Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

घनकचरा व्यवस्थापनासाठी पालिकेला तीन कोटी

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापालिकेला स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) योजनेअंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी तीन कोटी ६५ लाख ८६ हजार रुपयांचे अनुदान मिळाले आहे. त्याचा पहिला टप्पा नुकताच पालिकेला प्राप्त झाला आहे. यामुळे घनकचरा प्रक्रिया प्रकल्पातील कामाचा अडथळा दूर झाला, अशी माहिती महापौर रशीद शेख यांनी पत्रकारांना दिली.

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी ३१ कोटी ३५ लाख ९५ हजारांचा प्रकल्प अहवाल पालिका प्रशासनाने तयार केला होता. त्यास शासनाची अंतिम मंजुरी मिळाली असून, त्याचा भाग म्हणून हा पहिला टप्पा मंजूर करण्यात आला आहे. शहरातील म्हाळदे शिवारातील कचरा डेपोवर केवळ कचरा संकलन केले जाते, मात्र यामुळे हा कचरा वर्षानुवर्ष तसाच पडून राहत असल्याने येथे कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून विषारी वायू बाहेर पडत असून, त्यालगत असलेले गिरणा नदीपात्र देखील यामुळे प्रदूषित होत आहे. ही बाब लक्षात घेता राष्ट्रीय हरित लवादाने पालिकेवर ताशेर ओढत, कचरा डेपोसाठी पर्यायी जागा शोधा व तत्काळ घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवा अशा सूचना केल्या होत्या.

त्यानंतर पालिका प्रशासनाकडून याबाबत प्रकल्प अहवाल तयार करून शासनास सादर करण्यात आला होता. २ डिसेंबर रोजी नगरविकास विभागाचे उपसचिव सुधाकर बोबडे यांचे प्रकल्प अहवालास मान्यता मिळाल्याचे पत्र पालिका प्रशासनास प्राप्त झाले आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास शहरातील घनकचऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळे प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्यात येईल, असे आयुक्त संगीता धायगुडे यांनी सांगितले.

अत्याधुनिक यंत्रसामग्री

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत अत्याधुनिक यंत्रसामुग्री तसेच उपकरणाचा वापर केला जाणार आहे. यात एकूण ५३ घंटागाड्या, २ टिप्पर, प्रकल्पाअंतर्गत रस्ते, प्रोसेसिंग प्लांट, वेस्ट रूम, वे ब्रिज, ग्रीन झोन, कचरा वर्गीकरण यंत्रणा, शेड, अंतर्गत गटार, बायोगॅस प्लांट आदींचा समावेश असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रासायनिक औषधांचा पिकांवर अतिरेक टाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बदलत्या हवामानामुळे द्राक्ष बागायतदार आपल्या द्राक्षबागेच्या संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर बुरशीनाशकांची फवारणी करतात. मात्र, अशा बागांच्या द्राक्षांमध्ये बुरशीनाशकांचे अंश आढळून येतात. यामुळे अशी द्राक्षे निर्यातीच्या मानांकनावर खरी उतरत नाहीत. यामुळे रासायनिक बुरशी आणि तणनाशकांचा अतिरेक द्राक्ष उत्पादकांनी टाळावा, असा सल्ला प्रसिद्ध द्राक्ष सल्लागार मंगेश भास्कर यांनी दिला.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित तंत्रज्ञान महोत्सवात ‘निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन तंत्रज्ञान’ या विषयावर ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान विद्याशाखेचे संचालक डॉ. सूर्या गुंजाळ होते. भास्कर म्हणाले, की झाडाच्या योग्य अन्नद्रव्ये व्यवस्थापनातून कीटकनाशके आणि बुरशीनाशकांचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत कमी करणे शक्य आहे. अन्नद्रव्ये व्यवस्थापन हे माती परीक्षण करूनच केले पाहिजे. परंतु विविध अन्नद्रव्यांचा संबंध लावणेही गरजेचे आहे. आपल्याकडील भारी जमिनीत सोडियमचे प्रमाण कमी करून त्याचे मॅग्नेशियम व पालाषशी असलेले गुणोत्तर वाढवणे गरजेचे आहे. तसेच हिरवळीचे खत, गांडूळ खत, जीवाणू स्लरी, ह्युमिक आम्ल, फलवरिक आम्ल यांचाही वापर वाढवावा. तणनाशकांचा वापर थांबविणे आवश्यक आहे. झाडांना जैविक मल्चिंग करणे गरजेचे आहे. यशस्वी द्राक्षबाग नियोजनासाठी जमिनीतील खनिज पदार्थ, सूक्ष्म जीव तसेच सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढविण्याची त्रिसूत्री त्यांनी सांगितली.

अध्यक्षीय भाषणात डॉ. गुंजाळ म्हणाले, की सेंद्रीय शेतीवर भर देताना पिकांचा उत्पादन खर्च कमी करण्याची गरज आहे. फळे व भाजीपाला पिकात किटकनाशकांच्या उर्वरकांचे प्रमाण अत्यंत जास्त असून मनुष्याच्या आरोग्याच्या दृष्टीने ते घातक आहे. झाडाच्या समतोल पोषणावर भर देऊन झाडाची प्रतिकारक शक्ती वाढवता येते. त्यामुळे किटकनाशकांचे प्रमाण कमी होऊन उत्पादन खर्चही कमी होण्यास मदत होईल. या प्रकारचे प्रयोग कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर राबविण्यात येत असून शेतकऱ्यांनी या पद्धती समजून घ्याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख रावसाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले. विस्तार शास्रज्ञ डॉ. नितीन ठोके यांनी सूत्रसंचालन केले. उद्यानविद्यातज्ज्ञ हेमराज राजपूत यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे स्टेशनजवळ तरुणावर शस्त्राने वार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकरोड रेल्वे स्टेशन परिसरात किरकोळ कारणावरून एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. ही घटना सोमवारी (दि. ४) रात्री उशिरा घडली.

निलेश संजय दोंदे (३२, रा. गोरेवाडी, नाशिकरोड) असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. विभाकर प्रभाकर चंद्रमोरे (२६, रा. ध्रुवनगर, सातपूर) या संशयितावर नाशिकरोड पोल‌िसांनी गुन्हा दाखल केला आहे. संशयित विभाकर या परिसरात आरडाओरड करीत होता. त्यामुळे निलेश व त्याच्या मित्रांनी त्याला तेथून जाण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने निलेशच्या डोक्यात वार करून जखमी करण्यात आली.


चेक चोरून रोकड लांबविली

व्यवहारापोटी व्यापाऱ्यांनी दिलेले चेक चोरून त्याद्वारे बँकेतून ६० हजार रुपये काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दगडुलाल रामजीवन हेडा (५७, रा. सावतानगर, सिडको) यांनी अंबड पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. रवींद्र सजन कासार (रा. शेवगे दारणा) यांच्याविरोधात फसवणुकीसह चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. दगडुलाल यांच्या गोविंदनगर येथील कार्यालयात काही चेक आले होते. २१ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या काळात संशयिताने हे चेक चोरून त्यावर खातेधारकांच्या स्वाक्षऱ्या व नावे टाकल्या. हे चेक बँकेत वटवून ६० हजार रुपये काढून घेतले.

तरुणावर हल्ला

मित्रासोबत उभ्या असलेल्या तरुणाची कुरापत काढून त्याच्यावर चॉपरने वार करण्यात आले. देवळाली गावात ही घटना घडली.
आकाश सोमनाथ पवार (२९, रा. रोकडोबावाडी) याने उपनगर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. याप्रकरणी राहुल पगारे व मनोज पगारे यांच्याविरोधात मारहाणीची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. संशयितांनी मंगळवारी (दि. ५) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास कुरापत काढून आकाशला शिवीगाळ केली. त्यानंतर त्याच्या कमरेवर व हातावर वार करून दुखापत करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइनवर ‘नंबर चॉइस’ नाहीच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) ऑनलाइन झाले असले तरीही त्यात अनेक उणिवा आहेत. वाहनखरेदीनंतर अनेकांना चॉइस नंबर हवा असतो; परंतु या चॉइस नंबरचा पर्याय ऑनलाइन सुविधेत समाविष्ट न केल्याने सरकारला लाखो रुपये महसुलापासून मुकावे लागत आहे.

राज्य सरकारने आरटीओच्या संदर्भात तब्बल ३२ कामे ऑनलाइन केली असून, नागरिकांना फक्त अर्ज भरण्यासाठी आरटीओ कार्यालयात जावे लागत आहे. वाहनधारकांना लायसन्स काढण्यापासून फिटनेस सर्टीफिकेट घेणे, वाहन नोंदणी, नोंदणी रद्द करणे, मालकी हस्तांतरण, पत्त्यात बदल, वाहनावर बोजा चढवणे अशी ३२ प्रकारच्या कामांसाठी आरटीओ कार्यालयात जावे लागते. सरकारने आरटीओच्या वेबसाइटवर या सर्व कामांचे पर्याय दिले आहेत. परंतु, अनेक वाहनधारकांना हव्या असलेल्या चॉइस नंबरचा पर्याय दिलेला नाही. चॉइसनंबरमधून आरटीओला लाखो रुपयाचा महसूल मिळतो. परंतु, नेमका हाच पर्याय ऑनलाइनमधून वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. चॉईस नंबरसाठी सरकारला अधिकृत महसूल प्राप्त होतो. चॉइस नंबरसाठी ऑनलाइन सुविधा प्राप्त करून दिल्यास लोकांना ‘आरटीओ’त खेटा माराव्या लागणार नाहीत. तसेच एजंटांना पैसे मोजावे लागणार नाही. इतर सुविधांप्रमाणेच चॉइस नंबरची सुविधाही ऑनलाइन करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

वाहनधारकाने एजंटांना डावलून काम करण्याचा प्रयत्न केला असता त्यास सहकार्य केले जात नाही. तात्पुरत्या वाहतूक परवान्यासाठी ऑनलाइन परीक्षा व्यवस्था सुरू झाली तरी एजंटांचा गरडा कमी झालेला नाही. मात्र, या नवीन पद्धतीत कोणत्याही कामाचा अर्ज नागरिकांना ऑनलाइनच भरावा लागेल. कामासाठी लागणारे शुल्क भरल्यानंतर सदर फॉर्मची प्रिंट काढून ती आरटीओ कार्यालयात जमा करावी लागेल. या प्रक्रियेत कोणत्याही एजंट किंवा आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्याचा हस्तक्षेप राहत नाही. याशिवाय अर्ज भरण्यास कोणाची मदत घेण्यात आली तरी प्रात्यक्षिक व ऑनलाइन परीक्षा द्यावीच लागणार आहे. अर्ज नोंदणीच्या क्रमाने नागरिकांची कामे होतील. ऑनलाइन शुल्क स्वीकारले जाणार असल्याने सध्या सुरू असलेले कक्ष बंद करण्यात येणार आहे. अर्ज भरताना नागरिकांच्या मोबाइल क्रमांकांची नोंद होणार असल्याने त्यावर अर्जाची स्थिती वा इतर माहिती पुरवण्यात येणार आहे.

