Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

होर्डिंग्जद्वारे चमकोगिरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिकरोड परिसरात सध्या शुभेच्छापर होर्डिंग्जचे पेव फुटले असून, ‘पार्टी विथ डिफरंट’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्यात आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. भाजपसह इतरही काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची ही चमकोगिरी सार्वजनिक रहदारीला अडथळा ठरू लागली आहे.

सत्ताधारी भाजपच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनीही होर्डिंग्जची नियमावली पायदळी तुडविली असून, भाजपच्या कार्यकर्त्यांनी शहरात चक्क सिग्नल अन् हायमास्टच्या खांबांनाच होर्डिंग्ज लावले असल्याची स्थिती आहे. महापालिकेत सत्तेत असणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी होर्डिंग्जविषयीचे नियम तोडण्याचा सपाटाच लावला असल्याने शहरात विद्रुपीकरण वाढले आहे.

सध्या नाशिकरोडमधील वर्दळीच्या मुख्य चौकांत बेकायदेशीर होर्डिंग्जचा सुळसुळाट झाला आहे. शहरातील शिवाजी पुतळा, उड्डाणपुलाखालील परिसर, विभागीय आयुक्तालय रस्ता, बिटको चौक, दत्त मंदिर सिग्नल, एकलहरे टी पॉइंट, सिन्नर फाटा अशा ठिकाणी अनधिकृत होर्डिंग्जचा सुळसुळाट झाला आहे. महापालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणांशिवाय इतरत्र होर्डिंग्ज लावण्यास मनाई असतानाही महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या कार्यकर्त्यांनीच या नियमाला केराची टोपली दाखवत शहरात ठिकठिकाणी अनधिकृत होर्डिंग्ज उभारल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

--

खांबांचा सर्रास वापर

शहरातील मुख्य चौकांतील सिग्नल आणि हायमास्ट दिव्यांच्या खांबांनाही चमकोगिरी करण्यासाठी भाजपासह इतर काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी होर्डिंग्ज लावले आहेत. याशिवाय काही ठिकाणच्या होर्डिंग्जमुळे सार्वजनिक रहदारीलाही अडथळा होत आहे. मुख्य रस्त्यांवरही लोखंडी खिळे ठोकून बांबू बांधण्यात आल्याने रस्त्यांचीही नासधूस झाली आहे.

--

प्रशासनाचा कानाडोळा

शहरातील बहुतांश होर्डिंग्ज महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या कार्यकर्त्यांनीच लावलेले असल्याने महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग या बेकायदेशीत होर्डिंग्जप्रश्नी बघ्याची भूमिका घेत आहे. महापालिका प्रशासनाच्या या धोरणामुळे शहराचे विद्रुपीकरण वाढले असून, होर्डिंग्जबाबतच्या न्यायालयीन निर्देशांचेही उल्लंघन झालेले आहे. काही ठिकाणचे होर्डिंग्ज वाहनचालकांसाठी जीवघेणे ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आमोदे आश्रमशाळेला ‘आयएसओ’

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मनमाड

नांदगाव तालुक्यातील आमोदे येथील श्री साई शिक्षण संस्था संचलित ज्ञानदीप प्राथमिक व कै वामनराव सोनुजी पगार माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित आदिवासी आश्रमशाळेला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. आदिवासी विभागाच्या कळवण प्रकल्पांतर्गत अशा प्रकारचे मानांकन मिळविणारी ही प्रकल्पातील दुसरी आश्रमशाळा असून, यापूर्वी बाभुळणे येथील शाळेला हे मानांकन मिळाले आहे. शिवाय नांदगाव तालुक्यातील अशा प्रकारचे मानांकन मिळविणारी पहिलीच आश्रमशाळा ठरली आहे.

मानांकन मिळविल्याबद्दल शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी संस्थेचे सरचिटणीस अण्णासाहेब पगार व त्यांच्या मुख्याध्यापक,अधीक्षक सहकारी शिक्षक यांचे अभिनंदन केले. संस्थेचे सरचिटणीस आण्णासाहेब पगार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली प्राचार्य एस. ए. पाटील व त्यांच्या सर्व शाखांतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी यासाठी परिश्रम घेतले. शाळेला कंपाऊंड, इमारतीची रंगरंगोटी परिसर स्वच्छ ठेवण्यसाबोतच शैक्षणिक आमूलाग्र बदल घडविणे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, शालेय दप्तर व व्यवस्थापन याबाबत विशेष नियोजन, प्रत्येक झाडाला नामफलक, कुंड्या, सुविधादर्शक फलक पाण्याचे व्यवस्थापन, पोषण आहार, दर्जेदार सुविधा, पूर्णपणाने संगणीकृत शालेय कामकाज, इ-लर्निंग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह व अध्ययनासाठी स्वतंत्र वेगळी इमारत अशा प्रकारच्या नेटक्या नियोजनामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना प्रगत आधुनिक शैक्षणिक प्रवाहात सहभागी होता आले.

२८ वर्षांपासून कार्यरत

गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून श्री साई शिक्षण संस्था आश्रमशाळेच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना अविरतपणे ज्ञानदानाचे काम करीत आहे. शाळेची गुणवत्ता व दर्जा टिकवून त्यात आदिवासी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हा हेतू ठेवून संस्थेचे काम सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत भाजपची आज बैठक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे यांनी आैरंगाबाद येथे भाजपच्या आढावा बैठकीत आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार, असे संकेत दिल्यानंतर नाशिकला ते काय मंत्रा देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपची उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आज, रविवारी (दि. २६) सकाळी ९.३० वाजेपासून गंजमाळ येथील हाॅटेल रॉयल हेरिटेज येथे होणार आहे. त्यासाठी भाजपचे विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, नंदुरबार जिल्ह्यांतील पदाधिकारी व खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत.

राज्यभर भाजपातर्फे आढावा बैठक घेण्याचे सत्र दानवे यांनी सुरू केले असून, रविवारी नाशिक येथेही आढावा बैठक होणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. या बैठकीत संघटना बांधणीवर भर देण्याबरोबरच बूथ यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी काय करता येईल यावर दानवे मार्गदर्शन करणार आहेत. त्याचप्रमाणे वर्षभराच्या कामाचा आढावा घेण्यात येणार असून, दिलेल्या कार्यक्रमानुसार पदाधिकाऱ्यांनी कामे केली किंवा नाहीत याची माहिती ते घेणार आहेत. त्याचप्रमाणे भाजपच्या विविध आघाड्यांच्या कामाची ते माहिती घेणार आहेत. नाशिकचे भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप, आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, महापौर रंजना भानसी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी स्वागत करणार आहेत.

--

कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन

सुकाणू समितीच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी दानवे यांचे खास स्वागत करण्याचे नियोजन करून बेशरमचा हार आणला होता. त्यामुळे रविवारी ते काही करतात का यावर पोलिसांची बारीक नजर असणार आहे. बैठकीच्या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तही तैनात करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तपोवन पुलाची अखेर दुरुस्ती

$
0
0

कित्येक दिवसांपासूनची मागणी पूर्ण

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

पावसाळ्यात पुराच्या पाण्यामुळे नादुरुस्त झालेल्या तपोवनातील पुलाजवळ या पुलावरून जाऊ नये, असा फलक लावण्याची वेळ महापालिकेवर आली होती. या पुलाची आता दुरुस्ती करण्यात आली आहे. या पूलावर लाकडी बल्ल्या बसविण्यात आल्यामुळे पुलावरून पलीकडच्या बाजूला जाणे शक्य होऊ लागले आहे. दुरुस्तीनंतर आता तपोवनात येणारे भाविक आणि पर्यटक हा पूल ओलांडून जाऊ लागले आहेत. त्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.

