बॅडमिंटन स्पर्धेत नाशिकच्या प्रज्ज्वलचे तिहेरी यश म. टा. प्रतिनिधी, नाशिक नागपूर येथे महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नाशिकच्या प्रज्ज्वल सोनवणेने पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले. सबज्युनियर गटात एकेरी आणि दुहेरी या दोन्ही प्रकारात विजेतेपद तर ज्युनियर गटात प्रज्ज्वलने उपविजेतेपद मिळविले. सब ज्युनियर गटात एकेरीमध्ये खेळतांना उपांत्य फेरीत त्याने नागपूरच्या ओजस गेडामचा पराभव केला. ह सामना २-१ ने जिंकून प्रज्ज्वलने अंतिम फेरी गाठली. त्याचा दुहेरीचा जोडीदार ठाण्याच्या ओम गोवंडी यांच्याशी त्याची अंतिम लढत झाली. या सामन्यातही प्रज्ज्वलने वर्चस्व राखत पहिला सेट २१-१८ जिंकून आघाडी घेतली. परंतु दुसऱ्या सेटमध्ये त्याला १८-२१ असा पराभव झाल्यामुळे १-१ अशी बरोबरी झाली. परंतु तिसऱ्या सेटमध्ये प्रज्ज्वलने संयमाने खेळ करून २१-१२ ने सेट जिंकून या गटाचे विजेतेपद पटकावले. सब-ज्युनियर गटाच्या दुहेरी प्रकारात प्रज्ज्वल सोनवणेने ओम गोवंडीच्या साथीने खेळतांना उपांत्य फेरीत इरफान खान (औरंगाबाद) आणि नागेश चामले (लातूर) यांचा सरळ २-० असा पराभव केला. त्यानंतर त्यांची लढत आद्य पारसनीस आणि श्रेय्यस साने या पुण्याच्या जोडीविरुद्ध झाली. या अंतिम सामन्यातही प्रज्ज्वल आणि ओम या जोडीने आपापसात समन्वय राखून हा सामनाही २१-१८, २१-१६ असा जिंकून दुहेरीचे विजेतेपद मिळविले. त्यानंतर ज्युनियर गटाच्या अंतिम फेरीत प्रज्ज्वलची लढत पुण्याच्या दर्शन पुजारीशी झाली. या सामन्याअधी प्रज्ज्वलला विश्रांतीसाठी फारच कमी अवधी मिळाल्यामुळे त्याने या सामन्यात फारसा प्रतिकार न करता खेळ केला. त्यामुळे त्याला ०४- २१ आणि ०५-२१ अशा गुणांना पराभूत व्हावे लागले. त्यामुळे उपविजेतेपदावर त्याला समाधान मानावे लागले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट