Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

वैशिष्ट्यपूर्ण ‘पृथ्वी’द्वारे प्लास्टिकविरोधाचा नारा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

प्लास्टिक टाकून मानवाने पृथ्वीची कचराकुंडी केली आहे. त्याबाबत जागृती करण्यासाठी मानव उत्थान मंचातर्फे रामकुंडावर बांबूच्या साहाय्याने २५ फूट व्यास व २५ फूट उंचीची कचऱ्यात बुडालेली पृथ्वीची प्रतिकृती साकारली जाणार आहे. शहरातील शाळांचे विद्यार्थी त्यात कचरा टाकून पर्यावरणाच्या गंभीर समस्येकडे लक्ष वेधणार आहेत.

या वैशिष्ट्यपूर्ण पृथ्वीत प्लास्टिक, ई कचरा भरून पृथ्वी ही कचराकुंडी झाल्याचे दाखविण्यात येणार आहे. पृथ्वीला कचराकुंडी होण्यापासून वाचविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यूज अँड थ्रो संस्कृतीविरोधात मानव उत्थान मंचातर्फे याबाबत जनजागृती केली जात आहे. गेल्या वर्षी रामकुंडावर ७० हजार प्लास्टिक बाटल्यांचा राक्षस साकारून विक्रम करण्यात आला होता. आता प्लास्टिकबंदीविरोधात राज्याचे पर्यावरणमंत्री राम कदम यांनीच आदेश दिले आहेत.

मानव उत्थान मंचाचे जगबीर सिंग, भारती जाधव, निशिकांत पगारे, योगेश बर्वे, मिलिंद पगारे, नितीन शुक्ल, सुनंदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली यश भामरे, आकाश पटेल, अशफाक ताहिरी, हेमल लडाणी, प्रियांका बांगर, श्रुती वाघ, धनश्री कुलकर्णी, सुजय हन्नमवार, ओजस, चिन्मय चिटणीस हे ही पृथ्वी साकारणार आहेत. १० डिसेंबरला दुपारी तिचे काम सुरू होऊन ११ डिसेंबरला ही पृथ्वी साकारेल.


अशी असेल ‘पृथ्वी’

सध्या पृथ्वीला अक्षरशः कचराकुंडी बनविण्यात आले आहे. त्यामुळे होणारी हानी, पर्यावरणाचे नुकसान अधोरेखित करण्यासाठी तरुण टाकाऊ प्लास्टिकपासून प्लास्टिकच्या कचऱ्यात बुडणारी पृथ्वी साकारणार आहेत. विघटित न होणाऱ्या प्लास्टिकमुळे आपणच आपले घर कसे उद््ध्वस्त करीत आहोत, हे दाखविण्याचा हा प्रयत्न आहे. पर्यावरण जागृतीबाबत पोस्टर प्रदर्शनही रामकुंडावर भरविण्यात येणार आहे. दहा ते पंधरा शाळांशी संपर्क साधण्यात आला आहे. महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रतिज्ञा घेतली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हॉकर्स झोनचा सातपूरला फज्जा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

महापालिकेने न्यायालयाच्या आदेशावरून सहाही विभागांत हॉकर्स झोनची उभारणी केलेली आहे. रस्त्यांवर व्यवसाय करणाऱ्यांनी विभागीय अधिकाऱ्यांनी मनूद केलेल्या ठिकाणी बसावे, असे आवाहन करण्यात आले होते. परंतु, हॉकर्स झोनसाठी नेमून दिलेल्या जागेवर अंसख्य टपरीधारक आणि भाजीविक्रेते बसतच नसल्याने त्र्यंबकरोडवर पुन्हा भाजीबाजार वसला असून, हॉकर्स झोनचा फज्जा उडाल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

सातपूर गावातील भाजी मंडईच्या बाहेर नेहमीच होत असलेल्या अतिक्रमणाबाबत नगरसेविका सीमा निगळ व स्थानिक ग्रामस्थांनी नेहमीच समस्या महापालिकेकडे मांडल्या होत्या. याकडे मात्र महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी लक्ष देत नसल्याने रोजच सातपूर गावात जाताना ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो. याप्रश्नी महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग कधी लक्ष घालणार असाही सवाल उपस्थित केला जात आहे. मात्र, त्यातच त्र्यंबकरोडवर पुन्हा बाजार वसत असल्याने संबंधित विक्रेत्यांच्या अतिक्रणामुळे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचाही ताण वाढला आहे.

न्यायालयाच्या आदेशावरून महापालिकेने शहरात विविध ठिकाणी हॉकर्स झोनची उभारणी केलेली आहे. परंतु, हाॅकर्स झोनची उभारणी करूनदेखील रस्त्यांवर व्यवसाय करणारे व्यावसायिक संबंधित ठिकाणी जात नसल्याने पुन्हा आहे त्याच ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. सातपूर गावात जाताना रस्त्यातच भाजीविक्रेते व इतर व्यावसायिक दुकाने थाटत असल्याने ग्रामस्थांना त्याचा रोजच त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे याप्रश्नी महापालिका प्रशासनाने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी परिसरातील रहिवाशांकडून करण्यात येत आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत असून, लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची मागणी परिसरातून करण्यात येत आहे.


एक-दोन दिवसच व्यवसाय

त्र्यंबकरोडवर महिंद्रा सर्कलच्या बाजूलाच भाजीविक्रेत्यांना तपारिया टूल्सच्या भिंतीलगत जागा महापालिकेने हाॅकर्स झोनसाठी दिलेली आहे. मात्र, केवळ एक-दोन दिवसच विक्रेत्यांनी त्या ठिकाणी आपली दुकाने थाटली. त्यानंतर पुन्हा पूर्वीच्याच ठिकाणी दुकाने थाटण्यात आल्याने महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने धडक कारवाईची मोहीम हाती घेतली. रस्त्यांवर दुकाने मांडणाऱ्यांचे साहित्यच महापालिकेने जप्त केले होते. परंतु, त्यानंतर पुन्हा भाजीविक्रेत्यांनी त्र्यंबकरोडवरच दुसरीकडे आपली दुकाने थाटली असल्याने महापालिकेने थेट पोलिसी कारवाईच करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘निर्मल’तर्फे महिलांना आरोग्याविषयी मार्गदर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बेळगाव ढगा येथे निर्मल गंगा गोदा बहुउद्देशीय संस्थेमार्फत महिला आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्यात आला. महिलांमध्ये मासिक पाळी, स्वच्छता याविषयी जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मोफत सॅनिटरी नॅपकिन वाटप करण्यात आले.

मासिक पाळी व महिलांचे आरोग्य हा सुदृढ आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विषय आहे. ही जाणीव ठेवून या कार्यक्रमात मासिक पाळीदरम्यान आरोग्याविषयी घ्यावयाची काळजीची माहिती देण्यात आली. तसेच या संदर्भातील गैरसमज, जाणवणाऱ्या समस्या, सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर, स्वच्छतेच्या सवयी याबाबत अध्यक्ष शीतल गायकवाड, डॉ. अर्चना पाटील या स्त्रीरोगतज्ज्ञांनी प्रबोधन केले. यावेळी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी सुदृढ आरोग्याचे महत्त्व विषद केले. पालक, पाल्यांमध्ये संवाद असावा जेणेकरून भावी पिढी चांगली तयार होईल, असे ते म्हणाले. सिंगल यांनी पुणे ते गोवा हे ६४३ किमीचे अंतर सायकलवर ३८ तासात पूर्ण केल्याबद्दल त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सरपंच दत्तात्रय ढगे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यात्रोत्सवासाठी सज्जता

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

शहराचे आराध्य दैवत संतशिरोमणी देवमामलेदार यशवंतराव महाराज यात्रोत्सव बुधवार (दि. १३)पासून सुरू होत आहे. देवस्थानच्या वतीने यात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात येत असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड यांनी दिली.

बुधवारी (दि. १३) पहाटे ३.३० वाजता बागलाणचे तहसीलदार सुनील सैंदाणे, नगराध्यक्ष सुनील मोरे, देवस्थान अध्यक्ष भालचंद्र बागड यांच्या हस्ते देवमामलेदारांची महापूजा होणार आहे. यानंतर दुपारी २ वाजता रथ मिरवणूक निघणार आहे. रथ मिरवणुकीचा मार्ग सजला असून, शहरात यात्रोत्सवामुळे उत्साह संचारला आहे. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दि. १३ ते ३१ डिसेंबर दरम्यान आरमनदीपात्रात यात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

मंदिर परिसरातील स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे. मंदिराला सजावट करण्यात आली आहे. देवस्थानातील गाभाऱ्यातील चांदीचे नक्षीकाम करण्यात आले असून, यात्राकाळात भाविकांचीना सुलभ दर्शन घेता यावे, यासाठी विशेष सोय करण्यात आली आहे. देवस्थान विश्वस्त दादाजी खैरणार, राजेंद्र भांगडीया, अ‍ॅड. विजय पाटील, रमेश देवरे, सुनील मोरे, आदींसह विशेष परिश्रम घेत आहेत.
पोलिसही सज्ज

यात्राकाळात कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी पोलिस निरीक्षक हिरालाल पाटील यांनी विशेष कुमक पाचारण केली आहे. मंदिरालगतच विशेष पौलिस चौकी व कक्ष स्थापन करण्यात आला आहे. यात्रोत्सव काळात अवैध धंदे, चोरी, आदी प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी सर्तकता बाळगली आहे.

बँडवरील बंदी उठवली

जनमताचा प्रचंड रेटा व भावनांचा आदर करून शुक्रवारी दुपारी देवस्थान सभागृहात झालेल्या ट्रस्टच्या बैठकीत देवमामलेदार रथ मिरवणुकीतील बँडवरील बंदी उठवण्यात आल्याची घोषणा ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औषध फवारणीदरम्यान मृत्यू?

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

शेतामध्ये फवारणीवेळी औषधाचा त्रास झाल्याने हॉस्प‌िटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नाशिक तालुक्यातील मातोरी गावामध्ये शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. मात्र, हा विषप्राशनाचा प्रकार असावा, असा अंदाज सिव्हिल हॉस्प‌िटलमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या घटनेची पोलिस कशी दखल घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

निवृत्ती दामू पिंगळे (वय ६०, रा. दरी रोड, मातोरी) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांचा मुलगा रमेश निवृत्ती पिंगळे पोलिसपाटील असून, त्याने याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार दुपारी एकच्या सुमारास निवृत्ती पिंगळे शेतामध्ये औषध फवारणी करीत होते. त्या वेळी त्यांना औषधाचा त्रास होऊ लागला. उपचारासाठी त्यांना दुपारी पावणेदोनच्या सुमारास सिव्हिल हॉस्प‌िटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, अतिदक्षता विभागात उपचार घेत असताना दुपारी तीनच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

मृत्यू की आत्महत्या?

औषध फवारणीमुळे पिंगळे यांचा मृत्यू झाल्याची नोंद सिव्हिल हॉस्प‌िटलमधील पोलिस चौकीत करण्यात आली असली तरी हा मृत्यू संशयास्पद असल्याची शक्यता सिव्हिल हॉस्प‌िटलमधील सहाय्यक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. होले यांनी व्यक्त केली आहे. संबंधित रुग्णाच्या शरीरामध्ये कीटकनाशकाचे प्रमाण अधिक आढळून आले आहेत. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याने विषप्राशन केले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यापूर्वी सिन्नर तालुक्यातही एका महिलेच्या बाबतीत अशीच घटना घडल्याची माहितीदेखील सिव्हिल हॉस्प‌िटलमधील सूत्रांनी द‌िली आहे. त्यामुळे पिंगळे यांच्या आत्महत्येची शेतकरी आत्महत्या म्हणून नोंद होण्याची शक्यता आहे. या कुटुंबाचे एक एकर क्षेत्र असून, त्यावर भाजीपाला पिकविला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आहिरे कुटुंबीयांचे भुसेंकडून सांत्वन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

चाळीसगाव तालुक्यात सहा जणांचे बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याने बुधवारी मालेगाव तालुक्यातील साकुरी येथील कुणाल प्रकाश आहिरे या मुलाचाही बळी घेतला. या घटनेनंतर शुक्रवारी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी साकुरी येथे जाऊन आहिरे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. या दुर्दैवी घटनेनंतर आहिरे कुटुंबीयांना शक्य ती शासकीय मदत देण्याचे आश्वासन भुसे यांनी यावेळी दिले.

नरभक्षक बिबट्याला ठार करण्यासाठी प्रशासनाकडून शार्प शूटर, पिंजरे यासह ट्रॅप कॅमेरे परिसरात बसविण्यात आले असल्याची माहिती देत भुसे यांनी दिली. दरम्यान, या घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनादेखील कळविण्यात आल्याचे भुसे यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांच्या सूचना

मृत झालेल्या कुणाल प्रकाश आहिरे याच्या कुटुंबीयांची पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी शासनातर्फे आहिरे कुटुंबीयांना शासकीय मदतीचा एक लाख रुपयाचा धनादेश सुपूर्त केला. तसेच उर्वरित सात लाखांचा धनादेश प्रशासकीय कागदपात्रांची पूर्तता झाल्यानंतर देण्यात येतील. यावेळी महाजन यांनी आहिरे कुटुंबीयांची विचारपूस करीत अन्य शासकीय योजनातून लाभ देण्याच्या प्रशासानाला सूचना केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औद्योगिक प्रश्नांवर निमात मंथन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

निमा कार्यालयात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रमेश सुरवाडे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी झालेल्या बैठकीत औद्योगिक क्षेत्राचे विविध प्रश्न मांडण्यात आले. या बैठकीत नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील, अधीक्षक अभियंता एन. जी. वानखेडे, कार्यकारी अभियंता डी. बी. उईके, उपअभियंता जे. सी. बोरसे व निमाचे सदस्य उपस्थित होते.

या बैठकीत निमाचे अध्यक्ष मंगेश पाटणकर यांनी नाशिक औद्योगिक क्षेत्रातील आयटी पार्कची इमारत भाडेतत्त्वावर देण्यात यावी, तसेच भाडे माफक असावे. नजीकच्या परिसरातील भाडेकरार तपासून तीन वर्षांतील सरासरी भाड्यानुसार ते असावे. एमआयडीसीतील फ्लॅटेड बि‌‌ल्डिंगचे दर हे माफक असावेत, सिन्नरमधील अतिरिक्त जमिनीचे अधिग्रहण करण्यात यावे, दिंडोरी अक्राळे परिसरात जमिनींचे अधिग्रहण करून त्याचे वाटप लवकर करावे. भूखंडवाटप लॉटरी पद्धतीने करावे व लिलाव पद्धत बंद करावी, कामगार कल्याण उपकरबाबत उद्योजकांना दिलेल्या नोटिसा मागे घेण्यात याव्यात यासह विविध विषय मांडले.

