Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

आईच्या बँक खात्यावर मुलाने मारला डल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वत:ची मालमत्ता आईने बक्षीसपत्राद्वारे बहिणीस दिल्याने संतप्त झालेल्या मुलाने आईची बनावट स्वाक्षरी करून तिच्या बँक खात्यातून ४५ हजारांची रोकड परस्पर काढून घेतली. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजयराजकुमारी नारायणा येनमंड्रा (वय ६६, रा. केतकी सोसायटी, संभाजीनगर, म्हसरूळ) यांनी फिर्याद दिली. त्यामध्ये म्हटल्यानुसार मुलगा चंदनकुमार नारायणा येनमंड्रा हा २०१०पासून स्वतंत्र राहातो. येनमंड्रा यांच्या नावावर असलेले घर, ओम्नी कार आणि अन्य वाहने त्यांनी मुलगी उमा हिस बक्षीसपत्राद्वारे दिले. संशय‌तिांनी मायलेकींना शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. उमा यांच्या एसबीआय बँक खात्यावरील ४५ हजारांची रोकड बनावट स्वाक्षरीद्वारे काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पावणेदोन लाख लांबवले

मदतीचा बहाणा करीत एटीएम कार्ड लांबविणाऱ्या भामट्यांनी तिघा बँक खातेदारांच्या खात्यातील तब्बल पावणेदोन लाख रुपये लांबवले. यातील दोघांची रक्कम एटीएम कार्डधारकांच्या खात्यात ऑनलाइन ट्रान्सफर करून काढण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरिश्चंद्र जाणू पालवी (रा. नाशिक) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. ते ९ सप्टेंबर रोजी म्हसरूळ येथील बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले. त्यावेळी एकाने त्यांना मदतीचा बहाणा करून कार्ड हातोहात लांबवले. त्यानंतर १३ ऑक्टोबर दरम्यान संबंधिताने त्यांच्या बँक खात्यातील तब्बल ९५ हजारांची रोकड वेगवेगळ्या ठिकाणाहून काढली. त्यानंतर भामट्यांनी एटीएम कार्डधारकाच्या बँक खात्यातील अनुक्रमे ४० व ८० हजार रुपयांची रक्कम ऑनलाइन पध्दतीने ट्रान्सफर करून काढून नेली.

दोन ठिकाणी घरफोड्या

श्रीरामनगर आणि ओमनगर भागात भरदिवसा झालेल्या दोन घरफोडीच्या घटनांमध्ये चोरट्यांनी सुमारे सव्वा लाखाचा ऐवज चोरून नेला. त्यामध्ये रोकडसह सोने चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ज्योती संजय कातकाडे (रा. व्हिला अपार्टमेंट, श्रीरामनगर) यांनी फिर्याद दिली. कातकाडे कुटुंबीय शुक्रवारी सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडले. याचाच फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरफोडी केली. याचदरम्यान ओमनगर परिसरातही अशीच घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी संकल्प सोसायटीतील बंद घराचा कडी कोयंडा तोडून रोकडसह दागिने असा सुमारे एक लाख २२ हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.

जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी दोघांना अटक

नाशिक : कालिका माता यात्रेतील गाळे व मोकळ्या जागा लिलावावेळी एकास जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी सरकारवाडा पोल‌सिांनी दोघांना अटक केली. त्यांना जिल्हा कोर्टात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. ११ डिसेंबरला मात्र त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. संदीप विधाते व निखील मोटकरी (रा. मुंबई नाका) अशी संशयितांची नावे आहेत. दोघेही शहरातील एका मोठ्या राजकीय पदाधिकाऱ्याचे नातेवाईक असून, दीपक डोके यांनी या प्रकरणी फिर्याद दिली होती. १५ सप्टेंबर रोजी महापालिकेच्या राजीव गांधी भवन कार्यालयात हा प्रकार घडला होता.

पार्किंग कारमधील रोकडची चोरी

नाशिक : पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी पर्समधील रोकड चोरून नेली. कॉलेजरोड परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दिव्या नरेशकुमार जस्वानी (रा. प्रियंका ब्लोसम, सिरीन मिडोज गंगापूररोड) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. त्या शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास डॉन बॉस्को परिसरात गेल्या होत्या. दिव्यदान वसतिगृहाजवळ त्यांनी कार पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी काच फोडून मागील आसनावर ठेवलेली पर्स चोरून नेली. पर्समध्ये तीन हजाराच्या रोकडसह कागदपत्र आणि एटीएम कार्ड होते असे फिर्यादीत म्हटले आहे.

सरदवाडी रोडवर घरफोडी

सिन्नर : सरदवाडी रोड येथील इंद्रप्रस्थ अपार्टमेंट या इमारतीमध्ये असलेल्या बंद फ्लॅटमध्ये अज्ञात चोरट्याने घरफोडी करीत सुमारे अडीच ते तीन लाख रुपये किमतीचे दहा तोळे सोन्याचे दागिने लांबविले. ही घटना शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. सरदवाडी रोडवरील इंद्रप्रस्थ अपार्टमेंटमध्ये शिक्षक काकासाहेब राजाराम तांबे कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. घरी कुणी नसल्याची संधी साधत दुपारी चार वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने तांबे यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले सोन्याचे नेकलेस, लक्ष्मीहार, कानातील दागिने चोरून नेले.

मोटारसायकल्सची चोरी

नाशिक : मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच असून, गेल्या काही दिवसांत चार मोटारसायकली चोरीस गेल्या आहेत. जितेंद्र जाधव (रा. साईनाथ रो हाऊस, त्रिकोणी बंगल्याजवळ) हे बुधवारी भाजीपाला खरेदीसाठी पेठरोड भागात गेले होते. जुन्या पाणपोई परिसरातून त्यांची ड्रीम युगा मोटारसायकल चोरट्यांनी पळवून नेली. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. दुसरी घटना बॉईज टाऊन परिसरात घडली. प्रसाद आंबेकर यांची सुमारे पावणेदोन लाख रुपये किमतीची मोटरसायकल बंगल्याच्या आवारातून चोरट्यांनी चोरून नेली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पतंग पकडताना शॉक लागून बालकाचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

अडकलेली पतंग लोखंडाच्या सहाय्याने काढण्याचा प्रयत्न करत असताना विजेच्या तारेचा झटका लागून आठ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. शनिवारी (दि. ९) दुपारी दोनच्या सुमारास फुलेनगर येथील पाण्याच्या टाकीजवळ ही घटना घडली.

फुले नगर परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ किशोरसिंग भोंड (कातारी) यांचा मुलगा गुरुसिंग हा पतंग उडव‌ित होता. त्याची पतंग घराजवळील झाडाला अडकली. त्याने त्याच्याजवळ असलेल्या लोखंडी गजाच्या सहाय्याने ती काढण्याचा प्रयत्न केला. हा लोखंडी गज विजेच्या तारेस लागला. गजातून वीजेचा तीव्र प्रवाह उतरल्याने त्याचा झटका लागून गुरूसिंग जखमी झाला. गुरूसिंग याचे काका पप्पू यांनी त्यास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. गुरूसिंग फुलेनगर परिसरातील शाळा क्रमांक ५६ मध्ये चौथीमध्ये शिकत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विरोधक धास्तावले!

