Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कामगार दिनीच आयुक्तांकडून ‘हजेरी’!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेचे आयुक्त कोणत्या ना कोणत्या कारणाने कायमच चर्चेत राहिले आहेत. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी प्रत्येक आस्थापना या आपल्या कर्मचाऱ्यांना गुणवंत कामगार पुरस्कार देऊन सन्मानित करीत असतात. मात्र, नाशिक महापालिकेच्या आयुक्तांनी महाराष्ट्र दिनीच कर्मचाऱ्यांची 'हजेरी' घेतली. यामुळे महापालिकेत नाराजीचा सूर आहे.

महाराष्ट्र दिनी महापालिकेतील कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची प्रथा आहे. मात्र, आयुक्त मुंढे यांनी आपल्या वेगळ्या शैलीत महापालिकेच्या कामगारांना फैलावर घेतल्याचे समजते. ध्वजारोहण झाल्यानंतर तुकाराम मुंढे म्हणाले की, तुम्हाला काम सुधारण्यासाठी अडीच महिन्यांची संधी दिली होती. परंतु, सुधारणा दिसून आली नाही. त्यामुळे कारवाई करावी लागणार आहे. येत्या सात दिवसांत कामात बदल झाला नाही तर दोषी कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई केली जाईल, असा सज्जड दम त्यांनी भरला.

कपड्यांवरून कानउघडणी

त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना पारंपरिक गणवेशात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. त्यातील बहुतांश कर्मचारी पारंपरिक वेशात हजर होते, मात्र आयुक्तांनी कपड्यांना नावे ठेवत शर्ट असाच आहे, पँट खराबच आहे अशी कारणे देत कर्मचाऱ्यांची कान उघडणी केली. चित्रपटात शोभेल अशी ओळख परेड घेऊन अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. अधिकारी व कर्मचाऱ्यांना काळ्या रंगाचे बूट घालून येण्यास सांगितले होते. मात्र काही कर्मचाऱ्यांनी लेस नसलेले शूज घालून आल्याने त्यांच्यावरही आयुक्तांनी तोफ डागली. यापुढे लेस असलेलेच शूजच घालावे असा दम दिला. ज्या अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या हातात अंगठ्या आहेत त्या अंगठ्या काढून येण्यास सांगण्यात आले. ज्यांच्या गळ्यात सोन्याच्या चेन आहेत अशांनीदेखील त्या बाहेर काढून याव्यात असे सांगितले. आपली श्रीमंती महापालिकेच्या बाहेर दाखवा, असेही ते म्हणाले. त्यामुळेच सफाई कामगारापासून ते अधिकाऱ्यांपर्यंत एकाही व्यक्तीने अंगठी घालण्याचे धाडस बुधवारी केले नाही.

शिस्त लावूनच जाईन!

तुम्हाला शिस्त लावूनच मी येथून जाईन. माझी एक वर्ष तरी कुणी बदली करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तुम्हाला कोणाकडे तक्रार करायची असल्यास खुशाल करा. मी घाबरणार नाही. तुमच्यावर कारवाई करणारच, असेही सांगितले. त्यामुळे महापालिकेचे आयुक्त हुकुमशाही करीत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे असून, त्यांच्यात नाराजीचा सूर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांना घेराव

0
0

\Bम. टा. प्रतिनिधी , नाशिक

\Bदिवाळीपासून कामावरून कमी करण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसह शोषण होत असल्याच्या भावनेने कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्रदिनी ध्वजारोहण कार्यक्रमासाठी उपस्थित पालकमंत्री गिरीश महाजन यांना विविध मागण्यांसाठी घेराव घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी या कर्मचाऱ्यांना अडविल्याने त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या दिला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून साखळी पद्धतीने बेमुदत उपोषण छेडले आहे.

दिवाळीच्या कालावधीत नऊ कंत्राटी कर्मचाऱ्यांना तोंडी आदेशान्वये कामावरून कमी करण्यात आल्याचा आणि साडेतीनशे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे अत्यल्प वेतनावर शोषण केले जात असल्याचा आरोप महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कंत्राटी कामगार संघटनेने केला आहे. या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याबाबत विद्यापीठ प्रशासनासोबत चारदा चर्चा झाली आहे. यातून ठोस निर्णय होत नसल्याने आणि प्रशासनानेही त्याची दखल घेतली नसल्याने कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्याची भावना आहे. तसेच महाजन यांनी हा प्रश्‍न लवकरात लवकर सोडवला जाईल, असे आश्‍वासन दिले होते. तरीही त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप संघटनेने केला आहे. गत पाच महिन्यांपासून कामबंद आंदोलन करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे संघटनेच्या वतीने बेमुदत साखळी उपोषणाची घोषणा करण्यात आली आहे. कामावरून काढून टाकलेल्या ९ कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घ्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार समान कामाला समान वेतन देण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. उपोषणादरम्यान, कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्यास विद्यापीठ प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऐन उन्हाळ्यात ‘वॉटर वेंडिंग मशिन’ बंद

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड रेल्वे स्थानकातील शुद्ध आरओ पाणी देणारे वॉटर वेंडिंग मशिन्स ठेकेदाराकडून व्यवस्थित चालवले जात नसल्याने ऐन उन्हाळ्यात हाल होत असल्याची प्रवाशांची तक्रार आहे. सहा वॉटर वेंडिंग मशिन्सना मान्यता असताना प्रत्यक्षात दोनच मशिन्स कार्यरत आहेत. तीदेखील व्यवस्थित चालवली जात नाहीत. टवाळखोरांनी काड्या घातल्याने एका मशिनची कॉइन टाकून पाणी घेण्याची सुविधाच बंद आहे. प्लॅटफार्म एकवरील मशिन दुरुस्तीच्या नावाने नेले ते आलेलेच नाही.

नाशिकरोड स्थानकात प्लॅटफार्म एक तर दोनवर दोन वॉटर वेंडिंग मशिन होते. एकवरील मशिन दुरुस्तीस नेले परंतु, ते अजूनही आलेले नाही. प्लॅटफार्म दोनवर दोन मशिन आहेत. अत्यंत कमी दरात स्वच्छ पाणी देणारी ही मशिन्स ठेकेदार चालवतो. मशिन्सची प्रत्येकी चार ते पाच हजारांची वीजबीले होती. ठेकेदाराने ती तीन चार महिन्यांपासून भरली नव्हती. प्रशासनाने वीजपुरवठा खंडित केल्यानंतर ठेकेदाराने बिले भरली व मशिन्स पुन्हा सुरू झाली.

नाशिकरोडसह मनमाड, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, देवळाली या स्थानकांमध्ये ही मशिन्स आहेत. प्रवाशांना शुद्ध पाणी अत्यंत कमी दरात उपलब्ध मिळते. फन्टुस कंपनीने ही मशिन्स बसविली आहेत. नाशिकरोडच्या प्लॅटफॉर्म एक आणि दोनवर प्रत्येकी दोन मशिन्स बसविण्यात आली आहेत. सर्वात मोठ्या प्लॅटफार्म क्रमांक चारवर एकच मशिन आहे. कारण तेथे प्रवासी गाड्या थांबत नाहीत. या मशिन्सची वैशिष्ट्य म्हणजे पाण्याचा पुनर्वापर करण्यात आला आहे.

दोन टोकांना दोन मशिन

वॉटर वेंडिंग मशिनची सेवा चोवीस तास सुरू ठेवण्याची गरज आहे. परंतु, तसे होत नाही. रेल्वेगाडी आल्यावर प्रवाशांची पाणी घेण्यासाठी गर्दी होते. पाणी थंड नसते. प्लॅटफार्म एकवरील वेंडिंग मशिन दुरुस्तीच्या नावाने नेले ते आलेच नाहीत. रेल्वेने या मशिन्ससाठी जी जागा दिली ती स्थानकाच्या दोन टोकांना आहे. पाणी भरुन घेईपर्यंत गाडी सुटते. त्यामुळे प्रवाशांना मशिनचा लाभ होत नाही. अनेक प्रवाशांना अशी सुविधा असल्याचा पत्ताच नाही. प्लॅटफार्म दोनवरील एका मशिनमधील नाणे टाकून पाणी घेण्याची यंत्रणा बंद आहे. नाणे टाकण्याच्या जागी टवाळखोरांनी काड्या व पुठ्ठे टाकले आहेत. या मशिनचा पार्ट मिळत नसल्याने ती कधी सुरू होईल, ते सांगता येत नाही. मशिन दूरवर असल्याने दिवसाला शंभर लिटरपर्यंत पाणी विक्री होते. मशिन गर्दीच्या ठिकाणी ठेवले तर प्रवाशांचेही हाल टळतील आणि ठेकेदारालाही परवडेल.

