Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

एचआयव्ही ग्रस्तांना आयुक्तांकडून दिवाळीभेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एचआयव्ही बाधितांना स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी त्यांचे पुनर्वसन होणे गरजेचे आहे. या घटकांच्या पुनर्वसनासाठी महापालिका त्यांना मोफत जागा उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही देत महापालिका आयुक्त डॉ. तुकाराम मुंढे यांनी एचआयव्ही बाधितांना दिवाळीची अनोखी भेट दिली. इतकेच नव्हे, तर एचआयव्हीग्रस्त मुलांना शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेमध्ये शिष्यवृत्तीची प्रस्ताव ठेवण्याचा निर्णयदेखील त्यांनी घेतला आहे. त्यामुळे एचआयव्ही बाधितांच्या दिवाळीचा आनंद यंदा द्विगुणीत झाला आहे.

यश फाउंडेशन आणि महिंद्रा अँड महिंद्राच्या वतीने गंजमाळ येथील रोटरी क्लब येथे दिवाळी सेलिब्रेशनचे आयोजन केले होते. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाला आयुक्त डॉ. मुंढे यांनी आवर्जुन हजेरी लावली. याखेरीज महिंद्रा अँड महिंद्राचे नाशिक प्लान्टप्रमुख हिरामण आहेर, यश फाउंडेशनचे रवींद्र पाटील, संगीता पवार आदी उपस्थित होते. यावेळी मुंढे आणि आहेर यांच्या हस्ते एचआयव्हीबाधित बच्चेकंपनीला मिठाई तसेच फराळाचे वाटप करण्यात आले.

यावेळी डॉ. मुंढे म्हणाले की, एचआयव्हीबाधितांना सहानूभुती नको, ही भावना मनाला स्पर्शणारी आहे. त्यांना कायमस्वरुपी आनंद मिळावा यासाठी समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणणे गरजेचे आहे. महापालिका त्यांच्या कौशल्य विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल. सबलीकरणात महापालिका स्वयंसेवी संस्थांच्या बरोबरीने भागीदार म्हणून भूमिका पार पाडेल, असेही मुंढे म्हणाले. एचआयव्हीबाधितांच्या पुनर्वसनासाठी भाडे तत्त्वावर जागा घ्यावी लागत असल्याकडे यश फाउंडेशनच्या पाटील यांनी लक्ष वेधले. महापालिकेकडे काही जागा उपलब्ध असून, एचआयव्हीबाधितांच्या पुनर्वसनासाठी त्यापैकी योग्य जागा मोफत दिली जाईल, अशी ग्वाही मुंढे यांनी यावेळी दिली. महापालिका क्षेत्रातील खासगी तसेच महापालिका शाळेतील एचआयव्हीबाधित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येईल. ही शिष्यवृत्ती त्यांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी उपयोगी ठरू शकेल असा विश्वास मुंढे यांनी व्यक्त केला. शिष्यवृतीसाठीचा प्रस्ताव लवकरच मान्य केला जाईल असेही ते म्हणाले. महापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर स्टेशनरीची आवश्यकता भासते. एचआयव्हीबाधितांनी बनविलेल्या फायली व तत्सम वस्तू खरेदी करण्यासाठी महापालिका पुढाकार घेईल, असेही ते म्हणाले. एचआयव्हीबाधितांच्या सक्षमीकरणासाठी महिंद्रा अँड महिंद्रा गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहे. यापुढेही हे प्रयत्न अविरत सुरू राहतील, अशी ग्वाही आहेर यांनी दिली. चंदा थेटे यांनी सूत्रसंचालन केले.

नृत्य अन दिवाळीची खरेदी

समाजातील विविध घटक एचआयव्हीबाधितांमध्ये शक्यतो सहजतेने मिसळत नाहीत. परंतु, एचआयव्हीबाधित बच्चेमंडळींना मिठाई वाटताना डॉ. मुंढे त्यांच्यामध्ये मिसळले. त्यांच्याशी गप्पा मारल्या. भविष्याविषयी त्यांच्या मनात काय आहे हे समजून घेतले. इतकेच नव्हे तर 'भरपूर शिका आणि मोठे व्हा' असे म्हणत ही दिवाळी तुम्हा सर्वांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येवो, अशा शुभेच्छाही दिल्या. दिवाळीचे सेलिब्रेशन करताना या बच्चेमंडळींनी झिंगाट नृत्य केले. डॉ. मुंढे यांनी त्यांच्यासमवेत नृत्य करून या सेलिब्रेशनचा आनंद द्विगुणीत केला. आगळ्या वेगळ्या पद्धतीने ही दिवाळी साजरी करता आल्याबद्दल त्यांनी मनस्वी आनंदही व्यक्त केला. एचआयव्हीबाधितांनी बनविलेला आकाशकंदील खरेदी करून त्यांना कौशल्यविकासासाठी प्रोत्साहीत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चुंचाळेत तलवार दाखवित दहशत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

चुंचाळे शिवारात वाहनतळात दुचाकी पेटल्याची घटना होऊन २४ तास उलटत नाही तोच याच भागात तलवारीने धाक दाखवित दहशत निर्माण करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

चुंचाळे येथील घरकुल योजनेत राहणाऱ्या एका व्यक्तीला तलवारीचा धाक दाखवून धमकविणाऱ्यास अंबड पोलिसांनी सोमवारी (दि. ५) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास अटक केली. विश्वास साहेबराव चव्हाण (२५, रा. रुम नंबर २०५, बिल्डिंग नंबर ४, घरकुल योजना, अंबड) असे संशयिताचे नाव आहे. त्याने पंडित दगडू पाराम यांना हातात तलावरीचा धाक दाखवत 'तू खाली ये' असे धमकावित शिवीगाळ केली. या प्रकरणी आरोपीविरोधात विनापरवाना शस्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस उपनिरीक्षक एस. टी. शेळके हे पुढील तपास करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोघांची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अंबड आणि सातपूर परिसरात दोघांनी गळफास लावून घेत आत्महत्या केली. त्यात एका ८५ वर्षीय वृद्धाचा समावेश आहे. दोघाही व्यक्तींच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. मिलिंद रमेश पांडव (वय ४०, रा. घरकुल योजना, चुंचाळे शिवार) आणि महादेव जनार्दन ठाकूर (वय ८५, रा. विवेकानंदनगर, अशोकनगर) अशी या व्यक्तींची नावे आहेत. मिलिंद पांडव यांनी सोमवारी रात्री आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून किचनमध्येच गळफास लावून घेतला होता. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. महादेव ठाकूर या वृद्धाने सोमवारी रात्री आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

...

पंचवटीत तरुणाची आत्महत्या

पंचवटीतील कुमावतनगर येथे राहणाऱ्या मनोज जगदीश शिंपी (वय ३०, रा. पाटाजवळ, कुमावतनगर) या तरुणाने विषारी औषध सेवन करीत आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण कळाले नसून, याबाबत पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंदवण्यात आला. सोमवारी (दि. ५) सायंकाळी साडेपाच वाजता काही तरी अज्ञात कारणातून मनोज घरातच विषारी औषध सेवन केले. ही घटना त्याचे वडील जगदीश पांडुरंग शिंपी यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी रात्री ९ वाजता त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजारपेठेत खरेदीला उधाण

$
0
0

आज लक्ष्मीपूजन; मध्यवर्ती बाजारपेठेला यात्रेचे स्वरुप

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

दिवाळी म्हणजे मांगल्याचा आणि प्रकाशाचा उत्सव. परंतु, आता दिवाळी हा खरेदीचाही उत्सव झाला आहे. पुजेच्या साहित्याबरोबर आता, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहन खरेदीसह घर खरेदीलादेखील दिवाळीचा मुहूर्त साधला जात आहे. दिवाळीनिमित्त मंगळवारी (दि. ६) शहरातील मुख्य बाजारपेठेच्या भागाला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते.