तपोवनातील मुख्य आकर्षण असलेल्या कपिला संगमाकडे दुर्लक्ष झालेले होते. गेल्या कित्येक दिवसांपासून याबाबत नागरिकांसह पर्यटकांनीही या पुलाच्या दुरुस्तीची मागणी लावून धरली होती. मात्र त्याकडे प्रशासन लक्ष देत नव्हते.

मात्र पावसाळ्यानंतर प्रशासनाकडून या नादुरुस्त पुलाची तातडीने दुरुस्ती करण्यात आल्याने अखेर या पुलाच्या दुरुस्तीला मुहूर्त लागला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये येणाऱ्या पर्यटकांना तपोवन परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणांना पाहता येणे शक्य झाले आहे. तसेच त्यांच्या या मागणीचाही प्रशासनाने विचार केल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. यामुळे पर्यटकांची वाट सुकर होणार आहे.

स्वच्छतेकडेही लक्ष द्या

प्रत्येक सिंहस्थ कुंभमेळ्यानंतर हा भाग ओसाड पडल्यासारखा होत असतो. याठिकाणी असलेल्या श्रीराम पर्णकुटी, लक्ष्मण मंदिर, शूर्पणखा मंदिर, संगमावरील अग्निकुंड बघण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात. यावेळी कपिला संगमावर स्नान करण्याचीही भाविकांची इच्छा असते. मात्र, येथे येणारा पाण्याचा प्रवाह हा घाण आणि दुर्गंधीयुक्त असल्यामुळे त्याचा त्रास येथे येणाऱ्यांना होत असतो. त्यामुळे हे पाहून भाविक आणि पर्यटक लगेच काढता पाय घेतात. तरी, याबाबतही प्रशासनाने याकडेही लक्ष देत ही समस्या सोडवण्याची मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीवघेण्या विहिरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडको आणि इंदिरानगर हा भाग मुळातच सर्व शेती, मळे विभागांचा होता. शहराच्या विस्तारात या भागाचा विकास झपाट्याने झाला असला तरी सिडको व इंदिरानगर भागात आजही अनेक धोकादायक विहिरी नजरेत पडत असून, या विहिरींमुळे अनेकांना आपला जीवसुद्धा गमवावा लागला आहे.

सध्या तर या विहिरी म्हणजे सिडको आणि इंदिरानगर परिसरातील कचराकुंडीच बनल्या आहेत. त्यांना या कचऱ्यामुळे बकाल स्वरुप प्राप्त झाले असून, स्मार्ट सिटीकडे वाटचाल होत असताना या विहिरींकडे लक्ष देण्यास स्थानिक नगरसेवकही दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. प्रशासनाला तर याबाबत काही देणेघेणे नसल्याचे दिसून येत आहे. अनेक विहिरी या आजसुद्धा रस्त्याच्या मधोमध येत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघातही होत असल्याचे दिसत आहे. नाशिकच्या शहराच्या विकासात झपाट्याने विकसित झालेला भाग म्हणजे सिडको व इंदिरानगर हा होय. सिडको व इंदिरानगर भाग हा पूर्वीपासून मळे विभाग म्हणून ओळखला जात होता. मळ्यांचे रुपांतर प्लॉटमध्ये झाले आणि त्याठिकाणी टोलेजंग इमारती व बंगले उभे राहिले आहेत. या भागाचा आता विकास झाला असला तरी याठिकाणी अनेक समस्या आजही प्रलंबित राहिल्या आहेत. महापालिकेत निवडून गेलेले नगरसेवक व महापालिकेतील प्रशासनाच्या अनेक समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे वारंवार दिसून येत आहे.

रुंदीकरणास अडथळा

इंदिरा नगरातील पूर्वीच्या विहिरी आजही तशाच असून, या विहिरी आता परिसरातील नागरिकांना डोकेदुखी ठरत आहे. इंदिरानगर येथील शंभर फुटी रस्त्यावर मधोमध एक विहीर असून, या विहिरीमुळे रस्ता रुंदीकरणास अडथळा निर्माण होत आहे. याठिकाणी चार रस्ते एकत्र येत असल्याने व ही विहीर रस्त्याच्या मधोमध असल्याने वाहतूक कोंडी होऊन अनेक अपघातही झालेले आहेत. येथील अपघातांमध्ये अजूनपर्यंत एकही जीवितहानी झालेली नसली तरी ही हानी होण्याची प्रशासन वाट पाहत आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. ही विहीर पूर्वी याठिकाणी असलेल्या शेती कामासाठी वापरली जात होती, मात्र आता सर्वत्र रहिवास क्षेत्र झाल्याने या विहिरीचा फारसा वापर होत नाही. नागरिकांनी महापालिकेला कळवून विहीर बंद करण्याची मागणी केली आहे.

रस्त्याच्या कडेला असलेल्या या विहिरीचा कोणताही वापर होत नसला तरी आजूबाजूचे किंवा या रस्त्याने ये-जा करणारे अनेक नागरिक या विहीरीत सर्रासपणे कचरा टाकत असतात. त्यामुळे या विहिरीला आता कचराकुंडीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. या विहिरीच्या आजूबाजूला काही झाडे लावून ठेवले असल्यामुळे याठिकाणी विहीर असल्याचे तरी लक्षात येत असते.

अपघाताला निमंत्रण

सिडको परिसरातही बरेच मळे विभाग असून, येथील विहिरीसुद्धा अशाच पद्धतीने धोकादायक झालेल्या आहेत. काही विहिरींजवळ तर कचराच असल्याने याठिकाणी विहीर असल्याचेच लक्षात येत नाही व त्यामुळे वारंवार अपघात होत असतात. त्याचबरोबर अंबड येथील फडोळ मळा परिसराचाही दिवसेंदिवस विकास होत असताना याठिकाणी असलेली विहीर म्हणजे या परिसराची कचराकुंडी म्हणून तयार झाली आहे. ही विहीर रस्त्याच्या कडेला असून यात असलेल्या कचऱ्यामुळे या ठिकाणी विहीर आहे की नाही याबाबत लक्षातच येत नसल्याने अनेक अपघात झाले आहेत.

एकेकाळी पाणी देणाऱ्या अत्यंत गरजेच्या असलेल्या या विहिरी आता जीवघेण्या ठरत असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. सिडको व इंदिरानगर परिसरात असलेल्या विहिरींबाबत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. तसेच प्रत्येक विहिरीला संरक्षण भिंत बांधणे, त्याठिकाणी विहीर असल्याचा फलक लावणे यासारख्या गोष्टी केल्या पाहिजे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संरक्षक भिंत कोसळल्याने अपघाताचा धोका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

येथील आनंद रोडवर असणाऱ्या उघड्या नाल्यावरील संरक्षक भिंत गेल्या अनेक वर्षांपासून तुटली आहे. यामुळे रात्रीच्या समयी एखादा अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. गेल्या ३० वर्षापूर्वी कॅन्टोन्मेंट बोर्डाने या उघड्या नाल्याच्या बाजूला संरक्षक भिंत उभारली होती. तिला एवढ्या वर्षात कधीही दुरुस्त करण्यात न आल्यामुळे आता जागोजागी सिमेंटमध्ये बांधण्यात आलेले दगड निघाले आहेत. तर काही ठिकाणी संपूर्ण भिंतच कोलमडली आहे.

