Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘पारदर्शक कारभारा’चे ढोल वाजवून वाभाडे

0
0


म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड नगरपालिकेतील शिवसेना प्रशासनाच्या विरोधात शहर भाजपने आंदोलनाचा पवित्रा घेतला. मनमाड पालिकेचा कारभार पारदर्शक नसल्याचा आरोप करीत गुरुवारी भाजपतर्फे विविध मागण्यांसाठी शहरातून मोर्चा काढण्यात आला. तसेच ढोलबजाओ आंदोलन करण्यात आले.

मनमाड पालिकेतील शिवसेना प्रशासनाविरोधात आवाज उठवत पालिका प्रशासनाला जाग आणण्यासाठी भाजपतर्फे हे आंदोलन करण्यात आले. गुरुवारी सकाळी महात्मा फुले चौक येथून मनमाड पालिकेवर धडक मोर्चा काढून ढोलबजाओ आंदोलन करण्यात आले.

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, शहराध्यक्ष जयकुमार फुलवाणी, पदाधिकारी उमाकांत रॉय, नारायण पवार, पंकज खताळ, सचिन कांबळे, एकनाथ बोडके, सतीश परदेशी, महेंद्र गायकवाड, मनोज ससाणे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

पालिकेच्या विकासकामांची गुणवत्ता तपासावी, ऑडिट करण्यात यावे, रस्त्यांचे नूतनीकरण करावे, कचराकुंड्या साफ कराव्यात अशा मागण्या करीत पालिका प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शिवसेनेचे गटनेते गणेश धात्रक यांनी आस्थापना अधिकारी आदींना मागण्यांचे निवेदन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ड्रेनेजचे सांडपाणी गोदापात्रात

0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

महापालिका हद्दीतील सांडपाण्याच्या पाइपलाइन फोडण्याचे प्रकार सातत्याने होताना दिसतात. सातपूर विभागातील गंगापूररोड परिसरातील ध्रुवनगर भागात गेल्या महिन्यापासून असे प्रकार होत असल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे, ड्रेनेजचे हे सांडपाणी पुढे थेट गोदावरीत मिसळत असून, याकडे महापालिका व स्थानिक नगरसेवकांचेही दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

महापालिकेकडून ठिकठिकाणच्या ड्रेनेजच्या दुरुस्तीचे काम अनेकदा केले जाते. मात्र, ड्रेनेज लाइन फोडणाऱ्यांवर कारवाईच होत नसल्याने असे प्रकार वारंवर घडत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. ड्रेनेजची पाइपलाइन फोडल्यानंतर रस्त्यांसह उघड्या नाल्यांतून वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, याकडे महापालिकेचा आरोग्य विभाग कधी लक्ष देणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

गंगापूर धरणाच्या उजव्या कॅनॉलवर महापालिकेने उभारलेली सांडपाण्याची ड्रेनेज लाइन यापूर्वीही अनेकदा फोडण्यात आलेली आहे. महापालिकेच्या भूमिगत गटार विभागाकडून संबंधित ड्रेनेजची दुरुस्ती अनेकदा करण्यात येते. परंतु, असे असतानाही याप्रश्नी महापालिकेची यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या महिन्यापासून सांडपाणी उघड्यावरून वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांसह हॉटेल व्यावसायिकांनादेखील नाक मुठीत धरून वावरावे लागत आहे. महापालिकेच्या भूमिगत गटार विभागाने याप्रश्नी लक्ष घालावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

--

यंत्रणांचा कानाडोळा

ध्रुवनगर भागाला लागून असलेल्या गंगापूर धरणाच्या उजव्या कॅनॉलला लागून महापालिकेची थेट सांडपाण्याची पाइपलाइन टाकण्यात आली आहे. परंतु, संबंधित सांडपाण्याची ड्रेनेजची पाइपलाइन वारंवार फोडण्यात येत असल्याने त्याचा त्रास रहिवाशांना सहन करावा लागत आहे. फोडलेल्या ड्रेनेजमधील सांडपाणी पुढे नैसर्गिक नाल्यांतून वाहत जाऊन थेट गोदावरीत मिसळत असल्याने गोदा प्रदूषणात भर पडत आहे. मात्र, महापालिका व स्थानिक नगरसेवकांचेदेखील त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

--

ध्रुवनगर भागात महापालिकेने टाकलेली ड्रेनेजची पाइपलाइन नेहमीच फोडण्यात येते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. ड्रेनेजचे सांडपाणी पुढे गोदापात्रात मिसळत असल्याने महापालिकेच्या संबंधित यंत्रणेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

-बाजीराव शिंदे, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवीस वर्षांनी पुन्हा अनुभवली शाळा!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंचवीस वर्षांनंतर पाहिलेला आपला वर्ग, भेटलेले अनेक सवंगडी अन् गुरुजन यामुळे सीडीओ मेरी हायस्कूलमध्ये जमलेले ‘ते’ सर्व विद्यार्थी भारावून गेले होते... निमित्त होते या हायस्कूलमध्ये झालेल्या १९९२ मधील दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे. नुकत्याच झालेल्या या मेळाव्याद्वारे या माजी विद्यार्थ्यांनी २५ वर्षांपूर्वीच्या जुन्या आठवणींना उजाळा देत पुन्हा शाळा अनुभवली.

या अनोख्या मेळाव्यात ‘ती सध्या काय करते?’ किंवा ‘तो सध्या काय करतो?’ या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी एकमेकांकडून जाणून घेत जुन्या आठवणींना उजाळा दिला. अनेक जण आपापल्या वर्गात जाऊन त्या काळातील आपल्या बेंचवर बसत सेल्फी काढण्यात गुंग झाले होते. त्या काळातील शिक्षकही मेळाव्यात सहभागी झाले होते. पराग गुजराथी, राजेश राजवाडे, योगेश जाधव, प्रशांत बर्वे, संदीप मोराडे, उमाकांत सावदेकर, मनोज कर्पे यांनी या मेळाव्यासाठी विशेष परिश्रम घेतले. रेखा जोशींच्या स्वागतगीताने पंचवीस वर्षांपूर्वीचा भूतकाळ ताजातवाना झाला. राजेश राजवाडे यांनी सूत्रसंचालनातून कार्यक्रम फुलवत नेला.

या मेळाव्यात सचिन टिळे, तुषार भट, उमाकांत सावदेकर, संदीप मोराडे, दिनेश दोंदे, गणेश सदगीर, समीर पारगावकर, हेमंत शिंदे, संदीप मुळाणे, विजय लिंबकर, घनःश्याम कोळी, सुमित भगत, डॉ. प्रसाद वाघ, रेखा जोशी, योगिता पंडित, अंजली मेखे, रेखी पुरी, पद्मा माने, देवयानी साळवे, लक्ष्मण गावडे, सुहास चौधरी, प्रशांत लोखंडे, अमित गोखले, सिद्धांत पडोळ, मंदार कुलकर्णी, स्वरूप भद्रे, योगेश कांबळे, मनीष पलुस्कर यांच्यासह असंख्या माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.