दिवाळीनिमित्त शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी वाढली आहे. महात्मा फुले मार्केट, सुभाष चौक, गोलाणी मार्केट व दाणाबाजार परिसरात मंगळवारी प्रचंड गर्दी होती. टॉवर चौक ते थेट भिलपूरा चौकीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा तसेच डिव्हायडरवरही या विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली होती. यामुळे या रस्त्यावर चालणेदेखील अवघड झाले होते. आज (दि. ७) लक्ष्मीपूजन असल्याने मंगळवारी (दि. ६) पूजेचे साहित्य, फराळ, मिठाई, खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी झाली होती. सकाळपासून टॉवर चौकातून घाणेकर चौकापर्यंतच्या केवळ १० मिनिटांच्या अंतरासाठी वाहनधारकांना तब्बल अर्धा तास लागत होता. शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेत मंगळवारी ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. दिवाळीमुळे शहरात चैतन्य पसरले आहे.

संपूर्ण शहर प्रकाशोत्सवाच्या पर्वामुळे उत्साहित झाले आहे. लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या पूजेच्या साहित्याने बाजारपेठ सजली होती. सकाळपासूनच शहरातील फुले मार्केटसमोरील बाजारपेठेत जळगावकरांची खरेदीसाठी गर्दी झाली होती. झेंडूची फुले, पूजेचे साहित्य, रांगोळी, ऊस, केळीची पाने, नारळ, आंब्याची पाने, केळीचे खांब व लक्ष्मीच्या मूर्तींची खरेदी करण्यात येत होती.

झेंडूच्या फुलांना मागणी
सणासुदीत पुजेसाठी झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. दिवाळीसारख्या सणाला तर फुलांच्या मागणीत तिपटीने वाढ होत असते. बुधवारी लक्ष्मीपूजन असल्यामुळे बाजारपेठेत झेंडुच्या फुलांची मागणी वाढली असून, शनिवारपासून या फुलांच्या भावात चढउतार होत आहे. मंगळवारी झेंडूचे भाव किलोमागे ५० ते ६० रुपये इतके होते. व्यापारी, सर्वसामान्य नागरिकांकडून लक्ष्मीपूजनासाठी झेंडूच्या फुलांना जोरदार मागणी असते. सकाळपासूनच फुले खरेदीसाठी शहरातील गोलाणी मार्केटमध्ये नागरिकांनी गर्दी केली होती. फुलांबरोबरच तयार माळांचीही मागणी वाढली आहे. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत पहाटेच्या सुमारास जिल्ह्यातून झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. गावराण व कलकत्ता झेंडूलाही मागणी वाढली आहे.


लक्ष्मी मूर्तीसह फुलांनी बाजारपेठ सजली

म. टा. वृत्तसेवा, धुळे

आज (दि. ७) लक्ष्मीपूजन असून, यासाठी लागणाऱ्या लक्ष्मीच्या मूर्ती बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. गेल्या देान दिवसांपासून शहरातील बाजारपेठ मूर्तींसोबत केरसुणी, झेंडूची फुले आदी साहित्यांनी फुलली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून शहरातील बाजारपेठेत ग्रामीण भागातील ग्राहक दिसून येत नसले तरी नोकरदार वर्गाचा खरेदीसाठी अधिक कल दिसून आला आहे.

घरोघरी लक्ष्मीचे पूजन करून सुख समृद्धीची प्रार्थना केली जाते. लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या विविध वस्तू बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. लक्ष्मीच्या आकर्षक मूर्ती, केरसुणी, झेंडूची फुले यांची मोठ्या प्रमाणावर बाजारपेठेत आवक झाली आहे. लक्ष्मीच्या मूर्तींची विक्री साधारण २०० ते २५० रुपयांपर्यंत होत आहे. केरसुणीचे लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व असते. केरसुणीला लक्ष्मीस्वरूप मानून तिचेदेखील या दिवशी पूजन केले जाते. या केरसुणीचा दर ३० ते ६० रुपये प्रति नग याप्रमाणे आहे. तसेच झेंडूची फुलेदेखील विक्रेत्यांनी बाजारात आणली आहेत. यंदा पाऊस समाधानकारक न झाल्याने झेंडूचे उत्पादन घटले आहे. यामुळे झेंडूचे भावदेखील वाढले आहेत. झेंडूच्या फुलांची विक्री साधारण ५० ते ७० रुपये किलो या दराने होत आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५० कोटींची सोनेखरेदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सोन्याच्या भावात गेल्या काही महिन्यात सातत्याने चढ-उतार होत असल्याने बाजारात काही प्रमाणात अस्थिरता निर्माण झाली होती. मात्र, आठवडाभरापासून भाव स्थिर असल्याने पुन्हा सोने खरेदीने जोर पकडला आहे. लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने बाजारात सोनेखरेदीला उधाण आले होते. नाशिक शहरात अंदाजे ५० कोटींच्या घरात उलाढाल झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

दिवाळीत विशेषत: धनत्रयोदशी, लक्ष्मी पूजन आणि पाडवा या दिवशी सोने खरेदी केले जाते. यंदाही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नाशिकच्या सराफांची दुकाने ग्राहकांनी खच्चून भरली होती. ग्राहकांनी पारंपरिक दागिन्यांना अधिक पसंती देत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. या दागिन्यांमध्ये विशेषत: चिंचपेट्य़ा, वजरटिक, ठुशी, मोहनमाळ, पुतळीहार, सर, कोल्हापुरी सजा, जोंधळी हार, लफ्फा, तन्मणी, दुलेदिया, शिरोण, चंद्रहार, तोडे, बकुळी हार, कुंदनाचे हार अशा दागिन्यांना अधिक मागणी आहे. नाशिकच्या सराफ बाजाराबरोबरच नाशिकरोड, सातपूर, सिडको, पंचवटी भागातील सराफ दुकानातही ग्राहकांनी गर्दी केली होती. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर घरात आलेली लक्ष्मी चिरकाल टिकते म्हणून काही घरांमध्ये थोडेतरी सोने घेण्याची प्रथा आहे. त्यामुळे गुंतवणूक म्हणून नाही तर ग्राहकांनी मुहूर्ताची खरेदी केली. मुहूर्तावर पाटल्या, बांगड्या, नेकलेस, मंगळसुत्र, शुद्ध सोन्याच्या अंगठ्या इत्यादींचा समावेश होता. शुद्ध सोने घेण्याकडे ग्रहकांचा जास्त कल होता.

राशीची खडे विक्री जोरात

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने ग्राहकांनी बुधवारी राशींचे खडे खरेदी केले. यात पुष्कराज, गोमेध, पन्ना, माणिक इत्यादी खड्यांचा समावेश होता. घेतलेले खडे न लाभल्यास त्याची ठराविक रक्कम परत मिळत असल्याने खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला. दिवाळीचा मुहूर्त साधून अनेक विक्रेत्यांनी जंगी तयारी केली होती. ग्राहकांच्या स्वागतासाठी कमानी उभारण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे सनई चौघडादेखील लावण्यात आला होता. काही दुकानांमध्ये सणाच्या स्वागतासाठी आकर्षक रांगोळ्या देखील काढण्यात आल्या होत्या.