आनंद रोड रस्त्यावर स्टेट बँक ऑफ इंडिया, पोलिस स्टेशन, हिल रेंज परिसर अशी महत्त्वाची ठिकाणे असल्याने या रस्त्याचा वापर वाढला आहे. पहाटेच्या सुमारास आनंद रोड मैदानावर मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने घराबाहेर पडणारे अनेक नागरिक व व्यायामासाठी खंडेराव टेकडी, सह्याद्री नगर, आनंद रोड मैदानावर येणारे खेळाडू, जवळच्या डायमंड लॉज येथील मोफत दवाखान्यात येणारे रुग्ण व साईबाबा मंदिरात येणारे भक्तगण यांची या भागात सतत वर्दळ असते.

कॅन्टोन्मेंट बोर्ड हायस्कुल व प्रायमरी शाळेत जाणारे विद्यार्थी तसेच आर्टिलरी सेंटरला लामरोडशी जोडणारा हा मुख्य रस्ता असल्याने वाहतुकीची वर्दळ असते. या रस्त्यावर दिवसाकाठी एकदा अपघात होत असतो. शिवाय नाल्यावर संरक्षक भिंत नसल्याने कोणी नाल्यात पडून जीवितहानी होण्याची भीती राहते. स्वच्छ व सुंदर असा डंका मिरवणाऱ्या कॅन्टोन्मेंटची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होताना अशा परिस्थितीत संकल्पनेला खीळ बसण्याची शक्यता आहे.

नाला भूमिगत होण्याची नागरिकांना प्रतीक्षाच

गेल्या अनेक वर्षांपासून आनंद रोडवरील नाला भूमिगत करण्याची मागणी स्थानिक नागरिकांसह विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्ष करीत आहेत. यासाठी कॅन्टोमेंट बोर्डाने गेल्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या शहराच्या विकासकामांमध्ये हा नाला भूमिगत करून त्यावर ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बाक व बगीचा बनविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे सांगितले होते. मात्र दोन वर्षांपासून हा नाला भूमिगत करण्यासाठी निधी उपलब्ध होऊ शकलेला नाही. यामुळे परिसरातील नागरिकांना त्यासाठी प्रतीक्षाच असल्याचे चित्र आहे.

नागरिकच टाकतात घाण

कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून पावसाळ्यापूर्वी व दिवाळीच्या सुमारास या नाल्याची स्वच्छता करण्यात येते. मात्र दर दोन महिन्याला नाला स्वच्छ होणे गरजेचे आहे. मात्र या नाल्यामध्ये परिसरातील नागरिकच कचरा आणून टाकत असतात त्यावर प्रशासनाने बंदी करणे गरजेचे आहे.
दूषित पाण्यामुळे दुर्गंधीचा त्रास

त्रिमूर्ती चौकातून वाहत असणाऱ्या नाल्यात आजूबाजूच्या रहिवासी भागातून टाकण्यात आलेल्या भूमिगत गटारांचे पाणी सोडण्यात आल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. या पसरलेल्या दुर्गंधीने अनेकजण नाकाला रुमाल लावून ये-जा करतात. अनेकदा स्थानिक नागरिकांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना याबाबत सूचितदेखील करण्याचा प्रयत्न केला मात्र कार्यवाही होत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रीमियम दरवाढीसाठी साकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील शेतकऱ्यांच्या जमिनी आरक्षणात गेल्या असून, त्यांच्या ‘टीडीआर’ला मातीमोल भाव मिळत आहे. महापालिका आयुक्तांनी रहिवासी वापरासाठी ७० टक्के, तर व्यावसायिक वापरासाठी ८० टक्क्यांप्रमाणे दरवाढ सुचविली असून, सरकारने त्यास मान्यता द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली.

पालकमंत्री महाजन शनिवारी नाशिकमध्ये आले असता शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. भूखंडांच्या सरकारीदराच्या ४० टक्के दराने अतिरिक्त बांधकाम क्षेत्र महापालिकेने बिल्डर्सना विकण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. परंतु, सरकारच्या या निर्णयामुळे आरक्षणात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांच्या ‘टीडीआर’ला मातीमोल भाव मिळणार आहे. तसे होऊ नये यासाठी रहिवासी वापराकरिता ७०, तर व्यावसायिक वापरासाठी ८० टक्के याप्रमाणे दरवाढ मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी असून, महापालिकेने सुचविलेली प्रीमियम दरवाढ मंजूर करावी, अशी मागणी महाजन यांच्याकडे करण्यात आली. आरक्षणात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना देशोधडीला लावून बिल्डरांचे भले करण्याचा डाव काही राजकीय पदाधिकाऱ्यांकडून आखला जात आहे. परंतु, त्यांच्या दबावाखाली येऊन प्रस्तावात सुचविलेली दरवाढ रद्द होऊ देऊ नका, अशी विनंती शेतकऱ्यांनी महाजन यांना केली. यावेळी दिलीप दातीर, सोमनाथ बोराडे, सचिन काठे, कुंदन मौले, सुभाष नागरे आदी उपस्थ‌ित होते.

--

प्रस्तावच प्रलंबित

महापालिकेतील २०० ते २५० अतितातडीचे भूसंपादन प्रस्तावच वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. भूसंपादनासाठी १५० कोटींची तरतूद आर्थिक वर्षात केली असली, तरी महापालिकेच्या तिजोरीत पैसेच शिल्लक नाहीत. महापालिकेवर आधीच ६०० कोटींपेक्षा अधिकचे दायित्व प्रलंबित आहे. त्यामुळे अशा प्रीमियम दरवाढीच्या प्रस्तावावर निर्णय घेऊन प्रस्तावित दरवाढीनुसार अंमलबजावणी होणेच शेतकऱ्यांच्या हिताचे ठरणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेंद्रिय दूध निर्मितीला प्राधान्य द्यावे

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

सेंद्रिय शेतीइतकेच सेंद्रिय दूध निर्मितीलाही महत्त्व असून, अशा दूध निर्मितीचा हिस्सा वाढवायला हवा असा सूर कृषीथॉनमध्ये आयोजित चर्चासत्रात शनिवारी उमटला.

ठक्कर डोम येथे कृषीथॉन प्रदर्शनात सकाळी दूग्ध व्यवसायावर परिसंवाद झाला. त्यामध्ये पांजरापोळात नीर गायींवर संशोधन करणारे डॉ. सुरेश गंगावणे, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. धनंजय परकाळे, उपायुक्त डॉ. विसे, डॉ. प्रकाश धामणे, डॉ. शंतनु पाटील आदी सहभागी झाले. यावेळी पोल‌सि अधीक्षक संजय दराडे, जिल्हा परिषद सदस्य समाधान हिरे यांसह अनेक मान्यवर उपस्थ‌ति होते.