$
0
0

मालेगाव बाजार समितीचे सभापती प्रसाद हिरेंची सडकून टीका

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

कालपर्यंत एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले, एकमेकाला पाण्यात पाहणारे आता एकत्र आले आहेत. विकासाचे काही काम घेऊन ते एकत्र आले असते, तर त्यांचे स्वागत केले असते. परंतु, मला सभापतिपदावरून दूर करण्यासाठी ते एकत्र आले आहेत, ही माझ्यासाठी भूषणावह बाब आहे. भविष्यात विधानसभेच्या निवडणुकीला मी पर्याय होईल या भीतीने विरोधकांनी अविश्वास ठराव दाखला केला आहे, असे सांगत मालेगाव बाजार समितीचे सभापती प्रसाद हिरे यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले.

मालेगाव बाजार समितीच्या १७ संचालकांनी सभापती प्रसाद हिरे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्याची उपनिबंधकांकडे मागणी केली असून, याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी हिरे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मामको बँक चेअरमन राजेंद्र भोसले उपस्थित होते. यावेळी सभापती हिरे यांनी विरोधकांवर सडकून टीका करीत आपल्यावरील आरोपांना उत्तर दिले. हिरे पुढे म्हणाले, की सभापतिपदाच्या कार्यकाळात मी पैसे खाल्ले नाही किंवा कुणालाही खाऊही दिले नाहीत. बाजार समिती व शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून पारदर्शकपणे काम करीत आहे. माझ्यासोबत असलेल्या संचालकांना मी विश्वासात घेतले नाही हे चुकीचे आहे. परंतु, स्वतःच्या राजकीय विरोधकांना दूर ठेवण्यासाठी ज्यांना मी सभापती व्हावे असे वाटत होते, त्यांना आज अचानकपणे अविश्वास ठराव दाखल करण्याची वेळ यावी हे अतिशय दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, अविश्वास ठराव दाखल करताना सभापतींवर आमचा विश्वास राहिलेला नाही असे म्हणणे संयुक्तिक आहे. परंतु, हा अविश्वास ठराव दाखल करताना केलेले आरोपही हिरे यांनी धुडकावून लावले.

विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना हिरे म्हणाले, की वैयक्तिक प्रसिद्धीसाठी बाजार समितीचा वापर करेल इतका मी दुर्बल नाही. शक्य तेवढी बचत मी केलेली आहे. कर्जाचे हप्ते थकवले आहेत असा आरोप माझ्यावर करण्यात आला आहे. मुळात माझ्या कार्यकाळात कर्ज काढलेले नाही. याउलट आधीच्या संचालकांनी कर्ज काढले असून, त्याचे हफ्ते मी फेडत आहे. मी गैरव्यवहार केल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, विरोधकांनी एकही गैरव्यवहार सिद्ध करून दाखवावा. त्यांनी तो सिद्ध केला तर मी सभापतिपदाचा राजीनामाच नव्हे, तर राजकीय संन्यास घेईल. मात्र, आरोप सिध्द झाले नाही तर आरोप करणाऱ्यांनी राजकीय संन्यास घ्यावा, असे आव्हानदेखील हिरे यांनी दिले आहे. आपल्या कार्यकाळात बाजार समितीच्या प्रगतीची अनेक महत्त्वाची कामे झाली. बाजार समितीचे पैसे कसे कमीत कमी खर्च होतील हाच प्रयत्न केल्याचे हिरे यांनी स्पष्ट केले.

विरोधकांना आवाहन

ज्या विरोधकांनी माझ्यावर अविश्वास ठराव आणला आहे, त्यांनी मुंगसे व्यापारी असोसिएशनला हाताशी धरून बाजार समितीचे शुल्क भरू नका, असा सल्ला देऊन शुल्क रोखले आहे, असा आरोप सभापती हिरे यांनी केला आहे. विरोधकांनी मला तोंड उघडायला लावू नये. जर हे शेतकरी हिताचे असतील तर त्यांनी आमची चूक झाली अशी माझी माफी मागून अविश्वास ठराव मागे घ्यावा, असे आवाहन त्यांनी विरोधकांना केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंतर्मुख करणारं ‘नाव झालंच पाहिजे’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाटक हे सामाजिकतेचे प्रतिबिंब असते. जे समाजात घडते ते नाटकात दाखवले जाते. त्यामुळे नाटकाला खरेपणाचा आव आणता येत नाही, ते खरेच असते. नाटक अंगात भिनवलेला कलाकार त्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार होतो. त्याला नाटक रसिकांसमोर सादर करावयाचे असते त्यासाठी तो कोणतीही किंमत मोजायला तयार होतो, हे दाखवणारे नाटक म्हणजे ‘नाव झालं पाहिजे’.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा ६५वा नाट्यमहोत्सव परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे सुरू असून, नाशिक विभागातील प्राथमिक स्पर्धेत ‘नाव झालंच पाहिजे’ हे नाटक शनिवारी सादर झाले. या नाटकाचे लेखन विद्यासागर अध्यापक यांनी केले होते.

नाटक ही एक कलाकृती, एक जिवंत अभिव्यक्ती असते. स्वत:पासून, समाजापासून ते पूर्णत: भिन्न न करता येणारे कलाकार आजही आहेत. या स्वतंत्र अभिव्यक्तीवर घाला घातला गेला तर कलाकार जाणार कोठे? एका स्पर्धेत एक नाटक सुरू असते. या नाटकातून धर्मावर टीका केली म्हणून ते नाटक बंद पाडायला एक संघटना येते. नाटक जबरदस्तीने बंद पाडले जाते. पण त्याचे अनेक पडसाद उमटू लागतात. जे नाटक बंद पाडायला आलेले असतात त्यांनाही त्याचे कारण माहीत नसते. नाटकवाल्यांना व संघटनावाल्यांना समजावून सांगण्यासाठी एक हवालदार येतो. तो शासनाचा प्रतिनिधी असतो. तोही फक्त चर्चा करतो. नाटक मात्र अर्धवटच राहते, अशा आशयाची ही कथा होती.

बॉश फाईन आर्टस् प्रस्तूत या नाटकाचे लेखन विद्यासागर अध्यापक यांनी केले होते. दिग्दर्शन प्रशांत हिरे यांचे होते. नेपथ्य संजय चौधरी, प्रशांत येवले यांचे तर प्रकाश योजना रवींद्र रहाणे यांची होती. पार्श्वसंगीत रोहित सरोदे यांचे रंगभूषा माणिक कानडे, वेशभूषा विशाल बोढरे यांची होती. नाटकात राजेश अभोणकर, अंबर कुलकर्णी, आनंद कुलकर्णी, सुमित जाधव, माधुरी पठ्ठे, प्रशांत येवले, प्रवीण चव्हाण, धनंजय रहाणे, अभिषेक कोते, सुधीर पोंदे, शिरीष तांदळे, स्वप्निल क्षीरसागर, स्नेहा ओक, ऋतुजा वाबळे, प्रमोद भालेराव, विशाल बोढरे यांनी भूमिका केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तक्रार दाखल होताच ‘गायब’ मूर्ती जागेवर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

रामकुंडातील गोमुखाजवळ असलेली गौतम ऋषींची पुरातन मूर्ती शनिवारी (दि. ९) रोजी गायब झाली होती. ही मूर्ती चोरीस गेल्याबद्दलची तक्रारही पंचवटी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली. मात्र, ही तक्रार दाखल केल्यानंतरच्या थोड्या वेळात ही मूर्ती त्याच जागेवर असल्याचा दावा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला. ही मूर्ती कुठे गेली होती, याविषयी तर्कवितर्क करण्यात येत आहेत.