लग्नसराईच्या ऑर्डर्स बुकिंग

तुळशीच्या लग्नानंतर लग्नाचा सिझन सुरू होणार आहे. ज्यांचे विवाह जमले आहेत अशा वधू-वरांच्या पालकांनी लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधत दागिन्यांच्या ऑडर्स दिल्या. यानंतर सोन्याच्या भावात वाढ झाली तरीही ऑर्डर दिलेल्या भावात सोने मिळणार आहे.

कालचे भाव

सोने २४ कॅरेट - ३२ हजार ४००

सोने २२ कॅरेट- ३० हजार ८००

चांदी- ४० हजार रुपये किलो

लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधत अनेक ग्राहकांनी सोने खरेदी केली. येणाऱ्या लग्नाच्या सिझनसाठीही खरेदी करण्यात येत होती. त्याचप्रमाणे राशींच्या खड्यांचीही चांगली विक्री झाली.

- चेतन राजापूरकर, अध्यक्ष, सराफ असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वरांतून अवतरली पहाटेची किरणे

$
0
0

स्वरांतून अवतरली पहाट किरणे

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दीपावलीच्या पहाटे वातावरणात सर्वत्र परसलेले चैतन्य, नाशिकच्या गुलाबी थंडीत पारंपरिक वेशात जमलेले रसिक, कोवळी सूर्यकिरणांच्या प्रकाशात दीपोत्सवाच्या उत्साहात मंदिरातील घंटीची किणकिण अन् या प्रफुल्लित वातावरणात विदुषी अंजना नाथ यांची शास्त्रीय गाण्यांची रंगलेली बैठक. शास्त्रीय गाण्यांचा हवाहवासा स्वर जेव्हा नरसिंह नगरात गुंजला तेव्हा रसिक मंत्रमुग्ध झाल्याचे दिसून आले. निमित्त होते, नसती उठाठेव मित्र मंडळातर्फे आयोजित दीपावली पहाटचे.

बुधवारी गंगापूर रोड येथील नरसिंह नगर परिसरातील श्री संकटमोचन हनुमान मंदिरात दीपावलीच्या निमित्ताने मैफलीचे आयोजन करण्यात आले. शंखनाद आणि राम नामाचा गजर करत मैफलीस प्रारंभ करण्यात आला. कोलकाताचे पंडित अजय चक्रवर्ती यांच्या शिष्या अंजना नाथ यांनी ललत या रागाने दीपावली पहाटेच्या मैफलीची सुरुवात केली. 'मैं कैसें कहूँ' हे त्यांनी मैफलीच्या सुरुवातीस पेश केले. त्यानंतर भूपेश्वरी, निरंजनी रागातील अनेक गाणी त्यांनी सादर केली. या गाण्यांच्या सादरीकरणाला रसिकांची कमालीची दाद मिळाली. मैफलीची सांगता भैरवीने करण्यात आली. मैफलीत पं. सुरेशदादा तळवळकर यांचे शिष्य अजिंक्य जोशी‚ यांनी तबल्यावर दिलेली सुरेल साथ प्रत्येक रसिकाला कमालीची भावली. उस्ताद शाहीद परवेझ खान व पं. प्रभाकर दसककर यांचे शिष्य सुभाष दसककर यांनी हार्मोनियमवर साथ देत रसिकांवर मोहिनी घातली. आस्था मांडले व वृषाली गाडेकर यांनी तानपुऱ्याच्या तारा छेडत मैफलीत रंगत आणली. लक्ष्मी पूजनाच्या पहाटे कोवळ्या सूर्यकिरणांच्या प्रकाशात रंगलेल्या मैफलीने रसिकांच्या दीपोत्सवात आनंद पेरला. अंजना नाथ या उस्ताद बडे गुलाम अली खान यांच्या गायकीचा समृद्ध वारसा जपणाऱ्या गायिका म्हणून प्रचलित आहेत. त्यामुळे रसिकांनी या मैफलीस गर्दी केली. नसती उठाठेव मंडळाच्या वतीने दीपावली पहाट कार्यक्रम आयोजनाचे यंदा सोळावे वर्ष होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंतर तालुका क्रिकेट स्पर्धेचे १० नोव्हेंबर रोजी उद्घाटन

$
0
0

आंतर तालुका क्रिकेट

स्पर्धेचे शनिवारी उद्घाटन

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित किशोर सूर्यवंशी मेमोरियल ट्रॉफी आंतर तालुका क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी, १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. शहरातील अनंत कान्हेरे मैदानावर विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्या हस्ते व रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी, मनपा स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन गेल्या सात वर्षांपासून जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये निवड समितीचे सदस्य व प्रशिक्षक यांच्या मार्फत व प्रत्येक तालुक्यातील प्रतिनिधी यांच्या सहकार्याने तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमधील खेळाडूंसाठी तालुक्यामध्ये संघाची निवड चाचणी आयोजित करते. याही वर्षी दिनांक २१ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान सर्व पंधरा तालुक्यातील संघांची खेळाडूंची निवड समितीचे सतिश गायकवाड, संजय परिडा, बाळू मंडलिक, महेश मालवी, मंगेश शिरसाट, मंगेश गदडे, मोहनिष मुळे, संकेत बोरसे, भाविक मंकोडी, शिरीष लढ्ढा, शांताराम मेने, सर्वेश देशमुख, राजू आहेर, अण्णासाहेब पारटे यांच्या परिश्रमाने निवड करण्यात आली. यावेळी प्रत्येक तालुक्यातील प्रतिनिधींनी मोलाचे सहकार्य केले.

यावर्षी ही स्पर्धा अनंत कान्हेरे मैदान, महात्मा नगर क्रिकेट मैदान, सय्यद पिंपरी क्रिकेट स्टेडियम व कळवण तालुक्यातील बेजे गावातील क्रिकेट मैदानावर होणार आहेत. यावर्षी पहिल्यांदाच कळवण तालुक्यातील बेजे या गावांमध्ये शरद निकम व त्यांच्या संघाने तयार केलेल्या मैदानावर काही सामने होणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील खेळाडूंचा खेळ क्रिकेट रसिकांना बघावयास मिळणार आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा उद्देश त्यामुळे सफल होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठवणींचा दीप

$
0
0

दिवाळीचा उत्सव साजरा होत असताना अनेकजणांना आपल्या लहानपणीची आणि यापूर्वी साजरी झालेली दिवाळी प्रकर्षाने आठवते. काय आहेत त्या आठवणी? अशा कुठल्या बाबी आहेत, ज्यामुळे दिवाळी अविस्मरणीय ठरते? कुठल्या प्रथा-परंपरा आहेत, ज्या आपल्याला आठवणींमध्ये रममाण करतात? शहरातील काही मान्यवरांच्या दिवाळीविषयीच्या या आठवणी....

रोषणाई आजही स्मरणात

आमच्या लहानपणी नाशकात वीज नसायची. मग दिवाळी आणि आखाजी अशा सणांना पणत्या लावून रोषणाई केली जायची. ती रोषणाई आजही स्मरणात आहे. आमच्या बालपणातील दिवाळी शांत होती. आनंद, उत्साह तेवढाच होता. मात्र, आजसारखा झगमगाट, आतषबाजी नव्हती. बायका एकमेकांच्या घरी जाऊन दिवाळीचा फराळ बनवायच्या. आजसारखे त्यावेळी तयार फराळाचे पदार्थ विकत मिळत नसल्यामुळे घरीच बायका फराळ बनवायच्या. अशी शांत आणि आनंदाने आम्ही दिवाळी साजरी करायचो.

