्नातून हे प्रशिक्षण केंद्र होणार आहे. त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यानंतर शासनाने नावीन्यपूर्ण योजनेतून हे काम दिले आहे. या शेतकरी प्रशिक्षण केंद्रासाठी दुसऱ्यांदा टेंडर काढण्यात आले आहे. या ई टेंडरची विक्रीसाठी ७ ते २१ डिसेंबर ही मुदत दिली आहे. त्यानंतर ७ ते २१ डिसेंबरपर्यंत टेंडर भरण्यासाठी मुदत दिली आहे. २९ डिसेंबर रोजी या निविदा उघडून त्यानंतर कंत्राटदाराला हे काम दिले जाणार आहे. या टेंडरला किती प्रतिसाद मिळतो यावरही बरंच अवलंबून आहे. या टेंडरसाठी ५ हजार फी असून, डीजिटल सही व निविदा फी व इसारा रक्कम ही इंटरनेट बँकिंगने भरायची अट आहे.

शेतकरी केंद्राची आवश्यकता

शेतकऱ्यांना शेतीविषयी शास्त्रीय माहिती देण्यापासून अनेक योजना त्यांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी शेतकरी केंद्र आवश्यक आहे. त्यातून बाजारभाव, शाश्वत शेती, आधुनिक शेती यासारख्या अनेक गोष्टी माहित असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे खते, जमिनीचा पोत, हवामान, आधुनिक तंत्राचा वापर याची माहितीसुध्दा या केंद्रातून देणे गरजेचे आहे.

''नावीन्यपूर्ण योजनेतून ओझरला शेतकरी प्रशिक्षण केंद्र होणार आहे. त्याची ई निविदा प्रसिद्ध झाली आहे. शेतकऱ्यांसाठी हे प्रशिक्षण केंद्र उपयोगी आहे.'' - अनिल कदम, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सुपर ब्रेन्स’मध्ये राज जैन प्रथम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स आणि टाइम्स ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या 'सुपर ब्रेन्स २०१८' या परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत बुद्धीमत्तेची चुणूक दाखविणाऱ्या विद्यार्थ्यांना घवघवीत बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. दहावीच्या गटातून राज जैन याने लॅपटॉप हे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले, तर प्रतीक पुरी हा विद्यार्थी टॅब या दुसऱ्या बक्षिसाचा मानकरी ठरला.

गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारकात सायंकाळी हा बक्षीस समारंभ पार पडला. यावेळी व्यासपीठावर आयआयटीयन्स पेसचे सुमेन्द्र श्रीवास्तव, सुनील कुमार यांच्यासह प्रदीप नहार, अंकुर पांडे आदी मान्यवर उपस्थित होते. भविष्यात देशाला चांगले व कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने टाइम्स ग्रुपच्या वतीने 'सुपर ब्रेन्स' परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. आयआयटीयन्स पेस या स्पर्धेचे नॉलेज पार्टनर होते. आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या परीक्षेत ७०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

दहावीच्या गटात राज जैन प्रथम बक्षिसाचा, तर प्रतीक पुरी हा द्वितीय क्रमांकाच्या बक्षिसाचा मानकरी ठरला. गार्गी बक्षी या विद्यार्थिनीला अॅमेझॉन किंडल हे तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. नववीच्या गटात वेदांत पाटील (प्रथम), अनन्या बाघेल (द्वितीय), तर उदयन पवार यास तृतीय क्रमांकाचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. आठवीच्या गटात ध्रुव वर्मा (प्रथम), सिध्दी गुंजाळ (द्वितीय) आणि इशान गाढवे (तृतीय) यांनी बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. अनुक्रमे ११ हजार रुपये, आठ हजार रुपये व पाच हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. आयआयटीयन पेसच्या काउंसेलर मृणाल कापसे यांनी विजेत्यांची नावे जाहीर केली. पहिल्या १० उत्तम गुण प्राप्त करणाऱ्या स्पर्धकांना गिफ्ट व्हाऊचर्स, तर टॉप १०० स्पर्धकांना आकर्षक स्कॉलरशिप देण्यात येणार आहे.

यावेळी सुनील कुमार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आयआयटीमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी जेईईच्या स्पर्धेत ३६० पैकी ३६० गुण मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवायला हवे. या परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी शक्य तेवढ्या लवकर तयारी सुरू करणे महत्वाचे ठरते, असा कानमंत्र दिला. आयआयटी प्रवेश परीक्षेसह जेईई, नीट, एनटीएसई, केव्हीपीवाय, होमीभाभा, ऑलिंपियाड या परीक्षांमध्ये चमकदार यश मिळविण्यासाठी काय तयारी करायला हवी याची माहिती त्यांनी दिली. सृजन कन्सल्टंटचे संस्थापक शंतनु गुणे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जीवनात उत्तुंग यश प्राप्त करण्यासाठी ध्येय निश्चित करून त्या दिशेने वाटचाल करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यशस्वी होण्यासाठी सब कुछ चलता है ही मानसिकता झटका, असे आवाहन त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराष्ट्र केसरीसाठी२० कुस्तीपटूंची निवड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिक शहर तालिम संघाच्या मखमलाबाद येथील जय बजरंग तालिम संघातर्फे रविवारी (दि. ९) महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत लाल मातीवरील कुस्ती प्रकारात १० आणि मॅटवरील कुस्ती प्रकारात १० अशा २० कुस्तीपटूंची निवड करण्यात आली.

मखमलाबाद येथे ही निवड चाचणी घेण्यात आली. जालना येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत हे निवड झालेले कुस्तीपटू सहभागी होतील. आमदार बाळासाहेब सानप यांच्या हस्ते हनुमानाच्या प्रतिमेचे पूजन करून या निवड चाचणीस प्रारंभ झाला. जिल्हाभरातून शेकडो कुस्तीगिरांनी या निवड चाचणीस हजेरी लावली होती. या चाचणी प्रसंगी नगरसेवक जगदीश पाटील, माजी नगरसेवक संजय चव्हाण, दामोदर मानकर, हिरामण वाघ, जय बजरंग तालिम संघाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गेल्या सायकली कुणीकडे?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकची 'सायकल सिटी' ओळख कायम व्हावी यासाठी 'स्मार्ट सिटी'अंतर्गत शहरात मोठ्या थाटामाटात सायकल शेअरिंग प्रकल्प सुरू करण्यात आला. महापालिकेकडून ऑक्टोबर महिन्यात सुरू करण्यात आलेल्या या प्रकल्पाचा दोन महिन्यातच पूर्णतः गोंधळ उडाला आहे. शेअरिंग सायकली आहेत, पण दिसत नसल्याची चर्चा शहरात रंगत आहे. शेअरिंग सायकलचे कंट्रोल असणाऱ्या हेक्सी अॅपवर शेअरिंग सायकल मोठ्या संख्येने दिसत असून, वास्तवात सायकल पॉइंटवर ती उपलब्ध नसल्याचे दिसून येते. यामुळे सायकलप्रेमी नाशिककरांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होऊ लागला आहे.

शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील भार कमी करण्यासाठी महापालिकेने शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत तब्बल १०० ठिकाणी 'पब्लिक बायसिकल शेअरिंग' या प्रकल्पाचे लोकार्पण १० ऑक्टोबर रोजी केले. दोन महिन्यांतच या प्रकल्पाचा बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे. शहरात डॉकिंग स्टेशनवर (सायकल पॉइंट) अल्प प्रमाणात सायकली उभ्या असल्याचे दिसते. काही ठिकाणच्या सायकली नादुरूस्त झाल्या आहेत. या सायकलींची देखभाल होत नसल्याचे दिसून येत आहे. सायकल वापरण्यासाठीचे हेक्सी अॅप एक लाखांहून अधिक नागरिकांनी डाऊनलोड केले असून, त्यावर दाखविल्या जाणाऱ्या सायकली मात्र प्रत्यक्ष त्या ठिकाणी नसल्याचे दिसते. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या या प्रकल्पाचा लाभ घेण्याची इच्छा असूनही, नागरिकांचा हिरमोड होत आहे.

घराजवळ देतात सोडून

महात्मा नगर क्रिकेट ग्राउंड, जेहान सर्कल, गोल्फ क्लब, राजीव गांधी भवन, कृषीनगर जॉगिंग ट्रॅक या सायकल पॉइंटवर कायम चार ते सहा सायकली उभ्या असल्याचे दिसते. यासंदर्भात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, या पॉइंटवरील सायकल घेऊन गेलेली व्यक्ती दुसऱ्या पॉइंटवर सायकल लावत असल्याचे दिसते. पहाटे ४ ते ६ च्या सुमारासही या पॉइंटवर फक्त चार ते पाच सायकली उभ्या असतात. त्यामुळे या ठिकाणच्या सायकली जातात तरी कुठे, हा प्रश्न उपस्थित होत आहे. सायकल पॉइंटवर सायकल पार्किंग करण्याऐवजी घराच्या परिसरात सायकल पार्किंगला प्राधान्य दिले जात असल्याचे सध्या दिसत असून, सायकल पॉइंटव्यतिरिक्त इतरत्र सायकल पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

\Bतुटक्या सायकली बेवारस

\Bशहरातील अनेक ठिकाणी या सायकली बेवारस सोडून दिलेल्या आढळतात. गंगापूर रोडवरील पोलिस आयुक्तालय कार्यालयाच्या समोरील बस स्टॅँडच्या मागे गेल्या आठ दिवसांपासून एक सायकल मोडक्या अवस्थेत तशीच सोडून देण्यात आली आहे. गणेशवाडी आणि गोल्फ क्लब मैदान येथील सायकल पॉइंटवर उभ्या असलेल्या एका सायकलचे सीट तुटल्याचे दिसते आहे. या मोडक्या आणि बेवारस सायकलींकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे. \B

'या' पॉइंटवर एकही सायकल नाही

\Bप्रमोद महाजन गार्डन, पशु वैद्यकीय रुग्णालय आणि मॅरेथॉन चौक या शेअरिंग सायकल पॉइंटवरील सायकल गायब झाल्याचे चित्र आहे. पहाटे ४.३०, सकाळी ६, सकाळी १०, दुपारी २, संध्याकाळी ५ आणि रात्री ११ वाजता या पॉइंटवर गेले असता, कोणतीही सायकल दिसत नाही. जुना गंगापूर नाका ते अशोक स्तंभ परिसरातील एकाही पॉइंटवर सायकल उपलब्ध होत नसल्याने सायकली कुठे गायब झाल्या, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिका प्रशासनाचे सायकल शेअरिंग प्रकल्पाकडे संपूर्णतः दुर्लक्ष होत असून, ट्रॅकिंग सिस्टिमवर योग्य नियंत्रण नसल्याने सायकल पॉइंटवरील सायकली गायब होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

\Bतरुणांकडून अधिक वापर

\Bअशोक स्तंभ, जुना गंगापूर नाका, कॉलेज रोड, पंडित कॉलनी, विद्या विकास सर्कल या परिसरात बाहेरगावाहून शिक्षण आणि नोकरीसाठी आलेले तरुण मोठ्या संख्येने राहतात. तसेच या परिसरात कॉलेज व खासगी होस्टेलचे प्रमाणही अधिक आहे. या विद्यार्थ्यांकडे वाहने नसल्याने ते शेअरिंग सायकलचा वापर मोठ्या प्रमाणावर करीत असल्याचे दिसून येते. कॉलेज, क्लास आणि नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी या सायकलचा वापर करत असल्याचे हे विद्यार्थी सांगतात. पण ही तरुण मंडळी सायकल पॉइंटवर पुन्हा सायकल आणून उभी करणे टाळत असल्याने या ठिकाणच्या पॉइंटवरील सायकलची संख्या कमी असल्याचे दिसते.

शेअरिंग सायकल हा अतिशय चांगला प्रकल्प असून, व्यायामासह जवळपासच्या कामांसाठी या सायकलींचा उपयोग होतो. नाशिककरांच्या हितासाठी राबविण्यात आलेला हा प्रकल्प कायमस्वरुपी जतन करण्याची जबाबदारी सर्वांची आहे.

- कैवल्य एखंडे, सायकल वापरकर्ता

कॉलेज आणि क्लासमध्ये जाण्यासाठी शेअरिंग सायकलचा फायदा होतो. अतिशय अल्प किमतीमध्ये चांगल्या दर्जाची सायकल वापरण्यास मिळते. पण अनेक सायकल पॉइंटवर सायकली उपलब्ध होत नाहीत. सायकल नेल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी किंवा इतर पॉइंटवर उभी करण्याची जबाबदारी प्रत्येकाने कटाक्षाने पाळायला हवी.

- सूरज बोरसे, सायकल वापरकर्ता

जवळपासच्या ठिकाणी जाण्यासाठी गाडीचा वापर करण्यापेक्षा स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू करण्यात आलेला उपक्रम स्तुत्य आहे. कुठल्याही सायकलिस्टसाठी शेअरिंग सायकल ही नवीन संकल्पना फायदेशीर आहे.

