Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘एनए’ नोटिसांविरोधात जनलढा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विकास आराखड्यात अंतर्भूत गावांमधील अद्याप एनए न झालेल्या जमिनींची यादी जिल्हा प्रशासनाने तयार केली असून, अशा शेतकऱ्यांना नोट‌िसा पाठविण्याचे आदेशही तलाठ्यांना देण्यात आले आहेत. जमिनी एनए कराव्यात की नाही हा शेतकऱ्यांचा ऐच्छ‌िक प्रश्न असून, महसूल गोळा करण्यासाठीच सरकारचा हा खटाटोप सुरू असल्याचा दावा शेतकऱ्यांकडून केला जाऊ लागला आहे. सरकार आणि प्रशासनाच्या या धोरणाविरोधात २३ गावांमधील शेतकऱ्यांनी जन आंदोलन उभे करण्याची तयारी सुरू केली आहे.

अन्य शहरांप्रमाणेच नाशिकमध्येही सिमेंटचे जंगल वाढतेच आहे. मात्र तरीही महापालिका क्षेत्र आणि लगतच्या गावांमधील शेतकऱ्यांनी आपला पारंपरिक शेती व्यवसाय टिकवून ठेवला आहे. परंतु, या जमिनीदेखील सहजतेने अकृषक (बिगरशेती) करण्यासाठी सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केल्याचा दावा आता शेतकऱ्यांकडून केला जाऊ लागला आहे. शेतजमीन बिगरशेती करण्यासाठीची प्रक्रिया पूर्वी अत्यंत गुंतागुंतीची आणि वेळखाऊ होती. परंतु, गेल्या वर्षभरात सरकारने या प्रक्रियेमध्ये बरीचशी सुधारणा केली आहे. त्यामुळे नियमानुसार रक्कम भरून अशा जमिनी बिगरशेती करवून घेता येऊ लागल्या आहेत. विकास आराखडा मंजूर झाल्यानंतरही बहुतांश झोनमध्ये किमान ६० टक्के स्थानिक अजूनही शेती करीत आहेत. त्यांना त्यांची वडिलोपार्जित शेती जोपासायची आहे. परंतु, मालेगाव आणि नाशिक तालुक्यातील अशा शेतकऱ्यांना नोट‌िसा देण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील कलम ४२ ब, वसुलीच्या अनुषंगाने हा विषय महत्त्वाचा असून त्याची तत्काळ प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, असे आदेश सरकारच्या निर्देशांनुसार तहसीलदार आणि तलाठ्यांना देण्यात आले आहेत.

विकास आराखड्यामध्ये दर्शविण्यात आलेल्या रहिवासी, निवासी आणि वाणिज्यक यांसारख्या अकृषक स्वरुपाच्या वापर विभागात ज्या जमिनी आहेत, त्या जमिनींचे गट नंबर दर्शविणाऱ्या याद्या तलाठ्यांना देण्यात आल्या आहेत. ज्या जमिनी अद्याप बिगरशेती झालेल्या नाहीत, त्यांची स्वतंत्र यादी तयार करावी आणि अशा जमिनींचे स्थळ निरीक्षण करूनच संबंधित शेतकऱ्यांना नोट‌िसा काढाव्यात, असे आदेश देण्यात आले आहेत. अशा जमिनींवर अनधिकृत बांधकाम केलेल्या, विविध न्यायालयांमध्ये वाद सुरू असलेल्या जमिनी तूर्तास वगळाव्यात, असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

..ही बाब ऐच्छ‌िकच

जिल्हाधिकाऱ्यांकडून अशा प्रकारचे आदेश देण्यात आले आहेत ही वस्तुस्थ‌िती आहे. परंतु, सरसकट सर्वच जमिनी एनए करण्यासाठीचा हा खटाटोप असल्याचा शेतकऱ्यांचा दावा चुकीचा असल्याची माहिती जिल्हा प‍्रशासनातील सूत्रांनी दिली आहे. जमीन एनए करावी की करू नये, हा पूर्वीप्रमाणेच शेतकऱ्यांचा ऐच्छ‌िक विषय असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

विकास आराखड्यातील २३ गावांमधील शेतकरी सरकार आणि प्रशासनाच्या या नोट‌िसांना विरोध करण्यासाठी संघट‌ित होत आहेत. अकृषक कर आणि रुपांत‌रित कर गोळा करण्यासाठीच हा सर्व खटाटोप सुरू आहे. हळूहळू सर्वच जमिनी एनए करण्यासाठीची ही छुप्या मार्गाने सुरू असलेली प्रक्रिया असून, याविरोधात लढा उभारण्यात येणार आहे.

- अॅड. भास्कर निमसे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


त्र्यंबकच्या तत्कालीन नगराध्यक्षांचा हस्तक्षेप नाही

$
0
0

कदम यांनी मागविलेल्या माहिती अधिकारात बाब उघड

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक नगरपालिकेचा प्रारुप विकास आराखडा राजपत्रात प्रसिद्ध करण्यासाठी तत्कालीन नगराध्यक्षा विजया लढ्ढा यांनी परस्पर पत्र दिल्याचा आरोप खोटा असल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. याबाबत माजी उपनगराध्यक्ष संतोष कदम यांनी माहिती अधिकारात माहिती मिळविली होती. त्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे.

जिल्हाधिकारी नाशिक यांना त्र्यंबक नगरपालिका मुख्याधिकारी चेतना केरूरे यांनी १२ मे २०१७ रोजी पत्र दिले होते. त्यामध्ये डीपी आराखडा तयार करताना नगराध्यक्षांचा हस्तक्षेप झाल्याचे नमूद करताना शासन राजपत्रात प्रसिद्धीचे पत्र देण्याबाबत उल्लेख केला होता. याबाबत ठराव क्रमांक ४४८ रद्द करण्याची मागणीही करण्यात आली होती. त्यानंतर त्र्यंबकेश्वरचा डीपी वादग्रस्त ठरला होता. परिणामी, विजया लढ्ढा यांना नगराध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर त्र्यंबकेश्वर नगरपालिकेत सत्तांतर झाले होते.

मात्र या सर्व प्रकरणात संतोष कदम यांनी माहिती अधिकाराचा वापर करीत संपूर्ण मे महिन्याच्या कारागृह मुद्रणालयाचा आवकजावकच्या झेरॉक्स प्रती अपील करून प्राप्त केल्या आहेत. त्यातही लढ्ढा यांनी असे कोणतेच पत्र दिले नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता ऐन त्र्यंबकेश्वर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सर्व समजल्याने या प्रकारास कोणते वळण मिळणार याची उत्सुकता नागरिकांना आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भवानी तलाव दुरुस्तीला प्रारंभ

$
0
0

गडावरील पाणीटंचाई होणार दूर

म. टा. वृत्तसेवा, कळवण

साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ असलेल्या श्री सप्तशृंगी देवी गडास पाणीपुरवठा करणाऱ्या भवानी पाझर तलावाची गळती थांबवण्याच्या सर्व मेंटेनन्स कामाला रविवारी (दि. २६) पासून सुरुवात करण्यात आली. फेब्रुवारी २०१८ पासून या तलावाच्या मुख्य कामास प्रारंभ होणार असून, याबाबत भाविक व गड ग्रामस्थांनी वेळोवेळी आवाज उठवला होता. या पाझर तलावाने गडावरील पाणीटंचाई पुढील वर्षांपासून दूर होण्यास मदत होऊ शकते.

कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गडास भवानी पाझर तलावातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र पाझर तलावाला गळती असल्याने ३० ते ३५ टक्के पाणी वाया जात आहे. तसेच तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साठल्याने तलावातील साठवण क्षमताही कमी झालेली आहे. गडावर दिवसेंदिवस भाविकांची गर्दीबरोबर गडावरील लोकसंख्या वाढत असल्याने पाण्याची गरजेपेक्षा पाण्याचा साठा कमी राहात असल्यामुळे उन्हाळा सुरू होताच गडावरील रहिवाशी व न्यासास दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. परिणामी, या पाणीटंचाई काळात ग्रामस्थ, हॉटेल व्यावसासिकांबरोबरच ग्रामपंचायत व ट्रस्टला पाणी वाहून आणण्यासाठी मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.