परवडणारे दर

तीनशे मि. ली. आरओ पाणी स्वतःची बाटली असेल तर एक रुपयाला आहे. बाटलीसह पाणी दोन रुपयाला आहे. पाचशे मि. ली. पाणी तीन व पाच रुपयांना आहे. एक लिटर पाणी स्वतःची बाटली असेल तर पाच रुपये व बाटलीसह विकत घेतल्यास आठ रुपयांना आहे. दोन लिटर पाणी आठ व बारा रुपयांना आहे. पाच लिटर पाणी वीस व पंचवीस रुपयांना आहे. खासगी विक्रेते एक लिटर पाण्याच्या बाटलीचे वीस रुपये घेतात. शिवाय हे पाणी शुद्ध असेलच याची खात्री नाही. बाटलीवर छापील किंमत पंधरा रुपये असताना वीस रुपये आकारले जातात. वेंडिंग मशिनवर एक लिटर पाणी पाच रुपयांना आहे.

जीवाशी खेळ थांबवा

प्रवासातील पाणी पिऊन आजारी पडणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. ज्यांना वॉटर वेंडिंग मशिनचे पाणी नको असेल त्यांना जलकुंभाचे पाणी मोफत मिळते. पण सर्वच स्थानकांतील जलकुंभांची स्वच्छता नियमित होत नसल्याने प्रवासी आजारी पडू शकतात. वॉटर प्युरिफायरमुळे आजाराला प्रतिबंध होतो. नाशिकरोड आणि देवळाली कॅम्पसारख्या महत्त्वाच्या स्थानकांमध्ये मोठा जलकुंभ आणि वॉटर स्टँड आहेत. गाडी आल्यावर प्रवाशी रुळावरुन उड्या मारुन जलकुंभावर गर्दी करतात. रुळ ओलांडणे गुन्हा आहे. अपघातही होऊ शकतो, हे माहित असूनही ते पाण्यासाठी स्वतःच्या जीवाशी खेळतात. सर्व वॉटर वेंडिंग मशिन मोक्याच्या जागी लावले तर अपघात टळू शकेल.

वॉटर वेंडिंग मशिन गर्दी असलेल्या ठिकाणी लावावीत. पाणी थंड मिळत नाही. मशिनवर चोवीस तास सुरू कर्मचारी नसतो. दुपारी गर्दीच्या वेळी तरी तो असावा. काही प्रवासी पारंपरिक जलकुंभांचा उपयोग करतात. जलकुंभांची नियमित स्वच्छता करावी.

-अविनाश झोडगे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवशाही बसची ‘स्लिपर कोच’ सेवा

0
0

नाशिक-नागपूर मार्गावर धावणार दोन बसेस

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिवशाहीच्या वातानुकूलित बसनंतर राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात आता स्लिपर कोच बस दाखल झाल्या आहे. या बस नाशिक-नागपूर मार्गावर धावणार आहेत. येत्या काही दिवसात त्यांचे टाइम टेबल जाहीर केले जाणार आहे.

नाशिकहून विविध मार्गावर चेअर कार असलेल्या ६० हून अधिक शिवशाही बसेस यापूर्वी धावत आहेत. त्यास प्रवाशांकडून मिळालेल्या प्रतिसादानंतर आता स्लिपर कोच सुरू करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. पुण्यानंतर नाशिकमध्ये या बोस दाखल झाल्या आहेत. नागपूर मार्गे धावणाऱ्या या बसचे भाडे १५०० रुपयाच्या आसपास असणार असून सायंकाळी ६.३० वाजता ही बस सोडण्याचे एसटीचे नियोजन आहे. नाशिकहून मालेगाव, धुळे, जळगाव, खामगांव, अकोला,अमरावती असे या बसचे थांबे असतील. ही बस १३ तासात नागपूरला दाखल होईल. नाशिकमध्ये या दोन बस असून एक नाशिकहून सुटेल तर दुसरी नागपूरवरून सोडण्यात येणार आहे.

बसमध्ये विविध सुविधा

एअर सस्पेन्शन असलेल्या या स्लिपर कोचमध्ये विविध सुविधा देण्यात आल्या आहे. यात चार्जर लावण्यापासून, आरामदायी बेड असल्यामुळे प्रवाशांना सुखद प्रवासाचा आनंद घेता येणार आहे. तसेच या बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत.

रेल्वेला पर्याय

नाशिकहून नागपूरला जाण्यासाठी रेल्वेचा पर्याय होता. त्यामुळे एसटीच्या या बसेला चांगला प्रतिसाद मिळेल, असे एसटीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सायंकाळनंतर या बसेस असल्यामुळे रात्रीतून या बसमधून प्रवास करून सकाळी नागपूरला जाता येणार आहे.

३० प्रवाशांची सुविधा

नागपूर बसमध्ये ३० स्लिपर कोच असून एकावेळेस या प्रवाशांना आरक्षण करून ही सुविधा मिळणार आहे. त्यामुळे नागपूरला जाणाऱ्यांसाठी सुरुवातीच्या काळात वेटींगची संख्याही वाढणार आहे.

लोगो : शुभवार्ता ........ फोटो : सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रघुवीरांच्या जयघोषाने दुमदुमले शहर

0
0

श्री क्षेत्र जांब समर्थच्या समर्थ पादुकांचे आगमन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

श्री समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मस्थान असलेल्या श्री क्षेत्र जांब समर्थ मठातील पाद्यपूजा आणि भिक्षाफेरीच्या प्रथम दौऱ्यांतर्गत समर्थांच्या पादुकांचे आगमन शहरात मंगळवारी मोठ्या उत्साहात झाले. या दौऱ्यात ६ मेपर्यंत दररोज शहराच्या विविध भागात या पादुका दर्शनार्थ ठेवण्यात येणार आहेत. या कालावधीत विविध धार्मिक उपक्रम होतील. या पादुका गुरुवारी (दि. ३) नाशिकरोड आणि देवळाली परिसरात असणार आहेत.

पादुकांचा मुक्काम नाशिक-पुणेरोडवरील श्री संत सद‌्गुरू सिद्ध दिगंबर गणेश महाराज समाधी मंदिर येथे असणार आहे. मुक्कामस्थळी सकाळी ६ ते ८ काकड आरती व श्री पादुकांची पंचामृत अभिषेक पूजा, सकाळी ८ ते १२ ठरवून दिलेल्या मार्गावर सांप्रदायिक भिक्षा, दुपारी १२ ते १२.३० आरती, सायंकाळी ८ ते १२ दैनंदिन उपासना, सायंकाळी ७ ते ७.३० आरती, रात्री ८ ते ९.३० या वेळेत रामदासी कीर्तन असे उपक्रम होणार आहेत. या पादुका बुधवारी तारवालानगर, कलानगर, दिंडोरीरोड या परिसरात होत्या. नाशिकरोड, देवळालीगांव परिसर गुरुवारी (दि. ३) सिडको परिसरात शुक्रवारी (दि. ४) राजीवनगर, इंदिरानगर या परिसरात शनिवारी (दि. ५) तर श्री संत सद‌्गुरू सिद्ध दिगंबर गणेश महाराज समाधी मंदिर, जनरल वैद्य भाभानगर या परिसरात रविवारी (दि. ६) पादुका दर्शनार्थ असणार आहेत. या काळात सेवा घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या भाविकांनी मकरंद जोशी (९९७०१५८०१३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री समर्थ मंदिर संस्थान जांब समर्थचे उपाध्यक्ष बाबासाहेब तांगडे, समर्थ भक्त स्वप्नील रामदासी आणि समर्थभक्त रवींद्र जोशी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकासकामांना आचारसंहितेचा फटका

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे शहरात आचारसंहिता लागू झाली असून, त्याचा फटका विकासकामांना बसला आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत होणारी कामे रखडली असून, ती सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी महापालिकेने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

