Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

स्काऊट-गाइडचा आता डिसेंबरमध्ये मेळावा

$
0
0

नाशिकरोड : महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्स आणि गाइड्स मुंबई आणि अहमदनगर भारत स्काऊट्स आणि गाइडस जिल्हा संस्थेतर्फे अहमदनगर येथे दि. १२ ते १८ नोव्हेंबरदरम्यान सहाव्या राज्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते. मात्र, अपरिहार्य कारणास्तव हा राज्य मेळावा पुढे ढकलण्यात आला असून, आता हा राज्य मेळावा सुधारित वेळापत्रकानुसार अहमदनगर येथे दि. १ ते ७ डिसेंबर या कालावधीत होणार असल्याची माहिती राज्य चिटणीस सारिका बांगडकर यांनी कळविली आहे. नाशिक जिल्ह्यातील स्काऊट्स आणि गाइड्स यांनी नोंद घेण्याची आवाहन त्यांनी केले आहे.

--

\Bशुल्कासाठी आजची मुदत\B

नाशिक : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने डिसेंबर महिन्यात आर्टिझन टू टेक्नोक्रॅट' या योजनेंतर्गत तृतीय स्तरीय परीक्षा घेण्यात येणार आहे. या योजनेतील तृतीय स्तरीय परीक्षेत याअगोदर अनुत्तीर्ण झालेल्या, तसेच द्वितीय स्तर परीक्षा उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना आज, मंगळवारी (दि. २३) परीक्षा शुल्क जमा करण्याची अखेरची मुदत आहे. ही परीक्षा दि. ४ ते ७ डिसेंबर २०१८ या कालावधीत होईल. ज्यांनी अद्याप परीक्षा अर्ज भरलेला नाही त्यांनी आज शुल्क व परीक्षा अर्ज भरावा, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अतिक्रमण निर्मूलनाचा फार्स

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने सोमवारी पुन्हा एकदा नाशिकरोडमधील विविध ठिकाणी अतिक्रमणे हटविण्याची कारवाई केली. मात्र, त्यापैकी काही ठिकाणी यापूर्वी अनेकदा अतिक्रमण निर्मूलन कारवाई होऊही या अतिक्रमणधारकांवर ठोस कायदेशीर कारवाई न झाल्याने महापालिकेची कारवाई निव्वळ फार्स ठरत आहे.

महापालिकेच्या पथकाने सोमवारी बिटको रुग्णालयाजवळील भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई केली. येथील विक्रेत्यांनी विरोध केल्याने त्यांच्याकडील सुमारे एक ट्रक भाजीपाला अतिक्रमण निर्मूलन पथकाने ताब्यात घेतला. भीमनगर येथेही पाच दुकाने आणि ओट्यांचे अतिक्रमण हटविले. चेहेडी पपिंग स्टेशन येथील भगवा चौकातील गुरव चाळ येथे साइड मार्जिनमधील पक्क्या बांधकामाचे अतिक्रमणही हटविण्यात आले. नाशिक-पुणे महामार्गालगत सेंट झेविअर हायस्कूल परिसरात कपड्यांची विक्री करणाऱ्यांच्या अनधिकृत स्टॉल्सवरही सायंकाळी साडेसहा वाजता कारवाई करण्यात आली.

--

अतिक्रमण लगेच जैसे थे!

बिटको रुग्णालयाजवळील भाजीविक्रेत्यांचे अतिक्रमण हटविल्यानंतर या पथकाने आपला मोर्चा मुक्तिधाम चौकाकडे वळविला.या ठिकाणी देवळाली रस्त्यावर सोमाणी गार्डनच्या भिंतीलगत बसलेल्या फुगे विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी पथक थांबले असता मुक्तिधाम चौकातील सर्व हातगाडे व्यावसायिक आणि कुल्फी विक्रेत्यांनी पोबारा केला. काही वेळातच अतिक्रमण पथक येथे हजर झाले. परंतु, संपूर्ण चौक मोकळा असल्याचे बघून पथक पुढे निघून गेले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच सर्व हातगाडे व्यावसायिक आणि कुल्फी विक्रेते पुन्हा रस्त्यावर अवतरले होते.

धनदांडग्यांना अभय?

मुक्तिधामजवळील कारवाईवेळी फुगे व लहान मुलांच्या करमणुकीचे साहित्य विक्री करणाऱ्या महिलांकडील सर्व साहित्य पथकाने जप्त केले. या महिला पथकाचे अधिकारी, कर्मचारी व पोलिसांकडे याचना करीत होत्या. परंतु, त्यांच्याकडे पथकाने दुर्लक्ष केले. येथेच फुटपाथवर आजी-माजी नगरसेवकांनी दुकाने थाटलेली आहेत. त्यांच्याच नावाने शेकडो हातगाडे फुटपाथच्याही खाली उभे आहेत. मात्र, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने या पथकाकडून या धनदांडग्यांना अभय दिले जात असल्याचे व गोरगरिबांच्या साहित्याची जप्ती केली जात असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घर खाक

$
0
0

आगीत घर खाक

कळवण : कळवण तालुक्यातील ईंशी गावी राहणारे शानू बदा भोरे यांचे अकस्मात आग लागून राहते घर जळाले असून घरातील सर्व जीवनावश्यक वस्तू व सामान जळाले.यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.याबाबत शासकीय यंत्रणेकडून पंचनामा केला जात असून,या आदिवासी कुटुंबातील सदस्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. त्यासाठी शासनाने ती द्यावी ही मागणी आदिवासी बांधवांसह कुटुंबातील सदस्यांनी केली आहे. आग लागण्याचे स्पष्ट कारण समजू शकले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांचा मनपाला दणका

$
0
0

फटाक्यांच्या ७० स्टॉल्सना परवानगी नाकारली; सुरक्षेसह वर्दळीचे दिले कारण

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पोलिसांच्या परवानगीपूर्वीच फटाके विक्री स्टॉल्सचा लिलाव काढणाऱ्या महापालिकेला पोलिसांनी पुन्हा दणका देत शहरातील १० ठिकाणच्या ७० फटाके विक्री स्टॉल्सना परवानगी नाकारली आहे. सुरक्षा तसेच वर्दळीचे कारण देत, ही परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेने काढलेल्या ४७० पैकी आता ४०० स्टॉल्सचा लिलाव होणार आहे.