याबाबत गेल्या दोन वर्षांपासून सप्तशृंगी ग्रामपंचायतीचे तत्कालीन उपसरपंच गिरीश गवळी व ग्रामपंचायत सदस्य राजेश गवळी यांनी भवानी तलावाची गळती थांबविणे, तलावाची क्षमता वाढविण्याच्या कामासाठी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने सरकार दरबारी पाठपुरावा केला होता. त्यास त्यांना यश लाभून सरकारने २ कोटी ४९ लाख ७१ हजारांचा निधी मंजूर करीत प्रशासकीय मान्यता दिली होती. सध्या भवानी तलाव तुडुंब भरलेला असून, किमान जानेवारी २०१८ पर्यंत सप्तशृंगी गडास पाणी पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. सदर प्रस्तावित कामाची पाहाणी व मेंटेनन्स कामाच्या प्रारंभासाठी लघु पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता आर. पी. धुम, अभियंता ए. व्ही. महाजन, ठेकेदार एम. डी. लोखंडे यांनी हजेरी लावली. या वेळी शांताराम सदगीर, ग्रामविकास अधिकारी जाधव उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२५० युवकांचा ‘मनविसे’त प्रवेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र नवन‌र्मिाण विद्यार्थी सेनेमध्ये रविवारी तब्बल २५० युवकांनी प्रवेश केला. मनविसेचे प्रदेशाध्यक्ष आदित्य शिरोडकर यांच्या मुख्य उपस्थ‌तिीत ठक्कर बाजार बसस्थानकाजवळील पक्ष कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला.

विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आक्रमक झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये आंदोलनांच्या माध्यतातून मनविसेने विद्यार्थ्यांशी संबंधित विविध प्रश्न हाताळले आहेत. मनविसेच्या शहर आण‌ि जिल्हा कार्यकारिणीकडून सुरू असलेल्या कामाचा आढावा यावेळी शिरोडकर यांनी घेतला. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील घोटाळा, वीज भार नियमनामुळे होणारे विद्यार्थ्यांचे नुकसान, ज्येष्ठांसोबत साजरा करण्यात आलेला फ्रेन्डशिप डे, प्रश्नपत्रिका फुटल्याने लावण्यात आलेली चौकशी, मराठी पाट्या लावण्याबाबत इंग्रजी माध्यमाच्या शाळांवर आणलेला दबाव आदींची माहिती मनविसेचे शहराध्यक्ष शाम गोहाड यांन‌ी यावेळी दिली. नाशिकमध्ये ५० टक्के इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी मराठीत पाट्या लावल्या आहेत. अन्य शाळांनी त्या लावल्या नाहीत तर आम्ही लावू असे संदीप भवर यांच्याकडून शिरोडकर यांना सांगण्यात आले. त्यानंतर शिवसेनेच्या युवासेनेतील काही कार्यकर्त्यांसह तब्बल २५० युवकांनी मनविसेमध्ये प्रवेश केला.

यावेळी शिरोडकर म्हणाले, की मनविसेमध्ये कोणी ज्येष्ठ आणि कोणीही कनिष्ठ, कोणी जुने आणि कोणी नवीन पदाधिकारी असा भेदभाव नाही. सर्वांनी एक दिलाने काम करावे. त्यानंतर पुढील तीन आठवड्यांत त्यांना जबाबदाऱ्या ठरवून पदे दिली जातील. यावेळी संघटनेचे पदाधिकारी मनोज रामराजे, अॅड. सागर देवरे, दीपक चव्हाण, संदीप भवर, कौशल पाटील, खंडेराव मेढे आदी उपस्थ‌ति होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदाधिकाऱ्यांची झाडाझडती

$
0
0

दानवेंनी बैठकीत घेतला विविध कामांचा आढावा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भारतीय जनता पक्षाच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे यांनी पदाधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. संघटनात्मक निवडणुका होऊन दोन वर्षे झाली तरी कार्यकारणी तयार न केल्यामुळे त्यांनी पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले. या बैठकीत अनुपस्थित पदाधिकाऱ्यांना खूप काम असेल, तर त्यांना मुक्त करा असे सांगत नाराजी व्यक्त केली. उत्तर महाराष्ट्राच्या या बैठकीत मंत्र्यांची गैरहजेरी भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली. संघटनेवर बोला सरकारबद्दल बोलू नका, अशा सूचना देण्यात आल्यामुळे यावेळी पदाधिकाऱ्यांची मात्र कोंडी झाली.

रविवारी गंजमाळ येथील हॉटेल रॉयल हेरिटेज येथे आयोजित भाजपची आढावा बैठक तब्बल दोन तास उशिरा सुरू झाली. प्रारंभी नाशिक जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांशी दानवे यांनी संवाद साधून आढावा घेतला. त्यानंतर धुळे, नंदुरबार, अहमदनगर, जळगाव जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात आल्या. या बैठकीत संघटना बांधणीवर भर देण्याबरोबरच बूथ यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी काय करता येईल यावर दानवे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भाजपच्या विविध आघाड्यांच्या कामाची माहिती घेतली. त्यावेळी पदाधिकाऱ्यांना कार्यकारणीचे नाव विचारताच अनेक नेत्यांची फजिती झाली. यावेळी वर्षभराच्या कामाचा आढावा घेण्यात आला. पदाधिकारी काम करतो आहे की नाही यापासून त्यांनी प्रत्येक विभागाची राजकीय स्थितीही जाणून घेतली.

या बैठकीत भाजपचे सरचिटणीस आमदार सुरजितसिंग ठाकूर, उत्तर महाराष्ट्राचे संघटनमंत्री किशोर काळकर, नाशिकचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण, भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप, जिल्हाध्यक्ष दादा जाधव, आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल आहेर महापौर रंजना भानसी, मालेगावचे सुनील गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते. जळगावच्या बैठकीत माजी मंत्री एकनाथ खडसे, खासदार ए. टी. पाटील, रक्षा खडसेंसह आमदार उपस्थित होते.

नाशिकचे काम ५४ टक्के

नाशिक जिल्ह्याच्या आढावा बैठकीत त्यांनी पदाधिकाऱ्यांना धारेवर धरत कामाला ५४ टक्के गुण दिले. भविष्याच्या दृष्टीने हे काम चांगले नसल्याचे सांगून त्यांनी अधिक काम करण्याच्या सूचना केल्या. या बैठकीत प्रारंभी मालेगाव विभाग, नंतर ग्रामीण व नंतर नाशिक शहराच्या पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात आला.

दार बंद करून चर्चा

आढावा बैठकीत पदाधिकाऱ्यांशिवाय कार्यकर्त्यांनी बसू नये, अशा सूचना देण्यात आल्या. यावेळी केवळ जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, सरचिटणीस, विविध आघाडीचे प्रमुख फक्त उपस्थित होते. या चर्चेवेळी सभागृहाचे दार बंद करण्यात आले.

कडेकोट बंदोबस्त

सुकाणू समितीच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी आंदोलन केल्यामुळे या आढावा बैठकीत पोलिसांचा कडेकोड बंदोबस्त ठेवला होता. पोलिस आलेल्या वाहनांची तपासणी करीत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वबळाचा निर्णय योग्यवेळी!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभेच्या निवडणुका स्वतंत्र लढविण्याची औरंगाबाद येथील आढावा बैठकीत घोषणा करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नाशिकमध्ये मात्र सावध पवित्रा घेतला. नाशिकमध्ये त्यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुका कशा लढवायच्या या योग्यवेळी ठरवू, असे सांगतानाच शिवसेनेवर टीका करण्याचेही टाळले. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मित्रपक्षाशी वैर नको म्हणून त्यांनी ही भूमिका घेतल्‍याची चर्चा मात्र रंगली.

भाजपच्या उत्तर महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राणेंबाबत विचारल्यावर ते म्हणाले, की विधान परिषदेच्या निवडणुकीत उमेदवार ठरविण्याचे अधिकार मुख्यमंत्री व मला देण्यात आले आहेत. त्याबाबत बैठक झाल्यानंतर उमेदवाराचे नाव निश्चित केली करून दिल्लीत केंद्रीय समितीकडे पाठवले जाईल. त्यांची संमती मिळाल्यानंतर उमेदवाराचे नाव जाहीर करू. राणेंवर अन्याय होणार नाही. राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार निश्चितच होणार असला तरी तारीख निश्चित नसल्याचे त्यांनी सांगितले.

आढावा बैठकीबाबत बोलताना दानवे म्हणाले, की राज्यात स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका आम्ही संघटनात्मक बांधणीमुळे जिंकल्या. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्याची तयारी आम्ही करीत आहोत. त्यासाठी संघटनात्मक बांधणीकडे लक्ष दिले जात असून, त्यासाठी बूथ गठित करणे महत्त्वाचे काम आहे. आतापर्यंत राज्यात ९१ हजार बूथपैकी ७० टक्के काम झाले असून, उर्वरित कामे येत्या तीन महिन्यांत पूर्ण करणार आहोत. राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात आम्ही बूथ विस्तारक नेमले असून, मुंबई येथे वॉर रूम सुरू केले आहेत. त्यामुळे येथे सर्व माहिती एकत्रित केली जाते.

कांदा निर्णयावर मौन

सरकारने कांद्यावर साडेआठशे डॉलर प्रतिटन निर्यातमूल्य लावले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. याबाबत दानवे यांनी कांद्याला सध्या चांगले भाव मिळत असल्याचे सांगत बोलणे टाळले. शेतकऱ्यांचे राज्य सरकारने कर्ज माफ केले असून, बँकेने यादी देण्यास विलंब केल्यामुळे ते मिळत नसले तरी घोषणा झाल्यापासून त्यांना व्याज आकारणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फिल्टरेशन प्लँटची वाताहत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

देश-विदेशांतून नाशिकला येणारे भाविक रामकुंडात स्नानाला प्राधान्य देतात. मात्र, त्यांना रामकुंडातील प्रदूषित पाण्यात स्नान करावे लागते. येथील पाणी कायम शुद्ध राहावे यासाठी रामकुंडात २००३-०४ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अगोदर फिल्टरेशन प्लँट बसविण्यात आला होता. त्याची आता पुरती दैना उडाली आहे. त्यामुळे आता पुन्हा रामकुंडाच्या पाण्याच्या शुद्धिकरणाची चर्चा होऊ लागली आहे.

गोदावरीला गंगापूर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात येत नाही, त्यावेळी अशी परिस्थिती निर्माण होते. सध्या पाणी नसल्यामुळे रामकुंडातील शुद्ध पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत गोदाकाठ परिसराचा विकास करण्यात येणार आहे. त्यात रामकुंडाच्या पाण्याचाही प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

या पार्श्वभूमीवर येथे उभारण्यात आलेला प्लँट पुरेशा क्षमतेने कार्यान्वीतच न झाल्याने एकदा फेल गेलेला प्लँट पुन्हा उभारू नये. त्याऐवजी रामकुंडातील पाणी कायम प्रवाहित कसे राहील याचा विचार करताना रामकुंडातील नैसर्गिक झरे मोकळे करणे हा त्यावर चांगला उपाय होऊ शकतो, अशी भावना गोदाप्रेमींकडून व्यक्त होत आहे.

गोदावरी आढावा बैठकीत पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी रामकुंडातील प्रदूषित पाण्यात भाविकांना स्नान करावे लागते. ते टाळण्यासाठी पावसाळ्यानंतर फिल्टरेशन प्लँट कार्यरत करण्याची, तसेच नदी बारमाही प्रवाही करण्यासाठी नदीतील नैसर्गिक झरे मोकळे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यांची महापालिका प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतलेली दिसत नाही.

--

साहित्याची दैना

रामकुंडातील पाणी स्वच्छ करण्यासाठी बसविण्यात आलेल्या फिल्टरेशन प्लँट अयशस्वी ठरला आहे. हा प्लँट बसविण्यात आला, त्याच्या दोन मोठ्या टाक्या जुन्या भाजीबाजाराच्या कोपऱ्यावरील सुलभ शौचालयाच्या पश्चिमेला ठेवण्यात आल्या होत्या. त्यासाठी रचलेला पायाच्या खुणा, तसेच तेथून रामकुंडात नेण्यात आलेले लोखंडी पाइप गंज येऊन पडलेले दिसत आहेत. येथील फिल्टरेशन प्लँटच्या टाक्या काढून त्या फुलेनगर येथील जलकुंभाच्या भागात ठेवून दिलेल्या आहेत. हा प्लँट पुरेशा क्षमतेने कार्यान्वित झालाच नाही. त्यामुळे या प्लँटवर केलेला खर्च वाया गेलेला आहे.

--

रामकुंडातील पाणी अधिक शुद्ध कसे करता येईल, त्याचा पुनर्वापर कसा करता येईल याविषयी एका कंपनीकडून सल्ला घेण्यात येत आहे. प्रसिद्ध जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी नदीतील नैसर्गिक झरे पुनर्जीवित करण्याचा सल्ला दिला आहे. काँक्रिटीकरणात बुजलेले झरे मोकळे केले, तरी रामकुंडात शुद्ध पाण्याचा प्रवाह सुरू राहू शकतो.

-देवांग जानी, गोदावरीप्रेमी

---


कपिला संगमावर शेवाळाचा थर

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

भाविकांचे आणि पर्यटकांचे आकर्षण ठरू शकेल अशा कपिला संगमाकडे सिंहस्थ कुंभमेळ्यानंतर महापालिका प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे. सध्या या संगमाच्या पश्चिमेच्या बाजूला असलेल्या घाटजवळ तुंबलेल्या पाण्यावर शेवाळाचा थर जमा झाला आहे. हे शेवाळ काढण्याची तसदी महापालिका प्रशासन घेणार का, असा प्रश्न नागरिक करीत आहेत.

पंचवटी परिसरातील मंदिरांची संख्या लक्षात घेता हा परिसर धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित व्हायला हवा. मात्र, तसा प्रयत्न होताना दिसत नाही. नाशिकला आलेले भाविक मंदिरातील दर्शनानंतर काही काळ या परिसरात थांबू शकतील, येथील निसर्गरम्य वातावरणात निवांत बसतील, अशी व्यवस्था अजूनही पंचवटी परिसरात झालेली नाही. निसर्गरम्य वातावरणनिर्मिती तपोवन परिसरात होऊ शकेल, असे तेथील वातावरण असतानाही त्या दृष्टीने पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे सध्या पंचवटीतील विशेषतः तपोवनात येणाऱ्या भाविका-पर्यटकांवर येथील मंदिराव्यतिरिक्त फक्त कपिला संगमावरील ओबडधोबड खडकांचे दर्शन घेण्याची वेळ येत आहे.

सध्या गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी एकदमच कमी झालेली असल्याने कपिला संगमावरील सर्वच खडक उघडे पडले आहेत. या ठिकाणाहून वाहत असलेल्या पाण्याची दुर्गंधी पसरत आहे. संगमाच्या परिसरात येणारे पाणी अत्यंत घाण आणि दुर्गंधीयुक्त आहे. संगमाजवळच पाण्याचा प्रवाह खडकावर जोरात आदळतो. त्याच्या अगोदर संथ आणि साचलेल्या पाण्याच्या भागाकडे पर्यटकांचे लक्ष गेल्यास त्यांना येथील पाण्यावर पसरलेल्या शेवाळाचे दृश्य नजरेस पडत आहे. हे शेवाळ वाढून तेथे पाणवेलींची वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकदा पाणवेली वाढल्या म्हणजे त्यांची साफसफाईचे काम करण्याची वेळ येणार, त्यामुळे त्या अगोदरच येथील शेवाळ काढून घ्यायला हवे, अशी मागणी होत आहे.

---

रामायणातील महत्त्वाचे प्रसंग ज्या भागात घडले त्या तपोवन परिसराचा पाहिजे तसा विकास करण्यात आलेला दिसत नाही. येथील पाण्याच्या स्वच्छतेबाबतीतदेखील पुरेशी काळजी घेतली जात नाही.

-हितेशकुमार पटेल, पर्यटक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरीचे वाहन खरेदी केल्यास गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
शहरात ऑक्टोबर महिन्यापर्यंत ५२८ वाहने चोरीला गेली असून, त्यातील १०८ वाहने परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे. बहुतांश वेळी चोरीची वाहने अगदी स्वस्तात विकली जातात. खरेदीदार वाहनाची कोणतीही शहानिशा न करता खरेदी व्यवहार पार पाडतात. खरेदीदारांचे दुर्लक्षच वाहनचोरीच्या मुळाशी असून, यामुळे थेट खरेदीदारांवर गुन्हा दाखल करण्याचे काम शहर पोलिसांनी सुरू केले आहे.

गत वर्षीच्या तुलनेत यंदा वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसते. ऑक्टोबर २०१६ पर्यंत चोरट्यांनी ४६२ वाहनांवर हात साफ केला होता. तर पोलिसांनी ९५ वाहने परत आणण्यात यश मिळवले होते. यंदा वाहनचोरीचा आकडा ५२८ च्या घरात पोहचला असून, २० टक्क्यांच्या सरासरीने पोलिसांनी १०८ वाहने परत मिळवली आहेत. याबाबत क्राइम ब्रँचचे सहायक पोलिस आयुक्त अशोक नखाते यांनी सांगितले की, वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा सतत तपास करीत राहणे यावर पोलिसांचा भर आहे. नुकतेच गंगापूर पोलिसांनी पाचोरा येथून आठ वाहने जप्त केली. अगदी दोन मिन‌िटांत लॉक तोडून दुचाकी डायरेक्ट करून चोरटा थेट पाचोरा येथे वाहनाची विक्री करीत होता. ३० हजारांत बुलेट मिळाली म्हणून एका खरेदीदाराने तीन बुलेट विकत घेतल्या. या खरेदीदाराने कोणतीही शहानिशा करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे या खरेदीदारावर चोरीचा मुद्देमाल विकत घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. याच प्रकरणातील आणखी काही खरेदीदारांवरदेखील कारवाई होणार असल्याचे नखाते यांनी स्पष्ट केले. खरेदीदारच मिळाले नाही तर वाहनचोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध बसू शकतो, असे नखाते यांनी स्पष्ट केले. एका जिल्ह्यातील वाहन दुसऱ्या जिल्ह्यात विकण्याची प्रवृत्ती चोरट्यांमध्ये दिसून येते. त्यामुळे विभागातील अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदूरबार यासह शेजारील ठाणे जिल्ह्यातील पोलिसांशी सतत संपर्क ठेऊन माहितीचे आदानप्रदान केले जात आहे.