या बैठकीत खासदार हेमंत गोडसे यांनी काही प्रश्नांकडे लक्ष वेधले. बैठकीस निमाचे उपाध्यक्ष उदय खरोटे, खजिनदार हर्षद ब्राह्मणकर, सचिव ज्ञानेश्वर गोपाळे, नितीन वागस्कर तसेच संजय सोनवणे, सुरेश माळी, अखिल राठी, नानासाहेब देवरे, मंगेश काठे, व्हिनस वाणी, अनिल बाविस्कर, लघुउद्योग भारतीचे राजेंद्र कुलकर्णी, निवेकचे संदीप गोयल तसेच पी. सी. भामरे, अहिरे शिवाजी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रदीपच्या ध्येयापुढे अपंगत्वही ठेंगणे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

प्रयत्न केले तर वाळूमधून तेलही निघू शकते या म्हणीप्रमाणेच जीवनात अपघाताने डाव्या पायाला आलेल्या अपंगत्वावर मात करीत इंदूर येथील प्रदीप सेन या युवकाने सायकल प्रवासाच्या माध्यमातून भारत भ्रमण करण्याचे ध्येय बाळगत प्रवास सुरू केला आहे. इंदूरहून १२०० किमी अंतर पार केल्यानंतर पिंपळगाव शहरात दाखल झालेल्या या युवकाच्या कार्याचे नागरिकांनी कौतुक करून सत्कार केला. प्रदीपचे ना‌शिकमध्ये आगमन झाल्यानंतर नाशिक सायकलिस्टसचे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया, डॉ. नितीन रौदळ, डॉ. मनीषा रौदळ, महेश आदींनी त्याचे स्वागत केले.

पिंपळगावकरांशी मनसोक्त बोलताना सायकलिस्ट प्रदीप सेन म्हणाला, की भारत स्वच्‍छता अभियान, विकलांग सेवा, पर्यावरण सुरक्षा या गोष्टी मनात ठेऊन भारत भ्रमण सुरू केले आहे. आणखी १५ हजार किमी प्रवास करायचा असून, देशातील माझ्या अपंग बांधवांना मी एक प्रेरणादायी उदाहरण ठरेल, हा माझा मानस आहे. अपंगत्व आले म्हणून खचून न जाता, त्यावर मात करायला शिकणे हेच खरे आयुष्य असल्याचे त्याने सांगितले. प्रदीप सेनला पुढील मुंबईच्या प्रवासाठी पिंपळगावकरांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपसरपंच संजय मोरे, पोलिस निरीक्षक वासुदेव देसले, ग्रामपंचायत सदस्य गणेश बनकर उपस्थित होते.

इंदूरहून पुढचा प्रवास

उज्जैन, भोपाळ, आष्टा, मडवा, खरगोन, बऱ्हाणपूर, भुसावळ, जळगाव, धुळे, मालेगाव, पिंपळगाव बसवंत १२०० किमीचा प्रवास पार केला. प्रवासात अनेक लोकांनी सहकार्य केले. पाठीवर ३५ ते ४० किलो बॅगचे वजन घेऊन ताशी १५ किमी अंतर प्रदीप पार करतो.

सायकल प्रवासातून भारत भ्रमण करण्याचा निर्णय निश्चित केल्यावर एका खासगी कंपनीने आधुनिक सायकल भेट दिली. प्रवासात भोजन, राहण्याची सोय मित्र, नातेवाईक व इतर नागरिकांनी केली. या प्रवासातून गिनिज बूकमध्ये नोंद होण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे.

- प्रदीप सेन सायकलिस्ट, इंदूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


द्वारका कोंडीचे खापर पालिकेवर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुंबई-आग्रा महामार्गावरील द्वारका चौकातील अनधिकृत धार्मिक स्थळ हटवल्यानंतरही या ठिकाणची कोंडी सुटत नसल्याचे चित्र आहे. त्यातच आता द्वारका चौकात वाढलेल्या वाहतूक कोंडीचे खापर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महापालिकेच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला आहे. आमदार अपूर्व हिरे यांनी विधानपरिषदेत तारांक‌ित प्रश्‍नाद्वारे येथील वाहतुकीचा प्रश्‍न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना संबंधित चौकात अतिक्रमण असल्याने येथील वाहतूक कोंडी वाढली असून, अतिक्रमण काढण्याची जबाबदारी पालिकेवर ढकलली आहे. द्वारका भागातील अतिक्रमणांमुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक वळविता येत नसल्याचे लेखी उत्तर देण्यात आले. दरम्यान, येथील अनधिकृत धार्मिक स्थळ हटवल्यानंतर वाहतुकीला अडथळा ठरणारे वृक्षही काढण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावर उड्डाणपूल होऊनही द्वारका चौकातील कोंडी सुटत नसल्याचे चित्र आहे. या चौकातील कोंडी फोडण्यासाठी ऑक्‍टोबर महिन्यात यू-टर्नचा ड्राइव्ह करण्यात आला होता. परंतु, येथील वाहतुकीची कोंडी फुटण्याऐवजी अधिकच वाढली होती. या कोंडीत अनेक व्हीयआपी नेतेही अडकले होते. त्यामुळे हा मुद्दा आता विधानपरिषदेत पोहचला आहे. वाहतूक सुरळीत करण्याचे काय प्रयत्न करण्यात आले, याबाबत आमदार अपूर्व हिरे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्याला उत्तर देताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने येथे वाहतूक ठप्प होत असल्याची कबुली दिली. त्यात द्वारका चौकात सर्व्हिस रोडसह नऊ रस्ते एकाच ठिकाणी मिळत असल्याने वाहतूक ठप्प होत असल्याचे कारण दिले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवरील उड्डाणपुलाचे रॅम्प द्वारका चौकात चढ-उतारासाठी तयार करण्यात आले आहेत. पुणे, संगमनेरकडे जाणारी वाहने येथेच उतरत असल्याने वाहतूक ठप्प होते. याशिवाय नाशिकरोड भागातून मुंबईकडे वाहने जाताना वाहतूक कोंडी होते. द्वारका चौकात महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे सुरळीत वाहतुकीला तो मोठा अडथळा ठरत असल्याचे सांगून, न्हाईने थेट पालिकेवरच वाहतूक कोंडीचे खापर फोडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे न्हाईविरुद्ध पालिका असा संघर्ष रंगण्याची चिन्हे आहेत.

कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न

महापालिकेने अधिकृत धार्मिक स्थळे हटवण्यासंदर्भातील कारवाईत द्वारका चौकातील मारुती मंदिराचेही अतिक्रमण काढले आहे. त्यामुळे ही जागा मोकळी झाली असली तरी पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी बायपास काढण्याचे काम सुरू आहे. परंतु, या जागेवर सध्या भेंडीचे झाड असल्याने त्याचे काम रखडले आहे. महामार्ग प्राधिकरणाने झाड हटविण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीसमोर ठेवला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर तातडीने झाड हटवून मुंबईकडे जाणारी वाहतूक त्या मार्गाने वळविली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्वसामान्यांचा पट मांडणारे ‘जीत’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आपण मत दिले म्हणजे आपले काम संपले या भावनेने सामान्य माणूस व्यापलेला असतो. परंतु, त्याच्या एका मतावर निवडून आलेला राजकारणी मात्र कुठल्या कुठे जाऊन पोहोचतो. सामान्य माणूस त्याच्या राजकारणात नाहक भरडला जातो हे दाखवणारे नाटक म्हणजे ‘जीत’.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा ६५वा नाट्य महोत्सव परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे सुरू असून, नाशिक विभागातील प्राथमिक स्पर्धेत ‘जीत’ हे नाटक शुक्रवारी सादर झाले. या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन अनिल कोष्टी यांनी केले होते. राजकारणात यशस्वी व्हायचे म्हणजे प्रतिस्पर्ध्यांशी लढत देणे, त्यांच्या कुरघोडी करणे यात अधिक वेळ जातो. मात्र या सत्तासुखाची पोळी भाजण्यामध्ये भरडला जातो तो सामान्य माणूस, खरेतर हा दोष राजकारण्यांचा नसून, आपलाच आहे. आपण यांना सुतासारखे सरळ ठेऊ शकतो पण आपण केवळ मत देऊन गप्प बसतो. स्वार्थाच्या या राजकारणात सत्ताकारण, टोकाचा राष्ट्रवाद, आक्रमकता, साम्राज्यवाद ठासून भरला आहे. तो टिकवून ठेवण्यासाठी जनसामान्यांमध्ये जातीपातीची किंवा आर्थिकतेची दरी पाडून अधिक अग्नी भडकवला जातो. त्यात आहुती पडते ती ही सामान्यांचीच हे दाखवणारे नाटक म्हणजे ‘जीत’ होय.