--

देश-विदेशांतून सहभाग

सीडीओ मेरी शाळेत झालेल्या या मेळाव्यात नाशिकसह बेंगळूरू, मुंबई, भरौच, सिल्व्हासा, चंद्रपूर, पुणे, जालना, कराड, औरंगाबाद अशा विविध शहरांतून सुमारे शंभर विद्यार्थी सहभागी झाले होते. परदेशांतील विद्यार्थी या मेळाव्यात ऑनलाइन सहभागी झाले होते. जुन्या आठवणींना उजाळा देताना अनेकांच्या डोळ्यांच्या कडा आपोआप ओलावल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता ‘प्रॉक्टोलॉजी’ची फेलोशिप मिळणार

0
0

देशात पहिल्यांदाच विकसित; आरोग्य विद्यापीठाने दिली संलग्नता

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आरोग्य सेवांमध्ये उच्च दर्जाचे उपचार रुग्णांना मिळावेत यासाठी महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या वतीने फेलोशिप उपक्रम नव्याने राबविले जात आहेत. विविध विषयांसाठी नव्याने आरोग्य क्षेत्रातील घटक पुढे येत आहेत. यानुसार नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाने (एमयुएचएस) पुण्यातील हिलिंग हँड्स क्लिनिकला ‘फेलोशिप इन प्रॉक्टोलॉजी’ संलग्न केली आहे.

विद्यापीठाशी संलग्न होऊन अशाप्रकारचा ‘प्रॉक्टोलॉजी’ विषयाचा अभ्यासक्रम देशात पहिल्यांदाच विकसित करण्यात आला आहे. या फेलोशिपअंतर्गत दरवर्षी एमयुएचएसमधील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील पाच विद्यार्थ्यांना प्रॉक्टोलॉजी विषयाच्या एक वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जाणार आहे. याबाबत माहिती कोलोरेक्टल सर्जन डॉ. अश्विन पोरवाल म्हणाले, ‘पाइल्स, प्रोलॅप्स, बद्धकोष्ठता, इन्कॅन्टिन्स आणि फिस्तुला या विषयांचा समावेश असलेल्या प्रॉक्टोलॉजी क्षेत्रासाठी पहिल्यांदाच असा अभ्यासक्रम भारतामध्ये विकसित केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारसा स्थळांबाबत वाढविणार संवेदनशीलता

0
0


महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाच्या नाशिक कार्यालयाचे सहायक संचालक म्हणून विलास वाहने नुकतेच रुजू झाले. त्यांच्याकडे नाशिकसह पुणे पुरातत्त्व विभागाच्या सहायक संचालकपदाचा कार्यभारही राहणार आहे. नागरिकांचा पुरातत्त्व विभागाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याबरोबरच विभागाने आतापर्यंत केलेल्या कामांची माहिती पोहोचविण्याबरोबरच वारसा स्थळांबाबत संवेदनशीलता वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘मटा टॉकटाइम’मध्ये त्यांनी साधलेला संवाद...


वारसा स्थळांकडे नागरिकांनी कसे पाहायला हवे?

आतापर्यंत पुरातत्त्व‌ विभागाने वारसा स्थळांकडे कसे पाहायला हवे, असे विचारले जायचे. मात्र, आता वारसा स्थळांबाबत आपुलकी वाढली आहे. त्यामुळे आता हा प्रश्न बदलला आहे. यावरून वारसा स्थळे आपल्या जीवनात किती महत्त्वाची भूमिका बजावतात हे लक्षात येते. पुरातत्त्व विभागाचे मुख्य काम आहे वारसास्थळांचे संरक्षण व संवर्धन करणे. पण, आता संवर्धनाबरोबरच संबंधित स्थळ जेथे आहे तेथे नागरिकांना बरोबर घेऊन वारसा स्थळाच्या संरक्षण व संवर्धनाची भूमिका पार पाडणे गरजेचे झाले आहे. नागरिकांची वारसा स्थळांबाबत संवेदनशीलता वाढल्यास त्या स्थळांचे संरक्षण व संवर्धन योग्य पद्धतीने होऊ शकेल, असे वाटते. याच पद्धतीने नाशिक विभागात काम करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी रुजू होताच वारसा स्थळांची पाहणी व सुरू असलेल्या कामांचा आढावा घेणे सुरू केले आहे.


सरकारवाडा कधीपर्यंत खुला होईल?

नाशिकसाठी सरकारवाडा ही महत्त्वाची वास्तू आहे. त्यावर पुरातत्त्व विभागाने मोठा खर्च ही केला आहे. सरकारवाडा लवकरात लवकर खुला व्हावा यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. येथील कार्यालय इतरत्र हलवून कामाला वेग देण्याचा प्रयत्न करीत आहे. सरकारवाड्याचे बरेचसे काम अजूनही बाकी आहे. वाड्याच्या संवर्धनासाठी पावसाळ्यापूर्वी काही कामे होणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ- वाड्याचे छप्पर पावसाळ्यापूर्वी बंदिस्त करायला हवे. त्यासाठी ६० लाखांच्या निधीची गरज असून, त्याबाबतचा प्रस्ताव संचालकांना पाठविणार आहे. सरकारवाड्यात प्रादेशिक वस्तुसंग्रहालय, ग्रंथालय, कायमचे प्रदर्शन हॉल तयार करण्याचा मानस आहे.


सुंदरनारायण मंदिराचे काम केव्हा पूर्ण होईल?

सरकारवाड्याप्रमाणे सुंदरनारायण मंदिर हे नाशिकचे मुख्य आकर्षणाचे केंद्र आहे. त्यामुळे या मंदिराच्या कामासाठी चार कोटी निधी मंजूर असून, दोन वर्षे कालावधीत हे काम पूर्ण होणार आहे. हे मंदिर पूजेत असल्याने त्याचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी बैठकी सुरू आहेत. कामातील अडचणी व त्या सोडविण्यासाठी समन्वय, नियोजन यावर भर दिला जात आहे. सध्या दगड घडविण्याचे काम सुरू आहे. मंदिर उतरविण्याचे काम लवकरच सुरू होईल. सुंदरनारायणाप्रमाणेच नाशिकमधील अनेक मंदिराच्या संरक्षण व संवर्धनाची गरज आहे. ही कामेही हाती घेण्यात येतील.


चांदवडचा रंगमहाल केव्हा खुला होईल?

अहिल्यादेवी होळकर यांच्या चांदवडच्या रंगमहालाचे बरेचसे काम झाले आहे. त्यामुळे त्या वारसा स्थळाला झळाळी आली आहे. रंगमहाल ज्या नावाने ओळखला जातो त्या चित्रांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी चांगल्या पद्धतीने प्रयत्न होण्याची गरज आहे. येथील चित्रांच्या संवर्धनाचे काम बाकी आहे. लोकांची अपेक्षा व त्यातील अडचणी यावर विचार करून रंगमहालाला लोकांसमोर ठेवणार आहोत.


नाशिक परिसरातील अनेक किल्ले संरक्षित नाहीत?