ऑनलाइनचा फायदा

पोलिसांनी वाहन चोरी तक्रार नावाचे अॅप सुरू केले आहे. हे अॅप पोलिसांपुरते मर्यादीत असून, चोरी झालेल्या वाहनांची नोंदणी या अॅपवर केली जाते. यामुळे गेल्या काही दिवसांत जवळपास ५० वाहने शोधली गेली असल्याची माहिती एसीपी नखाते यांनी दिली. या अॅप्ल‌िकेशनमध्ये सापडलेल्या अथवा हरवलेल्या, चोरी गेलेल्या वाहनाची नोंदणी होते. त्यामुळे दुसऱ्या पोलिस स्टेशनमार्फत याच वाहनाबाबत सापडल्याची नोंद झाली की एक अलर्ट मिळतो. या प्रकारे शहर हद्दीतील २५, तर इतर जिल्ह्यांमधील २५ पेक्षा अधिक वाहनांचा शोध लागला आहे.

वाहनचोरी तक्रार करा ऑनलाइन

वाहनचोरीची तक्रार ऑनलाइन करण्याची सुविधा उपलब्ध आहे. नाशिक शहर पोलिसांच्या http://nashikpolice.com/ या वेबसाइटवर वाहनचोरी तक्रारीसंबंधी आयकॉन असून, येथे क्लिक केल्यानंतर वाहनचालक आपली काही माहिती भरून रजिस्टर होऊ शकतो. अशा व्यक्तीला पुढे ऑनलाइन पद्धतीने तक्रार नोंदवता येऊ शकते. ऑनलाइन तक्रार नोंदवली गेल्याचा फायदा तपासादरम्यान होतो

दुचाकीचे लॉक तोडणे चोरट्यांसाठी काही सेकंदाचे काम आहे. यासाठी वाहनधारकाने अतिरिक्त लॉकिंग सिस्ट‌िम कार्यान्व‌ित ठेवावी. महागाडी दुचाकी असल्यास जीपीएसचा वापरही होऊ शकतो. खरेदीदारांनी लक्ष दिल्यास, तसेच वाहनधारकांनी थोडी काळजी घेतल्यास या गुन्ह्यांना आळा बसू शकतो.

- अशोक नखाते, सहायक पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नसबंदीबाबत शहरी पुरुषांची उदासीनता

$
0
0

नाशिक : स्त्री-पुरुष समानतेचा जागर करणारा शहरी पुरुष कुटुंबनियोजनाची दोरी मात्र महिलांच्या हातात देऊन नामानिराळा राहत असल्याचे दिसते. या वर्षात नाशिक जिल्ह्यात स्त्रियांच्या तुलनेत अवघ्या चार टक्के पुरुषांनी नसबंदी केली असून, त्यात ९० टक्के पुरुष हे आदिवासीबहुल भागातील आहे. शहरी भागातील अनास्था पाहून आरोग्य विभागाने आता पुढील १५ दिवस जनजागृती मोहीम घेण्याचे नियोजन आखले आहे.

लहान कुटुंब, सुखी कुटुंब ही संकल्पना मागील दोन दशकांत सर्वदूर पोहोचली. यातून कुटुंबनियोजन शस्त्रक्रियांनी गती पकडली. पुरुषांच्या तुलनेत महिलांसाठी ही शस्त्रक्रिया थोडी त्रासदायक असली तरी ही जबाबदारी त्यांच्या गळ्यात टाकली जाते. कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी पुरुष पुढेच येत नाही. एप्रिल २०१७ ते ऑक्टोबर २०१७ या कालावधीत जिल्हाभरात ९,७६० महिलांनी कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया करून घेतली. तेच पुरुषांचे प्रमाण अवघे चार टक्के म्हणजे ३८९ इतके होते. जिल्हा आरोग्य विभागाची ही माहिती असून, यामुळे शहरी भागातील महिलांकडे पाहण्याची मानसिकता पुढे येत असल्याचे एका तज्ज्ञ डॉक्टरने स्पष्ट केले. महिलांच्या तुलनेत पुरुषांची शस्त्रक्रिया सोपी असते. अवघ्या काही तासांत पेशंट पुन्हा कार्यरत होऊ शकतो; पण याकडे दुर्लक्ष करून शस्त्रक्रियांसाठी महिलांनाच पुढे करण्यात येते. या मानसिकेतसाठी अनेक घटक कारणीभूत ठरतात. मागील सात महिन्यांत नाशिक तालुक्यासह सिन्नर, नांदगाव, मालेगाव आणि देवळा तालुक्यात एकाही पुरुषावर कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया झालेली नाही.

आदिवासी पट्ट्यात पुरुषांची आघाडी

महिलांच्या अधिकाराबाबत शहरी भाग सजग असल्याचे म्हटले जाते. तुलनेत ग्रामीण अथवा आदिवासी भागात महिलांचे सामाजिक स्थान धोक्यात असल्याची ओरड केली जाते. मात्र, अशाच भागांमध्ये महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेत जास्त आढळते. कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रियेतसुद्धा येथील पुरुष महिलांच्या पुढे आहेत. आदिवासीबहुल असलेल्या पेठ तालुक्यात मागील सात महिन्यांत ७४ पुरुषांवर, तर अवघ्या १३ महिलांवर ही शस्त्रक्रिया पार पडली. सुरगाणा तालुक्यातसुद्धा १६९ महिलांपाठोपाठ २४८ पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रिया केली. त्र्यंबक तालुक्यात पुरुषांची संख्या ४१ इतकी आहे.

जनजागृतीसाठी प्रयत्न

कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रियांमध्ये पुरुषांचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने पुढील पंधरा दिवस जनजागृती करण्याचे नियोजन आखले आहे. या शस्त्रक्रियेचे फायदे समजावून सांगण्यासह शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी प्रवृत्त करण्यात येणार आहे. शहरी भागात जनजागृतीवर भर देण्यात येणार आहे.

तालुकानिहाय पुरुषांची नसबंदी शस्त्रक्रिया (कंसात महिलांची संख्या)

बागलाण ः १ (८६१), चांदवड ः ३ (६०३), देवळा ः ० (४४३), दिंडोरी ः ५ (७४१), इगतपुरी ः ५ (७९३), कळवण ः ७ (६४२), मालेगाव ः ० (९००), नांदगाव ः ० (४९२), नाशिक ः ० (९६७), निफाड ः ४ (११२४), पेठ ः ७४ (१३), सिन्नर ः ० (७०८), सुरगाणा ः २४८ (१६९), त्र्यंबकेश्वर ः ४१ (३२१), येवला ः १ (३५६), एकूण ः ३८९ (९१८३).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तरी ​ देवावरील आस्था कायम!

$
0
0

मालेगावातील मंदिरांच्या जागा झाल्या सुन्या

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हटवण्याची कारवाई पालिका व पोलिस प्रशासनाकडून सुरू होती. मालेगावसारख्या संवेदनशील शहरात हे काम तसे अवघडच होते. मात्र शनिवारी (दि. २५) रात्री उशिरापर्यंत ही मंदिरे हटवण्यात आली.

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मोसम पुलावर असलेले शनी मंदिर त्यातलेच एक. लोकांचे श्रद्धास्थान असलेले हे मंदिर व त्यातील मूर्ती विधिवत हटवण्यात आली. मात्र रविवारची (दि. २६) सकाळ या मंदिरात नित्यनेमाने दर्शनासाठी येणाऱ्यांसाठी काहीतरी चुकल्यासारखी होती. देऊळ आणि देव हटवण्यात आला असला तरी कळत नकळत 'त्या' पडक्या जागेला हात जोडून नमस्कार केला जात होता.

रविवारी (दि. २६) सकाळी एरवी गजबजलेली हे ठिकाण सुनेसुने झाले होते. या मंदिरामुळे अनेक फुल व पूजा साहित्य विक्रेते त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. अनेकांना मंदिर हटवण्यात आल्याची कल्पना नसल्याने 'त्या' फुलवाल्या आजींकडे विचारपूस करीत होते. त्यावेळी त्या आजी म्हणाल्या 'कुठन वरून तरी आदेश आला म्हणे आणि मंदिर हटविले, देव हलवला... लय वाईट वाटतंय बघ, अरे पण देव काय असा कुणाच्या हटविल्याने हलतो होय? तो तर अनेकांच्या हृदयात आहे. लोकांनी फक्त त्याला ओळखावा...!' आजींचे हे वाक्य शनी मंदिरावर श्रद्धा असलेल्या अनेकांना सुखावणारे होते. मोसम पुलावरील देवळातला देव हटला असला तरी मनातील आस्था आणि आशा कायम असल्याची भावना त्या पडक्या जागेला पाहत अनेकांनी बोलून दाखवली.