स्मार्ट सिटीअंर्तगत शहरात विविध प्रकारची कामे करण्यात येणार असून, त्यात सायकल शेअरिंग, स्मार्ट रोड, मलनिस्सारण प्रकल्प, २४ तास पाणीपुरवठा या कामांचा समावेश आहे. मात्र, सध्या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता सुरू असल्याने या कामांच्या ऑर्डर देता येत नसल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. नाशिक महापालिका येत्या काही दिवसांत शहरातील नागरिकांना २४ तास पाणीपुरवठा करणार होती. मात्र, कायदेशीर अडचण आल्याने हे काम थांबविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शहराच्या काही भागात व नाशिक महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या खेड्यांमध्ये प्रामुख्याने रस्त्यांचे काम करण्यात येणार होते. मात्र, या कामालादेखील विलंब होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मलनिस्सारण प्रकल्पदेखील रखडला आहे. शहरातील नागरिकांनी जास्तीत जास्त सायकलींचा वापर करावा यासाठी शहरातील काही भागांमध्ये सायकल शेअरचा उपक्रम राबविण्यात येणार होता, याची प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी आचारसंहितेचा यालाही फटका बसला आहे. अशोकस्तंभ ते मुंबई नाका असा स्मार्ट रोड करण्यात येणार होता. मात्र, याचेही काम निवडणुकीमुळे थांबले आहे. अनेक कामांच्या निविदा तयार आहेत. मात्र, त्या पुढे जाऊ शकत नाहीत. महत्त्वाची कामे पुढे काढावीत, यासाठी नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेकडे परवानगी मागितली आहे. याबाबत जिल्हा प्रशासनानेही महाराष्ट्र निवडणूक अधिकारी यांच्याकडे विचारणा केली आहे. याबाबत अद्याप निर्णय झालेला नसल्याने विकासकामांना खीळ बसली आहे. जोपर्यंत आचारसंहिता उठत नाही तोपर्यंत कोणतीही विकासकामे करता येणार नाहीत, असे महापालिकेच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसंत व्याख्यानमाला

0
0

वसंत व्याख्यानमाला : पंचवटी

अरुण दाते यांनी आवडेल त्याच गितांचे गायन केले

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

'भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी' हे गीत फारच बाळबोध असल्याचे अरुण दाते यांनी रेकॉर्डिंगपूर्वी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. मात्र, यशवंत देव यांनी हे गीत गाण्यास सांगितले, त्यातूनच अजरामर गीताची निर्मिती झाली. अरुण दाते यांनी फक्त ११५ गायन केले आहे, त्यांना आवडेल त्याच गीतांचे गायन केले, असे प्रतिपादन अतुल दाते यांनी केले.

९७ व्या नाशिक वसंत व्याख्यानमालेत बुधवारी लोकशाहीर गजाभाऊ बेणी स्मृती व्याख्यानात 'सफर भावगीतांची' या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. यशवंतराव महाराज देवमालेदार पटांगण येथे झालेल्या व्याख्यानप्रसंगी चंद्रशेखर शहा, संगीता बेणी, मधुकर झेंडे आदी उपस्थित होते.

अतुल दाते म्हणाले, की अरुण दाते यांना कुमार गंधर्व यांनी गझल शिकविली. मंगेशकर कुटुंबीयांशी फार जुने संबंध होते. लतादीदींनी अरुण दाते यांच्यासोबत 'संधिकालिया अशा' असे एकच युगल गीत गायले. या गीताच्या रेकॉर्डिंगच्या वेळी लतादीदींच्या पायाला दाते यांनी स्पर्श केला, तेव्हा त्यांचा हात थंड लागला, तेव्हा दीदींनी त्यांना विचारले, तेव्हा ते म्हणाले तुमच्या समोर सर्वच थंड होतात, माझा तर फक्त हात थंड झाले आहेत. दाते मूळचे कोकणातले असून त्यावेळी त्यांचे आडनाव दीक्षित होते.

मंदार आपटे यांनी गायलेल्या 'श्रीराम जय राम जय जय राम' या भक्तीगीताने सुरवात झाली. 'स्वर गंगेच्या काठावरती वचन दिले तू मला', 'तिने बेचैन व्हावे', 'या जन्मावर शतदा प्रेम करावे' आदी गीतांचे सादरीकरण केले. विद्या कुलकर्णी यांनी सहगायन केले. अरुण दाते यांचे अनेक अनुभव चित्रफितीच्या माध्यमातून दाखविण्यात आले. प्रा. मानसी देशमुख यांनी मुलाखत घेतली. हेमंत देवरे यांनी सूत्रसंचालन केले. विश्वास मदाने यांनी प्रास्ताविक केले. अॅड. अजय निकम यांनी परिचय करून दिला.

..

'कलाकाराने स्वतःचा

बॅलन्स ठेवला पाहिजे'

पंचवटी : चित्रपट सृष्टीत कोणत्याही कलाकृतीचे भवितव्य कुणी सांगू शकत नाही. कलाकृतीचे यश आणि अपयश याच्यामधली जागा कलाकाराने ठरवायची असते. कलाकाराला स्वतःला बॅलन्स ठेवता आले पाहिजे, असे मत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने व्यक्त केले.

९७ व्या नाशिक वसंत व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पातील मुलाखतीत ती बोलत होत्या. यशवंतराव महाराज देवमामलेदार पटांगणावर पंडित दामोदर सोनार या ज्येष्ठ नागरिकाच्या हस्ते व्याख्यानमालेचे उद्घाटन करण्यात आले. निवृत्त आयुक्त विलास ठाकूर, चंद्रशेखर शहा, उषा तांबे आदी उपस्थित होते.

सोनाली कुलकर्णी म्हणाली, वडील मराठी आणि आई पंजाबी असल्यामुळे माझ्यावर मराठी आणि पंजाबी असे दोन्ही प्रकारचे संस्कार झाले. आर्मीच्या शाळेत हिंदी आणि इंग्रजी भाषा शिकली. वडील आणि नातेवाइकांकडून मराठी तर आईकडून पंजाबी शिकले. जी काही घडले त्यात सर्व कुटुंबीयांचे श्रेय आहे. अभिनय शिकण्यासाठी कुठल्याही शिबिरात गेले नाही. कोणत्याही कलेचे शिक्षण घेतले नाही. आर्मीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात आई सहभाग घ्यायची. त्यामुळे कलेचे संस्कार माझ्यात आले आहे. नृत्यावर माझे पहिले प्रेम आहे. नृत्यात स्वतःला हरवून जाता येते. टीव्हीवरच्या पहिल्या मालिकेत अभिनेते विक्रम गोखले यांच्याकडून मराठी बोलण्याचे आणि अभिनयाचे धडे मिळाल्याने मालिकेचे दडपण आले नाही.

हिंदी चित्रपटात प्रोफेशनलपणा जास्त आहे. तर मराठी चित्रपटात घरात असल्यासारखे वाटते. तंत्रज्ञानात फरक नाही. हिंदीतील मोठे निर्माते मराठीत येत आहेत. जगभरात मराठी चित्रपट बघितले जात आहेत. वेळ देता येईल तेव्हा मराठी रंगभूमीवर नाटकात काम करण्याचा प्रयत्न करील. चित्रपटातील प्रत्येक व्यक्तीरेखा बरेच काही देऊन जाते. नटरंग चित्रपटाने लोककलेशी जोडले. मराठी संस्कार झाले ते महत्वाचे आहे. अंजिठा चित्रपटाने भरपूर अनुभव दिले. हंप्पीने इंटरनॅशनल लेव्हलचा दर्जा दिला.

पहिला चित्रपट केला तेव्हा मला मराठी नीट बोलता येत नव्हते. इंग्रजी पुस्तकांचे वाचन होते. मात्र, मराठी वाचन कमी होते. वाचनाशिवाय पर्याय नाही. पुस्तकातून अनुभव मिळतो. मानसशास्त्राचे पुस्तके वाचनात रस आहे. (कै.) मुरलीधर खैरनार यांनी लिहिलेल्या 'शोध' या कादंबरीची सध्या वाचन करीत आहे. त्या कादंबरीतील नायिकेची भुमिका साकारण्यास आवडेल अशी इच्छा सोनालीने व्यक्त केली.

आनंद क्षेमकल्याणी आणि मनीषा क्षेमकल्याणी यांनी मुलाखत घेतली.

दरम्यान, तत्पूर्वी नाशिक वसंत व्याख्यानमालेचे संस्थापक न्या. महादेव गोविंद रानडे, रावसाहेब वझे, जगद्गुरू डॉ. शंकराचार्य कुर्तकोटी, द. बा. टकले गुरुजी, ना. ह. पाटील, भगवान कृष्ण पानसे, भक्तराज महाराज यांना आदरांजली वाहण्यात आली. साहेबराव गुंजाळ यांच्या 'शाळा आणि मळा' या निसर्ग कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. संगीता बाफणा यांनी सूत्रसंचालन केले. विजय हाके यांनी स्वागत केले. श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक केले. अरुण शेंदुर्णीकर यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पस्तीस हजार माहितीपत्रिका शाळांना सुपूर्द

0
0

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दहावीच्या निकालाचा अवधी जसजसा जवळ येतो आहे तसतसे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेवरही विद्यार्थी व पालकांचे लक्ष वाढते आहे. दुसरीकडे शिक्षण विभागानेही या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यापासून माहिती देणाऱ्या माहितीपत्रिका शिक्षण विभागाने शाळांना देण्यास सुरुवात होणार आहे. सुमारे ३५ हजार माहितीपुस्तिका शिक्षण विभागाकडे उपलब्ध आहेत.