शुक्रवारी (दि. ८) रोजी रामकुंडाच्या स्वच्छतेसाठी पाणी सोडून देण्यात आल्यानंतर कोरड्या पडलेल्या या कुंडात गोमुखाच्या जवळ असलेली गौतम ऋषींची पुरातन मूर्ती दिसली नसल्याचे अतुल शेवाळे यांच्या लक्षात आले. त्यांनी येथे मूर्ती नसल्याचे फोटो काढून ते सोशल मीडियावरून व्हायरल केले. याबाबतची खात्री करून घेण्यासाठी देवांग जानी, नरेंद्र धारणे, किशोर गरड, यागेश रामैया यांनी जागेची पाहणी केली. या मूर्तीविषयी त्यांनी रामकुंड परिसरात चौकशी केली. पण, कुणीही माहिती देऊ शकले नाही. त्यांनी ही मूर्ती ज्या जागेवर असते, तेथील छायाचित्रे काढली. ही मूती चोरीला गेल्याबद्दलची तक्रारही पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये केली.


दुपारच्या वेळेतील घटना

दरम्यान, पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केल्यानंतर सायंकाळी पाच वाजता ही मूर्ती त्याच जागेवर आहे, असे देवांग जानी यांना कळविण्यात आले. त्यांनी रामकुंडाजवळ जाऊन पाहणी केली असता मूर्ती त्याच जागेवर असल्याचे दाखविण्यात आले. गाळामुळे तुम्हाला दिसली नसेल, असेही सांगितले गेले. पण, त्या जागेवर गाळ साचत नसल्यामुळे मूर्ती न दिसण्याचे कारणच नसल्याची वस्तुस्थिती आहे. सायंकाळी साडेपाच वाजता ही मूर्ती गायब झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली, दुपारी सव्वादोन वाजेपर्यंत या जागेवर मूर्ती नसल्याचे जानी यांनी सांगितले. दुपारी साडेचार वाजेपर्यंतच्या काळात ही मूर्ती पुन्हा त्याच जागेवर ठेवून देण्यात आली असावी. पण, या कालावधीत ही मूर्ती नेमकी कुठे होती, हे गुढ मात्र, कुणालाही उलगडले नाही.

--

ही पुरातन मूर्ती असून, रामकुंडाच्या इतिहासात ही मूर्ती या जागेवर असल्याचा उल्लेख आहे. कित्येक पूर आणि महापुरांच्या काळातही ही मूर्ती जागेवरून हलली नाही, तिची काही प्रमाणात झीज झालेली आहे इतकेच. ही मूर्ती काढण्याचा खोडसाळपणा कुणी तरीकेला असावा किंवा दुसऱ्या उद्देशानेही मूर्ती काढली असावी, असा अंदाज आहे.

-देवांग जानी, गोदाप्रेमी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदार नोंदणीसाठी मिळणार संगणक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मतदार नोंदणीचे काम अधिक गतीने व्हावे, यासाठी निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदारसंघात मतदान नोंदणी अधिकारी व सहाय्यक मतदान नोंदणी अधिकाऱ्यांना संगणक व स्कॅनर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता नाशिक जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांसाठी २२ लाखांचा निधीही प्राप्त झाला असून, लवकरच संगणकांची खरेदी प्रक्रिया राबव‌ण्यिात येणार आहे.

मतदार नोंदणी कामात गतिमानता यावी, यासाठी निवडणूक आयोग आग्रही आहे. त्याच अनुषंगाने विविध प्रयोग राबविण्यात येत आहेत. आयोगाचे अध्यक्ष जे. एस. सहारिया यांनी इगतपुरी, त्र्यंबक नगरपालिका निवडणुकीमध्ये ‘कॉप’ अॅपचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात प्रथमच अशा प्रकारचे अॅप राबविण्यात येत असून, त्याद्वारे मतदारांना ऑनलाइन तक्रारी नोंदविता येईल. १८ ते ३० वयोगटातील मतदारांसाठी ऑनलाइन मतदार नोंदणी अर्जही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

निधी प्राप्त

प्रत्येक मतदाराचा अर्ज भरून घेतल्यानंतर तो स्कॅन करून आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड करावा लागतो. अशी कामे गतीने व्हावीत यासाठी प्रत्येक मतदारसंघात मतदार नोंदणी अधिकारी तसेच, सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना एक संगणक व स्कॅनर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यांना संगणक आणि स्कॅनर दिले जाणार आहेत. याकरिता २२ लाख रुपयांचा निधीही प्राप्त झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिन्नरमध्ये कारने घेतला पेट; चालकासह दोघे बचावले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

जायगाव शिवारात देशवंडी फाट्यावर धावत्या ओम्नी कारने अचानक पेट घेतल्याने जळून खाक झाली. ही घटना दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. कारने पेट घेतल्याचे लक्षात येताच चालकासह अन्य एका व्यक्तीने गाडी उभी करून बाहेर पळ काढल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. त्या दोघांनी पाण्याने आग विझविण्यासाठी केलेले प्रयत्न अपुरे ठरले आणि कार जळून खाक झाली.

पिंपळगाव निपाणी येथील अशोक रामनाथ बोडके आणि वाल्मीक तुकाराम बांगर हे दोघे ओम्नी कार (एमएच १५, ७४५५) मधून पिंपळगाव निपाणीकडे जात होते. जायगावजवळील देशवंडी फाट्यावर कारमधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच कार उभी करून दोघे बाहेर पडले. जवळच असलेल्या कौलारू घरातून पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाहता पाहता कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडून खाक झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावी ३५ हजार प्रकरणे निकाली

$
0
0

लोकअदालतीला अभूतपूर्व प्रतिसाद

मालेगाव : मालेगावात आयोजित लोकअदालतीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून, ३५ हजार ८७५ प्रकरणे निकाली निघाले. तसेच, ९ कोटी २ लाख रुपये इतकी थकीबाकी वसूल झाली आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण समितीचे जिल्हा न्यायाधीश बी. एस. महाजन यांनी दिली.

येथील जिल्हा न्यायालयात शनिवारी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या अदालतीमध्ये दिवाणी व फौजदारी असे एकूण १ हजार २३१ तर दाखलपूर्व तब्बल ६४ हजार ७२ प्रकरणे ठेवण्यात आली होती. जिल्हा न्यायाधीश बी. एस. महाजन, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. एस. एस. देवरे, सचिव बी. एल. लोखंडे, प्रांताधिकारी अजय मोरे, तहसीलदार शिवकुमार आवळ कंठे यांच्या मार्गदर्शनाखाली या अदालतीचे कामकाज पार पडले. लोकअदालातीत दाखलपूर्व प्रकरणात ग्रामपंचायत वसुलीची सर्वाधिक ५७ हजार प्रकरणे ठेवण्यात आली होती. यातील ३५ हजार प्रकरणे निकाली निघाली असून, २ कोटी ७५ लाख रुपये थकबाकी वसूल झाली आहे.

मनमाडला ८२ लाख वसुली

मनमाड : मनमाड येथील न्यायालयात शनिवारी झालेल्या लोकन्यायालयात दाखलपूर्व व न्यायप्रविष्ठ अशा एकूण १० हजार ६४२ दाखल खटल्यांपैकी तब्बल २४७८ खटले निकाली निघाले. या लोक न्यायालयाद्वारे नगरपालिका, वीज कंपनी, ग्रामपंचायती व बँकांची ८२ लाख रुपये थकबाकी वसूल झाल्याचे न्यायाधीश स्वाती फुलबांधे व शिल्पा हुडगर यांनी सांगितले. मनमाड न्यायालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण समिती व जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी मनमाड येथे लोकन्यायालयाचे उद्घाटन झाले. न्या. स्वाती फुलबांधे, शिल्पा हुडगर, मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. सुधाकर मोरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.