नाही, असे नाही. महाराष्ट्रात सर्वाधिक किल्ले नाशिकमध्ये आहेत. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हे ओळखून त्यासाठी सकारात्मक पावले उचलली जात आहेत. गड संवर्धन कमिटीने केलेल्या सूचनांनुसार अधिकाधिक किल्ले पुरातत्त्व विभागाच्या अंतर्गत आणण्याचे काम सुरू आहेत. पुणे, नाशिक, रत्नागिरी या विभागातील एकूण १५ जिल्ह्यांतील ८८ किल्ले संरक्षित होणार असून, त्यातील ३२ किल्ले नाशिक जिल्ह्यातील आहेत. किल्ले संरक्षित केल्यानंतर त्यांच्या संर‌क्षण व ‌संवर्धनासाठी निधीची तरतूद केली जाणार आहे. याशिवाय संरक्षित नसलेले किल्लेही पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली कसे राहतील, याकडे लक्ष दिले जाणार आहे.


किल्ल्यांच्या संवर्धनावरून वाद का होतात?

संवर्धन चांगले व्हावे, या उद्देशातून हे वाद निर्माण होतात. वादाचे रुपांतर संवादात व्हावे, असा पुरातत्त्व विभागाचा प्रयत्न आहे. त्यासाठी संस्था, संघटनांच्या मदतीने व किल्ले संवर्धनासाठी त्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम करून प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. फक्त गडकिल्ले संवर्धनासाठी प्रयत्नशील असणाऱ्या संस्थांनी पुरातत्त्व विभागाशी संवाद साधून एकत्रितपणे प्रयत्न करायला हवेत. त्यामुळे चांगले काम होऊ शकेल. अनेकदा परवानगीशिवाय काम झाल्याने पुरातत्त्वीय अंगाने काम न झाल्याने काय होते हे पाहायला मिळते. असे होऊ नये म्हणून आम्ही संस्था-संघटनांसह वन विभागाशी संवाद साधत आहोत. पुरातत्त्वच्या संकेतांनुसार गड-किल्ल्यांवर कामे व्हावीत, हे वन विभागानेही मान्य केले आहे. त्यामुळे येत्या काळात सर्वांनी एकत्र येऊन केलेल्या कामामुळे मोठा बदल झालेला पाहायला मिळेल.


वारसा स्थळांचा माहितीचे संकलन कसे करणार?

नाशिक परिसरात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिर संरक्षित करता येईल का, असा प्रश्न नेहमी विचारला जातो. यासाठी महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत व तेथील संस्था संघटनांची मदत लागणार आहे. आपला वारसा जपण्याची जबाबदारी आपलीच आहे. एवढे जरी नागरिकांमध्ये बिंबवता आले, तरी पुरातत्त्व विभाग मोठे काम पुढे घेऊन जाण्यात यशस्वी होईल. वारसा म्हणजे काय, तो कसा जपावा यासाठी लघुपटाची निर्मिती करून त्याद्वारे जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अनेकदा वास्तू पाडल्या जातात. दगडाच्या वास्तू पुन्हा आहे तशा बांधल्या जाऊ शकतात, हे माहिती नसल्यामुळेही हे घडते. त्यासाठी पुरातत्त्व विभागाची ओळख कामातून निर्माण करण्याचा प्रयत्न असेल.

(संकलन : रमेश पडवळ)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात पांझरा नदीवर साकारणार झुलता पूल

0
0

सरकारकडून जिल्हाधिकाऱ्यांना आदेश; आठ महिन्यांत कामास सुरुवात

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील पांझरा नदीवर झुलता पूल साकारण्याचा मार्ग मोकळा झाला असून, सरकारने गेल्या आठ वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न कायमचा निकाली काढला आहे. त्या पुलासंबंधीचे आदेश सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना केले आहेत. त्यामुळे पांझरा नदीवर एक सुंदर पर्यटनस्थळ लवकरच साकारले जाणार आहे, अशी माहिती शहराचे आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे.

धुळे शहरातील पांझरा नदीच्या पुलावर गेल्या आठ वर्षांपासून झुलता पुलाचा प्रश्न प्रलंबित होता. याबाबत आता सरकारने निर्णय घेत झुलत्या पुलासंदर्भातील आदेश धुळे जिल्हाधिकाऱ्यांना नुकतेच दिले आहेत. याविषयी आमदार अनिल गोटे यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यामुळे आता धुळे शहराच्या वैभवात भर पडणार असून, पर्यटनस्थळाला चालना मिळणार आहे.

याठिकाणी उभारण्यात आलेल्या या मूर्तीच्या जटेतून सायंकाळच्या वेळी गंगा रुपाने पाणी बाहेर पडणार आहे, खाली पृष्ठभागावर सुंदर कमळ असे विलोभनीय दृश्य असलेले प्रेक्षणीय स्थळ उभारण्यात येणार आहे. हे स्थळ येत्या सहा ते आठ महिन्यांत तयार करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून दोन कोटी रुपयांचा निधी बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत पत्रदेखील प्राप्त झाले आहे. त्यामुळे लवकरच धुळे शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी झुलता पूल व इतर स्थळे तयार होऊन शहराची नवी ओळख निर्माण होईल, असेही आमदार गोटे यांनी पत्रकातून म्हटले आहे.

अशी राहणार पुलाची रचना...

पांझराकिनारी गणपती मंदिराजवळ झुलता पूल उभा केला जाणार

पुलाच्या मध्यभागी ७५ x ७५ मीटरचा प्लॅटफॉर्म एका खांबावर उभा असेल

एकाचवेळी ४ हजार नागरिक याठिकाणी बसू शकणार

मध्यभागी भगवान शंकराची ३३ फूट उंचीची मूर्ती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्यांच्या’साठी मनमाड ठरले माणूसकीचे स्टेशन!

0
0

संदीप देशपांडे, मनमाड

पुण्याहून अकोल्याला आझाद हिंद एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या अंध बासरीवादकाच्या गरोदर अंध पत्नीला रेल्वेतच प्रसूतीकळा सुरू झाल्यानंतर मनमाड शहरातील माणुसकीचे शिलेदार त्यांच्या मदतीला धावले. उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या या अंध महिलेने गोंडस व डोळस बाळाला जन्म दिला. या महिलेला माहेरची साडी देत आणि या अंध दाम्पत्याचा सर्व खर्च करत दोन-तीन दिवस त्यांच्या पाठिशी उभ्या असणाऱ्या मनमाडकरांची आपुलकी पाहून हे अंध दाम्पत्य भारावून गेले आहे. एका गरीब अंध बासरी वादकाच्या अंधकारमय जीवनात डोळस सूर उमटल्याची ही घटना मानवतेचा गहिवर दर्शविणारी ठरली आहे. मनमाडमधील हे मदतीचे हात व माणुसकीचे शिलेदार डोळ्यांना दिसत नाही म्हणून खंत बाळगणाऱ्या या अंध दाम्पत्याने आम्हाला देवदूत भेटल्याची भावना व्यक्त केली.