महापालिका हद्दीतील ५७ शैक्षणिक संस्थांमध्ये सुमारे २७ हजार जागा अकरावीच्या प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील शाळांना माहितीपत्रिका वितरित करण्यास बुधवारपासून सुरुवात झाली आहे. ज्या शाळा या प्रक्रियेचा भाग असतील त्यांनी शिक्षण विभागाकडून शाळेच्या माहितीपत्रिका घेऊन जाव्यात, असे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने शाळांसाठी सूचना काढून केले जाणार आहे.

महापालिका हद्दीत एसएससी बोर्डाचे २५ हजार विद्यार्थी आहेत. तर सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचे १५०० विद्यार्थी आहेत. याशिवाय महापालिका हद्दीशेजारील शाळांसाठी ३ हजार माहितीपत्रिका छापण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना या माहितीपुस्तिका ५ मेपर्यंत वितरीत करण्याचे शिक्षण विभागाचे उद्दिष्ट आहे. अकरावी प्रवेशेच्छुक प्रत्येक विद्यार्थ्याच्या १० मेपर्यंत हाती ही माहितीपत्रिका मिळेल, असे नियोजन असणार आहे. विद्यार्थ्यांनी या माहितीपत्रिकेतील प्रक्रिया २० मेपर्यंत समजावून घेतल्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात माहितीच्या पडताळणीस सुरुवात होणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली.

लोगो : शाळा / कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ग्राहकहितासाठी सकारात्मक बदल गरजेचादीपक

0
0

ग्राहकहितासाठी सकारात्मक बदल गरजेचा

दीपक कुमठेकर यांचे आवाहन; महावितरणमध्ये कामगारांचा गौरव

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

'अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातुन कर्मचारी व ग्राहकांच्या सुविधांसाठी महावितरण सातत्याने सकारात्मक बदल करीत आहे. वीज ग्राहक, कंपनी आणि कामगार या घटकांच्या हितासाठी कामगारांनी या बदलांचा स्विकार करून तंत्रज्ञानावर आधारीत कामकाज करावे,' असे आवाहन महावितरणच्या नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले.

जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त महावितरणच्या नाशिक परिमंडळातील गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार समारंभात दीपक कुमठेकर बोलत होते. महावितरणच्या नाशिक परिमंडळ कार्यालयात प्रथम त्यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. महावितरण आपल्या कर्मचाऱ्यांचे दैनंदिन कामकाज अधिक सुलभ करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढवीत आहे. ग्राहकांच्या मोबाइल क्रमांकांची नोंदणी करून त्यांना मीटर रिडिंग, वीजबिल, वीज बंद आदींची माहिती एसएमएसद्वारे आगाऊ कळविण्यात येत असल्याने कामगार व ग्राहकांमधील विवाद कमी होत आहेत. कर्मचारी पोर्टल व मोबाइल अॅप यातून वैयक्तिक व कार्यालयीन कामे कर्मचाऱ्यांना एका क्लिकवर उपलब्ध झाली आहेत. कर्मचाऱ्यांनी या बदलांचा स्वीकार करून उपलब्ध सुविधा अनिवार्यपणे वापराव्यात, अशी अपेक्षा कुमठेकर यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमास अधीक्षक अभियंता अनिल बोरसे, कार्यकारी अभियंते मनीष ठाकरे, धनंजय आहेर, सुरेश सवाईराम, अनिल थोरात, राजाराम डोंगरे, मानव संसाधन विभागाचे सहायक महाव्यवस्थापक प्रवीण बागुल, व्यवस्थापक मंगेश गाडे यांच्यासह अभियंते, अधिकारी, गुणवंत कर्मचारी, कामगार संघटना प्रतिनिधी उपस्थित होते. उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. जनसंपर्क अधिकारी विजयसिंह दुधभाते यांनी उपस्तिथांचे आभार मानले.

पुरस्कारप्राप्त कर्मचारी

कांतीलाल पाटील (उपकार्यकारी अभियंता), प्रकाश भोये (सहायक अभियंता), गणेश हिरसे (प्रधान तंत्रज्ञ), प्रभाकर वाळुंज, तुकाराम भोर, शशिकांत पवार, रमेश हिरे, रमेश जाधव, विक्रम ढोकणे, स्वप्नील मोकाशे, नितीन घुगे, योगेश ढेरिंगे, कमलेश पाटील, विष्णू हडपे, भगवान गोळेसर, गणेश व्यवहारे, अरुण मेढे, नामदेव पवार, राजाराम हिरे, राकेश मुत्यालवार, विष्णू रकिबे, पंडित खैरनार, मुकुंदा कदम, शशिकांत जाधव, सतीश मुगल, वाल्मिक काळे, झुंबर वाघ, सुभाष दळवी, सचिन पवार, चंद्रकांत अहिरे, संदीप गांगुर्डे, गजानन चांडले, राजेश पाडावे, संजय सोनवणे, धर्मा पाटील, काळू शेळके, सचिन पाटील, देवेंद्र खैरनार, हिरामण वाघ, मोहन पवार, प्रदीप देवरे, ढवळू जोपाळे, मनोज भदाणे, मंगेश घायाळ, गिरीश अहिरराव, गणेश सूर्यवंशी, शिवाजी अहिरराव.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड येथील तरुणाचा मंगळवारी सायंकाळी उशीरा धावत्या रेल्वेतून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. गणेश कराड (वय २३) असे या तरुणाचे नाव असून, तो मनमाड न. प. शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती व बुधलवाडी येथील सामजिक कार्यकर्ते राजेंद्र कराड यांचा मुलगा आहे. गणेश नाशिकहून मनमाडला येत असतांना मंगला एक्स्प्रेसमधून पडून त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. मनमाड-मुंबई रेल्वे मार्गावर आश्विन नगर जवळील पोलजवळ हा अपघात घडला. रेल्वे पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे. गणेशच्या पश्चात आई-वडील, लहान भाऊ असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काव्यलेखन स्पर्धेत ‘मातीतल्या बीया’ प्रथम

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड-शतकोत्तर वाटचाल करणाऱ्या आणि आपल्या अभिनव उपक्रम आणि कार्यक्रमांनी सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटविणाऱ्या मनमाड सार्वजनिक वाचनालयाचा १०४ वा वर्धापनदिन नुकताच साजरा झाला. यावेळी झालेल्या काव्यलेखन स्पर्धेत कवी रवींद्र दळवी यांच्या 'मातीतल्या बिया' या कवितेला प्रथम क्रमांक मिळाला.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मनमाड शहरातील ज्येष्ठ समाजसेवक डॉ. सी. एच. बागरेचा, मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा, माजी अध्यक्ष सुरेश शिंदे, कवी प्रदीप गुजराथी, ज्येष्ठ संचालक नरेश गुजराथी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य स्व. विं. दा. करंदीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वाचनालयातर्फे खुल्या काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचे संयोजक व कवी प्रदीप गुजराथी यांनी या स्पर्धेचा वृत्तांत सादर केला. संचालक नरेश गुजराथी व कल्पेश बेदमुथा यांची वाचनालयाच्या वाटचाली संबंधी माहिती दिली. नाशिक येथील कवी रवींद्र दळवी यांच्या 'मातीतल्या बियाला' या कवितेला प्रथम क्रमांक देण्यात आला. काव्यलेखन स्पर्धेसाठी ८० पेक्षा जास्त कवितांसह कवींनी सहभाग घेतला होता. वाचनालयातर्फे रोख स्वरुपात तसेच पुस्तक व गौरवपत्र रुपाने या विजेत्यांचा गौरव करण्यात आला. डॉ. बागरेचा यांनी आपल्या सामाजिक जीवनात ३० वर्षांपेक्षा जास्त कालावधी मनमाड सार्वजनिक वाचनालयात नि:स्वार्थ सेवा दिली म्हणून त्यांचा देखील गौरव मानपत्र देवून वाचनालयातर्फे सत्कार करण्यात आला. कवी विजय बागुल यांनी वाचनालयास सहा पुस्तकांची भेट दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपीचे सीईओ घेणार व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा

0
0

तालुकास्तरीय आढाव्यास ७ मेपासून सुरुवात

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी तालुकास्तरीय यंत्रणेचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. येत्या ७ मे पासून तालुकास्तरीय आढावा बैठकींचे आयोजन करण्यात आले आहे.