ऑनलाइन ऑक्शन शक्य
ऑनलाइन चॉइस नंबरचा ऑप्शन दिल्यास सरकारच्या महसुलात वाढ होणार आहे. एकाच नंबरसाठी अनेक लोकांनी अर्ज केल्यास त्या नंबरचा ऑनलाइन ऑक्शन करून सरकारला महसूल मिळणे शक्य होऊ शकेल. तसेच नागरिकांना देखील सोयीचे होणार आहे.

असे आहेत हेल्पलाइन क्रमांक
आरटीओकडून पुरवण्यात येणाऱ्या ३२ सेवांबाबत अर्ज करण्यासाठी नागरिकांनी https://parivahan.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन सर्व्हिसमध्ये लॉगइन करावे. ऑनलाइन काम करताना तांत्रिक अडचणी असल्यास ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ०४०-२३४९४७७७ या क्रमांकावर सकाळी १० ते सांयकाळी ६ या वेळेत संपर्क करावा. किंवा sarathi@nic.in यावर मेल करावा. वाहनासंबंधी कामे करतांना अडचण असल्यास ०११-४९८७८३१० या क्रमांकावर सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत, किंवा ९८११००३९१८ या क्रमांकावर सकाळी ६ ते दुपारी २ पर्यंत तसेच ९८११००३९१५ या क्रमांकावर दुपारी दोन वाजेनंतर संपर्क साधवा. याशिवाय helpdesk-transport@gov.in यावर मेलही करता येऊ शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रीपेड स्मार्टकार्ड वाटपास प्रारंभ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

‘डिजिटल इंडिया’ मोहिमेअंतर्गत कॅशलेश इकॉनॉमीला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने येस बॅँकेच्या सहकार्याने सुरू केलेल्या प्रीपेड स्मार्ट कार्डचे वाटप बुधवारपासून सुरू करण्यात आले आहे.

नियमित कर भरणाऱ्या शहरातील ५० हजार करदात्यांना हे प्रीपेड स्मार्ट कार्ड मोफत वितरित केले जाणार असून याद्वारे महापालिकेच्या सर्व करांचा भरणा करता येणार आहे. तसेच व्हिसा कार्डप्रमाणे हे कार्ड मॉल्स, शॉपिंग सेंटर्स व अन्य इतर सर्व ठिकाणी वापरता येणार आहे. टप्प्या-टप्प्याने महापालिकेडून या कार्डचे वितरण करदात्यांना केले जाणार आहे.

शहरातील नियमित करदात्यांना क्रेडीट कार्डच्या धर्तीवर प्रिपेड स्मार्ट कार्ड देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यासाठी नियमित करदात्यांची यादी महापालिकेच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली असून या करदात्यांना मोफत प्रीपेड स्मार्ट कार्ड प्राप्त करून घेण्यासाठी एसएमएसद्वारेही कळविण्यात येणार आहे. स्मार्ट कार्ड मिळविण्यासाठी नागरिकांना ‘केवायसी’ डॉक्युमेंटची पूर्तता करावी लागणार आहे. ‘केवायसी’साठी आधारकार्ड अनिवार्य असणार आहे. त्यानंतरच हे कार्ड उपलब्ध होऊ शकणार आहे. हे कार्ड महापालिकेच्या सर्व ई-सुविधा केंद्रे, उपकार्यालयांच्या ठिकाणी कार्यालयीन वेळेत उपलब्ध होऊ शकणार आहे. या कार्डद्वारे सर्व प्रकारची देयके, सेवाशुल्क अदा करता येईल. यासाठी ई-सुविधा केंद्र तसेच उपकार्यालयांच्या ठिकाणी आधी कार्ड रिचार्ज करावे लागेल. या कार्डवर कॅश रिलोड तसेच कॅश ट्रान्सफर सारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत.

स्वच्छतेसाठी अॅप
केंद्राच्या स्वच्छ भारत अभियानात नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र स्वच्छता अॅप तयार केले आहे. हे अॅप स्मार्ट नाशिक अॅपशी लिंक केले आहे. स्वच्छता अॅपमध्ये स्वच्छता सर्वेक्षण फॉर्म भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सोबतच नागरिकांना यावर तक्रारी सुद्धा करता येणार आहेत. अॅपला लिंक असल्याने स्मार्ट नाशिक अॅपवर थेट तक्रारी दाखल होऊन त्याचे निरसन केले जाणार असल्याचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी सांगितले. यामुळे महापालिकेला स्वच्छतेच्या गुणांकनात मदत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वादळवारा पुरस्कारांचे शनिवारी वितरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

येथील परिवर्तन परिवारातर्फे देण्यात येणाऱ्या वादळवारा पुरस्काराचे वितरण शनिवारी (दि. ९) रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालय गडकरी चौक येथे सायंकाळी ५ वाजता होणार आहे.

इतिहास संशोधक व प्राख्यात वक्ते श्रीमंत कोकाटे (पुणे) यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रसिद्ध शाहीर शीतल साठे (सातारा) यांना प्रदान करण्यात येणार आहे. पाच हजार रुपये, गौरवचिन्ह आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने ‘महापुरुषांचे विचार आणि सद्यस्थितीतील आव्हाने’ या विषयांवर श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान होणार आहेत. व्याख्यानानंतर शाहीर शीतल साठे यांचा समाजप्रबोधनपर गितांचा, संगीतमय ‘नवयान महाजलसा’ हा कार्यक्रम होणार आहे. या सोहळ्याचे अध्यक्ष करुणासागर पगारे असून, निमंत्रक प्रा. गंगाधर अहिरे आहेत. प्रसिद्ध विचारवंत रावसाहेब कसबे यांची विशेष उपस्थिती असून शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, सावानाचे कार्यवाहक श्रीकांत बेणी, प्रभाकर साळवे, उपायुक्त वंदना कोचूरे, ‘भारिप’चे वामनराव गायकवाड, ‘भाकप’चे सचिव राजू देसले आदी सन्माननिय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

सोहळा यशस्वी करण्यासाठी किशोर शिंदे, नितीन भुजबळ, सूर्यभान जगताप, श्याम मोरे, प्रा. जयश्री बागूल, कवी रवींद्र मालुंजकर, डॉ. विशाल जाधव, प्रदीप जाधव, विनय कटारे आद‌ी प्रयत्नशील आहेत. या समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन परिवर्त परिवारातर्फे प्राचार्य दिनकर पवार, अशोक मोरे, काशीनाथ वेलदोडे, रवी पगारे, डॉ. धीरज झाल्टे आदींनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्त्री-पुरुष भेदभाव मिटवणारे राजा इल्वालू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पुरुषाचे जीवन हे स्त्री जीवनापेक्षा अधिक निरस असते. महिला आपल्या दैनंदिन कामात व्यस्त असतात तर पुरुषांची दैनंदिनी मोनोटोनोस असते. स्त्री-पुरुष या भावनांमधील तथ्य राजा इल्वालू नाटकातून उलगडण्यात आले.

महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या ६५ व्या नाट्य स्पर्धेत कामगार कल्याण केंद्र ललीत कला भवन ज‍ळगाव यांच्या वतीने प. सा. नाट्यगृहात बुधवारी नाटक सादर करण्यात आले. लेखक रमेश भोळे यांनी सामाजिक प्रबोधन करण्यासाठी ‘राजा इल्वालू’ या दोन अंकी नाटकाची कथा गुफतांना त्या संहितेला राजकीय, कौटुंबिक आयाम देऊन पुरोगामी विचारांची पेरणी केली आहे.
राजा इल्वालू नाटकाची कथा पौराणिक काळातील आहे. राजा इल्वालू हा या नायकाचा केंद्रबिंदू आहे. तो अत्यंत साहसी व कर्तव्यनिष्ठ आहे. राणीसोबत तो एकदा मायावी जंगलात जातात. राणीच्या सांगण्याकडे लक्ष न देता राजा तेथील एका सरोवरात स्नान करतो. त्याच क्षणी त्याचे स्त्रीमध्ये रुपांतर होते. स्त्री सुलभ भावनांमधून एका ऋषीकडे आकर्षित होतो. आणि त्यांना एक मूलदेखील होते. राजाला आपले स्वतःचे मूल व्हावे असे वाटत असते राणी या गोष्टीला तयार नसते. स्त्री जन्म मृत्यूशी लढून एक जीवन जन्माला घालते. स्त्रीच्या भावनांचा आदर करून समाजात तिला योग्य स्थान मिळाले पाहिजे समाज जीवनात स्त्रीला महत्त्वपूर्ण स्थान दिले पाहिजे, असा संदेश देत या नाटकाचा शेवट होतो.