मोसम पुलावरील शनी मंदिर व हनुमान मंदिर गेल्या कित्येक वर्षांपासून भाविकांचे श्रद्धास्थान झाले होते. अगदी ये-जा करणारा प्रत्येकजण येथे नमस्कार करायचा. बाहेर गावाहून येणाऱ्या प्रवाशांनादेखील कळत-नकळत याचे दर्शन व्हायचे. शनी अमावस्येला तर भाविकांची चांगलीच गर्दी व्हायची. त्यामुळे अनधिकृत धार्मिक स्थळ म्हणून हे शनी मंदिरदेखील जाणार या बातमीनेच अनेकांना धक्का बसला होता. अखेर सर्वोच्च न्यायालयाचा आदेशाचे पालन करीत मंदिर विश्वस्त आणि स्थानिकांनी कायद्याचा आदर राखत मंदिर हटवण्याची तयारी दर्शवली आणि कारवाई निर्विघ्न पार पडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’निर्णयाने हरणबारी लाभार्थी नाराज

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील १६ गावांच्या सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी हरणबारी धरणाचे पाणी तळवाडे-भामेर लघु पाटबंधारे तलावात सोडण्यासाठी कालव्याच्या बांधकामास नुकतीच प्रशासकीय मान्यता देण्यात आली. मात्र दुसरीकडे हरणबारी मध्यम प्रकल्पातील डाव्या कालव्याची लांबी वाढविण्याच्या प्रकल्प कामांना सुरुवात केली जाणार नाही अथवा निविदा काढली जाणार नाही या अटींवर अधीन राहून ही मान्यता दिल्याने हरणबारी डावा कालवा लाभक्षेत्रातील गावांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

बागलाण तालुक्यातील हरणबारी मध्यम प्रकल्प हा तापी पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत समाविष्ट होतो. या प्रकल्पाचे पूर पाणी तळवाडे-भामेर लघु पाटबंधारे तलावात सोडणे या योजनेंतर्गत हरणबारी धरणाचे खालील बाजूस अंबापूर गावातील मोसम नदीवरील अस्तित्वातील कठगड बंधाऱ्यापासून २७.५० किलोमीटर लांबीचा तळवाडे-भामेर पोहच कालवा प्रस्तावित आहे. या योजनेअंतर्गत कठगड बंधाऱ्यापासून ५ किलोमीटर लांबीचा अस्तित्वातील कालव्याचे नूतनीकरण करणे, ६ ते २७.५० किलोमीटरपर्यंतचा नवीन कालवा काढणे प्रस्तावित आहे. हरणबारी मध्यम प्रकल्पाच्या सुधारित जलनियोजनानुसार सदर योजनेचा एकूण पाणीवापर ५०.८५ दलघफू इतका आहे. हरणबारी धरणाचे पूर पाणी सदर पोच कालव्याद्वारे नाल्यांमध्ये सोडून अस्तित्वातील तांदुळवाडी, जनुवणे, वाडीपिसोळ, एकलहरे पाझर तलाव, कोल्हापूर टाइप बंधारे व तळवाडे-भामेर लघु पाटबंधारे तलाव तसेच भविष्यकालीन योजनांचे ५० टक्के क्षमतेने पुनर्भरण करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पामुळे तालुक्यातील एकूण १६ गावांतील सुमारे ४९५ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे.

या योजनेस मागील सरकारने २००७-०८ मध्ये १० कोटी ९० लक्ष रुपयांस मंजुरी दिली होती. मात्र विद्यमान सरकारने पूर्वीच्या जलसंपदा विभागाच्या सर्व योजनांना गुंडाळल्याने उपरोक्त योजना गुंडाळली गेली. आमदार दीपिका चव्हाण, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी सातत्याने यासाठी पाठपुरावा केल्यानंतर सरकारने द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्तावास विशेष बाब म्हणून सुमारे ३३ कोटी ३५ लक्ष रुपयांच्या किमतीच्या सुधारित प्रकल्पास मान्यता दिली. मात्र सदरची मान्यता देत असताना जलसंपदा विभागाने तळवाडे-भामेर पोहच कालव्याचे काम करित असताना हरणबारी डाव्या कालव्याची लांबी वाढविण्याच्या कामास सुरुवात करता येणार नसल्याची मेख करून ठेवल्याने या लाभक्षेत्रातील ग्रामस्थांमध्ये कमालीची नाराजी व्यक्त होत आहे. परिणामी, या कामास जनतेचा विरोध होण्याची शक्यता लक्षात घेता आमदार दीपिका चव्हाण यांनी पुढील महिन्यात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्याचा निर्णय घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेची इमारत धूळ खात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

महापालिकेने सातपूर भागातील पिंपळगाव बहुला येथे अभ्यासिका, व्यायामशाळा व अन्य आस्थापनांच्या अनुषंगाने इमारत उभारली आहे. परंतु, गेल्या दहा वर्षांपासून ही इमारत धूळ खात पडून आहे. त्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांसह व्यायामप्रेमींना इमारत असूनही पुरेशा सोयी-सुविधांअभावी गैरसोय सहन करावी लागत आहे. ही इमारत संबंधित वापरासाठी खुली करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

महापालिकेची स्थापना झाल्यानंतर शहरालगत असलेल्या २३ खेड्यांचा समावेश महापालिका हद्दीत करण्यात आला. यामध्ये सातपूर भागातील पिंपळगाव बहुला गावाचाही समावेश महापालिकेत करण्यात आल्याने पुरेशा नागरी सुविधा मिळतील, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली होती. सन १९९२ मध्ये झालेल्या महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत लता दिनकर पाटील यांनी येथून बाजी मारली होती. त्यावेळी नगरसेविका पाटील यांनी पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवीत नागरी सुविधांचा प्रारंभ केला होता. त्यानंतर पिंपळगाव बहुल्याचे भूमिपुत्र माजी नगरसेवक राजू नागरे यांनी गावातील रस्ते व विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या. दिवंगत प्राध्यापक पंढरीनाथ नागरे यांच्या नावाने भव्य अभ्यासिका व व्यायमशाळेची इमारतीही बांधली. परंतु, तब्बल दहा वर्षांहून अधिक काळापासून महापालिकेने लाखो रुपये खर्च करून उभारलेली ही इमारत धूळ खात पडून असल्याचे चित्र आहे. या व्यायमशाळेत विद्युत विभागाचे पोल व नादुरुस्त झालेले लाइट टाकण्यात आले आहेत, तर अभ्यासिकेत गावातील तरुण स्वखर्चाने लाइटची व्यवस्था करीत घरून सतरंजी आणून अभ्यास करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

‘अच्छे दिन’चे आश्वासन देणारे भाजपचे चार नगरसेवक पिंपळगाव बहुला गावाच्या प्रभाग १० मध्ये आहेत. परंतु, एकही नगरसेवक गावात उभारण्यात आलेली अभ्यासिका व व्यायमशाळेच्या इमारतीकडे लक्ष देत नसल्याचा आरोप तरुणांनी केला आहे. केवळ अच्छे दिन येणार म्हणून मते मागणाऱ्या भाजप सरकारच्या वरिष्ठ नेत्यांनी, तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या इमारतीतील अभ्यासिका व व्यायमशाळेला साहित्य पुरवावे, अशी मागणी गावातील तरुणांनी केली आहे.

--

विद्यार्थीच करतात श्रमदान!

या इमारतीत उभारण्यात आलेली अभ्यासिका व व्यायामशाळेला पुरेशा सोयी-सुविधाच उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना गैरसोय सहन करावी लागत आहे. स्वतः लाइट बिल भरणे, साफसफाई करण्यासह घरून सतरंजी आणून त्यांना अभ्यास करावा लागत आहे. असे असूनही येथील अभ्यासिकेतून पाच तरुण पोलिस दलात भरती झाले आहेत. मात्र, असे असताना आणि भाजपचे चार नगरसेवक पिंपळगाव बहुला गावाच्या प्रभाग क्रमांक १० मध्ये निवडून आलेले असतानाही या इमारतीकडे दुर्लक्ष होत असल्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीच याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी गावातील तरुणांनी केली आहे.

