Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

व्हॉट्सअॅपवरील चेष्टा पडली महागात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

व्हॉट्सअॅपसह इतर सोशल मीडियावर काहीही उद्योग करून नामनिराळे राहणे शक्य नाही, हे अनेक घटनांमधून स्पष्ट झाले आहे. मात्र, आपल्यापर्यंत पोलिस कधी पोहचणार?, असा विचार करून नागरिक सोशल मीडियावर नको त्या पोस्ट टाकतच असतात. असाच एक प्रकार उपनगर पोलिसांनी समोर आणला असून, मजाकमध्ये चुलत भावाचा फोटो व्हायरल करून हाच तो मुलांचा अपहरणकर्ता म्हणून सांगणाऱ्या एकास ताब्यात घेण्यात आले आहे.

या प्रकरणी अफजल हैदर मुलतानी (वय २३, रा. विहितगाव, मथुरारोड, हांडोरे मळा) या गॅरेज काम करणाऱ्या युवकाने उपनगर पोलिसांकडे २ जुलै रोजी अर्ज दिला होता. मुलांचे अपहरण करणारा हाच इसम असून, पुष्टी देण्यासाठी एक ऑडिओ क्लिप व्हॉट्सअॅपवर व्हायरल करण्यात आली होती. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील राईनपाडा येथे मुलांना पळविणारी टोळी समजून जमावाने पाच निष्पाप व्यक्तींची निर्घृण हत्या केली. ही घटना ताजी असल्याने उपनगर पोलिसांनी लागलीच अदखलपात्र गुन्हा दाखल करून तपासास सुरुवात केली. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत सदर फोटो अफजलचा चुलत भाऊ गुलाब रसूल मुलतानी याने तीन महिन्यांपूर्वी काढल्याचे समजले. अदखलपात्र गुन्ह्याचा तपास करण्याकामी संशयितास अटक करण्यासाठी उपनगर पोलिसांनी कोर्टात अर्ज केला आहे. दरम्यान, संशयित गुलाबला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता, मजाकमध्ये हा प्रकार केल्याची कबुली त्याने दिली.

या प्रकरणात आणखी एक संशयित असून, कोर्टाच्या मंजुरीने त्यालाही ताब्यात घेण्यात येईल. फिर्यादी आणि संशयित नातेवाईक असले आणि संशयिताने हा प्रकार मजाकमधून केल्याचे सांगितले असले तरी हा प्रकार अक्षम्य ठरतो. अशा प्रकारांमुळे एखाद्याचा जीव धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे कोर्टाच्या मंजुरीने संशयितांना अटक करून तपास पूर्ण केला जाईल. तसेच, त्यांच्याविरोधात कोर्टात दोषारोपपत्र सादर होईल, असे उपनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते यांनी सांगितले. घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक पी. बी. बाकले करीत आहेत.

सोशल मीडिया ही वैयक्तिक बाब नसून, त्यावर देण्यात येणारे संदेश, टाकण्यात येणारे फोटो वा व्हिडीओ समाजावर प्रभाव पाडतात. त्यामुळे एखाद्याचा जीव धोक्यात येणार असेल, बदनामी होणार असेल तर ही बाब खपवून घेतली जाणार नाही. नागरिकांनी कोणताही मॅसेज, फोटो अथवा व्हिडीओ फॉरवर्ड करताना काळजी घ्यावी.

- श्रीकृष्ण कोकाटे, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निवडणूक खडसेंच्या नेतृत्वाखाली!

$
0
0

जलसंपदा मंत्री महाजनांची गुगली; भाजपकडून मुलाखतींना सुरुवात

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जळगाव महापालिका निवडणूक ही ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखालीच लढविणार, अशी माहिती देत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी गुगली टाकली आहे. काही दिवसांपूर्वीच आमदार खडसे यांनी मंत्री महाजनांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास कमीपणा वाटणार नाही असे वक्तव्य केले होते. त्यामुळे महाजनांच्या या वक्तव्यामुळे आता पुन्हा चर्चा रंगू लागली आहे. भाजपकडून मंगळवारपासून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीला सुरुवात झाली आहे त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

भाजपच्या ‘वसंतस्मृती’ या पक्ष कार्यालयात मंगळवारी (दि. ३) मुलाखतीला सुरुवात झाली. दरम्यान, पुढे बोलताना जलसंपदामंत्री महाजन म्हणाले की, महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून २५५ ते ३०० उमेदवार इच्छुक आहेत. दोन दिवस या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. त्यानंतर अर्जांची छाननी करून उमेदवार निवडणूक लढविण्यासाठी किती सक्षम आहे. याची तपासणी करून त्याला उमेदवारी दिली जाणार आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी युतीसाठी होकार दिलेला असून, जागावाटपाचा निर्णय हा खालच्या पातळीवर घेण्याचे त्यांनी महाजनांनी सांगितले.

एकमत युतीचे जागावाटप
कोणत्या वॉर्डात किती जणांना उमेदवारी द्यायची त्या ठिकाणी कोणता उमेदवाराला संधी देऊन त्याठिकाणी कोणत्या पक्षाचा उमेदवार उभा करायचा. याबाबत शिवसेनेचे नेते माजी आमदार सुरेश जैन यांच्याशी चर्चा करणार आहे. चर्चेत जागा वाटपाबाबत दोन्ही पक्षांचे एकमत झाल्यानंतर जागावाटपाचा अंतिम निर्णय घेणार असल्याचेही महाजन यांनी या वेळी सांगितले.

आमदार खडसे ज्येष्ठ नेते
कोअर कमिटीच्या बैठकीला आमदार खडसे उपस्थित राहिले नाही, असे विचारले असता मंत्री महाजन म्हणाले की, मुक्ताईनगर नगरपरिषद निवडणूक प्रचाराचा आजपासून शुभारंभ झाला आहे. त्यामुळे ते येऊ शकले नाही. आमदार खडसे हे पक्षाचे ज्येष्ठ नेते असून, मनपाची निवडणूक त्यांच्याच नेतृत्वाखाली होणार असल्याचेही महाजन यांनी पत्रकारांना सांगितले.

कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची गर्दी
सकाळी १० वाजेपासून भाजपच्या कोअर कमेटीची बैठक होणार असल्याने सकाळीपासूनच भाजपच्या कार्यलयात गजबज होती. सकाळी खासदार ए. टी. पाटील, आमदार स्मिता वाघ, आमदार चंदुलाल पटेल, आमदार सुरेश भोळे, किशोर काळकर, विरोधीपक्ष नेते वामनराव खडके, गटनेते सुनील माळी यांच्यासह पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, इच्छुक उमेदवार व कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे जिल्ह्यात ‘जागरण गोंधळ’ आंदोलन

$
0
0

मराठा क्रांती मोर्चातर्फे लवकरच आंदोलन

म. टा. वृत्तसेवा, धुळे

मराठा समाज आरक्षणाच्या न्याय हक्कासाठी झोपलेल्या महाराष्ट्र सरकारला जाग आणण्यासाठी तुळजापूरनंतर धुळे जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चातर्फे ‘मराठ्यांचा जागरण गोंधळ’ आंदोलन करण्यात येणार आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या नुकत्याच झालेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी सर्वांनी आपसातील मतभेद विसरून एकजूट व्हावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले.

शहरातील पाझंरा नदीकिनारी मराठा सेवा संघाच्या कार्यालयात जिल्हा मराठा क्रांती मोर्चाची नुकतीच जाहीर बैठक झाली. या वेळी अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष मनोज मोरे होते. मराठा समाजाच्या विविध विषयांवर लढण्यासाठी तसेच १२ जानेवारीनंतर आलेली मरगळ झटकण्यासाठी सोशल मीडियावर विचार न मांडता प्रत्यक्ष चर्चा करून अंमलबजावणी करण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी प्रा. टी. पी. शिंदे, निंबा मराठे, प्रकाश पाटील, प्रेमचंद अहिरराव, मुन्ना शितोळे, राजेंद्र जाधव, अर्जुन पाटील, देवेंद्र पाटील, शितल नवले, अमर फरताडे, नानासाहेब कदम, रजनीश निंबाळकर आदींनी मराठा आरक्षण, समाजा समोरील बेरोजगारी, शहरातील गुंडगिरी, महिलांचे संरक्षण, मराठा समाजावर वाढत जाणारे भ्याड हल्ले, सुस्त प्रशासन, यावर आपली भूमिका मांडली.

आंदोलनाची तारीख, ठिकाण कोअर कमिटी ठरवणार
मराठा आरक्षणा संदर्भात मुंबई हायकोर्टाने सरकारला फटकारले असून, मराठा आरक्षण संदर्भात सरकारने भूमिका स्पष्ट करावी, असे सांगितले आहे. परंतु, सरकार चालढकल करत आहे. यामुळे आता मूक मोर्चा, निवेदन यापुरताच न राहता मराठा समाज आरक्षणाच्या न्याय हक्कासाठी सरकारला जाग आणण्यासाठी तुळजापूरनंतर धुळ्यातही मराठ्यांचा जागरण गोंधळ आंदोलन करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. याप्रसंगी मनोज मोरे म्हणाले, आरक्षणासह विविध प्रश्नांवर लढण्यासाठी मोठे आंदोलन उभे करावे लागेल. त्यासाठी आपसातील मतभेद विसरून सर्वांनी एकजूट होणे आवश्यक आहे. जुलै महिन्यातच देवीच्या मंदिरात जागरण गोंधळ आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल. आंदोलनाची तारीख व ठिकाण कोअर कमिटी ठरवेल. लवकरच तारीख व ठिकाण जाहीर करण्यात येईल असेही यावेळी सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुन्हा मागे घेण्यासाठी पोलिंसानी घेतले पैसे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बनावट कागदपत्रांद्वारे पीककर्ज घेऊन महाराष्ट्र बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी दाम्पत्याविरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घेण्यासाठी येथील पोलिस उपनिरीक्षक के. बी. घायवट यांनी केलेली एक लाख तीस हजार रुपयांची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे तक्रारदारांनी बैलजोडी आणि मंगळसूत्र गहाण ठेवून घायवट यांना पैसे दिले. या घटनेमुळे संपूर्ण बागलाण तालुक्यात पोलिस अधिकाऱ्यांबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

४ जून रोजी वायगाव (ता.बागलाण) येथील संजय जाधव व त्यांची पत्नी आशाबाई यांच्या विरोधात सटाणा महाराष्ट्र बँकेच्या व्यवस्थापकांनी बनावट कागदपत्रे सादर करून अकरा लाख रुपयांचे पीककर्ज घेऊन फसवणूक केल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार सटाणा पोलिसांनी जाधव कुटुंबीयांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून दांम्पत्याला अटक केली. हा गुन्हा मागे घ्यायचा असेल तर दोन लाख रुपये द्या, अशी मागणी संबंधित प्रकरणाचा तपास करणारे पोलिस उपनिरीक्षक घायवट यांनी केली होती. जाधव यांचे मोठे भाऊ भगवान हे पोलिस स्टेशनमध्ये गेले असता त्यांना संजय जाधव यांनी पोलिसांना पैसे द्यायचे आहेत. त्यामुळे बैलजोडी व मंगळसूत्र विकण्याचा सल्ला दिला. त्यानंतर भगवान यांनी संबंधित पोलीस उपनिरीक्षकाची भेट घेत दोन लाख रुपये जमा होत नाही, त्यात काहीतरी तडजोड करा, अशी विनंती केली. दोन दिवसांनर एक लाख तीस हजार रुपयांवर प्रकरण मिटविण्याचा निर्णय झाला. ही रक्कम देवूनही पोलिस उपनिरीक्षक आपल्या भाऊ व भावजईला सोडत नसल्याने भगवान जाधव आणि त्यांच्या नातेवाईकांनी पोलि निरीक्षक हिरालाल पाटील यांच्याकडे तक्रार केली. त्यामुळे आता हिरालाल पाटील के. बी. घायवट यांच्यावर काय कारवाई करतात, याकडे जाधव कुटुंबाचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावीची गुणवत्ता यादी उद्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले असून, अंतिम गुणवत्ता यादी उद्या ( ५ जुलै) जाहीर होणार आहे. पहिल्या गुणवत्ता यादीसाठी २७ हजार ९१६ विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज दाखल झाले आहेत. विज्ञान शाखेसाठी सर्वाधिक अर्ज आले आहेत. उद्या सकाळी ११ वाजता ऑनलाईन पध्दतीने ही यादी जाहीर करण्यात येईल. अकरावीच्या प्रवेशासाठी शहरात विज्ञान, वाणिज्य, कला व संयुक्त शाखा यांची ५७ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. प्रवेशाच्या २७ हजार ९०० जागा उपलब्ध आहेत. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीत प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळेल, त्यांना संबंधित महाविद्यालयांत प्रवेश घेणे बंधनकारक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकेश्वर तालुक्यात शेतकरी आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येच्या घटनांचे सत्र सुरूच असून, त्र्यंबकेश्वर तालुक्यात आणखी एका शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. त्यामुळे जिल्ह्यात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ४८ झाली आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खैरायपाली गावातील माचीपाडा येथे बुधा राजाराम सापटे (वय ५५) या शेतकऱ्याने सोमवारी, २ जुलै रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्र्यंबकेश्वर येथील तहसीलदारांनी या घटनेचा प्राथिमक अहवाल पाठविला असून, जिल्हाधिकारी कार्यालयास तो मंगळवारी सायंकाळी प्राप्त झाला. सापटे यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. त्यांच्या नावे बँकेचे काही कर्ज होते का, याची माहिती घेतली जाणार आहे. एक जानेवारीपासून जिल्ह्यात ४८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, त्र्यंबकेश्वर तालुक्यात आतापर्यंत चार शेतकऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठा सुधारणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बजेटमध्ये सूचित केल्यानुसार शहराच्या पाणीपुरवठा यंत्रणेत सुधारणा घडविण्यावर भर दिला असून, शहरात नव्याने विकसित झालेल्या भागात तब्बल ४ कोटी ५६ लाखांच्या नवीन जलवाहिन्या टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात पाच विभागांतील जलवाहिन्यांसाठी सात प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीच्या मान्यतेसाठी पाठविले आहेत.

आयुक्त मुंढेंनी बजेटमध्ये शहरातील पाणीपुरवठा, मलनिस्सारण तसेच आवश्यक त्या ठिकाणी रस्ते या कामांवर भर देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार पाणीपुरवठ्याला प्राधान्य देत, नगरसेवकांच्या रस्ते कामांनाही ब्रेक लावला होता. आचारसंहिता संपल्याने तीन महिन्यांतील प्रलंबित कामे राबवण्यावर भर देण्यात आला आहे. शहरातील सहाही विभागांत नव्याने विकसित झालेल्या भागात जलवाहिन्या टाकण्याची नगरसेवकांची मागणी होती. परंतु, सुरुवातीला विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ आणि त्यानंतर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने या कामांचे प्रस्ताव कार्यवाहीत आणणे प्रशासनाला शक्य नव्हते. आता मात्र आचारसंहिता संपुष्टात आल्याने प्रशासनाने स्थायी समितीवर प्रस्ताव पाठविण्याचा धडाका सुरू केला आहे. याअंतर्गत नाशिक पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक १६ मधील नाशिक-पुणे रोडवरील गांधीनगरपासून समतानगर पर्यंत २५० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यासाठी ५८.८३ लाख, तसेच जयभवानीनगर ते आदिवासी पाडापर्यंत १५० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यासाठी २५.९६ लाखांचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. पंचवटी विभागातील प्रभाग २ मधील आडगाव ते नांदूर परिसरातील नवीन विकसित झालेल्या कॉलनी परिसरात जलवाहिनी टाकण्यासाठी १.१९ कोटी, तर प्रभाग सहामधील पेठरोड ते तांबेमळा, मखमलाबाद रोडपर्यंत मुख्य वितरण वाहिनी टाकणे या कामासाठी ८०.३८ लाख, सातपूर विभागातील प्रभाग ८ मधील मते नर्सरी, नरसिंहनगर, आकाश रेषा, कल्याणी नगर, आदी परिसरात जलवाहिनी टाकण्यासाठी ८८.२४ लाख, नाशिकरोड प्रभाग १८ मधील म्हाडा कॉलनी, गोकुळधाम सोसायटी, सिद्धार्थनगर व कर्डक अभ्यासिका परिसरात जलवाहिन्या टाकण्यासाठी २७ लाख, सिडको विभागातील प्रभाग ३१ मधील केशवनगर, सुकदेवनगर या परिसरात जलवाहिन्या टाकण्यासाठी ६३.१४ लाख रुपये खर्चाचे प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर केले जाणार आहे.

६ जुलैला बैठक

आचारसंहितेमुळे गेल्या अडीच महिन्यांपासून ठप्प असलेला स्थायी समितीचा कारभार आचारसंहिता संपताच रुळावर येत आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर स्थायीची पहिली बैठक येत्या ६ जुलैला घेण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी स्थायी समितीवर अगोदरच प्रस्तावांचा ढीग आला आहे. त्यामुळे स्थायी समितीला आचारसंहिता चांगलीच पावणार असली तरी, आयुक्तांनी पंधरा दिवसांचे अल्टिमेटम दिल्याने स्थायीला तेवढ्या कालावधीत स्थायीला प्रस्ताव निकाली काढावे लागणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ताई बामणेला रौप्यपदक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बॅँकॉक येथे सुरू असलेल्या एशियन क्वॉलिफिकेशन मिटमध्ये नाशिकच्या ताई बामणे हिने १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्यपदक मिळवले. हे अंतर तिने ४ मिनिटे २४ सेकंद व १२ मायक्रोसेकंदाची वेळ नोंदवत पूर्ण केले. अर्जेंटिना येथे ऑक्टोबर २०१८ मध्ये होणाऱ्या यूथ ऑलिम्पिक गेमसाठी तिची निवड झाली आहे.

ताई गेल्या वर्षापासून १७ वर्षांखालील गटातून ४०० आणि ८०० मीटर या दोन स्पर्धांवर भर देत आहे. एनवायसीएसच्या माध्यमातून प्रसिद्ध गेल इंडिया या कंपनीने ताईस २०२० ऑलिम्पिक तयारीसाठी दत्तक घेतले आहे. वर्षभरापूर्वी थायलंडमधील एशियन स्कूल स्पर्धेसाठी, तर नैरोबीत होणाऱ्या वर्ल्ड स्कूल स्पर्धेसाठी देखील तिची निवड झाली होती. यावर्षी खेलो इंडिया या स्पर्धेनंतर लगेच महिनाभराच्या जमेका येथे होणाऱ्या उसेन बोल्ट क्लब येथे प्रशिक्षणासाठी तिची निवड झाली आहे. गेल्या चार वर्षात ताई बामणे हिने थेट आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत धडक घेतलेली आहे. जमैका अॅथलेटिक्समध्ये ८०० मीटरमध्ये ताईने सुवर्णपदक जिंकले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


युवतीच्या हातातून आयफोन हिसकावला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रस्त्याने पायी चाललेल्या युवतीचा महागडा आयफोन मोबाइल हिसकावून दोघा चोरट्यांनी पोबारा केला. पारिजातनगर परिसरात १४ जून रोजी हा प्रकार घडला असून याप्रकरणी कीर्ती भाऊसाहेब सोनवणे (रा. पारिजातनगर) यांच्या फिर्यादी दिली आहे. त्यानुसार, गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री नऊच्या सुमारास घराजवळून पायी जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्याजवळील ९० हजार रुपयांचा आयफोन हिसकावून नेला.

तरुणाची आत्महत्या

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कोणार्कनगर परिसरात एका ३५ वर्षीय तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सतीश सुदाम कदम असे त्याचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (दि. ३) दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली आहे. आडगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

तरुण नदीत बुडाला

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नदीपात्रात बुडल्याने एका ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. आनंदवली परिसरात ही घटना घडली. देविदास नाना पोटींदे (रा. आनंदवली, गंगापूर रोड) असे या तरुणाचे नाव आहे. गोदावरी नदीपात्रातील शिवनगर बंधारा येथे मंगळवारी (दि.३ जुलै) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. गंगापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लायन्स पंचवटीतर्फे डॉक्टरांचा सन्मान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समाजातील दु:खांचे निवारण करून सुखी समाज निर्मितीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या डॉक्टरांचा लायन्स पंचवटीच्या वतीने दरवर्षी सन्मान केला जातो. यंदा डॉ. भरत केळकर यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रशस्ती पत्र, शाल आणि सन्मानचिन्ह हा पुरस्काराचे स्वरुप होते. यंदाचे हे अकरावे वर्ष होते. 'डॉक्टर्स डे'चे औचित्य साधून हा सन्मान करण्यात आला. डॉ. भरत व डॉ. मृणालिनी केळकर हे दाम्पत्य गेले ३६ वर्षांहून अधिक काळापासून भारतासह इतरही देशांमध्येही सेवा देत आहेत. गिरणारे येथे २७ वर्षांपासून आरोग्यासाठी झटणारे डॉ. विरेंद्र मौर्य, अल्प दरात सेवा देणारे डॉ. मुकेश मुसळे तसेच समाजातील गरजूंना मोफत सेवा देणारे डॉ. चेतन अहिरे यांचाही सन्मान करण्यात आला. माजी प्रांतपाल वैद्य विक्रांत जाधव, अध्यक्ष अमृतकर, शोभा अमृतकर, वैद्य नीलिमा जाधव यांच्या हस्ते डॉ. केळकर यांच्या रुग्णालयात पुरस्कार वितरण झाले. शहरापेक्षा गावाकडील घरामध्ये आरोग्य नांदावे हे स्वप्न होते. त्यासाठी गिरणारे गावात सेवा सुरू केली. आज हे गाव माझ्या आयुष्यातील अविभाज्य घटक झाले असल्याचे डॉ. विरेन्द्रसिंग मौर्य यांनी सांगितली. यावेळी डॉ मुकेश मुसळे, डॉ. चेतन अहिरे यांनी देखील विचार मांडले.

कामाचे समाधान वेगळेच

'डॉक्टर्स बियाँड बॉडर्स'च्या माध्यमातून सिरिया तसेच येमेन येथे युद्धानंतर स्वयं सेवेसाठी कार्य करताना वेगळेच समाधान मिळाले. हेच ध्येय सर्वांनी ठेवायला हवे तसेच मधुमेहासाठी लायन्सने कार्य करावे, आंतरराष्ट्रीय संघटना त्यासाठी मदत करायला तयार असून त्याचा उपयोग नाशिकसाठी व्हावा असे डॉ. केळकर म्हणाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टॅँकर्सला मिळणार मुदतवाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये टॅँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ३० जून अखेरपर्यंतची मुदत संपली असली तरी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकारात काही गावांमध्ये ३१ जुलैपर्यंत टॅँकर्सला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या गावांना टॅँकर्सची गरज आहे अशा गावांचे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला दिल्या आहेत.