रेल्वे न्यायालय, शहर न्यायालय संयुक्त न्यायालय यांच्या वतीने हे लोकन्यायालय होत असून, दाखलपूर्व व न्यायप्रविष्ठ असे १० हजार ६४२ खटले या न्यायालयात दाखल होते. यात नगरपालिका, बँका, ग्रामपंचायती, पतसंस्था, वीज कंपनी यांची ८२ लाख एवढी मोठी थकबाकी वसूल झाल्याचे स्पष्ट झाले. अॅड. किशोर चोरडिया यांनी सूत्रसंचालन केले. अॅड. सुधाकर मोरे यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.

८२ लाख रुपये वसुली लोकन्यायालयात होणे ही मोठी आनंद व समाधानाची बाब आहे. लोकन्यायालय आयोजनातून दोन हजारांवर अधिक खटले निकाली निघाल्याने यशस्वी झाले आहे.

- स्वाती फुलबांधे, न्यायाधीश, मनमाड

कळवण येथे दोन कोटी वसुली

कळवण : कळवण न्यायालयात शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत विविध प्रकरणात एकूण १ कोटी ७९ लाख ४९ हजार ६३५ रुपयांची वसुली झाल्याची माहिती दिवाणी न्यायधीश स्वरा पारखी यांनी दिली. सदरच्या लोकन्यायालयात सहा पॅनल तयार करण्यात आले होते. यात १५,२३६ दावा पूर्व प्रकरणे दाखल होते. पैकी ४८२४ प्रकरणे निकाली निघाली आहेत. तर २०२ दाखल प्रकरणापैकी ११५ प्रकरणे निकाली निघाली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रेल्वेमार्गाचे दोन महिन्यांत भूमिपूजन

$
0
0

मनमाड-मालेगाव-इंदूर रेल्वेमार्गाबाबत डॉ. भामरे यांची ग्वाही

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

रेल्वे मंत्रालयाकडे २०१४पासून प्राधान्याने मनमाड-मालेगाव-इंदूर रेल्वेमार्ग व्हावा यासाठी मी प्रयत्नशील आहे. अनेकांनी गेल्या २० वर्षांपासून या रेल्वेमार्गाच्या उद्घाटन तारखा देऊन, थापा मारून जनतेची दिशाभूल केली आहे. मात्र या रेल्वेमार्गाच्या श्रेयवादात मला पडायचे नसून, या मतदारसंघातील लोकांसाठी काम करायचे आहे. लवकरच या रेल्वेमार्गाचा एमओयू होणार असून, येत्या दोन महिन्यांत भूमिपूजन होणार असल्याची माहिती केंद्रीय संरक्षक राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी शनिवारी दिली.

गेल्या कित्येक वर्षांपासून मनमाड-मालेगाव-इंदूर रेल्वेमार्गाचा प्रश्न प्रलंबित आहे. गेल्या काही दिवसांपासून या रेल्वेमार्गावरून भाजप आमदार अनिल गोटे व संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्यात श्रेयवाद रंगला आहे. गेल्या महिन्यात अनिल गोटे यांनी याबाबत पत्रकार परिषददेखील घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर डॉ. भामरे यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर शनिवारी (दि.९) पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजप नेते डॉ. अद्वय हिरे, महानगराध्यक्ष सुनील गायकवाड, तालुकाध्यक्ष दीपक पवार, पंचायत समिती सदस्य अरुण पाटील आदींसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी डॉ. भामरे यांनी रेल्वे मार्गाबाबत माहिती देताना सांगितले, की दि. १४ नोव्हेंबर रोजी या रेल्वेमार्गाबाबत दिल्ली येथे झालेल्या महत्त्वाच्या बैठकीस मी परदेशात असल्याचा गैरफायदा घेत काहींनी आमंत्रण नसताना हजेरी लावत अन्य कुणासही या बैठकीस आमंत्रण नव्हते असा अपप्रचार केला. तसेच, रेल्वेमार्गाबाबत सर्व काही त्यांनीच घडवून आणले असा केविलवाणा प्रयत्न केला आहे, अशा शब्दांत आमदार अनिल गोटे यांचे नाव न घेता टीका केली.

मालेगावी होणार लॉजिस्टिक पार्क

हा रेल्वेमार्ग प्रत्यक्षात आल्यास मालेगाव शहर व तालुक्याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. यामुळे मालेगावी लॉजिस्टिक पार्कदेखील उभारण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. सुभाष भामरे यांनी दिली. यामुळे शहरात रोजगार वाढणार असून, आर्थिक देवाण-घेवाण वाढेल, शहर देशाशी जोडले जाईल, असेदेखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मंजुरीसाठी पाठपुरावा सुरू

या रेल्वेमार्गाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात होण्यासाठी जेएनपीटीची समंती, रेल्वे मंत्रालयाची संमती, सामंजस्य करार, रेल्वे कॅबिनेट मंजुरी, एसपीयू मॉडेल तयार करणे, भूसंपादन करणे, ८० टक्के भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कंत्राट व निविदा प्रक्रिया या बाबी बाकी आहेत. त्यासाठी पाठपुरावा सुरू असून, मंजुरी मिळवण्यात येणार असल्याचे डॉ. भामरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इगतपुरीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे मतदारराजा कुणाच्या पारड्यात मत टाकतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. आज (दि. १०) नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान होत आहे. नगराध्यक्षपदासाठी ७, तर नगरसेवकपदाच्या १८ जागांसाठी ७९ उमेदवारांचे भवितव्य आज मतदान यंत्रात सील होणार आहे.

इगतपुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष या एकमेव जागेसाठी सात उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. त्यात शिवसेनेचे संजयभाई इंदुलकर, भाजपकडून फिरोज पठाण, काँग्रेसचे बद्रिनाथ शर्मा, बहुजन विकास आघाडीचे महेश शिरोळे, बाळू पंडित, मेमन महंमद हारून अ करीम, राजू कदम यांच्यात चुरशीची लढाई होणार असल्याचे चिन्ह आहे.

नगरसेवकपदासाठी ९ प्रभागांतील १८ जागांसाठी ७९ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात महिला राखीव ९ जागांसाठी ३७ उमेदवार, तर ४२ पुरुष उमेदवार रिंगणात आहेत. त्यात एका महिला उमेदवाराचाही समावेश आहे. एकूणच नगराध्यक्ष व नगरसेवकपदाच्या १९ जागांसाठी ४८ पुरुष तर ३८ महिला उमेदवार रिंगणात आहेत.

इगतपुरी नगरपालिका निवडणुकीसाठी २४ हजार ४६८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. शहरातील ९ प्रभागांतील ३२ मतदार केंद्रावर सकाळी साडेसात वाजेपासून मतदानाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे किती मतदार मतदानाचा हक्क बजावतात यावर उमेदवारांच्या विजयाचे गणित अवलंबून आहे.

सोमवारी मतमोजणी

सोमवारी (दि. ११) सकाळपासून शहरातील महामार्गाला लागून असलेल्या शासकीय आयटीआय इमारतीत मतमोजणी होणार आहे. शहरातील मतदान केंद्रासह मतमोजणीसाठी निश्चित स्थळाची पाहणीही यावेळी करण्यात आली. उपायुक्त ज्ञानेश्वर खिल्लारे, निवडणूक निर्णय अधिकारी संजय बागडे, नपा मुख्याधिकारी विजय मुंढे, उपविभागीय पोलिस अधिकारी अतुल झेंडे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्याची खाद्यसंस्कृती जगाच्या नकाशावर जावी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बाहेरून जे आले आहे, त्यात थोडाफार बदल करून महाराष्ट्राने स्वीकारले. मात्र, आता आपले जे आहे ते आपलेच ठेवण्यासाठी झगडण्याचा काळ आला आहे. महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती जगाच्या नकाशावर जावी यासाठी यथार्थ प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन खाद्यसंस्कृती अभ्यासिका मोहसिना मुकादम यांनी केले.

सार्वजनिक वाचनालयात ग्रंथालय सप्ताह सुरू आहे. त्यातील दुसरे पुष्प मुकादम यांनी गुंफले. ‘महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती’ असा विषय होता. मुकादम पुढे म्हणाल्या की, महाराष्ट्रीयन माणसाचा स्वभाव थोडा भिडस्त असल्यामुळे आपले प्रमोशन त्याने केलेले नाही. त्यामुळे महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीबाबत कमी लिहिलेले आहे. आपल्या संस्कृतीविषयी मोदक आणि पुरणपोळी सोडली तर खाद्यपदार्थांबाबत लिखाण झालेलेच नाही. त्यामुळे अनेक पदार्थांच्या रेसिपीपासून वंचित रहावे लागते. खाद्यसंस्कृती ही दहा हजार वर्षे जुनी आहे. आतातर आपले काय व बाहेरचे काय याच्या सीमारेषा पुसट होत चालल्या आहेत, असेही मुकादम म्हणाल्या. मुकादम यांनी मोदक, वडा, वडापाव या पदार्थांविषयी अधिक माहिती सांगितली.

दुसऱ्या वक्त्या डॉ. सुषमा पौडवाल यांनी प्राचीन काळापासून आजपर्यंत समाजामध्ये आहारात कसा बदल होत गेला याविषयी सांगितले. खाद्यसंस्कृतीची नाळ ही मौखिक परंपरेशी व कुटुंबव्यवस्थेशी जोडली असल्याचेही पौडवाल म्हणाल्या.

यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेविका अश्विनी बोरस्ते, स्वाती पाचपांडे, आशा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन संगीता बाफणा यांनी केले तर स्वागत, प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ. वेदश्री थिगळे यांनी करून दिला.

आजचे व्याख्यान

आज, रविवार १० डिसेंबर रोजी वास्तुशास्त्रतज्ज्ञ डॉ. धुंडिराज पाठक यांचे ‘वास्तुदोष आणि घरगुती उपाय’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. कै. सावित्रीबाई वावीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित या व्याख्यानाचे वेळी आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या सेवाभावी कार्यकर्त्यांचा सन्मान यावेळी करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महालोकअदालतीत विक्रम; सव्वा लाख प्रकरणे निकाली

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत शनिवारी घेण्यात आलेल्या महालोकअदालतीमध्ये साडेतीन लाख खटल्यांपैकी एक लाख २७ हजार प्रकरणे निकाली काढण्यात आली. शंभर कोटींहून अधिक तडजोड रक्कम त्यामध्ये वसूल करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली. या महालोकअदालतीने विक्रम प्रस्थाप‌ित केल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सूर्यकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही महालोक अदालत घेण्यात आली. नाशिक जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने खटले निकाली काढण्यात आले असून, एवढी मोठी रक्कम तडजोड शुल्क म्हणून वसूल करण्यात आली आहे. तडजोडीने प्रकरणे मिटाव‌ित यासाठी सकाळपासून जिल्हा न्यायालयात गर्दी उसळली. गोंधळाची परिस्थ‌िती निर्माण होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पोल‌िस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रकरणे तडजोडीने मिटविण्यासाठी बँकांचे अधिकारी-कर्मचारी, ग्रामविकास अधिकारी, विमा कंपन्यांचे अधिकारी, वीज मंडळ, मोबाइल कंपन्या आणि महसूल विभागाचे अधिकारी उपस्थ‌ित होते. जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये मिळून तीन लाखांहून अधिक प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. या लोकअदालतीमध्ये दाखलपूर्व आणि प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. लोक अदालत यशस्वीतेसाठी विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुधीर बुक्के, वकिलांनी सहकार्य केले.


साडेतीन लाख खटले

या लोकअदालतीमध्ये दाखल पूर्व ८० हजार खटले सुनावणीसाठी यावे, यासाठी प्रयत्न करण्यात आले. परंतु, प्रत्यक्षात तीन लाख ५५ हजार ६२० खटल्यांपैकी एक लाख २३ हजार ५६३ खटले निकाली काढण्यात आले. त्यातून ५३ कोटी १३ लाख ८८ हजार ४१९ रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर प्रलंबित १२ हजार २३० प्रकरणांपैकी तीन हजार ४४१ खटले निकाली काढण्यात आले असून, ४६ कोटी ८६ लाख ७९ हजार ६०६ रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे. या लोकअदालतीमुळे देशपातळीवर नवा विक्रम प्रस्थापित झाल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ईएसआयसी’ला बाधा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींत असलेल्या कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कष्टकरी कामगारांसाठी सरकारने कामगार विमा रुग्णालयाची (ईएसआयसी) उभारणी केलेली आहे. मात्र, शहरातील सातपूर येथील या रुग्णालयाला समस्यांची बाधा झाल्याचे दिसून येत आहे. येथे वेळेवर उपचार मिळत नसल्याच्या तक्रारीही अनेक कामगारांकडून होत अाहेत. याप्रश्नी ठोस कार्यवाही करण्याची मागणी कामगारवर्गाकडून केली जात आहे.

या रुग्णालयाच्या समस्या प्रशासनासमोर वेळोवेळी मांडल्या आहेत. परंतु, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कामगार विमा रुग्णालयालाच समस्यांची बाधा झाल्याने त्यावर उपाय करणार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे. कामगार विमा रुग्णालयाच्या पडून असलेल्या परिसराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करावा, अशी मागणी रुग्णालयाच्या वतीने करण्यात आली होती. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले जात अाहे. त्यातच कामगार विमा रुग्णालयात येणाऱ्या रस्त्याचीच दुरवस्था झाल्याने रुग्णांचा प्रवासही खडतर झाला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी येथील समस्यांप्रश्नी कधी पुढाकार घेणार, असा सवाल कामगारांनी उपस्थित केला आहे. एकीकडे सातपूर पोलिस स्टेशनला काँक्रिटीकरणाचा रस्ता महापालिका करते. मात्र, दुसरीकडे लाखो कामगारांसाठी असलेल्या कामगार विमा रुग्णालयाची वाट खडतर झाली असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

प्रयत्नांना मिळेना दाद

शेकडो कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी सरकारने कामगार विमा रुग्णालयाची भव्य इमारत सातपूर औद्योगिक वसाहतीत उभारली आहे. परंतु, कामगार विमा रुग्णालयात वेळेवर उपचार मिळत नसल्याचा आरोप नेहमीच केला जातो. खासदार हेमंत गोडसे यांनी कामगार रुग्णालयाला सुविधा उपलब्ध करून द्याव्यात यासाठी केंद्र व राज्य शासनाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार व निवेदन देत मागणी केली होती. आमदार सीमा हिरे यांनीदेखील कामगारांना योग्य आरोग्य सुविधा देण्यात यावी, अशी मागणी केलेली आहे. परंतु, तरीही योग्य ती कार्यवाही होत नसल्याने कामगारांना नाहक गैरसोय सहन करावी लागत आहे.


