Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

जेलरोडला हाणामारी तीन जण जखमी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

टेलरचे पैसे रात्री उशिरा देण्यासाठी आल्याबाबत विचारणा केल्याच्या रागातून जेलरोडवरील मोरे मळ्यातील बालाजीनगर येथे दोन गटात हाणामारी झाली. यात तिघे जण जखमी झाले असून गंभीर जखमी असलेल्या एकास नाशिकला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आकाश भालेराव (रा. देवळालीगाव, राजवाडा) याच्या फिर्यादीनुसार त्याचा भाऊ आमिष व त्याची पत्नी स्नेहल (रा. आढाव पेट्रोल पंपाजवळ, जेलरोड) हे दोघे जेलरोडच्या मोरे मळ्यातील बालाजीनगर येथील कावेरी भोसले यांच्याकडे शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता शिलाईचे पैसे देण्यासाठी गेले. यावेळी कावेरी भोसले यांच्या शेजारी राहणाऱ्या तुषार आव्हाड याने त्यांना इतक्या रात्री पैसे देण्यासाठी का आलात, अशी विचारणा केली. यावरून वाद होऊन तुषारने आमिषला मारहाण केली. याची माहिती आमिषने भाऊ आकाश भालेराव याला दिली. आकाश बालाजीनगर येथे गेला व भाऊ आमिषची विचारपूस करीत असताना तुषारने पाठीमागून येत आकाशच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केला. या घटनेत आकाश भालेराव जखमी झाला. आमिषने आकाशला बिटको रुग्णालयात दाखल केले.

दुसरा फिर्याद पवन विष्णू आव्हाड (रा. बालाजीनगर) याने नाशिकरोड पोलिसात दिली. कावेरी भोसले याच्याकडे आलेल्या आमिष व स्नेहल यांना एवढ्या रात्री का आलात, अशी विचारणा तुषारने केल्याच्या रागातून आमिषने त्याचा भाऊ आकाश याच्यासह संजय भालेराव आणि इतर चार पाच साथीदारांना फोन करून बोलावून घेतले आणि तुषारवर हल्ला केला. मध्यस्ती करणाऱ्या पवनला आकाश व त्याच्या साथीदारांनी दगड व विटांनी मारहाण केली. यात पवन गंभीर जखमी झाला. या हल्ल्यानंतर आकाश व त्याचे साथीदार दुचाकीवरून पळून गेले. बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तिथेही आकाश भालेराव व त्याच्या साथीदारांनी पवनला मारहाण केली. रात्री त्रास झाल्याने पुढील उपचारांसाठी पवनला नाशिकला सिव्हिल रुग्णालयात दाखल केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डॉ. कविता भालेराव ठरल्या मिसेस स्पार्क

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकच्या दंतरोग तज्ज्ञ डॉ. कविता भालेराव यांनी मिसेस स्पार्क किताब पटकविला आहे. मिसेस इंडिया क्वीन ऑफ सबस्टन्स ही विवाहितांची राष्ट्रीय स्पर्धा आहे. डॉ. भालेराव यांनी क्लासिक श्रेणीत भाग घेत प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्वामुळे किताब मिळविला. ही स्पर्धा नवी दिल्लीतील आयटीसी हॉटेल द्वारका येथे दरम्यान झाली. अभिनेत्री महिमा चौधरी, पूनम धिल्लन या परीक्षक होत्या.

डॉ. भालेराव यांनी मुंबई विद्यापीठातून मे २०१७ मध्ये एम. ए. पदवी ग्रहण केली. डॉ. भालेराव यांना आत्मविश्वास, आकर्षक व्यक्तिमत्त्व,

कलागुण यामुळे मिसेस इंडिया स्पार्कने सन्मानित करण्यात आले.

स्पर्धेसाठी सहा इंच हिल्स घालणे, मेक अप करणे यापासून ते जगातील चालू घडामोडींचे ज्ञान याची माहिती आवश्यक ठरली. व्यायाम, नृत्य प्रकारांचे प्रशिक्षण घेतले. नियमित व्यायाम आणि जीवनाप्रति सकारात्मक दृष्टिकोन, समाजाला आपण काही देणे लागतो, ही भावना ठेवली, असे डॉ. भालेराव यांनी सांगितले.

डॉ. भालेराव म्हणाल्या की, मला नवीन शिकणे, नवीन आव्हाने स्वीकारणे, त्यात प्राविण्य संपादन करणे आवडते. मी विविध संस्थांमार्फत सामाजिक उपक्रम राबविते. दर रविवारी सकाळी ९ ते ११ दरम्यान त्या गरजू मुलांसाठी संडे धम्म स्कूल चालवितात. रोटरी क्लबच्या माध्यमातून अनेक आश्रमशाळा व महापालिका शाळांमध्ये विविध प्रकारचे उपक्रम घेतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समर्पित शिक्षक, कर्मचारी हे संस्थेसाठी भूषणावह

$
0
0

पिंपळगाव बसवंत : शिक्षण संस्था उभारणीसाठी गुणवान आणि समर्पित शिक्षक, कर्मचारी लाभणे हे संस्थेचे भूषण ठरते. शिक्षक व कर्मचाऱ्यांनी उत्तम साथ दिल्यानेच मविप्र संस्था नावरुपाला आली आहे, असे प्रतिपादन मविप्रचे सभापती माणिकराव बोरस्ते य़ांनी केले.

पिंपळगाव बसवंत येथील क. का. वाघ महाविद्यालयातील उपप्राचार्य डी. डब्लू. शेळके व काशिनाथ बोरस्ते यांच्या सेवानिवृत्ती समारंभात ते बोलत होते. मंचावर कादवा कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, मविप्रचे संचालक प्रल्हादराव गडाख, दत्तात्रय पाटील, प्रा. नानासाहेब दाते, शिक्षणाधिकारी प्रा. डी. डी. काजळे, प्रा. एस. के. शिंदे, प्राचार्य डा. एस. एस. घुमरे आदी उपस्थित होते.

सभापती बोरस्ते म्हणाले, की सेवा निवृत्तीनंतरही शिक्षक व कर्मचाऱ्यांनी संस्थेसाठी योगदान द्यावे. श्रीराम शेटे म्हणाले, की शेळेक सर गरीब शेतकरी कुटुंबातून पुढे आले. त्यांनी नम्रपणे सेवा बजावली आहे. प्रल्हादराव गडाख म्हणाले, की खेडेगावातून येऊन चांगला शिक्षक, उत्तम प्रशासक, घराला सन्मानाने उभा करणारा कर्ता पुरुष म्हणून शेळके यांचे कार्य लक्षात घेण्यासारखे आहे.