- वैभव दीक्षित, जॉगर

शहरात सुरू करण्यात आलेला शेअरिंग सायकलचा उपक्रम कौतुकास्द आहेत. यामुळे व्यायामाच्या दृष्टीने नागरिक मोठ्या प्रमाणात सायकलचा वापर करतात. दररोज ट्रॅकवर फिरायला येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात सायकलिस्ट सायकलचा उपयोग करताना दिसतात.

- अभिराम भोळे, जॉगर

शेअरिंग सायकलचा आम्हाला फायदा होत असून, सकाळी सायकल पॉइंटवर सायकल्स असतात. मात्र, वर्दळ वाढल्यानंतर पॉइंटवरील सायकलची संख्या कमी होत जाते. सायकल वापरणाऱ्यांचे प्रमाण अधिक असून, होस्टेलच्या विद्यार्थ्यांमध्ये या सायकली वापरण्याचे प्रमाण अधिक आहे.

- नीरज बोरस्ते, सायकल वापरकर्ता

शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असताना, शेअरिंग सायकलचा नवा पर्याय अतिशय उत्तम आहे. व्यायामासोबतच इंधन बचतीसाठीदेखील याचा फायदा होत असून, नाशिककरांनी या शेअरिंग सायकलचा योग्य वापर करायला हवा. अनेकदा सायकल पॉइंटवर सायकल्स उपलब्ध होत नसल्याने नागरिकांचा हिरमोड होत आहे.

- नरेंद्र झाडगे, सायकल वापरकर्ता

सायकल शेअरिंगचा प्रोजेक्ट सुरू झाल्यापासून नागरिकांमध्ये उत्साह आहे. पण ज्या संख्येने सायकल पॉइंटवर सायकल उभ्या असायच्या, ती संख्या आता कमी होऊ लागली आहे. अनेकजण घराजवळ तसेच कामाच्या ठिकाणी कुठेही सायकल उभी करत असल्याने सायकल पॉइंटवर सायकल उपलब्ध होत नाही.

- रमन साळुंके, जॉगर

शालेय विद्यार्थ्यांपासून तर ज्येष्ठांपर्यंत सर्वजण शेअरिंग सायकलचा वापर करत आहेत. व्यायामासोबतच कामावर, कॉलेजमध्ये तसेच शाळेत जाण्यासाठी या सायकलचा वापर होत आहे. या प्रोजेक्टमुळे नाशिककरांना फायदा होत असून, त्याची जबाबदारी नाशिककरांनी देखील पेलण्याची गरज आहे.

- निखील गायकवाड, जॉगर

(संकलन - सौरभ बेंडाळे, कल्पेश उघडे, हर्षल भट)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंगात रंगली रंगोत्सव स्पर्धा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ज्येष्ठ निसर्गचित्रकार स्व. शिवाजीराव तुपे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबाबत यथोचित आदर व्यक्त करण्यासाठी कला विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष निसर्गचित्रणाची स्पर्धा आयोजित करण्यात आली. यात जे. जे. स्कूल ऑफ आर्टचा विद्यार्थी अक्षय डांगे याने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक चित्रकला महाविद्यालयाचा विद्यार्थी सचिन काळे, तर तृतीय क्रमांक अभिनव कला महाविद्यालयाचा विद्यार्थी रूपेश सोनार याने मिळवला. उत्तेजनार्थ बक्षिसांमध्ये स्वप्नील पाने व राहुल सातपुते यांचा समावेश आहे.

स्पर्धेत प्रथम येणाऱ्यांसाठी प्रथम ७ हजार रुपये व प्रमाणपत्र, द्वितीय पुरस्कार ५ हजार व प्रमाणपत्र, तृतीय पुरस्कार ३ हजार व प्रमाणपत्र तर प्रत्येकी १ हजार रुपयांचे दोन उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आले. ही स्पर्धा महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी होती. याचवेळी स्केचिंग स्पर्धादेखील घेण्यात आली. त्यात हृषिकेश भंडारे प्रथम, हेमंत पाटील द्वितीय तर चिराग शिवांगे तृतीय क्रमांक पटकावला. त्यांना अनुक्रमे १०००, ७०० व ५०० रुपये अशी बक्षिसे देण्यात आली. स्केचिंग तसेच प्रत्यक्ष निसर्गचित्रण या दोन्ही स्पर्धांचे परीक्षण चित्रकार अमोल पवार यांनी केले. स्पर्धेत ११५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी मुंबई, औरंगाबाद, पुणे, नाशिक, मालेगाव, गुलबर्गा या ठिकाणाहून विद्यार्थी सहभागी झाले होते. पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुक्ता बालिगा यांनी केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आर्किटेक्ट संजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात योगेश गुप्ता या सायकलिस्टचा सत्कार चित्रकार पंडित सोनवणी यांच्या हस्ते करण्यात आला. अमोल पवार यांचा परिचय अशोक ढिवरे यांनी करून दिला. सूत्रसंचालन ज्योती अष्टपुत्रे यांनी केले. स्पर्धेसाठी संयोजक प्रसिध्द चित्रकार मुक्ता बालिगा, अनिल तुपे, अशोक ढिवरे, धनंजय गोवर्धने यांनी प्रयत्न केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालभवन प्रथम सत्र पारितोषिक वितरण

$
0
0

बालभवनतर्फे पारितोषिक वितरण

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक वाचनालय, नाशिक या संस्थेच्या साने गुरुजी कथामाला- बालभवनचा प्रथम सत्रातील विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ प्रा. सुभाष देशमुख व राहुल सूर्यवंशी यांच्या हस्ते सावानाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात झाला. याप्रसंगी सपान निर्मित सचिन शिंदे दिग्दर्शित व सुषमा देशपांडे लिखित 'व्हय मी सावित्रीबाई' हा एकल नाट्य प्रयोग दामिनी जाधव यांनी सादर केला.