डॉ. गंगावणे म्हणाले, केवळ दुधाचे भाव वाढवून द्या अशी मागणी करून शेतकरी आणि दूध उत्पादकांचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यांना गाय आणि म्हशींशी संवाद देखील साधता यायला हवा. दुधाचा दर्जा, प्रत व उत्पादन वाढविण्यासाठी अनेक उपाय असून, त्याची माहितीही या चर्चासत्रामध्ये देण्यात आली. सेंद्रिय दूध निर्मिती वाढवितानाच आदर्श दूध उत्पादकांची यशोगाथा अन्य उत्पादकांसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

गोवंश हत्याबंदी विधेयकानंतर वाहनांची कडक तपासणी केली जाते. बेकायदेशीर काम करणाऱ्यांवर कारवाई होते. मात्र कारवाईत शेतकऱ्यांची अडवणूक होत नाही. शेतकऱ्यांनी गायी व गुरांची वाहतुक करताना ओळखपत्र जवळ बाळगावे असे आवाहन दराडे यांनी केले. साहिल व संजय न्याहारकर यांनी आभार मानले.

दूध उत्पादकांचा गौरव

या चर्चासत्रात आदर्श दुध उत्पादक राकेश निकम (मालेगाव), राजेंद्र मोरे (नगर), सारिका पोतले (पुणे) यांचा सत्कार करण्यात आला. पांडुरंग भामरे (सटाणा), उषा देशमुख (परभणी) यांना आदर्श देशी गोवंश संगोपक पुरस्कार देण्यात आला. अॅड. अंकुश कच्छवे (परभणी), शोभा राजपूत (औरंगाबाद) यांना आदर्श शेळी पालक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. अर्जुन कांबळे, डॉ. मधुकर बावके यांना पशुवैद्यक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आदर्श दूध प्रक्र‌यिा उद्योजक पुरस्कार दिलीप गागरे व अंकुश अंकाराम यांना प्रदान करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पेन्शनमध्ये हजार रुपयांची वाढ

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बालभारतीच्या पन्नास यशस्वी वर्षांचे साक्षीदार असलेल्या पेन्शनर्सला एक हजार रुपये प्रति महिना वाढ आणि दरवर्षी एक डीए, तसेच एक महिन्याचे सेवानिवृत्ती वेतन अधिक देण्यात येईल. बालभारतीची वैभवशाली परंपरा यशस्वीरित्या पुढे नेत असलेल्या कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार भेट म्हणून देण्यात येईल, अशी घोषणा बालभारतीचे अध्यक्ष तथा शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या (बालभारती) सुवर्णमहोत्सवी सांगता समारंभप्रसंगी व बालभारतीच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी शनिवारी गुरू गोविंद सिंग कॉलेजमध्ये आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ही घोषणा केली.

तावडे म्हणाले, बालभारतीचे गेल्या चार पाच पिढ्यांमधीले योगदान मोठे आहे. त्यामुळे बालभारतीच्या उपक्रमांची माहिती जनतेसमोर येणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या बालभारतीची रचना पाहण्यासाठी सहलीच्या माध्यमातून त्यांना न्यायला हवे, असेदेखील त्यांनी सुचवले. बालभारतीच्या किशोर मासिकाच्या डिजिटायझेशन उपक्रमाचे लोकार्पण करण्यात आले. तसेच कॉफी टेबल बुक, निफाडमधील वैनतेय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या ‘बालमनोन्मेष’ या हस्तलिखिताचे उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार सीमा हिरे, वर्षा तावडे, बालभारतीचे संचालक सुनील मगर, गायक स्वप्नील बांदोडकर, गुरू गोविंदसिंग फाऊंडेशनचे अध्यक्ष गुरूदेवसिंग बिरदी, हरजितसिंग, बलविरसिंग, शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, जयवंत जाधव आदी उपस्थित होते. विवेक गोसावी यांनी आभार मानले.

डिजिटल कनेक्टिव्हिटीवर भर

१९८० साली ज्ञानरचनावाद जगाने स्वीकारला भारताने मात्र तो २००६ साली स्वीकारला. ज्ञानरचनावादाप्रमाणेच राज्यातील अभ्यासक्रम बदलणे आवश्यक असल्याने शिक्षणपद्धतीत काही बदल होत आहेत. या बदलाने विद्यार्थ्यांना गाइडशिवाय परिक्षेला सामोरे जाणे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच इ-लर्निंगला प्राधान्य देण्यासाठी डिजिटल कनेक्टिव्हिटी राज्यातील सर्व शाळांमध्ये येत्या वर्षभरात आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर ‘ते’ मंदिर हटवले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापालिका प्रशासनाकडून शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटवण्याची कारवाई सुरू आहे. शनिवारी आजोंध्या बाबा मंदिर हटवताना पोल‌िस व पालिका प्रशासनात वाद झाल्याने महादेव मंदिर हटवण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत थांबली होती.

शहरातील ९ पैकी ६ धार्मिक स्थळे हटव‌िण्यात आली. मात्र भायगाव येथील आजोंध्या बाबा मंदिर, मोसमपूल परिसरातील शनी मंदिर, महादेव मंदिर हटव‌िण्यास विरोध झाल्याने या तीन मंदिरावरील कारवाई थांबली होती. अखेर शनिवारी पालिका व पोल‌िस प्रशासनाने बंदोबस्तात आजोंध्या बाबा मंदिर हटवले. तर शनी मंदिरातील मूर्ती स्थलांतरित करण्यात आली.

मागील आठवड्यात आजोंध्या बाबा मंदिर हटव‌ितांना परिसरातील महिलांनी दिवसभर ठिय्या आंदोलन केले होते. भाजप नेते अद्वय हिरे यांनी मंदिरासाठी त्यांच्या संस्थेची पर्यायी जागा दिल्याने वाद निवळा होता. मात्र मंदिर हटव‌िण्याचे काम प्रलंबित होते. तर शनीमंदिर व महादेव मंदिराबाबत मंदिर विश्वस्त व पालिका प्रशासन यांच्यात वाद असल्याने या मंदिरास देखील हटवण्यात आले नव्हते.

शनिवारी सकाळी प्रांताधिकारी अजय मोरे, नायब तहसीलदार जगदीश निकम, पालिका उपायुक्त अंबादास गरकल, डॉ. प्रदीप पठारे, सहआयुक्त राजू खैरनार, विलास गोसावी, प्रभाग अधिकारी पंकज सोनवणे यांच्यासह पोल‌िस उपाधिक्षक शशिकांत शिंदे, अजित हगवणे आजोंध्या बाबा मंदिराजवळ दाखल झाले. मंदिरातील मूर्तीची विधिवत पूजा करून मंदिरावर अखेर बुलडोजर चालवण्यात आला.

दुपारनंतर मोसमपुलावरील शनीमंदिर व महादेव मंदिर हटवण्याची कारवाई सुरू केली. गेल्या आठवड्यात शनी मंदिर परिसरातील चौथरा हटवण्यात आला होता. मात्र मंदिर कायम होते. हे मंदिर हटवण्याबाबत देखील प्रशासन ठाम असल्याने शनिवारी सकाळपासूनच मंदिर विश्वस्तांनी शनी देवतेची शिळा व हनुमान मूर्ती पर्यायी जागा उपलब्ध होईपर्यंत स्वप्नपूर्ती नगर येथील गणपती मंदिर येथे हलव‌िली.