- दिगंबर गाडगीळ, ज्येष्ठ पक्षी निरीक्षक

कडाक्याच्या थंडीत अभ्यंगस्नान

पूर्वी दिवाळीच्या काळात नाशकात प्रचंड थंडी असायची. एवढ्या थंडीत पहाटे अभ्यंगस्नान करण्याची आगळीवेगळी मजा होती. गल्लीतील सर्व मित्रमंडळींच्या घरी फराळाचे आमंत्रण असायचे. आम्ही सर्वजण सोबत फराळाचा आस्वाद घ्यायचो. नातेवाईकांना भेटणे, नवीन कपडे, नवीन सजावट सारेकाही नवखे होते. अशी ही आनंदाची दिवाळी अजून स्मरणात आहे.

- दिलीप फडके, शिक्षणतज्ज्ञ

प्रदूषणाविषयी योग्य निर्णय

दोन वर्षांपूर्वी मी दिल्लीला माझ्या मुलाला भेटायला गेले होते. त्यावेळीदेखील दिल्लीत आजसारखेच प्रदूषित वातावरण होते. त्यावेळी माझ्या मुलाच्या जेएनयूमधल्या मित्रांनीसुद्धा सांगितले की सर्वोच्च न्यायालयाने याविषयी काहीतरी निर्णय घ्यावा. आज झालेल्या निर्णयाचे आम्ही सर्व स्वागत करतो. याविषयी युवकांमध्ये उस्फूर्त प्रतिसाद दिसून आलाय. युवकांमध्ये आता दिवाळी म्हणजे नवनवीन गोष्टींची खरेदी असा अर्थ झाला आहे.

- डॉ. मेधा सायखेडकर, प्राध्यापक

समाजासोबतचा आनंद विसरलो

जग बदलल्यामुळे अनेक अमूलाग्र बदल झाले आहेत. त्यामुळे सण साजरा करण्याचा खरा आनंद पूर्वीसारखा राहिला नाही. फक्त देखाव्याकडे आणि समृद्धीला प्राधान्य दिले जात असून, समाजासोबत आपला वेळ घालवण्याचा आनंद कुठेतरी आपण विसरून गेलो आहोत.

- नीलेश धर्माधिकारी, पुरोहित

मौजमजेची दिवाळी

आमच्या लहानपणी समवयस्क मंडळी खूप असायची. त्यावेळची रविवार कारंजा, शनि गल्लीतील मोरेवाडा येथील दिवाळीची मौजमजा काही औरच होती. त्यावेळी सर्वजण एकत्र येऊन दिवाळी साजरी करत.

- डॉ. मिलिंद वाघ, प्राध्यापक

आता सगळे बनावट

पूर्वीच्या दिवाळीमध्ये आम्ही सर्व कुटुंबातील व्यक्ती एकत्र मिळून फराळ बनवत असू व गप्पागोष्टी करायचो. आताच्या दिवाळीमध्ये सर्व बाहेरून बनावट फराळ व वस्तू आणल्या जातात. त्यामुळे घरातील मजा लोप पावत चालली आहे. पूर्वी सर्व जमले की पत्ते खेळणे, डेकोरेशन करणे, रांगोळी काढणे अशा उपक्रमांमध्ये मजा येत असे. अशी पूर्वीची दिवाळी अतिशय मजेशीर होती.

- नेहा पाटील, डॉक्टर

लहानपणी जसे दिवाळीचे आकर्षण सर्वांना असते, तसेच मलादेखील होते आणि अजूनही आहे. पण मला वाटते की पूर्वीची दिवाळी अन् आताची साजरी होणारी दिवाळी यांचे स्वरूप बदलत आहे. दिवाळीतील आनंद, चैतन्य कुठेतरी हरवत आहे. सध्याची दिवाळी फटाके फोडून साजरी होत असल्याने निसर्गाची आणि पर्यावरणाची हानी होत असल्याने प्रत्येकाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.

-किशोर पवार, माजी प्राचार्य

आधीची दिवाळी ही मला आताच्या दिवाळीपेक्षा अधिक समृद्ध वाटते. आधीच्या दिवाळीत फटाके हे मुख्य आकर्षण असायचे. वडिलांचा कांदा आयात-निर्यातीचा व्यवसाय असल्याने वडिलांच्या व्यापारी मित्रांकडून खूप फटाके यायचे. दिवाळी संपल्यानंतरदेखील आम्ही फटाके फोडयचो. लहानपणी एकदा फटाके फोडताना माझा हात जळाला होता. जवळपास सहा महिने प्लास्टर होते. दिवाळी आली की ही गोष्ट नक्की आठवते.

- विनायकदादा पाटील, वनाधिपती

आजही मला लहानपणीची दिवाळी आठवते. त्यावेळी आम्ही सर्वजण मामाच्या गावी जायचो. दिवाळीत सर्वजण एकत्र कुटुंबासोबत मजा करायचो. शेतात जाऊन दिवाळीचा फराळ करण्यात एक वेगळीच मजाच असायची. या सर्व गोष्टींना आता खूप मिस करतो. पूर्वी दिवाळीत कुटुंबासोबत खरेदी करायला जायचो. परंतु, आता ऑनलाइन शॉपिंगच्या जमान्यात पूर्वीसारखी मजा नाही.

-डॉ. व्ही. बी. गायकवाड, प्राचार्य

(संकलन - अक्षय सराफ, सौरभ अमृतकर, देवेंद्र पाटील, यश कुलकर्णी, अक्षय शिनकर, विवेक कोळी, स्नेहल अमृतकर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संदीप इन्स्टिट्यूटला नॅकची 'अ' श्रेणी

$
0
0

संदीप इन्स्टिट्यूटला

नॅकची 'अ' श्रेणी

नाशिक : संदीप फाउंडेशन संचलित संदीप इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर कॉलेजला 'नॅशनल ऍक्रिडेशन अँड असेसमेंट काऊन्सिल' (नॅक) कमिटीद्वारे 'अ(A)' श्रेणी मिळाली. तर संदीप इस्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटला नॅक द्वारे ब++ आणि संदीप इंस्टिट्यूट ऑफ फार्मासुटिकल सायन्सेसला नॅक कडून 'ब+ श्रेणी मिळाली आहे.

दुसऱ्या टप्प्यात भेट देण्यात आलेल्या नाशिकमधील विविध कॉलेजच्या मुल्यांकनाची २ नोव्हेंबर रोजी नॅक समितीच्या वेबसाइटवर यादी प्रकाशित करण्यात आली. यामध्ये संदीप इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटरला ४ पैकी ३.११, संदीप इस्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटला ४ पैकी २.८९ तर संदीप इंस्टिट्यूट ऑफ फार्मासुटिकल सायन्सेसला नॅककडून ४ पैकी २.७० गुणांक देण्यात आले. या गुणांकांच्या निकषाने कॉलेज ला अ, ब++ आणि ब+ श्रेणी देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यावर कचरा टाकल्यास दंड

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने ऐन दिवाळीत सातशे सफाई कर्मचाऱ्यांची आऊटसोर्सिंगने भरती करण्याची तयारी सुरू केल्यानंतर या निर्णयाला विरोध करण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांनी सणासुदीच्या काळात संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. संपाची नोटीस दिली नसली तरी, प्रशासनाने संभाव्य शक्‍यता लक्षात घेवून अधिकाऱ्यांना दक्ष राहण्याच्या सूचना केल्या आहेत. सोबतच नागरिकांना देखील रस्त्यावर कचरा टाकण्यापासून प्रतिबंध केला असून, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.