या आढावा बैठकीत प्रत्येक विभागाचा सविस्तर आढावा घेण्यात येणार असून केंद्र व राज्य सरकारच्या ध्वजांकित कार्यक्रमांकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते हे विविध विषयांबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे नियमित आढावा घेत असून, सर्व योजना तसेच कामे विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र जिल्हास्तरावर सर्व यंत्रणेचा आढावा घेणे शक्य नसल्याने तालुकास्तरीय यंत्रणेतील सर्व घटकांचा आढावा घेण्यासाठी या तालुकास्तरावर आढावा बैठकींचे आयोजन करण्यात आले आहे.

विविध विभागांचा आढावा घेणार

या आढावा बैठकीत सर्व खातेप्रमुख, ग्रामसेवक, पर्यवेक्षीय यंत्रणेला उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या आढावा बैठकीत कुपोषण, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, वृक्ष लागवड, घरकुल योजनेतील अपूर्ण बांधकामे, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेली कमी, अपूर्ण कामे यांचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, कृषी विभाग, ग्रामपंचायत विभाग, समाजकल्याण विभाग, महिला बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पाणी व स्वच्छता विभाग या विविध विभागातील सर्व बाबींचा सविस्तर आढावाही घेण्यात येणार आहे. या बैठकीसाठी सर्व माहितीसह उपस्थित राहण्याचे आदेश सर्व संबंधिताना देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उनाड वनात उद्या पिकंल सोन्यांच रान…

0
0

कोनांबे, पाटपिंप्रीत पाणी फाउंडेशनच्या श्रमदानात ग्रामस्थांचा विश्वास

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वातंत्र्य मिळून ७० वर्ष झाली. पण आमची पाण्यासाठीची वणवण संपलेली नाही. देशाचा विकास झाला म्हणता मग आम्हाला पाण्यासाठी मरमर का करावी लागते? दिवस अन् महिने नाही तर पाणी वाहण्यात जिंदगी खर्च होत आहे. आता खूप झाले. कितीही श्रम उपसण्याची आमची तयारी आहे. विकासाची गंगा येईल तेव्हा येईल पाण्याची गंगा आम्ही दारात आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. साठीतील परिघा उगले पोटतिडकीने बोलत होत्या.

उगले यांची ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया असली, तरी सिन्नर तालुक्यातील पाटपिंप्री आणि कोनांबे गावातील प्रत्येक ग्रामस्थाने महाराष्ट्र दिनी कृतीमधून याचीच प्रचिती दिली. 'तुझ्या कामामधून तुझ्या घामामधून उद्या पिकंल सोन्याचं रान, चल उचल हत्यार गड्या होऊन तयार तुला नव्या जगाची आन' यांसारख्या स्फुल्लिंग चेतविणाऱ्या गीतांचे स्वर कानांमध्ये रूंजी घालत होते. भजनी मंडळाच्या अवीट भक्तीगीतांचा गोडवा भरउन्हातही मनाला उभारी देत होता. बाहेरचे लोक आपल्यासाठी श्रमदान करताहेत हे पाहून ग्रामस्थांनीही टिकाव फावडे उचलत श्रमाद्वारे भविष्यासाठी गुंतवणूक केली. कोनांबेत सकाळी सहा ते दहा तर पाटपिंप्रीत सायंकाळी चार ते सात या वेळेत पाच हजार बांधवांनी श्रमदान केले.

पाणी फाउंडेशनच्या अध्यक्षा किरण राव, सीईओ सत्यजित भटकळ, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे सीईओ नरेश गिते, बीजेएसचे नंदकिशोर साखला, प्रांताधिकारी महेश पाटील, अभिनेत्री अनिता दाते, तहसीलदार नितीन गवळी यांसह टाटा ट्रस्टसारख्या अनेक संस्थांच्या उच्च पदस्थांनी टिकाव फावडे हाती घेऊन श्रमदान केले. गुजरातसह मुंबई, पुणे, नाशिक येथील जलमित्रांनी यात सहभागी होऊन ग्रामस्थांनाही प्रेरीत केले. विशेष म्हणजे नितीन जाधव व जयश्री वामने या नव वर-वधुंनी बोहल्यावर चढण्यापूर्वी श्रमदानाला हजेरी लावली. तर भुवनेश्वर, चेन्नई येथून काही जलमित्र विमानाने मुंबईत आणि तेथून पाटपिंप्रीत श्रमदानासाठी आले.

कोनांबे-धोंडबार रस्त्यावरील निरपनी भागात डोंगर कुशीत कंटूर बांध तयार करण्यात आले. पाटपिंप्रीत डोंगर उतारावर पाणी आणि माती अडविण्याची व्यवस्था करण्यात आली. या श्रमदानाच्या निमित्ताने इंडिया व भारत एकत्रित होत असल्याची भावना माने यांनी व्यक्त केली. जलसंवर्धनासाठी गाव एकत्रित येणे ही विकासाची सुरवात असून, प्रशासनातर्फे सर्व सहकार्य करू, अशी ग्वाही राधाकृष्णन यांनी दिली.

-

मन भरून आले

श्रमदान शिबीरात ग्रामस्थांचे प्रेम मिळाल्याने मन भरून आल्याची भावना किरण राव यांनी व्यक्त केली. ग़्रामस्थांनी श्रमदानात सहभागी होऊन उत्साहाचे दर्शन घडविल्याने आजचा दिवस अधिक खास झाल्याचे त्या म्हणाल्या. शहरात आम्ही बुद्धिचे काम अधिक करतो. परंतु श्रमदानात शरीराने अधिक काम केले. त्यामुळे माझे शरीर आणि मन एक झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

-

श्रमदानासाठी तीन ते चार हजार लोकांनी ऑनलाइन नाव नोंदणी केली होती. प्रत्यक्षात त्याहून अधिक लोक सहभागी झाले. १० मीटरचे १३ बॉक्स दीड फुट खोल आणि दोन मीटर रुंद खोदण्यात आले होते. प्रत्येकी आठ व्यक्तींच्या ग्रुपला श्रमदानासाठी जागा निश्चित करून देण्यात आल्या. तेथील माती बाजूला टाकीत ०.८५ मीटर उंचीचा बांध तयार करण्यात आला. त्यासाठी टीकाव, फावडे, घमेल्यांचे ३५० संच उपलब्ध करून देण्यात आले.

-

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांचा वचक घटला

0
0

गावठी पिस्तुलासह एकास अटक; आतापर्यंत ५ पिस्तूल व १२ काडतुसे जप्त

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत गोरेवाडी गेटवर मंगळवारी (दि. १) रात्री अकरा वाजेच्या दरम्यान विजय भीमराव पगारे (वय २५, रा. नाईकवाडी, गोरेवाडी) या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराकडे आणखी एक गावठी पिस्तूल व एक काडतूस पोलिसांना आढळून आले.

वास्को चौक व सत्कार पॉईंट येथे गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या पाच सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्याचा प्रकार घडल्याने नाशिकरोड अवैध शस्त्रांच्या विक्रीचे केंद्र बनले असल्याचे उघड झाले आहे. या ठिकाणी शस्त्रांची खुलेआम खरेदी-विक्री होत असल्याने पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक कमी झाल्याचेही स्पष्ट झाले आहे.

विजय पगारे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, तो राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक हरिष भडांगे यांचा आतेभाऊ असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

अवघ्या दोन आठवड्यांच्या कालावधीत नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत तब्बल पाच गावठी पिस्तूल आणि १२ काडतुसे आढळून आली आहेत. विशेष म्हणजे आजी माजी नगरसेवकांच्या नात्यातील युवकांचाच या शस्त्र खरेदी-विक्रीच्या रॅकेटमध्ये सहभाग आहे.