उपप्राचार्य डॉ. एस. वाय. माळोदे, प्रा. पी. आर. बोरसे, कुसुमताई दरेकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. ज्ञानोबा ढगे यांनी सूत्रसंचलन केले. प्रा. वाय.आर. बस्ते यांनी आभार मानले. प्राचार्य बी. जी. वाघ, डॉ. दिलीप शिंदे, डॉ. आर. एन. भवरे, डॉ. पी. व्ही. रसाळ, आर. एन. पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चुकीच्या कामगार चळवळीचा फटका

$
0
0

१ मे साठी प्रतिक्रिया : उद्योग

000000

चुकीच्या कामगार चळवळीचा फटका

- किसनलाल सारडा

नाशिकची संस्कृती ही आजही टिकून आहे. इतर मोठ्या शहरांमध्ये त्या शहरांची ओळख आज हरवलेली दिसते. उद्योग क्षेत्राबाबत मात्र नाशिक दुर्दैवी ठरले. खरे तर उद्योग क्षेत्राची भरभराट होते, त्या शहराचा विकास झपाट्याने होतो, असे म्हणतात. नाशिकमध्ये सातपूर, अंबडसारख्या वसाहती असल्या तरी त्यांचा एका मर्यादेनंतर हवा तसा विकास झाला नाही. चुकीच्या कामगार चळवळींचा फटका नाशिकच्या उद्योग क्षेत्राला बसला आहे. पुणे, चाकणसारखी ठिकाणे आज उद्योग विकासामुळे पुढारली आहेत. अशी प्रगती, विकास नाशिकमध्येही होणे अपेक्षित होते. परंतु, तसे झाले नाही. नाशिकपासून मुंबईजवळ आहे. त्यामुळे येथील उद्योगासाठी पूरक वातावरण आहे. शिवाय, पाण्याची मुबलकता असणे हीदेखील आपल्या शहरासाठी जमेची बाजू आहे. सिन्नरबाबत मला त्यामुळेच विशेष कौतुक वाटतं. नाशिकमधील पाण्याचा तिकडे वापर करून तेथील उद्योग वसाहत विस्तारत आहे. नाशिक मात्र योग्य कामगार नेतृत्व नसल्याने अद्याप मागे पडले आहे, असे वाटते.

(शब्दांकन : अश्विनी कावळे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी निर्णयाला ठेंगा!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

खासगी बस धारकांना गर्दीच्या हंगामाच्या काळात एसटी बसच्या तुलनेत जास्तीत जास्त दीडपट भाडे आकारता येणार असल्याचे निर्देश शासनाने दिले असतानाही त्याला ट्रॅव्हल कंपन्यांनी ठेंगा दाखवला आहे. सोमवारी सरकारच्या या आदेशानंतरही आधी आकारल जात असलेले भाडेच या खासगी बसधारकांनी कायम ठेवल्यामुळे प्रवाशांचाही गोंधळ उडाला आहे. सरकारच्या निर्णयाचे कोणतेही लेखी पत्र आमच्याकडे आले नसल्याचे कारण पुढे करीत या बसधारकांनी हात झटकले आहेत.

राज्य सरकारने २७ एप्रिलच्या शासन निर्णयाद्वारे कंत्राटी वाहनांचे (खासगी बस, ट्रॅव्हल्स इत्यादी) महत्तम भाडेदर निश्चित केले आहेत. कंत्राटी बस परवानेधारकांकडून जर विहीत दरांपेक्षा अधिक दराने आकारणी करण्यात येत असेल, तर त्याविषयी मोटार वाहन विभागाच्या ०२२ - ६२४२६६६६ या निःशुल्क तक्रार नोंदणी क्रमांकावर तक्रार नोंदविण्यात यावी, असे परिवहन आयुक्त कार्यालयामार्फत आवाहन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे तक्रारी विभागाच्या www.transportcomplaints.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर भाडे जास्त घेतल्यास तक्रार करण्याच्या सूचनाही केल्या आहेत. या तक्रारी आल्यानंतर चौकशीअंती संबंधित कंत्राटी बस परवानाधारकाच्या परवान्यावर निलंबनाची, रद्द करण्याची कारवाई करण्याचा दमही भरला आहे. पण, याचा कोणताही परिणाम या खासगी बस धारकांमध्ये नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

भाडेवाढीचे समर्थन

खासगी बसधारक सुटीच्या काळात भाडेवाढीचे समर्थन करतात. बारा महिन्यांत आम्हाला या व्यवसायात ९ महिने नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे गर्दी किंवा सुटीच्या काळात आम्ही २५ टक्के दरवाढ करतो. त्यामुळे आमचे नुकसान भरून निघते. त्यात काही ठिकाणची भाडेवाढ तर २५ टक्क्यांपेक्षाही कमी आहे. त्याचप्रमाणे काही मार्गांवरील भाडे 'जैसे थे' असतात. गर्दीचे प्रमाण लक्षात घेऊन ही वाढ केली जाते.

भाडेवाढीचा गोंधळ

सरकारने खासगी बसचे भाडे महामंडळाच्या बसभाड्याच्या दीडपट असावे असे म्हटले असले, तरी एसटी महामंडळाच्या पुणे सोडल्यास व्हॉल्वो बसच नाहीत. त्यामुळे त्याचे निकष कसे लावावेत, हाही गोंधळ आहे. सेमी स्लीपर, नॉन एसी या बस धावत असल्या तरी एसटीच्या बस व खासगी बसमध्ये फरक आहे. खासगी बसची मनमानी रोखण्यासाठी एसटी महामंडळाने शिवशाही बस राज्यभर सुरू केल्या. नाशिकहून ६० हून अधिक बसेस विविध मार्गांवर धावत आहे. त्यात सर्वाधिक गर्दी पुणे मार्गावर आहे. त्याचप्रमाणे धुळे मार्गावरही या बस सुरू करण्यात आल्या आहे.

खासगी व्हॉल्वोचे दर नाशिकहून

ठिकाण - पूर्वीचे - वाढवलेले

मुंबई - ४५० -५५०

पुणे - ४००- ५२०

कोल्हापूर- ६५० -८००

एसटीच्या शिवशाहीचे दर

नाशिक - पुणे - ३४८

नाशिक - धुळे - ७१४

नाशिक - मुंबई - ३००

नाशिक - औरंगाबाद - ३२९

सरकारचे कोणतेही पत्र आमच्याकडे नाही. आम्ही २५ टक्के भाडेवाढ करतो. गर्दी नसताना आम्हाला मोठे नुकसान होते. त्यामुळे या काळात ते भरून निघते. काही मार्गांवर ही वाढ खूप कमी आहे.

-नितीन गुणवंत, संचालक गुणवंत ट्रॅव्हल्स

शिवशाहीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. नाशिकहून ६० बसेस विविध मार्गांवरून सोडल्या जात आहेत. पुणे मार्गावर मोठी गर्दी आहे.

- अरुण सिया, जिल्हा वाहतूक नियंत्रक, एसटी महामंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीरपत्नींना एसटीचा मोफत प्रवास

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्राच्या संरक्षणसाठी धारार्तीर्थी पडलेल्या शहीद जवानांच्या पत्नींना एसटी महामंडळातर्फे आजीवन मोफत प्रवासाचे स्मार्ट कार्ड आज १ मे रोजी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभात सकाळी ७.१५ वाजता देण्यात येणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेअंतर्गत हे कार्ड दिले जाणार आहे. या कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात पाच कार्ड दिले जाणार असून, उर्वरित ११ कार्ड वीरपत्नींना त्यांच्या घरी पाठविण्यात येणार आहेत.