अकोला येथील किशोर व उमा वाघ हे अंध दाम्पत्य पुणे येथून सोमवारी रात्री आझाद हिंद एक्सप्रेसने अकोला येथे जाण्यास निघाले. गरोदर असलेल्या उषा यांना रेल्वे मनमाड स्थानकादरम्यान आली असता प्रसूती कळा सुरू झाल्या व हे अंध दाम्पत्य बावरून गेले. किशोर वाघ यांनी १०८ क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका मागवली. रेल्वे मनमाडला थांबली असल्याने या घटनेची माहिती मिळताच मनमाडचे कैलास खैरे, अल्ताफ खान, प्रवीण पगारे, संजय कांबळे, प्रहार संघटनेचे पुंडे हे सर्व त्या दाम्पत्याच्या मदतीला धावले. त्यांनी तातडीने मध्यरात्री उपजिल्हा रुग्णालयात उषा वाघ यांना दाखल केले. वैद्यकीय अधिकारीही हजर झाले. पहाटे उषा यांनी गोंडस बाळाला जन्म दिला.

डोळस बाळाचा जन्म

आपले बाळ डोळस असल्याचे समजताच या अंध दाम्पत्याच्या डोळ्यांत आसवे जमा झाली. बँडमध्ये काम करणाऱ्या अंध किशोर वाघ यांनी आपली आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याचे सांगत पैसे नसल्याने घरी जाण्याचा हट्ट धरला. पण, थंडी, पावसाळी हवामान बाळाला बाधेल म्हणून मनमाडकरांनी त्यांना दोन-चार दिवस थांबण्याचा आग्रह केला. त्यांचा खाण्या-पिण्याचा खर्चही उचलला.

माहेरसारखा पाहुणचार

उषा यांना या कार्यकर्त्यांनी माहेरची साडी घेतली. किशोर व त्यांच्या बाळाला कपडे केले आहेत. चांगला सकस व पौष्टिक आहार उषा यांना मिळावा याकडेही त्यांचा कटाक्ष आहे. त्यांचे हे डोळस काम व माणुसकी अनुभवताना या दाम्पत्याचे डोळे पुन्हा-पुन्हा पाझरत आहेत. दिसत नसताना, कोणती ओळख व कसलेही नाते नसताना मनमाडमध्ये आधार मिळाला. मनमाड हे माणुसकीचे स्टेशन आम्हाला भेटले, हे सांगताना हे जोडपे हरखून गेले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपहार प्रकरणी पोतनीस बंधूंना अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सुनंद कन्स्ट्रक्शन आणि इस्टेट कंपनीत ठेव ठेवल्यास जादा दराने व्याज देण्याचे आमिष दाखवून ४४ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी कंपनीचे मालक वंदन अरविंद पोतनीस, सुहास अरविंद पोतनीस व आनंद अरविंद पोतनीस यांच्यावर सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यातील सुहास आणि आंनद यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना कोर्टासमोर हजर केले असता सोमवारपर्यंत (दि. १०) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या प्रकरणी सुभाष राजाराम आंबेगावकर (७२, रा. फ्लॅट नंबर ६ सुनंद सहनिवास डी विंग, काठेगल्ली) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक वर्षापासून फिर्यादी सुभाष आंबेगावकर व तीनही आरोपी यांची ओळख आहे. या ओळखीचा फायदा घेत पोतनीस यांनी आपल्या मालकीच्या असलेल्या सुनंद कंस्ट्रक्शन कंपनीत ठेव ठेवल्यास बाजारभावापेक्षा जास्त दराने म्हणजेच दर साल दर शेकडा १५ टक्के दराने व्याज देऊ असे कबूल केले. रक्कम आमच्या ताब्यात आहे तोपर्यंत व्याज मिळेल असे फिर्यादी आंबेगावकर यांना पोतनीसांकडून सांगण्यात आले. आंबेगावकर यांनी पोतनीसांवर विश्वास ठेवून २००६ ते २०१५ या काळात वेळोवेळी ४४ लाख रुपये गुंतवले. गुंतवणूकदाराला खात्री पटावी यासाठी पोतनीस यांनी २०१४ पर्यंत नियमित व्याज दिले. आंबेगावकर यांनी पैशाची मागणी केल्यानंतर तीनही आरोपींनी मुद्दल व व्याजाचे पैसे देण्यास नकार दिला. याबाबत आंगेबावकर यांनी अनेकदा पैशाचा तगादा लावला परंतु पोतनीस यांनी पैसे देण्याबाबत टाळाटाळ केली. त्यावरून आंबेगावकर यांनी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी वंदन, सुहास, आनंद या पोतनीस बंधूंविरूद्ध सराकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये ४२०, ४०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. यातील सुहास आणि आनंद यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश गवळी अधिक तपास करीत आहे.

वंदन पोतनीस फरार

पोलिसांनी बुधवारी (दि. ६) मध्यरात्री पोतनीसांच्या घरावर छापा टाकून सुहास आणि आनंद या दोघांना अटक केली. मात्र, वंदन पोतनीस फरार होण्यास यशस्वी ठरले. पोलिस त्यांचा शोध घेत असून लवकरच त्यांच्यावर कारवाई होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्वतेच्या उत्सवाला स्वरसुरांचा साज

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गुजरातमधील बडोदा येथे होणाऱ्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘श्रीनिवास खळे रजनी’ हा बहारदार संगीताचा कार्यक्रम होणार आहे. यात मुंबईतील गायकांसोबत बडोद्यातील गायक आपली कला सादर करणार आहेत.

मराठी साहित्य संमेलन म्हणजे साक्षात सरस्वती देवीचा उत्सव मानला जातो. देवी शारदेला प्रसन्न करण्यासाठी शब्दांसोबत सुरांचीही आराधना केली जाते. अशीच आराधना ‘श्रीनिवास खळे रजनी’ या बहारादार संगीत मैफलीतून केली जाणार आहे. मराठी संगतीसृष्टीमध्ये एकापेक्षा एक बहारदार गाण्यांची रचना करणारे श्रीनिवास खळे हे मूळचे बडोदा येथील होते. ऐकण्यास अतिशय मधूर मात्र गायनास तितकीच आव्हानात्मक अशी खळे यांनी निर्माण केलेल्या गाण्यांची ओळख आहे. मराठी रसिकांच्या मनावर वर्षोनुर्षे राज्य करणारी अशी सदाबहार गाणी बडोद्यातील साहित्य संमेलनात सादर केली जाणार आहेत. यात खळे यांचे शिष्य राहिलेल्या व मुंबईतील प्रसिद्ध संगीत संयोजक कमलेश भडकमकर यांच्या मार्गदर्शनाखाली गायनासाठी इच्छूक असलेल्या कलावतांची निवड चाचणी बडोदा येथील म्युझिक कॉलेजमध्ये नुकतीच घेण्यात आली. भडकमकर यांनी प्रत्यक्ष गायन करणाऱ्या कलावंतांची निवड केली. या कलावंतांनी शास्त्रीय व सुगम मराठी गीते सादर केली. या उपक्रमात मराठी साहित्य परिषदेचे कार्यवाह आशिष जोशी, दीपक भोंडे, प्रकाश गर्गे आणि मिलिंद बोडस यांचे योगदान होते. निवड झालेले कलावंत खळे यांच्या अभंग, नाट्यगीत, भावगीते अशा विविध रचना सादर करणार आहेत.