 या कारवाईत पोलिसांच्या जाळ्यात अडकलेला विजय भीमराव पगारे याच्यावर नाशिकरोड पोलिस ठाण्यात काही दिवसांपूर्वीच आर्म ॲक्टखाली गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात विजय पगारे याने नाशिकरोड पोलिसांना चकवा देण्यात यश मिळविले होते. नाशिकरोड पोलिस त्याच्या मागावर असतांनाच विजय पगारे मंगळवारी, रात्री गोरेवाडी गेटवर गावठी पिस्तूल घेऊन उभा असल्याची माहिती नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांना मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने सापळा रचून विजय पगारे यास ताब्यात घेतले. त्यास बुधवारी (दि. २) न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

चौघांना न्यायालयीन कोठडी

वास्को चौकात शंकर गोवर्धन वाडेकर यास गावठी पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या आदेश चंद्रकांत लवटे, संग्राम बिंदुमाधव फडके आणि सुमीत अविनाश निरभवणे या चौघांची पोलिस कोठडीची मुदत बुधवारी (दि. २) संपली. पोलिसांनी त्यांना नाशिकरोड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. यातील संग्राम फडके याला गुन्हे शाखा दोनच्या पथकाने यापूर्वीही अटक केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज़ब्त तहज़ीब है

0
0

\Bशेर ए साकी\B

तन्वी अमित

उर्दू भाषा आणि त्यातले विलक्षण गोडवा असलेले शब्द यांच्या प्रेमात वारंवार पडायला होतं. एखादी गजल, एखादा शेर वाचताना, समजून घेताना एखाद्या शब्दापाशी नजर अडते आणि मग तो शब्द त्याच्या अर्थाच्या अनेक छटांसह कायमस्वरूपी मनात वस्तीला येतो. 'ज़ब्त' हा अशाच शब्दांपैकी एक शब्द. सेल्फ कंट्रोल, स्वत:वरचा ताबा, संयम असे त्याचे शब्दकोषातले अर्थ. या ज़ब्तची अनेक शायरांनी वेळोवेळी व्यक्त केलेली रूपं पहाताना मात्र त्याची असीम व्याप्ती जाणवते. मुळात 'संयम' शब्दाभोवती एक शांत वलय आहे. याच पठडीतला 'ज़ब्त'.

ज़ब्त कर सकते थे आख़िर ज़ब्त हम करते रहे

काम था जिन का सितम करना सितम करते रहे

स्वनियंत्रण न करणारे तसेच वागत जातील आणि संयमी व्यक्तीकडून संयमाचीच अपेक्षा केली जाईल, हे जरी सत्य असले तरी संयमाची गोडी चाखलेली व्यक्ती सहसा तो गमावत नाही हे ही सत्यच. 'जो नालों की कभी वहशत ने ठानी, पुकारा ज़ब्त बस ख़ामोश ख़ामोश,' अन्यायाविरुद्ध, भीतीविरुद्ध तक्रार करावी असे ठरवतानाही माझ्यातला संयम जागृत होता आणि 'ख़ामोश ख़ामोश' या त्याच्या हाका मला ऐकू येत होत्या, यातल्या 'ज़ब्त'चं वळण हे सकारात्मक आहे.

भावभावनांच्या पसाऱ्यात न अडकता संयमाची कास धरणं सोपं नाही. तत्त्वज्ञानाची वाट चाललेला हा ज़ब्त, अन्याय सहन करण्याचं बळ सहज देत जातो. वरकरणी सोप्या या शब्दाचा अर्थ मात्र किती गहिरा आणि तसेच वळतात मग हा शब्द ल्यायलेले शेर.

'ठहरे पानी में फेंक कर पत्थर, अपने साए को तू न रुस्वा कर', शायर स्वत:लाच सावध करतो. प्रतिमेला तडा जाऊ देऊ नकोस, स्वभावाची एक जडणघडण जाणीवपूर्वक घडवली आहे ती सहसा मोडू नये असं काहीसं. अर्थात हा संयमाचा बांध परिस्थितीच्या रेट्यापुढे कधी हार पत्करतो आणि भावनांच्या अलोट लाटा मन व्यापून उरतात. त्यांचे प्रतिसाद मग माणसांच्या डोळ्यातून वाहतात किंवा स्वभावात उमटतात. 'आज 'मजरूह' ज़ब्त कर न सका, क्या करे जब कि जान जाने लगे', सहनशक्तीला आव्हान मिळते तेव्हा एखाद्या हळव्या कातरक्षणी 'ज़ब्त'ची साथ सुटते आणि भावनांच्या त्या उद्रेकाचं प्रतिबिंबही शायरी घेऊन येते.

ज़ब्त का शीशा चटख़ा होगा

याद ने कंकर फेंका होगा

संयम ही एकूणच आयुष्याचं यश ठरवणारी बाब 'मोहब्बत' नावाच्या किनाऱ्याला तर बराच काळ रेंगाळते, 'ज़ब्त तहज़ीब है मोहब्बत की, वो समझते हैं बे-ज़बान हूँ मैं' हा एक शेर किंवा 'ज़ब्त देखो उधर निगाह न की, मर गए मरते मरते आह न की'... इथे 'ज़ब्त'ची वेगवेगळी रूपं प्रत्ययास येत जातात. परवीन शाकिर मात्र तिच्या कमाल हळव्या अंदाजात लिहून जाते,

कमाल-ए-ज़ब्त को ख़ुद भी तो आज़माऊँगी

मैं अपने हाथ से उस की दुल्हन सजाऊँगी

'दिल चोट सहे और उफ़ न करे ये ज़ब्त की मंज़िल है लेकिन, साग़र टूटे आवाज़ न हो ऐसा तो बहुत कम होता है' हा शेर किंवा 'हम ज़ब्त की हदों से गुज़र भी नहीं गए, ज़िंदा अगर नहीं हैं तो मर भी नहीं गए', इथला वेदनेचा प्रामाणिक स्वर मनात उतरत जातो.

शेरोशायरीच्या वाटेवर ही 'ज़ब्त' नावाची दिवटी घेऊन निघाले तेव्हा वाट अनेक कोपऱ्यांवर उजळली आणि मनांच्या अनेक तळ्यांमधे उतरलेले या शब्दाचे अर्थवाही प्रतिबिंब पहायला मिळालं. भावनांच्या प्रांगणातले सूक्ष्म पदर आपल्या लेखणीतून उतरवणाऱ्या फिराकच्या लेखणीतून हा शब्द येतो तेव्हा तो खास फिराकच्याच शैलीतून येतो. 'आप-बीती कहो कि जग-बीती, हर कहानी मिरी कहानी है', म्हणताना पुढे मग फिराक लिहितात:

ज़ब्त कीजे तो दिल है अंगारा

और अगर रोइए तो पानी है !!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पत्नीच्या मृत्युच्या कारणांचा पतीकडून ‘शोध’

0
0

पत्नीच्या मृत्यूच्या कारणांचा पतीकडून 'शोध'

तब्बल आठ वर्षांपासून पाठपुरावा; अॅटो इम्युनी डिस्ऑर्डर आजाराची लागेना तड

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आजारी का पडलो, या कारणांचा शोध घेऊन तशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी रुग्णासह त्याचे कुटुंबीय प्रयत्न करतात. त्यामुळे आजार जातोच, तसेच इतरही त्याबाबत सजग होतात. पाथर्डी फाटा येथे राहणारे रमेश कार्लेकर गत आठ वर्षांपासून अशाच अॅटो इम्युनी डिस्ऑर्डर या आजाराच्या कारणांचा शोध घेत आहेत. त्यामुळे त्यांची पत्नी दगावली. डॉक्टर, विविध सरकारी विभाग एवढेच काय, तर अगदी कोर्टातही कार्लेकर यांनी हातपाय मारून पाहिले. मात्र, इंटरनेटवर उपलब्ध माहिती सरकारी कागदांवर उतरविण्यास कुचराई केली जात आहे.