यावेळी बोलताना प्रा. सुभाष देशमुख यांनी सार्वजनिक वाचनालयाचे बालभवन म्हणजे विद्यार्थ्यांचे कलागुण प्रदर्शित करण्याचे हक्काचे व्यासपीठच आहे. मुलांनी मोबाइलपासून दूर राहून उच्च ध्येय ठेवावे असे सागितले. राहुल सूर्यवंशी यांनी विद्यार्थांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळण्यासाठी बालभवन नेहमीच प्रयत्नशील असल्याचे दिसून येते हे नक्कीच अभिमानस्पद आहे असे सांगितले व कल ओळखून त्यांच्या आवडीप्रमाणे शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालभवनप्रमुख संजय करंजकर यांनी व सूत्रसंचालन गीता बागुल यांनी केले. यावेळी सावानाचे उपाध्यक्ष किशोर पाठक, नानासाहेब बोरस्ते, प्रमुख सचिव श्रीकांत बेणी, शंकरराव बर्वे, वसंत खैरनार, डॉ. शंकर बोऱ्हाडे, संगीता बाफणा, गिरीश नातू, समिती सदस्य अर्चना सूर्यवंशी, ज्योती फड, सुनील बस्ते, वैभव पाटील, कुशारे, बस्ते, प्रा. सोमनाथ मुठाळ, विविध शाळांचे विद्यार्थी व पालक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रेल्वेला ग्राहक न्यायमंचचा दणका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

चुकीचे तिकीट देऊन रिफंड देण्यासाठी उशीर लावल्यामुळे रेल्वेला ग्राहक न्यायमंचाने दणका देत १५ हजारांचा दंड ठोठावला आहे. या दंडात मानसिक त्रासापोटी दहा हजार रुपये व पाच हजार रुपये अर्जाच्या खर्चाचा समावेश आहे. त्याचप्रमाणे ११ महिन्यानंतर रिफंड केलेल्या रकमेवर व्याज देण्याचेही निर्देश दिले आहेत.

जेल रोडवरील आशियाना संकुल येथे राहणाऱ्या कल्याणक्रिष्ण एन. नायर यांनी मध्य रेल्वेच्या नाशिकरोड स्टेशनवरील तिकीट रिझर्व्हेशन सुपरवायझरविरुद्ध केलेल्या तक्रारीनंतर हा निकाल जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने दिला आहे. या तक्रारीत नायर यांनी म्हटले आहे की, नाशिकरोड स्थानकावर मी एर्नाकुलम एक्स्प्रेसचे रिझर्व्हेशन काढण्यासाठी गेलो होतो. तेथे मी, मुलगा व पत्नीचा रिझर्व्हेशन फॉर्म भरून त्यात एर्नाकुलम ते नाशिकरोड असे तिकीट मिळण्याचे नमुद केले. पण, मला एर्नाकुलम ते हजरत निझामुद्दीन दिल्ली असे ७१२० रुपयांचे तिकीट देण्यात आले. त्यामुळे मला २६०० रुपये जास्त मोजावे लागले. सदरची रक्कम क्रेडिट कार्डमधून दिली होती. ही गोष्ट मी बुकिंग करणाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तिकीट रद्द केले. मात्र, तिकिटाची रक्कम परत करण्यासाठी मोठी प्रक्रिया असून, वेळ लागेल असे सांगितले. त्यानंतर वारंवार त्यासाठी पत्रव्यवहार करावा लागला. चकरा माराव्या लागल्या.

रेल्वेची बाजू

या तक्रारीनंतर रेल्वेने आपली बाजू मांडताना सांगितले की, रेल्वेने अशा प्रकारणात न्यायनिवाडा करण्यासाठी रेल्वे ट्रिब्यूनल आहे. त्यामुळे न्यायमंचास ही केस चालविण्याचा अधिकार नाही. पण, न्यायमंचाने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला देत ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ च्या कलम ३ नुसार प्रस्तुत केस चालवण्याचा अधिकार असल्याचे सांगितले. त्यानंतर न्यायमंचाने या तक्रारीवर हा निकाल दिला. या निकालात सेवा देण्यास रेल्वेने कमतरता केली असून रेल्वे प्रशासनाने भविष्यात घडणाऱ्या यासारख्या घटनांची त्वरित दखल घेऊन तत्काळ रिफंड द्यावा, असे सांगितले. हा निकाल न्यायमंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्या प्रेरणा काळुंखे-कुलकर्णी, सदस्य सचिन शिंपी यांनी दिला. नायर यांच्यातर्फे अॅड. सुमेधा कुलकर्णी यांनी युक्तिवाद केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टेट बँकेच्या व्यवहाराने त्रस्त

$
0
0

अरुण गंगेले, मटा वाचक

रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार कोणत्याही बँकेत मुदत ठेव असेल, तर मार्च महिन्याच्या अखेरीस '१५ एच' हा अर्ज खातेधारकाला भरणे अनिवार्य असते. जर खातेधारकाने किंवा मुदत ठेवीदाराने हा अर्ज भरला नसेल, तर बँक एकूण व्याजावरील प्राप्तीकर त्या ठेवीदाराकडून वसूल करते, असा नियम आहे. त्यामुळे या नियमानुसार मी निफाड तालुक्यातील लासलगाव येथील मुख्य स्टेट बँकेत हा अर्ज भरला आहे. माझे वय ७३ वर्षे असून, स्टेट बँकेत असणाऱ्या मुदत ठेवीवर एका वर्षाला ७० हजार रुपयांचे व्याज मला मिळते. १५ एच हा अर्ज भरुनसुद्धा २०१७ पासून माझ्या ठेवीवर १३ हजार रुपयांचा प्राप्तीकर घेण्यात आला आहे. २०१८ मध्येही ४५० रुपये बँकेने वसूल केले. यासंदर्भात मुख्य बँक व्यवस्थापक यांच्यासोबत अनेकदा पत्रव्यवहार करून झाला. तरीही याकडे कोणतेही बँक अधिकारी लक्ष देत नाहीत. त्यामुळे स्टेट बँकेत होत असलेल्या चुकीच्या व्यवहारांनी आम्ही ज्येष्ठ नागरिक त्रस्त झालो असून, बँक प्रशासनाने योग्य मार्गदर्शन आणि समस्यांचे निवारण करावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उच्चविद्या विभूषितांचा रंगला मेळावा

$
0
0

फोटो - सतीश काळे

लोगो - सोशल कनेक्ट

उच्चविद्या विभूषितांचा रंगला मेळावा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

डिप्लोमा ते पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विवाह इच्छुक वधू-वरांनी संस्कारवाणी युवक मित्र मंडळाच्या उच्चविद्या विभूषितांचा उपवधू-वर मेळाव्यास हजेरी लावली. मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या या मेळाव्याचे यंदा १३ वे पर्व होते. कालिदास कलामंदिरात रविवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत या मेळावा झाला.