महापालिका आणि पोलिसांचा वाद आता नेहमीच झाला आहे. गेल्या वर्षासह नवरात्रोत्सवातील गाळ्यांचा वाद ताजा असताना महापालिकेने दिवाळीतल्या फटाके विक्रीच्या स्टॉल्सच्या लिलावाबाबत घाई केली. नवरात्रोत्सवात पोलिसांनी लिलावाच्या दिवशीच कालिका मंदिर परिसरातील स्टॉल्सला परवानगी नाकारली होती. त्यानंतरही प्रशासनाने त्यातून धडा घेतला नाही. त्याचाच फटका महापालिकेला पुन्हा बसला आहे. पोलिस प्रशासनाच्या परवानगीच्या अधिन राहून महापालिकेने यंदा सहाही विभागातील २७ ठिकाणी तब्बल ४७० फटाके विक्री स्टॉल्सची उभारणी करण्यासाठी २५ व २६ ऑक्टोबर रोजी लिलाव काढले होते. या लिलावाची प्रक्रिया सुरू होण्यास चार दिवसांचा कालावधी शिल्लक असतानाच पोलिस उपायुक्त (मुख्यालय) माधुरी कांगणे यांच्या स्वाक्षरीचे पत्र महापालिकेला प्राप्त झाले असून त्यात ४७० पैकी ७० स्टॉल्सची परवानगी नाकारण्यात आली आहे. यामध्ये नाशिक पूर्व विभागातील १, पंचवटी ४, नाशिकरोड ४, सातपूर विभागातील एक अशा १० ठिकाणांचा समावेश आहे. वर्दळीचे ठिकाण, संभाव्य वाहतूक कोंडी, सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न अशी कारणे या परवानगी नाकारण्यामागे देण्यात आली आहे.

ईदगाह मैदानाला हिरवा कंदील

पोलिसांनी ईदगाह मैदानावर अटीशर्थींच्या अधीन राहून ५० फटाके स्टॉल्स उभारणीस परवानगी दिली आहे. जिल्हा रुग्णालयासमोरचा परिसर हा सायलेन्स झोन आहे. त्यामुळे रस्त्यावर परवानगी मिळणार नाही. हा परिसर वर्दळीचा असल्याने सुरक्षेच्या सर्व उपायोजनांची जबाबादारी महापालिकेवर असेल, असे पोलिसांनी नमूद केले आहे. त्यामुळे येथील विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. म्हसरूळ गीतानगर येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालयाशेजारी वस्ती असल्याने अग्निप्रतिबंधक उपाययोजना करण्याच्या अटीवर परवानगी देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ड्यूऑथलॉनमध्ये प्रथमच धावले नाशिककर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

टीम ई थ्रीतर्फे नाशिकमध्ये पहिल्यांदाच ड्यूऑथलॉन स्पर्धा आयोजीत करण्यात आली. त्यात मोठ्या प्रमाणात पुणे, औरंगाबाद, मुंबई आणि नाशिकमधील स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.

ड्यूऑथलॉन म्हणजे सायकलिंग आणि धावण्याची स्पर्धा. कोल्हापूर नंतर महाराष्ट्रात नाशिक मध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची स्पर्धा रविवारी २१ ऑक्टोबरला तपोवनात घेण्यात आली. यात ३ कि.मी. धावणे व त्यानंतर २२ कि. मी. सायकलिंग आणि नंतर २ कि. मी. धावण्याचा समावेश होता. या स्पर्धेत सहभागी झालेल्या चार वयोगटातील ३२ विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. तसेच राईडमध्ये सहभागी झालेल्या सर्व सायकलिस्टना पदक आणि प्रमाणपत्र देण्यात आले. या स्पर्धेत १४ ते २०, २० ते ३५, ३५ ते ५० आणि ५० पेक्षा जास्त असे वयोगट करण्यात आले होते. प्रत्येक वयोगटातील एक पुरुष व एक महिला असे ३२ विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. प्रथम येणाऱ्यास २ हजार रोख, द्वितीय १ हजार रोख, तृतीय बक्षीस चांदीचे नाणे, चौथे बक्षीस सायकल सर्व्हिसिंग कूपन देण्यात आले. ३ कि. मी. धावण्यासाठी वॉटरवेज, तपोवन ते साधुग्राम गेट व परत वॉटरवेज असा मार्ग होता. २२ कि.मी. सायकलिंगसाठी वॉटरवेज, तपोवन ते जनार्दन स्वामी मठ, माडसांगवी, शीलापूर ते परत त्याचमार्गे वॉटरवेज असा मार्ग होता.

२ कि.मी. धावण्यासाठी वॉटरवेज ते श्री गणेश डिव्हाईन व परत वॉटरवेज, तपोवन असा मार्ग होता. रवींद्र नाईक जिल्हा क्रीडा अधिकारी, राजेंद्र निंबाळते अध्यक्ष महाराष्ट्र ट्रायथलॉन असोसिएशन, पोलिस इन्सपेक्टर मधुकर कड, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण खाबिया, डॉ. महेंद्र महाजन यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.

वयोगट १४ ते २० पुरुष

अनुज उगले, किशोर शिरसाठ, निसर्ग भामरे, साई शेटे

वयोगट १४ ते २० महिला

अनुजा उगले, रेश्मा सातपुते, साक्षी तेजाले

वयोगट २० ते ३५ पुरुष

अमोल बागुल, हिमांशू थुसे, दर्शन दुबे, नीलेश थोळे

वयोगट २० ते ३५ महिला

देविका पाटील, गारबी केडीया, मानसी तेजाले

वयोगट ३५ ते ५० पुरुष

दत्तात्रय चकोर, दिनकर पाटील, राहिमान खान, नंदू उगले

वयोगट ३५ ते ५० महिला

अश्विनी देवरे, जसविंदर सांधू, सपना नेरे

वयोगट ५० पुढील पुरुष

माणिक निकम, पुंडलिक महाले, प्रदीप खराडे, उत्तम पवार

वयोगट ५० पुढील महिला

सुचित्रा पालवे, शैलजा जैन.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुधाला दरवाढीची उकळी

$
0
0

कोजागरीच्या पूर्वसंध्येला ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कोजागरी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला ग्राहकांची दूध बाजारात दूध खरेदीसाठी मोठी गर्दी झाल्याने दुधाचे दर ६५ ते ७० रुपयांपर्यंत कडाडले. मंगळवारी हेच दर ७५ ते ८० रुपये प्रति लिटरपर्यंत जाण्याची चिन्हे आहेत.