जिल्ह्यात जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यातच ग्रामीण भागातील काही गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली. परंतु, मार्च महिन्यापासून टॅँकर्सद्वारे पाणीपुरवठ्याला सुरुवात झाली. एप्रिल आणि मे महिन्यात जिल्ह्यात टंचाईच्या झळा अधिक तीव्र झाल्याने टॅँकर्सची मागणी वाढली. टॅँकर्सद्वारे ३० जूनपपर्यंतच पाणीपुरवठा करा, असे सरकारचे निर्देश असल्याने आता पुन्हा टॅँकर्सद्वारे होणारा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. जून महिन्यात मान्सूनचे आगमन होऊन नद्या, नाल्यांना पाणी येते तसेच विहिरींचे स्रोत प्रवाहित होत असल्यामुळे ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न सुटत असल्याचे सांगत हे टॅँकर्स बंद करण्यात आले. परंतु, सिन्नरसह, येवला, मालेगाव, नांदगाव, बागलाण, देवळा या सहा तालुक्यांमधील २६९ गावांना ६७ टॅँकर्सद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याने या गावांना पुन्हा पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी टॅँकर्सला मुदतवाढ देण्यास संमती दर्शविली असून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश यंत्रणेला दिले आहेत. या निर्णयामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिव्यांगासाठी कौशल्य विकास केंद्र

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दिव्यांगांनी महापालिकेबाहेर बुधवारी ठिय्या आंदोलन केल्यानंतर प्रशासनाने अखेर दिव्यांगांसाठीच्या कल्याणकारी योजनांना चालना देण्याची तयारी सुरू केली आहे. दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी ईटीसी सेंटर अर्थात कौशल्य विकास प्रशिक्षण व सेवा केंद्र उभारण्याचा निर्णय महापालिकेच्या समाजकल्याण विभागाने घेतला आहे. दिव्यांग विकासासाठी विविध कल्याणकारी योजनांचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला असून, तो महासभेच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे.

महापालिकेडून दिव्यांगांसाठीचा तीन टक्के राखीव निधी खर्च केला नसल्याने दिव्यांगांनी बुधवारी महापालिकेबाहेर ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे समाजकल्याण विभागाने दिव्यांगांच्या विकासासाठी विविध कल्याणकारी योजनांचा प्रस्ताव तयार केला असून, तो आयुक्तांमार्फत येत्या महासभेच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे. या प्रस्तावानुसार कर्णबधिरांना शस्त्रक्रियेकरीता अर्थसहाय्य योजना राबविली जाणार आहे. दिव्यांगांना स्वयंरोजगाराद्वारे सक्षम करण्यासाठी अर्थसहाय्य योजना राबविली जाईल. यापूर्वी सरसकट सर्वच दिव्यांगांना पेन्शन योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता मात्र यात सुधारणा करण्यात आली असून, प्रौढ बेरोजगार दिव्यांगांसाठी पेन्शन योजना राबविली जाणार आहे. दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी कौशल्य प्रशिक्षण व सेवा केंद्र (ईटीसी) उभारले जाणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांना विशेष प्रशिक्षणाची आवश्यकता असते. त्यामुळे दिव्यांगांचा सांभाळ करताना येणाऱ्या अडचणी दूर होऊ शकतात. अशा प्रशिक्षणाकरीता दिव्यांगांना अर्थसहाय्य दिले जाणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती व व्यवसाय प्रशिक्षणासाठी अर्थसहाय्य योजना राबविण्याचा प्रस्ताव आहे. सहाय्यभूत साधने व तंत्रज्ञान यासाठीही दिव्यांगांना अर्थसहाय्य दिले जाणार आहे. याशिवाय विशिष्ट गरजा असणाऱ्या दिव्यांग व्यक्तींसाठी विविध योजना राबविल्या जाणार आहेत. मनपा क्षेत्रातील दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या विविध संस्था, संघटनांच्या सक्षमीकरणासाठीदेखील योजना राबविली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्थायी समितीची उद्या बैठक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विधानपरिषदेच्या आचारसंहितेमुळे गेल्या अडीच महिन्यांपासून ठप्प असलेले स्थायी समितीचे कामकाज पुन्हा रुळावर आले आहे. स्थायी समितीची प्रदीर्घ काळानंतर येत्या शुक्रवारी(दि. ६) सभा बोलविण्यात आली असून, त्यात प्रलंबित कपाट प्रश्नासह, पाणीपुरवठा, श्वान निर्बीजीकरण, वाहनचालक खासगीकरणासह विविध प्रस्ताव ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे स्थायी समितीच्या प्रस्तावांचा वनवास अखेरीस संपला आहे. शुक्रवारच्या स्थायी समितीत कपाट प्रश्नासंदर्भातील रस्ते रुंदीकरणाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यामुळे या बैठकीकडे नाशिककरांचे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ पोलिसांचे वेतन देण्यास नकार

$
0
0

नाशिक:

अतिक्रमणासाठी पोलिस आयुक्त कार्यालयाकडून नियुक्त करण्यात आलेल्या २५५ दांडीबहाद्दर पोलिसांचे वेतन देण्यास महापालिकेने नकार दिला आहे. महापालिकेने अतिक्रमण बंदोबस्तासाठी दोन महिन्यात ४५० पोलिसांचे बळ दिले असले तरी, प्रत्यक्षात अतिक्रमण विभागाच्या पटावर ७४५ पोलिस हजर आहेत. त्यामुळे पोलिसांनाच त्यांचे हजेरीपत्रक तपासण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. त्यामुळे पोलिस आणि महापालिकेतील वाद चिघळण्याची शक्यता आहे.

महापालिकेकडून शहरातील पाणीचोरीच्या गुन्ह्यांवरून महापालिका आयुक्त मुंढे आणि पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांच्यात वाद निर्माण झाला होता. मुंढे यांनी थेट डॉ. सिंगल यांनाच कायद्याची आठवण करून दिल्याने पोलिसांना अतिक्रमणाच्या बंदोबस्तावर पालिकेची कोंडी केली होती. महापालिका निवडणूक काळात नियुक्त असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या थकवलेल्या भत्त्याची पोलिसांनी महापालिकेला आठवण करून दिली. त्यापाठोपाठ भंगार बाजार अतिक्रमणाचे बिल थकीत असल्याचे कळविले. तसेच अतिक्रमण काढण्यासाठी पोलिस बंदोबस्त हवा असेल तर, प्रथम पैसे भरा अशी भूमिका पोलिसांनी घेत, महापालिकेची कोंडी केली होती. त्यामुळे महापालिकेनेही आता पोलिसांना पुन्हा कायदा दाखवला आहे.