कामगार कल्याण केंद्र, जोशी कॉलनी, जळगाव या संस्थेने हे नाटक सादर केले होते. प्रकाशयोजना प्रथमेश जोशी यांची होती. जितेश मराठे यांचे संगीत, संजय चव्हाण यांचे नेपथ्य तर श्रीराम पाटील यांची रंगभूषा होती. नाटकात कुंदन तावडे, योगेश गाडगीळ, धर्मराज देवकर, उमेश गोरधे, बापू सरोदे, श्रीकांत कुलकर्णी, रविकांत सुपेकर, जयश्री पुणतांबेकर, अक्षय नेहे, राजेश सोलसे, अनिल कोष्टी, श्र्वेता पाठक आदींनी भूमिका केल्या.

आजचे नाटक : नाव झालंच पाहिजे स्थळ : प. सा. नाट्यगृह वेळ : सायंकाळी ७ वाजता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आधार’चे काम, अडीच महिने थांब!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तुम्हाला नवीन आधारकार्ड काढायचे असेल अथवा आहे त्या आधारकार्डमध्ये केवळ काही दुरुस्ती करावयाची असेल तर किमान अडीच महिने प्रतीक्षेशिवाय पर्याय नाही. जिल्हाधिकारी कार्यालयातील आधार केंद्रावर कामे घेऊन येणाऱ्या नागरिकांची घोर निराशा होत असून, प्रतीक्षा यादी २० फेब्रुवारी‌पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे आधारशी संबंधित काही मिनिटांच्या कामांसाठी नागरिकांना अड‌ीच महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.

आधार कार्ड काढणे किंवा त्यामध्ये दुरुस्ती करवून घेणे नागरिकांसाठी शिक्षा ठरू लागले आहे. आर्थिक व्यवहारांसह मोबाइल, विमा व तत्सम अनेक गोष्टींशी केंद्र आणि राज्य सरकारने आधार लिंकिंग बंधनकारक केले आहे. त्यामुळे लहान-सहान गोष्टींसाठी नागरिकांची कामे अडत असून, आधारमधील दुरुस्त्यांसाठी त्यांना धावपळ करावी लागत आहे.

शहरासह जिल्ह्यातील खासगी आधार सेंटर्स बंद करण्यात आले असून, त्यामुळे आधार यंत्रणा पूर्णत: कोलमडून पडली आहे. सरकारी कार्यालये, शाळा व तत्सम काही ठिकाणांवर आधारशी संबंधित कामे होत असल्याचा दावा जिल्हा प्रशासन करीत असले, तरी त्या ठिकाणांवर घोर निराशा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी वाढतच आहेत. सातपूर शिवाजीनगर परिसरातील दोन महापालिका शाळांसह आनंदवली येथील केंद्रावरही सेवा मिळत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील आधार सेंटरवर सेवा पुरविली जात असली तरी तेथे दिवसभरात शेकडो लोक येत असल्याने नागरिकांची गैरसोय तसूभरही कमी होऊ शकलेली नाही. एका दिवशी आधार कार्डशी संबंधित फारतर ३० ते ३५ जणांचीच कामे होत असल्याने येथे एका रजिस्टरमध्ये प्रतीक्षा यादी बनविण्यात आली आहे. दररोज येथे शेकडो लोक नाव नोंदवित असल्याने ही यादी दिवसेंदिवस वाढतेच आहे. आजमितीस येथील रजिस्टरवर २० फेब्रुवारीपर्यंतची नावे नोंदविण्यात आली आहेत. त्यामुळे उद्यापासून या केंद्रावर कामे घेऊन जाणाऱ्या नागरिकांना पुढील तारखा दिल्या जाणार आहेत.

वादाच्या ठिणग्या

आधारमधील दुरुस्त्या होत नसल्याने नागरिकांची वेगवेगळ्या कार्यालयांमधील कामे खोळंबली आहेत. अवघ्या वीस मिनिटांच्या कामासाठी नागरिकांना अडीच महिने थांबण्यास सांगितले जात असल्यामुळे आधार सेंटरवरील कर्मचारी आणि नागरिक यांच्यामध्ये वादाच्या ठिणग्या उडू लागल्या आहेत. नागरिकांना उत्तरे देताना कर्मचाऱ्यांची दमछाक होऊ लागली आहे. येथील रजिस्टरवर तुमचे नाव आणि मोबाइल नंबर टाकून संबंधित दिवशी या असे त्यांना सांगितले जात आहे.


जिल्हाधिकारी कार्यालयातील सेंटरवर एकच क‌िट होते. नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन आता चार क‌िट सुरू करण्यात आले आहेत. महापालिका क्षेत्रातील १४ सीएसस‌ी सेंटर्सवरदेखील सोमवारपासून (दि. ११) आधार सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होण्यास मदत होईल.

- शशिकांत मंगरूळे, उपजिल्हाधिकारी नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसंतदादा सर्वसामान्यांचे नेते

$
0
0

ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वसंतदादा पाटील हे सर्वसामान्य माणसांचे नेते होते. दादा हे महाराष्ट्रातील सर्वात कमी शिकलेले परंतु, सर्वात जास्त हुशार माणूस. त्यांच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता आणि अंमलबजावणी करण्याची ताकदही होती, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी केले.

सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू अशी ओळख असणाऱ्या सार्वजनिक वाचनालय, नाशिक या संस्थेच्या ग्रंथालय सप्ताहास शुक्रवारपासून सुरुवात झाली. सप्ताहाचे उद्घाटन भावे यांच्या व्याख्यानाने करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सावानाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री तथा ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शुक्रवारी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. सर्वसामान्यांचा आधारवड स्व. वसंतदादा पाटील असा व्याख्यानाचा विषय होता. हे व्याख्यान क्रांतिकारक हुतात्मा अनंत कान्हेरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आले.

भावे पुढे म्हणाले, की दादांनी स्वातंत्र्यलढ्यात गोळी झेलली होती आणि अनंत कान्हेरे यांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी गोळी झाडली होती. अशा दोन्ही क्रांतिकारकांचा संगम या व्याख्यानमालेच्या निमित्ताने झालेला आहे. वसंतदादा म्हटले की त्यांचा इतिहास क्षणात समोर येतो. त्याग, समर्पण, सेवा आपण सर्वजण विसरूनच गेलो आहोत. ग्रामीण भागातील मुलांना शिकण्याची जेव्हा उमेद होती त्या काळात त्यांना कॉलेज मिळत नव्हते. दादांनी कॉलेज उभी करून दिली. राज्यात वैद्यकीय व अभियांत्रिकी कॉलेजेस उभी करण्यात दादांचा सिंहाचा वाटा होता.

कार्यक्रमाप्रसंगी काँग्रेसचे पदाधिकारी यशवंत हापे यांनीही छोटेखानी मनोगत व्यक्त केले. संजय करंजकर यांनी प्रास्ताविक केले. मधुकर भावे यांचा परिचय श्रीकांत बेणी यांनी करून दिला. डॉ. शंकर बोऱ्हाडे यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात पुढील आठवडाभर मान्यवर वक्त्यांची व्याख्याने होणार आहेत.