देशासाठी शहीद झालेल्या जवानांच्या पत्नींना आधार देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे ही शहीद सन्मान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत सैन्यातील तसेच सुरक्षा दलातील शहीद जवानाच्या पत्नीला महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास योजना लागू केली आहे. महाराष्ट्र दिनापासून राज्यभर या योजनेची अंमलबजावणी होणार आहे. या योजनेत एका पाल्याला त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार एसटी महामंडळात नोकरी देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभिवादन तथागताला

$
0
0

बुद्धपौर्णिमेनिमित्त शहरात ठिकठिकाणी खीरदान; विविध सांस्कृतिक कार्यक्रम

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बुद्धपौर्णिमेनिमित्त तथागत भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेला अभिवादन करून शहरात विविध ठिकाणी बुद्धपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम झाले. शहरातील विविध ठिकाणी खीरदान करण्यात आले. त्याचा अबालवृद्धांनी लाभ घेतला.

बुद्धपौर्णिमेनिमित्त शहरात सकाळपासूनच विविध कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली. अनेक बौद्ध अनुयायांनी सकाळी पांढरी शुभ्र वस्त्रे परिधान करून घरात भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मेणबत्त्या पेटवित अभिवादन केले. तसेच घरातील सर्व सदस्यांनी त्रिशरण, पंचशील याचे पठण केले. त्यानंतर बुद्धवंदना करण्यात आली. त्यानंतर घराजवळील बुद्धविहारात हजेरी लावून भन्तेजींचे दर्शन घेत वंदना सादर केली. आलेल्या सर्व अनुयायांना संदेश दिला. सकाळपासून नाशिकसह नाशिकरोड, सातपूर येथील बुद्धविहारात गर्दी केली. शासकीय सुट्टी असल्याने सकाळपासूनच फाळके स्मारक परिसारातील बुद्धविहारात गर्दी झाली होती. शहरातील विविध बुद्धविहारांमध्ये सकाळी सहा वाजता बुद्धपूजन करण्य़ात आले. ध्यान, परिप्राणपाद, मंगलमैत्री करण्यात आली. त्यानंतर धम्म ध्वजारोहण करण्यात येऊन दुपारी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. उपनगर येथे सायंकाळी धम्म रॅली काढण्यात आली.

शहरात अनेक ठिकाणी नेत्रतपासणी व रक्तदान शिबिर झाली. तसेच भिक्कूसंघ भोजनदान महासंघ दान हेही कार्यक्रम पार पडले. फाळके स्मारक येथील महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या २२ फुट बुद्धमूर्तीची सजावट करण्यात आली. तसेच संपूर्ण बुद्धविहाराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. मुंबई-आग्रा रोडवर असलेल्या बुद्धविहारात रात्री उशिरापर्यंत गर्दीचा ओघ सुरू होता.

पांडवलेणी पायथ्याशी वृक्षारोपण

इंदिरानगर : पांडवलेण्याच्या पायथ्याशी बुद्धस्मारकात वृक्षारोपणासह विविध कार्यक्रम झाले. वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे यंदा कमी गर्दीचे दिसून आली. सायंकाळी बुद्धभीम गितांचे सूर निनादले.

आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण झाले. शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्ट व महापालिका यांच्यातर्फे विविध कार्यक्रम झाले. सकाळी दहा वाजता धम्मध्वजारोहण व बुद्धपूजा झाली. शहरातील विविध संस्थांच्या वतीने रक्तदान शिबिर झाले. तसेच आरोग्य शिबिरासह वृक्षारोपण कार्यक्रम झाला. धम्मध्वजारोहणाप्रसंगी आमदार हिरे यांच्यासह नगरसेवक राकेश दोंदे, भगवना दोंदे, नगरसेविका छाया देवांग, भाग्यश्री ढोमसे, पुष्पा आव्हाड, प्रतिभा पवार यांचेसह इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नारायण न्याहाळदे आदी मान्यवर उपस्थित होते. दिवसभर सुरू असलेल्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष भदन्त सुगत व भदन्त आर्यनाग यांच्यासह सर्व सदस्य प्रयत्नशील होते.

प्रेस कामगारांतर्फे बुद्धवंदना

जेलरोड : प्रेस कामगारांच्या डॉ. बी. आर. आंबेडकर फाउंडेशनतर्फे भारत प्रतिभूती मुद्रणालयासमोर सकाळी बुद्धवंदना व अभिवादन सभा घेण्यात आली. दुपारी खिरदान कार्यक्रम झाला. बुद्ध आणि त्यांचा धम्म या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी भारत प्रतिभूती मुद्रणालयाचे अधिकारी डॉ. डी. के. रथ, प्रेस मजदूर संघाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्‍वर जुंद्रे, माजी सचिव रामभाऊ जगताप, सुधीर गायकवाड, राहुल रामराजे, सल्लागार प्रकाश सोनवणे, अनिल थोरात, फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंद पवार, कार्याध्यक्ष श्रीकांत जाधव, सचिव ताराचंद मोरे, खजिनदार आसिफ पठाण आदी उपस्थित होते.

पेठे विद्यालयात अभिवादन

नाशिक : नाशिक एज्युकेशन सोसायटी संचालित रविवार कारंजा येथील पेठे विद्यालयात बुद्धपौर्णिमा साजरी करण्यात आली. याप्रसंगी गौतम बुद्धांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक तथा शिक्षक मंडळ अध्यक्ष लक्ष्मण जाधव होते तर मंचावर उपमुख्याध्यापक एकनाथ कडाळे, पर्यवेक्षिका कुंदा जोशी, शिक्षक प्रतिनिधी शशांक मदाने आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक लक्ष्मण जाधव यांनी आपल्या मनोगतातून बुद्धांच्या तत्वज्ञानाविषयी सांगितले.

(फोटो : पंकज चांडोले)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हवामानबदलामुळे घटली आंब्याची आवक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

यंदा हवामानातील बदलाचा आंबा पिकावर मोठा परिणाम झाला असल्याने आंब्याचे उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. एरव्ही दरवर्षी या सिझनमध्ये हजारो क्विंटल आंब्याची आवक होते. मात्र, आतापर्यंत नाशिकमध्ये अवघी ६१४ क्विंटल इतकाच आंबा आला आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील घाऊक बाजारात हापूस आंब्याला ११० ते २३० रुपये प्रति किलो असा भाव मिळत आहे. किरकोळ बाजारात या किमतीत ४० ते ६० रुपयांची भर पडत असल्याने ग्राहकांना दर्जानुसार १५० ते ३०० रुपये प्रति किलो या दरात हापूस खरेदी करावा लागत आहे.