मे २०१८ मध्ये ४५० पोलिसांचे बळ बंदोबस्तासाठी दिले होते. प्रत्यक्ष अतिक्रमणाच्या हजेरीपटावर ४०२ पोलिसांचे बळ दिसून येत आहे. तर जून २०१८ या महिन्यात बंदोबस्तासाठी ४५० पोलिस दिले असताना प्रत्यक्षात ३४३ पोलिस हजर होते. त्यामुळे दोन महिन्यात १५५ पोलिसांचे दिवस गैरहजर आढळून आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने या १५५ दिवसांचे वेतन देण्यास नकार दिला असून पोलिसांनाच त्यांचे हजेरीपत्र तपासण्याचा सूचना केली आहे.

पोलिसांनी या पोलिसांना महापालिकेच्या अतिक्रमण मोहिमेवर पाठवले असले तरी हे कर्मचारी दीर्घकालीन रजेवर किंवा वैद्यकीय रजेवर जातात. तरीही महापालिकेला या कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याची शिफारस केली जाते. त्यामुळे महापालिकेने पोलिसांची पुन्हा कोंडी केली आहे. त्यामुळे पोलिस आणि महापालिकेतील वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रार्इनपाडा घटनेच्या दोषींना फाशी द्या

$
0
0

निषेधार्थ मोर्चाद्वारे भटका जोशी समाजाची मागणी

म. टा. प्रतिनिधी,जळगाव

धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे गोसावी समाजाच्या पाच भिक्षुंना जमावाने मारहाण करून त्यांची हत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ अखिल भटका जोशी समाज सेवा संघातर्फे बुधवारी (दि. ४) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे.

धुळे जिल्ह्यात राईनपाडा येथे पाच भिक्षुंची हत्या करण्यात आली. राज्यामध्ये डवरी गोसावी समाज हा पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती करीत असतो. ७० टक्के समाज मुलभूत गरजांसाठी गावोगावी फिरत असतो, असे असताना पुरोगामी महाराष्ट्रात त्यांच्यावर अमानूष हल्ले करून त्यांना ठार मारल्याची घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे, असे या वेळी देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या घटनेच्या निषेधार्थ अखिल भटका जोशी समाज सेवा संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात पुरुषांसह महिलांनीदेखील मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर अडविण्यात आला. या वेळी संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले. या वेळी सुरेश वाकोद, दिलीप जोशी, सुरतसिंग जोशी, वसंत वाकोद, सुनील जोशी, सुमीत जोशी, विलास साळुंके, हिरामण भवर, गणेश वायकर, मोहन भवर, संदीप जोशी, पांडुरंग जोशी, ईश्‍वर चव्हाण, गंगाराम वायकर, विष्णू अनार हे उपस्थित होते. दरम्यान, वाकोद येथील शांताई फाउंडेशनतर्फेदेखील या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. ज्या भिक्षुंची हत्या झाली आहे त्यांच्या कुटुंबीयांना २५ लाखांची मदत करून त्यांचे पुर्नवसन करावे, अशी मागणी सुरेश जोशी, गजानन जोशी, विलास जोशी, विशाल जोशी यांनी केले. राईनपाडा येथील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, भटक्या विमुक्त जाती-जमातींना शासकीय सवलती देवून संरक्षण कायदा करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

साक्रीत शनिवारी निषेध मोर्चा
धुळे : साक्री तालुक्यातील राईनपाडा येथे भटके विमुक्त नाथपंथी डवरी समाजाच्या पाच निष्पाप व्यक्तींची जमावाकडून क्रूरपणे हत्या करण्यात आली. या घटनेचा निषेध व्यक्त करीत दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच खटल्यासाठी ॲड. उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्यात यावी, अशा मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय नवनाथ गोसावी संघटनेतर्फे बुधवारी साक्री तालुका तहसीलदार संदीप भोसले यांना देण्यात आले. त्याचबरोबर येत्या शनिवारी (दि. ७) येथील तहसील कार्यालयावर संघटनेच्यावतीने निषेध मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. अखिल भारतीय नवनाथ गोसावी संघटनेच्या मागण्यांना शहर लाडशाखीय वाणी समाज व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनीदेखील पाठिंबा दिला आहे.

राईनपाडा येथे घडलेल्या अमानवीय घटनेने मानव जातीला कलंक फासला आहे. भटके विमुक्त नाथपंथी डवरी समाजाच्या पाच निष्पाप व्यक्तींची क्रूर हत्या झाली आहे. घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. खटल्यासाठी ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती व्हावी तसेच ज्या समाजकंटकांनी सोशल मीडियावर अफवा पसरविली, त्यांनाही कठोर शासन व्हावे. या घटनेतील व्यक्तीच्या परिवाराला २५ लाख रुपये लाभ मिळावा तसेच संरक्षण मिळावे. परिवारातील एका सदस्याला नोकरी मिळावी तसेच सरकारने त्यांच्या परिवारास घर बांधण्यासाठी मदत करावी, आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. या वेळी तालुकाध्यक्ष गोटू जगताप, अशोकगिरी महाराज, आरपीआयचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष राजेंद्र मोरे, लाडशाखीय वाणी समाजाचे अध्यक्ष प्रमोद येवले, शिवसेनेचे किशोर वाघ, गोविंदा सोनवणे, भटू जाधव, राहुल गोसावी, देवेंद्र पवार, मुकेश पवार, सागर गोंधळी, हिंमत गोसावी, राजू गोंधळी, किशोर गोंधळी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘एचव्हीडीएस’द्वारे कृषीपंपांना वीजजोडणी

$
0
0

जळगाव परिमंडळासाठी ४७६ कोटींची निधी; १६ नवीन उपकेंद्रांसाठी २६ कोटी

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

महावितरणच्या जळगाव परिमंडळातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील पैसे भरून प्रलंबित २०,२२४ कृषीपंपांना वीजजोडणी देण्यासाठी उच्चदाब वितरण प्रणाली व सोळा नवीन उपकेंद्राच्या उभारणीसाठी ४७६ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाच्या निविदा प्रक्रियेस प्रारंभ करण्यात आल्याची माहिती मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी ‘मटा’शी बोलताना दिली आहे.