संमेलनाची माहिती ट्विटरवर
मराठी साहित्य संमेलनाच्या विविध घडामोडी आणि अन्य माहितीसाठी ट्विटर अकाउंट सुरू करण्यात आले आहे. यावरून मराठी साहित्यरसिकांना बडोद्याच्या संमेलनाचे अपडेट मिळणार आहे. ९१ अखिल भारतीय साहित्य संमेलन, बडोदे या नावाने @sanjaybachav91 ट्विटर अकाउंट आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एचएएल’तर्फे उद्या स्वदेशी संमेलन

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्वदेशी बनावटीचे भारतीय लढाऊ विमान साकारण्याचा हिन्दुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडचा (एचएएल) प्रयत्न यशस्वी झाला आहे. म्हणूनच एचएएलच्यावतीने राष्ट्रीय पातळीवरील स्वदेशी संमेलनाचे आयोजन शनिवारी (दि. ९) करण्यात आले आहे.

रशियन सरकारबरोबर करार करून भारताने लढाऊ विमानांची निर्मिती सुरू केली. मात्र, स्वदेशी बनावटीचे लढाऊ विमान साकारण्याचे धोरण भारत सरकारने २००३ च्या सुमारास स्वीकारले. या अंतर्गत सूक्ष्म, लहान आणि मोठ्या भारतीय उद्योगांकडून विमानांच्या निर्मितीसाठी लागणारे विविध पार्ट खरेदी करण्यास एचएएलने प्राधान्य दिले. खासगी सहकारी भागीदारी (पीपीपी) तत्वावर हा प्रयोग अतिशय यशस्वी ठरला आहे. म्हणूनच सुखोई ३० एमकेआय या लढाऊ विमानासाठी तब्बल ९० खासगी उद्योगांकडून विविध प्रकारचे सुटे भाग पुरविले जातात. खासगी उद्योगांना सहभागी करून घेण्याचा सतत प्रयत्न ‘एचएएल’कडून होत आहे.

स्वदेशी बनावटीच्या लढाऊ विमान निर्मितीत ‘पीपीपी’चा हा प्रयोग अतिशय यशस्वी ठरला आहे. म्हणूनच ‘एचएएल’च्या वतीने पीपीपी संमेलन २०१७ चे आयोजन ओझर येथे करण्यात आले आहे. या समारंभास संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, एचएएलचे चेअरमन टी सुवर्ण राजू हे उपस्थित राहणार आहेत. एचएएल टाउनशीपमध्ये दुपारी ४ वाजता होणाऱ्या समारंभास भारतभरातील ९१८हून अधिक व्हेंडर्स उपस्थित राहणार आहेत. तसेच बंगळुरूच्या डायनामॅटिक टेक्नॉलॉजिज या कंपनीच्या वतीने सुखोईसाठी लागणाऱ्या एका सुट्या पार्टचा स्वीकार या प्रसंगी केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राधिकरण मंडळांसाठी १५१ अर्ज

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा विविध प्राधिकरण मंडळाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून प्रक्रियेला वेग आला आहे. या निवडणुकीसाठी विविध जागांसाठी नाशिक मुख्यालयात १५१ उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने ‌दिली आहे.

विद्यापीठ अधिनियमानुसार विविध प्राधिकरण मंडळ जसे अधिसभा, विद्यापरिषद व अभ्यास मंडळावरील विविध सदस्यांसाठी निवडणूक घेण्यात येते. यासाठी सदस्य निवडीसाठी विद्यापीठातर्फे निवडणूक घेण्यात येणार आहे. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी तथा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण म्हणाले, की विद्यापीठाच्या नागपूर, मुंबई, पुणे व औरंगाबाद या चार शहरांमधील विभागीय केंद्रावरही अर्ज जमा करण्याची सोय करण्यात आली होती. तेथील अर्ज एकत्रित केल्यानंतर एकूण उमेदवारांच्या अर्जांची संख्या हाती येईल. पण नाशिक मुख्यालयात नामनिर्देशन सादर करण्याच्या मुदतीअखेर १५१ अर्ज सादर आहेत.

प्राप्त अर्जाची विद्यापीठ मुख्यालयात ११ डिसेंबर रोजी छाननी केली जाणार आहे. छानणी अखेर उमेदवारांच्या वैध अर्जाची यादी विद्यापीठाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या निवडणूक प्रक्रियेत उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी २० डिसेंबर ही मुदत देण्यात आली आहे. उमेदवारांची अंतीम यादी २१ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. विद्यापीठाची विविध प्राधिकरण निवडणूक २८ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वेळेत राज्यभरातील विविध मतदान केंद्रावर रावविण्यात येईल. या मतदानाची मतमोजणी ३० डिसेंबर रोजी विद्यापीठ मुख्यालयात करण्यात येईल. त्यानंतर निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

बिनविरोध निवडीची शक्यता
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांसाठी पार पडणाऱ्या या निवडणूक प्रक्रियेसाठी तयारी पूर्ण झाल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. कालिदास चव्हाण यांनी दिली. या निवडणुकीसाठी राज्यभरातून सुमारे १४ हजार मतदारांनी नोंदणी केली आहे. निवडणुकीतील बहुतांश जागा बिनविरोध होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. निवडणुकीची यापूर्वीही बिनविरोध निवडीची परंपरा राहिली आहे. दरम्यान, २० डिसेंबर रोजी अर्ज माघारीची मुदत आहे. यापूर्वी, सोमवारी (दि. ११) आलेल्या सर्व अर्जांची छानणी होणार आहे. तसेच २१ डिसेंबर रोजी निवडणूक रिंगणातील उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. त्यामुळे अर्ज माघारीनंतरच लढतीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. डॉक्टर घडविणाऱ्या या विद्यापीठातील निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतजमिनींसाठी न्यायालयीन लढाई

0
0


म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग कंपनीने विकत घेतलेल्या तालुक्यातील दाभाडी येथील गिसाका कारखान्यास दिलेल्या जमिनी परत मिळाव्यात यासाठी दाभाडी येथील शेतकऱ्यांनी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे.

गिसाका आर्मस्ट्राँग कंपनीने २९४ एकर जमिनीसह २७ कोटी इतक्या अल्प किमतीत विकत घेतला होता. यामुळे परिसरातील शेतकरी, कामगार, सभासद यांच्यात असंतोष निर्माण झाला होता. यानंतर गिसाका बचाव समितीच्या यशवंत आहिरे यांच्या नेतृत्वात सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले होते. कारखान्यासाठी शेतकऱ्यांनी दिलेल्या जमिनी परत मिळाव्यात, अशी मागणी त्यावेळी करण्यात आली होती. तसेच त्या जमिनींवर शेतकऱ्यांनी नागर फिरवून पेरणी देखील केली होती. आता आपल्या जमिनी परत मिळव‌ण्यिासाठी येथील शेतकऱ्यांनी नायालयीन लढाई लढण्याची तयारी सुरू केली आहे. कारखान्यासाठी जमीन दिलेल्या १९ शेतकऱ्यांनी न्यायालयात दावा दाखल केला आहे. या दाव्यात महाराष्ट्र शासन, नाशिकचे जिल्हाधिकारी, साखर आयुक्त, आर्मस्ट्राँग व इन्फ्रा प्रा. लि. व अवसायक गिरणा कारखाना यांना वादी करण्यात आले आहे. त्यांना न्यायालयात हजार राहण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे, अशी माहिती दाभाडी भूमी बचाव समितीचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात रंगतोय ऊन-सावलीचा खेळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेले दोन दिवस ओखी वादळाचा फटका नाशिक शहरालाही बसला. थंडी, ऊन, ढगाळ वातावरण शहरात पाहायला मिळाले. गुरुवारी दिवसभर ऊन-सावलीचा खेळ शहरात होता. तर सायंकाळी सहा वाजताच अंधाराने शहराला व्यापले. गेल्या आठवड्यात दहा अंश सेल्सियसवर स्थिरावलेल्या किमान तपमानातही वाढ झाली असून १६.३ अंश सेल्सियसवर गुरुवारी तापमान स्थिरावले.