आऊटसोर्सिंगद्वारे सफाई कर्मचाऱ्याची भरतीचा मुद्दा हेरून सफाई कर्मचारी आता महापालिकेची कोंडी करण्याची तयारी केली आहे. या भरतीला विरोध करण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिला आहे तर, दुसरीकडे घंटागाडी कर्मचारीही सानुग्रह अनुदानासाठी संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. त्यापार्श्वभूमीवर महापालिकेने ऐन दिवाळीच्या काळात सफाई कर्मचारी आणि घंटागाडी कर्मचाऱ्यांनी गडबड केल्यास पर्यायी उपाययोजना सुरू केल्या आहेत. नागरिकांनाच रस्त्यावर कचरा टाकू नये, असे आवाहन करण्यात आले असून, कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे अधिकाऱ्यांनाही दक्ष राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यासंदर्भात महापालिकेने जाहीर नोटीस काढून नागरिकांना इशारा दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज बलिप्रतिपदेसाठी बाजारपेठ सज्ज

$
0
0

बलिप्रतिपदेसाठी बाजारपेठ सज्ज

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवाळीत येणारी कार्तिक शुध्द प्रतिपदा हा दीपावलीचा तिसरा दिवस, हिंदुधर्मीयांचा हा एक मोठा सण असून या दिवसाला दिवाळी पाडवा असेही म्हणतात. या दिवशी मध्य आणि उत्तर भारतात नवीन विक्रम संवत् सुरू होते. नवीन वर्ष सुरू होत असल्याने या दिवशी व्यवहारासाठी लागणाऱ्या चोपड्यांची पूजा करण्याची प्रथा आहे. महाराष्ट्रात या दिवशी स्त्रिया पती आणि माहेरच्या व सासरच्या इतर पुरुषांना ओवाळतात.

या दिवशी व्यापारी नव्या चोपड्या आणून त्याची पुजा करतात व मुहूर्ताच्या व्यवहाराला सुरुवात होते. या पुजेसाठी हिंदु पंचागानुसार मुहूर्त काढला जातो. यंदाही बलिप्रदेच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी (८ नोव्हेंबर) सकाळी ६ वाजून ४३ ते ८ वाजून ०८ मिनिटांनी शुभ, सकाळी १० वाजून ५८ मिनिटे ते १२ वाजून २३ मिनिटे चल, दुपारी १२ वाजून २४ मिनिटे ते १ वाजून ४८ मिनिटे लाभ, दुपारी १ वाजून ४९ मिनिटे ते ३ वाजून १३ मिनिटे अमृत आणि सायं. ४ वाजून ३८ मिनिटे ते ६ वाजून १ मिनिटे शुभ या चौघडीमध्ये वहीपूजन व लेखनास प्रारंभ करावा असे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवाळीत कचरा संकलन वाढले

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दिवाळीत नागरिकांकडून घरे तसेच व्यावसायिक आस्थापनांची साफसफाई केली जात असल्याने पालिकेचे कचरा संकलन एकदम २५ टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या आठवड्यापासून दैनंदिन कचरा संकलनात साधारण २५ टक्के वाढ होवून ६५० मेट्रीक टनापर्यंत कचरा संकलीत होवू लागला आहे. गेल्या आठ दिवसांत चार हजार ८०० मेट्रीक टन कचरा संकलीत झाला आहे. एवढा मोठ्या प्रमाणावर कचरा संकलन होत असले तरी, कचरा न उचलल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत.

सहाही विभागात २०७ घंटागाड्या कचरा संकलन करतात. दररोज घंटागाड्या प्रभागात फिरवण्याचे आदेश दिल्याने कचरा संकलानात आठ दिवसात मोठी वाढ झाली आहे. महापालीकेचे दररोज सरासरी केर कचरा संकलन ४५० ते ५५० टनापर्यंत जाते. मात्र दिवाळीच्या कालावधीत साधारण ६५० टनापर्यंत कचरा संकलन गेले आहे. गेल्या आठ दिवसातदिवसात चार हजार ८०० मेट्रीक टन कचरा संकलन झाले आहे. अजून आठ दिवस असाच कचरा संकलनाचा आकडा वाढणार आहे.

००

दिनांक संकलन ( मेट्रीक टन)

३० ऑक्टोबर : ६०२

३१ ऑक्टोबर : ५९२

०१ नोव्हेंबर : ५८७

०२ नोव्हेंबर : ६०१

०३ नोव्हेंबर ५९२

०४ नोव्हेंबर ५७४

०५ नोव्हेंबर ६५५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातपूरला अपघातात तरुण ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबक रोडवरील सातपूर पोलिस स्टेशनपासून काही अंतरावर झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार ठार झाला. जगदीश मोहनसिंग नवले (वय ४५, रा. हेमलता टॉकीजजवळ, रविवार पेठ) असे मृत्यू झालेल्या मोटरसायकलचालकाचे नाव आहे. नवले हे शनिवारी (दि. ३) रात्री ११ वाजता त्र्यंबक रोडवरील सातपूर महापालिका कार्यालयाजवळून मोटरसायकलवरून चालले होते. त्यावेळी अज्ञात वाहन चालकाने त्यांच्या मोटरसायकलला मागून जोरदार धडक दिली. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु रविवार (दि. ४) नोव्हेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनचालकाची ओळख पटली नाही असे पोलिसांकडून सांगण्यात आले. सिद्धेश नवले यांनी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. हवालदार सोर तपास करीत आहेत.

-

मोबाइल हिसकावणारा ताब्यात

फोनवर बोलत चाललेल्या तरुणाचा मोबाइल बळजबरीने हिसकावून पोबारा करून पहाणाऱ्यास उपनगर पोलिसांनी अटक केली आहे.

प्रवीण लिंबाजी काळे ऊर्फ चाफा (वय २२, रा. आम्रपाली झोपडपट्टी, उपनगर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. गांधीनगर येथे राहणारा संदीप भरतसिंह राणा (वय २५) हा मंगळवारी दुपारी पावणेचार वाजता राणेनगरच्या मागील गेटवर मोबाइलवर बोलत होता. यावेळी संशयित काळे मोटरसायकलवरून आला. राणा याच्या हातातील दहा हजार रुपये किमतीच्या मोबाइलसह त्याच्या बॅक कव्हरमध्ये ठेवलेले एक हजार रुपये असा ११ हजारांचा मुद्देमाल हिसकावून पोबारा केला. त्याला पकडण्यात उपनगर पोलिसांना यश आले. उपनिरीक्षक बी. के. गवळी तपास करीत आहेत.

-

तीन मुलींच्या पित्याचा तरुणीवर बलात्कार

नाशिक : स्वत: तीन मुलींचा पिता असूनही एकाने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवित तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. याबाबत उपनगर पोलिसांनी संशयितासह त्याच्या पत्नीवरही गुन्हा दाखल केला आहे.

२५ नोव्हेंबर २००५ ते ८ ऑगस्ट २०१८ या कालावधीत हा प्रकार घडल्याची कैफियत पीडितेने मांडली आहे. प्रवीणकुमार बाबूलाल जैन असे संशयिताचे नाव आहे. त्याने पीडितेला वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखविले. लरोड येथील कृष्णा हॉटेल, तसेच शहरातील अन्य काही ठिकाणी घेऊन जाऊन तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केला. तिने लग्नासाठी तगादा लावला असता तो टाळाटाळ करू लागला. दरम्यानच्या काळात पीडितेला प्रवीणकुमार याचा विवाह झाला असून, त्याला तीन मुली असल्याची माहिती मिळाली. ही बाब लपवून ठेवतानाच तिला मेसेज करून जातिवाचक टोमणे मारू लागला. संशयिताची पत्नी प्रियंका जैन (दोघे रा. सुरीनगर, ता. मोरार, जि. ग्वाल्हेर, मध्य प्रदेश) हिने पीडितेच्या फेसबुक अकाऊंटवर अश्‍लील मजकूर व फोटो व्हायरल करून तिची बदनामी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी बलात्कार, फसवणूक व अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टअन्वये गुन्हा दाखल केला आहे. महिला सहाय्यक निरीक्षक एम. बी. राऊत तपास करीत आहेत.