मेळाव्यात सुमारे दोनशेहून अधिक वधू-वरांनी हजेरी लावत, लग्नाची रेशीमगाठ पक्की करण्यासाठी जीवनसाथीचा शोध घेतला. डिप्लोमा, इंजिनिअरिंग, फार्मसी यासह सर्व विद्याशाखांतील पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेले वधू-वर या मेळाव्यात सहभागी झाले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष विनोद कोठावदे यांनी उमेदवारांनी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. उमेदवारांनी व्यासपीठावरून आपला अल्प परिचय करुन देत, जोडीदारासाठी अपेक्षा सांगितल्या. अगदी पारंपरिक पद्धतीने हा वधू-वर मेळावा दिवसभर रंगला. मंडळाचे सचिव समीर मालपुरे, वधू-वर मेळावा समिती प्रमुख चेतन येवला, मयूर दशपुते यांसह इतर पदाधिकारी व सदस्यांनी मेळाव्याचे संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीअर बारविरोधात ठिय्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

पखाल रोडवरील बीअर बार बंद करण्याच्या मागणीसाठी सोसायटीतील महिलांनी मुलाबाळांसह पाऊण तास ठिय्या आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजी केली. महाराष्ट्र राज्य दारूबंदी जनआंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष गणेश कदम कार्यकर्त्यांसह आंदोलनात सहभागी झाले. बार मालकाला एक दिवसाची मुदत देण्यात आली असून, ते बंद न केल्यास आज सोमवारी (दि. १०) दुकानास टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे.

नाशिक-पुणे मार्गावरील खोडेनगर येथील पखालरोडवरील रुंग्ठा कॅसल अपार्टमेंटच्या आवारात बीअरच्या दुकानदाराने आता बीअर बारदेखील सुरू केल्याने सोसायटीच्या सभासदांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. याबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी सोसायटीचे पदाधिकाऱ्यांनी पोलिस प्रशासन, नगरसेवक, महापालिका आयुक्त आदींकडे केली आहे. मुंबईनाका पोलिसांना निवेदन देण्यात येणार आहे. कारवाई केली नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.

परवानगी नाही

सोसायटी पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, बिल्डरने या सोसायटीच्या सभासदांशी करार करताना कोणत्याही परिस्थितीत इमारतीमध्ये मद्याच्या दुकानाला परवानगी देण्यात येणार नाही, असे स्पष्टपणे नमूद केले आहे. तरीही बीअर बार कसा सुरू झाला, असा प्रश्न सभासदांनी उपस्थित केला. नगरविकास खात्याकडेही सोसायटी सभासदांनी चौकशी केली असता रहिवाशी भागात दारूचे दुकान किंवा बीअर बार परवानगीशिवाय सुरू करता येत नाही असे सांगण्यात आले. या बीअर विक्रेत्याने सोसायटीला न कळवता, सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र न घेताच बीअरबार सुरू केला आहे. सर्व फ्लॅटधारकांनी त्याला तीव्र हरकत घेतली आहे.

बारमालक म्हणतो, पोलिस खिशात

सभासदांनी जाब विचारला असता बीअर बार मालकाने आपण सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केल्याचा दावा करून बीअरबार सुरूच ठेवणार असल्याचे ठणकावून सांगितले. त्याने दादागिरी करीत पोलिस माझ्या खिशात आहेत, तुम्हाला जामीनही मिळू देणार नाही, अशी भाषा वापरली. गंभीर बाब अशी की, या दुकानदाराने बीअर बार सुरू करण्यासाठी सोसायटीच्या इमारतीच्या मूलभूत सांगाड्याला धोका होईल, असे बांधकाम केले आहे. भविष्यात त्यामुळे मोठी दुर्घटना घडून रहिवाशांचे जीवही जाऊ शकतात. सोसायटीच्या आवारात बीअर बार सुरू केल्याने महिलावर्गाला मद्यपींचा त्रास होत आहे. लहान मुलांवर चुकीचे संस्कार होत आहेत. बीअर बार मालकावर तातडीने कारवाई करावी, बार बंद करावे या मागणीचे निवेदन महापालिका आयुक्त, मुंबईनाका पोलिस ठाणे, एक्साईज ऑफिस, नगरसेवक सतीश कुलकर्णी यांना देण्यात आले आहे. परंतु, अद्याप कारवाई झालेली नाही. अखेर शनिवारी महिलांनी मुलाबाळांसह पाऊण तास ठिय्या आंदोलन केले. जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.

दारूबंदी आंदोलनाचे पाठबळ

महाराष्ट्र राज्य दारूबंदी जनआंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष गणेश कदम यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांना एकजुटीची शपथ दिली. कदम म्हणाले की, बिल्डरने दारू, बीअर बार, बीअर शॉपी सुरू करता येणार नाही, असे करारनाम्यात लिहून दिले. त्याच्यावर विश्वास ठेऊन सभासदांनी फ्लॅट विकत घेतले. या सभासदांना त्रास होत असल्याने प्रशासनाने तातडीने कारवाई करावी. महिलांच्या सुरक्षेचा व मुलांच्या संस्काराचा प्रश्न आहे. वातावण बिघडलेले आहे. त्यामुळे बीअरबार बंद करावा, अन्यथा सोमवारी टाळे ठोकण्यात येईल. प्रशासन कारवाई करीत नसल्याने सोसायटीत बीअर बार असल्याची राज्यात सात ते आठ हजार प्रकरणे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एड्स जनाजागृती रॅली

$
0
0

एड्स जनाजागृती रॅली

म. टा. वृत्तसेवा नाशिकरोड

जागतिक एड्स सप्ताहाच्या निमित्ताने एचआयव्ही एड्स या आजाराबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी आणि जेडीसी बिटको हॉस्पिटलच्यावतीने वतीने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीची सुरुवात प्रभाग सभापती पंडित आवारे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून झाली. याप्रसंगी नगरसेवक रमेश धोंगडे, बिटको रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुषमा पाटील,डॉ. नितीन रावते आदी उपस्थित होते.

या रॅलीत के. जे. मेहता हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, गोखले एजुकेशन सोसायटीचे नर्सिंग कॉलेज व साई केअर नर्सिंग कॉलेजमधील सुमारे २२० विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. आयसीटीसीतील समुपदेशक संदूप चव्हाण यांनी एचआयव्ही एड्स या आजाराबाबत प्राथमिक माहिती व आयसीटीसीच्या दैनंदिन कार्याची माहिती दिली. जागतिक आरोग्य संघटनेच्या नो युवर स्टेट्स या संकल्पनेची सविस्तर माहिती यावेळी डॉ. सुषमा पाटील यांनी दिली. सूत्रसंचालन तानाजी इंगळे यांनी केले. रॅली पालिका विभागीय कार्यालय, सत्कार पॉईंट, सुभाषरोड, बसस्थानक, शिवाजी पुतळा व बिटको चौक मार्गे पुन्हा विभागीय कार्यालय येथे आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेल्मेट है जरूरी, ना समझो इसे मजबुरी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीने पुढे असलेल्या ट्रकला धडक दिल्याने दोघा युवकांचा करुण अंत झाला. अमृतधाम चौफुलीजवळ झालेल्या घटनेने आडगाव सुन्न झाले. शहरात दुचाकीचालकांचा रस्ते अपघातांमध्ये होणारा मृत्यू हा विषय यामुळे चर्चेत आला असून, हेल्मेटचा वापर केला असता तर अपघाताची तीव्रता कमी झाली असती, अशी चर्चा सुरू आहे. या वर्षी शहरातील किमान ११२ दुचाकीस्वारांचा हेल्मेट नसल्याने मृत्यू झाला असून, हेल्मेट वापरण्यास विरोध करणाऱ्यांनी हा आकडा लक्षात घ्यावा, अशी चर्चा आज दिवसभर सोशल मीडियावर सुरू होती.