ओखी वादळाचा परिणाम राज्यभरात विविध ठिकाणी झाल्याचे दिसून आले. गार वाऱ्यांमुळे दोन दिवस शहर थंडीने कुडकुडले होते. गुरुवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण असल्याने किमान वातावरणातही वाढ झाली होती. तर आर्द्रतेचे प्रमाणही ९४ टक्के होते. सकाळी अकरा वाजेच्या सुमारास सूर्यप्रकाशाने दिलासा दिला होता. परंतु, तोही काही वेळच. त्यानंतर पुन्हा ढगाळ वातावरणामुळे अंधारलेली परिस्थिती होती. यामुळे दिवसभर ऊन-सावलीचा खेळ शहरात सुरू होता. वातावरणात अचानक झालेल्या या बदलाचा परिणाम शहरवासीयांच्या आरोग्यावरही होत आहे. ताप थंडीसह, आरोग्याच्या इतर तक्रारींनी या वातावरणामुळे डोके वर काढले आहे. वातावरणाचा बदल आठवडाभर कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

तापमानातील चढउतार (अंश सेल्सिअसमध्ये)
दिनांक कमाल किमान
७ डिसेंबर २८.२ १६.३
६ डिसेंबर २७.० १७.८
५ डिसेंबर १९.० १७.७
४ डिसेंबर २८.३ १६.१
३ डिसेंबर २८.० १४.४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकमध्ये आज दिग्गजांच्या सभा

0
0


म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर नगरपालिकेसाठी रविवार मतदार होणार आहे. त्यामुळे प्रचार अंतिम टप्प्यांत आला आहे. शुक्रवारी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहेत. काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेकडून ‌दिग्गज नेत्यांच्या सभा शुक्रवारी आयोज‌ति करण्यात आल्या आहेत.

थेट नगराध्यक्षांची निवडणूक भाजप आणि काँग्रेसने प्रतिष्ठेची करीत दिग्गजांच्या सभा आयोज‌ति केल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या शुक्रवारी त्र्यंबकमध्ये सभा होणार असल्याने प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. यात भरीस भर म्हणून शिवसेनेकडून सचिव आदेश बांदेकर यांचीही प्रचार रॅली निघणार आहे. त्यामुळे या तिनही पक्षाचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये बळ संचारले आहे.

भाजप, शिवसेना आणि काँग्रेस असे समोरासमोर उभे ठाकले असताना राष्ट्रवादी मात्र निष्प्रभ ठरली असल्याची दिसत आहे. राष्ट्रवादीने प्रभागात अवघे चार उमेदवार दिले आहेत. भाजप, शिवसेना आणि काँग्रेस यांचे आमदार, खासदार, इतर पदाधिकारी त्र्यंबक शहरात तळ ठोकून आहेत.

राजकीय पक्षांची कुमक नसतानादेखील अपक्षांनी आपला स्वतंत्र ठसा उमटवला असून, प्रमुख लढतीत सहभाग नोंदव‌ण्यिात यश मिळविले आहे. काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व माजी मंत्री अब्दुल सत्तार, आमदार निर्मला गावीत यांची शिवाजी चौक येथे प्रचार सभा होणार होणार आहे. तर भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रदेक्षाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश महाजन यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे. शिवसेनेकडून सचिव आदेश बांदेकर यांची प्रचार रॅली काढण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या, शुक्रवारी शहरात होणाऱ्या प्रचारसभेतून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडणार आहेत. दोन वर्षांपूर्वी कुंभमेळा झाला त्याचे पूर्वनियोजन काँग्रेस आघाडी सरकारने केले होते. तर आयोजन भाजप-शिवसेना शासनाच्या काळात झाले. त्र्यंबककरांना या सिंहस्थापासून काय मिळाले, हा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे. सिंहस्थानंतर अनेक घटक दुखावले आणि दुरावले आहेत.

उमेदवारांना हात जोडले

त्र्यंबक निवडणुकीत मतदारांना प्रचाराचा ओव्हर डोस होत आहे. एका प्रभागात सहा ते आठ उमेदवार आणि नगराध्यक्षपदाचे सात उमेदवार उभे आहेत. मतदारराजा दुपारी कामधंदा आटोपून जेवण करून निवांत वामकुक्षी घ्यावी म्हणतो, तर एका पाठोपाठ एक प्रचारक भेटीसाठी येत असतात. उमेदवारांच्या आश्वासनांना मतदारही हात जोडून पुरते हैराण झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवघ्या सहा ठिकाणी वाळू लिलाव

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या २४ पैकी अवघ्या सहा ठिकाणी वाळू लिलावांना प्रतिसाद मिळाला असून यातून अवघा २३ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. वाळू ठिकाणांचे बुधवारी लिलाव करण्यात आले. यात ही गोष्ट समोर आली.

लाखो रुपयांचा महसूल मिळवून देणाऱ्या वाळू लिलाव प्रक्रियेला कमी प्रतिसाद मिळाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. सरकारने वाळू व्यवसायाला जाचक अटी लावल्यामुळे अनेक वाळू व्यवसायिकांनी त्याकडे पाठ फिरवल्याचे मानले जात आहे.

गेल्या वर्षी जिल्ह्यात ४० पैकी फक्त १५ ठिकाणांचाच लिलाव झाला होता. त्यातून शासनाला १ कोटी २७ लाख रुपयांचा महसूल मिळाला. त्यामुळे यावर्षी प्रशासनाने वाळू लिलावातून पैसा मिळेल यासाठी तयारी केली होती. पण, लिलावाला कमी प्रतिसाद मिळाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. वाळूचा लिलाव होत नसला तरी दुसरीकडे अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला असून त्या तुलनेत कारवाईची संख्या मात्र कमी आहे.