--

पिंपळगाव बहुला गावातील अभ्यासिकेत अभ्यास करून पाच तरुण पोलिस दलात दाखल झाले आहेत. परंतु, अभ्यासिका व व्यायामशाळेत कुठल्याही प्रकारीच्या सुविधा नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. याकडे भाजपाचे वरिष्ठ नेते व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

-सागर नागरे, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिनेटचा निकाल आज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नवीन विद्यापीठ कायद्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पहिल्यांदाच पार पडलेल्या सिनेट निवडणुकीची मतमोजणी सोमवारी (दि. २७) पार पडणार आहे.

विद्यापीठाचे कार्यक्षेत्र असणाऱ्या पुण्यासह नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांपैकी नाशिकमधून सर्वाधिक मतदान झाले. नाशिककरांनी यंदा एकजुटीचे दर्शन घडवित विद्यापीठ निवडणुकीची खिंडही आशेने लढविली आहे. यामुळे विद्यापीठात आजवर अल्पसंख्येत राहणाऱ्या नाशिककरांचे वर्चस्व वाढणार का? याकडे जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पुणे विद्यापीठात मतमोजणीस सकाळी ११ वाजता प्रारंभ होईल. सिनेटच्या एकूण १० जागांसाठी ही लढत होत आहे. या जागांसाठी सुमारे ३७ उमेदवार रिंगणात आहेत. यांचे भवितव्य रात्री उशिरापर्यंत स्पष्ट होणार आहे. मतदान पारंपरिक पद्धतीने होते. त्यामुळे मतमोजणी प्रक्रियेला उशीर लागू शकतो. यंदा नाशिककर उमेदवारांनी या निवडणूकीसाठी एकूण मतदानाच्या ४० टक्के मतदान केले होते. तर पुणेकरांचाही उत्साह गतवेळच्या तुलनेत वाढला होता. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात सुमारे ४९ हजार मतदार आहेत. पैकी सुमारे २१ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

सुमारे १० हजारांवर मतदार नाशिक जिल्ह्यातून होते. पैकी सुमारे साडेचार ते पाच हजार मतदान एकट्या नाशिक जिल्ह्यातून झाल्याचा अंदाज आहे. या पाठोपाठ पुण्यातील मतदानाची आकडेवारी गत सिनेट निवडणुकांच्या तुलनेत वाढली आहे. गेल्या वेळी सिनेटसाठी पुणे जिल्ह्यात अवघे १५ टक्के मतदान झाले होते. यंदा ही आकडेवारी सुमारे ३० टक्क्यांपर्यंत नोंदविले जाण्याचा अंदाज आहे. त्यापाठोपाठ नगर जिल्ह्याचा प्रतिसाद आहे.

जिल्ह्याला प्रतिनिधित्वाची प्रतीक्षा
व्यवस्थापन गटातून संस्थाचालकांचे एकूण २२९ मतदान होते. पैकी २२७ मतदान झाले होते. ही आकडेवारी सुमारे ९९ टक्क्यांच्या घरात आहे. पुणे विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि या विद्यापीठाशी संलग्न कॉलेजेसची संख्या नाशिक जिल्ह्यातून लक्षणीय आहे. त्यानुसार जिल्ह्याला अधिसभेत योग्य प्रतिनिधित्वाची गरज आहे. या निवडणुकीसाठी नाशिकमधून व्यवस्थापन गटातून अशोक सावंत हे रिंगणात आहेत. पदवीधर सदस्यपदासाठी एकता पॅनलतर्फे ‘मविप्र’चे डॉ. तानाजी वाघ, राखीव गटातून ‘मविप्र’च्या तीसगांव शाळेतील मुख्याध्यापक विश्वनाथ पाडवी, व्ही. एन. नाईक संस्थेचे विजय सोनवणे तर प्रगती पॅनलच्या वतीने हेमंत दिघोळे हे रिंगणात आहेत. जयकर ग्रुप प्रणित विद्यापीठ विकास मंडळातर्फे अॅड. बाकेराव बस्ते हे उमेदवार नाशिकचे प्रतिनिधित्व करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेथीचा बहर; दरात घसरण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

हिवाळ्याच्या दिवसात सर्वात जास्त खाल्ली जाणारी पालेभाजी म्हणून मेथीची ओळख आहे. हिवाळ्यातील वातावरण वाढीसाठी पोषक असल्याने मेथीची लागवड इतर ऋतुंच्या तुलनेत वाढते. सध्या मेथीची लागवड वाढल्याने नाशिक मार्केटमध्ये मेथीची आवक प्रचंड झाली आहे. ऐरवी २५ ते ३० हजार जुड्यांची होणारी आवक तब्बल एक ते सव्वा लाख जुडीपर्यंत पोहचली असल्याने मेथीच्या लिलावातील दरात प्रचंड घसरण झाली आहे. ४ ते ८ रुपये जुडी असा मेथीला दर मिळत आहे.
खरिपाच्या हंगामातील पिके निघाल्यानंतर सिंचनाची सुविधा असलेल्या भागात पालेभाज्यांची लागवड मोठ्या प्रमाणात होते. विशेषतः दिंडोरी, निफाड, इगतपुरी आदी तालुक्यात पालेभाज्यांची लागवड वाढते. त्यात हिवाळ्यात वाढती मागणी लक्षात घेऊन मेथीची लागवड केली जाते. हिवाळ्यात ही पालेभाजी चांगली फोफावत असल्याने तिच्या लागवडीवर भर दिला जातो. यंदा पाऊस चांगला पडलेला आहे. परतीच्या पावसाने खरिपाच्या हंगामातील पिकांचे नुकसान केले असले तरी या पाण्यामुळे विहिरी आणि बोअरवेलच्या पाण्याची पातळी वाढलेली आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या पिकाखालील क्षेत्रात वाढ झाली आहे.

लागवडीकडे वाढता कल

काढणीस लवकर तयार होणाऱ्या पालेभाज्यांमध्ये मेथीची भाजी इतर भाज्यांच्या तुलनेत चांगली येते. त्यामुळे मेथीच्या लागवडकडे शेतकऱ्यांचा कल असतो. पावसाळ्यात जास्त पाऊस पडल्यास मेथीचे सडण्याचे प्रमाण वाढते. तसेच काढणीच्या वेळी पाऊस असल्यास काढणी करणे मुश्किल होत असते. उन्हाळ्यात जास्त उन्हाच्या तडाख्यात मेथी पिक जळून जात असल्याने या काळात लागवड कमी होते. सध्या लागवड वाढल्यामुळे मेथीची आवकही वाढली आहे. नाशिक मार्केटमध्ये मागणी स्थिर असल्यामुळे मेथीचे दर खाली आले आहे. किरकोळ विक्रीत मात्र, मेथी १० ते १५ रुपये जुडी अशी विकली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेचा मृत्यू; हॉस्पिटलविरोधात तक्रार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नैसर्गिक प्रसूतीनंतर दहाच मिनिटांत तब्येत खराब होऊन महिलेचा मृत्यू झाला. यात हॉस्पिटलचा भोंगळ कारभार आणि डॉक्टरांकडून झालेली टिट्रमेंट कारणीभूत असल्याचा आरोप करीत संबंधित महिलेच्या पतीने महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे दिलेल्या तक्रारीत केला आहे. तक्रार ७ नोव्हेंबर रोजी येऊनही अद्याप अहवाल समोर आलेला नाही.

तेजल सागर शिरोडे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. ‌त्यांचा ७ ऑक्टोबर रोजी नैसर्गिक प्रसूती झाल्यानंतर मृत्यू झाला. या प्रकरणी महिलेचा पती सागर प्रतापराव शिरोडे यांनी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे लेखी तक्रार केली असून, त्यात डॉ. गणोरकर हॉस्पिटलच्या डॉ. शिल्पा तथा वृषाली राजाध्यक्ष मृत्यूस कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे. तेजल यांना प्रसूतीपूर्वी रक्तदाबाचा त्रास होत होता. मात्र, डॉक्टरांनी दुर्लक्ष केले. तसेच प्रसूतीदरम्यान चुकीचे इंजक्शन दिल्याने तेजलच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला. नैसर्गिक प्रसूती होऊनही तेजलची तब्येत कशी बिघडली याचे ठोस कारण डॉक्टरांनी दिले नसल्याचे शिरोडे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, तेजल यांना प्रसूतीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले; त्यापूर्वी एक दिवस त्रास झाला. मात्र, त्यांना उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले नाही. प्रसूतीनंतर अत्यवस्थ झाल्यानंतर तेजल यांना सुयश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे डॉ. राजाध्यक्षांसह इतर डॉक्टरांनी तपासणी केली. तसेच प्रकृतीत सुधारणा होईल, अशा अपेक्षेवर वेगवेगळ्या चाचण्या करण्यात आल्या. प्रत्यक्षात तेजलाचा मृत्यू झाला. यामागे डॉक्टरांचा निष्काळजीपणा कारणीभूत असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी शिरोडे यांनी केली आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने अशा प्रकरणांची चौकशी गतीने करावयस हवी, असेही शिरोडे यांनी स्पष्ट केले.