नाटकाचे सूत्रधार दीपक भट हे होते. पार्श्वसंगीत - हर्षल पवार, रंगभूषा - श्रद्धा पाटील, नेपथ्य - मंदार कुळकर्णी, प्रकाशयोजना - महेंद्र खेडकर यांची होती. नाटकात रसिका मुजुमदार (राणी), शरद भालेराव (राजा), अमोल ठाकूर (सूत्रधार), शुभम साळवी (कुत्रा), चंद्रवदन बच्छाव (घुबड), दुर्गेश जगताप (इंद्र), आकाश बाविस्कर (ऋषी), सयुरी कुलकर्णी (गाय), हरिओम त्रिपाठी (कुमार), हितेंद्र नेरकर (अंशुमली), साक्षी नेवे (नाचणारी गायक), सुरेश राजपूत (धर्मगुरू), भावेश चौधरी (गायक), उल्हास ठाकरे (ढोलकीवाला) यांनी भूमिका साकारल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेशन दुकानांना नाही पॉस मशिनची सक्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

धान्य वितरणासाठी पॉस मशिनचा वापर न केल्यास रेशन दुकानदारांचे थेट परवाने रद्द करण्याची नोटीस पुरवठा विभागाकडून काढण्यात आली होती. परंतु, डाटा एन्ट्रीचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत पॉस मशिनद्वारे धान्य वितरणाची सक्ती करू नये, अशी सूचना पुरवठा अधिकाऱ्यांना देत पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी दुकानदारांना दिलासा दिला आहे.

धान्य वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी आणि खऱ्या गरजूंनाच रेशनच्या धान्याचा लाभ मिळावा यासाठी पुरवठा विभागाने बायोमेट्रिक प्रणालीची मदत घेतली आहे. लाभार्थ्याचा अंगठ्याचा ठसा घेतल्यानंतरच त्याला धान्य वितरित केले जाऊ लागले आहे. त्यासाठी शिधापत्रिकाधारकाचा आधार क्रमांक पुरवठा विभागाच्या सॉफ्टवेअरला लिंक करण्याची प्रक्रिया सुरू असून ठेकेदाराने हे काम अर्धवट सोडल्याने जिल्ह्यात डाटा एन्ट्रीचे काम रखडले आहे. जिल्ह्यात इ-पॉस मशिन वितरीत करण्यात आले असले तरी त्याबाबतही रेशन दुकानदारांच्या तक्रारी आहेत. असे असतानाही पॉस मशिनचा वापर न करणाऱ्या दुकानदारांचा परवाना रद्द का करू नये, अशा नोटिसा पुरवठा विभागाने बजावल्या आहेत. यासंदर्भात रेशन दुकानदारांनी मुंबईत अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांची भेट घेतली. आधार सीडिंगची कामे अपूर्ण असल्याने ‘इ-पॉस’ यंत्र वापरण्याची सक्ती करू नये अशी विनंती त्यांना करण्यात आली. आमदार जयंत जाधव यांनीही या आदेशाबाबत फेरविचार करावा, अशी मागणी बापट यांना केली होती. त्यानुसार बापट यांनी संबंधितांना तसे आदेश प्रशासनाला देत रेशन दुकानदारांना दिलासा दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एप्र‌िलमध्ये वॉटरकप स्पर्धा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
गावे टंचाईमुक्त करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातही अभिनेता अमीर खानचे पाणी फाउंडेशन सरसावले आहे. एप्र‌िल २०१८ मध्ये चांदवड आणि सिन्नर तालुक्यातील ४१ गावांमध्ये वॉटरकप स्पर्धा घेण्यात येणार आहे. लोकसहभागातून गावांमधील पाणीटंचाई दूर करण्याचे आवाहन फाउंडेशनने केले आहे.

चांदवड आणि सिन्नर तालुक्यातील पाणीटंचाईची समस्या दूर करण्यासाठी देशभर काम करणाऱ्या पाणी फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. या फाउंडेशनच्या काही पदाधिकाऱ्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या कार्याची माहिती दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात ही बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, पाण‌ी फाउंडेशनचे समन्वयक अविनाश पोळ तसेच कृषी व वन विभागाचे अधिकारी उपस्थ‌ित होते.

टंचाई निवारणासाठी प्रदर्शन, स्वयंसेवकाचे प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष करावयाची कामे आदींबाबत चर्चा करण्यात आली. पोळ यांनी फाउंडेशनच्या कार्यपद्धतीबाबत उपस्थ‌ितांना माहिती दिली. यावेळी २०१६ मध्ये वॉटरकप जिंकणाऱ्या गावांची यशोगाथा दाखविण्यात आली. डॉ पोळ म्हणाले, की टंचाई निवारणासाठी आम्ही गावे निवडणार नाही. तर गावानेच आपली निवड करावयाची असून ग्रामस्थांनी मिळून त्यासाठी परिश्रम घ्यावयाचे आहे. पाणलोट या विषयाची माहिती देणारे प्रदर्शन चांदवडमध्ये २८ जानेवारीला तर सिन्नर तालुक्यात ३० जानेवारीला भरविण्यात येणार आहे. त्यानंतरचा टप्पा प्रशिक्षणाचा असणार आहे. टंचाईमुक्त होण्यासाठी परिश्रम घेऊ इच्छिणाऱ्या गावांनी १० जानेवारीपर्यंत फाउंडेशनकडे सरपंच आणि ग्रामसेवकांच्या स्वाक्षरीने अर्ज पाठवावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले. गावाच्या लोकसंख्येनुसार काही व्यक्तींना प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे फाउंडेशनने यापूर्वी ज्या गावांमध्ये काम केले आहे अशाच ४५ गावांमध्ये हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

प्रशिक्षणानंतर प्रशिक्षित व्यक्तींनी आपल्या गावामध्ये जनप्रबोधन करावयाचे असून लोकसहभागातून कामांना सुरुवात करणे अपेक्षित आहे. ८ एप्र‌िल ते २२ मे या काळात वॉटरकप स्पर्धा होईल. यामध्ये श्रमदान, माती परीक्षण, कामांची दुरुस्ती आदींसाठी १०० गुणांची स्पर्धा घेतली जाणार आहे. प्रत्येक गावामध्ये झालेल्या कामाची नोंदणी अॅपवर होणार असून सर्व गावांना तात्काळ आपले गुण कळणे त्यामुळे शक्य होणार आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी यंदा पहिली तीन राज्यस्तरीय बक्षिसे अनुक्रमे ७५ लाख, ५० लाख आणि ४० लाख रुपये अशी असतील. तालुका पातळीवर पहिला क्रमांक पटकावणाऱ्या गावांनाही बक्षीसाने गौरव‌िण्यात येणार आहे.

पाणीटंचाई निवारणासाठी फाउंडेशन गावांना निधी देणार नाही. श्रमदान हाच या मोहिमेचा गाभा आहे. फाउंडेशन सॅटेलाईटच्या माध्यमातून एकाचवेळी ४५ गावांशी संवाद साधेल. वॉटरकप स्पर्धाही जिंकण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या पाणीदार गावांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात येईल.
- डॉ. अविनाश पोळ,
समन्वयक, पाणी फाउंडेशन

स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या गावांना शेवटपर्यंत स्पर्धेत टिकून रहावे लागेल. तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, वनपाल अशा सर्वच सरकारी घटकांना त्यासाठी योगदान द्यावे लागणार आहे. प्रशिक्षण हा यामधील महत्त्वाचा टप्पा असून शिवार फेरीसाठी अधिकाऱ्यांना उपस्थ‌ित राहावे लागेल.
- राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थेट संपर्कावर उमेदवारांचा भर

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर नगरपालिकेसाठी मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहेत तसतशी नगराध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची ठरत आहे. भाजपा, शिवसेना आणि काँग्रेस या तीन पक्षांनी उमेदवार दिले आहे. त्यात भरीस भर म्हणून चार अपक्ष उमेदवारही रिगणात आहेत. त्यामुळे एकूण सात उमेदवारांतून त्र्यंबकेश्वरसाठी नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांसह मतदारांशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहेत.

यंदाच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार पहिले असता एक गोष्ट प्रामुख्याने नजरेस पडते. ती म्हणजे या सर्व उमेदवारांना राजकीय प्रवास. भाजपचे उमेदवार असलेले पुरुषोत्तम लोहगावकर काँग्रेसमधून आले आहेत. शिवसेनेचे उमेदवार धनंजय तुंगार हेदेखील मूळचे काँग्रेसचे. काँग्रेसचे उमेदवार सुनील अडसरे हे निवडणुकीच्या तोंडयावर काँग्रेसमध्ये आयात झाले असले तरी त्यांची राजकीय सुरुवात काँग्रेसमधूनच झाली आहे. त्यामळे तीन उमेवादर काँग्रेसच्या राजकीय मुशीत तावून सुलाखून निघालेले आहेत. आज त्यांच्या हातात वेगवेगळे झेंडे दिसत असले तरी त्यांचा पाया काँग्रेसचे आहे. या तिनही उमेदवारांसमोर असलेले अपक्ष उमेदवार अॅड. पराग दीक्ष‌ित हे भाजपचे बंडखोर आहेत. अपक्षांमध्ये आणखी चर्चेत असलेले बाळकृष्ण झोले यांनीही स्पर्धेत उडी घेतली आहे. दीक्ष‌ित हे भाजपचे आणि झोले हे काँग्रेसची मतविभागणी करतील असे सध्या तरी दिसून येत आहे.