यामध्ये जळगाव परिमंडळातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील प्रलंबित कृषीपंपांच्या उच्चदाब वितरण प्रणाली उभारण्यासाठी ४२५ कोटी रुपये, नवीन १६ उपकेंद्रे उभारण्यासाठी २६ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. याचबरोबर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून नंदुरबार जिल्ह्यातील १४८८ अनूसुचित जमातीतील पैसे भरून प्रलंबित कृषीपंपाना २५ कोटींचा निधी तर जळगाव जिल्ह्यासाठी २२७ कोटी ११ लाख, धुळे जिल्ह्यासाठी १३६ कोटी ९८ लाख तर नंदुरबारसाठी ८७ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. यानंतर आता दोन वा तीन कृषीपंपग्राहकांसाठी कमी क्षमतेचे एक वितरण रोहित्र असणार आहे. त्यामुळे संबंधित कृषीपंपग्राहकांमध्ये रोहित्राबद्दल स्वमालकीची भावना निर्माण होईल. योग्य दाबाचा वीजपुरवठा होऊन कृषीपंप व्यवस्थित चालतील तसेच वीजचोरीस आळा बसेल.

कृषीपंपांच्या वीजजोडणीची आकडेवारी...

जळगाव परिमंडळात...........२०,२२४
धुळे जिल्हा....................... ६१६३
जळगाव जिल्हा ................. १०१८९
नंदुरबार............................ ३८७२

उच्चदाब वितरण प्रणाली...
उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे ४१५ व्हॉल्टच्या लघुदाब वीजवाहिनीऐवजी ११ केव्हीची उच्चदाब वीजवाहिनी उभारणी करून १०० केव्हीए/६३ केव्हीए या उच्चक्षमतेच्या वितरण रोहित्राऐवजी वीजभारानुसार २५ केव्हीए व त्यापेक्षा कमी क्षमतेच्या वितरण रोहित्रांचा वापर करून वीजवापरकर्त्यांना वीजजोडणी उपलब्ध करून दिली जाते.

होणारे फायदे...
वीजेची तांत्रिक हानी कमी होऊन वितरण रोहित्रे जळण्याचे प्रमाणात घट होईल
वितरण रोहित्रावरील वीजभार मर्यादित असणार
अतिभार व लघुदाब वाहिन्यातील तांत्रिक बिघाड होणार नाही
अनधिकृत कृषीपंपाद्वारे वीजवापरास चाप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिष्यवृत्ती वाटप अन् शुभमंगलही!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

दि ब्लाईंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन आणि पुण्यातील श्रीमंत दगडू शेठ हलवाई चॅरिटेबल ट्रस्टतर्फे राज्यभरातील १२२ अंध विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्रत्येकी पंधराशे रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. याशिवाय याच कार्यक्रमात दोन अंध जोडप्यांच्या लग्नाच्या रेशीमगाठीही जुळविण्यात आल्या. हा कार्यक्रम नाशिक-पुणे रोडवरील स्वयंवर मंगल कार्यालयात पार पडला.

याप्रसंगी कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, श्रीमंत दगडू शेठ हलवाई चॅरिटेबल ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, दत्ता गायकवाड, लायन्स क्लबचे अध्यक्ष सचिन कर्णिक, गुडविलचे संस्थापक कालिदास मोरे, जैन सोशल ग्रुपचे शरद शहा आदी उपस्थित होते. दि ब्लाईंड वेल्फेअर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष अरुण भारस्कर यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी उपस्थितांचा परिचय करून दिला. संस्थेचे महासचिव दत्ता पाटील, खजिनदार विजया दबे, तेजस्विनी शेवाळे, सपना चांडक यांनी संयोजन केले.

संदीप सोनकांबळे आणि अनिता वालंबे तसेच गणेश पाटील आणि पार्वती लोंढे या जोडप्यांच्या रेशीमगाठी याच कार्यक्रमात जुळल्या. त्यांच्या शुभमंगल प्रसंगी उपस्थितांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. दोन्ही नवदांपत्यास उपस्थितांच्या सहकार्याने संसारोपयोगी साहित्याचीही भेट देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मास्टर्स ट्रेनर’ करणार गणित सोपं

$
0
0

आयआयटी मुंबई-राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियानचा उपक्रम

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील विद्यार्थ्यांचा गणित विषयातील दर्जा सुधारण्यासाठी शिक्षकांकडून योग्य अध्यापन केले जाणे आवश्यक आहे. या विचाराने आयआयटी मुंबई आणि राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने 'क्वालिटी इम्प्रुव्हमेंट इन मॅथ एज्युकेशन' हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. परीक्षेद्वारे शिक्षकांची निवड करण्यात येणार असून राज्यातील सुमारे ३०० निवडक माध्यमिक स्तरावरील गणित शिक्षकांना एक वर्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर प्रशिक्षित मास्टर ट्रेनर्स इतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे गणित आणखी सोप्पं करणार आहे.