आजचे व्याख्यान

महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती या विषयावर आज (दि. ९) मोहसिना मुकादम, डॉ. सुषमा पौडवाल, मुंबई यांचे व्याख्यान होणार आहे. यावेळी एम. लिब., बी. लिब अभ्यासक्रमात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना कै. मु. शं. औरंगाबादकर स्मृती पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गांधीनगर प्रेसची ताकद वाढणार

$
0
0

डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड

कोईमतूरच्या पेरियनीकेनिपलम येथील सरकारी प्रेसचे उत्पादन या महिनाअखेरीपर्यंत थांबविण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. ही प्रेस नाशिक येथील गांधीनगर प्रेसमध्ये विलीन केली जाणार आहे.सरकारी दस्त, गोपनीय कागदपत्रे, जनगणनेचे अर्ज आदींची छपाई या मुद्रणालयांमध्ये होत होती. विलीनीकरणानंतर ही छपाई आता गांधीनगर प्रेसमध्ये होईल. गांधीनगरच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोईमतूरबरोबरच कोराटी आणि म्हैसूर येथील दोन सरकारी मुद्रणालये गांधीनगरमध्ये विलीन होणार आहेत. त्यामुळे या प्रेसची ताकद वाढून संजीवनी मिळणार आहे. गांधीनगर व नाशिकरोड प्रेस कामगारांच्या समर्पण व कौशल्यावर दाखवलेल्या विश्वासाचे हे प्रतीक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

१८ प्रेस बंद करणार

सरकारने तांत्रिक कारणास्तव देशातील लहान १८ सरकारी प्रेस बंद करून फक्त पाच प्रेस सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आजपर्यंत कृती झाली नव्हती. आता कोईमतूरपासून सुरुवात झाली आहे. सुरू राहणाऱ्या पाच प्रेसमध्ये नाशिकची गांधीनगर प्रेस आहे. १९६४ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या पेरियनीकेनिपलम प्रेसचे उत्पादन ३१ डिसेंबरपर्यंत थांबविण्यात येणार आहे. या प्रेसमधील ६६ कामगारांना गांधीनगरला पाठविण्यात येणार असल्याचे समजते. कोईमतूर प्रेस सुरू झाली तेव्हा ९०० कामगार होते. १९९० ते ९५ दरम्यान या प्रेसमधून अनेक कामगार निवृत्त झाल्यानंतर सरकारने भरती केली नाही. ही प्रेस १३२ एकरमध्ये आहे. प्रेस कामगांराची ४६३ निवासस्थाने असून, ती मोडकळीस आली आहेत. दरम्यान, प्रेस बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयाला कामगार संघटनेचे नेते पी. ए. जेकब यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.

ताकद वाढणार

सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की पहिल्या टप्प्यात सरकार कोईमतूर, कोराटी आणि म्हैसूर या तीन प्रेस गांधीनगर प्रेसमध्ये विलीन करणार आहे. कोईमतूर प्रेसमध्ये ६६, कोराटीमध्ये २८ आणि म्हैसूर येथे २५ कामगार आहेत. ते जानेवारीत गांधीनगरला येतील. या कामगारांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू असून, त्यांचे जानेवारीचे वेतन गांधीनगरला काढले जाणार आहे. मशीन, बाइंडिंग, क्लर्क आदी विभागांतील कामगार प्रथम येतील.

गांधीनगरचा विजय

कुशल व कष्टाळू कामगार, दर्जेदार उत्पादन यासाठी गांधीनगर प्रेस प्रसिद्ध आहे. सध्या येथे पोस्टाचे व केंद्र सरकारी दस्त, गोपनीय कागदपत्रे, जनगणनेचे अर्ज, सरकारी शिक्षण संस्थांच्या प्रश्नपत्रिका आदींची छपाई होते. अडीच वर्षांपूर्वी गांधीनगर प्रेस बंद करण्याचे पत्र केंद्राने पाठविले, तेव्हा खळबळ उडाली होती. मात्र, न खचता प्रेस कामगारांनी एकजूट दाखवत लढा उभारला. प्रेस कामगार संघटनेचे सरचिटणीस मनोहर बोराडे, अध्यक्ष संजय घुगे, संयुक्त सचिव रवी आवारकर, माजी सरचटणीस विजय वागळे, समद शेख, हरीश परदेशी, भिकाभाऊ जाधव, रामभाऊ जाधव, सुनील पवार, संजय डोंगरे आदींनी जोरदार प्रयत्न केले. खासदार हेमंत गोडसे, नाशिकरोड प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, मनोहर बोराडे यांच्या टीमने नवी दिल्लीत वरिष्ठांची भेट घेतली. गांधीनगर प्रेसची जागा विस्तीर्ण असून, ही प्रेस महामार्गावर आहे. नाशिकमध्ये दोन विमानतळे, रेल्वेस्थानक आहे. त्यामुळे प्रेस सुरू ठेवणे फायद्याचे असल्याचे या टीमने पटवून दिल्यानंतर सरकारने प्रेस सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. आता तीन प्रेस विलीन होणार असल्याने या प्रेसला संजीवनी मिळाली आहे.

आधुनिकीकरणही लवकरच व्हावे

गांधीनगर प्रेसमध्ये कामगार व अधिकारी असे दोनशेचे मनुष्यबळ आहे. कमी मनुष्यबळात येथील कामगार दर्जेदार उत्पादन घेतात. कोईमतूर, कोराटी व म्हैसूरचे मनुष्यबळ येथे आल्यानंतर उत्पादन दुपटीने वाढेल. गांधीनगर प्रेसचे आधुनिकीकरण करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. त्याबाबत त्वरित कृती करावी.

- मनोहर बोराडे, सरचिटणीस, प्रेस कामगार संघटना

गांधीनगर प्रेस टिकवण्यात संघटनांना यश आले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. तीन प्रेसच्या विलीनीकरणानंतर जे कामगार येणार आहेत. त्यांची थोडीच सेवा शिल्लक आहे. ती संपल्यानंतरही गांधीनगर प्रेस कायम सुरूच राहणार आहे. तिचे आधुनिकीकरण व्हावे, हीच अपेक्षा.

- जगदीश गोडसे, सरचिटणीस, नाशिकरोड प्रेस मजदूर संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंभरावर जागांसाठी ३७२ अर्ज

$
0
0

निवडणूक रंग आरोग्य विद्यापीठ

--

शंभरावर जागांसाठी ३७२ अर्ज

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा विविध प्राधिकरण मंडळाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, या निवडणुकीतील शंभरावर जागांसाठी एकूण ३७२ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती देताना विद्यापीठ निवडणूक निर्णय अधिकारी तथा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले, की विद्यापीठातर्फे नागपूर, मुंबई, पुणे व औरंगाबाद विभागीय केंद्रांवरदेखील अर्ज जमा करण्याची सोय करण्यात आली होती. तेथील अर्ज एकत्रित केल्यानंतर एकूण उमेदवारांच्या अर्जांची संख्या ३७२ झाली आहे. विद्यापीठाच्या अधिसभेसाठी राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती व नाशिक या महसूल विभागातून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण सहा प्राध्यापकांच्या जागांसाठी एकूण ६८ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहे. यात मुंबई विभागासाठी १५, पुणे विभागासाठी १९, औरंगाबाद विभागासाठी १३, नाशिक विभागासाठी ९, नागपूर विभागासाठी ९, अमरावती विभागासाठी ३ असे उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत.