प्रभागात प्रचाराला वेग

भाजप, शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात लढत होत असताना त्यांना प्रभागातील उमेदवारांची साथसंगत मिळत आहे. यामध्ये भाजप उमेदवार लोहगावकर यांना सर्व १७ जागांची कुमक लाभली आहे. काँग्रेस आणि शिवसेनाच्या उमेदवारांना मात्र प्रत्येक प्रभागात अशी मदत लाभलेली नाही. मात्र जेथे उमेदवार दिले नाहीत त्या प्रभागातील पक्षांची मते त्यांना मिळतील, अशी अपेक्षा ते बाळगूण आहेत.

कार्यकर्त्यांची धावपळ

निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करून उमेदवारांनी आपल्या समर्थकांना चांगलेच पेचात पकडले आहे. प्रचार रॅली प्रसंगी याची प्रच‌िती येत आहे. प्रभागातील सदस्य आणि नगराध्यक्ष असे त्रांगडे सांभाळतांना कार्यकर्त्यांची चांगलीच तारांबळ होत आहे. यामध्ये एका राजकीय पक्षाची विचारसरणी घेऊन दुसऱ्या उमेदवाराचे समर्थन करावे लागत आहे.

‘त्यांची’ नावे याद्यांमध्ये आहेतच

त्र्यंबक शहराची लोकसंख्या १२ हजार ५०० इतकी आहे. त्यात मतदार संख्या दहा हजार ६१४ इतकी आहे. यातील बहुसंख्य मतदार हे बाहेरगावी राहतात. नोकरी व्यवसायाच्या निम‌ित्ताने काही काळ त्र्यंबकमध्ये वास्तव्य केले अशा मतदारांची नावे येथे आहेत. प्रत्येक प्रभागात महिलांची संख्या अधिक आहे. लग्न होऊन सासरी गेलेल्या आणि आता सासू झालेल्या महिलांचीदेखील नावे वर्षानुवर्ष मतदार यादीत आढळतात. काहींनी तर आपल्या सोयऱ्यांची नावे देखील नोंदवून या संख्येत भर घातलेली आहे.

मतदारांनाही पेच

शहरात दहा हजारांच्या आत मतदार आहेत. त्यामध्ये सात उमेदवार नगराध्यक्षांसाठी आणि ५६ उमेदवार नगरसेवकपदासाठी उमेदवारी करीत आहेत. प्रत्येक मतदाराला प्रभाग आठमध्ये चार आणि प्रभाग तीनमध्ये दोन तर इतर सर्वभागात तीन मते द्यावयाची आहेत. काही प्रभागात शिवसेनेचे काही ठिकाणी काँग्रेसचे आणि प्रत्येक प्रभागात भाजपचे पॅनल आहे. प्रचारात नगराध्यक्षपदासाठी सर्वांनी जोरदार आघाडी घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतीसाठी टर्मिनल मार्केट उभारणार

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, कळवण

राज्य शासन निर्यात व आयात धोरण ठरवण्यासाठी प्रयत्नशील आहे. इमारती केवळ बांधून उपयोग नसून शेतकरी, व्यापारी वर्गाची गरज ओळखून त्यांचा वापर होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण साधण्यासाठी नाशिक सारख्या प्रयोगशील जिल्ह्यात टर्मिनल मार्केटची संकल्पना येत्या काळात रुजविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन राज्याचे सहकार, कृषी व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

कळवण तालुक्यातील भेंडी येथे महाराष्ट्र राज्य कृषी, पणन मंडळ, पुणे व शेतकरी सहकारी संघ, कळवण यांच्या माध्यमातून शेतमाल निर्यात सुविधा केंद्र सुरू करण्यात आले. त्याच्या शुभारंभप्रसंगी देशमुख बोलत होते.

देवळ्याचे आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या अध्यक्षतेखाली व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार जे. पी. गावित, जिल्हा बँक संचालक धनंजय पवार, केदा आहेर, जि. प. सदस्य नितीन पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

देशमुख म्हणाले, भेंडी येथील सुविधा केंद्र अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र वीजपुरवठा नसल्याने हा प्रकल्प खंडित झाला होता. भविष्यात असे कुठलेही प्रकल्प राज्य शासन रखडवणार नाही. पैसे मिळविणे हा पणन मंडळाचा उद्देश नाही. मात्र शेतमालाला योग्य भाव व शेतकरी वर्गाला योग्य मोबदला मिळायला हवा. नाशिक जिल्ह्यात कांदा, द्राक्ष व डाळिंब उत्पादन चांगले आहे. शेतमाल टिकवून ठेवणे कठीण ठरते. मागणी व पुरवठा याचा ताळमेळ बसत नाही. कांद्याबाबत शेतकरी नेहमी चिंताग्रस्त असतो. थोडा महागला तरी अनेकांना त्रास होतो. अशांनी खाणं बंद करावं किंवा भाववाढीबाबत ओरड करू नये, शेतकरी वर्गाला थोडा भाव मिळू द्यावा असेही त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनीही एकदम कांदा बाजारात आणू नये. कांदा चाळीचे प्रस्ताव तयार करावेत, राज्य शासन तात्काळ त्यास मंजुरी देईल. कांदा रेल्वेने आवश्यक त्या ठिकाणी पुरवठा करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. कांदा खरेदीसाठी तत्काळ परवाने देण्यासाठी आम्ही तयार आहोत. ७४ लाख क्विंटल तूर शासनाने मागे खरेदी केली यापुढेही तूर, मूग घेतले जाणार आहे. ाज्यात नवीन प्रक्रिया उद्योग उभारण्यात येतील असे सांगून नाशिकच्या शेतमालाच्या प्रगतीचे मॉडेल देशासमोर आणले जाईल.

प्रास्ताविकात राज्य पणन महामंडळाचे कार्यकारी अधिकारी सुनील पवार यांनी भेंडी येथील ८ एकर मधील हा प्रकल्प देशात पहिलाच असल्याचे स्पष्ट केले. आमदार प्रविण दरेकर यांनी पणनच्या या प्रकल्पाचे कौतुक करत असे प्रकल्प राज्यात आणखी प्रकल्प उभे करावेत त्यासाठी मुंबई जिल्हा बँकच्या माध्यमातून आर्थिक पुरवठा करण्याची तयारी दर्शविली. कार्यक्रमास शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन सुधाकर पगार, भाजप जिल्हाध्यक्ष दादा जाधव, विकास देशमुख, राजेंद्र पवार, निंबा पगार, नंदकुमार खैरनार, मोतीराम पगार, पंकज ततार, श्रीधर कोठावदे, दीपक शिंदे उपस्थित होते.

कळवण तालुका शेतकरी सहकारी संघाच्या स्व. डॉ दौलतराव आहेर व्यापारी संकुल व सहकारमहर्षी स्व भिला दाजी पवार सभागृहाचा नामकरणसोहळाही देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्लॅमरस सनई-चौघडे

$
0
0

मटा फोकस

--

संकलन ः अश्विनी कावळे

--------------

ग्लॅमरस सनई-चौघडे

----

सध्या लग्नाचा धूमधडाका सुरू असून, यंदा मुहूर्त कमी असल्याने एकाच दिवशी अनेक ठिकाणी विवाहांचा बार उडत असल्याचे चित्र आहे. विवाह सोहळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक मानला जातो. हा सोहळा आता केवळ विधींपुरताच मर्यादित राहिला नसून, लग्नाकडे ग्लॅमरस इव्हेंट म्हणून पाहिले जात आहे. हा इव्हेंट खास व्हावा यासाठी वर, वधूबरोबर त्यांचे कुटुंबीयदेखील प्रयत्नशील असतात. लग्नमंडपाच्या सजावटीपासून फोटोशूट, लग्नात खमंग पदार्थ वऱ्हाडींच्या दिमतीला ठेवण्यापर्यंत सर्व व्यवस्था अगदी चोख करण्याकडे लक्ष केंद्रित केले जाते. लग्नाची शॉपिंग, मेंदी, हळद, सीमंती पूजन यानुसार कपड्यांची थीम, त्याचबरोबर लग्नस्थळी रोषणाई, फुलांच्या पाकळ्यांनी स्वागत आदींद्वारे हा सोहळा दिमाखदार बनविण्याकडे कल वाढल्याचे दिसून येत आहे.

----

लॉन्सकडे वाढता कल

हल्ली थीम वेडिंग हा प्रकार प्रत्येकालाच हवाहवासा वाटत आहे. थीमनुसार डेकोरेशन, तसे कपडे, दागिने घालण्याला पसंती दिली जाते. लॉन्सवर थीम वेडिंग करण्यास ऐसपैस जागा गरजेची असते. हवे तसे डेकोरेशन करता येत असल्याने कार्यालयांपेक्षा लॉन्सवर लग्न करण्याचा हा ट्रेंड हल्ली मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. थीम्सवर आधारित आकर्षक देखावे, रंगीत कारंजे, फुलांच्या माळा, विविध प्रकारच्या साहित्याची सजावट करून लग्नमंडप सजविण्यात येतात. बहुतांश कार्यालयांमध्ये त्यांचा ठरवलेलाच सेट घ्यावा लागत असल्याने लॉन्सला पसंती मिळत असल्याचे लॉन्सचालक सांगतात. यामुळे इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांनाही चांगले दिवस आले आहेत. आपल्या बजेटनुसार या कंपन्या थीम्स, डेकोरेशनविषयी कल्पना सुचवतात.