अमृतधाम चौफुली येथे शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात चालक सागर शेजवळ (२४) आणि संदीप सुरेश गवारे (३०, रा. ग्रामीण पोलिस मुख्यालय, आडगाव) या दोघांचा मृत्यू झाला. युवकाच्या ताब्यातील नव्या कोऱ्या रेसर दुचाकीने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की एका दुचाकीस्वाराचे शीर धडावेगळे झाले. दुसऱ्यालाही डोक्यास मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. अमृतधाम चौफुली येथे अपघात होणे नवीन नाही. हायवेचे रुंदीकरण झाल्यानंतर येथे सुरू झालेली अपघातांची मालिका अद्याप थांबलेली नाही. याचमुळे येथे उड्डाणपूल उभारणीचे काम सुरू करण्यात आले. येथील वाहतूक कोंडी व अपघातासारख्या समस्या कमी व्हाव्यात, म्हणून वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहनदेखील केले. मात्र, या आवाहनाला वाहनचालक वाटाण्याच्या अक्षता लावतात. शनिवारी रात्री घडलेल्या घटनेमुळे आडगाव सुन्न असून, हेल्मेट वापरण्यास विरोध करणाऱ्यांबाबत विविध सोशल मीडियावर याबाबत चर्चा झडत आहे.

११२ दुचाकीस्वारांचा हेल्मेटअभावी मृत्यू

शहरात या वर्षी ११५ दुचाकीस्वारांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. त्यापैकी तब्बल ११२ दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान केलेले नव्हते. एक छोटेसे साधन जीवन मृत्यूतील अंतर नक्कीच कमी करू शकले असते. पोलिसांच्या मते, या ११२ पैकी हेल्मेटमुळे किमान १०० व्यक्तींना जीवदान मिळू शकले असते. पण, तसे झाले नाही. चारचाकी वाहनचालकसुद्धा सीटबेल्ट वापराकडे दुर्लक्ष करतात. यंदा १२ चारचाकी वाहनचालकांचा अपघाती मृत्यू झाला असून, त्यापैकी एकानेही सीटबेल्टचा वापर केलेला नव्हता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षा होणार सुरक्षित, पर्यावरणस्नेही

$
0
0

शुभवार्ता

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकमध्ये लवकरच सुरक्षित आणि पर्यावरणपूरक रिक्षा-टॅक्सी सेवा मिळणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) नाशिकचे अधिकारी नितीन मुंडावरे यांनी आपल्या व्यवस्थापकीय संचालकांना तसा प्रस्ताव पाठवला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर ही सेवा नाशिकमध्ये सुरू होईल. राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी याबाबत कार्यवाहीच्या सूचना आधीच दिलेल्या आहेत.

नाशिकरोड रेल्वेस्टेशनवरील प्री-पेड रिक्षा व टॅक्सीचालकांना ही सेवा प्रथम लागू करण्यात येईल. नंतर अन्य चालकांना लागू होईल, अशी माहिती प्रीपेड सेवा देणाऱ्या भारतरत्न मागासवर्गीय सहकारी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. गिरीश मोहिते यांनी दिली. या योजनेत सहभागी झालेल्या रिक्षा व टॅक्सीचालकांचा डाटा प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांच्या सूचनेनुसार प्रीपेड सेवेच्या केबिनमध्ये उपलब्ध झाला आहे. वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक वांबळे यांनी ही कागदपत्रे तपासून वाहतुकीचे स्टीकर देण्याचे मान्य केले आहे. नाशिकमध्ये रिक्षाचालकाने प्रवाशाशी गैरवर्तणूक केल्याचा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाल्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षित आणि पर्यावरणपूरक टॅक्सी-रिक्षा सेवेला महत्त्व आले आहे.

या उपक्रमांतर्गत रिक्षा आणि टॅक्सीच्या सीटमागे डस्टबीन ठेवण्यात येईल. प्रवाशांनी बिस्कीट वेफर्स, केळी आदी खाल्ल्यानंतर कचरा रस्त्यावर न फेकता डस्टबीनमध्ये टाकण्यात येईल. त्यामुळे पर्यावरण रक्षण आणि स्वच्छता हे हेतू साध्य होतील. अपघातही टळतील. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रिक्षाचालकाच्या सीटमागे चालकाच्या फोटोसह परमिट, लायसन्स, बॅच नंबर आणि रिक्षाचा नंबर लावण्यात येईल. तसेच आरटीओ, रेल्वे पोलिस, नाशिक पोलिस आणि भारतरत्न मागासवर्गीय सहकारी संस्था यांच्या हेल्पलाइन फोन नंबरचे स्टीकर लावण्यात येईल, अशी माहिती मोहिते यांनी दिली.

शहरात प्रीपेड टॅक्सी

नाशिकरोड रेल्वेस्थानकात प्रीपेड टॅक्सीसेवेला एक महिनापूर्ण झाल्याची माहिती मोहिते यांनी दिली. सध्या ३५ टॅक्सीचालक या उपक्रमात सहभागी झाले आहेत. याशिवाय नाशिक शहरातही प्रीपेड टॅक्सीसेवा सुरू केली जाणार आहे. तसा प्रस्ताव आरटीओला देण्यात आला आहे. आरटीओने भाडे दर निश्चित केल्यानंतर ही सेवा शहरात सुरू केली जाईल. संस्थेने २६ नोव्हेंबरपासून प्रीपेड नाशिक नावाने फेसबुक पेज सुरू झाले असून देशविदेशातून नाशिकला येणाऱ्या पर्यटक, भाविकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रीपेडचे बुकिंग संस्थेच्या या फेसबुक पेजवरूनच केले जाते. त्र्यंबकेश्वर, मांगीतुंगी, सापुतारा येथे जाण्यासाठी काही प्रवाशांनी अशा पद्धतीने नुकतेच बुकिंग केले. या सेवेसाठी संस्था प्रत्येक रिक्षा-टॅक्सीमागे फक्त पाच रुपये शुल्क आकारते. भाड्याचे पैसे चालकाला मिळतात.