कोजागिरीनिमित्त दूध प्राशन करण्याची परंपरा आहे. त्यामुळे सोमवारी दूधबाजारात दुधाचा भाव वधारला होता. सकाळी ६० रुपये असलेले म्हशीचे दूध सायंकाळी ६५ रुपये प्रति लिटरप्रमाणे ग्राहकांनी खरेदी केले. कोजागरीच्या दिवशी दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळ्या, वेलदोडे, जायफळ आणि साखर घालून, लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविण्याची प्रथा आहे. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू दिल्यानंतर ते दूधप्राशन केले जाते. त्यामुळे कोजागरीच्या निमित्ताने दरवर्षी दुधाचा भाव अधिक असतो. गेल्या वर्षी कोजागरीच्या पूर्वसंध्येला म्हशीचे दूध ६० रुपये प्रतिलिटर प्रमाणे विक्री करण्यात आले. यावर्षी पूर्वसंध्येलाच ६५ रुपये प्रतिलिटर दुधाचा भाव होता. उपनगरातील काही दुकानात ७० रुपयांनी दूध खरेदी ग्राहकांना करावी लागली. नेहमीपेक्षा सोमवारी दुधाची मागणी वाढल्याने सायंकाळी ७ वाजेपर्यंत अनेक दुग्ध व्यावसायिकांकडील संपूर्ण दुधाची विक्री झाली. कोजागरीनिमित्ताने दूध बाजारपेठेसह उपनगरातील दुग्ध व्यावसायिकांनी दुधीची जादा मागणी नोंदविली आहे.

आज दर वाढण्याची शक्यता

कोजागरीनिमित्ताने म्हशीच्या दुधाचा दर मंगळवारी सकाळी ७५ ते ८० रुपयांच्या दरम्यान जाऊ शकतो, असा अंदाज दूध व्यावसायिकांनी वर्तविला आहे. सकाळी दूध खरेदीसाठी येणाऱ्यांमध्ये सर्वाधिक संख्या नागरिकांची असते. सायंकाळी मंडळाच्या वतीने दूध खरेदी केले जाते. त्यावेळी ७५ ते ८५ रुपये दर असू शकतो, असेही दुग्ध व्यावसायिकांनी सांगितले आहे.

दरवर्षीप्रमाणे ग्राहकांनी कोजागरीच्या पूर्वसंध्येला दूध खरेदीला प्राधान्य दिले. कोजागरीनिमित्तचा भाव ७० ते ८० रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. ग्राहकांची वाढती मागणी आणि दुधाची आवक पाहता दुधाचा भाव वेळेवर बदलू शकतो.

- पप्पू कर्पे, दूध व्यावसायिक

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिव्यांगाना मदत करण्यास कटिबद्ध

$
0
0

फोटो

दिव्यांगाना मदत करण्यास कटिबद्ध

नगरसेविका वर्षा भालेराव यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी,नाशिक

समाजातील अंध मुलामुलींना रोजगाराभिमुख शिक्षण देऊन त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचे कार्य अनमोल आहे असे, प्रतिपादन नाशिक मनपाच्या नगरसेविका प्रा. डॉ. वर्षा भालेराव यांनी केले. पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने मदतीने जागतिक पांढरी काठी दिवसाच्या निमित्ताने राष्ट्रीय दृष्टिहीन संघाने नाशिक विभागातील अंध व्यक्तींना पांढरी काठी वाटप करण्यात आले. यावेळी भालेराव बोलत होत्या.

त्या पुढे म्हणाल्या की, आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून मी मनपाच्या मला मिळणाऱ्या मानधनातून बहुतांशी रक्कम दिव्यांगांच्या मदतीसाठी खर्च करते. नाशिक मनपामध्ये दिव्यांगांसाठी विशेष निधी राखीव आहे तो गरजूंना मिळाला पाहिजे यासाठी माझा पुढाकार असेल. समाजातील इतर दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम केले पाहिजे. याप्रसंगी भाजपचे महानगर उपाध्यक्ष अनिल भालेराव, सचिव अजित कुलकर्णी, पंकज पाटील, सुनील शर्मा, दृष्टिहीन संघाचे उपाध्यक्ष पुंडलिक आवळे, अंजली बोराडे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजाराम गायकवाड यांनी केले तर आभार चिंतामण अहिरे यांनी मानले सूत्रसंचालन संजय घोडेराव यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीजतारांनी जीव टांगणीला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

शहराची मुख्य बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या मेनरोडवर उघड्यावरील वीजतारांचे शॉर्ट सर्किट होऊन झालेल्या प्रकारानंतर आता सिडकोतील नागरिक व व्यापारीसुद्धा धास्तावले आहेत.

सिडकोच्या दाट वसाहतीत वीज वितरण कंपनीच्या तारा भूमिगत न झाल्याने कोणत्याही क्षणी काहीही अनर्थ घडू शकतो, अशी स्थिती असतानाही या घटनेकडे जाणूबुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. वीज वितरण कंपनीला वारंवार सूचना करूनही त्यांच्याकडून या तारा भूमिगत करण्याच्या दृष्टीने काहीही हालचाल होत नसून, महापालिका आणि वीज वितरण कंपनीच्या अंतर्गत वादाने नागरिकांचा मात्र जीव टांगणीला लागला आहे.

सिडकोतील वीजतारा भूमिगत न झाल्याने मागील पाच वर्षांत अनेकांचा बळी गेला असून, बरेच जण जखमी झाले आहेत. अनेक घरांच्या गच्चीवर या वीजतारा लोंबकळत असतानाही त्याकडे दुर्लक्ष का केले जाते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सावतानगर, शिवाजी चौक, हनुमान चौक, दत्त चौक या भागात दोघांचा शॉक लागून मृत्यू झाल्याच्या घटना काही काळापूर्वी घडल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी दत्त चौक भागात वीजतारेचा शॉक लागून तिघे जण जखमी झाले होते. त्यानंतर विद्यमान आमदार सीमा हिरे व स्थानिक नगरसेवकांनी येथे पाहणी करून काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. ऊर्जामंत्र्यांनीदेखील येथे भेट दिली होती. या भागातील कामाला सुरुवात झाली असली, तरी सिडकोतील अन्य भागांचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दुर्घटना तेथेच काम!

सिडकोतील उघड्यावरील वीजतारांची काही महिन्यांपूर्वी खुद्द ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाहणी केली होती. सर्वच ठिकाणच्या वीजतारा भूमिगत करण्याचे आश्वासनदेखील त्यांनी दिले होते. तत्कालीन आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनीही वीजतारांचा प्रश्न थेट विधानसभेत उपस्थित केला होता. मात्र, अद्यापही त्यावर कार्यवाही झाली नसल्याचे चित्र आहे. सिडकोतील वीजतारा भूमिगत करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून केवळ घोषणाच होत असल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक निवडणुकीत वीजतारा भूमिगत करण्याचे आश्वासन देऊन या विषयाचे राजकीय भांडवल करणाऱ्यांनी आता तरी या कामाला सुरुवात करावी,अशी भावना व्यक्त होत आहे. राजकीय नेते या कामाला मंजुरी मिळाली असल्याचे सांगत असले, तरी ज्या ठिकाणी दुर्घटना घडते तेथेच फक्त काम सुरू केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

--

सिडकोतील वीजतारा भूमिगत करण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. मात्र, महापालिकेने रस्ते खणण्यासाठी लावलेले दर अवास्तव होते. आता महापालिका आणि वीज कंपनीत करार करून घेतला आहे. त्यामुळे लवकरच या कामाला सुरुवात होईल. -सीमा हिरे, आमदार

वीजतारा भूमिगत करण्याबाबत वीज वितरण कंपनीकडे वारंवार पत्रव्यवहार केला. तारा भूमिगत करण्यासाठी निधी दिला असल्याचे सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात काम सुरू होत नाही. वीज वितरण कंपनी मोठी हानी होण्याची वाट तर पाहत नाही ना, असे वाटत आहे.