दोन मुले, पती-पत्नी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये चांगल्या ठिकाणी कार्यरत अशी कार्लेकर कुटुंबाची १५ वर्षांपूर्वीची परिस्थिती. कार्लेकरांची पत्नी उषा या ब्लू क्रॉस या अंबड परिसरातील एका फार्मास्युटिकल कंपनीत कामास होत्या. जवळपास २२ वर्षे इमानइतबारे काम केल्यानंतर २००७ मध्ये त्यांना वेगवेगळ्या व्याधींनी ग्रासले. हायपरटेन्शन, अॅनेमिया, सर्व्हिकल स्पाँडिलिसीस अशा एक नव्हे, तर तब्बल १६ आजारांनी उषा यांना घेरले. कार्लेकर यांनी तीन ते चार खासगी हॉस्पिटलमध्ये, तसेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार केले. कंपनीने सुरुवातीस मदतही केली. मात्र, उषा यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत गेली. या आजारांच्या समूहास अॅटो इम्युनी डिस्ऑर्डर म्हणतात. सिव्हिल हॉस्पिटलच्या एका रिपोर्टमध्ये तसा उल्लेखही आहे. उपचार सुरू असताना २०१० मध्ये उषा यांचा मृत्यू झाला. त्यानंतर कार्लेकरांनी हा आजार कशामुळे होऊ शकतो, याचा शोध सुरू केला. यात धक्कादायक माहिती समोर आली. कंपनीत कार्यरत असताना उषा ज्या विभागात कार्यरत असायच्या तिथे त्या सतत विविध केमिकल्सच्या संपर्कात यायच्या. अॅटो इम्युनी डिस्ऑर्डर होण्यासाठी हीच स्थिती महत्त्वपूर्ण असते हे कार्लेकरांनी शोधून काढले. याबाबत त्यांनी कंपनीकडे पाठपुरावा केला. मात्र, व्यवस्थापनाने हात वर केले. विविध ठिकाणांहूनही अपेक्षित मदत मिळू शकली नाही. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानुसार या प्रकरणी अंबड पोलिसांनी चौकशी केली. मात्र, हा दिवाणी स्वरूपाचा दावा असल्याचे कारण सांगत कार्लेकरांना कोर्टात जाण्याचा सल्ला देण्यात आला.

...तर इतरांच्या आरोग्याचे काय?

उषा कार्लेकर यांच्यावर उपचार करणाऱ्या विविध डॉक्टरांकडे कार्लेकर यांनी मदत मागितली. सिव्हिल हॉस्पिटल, सहाय्यक कामगार आयुक्त, मेडिकल कौन्सिल, कामगार न्यायालय, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, गुजरात येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन ऑक्युपेशनल सेफ्टी अॅण्ड हेल्थ विभागासह मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला. अनेकदा तर उत्तरच देण्याचे टाळण्यात आले, तर काही ठिकाणांहून प्रतिसाद मिळाला, पण तोही तोकडाच! वास्तविक कार्लेकरांनी केलेला आरोप गंभीर असून, याची दखल घेऊन कंपनीसह संबंधित विभागांनी यातील तथ्य समोर आणणे गरजेचे होते. पण, याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आले. उषा यांचा व्यावसायिक मृत्यू असेल, तर इतर कामगारांच्या आरोग्याचे काय, असा प्रश्न यानिमित्ताने समोर येत आहे.

आर्थिक मदत केली नाही म्हणून आम्ही दोघे उपोषणास बसला होतो. त्यावेळी व्यवस्थापनाने मदतीचे आश्वासन देत फसवणूक केली. कंपनीने उषाच्या उपचारांकडे लक्ष दिले असते, तर ही वेळ आली नसती. अॅटो इम्युनी डिस्ऑर्डर हा आजार रसायनांच्या संपर्कामुळेच होतो. पण, कंपनीसह संबंधित सरकारी विभाग ही बाब अधोरेखित करू इच्छित नाहीत.

-रमेश कार्लेकर, दिवंगत उषा यांचे पती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वार्षिक निकालाचे विद्यार्थ्यांना ऑनलाइन गिफ्ट!

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

ऑनलाइन रिझल्टच्या कामात मोठमोठ्या विद्यापीठांच्या कामकाजात घोळ होत असताना नाशिकरोड येथील साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या के. जे. मेहता हायस्कूलमधील विठ्ठल रहाणे या गणिताच्या शिक्षकाने मात्र या शाळेत ५६ तुकड्यांतून शिक्षण घेणाऱ्या सुमारे २५०० विद्यार्थ्यांचा वार्षिक निकाल ऑनलाइन लावण्यात पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले आहे. ऑनलाइन निकाल देणारी के. जे. मेहता हायस्कूल व ई. वाय. फडोळ ज्युनियर कॉलेज ही शहरातील पहिलीच शाळा ठरली आहे.

ऑनलाइन निकाल तयार करण्यासाठी शिक्षक विठ्ठल रहाणे यांनी गुगल ड्राइव्हवर स्प्रेडशीटचा उपयोग करून त्याच्या फाइल लिंक्स प्रत्येक वर्गशिक्षकाला दिल्या. या स्प्रेडशीटवर त्यांनी पाचवी ते बारावीपर्यंतच्या सर्व तुकड्यांच्या सर्व विषयांच्या प्रत्येक परीक्षेचे रिझल्टशीट तयार केले. गुणांची बेरीज, टक्केवारी काढण्यासाठी खास फॉर्म्युला वापरला. लिंकवरील नियंत्रण स्वतःकडे ठेवले. वर्गशिक्षकाला दिलेल्या फाइल लिंक्सवर सर्व वर्गशिक्षकांनी मिळेल त्या वेळेत विद्यार्थ्यांचे गुण अपलोड केले. मुख्याध्यापकांनीही ऑनलाइन निकाल बघून शिक्षकांना सूचना केल्या. संपूर्ण निकाल तयार झाल्यावर विद्यार्थ्यांनाही घरबसल्या हा निकाल बघता आला. निकालाची प्रिंटही घेता आली. अशा प्रकारचा उपक्रम राबविण्यासाठी रहाणे यांनी संस्थेची वेबसाइट विकसित करण्याकामी मोठी मेहनत घेतली.

अशी सुचली कल्पना

दर वर्षी परंपरागत पद्धतीने सर्व शिक्षक हस्तलिखित निकाल तयार करीत. त्यात वेळ जास्त खर्ची पडे. त्यावर उपाय म्हणून शिक्षक विठ्ठल रहाणे यांनी ऑनलाइन निकालाची संकल्पना मांडली. ही संकल्पना संस्थेचे अध्यक्ष गणपत मुठाळ, सचिव प्रवीण जोशी, खजिनदार मिलिंद पांडे, संचालक राधाकृष्ण कानवडे, भूषण कानवडे, अनिल अरिंगळे, प्राचार्या अलका दुनबळे आदींनी स्वीकारली. रहाणे यांनी संस्थेच्या नावाची स्वतंत्र वेबसाइट तयार केली. त्यात संस्थेच्या इतिहासापासून आतापर्यंतच्या प्रवासाची माहिती अपलोड करण्यात आली. याच वेबसाइटवर त्यांनी शाळेतील पाचवी ते बारावीपर्यंतच्या ५६ तुकड्यांत शिक्षण घेणाऱ्या २५०० विद्यार्थ्यांचा वार्षिक निकालही ८९ शिक्षकांच्या सहकार्याने अपलोड केला. यात वर्षभरात घेण्यात आलेल्या सर्व प्रकारच्या परीक्षांचा समावेश आहे.

ऑनलाइन निकालामुळे कागदाचा वापर शून्य झाल्याने नकळतपणे वृक्षतोडीला आळा बसला. शिक्षकांच्या वेळेची बचत झाली. कामात अचूकता आली. प्राचार्यांनाही संपूर्ण शाळेच्या निकालाच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे सोपे गेले. विद्यार्थी व पालकांनाही घरबसल्या निकाल बघता आला.

-विठ्ठल रहाणे, शिक्षक

हस्तलिखित निकालाच्या कामकाजातून सुटका झाली. पेपरलेस निकालामुळे वृक्षसंवर्धनाचा उद्देश अप्रत्यक्षरीत्या साध्य झाला. ॲंड्रॉइड फोनवरच बहुतांश शिक्षकांनी ऑनलाइन मिळालेल्या लिंक्सवर आपल्या वर्गाचे मार्क्स अपलोड केले. संस्थेत असा प्रयोग प्रथमच झाला.

-अशोक अरिंगळे, उपप्राचार्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दांडी’ पडली महागात

0
0

झेडपीच्या तीस अधिकाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी तालुकास्तरीय आढावा बैठकीबाबत गुरुवारी तालुकास्तरीय खातेप्रमुखांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून विविध विषयांबाबत सूचना केल्या. या व्हिडिओ कॉन्फरन्ससाठी परवानगी न घेता अनुपस्थित असलेल्या तसेच मुख्यालयातही गैरहजर असलेल्या तालुकास्तरावरील विविध विभागातील ३० अधिकारी व कर्मचाऱ्यांचे एका दिवसाचे वेतन कपात करण्याच्या सूचना डॉ. गिते यांनी सर्व खातेप्रमुखांना दिली.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गिते यांनी जिल्हा परिषद अंतर्गत होणारे काम, विकास योजना या विहित वेळेत पूर्ण करण्याकडे अधिक भर दिला आहे. त्यादृष्टीने आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच विविध योजनांबाबत गुणांकन करून त्याचे मुल्यांकन करण्यात येत आहे. तालुका व ग्रामस्तरावरील कामकाज गतिमान व्हावे यासाठी तालुकास्तरीय आढावा बैठका लावण्यात आल्या आहेत. या बैठकींच्या अनुषंगाने गुरुवारी डॉ. गिते यांनी जिल्हास्तरीय खातेप्रमुखांसोबत तालुकास्तरावरील गट विकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी तसेच अन्य सर्व विभागप्रमुखांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली.