-

अंबड येथील घरकुलात आत्महत्या

अंबड परिसरातील घरकुल योजनेच्या इमारतीमध्ये राहणाऱ्या ४० वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही असे अंबड पोलिसांकडून सांगण्यात आले. मिलिंद रमेश पांडव (वय ४०, रा. बिल्डिंग क्र. २/६, घरकुल योजना अंबड) असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे. मंगळवारी (दि. ६) सकाळी घरी असताना मिलिंद पांडव यांनी स्वयंपाकघरातील फॅनला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला. याबाबत शरद पांडव यांनी पोलिसांना कळविले. सहायक उपनिरीक्षक शेळके करीत आहेत.

-

दुसरा विवाह करून तरुणीची फसवणूक

विवाह झाला असतानाही संशयिताने अन्य एका तरुणीशी विवाह करून तिची फसवणूक केल्याचा प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये विवाहितेने पतीसह सासरे, नणंद व नंदाई यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे. ही विवाहिता ३४ वर्षांची असून ती होलाराम कॉलनी परिसरात राहाते. पती राजीव मंदानी, सासरे द्वारकाप्रसाद मंदानी, नणंद देविका खेतावत व नंदाई विनय खेतावत अशी संशयितांची नावे आहेत. ६ डिसेंबर २०१७ ते ३० जानेवारी २०१८ या कालावधीत विवाहिता आसाम राज्यातील गुवाहाटी येथील सिकारिया कम्पाऊंड परिसरात सासरी नांदत होती. त्यावेळी तिला छोट्या छोट्या कारणातून शिवीगाळ करून मानसिक त्रास दिला जात होता असे फिर्यादीत म्हटले आहे. राजीव मंदानी याने त्याचे पहिले लग्न झालेले असतानाही ही बाब लपवून ठेवत फसवणूक केली. तसेच मंगळसूत्र, डायमंडचा नेकलेस व सोन्याच्या बांगड्या काढून घेतल्या अशीही विवाहितेची फिर्याद आहे. याबाबत महिला उपनिरीक्षक पिंपरे तपास करीत आहेत.

-

मनपा उद्यानात चंदनचोरी

गणेशनगर येथील रिलायन्स पेट्रोल पंपासमोरील महापालिकेच्या उद्यानातून चोरट्यांनी दोन चंदनाच्या झाडांची खोडे कापून चोरून नेली. याबाबत प्रकाश चौकटे यांनी फिर्याद दिली आहे. ही खोडं १० हजार रुपयांची होती असे फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार पवार तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कापड व्यवसायात कोट्यवधीची उलाढाल

$
0
0

कापड व्यवसायात कोट्यवधीची उलाढाल

पाडवा, भाऊबीजेलाही होणार खरेदी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवाळीसाठी शहरातील रेडिमेड कपडे आणि साड्यांची दुकाने गेल्या पंधरा दिवसांपासून गर्दीने ओसंडून वहात आहे. नवीन कपडे घालून लक्ष्मीपूजन करण्याची पद्धत असल्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची कपडे खरेदी उत्साहात करण्यात येत होती. लक्ष्मीपूजनालाही दुपारपर्यंत कपड्यांची दुकाने गर्दीने फुलून गेल्याचे चित्र होते. आज (८ नोव्हेंबर) पाडवा व उद्या (९ नोव्हेंबर) भाऊबीज असल्याने या दिवसांमध्येही कपडे खरेदी केली जाईल, असा अंदाज विक्रेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

दिवाळीच्या विविध वस्तूंच्या खरेदीबरोबर सर्वात महत्त्वाची खरेदी असते ती कपड्यांची. दिवाळीचे आणि दिव्यांचे, फराळाचे नाते जसे घट्ट तसेच ते फटाके आणि नवे कपडे यांचेदेखील आहे. नवीन कपडे घालून लक्ष्मीची पूजा घराघरात केली जाते. दिवाळीचा हा मुख्य दिवस असल्याने या दिवसासाठी अनेक दिवसांपासून बाजारात चैतन्य वातावरण आहे. शहरातील विविध दुकानांतून कुटुंबांची एकत्रित खरेदी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. डिझायनर साड्या, ड्रेस मटेरियल्सला तसेच नवीन फॅशनच्या कपड्यांना महिलावर्गाची विशेष पसंती मिळते आहे. शहरात साड्या आणि कपड्यांची कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी दिवाळीपूर्वीच व्यक्त केला होता. हा अंदााज ग्राहकांच्या प्रतिसादामुळे खरा ठरला असून कोट्यवधींची कपडे खरेदी केवळ नाशिक शहरात झाली आहे. दिवाळीपूर्वीच सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांच्या हातीही बोनसचा पैसा खेळू लागल्याने शहरात दिवाळीच्या खरेदीने लक्ष्मीपूजनाच्या दिवसापर्यंत जोर धरला होता. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व दिवाळी सणाचे वातावरण तयार करण्यासाठी शहरातील दुकानांवर रोषणाई करून नववधूप्रमाणे दुकाने सजविण्यात आली आहे.

- -

आजही होणार खरेदी

लक्ष्मीपूजनासाठी नवीन कपडे घालण्याची प्रथा असल्याने कपडे खरेदीसाठी बाजाराला उत्साह होताच. त्याबरोबरच पाडव्याला पत्नीला व भाऊबीजेला बहिणीला गिफ्ट दिले जाते. या गिफ्ट्समध्ये अनेकदा साड्या, ड्रेसला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे पाडवा व भाऊबीज असल्याने बाजारात गजबज राहणार आहे.

- -

भाऊबीजेनंतर दुकान बंद

तुलसीविवाहापर्यंत दिवाळी असली तरी भाऊबीजेबरोबर दिवाळीचे मुख्य दिवस संपतात. गेल्या महिनाभर शहरातील दुकाने दसरा, दिवाळीनिमित्त दुकानदारांनी खुलीच ठेवली होती. रात्री उशिरापर्यंत दुकाने खुली ठेवण्यात येत होती. रोजचा हिशोब करून जाण्यापर्यंत कर्मचाऱ्यांनाही दोन वाजत होती. आता वर्षातल्या या मोठ्या सणाची खरेदी भाऊबीजेनंतर थांबणार असल्याने त्यानंतर कपड्याची दुकाने बंद राहणार आहे, असे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेची जम्बो कार्यकारिणी जाहीर