--

लॉन्स, कार्यालयातच पॅकेजेस

लग्नाचा हॉल, होमकुंड, सुपाऱ्या, भटजी, पाट, चौरंग, अगदी समईच्या वाती, आतषबाजीसाठीचे फॅन्सीफटाके या व अशा अनेक वस्तूंसाठी ऐन लग्नाच्या गडबडीत मोठी पळापळ होते. लग्नाच्या आनंदावरही त्यामुळे विरजण पडू शकते. हे टाळण्यासाठी आता लॉन्स, कार्यालयांनीच पुढाकार घेतला आहे. हॉलबरोबरच या सर्व वस्तू त्यांच्याकडून पॅकेजनुसार पुरविल्या जात आहेत. शहरातील अनेक कार्यालये, लॉन्सचालकांनी दोन लाखांपासून पुढे असे पॅकेजेस उपलब्ध करून दिले आहेत. इतकेच नव्हे, तर नवरीसाठी डोली, नवरदेवासाठी घोडी, बँड, बग्गी यांचीही मागणी केली, तरी काही वेळात तेही उपलब्ध करून दिल्याची उदाहरणे असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येते.

---

ड्रेस, ज्वेलरी कन्सल्टंट

लग्नाच्या महत्त्वाच्या दिवशी आपला लूक फसू नये म्हणून वर-वधू यांच्याकडून पूर्वतयारी करण्यास मोठे महत्त्व दिले जाते. त्यासाठी खास वेडिंग ड्रेस कन्सल्टंटची मदत घेतली जात आहे. वधू आणि वराची शारीरिक बांधणी, रंग, लग्नाचे ठिकाण यावरून ड्रेसची निवड केली जाते. सध्या कोणती फॅशन सुरू आहे, कोणत्या फॅशनचे कपडे चांगले दिसतील, कोणत्या रंगाची सध्या चलती आहे, निवडलेल्या ड्रेसवर कोणत्या प्रकारची ज्वेलरी चांगली दिसेल, अशी माहिती यांच्याकडून मिळते. शिवाय अनेक कन्सल्टंट फॅशनल डिझायनर, बुटिक यांच्याशी संलग्न असल्याने हवे तसे ड्रेस डिझाइन करून घेण्याविषयीही त्यांच्याकडून सुचविले जाते. याशिवाय मोठमोठ्या ज्वेलर्स, शोरुम्स, मॉल्समध्येही ही सुविधा पुरविली जाते. नाशिकमध्ये अद्याप हा ट्रेंड तितका रुजला नसला, तरी मोठ्या शहरांमध्ये अशा कन्सल्टंट्सला चांगली मागणी आहे.

--

वेडिंग प्लॅनरलाही पसंती

लग्न थाटामाटात करण्याची इच्छा अनेकांना असते. परंतु, आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत स्वतःच्या लग्नाच्या तयारीसाठी तितका वेळ काढणेही अनेकांना शक्य नसते. काही वर्षांपूर्वी ‘बँड बाजा बारात’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. वेडिंग प्लॅनर ही थीम यातून सर्वसामान्यांना स्पष्ट झाली होती. अशा वेडिंग प्लॅनरची आजच्या धावपळीत चांगली मदत होत आहे. त्यामुळेच त्यांची मागणीदेखील वाढली आहे. मध्यमवर्गीय माणसांच्या मनात अद्याप वेडिंग प्लॅनरची मदत घ्यावी की नाही, याबाबत संभ्रम दिसून येतो. परंतु, लग्न कोणत्याही चिंतेविना योग्य रीतीने व्हावे यादृष्टीने त्यांच्याकडूनही वेडिंग प्लॅनरचा पर्याय निवडला जात आहे. लग्न नेमकं कसं असावं, किती लोकं लग्नाला बोलवायचे आहेत, लग्नात कोणकोणते कार्यक्रम असावेत, परफॉर्मन्सेस, वर-वधू यांची मंडपात एन्ट्री कशा पद्धतीने होणार आहे, लग्नात मेन्यू काय असावा, डेकोरेशन कसे असावे, डेकोरेशनला साजेसे कपडे, पारंपरिक विधी, खर्चाची आखणी कुठे व कशी करावी, या सर्वांची जबाबदारी वर-वधूच्या कुटुंबीयांशी चर्चा करून वेडिंग प्लॅनर पार पाडतो. आपल्या बजेटमध्ये लग्न व्हावे, यासाठी वेडिंग प्लॅनरची मदत घेण्यात मध्यमवर्गीय कुटुंबीयदेखील सरसावले आहेत.

--

स्टार्टर्सपासून डेझर्टपर्यंत...

लग्न चांगले झाले, ही प्रतिक्रिया लग्नातील मंडळी देतात ते तेथील नियोजनामुळे आणि स्वादिष्ट जेवणामुळेच. लग्नातील जेवण चांगले, तर ही मंडळी खूश असे चित्र लग्नांमध्ये हमखास दिसते. जेवण बेचव असेल, तर लग्नातही मजा नाही, अशी समीकरणं करणारी मंडळीही असतात. त्यामुळे लग्नातील सजावटीबरोबर मुख्य काळजी घेतली जाते ती जेवणाची. स्टार्टर्सपासून डेझर्टपर्यंतचे पॅकेजेस केटरर्सकडून देण्यात येतात. महाराष्ट्रीयन पंचपक्वाने, वेलकम ड्रिंक्स, रंगीबेरंगी मॉकटेल्स, पंजाबी, राजस्थानी, चायनीज, इटालियन, चाट, केळीच्या पानाच्या पंगतीपासून, बुफेपर्यंत आणि त्यानंतर रुचकर पानापर्यंत असे सर्व काही केटरर्सकडून पुरविले जातात. किमान पावणेदोनशे रुपये थाळीपासून पुढे जितक्या पदार्थांचा समावेश होईल, त्यानुसार केटरिंगचे पॅकेज ठरत असते.

--

सर्वसमावेशक फोटोग्राफीचा ट्रेंड

पूर्वी केवळ लग्न आणि त्यापूर्वीच्या हळद, सीमंती अशा विधींपासून ते पाठवणीपर्यंत व्हिडीओ शूटिंग, फोटोग्राफीचे पॅकेज असायचे. यामध्ये एक मुख्य फोटोग्राफर व त्याच्या सहाय्यासाठी एक-दोन जण इतकाच त्यांचा ग्रुप असायचा. गेल्या तीन-चार वर्षांमध्ये ही पद्धत मात्र कालबाह्य ठरली आहे. केवळ लग्नापुरताच फोटोग्राफर आता राहिला नसून, लग्नाच्या इव्हेंटमधला तो एक महत्त्वपूर्ण घटक बनला आहे. फोटोग्राफर्सची आठ-दहा लोकांची टीम लग्नासाठी कार्यरत असते. लग्नाचे विधी, पाहुणे मंडळींचे स्वागत, वर-वधूंच्या विधींचे फोटो, मेंदी, संगीत व इतर काही पारंपरिक विधी, त्यांचे ‘कॅन्डीड’ क्षण, व्हिडीओ शूटिंग असे सर्व फोटोज व्यवस्थित मिळावेत यासाठी ही टीम केवळ लग्नाच्या दिवशीच नव्हे, तर त्यापूर्वीच्या प्रत्येक इव्हेंटला वर-वधूसोबत असते. हे तर झाले लग्नाचे. परंतु, लग्न ठरल्यानंतर आता कपल्सची पहिली पसंती असते ती प्री-वेडिंग फोटोशूटला. ड्रोनसारख्या विविध आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने फोटोशूट करीत अनेक जण आठवणींचा हा खजिना सांभाळून ठेवत आहेत. प्री-वेडिंग, कॉफी टेबल बुक, लग्नाचा अल्बम, करिझ्मा अल्बम, शॉर्टफिल्म, कुटुंबीय, मित्र-मैत्रिणींच्या त्या कपलविषयी असणाऱ्या भावना मुलाखतीद्वारे आणण्यासाठी फोटोग्राफर्सचा शोध ही लग्नकार्यावेळी महत्त्वाची बाब बनली आहे.

--

डिजिटल अन् पारंपरिक निमंत्रण

एकीकडे डिजिटलच्या युगात कमी खर्चात ऑनलाइन पत्रिका देण्याचा ट्रेंड वाढत आहे, तर दुसरीकडे महागड्या पत्रिका छापून घेण्याकडेही कल दिसून येत आहे. सध्या सोशल मीडियाचा वापर खुबीने करता येत असल्याने कमी खर्चात प्रभावी निमंत्रण पत्रिका स्नेहीजणांना पाठविणे सुलभ झाले आहे. संबंधित सोहळ्याबाबतची क्लिप तयार करून ई-मेल्स, व्हॉट्सअॅप आदींद्वारे पाठविले जाणारे निमंत्रण चर्चेचा विषय ठरत आहे. दुसरीकडे कपल्सचे फोटो टाकून लग्नातील विधींची माहिती देणाऱ्या निमंत्रण पत्रिकांचा ट्रेंडही जोरात आहे. केवळ पत्रिका न देता त्याबरोबर सुकामेवा, चॉकलेट्स, मिठाई यांचा समावेश करीत निमंत्रण आकर्षक केले जात आहे.

--

जुन्या-नव्याची कल्पक सांगड

आजच्या पिढीला केवळ नवीन ट्रेंड भुरळ घालतात असे नसून, जुन्या काळातील, पारंपरिक गोष्टींचीही तितकीच भुरळ पडताना दिसून येते. लग्नात डीजे असावा की नाही या विचाराबरोबरच लग्नात विधी सुरू असताना शहनाईचाच आवाज असावा, बग्गीत बसून वरातीचा आनंद लुटावा, अशी मागणी काही जणांकडून केली जाते. केवळ नवीन ट्रेंडच नाही, तर नाही पारंपरिक आणि आधुनिक अशी सांगड घालत त्यांना लग्नसोहळा पार पाडायचा असतो. त्यासाठी जुन्या-नव्याची कल्पक सांगड घालण्याकडेही वाढता कल दिसून येत आहे.

---

लग्नातील प्रत्येक गोष्टीबाबत हल्ली लोक खूप चिकित्सक झाले आहेत. त्यांच्या डीमांडनुसार आम्ही त्यांना पॅकेजेस देत असतो. पेशवाई या थीमपासून ते एकदम मॉडर्न थीममध्ये लग्न करण्याची मागणी पुढे येत असते. यामध्ये वाढपींनीही त्याच वेशभूषेत येऊन वाढावे, असा आग्रहही अनेकांचा असतो. या मागण्या त्यांना हव्या तशा पद्धतीने पुरविण्यात येतात. त्याची वेगवेगळी पॅकेजेस असतात.

-प्रकाश मते, अध्यक्ष, लॉन्स संघटना

--

पूर्वी केवळ पारंपरिक थीमवर फोटोज काढले जात होते. ज्या कपलचे लग्न आहे ते थेट लग्नाच्या दिवशीच फोटोग्राफरला बघायला मिळत. त्यामुळे फोटोग्राफर आणि कपलमध्ये व्यवस्थित बाँडिंग नसल्याने त्याचा परिणाम फोटोंवर व्हायचा. सध्याचा ट्रेंड बदलला आहे. कंटेम्पररी स्टाइल, सिनेमॅटिक व्हिडीओ करण्याला कपल्सची पसंती असते. लग्नापूर्वी, फोटोशूटपूर्वी आम्ही कपल्ससोबत मीटिंग्ज घेतो. त्यांच्या स्टोरीनुसार फोटोशूट करतो. इंटरनेटमुळे अनेक नवनवीन ट्रेंड सर्वसामान्यांनाही माहिती असल्याने त्यांच्याकडूनही वेगवेगळ्या मागण्या पुढे येत असतात.

-सागर कोल्हे, फोटोग्राफर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकाऱ्यांच्या पाठिशी शिवसेना

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना आवरण्यात महापौरांना अपयश आल्यानंतर अधिकाऱ्यांच्या जाचाविरोधात शिवसेनाप्रणित कामगार सेना अधिकाऱ्यांच्या पाठ‌िशी उभी राहिली आहे. म्युनिसिपल कर्मचारी, कामगार सेना ही कायम महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पाठिशी आहे. अधिकाऱ्यांवर स्वेच्छानिवृत्तीचा दबाव वाढत असून, याबाबत आयुक्तांनी गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा म्युनिसिपल कर्मचारी, कामगार सेना अधिकाऱ्यांसह रस्त्यावर उतरेल असा इशारा म्युनिसिपल कर्मचारी, कामगार सेनेचे अध्यक्ष तथा नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

म्युनिसिपल कर्मचारी, कामगार सेनेचे अध्यक्ष तथा नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नाशिक महानगरपालिकेत आधीच अनेक पदे रिक्त आहेत. त्यात दरमहा सेवानिवृत्ती होत आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने ते अतिरिक्त कामाचा बोजा घेऊन काम करत असतात. मात्र, पालिकेत सध्या अधिकाऱ्यांवर स्वेच्छानिवृत्तीचा दबाव वाढत आहे. पुरेसे अधिकारी आणि कर्मचारी नसताना विषय समित्या, त्यांचे सभापती, पदाधिकारी, नगरसेवक, नागरिक अशा विविध पातळीवर प्रत्येकाची मर्जी सांभाळणे अधिकारी आणि कामगार वर्गाला कसे शक्य होणार? संपूर्ण नाशिक महानगरपालिकाच आउटसोर्सिंगच्या नावाखाली ठेकेदारांच्या ताब्यात देण्यासाठीच अधिकाऱ्यांवर स्वेच्छा निवृत्तीचा दबाव वाढविण्यात येत आहे. दोन वर्षांत तब्बल ११ अधिकाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. म्युनिसिपल कर्मचारी, कामगार सेना ही कायम नाशिक महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पाठ‌िशी आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कोणाच्या दबावाला बळी पडून स्वेच्छा निवृत्ती घेऊ नये. महापालिकाच ठेकेदारांच्या घश्यात घालण्यापेक्षा राज्यातही सत्ता असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेत नोकरभरतीसाठी विशेष बाब म्हणून मंजुरी मिळवून द्यावी. त्यातून अनेकांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध होऊन अनेक बेरोजगारांचे आशीर्वाद लाभतील. कोणाला नोकरी सोडण्यास लावण्यापेक्षा रोजगार देता येतो का, याचा विचार व्हावा, अशी अपेक्षाही तिदमे यांनी व्यक्त केली आहे.

कामगार सेनेशी संपर्क साधा

मनपातील उच्च अधिकारी असो की कर्मचारी, कोणी दबाव टाकत असेल त्यांनी त्वरित म्युनिसिपल कर्मचारी, कामगार सेनेशी संपर्क साधावा, असे आवाहन पत्रकात करण्यात आले आहे. मनपा आयुक्तांनी याप्रकरणी गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथा म्युनिसिपल कर्मचारी, कामगार सेना अधिकाऱ्यांसह रस्त्यावर उतरेल असा इशारा त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बजेटचा फुगा फुटणार; तब्बल दीडशे कोटींची तूट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या लेखा विभागाने सुधारित बजेटचे काम हाती घेतले असून, गेल्या आठ महिन्यातील जमा-खर्चाचा ताळमेळ करताना लेखा विभागाची दमछाक होत आहे. उत्पन्नाचे स्‍त्रोत मर्यादीत होत असताना खर्चाची बाजू मोठ्या प्रमाणावर वाढल्याने जमा-खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याचे चित्र आहे. मार्चअखेर उत्पन्न आणि खर्चात जवळपास दीडशे कोटींची तूट येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यातच स्पीलओव्हर पुन्हा सातशे कोटींच्या आसपास पोहचला आहे. त्यामुळे लेखा विभागाने सर्व विभागांना पत्र पाठवून आता नवीन कामे थांबवा, अशा स्पष्ट सूचना दिल्याने पालिकेच्या कामाचा गाडा चार महिने आधीच थांबला आहे. दुसरीकडे स्थायी समिती आणि महासभेने तब्बल २१०० कोटींवर नेलेल्या बजेटचाही फुगा फुटला आहे.

महापालिकेच्या लेखा विभागाकडून सध्या सुधारित बजेटचे काम हाती घेण्यात आले आहे. गेल्या आठ महिन्यांतील उत्पन्नाची बाजू आणि खर्चाचा आढावा घेतला जात आहे. उत्पन्न आणि खर्चाचा अंदाज घेऊन महापालिका आयुक्तांनी स्थायी समितीला १४१० कोटींचे बजेट सादर केले होते. त्यात स्थायी समितीने पावणेचारशे कोटींची वाढ करत हे बजेट अठराशे कोटींपर्यंत नेले होते. या बजेटमध्ये पुन्हा महासभेने वाढ करून ते २१०० कोटींच्या पार नेले होते. जकातीपाठोपाठ आलेल्या एलबीटीने अगोदरच उत्पन्नाची बाजू कमकुवत केली होती. एलबीटीनंतर आलेल्या जीएसटीने तर उत्पन्नावरच मर्यादा घातल्या आहेत. त्यामुळे पालिकेडे सध्या जीएसटी आणि मालमत्ता व पाणीपट्टी करावर डोलारा चालवावा लागणार आहे. नोव्हेंबरपर्यंत पालिकेच्या अनुदान व विविध योजनांच्या उत्पन्नातून तिजोरीत एक हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. खर्च ८२८ कोटींपर्यंत गेला आहे. येत्या चार महिन्यांत जीएसटी अनुदान व विविध उत्पन्नांतून २५० कोटी रुपये येणे अपेक्षित आहे. त्यामुळे जमा व खर्चाच्या बेरजेत दीडशे कोटी रुपयांपर्यतची तूट जाणवणार आहे.

वाढता वाढता वाढे...

महापालिका आयुक्तांनी स्थायी समितीला १४१० कोटींचे बजेट सादर केले होते. स्थायी समितीने ते १८०० कोटींपर्यंत फुगवले होते. महासभेने या बजेटमध्ये सव्वातीनशे कोटींची वाढ करत चालू वर्षाचे बजेट २१०० कोटींच्या पुढे नेले होते. परंतु, एकीकडे बजेटचा फुगवटा होत असताना दुसरीकडे उत्पन्नाच्या साधनांवर काम झाले नाही. त्यामुळे आयुक्तांच्या बजेटमध्ये अपेक्षित उत्पन्नाच्या आकड्यापर्यंत पोहचणेही आता मुश्किल झाले आहे. त्यामुळे स्थायी आणि महासभेच्या बजेटचा फुगाही फुटला आहे.

दत्तक नाशिकला ठेंगा

स्थायी समितीने बजेट फुगवताना राज्यसरकाकडून नाशिकला मोठ्या प्रमाणावर निधी मिळेल अशी अपेक्षा ठेवली होती. त्यासंदर्भात महापौरांनी मुख्यमंत्र्यांकडे हजार कोटींचा आराखडाही सादर केला होता. परंतु, नाशिक दत्तक घेतलेल्या मुख्यमंत्र्यांनी नाशिककरांना ठेंगा दाखवला आहे. औरंगाबाद महापालिकेला रस्त्यांसाठी निधी देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी नाशिकच्या बाबतीत मात्र हात आखडता घेतला आहे. सरकारकडून महापालिकेला आर्थिक मदतच मिळाली नसल्याने पदाधिकाऱ्यांचाही अपेक्षाभंग झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘संगीत देवबाभळी’ व्यावसायिक रंगभूमीवर

$
0
0

नाशिक ः हौशी आणि प्रायोगिक रंगभूमीमध्ये नेहमीच अव्वल ठरलेली नाशिकची रंगभूमी आता व्यावसायिकतेसाठीही कात टाकत असून, नाशिकचे रंगकर्मी प्राजक्त देशमुखलिखित, दिग्दर्शित ‘संगीत देवबाभळी’ हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करीत आहे. प्रसाद मच्छिंद्र कांबळी यांचे भद्रकाली प्रॉडक्शन हे नाटक रंगभूमीवर आणणार आहे. अनेक वर्षांपासून व्यावसायिक रंगभूमीवर जाणारी ही पहिलीच स्वतंत्र नाट्यकृती आहे.

नाशिकला व्यावसायिक नाटकांचे अनेक वर्षांपासून वावडेच आहे. कारण आतापर्यंत व्यावसायिकपर्यंत कुणी झेपच घेऊ शकलेले नाही. नाट्यलेखक दत्ता पाटील यांचे ‘रिमझिम रिमझिम’ नाटक ‘स्ट्रॉबेरी’ नावाने रंगभूमीवर आले; परंतु ते कुसुमाग्रज यांच्या कथेवर बेतलेले होते. त्याचे प्रयोगही फारच कमी झाल्याने ओळख होण्याआधीच ते पुसले गेले आणि नाशिकला व्यावसायिक नाटक मिळण्याचे स्वप्न आणखी धूसर होत गेले. मात्र, प्राजक्तच्या ‘संगीत देवबाभळी’मुळे पुन्हा एकदा रंगकर्मींच्या आशा पल्लवित झाल्या असून, नाशिकचे नाटक व्यावसायिकला गेल्याने रंगकर्मींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

संगीत देवबाभळी नाटकाचे कथानकही उत्तम आहे. यात तुकोबांना शोधत त्यांची पत्नी आवली भटकत असते, तेव्हा तिच्या पायात देवबाभळीचा काटा घुसतो आणि तिची शुद्ध हरपते. तेव्हा तिच्या पायातला काटा काढायला साक्षात विठ्ठल अवतरतो अशी एक वदंता आहे. त्या काट्याच्याच नावाचे हे नाटक विठ्ठलाने आवलीच्या पायातला काटा काढल्यानंतर काय घडले असेल याचा वेध घेते. विठ्ठल काटा काढून थांबत नाही. या जखमेचे निमित्त करून विठ्ठल रखमाईला आवलीची काळजी घ्यायला पाठवतो. दोन बायका एकत्र आल्या की गोंधळ उडतो; मात्र येथे या दोघी एकमेकींचा आणि पर्यायाने तुकारामांचा, विठ्ठलाचा, भक्तिपरंपरेचा, आस्तिक्याचा वेध घेतात. असे हे नाटक आहे.

भद्रकाली प्रॉडक्शनचे ५५ वे नाटक म्हणून संगीत देवबाभळीला सन्मान मिळत आहे. या नाटकाला व्यावसायिक रंगभूमीसाठी सादर करताना हवे ते बदल करण्याचे, तसेच हवे ते रंगकर्मी निवडण्याचे स्वातंत्र्य नाटकाचे लेखक प्राजक्त देशमुख यांना मिळाल्याने नाशिकचे हे नाटक बाजी मारणार, यात शंका नाही.

एक संगीत एकांकिका तुम्हाला व्यावसायिक रंगभूमीवर घेऊन जाते, या सत्याला मी सामोरा जातोय. लिहिताना उत्तम सादरीकरण डोक्यात असते. त्यामुळे संगीत देवबाभळी ओघवते झालेय. या नाटकाचे दिग्दर्शन मीच करावे असे कांबळींनी सांगितले. नाटकाबाबत सर्व मोकळीक दिली. आणखी काय हवे?

- प्राजक्त देशमुख, लेखक व दिग्दर्शक

व्यावसायिक रंगभूमीसाठी काम करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. देवबाभळीच्या रूपाने हे स्वप्न पूर्ण होतेय, याचा खूप आनंद आहे. संगीत दिग्दर्शन करताना कस लागणार, यात शंका नाही.

- आनंद ओक, संगीत दिग्दर्शक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘नो हॉर्न डे’आता राज्यात राबविणार

$
0
0

गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांच्या सूचना

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कर्णकर्कश आवाजाच्या हॉर्नमुळे रुग्ण, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक त्रास होतो. त्यामुळे शहरात पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी दर सोमवारी ‘नो हॉर्न डे’ सुरू केला होता. या उपक्रमाची राज्य सरकारने दखल घेतली असून, संपूर्ण राज्यात हा उपक्रम सुरू करण्याच्या सूचना गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिल्या आहेत.

अचानक वाजवलेल्या हॉर्नमुळे रस्त्यावर गंभीर अपघात घडत असतात. त्यामुळे या सर्व अनपेक्षित घटना टाळण्यासाठी ‘नो हॉर्न डे’नाशिक शहरात हा उपक्रम पहिल्यांदा सुरू करण्यात आला होता. या अभिनव उपक्रमात शहरातील विविध संस्था सहभागी झाल्या होत्या. या उपक्रमाची दखल घेत गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी कौतुक केले होते. त्यानुसार मुंबईतदेखील हा ‘नो हॉर्न डे’ उपक्रम राबविण्यात आला. गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी हा उपक्रम मुंबईत राबवला. त्यानंतर आता हा अभिनव उपक्रम पूर्ण राज्यात राबविण्याच्या सूचनाही मंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिल्या आहेत.


वाहनचालकांकडून जनजागृती

या उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन स्वतः मंत्रालयासमोर रस्त्यावर उतरून डॉ. पाटील यांनी वाहनचालकांना हॉर्न बंदीचे पत्रके दिली. ध्वनी प्रदूषणमुक्त राज्य म्हणून महाराष्ट्राची नवी ओळख निर्माण करण्यासाठी नागरिकांनी या उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. गरज नसतानाही मोठमोठ्याने हॉर्न वाजविल्याने मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होत असते. मुंबईतील परिवहन विभागाने या उपक्रमाची जोरात अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. रस्त्यात जागोजागी उभे राहून स्वतः अधिकारी वाहनचालकांना हॉर्न बंदीचे पत्रके देऊन यासंबंधी जाणीवजागृती करत आहेत. वाहनचालकही या अनोख्या उपक्रमाचे स्वागत करताना अनेक ठिकाणी दिसत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुंभमेळा जागतिक सांस्कृतिक वारसा

$
0
0

वृत्तसंस्था, नवी दिल्ली / नाशिकरोड

जगभरात प्रसिद्ध असलेल्या भारताच्या कुंभमेळ्याला आता जागतिक दर्जा प्राप्त झाला आहे. संयुक्त राष्ट्रांचा घटक असलेल्या ‘युनेस्को’ने कुंभमेळा हा मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा असल्याचे जाहीर केले आहे. याआधी गेल्या दोन वर्षांमध्ये योग आणि नवरोझ (पारशी नववर्ष) यांचा समावेश सांस्कृतिक वारशांच्या यादीमध्ये करण्यात आला आहे. भारतात नाशिकसह अलाहाबाद, हरिद्वार आणि उज्जैन या चार ठिकाणी कुंभमेळा भरतो.

‘युनेस्को’च्या आंतरशासकीय समितीच्या दक्षिण कोरियामध्ये सुरू असलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कुंभमेळा हा धार्मिक यात्रेकरूंचा जगातील सर्वांत मोठा आणि शांततेत पार पडणारा मेळा असल्याचे ‘युनेस्को’ने म्हटले आहे. भारतासाठी हा अभिमानास्पद क्षण आहे, अशी प्रतिक्रिया सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी व्यक्त केली.

अलाहाबाद, उज्जैन, हरिद्वारप्रमाणेच नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याला महत्त्व आहे. मात्र, या उत्सवाला आजपर्यंत जागतिक पातळीवर दर्जा प्राप्त होण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केला नव्हता. त्र्यंबकेश्वर संस्थानच्या विश्वस्त ललिता शिंदे यांनी कुंभमेळ्याला युनेस्कोच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांच्याकडे पाठपुरावा केला होता. केंद्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या समितीने केंद्रीय मंत्र्यांकडे अहवाल सादर केला. समितीच्या पुराव्याच्या आधारे पॅरिस येथील युनेस्कोच्या कार्यालयात केंद्राने प्रस्ताव पाठवला. त्याचा विचार करून युनेस्कोने कुंभमेळ्याला आंतरराष्ट्रीय दर्जा बहाल केला आहे.

असा होईल फायदा

नाशिकचा कुंभमेळा युनेस्कोच्या यादीत गेल्याने नाशिकला सांस्कृतिक क्षेत्रात यापुढे जागतिक स्तरावर नावलौकिक मिळणार आहे. या कुंभमेळ्याची दखल युनेस्को संस्था घेणार असून, कुंभमेळ्यासाठी आवश्यक उपाययोजना व संवर्धन युनेस्को करणार आहे. नाशिकचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान वाढणार आहे.

वारसायादीतील अन्य उत्सव

युनेस्कोने जागतिक वारसा यादीत भारतातील पुढील उत्सवांचा समावेश केला आहे. नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा, कुट्टीयत्तम, सांस्कृतिक थिएटर, वैदिक मंत्रोच्चार परंपरा, रामलीला रामायण पारंपरिक कामगिरी, नवरोझ, रम्मन धार्मिक सण आणि गढवाल हिमालयातील विधी थिएटर, छाऊ नृत्य, कालबेलिया लोकगीते, राजस्थानातील नृत्य, मुडियेट्टू विधी थिएटर, केरळ नृत्य नाटक, लडाख, जम्मू आणि काश्मीर बौद्ध पठण, संकीर्तन विधी गायन ड्रमिंग आणि मणिपूरचे नृत्य आदी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणार

$
0
0

धुळे जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथील यात्रेतील चेतक फेस्टिव्हलला कोट्यवधींचा निधी सरकारने दिला आहे. मात्र मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या सिंचन योजनांकडे लक्ष देण्यास वेळ नाही, असा आरोप जिल्हा स्वाभिमानी संघटनेने केला. जिल्ह्यातील तापी नदीचे पाणी शेतापर्यंत पोहचवण्यात मुख्यमंत्र्यांना अपयश आले असून, सारंगखेडा यात्रेच्यावेळी मुख्यमंत्री आल्यास त्यांना काळे झेंडे दाखवण्यात येतील, असा इशारा नंदुरबार जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा यात्रेत आज (दि. ८) मुख्यमंत्री चेतक फेस्टिव्हलला भेट देण्यासाठी येत आहेत. त्यासोबतच ते अश्व म्युझियमचे भूमिपूजनही करणार आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या समस्येकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नाही, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली. जिल्ह्यातील २२ बंद पडलेल्या उपसा सिंचन योजना अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. या योजनांच्या दुरुस्तीसाठी राज्य सरकारने ४० कोटींचा निधीही मंजूर केला. माजी मंत्री एकनाथ खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री जयकुमार रावल यांनी अनेकदा या योजना सुरू करण्याचे आश्वासन दिले. गेल्या महिन्यात सातपुडा सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाच्या कार्यक्रमात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी १५ दिवसांत उपसा सिंचन योजनांच्या दुरूस्तीला सुरुवात केली जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र आता निविदांचे कारण सांगून प्रश्न रेंगाळत ठेवण्यात आला आहे, असेही सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यातील समस्यांचे काय?

जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी मिळालेली नाही. कापसाला भाव नाही तसेच बोंडअळीमुळे कापसाचे नुकसान होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तापीचे पाणी सरळ गुजरातमध्ये वाहून जाते. उकाई धरणाचे बॅकवॉटर पाहण्यासाठी मंत्री दरवर्षी या भागात सहल काढतात. प्रकाशा-सारंगखेडा बॅरेजमध्ये पाणी साचले असून, प्रकाशा बॅरेजला गळती लागल्यामुळे पाणी वाहून जात आहे, यासारख्या विविध समस्या कायम आहेत. त्यामुळे याबाबत लक्ष केव्हा देणार असा सवालही संघटनेने उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्थानासाठी बॅरेजेस बांधण्यात आले; परंतु बंद पडलेल्या उपसा सिंचन योजना सुरू करण्यासाठी कुठल्याही मंत्र्यांना वेळ नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जर नंदुरबार जिल्ह्यात आले तर त्यांना काळे झेंडे दाखवू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष घनश्याम चौधरी व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जागा गैरवापरावर वस्तुनिष्ठ अहवाल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील ३३ समावेशक आरक्षणाच्या जागेचा गैरवापर करण्याच्या प्रकारासंदर्भात गुरुवारी (दि. ७) शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आयुक्त अभिषेक कृष्णा यांची भेट घेऊन या प्रकरणात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.

आयुक्तांनी यावेळी तातडीने नगररचना विभागातील अधिकाऱ्यांना बोलवून समावेशक आरक्षणासंदर्भात वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. तसेच समावेशक आरक्षणासंदर्भात कुणी गैरप्रकार केल्याचे आढळून आल्यास संबंधितांची बांधकाम परवानगी रद्द करण्यात येतील, असे आश्वासनही दिले. शहरातील ३३ समावेशक आरक्षण जागेच्या गैर वापरासंदर्भातील घोटाळा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी उघडकीस आणला होता. पहिल्या विकास आराखड्यामध्ये सुमारे ३३ समावेशक आरक्षणे पार्किंगसाठी विकसित करण्याचा निर्णय घेतला. संबंधित जागा मालकांपैकी मोजक्याच जागा मालकांनी पार्किंगची उभारणी केली. तर काही जागा मालकांनी त्या जागेवर टोलेजंग इमारती उभ्या केल्या. ज्यांनी पार्किंग उभारली त्यांनीही महापालिकेकडे जागा हस्तांतरित केल्या नाहीत. त्यामुळे संबंधितावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गुरुवारी (दि. ७) आयुक्त कृष्णा यांची भेट घेतली.

या जागांच्या गैर वापराचे पुरावे त्यांनी यावेळी आयुक्तांकडे सादर केले. त्यावर आयुक्त कृष्णा यांनी नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून वस्तुस्थिती जाणून घेतली. या वेळी श्याम साबळे, संतोष गायकवाड, भागवत आरोटे, दिलीप दातीर, प्रशांत दिवे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिझेलची पाइपलाइन फोडली

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, निफाड

भारत पेट्रोल‌िअमची मुंबई ते मनमाड डिझेल वाहून नेणारी पाइपलाइन बुधवारी रात्री तारुखेडले (ता. निफाड) शिवारात अज्ञातांनी फोडली. यामुळे लाखो लिटर डिझेल आजूबाजूच्या शेतात आणि जवळून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पात्रात मिसळले आहे. घटनास्थळी पेट्रोल‌िअमच्या कर्मचाऱ्यांकडून पाइपलाइन पूर्ववत करण्याचे काम सुरू असून, या ठिकाणी पोल‌सि बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भारत पेट्रोल‌िअमचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, पाइपलाइन फोडण्यात आली त्या ठिकाणी पुढील उपाययोजना सुरू आहेत.

ड्रील मशिनने पाडले छिद्र

गुरुवारी सकाळी ९ वाजता भारत पेट्रोल‌िअमच्या कर्मचाऱ्यांनी डिझेल लिकेजचा स्पॉट शोधायला सुरुवात केली. सापडलेल्या खड्ड्यात दहा फुटापर्यंत लिकेज शोधण्याचा प्रयत्न झाला. सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान पाइपलाइनला ड्रील मशिनने दीड ते दोन इंचाचे छिद्र केलेले सापडले.

येथून जाते डिझेल पाइपलाइन

मुंबई येथून मनमाड येथील पानेवाडी शिवारातील भारत पेट्रोल‌िअमच्या डिझेल डेपोत पाइपलाइनने डिझेल आणले जाते. ही पाइपलाइन जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, येवला तालुक्यातील काही गावांच्या शिवारातून जाते. निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर, तारुखेडले, खानगाव थडी या गावातील शेतशिवारातून ही पाइपलाइन गेली आहे.

व्हॉल्व्हच्या प्रेशरमुळे

घटना उघडकीस

खाणगाव थडी शिवारातील गट नं. २५४ मध्ये बुधवारी रात्री भारत पेट्रोलिअमची पाइपलाइन फोडण्यात आली. धारणगाव आणि म्हाळसाकोरे येथील वॉल्व्ह प्रेशर देत नसल्याचे लक्षात आल्यावर भारत पेट्रोल‌िअमच्या अधिकाऱ्यांनी शोध घेतला, तेव्हा खाणगाव थडीच्या गायरान जमिनीत डिझेल मोठ्या प्रमाणात झिरपल्याचे लक्षात आले.

सहा फुट खड्ड्यात डिझेल

घटना स्थळावर एक मोठा खड्डा केलेला आहे. त्या खड्ड्याजवळ पाच ते सहा मातीच्या गोण्या आहेत. शोध घेताना एक मजूर खड्ड्यात उतरला तेव्हा ६ ते ७ फुटांपर्यंत डिझेल भरलेले दिसले. ही पाइपलाइन किमान १० फूट खोल आहे. ही पाइपलाइन ड्रिल मश‌निच्या फोडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हे काम माहितगार असणाऱ्याचेच असल्याची शक्यता वर्तव‌लिी जात आहे.

टँकरमध्ये भरले डिझेल

या ठिकाणी एक किलोमीटर परिसरात डिझेलचा उग्र वास येत होता. सकाळी अधिकारी आल्यानंतर सर्वप्रथम जमिनीत पाच ठिकाणी चर खोदले. या जमिनीत इतके डिझेल जिरले होते की काही क्षणात ते चर भरले. तोपर्यंत मनमाड येथून टँकर आल्यानंतर पाइप लावून ते डिझेल टँकरमध्ये भरून मनमाडला पाठवण्यात आले.

जिल्ह्यातील तिसरी घटना

ही पाइपलाइन फुटली नसून, ती अत्यंत चाणाक्ष पद्धतीने फोडली असल्याचा निष्कर्ष घटनास्थळावसरील सर्व प्रकारावरून काढण्यात येत आहे. यामध्ये असणारी डिझेल माफियांची साखळी शोधण्याचे आव्हान भारत पेट्रोल‌िअमचे अधिकारी आणि पोल‌सि यंत्रणेसमोर आहे. यापूर्वीही अंकाई (ता येवला) व सिन्नर तालुक्यात या पाइपलाइनमधून डिझेलची गळती झाली आहे. ही तिसरी घटना आहे.

पानेवाडीतून पुरवठा बंद

या गळतीमुळे मनमाडजवळील पानेवाडी येथून टॅकरद्वारे भरून दिला जाणारा इंधनपुरवठा रात्रीपासून बंद करण्यात आला आहे. या प्रकल्पातून दररोज ७०० टँकरने राज्यातील विविध भागात इंधनपुरवठा केला जात होता. त्यामुळे राज्यातील बहुतांश भागातील इंधनपुरवठा पाइपलाइन दुरुस्ती होईपर्यंत विस्कळीत होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यावेळी पेट्रोलिअम कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी माध्यमांशी बोलणे टाळले. या डिझेल गळतीमुळे परिसरातील विहिरींबरोबर नदीचे पाणीही प्रदूषित झाले आहे. शासनाने यात लक्ष घालून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images