विद्यापीठाच्या विद्या परिषदेसाठी वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी आणि तत्सम विद्याशाखेतील प्रत्येकी एक याप्रमाणे पाच प्राचार्यांची विद्याशाखानिहाय निवडणूक घेण्यात येईल. यामध्ये वैद्यकीय विद्याशाखा महिला, तर दंत विद्याशाखा अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता सोडतीद्वारे आरक्षित आहे. वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी व तत्सम विद्याशाखांच्या अभ्यास मंडळाकरिता सदस्यांची निवडणूक घेण्यात येईल. या सर्व जागांसाठी एकत्रित ३०४ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. यात वैद्यकीय विद्याशाखेसाठी ५५, दंत विद्याशाखेसाठी ४४, आयुर्वेद विद्याशाखेसाठी १२५, युनानी विद्याशाखेसाठी ६, होमिओपॅथी विद्याशाखेसाठी ३४, तर तत्सम विद्याशाखेसाठी ४० उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. विविध सदस्य निवडीकरिता विद्यापीठातर्फे ही निवडणूक घेण्यात येणार आहे. याबाबतची अधिक माहिती व सूचना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांसाठी पार पडणाऱ्या या निवडणूक प्रक्रियेसाठी तयारी पूर्ण झाल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. चव्हाण यांनी दिली. या निवडणुकीसाठी राज्यभरातून सुमारे १४ हजार मतदारांनी नोंदणी केली आहे. निवडणुकीतील बहुतांश जागा बिनविरोध होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. निवडणुकीची यापूर्वीही बिनविरोध निवडीची परंपरा राहिली आहे. दरम्यान, २० डिसेंबर रोजी अर्ज माघारीची मुदत असून, २१ डिसेंबर रोजी निवडणूक रिंगणातील उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. त्यामुळे अर्ज माघारीनंतरच लढतींचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. डॉक्टर घडविणाऱ्या या विद्यापीठातील निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.


२८ रोजी मतदान, ३० ला मोजणी

प्राप्त अर्जांची विद्यापीठ मुख्यालयात ११ डिसेंबर रोजी छाननी करण्यात येईल. त्यानंतर उमेदवारांच्या वैध अर्जांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या निवडणूक प्रक्रियेत उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी २० डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुदत राहणार आहे. निवडणुकीकरिता उमेदवारांची अंतिम यादी २१ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. विद्यापीठाची विविध प्राधिकरण निवडणूक दि. २८ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वेळेत विविध मतदान केंद्रांवर होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेची मतमोजणी ३० डिसेंबर रोजी विद्यापीठ मुख्यालयात करण्यात येईल. त्यानंतर निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बचतगटांवर पालिकेची मेहेरबानी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत सहाही विभागातील ४१८ अंगणवाड्यांमधील बालकांना सकस पोषण आहार पुरविणाऱ्या बचत गटांची मुदत मे २०१७ मध्येच संपली आहे. पोषण आहाराची मुदत संपली असतांनाही,प्रशासनाकडून मात्र नव्याने निविदा पद्धती राबविण्याऐवजी त्याच बचत गटांना वारंवार मुदतवाढ दिली जात आहे.त्यामुळे निविदा पद्धतीबाबत आयुक्तांचेही आदेश धाब्यावर बसविण्यात आले असून, स्थायी समितीने पुन्हा त्याच बचतगटांना मुदतवाढ दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

महापालिकेमार्फत ४१८ अंगणवाड्यांमधील सुमारे १३ हजार बालकांना गूळ, शेंगदाणे लाडू, केळी, मटकी, मोडाची उसळ, गव्हाची लापशी, राजगिरा लाडू हा आहार पुरवठा केला जातो. हा पोषण आहार पुरविण्याचे काम निविदा प्रक्रिया राबवून बचत गटांना देण्यात आले होते. या बचतगटांचा ठेका ३१ मे २०१७ रोजी संपुष्टात आला आहे. त्यामुळे पुन्हा त्याला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. आता नोव्हेंबरमध्ये पुन्हा मुदत संपली आहे. त्यामुळे स्थायी समितीवर पुन्हा शुक्रवारी मुदतवाढीचा प्रस्ताव मागच्या दाराने ठेवण्यात आला होता. त्याला स्थायी समितीने पुन्हा मंजुरी दिली. कोणत्याही कामांची मुदत संपण्यापूर्वीच तीन-चार महिने अगोदर नवीन निविदा प्रक्रिया राबविण्याचे स्पष्ट आदेश आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी आपल्या सर्व खातेप्रमुखांना दिलेले आहेत. परंतु, आयुक्तांच्या या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्याचे या सकस आहार पुरवठ्यावरून समोर आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वावीत सशस्र दरोडा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

वावी येथे गुरुवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास सहा दरोडेखोरांनी घराचा दरवाजा तोडून दरोडा टाकल्याची घटना सिन्नर- शिर्डी महामार्गालगतच्या साईभक्त निवासासमोर घडली. वावी परिसरात एकाच आठवड्यातली ही तिसरी घटना असून, वावीसह परिसरात भीतीचे वातावरण आहे.

व्यवसायाने खासगी पशुचिकित्सक असलेले डॉ. रमेश कारभारी देव्हाड (वय ३९) नाशिक- पुणे महामार्गावरील वावी परिसरातील साईभक्त निवासासमोरील बंगल्यात कुटुंबीयांसह राहतात. रात्री अडीचच्या सुमारास निर्मला देव्हाड यांना अचानक आवाज आल्याने त्या हॉलमध्ये झोपलेल्या मुलांना पाहण्यासाठी बेडरूममधून बाहेर आल्या. मुलांना व्यवस्थित पाहून पुन्हा बेडरूमकडे जात असताना त्यांना अचानक किचनमधून आवाज आला. त्यांनी किचनमध्ये जाऊन पाहिले असता दरोडेखोर दरवाजा तोडत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी आरडाओरडा केल्याने पती डॉ. रमेश हेदेखील जागे झाले. त्यांनी दरोडेखोरांना विरोध केला. मात्र, सहा दरोडेखोरांसमोर दोन्ही दाम्पत्य हतबल ठरल्याने दरोडेखोरांनी काही क्षणातच दरवाजा तोडला. त्यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सशस्र दरोडेखोरांनी देव्हाड दाम्पत्यांना चाकूचा व पिस्तुलाचा धाक दाखवून सर्वांना बेडरूममध्ये एकत्र केले व कपाटाच्या किल्ल्यांची मागणी केली. देव्हाड दाम्पत्यांनी त्यांना नकार दिला. त्यामुळे दरोडेखोरांनी दोघांचे हातपाय बांधून ठेवले व पिस्तूल मुलांवर रोखले. मात्र, किल्ल्या सापडत नसल्याने कटावणी व हातोडीच्या साह्याने कपाट तोडून कपाटातील अंदाजे १ लाख १५ हजार रुपये व दहा ग्रॅमचे मंगळसूत्र, पाच ग्रॅमचे कानातील झुबे, दीड ग्रॅमची अंगठी, दोन सॅमसंग कंपनीचे मोबाइल असा सुमारे १ लाख ६६ हजार ५०० रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला. संपूर्ण कुटुंबाचे हातपाय बांधून ठेवलेल्या अवस्थेत असल्याने त्यांची मुलगी वैष्णवी हिने आपली सुटका करून आईवडिलांची सुटका केली व शेजाऱ्यांना जागे केले. मात्र, तोपर्यंत दरोडेखोर पसार झाले होते. घटनेची माहिती मिळताच वावी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रणजित आंधळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी वावी पोलिस स्टेशनमध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ना‌‌शिकचे मॉडेल पथदर्शी