आधी तक्रार करा, मग कारवाई करू...

गेल्या आठवड्यात आजोंध्या बाबा मंदिर हटवितांना स्थानिकांनी विरोध केला होता. त्यामुळे शनिवारी पोलिस बंदोबस्तात पालिका प्रशासनाकडून आजोंध्या बाबा मंदिर हटवण्याची कारवाई सुरू करण्यात आली. मात्र स्थानिकांकडून उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांना शिवीगाळ झाल्याचा प्रकार घडला. याबाबत पठारे यांनी पोल‌िस उपाधिक्षक अजित हगवणे यांना तक्रार केली. पोलिसांनी फिर्याद द्या मग कारवाई करू, असे सांगितल्याने संतप्त झालेल्या पालिका अधिकाऱ्यांनी मंदिर हटवून थेट प्रभाग एक कार्यालय गाठले. त्यामुळे मोसम पुलावरील शनीमंदिर हटवताना काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. रात्री उशिरापर्यंत महादेव मंदिर हटवण्याची कारवाई थांबली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य सेवेचा रुतला गाडा

$
0
0

संजय लोणारी, येवला

तालुक्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांचे उपकेंद्र कुलूपबंद अवस्थेत धूळ खात पडले आहेत. येवला तालुक्यातही मंजूर असलेली तब्बल ४४ पदे रिक्त असल्यामुळे ‘असूनही इमारती, रुतला आरोग्य सेवेचा गाडा’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

येवला तालुक्याच्या ग्रामीण भागात पूर्वीच्या तुलनेत अनेक ठिकाणी नवी प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे उभी राहिली आहेत. तालुक्यात अंदरसूल, मुखेड, पाटोदा व सावरगाव या जुन्या केंद्रांसह मागील वर्षी सुरू झालेले भारम अशी एकूण पाच प्राथमिक आरोग्य केंद्र, तर २३ उपकेंद्र सध्या कार्यान्वित आहेत. राजापूर येथे सुरू असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रासह देवठाण व एरंडगाव या दोन आरोग्य उपकेंद्रांचे सध्या काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, तालुक्यातील भुलेगाव व निमगाव मढ या ठिकाणच्या उपकेंद्रांच्या इमारतींचे काम पूर्ण होवूनही केवळ पदे भरली न गेल्याने या दोन ठिकाणी आरोग्य सेवेचा श्रीगणेशा होवू शकलेला नाही. निमगाव मढचे बांधकाम पूर्ण होवून दहा महिने झाली आहेत. भुलेगावची इमारत पूर्णत्वास जावून आता तब्बल तीन वर्षे उलटली असली तरी पदांची भरती केलेली नाही.

केंद्रनिहाय रिक्त पदे

भारम केंद्र (दहा पदे) :

दोन आरोग्य सहाय्यक, बाहयरुग्ण आरोग्यसेविका, औषधनिर्माण अधिकारी, चार शिपाई, सहाय‌िका, लिपिक.

अंदरसूल केंद्र (नऊ पदे) : आरोग्य सहायिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक, चार आरोग्यसेविका, शिपाई, वाहनचालक

सावरगाव केंद्र (सहा पदे) : आरोग्य सहाय‌िका, औषधनिर्माण अधिकारी, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका (प्रत्येकी २), परिचर

पाटोदा केंद्र (नऊ पदे) : तीन आरोग्यसेवक, चार आरोग्यसेविका, कनिष्ठ सहाय्यक, वाहनचालक

मुखेड केंद्र (दहा पदे) : वैद्यकीय अधिकारी, सहायिका, औषधनिर्माण अधिकारी, आरोग्यसेवक, तीन आरोग्यसेविका, सहाय्यक, वाहनचालक.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नार-पार योजनेवरून मालेगावात होर्डिंगबाजी

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

गेली कित्तेक वर्ष तालुक्याच्या राजकीय चर्चेत राहिलेला नार-पार प्रकल्पाच्या शिळ्या कढीला पुन्हा एकदा उत आला आहे. याविषयावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शहरातील चौकाचौकात अद्वय हिरे मित्र मंडळ व शिवसेना मालेगाव यांच्या वतीने होर्डिंग लावण्यात आले आहेत. तालुक्यात नार-पारचे पाणी आलेले नसले तरी होर्डिंगद्वारे श्रेयवादाचे युद्ध मात्र सुरू झाले आहे.

तालुक्यात सातत्याने पाण्याचे दुर्भिक्ष राहिले असल्याने याप्रश्नावर अनेक निवडणुकांमधून नार-पार, मांजारपाडा यांसारख्या प्रकल्पाबाबत आश्वासने दिली गेलीत. राजकीय आरोप-प्रत्यारोप झालेत. प्रत्यक्षात मांजरपाडा १ प्रकल्पाचे पाणी देखील मालेगावला मिळाले नाही, तर मांजरपाडा २ व नार-पारचा प्रकल्प अद्याप मार्गी लागलेला नाही. या प्रकल्पाबाबत नुकतीच नाशिक येथे बैठक झाली आणि त्यानंतर हा प्रश्न चर्चेत आला. यावरून सेना-भाजपात श्रेयावाद रंगला आहे. शहरात ठिकठिकाणी लागलेल्या होर्डिंगमुळे मात्र शहर व तालुक्यातील मतदारांना पुन्हा एकदा नार पार प्रकल्पाची आठवण झाली असून ‘नार-पार म्हणजे काय र भाऊ?’ 'असा मिश्कील सवाल देखील पाहणाऱ्यांना पडत आहे.

शाब्दिक टोले

अद्वय हिरे मित्र मंडळाने ‘समाजश्री प्रशांतदादा हिरे यांच्या मेहनतीला फळ आले’ असेे होर्डिंग लावले असून, नार-पार दमणगंगा नदीजोड प्रकल्पास मजुरी प्रदान केल्याबद्दल नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत. तर तिकडे शिवसेनेच्या वतीने देखील ‘नार-पारच्या जलपूजनाला चला ... !’ असे शीर्षक असलेले होर्डिंग लावण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फिटनेस फेस्टिवलची नाशिककरांना पर्वणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हिवाळा ऋतू आला, की अनेक जण सकाळी जॉगिंगला जाण्याचा संकल्प करतात. पण, थंडीमुळे हा संकल्प काही प्रत्यक्षात उतरत नाही आणि फिटनेस फक्त विचारांपुरताच मर्यदित राहतो. पण, यंदा फिटनेस विचारांपुरता मर्यादित राहणार नाही, तर तो प्रत्यक्षात अनुभवण्याची संधी सर्वांना उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब सर्वांना ही संधी उपलब्ध करून देत आहे.

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब आणि नवीन डान्स अॅकॅडमीतर्फे खास कल्चर क्लब सदस्यांसाठी विंटर फिटनेस फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार (दि. २७ नोव्हेंबर) ते ६ डिसेंबर असे दहा दिवस हा फिटनेस फेस्टिवल रंगणार आहे.

कॉलेजरोडवरील फिटनेस लाऊंज या ठिकाणी हा विंटर फिटनेस फेस्टिवल होणार आहे. सकाळी ८ ते ९, ११ ते १२, सायंकाळी ५ ते ६ आणि रात्री ८ ते ९ या वेळेत तुम्हाला त्यात सहभागी येईल. पूर्ण दहा दिवस या फिटनेससंदर्भातल्या बॅचेस असतील, त्यामुळे त्याचे रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर ज्यांना कल्चर क्लबचे सदस्यत्व रिन्यू करावयाचे असेल त्यांनी ते त्वरित करावे.