अॅक्यूट शॉकने मृत्यू
नैसर्गिक प्रसूतीनंतर त्रास होऊन त्यात महिलांचा मृत्यू होऊ शकतो. तेजल शिरोडे यांना अॅक्यूट शॉक बसला होता. कोणतीही चुकीची ट्रिटमेंट झालेली नसून, या प्रकाराची चौकशी वैद्यकीय विभाग करीत असल्याचे डॉ. गणोरकर हॉस्पिटलच्या डॉ. शिल्पा तथा वृषाली राजाध्यक्ष यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शिरोडे दाखल झाल्या त्यावेळी त्या अत्यवस्थ होत्या. त्यांच्यावर डॉ. राजाध्यक्ष यांनीच उपचार केले. हॉस्पिटलच्या फक्त सुविधेचा वापर केला गेला, असे सुयश हॉस्पिटलच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘नार-पार’साठी सर्वपक्षीय लढा

$
0
0

वांजूळ पाणी संघर्ष समितीच्या बैठकीत निर्धार

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

'पार-तापी-नर्मदा' ही गुजरात राज्याची योजना असून, नाशिक येथील बैठकीत नार-पार नदीजोड प्रस्ताव बदलल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला देताना आपल्या भागातील जनतेवर अन्याय होणार नाही यासाठी व गिरणा खोऱ्यात पाणी यावे यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असून, हक्काचे पाणी गुजरातला देण्यास विरोध आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी केले.

वांजूळ पाणी संघर्ष समितीच्या वतीने नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्प, मांजरपाडा २ प्रकल्प व इतर वळण बंधारे योजना याबाबत पुढील लढ्याची दिशा ठरवण्यासाठी गिरणा खोऱ्यातील सहा तालुक्यांतील सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते यांची बैठक रविवारी (दि. २६) आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी राज्यमंत्री भुसे बोलत होते. या बैठकीस शांताराम आहिरे, डॉ. विलास बच्छाव, समाधान हिरे, यशवंत आहिरे आदींसह सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी अॅड. शिशिर हिरे यांनी प्रास्ताविक करीत संघर्ष समितीची भूमिका स्पष्ट केली. गिरणा खोऱ्याला पाणी मिळावे यासाठी एकत्रित येण्याचे आवाहन त्यांनी केले. तर समितीचे अनिल निकम यांनी, 'गिरणा खोऱ्यातील सहा तालुक्यांना हकाचे पाणी मिळणे यासाठी वांजूळ संघर्ष समिती लढा देणार आहे, असे सांगितले. महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरात राज्याला देताना आपल्या भागातील जनतेवर अन्याय होणार नाही, याची दखल घेतली जाईल, अशी ग्रवाही राज्यमंत्री दादा भूसे यांनी दिली. यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याची माहितीही भुसे यांनी दिली.

हक्काच्या पाण्यापासून वंचित

पार-तापी-नर्मदा प्रकल्पाच्या डीपीआरमधून नार-पार प्रस्ताव बदलण्यात आल्याने गिरणा खोरे हक्काच्या पाण्यापासून वंचित राहणार असल्याने या योजनेस विरोध आहे. तसेच गिरणा नदीवरील तिन्ही कालव्यांचे रुंदीकरण करावे, तापी नदीच्या धर्तीवर गिरणा व मोसम नदीवरदेखील बॅरेज बांधावे, या प्रमुख मागण्या त्यांनी यावेळी बोलताना केल्या. या बैठकीच्यावेळी पंकज निकम, विश्वास देवरे, प्रशांत देवरे, शेखर पवार आदींनी नार-पार प्रश्नी आपली भूमिका सविस्तरपणे विषद केली. बैठकीत गिरणा खोऱ्याच्या हक्काच्या पाण्यासाठी सर्वपक्षीय लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला. या वेळी वांजूळ संघर्ष समितीचे निखील पवार, कुंदन चव्हाण, देवा पाटील, विजय देवरे, संजय देवरे, शक्ती दळवी, प्रभाकर शेवाळे आदींसह दहीकुटे संघर्ष समिती सदस्य, गिरणा खोऱ्यातील लोकप्रतिनिधी, राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वातंत्र्यलढ्यात संघाचा सहभाग नव्हता

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधीच सहभाग घेतला नाही. या लढ्यात स्वातंत्र्यसेनानीच्या डोक्यावर सफेद टोपी होती व त्यांचा सहभाग देशासाठी होता. पण, राष्ट्रीय स्वयंसेवकांची काळी टोपी होती असे सांगत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी संघावर टीका केली. संविधान दिनाच्या कार्यक्रमासाठी नाशिकला आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाध साधला. त्यावेळी त्यांनी संघाबरोबरच भाजपवरही निशाना साधला.

गुजरातमध्ये निवडणूक ही मोदी सरकार विरुध्द जनता अशी आहे. येथे मतदान यंत्रांशी छेडछाड केली नाही, तर ही निवडणूक निश्चितपणे काँग्रेस जिंकणार आहे. या ठिकाणी कोणताही वर्ग सुखी नाही. व्यापारी जीएसटीमुळे नाराज आहे. शेतकरी आत्महत्या करतो आहे. तरुणांना रोजगार नाही. त्यामुळे ही निवडणूक भाजपसाठी सोपी नाही. यावेळी त्यांनी ‘देश में विदेशी आका के इशारे पे सरकार काम कर रहीं है’ असे सांगून भाजपला चिमटा काढला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या राम मंदिरच्या वक्तव्यावर बोलताना मोहन प्रकाश म्हणाले, की एक मुद्दा बार बार नहीं चलता, १९९४ पासून ते हेच बोलत आहेत.

यावेळी त्यांनी निवडणूक प्रकियेवरही आक्षेप नोंदवला. आतापर्यंत देशात ठिकठिकाणी मतदान मशिनमध्ये घोटाळे झाल्याचे समोर आले. पण, निवडणूक आयोगाने घोटाळा झाले नसल्याचे सांगितले. त्यांनी जर असे सांगितले तर सर्व निवडणुका रद्द कराव्या लागल्या असत्या. खरं तर विश्वास निर्माण होईल अशी निवडणूक पध्दत हवी व ती बॅलेट पेपरच आहे. हे माझे व्यक्तिगत मत असले तरी पार्टीची भूमिका विश्वास निर्माण करणारी मतदान यंत्रणा असावी, असेही त्यांनी सांगितले. यावेळी काँग्रसचे प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष अॅड. शरद आहेर, नगरसेवक शाहू खैरे, राहुल दिवे यांसह काँग्रसचे पदाधिकारी उपस्थित होते.

संविधान दिन साजरा

स्वातंत्र्यानंतर संविधानाने देशात मूलभूत हक्क दिले पण, भाजप सरकारने या हक्कावर गदा आणण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये आम्ही संविधान दिन साजरा केला. घटनेचे महत्त्व पटवून देण्यासाठी काँग्रेसतर्फे रविवारी ग्रीन व्ह्यू हॉटेलमध्ये संविधान दिन साजरा करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी घटनेच्या अधिकारासाठी जनजागृती केली जाणार असल्याचे सांगून त्यांनी घटनेचे महत्त्वही सांगितले. नाशिकबरोबर डॉ. बाबासाहेब आंबडेकराचे वेगळे नाते असून, येथे चळवळीला बळ मिळाले असल्याचे अधोरेखित करण्यासाठी चित्रप्रदर्शनाचे आयोजन केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएसआय जाधवचा जेलचा मुक्काम कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आर्थिक गुन्ह्यात साक्षीदार असलेल्या व्यक्तीला आरोपी म्हणून सादर न करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेतील पोलिस उपनिरीक्षक निवांत जाधव यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली असून, ५ डिसेंबरपर्यंत जाधवचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.

मोफा कायद्यान्वये दाखल असलेल्या गुन्ह्यातील साक्षीदारास आरोपी न करण्याच्या मोबदल्यात जाधव यांनी ५० हजार रुपयांची लाच मागून हे पैसे स्वीकारले होते. लाचलुचपत प्रति‌बंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने जाधव यांना त्यांच्याच घराजवळ रंगेहाथ जेरबंद केले होते. हा प्रकार १७ नोव्हेंबर रोजी घडला होता. कोर्टाने संशयित जाधव यांना दुसऱ्या दिवशी न्यायालयीन कोठडी सुनावली. यामुळे जाधव यांची लागलीच सेंट्रल जेलला रवानगी करण्यात आली. जाधव विरोधात आणखी काही तक्रारी समोर आल्या असून, त्याचीही माहिती एसीबी घेत आहे. दरम्यान, गत सोमवारी (दि. २०) जाधव यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार होती. मात्र, ती आठवडाभर पुढे ढकलण्यात आली. सोमवारी या प्रलंबीत जामीन अर्जावर कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता होती. मात्र, कोर्टाने पुन्हा आठ दिवसांनंतर सुनावणी ठेवली आहे. आता जाधव यांच्या जामीन अर्जावर येत्या मंगळवारी (दि. ५ डिसेंबर) सुनावणी होणार असून, पोलिस दलाचे लक्षही याकडे लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिन्याला १०० जणांची घरातून धूम!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वेगवेगळ्या कारणांनी मागील १० महिन्यात १८ वर्षांपुढील बाराशे सज्ञान व्यक्ती बेपत्ता झाल्या आहेत. यात महिलांचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक आहे. अगदी बोटावर मोजण्याइतपत व्यक्ती वृद्ध काळातील विविध आजारांमुळे, काही व्यक्ती कौटुंबिक कलहामुळे सोडतात. तर बहुतांश व्यक्ती अनैतिक संबंधामुळे घरातून पळ काढतात, असे पोलिसांच्या तपासात स्ष्ट झाले आहे.