$
0
0

पश्चिम विधानसभा प्रमुखपदी प्रवीण तिदमे यांची पुनर्नियुक्ती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून विधानसभानिहाय पश्चिम मतदारसंघाची जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. नाशिक पश्चिम विधानसभा प्रमुखपदी नगरसेवक प्रवीण तिदमे यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली. सिडको आणि सातपूर असे दोन विभाग मिळून स्वतंत्र विभागसंघटक, उपमहानगरप्रमुख पदे देण्यात आली आहेत. या कार्यकारिणीत तब्बल ५१ जणांचा समावेश आहे. दरम्यान माजी संपर्क प्रमुख अजय चौधरी यांचा पुतळा जाळणाऱ्यांना पुन्हा कार्यकारिणीत महत्त्वाची पदे देण्यात आल्याने निष्ठावन शिवसैनिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने शहरासाठी दोन महानगरप्रमुख पदे देण्यात आली आहेत. तसेच पक्षाची कार्यकारणी ही आता विधानसभाहाय घोषित करण्यात येत आहे. नाशिक पूर्व, मध्य पाठोपाठ आता पश्चिम मतदारसंघाचीही कार्यकारिणी बुधवारी शिवसेनेच्या मुखपत्रातून जाहीर करण्यात आली आहे. सिडको आणि सातपूर या विभागात स्वतंत्रपणे उपमहानगरप्रमुख, विभागप्रमुख, संघटक व उपविभागप्रमुखासह शाखाप्रमुख ही पदे निर्माण करण्यात आली आहे. नगरसेवक प्रवीण तिदमे यांच्याकडे विधानसभाप्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सिडको विभागात विधानसभा संघटक म्हणून सुभाष गायधनी तर उपमहानगरप्रमुख या पदावर विष्णू पवार आणि नाना पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समन्वयक म्हणून रमेश उघडे, बबलू सूर्यवंशी, तर विभाग संघटक म्हणून योगेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंधरा जणांना उपविभागप्रमुख ही पदे बहाल करण्यात आली आहे. सातपूर विभागात उपमहानगप्रमुख म्हणून दीपक मौले, देवा जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा संघटक म्हणून नरेश सोनवणे, कार्यालयीन उपमहानगप्रमुख महेंद्र शिंदे तर, विधानसभा समन्वयक म्हणून गोकूळ निगळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दत्ता पाटील, प्रशांत दैतकर आणि गोकुळ तिडके यांची विभागसंघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

००

पुतळे जाळणाऱ्यांना स्थान

या कार्यकारिणीत माजी संपर्कप्रमुख अजय चौधरी यांचे जाहीर पुतळे जाळणाऱ्या काही पदाधिकाऱ्यांना महत्त्वाची पदे देण्यात आली आहेत. डी. जी. सूर्यवंशी यांच्या पक्षातील पुनर्प्रवेशाने अस्वस्थ झालेल्या विष्णू पवार, नाना पाटील, सुभाष गायधनी, रमेश उघाडे यांनी चौधरी यांचा पुतळा महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जाळला होता. त्यावेळी पक्षाने यांच्यासह तब्बल आठ जणांची पक्षातून हकालपट्टी केली होती. त्यानंतर यातील काही जन मनसेतही गेले होते. परंतु, पुन्हा त्यांचा पक्षप्रवेश करण्यात आला. आता त्यांना कार्यकारिणीत महत्त्वाची पदे बहाल करण्यात आल्याने निष्ठावान शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा

$
0
0

वैद्य विक्रांत जाधव

दिवाळी पाडवा... कार्तिक महिन्याचा प्रथम दिन. विवाहित दांपत्यांमध्ये स्त्री पुरुषाला ओवाळते, हा संस्कार आशीर्वादासाठी आणि उज्ज्वल संसारासाठी. या दिवसाला वेगळे महत्त्व आहे ते बळी प्रतिपदेचे. यामागे भगवान विष्णूची एक पौराणिक कथा आहे. भगवान विष्णूने वामन अवतारात बळीला पाताळात ढकलून दिले. परंतु, बळीच्या आजोबांच्या इच्छेनुसार त्याला वरदान दिले की, बळी पाताळातील राजा असेल आणि लोक त्याची पूजा करतील. म्हणून बळीप्रतिपदा. या कथेला एक मानसिक चिकित्सेचे रूप आहे. पाडव्यामध्येही प्रेम आणि सुविचार यांचा मेळ शास्त्राने केला असून, आज त्याची आवश्यकता अधिक वाटते.

पाडव्याला पत्नीने पतीला ओवाळने यातून पत्नी-प्रतींमधील प्रेम, आदर, निष्ठा याची प्रचीती देणे, हा एक मानसिक संतुलन सुविचारी करण्याचा प्रयत्न शास्त्राने केला आहे. आज मनाचा खेळ वेगळा झाला असून, एकमेकांत समज-गैरसमजांमुळे मनाला व्याधी होताना दिसते. पुराणकालीन हे संस्कार, प्रथा जर पाळल्या तर हे अनर्थ टळण्यास मदत होते आणि हाच विचार शास्त्राचा असावा. एकमेकांना भेटवस्तू देऊन संबंध दृढ करण्याचे संस्कार म्हणजे पाडव्याची ओवाळणी आणि त्यानिमित्त आदरभाव वाढवणे. पाडव्याच्या कथेमध्ये भगवान विष्णूला लक्ष्मी देवतेने विष्णूच्या गुणांचे कौतुक करण्यासाठी केलेली पूजा आणि विष्णूने आदर व्यक्त करीत केलेली स्तुती ही यातील गर्भ सांगते. दिवाळी हा केवळ शरीराचे आरोग्य नव्हे, तर मनाचे आरोग्य टिकवणाराही सण आहे, हे यातून लक्षात येते. बळीला दिलेला सन्मान आणि स्त्री पुरुषाचा एकमेकांच्या प्रति आदर ही पुराणकाळी पुढील काळ ओळखून केलेली योजना आहे. यात गोड पदार्थ खायला घालून आरोग्य स्थापनेचे ब्रीद नमूद केलेले दिसते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंध बांधवांना दिवाळी भेट

$
0
0

अंध बांधवांना दिवाळी भेट

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ब्लाईंड वेल्फेअर ऑर्गनायझेशनच्या वतीने धनत्रयोदशीच्यानिमित्ताने अंध बांधवांना दिवाळी भेट देण्यात आली. या वेळी शंभरहून अधिक अंध बांधव उपस्थित होते. अंध बांधवांच्या दिवाळीत प्रकाशवाटा पेरण्यासाठी आणि त्यांच्या उत्साहात अधिक भर घालण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. या बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छांसोबत मिठाई, फराळ आणि कपडे भेट देण्यात आले. यावेळी उद्योजक संजीव पैठणकर, आशा वेणुगोपाल, जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष अनिल नहार उपस्थित होते. ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष अरुण भारस्कर, कोषाध्यक्षा विजया मराठे, सपना चांडक, सचिव दत्ता पाटील, विशाल पाटील यांनी उपक्रमाचे संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रबोधनपर मेसेजचं दिवाळी गिफ्ट

$
0
0

प्रबोधनपर मेसेजचं दिवाळी गिफ्ट

ग्रीटिंग्जमधून समाजप्रबोधनपर शुभेच्छा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यंदा दिवाळीच्या शुभेच्छांच्या ग्रीटिंग्जवर समाजप्रबोधनपर मेसेजेस अधिक प्रमाणात लिहिण्यात आले आहेत. प्रत्येक शुभेच्छा पत्रावर एखादा समाजप्रबोधनपर मेसेज देण्यात आल्याचे दिसून येत आहे. डाएट, समाजिक बांधिलकी यांसह विशेष थिम अंतर्गत शुभेच्छा पत्र यंदा तयार करण्यात आले आहेत. या शुभेच्छा पत्रांद्वारे नातेवाइक, आप्तेष्टांवर दीपोत्सवाच्या प्रकाशमय शुभेच्छांचा वर्षाव सर्वत्र सुरू आहे. प्रबोधनपर मेसेजच्या माध्यमातून दिवाळीचं अनोख गिफ्ट यंदा देण्यात येत आहे.

दिवाळीच्या शुभेच्छा देणारे लांबच लांब मेसेजची जागा यंदा व्हॉटस अॅपवरच्या स्टिकर्सनी घेतली. त्याचप्रमाणे यंदा शुभेच्छा पत्रांवरच्या वाक्यांनी समाजप्रबोधनाचा वसा घेतला आहे. 'नाशिक जिल्ह्यातील काही गावांमध्ये दुष्काळचे संकट यंदा ओढावले आहे. या गावामधील शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. त्यांच्यापैकी आपल्या जवळच्या किंवा परिचयातील शेतकऱ्यांना अथवा त्यांच्या पाल्यांना काही रक्कम आर्थिक सहाय्यासाठी देऊया. दिवाळीच्या शुभेच्छांसोबतच शेतकऱ्यांच्या सोबत आपण कायम असल्याचा दिलासा देऊया', असे ग्रिटिंग अरूण कुकडे यांनी तयार केले आहे.