या विंटर फिटनेस फेस्टिवलमध्ये झुम्बा, बोकवा, स्टेप एरोबिक्स, बूट कॅम्प या डान्स प्रकारांचे कॉम्बिनेशन शिकविले जाणार आहेत. डाएटसंदर्भातील टिप्स आणि योगासंदर्भातही प्रशिक्षण दिले जाईल. कल्चर क्लब सदस्यांना यासाठी कुठलेही शुल्क नसून, इतरांसाठी ४०० रुपये रजिस्ट्रेशन फी ठेवण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य असून, कार्यक्रमाच्या ठिकाणी वेळेवर प्रवेश देण्यात येणार नाही. रजिस्ट्रेशनसाठी ०२५३-६६३७९८७ आणि ७०४०७६२२५४ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदयात्री घड्याळजींचा नाशिककरांतर्फे सत्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

श्री रामेश्वर ते केदारनाथ अशा बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्यासाठी पायी प्रवासाला निघालेल्या पुण्यातील दिवाकर घड्याळजी यांचा नाशिककरांच्या वतीने रविवारी सत्कार करण्यात आला. गुरू गंगेश्वर वेद मंदिर येथे झालेल्या सत्काराला नाशिकच्या विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

बारा ज्योर्तिलिंगपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन घड्याळजी यांचे शहरात आगमन झाले. ते मध्य प्रदेशकडे रवाना होणार आहेत. श्री रामेश्वराचे दसऱ्याला दर्शन घेऊन त्यांनी या ज्योतिर्लिंग पायी प्रवासाला प्रारंभ केला. ५६ दिवसात दोन हजार किलोमीटरचा प्रवास करून त्यांनी ६ ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतले आहे. दिवाकरजी राज्य सरकारच्या पाटबंधारे खात्यातून उपअभियंता पदावरून निवृत्त झालेले आहेत. आतापर्यंत त्यांनी १०० दिवसांत नर्मदा परिक्रमा, ४० दिवसात गंगोत्री-जमुनोत्री व बद्रीनाथ आणि केदारनाथ ही चारधाम यात्रा आणि १५ दिवसात अष्टविनायक यात्रा पायी पूर्ण केलेली आहे.

यापूर्वी अवघ्या ११ दिवसांमध्ये बाराही ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेणारे नाशिकचे नंदकुमार देसाई, डॉ. विश्वास सावकार, दीपक शिर्के, राजेंद्र फड आणि विलास वाळके या साहसवीरांच्या हस्ते घड्याळजी यांचा सत्कार करण्यात आला. नाशिक सायकलिस्टच्या वतीनेही त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रवीणकुमार खाबिया, देविदास आहेर, प्रतिभा आहेर उपस्थित होते.

घड्याळजी यांनी सुरू केलेली यात्रा मार्च महिन्यात संपणार आहे. घड्याळजी यांचा जन्म नाशिकला झाला. त्यांचे शालेय शिक्षण सोलापूर येथे झाले. त्यानंतर अहमदनगर व पुणे येथे पाटबंधारे खात्यात नोकरी केली. गेल्या ४० वर्षांपासून ते सातत्याने पंढरपूरचा पायी यात्रा करीत आहेत. रोज ५० किलोमीटर ते पायी चालतात. महिन्याला १ हजार किलोमीटरचा टप्पा ते पार करतात. आतापर्यंत त्यांनी ३३ टक्के प्रवास पूर्ण केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर झाले होर्डिंगमय

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महानगरपालिका निवडणुकीनंतर शहरात पुन्हा विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या कार्यक्रमांमुळे डिज‌िटल बॅनरची दाटी झाली आहे. सामान्य नागरिकांना याचा वीट आला आहे. डिज‌िटल बॅनरबरोबरच शहरातील विविध प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा पक्षाचे झेंडे लावण्यात आल्याने शहर विद्रूप होत आहे. रविवारी विविध राजकीय नेत्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांचीही मोठी गर्दी होती. काही ठिकाणी ट्रॅफिक जामची समस्याही निर्माण झाली.

रविवारी भाजपने उत्तर महाराष्ट्र आढावा बैठक घेतली. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे गेले दोन दिवस नाशिकमध्ये तळ ठोकून होते. या कार्यक्रमासाठी चार जिल्ह्यांतून विविध पदाधिकारी नाशिकला आल्यामुळे त्यांच्या स्वागताचे फलक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी लावले. काँग्रेसने संविधान दिनाचे निमित्त साधून मोठा कार्यक्रम घेतला. त्यात राष्ट्रीय सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांची उपस्थिती होती. त्यामुळे त्यांच्या स्वागताचे व कार्यक्रमाचे पोस्टर्स शहरात सगळीकडे लावण्यात आले होते. या दोन्ही नेत्यांबरोबरच मनसे विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आदित्य शिरोडकर यांचेही शहरात आगमन झाल्यामुळे विद्यार्थ्यांचीही गर्दी होती.

परवानगीबाबत साशंकता

राजकीय पक्षांनी लावलेल्या या डिज‌िटल बॅनरसाठी परवानगी घेतली की नाही, याबाबत साशंकता असते. याबाबतची माहिती, त्याची आकडेवारी किंवा कोणी परवानगी घेतली याची माहिती समोर येत नाही. महानगरपालिकेचे याकडे सुरुवातीपासून दुर्लक्ष असल्यामुळे त्यावरही नागरिक संताप व्यक्त करत आहेत. गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, मनसेचे नेते राज ठाकरे, तर भाजपचे नेते व मंत्री विनोद तावडे यांच्यासह अनेक नेत्यांनी हजेरी लावली. कोणतीही निवडणूक नसताना हे डिज‌िटल बॅनर शहराला विद्रूप करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुंबई हल्ल्यातील शहिदांना अभिवादन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तरुणाईच्या मनात स्फूर्ती चेतविणाऱ्या देशभक्तीपर गीतांच्या सुरावटींत दुर्गम भागातून आलेल्या तरुणाईने संचलनाद्वारे शहीदांना दिलेली मानवंदना अन् देशासाठी कौशल्यविकासाद्वारे योगदान देण्याची प्रतिज्ञा करीत २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील शहिदांना अभिवादन करण्यात आले.

पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेंतर्गत कारडा कन्स्ट्रक्शन संचालित कारडा स्किलिंग सर्व्ह‌िसेसच्या वतीने शहिदांना आदरांजली अर्पण करण्यात आली. द्वारका परिसरातील माणेकशानगरमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कारडा स्क‌िलिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल अमर, उपाध्यक्षा अंजू अमर, ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर, प्रकल्पप्रमुख विजय भोसले, दीपाली मालपुरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थ‌ित होते.
मुंबई हल्ल्यातील शहिदांना दुर्गम भागातील युवकांनी संचलनाद्वारे आदरांजली अर्पण केली. त्यानंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. सिक्युरिटी गार्ड, बीपीओ आणि हॉस्प‌िटॅलिटी असिस्टंस या प्रशिक्षण वर्गांचे सुमारे पावणेदोनशे प्रशिक्षणार्थी यावेळी उपस्थ‌ित होते. धनश्री पाटील, किरण पाटील, गणेश शेळके, सागर गायकवाड या प्रशिक्षणार्थींनी देशभक्तीपर गीते, कविता वाचन व वक्तृत्वाद्वारे आपल्यातील कलागुणांचे दर्शन घडविले. भोसले यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत पाटणकर यांनी सूत्रसंचालन केले.

--

युवकांना योगदानाचे आवाहन

हा हल्ला केवळ मुंबईवर नव्हता, तो देशावर आणि मातीवर झालेला हल्ला होता. देशावर झालेले हल्ले परतावून लावत आपण आपले सामर्थ्य जगाला दाखवून दिले. देशाच्या सीमा आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी सैन्य दल आणि पोलिस सज्ज आहेत. परंतु, सजग नागरिक म्हणून आपणही काही कर्तव्ये जाणिवपूर्व पार पाडायला हवीत. येथील प्रशिक्षणार्थींनी स्वत:मधील कौशल्यांचा विकास करून त्याचा उपयोग विधायक कामांसाठी केला तरी तीदेखील देशसेवाच आहे. चांगला माणूस बनून युवकांनी राष्ट्र उभारणीत योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पशुधन विकास अधिकाऱ्याचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

केंद्र सरकारच्या नियमानुसार जनावरांना टॅग लावून युआयडी क्रमांक देण्यात येत आहे. हे काम करीत असताना म्हशीने लाथ मारल्याने सहाय्यक पशुधन विकास अधिकाऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. २४) अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर गावात घडली. दशरथसिंग वनसिंग पाडवी (वय ५७) असे मृत अधिकाऱ्याचे नाव असून, या घटनेमुळे संतप्त पशुधन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना जनावरांच्या कानाला युआयडी क्रमांक असलेले बिल्ला लावण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यासाठी वाण्याविहीर येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे सहाय्यक पशुधन विकास अधिकारी दशरथसिंग पाडवी हे धीरज क्षत्रिय यांच्या शेतात गेले होते. या वेळी म्हशीला टॅग लावण्याचे काम सुरू असतानाच म्हशीने त्यांना लाथ मारली. त्यामुळे तोल जाऊन ते जवळच असलेल्या विहिरीत पडले. विहिरीच्या कठड्याचा मार बसल्याने ते जखमी झाले. ग्रामस्थांनी त्यांना विहिरीबाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना शुक्रवारी (दि. २४) रात्री जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच उपचारादरम्यान त्यांचा शनिवारी (दि. २५) मध्यरात्री मृत्यू झाला. याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गांधर्व’च्या विद्यार्थ्यांची मधुर गुरुवंदना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या गायन व संगीत साधना करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली कला पेश करून गुरुवंदना सादर केली. गांधर्व महाविद्यालय, नाशिकचे संचालक गुरू कमलाकर जोशी (भाऊ) यांच्याप्रति आदर व्यक्त करून विद्यार्थ्यांनी स्वरमधुर गुरुवंदना अर्पण केली.

गांधर्व महाविद्यालयातर्फे गुरू कमलाकर जोशी यांच्या शिष्यवर्गाची गायन-वादनाची मैफल पं. विष्णू दिगंबर पलुस्कर संस्थापित श्री रामनाम आधाराश्रम, पंचवटी येथे झाली. या मैफलीस प्रमुख पाहुणे डॉ. जयंत वाघ, विशेष अतिथी गोविंदराव पलुस्कर व मोमिना चॅटर्जी (संगीतप्रवीण) यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली.

यात प्रथम मोमिना चटर्जी यांनी राग पूरिया कल्याण सादर केला. त्यांना हार्मोनियमवर कमलाकर जोशी व तबल्यावर अनुराग जोशी यांनी साथसंगत केली.

शुभम तायडे, मानसी पाटील, तन्मय जाधव, अमृता डहाके, सुरेंद्र जालिहालकर यांनी शास्त्रीय गायन, नाट्यगीत, अभंग सादर केले. बाल गटात सार्थक, प्रणम्य, अर्णव, रुद्र, यज्ञेश यांनी त्रितालमध्ये कायदा, पलटा, तिहाई, चक्रदार इत्यादी वादन केले. समूह गायनात राग मालकंस स्वरमालिका व आलाप इत्यादी प्रकार कार्तिक, गार्गी, श्रद्धा, स्वरांगी, मनाली यांनी सादर केले.

मोठ्या गटाच्या तबलावादनात विद्यार्थ्यांनी झपताल वाजवून सर्वांची मन जिंकली. यात उमा, रोहन, गौरव, विपुल, तसेच सुयश मुळे, यश चांडक यांनी उत्तम प्रकारे सादरीकरण केले. गुरू कमलाकर जोशी यांनी सतारीवर चंद्रकंस राग वाजवून कार्यक्रमाची सांगता केली. सुनेत्रा मांडवगणे यांनी निवेदन केले. नकुल दायमा, अनुराग जोशी, सचिन भालेराव, शुभम तायडे यांनी तबला व हार्मोनियमवर साथसंगत करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.

--

बहारदार सादरीकरणाने वाहवा

चिन्मयी जोशी हिचे व्हायोलिन वादन व क्षितिजा शेवतकर यांची राग शिवरंजनीमध्ये जुगलबंदी सादरीकरण हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. चिन्मयी जोशी हिने गगन सदन ही प्रार्थना व्हायोलिनवर सादर केली. केतकी गोरे राग पूरिया कल्याण व क्षितिजा शेवतकर यांनी राग बहार सतारीवर स्वतंत्र वादन करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. सुनीता देशपांडे व ज्योती डोखळे यांनी सतारीवर राग शिवरंजनीमध्ये एक धून सादर केली. अमला खाडिलकर हिने एकल तबलावादनात ताल रुद्रमध्ये कायदा, पलटा, चक्रधार, फरर्माशी चक्रधार, परण, कमाली परण इत्यादी सादरीकरण करून कार्यक्रमाची रंगत वाढविली. प्रणव पुजारी यांनी सतारीवर राग बागेश्री एकतालमध्ये सादर केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्राद्ध टाळून दिव्यांगाला सायकल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

घरातील एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर दशक्रिया, श्राद्ध आदी विधी करण्यात येतात. या विधींना बराच खर्च येत असतो. तो टाळून काहीतरी समाजोपयोगी कार्य करण्याकडे काहींचा कल दिसून येतो. त्यापैकीच एक ठरलेल्या शहरातील बर्वे कुटुंबीयांनी त्यांच्या कुटुंबातील संजय बर्वे यांच्या निधनानंतर या विधींना फाटा देत खर्च करण्याचे टाळून जळगाव जिल्ह्यातील एका दिव्यांगाला सायकल दिली आणि समाजापुढे वेगळा आदर्श निर्माण केला.