जानेवारी ते ऑक्टोबर या काळात ५३१ पुरुष तर ६१४ महिला बेपत्ता झाल्याची नोंद शहरातील १३ पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली. यातील ४१४ पुरुष तर ४८४ महिलांचा शोध घेण्यात पोलिसांना यश मिळाले. साधारण महिनाभरात १०० व्यक्ती घर सोडून गेल्याचे यावरून स्पष्ट होते. ० ते १८ वयोगटातील मुलांच्या बाबतीत पोलिस थेट अपहरणाचा गुन्हा दाखल करतात. तर, १८ वर्षांपुढील वयोगटातील व्यक्ती घर सोडून गेल्यास मिसिंगची नोंद होते. गत काही वर्षांपासून वेगवेगळ्या कारणांनी घर सोडून पळणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. याबाबत गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त अशोक नखाते यांनी सांगितले, की वृद्धापकाळातील आजारपण, आर्थिक व्यवहार किंवा कौटुंबिक वादांमुळे व्यक्ती घर सोडण्याचा निर्णय घेतात. तक्रार समोर आल्यानंतर पोलिस तपास करून संबंधित व्यक्तीचा शोध घेतात. सध्या अनैतिक संबंधामुळे विवाहित स्त्री-पुरूष बेपत्ता होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे.

दरम्यान, अनैतिक संबंधाचा अप्रत्यक्ष ताण यानिमित्ताने पोलिस दलावर पडत असून, काही कर्मचाऱ्यांना सतत याच कामी नियुक्ती द्यावी लागत असल्याचे अंबड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी सांगितले. बेपत्ता प्रकरणात ८० टक्के व्यक्ती विवाहबाह्य संबंधांमुळे घर सोडतात. विवाहित स्त्री-पुरुषांच्या या निर्णयामुळे दोन कुटुंब उघड्यावर पडतात. अनेक भावनिक प्रश्न निर्माण होतात. शोधून काढलेल्या व्यक्तींनी घरी परत येण्यास नकार दिल्यानंतर पोलिसांना काहीच करता येत नाही. १८ ते २४ या वयोगटातील अविवाहित मुलांनी घर सोडून जाणे आणि विवाहित असलेल्या व्यक्तींनी घर सोडणे यात फरक असून, दुर्दैवाने हा प्रश्न गंभीर बनत असल्याकडे कड यांनी लक्ष वेधले.

प्रेमप्रकरणातून अल्पवयीन बेपत्ता

वर्षभरातील पहिल्या १० महिन्यात १८ वर्षांखालील १३६ मुली बेपत्ता झाल्या. यातील ११५ मुलींचा शोध घेण्यात आला. तर बेपत्ता झालेल्या ४० मुलांपैकी ३४ मुलांना पोलिसांनी शोधून पालकांच्या स्वाधीन केले. बेपत्ता होणाऱ्या अल्पवयीन मुलांमध्ये ७० ते ८० टक्के प्रकरणे प्रेमप्रकरणाशी निगडीत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. शाळा, कॉलेज शिक्षण घेणारे मुले पळून जातात. या वयोगटातील मुले स्वतः पळून गेली तरी याबाबत अपहरणाचा गुन्हा दाखल केला जातो. मुलगी अल्पवयीन आणि मुलगा सज्ञान असल्यास त्याच्याविरोधात खटला सुरू होतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जॉब फेअरमध्ये १४ तरुणांना नोकरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कृषीथॉन प्रदर्शनामध्ये आयोजित जॉब फेअरमध्ये निवड होऊन १४ विद्यार्थ्यांना थेट नोकरीची संधी मिळाली. तसेच ७५ उमेदवारांना लवकरच कंपनीतर्फे कळविण्यात येणार आहे. २२५ पेक्षा जास्त उमेदवारांनी या जॉब फेअरमध्ये मुलाखत दिली. यात युवतींचाही समावेश होता. २८ कंपन्यांनी जॉब फेअरमध्ये सहभाग घेतला.

कृषीथॉन २०१७ मध्ये सोमवारी अखेरच्या दिवशी जॉब फेअर झाला. सिल्व्हर इंजिनीअरिंगचे प्रकाश टाले, सिग्नेटा फाउंडेशनचे रवींद्र कुमार कात्रे, भन्साळी अॅग्रीकल्चर इम्पलीमेंट्स, श्रीराम अॅग्रीकल्चरचे अश्विन पटेल, बालाजी टायर्सचे सूरज धूत, मोगल अॅग्रोटेक्नॉलॉजीचे आदित्य मोगल, सानप अॅग्रो मशिनरीजचे रामदास सानप, मोरया ट्रॅक्टर्सचे रतन गिते, यमुना इंडस्ट्रीजचे मोहित कार्तिकेय, श्री एकविरा एरिगेशनचे सुनील शिंदे, डॉल्फिन जिओमेम्बरेन धरमसिंग राठोड, एम्बी इंडस्ट्रीजचे योगेश पाटील, ‘टफरोप्स’चे दीपक कुटे, ‘प्रभू अॅग्रो’चे हरिओम जयस्वाल, इझीफार्म अॅग्रोटेकचे अमोल गायकवाड, सुभद्रा इस्टेटचे डी. ए. गवळी, फिश्फा बायोजेनेसीसचे अमोल शिंदे, आयरिस पॅलीमर्सचे गजानन पवार यांनी मुलाखती घेतल्या. सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ ऑपेरेशनल मॅनेजमेंट हि शैक्षिणिक संस्था जून २०१८ पासून एमबीए ईन अॅग्रो बिझिनेस हा पद्‍वीत्तर अभ्यासक्रम सुरू करीत आहे. डॉ. वंदना सोनवणे आणि राजेश करजगी यांनी १६० विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या.

१७ कंपन्यांचा गौरव

कृषीथॉन २०१७ प्रदर्शनाच्या समारोपानिमित्त स्टॉलधारकांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये किर्लोस्कर ब्रदर्स लि., फिश्फा बायोजेनिक, ऑटो नेक्स्ट, पूर्वा केमटेक प्रा.लि., बेदमुथा इंडस्ट्रीज लि., महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, जॉहन डेअर, टाइयो इंडिया प्रा. लि., मॉनसन्टो होर्डींग्ज प्रा. लि., एम्बी इंडस्ट्रीज, एस्कॉर्ट लि., फोर्स मोटर्स, सिल्व्हर इंजिनीअरिंग, टेकबझ्झ, यारा फर्टीलाईझर्स इंडिया प्रा. लि, बालकृष्णा इंडस्ट्रीज लि., इंटरनॅशनल ट्रॅकटर लि, व्हिएसटी ट्रॅक्टर लि. मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

‘नाडा’च्या कृषी निविष्ठकांचा सन्मान

नाशिक डिस्ट्रिक्ट अॅग्रोडिलर्स असोसिएशनच्या (नाडा) उत्कृष्ट सभासदांचा कृषीथॉन प्रदर्शनात सत्कार झाला. पालकमंत्री गिरीश महाजन व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते त्यांना उत्कृष्ट कृषी सेवा दिल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. ‘नाडा’चे अध्यक्ष विजूनाना पाटील यांनी नाशिकमधील कृषी निविष्टकांना यवतमाळचा न्याय लावू नये अशी राज्य सरकारला विनंती केली. याप्रसंगी राजेंद्र बडगुजर, मोहन म्हैसधुणे, संतोष ललवाणी, ईश्वर पाटील, यशवंत मोरे, काकासाहेब भालेराव, रवींद्र भामरे, महेश सोनवणे, अशोक गवळी, महेंद्रकुमार बोरा, संजय भालेराव, भारत सोनवणे, विजय दौंड, दिलीप गायधनी, विलास भालेराव, हिरामण आडके, संजय हिरावत, भूषण खिवंसरा व किरण पिंगळे यांचा प्रशस्तिपत्रक देऊन गौरव करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images