विश्वास बँकेच्या ग्रीटिंगमध्ये 'काट्याने काटा वाढावायचा की, कमी करायचा हे आपल्याच हाती आहे', असे उपहासात्मक लिहिण्यात आले आहे. वजन काटा, जंकफूड आणि सलाड यांचे कोलाज करत हे वाक्य लिहिण्यात आले आहे. आहारात जंकफूडऐवजी सलाडचा वापर सर्वाधिक करा, असे या ग्रीटिंगमधून सांगण्यात आले आहे. तसेच भुजबळ नॉलेज सिटीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षाच्यानिमित्ताने दिवाळीच्या शुभेच्छांचे ग्रिटिंग सजविले आहे. ग्रीटिंगच्या मुख्य पृष्ठावर गांधीजींच्या प्रतिमेची आऊटलाइन करण्यात आली आहे. महात्मा गांधीच्या जीवनावर आधारित आणि महात्मा गांधी यांच्या तत्त्वांची थिम या ग्रीटिंगसाठी ठेवण्यात आली आहे. शुभेच्छा पत्रांसहित व्हॉटसअॅपवरही दिवाळीच्या शुभेच्छांच्या मेसेजमध्ये समाजप्रबोधनावर भर देण्यात येत आहे. 'कृपया फटाके फोडतांना मुक्या पशुपक्षांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या', 'पर्यावरणपुरक दिवाळी साजरी करा', 'अहंकार जाळा नकोत नुसते फटाके, हृदयासोबत नाते जोडा नकोत नुसत्या माणसांशी, नव्या विचार आत्मसात करा नकोत फक्त नवे कपडे, ज्ञानाचे दिवे लावा नको फक्त पणती' या मेसेजेसमधून जनजागृती करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटिझन रिपोर्टर

$
0
0

सिटिझन रिपोर्टर

सिडको

वाहतुकीत अडथळा

सिडकोतील अनेक दुकानांना पार्किंग नाही. त्यामुळे रस्त्यावरच वाहने लावली जातात. त्यामुळे वाहतुकीस प्रचंड अडथळा निर्माण होतो. पादचाऱ्यांना तर जीव मुठीत धरूनच चालावे लागते.

- चंद्रशेखर जोशी

सिडको

हे कधीपर्यंत चालणार

नाशिकची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होत असताना अजूनही रस्त्यावर कचरा टाकणे सुरूच आहे. घंटागाडी येत असूनही कचरा बाहेर फेकणे कितपत योग्य आहे?

सागर भालके

नाशिकरोड

खेळणी तुटली

नाशिकरोडच्या निसर्गोपचार केंद्रातील विविध खेळणी तुटली आहेत. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. मनपाने दखल घेऊन त्वरीत दुरुस्ती करावी.

-राजाराम पागेरे

शहर परिसर

किल्ले बनवा

दिवाळीच्या सुटीत मुलांना किल्ले बनविण्याच्या उपक्रमांमध्ये सहभागी करुन घ्यायला हवे. वेगळाच आनंद त्यामुळे मिळतो. विद्यार्थ्यांची सर्जनशीलता वाढते, इतिहासही कळतो

-विनायक येवले

शहर परिसर

मुलांना खेळू द्या

शाळांना सुट्या लागल्या आहेत. त्यामुळे मुलांना मनसोक्त मैदानात खेळू द्या. त्यांना वेगळाच अनुभव मिळेल. उगाच नकार देऊन त्यांचा हिरमोड करू नका.

- राकेश दळवी

शहर परिसर

फटाके नकोच

यंदाची दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी केली पाहिजे. गरजू आणि गोरगरिबांना कपडे, फराळ वाटून दिवाळी साजरी करुया. फटाके न फोडता प्रदूषणाला फाटा देऊन दिवाळी आनंदमय साजरी करुया.

-आकाश घाडगे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीपज्योती नमोस्तुते- भाऊबीज

$
0
0

दीपज्योती नमोस्तुते : भाऊबीज

वैद्य विक्रांत जाधव

भाऊबीज हा हिंदुधर्मीय भाऊ-बहीण साजरा करीत असलेला एक सण आहे. हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया (यमद्वितीया) या दिवशी असतो. या दिवसाला यमद्वितीया म्हणतात. या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानतात म्हणजे असे केल्यामुळे त्यावर्षी यमापासून तरी भय नसते असा समज आहे. यम आणि यमी या भावा-बहिणीच्या प्रेमाबद्दल अशी कथा आहे की यम मृत्यू पावला त्यावेळी यमीला एवढे दुःख झाले की ती आपली रडणे व डोळ्यांतील अश्रू काही केल्या थांबवेना. तेव्हा शेवटी दिवस संपला हे दाखवण्यासाठी देवाने रात्र निर्माण केली आणि मग यमीचे भावाबद्दलचे दुःख थोडेसे हलके झाले तेव्हापासून भाऊबीजेची प्रथा पडली. आपल्या भावाचे आयुष्य वाढावे म्हणून बहिणीने यमराजाची पूजा आणि प्रार्थना करायची.

या दिवशी बहिणीच्या किंवा स्वतःच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीचे ताटात ओवाळणी देऊन बहिणीचा सत्कार करतो. या ठिकाणी या ऋतूतील चंद्रप्रकाशाचे महत्त्व आरोग्याच्या दृष्टीने सांगितले आहे. कोजागरीला चंद्र दूध ठेवून नंतर सेवन करणे हा संस्कार सांगून चंद्राचा आरोग्याशी संबंध जोडला आहे. या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रे अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले म्हणून या दिवशी बहीण भावाला आरती ओवाळून त्याची पूजा करीत असते. त्याला प्रेमाचा टिळा लावते, तो टिळा बहिणीच्या नि:स्वार्थी प्रेमभावना व्यक्त करीत असतो भावाची पूजा म्हणजे यमराजाच्या पाशातून म्हणजे मृत्यूपासून भावाची सुटका व्हावी व तो चिरंजीव रहावा हा यामागचा उद्देश असतो.

या दिवशी घरी जेवण करू नये व पत्नीच्या हातचे जेवण करू नये, असे धर्मग्रंथात सांगितले आहे. याचे सूत्र मात्र वेगळे आहे ते बहिणीला मान देण्याचे, इथेही घर सांभाळण्यासाठी मनचिकित्सा शास्त्रने केलेली दिसते. जवळचा किंवा दूरचा भाऊ नसल्यास चांदोबास ओवाळण्याची पद्धत आहे. आपल्या सणामागे असलेल्या कल्पनांची विशाल पण यावरून दिसून येते. टिळा लावणे हे आरोग्यदायी आहे हे ध्यानात घ्यावे. कपाळावर ज्या ठिकाणी गंध लावले जाते ते संस्कार व्हावे विचारांना चालना मिळून सद्बुद्धी, सत्कार्य घडावे यासाठी आहे. दिवाळी एक संस्कारांचा मेळ आहे. आज केवळ भारतात नव्हे तर विश्वातील असंख्य ठिकाणी दिवाळी साजरी केली जात आहे आणि हे भारतीय संस्कार शरीर व मनाच्या आरोग्यासाठी पसरत आहेत ही गर्वाची बाब आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images