म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक नाशिकच्या गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या मिरजकर सराफ घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार हर्षल नाईक याच्या कर्नाटकमधील गुलबर्गा जिल्ह्यातील चिडीगुपा येथील मालमत्ता पोलिसांनी शोधून काढली. मात्र, या मालमत्तेशी हर्षलचा काहीही संबंध नसल्याचा दावा त्याच्याच कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे या मालमत्तेशी नाईकचा संबंध असल्याचे पुरावे पोलिसांना संकलित करावे लागत आहे. मिरजकर सराफच्या संचालकांनी २०१५ ते २०१७ या कालावधीत शेकडो गुंतवणूकदारांकडून रोख आणि सोन्याची गुंतवणूक घेतली. संचालकांकडून जानेवारी २०१८ पासून पैसे परत करण्याचे प्रमाण घटत गेले. अखेर या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये २० जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. बारापेक्षा अधिक संशयितांपैकी काहींना अटक करण्यात आली. मात्र, गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार हर्षल नाईक, भागीदार अनिल चौगुले अद्याप फरार आहेत. यापूर्वी अटक केलेल्या संशयितांकडून दोन कार आणि १६ किलो चांदी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. मात्र, यानंतर फारसे काही हाती आले नाही. मुख्य सूत्रधार नाईक मूळचा कर्नाटकमधील असल्याने पोलिसांनी तेथे तपास केला. त्यात त्याची स्थावर मालमत्ता असल्याचे उघड झाले. पोलिसांनी ही मालमत्ता रेकॉर्डवर घेतली. मात्र, काही दिवसांपूर्वी नाईकचे भाऊबहीण नाशिकला आले. या मालमत्तेशी हर्षलचा कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. या पार्श्वभूमीवर आर्थिक गुन्हे शाखेने आपला मोर्चा हर्षल नाईक व त्याच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यातील व्यवहाराकडे वळवला आहे. हर्षल नाईकचा संबंध नसेल तर त्याने त्यांना पैसे पुरविण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी सांगितले. या व्यवहारांबाबत बँकांकडून माहिती येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बँक व्यवहारात सर्व समोर येईल. त्यानंतर पुढील कार्यवाही होईल, असे मगर म्हणाले. या गुन्ह्यातील दोन संशयित अद्याप फरार आहेत. त्यांच्या तपासासाठी क्राइम ब्रँचसह इतर पथके तैनात आहे. सर्व शक्यतांनुसार संशयितांचा शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप ते आमच्या हाती लागलेले नाहीत. - डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट