Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

अकरा जणांना जन्मठेपेची शिक्षा

$
0
0

भूतबाधेच्या संशयातून झाला होता दोन महिलांचा खून

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भूतबाधा झाल्याच्या संशयावरून दोन महिलांना पायाखाली तुडवून ठार मारल्याप्रकरणी नाशिक जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एम. नंदेश्वर यांनी मृत महिलेची दोन मुले आणि भगत महिलेसह ११ जणांना मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये जन्मठेपेची शिक्षा होण्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे. २०१४ मध्ये ही संतापजनक घटना घडली होती.

इगतपुरी तालुक्यातील घोटी पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये टाकेहर्ष गाव आहे. ३० डिसेंबर २०१४ रोजी या गावात बुधीबाई पुनाजी दोरे, तसेच तिची बहीण अंबाई (ता. त्र्यंबकेश्वर) येथील काशीबाई भ‌िका वीर या दोघींना भूतबाधा झाली आहे असे समजून भगत महिला बच्चीबाई नारायण खडके आणि दहा जणांनी काठीने बेदम मारहाण केली होती, तसेच पायाखाली तुडवून त्यांना ठार मारण्यात आले. बुधीबाई यांची मुलगी आणि या प्रकरणातील तक्रारदार राहीबाई हिरामण पिंगळे (रा. दांडवळ, ता. मोखाडा, जि. ठाणे) यांनाही भूतबाधेच्या संशयावरून ठार मारण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी घोटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तत्कालीन पोलिस उपअधीक्षक सी. एस. देवराज यांनी या गुन्ह्यात संशयित ११ आरोपींविरोधात सबळ पुरावे गोळा केले. या प्रकरणातील संशयित बच्चीबाई खडके, हरी बुधा निरगुडे, लक्ष्मण बुधा निरगुडे, नारायण भिवा खडके, वामन हनुमंता निरगुडे, किसन बुधा निरगुडे (सर्व रा. टाकेहर्ष, ता. इगतपुरी) गोविंदा पुनाज‌ी दोरे, काशीनाथ पुणाजी दोरे, महादू कृष्णा वीर, बुगीबाई महादू वीर, सतीबाई बुधा निरगुडे (सर्व रा. दांडवळ व वाघ्याची वाडी, ता. मोखाडा, जि. ठाणे) यांच्या विरोधात पोलिस निरीक्षक मनोहर पाटील यांनी कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते. बच्चीबाई खडके हिच्यासह सर्व आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश नंदेश्वर यांनी मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अजय मिसर, सहाय्यक सरकारी वकील पौर्णिमा नाईक व दीपशिखा भिडे यांन‌ी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सांस्कृतिक बदलांबाबत परिषद

$
0
0

धुळ्यात २२ व २३ डिसेंबरला आयोजन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

धुळ्यातील का. स. वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्था आणि मेन अगेन्स्ट व्हॉयलन्स अँड अॅब्यूज (मावा), मुंबई यांच्या विद्यमाने ‘सांस्कृतिक बदल आणि नवे पुरुषभान’ या विषयावर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद धुळे येथे २२ व २३ डिसेंबरला का. स. वाणी संस्थेच्या प्रा. रघुनाथ केले सभागृहात होणार आहे.

परिषदेत मराठी साहित्याचे अभ्यासक, स्त्रीवादी कार्यकर्ते, सामाजिक शास्त्र आणि माध्यमांचे अभ्यासक, पुरोगामी कार्यकर्ते, साहित्यिक, पत्रकार, माध्यमकर्मी, कलावंत सहभाग घेऊ शकणार आहेत, अशी माहिती आयोजकांनी ‌दिली आहे. या विचारमंथनात कॉलेजियन विद्यार्थी, तरुणतरुणी व प्राध्यापकांना सहभागी करून घेण्याची सुवर्ण संधी लाभणार आहे. अधिक माहितीसाठी रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ (९८३३३४६५३४) आणि वंदना महाजन (९४२१५६८३४५) या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सामाजिक उत्क्रांतीच्या प्रक्रियेत विविध टप्प्यांवर पुरुषसत्ता नाकारणारा ‘नवा पुरुष’ कसा निर्माण झाला याचा शोध घेणे, अशा नव्या पुरुषाच्या निर्मितीच्या विरोधात कोणत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक शक्ती कार्यरत आहेत, याचा समाजशास्त्रीय शोध घेणे, नव्या पुरुषांच्या संदर्भात माध्यमांची समीक्षा करणे, नव्या पुरुषासाठी धडपडणारे समूह व तरुण यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्याशी संवाद करणे, असा या परिषदेचा उद्देश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक ठरणार रोलमॉडेल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे जैव वैद्यकीय कचरा (बायोमेडिकल वेस्ट) व्यवस्थापन पथदर्शी जिल्हा म्हणून नाशिकला शुक्रवारी (दि. ८) संपूर्ण राज्यात प्रोजेक्ट केले जाणार आहे. त्यासाठी हॉटेल एक्स्प्रेस इनमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कार्यक्रमाचे आयोजन केले असून यात पर्यावरण मंत्री रामदास कदम, पालकमंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत व पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे हे उपस्थित राहणार आहेत.

हॉस्पिटल्स, औषध दुकाने आणि प्रयोगशाळेतून निर्माण होणाऱ्या ‘बायोमेडिकल वेस्ट’ची विल्हेवाट लावणारा हा प्रोजेक्ट संपूर्ण राज्यासाठी महत्त्वाचा आहे. गेल्या दोन वर्षांपासून या प्रोजेक्टवर नाशिक शहरात काम सुरू असून त्यासाठी १३ हॉस्पिटलची निवड करण्यात आली आहे. पहिले त्यासाठी प्रशिक्षण दिल्यानंतर आता या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी वॉटरग्रेस कंपनी काम करत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, ग्लोबल इनव्हायरमेंट फॅसिलिटी, युनिडो, केंद्रीय पर्यावरण व वने वातावरणीय बदल मंत्रालय यांच्यातर्फे ‘बायोमेडिकल वेस्ट’चे पर्यावरणदृष्ट्या सुयोग्य व्यवस्थापन प्रकल्पातंर्गत मॅनेजमेटेंचे हे मॉडेल तयार करण्यात आले आहे.

कार्यक्रमात या मॉडेलवर दिवसभर चर्चा करून त्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यात ऑस्ट्रेलिया येथील युनिडो मुख्यालयाचे प्रकल्प व्यवस्थापक एर्लिन्डा गॅलवन, केंद्रीय पर्यावरण विभागाचे संचालक मनोजकुमार गांगेरा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष मिलिंद म्हैसकर, पर्यवरण अतिरिक्त सचिव सतीश गवई, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीपकुमार व्यास, आरोग्य विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार, प्रदूषण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अनबलगन, युनिडोचे प्रादेशिक समन्वयक डॉ. शक्ती प्रसाद धुआ हे उपस्थित राहणार आहे. याचे संयोजन प्रदूषण मंडळाचे प्रधान वैद्यकीय अधिकारी डॉ. अमर सुमाते करणार आहे. सकाळी साडेनऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा कार्यक्रम असणार आहे. या कार्यक्रमाला सर्व हॉस्पिटलच्या प्रतिनिधींनी उपस्थित रहावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी आर. यू. पाटील, उपप्रादेशिक अधिकारी अ. ज. कुडे, युनिडोचे राज्य प्रकल्प अधिकारी डॉ. सूरज भांगे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गैरवर्तन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना आवरा!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतील सत्तारूढ भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून अधिकाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या हीन वागणुकीबाबत पश्चिम प्रभाग समिती सभापती डॉ. हेमलता पाटील यांनी महापौरांना आरसा दाखवला आहे.

पदाधिकाऱ्यांच्या असभ्य वर्तनामुळे अधिकाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचे प्रमाण वाढले आहे. पदाधिकाऱ्यांची हीच तऱ्हा कायम राहिल्यास आगामी काळात महापालिकेचे कामकाज करणे कठीण होईल, अशी भीती व्यक्त करत गैरवर्तन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना आवरा, अशी मागणी डॉ. पाटील यांनी केली आहे.

पालिकेतील स्वेच्छानिवृत्तीच्या अर्जावरून डॉ. पाटील यांनी महापौर रंजना भानसी यांना उद्देशून पत्र लिहिले आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे महापालिकेच्या कामकाजात अडचणी जाणवू लागल्या आहेत. त्याला सर्वस्वी पदाधिकाऱ्यांचा जाच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सन २०१६ व २०१७ या दोन वर्षांत तब्बल ११ अधिकाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेत महापालिकेपासून स्वत:ची सुटका करवून घेतली आहे. पालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळलेले अधिकारी महापालिकेत काम करण्यास इच्छूक नाहीत. त्यात भरीसभर म्हणून विविध विषयसमित्या स्थापन करून त्यांचा ताबा सभापती, उपसभापतींना देण्यात आला. या विषय समित्यांच्या बैठकांमध्ये अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रकारही होत आहे. काय काम करावे, कुणाचे ऐकावे, लक्षात येत नसल्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. महासभेवर एकापाठोपाठ एक स्वेच्छानिवृत्तीचे अर्ज येत असताना संबंधित अधिकाऱ्यांना थांबविण्याचे कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. अधिकारी स्वेच्छानिवृत्ती का घेत आहेत, याचे कारण समजून घेण्यात सत्ताधाऱ्यांना रस नाही, असा आरोपही डॉ. पाटील यांनी या पत्राद्वारे केला आहे. अधिकाऱ्यांमधील अस्वस्थता कमी करून पालिकेच्या कामकाजाला गती देण्यासाठी अधिकाऱ्यांशी गैरवर्तणूक करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना आचारसंहिता घालण्याची गरज आहे, असा चिमटाही डॉ. पाटील यांनी काढला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंतर्गत रस्त्याची अखेर दुरुस्ती सुरू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या भूमिगत गटाराच्या कामांमुळे रस्त्यांची चांगलीच दैना झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांसह वाहनधारकांमधून मागणी होत असताना कॅन्टोन्मेंट प्रशासनाने संबंधित कंत्राटदारास सांगून रस्ते दुरुस्ती कामास प्रारंभ केला आहे. याबाबत 'मटा'ने वृत्त प्रसिद्ध केले होते, त्यानंतर प्रशासनाने तातडीने याबाबत काम सुरू करून नागरिकांच्या अडचणी दूर केल्या आहेत.

देवळालीसह परिसरात सुमारे १५० कोटी रुपये भूमिगत गटार योजनेच्या पहिल्या टप्प्यातील भूमिगत पाईप टाकण्याचे काम शहरात जवळजवळ पूर्ण झाले असून, पाईप टाकतेवेळी खणण्यात आल्यामुळे रस्त्याच्या मधोमध खड्डे निर्माण होऊन रस्त्यांची पार दुर्दशा झाली होती. त्यात मंगळवारी (दि. ५) झालेल्या पावसाने चिखलाची भर पडली होती. त्यामुळे अंतर्गत रस्त्यांवरून ये-जा करणे जिकरीचे झाल्याने नागरिक येथील नगरसेवकांकडे सातत्याने याबाबत तक्रारी करत होते. त्यानुसार नगरसेवकांनी बोर्डाच्या बैठकीत याबाबत हरकती नोंदवत रस्त्यांची कामे सुरू करण्याबाबत सुचविले होते.

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या बोर्डाच्या वतीने संबंधित कंत्राटदारास याबाबत सांगून त्वरित रस्ते सुरळीत करण्याचे सुचविले होते. त्यानुसार रस्त्यावर खणलेल्या जागी पुन्हा उकरून त्यामध्ये दगड व खडीसह सोलींग करून रस्ता वापरण्यायोग्य करण्याचे काम हौसन रोडसह अंतर्गत भागात सुरू झाले आहे. यामुळे वाहनधारकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सोलींगचे काम लवकरात लवकर पूर्ण करून डांबरीकरण करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. याबाबत बोर्ड प्रशासनाने सध्या हिवाळा सुरू असल्याने या काळात डांबरीकरणाची कामे केल्यास रस्ते पक्के होतील, असे जाणकारांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकरोडवर अंडरपास नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मृत्यूचा सापळा बनत चाललेल्या त्र्यंबकरोडवरील अपघातप्रवण क्षेत्रावर अंडरपास रस्ता बनविणे ‘साइट कंडीशन’नुसार योग्य नसल्याचे स्पष्ट मत डिझाइन डिव्हीजनने दिले आहे. त्यामुळे या अपघातप्रवण ठिकाणी अंडरपास बनविणे शक्य नसल्याचा खुलासा ‘आपलं सरकार’ या वेब पोर्टलवर दाखल एका तक्रारीच्या उत्तरादाखल जिल्हाधिकारी कार्यालय आणि पीडबल्यूडी विभागाकडून करण्यात आला आहे.

गेल्या १३ नोव्हेंबर रोजी येथील संदीप विद्यापीठासमोर झालेल्या एका रस्ता अपघातात कॉलेजच्या विद्यार्थिनीस प्राण गमवावे लागले होते. याशिवाय येथे आजवर अनेक अपघात झाले आहेत. पैकी एकूण मृतांमध्ये विद्यार्थ्यांचा अधिक समावेश आहे, अशा आशयाच्या संदर्भाने एका नागरिकाने पोर्टलवर ही तक्रार दाखल केली होती.

योगायोगाची बाब म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय आणि पीडब्ल्यूडीने या तक्रारीवर खुलासा करण्याच्या दिवशी म्हणजे सोमवारी मध्यरात्री संदीप विद्यापीठासमोर पुन्हा अपघात होऊन एका विद्यार्थ्याला प्राण गमवावे लागले. या रस्त्यावर संदीप विद्यापीठासह, सपकाळ नॉलेज हब, ब्रह्मा व्हॅली, विद्यामंदिर आदी शिक्षणसंस्था आहेत. शिवाय त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र असल्याने या मार्गावर भाविकांची जास्त वर्दळ असते. देशभरातून मोठ्या प्रमाणावर खासगी छोटी आणि ट्रॅव्हेल्स कंपन्यांची वाहने दर मिन‌िटाला शेकडोंच्या संख्येने ये-जा करतात. आजवर येथे झालेल्या अपघातांमध्ये १० ते १२ जणांना प्राणास मुकावे लागले आहे. यामध्ये सहा विद्यार्थ्यांसह एका बालकाचाही समावेश आहे.

फलकांवरच भिस्त

विशेष बाब म्हणजे या ठिकाणी अंडरपाससाठी सुमारे तीन कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. मात्र, यानंतर साइट कंडीशननुसार या ठिकाणी अंडरपास करणे योग्य ठरणार नसल्याच्या शेऱ्यामुळे येथे केवळ ‘झेब्रा क्रॉसिंग’ आणि ‘वाहने सावकाश चालवा’ असा संदेश देणाऱ्या पाट्यांवरच वाहनचालकांकडून वेग कमी करण्याची अपेक्षा केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदा परिक्रमा रविवारपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकची गोदावरी नदी ही दक्षिण गंगा म्हणून सुपरिचित आहे. आपल्या शहराला तिची साथ अवघी दहा किलोमीटरची लाभते. मात्र, या दहा किलोमीटरमध्ये आपली गोदा कशी आहे, हे पाहणे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्यच आहे. ज्या नदीवर आपले जीवन अवलंबून आहे. तिला आपण नेहमी भेटायला हवे. तिच्याशी संवाद साधायला हवा. तिला समजून घेण्यासाठी १० डिसेंबरपासून गोदा परिक्रमा हा उपक्रम सुरू होत आहे. गोदा परिक्रमा दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी सकाळी ७ वाजता रामकुंडाशेजारील अहिल्यादेवी महादेव मंदिरापासून सुरू होईल. ही परिक्रमा नदीच्या काठाकाठाने तपोवनापर्यंत पोहचेल. तपोवनातील गोदा-कप‌िला संगमावरील पूल ओलांडून पुन्हा नदीच्या काठाने देवमामलेदार यशवंत महाराजांच्या मंदिरापासून व्हिक्टोरिया पुलाखालून रामवाडीच्या पुलावरून पुन्हा गोदा ओलांडेल व गोदापार्कमधून पुन्हा रामकुंडावराशेजारील अहिल्यादेवी मंदिराजवळ पोहचेल. हा प्रवास साधारण तीन तासांचा आहे. यातून आपली नदी कशी आहे, तिला कशाची गरज आहे, त्यासाठी आपण काय करत आहोत, नदीकाठचा वारसा कसा आहे, नाशिकचा इतिहास अन् गोदावरीचे महत्त्व काय आहे हे जाणून घेण्यासाठी परिक्रमेदरम्यान गप्पाटप्पा रंगणार आहेत. आत्मभान जागविणारा हा एक शोध आहे गोदावरी नदीचा. सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी शिल्पा डहाके (गोदावरी नदी अभ्यासक) यांच्याशी ७०८७१९०७३८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्याच्या निकृष्टतेबाबत आयुक्तांना निवेदन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील पवननगर, स्वामी नारायण कॉलनी आणि रामचंद्रनगर परिसरात महापालिकेतर्फे रस्ता डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याची रहिवाशांनी तक्रार केली आहे.

यासोबतच संबंधित ठेकेदारास विचारणा करण्यास गेलेल्या रहिवाशांसोबत त्याने अरेरावीची भाषा करण्याचा प्रकार घडला. याबाबत परिसरातील नागरिकांनी महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांना निवेदन दिले आहे. धुळे महापालिकेतर्फे शहरात काही ठिकाणी रस्त्याची कामे सुरू करण्यात आली असून, त्याबाबत भरपूर तक्रारी आहेत. हे काम निकृष्ट दर्जाचे आहे, रस्त्याच्या निर्धारित रुंदीपेक्षा कमी रुंदीचा रस्ता तयार केला जात आहे, अशा तक्रारी नागरिकांनी दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. तरीही हे निकृष्ट रस्त्याचे काम वेगात सुरू असून, ठेकेदार नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करीत आहे, असे आयुक्त सुधाकर देशमुख यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सकाळी वधारला, दुपारी घसरला

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, निफाड

ओखी चक्रीवादळाचा फटका लाल कांद्याला बसला आहे. लासलगाव बाजार समितीत मंगळवारी आणि बुधवारी दुपारपर्यंत आवक मंदावली. आवक मंदावल्यामुळे बुधवारी सकाळच्या सत्रात कांद्याच्या भावात वाढ झाली. मात्र बाजार समितीत कांद्याची आवक वाढताच तब्बल ७०० रुपयांनी घसरण झाली.

कांद्याचे निर्यात मूल्य ८५० डॉलरने वाढवल्याने मागील आठवड्यात कांद्याच्या सरासरी भावात क्विंटलमागे १३०० रुपयांची घसरण झाली होती. घसरण लक्षात घेऊन भाव आणखी कोसळतात की काय, या भीतीने शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी मोठी गर्दी केली. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ हवामान आणि गुरुवारी झालेल्या पावसामुळे कांद्याची आवक कमी झाली. त्यातच लाल कांद्याला मागणी असल्यामुळे भाव वाढले. मात्र भाव वाढताच कांद्याची आवकही वाढणार. त्यामुळे येत्या काही दिवसात बाजारभाव खाली येतील असे बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी सांगितले.

बुधवारी लासलगाव बाजार समितीत सकाळच्या सत्रात लाल कांद्याची ४७५ वाहनांची आवक झाली होती. त्याला जास्तीजास्त ४०१२ रुपये, सरासरी ३५५१ रुपये तर कमीतकमी दोन हजार रुपये प्रति क्विंटल असउ भाव मिळाला. मात्र बुधवारी दुपारनंतर कांद्याच्या आवकेत अचानक वाढ होण्यास सुरुवात झाल्याने

काही तासांतच कांद्याचे दर चार हजारांपरून ३३०० रुपयांपर्यंत खाली आहे. काही तासांतरच तब्बल ७०० रुपयांची घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. बुधवारी लासलगावात एकूण १४५० वाहनातून कांद्याची आवक झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हलक्या सरींतही विजेने टाकली मान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्याच्या काही भागात मंग‍ळवारी झालेल्या पावसाने शहरातील वीज पुरवठा खंड‌ित झाला. यामुळे शहर परिसरात असलेले महावितरणचे ११ केव्हीचे १८ फीडर बंद पडले. सकाळपासून खंड‌ित झालेला वीज प्रवाह रात्री उश‌िरापर्यंत पूर्ववत करण्याचे काम महावितरणचे कर्मचारी करीत होते.

या पावसामुळे म्हसरूळ परिसरातील एकता नगर परिसराचा वीज प्रवाह खंड‌ित झाला. मात्र, तो काही वेळातच पूर्ववत करण्यात महावितरणला यश आले. त्यानंतर मीनाताई ठाकरे क्रीडा संकुलाच्या परिसरात वीज गेली. वीज प्रवाह खंड‌ित होण्याचा प्रकार संध्याकाळपर्यंत सुरू होता. आरटीओ, अंबड, गंगापूररोड येथील सहदेवनगर, विशाल पॉइंट, विद्याविकास सर्कल, महादेव पॉइंट या परिसरात वीज गेली होती. शरीन ऑटो, महिंद्रा अँड महिंद्रा, सीपी टूल्स, गरवारे या कंपन्यांना देखील खंड‌ित वीजप्रवाहाची झळ पोहचली. त्याचप्रमाणे टाकळी उपकेंद्रात बिघाड झाल्याने या परिसरातही वीज जाण्याचे प्रकार सुरू होते. गंगापूर रोड फीडरवरुन होणारा प्रवाहदेखील खंड‌ित झाल्याचा फटका कुलकर्णी कॉलनी, अशोकस्तंभ, एसटी कॉलनी, कृषीनगर, पाटील कॉलनी, पी अँड टी कॉलनी, उदोजी मराठा वसत‌िगृह या परिसराला बसला. नाशिक शहर विभाग २ मध्येही मोठ्या प्रमाणात वीज प्रवाह खंड‌ित झाला होता. ११ केव्हीचे ९ फिडर बंद पडले. पंचक मोटवानी, सायट्र‌िक, दुर्गा मंदिर, पॉलिटेक्निक, सिन्नर फाटा या परिसरात दुपारपासून वीज प्रवाह खंड‌ित झाला होता. उपनगर उपकेंद्रातून जाणारा समता नगर, इच्छामणी मंदिर या ठिकाणी वीज गेली होती. मुक्त‌िधाम परिसरातील आर्टिलरी सेंटर परिसर, देवळाली गाव, लामरोड या भागातदेखील वीज प्रवाह खंडित झाला होता. टाकळी मुंबई आग्रा रोड, शिवाजी वाडी, भारतनगर, राजीवनगर, मखमलाबाद, बोरगड, धागूर, सारूळ, विल्होळी, राजूर, बेळगाव ढगा, संदीप फाऊंडेशन, देवळाली कॅम्प, सदर बाजार या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत वीज प्रवाह सुरळीत करण्याचे काम सुरू होते.

भूमिगत तारांमध्ये पाणी

महावितरणशी संपर्क साधला असता पावसामुळे भूमिगत वायरींमध्ये पाणी शिरल्याने वीजपुरवठा खंडित होत असून, काही ठिकाणी ओव्हरहेड वायर्समध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ट्रान्सफॉर्मर जळण्याचे प्रकारात वाढ झाल्याचे, सांगण्यात आले. महावितरणच्या कॉल सेंटरमध्ये तक्रार दाखल केली असता काम सुरू आहे, थोड्याच वेळात वीज येईल असे उत्तर दिले जात होते.


ग्राहकांचीच उलट तपासणी

घरातील वीज गेल्यानंतर कॉल सेंटरला फोन केल्यास ग्राहकांची उलट तपासणी करण्यात येते. काही तक्रार निवारण केंद्रावर समक्ष गेल्यास तुम्ही फोनवर तक्रार करा. आम्हाला तेथून तुमची तक्रार येईल तेव्हा आम्ही दुरुस्तीसाठी येऊ असे सांगण्यात येते. तसेच अनेक वेळा अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारुन नेण्याचे प्रकार करीत आहे. कॉलेजरोड परिसरात रोजच वीज जाण्याचे प्रकार घडत आहेत. याबाबत अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तुमचेच काम करतो आहे, असे सांग‌ितले जाते. काहींना वरिष्ठांचे नाव सांगितल्यास ‘तुम्हाला काय करायचे ते करून घ्या’ असेही ग्राहकांना सुनावले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्ताला सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भटक्या कुत्र्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे शहरात फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. मंगळवारी (दि. ५) दुपारच्या सुमारास स्थानिक लोकांच्या मदतीने शरणपूर परिसरातील अनेक कुत्रे नायलॉन नेटच्या सहाय्याने पकडून रेस्क्यू व्हॅनमध्ये टाकून श्वान निर्बिजीकरण केंद्रात नेण्यात आले.

शरणपूर रोडवर मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हीच कुत्री परिसरातील नागरिकांवर प्रसंगी हल्ला करतात. शहरामध्ये फूटपाथवर, मंदिराच्या आवारात रस्त्यावर बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये, बस स्टेशन, रेल्वे स्टेशन यासारख्या ठिकाणी मोकाट कुत्र्यांनी आपले बस्तान बसवले आहे. रस्त्यावर ठाण मांडून बसणाऱ्या या कुत्र्यांमुळे छोटे-मोठे अपघात घडत असतात. लहान मुलांवर हल्ले वाढत आहे, शहरात घाणीचे प्रमाण वाढत आहे. यामुळे आजारांचे प्रमाणदेखील वाढत आहे. या सगळ्याला कोठेतरी आळा बसावा यासाठी महापालिकेने मोकाट कुत्रे पकडून त्यांचे निर्बिजीकरण करून त्यांना काही दिवस आरोग्य विभागाच्या कोंडवाड्यात ठेवून त्यांना पुन्हा तेथेच आणून सोडले जाते. पशुवैद्यकीय विभागाचे सॅनिटरी इन्स्पेक्टर डॉ. भरत बर्वे यांच्या उपस्थितीत ही श्वान पकडण्याची मोहीम पार पाडली जात आहे.

महापालिकेच्या या मोहिमेमुळे परिसरातील नागरिकांना मोकळा श्वास घेता येणार आहे. याबाबत आता कायमस्वरूपी उपाययोजना करावी, जेणेकरून मोकाट कुत्र्यांचा त्रास दूर होईल.

- स्वप्नील नेरकर,

स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापरिनिर्वाण दिनाचा भाजपला विसर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१ व्या महापरिनिर्वाणदिनाचा नाशिक महापालिकेला चक्क विसर पडला आहे. प्रथेप्रमाणे पालिका मुख्यालयात सकाळी अकरा वाजता प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यास भाजपेयी विसरले. नाशिक शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, मनपा गटनेते गजानन शेलार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या मुख्य कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची रांगोळी काढत अभिवादन केले. या प्रथा खंड‌ित करणाऱ्या भाजपचा यावेळी निषेध करण्यात आला.

यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त तारांगण येथे पुष्पहार अर्पण करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी गेले असता पुतळ्याभोवती अस्वच्छता आढळली होती. तसेच बुधवारच्या महापरिनिर्वाण दिनाचा नाशिक महापालिकेला विसर पडल्याचे दिसून आले. ६१ व्या महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम हा नाशिक महापालिकेच्या मुख्य कार्यालयात घेण्यातच आला नाही. आंबेडकर यांच्या शिवाजी मार्ग येथील पुतळ्यावर रात्री बारा वाजता अभिवादन करण्यात येत असले तरी महापालिकेच्या मुख्य कार्यालयात सकाळी ११ वाजता दरवर्षी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येत असतो. पण महापालिकेवर सत्ता असलेल्या सत्ताधाऱ्यांनी या प्रथेचे खंडण केले आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या या कृतीचा राष्ट्रवादीने निषेध केला असून, महापालिकेत कार्यक्रम घेऊन बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इगतपुरीत प्रचाराला गती

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक यंदा खूपच चुरशीची होत आहे. राजकीय पक्षांची वास्तविक स्थिती पाहता राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेने या निवडणुकीत उमेदवार दिले नसले, तरीही नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी अटीतटीची लढत रंगली आहे. या निवडणुकीत नगराध्यक्षपद हे खुल्या प्रवर्गासाठी असल्याने सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. नगराध्यक्षपदाचे सर्वच उमेदवार मोठ्या ताकदीने कामाला लागले आहेत. ‘अभी नही तो कभी नही’, याप्रमाणे सर्वांनीच प्रचारात गती घेतली आहे.

निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आल्याने रंगत वाढली आहे.

प्रचाराला अवघे दोनच दिवस उरल्याने प्रचारात उमेदवारांसाठी विविध क्लूप्त्या वापरल्या जात आहेत. काही उमेदवारांकडून जादूचे प्रयोग करून आपला उमेदवार कसा सरस आहे हे दाखविले जात आहे. तर बऱ्याच उमेदवारांकडून शाहिरांच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित केले जात आहे. या निवडणुकीत नगराध्यक्षपद हे खुल्या प्रवर्गासाठी आहे. त्यामुळे उभ्या असलेल्या उमेदवारांपैकी सर्वांनाच आपणच बाजी मारणार, असे वाटत आहे. त्यादृष्टीने सगळ्यांनीच डावपेच आखले आहेत.

उमेदवारांची दमछाक

शहराची भौगोलिक रचना, वाढीव हद्द, घाटनदेवी परिसरातील काही खेड्यांचा समावेश यामुळे उमेदवार व राजकीय पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. प्रचाराच्या प्रारंभीपासूनच राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी व अपक्ष उमेदवारांनी थेट मतदार प्रत्यक्ष भेटीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे प्रभागनिहाय रॅली काढणे, बैठका घेणे अशा पद्धतीने प्रचार सुरू आहे. त्यामुळे उमेदवारांना वेळही कमी पडू लागला आहे

अंदाज बांधण्यात विश्लेषक गुंग

इगतपुरी त्र्यंबकेश्वर निवडणुकीबरोबरच गुजरातच्या विधानसभा निवडणुकीचीही रणधूमाळी सुरू असल्याने इगतपुरी शहरात आपल्या नगरीबरोबरच गुजरात निवडनुकीवरही चर्चा, संवाद होत आहेत. गुजरातच्या निवडणुकीचे आखाडे, अंदाज बांधत असतानाच इगतपुरी नगरपालिकेत कोण किंगमेकर ठरणार, कुणाच्या गळ्यात विजयांची माळ पडणार? नगरसेवक म्हणून नगरपालिकेत कुणाकुणाचा शिरकाव होणार? याबाबतही अंदाज बांधले जात आहेत. त्यामुळे गुजरात विधानसभा व इगतपुरी नगरपालिका निवडणुकांवरच शहरासह तालुक्यात राजकीय चर्चा घडत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तालयात काम बंद

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

माजी आमदार संजय चव्हाण यांनी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या कार्यालयातील उपसंचालक जागृती कुमरे यांना दमबाजी करत शासकीय कामात अडथळा आणल्याच्या प्रकाराचे पडसाद बुधवारी आदिवासी आयुक्तालयात उमटले. आदिवासी विकास विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बुधवारी कामबंद आंदोलन करीत या घटनेचा निषेध केला. तसेच चव्हाण यांच्यावर कारवाईची मागणी केली.

माजी आमदार तथा विद्यमान आमदार दीपिका चव्हाण यांचे पती संजय चव्हाण यांनी माहितीच्या अधिकारामध्ये मागविलेल्या माहितीबाबत समितीच्या कार्यालयात मंगळवारी गोंधळ घातला. यावेळी चव्हाण यांनी हुज्जत घालत शिवीगाळ करून दमबाजी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप उपसंचालक कुमरे यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी चव्हाण यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये कारवाई करण्याची फिर्याद मुंबईनाका पोलीस ठाण्यात दिली. या घटनेचे पडसाद बुधवारी उमटले. आयुक्तालयातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी बुधवारी काम बंद आंदोलन करत शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नाविषयी जोरदार आंदोलन केले. यावेळी चव्हाण यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

काळ्या फिती अन् ठिय्या

यावेळी सर्व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून बुधवारी कार्यालयात हजेरी लावली. कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर महिला-पुरुष अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ठिय्या देऊन चव्हाण यांच्या दादागिरीचा निषेध नोंदवत कठोर कारवाईची मागणी केली. आदिवासी आयुक्तालयाच्या परिसरात सुरक्षा वाढवून बाहेरील कुठल्याही राजकीय व्यक्तीचा वाढता हस्तक्षेप व अरेरावी थांबविण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या मागणीचे निवेदन आदिवासी विकास आयुक्तांना सादर करण्यात आले. आदिवासी आयुक्तालयातील कामकाज या आंदोलनामुळे ठप्प झाले होते.

पिचड यांच्या भेटीने वाद वाढणार

माजी आमदार संजय चव्हाण यांच्या अनुसूच‌ित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालयात मंगळवारी झालेल्या अरेरावीप्रकरणी माजी मंत्री मधुकर पिचड यांनी त्यांच्यावर थेट कारवाईची मागणी केली. बोगस आदिवासींविरोधात पुढील आठवड्यात रस्त्यावर उतरण्याची घोषणाही त्यांनी केली. पिचड यांनी बुधवारी समितीच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीत पिचड यांनी बोगस आदिवासी जात प्रमाणपत्रे तत्काळ रद्द करण्याची आग्रही मागणी केली. अशा दाखल झालेल्या प्रकरणांवर निष्पक्षपणे कार्यवाही करून खऱ्या आदिवासींना न्याय देण्यात यावा असे साकडे त्यांनी यावेळी घातले. तसेच चव्हाण यांनी केलेल्या कृत्याचा निषेध नोंदवित, अधिकारी व कर्मचाऱ्यांची पाठीशी असल्याची ग्वाही दिली. भ्याड हल्ल्यास न घाबरण्याचे आवाहन त्यांनी यावेळी कर्मचाऱ्यांना केले. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद चिघळण्याची शक्यता आहे.

जागृती कुमरेंवर कारवाई करा

अनूसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या उपसंचालक जागृती कुमरे यांनी अपमानास्पद वागणूक देत शिवीगाळ केल्याचा तक्रारअर्ज माजी आमदार संजय चव्हाण यांनी मुंबई नाका पोलिसांना दिला आहे.

या तक्रार अर्जामध्ये म्हटल्यानुसार, चव्हाण यांनी ३० ऑक्टोबर रोजी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीकडे माहिती अधिकारांतर्गत अर्ज केला होता. त्यानुसार त्यांना २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता संबंधित प्रकरणाच्या नस्त्या अवलोकनासाठी कार्यालयात बोलावण्यात आले. नस्तीचे अवलोकन केल्यानंतर चव्हाण यांना आणखी काही माहिती हवी होती. त्यांनी त्याबाबत जन माहिती अधिकारी एच.बी. गव्हाणे यांच्या कार्यालयातील रजिस्टरमध्ये तशी नोंद करीत माहितीच्या साक्षांकीत प्रतींची मागणी केली. त्यासाठीचे ९८ रुपये शुल्क भरून जागृती कुमरे यांच्या सही शिक्क्यानिशी पावतीही घेतली. परंतु अजूनपर्यंत आपल्याला माहिती उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचे चव्हाण यांनी या तक्रार अर्जात म्हटले आहे. माहिती मिळत नसल्याने चव्हाण यांनी आदिवासी विकास भवनातील सहआयुक्त संदीप गोलाईत यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या दालनात कुमरे देखील उपस्थ‌ित होत्या. मला अद्याप माहितीच्या साक्षांकीत प्रती का दिल्या नाहीत अशी विचारणा त्यांनी गोलाईत यांना केली. त्यावेळी कुमरे अचानक संतापल्या. मी यांना कोणतीही माहिती देणार नसल्याचे स्पष्ट करीत त्यांनी हे खोटे आदिवासी ठाकूर आहेत. यांचे पुर्वज सुध्दा खोटेनाटे व लबाड्या करून ठाकूर अनुसूचित जमातीचा दावा करायचे असा आरोप केला. याला बाहेर हाकला अन्यथा पोलिसांना बोलावेन असेही धमकावले. याखेरीज शिवीगाळ करीत कुमरे यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचे या तक्रार अर्जामध्ये म्हटले आहे. कुमरे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे.

..चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल..

माहिती अधिकारान्वये मागितलेली माहिती मिळाली नाही म्हणून माजी आमदार आणि विद्यमान आमदार दीपिका चव्हाण यांचे पती संजय चव्हाण यांनी आपल्यासोबत गैरवर्तन करीत सरकारी कामात अडथळा आणल्याची तक्रार जागृती कुमरे यांनी मुंबईनाका पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. त्यानुसार चव्हाण यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणि जातिवाचक शिवीगाळसह जीवे मारण्याच्या धमकीचा गुन्हा मुंबई नाका पोल‌िसांनी दाखल केला आहे. चव्हाण यांनी मधुकर पिचड यांच्याबाबत माहिती अधिकारात माहिती मागितली होती. अधिकाऱ्यांसोबत मंगळवारी ( दि. ५) दोन फाईलींसंदर्भात चर्चा सुरू असताना चव्हाण परवानगी न घेताच कार्यालयात आले. त्यांनी माहितीबाबत विचारणा करून वाद घातला. असभ्य भाषेत जातीवाचक बोलून त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अश्व म्युझियमचे उद्या भूमिपूजन

$
0
0

सारंगखेड्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सोहळा

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा यात्रेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी (दि. ८) भेट देणार असल्याची माहिती यात्रेतील चेतक फेस्टिवलचे अध्यक्ष जसपालसिंह रावल यांनी दिली आहे. यावेळी पर्यटन विभागाकडून सारंगखेडा येथे जगात तिसरे व भारतात प्रथम क्रमांकाचे अश्व म्युझियम उभारण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात सारंगखेडा यात्रेतील घोडेबाजार व चेतक फेस्टिवलमुळे ही यात्रा प्रसिद्ध आहे. या यात्रेला साडेतीनशे वर्षांपेक्षा जास्तीचा इतिहास आहे. यावर्षी पर्यटन विभाग व चेतक फेस्टिवलचे आंतरराष्ट्रीय स्तरावर यात्रा पोहोचविण्याचे स्वप्नदेखील पूर्ण झाले असल्याचेही रावल यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी यंदा सारंगखेडा फेस्टिवलसाठी पर्यटन विभागाकडून ५ कोटींचा निधी मंजूर केला होता. तसेच पर्यटन विभागाकडून सारंगखेडा येथे जगात तिसरे व भारतात प्रथम क्रमांकाचे अश्व म्युझियमचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला खासदार डॉ. हीना गावित, आमदार डॉ. विजयकुमार गावित, आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांच्यासह नंदुरबार जिल्ह्यातील सर्व आमदार, लोकप्रतिनिधी व पर्यटन विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतील.

घोडेबाजार पोहोचला ७० लाखांवर

सारंगखेडा यात्रेला रविवार (दि. ३) पासून सुरुवात झाली आहे. देशविदेशातील पर्यटक याठिकाणी दाखल झाले आहेत. तसेच घोडे बाजारासाठीही ज्यांना रूची आहे तेही याठिकाणी घोड्यांची खरेदीविक्री करण्यासाठी येत असतात. त्यामुळे या घोडे बाजारातूनच लाखोंची उलाढाल होत असते. यावर्षीही सारंगखेड्यात मोठ्याप्रमाणात घोडेबाजार भरविण्यात आला आहे. या यात्रेत एकूण २०००च्या जवळपास घोडे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. त्यापैकी आतापर्यंत ३५० घोड्यांची विक्री झाली आहे. यातून सुमारे ७० लाखांपर्यंत घोडे बाजारात उलाढाल झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महिलांची जीम धूळ खात

$
0
0

खासदार गोडसे यांच्याकडून परिसराची पाहणी

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

सिन्नर शहरात महिलांसाठी पहिली व्यायामशाळा लवकर सुरू होणार आहे. या व्यायामशाळेची इमारत तयार असून, साहित्याअभावी इमारत तीन वर्षांपासून बंद आहे. यामुळे व्यायाम करण्याची इच्छा असूनही महिलांना व्यायामापासून वंचित रहावे लागत आहे.

सरदरवाडी जवळील संजीवनीनगर येथे व्यायाम शाळेसाठीची इमारत बांधून तयार आहे. गेल्या तीन महिन्यांपूर्वी नगरपालिकेने इमारतीवर महिला व्यायामशाळेचे आरक्षण टाकले आहे. परंतु, व्यायामासाठीचे साहित्य उपलब्ध नसल्याने व्यायामशाळा सुरू होऊ शकत नाही. यामुळे सिन्नर येथील महिलांमध्ये नाराजीचा सूर आहे. या समस्येबाबत सिन्नर येथील महिलांच्या शिष्टमंडळाने खासदार हेमंत गोडसे यांची भेट घेऊन ही खंत व्यक्त केली. तसेच व्यायामशाळेसाठी अत्याधुनिक साहित्य देण्याची मागणी केली. या महिला शिष्टमंडळाचे नेतृत्व मेघा सोमनाथ पावसे यांनी केले. शिष्टमंडळात सोनाली वारुंगसे, वनिता सदगीर, विजया पवार, निर्मळा काळे, अलका पंडित, वनिता क्षीरसागर, प्रतिभा पाटील, कविता पाटील, शितल देवरे, कल्पना जगताप, विमल बिन्नर आदींचा समावेश होता.

व्यायामशाळेला साहित्य मिळावे आणि सिन्नरमधील महिलांसाठीची पहिली व्यायामशाळा तातडीने सुरू व्हावी यासाठी नगरसेवक सोमनाथ पावसे यांनी पुढाकार घेतला आहे. याबाबत लवकरात लवकर अत्याधुनिक साहित्य पुरविण्यात येईल, अशी ग्वाही खासदार गोडसे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळालीत अत्याधुनिक रुग्णकक्ष

$
0
0

रुग्णांची दैना थांबणार; कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सभेत विविध विषयांवर चर्चा

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

देवळालीत बोर्डाच्या हॉस्पिटलमध्ये १ कोटी रु. चे अत्याधुनिक रुग्णकक्ष बांधण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. तसेच प्रलंबित असलेल्या लीज लॅन्डचा प्रश्नही केंद्र सरकारच्या नव्या परिपत्रकानुसार निकाली काढण्यात आला आहे. येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाची सभा बुधवारी (दि. ५) पदसिद्ध अध्यक्ष ब्रिगेडियर प्रदीप कौल यांच्या अध्यक्षतेखाली भरली होती. त्यावेळी हे निर्णय घेण्यात आले.

या वेळी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सभेत देशभरातील ६२ कॅन्टोन्मेंट मध्ये सर्वोत्कृष्ट ठरलेल्या येथील हॉस्पिटलचे नूतनीकरण करून त्यात रुग्णांना

दर्जेदार सुविधा देता याव्यात याकरिता १ कोटी रुपयाचा विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीमधून हॉस्पिटलच्या मोकळ्या जागेवर नवीन अत्याधुनिक सुविधा असलेले रुग्णकक्ष उभारले जाणार आहे. या निर्णयाने आता परिसरातील रुग्णांना लाभ घेता येणार आहे. तसेच रुग्णांची गर्दी टाळता

येणार आहे.

यासोबतच बैठकीत विविध निर्णयही घेण्यात आले, ज्यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांना नियमानुसार १२ व २४ वर्ष सेवा पूर्ण झाली आहे त्यांना विशेष वेतनवाढ मंजूर करण्यात आली. मार्केटमधील बाजार पावतीचे वार्षिक टेंडर १७ लाख रुपयात देण्याचा निर्णय घेण्यात आला. गतवर्षी हेच टेंडर १३ लाख रुपयात देण्यात आले होते. त्यामुळे बोर्डास अधिकचे ४ लाख रुपये मिळणार आहेत. या वेळी उपाध्यक्ष दिनकर आढाव, मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार, नगरसेवक प्रभावती धिवरे, सचिन ठाकरे, भगवान कटारिया, आशा गोडसे, कावेरी कासार, बाबूराव मोजाड, मीना करंजकर, कर्नल राहुल मिश्रा, कर्नल कमलेश चव्हाण आदी उपस्थित होते.

लीज लॅन्डधारकांना दिलासा

कॅन्टोन्मेंट शाळेसाठी ४५ नवीन संगणक खरेदी करण्याबरोबरच हॉस्पिटलची नवीन औषधे खरेदीला मंजुरी देण्यात आली. बोर्डाच्या वाचनालयात सुरू करण्यात आलेल्या अभ्यासिकेच्या मासिक फीमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरात बसविण्यात येणाऱ्या दोन हजार सहाशे पथदीपांवर नवीन एलईडी लाईट बसविण्याबाबत ठेकेदाराने जीएसटीच्या कारणावरून नकार दिल्याने नियमानुसार त्याचे अनामत रक्कम जप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. वॉर्ड क्र. ६ व ८ मधील भुयारी गटार योजनेचे काम लवकरच सुरू होणार असून, या योजनेबाबत नागरिकांसह नगरसेवकांनी हरकती नोंदविल्या होत्या त्याची खातरजमा करण्यासाठी आयआयटीबी पवई यांच्याकडून समिती नेमण्यात आली होती. या समितीचे सदस्य डॉ. व्ही ज्योतिप्रकाश व प्रा. आर.एस जनगीड यांनी दिलेल्या अहवालानुसार भूमिगत पाईप हे योग्य असून, २०५० पर्यंत १५ लाख ५० हजार लोकसंख्येसाठी पुरेसे असल्याचे स्पष्ट केले आहे.

फ्री होल्ड धारकांचाही निकाल लवकरच

ब्रिटिशकाळापासून ठिकठिकाणच्या कॅन्टोन्मेंट बोर्डासाठी १९०१, १९२१ व १९३२ मध्ये बनविण्यात आलेल्या नियमावलीनुसार सिव्हिल परिसरात असलेल्या जागांचे ४, ३०, ९० वर्षे करारपट्ट्याच्या जागा दिल्या जात असे. त्या जागा कराराचे नूतनीकरण करण्याची जबाबदारी संबधितांसह कॅन्टोन्मेंटची असताना यात बऱ्याच त्रुटींमुळे अडचणी निर्माण होत होत्या. तर २००१ पासून केंद्र सरकारने अशा जागांचे नूतनीकरण करण्याबाबत वारंवार सूचना करूनही कार्यवाही होत नव्हती. मात्र आता १० मार्च २०१७ च्या परिपत्रकानुसार देवळालीतील ९७ पैकी ९५ लीज लॅण्डच्या केसेस निकाली काढण्यात आल्या आहेत. मात्र हे करताना अशा लीजधारकांचे अतिक्रमण ग्राह्य धरले जाणार नाही. फ्री होल्ड ४८ केसेस गत १५ वर्षांपासून २५ टक्के रक्कम भरूनही प्रलंबित होत्या त्यांचा निकाल लवकरच लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोकळ्या भूखंडांच्या नोंदीच नाहीत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अस्वच्छतेप्रकरणी मोकळ्या भूखंडावर दंडात्मक कारवाईचे शस्‍त्र पालिकेला म्यान करावे लागणार आहे. महापालिकेच्या नगररचना विभागाकडे मोकळ्या भूखंडांच्या नोंदीच नसल्याने आरोग्य विभागाने कारवाईबाबत हतबलता दर्शवली आहे. त्यामुळे आरोग्य समितीही तोंडघशी पडली आहे. आरोग्य समितीच्या बैठकीतच अधिकाऱ्यांनी याची पोलखोल केल्याने सभापतींना डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली. दरम्यान, महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता खासगीकरणातून करण्याचा प्रस्ताव आरोग्य समितीच्या सभेत संमत करण्यात आला.

सभापती सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य व वैद्यकीय समितीची बैठक झाली. शहरात अनेक भागांत मोकळे भूखंड असून, त्यावर कचरा टाकला जात आहे. त्यामुळे रोगराई पसरत असल्याचा दावा केला जात आहे. शासनानेदेखील महापालिकांना मोकळ्या भूखंडावर कर आकारणी करावी, असे आदेश दिले आहेत. मोकळ्या भूखंडांवर दंडात्मक आकारणी करण्याचा निर्णय गेल्या बैठकीत घेण्यात आला होता. विभागीय स्वच्छता निरीक्षकांना आरोग्य समितीच्या महिनाभरापूर्वीच्या बैठकीत तसे आदेश देण्यात आले होते. आजच्या बैठकीत किती मोकळ्या भूखंडधारकांना नोटिसा बजावल्या, याचा अहवाल मागविण्यात आला. परंतु, सर्वांनी एकमुखाने नगररचना विभागाकडून मोकळ्या भूखंडांचा अहवाल नसल्याचे सांगत कारवाई करता येत नसल्याची हतबलता व्यक्त केली. त्यामुळे कारवाईचे शस्‍त्र म्यान करावे लागणार आहे.

शौचालयांची स्वच्छता आऊटसोर्सिंगद्वारे

महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता खासगीकरणातून करण्याचा प्रस्ताव आरोग्य समितीच्या सभेत संमत करण्यात आला. सार्वजनिक शौचालयांतील १९२ स‌िट्सची स्वच्छता मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांमार्फत व्यवस्थित केली जात नसल्याने खासगीकरणातून स्वच्छता करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. त्याला आरोग्य समितीने मंजुरी दिली. शहरात कचऱ्याच्या ब्लॅकस्पॉटसंदर्भात त्या-त्या परिसरातील नागरिकांना पत्र पाठवून कचरा न टाकण्याचे आवाहन सभापतींमार्फत केले जाणार आहे.

लोखंडी जाळ्यांना नकार

शहरातून वाहणाऱ्या गोदावरी व नंदिनी नदीवरील पुलावरून नदी पात्रात निर्माल्य टाकले जाते. त्यामुळे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने पुलांवर जाळ्या टाकण्याचे काम हाती घेतले आहे. परंतु, पाटबंधारे विभागाने त्यास आक्षेप घेतला आहे. लोखंडी जाळ्या लावल्यास पूल कोसळण्याची भिती व्यक्त करण्यात आली. लोखंडीऐवजी ग्रीन किंवा तात्पुरत्या जाळ्या लावण्याच्या सूचना देण्यात आल्या.

१५४ निर्माल्य कलश

गोदावरीच्या प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपायांची माहिती यावेळी देण्यात आली. त्यात गोदावरी, वाघाडी, वालदेवी, नंदिनी या नदीकिनारी १५४ निर्माल्य कलश ठेवण्यासाठी निविदा मागविण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. त्यावर गोदावरीसाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करण्याच्या सूचना सभापतींनी दिल्या. शहारतील जुन्या नाशकात बाजारपेठांतील कचरा गोळा करण्यासाठी स्वतंत्र घंटागाडीची मागणी करण्यात आली. तसेच डीपीरोडला धूर फवारणीसाठी मोठे हॅण्डमशीन, तर गल्लीबोळात छोट्या मशिनचा वापर करण्याच्याही सूचना सभापतींनी दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीएसएनएलची विक्री होऊ देणार नाही

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बीएसएनएल कंपनी बंद झाल्यास खासगी कंपन्या रोज वाढणाऱ्या पेट्रोलसारखे दर वाढवतील. आम्ही बीएसएनएलची विक्री होऊ देणार नाही. नवीन टॉवर्स, कंपनीला आमचा विरोध आहे. त्यासाठी सर्वांनी १२ व १३ डिसेंबर रोजीचा संप यशस्वी करा, असे आवाहन बीएसएनएल एम्प्लॉइज युनियनचे परिमंडळ सचिव नागेश नलावडे यांनी केले. प्रशासन नोकर भरती करत नाही, कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त बोजा टाकून केवळ गाजर दाखवून कर्मचाऱ्यांना हुलकावण्या देण्याचा प्रयत्न करून कॉर्पोरेट मॅनेजमेंट करत असल्याचेही ते म्हणाले.

कॅनडा कॉर्नरवरील बीएसएनएल कार्यालयाच्या आवारात युनियनची महाराष्ट्र परिमंडळाच्या कार्यकारिणीची सभा तसेच नाशिक जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यात बीएसएनएलपुढील आव्हाने व बीएसएनएलची सामाजिक जबाबदारी या विषयांवर अनेक वक्त्यांनी आपले मत मांडले. यावेळी नवी दिल्लीहून एआयबीडीपीएचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉ. ए. एन. नंबुद्री व बीएसएलएनएल एम्प्लॉइज युनियनचे जनरल सेक्रेटरी जॉन वर्गिस, परिमंडळ सचिव नागेश नलावडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाप्रबंधक नितीन महाजन होते. आप्पासाहेब गागरे यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

कॉ. नंबुद्री म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळाले, पण माहिती तंत्रज्ञान, रेल्वे, बँक, इन्शुरन्स विमानसेवा, पेट्रोल हे व्यवसाय खासगी कंपन्यांकडे होते. १९६२ साली चीन युद्धाच्या वेळी बर्मासारख्या तेल कंपन्यांनी पेट्रोल दिले नाही. आपण युद्धात मागे पडलो. या सर्वांचे सार्वजनिक व सरकारी खात्यात विलीनीकरण करून खासगी लुटारूंपासून सुरक्षा केली होती, याची आठवण त्यांनी करून दिली. आता वेतन करारही होत नाही. कोणतीही सरकारी मदत, कर्जमाफी, कर्ज बुडवणे हे न करता असोसिएशन व युनियन्सच्या माध्यमातून आम्ही सर्व्हिस विथ स्माइल ही सेवा देऊन गेल्या सात वर्षांत तोट्यातील कंपनी फायद्यात आणली. न्यायमूर्ती सतीशचंद्र यांच्या अहवालानुसार अॅफोर्डेबिल‌िटी क्लॉज बीएसएनएलला लावू नये. ग्रामीण भागातील आठ हजार कोटी इतका तोटा सहन करून बीएसएनएल सेवा देते. केदारनाथ येथील महाप्रलय, तामिळनाडूतील वादळ यावेळी सर्व टेलिकॉम कंपन्यांच्या सेवा बंद झाल्या. पण तेथे सर्वात प्रथम सेवा बीएसएनएलने चालू केली. जनतेशी संवाद साधण्यास, मदतकार्यास हातभार लावला. त्यामुळे अॅफोर्डेबिल‌िटी क्लॉज काढावा व वेतन करार करण्यात यावा, असेही ते म्हणाले.

यावेळी ऑल इंडिया पब्ल‌िक सेक्टर युनिट सेंट्रल गव्हर्न्मेंट ऑफिस, फेडरेशनच्या राज्यसचिवपदी सांगळे यांची निवड करण्यात आल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या सचिवपदी अरुण उगले यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दुर्गा पाटील यांनी केले. समारोप व आभारप्रदर्शन संगीता चव्हाण यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॅथालॉजी लॅब, क्लिनिक रडारवर!

$
0
0

मनपाकडे नोंदणीची होणार सक्ती; गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रस्ताव

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात रक्त संकलन केंद्राच्या नावाखाली अनधिकृत पॅथालॉजी लॅबचालकांकडून केले जाणारे गैरप्रकार आणि क्लिनिकमध्ये सुरू असलेला बोगस डॉक्टरांचा उच्छाद रोखण्यासाठी महापालिकेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शहरातील रुग्णालये, प्रसूतीगृहे व दवाखान्यांपाठोपाठ आता क्लिनिक आणि पॅथालॉजी लॅबचीही महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे नोंदणी सक्तीची करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. त्यांसदर्भातील प्रस्ताव आरोग्य उपसंचालकांकडे पाठविण्यात आला असून, त्यांच्या मंजुरीनंतर या प्रस्तावाची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे बोगस लॅब आणि डॉक्टरांना चाप बसणार आहे.

मुंबई सुश्रृषागृह अधिनियम १९४९ अंतर्गत महापालिका क्षेत्रातील रुग्णालये, दवाखान्यांप्रमाणेच क्लिनिक व पॅथालॉजी लॅब चालकांनादेखील महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे नोंदणी करून परवाना दिला जात होता. मात्र, रुग्णांवर उपचार केले जात नसल्याचे कारण देत पॅथालॉजी लॅब असोसिएशनने यातून अंग काढून घेतले होते. मात्र, गेल्या दोन वर्षांत रक्त संकलन केंद्रांच्या नावाखाली अनधिकृत पॅथालॉजी लॅब चालविण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. डॉक्टर आणि लॅबचालकांमधील कटप्रॅक्टिस जोरात असल्याच्याही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. डॉक्टर नसतानासुद्धा पॅथालॉजी सुरू असल्याचे प्रकार घडत आहे. अशा अनधिकृत लॅबमुळे पॅथालॉजिस्ट विषयीचे गैरसमज व विश्वासार्हता संपुष्टात येत आहे. ही बाब लक्षात घेत पॅथालॉजिस्ट असोसिएशनने स्वत:च महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे धाव घेत आमची नोंदणी करून घ्यावी, अशी मागणी केली होती.

सुळसुळाट थांबणार

महापालिका क्षेत्रात मुंबई सुश्रृषागृह अधिनियमानुसार केवळ दहा खाटांपेक्षा मोठ्या रुग्णालयाची महापालिकेत नोंद होते. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर पॅथालॉजी लॅब आणि क्लिनिकचा सुळसुळाट आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने सादर केलेल्या प्रस्तावाला आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. यामुळे पॅथालॉजी व क्लिनिकचालकांना मनपाकडे नोंदणी बंधनकारक करण्यासाठी आता आरोग्य संचालकांकडे प्रस्ताव पाठविला जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र भंडारी यांनी दिली.

फसवणुकीला चाप

आरोग्य उपसंचालकांनी प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर शहरातील पॅथालॉजी लॅब व क्लिनिक चालकांना मनपाकडे नोंदणीसाठी तीन महिन्यांचा अल्टिमेटम दिला जाईल. या मुदतीनंतरही नोंदणी न करणाऱ्यांविरोधात महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने लॅब सील केल्या जातील. तसेच, बोगस डॉक्टर म्हणून क्लिनिकचालकावर कारवाई केली जाईल. त्यामुळे रुग्णांच्या फसवणुकीला चाप बसणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images