-मंगेश नागरे, व्यावसायिक

सिडकोत अलीकडे वीजतारेच्या झटक्याने अनेकांचा बळी गेला आहे. मात्र, अशी घटना घडल्यावर दोन-तीन दिवस त्याबाबत चर्चा होते. मात्र, नंतर कोणीही याकडे लक्षच देत नाही. वीज वितरण कंपनीही जणू अशी घटना घडण्याची वाट पाहत असते, असेच वाटते.

-अशोक जाधव, व्यावसायिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आठ तालुके दुष्काळाच्या उंबरठ्यावर!

$
0
0

सात तालुक्यांमध्येही स्थिती गंभीर; उपाययोजनांची प्रतीक्षा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुष्काळ सदृश तालुक्यांसाठी शासन निर्णय लवकरच जाहीर करू, अशी मुख्यमंत्र्यांनी घोषणा करून २४ तास उलटत नाहीत तोच राज्यात कमी-अधिक प्रमाणात दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या तालुक्यांची नावेच सरकारने मंगळवारी जाहीर केली. राज्यात १७९ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असून, त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील आठ तालुक्यांचा समावेश आहे.

सरासरीएवढाही न झालेला पाऊस, त्यामुळे पुरेशा प्रमाणात भरू न शकलेली धरणे, तळाशी जाऊ लागलेली खेडोपाड्यातील जलाशये आणि पाण्यासाठी करावी लागणारी वणवण असे चित्र जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये दृष्टीस पडू लागले आहे. पिण्याच्या पाण्याची भ्रांत निर्माण होऊ लागल्याने सिंचनाचा प्रश्न तर अधिक गहन बनू लागला आहे. मका, सोयाबिन, कापूस, बाजरी ही खरीपातील पिके पाण्याअभावी मान टाकू लागल्याने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी व ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींकडून केली जात होती. या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दुष्काळसदृश तालुक्यांसाठीचा शासन निर्णय तयार असल्याची घोषणा बागलाण तालुक्यातील मांगीतुंगी येथे केली होती. हा शासन निर्णय मंगळवारी सोशल मीडियावरही व्हायरल झाला. यामध्ये नाशिकमधील आठ तालुक्यांचाही समावेश आहे. चांदवड तालुक्यात मध्यम स्वरूपाचा तर नाशिकसह, बागलाण, इगतपुरी, मालेगाव, सिन्नर, देवळा आणि नांदगाव तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे निरीक्षण कृषी विभागाने नोंदविले होते. याच तालुक्यांना दुष्काळसदृश म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

पुण्यात आज बैठक

दुष्काळी म्हणून जाहीर करण्यात आलेल्या तालुक्यांमधील ९३ गावांमध्ये पीक कापणीचा प्रयोग झाला होता. ३० ते ५० आणि ५० ते १०० टक्के नुकसान झालेल्या पिकांची माहिती महामदत या अॅपवरून सरकारला यापूर्वीच पाठविण्यात आली होती. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक झाली. त्यास संबंधित तालुक्यांचे तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते. या आठही तालुक्यांमधील एकंदर परिस्थितीची अंतिम अहवालाच्य प्रती बनविण्यात आल्या असून पुण्यात बुधवारी (दि. २४) होणाऱ्या राज्य दुष्काळ देखरेख समितीच्या बैठकीत त्या सादर केल्या जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिल्या दिवसाचा प्रयोग यशस्वी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्टरोडवरील वाहतूक बदलाचा प्रयोग पहिल्याच दिवशी यशस्वी झाल्याचा दावा वाहतूक पोलिसांनी केला आहे. काही वाहनचालकांनी नियमांकडे दुर्लक्ष केल्याने थोडाफार गोंधळ उडाला. मात्र, हा सवयीचा भाग असून, वाहतूक कोंडीचा त्रास कमी करण्यासाठी पर्यायी मार्गांचा पर्याय वाहनचालकांनी स्वीकारावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान, यामुळे मुख्य शहरातील पर्यायी मार्गांवर देखील वाहनांची गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले.

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका या स्मार्टरोडचे काम सध्या सुरू असून, या मार्गावरील वाहतूक प्रशासनाने एकाच रस्त्यावर दुहेरी पद्धतीने वळवली होती. मात्र, अत्यंत अरूंद रस्त्यावर वाहनांची सतत कोंडी होत असल्याने यावर पर्याय म्हणून त्र्यंबकनाका बाजूकडून अशोकस्तंभाकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांना 'नो एंट्री' करण्यात आली. या मार्गाचा वापर करणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग सुचविण्यात आला. हा बदल मंगळवारी आणि बुधवारी सकाळी आठ ते सांयकाळी सहा या वेळेत करण्याचे नियोजन पोलिसांनी आखले होते. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास वाहतूक पोलिसांनी त्र्यंबकनाका येथे बॅरीकेडस लावले. साधारणत: चार वाजेपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले की, ३३ कर्मचारी आणि पाच अधिकाऱ्यांनी याचे नियोजन केले. वाहतूक मार्गातील बदलबाबत प्रसिध्दी देऊनही अनेक वाहनचालकांनी त्र्यंबकनाका येथे पोलिसांशी वाद घातला. यामुळे काही काळ वाहतूक कोंडीही झाली. मात्र, पोलिस निर्णयावर ठाम राहिल्याने वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागला. आज, बुधवारीसुद्धा वाहतूक मार्गातील बदल कायम राहणार आहे. आजचा दिवस नियोजनाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला असून, नागरिकांनी त्यास चांगला प्रतिसाद दिल्याचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सांगितले. रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी ही समस्या कायम राहण्याची शक्यता असल्याने नवीन बदलांनुसार सर्वांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा सिंगल यांनी व्यक्त केली.