आंब्याची आवक कमी असल्यामुळे दर वाढले आहेत. या वर्षी सुरवातीपासून आंबा पिक उत्पादन संकटात आहे. अती दव पडणे, कडाक्याचे ऊन यामुळे मोहोर मोठ्या प्रमाणात गळाला आहे. उष्णतेमुळे देठ वाळत असल्याने कैऱ्या गळून पडत आहेत. वाढलेली उष्णता व कातळ तापत असल्यामुळे जमिनीतील उष्णता वाढत आहे. यामुळे आंब्याची वाढ व दर्जा घसरत चालला आहे. आंबा उत्पादन कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च भरून काढणे अवघड झाले आहे. तसेच दुसऱ्या मोहोराचा आंबा अत्यंत कमी असल्यामुळे आंब्याची आवक कमी झाली आहे. आंब्याच्या कमरतेमुळे स्थानिक बाजारात चांगला भाव मिळत आहे.

आंब्याची गोडी कमीच

हापूस परवडत नसलेल्या ग्राहकांना केशर, लालबाग आदींचा पर्याय असला तरी या आंब्यांचीही आवक कमी प्रमाणात आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या आंब्यांना फारशी गोडी नसल्याचे ग्राहक सांगत आहेत. बाजार समितीच्या घाऊक बाजारात केशर ७५ ते १३० आणि लालबाग ४५ ते ८० रुपये प्रतिकिलो या दरात विकला गेला. किरकोळ बाजारात या किमतीत वाढ होत आहे. आंब्याची गोडी कमी आणि वाढलेल्या दरांमुळे आंब्याची खरेदी करण्याकडे ग्राहकही कानाडोळा करीत असल्याचे विक्रेते सांगतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सातपूरला प्लास्टिक जप्त

$
0
0

सातपूर : राज्य सरकारने प्लास्टिक वापरावर बंदी केली आहे. शहरात प्लास्टिकचा वापर टाळावा यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून जोरदार मोहिम हाती घेण्यात आली आहे. दरम्यान, काही विक्रेत्यांकडून प्लास्टिकचा वापर केला जात असल्याने महापालिकेच्या सातपूर आरोग्य विभागाकडून जप्ती मोहीम राबविण्यात आली. मोहिमेत प्रभारी स्वच्छता निरिक्षक माधुरी तांबे, चिंतामण पवार यासह कर्मचारी सहभागी झाले. नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बस दरीत कोसळून तिघांचा मृत्यू

$
0
0

नाशिक :

सुरगाणा तालुक्यात बोरगावजवळ गायदरी घाटात बस दरीत कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाला असून २५ ते ३० प्रवासी जखमी झाले आहेत. नवसारीहून सप्तश्रृंग गडावर जात असलेल्या या बसच्या चालकाचा ताबा सुटल्याने ती थेट दरीत जाऊन कोसळली. या अपघातातील मृतांमध्ये दोन महिला आणि एका ४ वर्षाच्या चिमुरड्याचा समावेश आहे.

हिर ट्रॅव्हल्सची ही लक्झरी बस नवसारी येथून सप्तश्रृंग गडावर जात होती. पहाटे दोनच्या सुमारास सापुतारा रस्त्यावर सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथे घायधरी घाटात बसचा ब्रेक फेल झाला आणि चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. सुरगाणा पोलीस स्थानकातील अधिकारी पेट्रोलिंगसाठी गेल्यावर त्यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर त्वरीत बसमधील रुग्णांना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी हलविण्यात आले.

दरम्यान, बसचालक जयमिन शंकरभाई पटेल याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१०३ गावांची तहान भागतेय टँकरवर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

उन्हाचा पारा जसजसा वर चढत आहे तसतसे ग्रामीण भागात पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले आहेत. जिल्ह्यातील पाणीटंचाई असलेल्या १३२ गाव व वाड्या वस्त्यांची ११ तपासणी पथकांद्वारे पडताळणी करण्यात आली असून, त्यानुसार पाण्याची आवश्यकता असलेल्या ७ तालुक्यामधील ६६ गावे व ३७ वाड्या अशा एकूण १०३ गावे, वाड्या, वस्त्यांना ३६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली.

खरीप हंगामाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रस्तावित व मंजूर गावातील पाणी टंचाईबाबत तपासणी पथक समित्या नेमून पडताळणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी तहसीलदार, गट विकास अधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन याबाबत सूचना दिल्या. तसेच पडताळणीसाठी तहसीलदार, गट विकास अधिकारी, उप अभियंता लघु पाटबंधारे विभाग, उप अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा व भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांचे एकूण ११ तपासणी पथक तयार करून प्रस्तावित व मंजूर टंचाईग्रस्त गावांची प्रत्यक्ष पाहणी करून पाहणी अहवाल जिल्हा परिषदेकडे सादर करण्याचे निर्देश दिले. मंजूर ५५ गाव व ४२ वाड्या असे एकूण ९७ तर प्रस्तावित २० गाव व १५ वाड्या असे एकूण १३२ गावे, वाड्या, वस्त्यांची पडताळणी समितीने तपासणी केली. तपासणी पथकाच्या पाहणी अहवालानुसार मंजूर व प्रस्तावित टंचाईग्रस्त गावांमधील ४ गाव वगळता इतर सर्व गाव व वस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार जिल्ह्यात सध्यस्थितीत ७ तालुक्यातील ६६ गावे व ३७ वाड्या अशा एकूण १०३ गावे, वाड्या-वस्त्यांना ३६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. टंचाईने बिकट स्वरुप धारण केल्यास प्रशासनाने उपाययोजनांचे नियोजन केले असून, प्रत्येक टंचाईग्रस्त गावाला पाणी पुरविण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्त्रीचा नकार मनापासून हवा

$
0
0

वसंत व्याख्यानमाला : नाशिकरोड

मृणाल कुलकर्णी यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

प्रगत देशात स्त्री-पुरुष एकत्र काम करतात. तेथे 'कास्टिंग काउच'ची (स्त्रीचे शोषण) शक्यता असतेच. टाळी एका हाताने वाजत नाही. स्त्रीही यात काही प्रमाणात दोषी असते. स्त्री स्वतःला कसे सादर करते, परिस्थितीला कशी तोंड देते, यावर बरेच अवलंबून असते. स्त्रीचा नकार हा मनापासून असेल व ती कणखर असेल तर तिच्या मनाविरुद्ध कोणीही काहीही करू शकत नाही, असे स्पष्ट मत प्रसिद्ध अभिनेत्री तथा दिग्दर्शक मृणाल कुलकर्णी यांनी येथे व्यक्त केले.

नाशिकरोड बँकेच्या वसंत व्याख्यानमालेचे पहिले पुष्प कुलकर्णी यांच्या दिलखुलास गप्पांनी रंगले. रेडिओ जॉकी भूषण मटकरी यांनी तिची मुलाखत घेतली. बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड, महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक शैलेन्द्र तनपुरे, बँकेचे संचालक निवृत्ती अरिंगळे, बाबा सदाफुले, अशोक सातभाई, डॉ. प्रशांत भुतडा, वसंत अरिंगळे, सुधाकर जाधव, अशोक चोरडिया, दंडे ज्वेलर्सचे मिलिंद दंडे, मसापचे कार्याध्यक्ष उन्मेष गायधनी, दातार जेनेटिक्सचे बाबा दातार यांची प्रमुख उपस्थिती होती.

राजकारण, चित्रपट क्षेत्रात झटपट यशासाठी कास्टिंग काउचचा शॉर्टकट अवलंबला जातो. तुमच्यावर कधी अशी वेळ आली का, या प्रश्नावर कुलकर्णी यांनी 'कधीच नाही', असे उत्तर दिले. त्या म्हणाल्या, की प्रतिभा, जिद्द असेल तर यश स्वतःहून चालत येते. कास्टिंग काउचचा घृणास्पद प्रकार सर्वच क्षेत्रात दिसून येतो. त्यावर मात केली पाहिजे.

स्वामी मालिकेत रमाची भूमिका केली तेव्हा मी दहावीत होते. स्त्रीच्या प्रगतीमध्ये कुटुंबीयांची साथ महत्त्वाची असते मला ती लाभली म्हणूनच मी अभिनयात यशस्वी झाले. अभिनेता संजय खान यांनी 'द ग्रेट मराठा'साठी भूमिकेचा आग्रह केल्यामुळेच मला अभिनयासाठी अधिक प्रेरणा मिळाली. संसारी स्त्रीने करिअर करताना निकष व अंकुश यांची निवड योग करायला हवी. कलाकाराला स्थैर्यासाठी पुरस्काराची गरज असते. त्यामुळे जबाबदारीची जाणीव होते. पण त्यामुळे हुरळून जाऊ नये, असेही त्या म्हणाल्या.

दिग्दर्शन अधिक आवडते!

अभिनयापेक्षा दिग्दर्शनाचा रोल करणे मला जास्त आवडते, असे सांगून आजवरच्या भूमिकांमध्ये जिजाऊंची भूमिका सर्वात जास्त भावल्याचे त्यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, की जिजाऊंनी बाल शिवाजीवर सतत स्वराज्याचा विचार बिंबवला म्हणून छत्रपती साकारले. स्वराज्य साकारले. मुलांवर तुम्ही काय संस्कार करतात यावर त्यांची व समाजाची जडणघडण ठरते. स्त्रीच्या नजरेतून इतिहास पाहिला जात नाही. त्यांच्या भावना प्रतिबिंबित होत नाहीत. नागरिकांना फक्त इतिहासाच्या वादातच रस असतो. पुरुष घर विकत घेतो. मात्र, स्त्री घर वसवते. पण तिचे नाव कधीच लावले जात नाही. स्त्रीने आपल्या स्वप्नांचे स्मशान होणे स्वत:च टाळले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुखोईचे यशस्वी उड्डाण

$
0
0

देखभाल, दुरुस्ती यशस्वी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देखभाल आणि दुरुस्ती केल्यानंतर सज्ज झालेल्या पहिल्या सुखोई विमानाची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. भारतीय वायू सेनेच्या ओझर येथील डेपोमध्ये हे उड्डाण यशस्वी झाले आहे. त्यामुळे सुखोई या लढाऊ विमानाच्या बाबतीत ही ऐतिहासिक बाब ठरली आहे.

ओझर येथील हिन्दुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये (एचएएल) सुखोई, मिग या लढाऊ विमानांचे उत्पादन केले जाते. रशियाबरोबर भारत सरकारने करार करून या विमानांची निर्मिती केली गेली. आता सुखोई विमानाचे उत्पादन बंद करण्यात आले आहे. त्यामुळेच भारतीय वायू सेनेच्या ओझर येथील ११ बेस डेपोमध्ये सुखोई ७, मिग २१ आणि मिग २३ या लढाऊ विमानांची देखभाल आणि दुरुस्ती केली जाते. प्रसंगी विमानांचे अपग्रेडेशनही केले जाते. सुखोई ३० हे विमान देखभाल आणि दुरुस्तीसाठी डेपोमध्ये दाखल झाले होते. या डेपोमध्ये विमान पूर्णपणे खोलून त्याचा प्रत्येक सुटा भाग तपासला जातो. प्रसंगी नवा भाग लावला जातो. तर, नव्या आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा विचार करून या विमानाचे अपग्रेडेशनही केले जाते. त्यानुसार डेपोमध्ये प्रथमच सुखोई ३० या विमानाची देखभाल, दुरुस्ती तसेच अपग्रेडेशन करण्यात आले. त्यानंतर गेल्या २४ एप्रिलला या पहिल्या सुखोई ३० विमानाचे उड्डाण घेण्यात आले. ते यशस्वी ठरले. ग्रुप कॅप्टन एन दासगुप्ता आणि विंग कमांडर पी. नायर यांनी हे उड्डाण केले. या यशाबद्दल ओझरच्या हवाई दल केंद्राचे एअर कमोडोर समीर बोराडे (विशिष्ट सेवा मेडल) यांनी सुखोई ३० प्रोजेक्टचे टीम लीडर ग्रुप कॅप्टन आर. के. भाटला यांचे अभिनंदन केले. मुख्य हवाई विमान अधिकारी ग्रुप कॅप्टन वीआरएस राजू व अन्य वरिष्ठ अधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती.

शुभवार्ता ..... फोटो पान एकवरून घ्यायचा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वामी स्वरूपानंदांच्या प्रवचनमालेस सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वेदांत तत्वज्ञानाचे प्रसिद्ध भाष्यकार आणि पुण्याच्या श्रृतिसागर आश्रमाचे आचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांची गीतेवरील व्याख्यानमालेस बुधवारपासून सुरुवात झाली आहे.

नाशिकरोड परिसरातील के. जे. मेहता हायस्कूलच्या शोबेंदू सभागृहात ८ मेपर्यंत दररोज सायंकाळी ६.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत मराठीतून ही प्रवचनमाला होणार आहे. 'दैनंदिन जीवनात गीतेचे महत्त्व' हा त्यांच्या निरुपणाचा विषय आहे. तंत्रज्ञान आणि समाज माध्यमांचा वाढता वापर दैनंदिन जीवनासाठी आवश्यक आहे. मात्र, त्यांच्या अतिवापरामुळे तरुण पिढी तणावग्रस्त बनली आहे. दुसरीकडे, सत्य आणि असत्य यामध्ये भेद न करता आल्यामुळे प्रौढ पिढी संभ्रमात सापडली आहे. या गोंधळातून बाहेर पडण्यासाठी श्रीकृष्णाने प्रतिपादन केलेली गीता आजही आवश्यक आणि उपयोगी आहे. गीता देवघरात ठेवण्यासाठी नाही तर जीवनात उतरवण्यासाठी आहे हा विचार विज्ञानाच्या आधारे स्वामी स्वरूपानंद विषद करणार आहेत. या व्याख्यानांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्र्यंबकेश्वर येथील शिवशक्ती ज्ञानपीठ आणि निमंत्रक समीर करंदीकर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शनिवारी पाणी नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक मनपाच्या पंपींग स्टेशन येथील विद्युत पुरवठा करणाऱ्या एक्सप्रेस फिडरची दुरुस्ती करण्यात येणार असल्याने महावितरणकडून ५ मे रोजी विद्युत पुरवठा होणार नाही. त्यामुळे शनिवारी पूर्ण दिवस पाणीपुरवठा होणार नाही. रविवारी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

महावितरणकडून शनिवार ५ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ दरम्यान वीज पुरवठा बंद राहणार असल्याने त्या वेळेत गंगापूर डॅम पंपिंग स्टेशन व चेहेडी पंपिंग स्टेशन येथून पंपिंग होणार नाही. त्यामुळे ५ मे रोजी संपूर्ण शहराचा सकाळी ९ वाजेनंतरचा व सायंकाळचा पाणी पुरवठा होणार नाही. ६ मे रोजी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने व कमी प्रमाणात होईल, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राजदरेवाडीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

पाणी फाउंडेशनच्या वॉटर कपस्पर्धेसाठी चांदवड तालुकावासीय सज्ज झाले आहेत. मंगळवारी 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील राधिका उर्फ अनिता दाते हिने तालुक्यातील राजदेरवाडी येथे येऊन श्रमदानात उत्स्फूर्त सहभाग घेतला. विशेष म्हणजे प्रांत अधिकाऱ्यांसह सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी ग्रामस्थ श्रमदानात सहभागी झाले होते. प्रांत सिद्धार्थ भंडारे यांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. वॉटर कप स्पर्धेत चांदवड तालुक्यातील ४९ गावांचा समावेश आहे. आतापर्यंत तालुक्यात श्रमदानातून ५००० मिटर सीसीटीचे काम पूर्ण झाल्याची माहिती भंडारे यांनी दिली.

चांदवड तालुक्यात आजवर झालेल्या श्रमदानात नाशिकचे जिल्हाधिकारी सहकुटुंब सहभागी झाले. आमदार राहुल आहेर यांनीही आपला सहभाग नोंदवला आहे. या कार्याला मदत म्हणून भारतीय जैन संघटनेतर्फे प्रत्येक गावाला जेसीबी मशिन देण्यात येत आहे. या मशिनला डिझेलसाठी सरकारने दीड लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. 'माझ्या नवऱ्याची बायको'मधील राधिकाने राजदेरवाडी येथे श्रमदानात भाग घेतला. चांदवड सारख्या दुष्काळी तालुक्यात वॉटर कपसाठी धडाडीने काम सुरू असल्याचा आनंद वाटल्याचे तिने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकचे मुंबईत ब्रँडिंग

$
0
0

निमा इंडेक्सचे आज उद्घाटन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

निमातर्फे आयोजित होत असलेल्या 'निमा इंडेक्स २०१८' या औद्योगिक प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा गुरुवारी (दि. ३) बॉम्बे एक्झिबिशन सेंटर, गोरेगाव येथे मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे. पहिल्यांदाच नाशिक बाहेर घेण्यात आलेले हे प्रदर्शन ५ मेपर्यंत असणार आहे. या प्रदर्शनाची बुधवारी पूर्ण तयारी झाली असून उद्योगजगतात प्रदर्शनाबद्दल उत्सुकता आहे. प्रथमच हे प्रदर्शन नाशिकबाहेर होत आहे.

या प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा ३ मे रोजी उद्योग मंत्रालयाचे प्रधान सचिव सुनील पोरवाल यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यास उद्योग विभागाचे सचिव हर्षदीप कांबळे, सचिव, एमआयडीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी हे उपस्थित राहणार आहे. सर्वच श्रेणीतील उद्योगांना 'निमा इंडेक्स २०१८'द्वारे व्यवसायवाढीची संधी उपलब्ध होणार असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या उत्पादन व सेवांच्या ब्रँडिंगसाठी मंच उपलब्ध होणार असल्याचे निमातर्फे सांगण्यात आले. केवळ स्टॉलच उपलब्ध करून न देता लघुउद्योजकांना ब्रँडिंगचे इतरही अनेक पर्याय उपलब्ध करून देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रमुख कंपन्याचे स्टॉल

एचएएल, बॉश, मोटवाने मॅन्युफॅक्चरिंग, टपारिया टूल्स, जिंदाल सॉ, आनंद (आय) पॉवर इंडिया, सिंग्नेचर फुड्स टीडीके इप्कॉस, अशोका बिल्डकॉन, एम्पायर स्पायसेस ॲण्ड फूड्स, एमएसएल ड्राइव्हलाइन, इंडियन रेल्वे, गोगटे इलेक्ट्रो सिस्टम्स् अशा बड्या उद्योगांनी स्टॉल्सद्वारे आपला सहभाग नोंदविला आहे. तसेच अनेक उद्योगांचेही स्टॉल असणार आहे.

नवसंजीवनी देणारे प्रदर्शन

निमा इंडेक्स २०१८ हे औद्योगिक प्रदर्शन नाशिकच्या औद्योगिक विषयाला नवसंजीवनी देणारे ठरेल, असा विश्वास निमा अध्यक्ष मंगेश पाटणकर, मानद सरचिटणीस श्रीकांत बच्छाव, उपाध्यक्ष उदय खरोटे, खजिनदार हर्षद ब्राह्मणकर, सचिव ज्ञानेश्वर गोपाळे, नितीन वागस्कर व निमा इंडेक्सचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी व कार्यकारिणीने व्यक्त केला आहे.

'बीटूबी' चर्चेवर भर

प्रदर्शनात बीटूबी (बिझनेस टू बिझनेस ) मिटींगवर अधिक भर देण्यात येणार आहे जेणे करून सहभागी स्टॉलधारकांना उद्योगवाढीच्या उत्तम संधी भविष्यात उपलब्ध होती. भारत इलेक्ट्रिकल्स, भारत अर्थमुव्हर्स, गोवा शिपयार्ड, गार्डन रिच शिपबिल्डर्स, हिन्दुस्थान ॲरोनॉटिक्स, मिश्रधातू निगम, इंडियन रेल्वे, मोठे उद्योग समूह व बहुराष्ट्रीय उद्योग समूह श्रेणीतील कंपन्यांनी बीटूबी पार्टनर म्हणून आपला सहभाग दर्शविला आहे.

लोगो : नाशिक रायझिंग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातबारा ऑनलाइन

$
0
0

चौथ्यांचा मुदतवाढ

ऑनलाइन सातबारा लक्ष्य गाठण्यात प्रशासनाला अपयश

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

डिजिटल इंडियाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व गावांमधील शेतकऱ्यांच्या शेतजमिनींचे सातबारा उतारा ऑनलाइन करण्यासाठी राज्य सरकारने दिलेली १ मे रोजीची अंतिम मुदत पाळण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. नाशिक विभागातील ६ हजार ६३६ पैकी ६ हजार ३३० इतक्या म्हणजेच ९५.३९ टक्के गावांमधील सातबारा उताऱ्यांचे रि-एडिटचे काम पूर्ण होऊन अंतिम प्रमाणपत्र पूर्ण करणे शक्य झालेले आहे. अद्यापही ३०३ गावांमधील ऑनलाइन सातबारा रखडला आहे. या कामासाठी राज्य सरकारने चौथ्यांदा मुदतवाढ दिली होती.

डिजिटल इंडियाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या महसूल खात्याने राज्यातील सर्व गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनीचे सातबारा उतारे ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचे गेल्या वर्षी जाहीर केले होते. यापूर्वी २०१७ मधील स्वातंत्र्य दिनापर्यंत राज्यातील सर्व गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनीचे सातबारा उतारे ऑनलाइन होणे अपेक्षित होते. मात्र, या कामात प्रशासन अपयशी ठरले होते. त्यानंतर एक मे रोजी ऑनलाइन सातबारा उपलब्ध करून देण्याचे आदेश राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. परंतु, नाशिक जिल्ह्यात ११ तर विभागात अद्यापही ५ टक्के गावांमधील ऑनलाइन सातबाराचे काम बाकी आहे. यात तांत्रिक अडसर मोठ्या प्रमाणात असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे संगणकीय सातबारा उतारा ऑनलाइन उपलब्ध करून देण्याची प्रशासनाला चौथ्यांदा देण्यात आलेली डेडलाइन पुन्हा हुकली आहे. सातबारा संगणकीकरणाच्या कामात सर्व्हर डाउन होणे आणि रि-एडिटचे अपूर्ण काम यासारख्या अडचणीं जिल्हा प्रशासनाकडून पुढे केल्या गेल्या आहेत.

नाशिक पिछाडीवर

विभागात नगर जिल्ह्यातील सर्व १६०२ गावांचे रि-एडिटचे काम पूर्ण झाल्याने सर्व गावांचे अंतिम प्रमाणपत्र पूर्ण झाले आहे. मात्र, नाशिक जिल्ह्यात हेच काम ८८.६६ इतकेच पूर्ण झाल्याने नाशिक पिछाडीवर आहे. उर्वरित नंदुरबार, जळगाव आणि धुळे या तिन्ही जिल्ह्यांतही ऑनलाइन सातबाराचे उद्दिष्ट्य स्थानिक प्रशासनाला पेलवलेले नाही.

ऑनलाइन सातबाराची नाशिक विभागातील प्रगती

जिल्हा...........गावांची संख्या...........खाता प्रोसेसिंग पूर्ण गावे...........अंतिम प्रमाणपत्र पूर्ण गावे...........टक्केवारी

नाशिक...........१,९६७......................१,८८६.................................१,७४४......................८८.६६

धुळे...............६७८...........................६७४.....................................६५०......................९५.८७

नंदुरबार...........८८७..........................८८५.....................................८८१......................९९.४४

जळगाव...........१,५०३......................१,४९४.................................१,४५३......................९६.६७

नगर...............१,६०२......................१,६०२.................................१,६०२......................१००.००

एकूण.............६,६३७.......................६,५४१.................................६,३३०......................९५.३९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिजिटल स्वाक्षरीबाबत जिल्हा प्रशासनच उदासीन

$
0
0

नवनाथ वाघचौरे, नाशिकरोड

विभागातील जिल्हा प्रशासनांच्या अकार्यक्षमता आणि नकारात्मकतेच्या चक्रव्यूहात ऑनलाइन सातबारा सारखी राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना फसल्याचे उघड झाले आहे. विभागातील ५४ पैकी तब्बल २४ तालुक्यांतील अद्याप एकाही सातबारा उताऱ्यावर डिजिटल स्वाक्षरी झालेली नाही. तसेच उर्वरित ३० तालुक्यांतही अवघ्या १ लाख १३ हजार ८३८ सातबाऱ्यांवर डिजिटल स्वाक्षरी झाल्या. यात सर्वात जास्त नगर जिल्ह्यातील सातबारा उताऱ्यांचा समावेश असून धुळे जिल्हा प्रशासनापर्यंत तर या योजनेचे वारेही पोहचलेले नसल्याचे उघड झाले आहे.

जिल्हा प्रशासनांच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्र दिनी ऑनलाइन सातबारा उतारा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन राज्य सरकार पूर्ण करू न शकल्याने सरकार तोंडघशी पडले आहे. डिजिटल स्वाक्षरीच्या कामास प्रत्यक्षात ५४ पैकी ३० तालुक्यांमध्ये श्रीगणेशा झाला. उर्वरित २४ तालुक्यांतील प्रशासनाला अद्यापही डिजिटल स्वाक्षरीच्या कामाला मुहूर्त सापडलेला नाही. परिणामी सरकारला डिजिटल सातबाऱ्यांचे आश्वासन पाळता आलेले नाही. गेल्या वर्षी सर्व गावांतील सातबारा उताऱ्यांची माहितीचे संगणकीकरण करण्यात आले होते. हा डाटा शासनाच्या सर्व्हरवर अपलोड करण्यात आला. त्यानंतर मे २०१७ मध्ये पुन्हा एकदा चावडी वाचन घेऊन रि-एडिटचे काम झाले. रि-एडिटचे काम शंभर टक्के झाल्याशिवाय संबंधित तालुक्याचे प्रख्यापन होत नाही. एखाद्या तालुक्याचे प्रख्यापन होत नाही तोपर्यंत डिजिटल स्वाक्षरीही होत नाही. आतापर्यंत विभागातील ५४ पैकी अवघ्या ३० तालुक्यांचेच प्रख्यापन झाले असून यात नगर जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यांचा समावेश आहे. स्थानिक जिल्हा प्रशासनाने या कामाकडे दुर्लक्ष केल्यानेच हे काम रेंगाळले आहे. जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करित असल्याने विभागीय आयुक्त कार्यालयानेही या कामाचा आढावा घेण्यास टाळाटाळ केली आहे.