$
0
0

बायोमेडिकल वेस्ट व्यवस्थापनाचा शुभारंभ; अॅपचेही लॉँचिंग

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे जैव वैद्यकीय कचरा (बायोमेडिकल वेस्ट) व्यवस्थापनात पथदर्शी जिल्हा म्हणून नाशिकची निवड झाली आहे. त्याचा उद्‍घाटन सोहळा शुक्रवारी मान्यवरांच्या उपस्थित झाला. यावेळी जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापन व निर्मूलनासंबंधी जनजागृती करणाऱ्या मोबाइल अ‍ॅपचेही लॉँचिंग करण्यात आले. संपूर्ण राज्यात आता या मॉडेल प्रोजेक्टचा प्रचार केला जाणार आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे हॉटेल एक्स्प्रेस इनमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उद्‍घाटन सोहळ्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रधान वैज्ञानिक अधिकारी डॉ. अमर सुपाते व पर्यावरण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सतीश गवई यांच्या हस्ते जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापन व निर्मूलनासंबधी जनजागृती करणाऱ्या मोबाइल अ‍ॅपचे लॉँचिंग करण्यात आले. जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक सुरेश जगदाळे यांना जैव वैद्यक कचऱ्यांच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक डब्यांचे प्रातिनिधीक स्वरुपात वितरणही करण्यात आले. या कार्यक्रमाला नाशिकच्या महापौर रंजना भानसी, आमदार देवयानी फरांदे,

आमदार सीमा हिरे यांच्यासह प्रदूषण मंडळ व युनिडोचे अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमात या मॉडेलवर दिवसभर विविध चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ऑस्ट्रेलिया येथील युनिडो मुख्यालयाचे प्रकल्प व्यवस्थापक एर्लिन्डा गॅलवन, युनिडोचे प्रतिनिधी रेणे व्हॅन बेरकेल, केंद्रीय पर्यावरण विभागाचे संचालक मनोजकुमार गांगेय, महाराष्ट्र पर्यावरण अतिरिक्त सचिव सतीश गवई, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीपकुमार व्यास, युनिडोचे प्रादेशिक समन्वयक डॉ. शक्ती प्रसाद धुआ हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन प्रदूषण मंडळाचे प्रधान वैद्यकीय अधिकारी डॉ. अमर सुमाते यांनी केले. सकाळी साडेनऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमाला सर्व हॉस्पिटलच्या प्रतिनिधींनी उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी आर. यू. पाटील, उपप्रादेशिक अधिकारी अ. ज. कुडे, युनिडोचे राज्य प्रकल्प अधिकारी डॉ. सूरज भांगे यावेळी उपस्थित होते.

मगच अंमलबजावणी

हॉस्पिटल्स, औषध दुकाने आणि प्रयोगशाळेतून निर्माण होणाऱ्या बायोमेडिकल वेस्टची विल्हेवाट लावणारा हा प्रोजेक्ट आहे. नाशिकला यासाठी गेल्या दोन वर्षांपासून काम चालू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. त्यासाठी १३ हॉस्पिटलची निवड करण्यात आली व येथे हे या कचऱ्याचे यशस्वी व्यवस्थापनही करण्यात आले. प्रारंभी त्यासाठी प्रशिक्षण दिल्यानंतर या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे काम सुरू झाले. त्यानंतर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, ग्लोबल इनव्हायरमेंट फॅसिलिटी, युनिडो, केंद्रीय पर्यावरण व वने वातावरणीय बदल मंत्रालय यांच्यातर्फे बायोमेडिकल वेस्टचे पर्यावरणदृष्ट्या सुयोग्य व्यवस्थापन प्रकल्पातंर्गत मॅनेजमेटेंचे हे मॉडेल तयार करण्यात आले आहे.

शॉर्टफिल्म ठरली प्रभावी

या कार्यक्रमात बायोमेडिकल वेस्टचे वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट लावणारी पध्दत व त्यातील आरोग्यास असणारे धोके यावर केलेली शॉर्टफिल्म सर्वांत प्रभावी ठरली. या शॉर्टफिल्मला सर्वांनी टाळ्या वाजवून दादही दिली.

‘बायोमेडिकल वेस्ट प्रोजेक्ट अभिमानास्पद’

जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापनाबाबतचा प्रकल्प हा नाशिक शहरात सुरू होणे ही अभिमानाची बाब आहे. यामुळे शहरातील रोगराई कमी होण्यास मदत होणार असून, शहरातील हॉस्पिटलमधील जबाबदारी ही फार्मसिस्टकडे दिली पाहिजे, असे प्रतिपादन आमदार देवयानी फरांदे यांनी केले. बायोमेडिकल वेस्ट प्रोजेक्टच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. नाशिक शहरात प्रथम घंटागाडी सुरू झाल्यानंतर त्याची पाहणी सर्वच राज्यातून करण्यात आली होती. त्यानंतर नाशिकला खत प्रकल्प उभा राहिला आणि आता जैव वैद्यकीय कचऱ्याचे नियोजन करण्याचा प्रकल्प नाशिकमध्ये साकारत असल्याने नाशिकची चांगलीच सुधारणा होणार असल्याचा विश्वास आमदार फरांदे यांनी व्यक्‍त केला. त्याचबरोबर परदेशाप्रमाणे नाशिकमध्येही हॉस्पिटलची जबाबदारी फार्मसिस्टकडे देणे गरजेचे आहे. फार्मसिस्ट हा केवळ मेडिकल चालविणे किंवा मेडिकल कंपनीत काम करणे यापुरताच मर्यादित नसून, त्यांना हॉस्पिटल मॅनेजमेंटची पूर्ण कल्पना असते. त्यामुळे त्यांना महत्त्वाचे स्थान देणे गरजेचे आहे. नाशिक हे उत्तर महाराष्ट्राचे मेडिकल हब असून, या प्रकल्पाने नाशिकचा विकासच होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

रोगराईला होणार अटकाव

आमदार सीमा हिरे म्हणाल्या, की कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने व्हावे यासाठी महापालिका कायमच प्रयत्न करीत असते. मात्र आता हॉस्पिटलमधील जैव वैद्यकीय कचऱ्याचे व्यवस्थापन होणार असल्याने नाशिकमध्ये चांगले काम होणार आहे. तसेच, शहरातील रोगराईला अटकाव होणार असल्याचा विश्वासही आमदार हिरे यांनी व्यक्त केला.

नाशिक हे स्वच्छतेचे माहेरघर

शहरात खत प्रकल्प सुरू असून, यामुळे कचऱ्याचे योग्य नियोजन होत आहे. आता या प्रकल्पावर वीज निर्मितीसुद्धा होत आहे. त्यामुळे नव्याने येणाऱ्या जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापनाच्या प्रकल्पामुळे नाशिक हे स्वच्छतेचे माहेरघरच ठरेल, असा विश्वास महापौर रंजना भानसी यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अश्व संग्रहालय ठरेल पर्यटकांचे आकर्षण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नंदुरबार

तब्बल तीनशे वर्षांची परंपरा असलेल्या सारंगखेडा येथील यात्रोत्सव आणि अश्व बाजार पर्यटकांचे आगामी काळात आकर्षण ठरणार आहे. तसेच अश्व संग्रहालय देशविदेशातील अश्वप्रेमी व पर्यटकांचे आकर्षण ठरेल. नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास करून रोजगार निर्मितीवर भर देण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सारंगखेडा, ता. शहादा, जि. नंदुरबार येथे यात्रोत्सवानिमित्त आयोजित चेतक फेस्टिव्हलनिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते अश्वसंग्रहालयाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी राज्याचे पर्यटन, रोजगार हमी योजना व नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ. हीना गावित, आमदार डॉ. विजयकुमार गावित, चेतक फेस्टिवल समितीचे अध्यक्ष जयपाल रावल, जिल्हा परिषद सदस्या ऐश्वर्या रावल, सरपंच भारती कोळी, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, नाशिक विभागीय महसूल आयुक्त महेश झगडे, प्रभारी जिल्हाधिकारी अनिल पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, महाव्यवस्थापक स्वाती काळे, विक्रांत रावल, रेखा चौधरी, आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, सारंगखेडा येथील चेतक महोत्सवासाठी पर्यटन मंत्री जयकुमार रावल, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी यांनी परिश्रम घेत कमी कालावधी आयोजित फेस्टिव्हल कौतुकास्पद आहे. जिल्हा माहिती कार्यालय, धुळे यांच्यातर्फे प्रकाशित होणाऱ्या यशार्थच्या माध्यमातून या महोत्सवाचे संदर्भ थेट महाभारत काळात असल्याचे समजले.