आतील रस्त्यांवर ताण

त्र्यंबकनाका ते अशोक स्तंभ हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्याने नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागला. यामुळे शालिमार चौक, महात्मा गांधीरोड, वकीलवाडी आणि रविवार कारंजा या भागात वाहतूक कोंडीची समस्या कमी अधिक प्रमाणात उपस्थित झाली. या भागातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली. सातपूर - सिडकोकडून जुने सीबीएसकडे येणारी रिक्षा वाहतूक पूर्णपणे बंद झाली. तसेच शहर बसलाही शालिमारमार्गे पुन्हा सीबीएसकडे यावे लागले.

बुधवारी पुन्हा एकदा येथे चाचपणी करण्यात येणार असून, त्यानंतर एका बैठकीचे आयोजन करण्यात येईल. बैठकीतील मुद्दे लक्षात घेऊन हा बदल पुढे कायम करायचा की नाही याबाबत निर्णय घेण्यात येईल. मात्र, रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत अशा बदलांशिवाय पर्याय नाही. नागरिकांनी स्वंयस्फूर्तीने त्यास सहकार्य करणे गरजेचे आहे.

- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा परस्पर विकून चालक फरार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड येथून वेस्ट बंगाल येथे ट्रकद्वारे पाठविण्यात आलेला तब्बल ३ लाख ६५ हजार रुपयांचा कांदा ट्रक चालकाने परस्पर विकला. तसेच गाडी भाडे म्हणून घेतलेली ६१ हजार रुपयेही हडप केले. याप्रकरणी मनमाड शहर पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात सोमवारी रात्री गुन्हा

दाखल करण्यात आला आहे. या फसवणुकीच्या घटनेने परिसरातील कांदा व्यापाऱ्यांत खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोहाडी (धुळे) येथील गुरुदीपसिंग गुरुमेल सिंग हंस यांनी मनमाड येथील कांदा खळ्यातून ३ लाख ६५ हजार रुपयांचा कांदा खरेदी करून तो वेस्ट बंगाल येथे अंदमान इंटरप्राइज यांच्याकडे पाठविण्यासाठी मालट्रक (सीजी ०४ जेडी ७९५१)द्वारे पाठविला. त्यासाठी गाडी वाहतूक भाडे ६१ हजार रुपये ट्रक चालकाला दिले. मात्र सदर ट्रक पश्चिम बंगाल येथे पोहोचलाच नाही. साडेतीन लाखांहून अधिक किमतीच्या कांद्याची मध्येच कुठे परस्पर विक्री करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कांदा व्यापारी गुरुदीपसिंग हंस यांनी सोमवारी रात्री मनमाड पोलिस ठाण्यात ट्रकचालक व मालक जयविंदरसिंग बलविंदर सिंग बाल (रा. रायपूर, छत्तीसगड) याच्या विरोधात रात्री उशिरा फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. लाखो रुपयांचा कांदा परस्पर विकल्याने कांदा व्यापाऱ्याला धक्का बसला असून, फरार ट्रक चालकाचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शस्त्रे बाळगणारे दोघे अटकेत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील हजारखोली रोडलगत, गौंडवाडा परिसरात अवैधरित्या धारदार शस्त्रे बाळगणाऱ्या दोन संशयितांना येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेवून तीन धारदार शस्त्रे जप्त केली आहे. २२ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक करपे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. पथकास हजारखोली रोड, गौंडवाडा परिसरात काही संशयितांकडे धारदार शस्त्रे असून ते काहीतरी गुन्हा करण्याचे तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने परिसरात सापळा रचून गुफरान अहमद अब्दुल जलार (वय ३७, रा. गोल्डननगर) शेख अरबाज उर्फ समीर शेख अब्दुल हमीद (वय १८ रा. नंदननगर) यांना शिताफिने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन धारदार तलवारी व एक चंद्रकोर आकाराची कुऱ्हाड अशी तीन घातकशस्त्रे हस्तगत करण्यात आली. सदर बाबत आयशानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने गेल्या दोन दिवसांपूर्वी अशीच कारवाई करीत शहरातील कल्लू स्टेडिअम परिसरातून पाच धारदार शस्त्रे हस्तगत केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीपोत्सवाने झगमगले बालाजी मंदिर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कोजागिरीचा चंद्र अवकाशात हलकेच डोकावू लागल्यानंतर मंगळवारी सायंकाळी शंकराचार्य न्यासच्या बालाजी मंदिरात तेवलेल्या शेकडो दिव्यांनी मंदिर परिसर झगमगून निघाला. पौर्णिमेनिमित्त श्री बालाजी आणि लक्ष्मी या देवतांचे सायंकाळी महापूजन करण्यात आले. यावेळी भाविकांनी मंदिराच्या गाभाऱ्यासह सभामंडप शेकडो पणत्यांनी उजळून निघाला. शहराच्या विविध भागातील नागरीकांनीही मंदिरात मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

शंकराचार्य न्यास संचलित श्री बालाजी मंदिरात या निमित्ताने आकर्षक पणत्यांची आरास करण्यात आली होती. या मंदिराच्या स्थापनेपासून येथे अखंड समई तेवत आहे. या समईच्या ज्योतीव्दारे उजळलेल्या शेकडो पणत्यांमुळे मंदिर परिसराला रौनक आली होती. परिसरातील शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी समाधी मंदिर आणि गणेश मंदिर, लक्ष्मी मंदिरालाही विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिर प्रांगणातील गोशाळा, धबधब्याभोवतालचा परिसर येथेही पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या. न्यासाच्या वतीने सभागृहात भाविकांसाठी बैठक व्यवस्था व प्रसाद वितरणाची व्यवस्था करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा प्रशासनाला प्रतीक्षा आदेशाची

$
0
0

महामंडळाच्या घोषणेनंतर सावध भूमिका

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरण समूहातील जलाशयांमधील पाणी मराठवाड्यातील जायकवाडी धरणात सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने दिले असले तरी जिल्हा प्रशासनाला अद्याप ते प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे तुर्तास तरी जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडले जाणार नाही, असे जिल्हा प्रशासनाने मंगळवारी स्पष्ट केले. जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा तीव्र होत असताना पाणी पळविण्याचा घाट घातला जात असल्याने जिल्ह्यात पाणी पेटण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणने २०१४ मध्ये दिलेल्या निवाड्यात गोदावरी खोऱ्या अंतर्गतच्या जलाशयांमधील पाण्याचे समन्यायी पद्धतीने पाणीवाटपाचे निर्देश दिले आहेत. जायकवाडीत तुटीचा पाणीसाठा निर्माण झाल्याने नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातून एकूण नऊ टीएमसी पाणी जायकवाडीत सोडावे, असे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने मंगळवारी दिले. त्यानुसार, दारणा समूहातून दोन टीएमसी आणि ४० दशलक्ष घनफुट तर गंगापूर आणि पालखेड धरण समूहामधून प्रत्येकी ६०० दशलक्ष घनफुट पाणी सोडावे लागणार आहे.