शालेय विद्यार्थ्यांमध्ये गणिताची भीतीचे प्रमाण मोठे आहे. हा विषयच अनेक विद्यार्थ्यांना नको वाटतो. पण तो अधिक प्रभावी आणि सोप्या पद्धतीने शिकवला गेला तर विद्यार्थीही कंटाळणार नाही, या दृष्टीकोनातून प्रशिक्षणाची रचना करण्यात आली आहे. गेल्या वर्षी राज्यातील २७३ माध्यमिक स्तरावरील गणित शिक्षकांची निवड झाली होती. त्यांना मास्टर ट्रेनरचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर प्रशिक्षकांनी संपूर्ण राज्यात सप्टेंबर-डिसेंबर २०१७ मध्ये १२ हजार ५०० शिक्षकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले. अधिकाधिक शिक्षकांपर्यंत हा उपक्रम पोहोचवण्यासाठी मास्टर ट्रेनरची संख्याही जास्त असणे आवश्यक आहे, या विचाराने आता ३०० शिक्षकांची दुसरी बॅच तयार करण्यात येणार आहे. इयत्ता नववी व दहावीला गणित विषय शिकवणाऱ्या शिक्षकांना या परीक्षेसाठी अर्ज करता येणार असून ८ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर प्रशिक्षण पूर्वपरीक्षा १४ जुलै रोजी सकाळी ११ ते १ या दोन तासात होणार आहे. बहुपर्यायी प्रश्नांद्वारे परीक्षा घेतली जाणार आहे. शिक्षकांना https://goo.gl/forms/pVgrUtJXIKgmniwx1 या लिंकवर नोंदणी करता येणार आहे. या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक विद्या प्राधिकरण नाशिकचे उपसंचालक जालिंदर सावंत यांनी केले आहे.

असे असेल परीक्षेचे स्वरुप

प्रशक्षिण पूर्वपरीक्षेत सुमारे २५ टक्के प्रश्न प्राथमिक बीजगणित, रेखीय बीजगणित, अमूर्त बीजगणित, आणि संख्या सिद्धांतावर आधारित असणार आहेत. तर उर्वरित प्रश्न गणिताच्या इतर क्षेत्रावर आधारित असणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नीट’ परीक्षेच्या तयारीबाबत मार्गदर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेल्या नीट परीक्षेविषयी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने महाराष्ट्र टाइम्सच्या प्लॅनेट कॅम्पसअंतर्गत 'नीट परीक्षेची तयारी कशी करावी', या मार्गदर्शनपर शनिवारी (दि. ७) व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. कॉलेजरोडवरील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कॅम्पसमधील प्राचार्य एम. एस. गोसावी फार्मसी कॉलेजमधील सायंकाळी ५ ते ७ या वेळेत हा सेमिनार होणार आहे. यावे‌ळी रोहित जोशी मार्गदर्शन करणार आहेत. जोशीज् लर्निंग सेंटर या सेमिनारचे प्रायोजक आहेत. वैद्यकीय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना नीट परीक्षा होणे आवश्यक आहे. मात्र, परीक्षेच्या काठीण्य पातळीमुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये या परीक्षेबाबत भीती असते. तसेच परीक्षेचे स्वरुप, कालावधी आदी प्रश्न असतात. या प्रश्नांबरोबरच नीट परीक्षेची सर्व माहिती, अभ्यासाची तयारी कशी करावी, या विषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.

लोगो : प्लॅनेट कॅम्पस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदव्युत्तरसाठी प्रवेश सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे सार्वजनिक आरोग्य पोषणशास्त्र, आरोग्य सेवा व्यवस्थापन व औषध निर्मिती क्षेत्रतील नाविण्यपूर्ण पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे.

याबाबत कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर म्हणाले, की आरोग्य शिक्षणातील पदवीधर विद्यार्थ्यांसाठी मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ (न्यूट्रिशन), एमबीए (हेल्थ केअर एडमिनिस्ट्रेशन) व एम. एस्सी. (फार्मस्युटिकल मेडिसिन) हे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी कौशल्य ज्ञान असणे महत्त्वाचे आहे. यासाठी विद्यापीठाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ (न्यूट्रिशन) हा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांमधून विद्यार्थ्यांना पोषण विषयक कार्यक्रमांचे सुयोग्य नियोजन, व्यवस्थापन, प्रत्यक्ष कृती आणि मूल्यमापन अशा सर्व व्यवस्थापकीय कौशल्यज्ञान याचा अभ्यासक्रमात समावेश केला आहे. विद्यापीठाचे नाशिक मुख्यालयात सुरू करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी आरोग्य विज्ञान शाखेतील पदवी प्राप्त केलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात.

विद्यार्थ्यांना हॉस्पिटल व्यवस्थापन, हॉस्पिटल सेवेचे सुयोग्य नियोजन आणि व्यवस्थापन आदीबाबत कौशल्य प्रशिक्षण गरजेचे आहे. यासाठी विद्यापीठातर्फे एमबीए (हेल्थ केअर अॅडमिनिस्ट्रेशन) हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. यासाठी आरोग्य विज्ञान शाखेतील पदवी प्राप्त केलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात. यासाठी औषध निर्मिती संदर्भातील क्लिनिकल ट्रायल, मेडिकल राईटिंग, फार्माको व्हिजीलन्स, रेग्युलेटरी अफेयर्स, मेडिका मार्केटिंग, क्लिनिकल रिसर्च आणि क्लिनिकल टाडा व्यवस्थापन आदी कौशल्य असणे गरजेचे आहे. यासाठी विद्यापीठातर्फे एम. एस्सी. (फार्मस्युटिकल मेडिसिन) हा उपयुक्त अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमासाठी आरोग्य विज्ञान शाखेतील पदवीधर तसेच बी. एस्सी. लाईफ सायन्स आणि बायोटेक्नॉलॉजी व फार्मसी पदवीधर विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात.

एन्ट्रन्स २९ जुलै रोजी

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले, की विद्यापीठाच्या मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ (न्यूट्रिशन), एमबीए (हेल्थ केअर अॅडमिनिस्ट्रेशन) व एम. एस्सी. (फार्मस्युटिकल मेडिसिन) या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची विद्यापीठातर्फे नाशिक, मुंबई, पुणे व नागपूर येथे केंद्रीय सामायिक परीक्षा २९ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेची गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित होतील.

फोटो : आरोग्य विज्ञान विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images