म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक शहरातील म्हसरूळ व मुंबई नाका पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षकांची पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी शनिवारी रात्री तडकाफडकी बदली केली. यापैकी एका अधिकाऱ्याची आर्थिक गुन्हे शाखेत, तर दुसऱ्याची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. शनिवारी रात्री हे बदलीचे आदेश काढण्यात आले असून, प्रशासकीय कारणास्तव या बदल्या करण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र, वाढती गुन्हेगारी आणि वरिष्ठांशी मतभेद तसेच लोकप्रतिनिधींकडून होणाऱ्या तक्रारींमुळे ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. म्हसरूळ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली. त्यांच्या जागेवर सरकारवाडा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक एस. जी. रोहकले (गुन्हे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे़. मुंबई नाका पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज करंजे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागेवर पंचवटी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय ढमाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देशमुख व करंजे यांची प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आल्याचे सांगितले गेले. प्रत्यक्षात पोलिस स्टेशन हद्दीत वाढते गुन्हे, अवैध धंदे आणि लोकप्रतिनिधींसोबत असलेले वाद यासाठी कारणीभूत असल्याचे सूत्रांनी सांगितले. मुंबई नाका पोलिस स्टेशन हद्दीतील वाढत्या गुन्ह्यांमुळे भाजपा आमदार आणि पोलिस निरीक्षक करंजे यांच्यातील वाद वाढत गेले. यामुळे करंजे यांची गच्छंती करण्यात आली. दुसरीकडे म्हसरूळ पोलिस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारी आणि पोलिस स्टेशनमार्फत होणारे प्रयत्न यात मोठी तफावत सुरुवातीपासून कायम राहिली. प्रमुख दोन पोलिस स्टेशनमधील खांदेपालट इतरांसाठी इशारा मानला जात असून, याचा काय आणि कितपत फायदा होतो याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमध्ये चर्चा रंगल्या आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट