Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

लिंगायत धर्माला मान्यता द्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

उत्तर महाराष्ट्र लिंगायत संघर्ष समितीतर्फे रविवारी नाशिकरोडला महामोर्चा काढण्यात आला. लिंगायतांना स्वतंत्र धर्माचा दर्जा व आरक्षण मिळावे या मागणीसाठी निघालेल्या या मोर्चात मोठ्या प्रमाणावर समाजबांधव सहभागी झाले होते.

नाशिकरोड येथील पासपोर्ट कार्यालयाजवळ सकाळी दहा वाजता सर्व समाजबांधव जमले. त्यात युवा वर्गाचा तसेच महिलांचा सहभाग लक्षणीय होता. लिंगायत संघर्ष समितीमधील ओमप्रकाश तथा काका दादाप्पा कोयटे, सुनील रुकारी, सरला पाटील, राजाभाऊ मुंढे, चंद्रशेखर दंदणे, अनिल चौघुले, वसंत नगरकर, शैला तोडकर, अनंत दंदणे, प्रमोद वरुळे, संदीप झारेकर, नाना वाळेकर, मोहन ओढे आदी मान्यवरांनी मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन केले. साडेबाराच्या सुमारास विभागीय आयुक्त कार्यालयावर महामोर्चा निघाला. 'एक लिंगायत, कोटी लिंगायत', 'लिंगायत एक अवैदिक धर्म', 'लिंगायत धर्म, स्वतंत्र धर्म' अशा घोषणा देत महसूल कार्यालयाजवळ आला. लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माचा दर्जा व आरक्षण लवकर मिळावे, या मागणीचे निवेदन महसूल उपायुक्त संदीप माळोदे यांच्याकडे समितीने दिले.

अतिरिक्त पोलिस बंदोबस्त

महामोर्चा निघणार असल्याने पोलिस प्रशासनाने अतिरिक्त पोलिसदल नियुक्त केले होते. महामोर्चापासून ते विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात पोलिस तैनात करण्यात आले होते. मोर्चासाठी नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, नगरसह इतर जिल्ह्यांतून समाजबांधव सहभागी झाले होते. 'लिंगायत धर्मास स्वतंत्र धर्माची मान्यता मिळावी', 'समता नायक महात्मा बसवेश्वरांचा विजय असो' असे फलक त्यांच्या हातात होते. महामोर्चातील अनेक महिलांनी एक सारख्या साड्या परिधान केल्या होत्या. 'मी लिंगायत, माझा धर्म लिंगायत' अशी टोपी पुरुषांनी परिधान केली होती. हातात 'लिंगायत धर्म, स्वतंत्र धर्म' असे लिहिलेले ध्वज हातात धरले होते.

.. तर 'करो या मरो' आंदोलन

समितीचे ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे म्हणाले की, लिंगायत धर्मास स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता व आरक्षण मिळावे यासाठी लिंगायत संघर्ष समिती २०१४ पासून संघर्ष करीत आहे. शासनाला मागण्यांचे निवेदने दिली आहेत. मुख्यमंत्र्यांचा ई-मेल जाम, बेमुदत उपोषण, रास्ता रोको आंदोलने केली. मात्र प्रश्न सुटलेला नाही. देशभर हा लढा सुरू आहे. ९ ऑगस्ट या क्रांतिदिनापर्यंत लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माची मान्यता व आरक्षण न मिळाल्यास संघर्ष समितीच्या वतीने 'करो वा मरो' आंदोलन केले जाईल.

शिस्तीचे प्रदर्शन

या महामोर्चामुळे जेलरोडमार्गे नाशिकरोडला येणारी वाहने व नाशिक रोडकडून जेलरोडकडे जाणाऱ्या वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. बिटको पॉइंट येथे वाहतूक कोंडी झाली होती. तथापि, समाजबांधवांनी शिस्तीचे प्रदर्शन करीत वाहनांना वाट मोकळी करून दिली. पोलिसांनाही त्यांनी सहकार्य केल्याने वाहतूक त्वरीत सुरळीत झाली.

भोजन, पाण्याची व्यवस्था

महामोर्चात रखरखत्या उन्हात मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते. त्यांना ठिकठिकाणी थंड पाणी दिले जात होते. तसेच विभागीय आयुक्तालय रस्त्यावर मठ्ठ्याचे वाटप केले जात होते. महामोर्चाचा समारोप झाल्यानंतर मोर्चेकऱ्यांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खासगी बस भाडेवाढीवर अंकुश

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

उन्हाळी सुटी, दिवाळी किंवा गर्दीच्या काळात वाढणाऱ्या प्रवाशी संख्येचा फायदा घेऊन मनमर्जी भाडे वसूल करणाऱ्या खासगी कंत्राटी बसेसवर सरकारने अंकुश आणला आहे. यापुढे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसच्या जास्तीत जास्त ५० टक्के अधिक भाडे खासगी बस व्यवस्थापकांना घेता येणार असून, या नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्याचे आदेश राज्यातील पोलिस तसेच प्रादेशिक परिवहन विभागांना देण्यात आले आहेत.

राज्यात खासगी बसेसचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. गर्दीच्या काळात खासगी बस व्यवस्थापक ऐनवेळी अवाजवी भाडेवाढ करून प्रवाशांना जेरीस आणतात. या पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टात २०११ मध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. यात हायकोर्टाने खासगी परवानाधारक वाहनांचे भाडे निश्चित करण्याचे आदेश सरकारला दिले होते. यासंदर्भात सरकारने सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट (सीआयआरटी) या पुणे येथील केंद्र सरकारच्या संस्थेची नियुक्ती केली होती. संस्थेने वाहनाचा आकार तसेच सुविधा, देखभाल खर्च आदींचा विचार केला. तसेच या बसेसला टप्पा वाहतुकीचा अधिकार नसल्याने पूर्ण वाहनाचे प्रतिकिलोमीटर कमाल भाडे निश्चित केले. सरकारने त्यानुसार निर्णय जाहीर केला असून, यापुढे एसटी महामंडळाच्या बस भाड्याच्या ५० टक्क्यांहून अधिक रक्कम खासगी बस व्यवस्थापकांना घेता येणार नसल्याचे आदेश दिले आहेत. याबाबत सरकारने धोरण ठरविले असून, खासगी बस व्यवस्थापनाने सरासरी स्पर्धात्मक वाजवी भाडे आकारावे, गर्दीच्या हंगामात मागणी आणि पुरवठा यातील तफावतीमुळे मोठी भाडेवाढ करून प्रवाशांची पिळवणूक होणार नाही, याकडे लक्ष देण्याचे सूचित करण्यात आले आहे.

येथे करता येईल तक्रार

कंत्राटी बस परवानेधारकांकडून अधिक दराने आकारणी होत असल्यास प्रवाशांनी मोटार वाहन विभागाच्या ६२४२६६६६ या टोलफ्री क्रमाकांवर किंवा विभागाच्या www.transportcomplaints.mahaonline.gov.in या वेबसाइटवर तक्रार नोंदवावी. तक्रारीच्या संदर्भाने तसेच उचित चौकशीअंती कंत्राटी बस परवानाधारकांच्या परवान्यावर निलंबनाची/रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

या प्रकरणी प्रादेशिक परिवहन विभागाने काही पथकांची नियुक्ती केली असून, बसदर निर्णयाचे संबंधितांनी पालन करावे. या आदेशाचे उल्लंघन होत असल्यास प्रवाशांना वरील ठिकाणी तक्रार नोंदवण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

- भरत कळसकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी

सेवेचा प्रकार-रा. प. भाडेप्रतिटप्पा-आसन क्षमता-प्रतिबस/प्रतिकिमीभाडे-खासगीबस कमालभाडे

अवातानुकूलीत

साधी-६.३०-४४-४६.२०-६९.३०

निमआराम-८.६०-३९-५५.९०-८३.८५

वातानुकूलीत

शिवशाही-८.९५-४४-६५.६४-९८.४६

स्लिपर-१२.८८-३०-६४.४०-९६.६०

शिवनेरी-१५.८०-४३-११३.२४-१६९.८६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साखरेच्या पाकात पडून बालिकेचा मृत्यू

$
0
0

म.टा. वृत्तसेवा, पंचवटी

खेळता खेळता पाय घसरून साखरेच्या उकळत्या पाकात अडीच वर्षाची बालिका पडून ९० टक्के भाजल्याची घटना रविवारी(दि.२९) अमृतधाम परिसरात घडली. तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

स्वरा प्रवीण शिरोडे (रा.साईनाथ रो हाऊस, कालिकानगर, अमृतधाम) असे या बालिकेचे नाव आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पंचवटी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद दाखल करण्याचे काम सुरू होते. रविवारी सकाळी आठच्या सुमारास स्वरा चे वडील गुलाबजाम बनविण्यासाठी साखरेचा पाक करीत होते. त्याच वेळी स्वरा खेळत असताना फरशीवर पाय घसरून उकळत्या पाकात पडली.

कुटुंबीयांनी तिला जुना आडगाव नाक्यावरील सदगुरु हॉस्पिटलमध्ये सकाळी दहा वाजता दाखल केले. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. उपचारात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप शिरोडे कुटुंबीयांनी केला असून, संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केल्याचं वृत्त आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्या आठवणीने अजूनही शहारते 'विजयानंद'

$
0
0

ही घटना १९१३ सालची. चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या 'राजा हरिश्चंद्र' या पहिल्या मूकपटाद्वारे भारतीय चित्रपटाची मुहूर्तमेढ रोवली. या घटनेला आता १०५ वर्षे झाली आहेत. हा चित्रपट नाशिकला सर्वप्रथम दाखवला गेला होता तो 'विजयानंद' मध्ये. त्या वेळी अमावस्येच्या रात्री चेटूक करता म्हणून दादासाहेब फाळके व शंकरशेठ चुंबळे यांना मारण्यासाठी काही जणांनी लाठ्याकाठ्या आणल्या होत्या त्या आठवणीने 'विजयानंद' अजूनही शहारते.

१९१३ मध्ये विजयानंद हे सिनेमा टॉकीज नव्हते, तर नाट्यगृह होते. येथे नाटकांचे प्रयोग चालतात. बालगंधर्वांनीही अनेकदा येथे काम केले आहे. दादासाहेब फाळके यांनी येथेच ' राजा हरिश्चंद्र' चित्रपट दाखवण्याचे ठरवले आणि नाट्यगृहाबोहेर असलेल्या दोन झाडांना दोरी बांधून त्यावर धोतराचा नवाकोरा तागा टाकण्यात आल. दादासाहेबांनी स्वतः हातगाडयावर मॅन्युअल प्रोजेक्टर टाकून आणला व चित्रपट सुरु करण्यात आला. अंधार असावा म्हणून अमावस्येची रात्र निवडण्यात आली होती.प्रोजेक्टरमधून जसजशी चित्रे बाहेर पडू लागली तसतसा ते अप्रूप पाहण्यासाठी जमलेल्या नाशिककरांचा तोल सुटला आणि तेथे उपस्थित अनेकांनी घरी जाऊन मिळेल ते हत्यार आणले व प्रोजेक्टर फोडून टाकला. ती झाडे तोडून टाकली, तसेच तागाही फडून टाकला. हातगाडी आणि हे सर्व साहित्य जाळण्यात आले व फाळके, चुंबळे काळी जादू करीत आहेत असे एकमत होऊन त्यांनी या दोघांनाही नाशिकबाहेर हद्दपार केले. सरकारवाडा पोलिस स्टेशनला तशी तक्रार देखील काही जणांनी नोंदवली होती.

फाळके त्र्यंबकेश्वरी राहत असल्याने ते तिकडे निघून गेले. मात्र, चुंबळे यांना त्यानंतर काही काळ नाशिकबोहेरच राहावे लागले. कालांतराने काही ब्रिटीश अधिकारी तेथे आल्यावर त्यांनी हा चित्रपट आहे, असे सर्वांना सांगितले चुंबळेंना शहरात पुन्हा घेण्यात आले. अशी आठवण विनय चुंबळे यांनी जागवली.

आठवणीतला कॅमेरा
दादासाहेब फाळके यांचा काही वस्तू नाशिकमध्ये होत्या. 'हिंद सिने जरकाश्रम' या त्यांच्या घरातून या वस्तू काही संग्रहालायांना देण्यात आल्या, तसेच त्यांच्या हौदाचा बंगला येथील काही वस्तूदेखील महापालिकेला देण्यात येणार आल्या. विनय चुबळे याच्याकडे फाळके यांनी वापरलेला स्टील कॅमेरा होता. रोली फ्लेक्स कंपनीचा हा कॅमेरा दादासाहेबांना खूप उपयोगात येत असे. आता या कॅमेऱ्याचे केवळ छायाचित्र उरले असून, कॅमेरा आठवणीत गेला.

दादसाहेब फाळके यांचे आमच्या घराशी खूप सलोख्याचे संबंध होते. शंकरशेठ चुंबळे यांच्याबरोबर अनेकदा ते गप्पा मारत. त्यातून त्यांना नवनवीन कल्पना सुचत. माझे खापर पणजोबा (चुंबळे) फाळके यांना नाशिकमधून हद्दपार केल्याची घटना तेव्हाचीच.
- विनय चुंबळे, संचालक, विजयानंद थिएटर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावच्या चेतनचे युपीएससीत यश

$
0
0

देशात ७८१ वा क्रमांक

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून, यंदादेखील मालेगावातील तरुणाने यश संपादन केले आहे. तालुक्यातील मथुरपाडे सारख्या दुर्गम खेड्यातील चेतन मेघराज शेळके याने देशात ७८१ वा क्रमांक मिळवत गावाचा नावलौकिक वाढवला आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ग्रामीण भागातून शिक्षण घेऊनदेखील यशाला गवसणी घालता येते हे चेतनने सिद्ध केले आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यंदादेखील मथुरपाडे येथील चेतनने यूपीएससी परीक्षेत यश मिळवून मालेगावच्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे. चेतनचे वडील मेघराज शेळके हे निमगाव पोस्टात पोस्टमास्तर असून, आई अंगणवाडी सेविका आहे. अत्यंत कष्टप्रद जीवन जगत शेळके कुटुंबाने मुलांना चांगले शिक्षण देत त्यांच्या मनात जिद्द निर्माण केली.

तिसऱ्या प्रयत्नात यश

आधीपासूनच जिद्दी असलेल्या चेतनने प्रशासकीय सेवेत जायचा निर्णय घेतला. गेल्या तीन वर्षांपासून तो परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी दिल्ली येथे गेला होता. दोनवेळा यशाने हुलकावणी देऊनदेखील चेतनने आपला प्रयत्न सुरूच ठेवला होता. अखेर त्यास यश मिळाले असून, पंचक्रोशीतील तरुणांसाठी त्याने आदर्श उभा केला आहे. त्याच्या या यशात त्याचे आई, वडील, कुटुंबीय, मित्रांनीदेखील त्याला प्रोत्साहित केल्याचे तो आवर्जून सांगतो. भविष्यात प्रशासकीय सेवेत समाजहिताच्या कामे करण्याचा त्याचा संकल्प आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चुकीच्या कामगार चळवळीचा फटका

$
0
0

१ मे साठी प्रतिक्रिया : उद्योग

000000

चुकीच्या कामगार चळवळीचा फटका

- किसनलाल सारडा

नाशिकची संस्कृती ही आजही टिकून आहे. इतर मोठ्या शहरांमध्ये त्या शहरांची ओळख आज हरवलेली दिसते. उद्योग क्षेत्राबाबत मात्र नाशिक दुर्दैवी ठरले. खरे तर उद्योग क्षेत्राची भरभराट होते, त्या शहराचा विकास झपाट्याने होतो, असे म्हणतात. नाशिकमध्ये सातपूर, अंबडसारख्या वसाहती असल्या तरी त्यांचा एका मर्यादेनंतर हवा तसा विकास झाला नाही. चुकीच्या कामगार चळवळींचा फटका नाशिकच्या उद्योग क्षेत्राला बसला आहे. पुणे, चाकणसारखी ठिकाणे आज उद्योग विकासामुळे पुढारली आहेत. अशी प्रगती, विकास नाशिकमध्येही होणे अपेक्षित होते. परंतु, तसे झाले नाही. नाशिकपासून मुंबईजवळ आहे. त्यामुळे येथील उद्योगासाठी पूरक वातावरण आहे. शिवाय, पाण्याची मुबलकता असणे हीदेखील आपल्या शहरासाठी जमेची बाजू आहे. सिन्नरबाबत मला त्यामुळेच विशेष कौतुक वाटतं. नाशिकमधील पाण्याचा तिकडे वापर करून तेथील उद्योग वसाहत विस्तारत आहे. नाशिक मात्र योग्य कामगार नेतृत्व नसल्याने अद्याप मागे पडले आहे, असे वाटते.

(शब्दांकन : अश्विनी कावळे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील उद्यानांचे संगोपन होणे गरजेचे

$
0
0

माय मराठी सिडको वसंत व्याख्यानमाला

मधुकर झेंडे यांचे प्रतिपादन

म. टा. वत्तसेवा, सिडको

आशिया खंडातील दुसरे गोल्फ ग्राउंड नाशिक येथे होते. त्यामुळे त्यावेळी इंग्रज नाशिकमध्ये गोल्फ खेळण्यासाठी खास येत. आज त्याच मैदानाला आपण गोल्फ क्लब ग्राउड म्हणतो. मंत्रभूमीकडून यंत्रभूमीकडे वाटचाल सुरू आहे. महानगराचे रूप घेत असलेल्या नाशिक पूर्वीसारखेच थंड राहण्यासाठी झाडे, नदी आणि उद्यानांचे संगोपन झाले पाहिजे, असे आवाहन मधुकर झेंडे यांनी केले.

माय मराठी मोफत ग्रंथघर, सूर्यादय परिवार आणि नवीन नाशिक ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने झालेल्या माय मराठी सिडको वसंत व्याख्यानमालाचे सातवे पुष्प मधुकर झेंडे यांनी नाशिकचा चौक्यांचा इतिहास या विषयावर गुंफले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकांत बेणी आणि शंकरराव बर्वे उपस्थित होते. मधुकर झेंडे यांनी सांगितले, की शेती शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राची साथ यामुळेच नाशिकचा चौफेर विकास होत आहे. आताचे सीबीएस म्हणजे पूर्वी गावाच्या वेशीबाहेर होते. पूर्वी जुने नाशिक आणि गोदावरी घाट म्हणजेच नाशिक गाव. आताचे शासकीय गेस्टजवळ असलेले बंगले इंग्रजांना राहण्यासाठी होती. दंडकारण्य, गुलशनाबाद, जनस्थान आणि नाशिक असे वेगवेगळे नावे काळानुसार पडली.

गोदावरी कशी वाहती होती, रेल्वे कशी आली, मिग कारखाना, नोटप्रेस, सातपूर-अंबड एमआयडीसी कशी स्थापन झाली, पूर्वी कुंभमेळा कसे होत असे, याची झेंडे यांनी माहिती दिली. नाशिकच्या वसंत व्याख्यानमालाच्या धर्तीवर आयोजित सिडको व्याख्यानमालाची श्रीकांत बेणी आणि शंकरराव बर्वे यांनी स्तुती केली. किरण सोनार यांनी सूत्रसंचालन केले. देवराम सैंदाणे यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. प्रकाश काळे यांनी स्वागत केले. नंदकुमार दुसानिस यांनी आभार मानले.

..

'ताणतणाव मुक्‍तीसाठी चिंतन हाच मार्ग'

सिडको : ताणतणाव दिवसेंदिवस वाढत आहे. यातून मुक्‍त मिळण्यिासाठी चिंतन हा एकमेव उपाय आहे. जीवनात मन हे अधीर व उतावीळ होऊन मनुष्य अविवेकी वागू लागल्याचे दिसून येत आहे. अंतर्मनाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. शैलेंद्र गायकवाड यांनी केले.

माय मराठी मोफत ग्रंथघर, सूर्यादय परिवार आणि नवीन नाशिक ज्येष्ठ नागरिक मंडळ यांच्यातर्फे आयोजित माय मराठी सिडको वसंत व्याख्यानमालाचे सहावे पुष्प गुंफतांना डॉ. गायकवाड बोलत होते. समाजातील सर्वच घटकांना रोज ताणतणाव व त्यातून उद्भवणाऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो. जीवन म्हटले की संघर्ष आलाच; परंतु संघर्षातून मार्ग कडण्यासाठी अंतर्मनाशी सवांद साधायला हवा. समस्या थेट आपल्या अंतर्मनातून काढून टाकणे म्हणजेच संमोहनशास्र होय. गतिमान सुविधा आणि त्यामुळे वाढलेली जीवनाची गती यामुळे मन हे अधीर, उतावीळ आणि अविवेकी बनण्याचे प्रमाण वाढले आहे. काळजी, नैराश्य, संशयग्रस्तता हे विकार बळावयास लागले असून या सर्व गोष्टींवर प्रत्येकाने चिंतन करावयास हवे. मनाला लवचिक बनविण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी वास्तवाची जाणीव स्वत: ला करून देत राहणे आणि त्यापासून प्रेरणा घेत राहणे यासाठी वेळ काढावाच लागेल. अन्यथा केवळ सुखसुविधांच्या आणि तथाकथित यशस्वी जीवनाच्या अतिरेकी हट्टाहासापायी आपले मौल्यवान जीवन मूल्यहीन आणि पराधीन होत राहील, असेही त्यांनी सांगिले. किरण सोनार यांनी सूत्रसंचालन केले. जनार्दन माळी यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. प्रकाश काळे यांनी आभार मानले.

..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरात घुसून महिलेचा विनयभंग

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

--

शेजारी राहणाऱ्या विवाहित महिलेचा घरात घुसून विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी तरुणास अटक केली. संशयिताने या दरम्यान महिलेच्या सासूस बेदम मारहाण करीत सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर टाकल्याचेही पीडितेने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

प्रशांत गोरख देसले (वय २२, रा. ध्रुवनगर) असे अटक केलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. रविवारी, सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास तरुणाने महिलेच्या घरात प्रवेश केला. अचानक घुसलेल्या तरुणाने विवाहितेचे लक्ष नसल्याची संधी साधत विनयभंग केला. याचवेळी महिलेची सासू तेथे आल्याने संशयिताने वृद्ध सासूला मारहाण केली. सोशल मीडियावर महिलेचा बदनामीकारक मजकूर टाकल्याचा आरोप पीडित महिलेने केला असून, गुन्हा नोंदवल्यानंतर पोलिसांनी संशयितास अटक केली.

--

पिकअपच्या धडकेत दाम्पत्य जखमी

भरधाव पिकअपने धडक दिल्याने दुचाकीस्वार दाम्पत्य गंभीर जखमी झाले. ही घटना औरंगाबाद रोडवर घडली असून, या प्रकरणी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. रियाज उस्मान पठाण (५५) आणि हसिना रियाज पठाण (५० रा. संजरीमार्ग वडाळागाव) असे जखमी दाम्पत्याचे नाव आहे. गेल्या आठवड्यात हा अपघात झाला. पठाण दाम्पत्य दुचाकीवर (एमएच १५ डीई ८९९२) घराकडे परतत असताना समोरून भरधाव आलेल्या पिकअपने (एमएच १५ एफव्ही २९०४) त्यांना धडक दिली.

--

वीज कर्मचाऱ्यावर हल्ला

कार्यालय आवारात मद्यप्राशन करण्यास विरोध केल्याने एकाने वीज कर्मचाऱ्यावर हल्ला करून त्याचा दात तोडल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला.

राकेश संभाजी देशमुख, असे मारहाण करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. वीज कर्मचारी बाळासाहेब सोपान भास्करे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. रविवारी, दुपारी भास्करे कार्यालय आवारात सेवा बजावत असताना संशयित आरोपी इमारतीच्या आवारात मद्य सेवन करताना आढळून आला. भास्करे यांनी त्यास मद्यसेवनास विरोध केला असता संतप्त संशयिताने हातातील कड्याने तोंडावर फटका मारला.

--

सिडकोत ७४ हजाराची घरफोडी

बंद घर फोडून चोरट्यांनी रोकडसह सुमारे ७४ हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना सिडकोतील लोकमान्यनगर भागात घडली. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. केशव गणपत केंगे (६२ रा. लोकमान्यनगर, पवननगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, केंगे कुटुंबीय रविवारी, पहाटे चार वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला गेले होते. घरात कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडी कोयंडा तोडून घरातील कपाटात ठेवलेली ४० हजाराची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिने असा सुमारे ७४ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला.

--

पित्याकडून मुलीचा विनयभंग

अल्पवयीन मुलीचा नराधम पित्यानेच विनयभंग केल्याची घटना शरणपूररोड परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी संशयितास बेड्या ठोकल्या असून, या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी रात्री पित्याने किरकोळ कारणातून वाद घालत हे कृत्य केले. मुलीची आई वाद मिटविण्यासाठी शेजाऱ्यांना बोलविण्यासाठी गेली असता नराधम पित्याने मुलीचा विनयभंग केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चला, प्राचीन गोवर्धनच्या हेरिटेज वॉकला!

$
0
0

हेरिटेज वॉकचा लोगो घ्यावा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहराची कधीकाळी मुख्य बाजारपेठ अन् जिल्ह्याचे ठिकाण म्हणजे गोवर्धन गाव ओळखले जाते. दोन हजार वर्षांची पार्श्वभूमी असलेल्या अशा प्राचीन खेड्याची सफर करण्याची संधी रविवारी, ६ मे रोजी 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे 'मटा हेरिटेज वॉक'च्या माध्यमातून मिळणार आहे. या वॉकमध्ये राज्य पुरातत्त्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यांच्याशी संवाद साधण्याचीही संधी मिळणार आहे.

त्रिरश्मी डोंगरावरील पांडव लेण्यांतील क्रमांक ३, ४, ५, १० व १२ अशा पाच शिलालेखांमध्ये बारा वेळा गोवर्धनचा उल्लेख मिळतो अन् गौतमीपुत्र सातकर्णीच्या युद्धाचा इतिहासही. यावरून गोवर्धन इसवीसनाच्या आरंभापासून वसलेले प्राचीन खेडे असल्याचे स्पष्ट होते. आंध्रभृत्य नावाच्या दिवाणाचे गोवर्धन मुख्य ठिकाण होते. पांडवलेणी खोदतांना त्यासाठी मोठ्याप्रमाणात महसूल व दान याच गावातून व्यापारी मंडळींकडून मिळाल्याचा उल्लेखही आहे. गोवर्धन गाव पूर्वी विणकरांचे गाव म्हणूनही ओळखले जायचे. त्यामुळे युरोपचे व्यापारी या काळात नाशिककडे आकर्षिले गेले होते. गोवर्धन येथे तयार होणारी रेशमी वस्त्रे त्याकाळी परदेशात प्रसिद्ध होती. तेराव्या शतकात मार्कोवोलो याला बगदाद येथे एक रेशमी कापडाचा नमुना मिळाला तो गोवर्धनच्या विणकरांनी विणलेला होता. एवढेच नाही तर १९६० मध्ये पुण्यातील डेक्कन कॉलेजने केलेल्या उत्खननात युरोपातील काचेच्या बाटल्याही सापडल्याने येथील व्यापारी युरोपपर्यंत देवघेव करत असावेत, असेही डेक्कन कॉलेजच्या संशोधकांनी नोंदविले आहे. हेरिटेज वॉकमध्ये राज्य पुरातत्त्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, मुरलीधर पाटील, अॅड. सुदर्शन पाटील यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.

हेरिटेज वॉकमध्ये काय पहाल?

गंगापूर व गोवर्धन हे गाव आज वेगळे वाटत असले तरी ते पूर्वी गोवर्धन म्हणूनच ओळखले जाई. येथील १२ व्या शतकातील गोवर्धनेश्वरराचे महादेव मंदिर, त्याच्या शेजारीच बाणेश्वराचे पेशवेकालीन मंदिर आहे. बाणेश्वर मंदिरासमोर सुंदर घाट पेशवाईतील वैभवाची आठवण करून देतो. गोवर्धनच्या प्राचीन बाजारपेठेचे ठसे आजही पहायला मिळतात. ही बाजारपेठ सध्या गंगापुरात पेठगल्ली म्हणून अनुभवता येते. गावातील देवीचे मंदिर अनोखी परंपरा उलगडते तर पाटील वाडा, पंचवाडा, सोनवणी वाडा, देशपांडे वाड्याच्या रुपाने अनोखा इतिहास अनुभवता येतो. जलालपूरचे वैभव असलेले वऱ्हारेश्वराचे सुंदर मंदिर, दगडी कारंजे अन् पहिल्या मराठी महिला चरित्रकार लक्ष्मीबाई टिळकांच्या आठवणी या हेरिटेज वॉकमधून अनुभवता येणार आहेत.

नाव नोंदणी आवश्यक

मटा हेरिटेज वॉकमध्ये सहभागी होण्यासाठी ६ मे रोजी गोवर्धन गावातील दे. ना. पाटील माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजसमोर सकाळी ८ वाजता एकत्रित जमायचे आहे. वॉकमध्ये सहभागी होण्यासाठी रमेश पडवळ यांच्या ८३८००९८१०७ या क्रमांकावर आपले नाव व आपल्यासोबत येणाऱ्या व्यक्तींची संख्या व्हॉट्सअॅप करावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारागृहाचे दोन कर्मचारी निलंबित

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

कैद्यांच्या चिठ्या नातेवाईकांना पोहचवणाऱ्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील दोन कर्मचाऱ्यांना सोमवारी निलंबित करण्यात आले. रामेश्वर मुसळे आणि आबासाहेब मते अशी त्यांची नावे आहेत. कारागृह अधीक्षक राजकुमार साळी यांनी ही कारवाई केली.

याआधीही दोन कर्मचारी रात्रीची ड्युटी सोडून व नियम तोडून चारवेळा कारागृहाबाहेर बाहेर गेल्याबद्दल निलंबित झाले होते. कैद्यांना सिमकार्ड पुरवल्याप्रकरणी होमगार्डवर कारवाई झाली होती. साळी यांनी सूत्रे स्वीकारून एक वर्ष झाले आहे. या काळात त्यांनी पारदर्शी आणि शिस्तबद्ध कारभार सुरू केल्याने गैरप्रकारांना आळा बसल्याचे चित्र आहे. प्रशासन कठोर कारवाई करीत असल्याने कैद्यांकडे मोबाइल सापडणे, हाणामारी, अंमली पदार्थांची तस्करी, गैरकारभार याला प्रतिबंध बसल्याचे चित्र आहे.

याबाबत साळी म्हणाले की, कारागृह कर्मचाऱ्यांनी कैद्यांशी आर्थिक संबंध ठेवणे, त्यांची कामे बेकायदेशीरपणे करणे, त्यांना वस्तू पुरवणे आदींना बंदी आहे. रामेश्वर मुसळे आणि आबासाहेब मते हे कर्मचारी काही कैद्यांच्या चिठ्ठ्या घेऊन त्यांच्या नातेवाईकांना पोहचवत होते. चिठ्ठ्या घेऊन जाताना त्यांना पकडण्यात आले. त्यांना निलंबित करण्यात आले असून, औरंगाबाद विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांच्याकडे अहवाल पाठविण्यात आला आहे.

निलंबनाची दुसरी कारवाई

शिस्त मोडल्याबद्दल आणि बेकायदेशीर काम केल्याबद्दल नाशिकरोड कारागृहात कर्मचारी निलंबनाची ही वर्षभरातील दुसरी वेळ आहे. काही महिन्यापूर्वी बाळू पालवे आणि अनिल घेरपवार या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. या दोघांची ड्युटी रात्री कारागृहाच्या आत होती. मात्र, परवानगी न घेता ते कारागृहाबाहेर चार वेळा गेले होते. बेकायदेशीर कामासाठी ते गेल्याचा संशय आहे. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. आता पुन्हा दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई झाल्याने भ्रष्ट कामे करणारे कर्मचारी ताळ्यावर आले आहेत. दोन वर्षापूर्वी कैद्यांना सिमकार्ड पुरवताना होमगार्डना पकडण्यात आले होते. सुरक्षा कर्मचारीच गैरकारभारात अडकले असल्याने कारागृहाची बदनामी होत होती. आता कारवाईमुळे त्याला प्रतिबंध बसला आहे.

सुरक्षा वाढवली

कारागृहात सुरक्षेसाठी ९३ सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. आता कारागृहाबाहेरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी दहा कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. तटावरही कॅमेरे आहेत. कारागृहात २४ जॅमर लावण्यात आले आहेत. ४० एकरांवरील या कारागृहाला मोठी तटबंदी आहे. तिच्या बाहेरुन मोबाइल फेकले जातात. त्यामुळे तटबंदीलगत गस्त सुरू झाली आहे. कारागृहात साडेतीन हजार कच्चे-पक्के कैदी आहेत. त्यांच्यासाठी फक्त १९० सुरक्षा कर्मचारी आहेत. सहा कैद्यांमागे एक कर्मचारी असे आदर्श प्रमाण हवे असताना या कारागृहात सुरक्षा कर्मचारी कमी आहेत. कमी मनुष्यबळात चांगले काम करीत असल्याबद्दल अधीक्षक साळी यांचे अप्पर पोलिस महासंचालक डॉ. श्रीकांत उपाध्ये यांनी कौतुक केले. त्यांनी दोन दिवसांपूर्वी कारागृहाची पाहणी करुन समाधान व्यक्त केले.

पूर्वी या जेलमध्ये कैद्यांकडे मोबाइल पोहचवले जात होते. आता मोबाइल आतही जाऊ शकत नाही. सुरक्षेशी तडजोड करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाते. अशा कर्मचाऱ्यांनी स्वार्थासाठी शिस्त व पारदर्शी कारभाराला विरोध सुरू केला आहे. दबावाला बळी न पडता कारभार पारदर्शीपणेच चालवला जाईल.

- राजकुमार साळी, कारागृह अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकच्या कामगार चळवळीचा जाज्ज्वल्य इतिहास

$
0
0

कामगार दिन विशेष

…..

-कॉ. श्रीधर देशपांडे

देशात कामगार चळवळ सध्या जोमात सुरू आहे. नाशिकच्या कामगार चळवळीनेही यात मोठे योगदान दिले आहे. पन्नास वर्षांपूवी तत्त्वनिष्ठ कार्यकर्त्यांची फळी नेतृत्वात होती. यात समाजवादी चळवळीतून आलेले, त्याचप्रमाणे कम्युनिस्ट चळवळीशी संबंधित कार्यकर्त्यांचा समावेश अधिक होता.

नाशिकच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात पुरोगामी नेतृत्वाने लक्षणीय योगदान दिले होते. १९५० मध्ये इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये इंटकची युनियन कार्यरत होती. त्यानंतर चार-पाच वर्षांनी लगेच एचएमएसची साथी मधू लिमये, बाबा खेडगीवार यांच्या नेतृत्वाखाली युनियनची स्थापना होऊन चळवळीत वेगळे स्थान निर्माण केले होते. मुंबईमध्ये गिरणी कामगारांचा संप मोठ्या प्रमाणात सुरू होता. त्यावेळी नाशिकमध्ये त्याचे लोण फारसे पसरले नव्हते. ज्यावेळी नाशिकमध्ये फॅक्टरी, कारखाने सुरू झाले, त्यावेळी कामगार संघटना अस्तित्वात यायला लागल्या. इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये युनियनची स्थापना झाल्यानंतर एसटीमध्ये मजदूर युनियनची स्थापना करण्यात आली. तिचे नेतृत्व साथी जॉर्ज फर्नांडिस व भाऊ फाटक यांच्याकडे होते. नाशिकमध्ये झालेल्या आंदोलनांमध्ये वेतन करारासाठी होणाऱ्या आंदोलनांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. पूर्वी आंदोलनांचे स्वरुप उग्र नव्हते. पारंपरिक पद्धतीने निवेदने देणे, निदर्शने करणे, शिष्टमंडळाच्या चर्चा परिषदा घेणे एवढ्यापुरते मर्यादित होते. एवढे करुनच मागण्या मान्य व्हायच्या. एखाद्या कंपनीत संप करायचा असेल तर मोठी तयारी करावी लागायची. नाशिकमध्ये १९६० मध्ये पोस्ट अँड टेलिग्राफ कर्मचाऱ्यांनी ऑटोमेशनच्या संदर्भात एक दिवसाचा संप केला. १९६२ मध्ये आयएसपीच्या कर्मचाऱ्यांनीदेखील एक दिवसाचा संप केला. त्याला साथ म्हणून १९६२ मध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसाठी एक दिवसाचे चक्काजाम आंदोलन केले. त्यानंतर खऱ्या अर्थाने कामागारांना आपले हक्क समजू लागले व कामगार चळवळीने जोर धरला. आयएसपीच्या कामगारांनी १९६२मध्ये स्टाफ क्वॉर्टर आणि हॉस्पिटलच्या मागणीसाठी मधू लिमये यांच्या नेतृत्वाखाली ३२ दिवसांचा संप केला. त्यानंतर आयुर्विमा कर्मचाऱ्यांनीही संगणकाच्या वाढत्या वापराबद्दल व ऑटोमेशनच्या विरोधात संप पुकारला होता. या संपांना नाशिकच्या कामगारांनी मोठ्या प्रमाणात साथ देऊन हे संप १०० टक्के यशस्वी करून दाखवले आहेत. हा लढा सरकारच्या विरोधात असल्याने तो सात ते आठ वर्षे सतत सुरू होता. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनीही नाशिक शहरात संप पुकारला होता. ८ मे १९७४ ते २३ मे १९७४ या कालावधीत रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात संप केला होता. त्यावेळी अत्यावश्यक सेवेत असताना संप केला म्हणून तीनशे कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. यात नाशिकच्या कर्मचाऱ्यांचादेखील समावेश होता. त्यानंतर नाशिकमध्ये स्थानिक पातळीवर अनेक संप झाले. त्यातून कर्मचाऱ्यांना न्यायच मिळाला आहे.

सध्या आंदोलनांचे प्रमाण कमी झाले असले तरी कामगारांपुढील आव्हाने आजही कायम आहेत. जागतिकीकरणात कामगारांचे मुलभूत हक्क डावलले जात असून, कॉर्पोरेट आणि भांडवलदारांच्या विळख्यात कामगार आजही पिचला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकची आर्थिक, औद्योगिक वाटचाल

$
0
0

- डॉ. सतीश श्रीवास्तव

स्वातंत्र्य पूर्व काळ आणि स्वातंत्र्योत्तर १९६० च्या दशकापर्यंत नाशिक शहराशी तीर्थक्षेत्र हे अभिधान संबंधित होते. १९६२ मध्ये औद्योगिक वसाहतीची स्थापना झाल्यानंतर मात्र नाशिक शहराचे हे स्वरुप मोठ्या प्रमाणात बदलत गेले. साठच्या दशकापर्यंत नाशिकमधे जुने परंपरागत व्यवसाय उदा. तांब्या पितळेची भांडी, चांदीच्या वस्तू, विड्या वळणे,भगर प्रक्रिया, भात सडण्याच्या गिरण्या, तेल गिरण्या तसेच खेळणी, लोखंडी अवजारे, हस्त उद्योग, फर्निचर तयार करणे असे श्रमप्रधान उद्योग आणि हस्तोद्योग अस्तित्वात होते. स्व. बाबूशेठ राठी यांच्या पुढाकाराने नाशिकमध्ये सर्वप्रथम सहकारी तत्वावर औद्योगिक वसाहत स्थापन करण्याचे प्रयत्न झाले. या प्रयत्नांचे फलित म्हणजे नाशिक इंडस्ट्रियल को ऑपरेटिव्ह इस्टेट (NICE) ची स्थापना १९६२ मध्ये नाशिक येथे झाली. १९६४ मध्ये हिंदूस्थान एरोनॉटिक्स लि.च्या एअरक्राफ्ट डिव्हिजनची स्थापना ओझर येथे झाली. नाशिकच्या औद्योगिकरणाची मुहूर्तमेढ या दोन घटनांमुळे रोवली गेली असे म्हणता येईल.

१९६८ मध्ये ६३५.७३ हेक्टर एवढ्या जागेवर नाशिकजवळ सातपूर येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक वसाहतीची सुरुवात करण्यात आली.नाशिक इंडस्ट्रिअल को ऑपरेटिव्ह इस्टेटच्या (नाईस) १३३ एकर जागेवर उद्योगांची सुरुवात झालेली होती. १९६७ मध्ये सिकॉमने (स्टेट इन्व्हेस्टमेंट कार्पोरेशन ऑफ महाराष्ट्र ) नाशिकला औद्योगिक विकासाचे केंद्र म्हणून स्वीकृत केले. औद्योगिक वित्त पुरवठ्याची सोय त्यामुळे झाली. सातपूरलगत अंबड येथे १९७५ मध्ये ५१५.५o हेक्टर जागेवर नाशिकचे दुसरे औद्योगिक क्षेत्र उदयास आले. मायको आणि एबीबीसारख्या अनुक्रमे जर्मन आणि स्वीडिश बहुराष्ट्रीय कंपन्यांची युनिट्स औद्योगिक वसाहतीत सुरू झाली. महिंद्र अँड महिंद्रचा ऑटोमोबाइल कारखाना नाशिकमध्ये स्थापन झाला. ओझर येथे मिग विमानांचा कारखाना स्थापन झाल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि सामाजिक बदलांना गती मिळाली. वाइन, पर्यटन, भारतीय प्रतिभूती मुद्रणालय आदींचाही नाशिकच्या आर्थिक क्षेत्रात मोलाचा वाटा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवल्यात ‘हब’ची आखणी

$
0
0

  छोट्या व्यावसायिकांसाठी मुख्याधिकाऱ्यांचे पाऊल

म. टा. वृत्तसेवा, येवला 

शहरातील मुख्य रस्ते वाहतुकीची कोंडी करणाऱ्या अतिक्रमणांना काढून मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांच्यामुळे रस्त्यांना मोकळा श्वास घेणे शक्य झाले आहे. यानंतर मुख्याधिकारी नांदूरकर यांनी आता शहरातील छोट्या व्यावसायिकांमध्ये शिस्तीची पायाभरणी होण्याच्या दृष्टीने गेल्या दोन दिवसांत दमदार पाऊल टाकले आहे.

मुख्याधिकारी नांदूरकरांच्या संकल्पनेतून पडल्या गेलेल्या या पावलांतर्गत छोट्या व्यावसायिकांसाठी शहरातील शनी पटांगण अन् नजीकच्या दुसऱ्या बाजूकडील बाजारतळात सर्वांनाच समान न्यायाच्या हेतूने सारख्याच आकाराच्या 'हब'च्या आखणीसह निर्मिती करण्यात आली आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदाची सूत्रे हाती घेणाऱ्या संगीता नांदूरकर यांनी गेल्या आठवड्यात रात्रीतून अचानक राबविलेल्या मोहिमेतून अतिक्रमणांची उचलबांगडी केली. या मोहिमेमुळे 'हिरो' ठरलेल्या मुख्याधिकारी नांदूरकरांनी शहरातील शनी पटांगण, बाजारतळ भागासह छोट्या विक्रेत्यांना फेरीवाला धोरणांतर्गत सारख्याच आकाराच्या जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

याचबरोबर शहरातील हाजी बाबा दर्ग्याजवळ ८ बाय ७ आकाराची जागांची आखणी करण्यात आली असून, या ठिकाणी असलेल्या हबमध्ये १५० जागांची रचना व आखणी करण्यात आली. या बाजारतळात दररोजचा भाजीबाजार व फळबाजार भरणार आहे. याशिवाय भजी, वडापाव विक्रेत्या छोट्या व्यावसायिकांसाठी एकनाथ खेमचंद पेट्रोल पंपाजवळील मारुती मंदिरामागे 'हब'ची निर्मिती केली आहे. इंद्रनील कॉर्नरच्या मागील बाजूस असलेली मोकळी जागा, तसेच रंगरेज पान स्टॉल्समागे बाजारतळात पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

हबची प्रमुख वैशिष्ट्ये...

५ बाय ७ आकाराची जागा

छोट्या व्यावसायिकांसाठी आखणी

पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था

पालिकेकडून व्यावसायिकांना ओळखपत्र

हबच्या माध्यमातून व्यवसाय करण्यासाठी छोट्या व्यावसायिक व विक्रेत्यांना पालिकेने जागा उपलब्ध करून दिली. त्यानुसार या जागेवर मालकी हक्क झाला असे समजता येणार नाही. दिलेल्या जागेत कुणालाही टपरी अथवा शेड ठेवता येणार नाही. चारचाकी गाडीवर साहित्य आणून रात्री पुन्हा जागा मोकळी करावी लागणार आहे.

- संगीता नांदूरकर-शहाणे, मुख्याधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसस्थानक गर्दीने फुलले

$
0
0

मालेगाव आगारातून सुट्या आणि लग्नसराईसाठी जादा बसेसची सुविधा

म. टा. वृत्तसेवा , मालेगाव

शाळांच्या परीक्षा आटोपल्याने सुट्या सुरू झाल्या असून, त्यात लग्नसराईचे दिवस असल्याने मालेगाव नवीन व जुने बसस्थानक प्रवाशांच्या गर्दीने फुलून गेले आहे.

बसस्थानकावर प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेता पुणे, नाशिक, औरंगाबाद, धुळे येथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी आगारातून जादा बसेस सोडण्यात येत असल्याची माहिती आगारप्रमुख किरण धनवटे यांनी 'मटा'शी बोलताना दिली.

परीक्षांचा माहोल आटोपल्याने मुलांची व त्यांच्या पालकांची मामा-मावशीच्या गावाला जाण्यासाठी लगबग सुरू असून, मालेगाव नवीन बसस्थानक सकाळपासूनच प्रवाशांच्या गर्दीने भरलेले पाहायला मिळते आहे. यंदा एप्रिल महिन्याअखेर लग्नतिथीदेखील जास्त असल्याने सुटीसाठी बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांबरोबर लग्न समारंभासाठी प्रवास करणाऱ्या वऱ्हाडी मंडळींनीदेखील बसस्थानक फुलून गेले आहे.

नाशिकला उद्या आढावा बैठक

बसस्थानकात बसमध्ये जागा मिळावी यासाठी प्रवाशांची झुंबड उडत आहे. मिळेल त्या मार्गाने बसमध्ये जागा मिळण्यासाठी सगळेच धावाधाव करीत असून, काहीवेळा वादाचे प्रसंगदेखील उभे राहत आहेत. प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेता जादा बसेस सुरू करण्यात आल्या असून, आगामी काळातदेखील प्रवाशांची संख्या वाढण्याचा अंदाज आहे. त्यादृष्टीने येत्या २ तारखेला नाशिक येथे परिवहन विभागाची आढावा बैठक होणार असल्याचे धनवटे यांनी सांगितले.

अधिक फेऱ्यांचे नियोजन

प्रवाशांची गर्दी वाढल्याने येथील बसस्थानकातून नाशिकच्या नियमित १५ फेऱ्यांसह विनावाहक २६ फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. तर पुण्यासाठी सकाळी व औरंगाबादसाठी दुपारी एक-एक जादा फेरीही सुरू करण्यात आली आहे. धुळ्यासह खान्देशात जाणाऱ्या प्रवाशांची संख्यादेखील अधिक असल्याने सहा जादा फेऱ्या सुरू आहेत. नाशिकसाठी सुरू करण्यात आलेल्या विनावाहक फेऱ्यातून मालेगाव आगारास दिवसाकाठी सुमारे १ ते १.२५ लाख रुपये उत्पन्न मिळत आहे.

उकाड्याने प्रवाशी हैराण

सुट्या आणि लग्नांसाठी प्रवासाला निघालेल्या प्रवाशांना मालेगावच्या उकाड्याने हैराण केले आहे. शहरातील तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याने प्रवाशी चांगलेच घामाघूम होत आहेत. प्रवाशांची तहान भागवण्यासाठी राजस्थान जनसेवा मंडळाने मोफत थंडगार पाण्याची सुविधा बसस्थानकात उपलब्ध करून दिल्याने प्रवाशांच्या जीवाला काहिसा गारवा मिळत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तो’ युवक मुंबई फिरून परतला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

रौलेट या ऑनलाइन जुगारात ८० हजार रुपये हरल्यानंतर पैशांचा तगदा सुरू झाल्यामुळे बेपत्ता झालेला राहुल सेवकराम दर्डा हा युवक मुंबई फिरून रविवारी रात्री घरी परतला.

राहुलचे अपहरण झाल्याचा संशय असलेला हर्षल सदाशिव गाडेकर हा युवक मात्र पोलिस कोठडीतच असून, आज, त्याच्या कोठडीची मुदत संपल्यानंतरच त्याची सुटका होऊ शकते. हर्षल आणि अपह्त राहुल सेवकराम दर्डा (४७, रा. ०८, ऋतुराज, अपार्टमेंट, क्षीरसागर कॉलनी, पंचवटी) हे एकाच परिसरात राहतात. ओळखीतूनच हर्षलने राहुलला जवळपास ८० हजार रुपये दिले होते. कॉलेजरोडवरील एका कपड्याच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करणाऱ्या राहुलने हे पैसे रौलेट नावाच्या जुगारात उडविले.

साधारणत: वर्षभरापूर्वीची ही गोष्ट असून, यानंतर हर्षलने वेळोवेळी राहुलकडे पैशांचा तगदा केला. दि. २६ एप्रिल रोजी राहुल अचानक कामावरून बेपत्ता झाला. राहुलची चौकशी करण्यासाठी हर्षल त्याच्या घरी गेला. सेवकराम दर्डा यांच्याशी चर्चा करताना त्याने आपण ब्राह्मणाकडे चौकशी केली असून, राहुल दोन दिवसांत परत येईल, असा दिलासा सेवकराम यांना दिला. मात्र, यामुळे राहुल कोठे आहे याची हर्षलाला पूर्ण माहिती असल्याचा ग्रह सेवकराम यांनी करून घेतला. दोन दिवसांनंतरही राहुल घरी न परतल्याने त्यांनी थेट सरकारवाडा पोलिस स्टेशन गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत हर्षलला अटक केली. कोर्टाने त्यास १ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. मात्र, राहुलबाबत कोणतीच माहिती नसल्याचे हर्षलने चौकशीदरम्यान स्पष्ट केले. पोलिसांचा तपास सुरू असताना राहुल रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घरी परतला. याबाबत अपहरण झाले असा संशय असलेला राहुल मुंबई येथे निघून गेला होता. पैशांचा तगदा वाढल्याने त्याने हे कृत्य केले, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गावठी कट्ट्यांचे कनेक्शन उघड

$
0
0

संशयितांना अटक; तीन जिवंत काडतुसे जप्त

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

--

गावठी कट्टा बाळगणाऱ्या चोरट्याच्या अटकेनंतर ही हत्यारे विक्रीचे मोठे रॅकेट उघडकीस आणण्यात शहर पोलिसांना यश मिळाले आहे. या प्रकरणी तिघा संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून दोन गावठी कट्टे आणि तीन जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली.

त्र्यंबकरोडवरील राजदूत हॉटेल परिसरात एक तरुण गावठी कट्टा विक्री करण्यासाठी येणार असल्याच्या माहितीवरून सोमवारी (दि. ३०) सकाळी पोलिसांनी सापळा रचला. यात एकापाठोपाठ एक संशयित पोलिसांच्या जाळ्यात सापडले. युनिट एकचे सहायक पोलिस उपनिरीक्षक जाकिर शेख आणि हवालदार बागूल यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली.

निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने सापळा लावला असता सौरभ राजेंद्र ढगे (२२, रा. मामलेदार चौक, निफाड) हा चोरटा पोलिसांच्या हाती लागला. त्याच्या अंगझडतीत गावठी बनावटीचे दोन कट्टे व दोन जिवंत काडतुसे असा ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांना सापडला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, साथीदार करणअप्पा कडुसकर याच्या मदतीने नाशिकरोड परिसरात केलेल्या एका घरफोडीत कट्टा मिळाल्याची माहिती संशयित ढगेने पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी सदर घरमालकाचा शोध घेतला. मात्र, घरमालक आशिषकुमार श्रीपालकुमार वर्मा याने काही दिवसांपूर्वीच घर सोडल्याची माहिती समोर आली. तरीही पोलिसांनी तपास सुरूच ठेवला. यात वर्मा सध्या हॉटेल वास्को येथे कामास असून, तेथेच वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. पोलिसांनी या माहितीच्या आधारे, वर्मालाही ताब्यात घेतले. तेव्हा वर्माने सदर कट्टा महम्मद समीम महम्मद इलियास याने ठेवण्यासाठी दिल्याचे पोलिसांना सांगितले. इलियास नाशिकरोड बसस्थानकासमोरील मनकोली मॅन्शनमध्ये राहत असल्याचे समजल्याबरोबर पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले. हा तपास सहाय्यक आयुक्त अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आनंदा वाघ, सहाय्यक निरीक्षक महेश कुलकर्णी, नागेश मोहिते, दीपक गिरमे आदींच्या पथकाने केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल मीडियाचा सद्सद् विवेकबुद्धीने विचार करावा

$
0
0

ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सोशल मीडिया सध्या धिंगाणा घालत आहे, हे केवळ भारताच्याच बाबतीत नाही तर इतर देशांमध्येही सोशल मीडियाने विद्ध्वंस मांडलेला आहे. इंग्लंड, अमेरिकामध्ये फेक न्यूज प्रकरण खूपच गाजते आहे. प्रत्यक्ष ओबामांनाही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. यावर उपाय एकच की सद्सद् विवेकबुद्धीने विचार करावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व खासदार कुमार केतकर यांनी केले.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने कुसुमाग्रज स्मारक, गंगापूर रोड येथे केतकर यांची मुलाखत झाली. याप्रसंगी सोशल मीडियावर खऱ्या खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. याचा पत्रकारितेवर व लोकांवर काय परिणाम होतोय, या प्रश्नाचे उत्तर देताने केतकर बोलत होते. लोकेश शेवडे यांनी त्यांची मुलाखत घेतली. पोस्ट ट्रुथ म्हणजे सत्याशी ज्याचा काही संबंध नाही, अशा न्यूजचे प्रमाण सध्या वाढले आहे. हा वेग थांबविणे कुणालाही शक्य नाही, तसा काही कायदाही नाही. हवेने कोणत्या दिशेने वहावे, हे आपण तिला सांगू शकत नाही, असे ते यावेळी म्हणाले.

नि:पक्ष पत्रकारिता असू शकते का, या प्रश्नाचे उत्तर देताना केतकर म्हणाले, की पत्रकारिता ही केवळ राजकीय नसते तर सांस्कृतिक, आर्थिक असे तिचे अनेक प्रकार असतात. सखाराम बाईंडर, गिधाडे, घाशिराम कोतवाल या नाटकांच्या वेळी खूपच गदारोळ उठला होता. मात्र, पत्रकाराला बातमीच्या ठिकाणी भूमिका नाही घेता येत, तेथे त्याला घटनाच द्यावी लागते भलेही त्याने नंतर लेख लिहिला तर त्यात तो एक भूमिका घेऊन त्याचे मुद्दे मांडू शकतो. पत्रकारितेतील आयुष्यात आपण कोणत्या व्यक्तींपासून प्रभावित झाला या प्रश्नावर कुमार केतकरांनी पी. एन. हटकर हे इतिहासतज्ज्ञ, विजय तेंडुलकर, अशोक रानडे, किशोरी आमोणकर यांची नावे घेतली. यातील काही माणसे जो विचार सांगायची तो आपण पुन्हा बोलून सुद्धा दाखवू शकत नाही इतका प्रगाढ असायचा, असेही केतकर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेईईचा कट ऑफ घसरला

$
0
0

विद्यार्थ्यांसमोर प्रवेशाचे आव्हान

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनच्या (सीबीएसई) वतीने घेण्यात आलेल्या जॉईंट एन्टरन्स टेस्ट (जेईई) २०१८ या परीक्षेचा निकाल सोमवारी सायंकाळी जाहीर झाला. यंदा या परीक्षेसाठी खुल्या गटातील कट ऑफ ७४ नोंदविला गेला. गेल्या वर्षी खुल्या गटासाठी हा कट ऑफ ८१ होता. यंदाची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी जास्त अवघड असल्याचे मानले जात होते. निकालाच्या आकडेवारी आणि घसरलेल्या कट ऑफने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

देशातील आयआयटी आणि नामांकीत अभियांत्रिकी शिक्षण संस्थांमधील प्रवेशासाठी हा निकाल महत्त्वाचा आहे. नाशिकमधून यश कुलकर्णी याने देशात ४४० वा क्रमांक पटकाविला. तर श्रेयस हवालदार याने देशात ४६४ वा क्रमांक पटकाविला आहे. या परीक्षेच्या गुणवत्ता यादीत पहिल्या २० क्रमांकांमध्ये महाराष्ट्रातील एकाही विद्यार्थ्याचा समावेश नाही. देशभरातून या परीक्षेसाठी ११ लाख ३५ हजार २८४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. पैकी अवघ्या २ लाख ३४ हजार १०४ विद्यार्थ्यांनी जेईई अॅडव्हान्ड परीक्षेत यश मिळविले आहे. सोमवारी जाहीर झालेला निकाल हा अभियांत्रिकी विभागासाठी आहे. तर आर्किटेक्चर विद्याशाखेसाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जेईई परीक्षा पेपर क्रमांक २ चा निकाल मंगळवारी (१ मे) जाहीर होणार आहे.

जेईई परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची काठीण्यपातळी दरवर्षी वाढते आहे. यंदाचाही पेपर विद्यार्थ्यांना कठीण वाटला आहे. दिवसेंदिवस स्पर्धा खडतर होत असल्याने मेहनतीला पर्याय नाही. नाशिकच्या विद्यार्थ्यांकडे चांगल्या क्षमता आहेत. योग्य मेहनतीची जोड देऊन विद्यार्थ्यांनी या क्षमतांचा उपयोग करायला हवा.

- प्रमोद पाटील , जेईई मार्गदर्शक

कट ऑफ लिस्ट मार्क्स : जेईई अॅडव्हान्स्ड :

वर्ग ..........२०१८ ...............२०१७

ओपन...........७४...................८१

ओबीसी.........४५..................४९

एससी..........२९...................३२

एसटी..........२४...................२७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किसान कार्यशाळेतून मत्स्य व्यवसायाचे धडे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

मत्स्य व्यवसाय विभागाच्या वतीने बुधवारी (दि. २) जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या ठिकाणी किसान कल्याण कार्यशाळा होणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय प्रादेशिक उपआयुक्त सुजाता साळुंके यांनी दिली आहे.

शेतकरी बांधवांना या कार्यशाळेतून संबंधित तालुक्यांत मत्स्य व्यवसाय विभागाकडून राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांविषयी माहिती दिली जाणार आहे. किसान कल्याण कार्यशाळेचे आयोजन तालुका कृषी अधिकारी कार्यालयात करण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे असा या किसान कल्याण कार्यशाळेचा मूळ उद्देश आहे. शेतकऱ्यांनी मत्स्यव्यवसाय हा शेतीपूरक व्यवसाय म्हणून स्वीकारावा यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना कार्यरत आहेत. या योजनांची माहिती पुस्तिकांचे वाटपही शेतकरी वर्गाला व मच्छिमार बांधवांना या कार्यशाळांतून केले जाणार आहे. या कार्यशाळेस तालुक्यांतील अधिकाधिक शेतकऱ्यांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबईवारी केल्यानंतर ‘तो’ तरुण परतला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

रौलेट या ऑनलाइन जुगारात ८० हजार रुपये हरल्यानंतर पैशांचा तगदा सुरू झाल्याने बेपत्ता झालेला राहुल सेवकराम दर्डा हा तरुण मुंबई फिरून रविवारी (दि. २९) रात्री घरी परतला.

राहुलचे अपहरण झाल्याचा संशय असलेला हर्षल सदाशिव गाडेकर हा तरुण मात्र पोलिस कोठडीतच आहे. त्याच्या कोठडीची मुदत मंगळवारी (दि. १) संपणार आहे. राहुल परतल्याने आता हॅर्षलीची सुटका होऊ शकते. हर्षल आणि राहुल हे एकाच परिसरात राहतात. ओळखीतूनच हर्षलने राहुलला जवळपास ८० हजार रुपये दिले होते. कॉलेजरोडवरील एका कपड्याच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करणाऱ्या राहुलने हे पैसे रौलेट नावाच्या जुगारात उडविले.

साधारणत: वर्षभरापूर्वीची ही गोष्ट असून, यानंतर हर्षलने वेळोवेळी राहुलकडे पैशांचा तगदा केला. राहुल गुरुवारी (दि. २६) अचानक कामावरून बेपत्ता झाला. चौकशी करण्यासाठी हर्षल त्याच्या घरी गेला. सेवकराम दर्डा यांच्याशी चर्चा करताना त्याने आपण ब्राह्मणाकडे चौकशी केली असून, राहुल दोन दिवसांत परत येईल, असा दिलासा सेवकराम यांना दिला. मात्र, यामुळे राहुल कोठे आहे याची हर्षलाला पूर्ण माहिती असल्याचा ग्रह सेवकराम यांनी करून घेतला. दोन दिवसांनंतरही राहुल घरी न परतल्याने त्यांनी थेट सरकारवाडा पोलिस स्टेशन गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत हर्षलला अटक केली. कोर्टाने त्यास १ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. मात्र, राहुलबाबत कोणतीच माहिती नसल्याचे हर्षलने चौकशीदरम्यान स्पष्ट केले. पोलिसांचा तपास सुरू असताना राहुल रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घरी परतला. याबाबत अपहरण झाले असा संशय असलेला राहुल मुंबई येथे निघून गेला होता. पैशांचा तगदा वाढल्याने त्याने हे कृत्य केले, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images