गेल्या काही वर्षांपासून ई-टेंडरिंग आणि ई-ऑक्शनमुळे वाळू लिलावास ठेकेदारांकडून कमी प्रतिसाद होता. तसेच शासनाच्या अटी-शर्ती, पर्यावरणासह किचकट परवानग्यांचाही त्रास जाचक वाटू लागल्याने वाळू व्यावसायिकांनी लिलावात भाग घेणे कमी केले. यावर्षी जिल्ह्यातील २४ पैकी सहा वाळू ठिकाणांचे लिलाव झाले. त्यातून २३२७ ब्रास वाळूचा लिलाव झाला असून त्यात २३ लाख ७८ हजार ८८५ रुपयांचा महसून प्राप्त झाला आहे. त्यामुळे आता १८ ठिकाणांसाठी आता दरात कपात करून पुन्हा लिलाव घेण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लिव्ह अँड लायसेन्सची दस्तनोंदणी आवश्यक

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुद्रांक भाडेकरूंच्या नोंदणीसाठी लिव्ह अँड लायसेन्सची दस्तनोंदणी आवश्यक असून, ती घरमालकांनी करावी, असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी मनोज वावीकर यांनी केले आहे. या करारामध्ये भाडेकरूंची सर्व माहिती अधिकृतपणे नोंद केली जाते. त्यात भाडेकरूचे नाव, आधार कार्ड, पत्ता यासह इतर माहिती असल्यामुळे भाडेकरूंची सर्व माहिती उपलब्ध होते. हा करारनामा पोलिसांना दिला तर त्याचा उपयोगही कायदेशीररीत्या काही प्रसंग उद््भवल्यास त्यात होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुद्रांक विभागाने आता या करार विषयाकडे लक्ष केंद्रित केले असून, त्यासाठी विशेष मोहीम उघडली असली तरी त्याला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे त्यांनी पुन्हा हे आवाहन केले आहे. त्यासाठी मुद्रांक शुल्क विभाग याबाबत घरमालकांमध्ये जागृती करण्याचे कामही सुरू केले आहे. भाडेनियंत्रण कायदा कलम ५५ अन्वये सर्व करारनामे नोंदणीकृत करणे मिळकतधारकांच्या लाभाचे असून, सर्वांनी लिव्ह अँड लायसेन्सचे करारनामे नोंदणी करून घ्यावे. ज्यांचे करार राहिले आहेत, त्यांनासुद्धा ते नोंदवता येणार आहे. यासाठी ऑनलाइन सुविधासुद्धा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे प्रत्येक मुद्रांक कार्यालयातही त्याची माहिती उपलब्ध असून, येथे ही नोंदणी करता येणार आहे.

पोलिसांची मोहीम

एकीककडे मुद्रांक विभागाने मोहीम उघडली असताना पोलिसांनीसुद्धा भाडेकरूंची माहिती पोलिस स्टेशनमध्ये देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांना ही माहिती महत्त्वाची आहे. घर भाड्याने दिले असल्याची माहिती महापालिकेला असणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे महापालिकासुद्धा कर आकारणी करीत असते. गेल्या काही दिवसांत मनपाने केलेल्या सर्व्हेत भाडेकरूंची संख्या तुलनेत खूपच कमी आढळून आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कल्चर क्लब सदस्यांचा डिसेंबर रंजक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यंदाचा डिसेंबर महिना महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब सदस्यांसाठी मनोरंजनाने परिपूर्ण असाच ठरत आहे. नुकतेच कल्चर क्लब सदस्यांचे गेट टुगेदर पार पडले आहे. सदस्यांनी या गेट टुगेदरचा मनमुराद आनंद लुटल्यानंतर आता वेगवेगळ्या कार्यशाळांमधून त्यांना चविष्ट खाद्यपदार्थांविषयी मार्गदर्शनही मिळणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे डिसेंबर महिन्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज, शनिवारी (दि. ९ डिसेंबर) मल्टिग्रेन जॅगरी केक कार्यशाळा आयोजित करण्यात आले आहे. ऋग्वेद मंगल कार्यालय, तिडके कॉलनी येथे दुपारी ३ वाजता ही कार्यशाळा होणार आहे. १७ डिसेंबर रोजी सिझलिंग ब्राऊनी, तसेच ख्रिसमस स्पेशल केक कसा बनवायचा यासंदर्भातील कार्यशाळा घेण्यात येणार आहे. २५ डिसेंबर रोजी ‘एक शून्य तीन’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे. नवीन वर्षाचे स्वागत डॉ. सलील कुलकर्णी यांच्या ‘कवितेचं गाणे होताना’ या कार्यक्रमाने महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब करणार आहे. असे एकामागोमाग एक कार्यक्रम कल्चर क्लबअंतर्गत आयोजित करण्यात येत आहेत. तर मग विचार कसला करत आहात? आजच कल्चर क्लबचे सदस्य व्हा आणि या व यांसारख्या मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा आस्वाद लुटा.


सदस्यत्व मिळविण्यासाठी...

मटा कल्चर क्लबचे सदस्यत्व मिळविण्यासाठी तुम्हाला ‘बीसीसीएल’च्या नावाने २९९ रुपयांचा चेक आपल्या जवळच्या सेंटरवर जमा करायचा आहे. त्या ठिकाणी तुम्हाला एक फॉर्म दिला जाईल, तो तुम्ही भरून द्यायचा आहे. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबचे कार्ड तुम्हाला दिले जाईल. अधिक माहितीसाठी ०२५३ - ६६३७९८७, ७०४०७६२२५४ या क्रमांकावर संपर्क साधावा, तसेच ऑनलाइन सदस्यत्वासाठी www.mtcultureclub.com या वेबसाइटला व्हिजिट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

म्हसरूळ परिसरात जीवे मारण्याचा प्रयत्न

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

म्हसरूळ परिसरातील गणेशनगर भागातील एका दुकानदारावर गोळीबार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, दुकानदाराने मागच्या दरवाज्याने पळ काढल्याने हा प्रयत्न फसला. या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केल्यामुळे नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे. दरम्यान, प्रत्यक्षात गोळीबार झालेला नसून ही अफवा असल्याचा दावा पोलिसांनी केल्याने संभ्रम वाढला आहे.

दिंडोरी रोड परिसरातील गणेशनगर येथील मारुती मंदिरासमोरील राधाई जनरल स्टोअर्समध्ये शुक्रवारी (दि. ८) दुपारी एक वाजेच्या सुमारास दोन संशयित फिरत होते. राधाई जनरल स्टोअर्सशेजारी काही काळ उभे राहिले. नंतर राधाई जनरल स्टोअर्समध्ये बसलेल्या भूषण पगारे व त्याचा मित्र हेमंत आहेर यांच्याकडे कुरकुरेची मागणी केली. या दोन संशयितांपैकी एकाने बंदूक काढत लोड केली. बंदूक लोड केल्याचा आवाज ऐकताच भूषण दुकानातील फ्रीजमागे लपला. त्यात दुसऱ्या संशयिताने देखील बंदूक काढली. हे हेमंत याने बघताच त्यानेही पळ काढला. या प्रकारानंतर दोन्ही संशयितांनी तोडफोड करीत घटनास्थळाहून पळ काढला. दुकानातील काचा तुटून पडल्या. या घटनेनंतर भूषण पगारे यांनी म्हसरूळ पोलिस ठाणे गाठत सर्व हकिकत सांगितली. परंतु, घटनेचे गांभीर्य न बघता पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा नोंदवून घेतला.