नवनाथपंथी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी योगेश बर्वे आणि प्रकाश बर्वे यांचे बंधू संजय बर्वे यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर करण्यात येणारे धार्मिक विधी टाळून त्या खर्चाच्या रकमेतून त्यांनी उदांनी (ता. पारोळा, जि. जळगाव) येथील दाभाजी भाऊ पाटील या दिव्यांगाला तीनचाकी सायकल घेऊन दिली. अशा प्रकारच्या मदतीतून त्यांना आपल्या भावाला श्रद्धांजली अर्पण केली. सामाजिक कार्यकर्ते सुरेश बोडके यांच्या हस्ते ही सायकल पाटील यांना देण्यात आली. गोदावरी गटारीकरणविरोधी मंचाचे अध्यक्ष निशिकांत पगारे, प्रहार जनशक्तीचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख दत्तू बोडके, जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे, शहराध्यक्ष श्याम गोसावी, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष जगन काकडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नेहरूनगरमधील रस्ताकामास लाभला मुहूर्त

$
0
0

म. टा. इम्पॅक्ट


म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नेहरूनगरमधील दुरवस्था झालेल्या रस्त्यांचे काम प्रेस प्रशासनाने सुरू केले आहे. नागरिकांकडून अनेक दिवसांपासून रस्तादुरुस्तीची मागणी केली जात होती. येथील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे कर्मचारी, विद्यार्थी आणि वाहनचालकांचे हाल होत असल्याचे वृत्त ‘मटा’मध्ये प्रसिद्ध होताच प्रेस प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेत काम सुरू केल्याने रहिवाशांनी समाधान व्यक्त केले असून, बंद पथदीप सुरू करण्याची मागणी केली आहे.

नेहरूनगरमधील बंद पथदीप सुरू करावेत, रस्ते दुरुस्त करावेत, अशी मागणी बीइंग कॉमन संस्थेचे अध्यक्ष विक्रम कदम आणि रहिवाशांनी केली होती. ‘मटा’नेही याप्रश्नी पाठपुरावा केला होता. या रस्ता कामाचे भूमिपूजन नुकतेच प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे आदींच्या हस्ते झाले. आता त्याचे काम सुरू झाले आहे. खराब झालेला रस्ता फोडून त्यात मुरूम टाकण्यात आला आहे. त्यावर पाणी मारून रोलर फिरविला जात आहे.

नेहरूनगर ही प्रेस कामगारांची वसाहत आहे. येथे असंख्य इमारती असून, त्यामध्ये प्रतिभूती आणि चलार्थपत्र मुद्रणालयाचे कामगार राहतात. वीस वर्षांपूर्वी प्रेसमध्ये एकूण वीस हजारांवर कामगार होते. त्यांच्यासाठी नेहरूनगर वसाहत उभारण्यात आली होती. प्रेसचे महामंडळात रुपांतर झाल्यानंतर प्रेस कामगारांची संख्या आता पाच ते सहा हजारांवर आली आहे. साहजिकच असंख्य इमारती असलेली नेहरूनगर वसाहत बरीच रिकामी झाली आहे. अनेक इमारतींतील निम्मी घरे रिकामी आहेत. प्रेसची सुरक्षा बघणाऱ्या सीआयएसएफ संस्थेचे जवान आता कुटुंबीयांसह येथे राहतात.

नेहरूनगरच्या प्रवेशद्वारातच खड्डा आहे. वाहतूक बेटाच्या वळणावर तर अनेक खड्डे आहेत. उपनगर पोलिस ठाण्याकडे जाताना मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. पोलिस ठाण्यासमोर एक घातकी खड्डा आहे. काही ठिकाणी नावाला डांबराएेवजी सिमेंट टाकून खड्डे बुजविण्यात आले होते. खराब दर्जाचे काम असल्याने खड्डे पुन्हा उखडले. सीआयएसएफच्या जवानांनी वर्षापूर्वी श्रमदान करून रस्त्याची डागडुजी केली होती.

--

या रस्त्यांची कामे सुरू

नाशिकरोड व जेलरोडला जाण्यासाठी नेहरूनगरमधील रस्ता सोयीचा आहे. या रस्त्यावर उपनगर पोलिस ठाणे, केंद्रीय विद्यालय, सीआएसएफचे कार्यालय आहे. शालेय विद्यार्थी, पोलिस, सीआयएसएफचे जवान, नोकरदार या मार्गाचा वापर करतात. याच वसाहतीतून इच्छामणी गणेश मंदिर, शिखरेवाडीकडे रस्ता जातो. तेथील रस्ते तर पार उखडलेले आहेत. खड्डे चुकविताना दोन वाहने समोरासमोर येऊन अपघात होत आहेत. पोलिस ठाणे व केंद्रीय विद्यालयासमोरील रस्ताही खराब झालेला आहे. वाहतूक बेटावर सर्व बाजूंनी रस्ता उखडलेला आहे. सायकल स्टँडजवळ यापेक्षा वाईट अवस्था आहे. या सर्व ठिकाणी आता रस्तादुरुस्ती सुरू झाली आहे.

-------------

अन् पोलिस लाइन उजळली


म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

येथील पोलिस लाइनमधील पथदीपांची दुरुस्ती करून गरजेनुसार नवे पथददिवे बसविल्याने बऱ्याच कालावधीनंतर पोलिस लाइन उजळली आहे. येथील बहुतांश पथदीप बंद असल्याने पोलिस लाइन गेल्या महिनाभरापासून अंधारात होती. नागरिकांनी तक्रारी करूनही उपयोग होत नव्हता. समता परिषदेनेही मागणी केली होती. ‘मटा’मध्ये याबाबतेच वृत्त प्रसिद्ध होताच ही कार्यवाही झाली आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

नाशिकरोड पोलिस लाइनमध्ये पोलिसांची वसाहत, विभागीय माहिती अधिकारी कार्यालय, डिस्टिलरी क्वार्टर्स कर्मचारी वर्ग तीनची निवासस्थाने व लष्कर भरती प्रशिक्षण केंद्र आहे. पोलिस लाइनमध्ये दीडशे कुटुंबे राहतात. गेल्या महिनाभरापासून दिवसांपासून येथील पथदीप बंद होते. येथे गवतही वाढलेले आहे. शासकीय कर्मचारी भाडे भरतात, तरीही रस्ते, लाअट, पाणी यांसारख्या मूलभूत समस्यांना तोंड द्यावे लागते. सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिल्यावर ते महापालिकेकडे बोट दाखवतात. ही वसाहत आमच्या हद्दीत नाही, असे महापालिका सांगते. आता किमान पथदीप सुरू झाल्याने समाधान व्यक्त होत असून, परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

-------------

एमआयडीसीत खड्डेदुरुस्ती


म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतींतील रस्त्यांवरील खड्डे डांबर टाकून बुजविण्यात येत आहेत. सुरुवातीला महापालिकेने मुरुमाची मलमपट्टी करीत खड्डे बुजविले होते. परंतु, आठच दिवसांत रस्ते पुन्हा खड्डेमय झाले होते. येथील रस्त्यांच्या दुरवस्थेचे वृत्त ‘मटा’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिकेने सातपूर व अंबड एमआयडीसीतील रस्त्यांवरील खड्डे डांबरीकरण करून बुजविण्यास प्रारंभ केला आहे. निमा व आयमा संघटनेने अनेक वर्षांपासून एमआयडीसीतील सर्वच रस्त्यांचे नव्याने डांबरीकरण करण्याची मागणी केली होती. याकडे महापालिका कधी लक्ष घालणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. महापालिकेने एमआयडीसीला मूलभूत सेवा देताना सर्वच रस्त्यांचे डांबरीकरण करावे, अशी मागणी उद्योजकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images