पाणी देण्यास नगर आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविल्याने पाणीप्रश्न पेटू लागला आहे. महामंडळाने आदेश जारी केले असले तरी ते अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झालेले नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाशिवाय पाणी सोडता येत नाही. महामंडळाचे आदेश अद्याप प्राप्त झाले नसल्याची माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे तूर्तास पाणी सोडता येणार नाही, अशी भूमिका जिल्हा प्रशासनाकडील सुत्रांकडून स्पष्ट करण्यात आली आहे. महामंडळाकडून जिल्हाधिकारी कार्यालयास, पोलिस अधीक्षक कार्यालयास याबाबतच्या आदेशाची प्रत प्राप्त होणे अपेक्षित आहे. पाणी सोडण्यासाठी पोलिस बंदोबस्त व तत्सम तजवीज आवश्यक असून त्यामुळे तुर्तास तरी पाणी सोडले जाणार नाही, असे संकेत प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना डावलले!

उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणांमधील पाणी सोडण्यासंदर्भातील बैठकांना जिल्हाधिकाऱ्यांना निमंत्रित करणे अनिवार्य आहे. परंतु, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी या बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांना निमंत्रितच केले नसल्याचा दावा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. या बैठकीमध्ये जिल्ह्यातील उपलब्ध उपयुक्त पाणीसाठा, जिल्हावासीयांची पाण्याची गरज याबाबतची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी सादर करावी अशी तरतूद आहे. मात्र, नाशिकचे पाणी पळविण्याचा कट शिजल्यानेच जिल्हाधिकाऱ्यांना या बैठकीपासून जाणीवपूर्वक दूर ठेवले जात असल्याचा दावाही प्रशासनातील सुत्रांकडून केला जाऊ लागला आहे.

पाणीवाटपास जाणीवपूर्वक विलंब

जून ते सप्टेंबर या काळात झालेला पाऊस, धरणांमध्ये उपलब्ध पाणीसाठा याचा पुरेपूर अंदाज आल्यानंतर १५ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत पाणी वाटपाबाबतची बैठक घेणे आवश्यक आहे. महापालिका, एमआयडीसी, नगरपालिका यांसह विविध यंत्रणांना किती पाणी द्यायचे याचे नियोजन या बैठकीत केले जाते. मात्र, ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा उजाडूनही अद्याप पालकमंत्र्यांनी ही बैठक घेतलेली नाही. जिल्हावासीयांची तहान भागविण्यापूर्वीच धरणांमधून पाणी सोडण्याचा घाट घातला जात असून त्यामुळेच या बैठकीला जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याची चर्चाही नाशिककरांमध्ये होऊ लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दशक्रिया विधीत सृजनाचे आख्यान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

दशक्रिया विधीचा कार्यक्रम म्हटले की थोडं गंभीर वातावरण, किर्तन-भजनाचा माहौल. अशावेळी एखाद्याने व्याख्यान देणे आणि ते उपस्थितांनी एकणे म्हणजे धारिष्ट्याचीच गोष्ट. मात्र, देवळालीगावात आगळंवेगळं व्याख्यान होणार आहे. ते ऐकण्यासाठी शेतकरीही जमणार आहेत. नगरच्या 'सीडमदर' राहीबाई सोमा पापेरे यांचे विषमुक्त बियाणे यावर हे व्याख्यान आहे. विशेष म्हणजे त्यानंतर अडाणी राहीबाई गंगापूररोडवरील आयएमआरटीमधील मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

एकलहरे रोडवरील प्रगतशील शेतकरी मीनाताई बाबूराव अस्वले यांचा आज (दि. २४) देवळालीगावात सकाळी नऊला दशक्रिया विधी आहे. त्यांचे पुत्र उत्तमराव यांच्याशी पर्यावरणप्रेमी जितेंद्र भावे यांनी संपर्क साधून राहीबाईंच्या विषमुक्त धान्यावर आधारीत मुलाखतीचा प्रस्ताव ठेवला. रासायानिक शेतीचे दुष्परिणाम जाणलेल्या उत्तमरावांनीही त्वरित होकार दिला. यानंतर दुपारी बाराला गंगापूररोडवरील आयएमआरटी मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना अडाणी राहीबाई मार्गदर्शन करणार आहेत. मॅनेजमेंटचे ट्रेनिंग न घेता गरुडझेप घेतलेल्या अडाणी राहिबाईंचा प्रवास जाणून घेण्यास विद्यार्थीही उत्सुक आहेत, अशी माहिती भावे यांनी दिली.

साठ वर्षांच्या राहीबाई या नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोंभाळणे येथील रहिवाशी. पती, पत्नी, तीन मुले, एक मुलगी असे हे कुटूंब. पती-पत्नी अशिक्षित तर मुलांनी कशी तरी दहावी-बारावी केलेली. या कुटुंबाची फक्त पाच एकर शेती आहे. ती पण कोरडवाहू. त्यावर त्यांची कशीबशी गुजराण चालते.

अशा झाल्या सीडमदर

पोपरेंच्या पिढ्यांमध्ये कसदार खाण्याची आणि दीर्घायुषी जगण्याची चांगली सवय आहे. राहीबाईंनी पतीच्या मदतीने छोट्या शेतात गरजेपुरते धान्य आणि भाजीपाला घेतात. उर्वरीत जागेत त्यांनी शेणखत, गांडूळ खत वापरून सेंद्रीय व शुद्ध बियाणे घेण्यास सुरुवात केली. कुटुंबापुरता शेतीचा वापर करता करता परिसरातील शेतकऱ्यांनाही त्या सेंद्रीय बियाणे पुरवू लागल्या. हळ हळू कीर्ती होत गेली, लोकं येऊ लागले. राहीबाई त्यांना रासायिनक खते, किटनाशके यांचे माणसे आणि पर्यावरणावरील दुष्परिणाम सांगू लागल्या. हे विषमुक्त खाण्याने अनेक पिढ्यापर्यंत कॅन्सरसारखे आजार पसरतात. दवाखाना-औषधांवर मोठा खर्च होतो. हे टाळून विषमुक्त व कसदार नैसर्गिक बियाणे वापरा, स्वतःचे आणि पर्यावणाचे रक्षण करा, असा संदेश त्या देऊ लागल्या. त्यांच्या कार्याची दखल घेत बायफ या संस्थेने त्यांचे मार्गदर्शन घेतले. त्यांना मदत केली. बायफ व राहीबाई दोघांना जनजागृतीत एकमेकांचा फायदा झाला. बायफने त्यांना 'सीड मदर' ही उपाधी दिली. बीबीसीने राहीबाईंची मुलाखत घेतल्याने त्या रात्रीतून लोकप्रिय झाल्या. अनेक संस्था व न्यूज चॅनलनी त्यांना गौरवले. राज्यभर त्यांचे प्रबोधन दौरे सुरू असतात. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