प्रीपेड रिक्षा जोमात

नाशिकरोड रेल्वेस्टेशनमधून प्रीपेड रिक्षासेवा सुरू झाल्यानंतर तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रीपेड रिक्षासाठी एकूण ७० पॉइंट आहेत. त्यामध्ये मुक्त विद्यापीठ, आरोग्य विद्यापीठ, सीबीएस, आर्टिलरी सेंटर, एचएएल विमानतळ, आनंदवली, गंगापूररोड, पळसे, सिन्नर आदींचा समावेश आहे. प्रीपेड सेवेसाठी सध्या स्टेशनमध्ये पत्र्याची केबिन आहे. राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी एमटीडीसीमार्फत आकर्षक केबिन करून देण्याचे आश्वासन दिले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या रिक्षाचालकांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच त्यांची नोंदणी या प्रीपेड सेवेमार्फत भाडे उपलब्ध केले जाईल.

उधारीवर इंधन

नाशिकरोड रेल्वेस्टेशनच्या प्रीपेड टॅक्सी व रिक्षा सेवा उपक्रमात नोंदणी केलेल्या चालकांना अनेकदा रात्री-अपरात्री इंधनाची गरज भासते. जवळ पैसे नसल्याने समस्या येते. अशावेळी त्यांना उधारीवर इंधन मिळावे म्हणून आमच्या संस्थेने एस्सार ऑईल कंपनीशी करार केल्याची माहिती मोहिते यांनी दिली. एस्सारच्या पंपांवर या चालकांना उधारीवर इंधन भरता येईल. प्रीपेड रिक्षा व टॅक्सीचा वापर सुरक्षित असल्याने पर्यटक व भाविकांचा ओढा वाढत आहे. एमटीडीसी मान्यताप्राप्त हॉटेलमधील पर्यटक, भाविकांनी प्रीपेड सेवेचाच आधार घ्यावा, असा सल्ला हॉटेलचालक देत असल्याचे मोहिते यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हायवेवर लुटमार करणारी टोळी अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सापुतरा-नाशिक हायवेवर प्रवाशांना अडवून लूट करणाऱ्या टोळीस ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (एलसीबी) शनिवारी जेरबंद केले. त्यांच्याकडून दुचाकी तसेच, इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

कल्पेश बाबुराव वाघमारे (वय १८, रा. पळसेत, ता. सुरगाणा), धर्मराज काशिनाथ गायकवाड (वय २२, रा. शिराटा, ता. सुरगाणा), बाबू थविल (रा. गारमाळ, ता. सुरगाणा) व केशव वारडे (रा. पळसेत, ता. सुरगाणा) अशी या प्रकरणी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. २९ नोव्हेंबर २०१८ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सुरगाणा तालुक्यातील भदर गावातील रहिवासी सुभाष चिंतामण पवार हे आपल्या दुचाकीवर सुरगाणा येथे जाण्यासाठी निघाले होते. नाशिक ते सापुतारा महामार्गावर घोटूळ गाव शिवारात अज्ञात चार संशियितांनी त्यांना अडवून चाकूचा धाक दाखवत मारहाण केली. तसेच, त्यांच्याकडील रोख रक्कम, मोबाइल फोन व दुचाकी असा एकूण ३३ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला होता. या प्रकरणी सुरगाणा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. एलसीबीचे पोलिस निरीक्षक अशोक करपे यांच्या पथकाने या गुन्हयातील फिर्यादीकडे बारकाईने चौकशी केली. गुन्ह्याच्या कार्यप्रणालीवरून गुन्हेगार हे त्याच परिसरातील असल्याचा अंदाज आल्याने सुरगाणा ते सापुतारा महामार्गावर संशयितांचा शोध घेण्यास सुरुवात झाली. काही संशयित हतगड परिसरात गुन्ह्यातील लुटमार करून नेलेली दुचाकी नंबरप्लेट काढून वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हतगड शिवारात रात्रभर सापळा लावून संशयित वाघमारेसह गायकवाडला अटक केली. त्यांनी बाबू थविल व केशव वारडे या दोन साथिदारांची नावे सांगितली. पोलिस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक करपे, पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल नाईक, रामभाऊ मुंढे, संजय पाटील, पोहवा हनुमंत महाले, प्रकाश तुपलोंढे, जे. के. सूर्यवंशी, संदीप शिरोळे, कैलास देखमुख, वसंत खांडवी, प्रदीप बहिरम, हेमंत गिलबिले, रमेश काकडे व चौधरी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानवाचा जन्म कर्मावर आधारित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'मानवाचा पुढील जन्म हा त्याच्या कर्मावर आधारित आहे. मिळालेल्या जन्मात चांगले कर्म केले तर चांगला जन्म मिळेल. कुकर्म केले तर त्याचे फळ वाईटच मिळेल. मानवाचे शरीर हे सत्व, तम, रज गुणांनी भरलेले आहे. त्याचा वापर कोण कसा करतो यावर पुढील जीवन अवलंबून असेल.' असे प्रतिपादन श्रृतिसागर आश्रमाचे संस्थापक स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी केले. शंकराचार्य न्यास व शिवशक्ती ज्ञानपीठ त्र्यंबकेश्वर यांच्यावतीने आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते.

गंगापूररोडवरील शंकराचार्य न्यास संकुलात ही व्याख्यानमाला आयोजित केली होती. 'मृत्यू आणि पुर्नजन्माचे रहस्य' हा व्याख्यानमालेचा विषय होता. रविवारी व्याख्यानमालेचा शेवटचे पुष्प गुंफताना स्वामीजी म्हणाले,'कोणताही जीव वर्तमान शरीर सोडत असताना जन्माच्या वेळी जसा शरीरात प्रवेश करतो. शरीराशी एकरुप होऊन हे माझं शरीर आहे असे समजून व्यवहार करतो. मृत्यूनंतर देखील त्याच भावनेने शरीर सोडतो. मृत्यूनंतर मानवाचे शरीर हे पार्थिव असल्याचे मानले जाते. ज्या शरीराराची निर्मिती पंच महाभुतांनी झाला आहे. त्या पंच महाभुतांमध्ये विलीन होते म्हणजेच या पृथ्वीला जाऊन मिळते. या भुतलावर अनेक नद्या उगम पावतात अनेक भागातून विहार करीत त्या शेवटी सागराला मिळतात. सागराला मिळाल्यानंतर त्यांचे अस्तित्व नष्ट होते. प्रत्येकाने जीवन जगताना आनंदाचा शोध घेणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाच्या अंतकरणात आनंद आहे. फक्त त्याची अनुभूती येणे आवश्यक आहे. काही लोकांना सिद्धी प्राप्त होते त्यांना सिद्ध पुरुष म्हटले जाते; मात्र जीवनाचे साध्य केले आहे त्याला सिद्ध पुरुष म्हणायला पाहिजे.'