निखिल उर्फ बाल्या मोरे याच्या खूनप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित आरोपी रोशन पगारे हा सदर घटनेतील फिर्यादी भूषण याचा भाऊ आहे. मोरे खुनाचा बदला म्हणून या घटनेकडे बघितले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांनी कृषी उद्योजकतेकडे वळावे

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कृषी उद्योग सुरू करण्यासाठी सरकारच्या बऱ्याच योजना असून, त्यांची माहिती करून घेणे महिलांसाठी आवश्यक आहे. राज्य सरकार कृषी उद्योग सुरू करण्यापासून विक्रीपर्यंत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर अर्थसहाय्य करीत असते. महिलांनी या योजनांच्या माध्यमातून कृषी उद्योजकतेकडे वाटचाल सुरू करावी, असे आवाहन उद्योजक मनीषा धात्रक यांनी केले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत आयोजित पाचदिवसीय तंत्रज्ञान महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी ‘महिलांसाठी कृषिपूरक प्रक्रिया उद्योग’ या विषयावरील चर्चासत्रात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे अध्यक्षस्थानी होते.

धात्रक म्हणाल्या, की कृषिप्रधान महाराष्ट्रात शेतीची बहुतांश कामे महिला वर्गच करतात. त्यामुळे उद्योजकतेचे गुण त्यांच्यामध्ये अंतर्भूतच आहेत. महिलांमधील या गुणांच्या आधारेच त्यांनी जिद्दीने कृषी उद्योजकतेकडे वळल्यास त्या चांगल्या प्रकारे यश मिळवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शेतीतील ७५ टक्के काम महिला करतात. त्यामुळे त्यांनी आधुनिक तंत्राची कास धरल्यास भारतातील शेती नक्कीच प्रगतिशील होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महिलांनी शेती करताना हिशेब लिहिण्याची सवय स्वत:ला लावून घेण्याचा सल्ला देला. यशस्वी उद्योजकतेकडे वाटचाल करताना टोमॅटो केचप क्षेत्रात नाव कमावण्यासाठी बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र, त्यातूनही मार्ग काढत आज भारतात मोठा उद्योग उभारण्यात यश आले असल्याचे त्यांनी आपले अनुभव व्यक्त करताना सांगितले. टोमॅटो प्रक्रियेसोबतच टोमॅटो उत्पादनात खर्च कमी करण्यासाठी बरेच प्रयोग केल्याचे त्यांनी सांगितले. करार शेती माध्यमातून प्रक्रिया उद्योग चालविताना सामान्य शेतकऱ्यांना फायदा करून देण्यासाठी प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय भाषणात विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. भोंडे यांनी महिला बचतगटावर भर देताना शेतीसोबतच कृषिपूरक व्यवसाय महिलांनी सुरू करावेत, असे आवाहन केले. शेळीपालन व कोंबडीपालनाच्या माध्यमातून विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राने महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले. महिलांनी अशा प्रकारचे कृषिपूरक उद्योग सुरू करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राची मदत घ्यावी. त्यासाठी केंद्र तांत्रिक माहिती पुरविण्यासाठी नेहमीच तत्पर असेल, अशी ग्वाहीही त्यांनी याप्रसंगी दिली.

तांत्रिक सत्रात केंद्राचे उद्यानविद्या तज्ज्ञ हेमराज राजपूत यांनी विविध प्रक्रियायुक्त पदार्थ यावर मार्गदर्शन केले. नागली आणि सोयाबीनपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थांवर केंद्राच्या गृहविज्ञान तज्ज्ञ अर्चना देशमुख यांनी सादरीकरण केले. नंदुरबार येथील कृषी विज्ञान केंद्राचे रवींद्र पाटील आणि गणापुळे यांनीही सादरीकरण केले. नंदुरबार येथील कृषी विज्ञान केंद्राचे पीक संरक्षणतज्ज्ञ पद्माकर कुंदे यांनीही कृषिपूरक व्यवसायसंबंधी मार्गदर्शन केले. केंद्राचे प्रमुख रावसाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले. विस्तारशास्रज्ञ डॉ. नितीन ठोके यांनी सूत्रसंचालन केले. गृहविज्ञान तज्ज्ञ अर्चना देशमुख यांनी आभार मानले.

तांत्रिक सत्रानंतर कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर भेटीचे आयोजनही करण्यात आले होते. या वेळी शेळीपालन, कोंबडीपालन, रोपवाटिका, गांडूळ खत प्रकल्प, १५ प्रकारच्या फळझाडांच्या बागा, जलसंवर्धनाच्या पद्धती याविषयीचे आधुनिक तंत्रज्ञान महिलांना समजावून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळू उपसण्यापूर्वी पर्यावरण रक्षणाचे बंधन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लिलावात वाळू ठिय्या घेणाऱ्या ठेकेदारांना आता या ठिय्याच्या ठिकाणी पर्यावरण रक्षणासाठी कोणत्या उपाययोजना करणार याचा सविस्तर अहवाल द्यावा लागणार आहे. राष्ट्रीय हरित लवादानेच (एनजीटी) त्याबाबतचे आदेश दिले असून, तोपर्यंत प्रत्यक्ष वाळू उपशाला परवानगी देऊ नका, असेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे सहा वाळू ठिय्या घेणाऱ्या ठेकेदारांच्या अडचणी वाढल्या आहेत.

पर्यावरण रक्षणाला सर्वतोपरी महत्त्व देणाऱ्या हरित लवादाने आता वाळू घाटांवरील पर्यावरण हानीकडे लक्ष केंद्रित केले आहे. नद्यांमधील वाळूचा ठेका घेणाऱ्या ठेकेदारांवरच तेथील पर्यावरण रक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. लिलावाद्वारे घाट घेणाऱ्या ठेकेदारांना नदीतून वाळूचा उपसा कशाप्रकारे करणार, उपशादरम्यान नदीपात्राचे नुकसान होऊ नये यासाठी कोणत्या उपाययोजना करणार आणि घाटाजवळील पर्यावरण रक्षणासाठी काय काळजी घेणार याबाबतचा सविस्तर अहवाल गौण खनिज विभागाला सादर करावा लागणार आहे. त्यासाठी संबंधित ठेकेदारांनी पर्यावरण विभाग तसेच, इतर विभागाची मदत घेणे बंधनकारक असणार आहे. हा अहवाल ठेकेदार सादर करीत नाही तोपर्यंत नदीतून वाळूचा ऊपसा करता येणार नाही, असे लवादाने स्पष्ट केले आहे.

वाळू ठेकेदारांचा हिरमोड

ई-ऑक्शनद्वारे होणाऱ्या घाटांच्या लिलावाकडे ठेकेदारांनी पाठ फिरवली असून, यंदा २४ पैकी अवघ्या सहा घाटांचे लिलाव झाले आहेत. त्यामधून सरकारला अवघा २३ लाखांचा महसूल मिळाला आहे. गौण खनिज विभागाला उर्वरित १८ घाटांसाठी पुन्हा लिलाव प्रक्रिया राबवावी लागणार आहे. असे असताना आता अहवालाची सक्ती करण्यात आल्याने वाळू ठेकेदारांचा हिरमोड झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images