रस्त्याची वाट, झुडपे फोफावली

कामगार विमा रुग्णालयाच्या परिसरातील रस्त्याची दुरवस्था झाली असून, झाडाझुडपांमुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. रुग्णालयाच्या प्रशासनाने याबाबत लेखी पत्रव्यवहार करीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहितीदेखील सादर केली आहे. मात्र, असे असतानादेखील कामगारांना खडतर रस्त्यावरून प्रवास करावा लागत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. कामगार रुग्णालयाच्या अशा दुरवस्थेकडे सरकार कधी लक्ष देणार, असा सवाल कामगारांनी उपस्थित केला आहे.

----------

स्थानिक नगरसेवकांकडून पोलिस स्टेशनच्या हद्दीत महापालिकेच्या खर्चाने नागरी सुविधा पुरविल्या जातात. परंतु, लाखो कामगार येत असलेल्या कामगार विमा रुग्णालयाकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. स्थानिक लोकप्रतिनिधींनी येथील समस्या सोडविण्याची गरज आहे.

- दीपक जगताप, कामगार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार अपघातात दोन भाविक जखमी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर-शिर्डी रस्त्यावर पाथरे सबस्टेशनजवळ शनिवारी (दि. ९) दीड वाजेच्या सुमारास व्होक्सवॅगन कार उलटल्याने दोन जण जखमी झाले. वावी पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.

मुंबईहून शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेली व्होक्सवॅगन कार (एमएच ०१, ए एक्स ४९९६) सिन्नरकडून शिर्डीच्या दिशेने जात होती. पाथरे शिवारात सबस्टेशनजवळ असलेल्या वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार सरळ नालीत उलटली. या अपघातात कारमधील दोन जण जखमी झाले. अपघातानंतर पाथरे बु.चे सरपंच मच्छिंन्द्र चिने यांच्यासह मनोज गवळी, सुरेश जोर्वेकर, महेश नरोडे, संदीप ढवण, उपकेंद्रातील कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. कारमधील जखमींना बाहेर काढून श्रीराम मित्रमंडळाच्या रुग्णवाहिकेद्वारे उपचारार्थ शिर्डी येथे पाठविण्यात आले. वावी पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘झिरो गार्बेज’ला तिलांजली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्वच्छ व सुंदर नाशिकचा नारा देणाऱ्या नाशिक महापालिकेने स्वच्छतेतील आपले गुणांकन सुधारण्यासाठी आपल्याच ‘झिरो गार्बेज’ संकल्पनेला तिलांजली दिली आहे. शहरात पुन्हा ओला व सुक्या कचऱ्याच्या विलगीकरणाच्या नावाखाली महापालिकेने शहरात सुमारे दोनशे ठिकाणी कचरा पेट्यांची उभारणी केली आहे. त्यासाठी ठेकेदारावर तब्बल २१ लाखांचीही उधळपट्टी करण्यात आली आहे. शहरात पुन्हा कचराकुंड्यांमुळे घाणीचे साम्राज्य तयार होणार असून, स्वच्छ व सुंदर नाशिकला पुन्हा हरताळ फासला जाणार आहे. या वादग्रस्त निर्णयामुळे आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

माजी महापौर प्रकाश मते यांनी शहर कचराकुंडीमुक्त करण्यासाठी आदर्श घंटागाडी योजना सुरू केली होती. या योजनेनेमुळे घरोघरी केरकचऱ्याचे संकलन होऊन शहर झिरो गार्बेज करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. घंटागाडीमुळे शहरातील कचराकुंड्याची संख्या कमी झाली होती. कचऱ्या कुंड्यांभोवती तयार होणारे कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट कमी झाल्याने नाशिकचा ‘झिरो गार्बेज सिटी’ म्हणून देशभर नावलौकिक होता. परंतु, अधिकाऱ्यांच्या ठेकेदारप्रेमामुळे, तसेच लोकप्रतिनिधींचीही ठेकेदारांवर माया वाढल्याने आदर्श घंटागाडी योजनेलाच घरघर लागली होती. त्यामुळे पुन्हा शहरात कचऱ्याचे साम्राज्य उभे राहण्यास सुरुवात झाली. त्यावर उपाय म्हणून पुन्हा घंटागाडी ठेकेदारांना आमंत्रण देण्यात आले. त्यासाठी महापालिकेनेच घंटागाड्या विकत घेऊन त्या ठेकेदाराला चालविण्यासाठी देण्यात आल्यात.

आरोग्य विभाग आणि ठेकेदारांच्या संगनमताने पुन्हा घंटागाड्यांचा ठेका पाच वर्षांसाठी देण्यात आला. त्यासाठी नवीन घंटागाड्या खरेदीची अट ठेकेदारांना घालण्यात आली. यासाठी घंटागाडीचा ठेका तब्बल १७६ कोटींपर्यंत वाढविण्यात आला. ओल्या व सुक्या कचऱ्याच्या विलगीकरणाची अट नव्या ठेक्यात अंतर्भूत होती. घंटागाडी योजनेत सुधारणा व्हावी, शहरातील कचऱ्याची समस्या दूर व्हावी, या यामागील उद्देश होता. त्याची सर्व व्यवस्था ही घंटागाडी ठेकेदारानेच करायची होती. परंतु, ठेकेदारांच्या दावणीला बांधलेल्या आरोग्य विभागाने ओला व सुका कचऱ्यासाठी पुन्हा शहरात कचरापेट्या आणि ब्लॅकस्पॉटला आमंत्रण देण्याचे धोरण स्वीकारले. ठेकेदार, अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या संगनमताने पुन्हा ओला व सुका कचऱ्यासाठी दोनशे प्लास्ट‌िकच्या कचरापेट्या खरेदी करण्यात आल्या आहेत. ओला व सुका कचरा स्वतंत्र घेण्याच्या नावाखाली शहरात तब्बल २०० ठिकाणी कचरा पेट्या उभारण्याचा उफराटा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. यासाठी २१ लाख रुपयांचा खर्चदेखील करण्यात आल्याने आरोग्य विभागाच्या भूमिकेवरच आता शंका उपस्थित केल्या जात आहेत.

कचरास्पॉट वाढणार

शहरात महापालिकेच्या दप्तरी सध्या साडेचारशे कचऱ्याचे ब्लॅकस्पॉट आहेत. यांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात असतानाच, पुन्हा कचरापेट्या लावण्याचा उद्योग करण्यात आला आहे. या कचरापेट्यांमुळे नागरिकांमध्ये पुन्हा घंटागाडीत कचरा टाकण्याची सवय मोडेल. ते पुन्हा कचरापेट्यांमध्ये कचरा टाकण्यासाठी प्रवृत्त होणार आहेत. त्यामुळे कचरापेट्यांच्या अवतीभवती कचरा जमा होऊन दुर्गंधी वाढणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


त्र्यंबकमध्ये चुरशीची लढाई

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. थेट नगराध्यक्षपदाची ही निवडणूक भाजप, शिवसेना आणि काँग्रेसने प्रतिष्ठेची केली आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी प्रदेशाध्यक्षांना त्र्यंबकमध्ये उतरवत डागलेल्या तोफांचा नेमका किती परिणाम साध्य होतो ते स्पष्ट होणार आहे. भाजप, सेना आणि काँग्रेस या तीनही पक्षांच्या आजी-माजी आमदार, खासदार तसेच प्रदेश व जिल्हा पदाधिकारी यांनी तळ ठोकून केलेले नियोजन आज दिसून येणार आहे.