डिजिटल स्वाक्षरी काम सुरू न झालेले तालुके

- नाशिक जिल्हा : निफाड, येवला, सिन्नर, नांदगाव, नाशिक, मालेगाव, इगतपुरी, सटाणा

- धुळे जिल्हा : शिंदखेडा, धुळे, शिरपूर, साक्री

- जळगाव जिल्हा : चोपडा, अमळनेर, चाळीसगाव, पाचोरा, पारोळा, मुक्ताईनगर, भुसावळ, जळगाव, जामनेर, धरणगाव

- नंदुरबार : शहादा, नंदुरबार अ

नाशिक जिल्ह्यातील डिजिटल स्वाक्षरीबाबतची स्थिती

तालुका...........एकूण सातबारा...........डिजिटल स्वाक्षरी झालेली सातबारा संख्या

देवळा.............४०,२९७......................१,६०२

त्र्यंबकेश्वर........३४,८०५......................१,५८५

चांदवड...........७८,९८८......................८८०

दिंडोरी...........६४,८५०......................४५५

कळवण...........४३,८९५......................४३८

सुरगाणा...........२९,०९९......................३०७

पेठ...............१९,२६८......................९८

एकूण...........३,११,२०२....................५,३६५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बस, रेल्वे ओव्हरफ्लो

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लग्नसराई व शाळांना सुट्या असल्यामुळे रेल्वेस्टेशन व बस स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढली आहे. एसटीने व रेल्वेने जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले असले तरी एकाच वेळी होणाऱ्या या गर्दीमुळे ते कोलमडले आहे. रेल्वेच्या आरक्षित डब्यांतही प्रवाशांची संख्या वाढली आहे. एसटीमध्ये अनेक प्रवशांना उभे राहूनच प्रवास करावा लागत आहे.

नवीन सीबीएस, महामार्ग बस स्थानक, जुने सीबीएस, नाशिकरोड बस स्थानकावर प्रवाशांची बुधवार मोठी वर्दळ होती. नाशिक रेल्वे स्थानकावरही या गर्दीत परराज्यांतून कामानिमित्त आलेल्या कामगारांची संख्या मोठी होती. रेल्वेसाठी अनेकांनी अगोदरच आरक्षण केलेले असले, तरी या गर्दीतून आपला डबा शोधण्यासाठी त्यांची दमछाक होत आहे. त्यात उन्हाच्या झळा व प्रवासातील गर्दी यामुळे प्रवाशांना त्याचा त्रासही सहन करावा लागत आहे. एसटीने जिल्ह्यातून सुरुवातीला ९८ जादा बसेसचे नियोजन केले आहे. त्यात गर्दीचे प्रमाण पाहून वाढ केली जाणार आहे. एसटीने अनेक ठिकाणी शिवशाही बस सुरू केल्या असून, त्यालाही चांगला प्रतिसाद आहे. त्याचप्रमाणे एसटीच्या नियमित गाड्यांनाही मोठी गर्दी आहे. नाशिकहून पुणे, नंदूरबार, शिर्डी, त्र्यंबकेश्वर, कसारा, सप्तशृंगी गड, अहमदनगर येथे जादा गाड्या सोडल्या जात आहे.

नाशिकरोडहून जादा बस

नाशिकरोड बसस्थानक प्रमुख नानाजी गायकवाड यांनी सांगितले की, नाशिकरोडहून दररोज ३५ ते ४० हजार प्रवासी प्रवास करतात. येथून दररोज ५९६ सिटी बस तर ३७५ एसटी बस धावतात. सध्या गर्दी वाढल्यामुळे दीडशे जादा बस सोडण्यात आल्या आहेत. पुणे, नगर, कोपरगाव, शिर्डीसाठी दर पंधरा मिनिटाला बस आहे. त्यामध्ये शिवशाहीचा समावेश आहे. तरीही जागा मिळत नसल्याने काही प्रवाशांना सीबीएसला जावे लागत आहे. नाशिकरोड स्थानकात १९ कर्मचारी आहेत. ते तत्पर व विनम्र सेवा देतात. मात्र, गर्दी वाढल्याने त्यांच्या नाकी नऊ आले आहेत.

खासगी वाहनांकडून लूट

प्रवाशांची गर्दी वाढल्यामुळे खासगी बसचालकांनी दर दुप्पट केले आहेत. नाशिक-पुणे या २२० किलोमीटर प्रवासासाठी साध्या बसचे भाडे २१६, एशियाडचे ३१६ तर शिवशाहीचे ३४६ रुपये आहे. खासगी बसचालक याच प्रवासासाठी ७०० ते हजार रुपये भाडे आकारून लूट करीत आहेत. सरकारने अशा वाहतूकदारांवर बंदीची घोषणा केली असली तरी कारवाई होत नसल्याने खुलेआम लूट सुरूच आहे. कारवाई झाली तर एसटीचा महसूल वाढेल व तोटा कमी होईल.

डाऊन रेल्वेला गर्दी

नाशिकरोड रेल्वे स्टेशनमध्ये सर्वच रेल्वेगाड्यांना प्रचंड गर्दी आहे. गाडीत प्रवेश करणेही मुश्किल झाले आहे. मुंबईहून जाणाऱ्या (अप) गाड्यांमधून प्रवास करणे सोपे आहे, पण मुंबईहून येणाऱ्या (डाऊन) गाड्यांमधून प्रवास करणे दिव्य झाले आहे. तपोवन, वाशी, भागलपूर, पुष्पक, मुंबई-भुसावळ पॅसेंजर आदी गाड्या मुंबईहूनच खचाखच भरून येत आहेत. मुंबईला जाणाऱ्या व तेथून येणाऱ्या गाड्या सकाळीच असतात. दुपारी बारा ते साडेतीनपर्यंत एकही गाडी नसते. या काळात रेल्वेने गाड्या सोडल्या तर महसूलही वाढेल आणि प्रवाशांचेही हाल टळतील.

रिझर्व्हेशनला गर्दी

नाशिकरोड रेल्वे रिझर्वेशन विभागप्रमुख विजय तिवडे यांनी सांगितले की, उत्तर प्रदेश, बिहारसारख्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना गर्दी आहे. २० मेपर्यंत तत्काळ खिडकीवर गर्दी राहणार आहे. बुद्ध पोर्णिमेसह सलग चार दिवस सुटी असल्याने या काळात तुफान गर्दी होती. सध्या नाशिकरोड स्थानकात तत्काळचे रोज ११५० रिझर्वेशन होत आहेत. देवळाली कॅम्प, नाशिक, आर्टिलरी सेंटर आदी ठिकाणीही रिझर्वेशसाठी गर्दी होत आहे.

महसूल वाढला

रेल्वे तिकिट बुकिंग विभागाचे प्रमुख एम. बी. डोके यांनी सांगितले की, गर्दीमुळे महसूल वाढला आहे. नाशिकरोड स्थानकातून दररोज सरासरी १६ हजार प्रवासी प्रवास करतात. उन्हाळ्यात ही संख्या २० हजारांपर्यंत जाते. २०१६-१७ मध्ये ५८ लाख प्रवाशांनी येथून प्रवास केला होता, तर २०१७-१८ या वर्षात ५९ लाख प्रवाशांनी येथून प्रवास केला. मार्च १७ अखेर २ लाख ८८,९५४ तिकिटे विकली, तर मार्च २०१८ अखेर २ लाख ९१, ९८७ तिकिटे विकली गेली. २०१७-१८ चा नाशिकरोड स्थानकाचा वर्षभराचा महसूल ४१९५.६४ लाख होता. त्याच्या गेल्या वर्षी हा आकडा ४१९१.४६ लाख होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images