व्याख्यानमालेची सुरुवात न्यासाचे कार्यवाह प्रमोद भार्गवे यांच्या हस्ते स्वामीजींच्या सत्काराने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजाभाऊ मोगल यांनी केले. व्याख्यानाला मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहन विम्यासाठी बनावट वेबसाईट

$
0
0

आतापर्यंत सहा जणांना अटक

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वाहनांचे बनावट वाहन विमा प्रमाणपत्र तयार करून देण्याचे प्रकरण गंभीर झाले असून, पोलिसांच्या चौकशीत प्रादेशिक परिवहन विभागाच्या आवारातच मोठा घोटाळा केल्याचे समोर येते आहे. बनावट विमा तयार करणाऱ्या एजंटने थेट तीन कंपन्यांच्या वेब तयार करून घेतल्याची गंभीर बाबही यानिमित्ताने समोर आली आहे. या गुन्ह्याची व्याप्ती वाढत असून, असे अनेक कारनामे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

कैलास संताजी गायकवाड (वय ३३, श्रीधर कॉलनी, मेहरधाम) आणि आशिश मधुकर काळे (वय ३१, दुर्गानगर, आरटीओ ऑफिस, पेठरोड) असे नव्याने अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. पंचवटी पोलिसांनी यापूर्वीच अन्य चौघांना अटक केली असून, कोर्टाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. यातील कैलास गायकवाड हा संशयित काही वर्षांपर्यंत आरटीओ कार्यालयात खासगी मदतनीस म्हणून कामाला होता. मात्र, नंतर त्याची सेवा खंडित करण्यात आली. आरटीओतील खडानखडा माहिती असलेल्या गायकवाडने बनावट विमा तयार करून देण्याची सुरुवात केली. यासाठी त्याने त्याच्या मेलमध्ये एक एक्सल सीट तयार करून ठेवली होती. ग्राहक आल्यानंतर फक्त नाव बदलून तो प्रिंट काढून देत होता. मात्र, कंपन्यांनी विमा पॉलिसीचे बनावटीकरण थांबविण्यासाठी त्यावर क्यूआरकोड टाकला. हा क्यूआर कोड स्कॅन केला की आरटीओ अधिकाऱ्यांना सर्व माहिती झटक्यात मिळते. त्यामुळे गायकवाडसमोर समस्या निर्माण झाली. दहावी नापास आणि अर्धवट एमएससीयाटीचा कोर्स करणाऱ्या गायकवाडने पुढे आशिश काळे या वेब होस्टिंगचे काम करणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधला. काळेची गंगापूर नाका परिसरात मोठी फर्म असून, त्यात किमान ४० व्यक्ती काम करतात, अशी माहिती तपासाधिकारी सहायक पोलिस निरीक्षक दीपक गिरमे यांनी दिली. काळेने कोणतीही खातरजमा न करता आयसीआयसीआय लोबांर्ड, भारती अॅक्सा आणि बजाज अलायन्स या तीन कंपन्याच्या वेबसाईट तयार करून दिल्या. वास्तविक पुढे या वेबसाईचा काय वापर होणार याकडे काळेने लक्ष दिले नाही. गायकवाडने तयार केलेल्या बनावट विम्यावरील बनावट क्यूआर कोड आरटीओ स्कॅन केला की काळेने तयार करून दिलेल्या वेबसाईट ओपन होत होत्या. याच गायकवाडकडून तयार केलेल्या विमा प्रमाणपत्रामुळे आतापर्यंतचे चित्र स्पष्ट झालेले असल्याचे गिरमे यांनी स्पष्ट केले. या दोघांना कोर्टाने १४ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

...

शाळेचा बनावट दाखला देणे असो की वाहन विम्याचे प्रमाणपत्र असे अनेक प्रकार या चौकशीमुळे समोर आले आहेत. यापूर्वी अटक केलेल्या संशयितांकडून अनेक सरकारी विभागांचे रबरी स्टॅम्प जप्त करण्यात आले होते. आता बनावट वेबसाईटचा प्रकार समोर आला आहे. गुन्ह्याचा अगदी बारकाईने तपास सुरू आहे.

- मधुकर कड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पंचवटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लायन क्लब ऑफ नाशिक सुप्रीम तर्फे ब्लँकेट वाटप

$
0
0

नवजात शिशुंना कपडे वाटप

नाशिक : लायन क्लब ऑफ नाशिक सुप्रीमतर्फे नाशिक जिल्हा रुग्णालयात नवजात शिशूसाठी लोकरीचे कपडे तसेच त्यांच्या आईसाठी ब्लँकेट वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास लायन बिना झा व कैलास हांडा यांनी देणगी दिली. या कार्यक्रमास जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी तसेच लायन क्लबतर्फे अध्यक्ष बाजीराव पाटील, खजिनदार प्रभाकर पाटील आदी उपस्थित होते. या कार्यक्रमास सर्व मातांनी या थंडीत बाळाला मिळालेल्या कपड्यांचे समाधान व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवदीपावलीचा कार्यक्रम साजरा

$
0
0

देवदीपावलीचा कार्यक्रम साजरा

नाशिक : नारायणकाका ढेकणे यांच्या लोकनाथतीर्थ स्वामी महाराज आश्रमात देवदीपावलीचा कार्यक्रम उत्साहात झाला. यानिमित्ताने जळगावचे ऍक्युप्रेशरतज्ज्ञ डॉ. अविनाश सोनगीरकर यांचे शिबिर झाले. तसेच जनकल्याण रक्तपेढीतर्फे रक्तदानाचा कार्यक्रम झाला. साधकांप्रमाणे नागरिकांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाला प्रभुणे महाराज, राखे गुरुजी, कायदेतज्ज्ञ एस. एल. देशपांडे आणि साधक उपस्थित होते.

---

अस्थिघनता शिबिराचे आयोजन

इंडियन रेडक्रॉस सोसायटी नाशिकतर्फे मंगळवारी (११ डिसेंबर) अस्थिघनता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रेडक्रॉस बिल्डिंग येथे सकाळी १० ते १२ या वेळेत हे शिबिर होईल. शिबिरात अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत भुतडा मार्गदर्शन करणार आहेत. नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images