त्र्यंबकच्या मतदारांनी १९७४ आणि २००२ या दोन निवडणुकांमध्ये थेट नगराध्यक्ष निवडून दिले होते. काही वर्षांपूर्वी झालेल्या हद्दवाढीने दोन हजारांच्या आसपास मतदार नव्याने जोडले गेले आहेत. शहराची लोकसंख्या १२,५०० आहे तर मतदारांची संख्या १०,६१४ इतकी आहे. यामध्ये महिला मतदार ५४२३ आणि पुरूष मतदार ५१९१ इतके आहेत.

नगराध्यक्षपदासाठी ७ उमेदवार, तर ८ प्रभागांतील १७ जागांसाठी ५७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यापैकी भाजपचा एक उमेदवार बिनविरोध झालेला आहे. नगराध्यक्षपदासाठी भाजप, शिवसेना आणि काँग्रेस यासाबत चार अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. प्रभागांमध्ये भाजप १७, शिवसेना १०, काँग्रेस १२, राष्ट्रवादी ४ आणि १४ अपक्ष उमेदवार नशीब आजमावत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरोग्य’ची चमकोगिरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

महापालिकेच्या आरोग्य विभागाने घंटागाडी प्रभागात जातानाचा मार्ग ठरवून दिलेला आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हजेरी शेडवर नगरसेवकांचा प्रभाग व नावे यांचा फलक लावण्यात आलेले आहेत. मात्र, त्यावर माजी नगरसेवकांचीच नावे अद्यापही कायम असल्याचे सभापती माधुरी बोलकर यांच्या पाहणी दौऱ्यात आढळून आले. तेथील कामकाजात इतरही अनेक त्रुटी आढळून आल्याने आरोग्य विभाग चमकोगिरी करीत असल्याचा आरोप सभापती बोलकर यांनी केला.

आरोग्य विभागात चालणाऱ्या अनागोंदी कारभाराबाबत नागरिकांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे याबाबत माहिती घेण्यासाठी केलेल्या या पाहणीदौऱ्यात अनेक त्रुटी आढळून आल्याने त्या दूर करण्यासह तेथील फलक तात्काळ हटविण्याचे आदेश सभापती बोलकर यांनी कर्मचाऱ्यांना दिले. आरोग्य कर्मचाऱ्यांनी तात्काळ फलक हटविले. परंतु, आता आरोग्य विभागाकडून तेथे नवीन फलक कधी लागणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या एकंदर प्रकाराबाबत वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे सभापती बोलकर यांनी सांगितले.

महापालिकेची निवडणूक होऊन दहा महिन्यांहून अधिक काळ उलटला आहे. मात्र, असे असतानादेखील महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या हजेरी शेडवर जुन्याच नगरसेवकांचे फलक झळकत असल्याचे सातपूरच्या सभापती बोलकर यांच्या पाहणी दौऱ्यात आढळल्यावर सभापतींनी आरोग्य कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता घंटागाडीचा मार्ग दर्शविण्यासाठी फलक लावण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. परंतु, संबंधित फलकावर जुन्याच नगरसेवकांची नावे असल्याने ती काढण्यात का आली नाहीत, असा सवाल सभापती बोलकर यांनी उपस्थित केला. त्यानंतर जुने फलक आरोग्य कर्मचाऱ्यांनी तात्काळ हटविले.

--


नेमलेल्या ठिकाणी कामच नाही

नागरिकांकडून करण्यात आलेल्या तक्रारींनंतर हा पाहणी दौरा सभापतींनी आयोजिक केला होता. त्यात आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी नेमलेल्या ठिकाणी कामच करीत नसल्याचे आढळले. त्याचप्रमाणे कामकाजात इतर त्रुटीदेखील आढळल्याने याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे सभापती बोलकर यांनी यावेळी सांगितले.

--

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हजेरी शेडवर पाहणी केली असता घंटागाडीसाठी लावण्यात आलेल्या मार्गाच्या फलकांवर जुन्याच नगरसेवकांची नावे दिसली. संबंधित फलक तात्काळ हटविण्याचे आदेश देण्यात आले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार आहे.

-माधुरी बोलकर, सभापती, सातपूर प्रभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एचएएलला सुखोईचे गिफ्ट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाचव्या पिढीतील अत्याधुनिक लढाऊ विमानांची निर्मिती हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)च्या ओझर आणि बंगळुरू येथील प्रकल्पामध्ये केली जाईल, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली, तसेच येत्या २०३० पर्यंत ओझर एचएएलला सुखोईचे काम राहणार असल्याचे सांगून डॉ. भामरे यांनी नाशिककरांना सुखद धक्का दिला आहे.

नाशिक ‘एचएएल’तर्फे आयोजित खासगी सहकारी भागीदारी संमेलन २०१७ वेळी डॉ. भामरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. ओझर येथील एचएएलच्या कारखान्यात सुखोई या लढाऊ विमानांची निर्मिती करण्यात येत आहे. रशियन सरकारच्या सहयोगाने निर्मिती होणाऱ्या सुखोई या विमानाचे भारतीयीकरण करण्यात आले आहे. येत्या २०१९ पर्यंत या विमानांच्या निर्मितीचे काम ओझर एचएएलकडे आहे. मात्र, त्यानंतर काय असा प्रश्न एचएएलच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. याची दखल घेण्यात आली असून, सुखोई विमानाच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम ओझर एचएएलमध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे २०३० पर्यंत हे काम पुरेल, असे डॉ. भामरे यांनी सांगितले. त्याशिवाय पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानांची निर्मिती सध्या प्रस्तावित आहे. त्या संदर्भात संरक्षण मंत्रालय आवश्यक ती कार्यवाही करीत आहे. या विमानांची निर्मिती बंगळुरू आणि ओझर येथील प्रकल्पांमध्ये करावी, असे निर्देश एचएएलचे चेअरमन यांना देण्यात आल्याचे डॉ. भामरे यांनी सांगितले.

डीटीएलचा सन्मान

सुखोई विमानासाठी लागणारे विविध पार्टस खासगी कंपन्यांकडून खरेदी केले जातात. मेक इन इंडिया या मोहिमेंतर्गत संरक्षण क्षेत्रात खासगी उद्योगांना संधी दिली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून सुखोईच्या निर्मितीत शेकडो उद्योजकांना सहभागी करून घेण्यात आले आहे. डायनामॅटिक टेक्नॉलॉजीज या बंगळुरूच्या कंपनीतर्फे सुखोईसाठी लागणारा शंभरावा भाग शनिवारी प्रदान करण्यात आला. त्याचा स्वीकार डॉ. भामरे आणि एचएएलचे चेअरमन टी. सुवर्ण राजू यांनी केला. याप्रसंगी डीटीएलचे एमडी व सीईओ उदयनाथ मल्होत्रा उपस्थित होते.

पीपीपी तत्त्व वाढविणार

संरक्षण क्षेत्रात खासगी सहकारी भागीदारी (पीपीपी)चा अतिशय प्रभावी वापर केला जाणार आहे. त्यामुळे परदेशातून होणारी आयात कमी करण्यात येईल. नवीन उद्योगांना संधी मिळेल, शिवाय याद्वारे गुंतवणूक येईल. परदेशी उद्योजकांनाही याचा लाभ घेता येईल. यासाठी त्यांना तंत्रज्ञान हस्तांतर करावे लागेल, असे डॉ. भामरे आणि राजी यांनी सांगितले.