घोड्यांबद्दल सर्वांनाच आकर्षण आहे. चेतक फेस्टिवल आगामी काळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचेल. येथे होणाऱ्या अश्व संग्रहालयानिमित्त अतिप्राचीन, प्राचीन काळापासून आजपर्यंतचा घोड्यांचा इतिहास, घोड्यांच्या वेगवेगळ्या प्रजाती, त्यांचे ब्रीडिंग यासह घोड्यांबद्दलच्या विविध गोष्टी येथे येणाऱ्या पर्यटकांना अश्व संग्रहालयाच्या माध्यमातून समजतील. त्यामुळे येथे घोडा विकास व संशोधन केंद्र, पशुचिकित्सालय कार्यान्वित करण्याबाबत विचार केला जाईल.

जगातील पर्यटकांना आदिवासी संस्कृतीचे मोठे आकर्षण आहे. नंदुरबार जिल्ह्यातील होळी महोत्सव पर्यटकांसाठी पर्वणी ठरेल. त्यामुळे या कालावधीत देशविदेशातील पर्यटक येण्यासाठी ब्रॅडिंग करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

पर्यटन मंत्री रावल म्हणाले, सारंगखेडा येथील यात्रोत्सव म्हणजे बहुआयामी यात्रोत्सव आहे. यात्रेच्या माध्यमातून येथील परंपरा, संस्कृती सर्वोच्च पदाला नेण्याचे प्रयत्न असून जगासमोर येण्यास मदत होईल. सारंगखेडा बॅरेज येथे वॉटर स्पोर्ट विकसित करण्यात येईल. याशिवाय प्रकाशे, रावलापाणी, तोरणमाळ, नंदुरबारचा इमाम बादशाह दर्गा विकसित करण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

अश्व कसरतींची पाहणी

चेतक फेस्टिव्हलनिमित्त येथे घोड्यांचा व्यापार भरलेला आहे. यानिमित्त घोडे व्यावसायिक अनेक थरारक कसरती करतात. या कसरतींची अत्याधुनिक आणि वातानुकूलीत अशा प्रेक्षक गॅलरीतून मुख्यमंत्री फडणवीस, पर्यटन मंत्री रावल यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनी पाहणी केली. चेतक फेस्टिव्हलनिमित्त येथे अश्वांवर आधारीत चित्र व छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाची सर्वांनी पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौपदरी उड्डाणपुलाचे काम लागणार मार्गी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
द्वारका ते दत्त मंदिर या ५.९ किलोमीटर चाैपदरी उड्डाणपुलासंदर्भातील सर्वेक्षण अखेर पूर्ण झाले आहे. येथील वाहतुकीच्या दृष्टीने तांत्रिक सल्लागार आकार अभिनव या कंपनीने तीन पर्याय सुचविले आहेत. त्यापैकी सोयीस्कर पर्याय निवडून राज्य, तसेच केंद्र सरकारला पाठविण्यात येणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. त्यामुळे आता या उड्डाणपुलाचा मार्ग सुकर झाला आहे.
गेल्या तीन वर्षांपासून द्वारका ते दत्त मंदिर या मार्गावर चौपदरी उड्डाणपूल व्हावा याकरिता केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता. प्रस्तावित मार्ग नाशिक महापालिका क्षेत्रात येत असल्याने त्याचे काम करण्यास राष्ट्रीय महामार्गाने नकारघंटा दर्शविली होती. मात्र, राज्य सरकारकडे पाठपुरावा करून राष्ट्रीय महामार्गाकडे रस्ता वर्ग केला, तर केंद्र सरकार चारशे कोटींचा निधी देईल, त्याचप्रमाणे उड्डाणपूल कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करू असे आश्वासन दिले होते. प्रस्तावित उड्डाणपुलाकरिता कन्सल्टिंग नेमणूक करण्याची सूचना गडकरी यांनी दिली होती. त्याप्रमाणे राष्ट्रीय महामार्गाच्या मुख्य अभियंत्यांनी आकार अभिनव कंपनीचे संचालक अमोल खैर यांना काम दिले होते. या भागाच्या सर्वेक्षणानंतर खैर यांनी शुक्रवारी द्वारका ते दत्त मंदिर चौपदरी उड्डाणपुलासंदर्भात तीन पर्याय सुचविले आहेत. या संदर्भातील सादरीकरण करण्यात आले. तीन पर्यायांपैकी आवश्यक एक पर्याय निवडला जाणार आहे. त्या संदर्भातील अहवाल राज्य सरकारतर्फे केंद्र सरकारकडे पाठविला जाईल. त्यामुळे आता द्वारका ते दत्त मंदिर या मार्गावरील चौपदरी उड्डाणपुलाचा मार्ग सुकर झाला आहे. केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात होण्याची चिन्हे आहेत.
येथे राहणार रॅम्प
या रस्त्यावर सारडा सर्कल, द्वारका, काठे गल्ली, फेम टॉकीज, आंबेडकरनगर, उपनगर, दत्त मंदिर, बिटको या ठिकाणी चढण्यासाठी व उतरण्यासाठी रॅम्प तयार केले जाणार आहेत. सध्या महामार्गाकडे ३० मीटरची जागा ताब्यात आहे. पुलासाठी एकूण ४५ मीटर रुंदीची जागा लागणार आहे. जंक्शनच्या ठिकाणी ४८ मीटर जागा लागेल. हा रस्ता सध्या सहा लेनचा असून, त्यात पुलाच्या चार लेनची भर पडणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीएमच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग

$
0
0

नाशिक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामागचं हेलिकॉप्टरचं शुक्लकाष्ठ काही सुटताना दिसत नाही. आज सकाळी हेलिकॉप्टरमध्ये मर्यादेपेक्षा जास्त वजन झाल्याने फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरचं नाशिकमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. टेक ऑफ झाल्याबरोबर हेलिकॉप्टरचं लँडिंग करण्यात आल्याने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. मुख्यमंत्र्यांसहीत हेलिकॉप्टरमधील सर्वजण सुखरूप असल्याचं सांगण्यात आलं. खानसाम्याला हेलिकॉप्टरमधून उतरविल्यानंतर या हेलिकॉप्टरने औरंगाबादच्या दिशेनं उड्डाण घेतलं.

आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस औरंगाबादला जायला निघाले होते. नाशिकच्या पोलीस परेड मैदानावरून हेलिकॉप्टरने टेक ऑफ करताच उड्डाणात अडचणी निर्माण झाल्याने सर्वच घाबरले. हेलिकॉप्टर वरच्यावर घिरट्या घेऊ लागल्याने त्यात मर्यादेपेक्षा जास्त वजन झाल्याचं लक्षात येताच हेलिकॉप्टरचे तातडीने लँडिंग करण्यात आले. त्यानंतर हेलिकॉप्टरमधून खानसामा सतीश याला उतरविल्यानंतर हेलिकॉप्टरने टेक ऑफ घेतले. या हेलिकॉप्टरमधून मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि त्यांचे स्वीय सचिव प्रवास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images