बियाणांची निर्यात

पाच एकर शेतीच्या राहीबाईंची बियाणे महाराष्ट्राबाहेर, गुजरात, राजस्थान, दिल्ली आदी राज्यांबरोबरच परदेशातही जात आहेत. यंदा त्यांनी वीस हजार पाकिटे पाठवली. अठरा जातींचे वालघेवडे तसेच सोळा जातींचे भात बियाणे त्या तयार करतात. जोडीला पालक, मेथी, गवार, भेंड़ी, शेपू, चंदन बटवा, मिरची, डांगर आदी गावठी बियाणेही विकसित करतात. पंधरा जातींचे बियाण्यांची स्वतंत्र पाकिटे एका मोठ्या पाकिटात घालून शेतकरी, बचतगटांना त्या देतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वॉटरग्रेसने जनतेची माफी मागावी

$
0
0

कचरा संकलन प्रश्नी आयुक्तांची कठोर भूमिका

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील कचरा संकलन करण्याचा ठेका मिळालेल्या वॉटरग्रेस कंपनीने सोमवारी पुन्हा काम सुरू केले असले तरी पालिका प्रशासन व कंपनीतील वाद क्षमण्याची चिन्हे नाहीत. अचानक काम बंद करून शहरातील जनतेस वेठीस धरणाऱ्या व पालिकेच्या आर्थिक नुकसानीस जबाबदार असलेल्या संबंधित कंपनीने माफीनामा सादर करावा. भविष्यात अचानक काम बंद करणार नाही असे हमीपत्र ठेकेदाराने द्यावे, अशी नोटीस वॉटरग्रेसला बजावली असल्याची माहिती आयुक्त संगीता धायगुडे यांनी दिली.

येथील पालिका सभागृहात पत्रकारांशी बोलतांना आयुक्तांनी ही माहिती दिली. यावेळी उपायुक्त नितीन कापडणीस उपस्थित होते. ऐन दसऱ्याच्या दिवशी कंपनीच्या कामगारांनी संप पुकारल्याने कचरा संकलानाचा प्रश्न निर्माण झाला होता. पालिकेने तीन दिवस तात्पुरत्या स्वरुपातील आपली यंत्रणा राबवून शहरातील कचरा उचलण्यास सुरुवात केली होती. दरम्यान सोमवारी कंपनीकडून अचानक संप मागे घेण्यात आले. मात्र कंपनीच्या कारभार पाहता पालिका प्रशासनाकडून कोणतीही नरमाईची भूमिका घेतली जाणार नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

आयुक्त धायगुडे म्हणाल्या की, अचानक कामबंद करून कंपनीने जनतेस वेठीस धरले आहे. त्यामुळे त्यांनी जनतेची माफी मागावी. पालिकेने कंपनीला ठेका दिला असल्याने कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाशी पालिकेचा संबध नाही. मात्र पालिकेकडून वेळेवर बिल अदा न केल्याचा कंपनीचा दावा चुकीचा आहे. कंपनीकडून जनतेची दिशाभूल केली जात आहे. पुन्हा कंपनीकडून अशी मनमानी होऊ नये म्हणून हमीपत्र घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विनापरवानगी कचरा उचलणे गुन्हा

उपायुक्त कापडणीस यांनी सांगितले, संबंधित ठेकेदारास नोटीस बजावली आहे. काम बंद करण्याबाबत त्यांनी पालिकेला कळवले नव्हते तसेच काम सुरू करीत असल्याचे देखील लेखी दिलेले नाही. त्यामुळे पालिकेच्या परवानगी शिवाय कचरा उचलणे गुन्हा आहे. तसेच गेल्या दोन दिवसांत त्यांनी उचललेला कचऱ्याचे बिल अदा केले जाणार नाही. कचरा डेपोवर कर्मचाऱ्याशी अरेरावी करून कचरा टाकल्यामुळे देखील कारवाई केली जाऊ शकते अशी नोटीस बजावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक लाख बालकांना लसीकरण

$
0
0

गोवर रुबेला निर्मूलनासाठी २७ पासून मोहीम

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

सन २०२० पर्यंत भारतातून गोवर आजाराचे निर्मूलन व रुबेला आजाराचे नियंत्रण करण्याचे सरकारने लक्ष निश्चित केले आहे. पालिका क्षेत्रात एकूण १ लाख ९३ हजार ८७३ बालकांना एमआरची लस दिली जाणार असून २७ नोव्हेंबरपासून हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. पालकांनी आपल्या बालकास लसीकरण करून घ्यावे असे आवाहन पालिका आयुक्त संगीता धायगुडे यांनी केले.

गोवर रुबेला लसीकरण मोहिमेबाबत आयोजित पत्रकार परिषदेत आयुक्त धायगुडे बोलत होत्या. यावेळी उपायुक्त नितीन कापडणीस , जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. मोहम्मद अली अजहर, लसीकरण मोहिमेचे समन्वयक एम. अब्बास, पालिकेचे डॉ. भीमराव त्रिभुवन उपस्थित होते. लसीकरण मोहिमेविषयी कापडणीस यांनी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, प्रथमतः शहरातील सर्व शाळा, नंतर अंगणवाडी, रुग्णालय व नागरी आरोग्य केंद्रातून दिल्या जातील. यासाठी शहरातील ३५१ पैकी ३०० शाळांमध्ये पालक शिक्षक सभा घेऊन जनजागृती करण्यात आली आहे. सर्व मुख्याध्यापक, नोडेल ऑफिसर्स, अंगणवाडी वर्कर्स, आशा वर्कर्स, मेडिकल कॉलेज यांचे प्रशिक्षण कार्यशाळा झालेल्या आहेत. २५ ऑक्टोबर रोजी धर्म गुरूंचे व महासभेत नगरसेवकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. लसीकरण मोहिमेची ७० टक्के तयारी पूर्ण झाली आहे.

लस पूर्णपणे सुरक्षित

डॉ. अजहर म्हणाले की, ९ महिने ते १५ वर्षांखालील सर्व बालकांना मिझल रुबेला लसीकरण करण्यात येणर आहे. आतापर्यंत १७ राज्यात १० कोटी मुलांसाठी लसीकरण कार्यक्रम राबविण्यात आला असून यात कोणत्याही बालकास त्रास झालेला नाही. सर्वांसाठी ही लस सुरक्षित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीची आत्महत्या; पतीला कारावास

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एक लाखाच्या हुंड्यासाठी पत्नीचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जिल्हा कोर्टाने पतीला दोषी ठरवत पाच वर्षे सश्रम कारवासाची शिक्षा ठोठावली.