ओझर एचएएलचे कौतुक

सुखोई विमानावर ब्राह्मोसचे यशस्वी आरोहण ओझर एचएएलमध्ये करण्यात आले. सुखोईच्या निर्मितीत खासगी कंपन्यांना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात आली. ही बाब लक्षात घेऊन डॉ. भामरे आणि राजू यांनी ओझर एचएएलचे कौतुक केले. याप्रसंगी ओझर एचएएलचे सीईओ दलजितसिंग, सेमिलॅकचे सीईओ पी. जयपाल, डीजीएक्यूएचे अतिरिक्त संचालक निर्मल थिसाई उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी आत्महत्यांत ५० टक्क्यांहून अधिक तरुण

$
0
0

नाशिक ः जगाचा पोशिंदा म्हणून अहोरात्र राबणाऱ्या बळीराजाच्या मानेवरील अनंत अडचणींचा जू काही केल्या उतरण्यास तयार नाही. त्यामुळेच शेतकरी मरणाला जवळ करीत असून यंदाच्या वर्षी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये निम्म्याहून अधिक शेतकरी तरुण आहेत. यंदा सर्वाधिक १०१ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले असून, त्यामध्ये २० ते ४९ वयोगटातील ६७ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

राज्यात पहिली शेतकरी आत्महत्येची घटना विदर्भात १९९५ मध्ये घडली होती. तेव्हापासून लागलेले शेतकरी आत्महत्यांचे ग्रहण गेल्या २२ वर्षांत सुटू शकलेले नाही. किंबहुना वर्षानुवर्ष आत्महत्यांची संख्या वाढतेच आहे. मराठवाडा आणि विदर्भाच्या तुलनेने नाशिकसारख्या सधन जिल्ह्यातदेखील शेतकरी मेटाकुटीला येऊन जीवनयात्रा संपवित आहे. संकटांच्या मालिकेपेक्षा मृत्यू परवडला, ही भावनाच शेतकऱ्यांना जीवनयात्रा संपविण्यासाठी प्रवृत्त करीत असल्याचे मत जाणकारांकडून नोंदविले जात आहे. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये तरुणांपासून वृध्दावस्थेला पोहोचलेल्या शेतकऱ्यांचाही समावेश आहे. जिल्ह्यात यंदा प्रथमच शेतकरी आत्महत्यांच्या घटनांनी शंभरी गाठली आहे. गतवर्षी अशा ८७ घटनांची नोंद झाली होती. यंदा जानेवारी ते ९ डिसेंबर २०१७ या कालावधीत ही संख्या १०१ पर्यंत गेली आहे. त्यामुळे आत्महत्यांच्या या वाढत्या घटनांनी सरकार आणि प्रशासनापुढे आव्हान उभे केले आहे. विशेष म्हणजे यंदा आत्महत्या करणारा एक शेतकरी अवघ्या १९ वर्ष वयाचा आहे, तर एक ७९ वर्ष वयाचे आजोबा आहेत. निफाडसारख्या सधन तालुक्यात तर शेतकरी महिलेने आत्महत्येचा मार्ग अवलंबल्याने जिल्हा प्रशासनाला नोंद घ्यावी लागली. विशेष म्हणजे सुरगाणा या आदिवासी तालुक्यातदेखील पहिल्यांदाच शेतकरी आत्महत्येची नोंद झाली. त्यामुळे दुर्दैवाने यंदाचे वर्ष शेतकरी आत्महत्यांच्या दृष्टीने सर्वव्यापी ठरले.

नकळत्या वयातच जबाबदाऱ्यांचे ओझे

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांच्या ज्या घटना घडल्या त्यापैकी सर्वाधिक आत्महत्या ४० ते ४९ वयोगटातील शेतकऱ्यांनी केल्या आहेत. अशा २७ घटनांची नोंद जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. तर ५० ते ५९ वयोगटातील शेतकऱ्यांची संख्या २२ आहे. यापैकी बहुतांश शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढीने अजून तारुण्यात देखील प्रवेश केला नसून आतापासूनच संसाराची चिंता वाहण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली आहे. २० ते ३९ या वयोगटातील ४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यामुळे नकळत्या वयातच त्यांच्या बालकांच्या डोक्यावरील पितृछत्र हरपले आहे. एकीकडे बेरोजगारी, महागाई यामुळे शेतकरी कुटुंबातील तरुण हवालदिल झाला असताना शेतीतूनही हाती काही लागत नसल्याने तो नैराश्याने ग्रासला जात आहे.

वयोगट शेतकरी आत्महत्या

० ते १९ १

२० ते २९ १७

३० ते ३९ २३

४० ते ४९ २७

५० ते ५९ २२

६० हून अधिक ११

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दातृत्वातून कायापालट

$
0
0

तुषार देसले, मालेगाव

जिल्हा परिषदेची शाळा म्हटली की आपल्या डोळ्यासमोर पडकी इमारत, फुटकी कौले, भौतिक सुविधांचा आभाव असे चित्र उभे राहते. मात्र ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांचे हे उदासीन चित्र आता पालटू लागले आहे. देवघट (ता. मालेगाव) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला कधीकाळी ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जाऊन टाळे लागले होते. मात्र, गेल्या तीन वर्षांत विविध या शाळेने कात टाकली आहे. कसमादे परिसरातील शाळांसाठी ही शाळा रोल मॉडेल ठरली आहे.

उपक्रम व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ध्यास घेत शिक्षकांनी शाळेचा नावलौकिक वाढवला. याची दखत घेत मुंबई येथील सामाजिक संस्था एम्पथी फाउंडेशन व जिल्हा परिषद नाशिक यांच्या सौजन्याने शाळेची भव्यदिव्य इमारत उभी राहिली. या कायापालट झालेल्या जिल्हा परिषद देवघट शाळेच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा नुकताच झाला. देवघट येथील शाळेची तीन वर्षांपूर्वीची अवस्था इतर जिल्हा परिषद शाळांसारखीच होती. शिक्षकांची कमतरता होती. मात्र, मागील तीन वर्षांपासून येथील शिक्षकांनी विविध उपक्रमांनी, स्पर्धा परीक्षेतील यशाने शाळेचा कायापालट करायला सुरुवात केली. आज संपूर्ण जिल्हाभरात देवघटची शाळा एक कुतूहलाचा विषय बनली आहे.

गावाशी कुठलीही ओळख, नातगोत नसताना मुंबई येथील एम्पथी फाउंडेशनने दाखवलेल्या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे. एम्पथी फाउंडेशनने सुसज्ज दहा वर्गखोल्या, मुख्याध्यापक कार्यालय, संगणक कक्ष, मुलामुलींसाठी व दिव्यांगांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची निर्मिती केली. ही भव्य शालेय इमारत आज देवघट गावाच्या लौकिकात भर घालत आहे. तसेच आदिवासी, शेतकरी, मजूर यांनी पाचशे ते लाखापर्यंत देणगी देत जिल्ह्यात एक आदर्श निर्माण केला. पुढील वर्षी ग्रामस्थांचा आठवीचा वर्ग सुरू करण्याचा मानस आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार भौतिक सुविधांसह शिक्षण मिळावे म्हणून राज्यभरातून आजपर्यंत १४८ शाळा एम्पथी फाउंडेशनने निर्माण केल्या आहेत. देवघट शाळेचा नावलौकिक व प्रत्यक्ष शिक्षकांची तळमळ पाहून फाउंडेशनने शाळेचे स्वप्न साकार केले. - शांतिलाल छेडा,

सहाय्यक कार्यकारी विश्वस्त,

एम्पथी फाउंडेशन, मुंबई

देवघट येथ सुसज्ज शालेय इमारतीचे निर्माण झाले आहे. शाळेच्या गुणवत्तेसाठी शिक्षकांनी तर इमारत संरक्षणासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. एम्पथी फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद आहे.

- संदीप पाटील, शिक्षक देवघट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images