या बैठकीत डॉ. गिते यांनी जिल्हास्तरावरील प्रलंबित विषयांची माहिती तत्काळ तयार करून आढावा बैठकीपूर्वी जिल्हा स्तरावर पाठविण्याचे निर्देश दिले. तसेच सर्व ध्वजांकित योजनांचे गुणांकन तयार करून त्यानुसार बैठकीत माहिती सदर करण्याच्या सूचना दिल्या. तालुकास्तरावर बैठकीच्या आदल्या दिवशी गट विकास अधिकारी यांनी गोपनिय अहवाल प्रतिवेदन व पुनर्विलोकन शिबीर घेऊन त्याद्वारे सर्व कर्मचाऱ्यांचे गोपनिय अहवाल प्रतिवेदन व पुनर्विलोकन करण्यात येणार आहे.

हे अधिकारी होते गैरहजर

यापुढे व्हिडिओ कॉन्फरन्स, आढावा बैठक असताना मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पूर्व परवानगी शिवाय कोणाचीही रजा मंजूर न करण्याचे आदेशही सर्व गट विकास अधिकारी व खातेप्रमुखांना दिले. आजची व्हिडिओ कॉन्फरन्स पूर्वनियोजित असतानाही तालुकास्तरावरील वित्त विभागातील ३ सहायक लेखाधिकारी, कृषी विभागातील ८ कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी, शिक्षण विभागातील १ गट शिक्षण अधिकारी, पशुसंवर्धन विभागातील ४ अधिकारी, लघु पाटबंधारे विभाग पूर्व व पश्चिमचे २ अधिकारी, आरोग्य विभागाकडील ४ तालुका वैद्यकीय अधिकारी, बाल विकास विभागातील १ बाल विकास अधिकारी, सुरगाणा गट विकास अधिकारी, बांधकाम विभागातील ६ उप अभियंता असे एकूण ३० अधिकारी व कर्मचारी पूर्वपरवानगी न घेता गैरहजर असल्याने त्यांचे आजच्या दिवसाचे वेतन कपात करण्याच्या सूचना डॉ. गिते यांनी खातेप्रमुखांना दिल्या.

प्रमुख अधिकारी उपस्थित

या बैठकीस सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाघचौरे, प्राथमिक शिक्षण अधिकारी वैशाली झणकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी बी. जे. सोनकांबळे, राजेंद्र देसले आदी खातेप्रमुख उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेची डोकेदुखी वाढली

0
0

माघारीनंतर स्पष्ट होणार चित्र

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विधान परिषदेच्या निवडणुकीत सात उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे शिवसेनेच डोकेदुखी वाढली आहे. या निवडणुकीत भाजपने अधिकृत उमेदवार दिला नसला तरी त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरले आहेत. त्यातच अर्ज दाखल करतांना दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण वगळता एकही नेता आला नाही. त्यामागे भाजपची नेमकी काय खेळी आहे या विचाराने शिवसेना नेते तूर्त धास्तावले आहेत.

या निवडणुकीसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक परवेझ कोकणी यांनी अपक्ष अर्ज भरला. त्यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर उपस्थित होते. त्यामागे नेमके काय राजकारण आहे. याचे कोडेही शिवसेनेला तूर्त उमगत नसल्यामुळे त्यांनी फोनाफोनी करून अनेकांकडे त्याबाबत विचारणा केली. कोकणी यांच्या बरोबर त्र्यंबकेश्वरचे भाजपचे नगराध्यक्ष व १७ नगरसेवकही उपस्थित होते. त्याचप्रमाणे सुचक म्हणून काही नगरसेवकांनी सह्या केल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेचा गोंधळ वाढला आहे. या निवडणुकीत देवळा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अशोक आहेर यांनीही अर्ज दाखल केला. त्यावेळीही केदा आहेर उपस्थित होते. त्यामुळे या खेळीचे राजकारणावर आता चर्चा रंगू लागली आहे.

शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना एकतर्फी वाटणारी ही निवडणूक तूर्त जास्त अर्ज आल्यामुळे अवघड बनली आहे. शुक्रवारी छाननी झाल्यानंतर सात मे पर्यंत माघारीची मुदत आहे. त्यानंतर या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. शिवसेनेबरोबरच राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांनाही काँग्रेसचे ज्ञानेश्वर गायकवाड यांनी उमेदवारी दाखल केल्यामुळे धक्का बसला आहे. पण, राज्यात आघाडी झाल्यामुळे त्यांना त्यातून दिलासा मिळणार आहे. एकुणच माघारीनंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्यांचे वास्तव्य अभयारण्याबाहेरच

0
0

वन्यजीव गणनेच्या अहवालानंतर स्पष्ट

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या काही वर्षांपासून मानवी वस्तीत येणारा बिबट्या हा वन्यजीव क्षेत्राबाहेरच वास्तव्य करीत असल्याची बाब स्पष्ट होत आहे. कारण, वनविभागाने उत्तर महाराष्ट्रात केलेल्या गणनेत अवघे सात बिबटेच संरक्षित वन्य़जीव क्षेत्रात आढळून आले आहेत. तर नाशिक जिल्ह्यात एकही बिबट्या संरक्षित क्षेत्रात दिसून आलेला नाही. त्यामुळे संरक्षित क्षेत्राबाहेर राहणारे बिबटे खाद्यासाठी मानवी वस्तीकडे येत असल्याचे चित्र आहे.

बुद्धपौर्णिमेच्या दिवशी नाशिक वन्यजीव विभागाने उत्तर महाराष्ट्रातील एकूण सहा वन्यजीव क्षेत्रांमध्ये वन्यजीव गणना केली आहे. त्यानुसार उत्तर महाराष्ट्रात एकूण १,३९७ वन्यजीव आढळून आले आहेत. नाशिक, जळगाव, धुळे आणि नगर या चार जिल्ह्यातील विविध निसर्गप्रेमींच्या मदतीने विभागाने ही गणना केली आहे. राज्यातील प्रत्येक वन्यजीव संरक्षित क्षेत्र निहाय व वनविभाग निहाय वाघ सोडून इतर वन्यप्राण्यांच्या संख्येचा अंदाज मिळावा म्हणून अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या पद्धतीने पाणस्थळावरील वन्यप्राणी प्रगणना यंदाही करण्यात आली.

बुद्धपौर्णिमेच्या दिवशी वन्यजीव गणना करण्याची पद्धत आहे. चार जिल्ह्यातील एकूण ५१ ठिकाणामध्ये १,३९७ वन्यजीव आढळले. त्यानुसार नाशिक वन्यजीव विभागाने यंदा ही गणना केली. नाशिक जिल्ह्यात नांदूरमध्यमेश्वर हे एकमेवर संरक्षित वन्यजीव क्षेत्र आहे. याठिकाणी एकही बिबट्या आढळून आलेला नाही. त्यामुळे संरक्षित वन्यजीव क्षेत्राबाहेरच बिबट्यांचे वास्तव्य आहे. खास करून उसाची शेती असलेल्या भागात बिबट्या अधिवासास प्राधान्य देतो. भक्ष्याच्या शोधात तो मानवी वस्तीकडे येतो. त्यातून मानव व वन्यजीव संघर्ष उदभवत असल्याचे दिसून येत आहे. या गणनेमुळे बिबट्यांच्या सद्यस्थितीवर प्रकाश पडला आहे.

येथे झली गणना

नाशिक जिल्हा : नांदूरमध्यमेश्वर

नगर जिल्हा : कळसूबाई-हरिश्चंद्रगढ आणि राजूर

जळगाव जिल्हा : पाल व जामन्या

धुळे जिल्हा : अनेर डॅम

यांचा सहभाग : १०३ वन्यजीव कर्मचारी, ५७ निसर्गप्रेमी

आढळलेले वन्यजीव

३ अस्वल

३ खोकड

७ बिबटे

११ लांडगे

१५ नीलगाय

२२ तरस

२८ मुंगूस

४६ रानमांजर

५० भेकर

५३ कोल्हे

६४ ससे

९७ सांबर

१५५ रानडुक्कर

२५३ माकड

५९० इतर वन्यजीव

१,३९७ एकूण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images