अमोल मधुकर निकम असे या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी उषा महेश पगारे यांनी उपनगर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली होती. पगारे यांच्या मुलीचा विवाह २००६ मध्ये आरोपी अमोलशी झाला होता. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच त्याने पत्नीकडे हुंड्यासाठी एक लाखा रुपयांचा तगादा सुरू केला. यातूनच आरोपीने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन वेळोवेळी तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. या छळाला कंटाळून अमोलच्या पत्नीने २ नोव्हेंबर २०११ रोजी आत्महत्या केली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध उपनगर पोलिस स्टेशनमध्ये आत्महत्येस प्रवृत्त करणे, तसेच कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. या घटनेचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक सी. एस. कापसे यांनी केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. देशमुख यांच्या कोर्टात आरोपपत्र सादर केले. सरकारी पक्षातर्फे अॅड. एस. बी. सरोदे यांनी सबळ पुरावे सादर केले. समोर आलेल्या साक्षीपुराव्यांनुसार कोर्टाने आरोपीला दोषी ठरवत पाच वर्षे सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. उपनगर पोलिस स्टेशनचे पैरवी अधिकारी हवालदार के. के. गायकवाड आणि पोलिस शिपाई एस. आर. साळवे यांनी पाठपुरावा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाळे प्रकल्पांचे दर कमी करण्याची मागणी

$
0
0

गाळे प्रकल्पांचे दर कमी करण्याची मागणी (फोटो)

सातपूर : औद्योगिक विकास महामंडळाने लघु उद्योजकांच्या मागणीनुसार अंबड एमआयडीसीत भव्य असा २९२ गाळ्यांचा नवीन प्रकल्प साकारला आहे. परंतु, गाळ्यांचे दर अधिक ठेवण्यात आल्याने तयार असलेला गाळे प्रकल्प पडून आहे. एमआयडीसीने उभारलेल्या नवीन गाळे प्रकल्पाचे दर कमी करावेत, अशी मागणी भाजप उद्योजक आघाडीचे प्रदीप पेशकार यांनी केली आहे. परंतु, याबाबत एमआयडीसीने निर्णय न घेतल्याने गाळे प्रकल्पाची इमारत पडून

असल्याचे चित्र दिसून येत आहे.

---

बंद पथदीपांनी गैरसोय

नाशिक : शहरातील शिंगाडा तलाव भागातील गुरुद्वारारोड, तसेच अन्य रस्त्यांवरील बहुतांश पथदीप बंद असल्याने गैरसोय होत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. या भागातील रस्त्यांचीही दुरवस्था झालेली असून, पथदीपांअभावी रात्री वाहने खड्ड्यांत आदळण्याची प्रकार वाढले आहेत. मोकाट कुत्र्यांचा उच्छादही वाढलेला आहे. त्यामुळे येथे तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

---

धनगर समाज मेळावा (फोटो)

जेलरोड : धनगर समाजासाठी आरक्षणाची न्यायालयीन लढाई आपण जिंकू, असे प्रतिपादन मंचाचे प्रदेश कार्यावाहक एम. ए. पाचपोळ यांनी केले. नाशिकरोड येथील शिवाजीनगर समाजमंदिरात धनगर समाज सेवा संस्थेतर्फे मागदर्शन मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. प्रबोधिनी मंचाचे अध्यक्ष मधू शिंदे, चंद्रशेखर सोनवणे, शंकर कोळेकर, सुभाष मासुळे, डॉ. गोपाळ शिंदे, रामदास भांड, नवनाथ ढगे, सुनील ओढेकर, शशीभाऊ वाघ, शिरीष चव्हाण, रोहिणी चव्हाण, नितीन धानापुणे आदी उपस्थित होते. धनगर समाज सेवा संस्थेतर्फे न्यायालयीन लढाईसाठी आर्थिक मदत देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महामार्गांवरील वाहतूककोंडी सोडवा

$
0
0

नाशिक सिटिझन फोरमची गडकरींकडे मागणी

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुंबई-नाशिक-पुणे हा सुवर्ण त्रिकोण एक्स्प्रेस वे आणि चौपदरी महामार्गाने जोडला गेला आहे. असे असले तरी मुंबई-नाशिक-पुणे या शहरांतील वाहतुकीची कनेक्टिव्हिटी हवी तितकी चांगली नाही. या दोन्ही हायवेवर वाहनधारकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे नाशिक-पुणे व नाशिक-मुंबई, असा प्रवास करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या समस्यांवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी नाशिक सिटिझन फोरमचे अध्यक्ष सुनील भायभंग यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

केंद्रीय भूपृष्ठ परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आज, (दि. २४) नाशिक दौऱ्यावर येत आहेत. गडकरी यांच्या नाशिक भेटीच्या पार्श्वभूमीवर भायभंग यांनी नाशिककरांच्या वतीने ही अपेक्षा व्यक्त केली आहे. नाशिक-मुंबई एक्स्प्रेस वेच्या दुरवस्थेबाबत नाशिक सिटिझन्स फोरमने यशस्वी लढा दिला. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून फोरमने पुढील वाटचाल ठरवली आहे. या अंतर्गत नाशिक-मुंबई एक्स्प्रेसच्या चौपदरीकरणानंतर वाहतुकीचा वेग वाढला आहे. पण अलिकडच्या काळात काही समस्यांमुळे वाहतुकीचा वेग पुन्हा मंदावत आहे.

...

मुंबई वाहतूक खडतरच

नाशिक ते मुलुंड हे अंतर चांगल्या पध्दतीने पार होते. पण मुलुंडनंतर वाहतूक कित्येक तास रखडलेली असते. अंजूर फाटा व कल्याण फाटा येथील उड्डाणपुलांचे काम दीर्घकाळापासून रखडले आहे. मुलुंड टोल नाका येथे टोलवसुली यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे तेथेही वाहतूक कोंडी असते. या संदर्भात केंद्रीय मंत्री गडकरी यांनी स्वतः लक्ष घालून या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी फोरमने केली आहे.

...

पुणे मार्गही त्रायदायक

नाशिक-पुणे हायवेचे विस्तारीकरण होत आहे. त्यामुळे नारायणगाव, राजगुरूनगर, चाकण या रस्त्यावरील वाहतूक कोंडी अतिशय त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे नाशिक ते पुणे या एकूण प्रवासातील वेळेपेक्षा जास्त वेळ अनेकदा नारायणगाव ते चाकण या रस्त्यावरील वाहतूक कोंडीतून बाहेर निघण्यासाठी लागतो. यातही गडकरी यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी फोरमने केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images